Wednesday, 20 April 2016

नमस्कार लाईव्ह २०-०४-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- चीनमध्ये ९ हजार भ्रष्टाचारी अधिका-यांना शिक्षा 
२- न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प, हिलरी विजयी 
३- पाकने काढले कृपाल सिंग यांचे हृदय, जठर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- पीएफच्या निर्णयाला केंद्राची स्थगिती, निर्णयाविरोधात कामगार संघटनांची जाळपोळ 
५- कोहिनूर हिरा प्रकरणी सरकारचा यू-टर्न 
६- राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्यास केंद्राचा नकार 
७- ‘वैवाहिक बलात्कार’ हा गुन्हा ठरविण्याचा विचार 
८- कटरा; भारत जगावर राज्य करणार - मोदी  
९- ‘त्या’ धार्मिक स्थळांवरून फटकारले 
१०- 'PM हवा मोदींसारखा, तर CM केजरीवालांसारखा - बजाज समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज 
११- मालेगाव स्फोट: कर्नल पुरोहितांविरुद्ध पुरावा नाही 
१२- ऑनलाईन ग्राहकांच्या तक्रारींसाठी समिती- पासवान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१३- बापट आणि पोलिसांदेखत 'आपलं घर'चा सचिन अग्रवाल पळाला 
१४- हार्बर मार्गावर उद्यापासून 12 डब्यांची लोकल धावणार 
१५- लातूर; राज ठाकरे मराठवाड्यात, दोन वर्षांनी दुष्काळ दौऱ्यावर 
१६- छगन भुजबळांच्या 'रुग्णालय'वारीवरून चौकशीचे आदेश 
१७- हाती सत्ता, धनसंपत्ती आहे म्हणून लोकभावना विकत घेता येत नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला 
१८- लातूरमध्ये ५० लाखांपैकी केवळ २५ लाख लीटर पाणीपुरवठा 
१९- डान्सबारला परवानगी मिळणे आता दुरपास्तच 
२०- बिहारमध्ये दारूबंदी टिकविण्याचे आव्हान 
२१- भाजपची घसरगुंडी आमच्यासाठी वेदनादायी- सेना 
२२- मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचाही अवयवदानाचा संकल्प 
२३- राज्यात दोन वर्षांत डेंगीचे 177 बळी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२४- बीडमध्ये उन्हात पाणी भरल्याने 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू 
२५- पुणे; ‘मेपल ग्रुप’शी आपला कोणताही संबंध नाही; मंत्री गिरीष बापट खोटं बोलत असल्याची शंका 
२६- पुण्यात धावत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार 
२७- वर्धा; लग्नाला नकार, प्रेयसीच्या आई-वडिलांची भोसकून हत्या 
२८- हैदराबाद; विव्हळणाऱ्या महिलेच्या मदतीला पोलिस, भरदुपारी रस्त्यावर प्रसुती 
२९- लातूर; २५ लाख लीटर पाणी घेऊन 'जलदूत एक्स्प्रेस' लातूरमध्ये दाखल 
३०- पंजाब; ८ महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार, पित्याने छाटले नराधमाचे हात 
३१- दिवा जंक्शन; रेल्वे फाटकाजवळ वाहनांसाठी लिफ्ट 
३२- परंडा; साखरपुड्यातच विवाह; दुष्काळग्रस्तांसाठी एक लाख 
३३- औरंगाबाद; भीक मागत आईच्या कवेत तिने सोडले प्राण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३४- हलगी वाजवत ‘सैराट’चं पोस्टर रिलीज  
३५- सोन्या-चांदीने दिला शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३६- कॅनॉल रोडवरील अनिर्बंध बांधकामांना आवर घाला; सजग नागरिक मंचाची मागणी 
३७- तरोडा भागातील बेशिस्त भाजी विक्रेत्यांना शिस्त लावण्याची मागणी 
३८- आदिवासी ठाकूर जमातीचा २३ एप्रिलला वधू-वर परिचय मेळावा 
३९- एक लाखाचे सागवान पकडले; इस्लापूर वन पथकाची कारवाई 
४०- नांदेड मर्चंट बँकेला चार शाखा उघडण्याची रिझर्व बँकेची परवानगी 
४१- आयडीबीआय बँक बंद होण्याच्या अफवेने ग्राहकांत खळबळ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
महेश गंगातीरे, संदीप झुनझुनवार, शिवाजी गिरी, सचिन डोके, योगेश दुधाटे, जेताराम जाट, गणेश कोलकोणवाड, समाधान पाईकराव, गजानन कहाळेकर, मनोज गुंजाळ, सुर्यकांत मेटे, माधव नुकुलवाड, विलास कावळे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
कोणत्याही स्थितीत शांत आणि संयमी राहण्याची ताकद हेच सर्वोच्च सामर्थ्य
(युवराज गोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


=================================================

बीडमध्ये उन्हात पाणी भरल्याने 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

बीडमध्ये उन्हात पाणी भरल्याने 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू
बीड : बीडमध्ये दिवसभर उन्हात पाणी भरल्यामुळे उष्माघाताने अकरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. आष्टी तालुक्यातील साबलखेडा गावात ही घटना घडली आहे. योगिता देसाई असं या मुलीचं नाव असून ती पाचवीत शिकत होती. 
शाळेला सुट्टी असल्याने योगिताने भर उन्हात घराजवळ असलेल्या हातपंपावरुन पाणी भरलं. मात्र सायंकाळी उलट्या आणि जुलाब होऊ लागल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्याने योगिताचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 
दरम्यान, मराठवाड्यात पाऱ्याने चाळीशी पार केली आहे. पाणीटंचाईसोबतच या वाढत्या तापमानाचा फटकाही बसताना पाहायला मिळत आहे.
=================================================

मंत्री गिरीष बापट खोटं बोलत आहेत

मंत्री गिरीष बापट खोटं बोलत आहेत?
पुणेपुण्यातल्या ग्राहकांना 5 लाखात घर देण्याचा वायदा करणाऱ्या ‘मेपल ग्रुप’शी आपला कोणताही संबंध नाही, असा दावा करणाऱ्या कॅबिनेट मंत्री गिरीश बापट यांच्या भूमिकेविषयीचा संशय आता दाट होऊ लागला आहे. 
कारण ज्या मेपल ग्रुपशी आपला कोणताही संबंध नाही, असा दावा गिरीश बापट यांनी केला होता, त्याच मेपल ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांसोबत क्रेडाईच्या प्रदर्शनाचं उद्घाटन गिरीश बापट यांनी केलं होतं. 
या कार्यक्रमात सचिन अग्रवालसह ग्रुपच्या अन्य पदाधिकाऱ्यांसोबतचा बापट यांचा फोटो ट्विटरवर प्रसिद्ध झाला आहे. 
त्यामुळे गिरीश बापट यांनी मेपल ग्रुपशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा का केला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शिवाय काल एका वृत्तवाहिनीच्या चर्चेमध्ये सहभागी असलेल्या सचिन अग्रवाल हा त्याच कार्यक्रमात होता, याची माहिती बापटांना कशी नव्हती असाही सवाल उपस्थित होत आहे.
=================================================

बापट आणि पोलिसांदेखत 'आपलं घर'चा सचिन अग्रवाल पळाला

बापट आणि पोलिसांदेखत 'आपलं घर'चा सचिन अग्रवाल पळाला!
पुणे : पुण्यात ‘आपलं घर’ योजनेत हजारो लोकांची फसवणूक करणाऱ्या ‘मेपल’चा सचिन अग्रवाल पोलिसांसमोरच पसार झाला. सचिन अग्रवालवर अजामीनपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनीच त्याला पलायन करण्यात मदत केली.

पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि सचिन अग्रवाल एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात लाईव्ह होते. याची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिस तातडीने सचिन अग्रवालला अटक करण्यासाठी संबंधित वृत्तवाहिनीच्या कार्यालयात पोहोचले. मात्र जुजबी चौकशी करुन अग्रवाल इमारतीत नसल्याचं सांगत पोलिसांनी काढता पाय घेतला.

त्यानंतर अगदी पाच मिनिटात कार्यक्रम संपला आणि पालकमंत्री गिरीष बापट खाली आले. त्यानंतर काहीच वेळात ‘आपलं घर’चा प्रवर्तक सचिन अग्रवालही इमारतीखाली आला. त्यावेळी बापट आणि पोलिसांदेखतच त्याने तिथून एका दुचाकीवरुन पळ काढला.

त्यामुळे पुणे पोलिसांनी फक्त अग्रवालवर कारवाईचा फार्स केला का? वृत्तवाहिनीच्या कार्यालयात अशी काय जादू झाली की पोलिसांना अग्रवाल दिसला नाही? पोलीस गेल्यानंतर अग्रवाल त्याच इमारतीतून बाहेर कसा आला? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्यामुळे पुणे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
=================================================

हार्बर मार्गावर उद्यापासून 12 डब्यांची लोकल धावणार

हार्बर मार्गावर उद्यापासून 12 डब्यांची लोकल धावणार?
प्रातिनिधिक फोटो
मुंबई :  मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण या मार्गावर उद्यापासून 12 डब्यांची ट्रेन धावण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या लोकल ट्रेनला हिरवा कंदील दाखवतील

हार्बर मार्गावर डीसी टू एस विद्युतप्रवाह परिवर्तन झाल्यानंतर मध्य रेल्वेने 10 नव्या फेऱ्यांऐवजी 12 डब्यांची लोकल चालवण्याला प्राधान्य दिलं. प्रवासी संख्या वाढत असल्याने मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला.

काही दिवस 12 डब्यांची एकच लोकल हार्बर मार्गावर चालवण्यात येणार आहे. 12 डब्यांच्या या लोकलमुळे प्रवासी संख्येत 33 टक्के वाढ होणार आहे.
सध्या या मार्गावर 9 डब्यांच्या 36 गाड्यांमार्फत दिवसभरात 590 फेऱ्या चालवल्या जातात. या 36 गाड्यांना प्रत्येकी 3 डबे जोडल्यास प्रवासी क्षमता 33 टक्क्यांनी वाढते. ही क्षमता वाढवणं हे 9 डब्यांच्या 190 जादा सेवा चालवण्यासारखं आहे.

हार्बर मार्गावर मंगळवारी मध्यरात्री शेवटच्या ट्रेननंतर 12 डब्यांच्या लोकलची चाचणी घेण्यात आली. याशिवाय 12 डब्यांची गाडी सुरु होण्यापूर्वी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं कामही पूर्ण झाल्याची माहिती, मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते नरेंद्र पाटील यांनी दिली.
=================================================

पुण्यात धावत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

पुण्यात धावत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार
पुणे: हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाण्याचं आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पीडित तरूणी मुळची अमरावतीची असून कामानिमित्त ती पुण्यात वास्तव्यास आहे.

घटनेच्या दिवशी हॉटेलमध्ये जेवायला जाण्याच्या बहाण्यानं विकी नावाचा तरूण पीडित तरूणीला आपल्या कारमधून घेऊन गेला. मात्र, वाटेत विकी आणि त्याच्या मित्रानं धावत्या कारमध्ये पीडित तरूणीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तरुणीला कारमध्ये बंद करून मित्राच्या साखरपुड्याला गेले. घरी परतताना आणखी दोन तरूणांनी पीडित तरूणीवर अत्याचार केला.

या प्रकरणी पोलिसांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.
=================================================

लग्नाला नकार, प्रेयसीच्या आई-वडिलांची भोसकून हत्या

लग्नाला नकार, प्रेयसीच्या आई-वडिलांची भोसकून हत्या
वर्धा: लग्नाला नकार दिल्यानं प्रेयसीच्या आई-वडिलांची भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पंकज डिकूनवार उर्फ कुळसकर या आरोपली अटक केली आहे.

मोठ्या भावाच्या मेहुणीसोबत पंकजचे प्रेमसंबंध होते. मात्र, याला त्या तरुणीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळं संतापलेला पंकज पहाटे साडेचारच्या सुमारास घरात घुसला आणि त्यानं चाकूनं वार करुन रेखा भांडेकर आणि पांडुरंग भांडेकर यांच्यावर वार केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग यांना नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आलं, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या नातेवाईक शांता कुसळकरही हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
=================================================

पीएफच्या निर्णयाला केंद्राची स्थगिती, निर्णयाविरोधात कामगार संघटनांची जाळपोळ

पीएफच्या निर्णयाला केंद्राची स्थगिती, निर्णयाविरोधात कामगार संघटनांची जाळपोळ
नवी दिल्ली: वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम काढण्यास मनाई करण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी काल ही माहिती दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारनं प्रॉव्हिडंट फंड काढण्यास मनाई करणारा निर्णय जाहीर केला होता. त्याविरोधात देशभरातील नोकरदारांमधून संतापाची लाट उसळली. त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत या निर्णयाला सरकारनं तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्याला मुदतवाढ देत आता 1 ऑगस्टनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
=================================================

राज ठाकरे मराठवाड्यात, दोन वर्षांनी दुष्काळ दौऱ्यावर

राज ठाकरे मराठवाड्यात, दोन वर्षांनी दुष्काळ दौऱ्यावर
लातूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दहा दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यासाठी लातूरला पोहोचले आहेत. आज सकाळी ट्रेनने राज ठाकरेंचं लातूरमध्ये आगमन झालं. तब्बल दोन वर्षांनंतर राज ठाकरे दुष्काळ दौरा करत आहेत.

लातूर, बीड,  उस्मानाबाद या जिल्ह्यांचा राज ठाकरे दौरा करणार आहेत. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि इतर नेतेही आहेत.

आघाडी सरकारवर घणाघात

दुष्काळ दौऱ्यावर निघताना राज ठाकरेंनी आघाडीसह विद्यमान राज्य सरकारवरही टीका केली. राज ठाकरे म्हणाले, “काँग्रेस राष्ट्रवादीने सिंचनाचे उपाय केले नाहीत. ज्याप्रकारे पाणी अडवलं पाहिजे होतं, तसं अडवलं नाही. आघाडीच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम म्हणजे आजचा दुष्काळ आहे. किंबहुना म्हणूनच आघाडी सरकारला जनतेनं बाजूला सारलं आहे.”
=================================================

विव्हळणाऱ्या महिलेच्या मदतीला पोलिस, भरदुपारी रस्त्यावर प्रसुती

विव्हळणाऱ्या महिलेच्या मदतीला पोलिस, भरदुपारी रस्त्यावर प्रसुती
हैदराबा : हैदराबादमध्ये माणुसकी जपणारी एक घटना घडली आहे. एका महिला पोलिसाने वेदनांनी विव्हळत असलेल्या एका महिलेची प्रसुती भरदुपारी रस्त्यावरच केली.

दुपारची वेळ होती. हैदराबादमधील गर्दीच्या परिसरात एक महिला भररस्त्यावर वेदनेने तडफडत होती. पोलिसांना या महिलेबाबत कळलं आणि महिला पोलिसासाह पोलिसांची पथक घडनास्थळी दाखल झालं. ही महिला गर्भवती असून प्रसुती वेदना सुरु झाल्याचं पोलिसांना समजलं. एवढचं नाही तर तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता.
=================================================

कोहिनूर हिरा प्रकरणी सरकारचा यू-टर्न

कोहिनूर हिरा प्रकरणी सरकारचा यू-टर्न
नवी दिल्ली: कोहिनूर हिरा प्रकरणी सरकारने आपल्या वक्तव्यावरुन यू-टर्न घेतला आहे. कोहिनूर परत आणण्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

दोनच दिवसांपूर्वी कोर्टात कोहिनूर हिरा भारतात परत आणण्याविषयी एक जनहित याचिकेवर सुनावणी करण्यात आली. त्यावेळेस सरकारनं सुप्रीम कोर्टाला अशी माहिती दिली की, ‘ब्रिटीशांनी कोहिनूर चोरलेला नव्हता किंवा जबरदरस्ती नेला नाही. तर पंजाबमधील शासकांनी तो त्यांना दिला होता.’

सरकारच्या या माहितीनंतर माध्यमात त्यासंबंधी बातम्या येऊ लागल्या. त्यानंतर सरकारकडून एक पत्रक जारी करण्यात आलं. ज्यामध्ये असं म्हणण्यात आलं की, “कोहिनूरसंबंधी ज्या काही बातम्या आल्या आहेत. त्या तथ्यावर आधारित नाही.” तसंच सरकार कोहिनूरला योग्यपणे आणि प्रेमानं परत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात असून ही जनहित याचिका स्वीकारणं बाकी आहे.

तसंच कोर्टानं उत्तर देण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. असंही पत्रकात म्हटलं आहे. तसंच पत्रकात असंही म्हणण्यात आलं आहे की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतीय इतिहासातील तीन महत्त्वाच्या कलाकृती देशात परत आणण्यात आलं आहे.

त्यामुळे आता कोहिनूर देशात परत आणण्यासाठी सरकार कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
=================================================

हलगी वाजवत ‘सैराट’चं पोस्टर रिलीज

EXCLUSIVE : हलगी वाजवत ‘सैराट’चं पोस्टर रिलीज
मुंबई : खरं तर चित्रपटाच्या पोस्टरचं रिलीज करायचं असेल, तर मोठी पार्टी होते. सेलिब्रेटी त्याला उपस्थित राहतात. पण या सगळ्या फाटा देत ‘सैराट’ चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या चित्रपटाचं पोस्टर थेट आपल्या गावात रिलीज केलं आहे.

करमाळा या मूळ गावी नागराज मंजुळे यांनी हलगीच्या तालावर नाचत पोस्टर रिलीज केलं आहे.

पूर्वीच्या काळी चित्रपट रिलीज झाला की पोस्टर हलगीच्या तालावर नाचवत गावभर मिरवणूक काढली जायची. अगदी तशाच पद्धतीनं हे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

यापूर्वी फँड्रीचं पोस्टरही नागराज मंजुळे यांनी अशाच पद्धतीनं रिलीज केलं होतं. येत्या 29 तारखेला सैराट चित्रपट रिलीज होतोय.
=================================================

छगन भुजबळांच्या 'रुग्णालय'वारीवरून चौकशीचे आदेश

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २० - महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची रुग्णालयवारी वादाच्या भोव-यात सापडली आहे. आता याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह आर्थर रोड जेलचे अधिकारी व काही डॉक्टरांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवार १८ एप्रिल रोजी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर भुजबळ यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मुळात त्यांनी दाढदुखीची तक्रार केल्याने त्यांना तुरूंगाबाहेर जाऊन सरकारी दंतवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात आल्याचे समोर आले आहे. मग अचानक त्यांच्या छातीत कसे दुखू लागले? आणि त्यावरील उपचारांसाठी त्यांना कार्डिओलॉजी विभाग नसणा-या सेंट जॉर्ज रुग्णालयात कसे दाखल करण्यात आले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून याप्रकरणाची चौकशी आता तुरूंग महानिरीक्षक बिपीनकुमार सिंह करणार आहेत. 
    महाराष्ट्र सदन आणि इतर काही प्रकरणात घोटाळा केल्याचे भुजबळांवर आरोप आहेत. १४ मार्चला ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून भुजबळांना अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्याभरापासून आर्थर रोड कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांना सोमवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागले. दात दुखत असून छातीतही दुखत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. मात्र हा सर्व प्रकार संशयाच्या भोव-यात सापडला असून दात दुखत असतानाही भुजबळ एकदाही दंतवैद्यकीय रुग्णालयात का गेले नाहीत? असा प्रश्न अनेकांना पडला. तसेच अनेक डॉक्टरांनी याप्रकरणी परस्परविरोधी माहिती दिल्याने संशयात आणखीन भरच पडली असून तुरूंग अतिरिक्त पोलीस महासंचालक बी.के. उपाध्याय यांनी तुरूंग महानिरीक्षक बिपीनकुमार सिंह यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 
    दरम्यान तुरूंगवारी भोगावी लागणा-या राजकारण्यांमध्ये तुरूंगातून काही काळ बाहेर घालवण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालय लोकप्रिय आहे. यापूर्वीही अनेक राजकारण्यांनी आजारपणाच्या निमित्ताने अनेक काळ या रुग्णालयात घालवल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर यांच्या खुनाशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड व राजकारणी अरूण गवळीनेही तुरूंगापेक्षा बराच काळ या रुग्णालयात घालवला होता. 
=================================================

२५ लाख लीटर पाणी घेऊन 'जलदूत एक्स्प्रेस' लातूरमध्ये दाखल

  • ऑनलाइन लोकमत - 
    लातूर, दि. २० - मिरजेतून एकाचवेळी 50 टँकरमधून 25 लाख लिटर पाणी घेऊन निघालेली ‘जलदूत’ एक्स्प्रेस बुधवारी सकाळी लातूरमध्ये दाखल झाली आहे. ही जलदूत एक्स्प्रेस मंगळवारी रात्री रवाना झाली होती. प्रशासनाचे अथक प्रयत्न मार्गी लागल्याने ही रेल्वे आता पूर्णक्षमतेने पाणी घेऊन जाणार आहे. मिरज येथील रेल्वे यार्डात टँकर भरण्याची व्यवस्था झाल्याने दररोज २५ लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात येणार आहे.
    मिरज रेल्वे स्थानकातून मंगळवारी सकाळी पाच लाख लिटर पाणी घेऊन दहा टँकरची नववी खेप लातूरला पाठविण्यात आली. रेल्वे यार्डात एकाचवेळी 25 लाख लिटर पाणी भरण्याची सोय झाल्याने आता दररोज 50 टँकर लातूरला जाणार आहेत. लातूरला पाणी घेऊन जाणाऱ्या रेल्वेला ‘जलदूत’ हे नाव देण्यात आले असून ‘जलदूत’ला एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे जलदूत कोणत्याही स्थानकावर क्रॉसिंगला न थांबता लातूरला रवाना होईल. मिरजेतून लातूरपर्यंत जाण्यासाठी आठ ते नऊ तास लागतात. मात्र जलदूत एक्स्प्रेस सात तासात लातूरला पोहोचणार आहे.
    पाणीटंचाईमुळे मिरजेतून लातूरला पाणीपुरवठ्याचा निर्णय झाल्यानंतर रेल्वे जलशुद्धिकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत जलवाहिनी व उच्च क्षमतेच्या मोटारी बसविण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. या यंत्रणेद्वारे रेल्वे स्थानकातील हैदरखान विहिरीत नदीच्या पाण्याचा साठा करून ते पाणी रेल्वे टँकरमध्ये भरण्यास मंगळवारी सुरुवात झाली. गेले नऊ दिवस दररोज पाच लाख लिटर पाणी लातूरला पाठविण्यात येत होते. आता उच्च दाबाने टँकर भरण्याची व्यवस्था झाल्याने व 50 टँकरच्या दोन रेल्वे उपलब्ध झाल्यामुळे लातूरकरांना दररोज २५ लाख लिटर पाण्याचा पुरवठा होणार आहे.
=================================================

८ महिन्याच्या चिमुरडीवर बलात्कार, पित्याने छाटले नराधमाचे हात

  • ऑनलाइन लोकमत - 
    पंजाब, दि. २० - 8 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणा-या आरोपीचे दोन्ही हात मुलीच्या पित्याने छाटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भटींडा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. आरोपीदेखील अल्पवयीन असून 2014मध्ये त्याने या चिमुरडीवर बलात्कार केला होता. याचा राग मनात ठेवून मुलीच्या वडिलांनी आरोपी तरुणाचे दोन्ही हातच कापले आहेत.
    पिडीत मुलगी आणि आरोपी दोघेही कोटली अबलू गावाचे रहिवासी आहेत. भटींडा जिल्हा न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. सुनावणी संपल्यानंतर घरी परतत असताना पिडीत मुलीच्या वडिलांनी आरोपी तरुणाला दुचाकीवरुन आपल्यासोबत येण्यास सांगितले. हे प्रकरण मिटवण्यासाठी तडजोडीची चर्चा करायची असल्याचं त्याला सांगितलं. झुंबा गावाजवळ पोहोताच पिडीत मुलीच्या वडिलांनी आरोपी तरुणाला झाडाला बांधलं आणि धारदार शस्त्राने त्याचे दोन्ही हात कापून टाकले. 
    आरोपी तरुणाला भटींडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या शरिरावर इतर ठिकाणीही जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास करत आहेत.
=================================================

राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्यास केंद्राचा नकार

  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. २० - राजीव गांधीच्या सात मारेक-यांना सोडण्याचा तामिळनाडू सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. सातही मारेक-यांनी 20 वर्षाहून जास्त काळ कारागृहात शिक्षा भोगली आहे त्यामुळे त्यांची शिक्षा माफ करण्याचा विचार तामिळनाडू सरकार करत आहे असं पत्र केंद्र सरकारला पाठवण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला होता त्यामुळे तामिळनाडू सरकारने केंद्राकडे विचारणा करत मत मागवलं होतं.
    राजीव गांधीच्या मारेक-यांची शिक्षा माफ करण्यात यावी यासाठी तामिळनाडू सरकारने दुस-यांदा केंद्राकडून मत मागवलं होतं. युपीए सरकार सत्तेत असताना फेब्रुवारी 2014मध्ये पहिल पत्र पाठवण्यात आलं होतं. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यांना सोडण्याचा अधिकार नसल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने तामिळनाडू सरकारला कळवलं आहे. 'राज्य सरकारने पाठवलेल्या पत्रावर आम्ही कायदा मंत्रालयाचं मत मागवलं होतं. आम्ही त्यांना मारेक-यांना सोडू शकत नाही कळवलं आहे', अशी माहिती गृहमंत्रालयातील अधिका-याने दिली आहे.
    केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांना तामिळनाडूचे मुख्य सचिव के. ज्ञानदेसीकन यांनी यासंबंधी पत्र पाठवलं होतं. सातही आरोपींनी केलेल्या याचिकेवर तामिळनाडू सरकार विचार करत असून त्यांची जन्मठेपेची शिक्षा माफ करण्याचा विचार सरकार करत आहे. सर्व दोषींनी 24 वर्ष कारागृहात आपली शिक्षा भोगली आहे त्यामुळे त्यांना मुक्त करण्याचा सरकार विचार करत असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.
    राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी संथान, मुरुगन, पेरारीवलन, नलिनी, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
=================================================

हाती सत्ता, धनसंपत्ती आहे म्हणून लोकभावना विकत घेता येत नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. २० - नगरपंचायत व जिल्हा परिषद पोटनिवडणुकांबरोबर काही ग्रामपंचायतींचे निकाल लागले ते संमिश्र स्वरूपाचे आहेत व भाजपला अनेक ठिकाणी अस्तित्वासाठी झगडावे लागत असेल तर सत्तेची मधुर फळे जनतेच्या मुखी न लागता दुसरेच कोणीतरी लुटालूट करीत आहे हे समजून घेतले पाहिजे. शिवसेनेने या निवडणुकीत मुसंडी मारली आहे. मात्र त्याचवेळी भाजपची झालेली घसरगुंडी आमच्यासाठी वेदनादायी आहे. हाती सत्ता, धनसंपत्ती आहे म्हणून लोकभावना प्रत्येक वेळी विकत घेता येईलच असे नाही असा टोमणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भाजपाला मारला आहे.
    राज्यात बदलाचे वारे इतक्या लवकर वाहू लागतील असे वाटले नव्हते, पण नगरपंचायत निवडणुकांत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची जी धूळधाण उडाली आहे तो सर्व प्रकार धक्कादायकच म्हणावा लागेल. ज्या काँगे्रस पक्षाला लोकांनी उचलून आपटले होते त्या काँगे्रस पक्षाची मूर्च्छितावस्था जाऊन तरतरी यावी असे काही निकाल लागले आहेत. जानेवारी महिन्यात राज्यातील २८९ पंचायत व नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यातही भाजपास लोकांनी साफ झिडकारल्याने त्यांचा चेहरा ‘सेल्फी’ काढण्यालायकच झाला होता असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
    भारतीय जनता पक्ष सध्या सत्तेवर आहे व त्यांचे मंत्री तसेच पुढारी विकासाच्या नव्या घोषणांचे नारळ रोज वाढवत आहेत, पण त्या नारळात पाणी व खोबरे दोन्ही नसल्याने नुसत्या करवंट्यांचेच आवाज येत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
    केंद्रात भाजपचे राज्य एकहाती आल्यापासून ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत शत-प्रतिशत भाजपचा नारा देण्यात आलाच होता. इतकेच काय, देशातील प्रमुख विद्यापीठे व शैक्षणिक संकुलांतही भाजपने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यात रोहित वेमुलाची आत्महत्या झाली व कन्हैयाकुमारचा जन्म झाला. हेच यश मानायचे असेल तर शत-प्रतिशत मार्गी लागले असे म्हणायला जागा आहे असा टोला उद्धव ठाकरेंना हाणला आहे.
=================================================

लातूरमध्ये ५० लाखांपैकी केवळ २५ लाख लीटर पाणीपुरवठा

  • लातूर : पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे राहिल्यानंतर लातूरला रेल्वेसह इतर यंत्रणांद्वारे झालेल्या पुरवठ्यामुळे दररोज सुमारे ५० लाख लीटर पाणी उपलब्ध होते. मात्र त्यातील निम्मे म्हणजे केवळ २५ लाख लीटर पाणी वाटप होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने मिळविलेल्या माहितीतून उघड झाले आहे. त्यामुळे उर्वरित पाणी जाते कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
    शहरासाठी रेल्वेने मिरजहून दररोज साधारण ५ लाख लीटर पाणी येते. शिवाय निम्न तेरणा प्रकल्पातून १२ लाख, डोंगरगाव बॅरेजेसमधून ३० लाख आणि साई ट्रेंचमधून ३ लाख लीटर असे रोज ५० लाख लीटर पाणी संकलित केले जाते़ प्रतिकुटुंब २०० लीटर याप्रमाणे लातूरकरांना दररोज २५ लाख लीटर पाणी पुरविले जाते.
    महापालिकेच्या दप्तरात ९० हजार घरांची नोंद आहे. भाडेकरूंसह एकूण कुटुंब संख्या १ लाख २० हजार आहे़ त्यांना आठ दिवसांना २०० लीटरप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्याचे पालिकेचे म्हणणे ग्राह्य धरल्यास दररोज २५ लाख लीटर पाण्याचे वितरण होते़ शहरात एकूण ३५ प्रभाग आहेत़ प्रत्येक प्रभागाला २ टँकर आहेत़ स्थानिक स्रोतातून तसेच रेल्वेचे पाणी उचलण्यासाठी २० हजार व १२ हजार लीटर क्षमतेचे ६० टँकर आहेत़ ६ हजार लीटर क्षमतेच्या ७० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आठ दिवसांना २०० लीटर पाणी पुरत नाही, अशी ओरड नागरिकांतून होत आहे़ शिवाय पाणी वितरणामध्ये दुजाभाव होत असल्याचाही आरोप होत असून, आठ दिवसांऐवजी पाच दिवसांनी पाणी द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
    >पालिकेकडे पाणीवाटपाची प्रभागनिहाय नोंद आहे. तेथील चार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. नियमानुसार सर्वांनाच २०० लीटर पाणी दिले जात आहे. तक्रार असल्यास चौकशीही केली जाते. अधिकचे पाणी देण्याची मागणी आहे. त्यावर निर्णय झालेला नाही.
=================================================

डान्सबारला परवानगी मिळणे आता दुरपास्तच

  • सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई
    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, राज्य सरकारने डान्सबारला परवानगी दिली असली तरी किती डान्सबारला परवानगी मिळेल, याबाबत साशंकताच आहे. डान्सबारसाठी शासनाने ठरवलेल्या अटींची पूर्तता करणे अनेक बारमालकांना अशक्य होणार आहे. तर याच अटींची पूर्तता न करू शकलेल्या बारमालकांचे डान्सबारसाठी आलेल्या अर्जावर नवी मुंबई पोलिसांनी हरकत घेतली आहे.
    डान्सबारवरील बंदीविरोधात इंडियन हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशनने न्यायालयात धाव घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली आहे. परंतु डान्सबारसाठी परवाने देण्यापूर्वी अटींची पूर्तता करणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यातील काही अटी वगळण्याची मागणी बारमालकांनी केल्याने काही अटी वगळण्यात आल्या असून, त्यामध्ये सीसीटीव्हीचाही समावेश आहे. यामुळे डान्सबारमधील नृत्याचे थेट पोलीस ठाण्यात प्रक्षेपण सुरू होण्यापूर्वीच बंद झाले आहे. यानंतर राज्य सरकार कधी परवानगी द्यायला सुरू करतेय याकडे बारमालकांचे लक्ष लागले असले तरी किती जणांकडून अटींची पूर्तता होईल याबाबत साशंकताच आहे.
    सद्य:स्थितीत सुरू असलेले बार रहिवासी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तर काही वाणिज्य गाळ्यामध्ये मात्र रहिवासी क्षेत्रातच आहेत. याचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत असून, त्यांच्या तक्रारींनाही दाद मिळत नसल्याचे दिसत आहे. यामुळे सुधारित नियमावलीनुसार डान्सबारसाठी परवाने देताना या सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्या याच अटींवर बोट ठेवत नवी मुंबई पोलिसांनी डान्सबारसाठी आलेल्या अर्जांवर आक्षेप घेतल्याचे समजते. नवी मुंबई पोलिसांचा हा अहवाल शासनाकडे गेल्यानंतर डान्सबार सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या त्या सर्वांचे अर्ज बाद होणार आहेत. अशाच प्रकारे राज्यातल्या अनेक प्रस्तावित डान्सबारवर पोलिसांचा आक्षेपार्ह ठपका बसणार आहे. त्यामुळे डान्सबार सुरूच करायचा असल्यास नवीन जागेत नियमानुसार फेरबदल करून बारमालकाला राज्य सरकारच्या अटींचे पालन करावे लागणार आहे. त्याशिवाय राज्यात एकाही डान्सबारला परवानगी मिळणे कठीणच आहे. या संपूर्ण परिस्थितीवरून राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखत अटींच्या माध्यमातून बारमालकांची चांगलीच कोंडी केल्याचे दिसत आहे.
=================================================

रेल्वे फाटकाजवळ वाहनांसाठी लिफ्ट

  • दिवा येथील ब्रिजसाठी मरेचा अनोखा पर्याय
    मुंबई : मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात असणाऱ्या फाटकामुळे लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागत आहे. त्यामुळे फाटक बंद करून रोड ओव्हर ब्रिज बांधला जाणार आहे. मात्र हा ब्रिज बांधल्यास त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांना उतरण्यास जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे यावर पर्याय म्हणून वाहनांची ब्रिजवर चढउतर करण्यासाठी दोन्ही बाजूंना प्रत्येकी २0 टनाच्या चार लिफ्ट उभारण्यात येणार आहेत.
    ब्रिज बांधताना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. ब्रिज बांधताना त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांना उतरण्यासाठी जागाच उरलेली नाही. अनधिकृत बांधकामांमुळेच ही जागा राहिली नसल्याने उड्डाणपूल पूर्ण होण्यात अडथळे येत आहेत. यावर मध्य रेल्वेकडून तोडगा काढण्यात आला आहे. मध्य रेल्वेने पालिकेसमोर पुलाच्या दोन्ही बाजूंना लिफ्ट बांधण्याचा पर्याय ठेवला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन-दोन लिफ्ट बांधण्यात येणार असून, त्यांचे प्रत्येकी वजन २0 टन असेल. पुलावर वाहने ये-जा करतील व त्यानंतर दोन्ही बाजूंच्या लिफ्टमधून अवजड वाहनांपासून हलक्या प्रकारची वाहने वर-खाली घेऊन जाता येणे शक्य होईल, असे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
=================================================

‘वैवाहिक बलात्कार’ हा गुन्हा ठरविण्याचा विचार

  • नवी दिल्ली : पत्नीची इच्छा नसताना पतीने तिच्यापासून शरीरसुख घेणे हा ‘वैवाहिक बलात्कारा’चा गुन्हा ठरविण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे, असे महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी मंगळवारी येथे सांगितले.
    मनेका गांधींचे हे विधान म्हणजे महिनाभरातच या विषयावर त्यांनी केलेले घूमजाव आहे. गेल्याच महिन्यात संसदेत हा विषय उपस्थित झाला तेव्हा, ‘वैवाहिक बलात्कार’ ही संकल्पना सद्य:स्थितीत भारतीय संदर्भात लागू करणे योग्य होणार नाही, असे त्यांनी संसदेत सांगितले होते व त्यावरून बराच वाद झाला होता. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ ही केंद्र सरकारची मोहीम देशातील आणखी ६१ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मनेका गांधी यांनी हा बदललेला पवित्रा घेतला. ‘वैवाहिक बलात्कार’ हा गुन्हा ठरविण्याचा विषय पुढे नेण्याच्या दृष्टीने सरकारचे काही प्रयत्न सुरू आहेत का, असे विचारले असता त्यांनी ‘आता तसे प्रयत्न सुरू आहेत’, असे उत्तर दिले. हा विषय पुढे नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे व यावर लवकरच निर्णय होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
    स्त्री-पुरुषाचे शरीसंबंध हाच विवाहाचा मुख्य आधार असला तरी पत्नीला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व व स्वतंत्र हक्क आहेत. त्यामुळे लग्नाची बायको म्हणून स्त्रीने, स्वत:ची इच्छा असो वा नसो, पतीच्या शरीरसुखासाठी सदैव उपलब्ध व्हायलाच हवे, ही पुरुषी मानसिकता आता बदलायला हवी, असे म्हणून महिला हक्कांसाठी आग्रह धरणाऱ्या संघटनांनी ‘वैवाहिक बलात्कार’ हादेखील गुन्हा ठरविण्याची मागणी सुरू केली. मध्यंतरी केंद्रीय विधि आयोगाने प्रचलित फौजदारी कायद्यांचा सर्वंकष फेरआढावा घेण्याचे काम हाती घेतले तेव्हा गृह मंत्रालयाने आयोगाचे या विषयावरही मत मागितले होते. आयोगाने त्यावेळी अनुकूल मत दिले होते.
    महिनाभरापूर्वी संसदेत हा विषय निघाला तेव्हा मनेका गांधी म्हणाल्या होत्या, ‘निरक्षरता, गरिबी, पिढीजात घट्ट होत गेलेल्या सामाजिक प्रथा व नीतिमूल्ये, धार्मिक श्रद्धा आणि विवाहाला पवित्र बंधन मानण्याची समाजाची मानसिकता यासारख्या विविध कारणांवरून ‘वैवाहिक बलात्कारा’च्या गुन्ह्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर मानली जाणारी संकल्पना भारतीय संदर्भात लागू करणे योग्य होणार नाही, असे वाटते.’
=================================================

दारूबंदी टिकविण्याचे आव्हान

  • एस.पी. सिन्हा, पाटणा
    बिहारमध्ये नितीशकुमार सरकारने संपूर्ण दारुबंदीची घोषणा केल्यानंतर आता सरकारसमक्ष ही बंदी टिकवून ठेवण्याचे फार मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
    बिहार सीमेलगतच्या इतर राज्यांमधून बेकायदेशीरपणे येणारी आणि विकली जाणारी दारू रोखण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असतानाच कफ सिरप आणि झोपेच्या गोळ्यांची विक्रीही प्रचंड वाढली आहे.
    व्यसनाधीन तरुण व इतर लोक या औषधांचा खुलेआम वापर करीत आहेत. बेनाड्रील, फेंसाड्रील आदी कफ सिरपची तर आता ब्लॅकमध्ये विक्री होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे झोपेच्या गोळ्यांचीही मागणी वाढली आहे. नशा करणारे आता याच गोष्टींवर आपली तहान भागवत आहेत.
    दुसरीकडे झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि नेपाळलगतच्या जवळपास सर्व जिल्ह्णांच्या अनेक शहरांमध्ये शेजारून येणाऱ्या दारूची लपूनछपून विक्री सुरू आहे. अथवा लोक स्वत: सीमा भागात जाऊन मद्यप्राशन करीत आहेत. थोडक्यात संपूर्ण दारुबंदीनंतरही या क्षेत्रातील लोकांना अगदी सहजपणे दारू उपलब्ध होत आहे.
    नेपाळलगतच्या रक्सौल, मधुबनी, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण या जिल्ह्णांमध्ये सुद्धा सीमा सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांसमक्ष मद्य तस्करी रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
    मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शेजारील राज्यांना दारुबंदीच्या अंमलबजावणीत सहकार्याचे आवाहन केले आहे. परंतु समस्या ही आहे की तेथे दारुबंदीच नाही मग तेथील सरकार यावर आळा कसा घालणार?दुसरीकडे झारखंडला लागून असलेल्या नवादा, नालंदा जिल्ह्याचे लोक रजौली मार्गे शेजारील राज्याच्या सीमेवरील ढाबे व हॉटेल्समध्ये जाऊन मद्यप्राशन करीत आहेत. भागलपूरचा इशुपूर वा बाराहाट बाजार अर्धा बिहार आणि अर्धा झारखंडमध्ये पडतो. त्यामुळे गैरप्रकार रोखणे अथवा धाडी घालणे जवळपास अशक्य आहे.
=================================================

भारत जगावर राज्य करणार - मोदी 

  • कटरा (जम्मू-काश्मीर) : सध्याचे २१ वे शतक ज्ञानाचे युग असून यात भारत जगावर राज्य करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात व्यक्त केला.
    भारतात ३५ वर्षांखालील ८० कोटी युवक असून प्रत्येक युवकाचे स्वप्न हे देशाच्या प्रगतीची कहाणी ठरावे. २१ वे शतक हे ज्ञानाचे शतक असून त्याचे भारत नेतृत्व करेल. त्यासाठी ज्ञान हीच ऊर्जा असून ती भारताकडे आहे. गरिबांसाठी काही तरी करण्याची प्रतिज्ञा करू या. कारण गरीब वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या योगदानातून हे विद्यापीठ उभे ठाकले आहे. लाखो यात्रेकरू खूप दूरवरून आले असतील. देशातील अन्य विद्यापीठे करदात्यांच्या(मातापित्यांनी दिलेले पैसे) पैशावर चालत असताना हे विद्यापीठ वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या लाखो गरीब यात्रेकरूंच्या पैशावर चालते हेच या विद्यापीठाचे वैशिष्ट्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.
    रुग्णालयाचे उद्घाटन...
    कटरालगतच्या काकरॅल येथे श्री मातादेवी नारायणा सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे मोदींनी उद्घाटन केले. श्री मातादेवी देवस्थान मंडळाने ३०० कोटी रुपये खर्चून हे २३० खाटांचे रुग्णालय उभारले आहे. तेथे कॉर्डिओलॉजी, कॉर्डिओ-थोरॅसीस सर्जरीसह २० पेक्षा जास्त औषध आणि शस्त्रक्रिया शाखा आहेत. या रुग्णालयाच्या उद्घाटनाला राज्यपाल एन.एन. व्होरा, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, उपमुख्यमंत्री निर्मलसिंग, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंग उपस्थित होते.
    दीपाने नाव सार्थ केले...
    रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या त्रिपुराच्या दीपा करमाकर या पहिल्या भारतीय महिला जिम्नॅस्टबाबत मोदींनी गौरवोद्गार काढले. दीपाने देशाची मान अभिमानाने उंचावताना स्वत:चे नाव सार्थ ठरविले आहे. निर्धारातून तिने हे यश मिळविले आहे. संसाधनांच्या कमतरतेचा अडसर तिने प्रगतीच्या आड येऊ दिला नाही, असे ते दीक्षांत समारंभात म्हणाले.
=================================================

‘त्या’ धार्मिक स्थळांवरून फटकारले

  • नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवरील (फूटपाथ) बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटविण्याच्या दिशेने उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल मंगळवारी देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जोरदार फटकारले.
    सोबतच हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदतही दिली. याउपरही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी निर्देशांचे पालन केले नाहीतर संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना वेळोवेळी व्यक्तिश: सर्वोच्च न्यायालयापुढे हजर होऊन त्यांनी न्यायालयाच्या विविध आदेशांचे पालन का केले नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले. न्यायमूर्तीद्वय व्ही. गोपाल गौडा आणि अरुण मिश्रा यांनी या प्रकरणाची सुनावणी मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तहकूब करताना आम्ही अशाप्रकारची वर्तणूक कदापि सहन करणार नाही,असे सांगितले.
=================================================

चीनमध्ये ९ हजार भ्रष्टाचारी अधिका-यांना शिक्षा

  • ऑनलाइन लोकमत - 
    बीजिंग, दि. २० - भ्रष्टाचार केल्याप्रकरणी चीनमध्ये 9361 अधिका-यांना शिक्षा करण्यात आली आहे. पहिल्या तीन महिन्यातील तपासाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. शिक्षा करण्यात आलेल्यांमध्ये मंत्रीस्तरावरील अधिका-यांचादेखील समावेश आहे. हे अधिकारी 8788 प्रकरणांमध्ये सहभागी होते अशी माहिती मिळाली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या शिस्त तपासणी केंद्रीय आयोगाने अहवालाद्वारे ही माहिती दिली आहे. वेबसाईटवर हा अहवाल टाकण्यात आला आहे. 
    फक्त मार्च महिन्यात 2701 अधिका-यांवर 2672 प्रकरणांमध्ये कारवाईकरण्यात आली आहे. सर्वात जास्त प्रकरण बेकायदेशीर भत्ते आणि फायदे मिळवण्याची आहेत. सरकारी वाहनांचा खाजगी कामांसाठी वापर करणे, भेटवस्तू आणि पैशांची देवाणघेवाण करणे ही प्रकरणेदेखील यामध्ये सामील आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ३ वर्षापुर्वी सुरु केलेल्या भ्रष्टाचार-विरोधी अभियानाअंतर्गत आतापर्यंत हजारांहून जास्त अधिका-यांवर कारवाई करण्यात आली आहे. 
=================================================

न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प, हिलरी विजयी

  • ऑनलाइन लोकमत - 
    न्यूयॉर्क, दि. २० - न्यूयॉर्क येथे पार पडलेल्या प्राथमिक निवडणुकीत  डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. ट्रम्प यांना 65 टक्के मते मिळाली, तर जॉन कॅसिच 21 टक्के मत मिळवून दुस-या स्थानावर राहिले. क्रूज यांना फक्त 14 टक्के मतदारांचा पाठिंबा मिळाला. हिलरी क्लिंटन यांना 61 टक्के मत मिळाली तर सँडर्स यांना 39 टक्के मतदारांचा पाठिंबा मिळाला.
    डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे प्रतिनिधींची संख्या वाढली असून उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली आहे. तर दुसरीकडे हिलरी क्लिंटन यांनीदेखील विजय मिळवला आहे. हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा हा विजय आतापर्यंतचा मोठा विजय मानला जात आहे. मंगळवारी 5 राज्यांमध्ये प्राथमिक निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे हा विजय त्यांच्या पुढील निवडणुकांमध्ये महत्वाची भुमिका पार पाडले असं म्हटलं जात आहे.
    अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीसाठी रिपब्लिकन व डेमोक्रॅ्रटिक पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे ट्रम्प व हिलरी आघाडीवर आहेत. नोव्हेंबरमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी उमेदवार निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. त्याचाच भाग म्हणून राज्या राज्यात उमेदवार निवडीसाठी मतदान घेतले जात आहे.
=================================================

सोन्या-चांदीने दिला शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा

  • नवी दिल्ली : २0१६ मध्ये आतापर्यंत शेअर बाजाराच्या तुलनेत सोन्या-चांदीमधील गुंतवणुकीने अधिक परतावा दिला आहे. या वर्षात सोन्याच्या भावात १६.१८ टक्के, तर चांदीच्या भावात १५.६१ टक्के वाढ झाली आहे. त्याचवेळी ३0 कंपन्यांच्या सेन्सेक्समध्ये मात्र १.१५ टक्के घसरण झाली आहे.
    २९ फेब्रुवारी रोेजी सेन्सेक्स एक वर्षाच्या नीचांकावर २२,४९४.६१ अंकांवर गेला होता. सध्या त्यात वाढ झाली असली तरी ४ मार्च २0१५ च्या तुलनेत सेन्सेक्स आजही १४ टक्क्यांनी खाली आहे. ४ मार्च २0१५ रोजी सेन्सेक्स ३0,0२४.७४ अंकांवर होता. शेअर बाजार कमजोर झाल्यामुळे गुंतवणूकदार सोने आणि अन्य संपत्ती वर्गाकडे आकर्षित झाला आहे. गुंतवणूकदार सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देत असतो.
    कच्च्या तेलाच्या किमतींतील चढ-उतार आणि चीनच्या अर्थव्यवस्थेसंबंधीच्या चिंता यामुळे शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पानंतर बाजारात थोडी सुधारणा झाल्यामुळे नुकसान थोडे भरून निघाले आहे.
=================================================
पाकने काढले कृपाल सिंग यांचे हृदय, जठर
अटारी (पंजाब) - पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय कैदी कृपाल सिंग यांच्या संशयास्पद मृत्युनंतर पाकिस्तानने भारताकडे सुपूर्त केलेच्या त्यांच्या मृतदेहामधून हृदय आणि जठर काढून घेतल्याचे वैद्यकीय तपासात समोर आले आहे. 

सिंग यांचा मृतदेह पाकिस्तानने सोमवारी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला. अमृतसर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य बी. एस. बल यांनी "कृपाल सिंग यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा नव्हत्या. मात्र त्यांचं हृदय आणि जठर शरीरात आढळले नाही.‘ अशी माहिती दिली. मृत्युचे नेमके कारण समजण्यासाठी त्यांचे मूत्रपिंड आणि आतड्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कृपाल सिंग हे 29 फेब्रुवारी 1992 रोजी वाघा सीमा ओलांडून पाकिस्तानात गेल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच नंतर पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांनी दोषी ठरवून मृत्युदंडची शिक्षा सुनावण्यात आली होती.
=================================================
साखरपुड्यातच विवाह; दुष्काळग्रस्तांसाठी एक लाख
परंडा तालुक्‍यातील राजुरी येथे साखरपुड्यात विवाह उरकून नाम फाउंडेशनकडे दुष्काळग्रस्तांसाठी एक लाखांचा धनादेश देताना घाडगे व गंभीरे कुटुंबीय.

परंडा - लग्नसमारंभ म्हटला की, वधूपित्यासह वरांकडील मंडळींकडून मोठा खर्च केला जातो. जेवणावळी, मंडप, बॅण्डपथके, आतषबाजी, कपडे आदींसाठी वारेमाप खर्च होतो. मात्र याला छेद देत परंडा तालुक्‍यातील राजुरी येथे वरपिता व वधूपिता यांच्या समन्वयाने मंगळवारी (ता.१९) साखरपुड्यातच विवाह लावून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी नाम फाउंडेशनला एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

प्रा. डॉ. हणमंत घाडगे (रा. अंजनसोड, ता. पंढरपूर) यांचा मुलगा कौस्तुभ याचा श्रीमंत गंभिरे (रा. राजुरी, ता. परंडा) यांची कन्या ज्योती हिच्याशी विवाह ठरला होता. मंगळवारी (ता. १९) राजुरी येथे साखरपुडा, टिळ्याच्या कार्यक्रमासाठी वराकडील मंडळी आली होती. यावेळी दोन्हींकडील मंडळीत एकमत होऊन पारंपरिक विवाहाच्या खर्चाला फाटा देत सायंकाळी ६ वाजता साध्या पद्धतीने साखरपुड्यातच विवाह लावण्यात आला. घाडगे व गंभिरे परिवाराच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी नाम फाउंडेशनचे सदस्य संदीप मांडेकर (पुणे) यांच्याकडे एक लाखाचा धनादेश देण्यात आला. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दोन्ही शेतकरी कुटुंबे आहेत. या समारंभात वराकडील जितेंद्र भोसले, अमोल पाटील, राजेंद्र घाडगे, रवींद्र घाडगे, हरिदास घाडगे तर वधूकडील जयदेव गंभिरे पोपट गोडगे, महादेव खैरे आदींची उपस्थिती होती.
=================================================
भीक मागत आईच्या कवेत तिने सोडले प्राण
हतबलता अन्‌ लाचारीचं जिणं - अन्नावाचून राजस्थानातील कुटुंबाची तडफड

औरंगाबाद - हाताला काम नाही. मिळाले तरी त्यात राम नाही. गावोगाव भटकायचं, लोकांपुढे हात पसरायचे अन्‌ मिळेल ते खात लाचारीचं जिणं जगण्याच भोग त्यांच्या वाट्याला आले. भटकंती करूनही पोट भरेलच, याची शाश्‍वती नाही. अशा स्थितीत उपाशी अन्‌ तापाने फणफणलेल्या तीन वर्षीय चिमुकलीने दारोदार भीक मागणाऱ्या आईच्या कुशीतच प्राण सोडला. नियती इतकी क्रूर झाली, की चिमुकली गतप्राण झाल्याची आईला कल्पनाही आली नाही. यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी? भूकबळी ठरलेल्या एका राजस्थानी कुटुंबाची करुण कहाणी हृदय पिळवटून टाकणारी आहे.

राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील मलियाडा, सांगोत हे गाव. तेथील राजुलाल कजोडीलाल बागरी (वय-३३) त्यांची पत्नी सुरेशी, भाऊ राकेश, भावजय रुक्‍मिणी अन्‌ बालगोपाळांचा गोतावळा असे हे कुटुंब आहे. गावात हाताला काम नाही, शेतीला पाणी नाही म्हणून कोल्हापूर, मुंबई, औरंगाबाद येथे भटकंती करून भीक मागून उदरनिर्वाह करण्याची वेळ त्यांच्यावर आली. काडीचेही अक्षरज्ञान नाही, हतबलता, उपेक्षा व जगावं लागणारं लाचारीचं जिणं यामुळे या फिरस्ती कुटुंबानं मुंबईवरून सोमवारी (ता.१८) औरंगाबाद गाठलं. सकाळपासून तीन मुलांना घेऊन सुरेशीने भीक मागण्यासाठी दारोदार भटकंतीला सुरवात केली. पुरेसे अन्न मिळत नसल्याने आमरी (वय तीन) ही चिमुकली अनेक दिवसांपासून कुपोषित होती. सोमवारी ती तापेनं फणफणली. मात्र, अज्ञानामुळे अन्‌ पैसे नसल्याने सुरेशीने तिला दवाखान्यात नेले नाही. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास भीक मागता मागताच आमरीने आईच्या कवेत अखेरचा श्‍वास घेतला. तिची आई सुरेशीला याचा थांगपत्ताही लागला नाही. एका गृहस्थाचे आमरीकडे लक्ष गेले, बारकाईने त्याने पाहिल्यानंतर ती आईच्या कवेतच मृत झाल्याचा त्यांना संशय आला. पाहता-पाहता गर्दी जमली. नागरिकांनी दामिनी पथकाला माहिती दिली. पथकाने आमरीला घाटीत नेले. डॉक्‍टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. सुरेशीला व तिच्या कुटुंबाला ठाण्यात आणून पोलिसांनी चौकशी सुरू केली. आमरी व तिच्या कुटुंबीयांची डीएनए चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली. 
=================================================
'PM हवा मोदींसारखा, तर CM केजरीवालांसारखा
मुंबई - भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान तर देशातील प्रत्येक राज्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळायला हवा, असे मत बजाज समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केले आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बजाज बोलत होते. ते म्हणाले, ‘भारत वाईट परिस्थितीतून जात आहे असे मला वाटत नाही. मात्र नेहमीप्रमाणे व्यवसायासाठी हा कठीण काळ आहे. आपण भारतीय खूप भावनिक आहोत. क्रिकेटर असो किंवा राजकारणी सर्वांकडून अपेक्षा फार लवकर वाढतात तशाच कमीही होतात. त्यामुळे नरेंद्र मोदी हे सध्या मुख्यमंत्री नसून पंतप्रधान असल्याची जाणीव अद्याप लोकांना झालेली नसावी. मुख्यमंत्री जेवढ्या वेळात अपेक्षा पूर्ण करू शकतात, तेवढ्याच वेळात पंतप्रधानांनी काम करणे लोकांना अपेक्षित आहे. ते शक्‍य नाही. भविष्याच्या निर्माणासाठी एका पंतप्रधानाला विविध भूमिकांमधून जावे लागते. दिल्लीचे मुख्यमंत्री चांगले काम करत असल्याचेही बजाज म्हणाले. "मी त्यांना (केजरीवाल) पाठिंबा दाखवित आहे म्हणजे मी मोदीविरोधक आहे असे नाही. त्यांना (केजरीवाल) प्रत्येक गल्ली, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक सचिवाची माहिती असल्याचे मला आश्‍चर्य वाटते.‘
=================================================
मालेगाव स्फोट: कर्नल पुरोहितांविरुद्ध पुरावा नाही
संग्रहित चित्रनवी दिल्ली - मालेगावमध्ये 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याविरुद्ध पुरावा नसल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) स्पष्ट केले आहे. 

वृत्तसंस्थेशी बोलताना एनआयएचे महासंचालक शरद कुमार म्हणाले, ‘समझौता बॉम्बस्फोट प्रकरणी पुरावा उपलब्ध नाही. मला एक कळत नाही की पुरोहितांचे नाव या प्रकरणाशी का जोडण्यात आले?‘ मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने पुरोहितांवर केले होते. या प्रकरणात एनआयए पुढील तपास करत आहे. एनआयएने या प्रकरणी आठ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये नाबा कुमार ऊर्फ स्वामी असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान, अमित, राजेंद्र चौधरी यांच्यासह फरार असलेले रामचंद्र आणि संदीप डांगे यांचाही समावेश आहे. शिवाय मृत पावलेले सुनील जोशी उर्फ सुनीलजी यांचाही त्यामध्ये समावेश होता.

मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी पुरोहितांवर आरोप ठेवण्यात आले होते. या स्फोटात चार जण ठार झाले होते तर अन्य काही जण जखमी झाले होते. सुरुवातीला हे प्रकरणी दहशतवादविरोधी पथकाकडे होते. त्या नंतर ते एनआयएकडे सोपविण्यात आले.
=================================================
ऑनलाईन ग्राहकांच्या तक्रारींसाठी समिती- पासवान
संग्रहित चित्रनवी दिल्ली - एखादी वस्तू ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विविध मार्ग सुचविण्यासाठी सरकार लवकरच समिती स्थापन करणार असल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी दिली. 

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीनंतर पासवान प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘एफएसएसएआय‘, स्वयंसेवी संस्था, ग्राहक कल्याण मंत्रालयाचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. यावेळी पासवान म्हणाले, की पेयजलाची शुद्धता हा चिंतेचा विषय आहे. त्याच्या शुद्धतेचे निकष "एफएसएसएआय‘ने ठरविले आहेत आणि शुद्ध पाण्याची जबाबदारी महापालिका, स्थानिक प्रशासनाची आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर स्रोत शुद्धतेच्या निकषांचे पालन करण्याचे व तसे न झाल्यास कारवाईचे अधिकार "एफएसएसएआय‘कडे सोपवावेत, असे परिषदेने सुचविले. परंतु असे अधिकार सोपविल्यास पालिका, महापालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था "एफएसएआय‘ला उत्तर देण्यास बाध्य असतील काय, या प्रश्‍नावर सरकारमध्ये मात्र एकवाक्‍यता नाही. फसव्या, अतिशयोक्तीपूर्ण जाहिरातींबाबत उत्पादकांबरोबरच जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींना (अभिनेते, नायिका, खेळाडू, नामवंत कलाकार) जबाबदार मानावे, अशी शिफारस असल्याचे पासवान यांनी सांगितले. मात्र या सेलिब्रिटींवर काय कारवाई होणार यावर थेट उत्तर देण्याचे टाळून त्यांनी, जाहिरात करण्याआधी सेलिब्रिटींनीच उत्पादनाची सखोल माहिती घ्यावी, अशी टिप्पणी केली. 

"एमआरपी‘पेक्षा अधिक किंमत आकारणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा देताना त्यांनी अशा व्यक्ती, संस्थांविरुद्ध ग्राहकांनी त्वरित ग्राहक न्यायालयात दाद मागावी, असे आवाहन केले. चित्रपटगृहे, स्टेडिअम, हॉटेल अशा ठिकाणी बाटलीबंद पाणी, खाद्यपदार्थांच्या छापील दरापेक्षा अधिक दर आकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, असेही ते म्हणाले. तसेच ग्राहक हेल्पलाइन क्रमांक 1800114000 ची काउंटर संख्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
=================================================
भाजपची घसरगुंडी आमच्यासाठी वेदनादायी- सेना
संग्रहित चित्रमुंबई - नगरपंचायत व जिल्हा परिषद पोटनिवडणुकांबरोबर काही ग्रामपंचायतींचे निकाल लागले ते संमिश्र स्वरूपाचे आहेत व भाजपला अनेक ठिकाणी अस्तित्वासाठी झगडावे लागत असेल तर हाती सत्ता, धनसंपत्ती आहे म्हणून लोकभावना प्रत्येक वेळी विकत घेता येतीलच असे नाही. शिवसेनेने मात्र या निवडणुकीत मुसंडी मारली आहे. मात्र भारतीय जनता पक्षाची झालेली घसरगुंडी आमच्यासाठी वेदनादायी आहे. काही झाले तरी तो आमचा जुना मित्रपक्ष आहे, अशा शब्दांत राज्यातील नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत निकालावर शिवसेनेने ‘सामना‘च्या अग्रलेखातून भाष्य केले आहे. 

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, ‘राज्यात बदलाचे वारे इतक्‍या लवकर वाहू लागतील असे वाटले नव्हते, पण नगरपंचायत निवडणुकांत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची जी धूळधाण उडाली आहे तो सर्व प्रकार धक्कादायकच म्हणावा लागेल. ज्या कॉंग्रेस पक्षाला लोकांनी उचलून आपटले होते त्या कॉंग्रेस पक्षाची मूर्च्छितावस्था जाऊन तरतरी यावी असे काही निकाल लागले आहेत.‘ तसेच "पंचायती, जिल्हा परिषदांचे निकाल म्हणजे महाराष्ट्राचे जनमानस नाही, असे खुलासे आता होतील. पण त्या लपवाछपवीस अर्थ नाही. केंद्रात भाजपचे राज्य एकहाती आल्यापासून ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत शत-प्रतिशत भाजपचा नारा देण्यात आलाच होता. इतकेच काय, देशातील प्रमुख विद्यापीठे व शैक्षणिक संकुलांतही भाजपने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यात रोहित वेमुलाची आत्महत्या झाली व कन्हैयाकुमारचा जन्म झाला. हेच यश मानायचे असेल तर शत-प्रतिशत मार्गी लागले असे म्हणायला जागा आहे.‘ अशी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.
=================================================
मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचाही अवयवदानाचा संकल्प
मुंबई - अवघे पाच हजार रुपये कमावणाऱ्या आणि सुरक्षा रक्षकाची नोकरी करणाऱ्या जीवराज परमार यांनी कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता 16 वर्षांच्या मुलीचे अवयव दान केले. अवयवदान केल्यानंतर रुग्णालयात त्या रुग्णाला पाहूनही त्याबाबत वाच्यता न करणारे देसाई कुटुंब. अत्यंत गरिबीत जगत असतानाही हाडांचे दान करणारे म्हस्के कुटुंब... 21 वर्षांच्या मुलाला गमावल्यानंतरही त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेणारे केणी कुटुंब... अशा तब्बल 42 कुटुंबांचा सोमवारी अवयव प्रत्यारोपण समितीतर्फे केईएम रुग्णालयात भावपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला. या ऋणातून उतराई होणे शक्‍य नाही; पण तरीही शब्दांपलीकडच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा सन्मान समारंभ होता. या भावूक वातावरणात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस यांनीही अवयवदानाचा संकल्प सोडला. 

जवळची व्यक्ती जाते, तेव्हा आपल्याच शरीरातील एखादा अवयव गळून पडल्यासारखे होते. प्राणप्रिय व्यक्ती समोर निश्‍चेष्ट पडलेली असते. ती या जगातून गेली खरी... पण किमान तिचे अवयव या जगात राहावेत, दुसऱ्या व्यक्तींना तिने प्राणदान द्यावे या विचारांनी भारावलेल्या या कुटुंबीयांचा सत्कार करताना सगळ्यांनाच गहिवरून आले होते. 2015-2016 मध्ये अवयवदान केलेल्या या कुटुंबीयांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. अवयवदान करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचे कौतुक करण्यासाठी शब्द थिटे पडत आहेत, असे त्या म्हणाल्या. 

या वेळी अवयवांचे दान केलेल्या अनेकांना प्रियजनांच्या आठवणी सांगताना हुंदके आवरता आले नाहीत. अवयवदानाबाबत जनजागृती करण्याची आवश्‍यकता असल्याचेही अनेक जण म्हणाले. या कार्यक्रमाला डॉ. गौरी कोठारी, डॉ. गुस्ताद डावर, डॉ. अविनाश सुपे, डॉ. संजय नागराल, डॉ. सुजाता पटवर्धन यांच्यासह मुंबईतील रुग्णालयात अवयवदानासाठी समन्वयकाची भूमिका बजावणारे समाजसेवकही उपस्थित होते.
=================================================
राज्यात दोन वर्षांत डेंगीचे 177 बळी
मुंबई - राज्यातील शासकीय रुग्णालयांसह जिल्हा, तालुका रुग्णालये; तसेच महापालिकांच्या रुग्णालयांत डेंगी, चिकुनगुनिया आणि मलेरिया अशा तापाच्या आजारांवर शासकीय-निमशासकीय यंत्रणा सक्षमपणे काम करत असली, तरी 2014 व 15 या वर्षांत डेंगीमुळे 177 रुणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली. 

डासामुळे पसरणाऱ्या या विषाणूजन्य आजाराचे वेळेत निदान होण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय रुग्णालये अद्ययावत यंत्रणेने सक्षम करण्यात आली आहेत. यासाठी क्षेत्रीय पातळीवर आरोग्य कर्मचारी वेळोवेळी नागरिकांच्या घरी भेट देऊन रुग्णांची माहिती गोळा करत असतात. गेल्या काही वर्षांतील अनुभव लक्षात घेता यंदाच्या वर्षी राज्यभरात 21 ते 27 मार्चदरम्यान सर्वेक्षण करण्यात आले. त्यात डेंगीचे 907 संशयित रुग्ण आढळून आले. यात 377 रुग्णांच्या रक्‍तांचे नमुने तपासण्यात आल्यानंतर 31 रुग्णांना डेंगी झाल्याचे दिसून आले. मात्र, या सर्वांवर वेळीच उपचार करण्यात आल्याने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. डेंगीबाबत पूर्वानुभव वाईट असल्याने प्रत्येक महिन्याला राज्यभरात सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

राज्यात 2014 मध्ये डेंगीचे 8 हजार 573 रुग्ण आढळून आल्यानंतर 144 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 2015 मध्ये आढळून आलेल्या 5 हजार 119 पैकी 33 रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक महिन्याला रुग्णांचे सर्वेक्षण करून तातडीने उपचार करण्यासाठी सर्व रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातून आली. 
=================================================

No comments: