Wednesday, 5 October 2016

नमस्कार लाईव्ह ०४-१०-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तानचा युद्धसराव, लाहोर, कराची एअरस्पेस 13 दिवसांसाठी बंद 
२- पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा, याचिकेला 6 लाख अमेरिकनचा पाठिंबा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- सैन्याने सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ सरकारला सोपवला 
४- सर्जिकल स्ट्राईक : ट्रकमधून अतिरेक्यांचे मृतदेह नेले, प्रत्यक्षदर्शींचा दावा 
५- ऑक्टोबर पावसामुळे 'हिट' होणार, 15 तारखेपर्यंत महाराष्ट्रात संततधार कायम 
६- पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ
७- 'सर्जिकल स्ट्राईक'चे पुरावे प्रसिद्ध होणार! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- मराठा आरक्षणाबाबतची 'वर्षा'वरील सर्वपक्षीय बैठक संपली 
९- 30 नोव्हेंबरपर्यंत आधार कार्ड बनवा, नाहीतर गॅस सबसिडीला मुकाल! 
१०- शिक्षक-पोलिसांची धुमश्चक्री, मुख्यमंत्री पार्टी झोडण्यात दंग 
११- नॅशनल पार्कमधील 13 वर्षीय वाघ पलाशचा मृत्यू
१२- वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर, मोबाईलवर पावती
१३- केजरीवालांवर 'शाई हल्ला'; दोन अटकेत 
१४- पुरावे मागणारे केजरीवाल टीकेच्या भोवऱ्यात 
१५- सर्जिकल स्ट्राईक म्हणजे सेक्स टेप नव्हे - चेतन भगत 
१६- संकटकाळात तोंड बंद ठेवणे हीसुद्धा देशसेवाच - उद्धव ठाकरे 
१७- एडस रोखणे आणि नियंत्रण विधेयक २०१४ मधील सुधारणांना मंत्रिमंडळाची मंजुरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- मुंबई; सरकारकडून नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत 
१९- मीरा रोडमधील 7 बोगस कॉल सेंटरवर छापा, 700 हून अधिक जण ताब्यात 
२०- कल्याणमधील भाजप नगरसेवकाला लाच घेताना रंगेहाथ अटक
२१- औरंगाबादेत शिक्षकांच्या मोर्चावर लाठीचार्ज, गोंधळात पोलिसाचा मृत्यू
२२- जळगाव: लाच घेतल्याप्रकरणी महापालिकेचे उपायुक्त अटक 
२३- पश्चिम बंगाल मिदानपोर पोलिसांसमोर दहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- वानखेडेवरील शिवीगाळप्रकरणी शाहरुख खानला क्लीनचिट 
२५- अभिनेते ओम पुरींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल 
२६- फ्लिपकार्टचा एका दिवसात तब्बल 1400 कोटींचा व्यवसाय
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
=======================================

मराठा आरक्षणाबाबतची 'वर्षा'वरील सर्वपक्षीय बैठक संपली

मराठा आरक्षणाबाबतची 'वर्षा'वरील सर्वपक्षीय बैठक संपली
प्रातिनिधिक फोटो
मुंबईः राज्यभरातील मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर बोलावलेली सर्वपक्षीय बैठक नुकतीच संपली.
मराठा आरक्षणासंदर्भात 13 तारखेला हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे, त्यावर या बैठकीत चर्चा झाली.
सरकार मराठयांना आरक्षण देण्यासाठी पॉझिटीव्ह आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली
या बैठकीला भाजप नेते विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. याशिवाय आरक्षण समितीचे सदस्यही हजर होते.
राज्यभरातील मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

=======================================

वानखेडेवरील शिवीगाळप्रकरणी शाहरुख खानला क्लीनचिट

वानखेडेवरील शिवीगाळप्रकरणी शाहरुख खानला क्लीनचिट
मुंबई : मुंबईतील 2012 मधील वानखेडे वादाप्रकरणी बॉलिवूड अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानला दिलासा मिळाला आहे. वानखेडे स्टेडियमवरील धक्काबुक्की आणि शिवीगाळप्रकरणी शाहरुखला क्लीनचिट मिळाली आहे.
चौकशीत समोर आलं की, आयपीएल सामन्यादरम्यान शाहरुख ना नशेत होता, ना त्याने सुरक्षारक्षकाला शिवीगाळ केली, असं पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे. पोलिसांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हा अहवाल सादर केला.
एका स्थानिक कार्यकर्त्याने शाहरुख खानविरोधात कोर्टात तक्रार दाखल केली होती. शाहरुखवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या करण्यात आली होती.
2012 मध्ये वानखेडेवरील आयपीएल सामन्यानंतर सुरक्षारक्षक विकास दळवी, एमसीए अधिकाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप शाहरुख खानवर होता. त्यानंतर एमसीएने शाहरुख खानवर वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास 5 वर्षांची बंदी घातली होती. मात्र ही बंदी मागील वर्षी उठवण्यात आली.

=======================================

सैन्याने सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ सरकारला सोपवला

सैन्याने सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ सरकारला सोपवला
नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईकवरुन राजकारण सुरु झाल्यानंतर भारतीय सैन्याने या कारवाईचे पुरावे केंद्र सरकारला सादर केले आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार सर्जिकल स्ट्राईकचा 90 मिनिटांचा व्हिडीओ सैन्याने सरकारला सोपवला आहे.
सर्जिकल स्ट्राईकबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालंसह काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम पुरावे मागत होते. त्यानंतर आता सैन्याने हा व्हिडीओ सरकारकडे सोपवला आहे.
मात्र हा व्हिडीओ जारी करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही. हल्ल्याचं रेकॉर्डिंग करण्याचा उद्देश राजकीय नाही तर रणनीतीसाठी होता.
उरीचा बदला, भारताचं सर्जिकल स्ट्राईक
उरीमध्ये भारतीय जवानांच्या कॅम्पवरील हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी 29 सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. एलओसी पार करुन भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे 7 तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेक दहशतवाद्यांना खात्मा झाला.
स्थानिकांच्या माहितीवर प्रत्यक्षदर्शींचा दावा
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानला प्रत्यक्षदर्शींनी तोंडघशी पाडलं आहे. 29 सप्टेंबरच्या पहाटे भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात खात्मा केलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रकमधून अज्ञातस्थळी नेऊन दफन केले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
कसा चित्रीत केला सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ?
सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ एकूण 90 मिनिटांचा आहे. हल्ला करण्यासाठी गेलेल्या कमांडोंच्या हेल्मेटला लावलेल्या कॅमेऱ्यातून तो शूट केला होता. ऑपरेशनदरम्यान कमांडोंच्या हेल्मेटमध्ये थर्मल इमेजिंग आणि नाईट व्हिजन कॅमेरे लावलेले होते. याशिवाय साऊथ ब्लॉकमधील सैन्याच्या मुख्यालयाला 25-30 महत्त्वाचे फोटोही पाठवले होते.

=======================================

सर्जिकल स्ट्राईक : ट्रकमधून अतिरेक्यांचे मृतदेह नेले, प्रत्यक्षदर्शींचा दावा

सर्जिकल स्ट्राईक : ट्रकमधून अतिरेक्यांचे मृतदेह नेले, प्रत्यक्षदर्शींचा दावा
प्रातिनिधीक फोटो
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानला प्रत्यक्षदर्शींनी तोंडघशी पाडलं आहे. 29 सप्टेंबरच्या पहाटे भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात खात्मा केलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रकमधून अज्ञातस्थळी नेऊन दफन केले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केल आहे. भारतालगतच्या एलओसीजवळ राहणाऱ्या 5 प्रत्यक्षदर्शींशी संपर्क साधून ही माहिती समोर आणल्याचा दावा इंडियन एक्स्प्रेसने केला आहे.

=======================================

सरकारकडून नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत

मुंबईः राज्यातील नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत राज्य सरकार आज मुंबईत जाहीर करणार आहे. नगरपालिकांचे नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडण्यात येणार असल्याने या आरक्षण सोडतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नगरपालिकांचे नगराध्यक्ष प्रथमच थेट जनतेमधून निवडण्यात येणार आहेत. राज्यातील 195 नगरपालिकांची मुदत डिसेंबर 2016  ते फेब्रुवारी 2017 या दरम्यान संपुष्टात येत आहे. तसंच नव्याने 19 नगरपालिकांची निर्मिती करण्यात आली आहे.

या सर्व नगरपालिकांची निवडणूक होणार असून त्यासाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत काढली जाणार आहे. नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे राजकीय पक्ष आणि इच्छुकांचं लक्ष लागलं आहे.

=======================================

व्हायरल सत्य: सर्जिकल स्ट्राईकमध्ये 'हे' जवान सहभागी होते का?


व्हायरल सत्य: सर्जिकल स्ट्राईकमध्ये 'हे' जवान सहभागी होते का?
नवी दिल्ली: गुरुवारी भारतीय जवानांनी पाकिस्तानात घुसून सात दहशतवादी अड्डे उद्धवस्त केल्यानंतर संपूर्ण देशात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी फटाके फोडून हा आनंद व्यक्त करण्यात आला. कारण भारतीय सैन्यदलाने उरीमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांच्या हौतात्म्याचा वचपा काढला होता.

हे फोटो काही सैन्यदल आणि वायूदलाच्या अधिकाऱ्यांना दाखवले. वायूदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जवान एका मिलिट्री ट्रान्सपोर्ट विमानात दिसत आहेत. त्यामुळे हा फोटो चुकीचा असल्याचा पहिला पुरावा त्यांनी दिला. कारण, पीओकेवर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवेळी स्पेशल फोर्स कमांडोजनी कोणत्याही विमानाचा वापर केला नव्हता. सर्जिकल स्ट्राईकसाठी हे कमांडो जम्मू-काश्मीरमधील सैन्यदलाच्या उत्तरेकडील दोन गुप्त ठिकाणातून एलओसीपर्यंत हेलिकॉप्टरमधून गेले. यानंतर हे जवान एलओसीवर हॅलिकॉप्टरमधून उतरुन सरपटत पीओकेमध्ये दाखल झाले होते.

त्यामुळे सैन्यदलाच्या सूत्रांनी हा फोटो पाहताक्षणीच तो बोगस असल्याचे सांगितलं. या फोटोतील जवानांनी जे हेलमेट वापरले आहे, तेही एखाद्या मिलिट्री एअरक्राफ्टमधून पॅरा जम्पिंगवेळी वापरले जाते. तेव्हा 28-29 सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अशा कोणत्याही एअरक्राफ्टचा वापर केला नव्हता, हे ही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एबीपी न्यूजच्या या पडताळणीत व्हायरल होणारा फोटो चुकीचा असल्याचं उघड झालं आहे.


=======================================

पाकिस्तानचा युद्धसराव, लाहोर, कराची एअरस्पेस 13 दिवसांसाठी बंद

पाकिस्तानचा युद्धसराव, लाहोर, कराची एअरस्पेस 13 दिवसांसाठी बंद
इस्लामाबाद : पाकिस्तान 8 ऑक्टोबरपासून लाहोर आणि कराची शहरांवरील एअरस्पेस बंद करणार आहे. या दोन्ही शहरांवरील एअरस्पेस 13 दिवसांसाठी बंद ठेवले जाणार आहे. ‘ऑपरेशनल’ कारणांमुळे एअरस्पेस बंद करत असल्याचं कारण पाकिस्तानने दिलं आहे.
लाहोर, कराचीवरील एअरस्पेस 13 दिवसांसाठी रोज 18 तास बंद राहणार आहे. संरक्षण आणि हवाई वाहतूक तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानने हवाईदलाच्या माध्यमातून युद्ध सरावासाठी कमर्शियल उड्डाण क्षेत्र रिकामं केलं आहे. पाकिस्तान 8 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबरपर्यंत लाहोर, कराचीवरील एअरस्पेस बंद ठेवणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, अनेक देश अशाप्रकारे युद्ध सराव करत असतात. मात्र, अत्यंत व्यस्त एअरस्पेस इतक्या दिवसांसाठी बंद केलं गेलंय, हे विशेष आहे. भारतीय अधिकाऱ्यांची नजरही पाकिस्तानच्या या सर्व हालचालींवर आहे. कारण एअरस्पेस बंद करणं, युद्ध सराव सुरु करणं या सर्व गोष्टी अशा वेळी होत आहेत, ज्यावेळी भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध अत्यंत तणावाचे आहेत.
भारताह आशियाहून युरोप आणि मध्यपूर्व भागासाठी एअर ट्रॅफिक कॉरिडोअरमध्ये पाकिस्तान येतं.

=======================================

ऑक्टोबर पावसामुळे 'हिट' होणार, 15 तारखेपर्यंत महाराष्ट्रात संततधार कायम

ऑक्टोबर पावसामुळे 'हिट' होणार, 15 तारखेपर्यंत महाराष्ट्रात संततधार कायम
मुंबई : राज्यात येत्या 15 तारखेपर्यंत हलक्या किंवा मोठ्या स्वरुपात पाऊस होईल, असा अंदाज  हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अजूनही पाऊस कायम राहणार असल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वीच परतीचा पाऊस माघारी गेल्याची अधिकृत घोषणा झाली होती.
येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील अनेक ठिकाणी कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज  हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुंबईसह कोकणात रिपरिप सुरुच आहे. कोकण पट्ट्यात काल रात्रीपासून रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरुच होती. तर दुसरीकडे मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली असली, तरी अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती कायम आहे.
उस्मानाबादमधील माकणी धरण गेल्या सहा वर्षानंतर भरल्यानं धरणाचे चौदा दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेरणा नदी काठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे.

=======================================

मीरा रोडमधील 7 बोगस कॉल सेंटरवर छापा, 700 हून अधिक जण ताब्यात

मीरा रोडमधील 7 बोगस कॉल सेंटरवर छापा, 700 हून अधिक जण ताब्यात
ठाणे : मीरा रोड भागातील 7 बोगस कॉल सेंटरवर रात्री पोलिसांनी मोठी कारवाई केली. रॉयल कॉलेज शेजारील डेल्टा बिल्डिंगमधून तब्बल 700 हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या 200 पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली.
देशातील सर्वात मोठी कारवाई!
या कॉल सेंटरद्वारे परदेशातील लोकांना फोन करुन टॅक्स रिव्हिजनच्या नावाने गंडवलं जात असल्याचा आरोप आहे. पॉलिसीच्या नावाने लोकांच्या अकाऊंटची गोपनीय माहिती गोळा करुन त्यातून रक्कम पळवण्याचं काम या कॉल सेंटर्समधून चालत होते. याच आरोपाखाली मीरा रोडच्या एकूण तीन कॉल सेंटर्सवर ठाणे पोलिसांनी कारवाई केली. देशात कॉल सेंटरवर पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याचं सांगितलं जातं आहे.
या बोगस कॉल सेंटरमध्ये नेमकं काय काम करायचे?
मीरा रोडमधील डेल्टा टॉवरच्या सातव्या मजल्यावर वेगवेगळ्या लोकांकडून 7 कॉल सेंटर चालवले जात होते. कॉल सेंटरमधील कर्मचारी लोकांना फोन करुन इन्श्योरन्स पॉलिसी विक्री, सरेंडर करुन रक्कम परत देण्याचं आमिष दाखवत पैसे गोळा करत असत किंवा बँक अकाऊंटची माहिती मिळवून पैसे लंपास करत असत. लोकांच्या अकाऊंटवरुन ऑनलाईन शॉपिंगही केल्याची माहिती समोर आली आहे. अनेक कॉल सेंटरवरुन इन्कम टॅक्स गोळा करण्याची धमकी देऊन पैशांची वसुलीही केली जायची.

=======================================

अभिनेते ओम पुरींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

अभिनेते ओम पुरींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नवी दिल्लीः भारतीय जवानांचा अपमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या विरोधात मुंबई, आग्रा आणि लखनौमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैनिकांना लष्करात भरती व्हायला कोणी सांगितलं, असं वादग्रस्त विधान ओम पुरी यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केलं.
जवान देशासाठी  शहीद होतात, त्यांचा आदर ठेवायला पाहिजे की पाकिस्तानी कलाकारांचं समर्थन करायला पाहिजे, असा प्रश्न ओम पुरींना विचारण्यात आला. जवान शहीद होतात तर त्यांना सैन्य दलात भरती व्हायला कोणी सांगितलं, हातात बंदूक घ्यायला कोणी सांगितलं, असं विधान ओम पुरींनी केलं.
”सरकार पाकिस्तानवर कारवाई करत आहे. तर आपण सर्वांनी शांत रहायला पाहिजे. आपण मी अनेकदा पाकिस्तानला गेलो आहे. तिथल्या नागरिकांनाही भेटलो आहे. पाकिस्तानी कलाकार भारतात येतात, ते व्हिसा घेऊन येतात, बेकायदेशीरपणे येत नाहीत. एखादा सिनेमा सोडून ते मध्येच गेले तर निर्मात्याचं मोठं नुकसान होतं, असं वक्तव्य ओम पुरी यांनी केलं.
यापूर्वी अभिनेता सलमान खाननेही पाकिस्तानी कलाकारांचं समर्थन केलं होतं. त्यानंतर ओम पुरी यांनी जाहिरपणे पाकिस्तानी कलाकाराचं समर्थन करत जवानांवरही वादग्रस्त विधान केलं. यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.

=======================================

शिक्षक-पोलिसांची धुमश्चक्री, मुख्यमंत्री पार्टी झोडण्यात दंग

शिक्षक-पोलिसांची धुमश्चक्री, मुख्यमंत्री पार्टी झोडण्यात दंग
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये शिक्षक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पार्टीमध्ये दंग होते. जखमी पोलीस आणि शिक्षकांना भेट देण्याचं साधं सौजन्यही मुख्यमंत्र्यांनी दाखवलं नसल्याचा आरोप होत आहे.
मराठवाड्याच्या प्रश्नावर औरंगाबादमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी शिक्षक आणि पोलिसात तुफान हाणामारी झाली. पण हे सगळं सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप आमदार अतुल सावेंच्या घरी मेजवानी झोडत होते.
विनाअनुदानित शाळांना अनुदान द्या, या मागणीसाठी औरंगाबादेत शिक्षकांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलक शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या गोंधळात नऊ पोलिसांसह काही आंदोलक शिक्षक जखमी झाले.

=======================================

=======================================

No comments: