Sunday, 23 October 2016

नमस्कार लाईव्ह २३-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्क अमेरिका उद्ध्वस्त करेल! - अमेरिकेचे टेररिझम आणि फायनान्शियल इंटेलिजिएन्सचे अॅक्टिंग अंडर-सेक्रेटरी अॅडम जुबिन 
२- सेक्स करण्यासाठी ट्रम्पनी दिली होती 10 हजार डॉलरची ऑफर - महिलेने केला आरोप 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- पुरंदरेंचा 'महाराष्ट्र भूषण' परत घ्या, वर्ध्यात मराठा समाजाची मागणी 
४- गेल्या काही दिवसांपासून देशात असहिष्णुता पाहतोय : रतन टाटा 
५- पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारा - शहीद गुरुनामच्या वडिलांची मागणी 
६- दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को नॉनस्टॉप उड्डाण करून एअर इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये 
७- तीन मोबाइल कंपन्यांवर कारवाईचा बडगा ! 
८- इस्लामशी संघर्ष कराल तर संपाल : मौलाना मुफ्ती रशीद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- 'ऐ दिल है मुश्किल'ला परवानगी : राज ठाकरे 
१०- खड्डे दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा: चंद्रकांत पाटील 
११- सैन्याला स्वत:चा स्वाभिमान, खंडणीचा पैसा नको, उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला 
१२- आगामी निवडणुकांतही भाजप अव्वल स्थानावरच राहील, मुख्यमंत्र्यांचा दावा  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- मराठा मोर्चाचं वादळ आज कोकणात, उदयनराजेही उपस्थित राहणार 
१४- मुंबईत मध्य रेल्वेवर 9 तासांचा मेगाब्लॉक 
१५- कल्याण; रेल्वे अपघातात तरुणीने पाय गमावला 
१६- जालना जिल्ह्यात विहरीत पडून युवकाचा मृत्यू 
१७- गोव्यात युतीची घोषणा आणि जागावाटप दिवाळीनंतर- उद्धव ठाकरे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- सॅमसंग गॅलेक्सी C9 प्रो लॉन्च, तब्बल 6 जीबी रॅम, 16 मेगापिक्सेल कॅमेरा 
१९- अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं रंगमंचावरच निधन 
२०- भारताने सलग तिस-यांदा जिंकला कबड्डी विश्वचषक 
२१- भारताने वचपा काढला, विराटने केली किवींची शिकार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
===================================

गेल्या काही दिवसांपासून देशात असहिष्णुता पाहतोय : रतन टाटा

गेल्या काही दिवसांपासून देशात असहिष्णुता पाहतोय : रतन टाटा
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी देशात कथित स्वरुपात वाढणाऱ्या असहिष्णुतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. “असहिष्णुता एक शाप आहे, जो गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत आहोत.”, असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. “देशातील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की, असहिष्णुता कुठून येते आहे आणि काय आहे. देशातील हजारो-लाखो लोकांमधील प्रत्येकाला असहिष्णुतेपासून मुक्तता हवी आहे.”, असे टाटा म्हणाले.
मध्य प्रदेशमधील सिंधिया स्कूलच्या 119 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात संबोधित करताना काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी असहिष्णुतेबाबत आपलं मत व्यक्त केलं. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना रतन टाटांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मताचं समर्थन केलं. शिवाय, टाटा म्हणाले, “शिंदे यांनी असहिष्णुतेबाबत मत व्यक्त केलं. असहिष्णुता एक शाप आहे, जे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत आहोत.”
रतन टाटा म्हणाले, “आपल्याला देशात असं वातावरण हवं आहे, जिथे आपण सर्वांवर प्रेम करु शकू. कुणाला मारझोड करणार नाही. किंबहुना, प्रत्येकाशी चांगली देवण-घेवाण करत सद्भावनापूर्ण वातावरणात राहू.” यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रतन टाटा म्हणाले, “मला वाटतं तुम्ही यशस्वी व्हावं. मात्र, त्याचसोबत मला असंही वाटतं की, तुम्ही विचारवंत बनावं. चर्चा, वाद-विवाद, विश्लेषण आणि असहमती हे सारी सभ्य समाजाची लक्षणं आहेत.”
असहिष्णुतेच्या वक्तव्यावरुनच बॉलिवूड अभिनेता आमीर खान वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यावेळी आमीरवर चौफेर टीका झाली होती. त्यामुळे रतन टाटा यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि प्रसिद्ध उद्योगपतींबाबत आमीरवर टीका करणाऱ्यांची काय भूमिका असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

===================================

पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्क अमेरिका उद्ध्वस्त करेल! 

...तर पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्क अमेरिका उद्ध्वस्त करेल!
वॉशिंग्टन : दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने चांगलंच फटकारलं आहे. शनिवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे टेररिझम आणि फायनान्शियल इंटेलिजिएन्सचे अॅक्टिंग अंडर-सेक्रेटरी अॅडम जुबिन पाकिस्तानला इशारा देत म्हणाले, “पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिका मागेपुढे पाहणार नाही.”
“मूळ समस्या अशी आहे की, पाकिस्तान सरकारची आयएसआय कोणत्याही प्रकारची कारवाई पाकमधील सक्रीय दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करु इच्छित नाही.”, असे जुबिन म्हणाले. मात्र, त्यावेळी ते असेही म्हणाले की, दहशतवादाविरोधात पाकिस्तान अमेरिकेचा महत्त्वाचा सोबती आहे.
अॅडम जुबिन म्हणाले, “पाकिस्तानमधील शाळा, बाजार आणि मशिदी या दहशतवाद्यांमुळे त्रस्त आहेत. दुर्दैवाने आजही तिथे हल्ले होतात. अशा हिंसक हल्ल्यांमुळेच पाकिस्तानला वारंवार मागे राहावं लागत आहे.”
दरम्यान, अमेरिकेनेही इशारा दिला असला, तरी आतापर्यंत पाकिस्तानने कधीच मान्य केलं नाही की, पाकमध्ये दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. उलट आम्ही दहशतवादविरोधी लढाईमध्ये सहभागी आहोत, असेच कायम पाकिस्तान म्हणत आला आहे. मात्र, भारतीय सीमेवर किंवा भारतातील दहशतवादी हल्ले करणारे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.

===================================

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं रंगमंचावरच निधन

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं रंगमंचावरच निधन
पुणेख्यातनाम अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं रंगमंचावरच निधन झालं. पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु असतानाच, हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 44 वर्षांच्या होत्या.
‘नाट्यत्रिविधा’ या नाटकाचा प्रयोग सुरु होता. त्याचवेळी त्यांना रंगमंचावरच मृत्यूने गाठलं. धक्कादायक म्हणजे या नाटकाचा प्रयोग सुरु होता, त्यावेळी शेवटच्या प्रसंगाला डान्स करत असताना, अश्विनी यांनी गिरकी घेतली आणि त्याचवेळी त्या रंगमंचावर कोसळल्या. मात्र हा नाटकातीलच भाग आहे, अशीच धारणा उपस्थितांची झाली. त्यादरम्यानच पडदाही पडला, मात्र अश्विनी जमिनीवर कोसळल्या, त्या कायमच्याच.
रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमाचं शेवटचं नृत्य सादर करण्यासाठी अश्विनी रंगमंचावर आल्या. भैरवी रागावर आधारित बंदिशीवर त्यांनी नृत्य करण्यास सुरूवात केली. नृत्य झालं आणि कार्यक्रमाच्या शेवटी तोल जाऊन त्या रंगमंचावरच कोसळल्या.

===================================

'ऐ दिल है मुश्किल'ला परवानगी : राज ठाकरे

...म्हणून 'ऐ दिल है मुश्किल'ला परवानगी : राज ठाकरे
मुंबई : करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाच्या प्रदर्शनावरचं विघ्न अखेर दूर झालं आहे. मनसेने या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी उगारलेलं विरोधास्त्र अखेर आज म्यान केलं.
दिग्दर्शक करण जोहर आणि मुकेश भट्ट यांनी दिलेल्या ठोस आश्वासनांमुळे ही माघार घेतल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. यापुढे कोणत्याही पाकिस्तानी कलाकार, तंत्रज्ञाला सिनेमात घेऊ नका, सैन्य कल्याणनिधीत प्रत्येकी पाच-पाच कोटी रुपये द्या, सिनेमा सुरु होण्याआधी शहीदांना श्रद्धांजलीची फलक दाखवा, अशा अटी निर्माते आणि दिग्दर्शकांनी मान्य केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या वादात मध्यस्थी करत राज ठाकरे आणि निर्माते-दिग्दर्शक करण जोहर यांना वर्षा बंगल्यावर बोलावलं होतं. तासभर चाललेल्या या बैठकीत हा तोडगा काढला गेला.
उरीच्या दहशतवादी हल्ल्यांनंतर पाकिस्तानी कलाकार आणि त्यांनी भूमिका केलेले सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका मनसेनं घेतली होती. त्यावरुन हा वाद उभा राहिला होता.
‘ऐ दिल है मुश्किल’चा वाद काय आहे?
‘ऐ दिल है मुश्किल’ या करण जोहरच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका आहे. पाकिस्तानी कलाकारांना आपल्या सिनेमात घेऊ नये, यासाठी मनसेने आवाज उठवला होता. त्यानंतर फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडला. मात्र, करण जोहरच्या सिनेमात फवादची भूमिका असल्याने तो वादात सापडला.

===================================

खड्डे दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा: चंद्रकांत पाटील

खड्डे दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा: चंद्रकांत पाटील
मुंबई: राज्यातील पीडब्ल्यूडीचे रस्ते 15 डिसेंबरपर्यंत दुरुस्त करण्याचं काम पूर्ण होईल. त्यामुळे राज्यातील रस्त्यांवर 15 डिसेंबरनंतर खड्डे दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, असं सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, ”राज्यातील सर्वाधिक रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे 15 डिसेंबरपर्यंत पीडब्ल्यूडीचे रस्ते खड्डेमुक्त करणार आहोत. पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांवर 15 डिसेंबरनंतर एकतरी खड्डा दिसला, तर त्याची माहिती देणाऱ्यास 1000 रुपये देणार आहोत.”
तसेच यावेळी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महामार्गावर छोट्या वाहनांना टोलमुक्ती केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, ”राज्य महामार्गावरील छोट्या वाहनांना टोल मुक्ती केली असून महाड दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरु आहे. पुलांच्या डागडुजीसाठी 2500 कोटी रुपयांची तरतुद केली” अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
राज्यातील मराठा मोर्चानंतर मुख्यमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेवरुन त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ”मी राजकारणात असूनही, महत्त्वकांक्षा नसलेला राजकारणी आहे. त्यामुळे मला मुख्यमंत्री बनण्याची बिल्कुल महत्त्वकांक्षा नाही. पक्ष देईल ते काम मी करत राहीन.”

===================================

पुरंदरेंचा 'महाराष्ट्र भूषण' परत घ्या, वर्ध्यात मराठा समाजाची मागणी

पुरंदरेंचा 'महाराष्ट्र भूषण' परत घ्या, वर्ध्यात मराठा समाजाची मागणी
वर्धा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा ”महाराष्ट्र भूषण” सन्मान परत घ्यावा, या नव्या मागणीसह वर्ध्यात मराठा मोर्चा काढला गेला. पुरंदरे यांनी आपल्या लिखाणात जिजाऊ आणि शिवरायांचा अवमान केल्याचा आरोप मोर्चकरांनी आपल्या निवेदनात केला.
सकल मराठा-कुणबी या नावानं निघालेला वर्ध्यातला मोर्चा दुपारी एक वाजता जुन्या आरटीओ कार्यालयापासून सुरु झाला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन या मोर्चाची सांगता केली गेली.
एकाच दिवशी राज्यातल्या चार ठिकाणी मराठा मोर्चांनी धडक दिली. यापैकी वर्ध्यातल्या मोर्चात इतर मागण्यांबरोबरच पुरंदरे यांचा ”महाराष्ट्र भूषण” सन्मान परत घेण्याची मागणी केली गेली.

===================================

सैन्याला स्वत:चा स्वाभिमान, खंडणीचा पैसा नको, उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला

सैन्याला स्वत:चा स्वाभिमान, खंडणीचा पैसा नको, उद्धव यांचा राज ठाकरेंना टोला
पणजी (गोवा) : भारतीय सैन्याला स्वत:चा स्वाभिमान आहे. त्यांना खंडणीतून उकळलेला पैसा नको. म्हणून भारतीय सैन्याने पैसे घेणे नाकारलं, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला. गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी उद्धव ठाकरे गोवा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाचा तिढा काल मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर सुटला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, दिग्दर्शक करण जोहर, निर्माते मुकेश भट यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर राज ठाकरेंनी काही अटी ठेवून ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाचा विरोध मागे घेतला. त्यातली एक अट अशी आहे की, पाकिस्तानी कलाकारांना सिनेमात घेणाऱ्या निर्मात्यांनी आर्मी वेल्फेअर फंडाला 5-5 कोटी रुपये द्यावे. राज ठाकरेंच्या या अटीवर सोशल मीडियासह अनेक स्तरावरुन टीकाही झाली. त्यानंतर पणजीत आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर घणाघात केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “सैन्याला स्वत:चा अभिमान आहे. त्यामुळे त्यांना खंडणीतून उकळलेले पैसे नको आहे. मदत करायची आहे, तर दिलसे करो. जो भी करना है दिलसे करो.”

===================================

दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को नॉनस्टॉप उड्डाण करून एअर इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. 23 - पॅसिफिक महासागरावरून  दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को असे नॉनस्टॉप उड्डाण करून एअर इंडियाने आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले आहे. गेल्या आठवड्यात एअर इंडियाने नवी दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत नॉनस्टॉप उड्डाण करून हा विक्रम नोंदवला. 
    सॅन फ्रान्सिस्कोला जाण्यासाठी अटलांटिक महासागरावरून जाणाऱ्या मार्गापेक्षा पॅसिफिक महासागरावरून जाणाऱ्या मार्गाचे अंतर 1400 किमीने अधिक आहे. दरम्यान, एअर इंडियाच्या विमानाने पॅसिफिक महासागरावरून उड्डाण करताना 15 हजार 300 किमी अंतर 14.5 तासांमध्ये पार केले. अटलांटिक मार्गापेक्षा हा मार्ग दूर असूनही अटलांटिक मार्गावरून जाताना लागणाऱ्या वेळापेक्षा दोन तास कमी वेळात विमानाने हे अंतर पार केले आहे.
===================================

तीन मोबाइल कंपन्यांवर कारवाईचा बडगा ! 

  • नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी आॅफ इंडिया (ट्राय) ने भारती एअरटेल, वोडाफोन व आयडिया या तीन टेलिकॉम कंपन्यांना ३0५0 कोटी रुपये दंड ठोठावण्याची शिफारस दूरसंचार विभागाला केली आहे.
    एअरटेल, वोडाफोन व आयडिया या कंपन्यांच्या नेटवर्कशी रिलायन्स जिओ ग्राहकांकडून केले जाणारे फोन जोडले जात नसून, जोडणीमध्ये अडथळे येत असल्यामुळे हा दंड वसूल करण्याची शिफारस केली आहे. भारती एअरटेल व वोडाफोन यांना प्रत्येकी २१ सर्कलसाठी प्रत्येकी ५0 कोटी रुपये याप्रमाणे प्रत्येकी १0५0 कोटी तर आयडियाच्या १९ सर्कलसाठी
    प्रत्येकी ५0 कोटीप्रमाणे ९५0
    कोटी रु. असा दंड घेतला जाईल.
  • रिलायन्स जिओला ५ सप्टेंबर रोजी सेवा सुरू करताच, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र काही दिवसांनी अन्य नेटवर्कशी कॉल जोडले जात नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी सुरू झाल्या. त्यामुळे अन्य मोबाइल कंपन्या जिओ ग्राहकांना फोन जोडणी उपलब्ध करुन देत नसून, आपल्या ग्राहकांची गैरसोय होत आहे, अशी तक्रार जिओ कंपनीने ‘ट्राय’कडे केली होती. त्याची शहानिशा करून, ‘ट्राय’ने या तीन कंपन्यांना दंड करण्याची शिफारस दूरसंचार विभागाला केली आहे. या तीन कंपन्या नियम व अटींचे पालन करत नसल्याचे दिसते. जिओ नेटवर्क ग्राहकांना अन्य नेटवर्कशी जोडू न देण्यामागे संबंधित कंपनीला स्पर्धेत उतरू न देण्याची भूमिका ग्राहकांच्या हिताच्या विरोधातील आहे, असे ट्रायने म्हटले आहे.
    मोबाइल ग्राहकांच्या असुविधेमध्ये आणखी भर पडू नये म्हणूनच केवळ या
    तीन कंपन्यांचा परवाना रद्द करण्याची शिफारस आपण करीत नाही आहोत, असे ट्रायने नमूद केले आहे. एअरटेल, वोडाफोन व आयडिया नेटवर्कने जिओ ग्राहकांना इंटरकनेक्शन सुविधा न पुरवल्याने ७५ टक्के कॉल अन्य नेटवर्कशी जोडले गेले नाही, असा दावा जिओने केला होता.
    प्रतिक्रिया नाही
    एक हजार कॉलमधील कॉलपैकी पाचहून अधिक कॉल जोडण्यात अपयश येता कामा नये, असा नियम आहे.
    मात्र, रिलायन्स जिओ प्रकरणात एक हजारातील सुमारे ९६0 कॉल अन्य मोबाईल नेटवर्कशी जोडलेच जाऊ शकले नाहीत, असे जिओचे म्हणणे आहे.
    दंडाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास तिन्ही कंपन्यांनी तूर्त तरी टाळले आहे.
===================================

No comments: