Wednesday, 12 October 2016

नमस्कार लाईव्ह १२-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- न्यूयॉर्कमध्ये पुरुषांना औषधांसाठी द्यावा लागणार 7 टक्के टॅक्स 
२- काबुलमध्ये मशिदीवर हल्ला; 14 जणांचा मृत्यू 
३- लक्षद्विपला भूकंपाचा धक्का 
४- पत्रकार अल्मेडा यांना पाकिस्तान सरकारची देश सोडण्यास मनाई 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- केबलसेवा स्वस्त करण्यासाठी ट्रायचा पुढाकार 
६- युती मोडाल, तर सेनेचं सर्जिकल स्ट्राईक दाखवू : उद्धव ठाकरे 
७- दसऱ्यानिमित्त शिर्डीच्या साईंचरणी कोट्यवधींचं दान 
८- पुण्यात महाराष्ट्र एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरुन घसरले 
९- सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर करणार नाही - केंद सरकार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- बाबासाहेबांमुळेच देश अखंड - मुख्यमंत्री 
११- नाशकात बससेवा ठप्प, इंटरनेट-बिअर बारही तीन दिवस बंद 
१२- भुजबळांना जे. जे. रुग्णालयातून हलवणार, जेल प्रशासनाला पत्र 
१३- तीन पॉर्न फिल्म दाखवून मोनिका घुरडेवर बलात्कार, त्यानंतर हत्या! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- सांगलीत पोलिस अधीक्षकांच्या घराच्या आवारातच दरोड्याचा प्रयत्न 
१५- बेळगावात कोट्यवधींची सांबराची शिंगं, हत्तीचे सुळे, वाघनखं जप्त 
१६- पुण्यातील हिंगण्यात तरुणाची निर्घृण हत्या 
१७- पम्पोरमध्ये 48 तासांपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु 
१८- मुलुंडमधील भाजपच्या आंदोलनात राडा, पाच जणांना अटक 
१९- ठाणे; युवासेनेच्या पदाधिकाऱ्याकडून साडेचार वर्षाच्या मुलीवर बलात्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- अ‍ॅपल-सॅमसंग लढाई सर्वोच्च न्यायालयात
२१- रेल्वेला बसविणार आर-पार काचांचे छत; पर्यटनाला मिळणार उभारी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=====================================

सांगलीत पोलिस अधीक्षकांच्या घराच्या आवारातच दरोड्याचा प्रयत्न

सांगलीत पोलिस अधीक्षकांच्या घराच्या आवारातच दरोड्याचा प्रयत्न
सांगली : सांगलीतील पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारातच दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ल्याचाही प्रयत्न केला.
दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या परिसरातील चंदनाची झाडं तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यावेळी त्यांना अडवायला गेलेल्या पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेलं नाही.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांकडून सत्तूर आणि करवत जप्त करण्यात आली आहे. बुधवारी पहाटे ही घटना घडल्याची माहिती आहे.

=====================================

रावणदहन करताना जळता पुतळा अंगावर पडून जवानाचा मृत्यू

रावणदहन करताना जळता पुतळा अंगावर पडून जवानाचा मृत्यू
मुरादाबाद : विजयादशमीला रावणदहन करताना पेटलेला पुतळा अंगावर पडून एका जवानाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे.
मंगळवारी रात्री मुरादाबादच्या रामलीला ग्राऊंडवर सालाबादप्रमाणे रावण दहनाचा कार्यक्रम होता. रावणाचं दहन होताच काही सेकंदांनी रावणाचा जळता पुतळा एका बाजूला कोसळला. त्या पुतळ्याखाली अनेक जण अडकले.
तात्काळ रेस्क्यु ऑपरेशन करुन अडकलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्या अपघातात सिव्हिल डिफेन्सचा जवान धर्मेंद्र दिवाकरचा मृत्यू झाला.
ही घटना एका कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेनंतर झालेल्या धावपळीमध्येही काहीजण जखमी झाल्याची माहिती आहे.


=====================================

भुजबळांना जे. जे. रुग्णालयातून हलवणार, जेल प्रशासनाला पत्र

भुजबळांना जे. जे. रुग्णालयातून हलवणार, जेल प्रशासनाला पत्र
मुंबई : राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांना जे.जे. रुग्णालयातून एखाद्या अद्ययावत हॉस्पिटलमध्ये हलवलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. रुग्णालयाकडून तशा प्रकारचं पत्र जेल प्रशासनाला पाठवण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून भुजबळांच्या तब्येतीमध्ये चढउतार होत आहे. त्यासाठी काही विशेष तपासण्या करण्याची गरज आहे. त्या तपासण्यांची सोय जे.जे. रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळेच अशा तपासण्यांची सुविधा असलेल्या रुग्णालयात त्यांना दाखल केलं जाणार असल्याची माहिती जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी दिली आहे.
त्यासाठी लहाने यांनी जेल प्रशासनाला पत्रही लिहिलं आहे. पण असे कोणतेही पत्र मिळालं नसल्याचा दावा जेल प्रशासनाने केला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ सध्या तुरुंगात असून त्यांच्यावर जेजेमध्ये उपचार सुरु आहेत.

=====================================
बाबासाहेबांमुळेच देश अखंड - मुख्यमंत्री 


नागपूर - ""देश शेकडो खंडात विभागला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय घटनेच्या सांस्कृतिक ऐक्‍यातून देश अखंड झाला. हे अखंड राष्ट्र विकासाकडे, सामाजिक न्यायाच्या दिशेने नेण्याचे या राष्ट्रनिर्मात्याने केले. बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते होते,‘‘ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात नागपूरच्या दीक्षाभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई होते. याशिवाय जपान, थायलंड, नेपाळ, भूतान, म्यानमारसह विविध बौद्ध देशांतील भन्ते उपस्थित होते. 

दसऱ्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "आम्हाला युद्ध नको, ही बुद्धाची भूमी आहे‘, असे सांगितल्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले, ""जगातील बौद्ध राष्ट्रांची प्रगती झाल्याचे चिंतन बाबासाहेबांना होते, यामुळेच प्रगतीच्या दिशेने झेप घेणारा, अखिल मानवाला जोडणारा बौद्ध धम्म येथे दिला. संविधानाच्या माध्यमातून देश विकासाकडे झेप घेत आहे. सामाजिक न्याय देशात प्रसारित आहे. शिक्षणाची संधी साऱ्यांना मिळत आहे. भारतीय घटनेत सर्वच प्रश्‍नांची उत्तरे आहेत.‘‘
मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या विचारांच्या स्मारकाचा सर्वसमावेश आराखडा तयार झाला असून, दीक्षाभूमीच्या विकासाचाही आराखडा तयार आहे. अमरावती येथे रा. सू. गवई यांच्या स्मारकासाठी 25 कोटी देण्याची घोषणाही या वेळी केली.

"ऍट्रॉसिटी‘ रद्द होणार नाही 
"ऍट्रॉसिटी‘ कायदा मागासवर्गीयांना संरक्षण देण्यासाठी आहे. तो रद्द करण्याचा विचार केंद्र व राज्य सरकारचा नाही. बाबासाहेबांचे अनुयायी याचा दुरुपयोग करू शकत नाहीत आणि तसे करणारे बाबासाहेबांचे अनुयायी नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठ्यांचे मोर्चे दलितांच्या विरोधात नाहीत. त्यामुळे कोणीही अस्वस्थ होण्याचे कारण नाही. प्रत्येक मागासांना आरक्षण देण्याची तरतूद घटनेत असून, ते बहाल करण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी आम्हाला घटनेच्या माध्यमातून दिली असल्याचे सांगत मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. 
=====================================

No comments: