Monday, 11 April 2016

नमस्कार लाईव्ह ११-०४-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- वॉशिंग्टन; नौसैनिकांशिवाय चालणारी अमेरिकेची 'सी हंटर' युद्धनौका 
२- इटली; 'त्या' कलाकाराने मॅनहोलची बनवली रुम 
३- दुबईत उभारण्यात येणार बुर्ज खलिफाहून उंच इमारत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- पाकिस्तानची घुसखोरी रोखण्यासाठी भारताचा हायटेक प्लान 
५- शिर्डीच्या साईबाबांच्या पुजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळ: शंकराचार्य स्वरुपानंद 
६- अहमदाबाद; 'भारत मात की जय'चा, नारा देशातच नव्हे जगात घुमला पाहिजे: भागवत 
७- शतकात प्रथमच वाघांच्या जागतिक आकडेवारीत वाढ, भारतात सर्वाधिक संख्या 
८- त्र्यंबकेश्वर मंदिराचे गर्भगृह पुरुषांना पुन्हा खुले 
९- वेतन आयोगामुळे 'बांधकाम'ला लाभ 
१०- परदेशातून आणलेल्या वस्तूंवर 15 टक्के सीमाशुल्क 
११- केरळ आग दुर्घटना; देशभरातून तीव्र दु:ख व्यक्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत, हायवेही जाम 
१३- 5 लाख लिटर पाणी घेऊन पाणी एक्स्प्रेस लातुरकडे रवाना 
१४- पुण्यात हुक्का सेंटरवर छापा, 11 मुलीसह 68जण ताब्यात 
१५- कोल्हापूर; कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातही महिलांना प्रवेश? 
१६- बंगालमध्ये 39, आसाममध्ये 36 टक्के मतदान 
१७- वैद्य यांचे औषधाच्या गोळ्या खाण्याचं वय-मनसे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- शिर्डीत भाजप नेत्याच्या बेडरुममध्ये घुसून गोळीबार 
१९- डॉ.आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नागपुरात काँग्रेसची विराट सभा  
२०- भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी दिल्ली, चंदिगड, हरियाणा हादरलं 
२१- पिंपरी-चिंचवड; देहूरोडमध्ये टोळक्याचा धुडगूस, दुकानांची जाळपोळ, वाहनांची तोडफोड 
२२- अहमदनगर; देव दर्शनाच्या बहाण्याने धावत्या कारमध्ये पत्नीची हत्या 
२३- औरंगाबाद; साठ फूट उंचीवर खोदलेल्या शेततळ्याने दिली साथ 
२४- कोलकाता; बंगालमध्ये मतदान केंद्राजवळून बॉम्ब जप्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- BlackBerryची मोठी घोषणा, दोन नवे बजेट स्मार्टफोनचं लवकरच लाँचिंग 
२६- इंग्लंडचा पीटरसन आफ्रिकेकडून खेळणार ? 
२७- साखरपुड्याच्या चर्चांवर अभिनेत्री इशा गुप्ताचं स्पष्टीकरण 
२८- अनंत अंबानीचे सलमान, धोनीकडून कौतुक 
२९- कोलकाता संघाविरुद्ध दिल्लीची घोर निराशा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
करण वाघमारे, रामचंद्र धुमाळ, सचिन मालपाणी, संदीप कदम, सुनील सिरसाठ, रोहिदास बनसोडे, शिवाजी बिडवई, युगेश सक्ले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
ध्येय सध्या करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात खरा आनंद समावला आहे
(उत्कर्ष पवार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


====================================

5 लाख लिटर पाणी घेऊन पाणी एक्स्प्रेस लातुरकडे रवाना

5 लाख लिटर पाणी घेऊन पाणी एक्स्प्रेस लातुरकडे रवाना
सांगली : लातुरकरांची तहान भागवण्यासाठी मिरजेतून पाण्याने भरलेल्या 10 वॅगनची रेल्वे रवाना झाली आहे.  या दहा वॅगनमध्ये पाणी भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरु होतं. या 10 वॅगन भरल्यानंतर त्या तातडीने लातुरकडे रवाना करण्यात आल्या. 
एका वॅगनमध्ये 50 हजार लिटर पाणी आहे. म्हणजे या 10 वॅगनमधून तब्बल 5 लाख लिटर पाणी घेऊन रेल्वे रवाना झाली आहे. 
पंढरपूर – कुर्डवाडी – उस्मानाबाद – लातूर असा या पाणी एक्स्प्रेसचा मार्ग असेल. हा प्रवास पूर्ण होण्यासाठी साधरणात: 9 तास लागतात. पण या पाणी एक्स्प्रेस प्रवासासाठी किती वेळ लागेल हे पाहावं लागेल. 
दुसरीकडे आणखी 10 वॅगन्समध्ये पाणी भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. 
रेल्वेच्या जॅकवेलपासून रेल्वेपर्यंत येणाऱ्या पाईपलाईनचं काम काल पूर्ण न झाल्याने, रेल्वे स्थानकावरच्या छोट्या पाईपलाईनमधून पाणी भरण्याचं काम सुरु करण्यात आलं. पण पाण्याचा वेग अत्यंत कमी असल्याने गाडी रवाना होण्यास उशीर झाला होता. 
मात्र असं असलं, तरी पाण्याची 20 वॅगन्सची पहिली खेप पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नांना आज यश आलं. 
यामुळे वेळ आणि श्रम यांची बचत होऊन, दुसरीकडे नव्या पाईपलाईनचं कामही पुढे सरकणार आहे. 10 वॅगन भरण्यास साधारण 14 तासांपेक्षा जास्त अवधी लागला. तर दुसरीकडे पाईप लाईनचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
====================================

पुण्यात हुक्का सेंटरवर छापा, 11 मुलीसह 68जण ताब्यात

पुण्यात हुक्का सेंटरवर छापा, 11 मुलीसह 68जण ताब्यात
पुणे: पुण्याजवळील कोंढवा परिसरातल्या एका हुक्का शनिवारी सेंटरवर पोलिसांनी छापा मारला. यावेळी केलेल्या कारवाईत पोलिसांनी 11 मुलींसह 68 जणांना ताब्यात घेतलं आहे.

पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने कोंढव्यातील मॅश डोनाल्ड या हुक्का सेंटरवर छापा टाकला. यावेळी सेंटरचा मालक, 6 कामगार आणि काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या कारवाईदरम्यान पोलिसांनी हुक्क्याची वेगवेगळी साधनं आणि काही रोकडही आपल्या ताब्यात घेतली.

पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी तिथे 11 मुलीसह 42 तरुण होते. हुक्का सेंटरचा मालक, 6 कामगार, हुक्का पिणारे 11 मुली आणि 42 तरुण तिथे आढळून आले.

====================================

शिर्डीत भाजप नेत्याच्या बेडरुममध्ये घुसून गोळीबार

शिर्डीत भाजप नेत्याच्या बेडरुममध्ये घुसून गोळीबार
शिर्डी : शिर्डीत भाजप नेते प्रकाश चित्ते यांच्या घरात घुसून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. श्रीरामपूरमध्ये काल रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला. 
प्रकाश चित्ते अवैध धंद्याना विरोध करत असल्याने त्यांना मारण्याचा प्रयत्न झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 
दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाहीत. या प्रकरणी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश चित्ते हे भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस आहेत. याआधीही प्रकाश चित्ते यांच्यावर गोळीबार झाला होता.
 काही दिवसांपूर्वीच गोंदियात भाजपचा स्वीकृत नगरसेवक शिव शर्मानं काँग्रेसचे आमदार गोपाल अग्रवाल यांना बेदम मारहाण केली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांप्रमाणे आता नेते मंडळीही भिडत असल्याचं समोर आलं आहे.
====================================

पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत, हायवेही जाम

पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत, हायवेही जाम
मुंबई : पश्चिम रेल्वेचे विस्कळीत झालेली वाहतूक अद्याप ट्रॅकवर आलेली नाही. लोकल वाहतूक तब्बल अर्धा तास उशिरा धावत आहे. त्यामुळे त्याचा भार रस्ते वाहतुकीवरही पडला आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. 
सकाळी बोरीवली आणि कांदिवली दरम्यान रेल्वेच्या विद्युत पुरवठा यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यानंतर झालेला खोळंबा अद्याप सुरुच आहे . 
पश्चिम द्रूतगती महामार्गाची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पश्चिम द्रूतगती मार्गावरच्या जेव्हीएलआर जवळ ट्रक बंद पडल्यानं महामार्गही जाम झाला आहे.
====================================

डॉ.आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नागपुरात काँग्रेसची विराट सभा

डॉ.आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नागपुरात काँग्रेसची विराट सभा
नागपूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त नागपुरात आज काँग्रेसची विराट सभा होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे या सभेला संबोधित करणार आहे. 
या सभेला काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असून नागपूरच्या कस्तुरचंद पार्कमध्ये ही विराट सभा होणार आहे. तर सभेला सुमारे एक लाख कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार असण्याची शक्यता आहे. 
राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्त्यांना आणण्यासाठी काँग्रेसने सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सभेत काँग्रेस भाजप सरकारवर निशाणा साधणार हे निश्चित आहे. 
सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा दौरा
राहुल गांधींचं 3 वाजता नागपुरात आगमन होईल
तर सोनिया गांधी 3.30 वाजता नागपूरमध्ये दाखल होतील.
यानंतर 3.45 वाजता दोघेही दीक्षाभूमीला दर्शनासाठी जातील.
5.30 वाजता कस्तूरचंद पार्कमध्ये होणाऱ्या सभेच्या ठिकाणी पोहोचतील.
====================================

BlackBerryची मोठी घोषणा, दोन नवे बजेट स्मार्टफोनचं लवकरच लाँचिंग

BlackBerryची मोठी घोषणा, दोन नवे बजेट स्मार्टफोनचं लवकरच लाँचिंग
मुंबई: स्मार्टफोन कंपनी ब्लॅकबेरी दोन नवे मिडरेंज स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीचे सीईओ जॉन चेन यांनी याबाबत एका मुलाखतीत याची घोषणा केली. मात्र, नेमकं कधी याचं लाँचिंग करण्यात येईल याविषयी माहिती देण्यात आली नाही. 
रिपोर्टनुसार, एक फूल टच स्क्रिन आणि दुसरा स्मार्टफोन क्वेटी की बोर्ड असणार आहे. दोन्ही स्मार्टफोनची किंमत 300 डॉलर (जवळजवळ 20,000 रु) आणि 400 डॉलर (जवळजवळ 26,000) आहे. 
प्रीमियम अँड्रॉईड स्मार्टफोन प्रिवविषयी बोलताना चैन म्हणाले की, हे कंपनीचं हाय-एंड डिव्हाइस आहे. ज्याच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. 
मागील तीन महिन्यात प्रीमियम अँड्रॉईड स्मार्टफोन प्रिव 600,000 युनिटची विक्री करण्यात आली आहे. ब्लॅकबेरी प्रिवमध्ये 5.4 इंच 1440×2560 पिक्सल रेझ्युलेशन डिस्प्ले आहे. हेक्सा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर, 3 जीबी रॅम 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. 
18 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. अँड्रॉईड 5.1 लॉलीपॉप आणि 3जी, वायफाय आणि इतर कनेक्टिव्हीटी फीचर यात देण्यात आले आहेत.
====================================

साखरपुड्याच्या चर्चांवर अभिनेत्री इशा गुप्ताचं स्पष्टीकरण

साखरपुड्याच्या चर्चांवर अभिनेत्री इशा गुप्ताचं स्पष्टीकरण
मुंबई : सोशल मीडियावर साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ताने स्पष्टीकरण दिलं आहे. माझा साखरपुडा झाला नाही, असं स्पष्टीकरण ‘जन्नत 2’, ‘राज 3’ सारख्या सिनेमातून झळकलेली अभिनेत्री इशा गुप्ताने ट्विटरच्या माध्यमातून दिलं आहे.
इशा गुप्ताने 9 एप्रिल रोजी हिऱ्याची अंगठी बोटात असलेला फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. “त्याने मला विचारलं आणि मी होकार दिला,” असं कॅप्शन 30 वर्षांच्या बॉलिवूड ब्यूटीने दिलं होतं. त्यामुळे तिचा सारखपुडा झाल्याची चर्चा होती. 

आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचा साखरपुडा

मात्र आता खुद्द इशानेच ट्वीट करुन साखरपुड्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. “माझा साखरपुडा झालेल नाही, पण एवढ्या आकाराच्या हिऱ्याची अंगठी आवडेल,” असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
====================================

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी दिल्ली, चंदिगड, हरियाणा हादरलं

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी दिल्ली, चंदिगड, हरियाणा हादरलं
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीसह आसपासचा परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. उत्तरेकडील दिल्ली, चंदिगढ, हरियाणा, श्रीनगर या राज्यांमध्ये रविवारी दुपारी 4 वाजून 1 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवले. 
अफगाणिस्तान, पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. भूकंपाची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल असल्याची माहिती आहे. भूकंपाचे केंद्रस्थान अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये आहे.

दिल्लीसह नोएडा आणि परिसरात पाच मिनिटांपर्यंत हे धक्के जाणवल्याची माहिती आहे. भूकंपामुळे दिल्लीतील मेट्रोसेवाही काही मिनिटांसाठी थांबवल्याचं सांगितलं जातं.
====================================

इंग्लंडचा पीटरसन आफ्रिकेकडून खेळणार ?

इंग्लंडचा पीटरसन आफ्रिकेकडून खेळणार ?
मुंबई: इंग्लंडचा स्फोटक फलंदाज केविन पीटरसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे वेध लागले आहेत. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याच्या पर्यायही खुला असल्याचं त्यानं मान्य केलं. 
पीटरसन सध्या आयपीएलमध्ये धोनीच्या रायझिंग पुणे संघाकडून खेळत आहे. पहिल्याच सामन्यात पुणे संघाने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात केविन पीटरसनने नाबाद 21 धावा केल्या. 
या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पीटरसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबत विचारण्यात आलं, त्यावर तो म्हणाला, ” मी आंतरराष्ट्रीय पुनरागमनाच्या विचारात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असल्याची कमतरता भासते”. 
पीटरसन मूळचा दक्षिण आफ्रिकेचाच, पण तिथून संधी न मिळाल्यानं त्यानं इंग्लंडची वाट धरली. पीटरसनची आई इंग्लंडची असल्यानं त्याला इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. 2004 ते 2014 या कालावधीत पीटरसननं इंग्लंडकडून 104 कसोटीत 8,181  आणि 136 वन डेत 4,440 तर 37 टी20 सामन्यांत 1,176 धावा केल्या. पण 2014 साली अॅशेस मालिकेनंतर त्याची संघातून हकालपट्टी झाली. 
आता दुसऱ्या देशाकडून खेळायचं तर आयसीसीच्या नियमांनुसार पीटरसनला चार वर्ष वाट पाहावी लागेल. म्हणजे 2018 मध्ये तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळू शकेल. पण त्यावेळी त्याचं वय 37 वर्ष असेल, त्यामुळं पीटरसनला दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळेल का हा प्रश्नच आहे.
====================================

शिर्डीच्या साईबाबांच्या पुजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळ: शंकराचार्य स्वरुपानंद

शिर्डीच्या साईबाबांच्या पुजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळ: शंकराचार्य स्वरुपानंद
हरिद्वार: शिर्डीच्या साईबाबांच्या  पुजेमुळे महाराष्ट्रात दुष्काळ पडल्याचं अजब तर्कट द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केलं. ते हरिद्वारमध्ये बोलत होते. 
फकीर असलेल्या साईबाबांना देशात देवासारखं स्थान मिळतं आणि ज्या ठिकाणी त्यांना देवाचं स्थान मिळतं तिकडेच निसर्गाचा प्रकोप होतो.  महाराष्ट्रात पडणारा दुष्काळ हे त्याचंच उदाहरण असल्याचं शंकराचार्यांनी म्हटलं आहे. 
याआधीही शंकराचार्यांनी ‘साईबाबा हे देव नाहीत, त्यामुळे त्यांची पुजा करु नये.’ असं फर्मानं काढलं होतं. ज्याला देशभरातून साईभक्तांनी विरोध केला होता. त्यातचं दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीशी साईबाबांचा संबंध जोडल्यामुळे साईभक्तांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
====================================

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातही महिलांना प्रवेश?

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातही महिलांना प्रवेश?
कोल्हापूर : नारीशक्तीने शनी शिंगणापूरचा चौथरा सर केल्यानंतर आता महिलांना कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातही प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. 
मंदिराच्या गाभाऱ्यातील महिला प्रवेशासंदर्भात रविवारी स्थानिक पोलिस ठाण्यात यशस्वी बैठक झाली. गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्याबाबत पुजाऱ्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. आज या संदर्भात औपचारिक घोषणा होऊ शकते. 
दरम्यान महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश न मिळाल्यास 13 एप्रिलला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला होता. 
आठवडाभरापूर्वी ‘अवनि’  अर्थात अन्न,वस्त्र, निवारा या संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुजारी महिलांकडून यावेळी विरोध झाल्याने आंदोलक महिलांनी गाभाऱ्यातच तीव्र घोषणाबाजी केली होती. 
गाभाऱ्यात महिलांना प्रवेश का नाही?
गाभाऱ्यात जाताना पावित्र्य राखण्यासाठी शुचिर्भुत होऊन सोवळे नेसून जाण्याचा दंडक ठेवण्यात आला आहे. त्यामुळे इथे केवळ पुरुषांनाच प्रवेश मिळतो. त्याविरोधात यापूर्वीही आंदोलनं झाली आहेत.
====================================

देहूरोडमध्ये टोळक्याचा धुडगूस, दुकानांची जाळपोळ, वाहनांची तोडफोड

देहूरोडमध्ये टोळक्याचा धुडगूस, दुकानांची जाळपोळ, वाहनांची तोडफोड
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड इथे रविवारी रात्री टोळक्याकडून दुकानांची जाळपोळ करण्यात आली. तर अनेक वाहनांची तोडफोड करुन नासधूसदेखील केली. यामध्ये अबूशेठ रोडवरील दुकांनांचं आणि वाहनांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं.

दुचाकींवरुन आलेल्या 40 ते 50 तरुणांनी यावेळी धुडगूस घातला. या टोळक्याने रात्री नऊच्या सुमारास दुकानांची आणि वाहनाची तोडफोड केली. तसंच तलवारी घेऊन दहशत माजवल्याचं कळतं

या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अबूशेठ रस्त्यावर कडेकोट बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
====================================

'भारत मात की जय'चा, नारा देशातच नव्हे जगात घुमला पाहिजे: भागवत

'भारत मात की जय'चा, नारा देशातच नव्हे जगात घुमला पाहिजे: भागवत
अहमदाबाद: ‘भारत माता की जय’चा नारा केवळ देशात नाही तर संपूर्ण जगात ऐकू आला पाहिजे असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. ते गुजरामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे दाखले देत देशांर्तगत भेदभाव संपवायला हवा असंही ते म्हणाले. “भारत माता की जय” या घोषणेवरुन झालेल्या वादानंतर मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा या घोषणेचा पुर्नउच्चार केला.

दरम्यान, या कार्यक्रमाप्रसंगी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बॅनरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाहायला मिळाला.
====================================

देव दर्शनाच्या बहाण्याने धावत्या कारमध्ये पत्नीची हत्या

देव दर्शनाच्या बहाण्याने धावत्या कारमध्ये पत्नीची हत्या
अहमदनगर: अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये पतीने आपल्याचं पत्नीची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आश्विनी अकोलकर असं या मृत महिलेचं नाव असून देव दर्शनाला जाण्याच्या बहाण्याने पती मच्छिंद्र अकोलकरने आपल्या पत्नीची गळा चिरुन हत्या केली.

गुरुवारी रात्री मढीला देव दर्शनाला जाण्याचं निमित्त करुन पत्नीला कारमध्ये बसवलं. तीसगाव-करंजी दरम्यान मध्यरात्री पतीनं पत्नीचा गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर चालकाला धमकावून कार जामखेडच्या घाटात नेऊन पेट्रोल ओतून पत्नीला जाळलं. या घटनेनंतर पती मच्छिंद्र अकोलकर फरार झाला आहे. मात्र, गाडीचा चालक बाबासाहेब मराठेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

जाळलेली गाडीही पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस सध्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
====================================

नौसैनिकांशिवाय चालणारी अमेरिकेची 'सी हंटर' युद्धनौका

  • ऑनलाइन लोकमत 
    वॉशिंग्टन, दि. ११ - अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये आघाडीवर असणा-या अमेरिकेने मानवरहीत विमानाप्रमाणे मानवरहीत युद्ध नौकेची निर्मिती केली आहे. जगातील अशा प्रकारची ही पहिलीच युद्धनौका आहे. अमेरिकेने सी हंटर असे या युद्धनौकेला नाव दिले आहे. शत्रू सैन्याच्या पाणबुडयांचा वेध घेण्याची सी हंटरवर मुख्य जबाबदारी असेल. 
    गुगलच्या स्वयंचलित कारप्रमाणे चालकदल आणि रिमोट कंट्रोल शिवाय सी हंटर समुद्रात कार्य करेल. सी हंटर १३२ फूट लांब ( ४० मीटर लांबी) आहे. दुस-या जहाजांबरोबर टक्कर टाळण्यासाठी सी हंटर अत्याधुनिक रडार आणि कॅमे-यांनी सज्ज आहे. 
    दोन डिझेल इंजिनच्या या युद्धनौकेचा वेग २७ कॉन्टस आहे. ही युद्धनौका म्हणजे रोबोटिक शस्त्रास्त्र निर्मितीतील पुढचे पाऊल आहे. पेंटागॉनच्या डीएआरपीएने ओरेगॉन गोदीमध्ये सी हंटरची बांधणी केली आहे. अशा प्रकारच्या युद्धनौकेमुळे नौदलाची जिवीतहानी टळणार आहे तसेच सैन्यावरील खर्चही कमी होणार आहे. 
    मानवरहीत ही युद्धनौका नेमून दिलेले कार्य व्यवस्थित करते की नाही, आंतरराष्ट्रीय समुद्र नियमांचे पालन होते की नाही यासाठी सी हंटरच्या दोन वर्ष वेगवेगळया चाचण्या होतील. त्यानंतर सी हंटरचा नौदलात समावेश होईल. 

    ====================================


  • शतकात प्रथमच वाघांच्या जागतिक आकडेवारीत वाढ, भारतात सर्वाधिक संख्या

    • ऑनलाइन लोकमत  - 
      नवी दिल्ली, दि. ११ - जगभरात करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत शतकामध्ये पहिल्यांदाच वाघांची संख्या वाढली आहे. रशियापासून ते व्हिएतनामच्या जंगलामध्ये ही व्याघ्रगणना करण्यात आली असून वाघांची संख्या 3890 वर पोहोचली आहे. संवर्धन गट आणि प्रत्येक देशाच्या सरकारने व्याघ्रगणनेत सहभाग घेतला होता आणि त्याच आधारे ही आकडेवारी समोर आल्याची माहिती वन्यजीन संवर्धन गटाने दिली आहे.
      2010मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत वाघांची संख्या 3200 होती. महत्वाची गोष्ट म्हणजे वाघांची संख्या वाढण्यामध्ये भारताचं खूप मोठं योगदान असून अर्ध्यापेक्षा जास्त वाघ भारतामध्येच आहे. भारतामधील जंगलांमध्ये एकूण 2226 वाघ आहेत. 
      या सर्व्हैमुळे पहिल्यांदाच वाघांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. 19व्या शतका जगभरातील जंगलात एकूण एक लाख वाघ होते. वाघांची संख्या वाढली आहे यापेक्षा आपण योग्य दिशेन वाटचाल करत आहोत हे महत्वाचं आहे असं  वन्यजीन संवर्धन गटाचे हेमली यांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये 13 देशातील प्रतिनिधींची मंगळवारी बैठक होणार आहे त्याअगोदरच ही जागतिक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
====================================

'त्या' कलाकाराने मॅनहोलची बनवली रुम

  • ऑनलाइन लोकमत 
    मिलान, दि. ११ - बियानकोशॉक या स्ट्रीट आर्टीस्टने 'बॉर्डरलाईफ' या कलात्मक संकल्पनेतून डोक्यावर छप्पर नसलेल्या बेघर नागरीकांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. बियानकोशॉकने इटलीच्या मिलान शहरातील दुर्लक्षित मॅनहोल्समध्ये छोटया रुम बनवल्या आहेत. 
    या तीन रुम्समध्ये किचन, बाथरुम आणि लिव्हींग रुम आहे. मॅनहोलची जागा छोटी असली तरी ती कलात्मक पद्धतीने सजवली आहे. छोटया घरामध्ये रहाणारेही आपल्या घराला नीटनेटके ठेवण्याचा कसा प्रयत्न करतात ते दाखवण्याचा प्रयत्न या कलात्मकतेतून करण्यात आला आहे. 
    रोमानिया बुचारेस्टमध्ये वाढत्या बेघर नागरीकांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी बियानकोशॉकने मॅनहोल्सचा वापर केला आहे. रोमानियामध्ये ६०० लोक मलवाहिनीजवळ रहातात. 
====================================

पाकिस्तानची घुसखोरी रोखण्यासाठी भारताचा हायटेक प्लान

  • ऑनलाइन लोकमत -
    नवी दिल्ली, दि, ११ - पाकिस्तानकडून भारतात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारत हायटेक योजना आखत आहे. पाकिस्ताकडून होणा-या घुसखोरीवर नियंत्रम ठेवण्यासाठी पाच-स्तरीय सुरक्षा प्रणाली आखण्यात आली आहे. केंद्रानेदेखील या सुरक्षा प्रणालीला मान्यता दिली आहे. या सुरक्षा प्रणालीनुसार पश्चिमेकडील 2900 किमीवरील सीमा सुरक्षारेषा पुर्णपणे लॉक करण्यात येणार असून यामुळे दहशतवादी आणि तस्करी घुसखोरांवर आळा घालण्यास मदतमिळणार आहे.  
    या सुरक्षा प्रणाली अंतर्गत सीमारेषेवर पुर्णवेळ लक्ष ठेवण्यात येणार असून सीआयबीएमएसच्या देखरेखेखाली असणार आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने 24 तास सीमारेषेवर लक्ष ठेवण्यास मदत मिळणार आहे. यामुळे सीमारेषेपलीकडून होणा-या सर्व हालचालींवर नजर ठेवणे शक्यहोणार आहे. 
    या सुरक्षा प्रणालीत  सीसीटीव्ही कॅमेरा, थर्मल इमेज, मॉनिटरिंग सेन्सर्स, लेजर बॅरिअर्स यांचा समावेश असणार आहे. कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर सिस्टीमच्या आधारे लगेच धोक्याची सूचना मिळणार आहे ज्यामुळे कारवाई करणं शक्य होईल. यामध्ये लेजर बॅरिअर्सची मुख्य भुमिका असणार आहे कारण ज्या ठिकाणी जवान तैनात नाहीत अशा 130 ठिकाणी यांची मदत मिळणार आहे. नदीकाठ तसंच डोंगरावरील प्रदेश ज्यांचा अनेक वेळा घुसखोरीसाठी वापर केला जातो अशा ठिकाणी हे लेजर बॅरिअर्स फायद्याचे ठरणार आहेत. 
====================================

त्र्यंबकेश्वर मंदिराचे गर्भगृह पुरुषांना पुन्हा खुले

  • त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिराचे गर्भगृह पुरुषांना आता पुन्हा खुले झाले आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान व ग्रामस्थ यांच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तरी महिलांच्या प्रवेशाबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.
    त्र्यंबकेश्वर देवस्थानचे सचिव निवृत्ती नागरे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक झाली. ३ एप्रिल रोजी मंदिराच्या गर्भगृहात सर्वांनाच प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रविवारच्या बैठकीत हा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणेच दर्शनाची परंपरा कायम ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. ३ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये निर्माण झालेल्या वातावरणाचे खापर गावकऱ्यांनी विश्वस्त मंडळावर फोडले.
    महिलांना प्रवेश देण्याच्या मुद्द्यावरून पुरुषांनाही प्रवेश बंदचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केल्याने विश्वस्त मंडळाने हा निर्णय बैठकीत रद्द केला. या निर्णयामुळे मंदिराच्या गर्भगृहात पुरुषांना प्रवेश मिळण्याचा मार्ग खुला झाला. पुरातत्त्व विभागाने दिलेल्या सूचना विचार घेता भाविकांना गर्भगृहात पूजा, अभिषेकासाठी सकाळी ६ ते ७ वेळ ठरविण्यात आली आहे.
====================================

दुबईत उभारण्यात येणार बुर्ज खलिफाहून उंच इमारत

  • ऑनलाइन लोकमत - 
    दुबई, दि. ११ - जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफापेक्षाही उंच इमारत दुबईमध्येच उभारण्याची तयारी सुरु असल्याची माहिती एम्मारने दिली आहे. एम्मार प्रॉपर्टी डेव्हलपर असून या इमारतीसाठी तब्बल सात हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे, तसंच बुर्ज खलिफापेक्षा ही इमारत उंच असेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. 
    इमारतीची उंची नेमकी किती असणार आहे याबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे. ही इमारत आमच्या शहरासाठी 2020ची भेट असेल असंही त्यांनी सांगितलं आहे. दुबईत 2020 मध्ये वर्ल्ड एक्स्पो ट्रेडिंग फेअर पार पडणार आहे त्याचवेळी या इमारतीच उद्घाटन करण्याची तयारी सुरु आहे. या इमारतीच्या रचनेचं काम स्पॅनिश-स्विस आर्किटेक्ट पाहत असून या इमारतीत रेस्टॉरंट आणि बुटीक हॉटेल्सदेखील असणार आहेत. 
    बुर्ज खलिफाची उंची 2700 फूट असून त्यासाठी नऊ हजार कोटींचा खर्च करण्यात आला होता. 2010 मध्ये या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं होतं.  

====================================

वेतन आयोगामुळे 'बांधकाम'ला लाभ

  • नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची उत्सुकता केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच आहे, असे नाही तर तेवढीच ती बांधकाम क्षेत्रातील इस्टेट एजंट, कार डीलर्स आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री करणाऱ्यांनाही आहे. कारण यांनाही हा आयोग लाभदायी ठरणार आहे.
    कर्मचारी आणि सेवानिवृत्तीधारक असे ३.४ कोटी लोक या आयोगाच्या शिफारशींचे लाभार्थी आहेत. त्यांचे उत्पन्न वाढणार आहे व साहजिकच त्याचा लाभ वरील व्यवसायांनाही होणार आहे. मालमत्तांच्या व्यवसायात सध्या मागणी नसल्यामुळे तेवढा उत्साह नाही. आयोगामुळे हे क्षेत्र एकदम उत्साहात येणार आहे. टियर वन आणि टियर टू प्रकारच्या शहरांमध्ये घरांची मागणी वाढेल. कारण केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांपैकी ८० टक्के या दोन शहरांत वास्तव्यास आहेत. अपेक्षित मागणी बघता रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाला घरबांधणी व निवासस्थानांच्या मागणीत जोरदार आणि सततची मागणी असेल, अशी अपेक्षा आहे. आयोग लागू होताच दुचाकी आणि चारचाकींचे डीलरही आनंदी होतील. या उद्योगाला दुचाकी, छोट्या आणि कॉम्पॅक्ट कारच्या विक्रीत दोन आकड्यांच्या मागणीची आशा आहे. रेफ्रिजरेटर, टीव्ही अशा ग्राहकोपयोगी वस्तूंच्या मागणीत चांगली वाढ होईल.
====================================
साठ फूट उंचीवर खोदलेल्या शेततळ्याने दिली साथ
औरंगाबाद -  बदलते हवामान दिवसेंदिवस पिकासाठी प्रतिकूल ठरत आहे, ही गोष्ट ‘त्यांच्या’ लवकरच लक्षात आली. यामुळे आता पीकपद्धतीत बदल करावयास हवे हे त्यांनी हेरले. पण नवनवीन पीक उत्पादन घेण्याचा अनुभव नाही. त्यात पुन्हा बाजारपेठेचा प्रश्‍न आलाच, भावही मिळतो की नाही, याची काळजी. पीक उत्पादनात घट येणे, कीड पडल्यास योग्य मार्गदर्शन मिळविणे सर्व अडचणींना तोंड देण्यासाठी पत्नीचीही साथ मिळाली. कृषी विभागाच्या सहकार्याने तब्बल साठ फूट उंचीवर केलेल्या शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करत दरेगाव (ता. खुलताबाद)च्या डोंगराळ भागात तुकाराम गायकवाड यांनी नंदनवन फुलविले आहे.
या परिसरातील काही भाग डोंगराळ आहे, ऊस हे येथील पारंपरिक पीक. फळबागही नगण्यच. हवामानाने आपला रंग दाखवायला सुरवात केल्यानंतर गायकवाड यांनी पारंपरिक पीकपद्धतीला फाटा देत कलिंगड, भाजीपाला पिकांना प्राधान्य देत दुष्काळावर मात केली आहे. सध्या त्यांच्याकडे उसाचे एक गुंठाही क्षेत्र नाही. त्याच जागी त्यांनी कलिंगड, कांदा (बीजोत्पादन), अद्रक लागवड केली आहे. बीजोत्पादनाचा कांदा पाच एक क्षेत्रात असून जोमदार आला आहे. 
====================================
अनंत अंबानीचे सलमान, धोनीकडून कौतुक

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याने 18 महिन्यांत 108 किलो वजन घटविल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अभिनेता सलमान खानसह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही त्याचे कौतुक केले आहे.

‘आयपीएल‘च्या सुरवातीच्या सत्रांमध्ये "मुंबई इंडियन्स‘ संघाचे मालक मुकेश अंबानींचा मुलगा अनंत हा आई नीतासोबत सीमारेषेवरील कोचावर बसलेला टीव्हीवर दिसत असे. विश्‍वास बसणार नाही असे तब्बल 108 किलो वजन घटविण्यात अनंतला यश आले आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या एका पार्टीत त्याचा हा खऱ्या अर्थाने शिडशिडीत बांधा दिसला अन्‌ सोशल मीडियाचा बांध फुटला. अनंत अंबानी हा विषय ट्‌विटरवर ‘ट्रेंड‘ झाला. सहा-सहा तास ‘वर्कआऊट‘ करून त्याने 108 किलो वजन घटवले.

धोनीने अनंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याने घटविलेले वजन हेच त्याला वाढदिवसाला मिळालेले मोठे गिफ्ट असल्याचे म्हटले आहे. तर सलमानने अनंतला पाहून आनंद व्यक्त करत, त्याने इच्छाशक्तीच्या जोरावर 108 किलो वजन कमी केल्याचे म्हटले आहे. 
====================================
बंगालमध्ये मतदान केंद्राजवळून बॉम्ब जप्त
कोलकता - पश्चिम बंगालमध्ये आज (सोमवार) दुसऱ्या टप्प्यातील विधानसभेचे मतदान होत असून, आज सकाळी तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच वर्धमान जिल्ह्यातील जामुरिया विधानसभा मतदारसंघातील मतदानकेंद्राजवळ बॉम्ब सापडले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेचे मतदान सकाळी सात वाजता सुरु झाल्यानंतर सीपीएमच्या दोन कार्यकर्त्यांना तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी अडवून मतदान केंद्रात जाण्यास मनाई केली. यावरून झालेल्या वादात सीपीएमच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी तृणमुलच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

जामुरिया विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राजवळ बॅगेत ठेवलेले गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या तपासावेळी ही बॅग आढळून आली. हे दोन्ही बॉम्ब निकामी करण्यात आले आहेत. वर्धमान, बांकुरा आणि पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील 31 मतदारसंघात आज मतदान होत आहे.
====================================
बंगालमध्ये 39, आसाममध्ये 36 टक्के मतदान
कोलकता/गुवाहाटी - विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानास आसाम आणि पश्‍चिम बंगाल आज (सोमवार) सकाळपासून सुरवात झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 39.69 टक्के, तर आसाममध्ये 36 टक्के मतदान झाले होते. कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस अशा सत्ताधारी पक्षांसह भाजप आणि माकप या राज्यातील विरोधी पक्षांनीही मतदानासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. 

आसाममध्ये निवडणुकीचा हा दुसरा आणि शेवटचा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात 65 मतदारसंघांत मतदान झाल्यानंतर आज उर्वरित 61 जागांसाठी मतदान होत आहे. राज्य सरकारने सर्व मतदान केंद्रांवर आणि संवेदनशील भागांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. बांगलादेश आणि भूतानच्या सीमेवरही कडक पहारा ठेवण्यात आला आहे. राज्यामध्ये भाजपला सत्ताबदलाची अपेक्षा आहे. पश्‍चिम बंगालमध्येही पश्‍चिम मेदिनीपूर, बांकरा आणि वर्धमान जिल्ह्यांमधील 31 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. तृणमूल कॉंग्रेसला माकप आणि भाजपकडून जोरदार लढत मिळू शकते. दोन्ही राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये चांगले मतदान झाल्याने आजही मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. 
====================================
परदेशातून आणलेल्या वस्तूंवर 15 टक्के सीमाशुल्क
नवी दिल्ली - वर्षभराच्या परदेशातील वास्तव्यानंतर भारतात परतताना सोबत आणलेल्या रंगीत टीव्ही, होम थिएटर सिस्टम आणि दागिन्यांशिवाय इतर स्वरुपात आणलेल्या सोने-चांदीवर नागरिकांना 15 टक्के सीमाशुल्क भरावे लागणार आहे. 

आतापर्यंत वापरलेल्या वैयक्तिक वस्तू किंवा घरगुती सामानावर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसत. नागरिकांना व्हिडियो कॅसेट रेकॉर्डर-प्लेयर, वॉशिंग मशिन, इलेक्ट्रिकल किंवा एलपीसी कुकिंग रेंज, कम्प्युटर/लॅपटॉप आणि 300 लीटर क्षमतेचा रेफ्रिजरेटर आणण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसत. त्याशिवाय, पुरुषांना 50,000 रुपये आणि महिलांना 1,00,000 रुपयांपर्यंतचे दागिने विनाशुल्क भारतात आणण्याची परवानगी होती. 

परंतु आता केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमाशुल्क विभागाने चालू आर्थिक वर्षासाठी शुल्क लागू होणाऱ्या वस्तूंची यादी जाहीर केली आहे. चालू आर्थिक वर्षातभारतीय पासपोर्टधारकांना 13 वस्तू विनाशुल्क भारतात आणता येतील. तसेच, या वस्तूंची सरासरी किंमत 5 लाखांपेक्षा जास्त नसावी व यापेक्षा जास्त किंमतीच्या वस्तूंवर 35 टक्के कर लागू होईल. असेही विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच नेपाळ, भूतान आणि म्यानमारमधून येणाऱ्या नागरिकांसाठी ही मर्यादा केवळ 15,000 रुपये असल्याचे, विभागाने स्वतंत्र निवेदनात कळविले आहे. 
====================================
वैद्य यांचे औषधाच्या गोळ्या खाण्याचं वय-मनसे

मुंबई - महाराष्ट्र राज्याचे चार तुकडे करून वातावरणात विष कालवल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्‍ते म. गो. वैद्य मराठी माणसांच्या मनातून उतरलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणी पिस्तुलातून गोळ्या झाडण्याची गरज नाही. आता त्यांचं वय बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा औषधाच्या गोळ्या घेण्याचं आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका पत्रकातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्‍ते मा. गो. वैद्य यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

शिवाजी पार्कवर गुढीपाढव्याच्या निमित्ताने जाहीर सभेत बोलताना राज ठाकरे यांनी मा. गो. वैद्य यांनी महाराष्ट्राचे विभाजन करावे या वक्‍तव्याचा दाखला देत कठोर टीका केली होती. त्यावर वैद्य यांनी छोट्या राज्याच्या निर्मितीवर ठाम असल्याचे स्पष्ट करत, मी पृथ्वीपासून आताच वेगळा होणार नसून आयुष्याचे शतक पूर्ण करणार आहे. मला वेगळे करायचेच असेल, तर गोळ्या घालाव्या लागतील. अशा भाषेत राज यांना टोला लगावला होता. आज मनसेने एक प्रसिद्धिपत्रक जाहीर करत भारतात राज्ये स्थापन झाली तेव्हा भाषा, संस्कृती व लोकभावनेचा आदर करण्यात आला होता. त्यावरच आधारित राज्यनिर्मिती झाली होती. असे नमूद केले आहे. छोट्या राज्याची निर्मिती करताना लोकसंख्या किमान 50 लाख व 3 कोटी असावी, असे मा. गो. वैद्य यांना वाटत असेल, तर भारतीय संघराज्याच्या ऐवजी "महानगरपालिकांचं संघराज्य‘ निर्माण करायचे आहे काय, असा सवाल मनसेने केला आहे. 
====================================
केरळ आग दुर्घटना; देशभरातून तीव्र दु:ख व्यक्त
फटाक्‍यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी 

नवी दिल्ली - केरळमधील मंदिराला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेबद्दल आज देशभरातून तीव्र दु:ख व्यक्त करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी या घटनेमुळे तीव्र धक्का बसल्याचे सांगत दु:ख झाल्याची भावना व्यक्त केली आहे. 

या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे अतिशय दु:ख झाल्याचे राष्ट्रपती मुखर्जी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत घटनेची सर्व माहिती घेतली. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही बळी पडलेल्यांसाठी तीव्र दु:ख व्यक्त केले. मुख्यमंत्री चंडी यांना तत्काळ मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे या मंदिराला प्रत्यक्ष भेट देणार आहेत. चंडी यांनी याप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि विविध राजकीय पक्षांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मदतकार्यामध्ये सर्व प्रकारे मदत करण्याची तयारी असल्याचे तमिळनाडू सरकारने जाहीर केले आहे. ही आग समाजकंटकांनी लावली असण्याची शक्‍यता लक्षात घेऊन चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. 

राजकीय व्यक्तींबरोबरच बॉलिवूडमधील कलाकारांनाही या घटनेने धक्का बसल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमधून जाणवले. निष्काळजीपणे फटाके वाजविणे हे धोकादायक ठरत असून, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक असल्याचे मत दिग्दर्शक शेखर कपूर यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्‌विटरवरील आपल्या खात्यावरून हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध केले. अभिनेता जॉन अब्राहम आणि फरहान अख्तर यांनीही बळींच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. अभिनेत्री दीया मिर्झाने ही घटना निष्काळजीपणामुळे घडल्याचे म्हटले आहे. पाकिस्ताननेही केरळमधील दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. आगीमुळे अनेक निष्पाप नागरिकांना त्यांचे मौल्यवान जीव गमवावे लागल्यामुळे तीव्र दु:ख झाल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी म्हटले आहे. 
====================================
कोलकाता संघाविरुद्ध दिल्लीची घोर निराशा
कोलकाता - कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सला नऊ विकेट राखून हरवत विजयी सलामी दिली. संघाची घडी नव्याने बसविलेल्या दिल्लीच्या फलंदाजांनी घोर निराशा केली. 

नाणेफेक जिंकून कोलकात्याने दिल्लीला फलंदाजीचे निमंत्रण दिले. त्यांनी दिल्लीला 18व्या षटकात 98 धावांत गुंडाळले. हे किरकोळ लक्ष्य त्यांनी 35 चेंडू राखून पार केले. ईडन गार्डन्सवरील सामन्यात अष्टपैलू आंद्रे रसेल व फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉग यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. विश्वकरंडक गाजविलेल्या कार्लोस ब्रॅथवेटने अपेक्षाभंग केला. सातव्या क्रमांकावर आल्यानंतर तो केवळ सहा धावा करू शकला. कोलकात्याकडून फलंदाजीत रॉबिन उथप्पाने 35 धावा फटकावल्या, तर कर्णधार गौतम गंभीर 38 धावांवर नाबाद राहिला. दिल्लीचा कर्णधार झहीर खान एकही विकेट घेऊ शकला नाही. 
संक्षिप्त धावफलक 

दिल्ली डेअरडेव्हिल्स :
 17.4 षटकांत सर्वबाद 98 (क्विंटन डीकॉक 17, श्रेयस अय्यर 0, संजू सॅमसन 15, कार्लोस ब्रॅथवेट 6, आंद्रे रसेल 3-0-24-3, जॉन हेस्टिंग्ज 2.4-1-6-2, ब्रॅड हॉग 4-1-19-3, पीयूष चावला 4-0-21-2) पराभूत विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स : 14.1 षटकांत 1 बाद 99 (रॉबिन उथप्पा 35-33 चेंडू, 7 चौकार, गौतम गंभीर नाबाद 38, झहीर खान 2.4-0-24-0, अमित मिश्रा 2-0-11-0)
====================================

No comments: