Monday, 18 April 2016

नमस्कार लाईव्ह १८-०४-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- मॉस्को; भारताकडून मसूद अजहरविषयी चीनला विचारणा 
२- भारतीय आयटी क्षेत्र अमेरिकेत "रडार'वर 
३- जपानला 5.8 रिश्टर स्केल तीव्र भूकंपाचा धक्का 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- 'कोहिनूर भारतात परत आणणं अशक्य', केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती 
५- 'कोहिनूर'वर दावा करू शकत नाहीः मोदी सरकार 
६- विजय मल्ल्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट 
७- मोदींचे मॅक्सिमम गव्हर्नमेंट, दोन वर्षात दोन लाख नोकरभरती 
८- यंदा नोकरदारांना 11 ते 13 टक्के वेतनवाढ शक्य 
९- संपूर्ण 'पीएफ' काढण्याचे शेवटचे 12 दिवस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- छगन भुजबळ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल 
११- पंकजा मुंडेंच्या 'दुष्काळ सेल्फी'वर विरोधकांची टीका 
१२- हौस म्हणून नाही तर केलेल्या कामाचा सेल्फी : पंकजा मुंडे 
१३- मद्य कंपन्यांचे पाणी बंद करा- कॉंग्रेसची निदर्शने 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- पुण्यातही जातपंचायतीचा विळखा, समाजाबाहेर लग्न केल्याने कुटुंब बहिष्कृत
१५- पुणे; बसच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, पाऊण तास मृतदेह रस्त्यावरच
१६- दिल्ली : आकाशवाणी भवनजवळ पोस्ट ऑफिसच्या एका वाहनाला आग 
१७- आंध्रप्रदेश : फटाक्यांच्या युनिटमध्ये स्फोट; तीन मृत्यू, आठ जखमी 
१८- गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या घरांची लॉटरी मे महिन्यात 
१९- यवतमाळ; पाणी भरायला गेलेली महिला विहिरीत पडली, वाचवण्याच्या प्रयत्नात पतीचाही बुडून मृत्यू.
२०- देवनारवर दहशत कचरामाफियांचीच 
२१- नांदेड; आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पेरते व्हावे असा दिलासा द्या - पालकमंत्री रावते 
२२- राहुल राजचा रुग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न 
२३- औरंगाबादेत 2 वार्डांत भाजप, कॉंग्रेस विजयी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- शाहरुखच्या 'फॅन'ची हवा! 2016 चा बिगेस्ट वीकेंड ओपनर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान आहे
(आनंद लढ्ढा, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


==================================================

पंकजा मुंडेंच्या 'दुष्काळ सेल्फी'वर विरोधकांची टीका

पंकजा मुंडेंच्या 'दुष्काळ सेल्फी'वर विरोधकांची टीका
लातूर : लातूरमधील मांजरा नदीतला गाळ काढण्याचं काम सुरु असताना महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सेल्फी काढल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. इतकंच नाही तर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे. 
लातूर जिल्ह्यातील केसाई गावात भीषण दुष्काळामुळे मांजरा नदीचं पात्र कोरडं ठाक पडलं आहे. याठिकाणी गाळ काढण्याचं काम सुरु आहे. त्याची पाहणी करण्यासाठी पंकजा मुंडे लातूरला गेल्या होत्या. त्यावेळी बॅकग्राऊंडला गाळ काढण्याचं काम सुरु असताना पंकजांनी सेल्फी काढला. तसंच सोबत असलेल्या अधिकाऱ्यांसोबतही पंकजांनी त्यांच्या कॅमेऱ्यात सेल्फी काढला.
==================================================

पुण्यातही जातपंचायतीचा विळखा, समाजाबाहेर लग्न केल्याने कुटुंब बहिष्कृत

पुण्यातही जातपंचायतीचा विळखा, समाजाबाहेर लग्न केल्याने कुटुंब बहिष्कृत
पुणे जात पंचायतीचा विळखा केवळ ग्रामीण भागातच नाही, तर शहरी भागातही पसरत चालला आहे. पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजाबाहेर लग्न केल्याच्या रागातून कुटुंबीयांना बहिष्कृत केल्याचं समोर आलं आहे. 
पुण्यात राहणाऱ्या आणि मूळच्या राजस्थानच्या असलेल्या शंकर डांगी या 54 वर्षीय व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना समाजातून बहिष्कृत करून शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. 
शंकर डांगी यांच्या मुलानं ब्राह्मण जातीच्या मुलीशी लग्न केलं. डांगी हे श्रीगौडब्राह्मण समाजाचे आहेत. त्यांच्याच समाजातील मुलीशी लग्न केलं नाही, या रागातून डांगी यांना घरच्या कार्यात सहभागी होण्यास जात पंचायतीच्या पंचांनी नकार दिला. 
दरम्यान डांगी यांचे चुलते वारल्यानं त्यांच्या अंत्यविधीदरम्यानही डांगी यांनी उपस्थित राहू नये आणि राहिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा डांगी यांनी केला आहे. 
या संदर्भात त्यांनी 8 तारखेला सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि 14 तारखेला उशिरा जात पंचायत कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद झाली आहे आणि 5 जणांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे. तेजाराम डांगी, मोतीराम डांगी, विजय डांगी, बालकिसन डांगी, दिपचंद डांगी यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. परंतु, पोलिसांनी अजून कुणालाही चौकशीसाठी बोलवलं नाही किंवा अटकही केली नाही. 
सातत्यानं पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढूनही पोलिसांकडून सहकार्य होत नसल्याचा दावा डांगींनी केला आहे.
 नव्या कायद्याचा जीआर पोलिसांच्या हाती पडला नसल्यामुळे त्या कायद्यान्वये कारवाई करता येणार नाही, असा दावा पोलिस करत आहेत. डांगी आणि त्यांच्या पत्नी सध्या भीतीच्या छायेत आहेत. तसेच, पंचांनी समाजातून बहिष्कृत केल्याच्या विरोधात न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. 
दरम्यान, ज्या पंचांनी डांगी कुटुंबीयांना बहिष्कृत केलं आहे, त्यांनी माध्यमांशी बोलायलाही नकार दिला आहे.
==================================================

शाहरुखच्या 'फॅन'ची हवा! 2016 चा बिगेस्ट वीकेंड ओपनर

शाहरुखच्या 'फॅन'ची हवा! 2016 चा बिगेस्ट वीकेंड ओपनर
मुंबई : शाहरुख खानच्या ‘फॅन’ चित्रपटाची त्याच्या फॅन्समध्ये चांगलीच हवा आहे. किंग खानच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत फॅनला थंड प्रतिसाद मिळाल्याचं चित्र असलं, तरी बॉक्स ऑफिसवर सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 52.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवत ‘फॅन’ हा 2016 मधील हाय्येस्ट ओपनिंग वीकेंड ग्रॉसर ठरला आहे.

शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला फॅन 15 एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित झाला. रिलीजनंतरच्या पहिल्या वीकेंडला म्हणजेच शुक्रवार, शनिवार,रविवार या तीन दिवसांत, 2016 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरण्याचा मान फॅनला मिळाला आहे.
==================================================

'कोहिनूर भारतात परत आणणं अशक्य', केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

'कोहिनूर भारतात परत आणणं अशक्य', केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती
नवी दिल्ली: इंग्लंडमधून कोहिनूर हिरा भारतात परत आणण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. याच प्रकरणी सुनावणी दरम्यान आज केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात महत्वाची माहिती दिली. 
‘कोहिनूर हिरा परत आणणं शक्य नाही. कारण की, कोहिनूर हिरा चोरी केला गेला नव्हता अथवा जबरदस्तीने नेलाही नव्हता. हा हिरा महाराज रणजीत सिंह यांनी ईस्ट इंडिया कंपनीला स्वत:हून दिला होता.’ अशी माहिती केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिली. 
‘तुम्हाला असं वाटतं की ही याचिका फेटाळण्यात यावी? जर असं केल्यास कोहिनूरवरील भारताचा दावा कायमसाठी कमकुवत होईल. असं म्हटलं जाईल की, भारताच्या सर्वात मोठ्या कोर्टानं आता हा फैसला दिला आहे.’ केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनंतर सरन्यायाधीश यांनी केंद्राला सुनावलं.
 दरम्यान, कोहिनूर हिरा देशात परत आणण्यासंबंधी केंद्र सरकार कोणते प्रयत्न करीत आहेत. याची माहिती देण्यासाठी कोर्टानं सरकारला सहा आठवड्यांची मुदत दिली आहे.
==================================================

बसच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, पाऊण तास मृतदेह रस्त्यावरच

बसच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, पाऊण तास मृतदेह रस्त्यावरच
महत्वाची बाब म्हणजे अपघात झाला त्यावेळी सुप्रियाने हेल्मेट घातले होते. मात्र दुर्दैवाने बसचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
पुणे : पुण्याच्या सिंहगड रस्त्यावर राजाराम पुलाजवळ महापालिकेच्या बसने एका तरुणीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात अॅक्टिव्हास्वार तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यानंतर पालिकेच्या असंवेदनशील कारभाराचा कळस पाहायला मिळाला. 
यात संतापजनक बाब म्हणजे तरुणीचा मृतदेह पाऊण तास रस्त्यावर तसाच पडून होता. अपघातानंतर बघ्यांची गर्दी जमली, पोलिसही आले, मात्र त्या वेळेत एकही रुग्णवाहिका या तरुणीचा मृतदेह उचलण्यासाठी आली नाही. अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यानंतर अखेर तिचा मृतदेह उचलण्यासाठी रुग्णवाहिका आली. 
तरुणी सिंहगड रोडकडून पुण्याच्या दिशेने येत असताना पाठीमागून येणाऱ्या पीएमपीएमएल बसने सुप्रियाला धडक दिली. बसचं पुढचं चाक तिच्या डोक्यावरुन गेल्यामुळे सुप्रिया जागीच ठार झाली. तिचं वय 18 ते 20 वर्षाच्या दरम्यान असल्याचा पोलीसांचा अंदाज आहे. 
महत्वाची बाब म्हणजे अपघात झाला त्यावेळी सुप्रियाने हेल्मेट घातले होते. मात्र दुर्दैवाने बसचे चाक डोक्यावरून गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
==================================================

हौस म्हणून नाही तर केलेल्या कामाचा सेल्फी : पंकजा मुंडे

हौस म्हणून नाही तर केलेल्या कामाचा सेल्फी : पंकजा मुंडे
मुंबई : हौस म्हणून नाही तर केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी सेल्फी काढला. काही उथळ लोकांनी त्याचं राजकारण केलं, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सेल्फी वादावर दिलं आहे. लातूर जिल्ह्यातील केसाई गावात भीषण दुष्काळामुळे मांजरा नदीचं पात्र कोरडं ठाक पडलं आहे. याठिकाणी गाळ काढण्याचं काम सुरु आहे. त्याची पाहणी करण्यासाठी पंकजा मुंडे लातूरला गेल्या होत्या. त्यावेळी बॅकग्राऊंडला गाळ काढण्याचं काम सुरु असताना पंकजांनी सेल्फी काढला. तसंच सोबत असलेल्या अधिकाऱ्यांसोबतही पंकजांनी त्यांच्या कॅमेऱ्यात सेल्फी काढला.
==================================================

विजय मल्ल्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट

मुंबई, दि. १८ - किंगफिशर एअरलाईन्सची याचिका फेटाळल्यानंतर विशेष न्यायालयाने सोमवारी विजय मल्ल्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. विजय मल्ल्यांनी ४३० कोटी रुपये परदेशात संपत्ती खरेदी करण्यासाठी वापरले या ईडीच्या दाव्याला किंगफिशर एअरलाईन्सने आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने किंगफिशरची याचिका फेटाळून लावली. 
 ==================================================

मोदींचे मॅक्सिमम गव्हर्नमेंट, दोन वर्षात दोन लाख नोकरभरती

  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १८ - दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स' ही घोषणा लोकप्रिय ठरली होती. घोषणेनुसार कारभार होईल असे लोकांना वाटले होते. पण प्रत्यक्षात सरकारी नोकरभरतीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर , इथे मॅक्सिमम गव्हर्नमेंट आणि मिनिमम गव्हर्नन्स होताना दिसत आहे. एक मार्च २०१५ रोजी केंद्रीय कर्मचा-यांची एकूण संख्या ३३.०५ लाख होती. २०१६ मध्ये हाच आकडा ३४.९३ लाख झाला आणि एक मार्च २०१७ पर्यंत केंद्रीय कर्मचा-यांची संख्या ३५.२३ लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. रेल्वे केंद्र सरकारचा भाग असून, रेल्वेच्या कर्मचा-यांची एकूण संख्या १३,२६,४३७ आहे. तीन वर्षात रेल्वेने आपला एकही कर्मचारी वाढवलेला नाही. सरकारच्या महसूली विभागामध्ये ७० हजारपर्यंत कर्मचारी संख्या वाढेल असा अंदाज आहे. यामध्ये आयकर खाते, कस्टम आणि उत्पादन शुल्क विभागांचा समावेश होतो. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या केंद्रीय निमलष्करी दलामध्ये ४७ हजारांपर्यंत नव्या कर्मचा-यांची भरती होईल असा अंदाज आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने २२०० कर्मचा-यांची भरती केली आहे. 
==================================================
छगन भुजबळ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल
मुंबई- महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

छातीत दुखू लागल्याने भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात हलविण्यात आले. 
छगन भुजबळ, समीर आणि पंकज भुजबळ यांच्यासह 50 जणांवर सक्तवसुली संचनालयाने (ईडी) 29 मार्च रोजी मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत सत्र न्यायालयात 11 हजार 150 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. तब्बल 870 कोटींच्या महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांचा गुढीपाडवा यंदा कोठडीतच गेला.

अलीकडेच महात्मा फुले यांच्या शतकोत्तर रौप्यस्मृती वर्षाकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे याबद्दलची खंत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती. तसेच 28 नोव्हेंबर 2017 ला महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीला सव्वाशे वर्षे पूर्ण होत असल्याने सरकारने वर्षभरासाठी कार्यक्रम आखावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे. आर्थर रोड कारागृहातून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. 
==================================================
यंदा नोकरदारांना 11 ते 13 टक्के वेतनवाढ शक्य
नवी दिल्ली : देशातील कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षात सरासरी 11 ते 13 टक्क्यांची वेतनावाढ मिळण्याची शक्यता कर्मचारी भरती सल्लागार कंपनी टीमलीजने वर्तवली आहे. तसेच भारतीय कंपन्यांमार्फत यंदा आणखी जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

कर्मचारी भरती सल्लागार कंपनीच्या अहवालानुसार, भारतीय रोजगार क्षेत्रात परिपक्वतेची लक्षणे दिसून येत आहेत आणि विविध मार्गांनी गुणवत्तेचा गौरव केला जात आहे. तरी, यंदा केवळ 42 टक्के कर्मचाऱ्यांना वेतनात भरघोस वाढ मिळण्याची शक्यता आहे. मात्र, कर्मचाऱ्याच्या सरासरी वेतनात 11 ते 13 टक्के वाढीचा अंदाज आहे. 

क्षेत्रनिहाय विचार केला असता, माहिती व तंत्रज्ञान, अॅग्रिकल्चर अँड अॅग्रोकेमिकल्स, एफएमसीडी, हेल्थकेअर व फार्मा, हॉस्पिटॅलिटी, रिटेल आणि टेलिकम्युनिकेशन्स क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरासरी 11 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, दिल्ली, मुंबई, पुणे, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नईतील कर्मचाऱ्यांना जास्त प्रमाणात वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, विशेष कौशल्य टिकवून ठेवण्यासाठी काही ‘ब्लू कॉलर‘ नोकऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
==================================================
'कोहिनूर'वर दावा करू शकत नाहीः मोदी सरकार
नवी दिल्ली- इंग्लंडमध्ये असलेल्या कोहिनूर हिऱयावर भारत दावा करू शकत नसल्याने तो भारतात आणणे शक्‍य नाही, अशी माहिती मोदी सरकारने आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात दिली. 

कोहिनूर हिरा चोरीला गेला नव्हता किंवा जबरदस्ती करून नेण्यात आला नव्हता. सन 1849 मध्ये झालेल्या युद्धात पराभव झाल्याने दिलीप सिंह यांनी हा हिरा इंग्रजांना दिला होता. कोहिनूर आपण परत मागितला तर आपल्या संग्राहलयामध्ये असलेल्या वस्तूंवरही दुसरे देश दावा करू शकतील, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली 

टिपू सुलतान यांची तलवार परत आणली आहे. हिऱ्याच्या बाबतीतही असे होऊ शकते. परंतु, याचिका रद्द व्हावी अशी तुमची इच्छा आहे का? असे झाल्यास भविष्यात कायदेशीर हक्क सिद्ध करणे तुम्हाला अवघड होईल, असे मत सरन्यायाधीशांनी मांडले. कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकार कोणते प्रयत्न करीत आहे, याची माहिती देण्यासाठी न्यायालयाने सरकारला सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. 

दरम्यान, भारताने कोहिनूर भारताला परत करावा, अशी मागणी भारताने इंग्लंड केली होती. भारताची ही मागणी ब्रिटिश सरकारने 2013 मध्ये फेटाळली होती.
==================================================
मद्य कंपन्यांचे पाणी बंद करा- कॉंग्रेसची निदर्शने
औरंगाबाद- दुष्काळी परिस्थितीमुळे औरंगाबादजिल्ह्यात मोठया प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे पाणी बंद करून, ते पाणी पिण्यासाठी द्यावे, अशी जोरदार मागणी करीत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसतर्फे आज (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सकाळी अकरा वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शनांमध्ये औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, समशेरसिंग सोधी, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार नामदेवराव पवार, माजी आमदार डॉ. कल्याणराव काळे, सय्यद अक्रम, सौ. सरोजताई मसलगे यांच्यासह सर्व पक्षाच्या सर्व आघाड्या, विभाग व कक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते, अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली.
==================================================
देवनारवर दहशत कचरामाफियांचीच


देवनार क्षेपणभूमीवर जानेवारी आणि मार्चमध्ये भडका उडाला. या आगीची चर्चा थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली. मुंबईतील वायुप्रदूषण वाढले. त्यातून राजकारणाचा स्फोट झाला. राजकीय नेते आणि महापालिका प्रशासनाने आश्‍वासनांचा वर्षाव केला. डम्पिंग ग्राऊंड बंद होणार नाही; मात्र स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आश्‍वासन महापालिकेने दिले. त्या आश्‍वासनावर स्थानिकांचा विश्‍वास नाही. जानेवारीत लागलेल्या आगीच्या प्रकरणी पोलिसांनी नऊ भंगार व्यापाऱ्यांना नुकतीच अटक केली; मात्र कचरामाफिया आणि भंगारवाल्यांचा दबदबा कायमच आहे...

कचऱ्याची बेकायदा विल्हेवाट लावणाऱ्या टोळ्या देवनार डम्पिंग ग्राऊंडवर मोकाट आहेत. या कचरामाफियांमध्ये राडारोडावाले, वैद्यकीय कचरावाले, घातक कचरावाले, हॉटेल कचरावाले असे वर्ग आहेत. राडारोडा भरलेला एक ट्रक रिकामा केल्यास त्यांना दोन ते अडीच हजार रुपये मिळतात. वैद्यकीय आणि घातक कचऱ्यासाठी हा दर जास्त आहे. कचरामाफियांनी स्वत:चे ‘एरिया‘ तयार केले. त्यातून हाणामाऱ्या सुरू झाल्या. पालिका अधिकाऱ्यांवरही अनेकदा हल्ले झाले. कचऱ्यातून प्लॅस्टिक, धातू, लाकूड गोळा करणारे भंगारवालेही मोठ्या प्रमाणात आहेत. जानेवारी आणि मार्चमधील आगींच्या प्रकरणी अशाच नऊ भंगारवाल्यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली. माफिया आणि भंगारवाल्याचे कंबरडे मोडण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी प्रयत्न केले खरे; पण त्यांचे बस्तान कायम असल्याचे स्थानिक सांगतात. भंगारवाले लहान मुलांना क्षेपणभूमीवर पाठवून कचरा गोळा करतात. पोलिसांनीही त्याची कबुली दिली आहे.
==================================================
भारताकडून मसूद अजहरविषयी चीनला विचारणा
मॉस्को - भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज (सोमवार) चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबरील चर्चेत भारतामधील पठाणकोट येथील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार व जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अजहर याला दहशतवादी ठरविण्यासंदर्भातील राष्ट्रसंघात मांडण्यात आलेला प्रस्ताव अडविण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. रशिया, चीन व भारत या तीन देशांच्या परराष्ट्र मंत्री स्तरावरील बैठकीस उपस्थित राहण्यासाठी स्वराज या रशियामध्ये आल्या आहेत. यावेळी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत स्वराज यांनी मसूदचा मुद्दा आग्रहीपणाने मांडला. 

मसूद अजहर आणि ‘जैश-ए-महंमद‘ या संघटनेवर तातडीने कारवाई न केल्यास दक्षिण आशियातील इतर देशांच्या सुरक्षेसही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका भारताने घेतली होती. अजहर आणि ‘जैश-ए-महंमद‘ यांच्या दहशतवादी कारवायांचे ठोस पुरावेही भारताने संयुक्त राष्ट्रांच्या समितीसमोर सादर केले. या समितीमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सच्या निरीक्षकांचा समावेश आहे. हे पुरावे या समितीने संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्यांना पाठविले. ‘या प्रस्तावावर कोणत्याही सदस्याचा आक्षेप नसेल, तर निर्णय घेण्याची मुदत संपल्यानंतर बंदीची घोषणा केली जाईल,‘ असेही जाहीर करण्यात आले होते. मात्र, ‘मसूद अजहरवर बंदी घालण्याचा निर्णय तूर्त स्थगित करावा, अशी विनंती चीनने या समितीला मुदत संपण्यापूर्वी काही तास आधी केली,‘ अशी माहिती देण्यात आली. 
==================================================
राहुल राजचा रुग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई- अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणातील संशयित आरोपी राहुल राज सिंग याने रुग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती सूत्रांनी आज (सोमवार) दिली. 

प्रत्युषाच्या आत्महत्येप्रकरणी राहुलविरुद्ध बांगूरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर कांदिवलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी शुक्रवारी (ता. 9) रुग्णालयात जाऊन दोन तास राहुलची चौकशी केली. रुग्णालयात पहिल्या मजल्यावर एका खोलीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. पोलिस गेल्यानंतर स्नानगृहामध्ये तो गेला होता. बराच वेळ झाल्यानंतर तो बाहेर न आल्यामुळे नातेवाइकांनी डॉक्‍टरांशी संपर्क साधला. प्रयत्न करूनही तो दरवाजा उघडत नव्हता. डॉक्‍टरांनी त्याचे मन कळविल्यानंतर त्याने दरवाजा उघडला. यावेळी खिडकीतून खाली उडी मारून तो आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले, असे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी त्याच्या वकिलांनी केलेला अर्ज दिंडोशी न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. त्याला 18 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
==================================================
संपूर्ण 'पीएफ' काढण्याचे शेवटचे 12 दिवस
नवी दिल्ली : नोकरदार वर्गाला ‘पीएफ‘ची संपूर्ण रक्कम काढायची असल्यास एप्रिल अखेरपर्यंतच पूर्ण रक्कम काढता येणार आहे. मात्र 1 मे नंतर पूर्ण ‘पीएफ‘ कर्मचा-याच्या वय वर्षे 58 नंतरच मिळू शकेल.

‘पीएफ‘ची रक्कम काढल्यास त्यावर कर आकारण्याचा प्रस्ताव केंद्राने ठेवला होता. या प्रस्तावाला चाकरमान्यांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर केंद्राने हा प्रस्ताव मागे घेतला. परंतु, ‘‘पीएफ‘ची पूर्ण रक्कम काढता येणार नाही‘ हा नियम सरकारने कायम ठेवला आहे. तो 1 मेपासून लागू करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्याबाबत नवीन नियम केले आहेत. नवीन नियमानुसार निधीतील रक्कम काढण्यावर मर्यादा आणल्या आहेत. 
आतापर्यंत असलेल्या नियमानुसार कर्मचारी नोकरी सोडल्यावर दोन महिने बेरोजगार राहिल्यास त्याला पूर्ण रक्कम काढता येत असे. आता मात्र, अशा व्यक्तीस ‘पीएफ‘मध्ये फक्त त्याच्या पगारातून जमा झालेली रक्कम मिळेल. मालक, कपंनीकडून जमा करण्यात आलेली रक्कम त्याला मिळणार नाही. हा नवीन नियमही 1 मे 2016 पासून लागू करण्यात येणार आहे.
==================================================
औरंगाबादेत 2 वार्डांत भाजप, कॉंग्रेस विजयी
औरंगाबाद- सातारा-देवळाई भागातील औरंगाबाद महापालिकेच्या दोन वॉर्डांसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस व भाजपचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत.

शिवसेनेला दोन्ही जागी विजय संपादन करण्यात अपयश आले. वॉर्ड क्रमांक ११४ मधून भाजपचे अप्पासाहेब हिवाळे विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके उडविण्यात आले. वॉर्ड क्रमांक ११५ ची जागा कॉंग्रेसच्या सायली जमादार यांनी जिंकली. त्यांनी नजिकच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या पल्लवी गायकवाड यांचा पराभव केला. 

सातारा-देवळाई परिसराचा औरंगाबाद महापालिकेत अलिकडेच समावेश करण्यात आला आहे. तिथल्या दोन वॉर्डांसाठी रविवारी (ता. १७) मतदान झाले होते. आज (सोमवार) सकाळी मतमोजणी करण्यात आली.
==================================================
भारतीय आयटी क्षेत्र अमेरिकेत "रडार'वर
मुंबई: अमेरिकन ग्रँड ज्युरीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसवर लादलेल्या 100 कोटी डॉलर दंडाचा कंपनीसह संपुर्ण भारतीय आयटी क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्य क्षेत्रात सध्या आयटी कंपन्यांच्या सॉफ्टवेअरला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. टीसीएदेखील या क्षेत्रात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करीत आहे. एपिक सिस्टम्स या क्षेत्रासाठी सॉफ्टवेअर सेवा पुरविणारी सर्वात मोठी कंपनी आहे. 

"सध्या भारतीय आयटी कंपन्यांच्या वाढीचा वेग मंदावला आहे. या निर्णयामुळे टीसीएसची आणखी पीछेहाट होणार आहे. शिवाय, यामुळे अमेरिकी बाजारात प्रवेश करु इच्छिणाऱ्या इतर भारतीय कंपन्यांचीदेखील प्रतिमा मलीन होऊ शकते. आरोग्य क्षेत्रात कंपनीची प्रतिष्ठा अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना टीसीएस व पर्यायाने इतर भारतीय कंपन्यांबद्दल शंका उपस्थित करण्यास वाव निर्माण होईल व त्यांचा प्रवास आणखी अवघड होईल", असे मत एव्हरेस्ट ग्रुपचे मुख्य अधिकारी पीटर बेंडर सॅम्युएल यांनी व्यक्त केले आहे. ॉ

एपिक सिस्टम्सने टाटा समुहाच्या कंपन्यांनी आपले ट्रेड सिक्रेट्स, गोपनीय माहिती, कागदपत्रे आणि डेटा चोरल्याचा आरोप केला होता. कंपनीने ग्राहक सल्लागार सेवा देताना ही चोरी केली व टीसीएसच्या कर्मचाऱ्यांनी एपिकच्या सॉफ्टवेअरवरुन महत्त्वाचे दस्ताऐवज डाऊनलोड करुन आपले उत्पादन उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, असे एपिकने म्हटले होते. यावर विस्कॉन्सिन राज्याच्या ग्रँड ज्युरीने एपिक सिस्टम्सच्या बाजूने निकाल देत टीसीएसला दंड ठोठावला आहे. 
==================================================

आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पेरते व्हावे असा दिलासा द्या - पालकमंत्री रावते


पिक-कर्ज, बियाणे, खते, पिक-विमा आणि चारा, कृषि-पंप वीज जोडणी यासाठी काटेकोर नियोजन करा. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामासाठी पेरते व्हावे...! असा दिलासा द्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी एकरूप व्हा , असे निर्देश राज्याचे परिवहन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज येथे दिले. 
जिल्ह्यातील खरीप हंगाम2016 च्या अनुषंगाने आयोजित पुर्वतयारी आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री श्री. रावते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे बैठक संपन्न झाली. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगलताई गुंडले, सर्वश्री आमदार अमर राजूरकर, डी. पी. सावंत, सुभाष साबणे, नागेश पाटील-आष्टीकर तसेच आमदार सौ. अमिता चव्हाण, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे, महापालिका आयुक्त सुशिल खोडवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. रावते म्हणाले की, मराठवाड्यात भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आगामी खरीप हंगामात पिक घेण्यासाठी सर्वोतोपरी मदत मिळाली पाहिजे यासाठी नियोजन करा. पेरणीपुर्व तयारीसाठी शेतकऱ्यांना पिक कर्ज, त्याच्या कर्जांचे पुनर्गठन वेळेत होईल याकडे लक्ष द्या. आगामी हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याची मानसिकता तयार करा. त्यासाठी त्यांनी तुमच्यापर्यंत पोहचण्याची वाट पाहू नका. बँकांनी त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करावेत. कर्ज पुरवठ्याबाबत आवश्यक प्रक्रिया-कागदपत्रे यांची माहिती देण्यासाठी मंडळ निहाय नियोजन करा. प्रत्येक बँकेने कर्ज वाटपासाठी नोडल अधिकारी नियुक्त करा. कोरडवाहू शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. ऊसासाठी शंभर टक्के ठिबक सिंचनचा वापर व्हावा, आंतरपिक पद्धतीने चांगले उत्पन्न देणाऱ्या तूर, मूग अशा तृणधान्यांची पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांना विविध माध्यमातून माहिती द्या. कर्ज वाटप, पिकपद्धतीतील बदल यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत गावा-गावात पोहचण्यासाठी लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा. त्यांचाही विविध उपक्रमात सहभाग घ्या, असेही त्यांनी सांगितले. 
==================================================

No comments: