Friday, 15 April 2016

नमस्कार लाईव्ह १५-०४-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- बिनकामाचे पाकिस्तानी पंतप्रधान विकणे आहे, ईबेवर जाहिरात 
२- पाकिस्तानचे घुमजाव, भारताबरोबर चर्चेची तयारी 
३- वॉशिंग्टन; संयुक्त राष्ट्र संघातील 'हिडन व्हेटो' वापरावरुन भारताने फटकारलं 
४- न्यूयॉर्क; कामाच्या ठिकाणी महिलाच महिलांना साथ देत नाहीत - इंद्रा नुयी 
५- वॉशिंग्टन; विदेशी मनीऑर्डरचा पैसा घटला, तरी भारत अव्वल 
६- इस्लामाबाद; '9/11'नंतर पाकला तब्बल 13 अब्ज डॉलर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- नागपूर; भाषणादरम्यान कन्हैयावर चप्पलफेक, अभाविपचा कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात 
८- 'नवविवाहीत दाम्पत्यांच्या हनिमूनमुळेच केदारनाथमध्ये पूर', शंकराचार्यांचं अजब तर्कट 
९- भुजबळांच्या कंपनीचा संचालक माफीचा साक्षीदार 
१०- शंकराचार्यांच्या मुक्ताफळांची मालिका सुरुच, साईबाबांची तुलना राक्षसाशी 
११- अयोध्येपासून शिर्डीतही रामजन्माचा उत्साह 
१२- कोल्लम; मोदी, राहुलच्या भेटीवर केरळ पोलिसांचा आक्षेप 
१३- भारत करणार अन्य देशांना 'व्याघ्रसाह्य' - जावडेकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- दुष्काळ कायमचा हटवण्याचा आमीरचा निर्धार 
१५- राज्यावर अस्मानी संकट, सरकारप्रती विश्वास हरवतोय: नाना 
१६- मुंबई; रोहित वेमुलाच्या कुटुंबीयांकडून बौद्ध धर्माचा स्वीकार 
१७- मुंबई; मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 10 पट खर्च : कॅग 
१८- देशाला अंतर्गत फुटीरतावाद्यांकडून धोका: सरंक्षणमंत्री 
१९- दुष्काळावर शांत राहणे हा गुन्हा - नाना पाटेकर 
२०- साडेतीन लाख कोटींचे ६२ प्रकल्प मार्गी  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२१- जळगाव; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा लेझिमच्या तालावर ठेका 
२२- नागपूर संघाची नाही तर बाबासाहेबांची भूमी : कन्हैया 
२३- गडचिरोलीत माजी आमदाराच्या बॉडीगार्डची नक्षलवाद्यांकडून हत्या 
२४- चेन्नई; रजनीकांतचा 600 किलोंचा चॉकलेटचा पुतळा 
२५- दिल्लीत एक वर्षासाठी तंबाखूवर बंदी 
२६- हैदराबाद; तेलंगणात हाय अलर्ट; उष्माघाताचे 35 बळी 
२७- अहमदाबाद; गुजरातेत अजूनही अस्पृश्‍यतेच्या भिंती 
२८- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी - सौ. वर्षाताई भोसीकर 
२९- लोहा; टेळकि येथे गोविंदबुवा पालखि सोहळ्या निमित्याने जंगि कुस्तिचे सामने संपन्न 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३०- धोनीपेक्षा रैना सरस, गुजरातकडून पुण्याचा धुव्वा 
३१- संजय दत्तच्या पार्टीत रात्री दोन वाजता पोलिसांची एंट्री 
३२- एकाच संघात खेळलेले धोनी-रैना पहिल्यांदाच आमने-सामने 
३३- अंगावर शहारा आणणारा 'सरबजीत'चा ट्रेलर रिलीज 
३४- स्वत:चा जीव देण्याआधी समोरच्याचा जीव घेईन : प्रियांका 
३५- सचिनच्या सिनेमाचा टिझर रिलीज 
३६- हैदराबाद; फक्त वीस हजारांसाठी पित्याने भर बाजारात मुलींचा लिलाव मांडला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
दत्ताहारी हाधव, अवतारसिंघ पेहारेदार, बालाजी कुऱ्हाडे, माधवसिंह ठाकूर, नाना मैनदाद, गौस शैख, श्रीराम गिरगावकर, सचिन सोनखेडे, माधव जाकापुरकर, रविकुमार गौड, आशिष दमकोंडवार, दीपक खरात, भास्कर वैजवाडे, संजीव कुमार, बाळू भोसले, नितीन काबरा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आयुष्यात यश मिळते तेंव्हा कळते कि आपण कोण आहोत पण अपयशी होतो तेंव्हा कळते कि आपले कोण आहेत
(अमोल पुढारी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


=============================================

संजय दत्तच्या पार्टीत रात्री दोन वाजता पोलिसांची एंट्री

संजय दत्तच्या पार्टीत रात्री दोन वाजता पोलिसांची एंट्री
मुंबई: जवळजवळ तीन वर्षापेक्षा अधिक शिक्षा भोगून नुकताच जेलमधून बाहेर आलेला अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संजय दत्तमुळे त्याच्या शेजाऱ्यांना पोलिसांना पाचारण करावं लागल्याचं वृत्त समजतं आहे.

एका इंटरटेनमेंट वेबसाइटच्या वृत्तानुसार संजय दत्तच्या घरात बराच गोंधळ सुरु होता. त्याच्या घरातून प्रचंड आवाज येत होता. तसंच घरामध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवणं सुरु होता. रात्री उशीरापर्यंत हा प्रकार सुरु होता. त्यामुळे वैतागलेल्या त्याच्या शेजाऱ्यांनी अखेर पोलिसांना पाचारण केलं.

संजयच्या घरी काही कारणानिमित्त पार्टी आयोजित करण्यात आली होती. ही पार्टी रात्री 2 वाजेपर्यंत सुरु होती.   त्यानंतर संजयच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करुन त्याबाबत तक्रार केली.
=============================================

मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, दुष्काळ कायमचा हटवण्याचा आमीरचा निर्धार

मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, दुष्काळ कायमचा हटवण्याचा आमीरचा निर्धार
मुंबई : महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ आहे. हा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेणं आवश्यक आहे. त्यासाठी पाणी फाऊंडेशन काम करत असून, आमची योजना यशस्वी झाल्यास महाराष्ट्रातील दुष्काळ कायमचा हटेल, असा विश्वास अभिनेता आमीर खान आणि दिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी व्यक्त केला. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. 
महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. लातुरात पाणी टंचाई इतकी भीषण आहे की ट्रेनने पाणी पुरवण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारसह अनेक सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील संवेदनशील व्यक्ती आपापल्या परीने दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानने ‘पाणी फाऊंडेशन’च्या माध्यमातून सुरु केला आहे. याच निमित्ताने अभिनेता आमीर खान आणि सिनेदिग्दर्शक सत्यजीत भटकळ यांनी आज ‘माझाकट्टा’वरुन संवाद साधला. 
मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा 
देशातील अनेक राज्यांमध्ये भीषण दुष्काळ आहे. मात्र, दुष्काळ निवारणाची सुरुवात महाराष्ट्रातूनच का केली, असा प्रश्न ज्यावेळी आमीरला विचारला गेला, त्यावेळी आमीर म्हणाला, “मी महाराष्ट्राचा आहे. शिवाय, महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे राज्यातील तीन तालुक्यांपासून पाणी फाऊंडेशनने आपलं काम सुरु केलं आहे.”
=============================================

जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा लेझिमच्या तालावर ठेका

जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा लेझिमच्या तालावर ठेका!
जळगाव राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत लेझिमच्या तालावर ठेका धरला. गेल्या 25 वर्षांपासून जामनेर मतदारसंघात बाबासाहेबांच्या जयंतीची मिरवणूक निघते. यामध्ये गिरीश महाजन दरवर्षी सहभागी होतात.

राज्याच्या जलसंपदामंत्रिपदी विराजमान झाल्यानंतरही गिरीश महाजनांनी ही परंपरा कायम ठेवली. गिरीश महाजन यांनी मिरवणुकीसाठी खास निळा शर्ट परिधान केला होता. गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या.

=============================================

भाषणादरम्यान कन्हैयावर चप्पलफेक, अभाविपचा कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात

भाषणादरम्यान कन्हैयावर चप्पलफेक, अभाविपचा कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात
नागपूर: दिल्लीतील जवाहरलाला नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूतील छात्र संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारचं आज नागपूरमध्ये भाषणादरम्यान अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. भषण सुरु असतानाच कन्हैयाच्या दिशेने एका व्यक्तीन चप्पल भिरकावली. चप्पल फेकणारा व्यक्ती अभाविपचा कार्यकर्ता असल्याचं समजतं आहे.

सुरुवातीपासूनच कन्हैयाच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेला. सुरुवातीला जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना हॉलमधून बाहेर काढलं. त्यानंतर पुन्हा एकदा एका कार्यकर्त्यानं घोषणाबाजी केली. त्यालाही बाहेर काढण्यात आलं.

त्यानंतर कन्हैयानं भाषणाला सुरुवात केली. त्यानं किमान 5 मिनिटं भाषण केलं. या पाच मिनिटांमध्ये कन्हैयानं भाजप आणि संघावर जोरदार टीका केली. कन्हैयानं संघावर टोमणा मारल्यानंतर हॉलमध्ये उपस्थित असणाऱ्या एका अभाविपच्या कार्यकर्त्यानं कन्हैयाच्या दिशेने चप्पल भिरकावली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. या सगळ्या प्रकारामुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला होता.

=============================================

राज्यावर अस्मानी संकट, सरकारप्रती विश्वास हरवतोय: नाना

राज्यावर अस्मानी संकट, सरकारप्रती विश्वास हरवतोय: नाना
अहमदनगर राज्यावर अस्मानी संकट आहे. मात्र, सरकारप्रती  विश्वास हरवतो. राजकीय सत्तांतरण होतं आहे. मात्र, नोकरवर्ग तोच असून समन्वय वाढला पाहिजे. सर्वजण प्रयत्न करत आहेत. पण तरीही नाम संस्थेला हे काम करावा लागतं आहे. हे दुर्दैवी असल्याचं प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.

अहमदनगरमध्ये नाम फाऊंडेशनच्या वतीने आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना धनादेश वाटप प्रसंगी बोलत होते. यावेळी  118 आत्महत्याग्रस्तना कुटुंबीयांना प्रत्येकी 15 हजाराची मदत करण्यात आली.

यावेळी नाना पाटेकर यांनी दारुबंदीसह कर्जमाफी, हमीभाव आणि महिलांच्या मंदिर प्रवेशावरही रोखठोक भूमीका मांडली. बिहार, गुजरात या राज्यांमध्ये दारुबंदी होते तर महाराष्टात का नाही, असा सवालही नानानं उपस्थित केलाय.

“कर्जमाफीसाठी निकष ठरवून सुवर्णमध्ये काढा”

सरसकट कर्जमाफी देण्याऎवजी निकष ठरवण्याची मागणीही नानांनी केली. गेल्यावेळी कोरडवाहू बरोबर  सधन शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं कर्जमाफीसाठी निकष ठरवून सुवर्णमध्य काढण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

मंदिर प्रवेशासाठी सर्वांना समान हक्क असायला पाहिजेत – नाना

यावेळी नानांनी महिलांच्या मंदिर प्रवेशावरही खड़ेबोल सुनावले. देव हा मंदिरात नसून निसर्गात आहे. मात्र, मंदिरात सर्वाना समान हक्क असायला पाहिजेच. देवळात कोणी कुठं जायचं नाही, हा विचित्र वाद आहे. त्यावर  बोलावंसही वाटत नसल्याची खंत नानांनी व्यक्त केली आहे.

आता हमीभावासाठी लढा – नाना

यावेळी नानांनी आपल्या पुढील वाटचालीची दिशाही स्पष्ट केली. पावसाळ्यानंतर नाम फाऊंडेशन उत्पादनाच्या हमीभावासाठी पुढाकार घेणार असल्याचं नानानी म्हटलं आहे.
=============================================

रोहित वेमुलाच्या कुटुंबीयांकडून बौद्ध धर्माचा स्वीकार

रोहित वेमुलाच्या कुटुंबीयांकडून बौद्ध धर्माचा स्वीकार
मुंबई: हैदराबाद विद्यापीठा आत्महत्या केलेल्या रोहित वेमुलाच्या आई आणि भावानं बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

दादरच्या आंबेडकर भवनात डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत रोहितची आई राधिका आणि भाऊ राजाने हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारला.
Rohit Vemulla Family
रोहित वेमुला हा हैदराबाद विद्यापीठात पीएचडी करणारा विद्यार्थी होता. 17 जानेवारी रोजी त्यानं विद्यार्थी संघटनांच्या राजकारणातून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येनंतर देशातलं राजकीय आणि सामाजिक जीवन ढवळून निघालं होतं.
=============================================

एकाच संघात खेळलेले धोनी-रैना पहिल्यांदाच आमने-सामने

एकाच संघात खेळलेले धोनी-रैना पहिल्यांदाच आमने-सामने!
नवी दिल्ली आयपीएलच्या 8 व्या मोसमात एकाच संघात खेळणारे महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना पहिल्यांदाच आमने-सामने आले आहेत. रायझिंग पुणे सुपरजायंट्सने पहिल्याच सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हरवत विजयी सलामी दिली आहे. आज सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सशी धोनीच्या पुणे संघाची लढत असणार आहे.

आयपीएलमध्ये पदार्पणातच विजयी सलामी दिल्यावर आत याच दोन टीम्स आमनेसामने-येणार आङेत. आणि या लढाईच्या निमित्तानं धोनी आणि रैना या दोन मित्रांमध्ये चुरस रंगणार आहे.

महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना. टीम इंडियातले दोन बेस्ट फ्रेण्ड्स. धोनी आणि रैनामधली मैत्री इतकी घटट् आहे की धोनीची सावली म्हणूनच रैनाची ओळख निर्माण झाली आहे. लग्नाआधी महेंद्रसिंग धोनीच्या सर्वात जवळची व्यक्ती म्हणून सुरेश रैनाकडे पाहिलं जायचं.

टीम इंडियाखेरीज आयपीएलमध्येही ते दोघं गेली आठ वर्षे एकत्रच खेळत होते. पण स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नई सुपर किंग्सवर दोन वर्षांची बंदी आल्यानंतर दोघेही आता वेगळे झालेयत. यंदा धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्सचं, तर रैना गुजरात लायन्सचं नेतृत्त्व करतोय. आता याच दोन संघांमधल्या लढाईच्या निमित्तानं धोनी आणि रैना हे जिवलग मित्र एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

आयपीएलमध्ये आपल्या पदार्पणातच रायझिंग पुणे आणि गुजरात लायन्सनं विजयी सलामी दिली होती. रायझिंग पुणेनं मुंबई इंडिन्सचा, तर गुजरात लायन्सनं किंग्स इलेव्हन पंजाबचा धुव्वा उडवला होता.

किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात गुजरातच्या ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जाडेजानं चमकदार कामगिरी बजावली होती. ब्राव्होनं चार षटकांत 22 धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढल्या होत्या. तर  जाडेजानंही 4 षटकांत 30 धावा मोजून दोन फलंदाजांना माघारी धाडलं होतं. जाडेजा आणि ब्राव्होशिवाय ब्रेन्डन मॅक्युलमही रैनाच्या गुजरात लायन्सकडून खेळतो आहे.
=============================================

नागपूर संघाची नाही तर बाबासाहेबांची भूमी : कन्हैया

नागपूर संघाची नाही तर बाबासाहेबांची भूमी : कन्हैया
नागपूर :  नागपूर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी नसून ही बाबासाहेबांची भूमी असल्याचं वक्तव्य, दिल्लीतील जवाहरलाला नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूतील छात्र संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारने नागपुरात केलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमीत्त कन्हैया कुमारनं नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाऊन दर्शन घेतलं.  त्यावेळी कन्हैयानं एबीपी माझाशी संवाद साधला.

“भारत हा लोकशाही देश आहे, हा देश मनुस्मृतीनुसार चालणार नाही. संघ नागपूरला बदनाम करत आहे. मात्र नागपूरची भूमी ही संघाची नसून, ही बुद्धांची, बाबासाहेबांची दीक्षा भूमी आहे” असं कन्हैया म्हणाला.

दरम्यान, कन्हैयाच्या नागपूर दौऱ्याला बजरंग दलानं विरोध दर्शवत त्याच्या गाडीवर दगडफेक केली. याप्रकरणी 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दीक्षाभूमीवर जाताना लाल सलामचे नारेही लावण्यात आले.

चप्पल चोरीला

दरम्यान, कन्हैया कुमार दीक्षाभूमीवर गेल्यानंतर त्याची चप्पल चोरीला गेली. त्यामुळे चप्पलशिवाय कन्हैया पुढच्या कार्यक्रमांसाठी निघाला. कन्हैयासाठी दुसरी चप्पल मागवण्यात आली आहे.
=============================================

गडचिरोलीत माजी आमदाराच्या बॉडीगार्डची नक्षलवाद्यांकडून हत्या

गडचिरोलीत माजी आमदाराच्या बॉडीगार्डची नक्षलवाद्यांकडून हत्या
गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती कार्यक्रमात गेलेल्या माजी आमदार दीपक अत्राम यांच्या अंगरक्षकाची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील थल्लेवाडा इथे ही घटना घडली.

माजी आमदार दीपक अत्राम बाबासाहेबच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गेले होते. मात्र यावेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात अत्राम यांचे अंगरक्षक नानाजी नागोसे यांचा मृत्यू झाला. तर दीपक अत्राम थोडक्यात बचावले.
=============================================

मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 10 पट खर्च : कॅग

 मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 10 पट खर्च : कॅग
मुंबई: राज्यातल्या सिंचन आणि इतर प्रकल्पांवर वाढलेल्या खर्चावर ताशेरे ओढल्यानंतर ‘कॅग’च्या अहवालात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी गेल्या 5 वर्षात खर्चामध्ये 10 पट वाढ केल्याचं उघड झालं आहे.

मलबार हिल येथील मंत्र्यांच्या निवासस्थानांच्या दुरुस्तीवर गेल्या 5 वर्षात तब्बल 52 कोटी रुपये खर्च केल्याचं कॅगच्या अहवालात समोर आलं आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे हे बंगले ४० वर्षांपेक्षा जुने असल्यानं त्यांच्या दुरुस्तीवर खर्च करण्यापेक्षा त्यांची पुनर्बांधणी केली असती तर ती केवळ ३७ कोटी रुपयांत झाली असती, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.

अशाच प्रकारे मॅजेस्टिक आमदार निवासस्थान धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतरही त्याच्या देखभाल दुरुस्तीवर ९.२०कोटी रुपये खर्च करण्यात आले.

विशेष म्हणजे वारंवार पाठपुरावा होऊनही रुग्णालयं आणि पोलिसांच्या वसाहतींच्या दुरुस्तीकडे डोळेझाक केल्याचा ठपका कॅगनं ठेवलाय.
=============================================

अंगावर शहारा आणणारा 'सरबजीत'चा ट्रेलर रिलीज

अंगावर शहारा आणणारा 'सरबजीत'चा ट्रेलर रिलीज
मुंबई : बहुचर्चित सरबजीत या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या या ट्रेलरमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता रणदीप हुडा यांचा दमदार अभिनय दिसत आहे. भावाच्या न्यायहक्कांसाठी लढणारी बहिण ऐश्वर्याने या सिनेमात जिवंत केली आहे.

‘सरबजीत’ चित्रपटामध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात ऐश्वर्या सरबजीतच्या बहिणीची व्यक्तिरेखा साकारत आहे.

भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सरबजीतच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. हेर समजून सरबजीतला पाकिस्तानच्या तुरुंगात 23 वर्ष डांबण्यात आलं होतं. जेलमधील इतर कैद्यांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता.

मेरी कोम फेम दिग्दर्शक ओमंगकुमार यांनीच चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ऐश्वर्या सरबजीतची बहिण दलबीर कौरच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा 19 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
=============================================

स्वत:चा जीव देण्याआधी समोरच्याचा जीव घेईन : प्रियांका

स्वत:चा जीव देण्याआधी समोरच्याचा जीव घेईन : प्रियांका
मुंबई : प्रकाश जाजूने केलेल्या आत्महत्येच्या दाव्यावर अभिनेत्री प्रियांका चोप्राने अखेर मौन सोडलं आहे. प्रकाश जाजूचं विधान चुकीचं आहे. कोणासाठी जीव देण्याआधी मी समोरच्याचा जीव घेईन, असं प्रियांका चोप्रा म्हणाली.

प्रकाश जाजू हा प्रियांका चोप्राची माजी मॅनेजर होता. टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्याचे दोन-तीन दिवसांनी प्रकाश जाजूने दावा केला होता की, स्ट्रगलिंगच्या दिवसात प्रियांकाने तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

सुर्वात आधी प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी खोटे असल्याचे सांगितले होते. आता प्रियांकाने प्रकाश जाजूचे दावे चुकीचे असल्याचं म्हटलं आहे.

प्रकाश जाजूचा दावा खोटा : प्रियांका

प्रियांका म्हणाली की, ‘ प्रकाश जाजूचा दावा खोटा आहे. ज्या व्यक्तीने मला त्रास दिला, माझा छळ केला त्याला मीडिया महत्त्व देत आहेत. याचं मला अतिशय दु:ख आहे. त्याचा भूतकाळ माहित न करता त्याच्यावर विश्वास ठेवला.

ज्या घरात सुनांना मारहाण केली जाते, छळ होतो, त्यांच्याबाबत मीडिया का बोलत नाही?, असा सवालही प्रियांकाने मीडियाला विचारला

प्रियांका चोप्रा म्हणाली की, तरुण-तरुणी कॉलेज आणि होस्टेलमध्ये आत्महत्या करत आहेत. पण ते दुसऱ्यांसाठी स्वत:चा जीव का देतात. कोणासाठी जीव देण्याआधी मी समोरच्याचा जीव घेईन.
=============================================

सचिनच्या सिनेमाचा टिझर रिलीज

VIDEO: सचिनच्या सिनेमाचा टिझर रिलीज
मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘सचिन ए बिलियन ड्रिम्स’ या चित्रपटाचा टीझर अखेर रिलीज झाला आहे. सचिन तेंडुलकरनेच ट्विटरवर टिझर रिलीज केलं आहे.

यापूर्वी सचिननेच पोस्टर रिलीज केलं होतं.

विशेष म्हणजे या चित्रपटात खुद्द सचिन तेंडुलकरच स्वतःची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मुंबईतील ‘200 नॉट आऊट’ या प्रॉडक्शन कंपनीनं हा चित्रपट बनवला असून जेम्स अर्सकिन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शन केलं आहे. 14 एप्रिलला दुपारी एक वाजता या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित केला जाईल, असं सचिनने सांगितलं होतं. त्यानुसार सचिनने बरोबर 1 वा. टिझर रिलीज केला आहे.

या टिझरमध्ये –  मेरे बाबा मुझे हमेशा कहते थे, तुमने जिंदगी में क्रिकेट को चुना है ए एक बात है,
लेकीन आखिर तक जो बात तुम्हारे साथ रहेगी वो ए होगी की तुम इन्सान कैसे होगे, हा डायलॉग ऐकायलो मिळतो.

=============================================

'नवविवाहीत दाम्पत्यांच्या हनिमूनमुळेच केदारनाथमध्ये पूर', शंकराचार्यांचं अजब तर्कट

'नवविवाहीत दाम्पत्यांच्या हनिमूनमुळेच केदारनाथमध्ये पूर', शंकराचार्यांचं अजब तर्कट
नवी दिल्ली: नेहमी चमत्कारिक आणि वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणाऱ्या द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी पुन्हा एकदा तारे तोडले आहेत. 
नवविवाहित जोडप्यांनी केदारनाथमध्ये हनिमून साजरा केल्यानंच महाप्रलय आल्याचं बाष्कळ विधान स्वरुपानंद यांनी केलं आहे. ते हरिद्वार दौऱ्यावर असताना बोलत होते. केदारनाथासारख्या पवित्र भूमीमध्ये हनिमून साजरा केल्यानं अपवित्रता पसरली  आणि त्यामुळेच अशा प्रलयांना निमंत्रण दिल्याचं अजब तर्कट स्वरुपानंद यांनी मांडलं. 
स्वरुपानंद यांनी याआधीही महाराष्ट्रातला दुष्काळ हा साईबाबांची भक्ती केल्यामुळे उत्पन्न झाल्याचा दावा केला होता. इतकंच नाही, तर शनी शिंगणापूरसारख्या मंदिरांमध्ये महिलांनी प्रवेश केल्यास त्यांच्यावरचे अत्याचार वाढतील असा दावाही स्वरुपानंद यांनी केला होता.
=============================================

बिनकामाचे पाकिस्तानी पंतप्रधान विकणे आहे, ईबेवर जाहिरात

बिनकामाचे पाकिस्तानी पंतप्रधान विकणे आहे, ईबेवर जाहिरात
मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट इबेवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह जाहिरात पोस्ट केली आहे. बिनकामाचे पाकिस्तानी पंतप्रधान विकणे आहे, किंमत 66,200 पौंड म्हणजे 62 लाख 40 हजार रुपये, असं या जाहिरातीत म्हटलं आहे. 
ही गंमत नसून युकेतील इबेच्या वेबसाईटवर ‘युझलेस पाकिस्तानी पीएम फॉर सेल’ या नावाने ही जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. ही जाहिरात झळकल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारले.
Nawaz_Ebay
ईबेवरील जाहिरात
युझलेस पाकिस्तानी पीएम फॉर सेल
किंमत 62 लाख
स्थिती – नवीन परंतु दोषयुक्त
डिलिव्हरी ऑप्शन – भारतात डिलिव्हरी नाही 
महत्त्वाचं म्हणजे या पोस्टवर दहा जणांनी ईबेकडून माहिती मागवली आहे. सोशल मीडियावर या जाहिरातीची जोरदार चर्चा सुरु आहे.
=============================================

भुजबळांच्या कंपनीचा संचालक माफीचा साक्षीदार

भुजबळांच्या कंपनीचा संचालक माफीचा साक्षीदार?
मुंबई : पैशांच्या अफरातफरीप्रकरणी तुरुंगावास भोगत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कारण अंमलबजावणी संचालनालय भुजबळ यांच्या कंपनीच्या संचालकालाच माफीचा साक्षीदार करण्याच्या तयारीत आहे.

या प्रकरणी ठोस पुरावे मिळवण्यासाठी भुजबळ कुटुंबीयांची मालकी असलेल्या कंपनीच्या एका संचालकालाच माफीचा साक्षीदार करण्याचा निर्णय ईडीने घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सध्या छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ घोटाळ्याच्या आरोपात आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्याने दोघांना जामीन मिळण्याचा मार्ग खडतर बनला आहे. शिवाय दोघांच्या न्यायालयीन कोठडीत 27 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

खरंतर छगन भुजबळ हे ‘मुंबई एज्युकेशन ट्रस्ट’चे अध्यक्ष आहेत. या संस्थेतील काही कर्मचाऱ्यांनाच संचालक बनवण्यात आलं, मात्र त्यांना कोणतेही अधिकार दिले नव्हते. ते नाममात्र संचालक होते आणि समीर भुजबळ यांच्या आदेशानुसारच काम करत. त्यामुळे या संचालकांचा प्रत्यक्ष व्यवहाराशी काहीही संबंध नसल्याने त्यांचा जबाब खटल्याच्या वेळी कामी येईल.

ईडीने या संचालकांचा आरोपी म्हणून जबाब नोंदवला असला तरी त्यांना माफीचा साक्षीदार करणार आहे. त्यामुळे त्यांचा जबाब हा भुजबळांविरुद्ध ठोस पुरावा ठरु शकतो, अशी शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे.
=============================================

शंकराचार्यांच्या मुक्ताफळांची मालिका सुरुच, साईबाबांची तुलना राक्षसाशी

शंकराचार्यांच्या मुक्ताफळांची मालिका सुरुच, साईबाबांची तुलना राक्षसाशी
नवी दिल्ली: द्वारकापीठाचे स्वरुपानंद शंकराचार्य यांची वादग्रस्त विधानांची मालिका काही केल्या संपत नाही. आधी साईंमुळे महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे, असं म्हणणाऱ्या शंकराचार्यांनी आता साईबाबांची तुलना थेट राक्षशासी केली आहे. य़ाशिवाय भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंवर वारंवार हल्ला करुन त्यांना बळ देऊ नका. असाही सल्ला त्यांनी आपल्या भक्तांना दिला आहे.

स्वरुपानंद यांनी याआधीही महाराष्ट्रातला दुष्काळ हा साईबाबांची भक्ती केल्यामुळे उत्पन्न झाल्याचा दावा केला होता. इतकंच नाही, तर शनी शिंगणापूरसारख्या मंदिरांमध्ये महिलांनी प्रवेश केल्यास त्यांच्यावरचे अत्याचार वाढतील असा दावाही स्वरुपानंद यांनी केला होता.

दरम्यान, कालही शंकराचार्यांनी असंच चमत्कारिक विधान केलं. नवविवाहित जोडप्यांनी केदारनाथमध्ये हनिमून साजरा केल्यानंच केदारनाथमध्ये महाप्रलय आला, असं ते म्हणाले. ते हरिद्वार दौऱ्यावर असताना बोलत होते. केदारनाथासारख्या पवित्र भूमीमध्ये हनिमून साजरा केल्यानं अपवित्रता पसरली  आणि त्यामुळेच अशा प्रलयांना निमंत्रण दिल्याचं अजब तर्कट स्वरुपानंद यांनी मांडलं.
=============================================

अयोध्येपासून शिर्डीतही रामजन्माचा उत्साह

राम जन्मला गं सखे...! अयोध्येपासून शिर्डीतही रामजन्माचा उत्साह
मुंबई: राम नवमीचा उत्सव आज देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो आहे. दिल्लीच्या राम मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. राम नवमीनिमित्त दिल्लीत विविध कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलंय. तर शिर्डीतही राम नवमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. शिर्डीच्या साई मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

रामनवमी उत्सव दिनानिमित्त काल रात्रभर साईमंदिर खुले ठेवण्यात आले होते. साईभक्तांच्या सुरक्षेची, राहण्याची, भोजनाची आणि दर्शनाची व्यवस्था संस्थानकडून करण्यात आली आहे.

पंढरपूर प्रमाणे शिर्डीलाही अनेक पायी पालख्या येतात. राज्यभरातून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. साईनामाचा गजर करत खांद्यावर पालखी घेऊन नाचत गात अनेक भक्त शिर्डीत आल्याने रामनवमी उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे.
=============================================

धोनीपेक्षा रैना सरस, गुजरातकडून पुण्याचा धुव्वा

धोनीपेक्षा रैना सरस, गुजरातकडून पुण्याचा धुव्वा
फोटो सौजन्य : BCCI
राजकोट : गुजरात लायन्सने विजयाचा धडाका सुरुच ठेवला आहे. सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सने धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला. यंदाच्या आयपीएल मोसमातील गुजरातचा हा सलग दुसरा विजय आहे.

राजकोटमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात  पहिल्यांदा फलंदाजी करताना रायझिंग पुणे सुपरजायंटने निर्धारित 20 षटकात 163 धावा केल्या होता. यानंतर गुजरात लायन्सने तीन विकेट्सच्या मोबदल्यात 18 षटकातच 164 धावांचं आव्हान पार केलं.

गुजरातच्या विजयाचे हिरो

या सामन्यात गुजरातच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. अरॉन फिन्चने 36 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 50 धावा ठोकल्या. तर ब्रेण्डन मॅक्युलमने 31 बॉलमध्ये 49 धावा केल्या. या दोघांनी मिळून 85 धावांची भागीदारी रचली.
याशिवाय गोलंदाज प्रवीण तांबेने 4 षटकात 2 विकेट्स घेतल्या तर रवींद्र जाडेजाने 4 षटकात दोन फलंदाजांना माघारी धाडलं.

ड्यू प्लेसिसची 69 धावांची खेळी

त्याआधी पुण्याची सुरुवात अडखळत झाली. अजिंक्य रहाणे 21 धावा करुन बाद झाला. त्यानंतर केविन पीटरसन आणि ड्यू प्लेसिसने 86 धावांची भागीदारी रचली. पीटरसनने 37 धावा करुन बाद झाला. तर ड्यू प्लेसिसने 43 चेंडूत 69 धावा करता आल्या. त्याने या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार लगावले. यानंतर धोनी वगळता कोणालाही दोन आकडी धावसंख्या उभारता आली नाही.
=============================================

देशाला अंतर्गत फुटीरतावाद्यांकडून धोका: सरंक्षणमंत्री

देशाला अंतर्गत फुटीरतावाद्यांकडून धोका: सरंक्षणमंत्री
नवी मुंबई: देशाला बाह्य शक्तींकडून धोका नसून अंतर्गत फुटिरवाद्यांकडून धोका आहे, असं मत देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केलं. या फुटिरवाद्यांचा लोकांनी समाचार घ्यावा, असंही ते म्हणाले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर काल माजी सैनिक आघाडीने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्याच्या दरम्यान बोलत होते.

काही लोकांना ‘भारत माता की जय’ म्हणण्यात काय अडचण आहे? असा सवालही पर्रिकर यांनी विचारला, गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा बराच गाजत आहे. दरम्यान, पर्रिकर यांनी काँग्रेसवरही बरीच टीका केली.

संरक्षण खात्यातील सामग्री खरेदीतील दलाली हा गंभीर विषय असून मागील सरकारच्या काळात याचा सुळसुळाट होता. असं सांगून पर्रीकरांनी काँग्रेसवर निशाणा साधला. याव्यतिरीक्त, मॅरिड एकोमोडेशन कायद्याअंतर्गत मागील दीड वर्षात आपण २४ हजार सैनिकांना त्यांच्या स्पेस सेंटर मध्ये घर दिलं असून पुढील दोन वर्षात ६९ हजार सैनिकांना घर देण्याचं लक्ष असल्याचं ही पर्रिकर यांनी स्पष्ट केलं.
=============================================

पाकिस्तानचे घुमजाव, भारताबरोबर चर्चेची तयारी

  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १५ - भारताबरोबर शांतता प्रकिया स्थगित करणा-या पाकिस्तानने आठवडयाभरातच आपल्या भूमिकेवरुन घुमजाव केले आहे. भारताबरोबर चर्चेचे दरवाजे उघडे असल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झाकारीया यांनी गुरुवारी सांगितले. 
    इस्लामाबादमध्ये पत्रकारपरिषदेत झाकारीया यांना भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा होऊ शकते का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर चर्चा हाच उत्तम पर्याय असून, चर्चेचे दरवाजे बंद झालेले नाहीत असे उत्तर त्यांनी दिले. आठवडयाभरापूर्वी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताबरोबरची शांतता प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे म्हटले होते. 
    डिप्लोमसी ही दोन देशांमधल्या संवादासाठी आहे. परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेसाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरु आहेत. कुठलाही पर्याय बंद करण्याचा विचार न करता आपण पुढे बघितले पाहिजे. दोन्ही देश परस्परांच्या संपर्कात आहेत असे नफीस झाकारीया यांनी सांगितले. 
=============================================

संयुक्त राष्ट्र संघातील 'हिडन व्हेटो' वापरावरुन भारताने फटकारलं

  • ऑनलाइन लोकमत - 
    वॉशिंग्टन, दि. १५ - जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसुद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यास चीनने केलेल्या विरोधाच्या पार्श्वभुमीवर भारताने 'हिडन व्हेटो'चा वापर करण्यावरुन फटाकरलं आहे. दहशतवाद्यांना यादीत न टाकण्यामागचं कारण संयुक्त राष्ट्र संघातील सदस्यांना सांगितलं जात नाही. याची जबाबदारी घेण्यात यावी अशी मागणीदेखील भारताने संयुक्त राष्ट्र संघाकडे केली आहे. 
    दहशतवादी संघटना अल कायदा, तालीबान आणि आयसीस यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी एकमत होण्याची तसंच नाव गुप्त ठेवण्याच्या संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या प्रक्रियेवर पुनर्विचार करण्याची गरज आहे. एकमत होण्याच्या तसंच नाव गुप्त ठेवण्याच्या प्रक्रियेमुळे विश्वासार्हता कमी होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी सुरक्षा परिषदेच्या चर्चेदरम्यान आपलं हे मत मांडलं.
    संयुक्त राष्ट्र संघ समितीत असणा-या 15 सदस्यांकडे आता 'व्हेटो' अधिकार आहे असं सांगत सय्यद अबरुद्दीन यांनी मसुद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यास चीनने केलेल्या विरोधावर टीका केली. 15 सदस्य वगळता इतर कोणालाच मसुद अहजरच्या नावाला कोणी विरोध केला याची माहिती देण्यात आली नाही असं चीनचं नाव न घेता सय्यद अकबरुद्दीन यांनी प्रश्न उपस्थित केला. 
=============================================

दुष्काळावर शांत राहणे हा गुन्हा - नाना पाटेकर

  • ऑनलाइन लोकमत - 
    अहमदनगर, दि. १५ - 'दुष्काळावर सरकारला प्रश्न विचारण्याची गरज आहे, यावर शांत राहणे हा गुन्हा असल्याचं', अभिनेते नाना पाटेकर बोलले आहेत. 'दुष्कळामुळे मोठ्या प्रमाणात शहरांच्या दिशेने स्थलांतर होत आहे. मला सर्वांना सांगायचं आहे जर कोणी तुमच्या गाडीची काच ठोठावत असेल तर त्यांना भिकारी म्हणून वागणूक देऊ नका, ते शेतकरी आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. त्यांना अन्न, पाणी आणि शौचालयांची सुविधा हवी आहे. आपण प्रत्येकजण एका व्यक्तीची जबाबदारी घेऊया. त्यात जास्त अवघड असं काही नाही आहे', असं भावनिक आवाहनही नाना पाटेकर यांनी केलं आहे. 
    एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी दुष्काळामुळे राज्यासमोर उभ्या राहिलेल्या पाणी संकटावर चर्चा केली. टमहाराष्ट्राने आयपीएल सामन्यांचं आयोजन करण्याची गरज नव्हतीट, असं मत नाना पाटेकरांनी व्यक्त केलं आहे. पाणी वाचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याचे आदेश दिलेल्या निर्णयाचं स्वागत करत यामुळे जास्त फरक पडणार नाही असंदेखील नाना पाटेकर बोलले आहेत. 'आयपीएल सामने नसले तरी त्यांना खेळपट्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागणार नाही का ? पण हा भावनिक विषय आहे. लोक मरत असताना आपण आनंद कसा काय साजरा करायचा ?', असा प्रश्न नाना पाटेकरांनी उपस्थित केला.
=============================================

फक्त वीस हजारांसाठी पित्याने भर बाजारात मुलींचा लिलाव मांडला

  • ऑनलाइन लोकमत 
    हैदराबाद, दि. १५ - गरीबी वेळ प्रसंगी माणसाला अत्यंत वाईटातील वाईट गोष्ट करायला भाग पाडते. हैदराबादच्या महबूब नगरमध्ये आर्थिक तंगीने पिचलेल्या एका व्यक्तीने आपल्या पोटच्या दोन मुलींना भरबाजारात लिलावासाठी उभे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त वीस हजार रुपयांसाठी तो पोटच्या दोन मुलींची विक्री करायला निघाला होता. 
    एक मुलगी सहावर्षांची आणि दुसरी अवघ्या चार महिन्यांची आहे. आई कामावर गेलेली असताना या पित्याने मुलीला लिलावासाठी बाजारात आणून उभे केले होते. बिजनापल्ली मंडला येथील लट्टूपल्ली गावात रहाणारा मल्लेश आणि त्याची पत्नी नरसम्मा अत्यंत हलाखीत दिवस काढत आहेत. सातवर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला. या दांम्पत्याला दोन मुली असून, मोठया मुलीचे नाव गीतांजली आणि छोटीचे नाव भूलक्ष्मी आहे. 
    मल्लेश रस्त्यावरुन येणा-या जाणा-या प्रत्येकाला आपली मुलगी विकत घ्या म्हणून गळ घालत होता. पैशांसाठी तो इतका अधीर झाला होता की, पोलिस आल्याचेही त्याला कळले नाही. पोलिसांशीही तो लिलावाच्या रक्कमेची चर्चा करत होता. तिथून ये-जा करणा-यांपैकी एकाने पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मल्लेशला अटक करुन मुलींना शिशुविहारमध्ये पाठवले आहे. 
=============================================

कामाच्या ठिकाणी महिलाच महिलांना साथ देत नाहीत - इंद्रा नुयी

  • ऑनलाइन लोकमत 
    न्यूयॉर्क, दि. १५ - महिलाच महिलांना कामाच्या ठिकाणी मदत करत नाहीत तसेच सहकारी महिलेने चांगले काम केले तर स्तुती सुद्धा करत नाही असे विधान प्रसिद्ध पेप्सिको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुयी यांनी केले. न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कामाच्या ठिकाणी महिलाच महिलांना पुरेशी साथ देत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. 
    महिलांना कामाच्या ठिकाणी भेडसावणा-या समस्यांच्या विषयांवर त्या बोलत होत्या. प्रत्येकवेळी आपल्यालाही कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव आला नसल्याचे त्यांनी सांगितले. हनी, स्वीटी, बेब हे शब्द कानावर पडल्यानंतर आपल्याला संताप येतो असे नुयी यांनी सांगितले. 
    महिला क्रांती पूर्ण करण्यासाठी समाज, सरकार, कंपनी, कुटुंब आपल्यापरीने कसे योगदान देणार याविषयी आपण कधीच बोलत नाही. आता महिलांनी महिलांना मदत करण्याची वेळ आहे असे नुयी यांनी सांगितले. 
=============================================

साडेतीन लाख कोटींचे ६२ प्रकल्प मार्गी 

  • - हरीश गुप्ता,  नवी दिल्ली
    महाराष्ट्राच्या बाबतीत काही सुखद घटना आता घडताना दिसत आहेत. राज्यात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, त्याची अमलबजावणी सुरू होत आहे.
    अंदाजे ३.५३ लाख कोटी रुपयांचे ६२ प्रकल्प केंद्र सरकारकडे बराच काळपासून पडून होते. त्यापैकी १.०९ लाख कोटी रुपये खर्चांचे ३२ प्रकल्प निर्माणाधीन होते. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी मिळून त्यातील अडचणी दूर केल्या आहेत. त्यासाठी २.४४ लाख कोटींचे अन्य ३० प्रमुख प्रकल्प प्रत्यक्ष पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात येत आहेत.
    हे प्रकल्प आंतरमंत्रालयीन आणि आंतरराज्य मुद्द्यांशी संबंधित आहेत. त्यासाठी केंद्राकडून आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर मिळाव्यात, यासाठी ते पंतप्रधानांच्या देखरेखीखाली आणले आहेत. या प्रकल्पांना विलंब होऊ नये व खर्च वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
    प्रकल्पांचा आकार आणि संबंधित मुद्दे लक्षात घेता त्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून नियमितपणे लक्ष ठेवण्याची गरज आहे. या ६२ प्रकल्पांमधील दोन-तीन प्रकल्प वगळता उर्वरित सर्व प्रकल्प येत्या दोन-तीन वर्षांत पूर्ण करण्यात येतील, असे पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले. प्रकल्पांना मंजुरी मिळून ते वेगाने पूर्ण होण्यासाठी केंद्राकडून इतके सहकार्य मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.
=============================================
मोदी, राहुलच्या भेटीवर केरळ पोलिसांचा आक्षेप
कोल्लम - परावूर पुट्टींगल देवी मंदिरात लागलेल्या भीषण आगीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीवर केरळचे पोलिस प्रमुख टीपी सेनकुमार यांनी आक्षेप घेतला आहे. या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीमुळे बचाव मोहिमेवर परिणाम झाल्याचे सेनकुमार यांनी म्हटले आहे. 

पुट्टींगल मंदिरातील उत्सवादरम्यान रविवारी फटाक्‍यांमुळे लागलेल्या भीषण आगीत 100 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 280 भाविक जखमी झाले. घटना घडली त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाला तसेच जखमींना भेट दिली होती. तसेच राहुल गांधी यांनीही कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत घटनास्थळाला भेट दिली होती. मात्र या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमुळे बचाव मोहिमेवर परिणाम झाल्याचे म्हणत सेनकुमार यांनी या भेटीवर आक्षेप घेतला आहे. दरम्यान केरळचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी मात्र या भेटीचे समर्थन करत पंतप्रधानांच्या भेटीमुळे जखमी लोकांना खूप मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले.
=============================================
रजनीकांतचा 600 किलोंचा चॉकलेटचा पुतळा
चेन्नई : चित्रपटांतून आपल्या अफलातून भूमिकांमुळे रसिकांमध्ये लोकप्रिय असलेला सुपरस्टार रजनीकांतचा 600 किलोग्रॅम चॉकलेटचा पुतळा तयार करण्यात आला आहे. 

रजनीकांतला नुकतेच पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर चाहत्यांनी एकत्र एकत्र येत चेन्नईमध्ये हा पुतळा तयार केला आहे. येथील झुका नावाच्या कॉफी शॉपमध्ये हा पुतळा तयार करण्यात आला आहे. 
विजय मल्ल्या थोडे स्लिम होऊन अमिताभ बच्चन यांच्यासारखी पोज देऊन उभे राहिले आहेत की काय असा आभास या पुतळ्याकडे बघून होऊ शकतो. परंतु, ते शक्य नाही. हेअर स्टाईल, गॉगल्स आणि चेहऱ्यावरील हावभाव यांमुळे रजनीकांत यांची ही ‘चॉकलेट छबी‘ लक्षात येते. 
=============================================
विदेशी मनीऑर्डरचा पैसा घटला, तरी भारत अव्वल
वॉशिंग्टन : मागील वर्षी विदेशातील नागरिकांकडून भारतात येणाऱ्या पैशामध्ये (रेमिटन्स) तब्बल 1 अब्ज डॉलरची घट झाली आहे. रेमिटन्समध्ये 2009 पासून झालेली ही सर्वांत जास्त घट आहे. तथापि, विदेशी नागरिकांकडून सर्वाधिक पैसा (रेमिटन्स) येणाऱ्या देशांच्या यादीत भारत यंदाही अव्वल स्थानी राहिला आहे. जागतिक बँकेने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

जगभरातील देशांच्या तुलनेत अधिक पैसा भारतात आला आहे. भारताने वर्ष 2015 मध्ये 69 अब्ज डॉलर रेमिटन्ससह आंतरराष्ट्रीय पातळीवर आघाडीचे स्थान कायम राखले आहे. त्यापूर्वी 2014 मध्ये देशात 70 अब्ज डॉलरचा रेमिटन्स आला होता. भारताशिवाय गेल्या वर्षी चीन (64 अब्ज डॉलर), फिलिपाईन्स (28 अब्ज डॉलर), मेक्सिको (25 अब्ज डॉलर) आणि नायजेरियामध्ये (21 अब्ज डॉलर) सर्वाधिक रेमिटन्स दाखल झाला आहे.

"दक्षिण आशियातील सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतात येणाऱ्या रेमिटन्समध्ये गेल्या वर्षी (2015) 2.1 टक्क्यांची घट झाली आहे. या काळात देशात 68.9 अब्ज डॉलरचा रेमिटन्स आला असून 2009 सालापासून या आकड्यात प्रथमच घट झाली आहे", असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे.
विकसनशील देशांमध्ये 431.6 अब्ज डॉलरचा रेमिटन्स दाखल झाला आहे. 2014 मध्ये या देशांमध्ये 430 अब्ज डॉलरचा रेमिटन्स दाखल झाला होता. 2015 मध्ये जागतिक आर्थिक संकटामुळे वाढीचे वेग सर्वात कमी होता, असेही बँकेने म्हटले आहे. सर्व देशांच्या एकुण रेमिटन्समध्येदेखील 1.7 टक्क्यांची घट झाली आहे. यंदा जागतिक रेमिटन्सेसचा आकडा 592 अब्ज डॉलरवरुन 581.6 अब्ज डॉलरवर पोचला आहे.
=============================================
दिल्लीत एक वर्षासाठी तंबाखूवर बंदी
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत तंबाखूसह गुटखा, पान मसाला, खैनी आणि जर्दाच्या उत्पादन, विक्री, खरेदी आणि साठविण्यावर एक वर्षासाठी बंदी आणल्याची माहिती दिल्लीच्या अन्न सुरक्षा विभागाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या सूचनेतून दिली आहे. 

‘बंद किंवा खुल्या पाकिटातील, सुगंध येणारी अथवा न येणारी किंवा संमिश्र, गुटखा, पान मसाला, सुगंधी किंवा इतर स्वरुपातील तंबाखूचे उत्पादन, साठवणूक, वितरण, विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घालण्यात येत आहे‘ अशी माहिती सूचनेत देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सप्टेंबर 2012 मध्ये दिल्लीतील आरोग्य विभागाने गुटख्यावर बंदी आणला होती. मात्र त्यानंतर तंबाखू व्यापाऱ्यांनी गुटख्यातील घटकांचा समावेश असलेल्या उत्पादनांची विक्री सुरूच ठेवली होती. त्यामुळे या आदेशांचा भंग करण्यात येत होता.
=============================================
तेलंगणात हाय अलर्ट; उष्माघाताचे 35 बळी
हैदराबाद : तेलंगणातील उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून, नालगोंडा आणि रमागुंडम या भागांमध्ये पारा 44 अंश सेल्सियसपर्यंत वर चढला असल्याची नोंद झाली आहे. तेलंगणामध्ये या उष्माघातामुळे 35 लोकांचा बळी गेला आहे. यामुळे सरकारने राज्यभरात ‘हाय अलर्ट‘ लावण्यात आला आहे.

दुपारनंतर नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. तसेच वाढत्या हवामानाच्या बदलाबाबत काळजी घ्यावी अशा सूचना अनेक जिल्ह्यांना राज्य सरकारने दिल्या आहेत. तेलंगणात मागील चोविस तासांमध्ये सरासरी 40 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. सर्व जिल्हाधिका-यांना याबाबत दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, असे तेलंगणाचे महसूल सचिव बी. आर. मीना यांनी सांगितले.

पाण्याचा मुबलक साठा करून ठेवण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाला देण्यात आले आहेत. या उष्माघातामुळे 35 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मीना यांनी दिली. तत्पूर्वी, आठवड्यापूर्वी राज्य सरकारने 66 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मात्र मीना यांनी 35 लोकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. सरकारने बांधकाम मजुरांना उन्हात काम करण्यावर प्रतिबंध घातले आहेत. तेलंगणात सलग तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या वर्षी तेलंगणात तब्बल एक हजार लोकांचा उष्माघाताने बळी गेला होता. मात्र यंदाचे तापमान पाहता यावर्षीही उष्माघाताचे बळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
=============================================
गुजरातेत अजूनही अस्पृश्‍यतेच्या भिंती
‘एनजीओ‘चे सर्वेक्षण; दलितांना नाकारले जाते पाणी 
अहमदाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात धूमधडाक्‍यात साजरी केली जात असताना, गुजरातमध्ये मात्र दलितांची स्थिती वाईट आहे. अस्पृश्‍यतेच्या नावाखाली त्यांना वाईट वागणूक दिली जाते. "नवसर्जन ट्रस्ट‘ या बिगर सरकारी संघटनेने (एनजीओ) केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब सामोरी आली. 

सर्वांना पिण्याच्या पाण्यासाठी बाबासाहेबांनी नव्वद वर्षांपूर्वी "महाड सत्याग्रह‘ केला होता; पण आजही गुजरातेत दलित समाजाला मंदिरांत प्रवेश सोडाच; पण अनेक गावांत त्यांना केशकर्तनालयांतही प्रवेश नाकारला जातो. चहाच्या कप-बशा वेगळ्या ठेवणे, पिण्याचे पाणी देण्यास नकार देणे आदी मार्गांनी हा भेदभाव केला जातो. मेहसाणा जिल्ह्यातील बेचर या गावात दलित महिलांना विहिरीतून पाणी घेऊ दिले जात नाही. बेचरची लोकसंख्या आहे जेमतेम वीस हजार. त्यात दलित कुटुंबे आहेत दोनशे. आजही त्यांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी विनवण्या कराव्या लागतात. अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी तरतूद केलेल्या रकमेचा खर्चही अत्यल्प प्रमाणात केला जातो.

असा भेदभाव करणारे बेचर हे एकच गाव नाही. "नवसर्जन ट्रस्ट‘च्या सर्वेक्षणानुसार, गुजरातमधील भावनगर, मेहसाणा, पाटण, खेडा, अहमदाबाद, राजकोट, सुरेन्द्रनगर, गांधीनगर, छोटा उदेपूर, नवसारी, डांग आणि साबरकांठा हे जिल्हे मिळून तब्बल 1589 गावांत दलितांना सार्वजनिक विहिरींतून पाणी घेण्यास बंदी आहे. आणखी 75 गावांमध्ये दलितांसाठी वेगळ्या विहिरी आहेत.
=============================================
'9/11'नंतर पाकला तब्बल 13 अब्ज डॉलर
इस्लामाबाद - अमेरिकेतील 11 सप्टेंबर 2001 च्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर (9/11) जागतिक दहशतवादविरोधी लढ्यासंदर्भातील सहभागासाठी लढाऊ साहित्य व इतर विविध माध्यमांमधून पाकिस्तानला अमेरिकेकडून आतापर्यंत किमान 13 अब्ज डॉलरचा निधी देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहातील लष्करविषयक समितीसमोर बोलताना पाकिस्तानचे लष्करी सचिव आलम खट्टक यांनीच ही माहिती दिली. 

‘9/11 नंतर दहशतवादविरोधी आघाडी निधी व्यवस्थेमधून पाकिस्तानला 13 अब्ज डॉलरचा निधी देण्यात आला आहे. या निधीपैकी 40 टक्के निधी हा सरकारसाठी; तर 60 टक्के निधी हा पाकिस्तानी सैन्यास देण्यात आला,‘‘ असे खट्टक म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या "सीआयए‘च्या पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमारेषेजवळील छावणीवर 2009 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यास पाकिस्तानकडूनच आर्थिक पाठबळ पुरविले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान हा दहशतवादविरोधी लढ्यामधील एक महत्त्वपूर्ण साथीदार देश असल्याची भूमिका घेत अमेरिकेने आत्तापर्यंत अब्जावधी डॉलरचा निधी पाकिस्तानमध्ये मदत म्हणून खर्च केला आहे. यामुळे सीआयएच्या कॅम्पवरील भीषण हल्ल्यात पाकिस्तानचा उघड सहभाग असल्याचे स्पष्ट होऊनही ओबामा प्रशासनाने त्याकडे काणाडोळा करत अब्जावधींची मदत पाकिस्तानला बहाल केल्याचे निष्पन्न झाले आहे. अमेरिकेत आता सुरू झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रणधुमाळीमध्येही या विषयाचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे.
=============================================
भारत करणार अन्य देशांना 'व्याघ्रसाह्य' - जावडेकर
नवी दिल्ली - जगातील सर्वाधिक व्याघ्रसंपत्ती असणारा देश म्हणून मिरविणाऱ्या भारताने आता वाघ नामशेष होत आलेल्या वा ते बिलकूल नसलेल्या कंबोडियादी देशांनाही वाघ पुरविण्याची सहर्ष तयारी दाखविली आहे. केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज तिसऱ्या आशिया व्याघ्र मंत्री परिषदेच्या समारोप कार्यक्रमात तशा शक्‍यतेचा उच्चार केला.
परदेशात धाडल्यावर मातृभूमीपासून दुरावलेल्या या वाघांना क्वचित प्रसंगी "ने मजसी ने परत मातृभूमीला‘ अशी भावना व्याकूळ करू नये या दृष्टीनेही मदतीची तयारी भारताने दाखविली आहे.
चीन व रशियासह तेरा देशांच्या वन तसेच कृषिमंत्र्यांच्या या परिषदेचे यजमानपद भूषविणाऱ्या भारताने या व्याघ्र परिषदेत व्याघ्रसंपत्ती अन्य जणांना देण्याची तयारी दाखवून, नवा पायंडा पाडल्याची प्रतिक्रिया उपस्थित प्रतिनिधींमध्ये व्यक्त झाली. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ अडीच टक्के भूभाग व एकुणांतील 17 टक्के लोकसंख्या असलेल्या भारतात जगातील सर्वाधिक म्हणजे जवळपास अडीच हजार पट्टेदार वाघ आहेत. केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत वाघांचे जतन, संवर्धन व त्यांच्या शिकाऱ्यांबाबत "झीरो टॉलरन्स‘ची कठोर भूमिका घेतल्याचे जावडेकर यांनी अधोरेखित केले. त्यामुळेच ज्या देशांत वाघांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे वा जेथे ते नाहीच त्यांनी मागणी केली तर आम्ही आवश्‍यक ते सहकार्य जरूर करू असे ते म्हणाले. या परिषदेत सहभागी झालेल्या कंबोडियावरच वाघ नष्ट होण्याचे संकट घोंघावते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेली ही तीन दिवसांची व्याघ्र मंत्री परिषद यशस्वी झाल्याचे सांगून जावडेकर म्हणाले, की तेराही देशांनी स्वाक्षऱ्या केलेला "दिल्ली जाहीरनामा‘ अनेक अर्थांनी वेगळा आहे. यात वाघांचे जतन, संवर्धन याबाबत तंत्रज्ञानासह सर्व प्रकारच्या परस्पर सहकार्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

तेराही देशांनी स्वाक्षऱ्या केलेला "दिल्ली जाहीरनामा‘ अनेक अर्थांनी वेगळा आहे. यात वाघांचे जतन, संवर्धन याबाबत तंत्रज्ञानासह सर्व प्रकारच्या परस्पर सहकार्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.
- प्रकाश जावडेकर, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री 
=============================================
लोहा; टेळकि येथे गोविंदबुवा पालखि सोहळ्या निमित्याने जंगि कुस्तिचे सामने संपन्न 

=============================================
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रेरणादायी - सौ. वर्षाताई भोसीकर 



No comments: