Monday, 18 April 2016

नमस्कार लाईव्ह १८-०४-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तानातील हिंदूंना आता भारतात संपत्ती खरेदीची संमती 
२- भारताची भूमिका कायम "सुंदर स्त्री'ची: संतप्त चीन 
३- अमेरिकेच्या लाभासाठी कराराचा घाट 
४- इक्वेडोर: भूकंपामुळे मृतांची संख्या 246 वर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- वर्ष अखेर अयोध्येत राम मंदिर उभारणी सुरु : सुब्रह्मण्यम स्वामी 
६- निवडणुकांमध्ये अजूनही गुन्हेगारी घटक महत्वाची भुमिका का बजावतात ? न्यायाधीशांचा सवाल 
७- आयपीएल बाबतीत सरकारचे दुटप्पी धोरण 
८- चिमुकलीच्या पत्राला पंतप्रधानांचं उत्तर 
९- काँग्रेसने केली आरएसएसची तुलना मुस्लिम लीगशी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- राज्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल 
११- 'दारु नव्हे तर पिण्याचं पाणी प्राथमिकता', मुख्यमंत्र्यांचा पंकजा मुंडेंना टोला 
१२- पुण्यातील '5 लाखात आपले घर' योजनेवर सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
१२- 'आपलं घर'चा केंद्र आणि राज्य सरकारशी संबंध नाही : प्रकाश मेहता 
१४- कुडाळमध्ये काँग्रेसची सरशी, मतदारांची राणेंना साथ 
१५- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 3 महिन्यात 18 किलो वजन घटवलं 
१६- किल्ल्यांच्या पायथा विकासाची कामे रखडली; चारशेवर किल्ल्यांची सरकारदफ्तरी नोंदच नाही 
१७- वेरूळ लेणीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात, एकाचा मृत्यू 
१९- मुंबई; अवघ्या दोन रुपयाच्या वादातून एकाची हत्या 
२०- भिवंडी; ७ वर्षीय चिमुरडीचं अपहरण करुन बलात्कार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल 
२१- लातूर; वक्तव्याचा विपर्यास, पंकजा मुंडे माध्यमांवर भडकल्या 
२२- प्रत्युषा बॅनर्जीप्रकरणाचा आरोप असलेल्या राहुलच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी 
२३- ओडिशात भीषण अपघात; 30 मृत्युमुखी 
२४- "दुष्काळी' समित्यांना वाटाण्याच्या अक्षता  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- दीपा करमरकरने इतिहास रचत केली रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत एंट्री 
२६- वॉटसन आणि वीझची जबरदस्त फिल्डिंग, बाऊंड्री लाईनवर अप्रतिम झेल 
२७- टीम इंडियाचा स्टार रवींद्र जाडेजाचा शाही विवाहसोहळा 
२८- भारताची जिम्नॅस्ट दिपा करमाकरची ऐतिहासिक कामगिरी 
२९- डी कॉकचं खणखणीत शतक, दिल्लीची बंगळुरुवर मात 
३०- गुजरात लायन ड्वेन ब्राव्होला सामनाधिकाऱ्यांची तंबी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३१- चोरांबा येथील जागृत खंडोबा यात्रेस आजपासून प्रारंभ 
३२- उत्तर प्रदेशकडे गोमांस घेऊन जाणारा ट्रक शिवसैनिकांनी पकडला 
३३- देगलूर; दुष्काळग्रस्त २४२ शेतमजुरांवर मोफत शास्त्रक्रिया 
३४- फुलवल येथील यात्रेनिमित्त आज रंगणार कुस्त्यांची दंगल 
३५- खा. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली 'भारत भिमरथ यात्रेचे' उद्या नांदेडमध्ये आगमन 
३६- जि.प.च्या अकरा शाळेत लोकवर्गणीतून कुलरची सोय 
३७- जालयुक्त शिवार योजनेत नांदेड जिल्हा पिछाडीवर; पालक मंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला घेतले 

फैलावर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
राजू कदम, ज्ञानू शिंदे, वैभव मर्दा, संजय बाहेती, कैलाश हैबते, साहेबराव सोनकांबळे, बिरबल यादव, 

जयप्रीत सिंघ, बाळासाहेब बोकारे, दिनेश सोनवणे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो
(सत्यजित तांबे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


================================================

'आपलं घर'चा केंद्र आणि राज्य सरकारशी संबंध नाही : प्रकाश मेहता

'आपलं घर'चा केंद्र आणि राज्य सरकारशी संबंध नाही : प्रकाश मेहता
मुंबई : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘आपलं घर’ या योजनेचा केंद्र आणि राज्य सरकारशी काही संबंध नसल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे. तसंच 5 लाखांत पुण्याजवळ वन बीएचके घर देण्याचा दावा करणाऱ्या विकासकाला मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे मेहतांनी सांगितलं.

पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे फोटो वापरुन जाहिरात सुरु असलेल्या या योजनेत दोष आढळल्यास दोन दिवसात कारवाई करण्यात येणार आहे.

पुण्यातील ‘5 लाखात आपले घर’ योजनेवर सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

किरीट सोमय्यांचा योजनेवर सवाल
मंत्र्यांच्या फोटोसह ‘आपलं घर’ या योजनेची जोरदार जाहिरात सुरु झाल्यानंतर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. या योजनेद्वारे लाभार्थी इच्छुकांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यासाठी विविध प्रलोभने आणि आश्वासने दिली जात असून, या योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.
================================================

'धन्यवाद', चिमुकलीच्या पत्राला पंतप्रधानांचं उत्तर

'धन्यवाद', चिमुकलीच्या पत्राला पंतप्रधानांचं उत्तर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चाहत्यांची संख्या कोणत्याही अभिनेत्यापेक्षा कमी नाही. शिवाय त्यात लहान मुलंही मागे नाहीत. मोदींची चाहती असलेल्या सहावीत शिकणाऱ्या एका मुलीने पंतप्रधानांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी पत्र लिहिलं.

एवढंच नव्हे तर तिच्या पत्राला पंतप्रधान मोदींनी ‘धन्यवाद’ असं उत्तरही दिलं. मोदींच्या उत्तराने कानपूरमध्ये राहणाऱ्या अदितीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

“चांगली कामगिरी आणि चांगल्या योजनांबाबत मी पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे शुभेच्छा  दिल्या. पंतप्रधान माझ्या पत्राला नक्कीच उत्तर देतील, असा विश्वास मला होता. त्यांच्या उत्तराने मी खुपच खूश आहे,” असं आदितीने सांगितलं.
PM_Letter
अदितीच्या पत्राला पंतप्रधानांचं उत्तर
“मोदींकडून आलेलं हे पत्र अदितीला 11 एप्रिलला मिळालं. खुद्द पंतप्रधानांनी पत्राचं उत्तर दिल्याने अदितील अभिमान वाटत आहे. मी यापुढेही पंतप्रधान मोदींना त्यांच्या कामगिरीसाठी पत्र लिहिन,” असंही ती म्हणाली.

जेव्हा तिला विचारलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगली कामगिरी करत आहेत का? यावर ती ठामपणे म्हणाली ‘हो’. “त्यांनी देशासाठी असंच काम करत राहावं आणि सगळ्यांना सकारात्मक मार्गदर्शन करावं,” अशी अपेक्षा अदितीने व्यक्त केली आहे.

“आपली दहा वर्षांची मुलगी एवढं छान लिहू शकते यावर अदितीच्या आईचा विश्वासच बसत नव्हता. सरकारच्या कामाबाबत, योजनांबाबत अदितीला माहित असेल, याची मला कल्पनाही नव्हती,” असं अदितीची आई म्हणाली.

“आम्ही पंतप्रधान मोदींच्या उत्तराची अपेक्षा केली नव्हती. पण अदितीने छान लिहिलं होतं. अदितीने पत्रात पंतप्रधानांनी देशात सुरु केलेल्या योजना आणि तिच्या शाळेविषयी लिहिलं होतं,” असंही अदितीच्या आईने सांगितलं.
================================================

वॉटसन आणि वीझची जबरदस्त फिल्डिंग, बाऊंड्री लाईनवर अप्रतिम झेल

वॉटसन आणि वीझची जबरदस्त फिल्डिंग, बाऊंड्री लाईनवर अप्रतिम झेल
बंगळुरु : कॅचेस विन मॅचेस हे आता जुनं झालं आहे. क्रिकेट बदललं आहे. क्रिकेटमध्ये असे झेल पाहायला मिळतात जे अविश्वसनीय वाटतात.

अशीच एक शानदार कॅच आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स सामन्यात पाहायला मिळाली. 192 धावाचं मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने चांगली सुरुवात केली. एकीकडे क्विन्टन डी कॉक बाजू सांभाळत होत तर दुसरीकडे श्रेयस अय्यरही मोठे शॉट्स खेळण्याच्या प्रयत्नात होता.

जलदगती गोलंदाज श्रीनाथ अरविंदच्या एका बॉलवर श्रेयस अय्यरने मोठा शॉट लगावला. हा सिक्सर जाणार असं जवळपास सगळ्यांनाच वाटत होतं. पण मिड ऑनला असलेल्या शेन वॉटसनचे इरादे वेगळेच होते. तो बाऊंड्री लाईनच्या दिशेने धावत गेला आणि अतिशय चपळाईने बॉल पडकला.

वॉटसनने हवेत उडी मारुन अप्रतिम झेप टिपला पण यावेळी त्याचं नियंत्रण सुटलं. परंतु अशा परिस्थितीतही शेन वॉटसन संयम बाळगला. बाऊंड्री लाईनच्या बाहेर जाण्याआधी त्याने बॉल हवेत मागे उडवला.

या दरम्यान मिड ऑफवर फिल्डिंग करत असलेला डेव्हिड वीझही बाऊंड्री लाईनजवळ पोहोचला होता. शेन वॉटसनने फेकलेला बॉल वीझने डाईव्ह मारुन पकडला. त्याने बॉल तर पडकला पण घसरल्याने बाऊंड्री लाईनला स्पर्श होता होता थोडक्यात बचावला.

यानंतर फिल्ड अंपायरने थर्ड अंपायरची मदत घेतली. श्रेयस अय्यर बाद असल्याचं थर्ड अंपायरने सांगितलं आणि बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. श्रेयस अय्यरच्या रुपाने दिल्ली डेअरडेव्हिल्सला पहिला धक्का बसला होता.
================================================

वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात, एकाचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील वांद्रे-वरळी सीलिंकवर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक वाहतूक पोलिस कॉन्स्टेबलसह सह जण गंभीर जखमी आहेत.

सीलिंकवर रात्री 12 च्या सुमारास सुमो कार भरधाव वेगाने वांद्र्याहून वरळीच्या दिशेने जात होती. मात्र चालकाचं नियंत्रण सुटलं आणि पुढे असलेल्या i20 या कारला जोरदार धडक दिली. यानंतर i20 कार डिव्हायडरला धडकली.

सुमो कारमध्ये 7 जण प्रवास करत होते. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहे. i20 कारमधील 1 पुरुष आणि दोन महिला सुरक्षित आहेत.

पंचनामा करणाऱ्या पोलिसाला कारची धडक
अपघाताचा पंचनामा करण्यासाठी तिथे पोलिस आणि वाहतूक पोलिस पोहोचले. मात्र त्याचवेळी एका भरधाव कारने पोलिस कॉन्स्टेबलला धडक दिली. जखमी पोलिस कॉन्स्टेबलवर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु आहे. कारचालकाला ताब्यात घेऊन त्याला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवलं. सध्या पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.
================================================

'दारु नव्हे तर पिण्याचं पाणी प्राथमिकता', मुख्यमंत्र्यांचा पंकजा मुंडेंना टोला

'दारु नव्हे तर पिण्याचं पाणी प्राथमिकता', मुख्यमंत्र्यांचा पंकजा मुंडेंना टोला
जालना: ‘दारुच्या कारखान्यांसाठी नाही तर पिण्याच्या पाण्याची प्राथमिकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.’ ते काल जालन्यामधल्या कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्र्यांचं हे विधान म्हणजे पंकजा मुंडेंना टोलाच आहे.

शनिवारी पंकजा मुंडे यांनी उद्योगांचं आरक्षित पाणी तोडता येणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यावर टीका होताच पिण्याच्या पाण्याचीच प्राथमिकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं पाण्याच्या मुद्यावरुनच सरकारमध्ये एकमत नसल्याचं दिसतं आहे. शिवाय यावेळी लातूरला केलेल्या पाणी पुरवठ्याचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

दरम्यान, मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणी पुरवण्याच्या मुद्यावरून टीकेचे धनी झालेल्या पंकजा मुंडे काल माध्यमांवर भडकल्या. प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असा आरोप पंकजा मुंडेनी केला. पंकजा मुंडे लातूर दौऱ्यावर असून त्यांनी लातूर रेल्वे स्टेशनला भेट देऊन पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला.

काल पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून पंकजा मुंडेंचा पारा चढला. ‘मी काही बोलणार नाही, तुम्ही शुटींग बंद करा’ अशी तंबी पंकजा मुंडेंनी दिली. ऐन दुष्काळात महाराष्ट्र होरपळत असताना उद्योगांसाठी राखीव असलेलं पाणी दारूच्या कारखान्यांना देण्यात काहीच गैर नाही. असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं.
================================================

भारताची जिम्नॅस्ट दिपा करमाकरची ऐतिहासिक कामगिरी

भारताची जिम्नॅस्ट दिपा करमाकरची ऐतिहासिक कामगिरी
रिओ दी जानेरो : भारताची जिम्नॅस्ट दिपा करमाकरने इतिहास रचला आहे. 22 वर्षीय दिपा रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी दिपा करमाकर ही पहिलीच भारतीय जिम्नॅस्ट आहे.

रिओ दी जानेरो येथे ऑलिम्पिक चाचणी आणि अंतिम पात्रता स्पर्धा सुरु आहे. यामध्ये दिपा करमाकरने शानदार कामगिरी करत रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला. ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत महिला आर्टिस्टिक प्रकारात नववं स्थान पटकावत तिने 52.698 गुणांची कमाई केली.

आंतराराष्ट्रीय सामनाधिकारी दीपक काग्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 52.698 गुणांच्या कमाईसह दिपा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल, याची खात्री होती. परंतु आणखी तीन सबडिव्हिजन शिल्लक होते. मात्र दिपाने तीन देशांचा जिम्नॅस्टना आधीच पराभूत केल्याने ती ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली.

ग्लासगो इथे 2014 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दिपा करमाकरने कांस्य पदक जिंकलं होतं.
================================================

अवघ्या दोन रुपयाच्या वादातून एकाची हत्या

अवघ्या दोन रुपयाच्या वादातून एकाची हत्या
मुंबई: मुंबईच्या एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटील नगरमध्ये अवघ्या दोन रुपयांसाठी एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरजू साहनी असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

सरजू साहनी रिक्षातून बोरिवलीतून रिक्षाने पाटील नगरला उतरले. मात्र दोन रुपये सुट्टे नसल्याच्या वादातून त्यांचं रिक्षावाल्यासोबत भांडण झालं. त्यावेळी सरजू यांना दोन जणांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत सरजू साहनी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु आहे. सरजू हा वॉचमनचं काम करीत होता. तसेच त्याला दोन मुलं आहेत.
================================================

राज्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल

राज्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणुकीचा आज निकाल
मुंबई : राज्यातील  ग्रामपंचायत आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.  विविध जिल्ह्यातील 1 हजार 151 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी 75.35 टक्के मतदान झालं. तर राज्यातील सहा नवनिर्मित नगरपंचायतीसाठी सरासरी 78.15 टक्के मतदान झालं. राज्याचे निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी ही माहिती दिली.

कुडाळ, लोणंद, माढा, माळशिरस, मोहोळ आणि लोहारा या सहा नवनिर्मित नगरपंचायतींची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती.  निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल.

याशिवाय  विविध महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीही रविवारी मतदान झालं. नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 6 च्या पोटनिवडणुकीची मतमोजणी रविवारी होऊन निकालही कालच लागला. या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या यादव विजयी झाल्या.

ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी मतदानाची टक्केवारी

जिल्हाग्रामपंचायतीची संख्यामतदान
ठाणे
10172.68 %
पालघर29564.01 %
रायगड0370.86 %
सिंधुदुर्ग0174.44 %
नाशिक21878.46 %
नंदुरबार19768.29 %
अहमदनगर3269.44 %
जळगाव1876.73 %
धुळे6375.76 %
पुणे3678.53 %
सोलापूर0276.30 %
सातारा0189.76 %
औरंगाबाद0588.50 %
उस्मानाबाद0285.75 %
बीड0285.46 %
जालना0681.95 %
नांदेड6470.92 %
अमरावती0573.25 %
यवतमाळ6174.78 %
अकोला0347.55 %
वाशिम0160.93 %
बुलडाणा0477.02 %
नागपूर0773.41 %
वर्धा0667.00 %
चंद्रपूर0186.20 %
भंडारा1176.37 %
गोंदिया0184.20 %
गडचिरोली0281.19 %
एकूण1151सरासरी 75.35 %


नगरपंचायत निवडणुकीत सरासरी मतदानाची टक्केवारी

नगरपंचायतजिल्हामतदान
कुडाळसिंधुदुर्ग73.63 %
लोणंदसातारा75.93 %
माढासोलापूर81.31 %
माळशिरससोलापूर82.18 %
लोहाराउस्मानाबाद78.18 %
एकूण78.15 %
================================================

डी कॉकचं खणखणीत शतक, दिल्लीची बंगळुरुवर मात

डी कॉकचं खणखणीत शतक, दिल्लीची बंगळुरुवर मात
बंगळुरु : क्विन्टन डी कॉकच्या खणखणीत शतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोवर सात विकेटस आणि पाच चेंडू राखून सनसनाटी विजय मिळवला. दिल्लीचा हा तीन सामन्यांमधला दुसरा विजय ठरला असून, झहीर खानच्या टीमनं चार गुणांसह गुणतालिकेत तिसरं स्थान गाठलं आहे.


बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्लीने 192 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. डी कॉकने सलामीला खेळताना अवघ्या 50 चेंडूंमध्येच शतक ठोकलं. त्याने 51 चेंडूंत 15 चौकार आणि तीन षटकारांसह 108 धावांची भक्कम खेळी केली. तर करुण नायरने 42 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 54 धावा ठोकल्या आणि डी कॉकला चांगली साथ दिली.

डी कॉक आणि नायरनं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या 134 धावांच्या भागीदारीने दिल्लीचा विजय निश्चित केला. मग अखेरच्या षटकात करूण नायरनं जेपी ड्युमिनीच्या साथीनं दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी विराट कोहलीच्या 79, एबी डिव्हिलियर्सच्या 55 आणि शेन वॉटसनच्या 33 धावांच्या खेळींच्या जोरावर बंगलोरने 20 षटकांत 5 बाद 191 धावांची मजल मारली होती.
================================================

७ वर्षीय चिमुरडीचं अपहरण करुन बलात्कार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

७ वर्षीय चिमुरडीचं अपहरण करुन बलात्कार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी: भिवंडीतील राजनोली गावात एका 7 वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह घरात झोपली असताना तिचं अपहरण करण्यात आलं. पीडित मुलीच्या बहिणीला रात्री घराचा दरवाजा उघडा असल्याचं दिसलं, त्यानंतर ही बाब लक्षात आली. मुलीची शोधाशोध केल्यानंतर घरापासून काही अंतरावर पीडित मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आली.

या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण परसले असून बलत्कार करून नराधम पसार झाला आहे. दरम्यान, पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलीस आरोपीचा कसोशीने शोध घेत आहेत.
================================================

पाकिस्तानातील हिंदूंना आता भारतात संपत्ती खरेदीची संमती

पाकिस्तानातील हिंदूंना आता भारतात संपत्ती खरेदीची संमती
नवी दिल्ली : पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना म्हणजेच हिंदूना आता भारतात संपत्ती खरेदी करता येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानमधील  हिंदूंना पॅनकार्ड आणि आधारकार्डाचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या नागरिकांची संख्या तब्बल 2 लाख इतकी आहे. यामध्ये बहुतांश हिंदू आणि शीख नागरिकांचा समावेश आहे. यापैकी 400 पाकिस्तानी हिंदू सध्या भारतातील जोधपूर, जैसलमेर, जयपूर, रायपूर यासारख्या शहरांमध्ये वास्तव्याला आहेत.

व्हिसावर भारतात राहणाऱ्या या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. त्यांच्या समस्यांचा विचार करता सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.
================================================

पुण्यातील '5 लाखात आपले घर' योजनेवर सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पुण्यातील '5 लाखात आपले घर' योजनेवर सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
पुणे : पुण्यात सुरु करण्यात आलेल्या ‘5 लाखात घर’ या योजनेवर भाजपचेच खासदार किरीट सोमय्या यांनी सवाल उपस्थित केले आहेत. या खाजगी उद्योजकांनी आणलेल्या योजनांच्या जाहिरातींवर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे फोटो छापले जात आहेत, त्यामुळे ही योजना
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारनं प्रस्तावित केल्या आहेत का? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात विचारला आहे.

विशेष म्हणजे या योजनेद्वारे लाभार्थी इच्छुकांकडून पैसे उकळले जात असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. त्यासाठी विविध प्रलोभने आणि आश्वासने दिली जात असून, या योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.
================================================

वर्ष अखेर अयोध्येत राम मंदिर उभारणी सुरु : सुब्रह्मण्यम स्वामी

वर्ष अखेर अयोध्येत राम मंदिर उभारणी सुरु : सुब्रह्मण्यम स्वामी
मुंबई : या वर्षाच्या अखेरीस अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती भाजपचे जेष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिली आहे. पुढच्या रामनवमीपर्यंत भव्य राम मंदिर उभं राहिल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ओवेसी, शहाबुद्दीन यांच्यासह अनेक मुस्लिम नेत्यांशी आपण चर्चा केली असून एका बाजूला राम मंदिर आणि दुसरीकडे मशिद बांधण्याचा पर्याय सुचवल्याचंही स्वामींनी सांगितलं. यावर, ‘पैसे खाल्ल्याचा आरोप आमच्यावर होऊ नये, म्हणून कोर्टात या पर्यायाबद्दल बोला, मात्र आम्हाला काही
आक्षेप नाही’ असं मुस्लिम नेत्यांनी म्हटल्याचं सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सांगितलं.

त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही राम मंदिर बांधण्याच्या पर्यायासंदर्भात चर्चा केल्याचंही स्वामी यांनी म्हटलं आहे.
================================================

वक्तव्याचा विपर्यास, पंकजा मुंडे माध्यमांवर भडकल्या

वक्तव्याचा विपर्यास, पंकजा मुंडे माध्यमांवर भडकल्या
लातूर : मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणी पुरवण्याच्या मुद्यावरुन टीकेचे धनी झालेल्या पंकजा मुंडे आज माध्यमांवर भडकल्या. प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्त्तव्याचा विपर्यास केला असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.

पंकजा मुंडे लातूर दौऱ्यावर असून त्यांनी लातूर रेल्वे स्टेशनला भेट देऊन पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला. दरम्यान पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून पंकजा मुंडेंचा पारा चढला.

मी काही बोलणार नाही, तुम्ही शूटींग बंद करा अशी तंबी पंकजा मुंडेंनी दिली. ऐन दुष्काळात महाराष्ट्र होरपळत असताना उद्योगांसाठी राखीव असलेलं पाणी दारुच्या कारखान्यांना देण्यात काहीच गैर नाही अशा अनुषंगाचं वक्तव्य काल पंकजा मुंडेंनी केलं होतं. त्यानंतर सर्वच स्तरातून पंकजा
मुंडेंवर टीका होत आहे.


दुष्काळी मराठवाड्यात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य असताना, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अजब वक्तव्य केलं आहे. “दारु किंवा उद्योगधंद्याना देण्यात येणारं पाणी हे आरक्षित केलेलं असतं. त्यामुळे अशा उद्योगांचं पाणी बंद करणं अयोग्य होईल. त्यांना जर पिण्याचं पाणी देण्यात येत असेल तर बंद करावं”, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं
================================================

गुजरात लायन ड्वेन ब्राव्होला सामनाधिकाऱ्यांची तंबी

गुजरात लायन ड्वेन ब्राव्होला सामनाधिकाऱ्यांची तंबी
मुंबई : गुजरात लायन्सचा अष्टपैलू खेळाडू, वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होला सामनाधिकाऱ्यांनी फटकारलं. पंचांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केल्यामुळे त्याला तंबी देण्यात आली.

शनिवारी झालेल्या चुरशीच्या लढाईत गुजरात लायन्सनं मुंबई इंडियन्सचा तीन विकेट्सनी पराभव केला होता. त्या सामन्यात गुजरातच्या डावातील बाराव्या षटकात ब्राव्हो बाद झाल्याचा निर्णय पंचांनी दिला होता. त्यावर ब्राव्होनं मैदानातच नाराजी व्यक्त केली होती.

याविषयीची तक्रार पंचांनी सामनाधिकारी चिन्मय शर्मा यांच्याकडे केली होती. ब्राव्होनं आपली चूक कबूल केल्यामुळे सामधिकाऱ्यांनी त्याला तंबी देऊन सोडून दिलं.
================================================

टीम इंडियाचा स्टार रवींद्र जाडेजाचा शाही विवाहसोहळा

टीम इंडियाचा स्टार रवींद्र जाडेजाचा शाही विवाहसोहळा
टीम इंडियाचा अष्टपैलू आणि आयपीएलमधल्या गुजरात टीमचा लायन रवींद्र जाडेजा राजकोटमध्ये त्याची प्रेयसी रिवा सोळंकीशी विवाहबद्ध झाला.
राजकोट : टीम इंडियाचा अष्टपैलू आणि आयपीएलमधल्या गुजरात टीमचा लायन रवींद्र जाडेजा राजकोटमध्ये त्याची प्रेयसी रिवा सोळंकीशी विवाहबद्ध झाला. रवींद्र आणि रिवाच्या लग्नाचा थाट इतका मोठा होता की, एखाद्या शाही विवाहसोहळ्याला शोभाव्यात अशा परंपरा आणि विधी त्यांच्या लग्नानिमित्त दिसून आल्या.

दुपारीच रिवा वधूवेशात आपल्या कुटुंबियांसह कारमधून विवाहस्थळी दाखल झाली. तर जाडेजा घोडीवर बसून वाजत गाजत मंडपात दाखल झाला.
राजकोटमध्ये शनिवारी झालेल्या संगीत सोहळ्यात रवींद्र जाडेजाचं वेगळं रूप पाहायला मिळालं. जाडेजा अगदी सहजपणे तलवार चालवताना दिसला. राजकोटच्या रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजीही झाली आणि लग्नानिमित्त शनिवारी तर बँडवाल्यावर दौलतजादा झाल्याचंही पाहायला मिळालं.

रवींद्र जाडेजाला त्याच्या सासरच्या मंडळींकडून म्हणजे सोळंकी कुटुंबियांकडून 96 लाख रुपयांच्या ऑडीची मिळालेली भेट आपण आधीच पाहिली होती.

नवरदेव जाडेजा घोडीवर स्वार झाल्यावर वाजतगाजत वरात निघाली पण या वरातीत एका व्यक्तीनं हवेत गोळीबार केल्याचं समोर आलं. जाडेजापासून केवळ दहा फुटांच्या अंतरावार वऱ्हाडी मंडळींपैकी एकानं रिव्हॉल्वरनं जवळपास सहावेळा हवेत गोळीबार केला.

सुदैवानं या गोळीबारात कुणीही जखमी झालं नाही. पण गोळीबाराच्या आवाजानं काही काळ घोडा भेदरुन गेला होता. दरम्यान, वरातीत फायरिंगची माहिती मिळाल्यावर राजकोट पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
================================================

कुडाळमध्ये काँग्रेसची सरशी, मतदारांची राणेंना साथ

  • ऑनलाइन लोकमत 
    कुडाळ, दि. १८ - नव्याने तयार झालेल्या कु़डाळ नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. एकूण १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक नऊ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेने सहा, भाजपने एक आणि अपक्षाने एका जागेवर विजय मिळवला.ही नगरपंचयातीची निवडणूक असली तरी, इथे काँग्रेस नेते नारायण राणे आणि शिवसेना असा थेट सामना होता. नारायण राणे, शिवसेना आणि भाजपने इथे पूर्ण ताकत पणाला लावली होती. 
    शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक इथे निवडणुकीची जबाबदारी संभाळत होते. भाजपचे डोंबिवलीतील आमदार रविंद्र चव्हाण इथे तळ ठोकून होते. मात्र निकालावरुन त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे.  सिंधुदुर्ग जिल्हा हा नारायण राणेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण दोनवर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून इथे समीकरण बदलली. नारायण राणे यांचे सुपूत्र आणि काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांचा लोकसभेला पराभव झाला. त्यानंतर विधानसभेला स्वत: नारायण राणे यांचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभव केला होता. 
    त्यानंतर जिल्ह्यातील अन्य निवडणुकातील निकालही राणे यांच्यासाठी फारसे उत्साहवर्धक नव्हते. जिल्हयातील पुढील राजकारणात राणे यांचे वजन घटणार कि, वाढणार त्यादुष्टीने कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक महत्वाची होती. तूर्तात तरी कुडाळमध्ये नारायण राणे यांनी बाजी मारली आहे. 
================================================

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 3 महिन्यात 18 किलो वजन घटवलं

  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. १८ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 महिन्यात 18 किलो वजन घटवलं आहे. देवेंद्र फडणवीस आपलं वजन घटवण्यासाठी मेटाबॉलिक उपचार घेत आहेत. ज्यामध्ये औषधांसोबतच आपल्या शरिराला योग्य डायट आणि पथ्ये पाळावी लागत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर महिन्यात डॉक्टरांशी संपर्क साधला होता. फेब्रुवारीमध्ये उपचाराला सुरुवात केली तेव्हा मुख्यमंत्र्यांचे वजन 122 होते. मात्र फक्त 3 महिन्यात मुख्यमंत्र्यांनी 18 किलो वजन घटवलंअसून आता 104 किलोवर आणलं आहे. मुख्यमंत्र्यांचा टार्गेट  88 ते 90 किलो वजन आहे. अशाच प्रकारे जर त्यांनी मेहनत घेतली तर येत्या 3 महिन्यात आपलं लक्ष्य पुर्ण करतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
     'त्यांनी वजन घटवलं होतं, पण कामाच्या व्यापामुळे आणि अनियमित वेळापत्रकामुळे पुन्हा वजन वाढलं होतं. जेव्ही मा माझं वजन 5 ते 6 किलो घटवलं तेव्हा त्यांनाही प्रेरणा मिळाली', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितलं आहे. 
    मेटाबॉलिक आणि बॅरियाट्रीक सर्जन जयश्री तोडकर मुख्यमंत्र्यांवर उपचार करत आहेत. 'मुख्यमंत्री असल्याने त्यांना खूप प्रवास करावा लागतो ज्यामुळे वेळापत्रकात बदल होत असलतो. मात्र तरीही त्यांची हालचाल ब-यापैकी आहे. दिवसाला 10 हजारापेक्षा जास्त पावलं चालण्यासोबतच ते चपळाईने चालतात', अशी माहिती जयश्री तोडकर यांनी दिली आहे.
================================================

निवडणुकांमध्ये अजूनही गुन्हेगारी घटक महत्वाची भुमिका का बजावतात ? न्यायाधीशांचा सवाल

  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. १८ - निवडणुकांमध्ये अजूनही गुन्हेगारी घटक महत्वाची भुमिका का बजावतात ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी विचारला आहे. कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाने राजकारण गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले असतानादेखील  ही परिस्थिती का ? असा सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केला आहे. देशातील विविध क्षेत्रांतील प्रगती या विषयावर भोपाल न्यायालयीन अकादमीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना हा प्रश्न विचारण्यात आला आहे. 
    न्यायाधीस एस वाय कुरेशी यांनी निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष टी एस ठाकूर यांच्याकडे याबाबत विचारणा केली. मतदान रिंगणात गुन्हेगारी घटकांना येण्यापासून रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने काय पाऊल उचलली ? याची माहिती कुरेशी यांनी ठाकूर यांच्याकडे मागितली. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग होऊ नये तसंच सत्तेत असणा-या पक्षाला कोणताही चुकीचा फायदा मिळू नये यासाठी निवडणूक आयोगाने पुर्ण प्रयत्न केले आहेत अशी माहिती माजी अध्यक्ष टी एस ठाकूर यांनी दिली आहे.
    निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती देणा-या उमेदवारांवर कारवाई करण्यासाठी पाऊल का उचलली गेली नाहीत ?
    याबाबतही न्यायाधीशांनी विचारणा केली. प्रत्येक उमेदवाराचं प्रतिज्ञापत्र तपासून पाहण्याइतकं मनुष्यबळ निवडणूक आयोगाकडे नाही आहे. निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे असणारे उमेदवार जेव्हा अशी काही माहिती देतात तेव्हा कारवाई करण्यात येते असं ठाकूर यांनी सांगितलं आहे.
    कायद्याची बंधन असतानाही निवडणुकांमध्ये वापरण्यात येणा-या पैशांवरुनही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. तसंच मतदारांना मतदान करण्यासाठी पैसे वाटप करण्यात येत असण्यावरुन काळजी व्यक्त केली आहे. लोकशाहीसाठी हा धोका असल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं आहे.
================================================

दीपा करमरकरने इतिहास रचत केली रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत एंट्री

  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. १८ - भारतीय जिमनॅस्ट दीपा करमरकर रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारी दीपा करमरकर पहिली भारतीय जिमनॅस्ट आहे. 22 वर्षीय दीपा करमरकरने एकूण 52.698 पॉईंट्स कमावत रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत आपलं स्थान नक्की केलं आहे. 
    नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड जिमनॅस्टीक चॅम्पिअनशीपमध्ये पाचव्या स्थानावर राहिल्यामुळे दीपा करमरकरची ऑलिम्पिकमध्ये जाण्याची संधी हुकली होती. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दीपा करमरकरला अगोदर रिझर्व्हवर ठेवण्यात आलं होतं. पण गेल्याच महिन्यात तिची निवड झाल्याचं कळवण्यात आलं होतं. 2014मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकून दीपा करमरकरने अगोदरच इतिहास रचला होता. नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड जिमनॅस्टीक चॅम्पिअनशीपच्या अंतिम फेरीत दाखल होणारी ती पहिला महिला जिमनॅस्ट होती. 
================================================

किल्ल्यांच्या पायथा विकासाची कामे रखडली

  • मुंबई : राज्यातील महत्त्वाचे किल्ले-गड यांच्या पायथ्याजवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यातील चार टप्प्यांपैकी एकाच टप्प्यातील किल्ले-गडांच्या पायथ्याशी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. उर्वरित टप्प्यांतील किल्ले-गडांच्या पायथ्याशी पायाभूत सुविधांसाठी निधीच उपलब्ध न झाल्याने कामे रखडली आहेत.
    राज्य शासनाने किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन किल्ले दुरुस्ती व परिसर विकास व जतन संवर्धनाची कामे करण्याबाबतचा निर्णय घेतला. त्यानुसार किल्ल्यांच्या पायथ्याशीच सुविधा देण्यात येत असून एमटीडीसीकडून (महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ) ही कामे केली जात आहेत. त्याचे चार टप्पे आहेत. टप्पा एकमध्ये रायगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, जंजिरा, पद्मदुर्ग, टप्पा दोनमध्ये पन्हाळा, विशालगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग तर टप्पा तीनमध्ये राजमाची, लोहगड, सिंहगड, तोरणा, शिवनेरी, राजगड आणि टप्पा चारमध्ये हरिश्चंद्र, नाणेघाट व माळशेज घाटाचा समावेश आहे. या कामांची सुरुवात टप्पा तीनमधील किल्ल्यांपासून करण्यात आली. या किल्ल्यांसाठी १0 कोटींचा निधी मंजूर केला. ही कामे पूर्ण करण्यास पाच वर्षे लागली आणि ती चार महिन्यांपूर्वीच पूर्ण झाली आहेत. उर्वरित टप्प्यांसाठी शासनाकडून निधीच उपलब्ध झाला नल्यामुळे ही कामे रखडल्याचे एमटीडीसीतील सूत्रांनी सांगितले.
================================================

आयपीएल बाबतीत सरकारचे दुटप्पी धोरण

  • मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे दुष्काळी भागांतील जनतेला पिण्यासाठीही पाणी मिळत नसताना दुसरीकडे आयपीएल स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांसाठी लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी होत असूनही राज्य सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेत दुटप्पी धोरण स्वीकारावे यावर उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
    या स्पर्धेचे मे महिन्यांत होणारे महाराष्ट्रातील १३ सामने राज्याबाहेर हलविण्याचा आदेश न्यायालयाने बुधवारी दिला. ‘लोकसत्ता मूव्हमेंट’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या जनहित याचिकेवर न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने दिलेल्या २२ पानी अंतरिम आदेशाची अधिकृत प्रत आता उपलब्ध झाली आहे.
    न्यायालय म्हणते की, राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेने आम्ही व्यथित झालो आहोत. सरकारने केलेले प्रतिज्ञापत्र व प्रभारी महाअधिवक्त्यांनी केलेला युक्तिवाद यावरून स्पष्ट दिसते की, राज्य सरकार जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. आता सरकार महापालिका कायद्यातील काही सुधारणांचा आधार घेऊन महापालिकेवर जबाबदारी झटकू पाहात आहे. पण नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल याची व्यवस्था करण्याची जबाबदारी अंतिमत: राज्य सरकारवर आहे, हे विसरून चालणार नाही. पाण्याचे नियोजन कसे करावे याविषयी प्रसंगी महापालिकेलाही आदेश देण्याचे अधिकार कायद्याने राज्य सरकारला दिलेले आहेत.
================================================

वेरूळ लेणीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

  • - मुजीब देवणीकर,  औरंगाबाद
    भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेणीकडे पाहिले जाते. युनेस्कोने १९८३मध्ये अजिंठा व वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. मात्र, मागील काही वर्षांपासून केंद्रीय पुरातत्व विभागाकडून या लेण्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने जगप्रसिद्ध वारशाची दुरवस्था होत चालली आहे.
    औरंगाबाद शहरापासून अवघ्या ३० कि.मी.वरील खुलताबाद तालुक्यात वेरूळ गाव वसले आहे. सरळ रेषेत वसलेल्या एकूण ३४ लेण्यांमध्ये बौद्ध चैत्य दालने, प्रार्थना गृहे, विहार किंवा आश्रम, तसेच हिंदू आणि जैन मंदिरे यांचा समावेश आहे. पाचव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत लेणी कोरण्यात आल्या आहेत. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या या लेण्यांच्या देखभाल, दुरुस्तीकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. येथील कोरीव कामांच्या सुरक्षेसाठी कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
    दोन महिन्यांपूर्वी एका चित्रपटाचे चित्रीकरण या परिसरात करण्यात आले. कलाकार येथील विविध मूर्र्तींवर बसून शूटिंग करीत होते, हा प्रकार धक्कादायकच होता. त्यापूर्वी लेणी परिसरातील अवैध उपाहारगृहात झालेल्या सिलिंडरच्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला होता. या स्फोटामुळे लेणींना तडा गेल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता. जागतिक वारसा दिनानिमित्त वेरूळ लेणीत ‘लोकमत’ प्रतिनिधीने फेरफटका मारला असता, अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळाले. ३४ लेणींमधील अनेक मूर्र्तींचे हात-पाय गायब झाले आहेत. लेणींच्या प्रवेशद्वाराजवळील हत्तींचीही तोडफोड झाली आहे.
================================================

राहुलच्या जामिनावर आज सुनावणी

  • मुंबई : प्रत्युषा बॅनर्जीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या राहुल राज सिंगच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. रविवारीही राहुलने बांगुरनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती.
    राहुलविरोधात गुन्हा दाखल केल्यापासून तो कांदिवली येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्याने हायकोर्टात धाव घेतली . कोर्टाने १८ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे अंतरिम आदेश दिले असल्याने राहुलला अटक केलेली नाही. 
================================================

पाकिस्तानातील हिंदू भारतात करु शकतात संपत्ती खरेदी

  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. १८ - पाकिस्तानमधील हिंदूंना भारतात संपत्ती खरेदी करायची असेल तर त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील हिंदू भारतात संपत्ती खरेदी करु शकतात. महत्वाचं म्हणजे पाकिस्तानातील हिंदूंना पॅनकार्ड आणि आधारकार्डाचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
    पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात येऊन वास्तव्य करणा-यांची संख्या जवळपाल दोन लाखाहून अधिक आहे. यामध्ये हिंदू आणि शीख नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यापैकी 400 पाकिस्तानी हिंदू सध्या भारतातील जोधपूर, जैसलमेर, जयपूर, रायपूर यासारख्या शहरांमध्ये वास्तव्याला आहेत. व्हिसावर भारतात राहणाऱ्या या लोकांना अनेक सुविधा मिळत नाहीत ज्यामुळे प्रत्येक दिवशी समस्यांना सामोरे जावं लागत आहे. त्यांच्या समस्यांचा विचार करता सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.
================================================

काँग्रेसने केली आरएसएसची तुलना मुस्लिम लीगशी

  • ऑनलाइन लोकमत - 
    लखनऊ, दि. १८ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) जातीय द्वेष पसरवत असून फुटीरतावादी राजकारण करत असल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेत्या मोहसीना किडवाई यांनी केला आहे. मोहसीना किडवाई यांनी आरएसएसची तुलना मोहम्मद अली जिन्ना यांच्या मुस्लिम लीगशी केली आहे. 'मोहम्मद अली जिन्ना यांच्या मुस्लिम लीगमुळे 1947मध्ये भारताची फाळणी झाली, तर आरएसएस जातीय द्वेषाच्या आधारे देशाची फाळणी करत आहे', असं  मोहसीना किडवाई यांनी म्हटलं आहे. भीम ज्योती यात्रा कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बोलताना मोहसीना किडवाई यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
    या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी भीम ज्योती यात्रा सोनिया गांधी आणि राहुल गांधींमुळेच यशस्वी झाल्याचं म्हटलं आहे. 'बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी घेतला. काँग्रेस कार्यालयातून ही बातमी बाहेर पडल्यावर भाजपला जाग आली', असल्याचं म्हणत सुशीलकुमार शिंदेंनी भाजपला टोमणा मारला आहे. 
================================================
भारताची भूमिका कायम "सुंदर स्त्री'ची: संतप्त चीन
बीजिंग - अमेरिकेबरोबरील संवेदनशील "लॉजिस्टिक्‍स एक्‍सचेंज‘ करार करण्याच्या भारताच्या निर्णयावर चीनने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

भारत व अमेरिकेमधील अविश्‍वासाच्या वातावरणामुळेच हा करार अद्यापी रेंगाळला असल्याचा दावा ग्लोबल टाईम्स या चीनमधील सरकारी वृत्तपत्रामधील या लेखामध्ये करण्यात आला आहे. याशिवाय "अमेरिका व चीन या दोन्ही देशांसह सर्वांनीच आपली मनधरणी करावी, अशी भारताची इच्छा असल्याचा‘ आरोप या लेखामध्ये करण्यात आला आहे. 

""अमेरिका व चीन या जगातील दोन महासत्तांसहितच इतरही पुरुष मनधरणी करत असलेल्या सर्वांत सुंदर स्त्रीची भूमिका आपण घ्यावी, हे भारताचे जुने धोरण आहे. शीतयुद्ध काळातही स्पर्धा करणाऱ्या दोन गटांमध्ये मोठ्या राजनैतिक प्रयत्नांनंतर भारताने वेगळे स्थान मिळविल्याच्या स्मृती अजूनही आहेत. मात्र आता भारताने लक्ष्मणरेषा ओलांडून चीनला त्रास न देऊ नये. या करारामुळे भारताच्या इतर देशांबरोबरील संबंधांवर होणाऱ्या परिणामाचा भारताने पुनर्विचार करणे आवश्‍यक आहे,‘‘ असा थेट इशारा चीनकडून देण्यात आला आहे. 

भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पहिल्यावाहिल्या चीन दौऱ्यास आजपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनने वुअक्त केलेली प्रतिक्रिया सूचक मानली जात आहे. 
================================================
अमेरिकेच्या लाभासाठी कराराचा घाट
‘लॉजिस्टिक्‍स सपोर्ट ॲग्रिमेंट’ला काँग्रेसच्या राजवटीत कार्यवाही झाली नव्हती. या कराराला सेनादले आणि परराष्ट्र मंत्रालयाचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. त्यातच सरकारने या कराराला तत्त्वतः मान्यता दिल्याने आगामी संसद अधिवेशनात याचे जोरदार पडसाद उमटणार आहेत. 

भारत व अमेरिका यांच्यात करार होणार आहे. ‘लॉजिस्टिक्‍स सपोर्ट ॲग्रिमेंट’ किंवा ताज्या संयुक्त निवेदनात उल्लेख केल्याप्रमाणे ‘लॉजिस्टिक्‍स एक्‍स्चेंज मेमोरॅंडम ऑफ ॲग्रिमेंट’ (एलईएमओए) करार दोन्ही देशांत करण्यास अमेरिकेचे संरक्षणमंत्री ॲश्‍टन कार्टर आणि संरक्षणमंत्री मोहर पर्रीकर यांच्या भेटीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. कार्टर- पर्रीकर भेटीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात याचा एका वाक्‍यात उल्लेख आहे. या कराराचा प्रस्ताव नवा नाही. हा प्रस्ताव २००४ मध्ये प्रथम अमेरिकेतर्फे भारताला करण्यात आला होता. त्या वेळी त्याचे स्वरूप थोडेसे वेगळे होते, तरीही डाव्या पक्षांच्या मदतीने चालणाऱ्या यूपीए-१ सरकारने आणि त्यानंतरच्या यूपीए-२ सरकारने त्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही केलेली नव्हती. या स्वरूपाच्या कराराला मुख्यतः भारतीय सेनादलांचा आणि परराष्ट्र मंत्रालयाचा देखील विरोध असल्याचे सांगितले जाते. खुद्द यूपीए सरकार या कराराला अनुकूल होते; परंतु त्यास असलेला विरोध लक्षात घेऊन त्या सरकारने प्रत्यक्षात करार करण्याच्या दिशेने पावले टाकली नाहीत. वर्तमान राजवटीने मात्र या कराराला तत्त्वतः मान्यता असल्याचे जाहीर करून टाकले आहे. त्याला साहजिकच विरोध सुरू झाला आहे आणि आगामी संसदीय अधिवेशनात त्यावरून गदारोळ उडण्याची चिन्हे आहेत. 
================================================
आमच्यासारख्यांनी जगायचं, शिकायचं कसं

उस्मानाबाद - दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे वाटप करताना डॉ. माया पाटील. या वेळी उपस्थित विश्‍वनाथ तोडकर, रामभाऊ सोनटक्के, डॉ. अभय शहापूरकर, डॉ. स्मिता शहापूरकर, महेश पोतदार, मदत स्वीकारताना पूनम पवार व तिचे पालक. (छायाचित्र - कालिदास म्हेत्रे, उस्मानाबाद)

विद्यार्थिनीच्या व्यथेने सभागृह हेलावले, डॉ. माया पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना मदत
उस्मानाबाद - आई-वडील मजुरी करतात, कुटुंबांचा उदरनिर्वाह भागवितानाच शिक्षणासाठीही मोठा खर्च करावा लागत आहे. हा खर्च कोठून करायचा, खुल्या प्रवर्गातील मुला-मुलींना तर शिक्षणाचा खर्च परवडणारा नाही. संस्थाचालक फीसाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे आमच्यासारख्यांनी जगायचं आणि शिकायचं तरी कसं, अशी कुटुंबांची व्यथा एका विद्यार्थिनीने मांडताच संपूर्ण सभागृह हेलावून गेले. निमित्त होते दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या मुला-मुलींना आर्थिक मदतीच्या वाटपाचे.
================================================
कर्णफुले, झुमके मोडून केली पाण्याची व्यवस्था

तोरंबा-हराळी (ता. लोहारा) - भालेराव दांपत्याने सुरू केलेला मोफत पाणीपुरवठा. 

पुण्यात खानावळ चालवणाऱ्या भालेराव दांपत्याची गावाशी नाळ कायम
उस्मानाबाद - खानावळ चालविणाऱ्या एका दांपत्याने सोन्याची कर्णफुले व झुमके मोडून तोरंबा-हराळी (ता. लोहारा) येथील गावकऱ्यांना मोफत पाण्याची व्यवस्था केली आहे. या दानशूर दांपत्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 

लोहारा तालुक्‍यातील इंदुमती देविदास भालेराव हे दांपत्य ३० वर्षांपूर्वी पुणे येथे स्थलांतरित झाले. परंतु त्यांची गावाकडील नाळ तुटलेली नाही. पुण्यातील लोहगाव परिसरात भालेराव दांपत्य खानावळीचा व्यवसाय करीत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याचे त्यांना माहिती होते. गावाकडे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई असल्याची माहिती त्यांना मिळाली. गेल्या वर्षीही अशीच स्थिती होती. त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षीच एक कूपनलिका खोदली होती. त्यातून गावातील नागरिकांना मोफत पाणी दिले जात होते. यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त टंचाई जाणवत आहे. विशेष म्हणजे गावातील काही नागरीकांकडे कूपनलिका असतानाही ते इतरांना पाणी देत नाहीत. काही नागरिक पाणी विकत देत आहेत. त्यामुळे भालेराव दांपत्याने गावातील नागरिकांची पाण्याची चांगली व्यवस्था करण्याचे ठरवले.
================================================
इक्वेडोर: भूकंपामुळे मृतांची संख्या 246 वर
क्विटो - इक्वेडोर या देशात झालेल्या शक्तिशाली भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या तब्बल 246 वर पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

7.8 रिश्‍टर स्केल इतकी तीव्रता असलेल्या या भूकंपाचा सर्वाधिक फटका देशातील मनाबी या किनारपट्टीवरील प्रांतास बसला आहे. भूकंपाच्या तीव्र धक्‍क्‍यामुळे मनाबीमध्ये किमान 200 जण मृत्युमुखी पडले आहेत. याशिवाय देशच्या इतर भागांमध्येही या भूकंपामुळे मोठी जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये अडीच हजारापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.

भूकंपामुळे अनेक शहरांतील इमारतींची नासधूस झाली. भूकंपाच्या हादऱ्यामुळे लोक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाले. हा भूकंप स्थानिक वेळेनुसार शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास मुईस्ने शहराजवळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

राजधानी क्विटो येथे राहणाऱ्या 60 वर्षीय मारिया टोरस म्हणाल्या, "" हे देवा, मी आपल्या आयुष्यात आतापर्यंत जितके भूकंपाचे धक्के सहन केले, त्यात सर्वांत शक्तिशाली भूकंप आजचा होता. या भूकंपाचे हादरे बराच वेळ बसत होते आणि त्यामुळे मला चक्करही आली. मला चालताही येत नव्हते. मला घराबाहेर पळायचे होते, परंतु मला तसे करता आले नाही.‘‘ 
================================================
ओडिशात भीषण अपघात; 30 मृत्युमुखी
भुवनेश्‍वर - ओडिशा राज्यामधील देवगड येथील डोंगराळ प्रदेशात बस दरीत कोसळून झालेल्या एका अपघातामध्ये किमान 30 नागरिक मृत्युमुखी पडले.

ओडिशाची राजधानी असलेल्या भुवनेश्‍वरपासून हे ठिकाण सुमारे 350 किमी अंतरावर आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व नागरिक हे बारगड जिल्ह्यामधील भारती गणनाट्य या स्थानिक नाटक मंडळीमधील कलावंत होते. मृतांमध्ये काही महिला व एका लहान मुलाचाही समावेश आहे. संबलपूर येथे जात असलेल्या या बसमधून एकूण 38 कलावंत व इतर कर्मचारी प्रवास करत होते. 

येथील डोंगराळ भागामधील एका तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस संरक्षक कठडा तोडून थेट दरीत कोसळली. दरम्यान, राज्यामधील आपत्ती व्यवस्थापन पथक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने मदतकार्य सुरु केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र पहाडी भाग; आणि अंधार पडल्याने मदतकार्यात अडचणी आल्याचे सूत्रांनी सांगितले. या अपघातामध्ये अन्य आठ जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांमधील सात जणांची प्रकृती गंभीर आहे.
================================================
"दुष्काळी' समित्यांना वाटाण्याच्या अक्षता
मुंबई - सततच्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी गाव-तालुका-जिल्हा स्तरावर दुष्काळ निवारण समित्यांना प्रशासनानेच वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. महसूल विभागाने गेल्या 4 जानेवारी रोजी आदेश काढूनही आतापर्यंत या समित्या दुष्काळी जिल्ह्यात अस्तित्वातच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. 

दुष्काळाचा मुकाबला करताना पाण्याचे नियोजन, भूगर्भातील पातळीची तपासणी, पीकपद्धतीचे नियोजन, पीक नुकसानीच्या नोंदी, शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा, यासाठी बॅंक खाती उघडण्याची मोहीम, रोहयोची कामे, जनावरांचे सर्वेक्षण आदी महत्त्वपूर्ण कामांचे आढावे व शिफारशी करण्यासाठी सरकारने दुष्काळ निवारण समित्यांची घोषणा केली होती. त्यासोबत चारा छावण्या, जमीन महसुलाची सूट, सहकारी कर्जाचे रूपांतरण, परीक्षा शुल्क माफी, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती व सावकारी कर्जाची स्थिती याबाबतचा आढावा घेऊन या समित्यांनी दुष्काळी उपाययोजनांवर करडी नजर ठेवणे अभिप्रेत होते. पण चार महिन्यांनंतरही या समित्या गावोगावी अस्तित्वातच आल्या नसल्याने तालुका व जिल्हास्तरावर प्रशासकीय समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र आहे.
संपूर्ण प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह सामान्य शेतकरी व अशासकीय सदस्यांचा समावेश करून या समित्यांची स्थापना करण्याचे आदेश सरकारने दिले होते. या समित्यांनी नोंदवले निष्कर्ष व सूचना, तक्रारींचा अहवाल विभागीय आयुक्तांनी जमा करून सरकारला सादर करणे बंधनकारक होते. मात्र महसूल प्रशासनाच्या खांद्यावरच दुष्काळ पेलण्याची जबाबदारी असल्याच्या सरकारी मानसिकतेमुळे या समित्या कागदावरच राहिल्या आहेत.

... अशी आहे रचना ... 
ग्राम समिती सरपंच - अध्यक्ष
ग्रामसेवक - सदस्य
प्रगतिशील शेतकरी - सदस्य
सहकारी पतपुरवठा संस्था अध्यक्ष - सदस्य
अल्पभूधारक शेकरी - दोन सदस्य
कृषिसहायक - सदस्य
तलाठी - सदस्य सचिव

तालुका समिती 
अशासकीय सदस्य (सरकार निवडेल तो) - अध्यक्ष
विस्तार अधिकारी - सदस्य
तहसीलदार - सदस्य
नायब तहसीलदार - सदस्य
मंडल अधिकारी - सदस्य
तालुका कृषी अधिकारी, प्रगतिशील शेतकरी, दोन अल्पभूधारक शेतकरी - सदस्य

जिल्हा समिती अध्यक्ष - पालकमंत्री/ विधानसभा व विधान परिषद सदस्य/ राज्यसभा व लोकसभा सदस्य (सरकार निवडेल ते)
सदस्य - जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी (नरेगा), मुख्य अभियंता (महावितरण), कार्यकारी अभियंता (जीवन प्राधिकरण), अधीक्षक अभियंता (जलसंपदा), जिल्हा कृषिसहायक, पशुसंर्धन अधिकारी, प्रगतिशील-अल्पभूधारक शेतकरी (एक), अशासकीय संस्थांचे तीन प्रतिनिधी.
ना आढावा, ना अंमलबजावणी 
- जानेवारीत आदेश; पण एकही समिती नाही
- गावपातळीवर तर प्रशासकीय अनागोंदीच
- पालक सचिव फिरकतही नाहीत
- ना आढावा, ना अंमलबजावणीवर नियंत्रण
================================================
चारशेवर किल्ल्यांची सरकारदफ्तरी नोंदच नाही
मुंबई - राज्यात विविध राजवटींमध्ये निर्मिलेल्या पाचशेहून अधिक किल्ल्यांपैकी केवळ 96 किल्लेच राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. उर्वरित चारशेहून अधिक किल्ल्यांची सरकारदफ्तरी नोंदच नाही. त्यामुळे त्यांचा विकास रखडला आहे. आता लवकरच अधिकृतरीत्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचे सर्वेक्षण होणार असून, पहिल्या टप्प्यात 100 किल्ल्यांची नोंद सरकारदफ्तरी होणार आहे. 

सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या वैविध्यपूर्ण महाराष्ट्राची गड-किल्ल्यांमुळे जगात ओळख आहे. राज्यातील 47 किल्ले केंद्र सरकारच्या पुरातत्त्व, तर 49 किल्ले राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहेत. इतर चारशेहून अधिक किल्ले-दुर्ग यांची अधिकृत नोंदच सरकारदफ्तरी नसल्याने त्यांचा विकास आत्तापर्यंत झालेला नव्हता. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी नियुक्त दुर्गसंवर्धन समितीने ही बाब सरकारच्या निदर्शनास आणली. त्यानंतर 100 किल्ल्यांची निवड करून ते सरकारच्या अखत्यारीत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विभागानुसार किल्ल्यांसंदर्भात नोटिफिकेशन काढल्याचे सांगण्यात आले. हे किल्ले सरकारच्या अखत्यारीत आल्यानंतरच विकासासाठी निधीची तरतूद करून विकास होईल, असे समितीचे मार्गदर्शक पांडुरंग बलकवडे यांनी सांगितले. ब्रिटिश काळापासून आजपर्यंत महाराष्ट्रात नेमके किती गड-किल्ले-दुर्ग आहेत, यांची नोंद कोठेच नाही. त्यामुळे प्रथमच या किल्ल्यांचे सर्वेक्षण होणार असून, त्यांचा गॅझेटमध्ये समावेश केला जाणार आहे. 
================================================


No comments: