Thursday, 7 April 2016

नमस्कार लाईव्ह ०७-०४-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- लाहोर; हाफिज सईदची न्यायासाठी लाहोरमध्ये शरिया कोर्टाची स्थापना 
२- भारतासोबतची शांतता प्रक्रिया स्थगित- पाकिस्तान 
३- वॉशिंग्टन; अमेरिकेतील व्हिसा गैरव्यवहारात 10 भारतीय!
४- इस्लामाबाद; शस्त्रास्त्रे नियंत्रणाबाबत भारताशी चर्चेस तयार-पाक 
५- दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही- स. न्यायालय 
६- ढाका; इस्लामी मूलतत्त्वादाच्या टीकाकाराची क्रूर हत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- आयआयटीतून इंजिनिअर होणं महागलं, 90 हजाराहून फी थेट 2 लाखांवर 
७- मल्ल्याचा 4 हजार कोटींचा प्रस्ताव बँकांनी फेटाळला 
८- पश्चिम बंगाल; उड्डाणपूल कोसळणे ही 'ऍक्‍ट ऑफ फ्रॉड'- मोदी 
९- पनामा प्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी- काँग्रेस 
१०- आयपीएलचा मुंबईतील पहिला सामना तर होणार... 
११- अब्रुनुकसानीप्रकरणी केजरीवालांना जामीन 
१२- नीता अंबानी आशियातील सर्वात प्रभावी उद्योजिका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१३- 'भारत माता की जय'ने दुष्काळ हटणार नाही : सामना 
१४- छगन भुजबळांचं जेलमधून मुख्यमंत्र्यांना पत्र 
१५- मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याची कागदपत्रं गहाळ 
१६- इथे दमदाटी काय करता, सदनाबाहेर या - सामजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे 
१७- लठ्ठपणावर सरकारचा अजब उपाय, जंक फूडवर कर लावण्याच्या तयारीत 
१८- 29000 कोटींचा कोळसा घोटाळा, अदानी समूहाची चौकशी 
१९- आरोग्य विभागाने नेमली चौकशी समिती 
२०- मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा! 
२१- सहारनपुर; शनीच्या छायेपासून महिलांनी दूर राहावे-शंकराचार्य 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- मुंबई; तू न रुकेगी कभी, तू न झुकेगी कभी... 51व्या वर्षी कॉलेज अॅडमिशन 
२३- हैदराबाद; तेलंगणात उष्माघाताचा कहर, 66 जणांचा मृत्यू 
२४- डोंबिवली; आमदार लिहलेल्या गाडीनं महिलेला उडवलं, चालक पोलिसांच्या ताब्यात 
२५- नागपूर; एड्स जनजागृतीसाठी नागपूर मनपाकडून हनुमान चालिसा पठण 
२६- पुण्यात 'इसिस'च्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणाची सुटका 
२७- श्रीनगर; तीन राज्यांत विद्यार्थ्यांमुळे तणावाचे प्रसंग 
२८- सोनई; शनि चौथऱ्यावर जाऊन अभिषेक करणारच! 
२९- हैदराबाद; मुलगी ऐवजी मुलगा झाल्याने केली हत्या 
३०- गडचिरोली: सहा जहाल माओवाद्यांची शरणागती 
३१- मुखेड मध्ये माजी न्यायमूर्ती बि.जी.कोळसे पाटील यांचे शनिवारी व्याख्यान  
३२- मुखेड; राजुदादा गंदपवाड मित्रमंडळ तर्फे पाणीपोईचे उद्घाटन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३३- आयपीएलच्या मुंबईतल्या सामन्याचा मार्ग मोकळा 
३४- बिग बींबद्दलच्या 'त्या' ट्वीटनंतर फ्लिंटॉफचं स्पष्टीकरण 
३५- विराट-अनुष्का वांद्र्यात दिसले, रेस्टॉरंटमध्ये डिनरही घेतलं 
३६- IPL : नवे आहेत, पण छावे आहेत 
३७- हो, आम्ही लग्न करतोय - बिपाशा बासू 
३८- IPL च्या वानखेडेवरील मॅचला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही
(किशोरी ठाकूर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


===============================================

आयपीएलच्या मुंबईतल्या सामन्याचा मार्ग मोकळा

आयपीएलच्या मुंबईतल्या सामन्याचा मार्ग मोकळा
मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरु होणाऱ्या आयपीएलवरील गंडांतर तूर्तास दूर झालं आहे. हायकोर्टाकडून आयपीएल सामन्यांवर बंदी घातली गेली नाही. त्यामुळे 9 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर सामना होणार आहे.
दरम्यान टॅंकरच्या पाण्याच्या स्रोताची चौकशी करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. बारा तारखेला चौकशी अहवाल सादर करण्यास हायकोर्टाने सांगितलं आहे.ऐन दुष्काळात पाण्याची नासाडी टाळण्यासाठी आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवावेत अशी मागणी लोकसत्ता सामाजिक संस्थेनं कोर्टात केली होती. त्यावर आज राज्य सरकारला बाजू मांडण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. नागपूर, मुंबई आणि पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर होणाऱ्या 20 सामन्यांसाठी तब्बल 66 लाख लीटर पाणी वापरलं जाणार आहे. मात्र मराठवाड्यातील 8 जिल्हे दुष्काळानं होरपळत असताना ही चैन परवडण्यासारखी नाही, असं कोर्टानं म्हटलं होतं.
===============================================

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याची कागदपत्रं गहाळ

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याची कागदपत्रं गहाळ
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य साक्षीदारांच्या जबाबांची फाईलच गहाळ झाली आहे. त्यामुळे हा खटला कमकुवत होण्याची शक्यता आहे. इतक्या महत्त्वपूर्ण खटल्याची फाईल गहाळ होतेच कशी असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटातील महत्वाच्या साक्षीदारांची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेली सात जबाबांची फाईल एनआयएच्या विशेष कोर्टातून गहाळ झाली. मुंबई मिरर या दैनिकानं हे वृत्त प्रकाशित केलं आहे. महत्वाच्या फाईल गहाळ झाल्यानं मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला कमकुवत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

29 सप्टेंबर 2008 साली मालेगावमध्ये दोन स्फोट झाले. यात सात जणांचा मृत्यू झाला तर 80 जण जखमी झाले. याप्रकरणी एटीएसने अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेच्या साध्वी प्रज्ञा सिंग आणि लष्कराचा अधिकारी लेफ्टनंट श्रीकांत पुरोहित यांना अटक केली. त्यानंतर प्रकरण एनआयएकडे गेलं.

मालेगाव स्फोटातील खटला कमजोर व्हावा. यासाठी एनआयएचे अधिकारी आपल्यावर दबाव टाकत असल्याचा धक्कादायक आरोप खटल्याच्या विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये केला होता. त्यानंतर त्यांनी हा खटला सोडून दिला. त्यावेळी ही सगळी महत्वाची कागदपत्रं एनआयए अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांच्याकडे सुपूर्द केल्याचा दावा रोहिणी सॅलियन यांनी केला आहे.
===============================================

छगन भुजबळांचं जेलमधून मुख्यमंत्र्यांना पत्र

छगन भुजबळांचं जेलमधून मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तुरुंगातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. नाशिकमधील मांजरपाडा – जिखा वळण योजनेचं रखडलेलं काम तातडीनं सुरु करण्यात यावं अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

या धरणाचं 70 टक्के काम पूर्ण झालं आहे. मात्र सुधारीत प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने ऑक्टोबर 2014 पासून हे काम बंद पडलं आहे. ते लवकरात – लवकर पूर्ण व्हावं अशी मागणी करणारं पत्र छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे.

पैशांचा गैरव्यवहार आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सध्या भुजबळांचा मुक्काम मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात आहे. तिथूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहलं आहे.
Chhagan Bhujbals Letter-compressed
भुजबळांच्या पत्रातील मुद्दे
Chhagan Bhujbals Letter 1-compressed
मांजरपाडा वळण योजनेद्वारे नाशिक जिल्ह्यातील गुजरातच्या हद्दीवरील पाणलोट क्षेत्रातील पश्चिम वहिनी नद्यांचे गुजरातकडे आणि अरबी समुद्रात वाहून जाणारे 845 दशलक्षघनफूट (MLD) पाणी अडवून हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहे.
– यातील 100 MLD पाणी स्थानिक वापरासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे
– सध्या 8.96 किमी लांबीच्या बोगद्यापैकी 90 टक्के आणि 3.20 किमी लांबीच्या उघड्या चराचे काम पूर्ण झाले आहे
-तर धरणाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे
– पण सिंचन विषयक चौकशी समितीच्या अहवालानुसार राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून तपासणी करण्याच्या यादीत या प्रकल्पाचा समावेश असल्यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही आणि ऑक्टोबर 2014 पासून काम बंद पडले आहे.
– मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना आश्वासन दिले होते
– या प्रकल्पासाठी वेलमध्ये ठिय्या आंदोलन केले होते.
– याचा पाठपुरवठा करण्यासाठी तुरूंगातून पत्र लिहिलं आहे
===============================================

इथे दमदाटी काय करता, सदनाबाहेर या - सामजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे

'इथे दमदाटी काय करता, सदनाबाहेर या '
मुंबई विधान परिषदेतील प्रश्नोत्तराच्या पहिल्याच प्रश्नावर सामजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली.

दिलीप कांबळेंच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही तेव्हा ” इथे दमदाटी काय करता, सदनाबाहेर या ” अशा शब्दात कांबळेंनी विरोधकांवर हल्ला चढवला.

कांबळेंच्या या भाषेनं विरोधक चांगलेच संतप्त झाले आणि कांबळेंच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर झालेल्या गोंधळानं आधी 15 मिनिटं आणि नंतर पुन्हा 15 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आलं.

मंत्र्यांनी माफी मागावी

दरम्यान, मंत्री दिलीप कांबळे यांनी माफी मागितल्याशिवाय सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.

दरम्यान, सभापती रामराजे निंबाळकर यांनीही ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचं म्हटलं.

दुसरीकडे फक्त मंत्र्यांनी माफी मागून भागणार नाही तर सभागृह नेत्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस आमदार शिवाजीराव देशमुख यांनी केली.
===============================================

बिग बींबद्दलच्या 'त्या' ट्वीटनंतर फ्लिंटॉफचं स्पष्टीकरण

बिग बींबद्दलच्या 'त्या' ट्वीटनंतर फ्लिंटॉफचं स्पष्टीकरण
मुंबई : ट्विटरवरील एका बनावट कमेंटमुळे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंन्टॉफ याला अमिताभ बच्चन यांच्याविषयी ट्वीट करुन स्पष्टीकरण द्यावं लागलं. ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये, वेस्ट इंडीजकडून पराभूत झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी नर्मविनोदातून इंग्लंडला परतीचं तिकीट बुक करण्याचा सल्ला दिला होता.

पण त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अँड्र्यू फ्लिंटॉफच्या कथित ट्वीटमुळे खळबळ माजली. त्या ट्वीटमध्ये ‘आमच्या तिकीटापेक्षा तुम्हालाच पनामाची तिकीटं बुक करावी लागतील’ असा टोला लगावण्यात आला होता.

पण काही तासातच अँड्र्यू फ्लिंटॉफने ट्वीट केलं. तो कथित ट्वीट माझा नसून बनावट असल्याचं स्पष्टीकरण त्याने दिलं आणि या प्रकरणावर पडदा टाकला.
===============================================

लठ्ठपणावर सरकारचा अजब उपाय, जंक फूडवर कर लावण्याच्या तयारीत

लठ्ठपणावर सरकारचा अजब उपाय, जंक फूडवर कर लावण्याच्या तयारीत
मुंबई : बर्गर, फ्रँकी, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज आणि त्याबरोबर कोल्ड ड्रिंकचा सिप, नुसती कल्पना जरी केली तरी तोंडाला पानी सुटतं. मात्र भविष्यात जंक फूड प्रेमींना आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जरा जास्तच खिसा खाली करावा लागू शकतो. कारण जंक फूड आणि साखरयुक्त शीतपेयांवर अतिरिक्त कर लावण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

लोकांनी जंक फूड खाल्लं तर सरकारच्या पोटात का दुखतंय?, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.मात्र सरकारच्या डोळ्यात तुमचं खाणं नव्हे, तर जंक फूड आणि कोल्ड ड्रिंकमुळे फोफावणारा मधुमेह आणि लठ्ठपणा खुपत आहे. कोट्यवधी भारतीयांचा मधुमेह आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी सरकार अशा पदार्थांवर जास्तीचा कर लावण्याचा विचार करतं आहे. पण सरकारने जर असा धाडसी निर्णय घेतला तर खरंच मधुमेह आणि लठ्ठपणाला आळा बसेल का, यावर आता चमचमीत चर्चा रंगू लागली आहे.

मधुमेह आणि लठ्ठपणासाठी फक्त जंक फूड आणि कोल्ड्रिंकला जबाबदार धरणं चुकीचं असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. भारतीयांमध्ये, विशेषतः शहरांमध्ये जंक फूड आणि कोल्ड ड्रिंकच्या सेवनाचं प्रमाण चांगलंच वाढलं आहे.

एका संशोधनानुसार 1998 मध्ये प्रति माणसी साखरयुक्त शीतपेयांचं प्रमाण दोन लिटर इतक होतं. 2014 मध्ये हे प्रमाण पाचपेक्षा अधिक पटीनं वाढून तब्बल 11 लिटर इतकं झालं आहे. तसंच तरुणाईमध्ये पिझ्झा, फ्रँकी, हॉट डॉग आणि बर्गरची क्रेझ देखील प्रचंड वाढली आहे.

सरकार दरवर्षी सिगारेट आणि दारुवरचा कर वाढवतं. मात्र दारु आणि तंबाखुजन्य पदार्थांच्या विक्रीत घट होण्याऐवजी खप वाढतच चालला आहे. त्यामुळे जंक फूड आणि शीतपेयांवरचा कर वाढवून लोकांचा मधुमेह आणि लठ्ठपणा कसा कमी होईल, याचा विचार सरकारला करायला हवा.
===============================================

आयआयटीतून इंजिनिअर होणं महागलं, 90 हजाराहून फी थेट 2 लाखांवर

आयआयटीतून इंजिनिअर होणं महागलं, 90 हजाराहून फी थेट 2 लाखांवर
नवी दिल्ली: आयआयटीमधून इंजिनिअर होणं आता बरंच महागणार आहे. त्यासाठी आता लाखो रुपये मोजावे लागणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आयआयटीची ट्यूशन फी 90 हजारांहून थेट 2 लाख करण्यात आली आहे. म्हणजेच चार वर्षासाठी आता थेट 8 लाख रुपये मोजावे लागणार आहे.

90 हजार याप्रमाणे आधी आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चार वर्षासाठी 3 लाख 60 हजार मोजावे लागत होते. मात्र आता अधिक 4 लाख 40 हजार मोजावे लागणार आहेत. तसेच यामध्ये इतर फीचा समावेश करण्यात आलेला नाही.

मात्र, एससी, एसटी आणि दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी (ज्यांचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा कमी आहे) खुशखबर आहे. या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्यात आली आहे. तसंच दिव्यांग विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात आली आहे.

याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी आहे त्यांची फी दोन तृतीयांश माफ करण्यात आली आहे. तसेच एक तृतीयांश फीसाठी सरकारनं कर्जाचीही तरतूद केली आहे.

आयआयटी काउंसिलनं फी वाढीचा हा निर्णय घेतला असून या कांउसिलच्या प्रमुख केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या आहेत.

काय आहे आयआयटी कॉलेज?

देशातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी असणारी शासकीय अग्रगणी संस्था आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आयआयटीमधून शिक्षण घेण्याचं स्वप्न असतं. दिल्ली, मुंबई, खडगपूर यासह देशात आयआयटी एकूण 17 ठिकाणी आहे.

देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील आयआयटीचे विद्यार्थी होते.

===============================================

तू न रुकेगी कभी, तू न झुकेगी कभी... 51व्या वर्षी कॉलेज अॅडमिशन !

तू न रुकेगी कभी, तू न झुकेगी कभी... 51व्या वर्षी कॉलेज अॅडमिशन !
Image courtesy-Humans of Bombay/Facebook
मुंबई : शिक्षण आणि ज्ञान संपादनाला वयाचं बंधन नसतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. खंड पडलेल्या शिक्षणाला वयाच्या 51 व्या वर्षी पुन्हा सुरुवात करून, मुंबईच्या एका महिलेने हे दाखवून दिलं आहे.  या महिलेने तब्बल 30 वर्षानंतर पुन्हा एकदा कॉलेज जॉईन केलं आहे.

30 वर्षानंतर पुन्हा कॉलेज
तब्बल 30 वर्षांचा खंड पडूनही संबंधित महिलेने, 51 व्या वर्षी पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला. यंदा त्यांचं शेवटचं वर्ष असून, त्या ‘बी कॉम’ पदवीधर होणार आहेत.

‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवर या महिलेच्या कर्तृत्त्वावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. मात्र त्यांचं नाव देण्यात आलेलं नाही.

या ‘सरस्वती’ने आपल्या शैक्षणिक प्रवासाबाबत ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’शी संवाद साधला.
===============================================

मल्ल्याचा 4 हजार कोटींचा प्रस्ताव बँकांनी फेटाळला

मल्ल्याचा 4 हजार कोटींचा प्रस्ताव बँकांनी फेटाळला
नवी दिल्लीउद्योगपती विजय मल्ल्याने दिलेला प्रस्ताव बँकांनी फेटाळला आहे.  30 सप्टेंबरपर्यंत 17 बँकांना 4 हजार कोटी देण्याचा प्रस्ताव मल्ल्याकडून बँकांपुढे ठेवण्यात आला होता. मात्र तो बँकांनी फेटाळला आहे.

30 मार्चला मल्याच्या वकिलांनी कोर्टात अर्ज करून 4 हजार कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र बँकांना मल्ल्याकडून अधिक चांगला प्रस्ताव अपेक्षित आहे असं आज कोर्टात सांगण्यात आलं.

येत्या दहा दिवसात मल्ल्यानं आपल्याकडील एकूण संपत्तीचा आकडा कोर्टापुढे जाहीर करुन मोठी रक्कम जमा करावी. त्यानंतरच बँकांशी चर्चा होऊ शकेल असे आदेश कोर्टानं मल्ल्याच्या वकिलांना दिले आहेत.

‘किंगफिशर एअरलाईन्स’चा मालक असलेल्या विजय मल्ल्यावर 17 बँकांचं नऊ हजार कोटींचं कर्ज आहे. आर्थिक अफरातफरीप्रकरणी ईडीकडून मल्ल्याची चौकशी सुरू असून अटक होण्याच्या भीतीनं तो देशातून पळून गेला आहे.
===============================================

तेलंगणात उष्माघाताचा कहर, 66 जणांचा मृत्यू

तेलंगणात उष्माघाताचा कहर, 66 जणांचा मृत्यू
हैदराबाद : तेलंगणात उष्माघाताने आतापर्यंत तब्बल 66 जणांचा बळी घेतला आहे. सर्वाधिक बळी हे मेहबूबनगर जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत.

गेल्या काही महिन्यात अनेक राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका तेलंगणा राज्याला बसताना दिसतोय. तेलंगाणाचं तापमान 40 अंश सेल्सियसच्या पुढे आहे. मेहबूबनगर व्यतिरीक्त मेडक, करीमनगर, खमान जिल्ह्यात उष्माघाताचे बळी गेले आहेत.

मेहबूबनगर जिल्ह्यात 28, मेडकमध्ये 11, निजामाबाद 7, खमान आणि करीमनगरमध्ये प्रत्येकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

सलग तीन वर्षांपासून तेलंगणात दुष्काळ पडत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. गेल्या वर्षी तेलंगणात तब्बल 1000 लोकांचा उष्माघाताने बळी गेला होता. मात्र यंदाचं तापमान पाहता यावर्षीही उष्माघाताचे बळी वाढण्याची भीती आहे.

महाबळेश्वरही तापलं
एकीकडे तेलंगणात तापमान वाढलेलं असताना इकडे महाराष्ट्रातही उष्णतेच्या झळा वाहत आहेत. मिनी काश्मिर म्हणून ओळखलं जाणाऱ्या महाबळेश्वरलाही या तापमानाचा फटका बसलाय.
===============================================

आमदार लिहलेल्या गाडीनं महिलेला उडवलं, चालक पोलिसांच्या ताब्यात

आमदार लिहलेल्या गाडीनं  महिलेला उडवलं, चालक पोलिसांच्या ताब्यात
डोंबिवली: डोंबिवलीत एक 70 वर्षीय महिला भरधाव कारच्या धडकेत जखमी झाली आहे. या अपघातानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चालकाला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

मयूर नंदू असं या कारचालकाचं नाव असून अपघात झाला तेव्हा तो दारुच्या नशेत होता. विशेष म्हणजे ज्या कारनं महिलेला धडक दिली त्या कारवर भाजपचा लोगो आहे. तसेच पुढच्या बाजूस आमदार असं लिहलं आहे. अटक केल्यावर कारचालकानं भिवंडीचे भाजप आमदार महेश चौगुले यांच्या नावाचं कार्ड पोलिसांना दाखवलं.

याबाबत आमदार महेश चौगुलें यांच्याशी संपर्क साधला असता, ही गाडी आपली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं भाजपचा लोगो आणि आमदार नाव असलेली ही गाडी नेमकी कोणाची? आहे असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
===============================================

एड्स जनजागृतीसाठी नागपूर मनपाकडून हनुमान चालिसा पठण

एड्स जनजागृतीसाठी नागपूर मनपाकडून हनुमान चालिसा पठण
नागपूर : एड्स या रोगाचं नाव ऐकलं की अनेकांची भीतीने गाळण उडते. पण या रोगाच्या निवारणासाठी नागपूर महापालिकेने जो उपाय योजला होता तो ऐकून कोणालाही घाम फुटेल.

एड्स निवारण आणि जनजागृतीसाठी नागपूर महापालिकेने तब्बल दीड लाख लोकांसाठी हनुमान चालिसा पठणाचं आयोजन केलं होतं. पण या कार्यक्रमाविरोधात एका स्वयंसेवी संस्थेने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यानंतर नागपूर खंडपीठाने कडक शब्दात ताशेरे ओढलेत.

हनुमान चालिसा पठणाने एड्स निवारण कसं होईलं असा सवाल विचारत कोर्टाने महापालिकालेला कार्यक्रमात बदल करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे कोर्टाच्या दणक्यानंतर आता या कार्यक्रमाचं आयोजन पोद्दारेश्वर राम मंदिराकडे देण्यात आलं आहे.

`नैतिकता पाळा, एड्स टाळा’ – हे ब्रीदवाक्य घेत, जागतिक आरोग्य दिवसाच्या निमित्ताने एड्स रोगाबद्दल सर्व सामन्यांमध्ये जनजागृती निर्माण करताना, त्याच्या अंतर्गत मारुती स्तोत्राच्या पठणाचा कार्यक्रम देखील केला होता. १ लाख हनुमान-भक्तांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करत याचा ‘गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ अंतर्गत नोंदणी करण्याचा प्रयत्न पालिकेचा होता. पण आता कोर्टाने झापल्यामुळे पालिकेच्या आशेवर पाणी फेरलं आहे.
===============================================

विराट-अनुष्का वांद्र्यात दिसले, रेस्टॉरंटमध्ये डिनरही घेतलं!

विराट-अनुष्का वांद्र्यात दिसले, रेस्टॉरंटमध्ये डिनरही घेतलं!
मुंबई: टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली काल (बुधवार) रात्री मुंबईतील एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आपली गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत दिसून आला.

सुत्रांच्या माहितीनुसार, दोघांनी एकत्र डिनरही घेतलं. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जेव्हा वांद्रेतील एका रेस्टॉरंटमध्ये जात असताना मीडियातील काही फोटोग्राफर आणि त्यांच्या चाहत्यानी त्यांचे काही फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
===============================================

'भारत माता की जय'ने दुष्काळ हटणार नाही : सामना

'भारत माता की जय'ने दुष्काळ हटणार नाही : सामना
मुंबई: ‘भारत माता की जय’च्या मुद्यावरुन शिवसेनेने ‘सामाना’तून मुख्यमंत्र्यावर निशाणा साधण्यात आला आहे. फक्त ‘भारत माता की जय’ बोलून दुष्काळाची दाहकता कमी होणार नसल्याची टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

‘भारतमाता की जय’ बोलावंच लागेल, पण ते बोलण्यासाठी माणसं जिवंत राहायला हवीत. मराठवाड्यासह अनेक भागात पाण्यासाठी माणूसच माणसाचा शत्रू झालाय. भारतमातेच्या स्वप्नातील हा महाराष्ट्र नाही. मुख्यमंत्री, खुर्चीवर बसा व महाराष्ट्राला पाणी द्या’ असं ‘सामना’त म्हटलं आहे.

खुर्ची गेली तरी चालेल, पण ‘भारत माता की जय’ बोलणारच मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचाही ‘सामना’तून समाचार घेण्यात आला.

पाण्याअभावी राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नन निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गावात पिण्याचे पाणी देईन, नाहीतर खुर्चीवर लाथ मारीन अशी गर्जना केली असती तर ते अधिक बरं झालं असतं, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

‘मुख्यमंत्री खुर्चीवर बसा आणि महाराष्ट्राला पाणी द्या’ असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे
===============================================

IPL : नवे आहेत, पण छावे आहेत

IPL : नवे आहेत, पण छावे आहेत
मुंबई: आयपीएलच्या नव्या मोसमाला सुरुवात होण्यास अवघे काही तास उरले आहेत. 9 एप्रिलपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध रायजिंग पुणे सुपरजाएन्ट्स या सामन्याने आयपीएलचं बिगूल वाजेल. यंदाही आयपीएलमध्ये नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. सध्या त्यांचं नाव चर्चेत नसलं, तरी येत्या काळात ते प्रकाशझोतात येऊ शकतात. अशाच काही खेळांडूंवर एक नजर

शिवील कौशिक –
SHIVIL Kaushik20 वर्षीय शिवील कौशिक उजव्या हाताने गोलंदाजी करतो. त्याची गोलंदाजीची शैली हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शिवील कौशिक हा दक्षिण आफ्रिकेच्या पॉल अडम्सप्रमाणे गोलंदाजी करतो. कर्नाटकच्या या खेळाडूला सुरेश रैनाच्या गुजरात लायन्स संघाने खरेदी केलं आहे. गुजरातने त्याला 10 लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केलं आहे.

आयपीएलमध्ये मोठ्या खेळाडूंसोबत खेळणं हे माझं स्वप्न सत्यात उतरल्यासारखं आहे, असं शिवील म्हणतो. 6 फूट उंच शिवील त्याच्या उत्कृष्ट लाईन-लेन्थसाठी परिचीत आहे.

अक्षय कर्णेवार-
Akshay Karnewarविदर्भाकडून खेळणारा 23 वर्षीय फिरकीपटू अक्षय कर्णेवार यंदा चांगलाच चर्चेत आला. अक्षय दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतो. अक्षय यवतमाळच्या पांढरकवडा इथला रहिवाशी आहे. आयपीएलमध्ये त्याला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने खरेदी केलं आहे.


मुरुगन अश्विन-
Murugan Ashwinआयपीएलच्या 9 व्या मोसमात मुरुगन अश्विनसाठी तब्बल 4 कोटी 50 लाख रुपयांची बोली लागली. एम अश्विनची बेस प्राईस केवळ 10 लाख रुपये होती. त्यामुळे बेस प्राईसच्या 45 पट जास्त रक्कम मिळवणारा अश्विन किती महत्त्वाचा असू शकतो, हे येत्या काळात समजेल.

मुरुगन अश्विन हा धोनीच्या पुणे सुपरजाएंट्सकडून खेळणार आहे. अश्विन लेगस्पिनर आहे. मुरुगन अश्विनने 6 टी 20 सामन्यांत 10 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनच्या कामगिरीकडे धोनीचं विशेष लक्ष असेल.

नाथू सिंह-
Nathu Singh1राजस्थानचा मध्यमगती गोलंदाज नाथू सिंह हा एका रात्रीत करोडपती झाला.  नाथूसाठी  आयपीएल 9 साठी तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांची बोली लागली. एका मजुराचा मुलगा असलेल्या नाथूसाठी आयपीएल एक सुवर्णसंधी ठरू शकते.

नाथू सिंहचा वेगाचा मारा रणजी ट्रॉफीत पाहायला मिळाला. नाथूने पहिल्याच रणजी सामन्यात तब्बल 7 विकेट्स घेतल्या होत्या. यंदा नाथू मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.
===============================================

29000 कोटींचा कोळसा घोटाळा, अदानी समूहाची चौकशी

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 7 - इंडोनेशियातून कोळसा आयात करताना कृत्रिमरीत्या चढे दर दाखवायचे आणि ग्राहकांकडून जास्त दराने वीजबिलातून पैसे लुबाडायचे असा प्रकार घडल्याचा संशय असून हा घोटाळा 29 हजार कोटी रुपये किंवा 4.4 अब्ज डॉलर्स इतका प्रचंड असल्याचा अंदाज आहे. या घोटाळ्यात एकूण 40 कंपन्या असून यामध्ये अदानी समूहाच्या सहा कंपन्यांचा व अनिल अंबानींच्या कंपनीचाही समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे मानले जाणाऱ्या गौतम अदानींच्या कंपन्यांची निष्पक्षपातीपणे चौकशी होईल का अशी उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
    या संदर्भातले वृत्त प्रथम इकॉनॉमक अँड पॉलिटिकल वीकलीने याबाबत वृत्त दिले असून केंद्रीय अर्थखाते भारतातल्या 40 ऊर्जा कंपन्यांची चौकशी करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अदानी पॉवर राजस्थान, अदानी पॉवर महाराष्ट्र, अदानी विल्मर, व्योम ट्रेड या कंपन्यांचा समावेश आहे. या समूहाने वेगवेगळ्या राज्यांच्या ऊर्जानिर्मिती कंपन्यांना आयात कोळसा पुरवला आहे. 
    याखेरीज अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टरचीही चौकशी करण्यात येत असल्याचे वृत्त ईपीडब्ल्यूने दिले आहे.
    डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स या प्रकरणांची चौकशी करत असून फेब्रवारीमध्ये मनोज कुमार गर्ग यास अटक करण्यात आली. इंडोनेशियातून आयात कोळसाची किंमत जास्त दाखवून जवळपास 280 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप या प्रकरणात आहे.
    वीजेचे दर निश्चित करताना अनेक घटकांबरोबच कच्च्या मालाची, म्हणजे कोळश्याची किंमत महत्त्वाची असते. हेच दर कृत्रिमरीत्या फुगवल्याने सर्वसामान्य ग्राहकांची हजारो कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप व्यक्त करण्यात आला आहे. 
    विशेष म्हणजे इंडोनेशियातून थेट कोळसा आयात झाला असला तरी बिलं मात्र अन्य देशांच्या मार्फत आल्याचे दाखवल्याने आर्थिक अफरातफरीची शक्यताही डीआरआय पडताळत आहे.
===============================================

पुण्यात 'इसिस'च्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणाची सुटका

  • ऑनलाइन लोकमत
    पुणे, दि. ७ - कुख्यात दहशतवादी संघटना इसिसशी संबंधअसल्याच्या संशयावरुन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मंगळवारी ताब्यात घेण्यात आलेल्या इस्माईल मुसब अब्दुल रौफ या तरूणाची अखेर सुटका करण्यात आली आहे. मूळचा कर्नाटकातील भटकळ जिल्ह्यातील रहिवासी असून दुबईला जाण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता. त्यावेळी एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) त्याला मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. मात्र त्याची चौकशी केल्यानंतर एका दिवसाने त्याची सुटका करण्यात आली. 
    गेल्या काही दिवसांपासून अब्दुल रौफ ई-मेलच्या माध्यामातून इसिसच्या काही संशयितांशी संपर्कात असल्याचा संशय होता. राष्ट्रीय तपास संस्थेसह गुप्तचर खाते (आयबी) त्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून होते. तो मंगळवारी सायंकाळी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुबईला जाण्यास निघाला असता त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. 
    मात्र रऊफला अटक नव्हे तर चौकशीसाठी फक्त काही काळ ताब्यात घेण्यात आल्याचे एनआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले. तसेच त्याला चौकशीसाठी परत बोलावले जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) इसिसशी संबंधांच्या संशयावरून देशभरातून १४ तरूणांना अटक करण्यात आली होती. त्यात ठाणे आणि मुंबई परिसरातील तरूणांचा समावेश होता
===============================================

हो, आम्ही लग्न करतोय - बिपाशा बासू

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. ७ - बिपाशा बसू व करणसिंग ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी.... ते दोघे लग्न करणार असल्याची बातमी 'लोकमत'नेच तुमच्यापर्यंत पोहोचवली होती आणि आता त्या दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून एक संयुक्त अधिकृत निवेदनही जारी केले आहे. 
    अभिनेत्री प्रियांका चोप्राने ट्विटरवरून बिपाशा- व करणला शुभेच्छा देत त्यांच्या लग्नाची बातमी फोडली होती. त्यावरून चर्चा सुरू झालेली असतानाच आता खुद्द बिपाशा-करणनेच ही बातमी खरी असल्याचे सांगत आपण ३० एप्रिलला विवाहबंधनात अडकणार असल्याचे नमूद केले. 
    ' आमच्या आयुष्यातील अतिशय आनंदाची व विशेष बातमी सर्वांसोबत शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ३० एप्रिल हा (लग्नाचा) आमच्यासाठी एक महत्वाचा आणि मोठा दिवस असून त्यासाठी आम्ही आमचे कुटुंबिय, मित्र-मैत्रिणी, चाहते आणि शुभेच्छुकांचे मनापासून आभार मानतो. मात्र आमचे लग्न एक खासगी, कौटुंबिक समारंभ असेल. आत्तापर्यंत आमच्या खासगी आयुष्याचा आदर राखल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. आमच्या नवीन आयुष्याला सुरूवात करताना तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा आमच्या पाठीशी असतील अशी आम्हाला आशा आहे' अशा शब्दांत बिपाशा-करणने ही गुड न्यूज शेअर केली. 
===============================================

आरोग्य विभागाने नेमली चौकशी समिती


  • मुंबई, दि. 7 - सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मनमानी खरेदीसंदर्भातल्या बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने दखल घेत चौकशी समिती नेमली आहे. आरोग्य मंत्री डॉ. दीपक सांवत यांनी श्रीमती कुंदन यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही विधानसभेत गुरुवारी दिली.
    नियम आणि निकष डावलून सार्वजनिक आरोग्य विभागाने कोट्यवधी रुपयांच्या औषधांची मनमानीपणे खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, यापैकी महागडी औषधे वापराविना वाया गेली असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
    याखेरीज व्हेन्टिलेटर्सच्या खरेदीतही लाखो रुपये वाया जात असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात लोकमतने बुधवारी व गुरुवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याचे पडसाद विधानसभेत उमटले आहेत. 
===============================================

IPL च्या वानखेडेवरील मॅचला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. ७  -  मुंबईत सुरु होणा-या  आयपीएलच्या ९ एप्रिलच्या पहिल्या सामन्याला मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे.
    राज्यात दुष्काळ पडल्याने आयपीएलच्या सामन्यादरम्यान स्टेडियमवर होणारा पाण्याचा अपव्याप टाळण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर हायकोर्टाने टँकरच्या पाण्याच्या स्त्रोतांची चौकशी करण्याचे आणि   स्टेडियमला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो का? असा राज्य सरकारला सवाल करत याप्रकरणी येत्या १२ तारखेपर्यंत  स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच, एकीकडे लोक मरत असताना आपण पाण्याचा उपयोग गार्डन आणि स्टेडियमच्या मेन्टेन्ससाठी करत आहात का? असा सवाल मुंबई क्रिकेट बॉडीला हार्यकोर्टाने विचारला आहे.
===============================================

मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा!

  • मुंबई : अतिरेकी संघटनांकडून येत्या काही दिवसात महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडविल्या जाण्याच्या शक्यतेमुळे मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महत्वाची धार्मिक स्थळे, व्यापारी केंद्र व गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवून नाकाबंदी करण्यात येत आहे.
    देशात अतिरेकी हल्ला घडविण्यासाठी काही दहशतवादी शिरले आहेत. त्यांच्याकडून दिल्ली, मुंबईसह महाराष्ट्र व पंजाबमधील महत्वाच्या ठिकाणी घातपाती कृत्य होण्याची शक्यता आहे, त्याबाबत खबरदारी घ्यावी, असा इशारा गुप्तचर यंत्रणेने बुधवारी राज्यांना दिला आहे.
    केंद्रात व राज्यात उन्हाळी अधिवेशन सुरु असताना गोंधळ माजविण्यासाठी काही ठिकाणी अतिरेकी हल्ला घडविला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी दिल्लीत एका मोटारीतून काही जण फिरत आहेत. मुंबई व अन्य राज्यातील अन्य महत्वाच्या ठिकाणी घातपाती कृत्य घडविले जाण्याची शक्यता आहे, असा संदेश केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने राज्याला पाठविला आहे.
===============================================

तीन राज्यांत विद्यार्थ्यांमुळे तणावाचे प्रसंग

  • श्रीनगर, जयपूर, हैदराबाद : टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पराभवानंतर जम्मू आणि काश्मीर तसेच राजस्थानात विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारीमुळे तणाव निर्माण झाला असतानाच याच प्रकरणी काश्मिरात विद्यार्थ्यांवर लाठीमार तर राजस्थानात निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने परिस्थिती चिघळली आहे. भरीस भर म्हणजे गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेल्या हैदराबाद विद्यापीठात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी रोखल्यामुळे कॅम्पसमध्ये नव्याने तणाव निर्माण झाला आहे.
    - श्रीनगर एनआयटीमध्ये केंद्रीय पथक दाखल
    टी-२० विश्वचषक सामन्यात भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजकडून पराभूत झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्यामुळे श्रीनगरच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत(एनआयटी) तणाव निर्माण झाला आहे. बुधवारी दिल्लीहून येथे दाखल झालेल्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (एचआरडी) दोन सदस्यीय चमूने या अभियांत्रिकी संस्थेच्या अधिकाऱ्यांशी तणावाच्या परिस्थितीबाबत सल्लामसलत केली.
    असुरक्षिततेचे वातावरण बळावत असतानाच विद्यार्थ्यांनी संघर्षाचा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे काही विद्यार्थी जखमी झाले. दरम्यान काश्मीरबाहेरील विद्यार्थ्यांनी आक्रमक धोरण अवलंबत प्रशासनाला ४ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्रात पाच मागण्या ठेवल्या आहेत. राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा मुद्दाही त्यात समाविष्ट आहे.
    केंद्राचा विश्वास नाही
    राज्य पोलिसांऐवजी सीआरपीएफकडे कॅम्पसची सुरक्षा पुरविण्यात आल्यामुळे केंद्र सरकारचा मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्यावर विश्वास उरला नसल्याचे संकेत मिळतात, असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
    दररोज लाठीमार
    विद्यार्थ्यांवर दररोज लाठीमार केला जाणारा भारत हा जगातील बहुदा एकमेव देश असावा. काश्मिरात ‘भारत माता की जय’ म्हणणाऱ्यांना भाजप बदडून काढत आहे. देशात अन्यत्र ही घोषणा न देणाऱ्यांनाही हा पक्ष चोप देत आहे, असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
===============================================

हाफिज सईदची न्यायासाठी लाहोरमध्ये शरिया कोर्टाची स्थापना

  • ऑनलाइन लोकमत
    लाहोर, दि. ७- मुंबई 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड आणि जमाद उल दावाचा म्होरक्या हाफिज सईद यानं लोकांना न्याय देण्यासाठी लाहोरमध्ये  स्वतः शरिया कोर्टा स्थापन केलं आहे.
    पाकिस्तानच्या पंजाब कोर्टाप्रमाणे शरिया कोर्ट न्याय निवाड्याचं काम करत असल्याचं माहिती आता समोर येते आहे. जमाद उल दावानं खडमिन्स इथं शरिया कोर्टाचं मुख्यालय बनवलं आहे. जमाई क्वाडसिया, चाऊबुर्जी आणि क्वाझी हे न्यायाधीश या कोर्टात आलेल्या प्रकरणांचा न्यायनिवाड्याचं काम पाहत आहेत.  दारूल क्वाझा शरिया ही खासगी न्याय संस्था असल्याचं पाकिस्तानमधल्या डॉन या वृत्तपत्रानं म्हटलं आहे. 
    जलद न्याय मिळण्यासाठी जमाद उल दावानं या कोर्टाची स्थापना केली आहे. मालमत्ता आणि  पैशांच्या वादातल्या तक्रारींच्या न्याय निवाड्यासाठी या कोर्टात जास्त करून लोक जात असल्याची माहिती समोर येते आहे. शरिया कोर्ट हे कायदेविषयक कोर्ट नाही, ते एका पार्टीनं स्थापलेले पंचायतीचं कोर्ट असल्याची माहिती पाकिस्तानचं प्रसिद्ध वर्तमानपत्र डॉननं दिली आहे.
===============================================
भारतासोबतची शांतता प्रक्रिया स्थगित- पाकिस्तान
नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानमधील शांतता प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून दोन्ही देशांमध्ये कोणत्याही चर्चा प्रस्तावित नसल्याची माहिती पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी स्पष्ट केले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना बसीत म्हणाले, "आजच्या घडीला कोणत्याही चर्चा प्रस्तावित नाहीत. मला वाटते की सध्यातरी शांतता प्रक्रिया स्थगित झाली आहे.‘ पठाणकोटवरील हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानमधून संयुक्त तपास पथक भारतात आले होते. याबाबत थेट भाष्य करण्याचे टाळत बासीत म्हणाले, ‘हा देवाणघेवाणीचा विषय नसून दोन्ही देशांतील परस्पर सहकार्याचा विषय आहे.‘ 

संयुक्त तपास पथकाने पाकला परतल्यावर दिलेल्या अहवालात पाकिस्तान विरोधातील धोरणाचा भाग म्हणून भारतानेच पठाणकोट हल्ल्याचे कुंभाड रचल्याचा कांगावा केल्याचा आरोप करत भारतातील तपासादरम्यान राष्ट्रीय तपास पथकाने सहकार्य केले नसल्याचे वृत्त स्थानिक माध्यमात प्रसिद्ध झाले होते. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना, "पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाला आम्ही पूर्णपणे सहकार्य केले असून पठाणकोट हल्ल्याप्रकरणी सर्व पुरावे दिले आहेत‘ असे म्हटले होते.
===============================================
पनामा प्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी- काँग्रेस
नवी दिल्ली : करबुडव्यांची जी यादी पनामा पेपर्सने प्रसिद्ध केली आहे, त्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या जवळच्या लोकांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी अर्थमंत्रालयाऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली व्हावी, अशी मागणी कॉंग्रेसने आज (गुरुवार) केली. 

पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांच्या जवळच्या लोकांची नावे पनामाने प्रसिद्ध केली आहेत. याबाबतची चौकशी करण्यासाठी मोदी यांनी आदेश दिले असले तरी अर्थमंत्रालयांतर्गत या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी होऊ शकत नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली चौकशी होणे गरजेचे आहे. अर्थमंत्रालयाकडून होणाऱ्या चौकशीवर कॉंग्रेसचा अजिबात विश्वास नाही. जेटली यांचे मित्र लोकेश शर्मा आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह आणि त्यांचे पुत्र अभिषेक यांची नावेही पनामात आली आहेत. याकडे लक्ष वेधत रमेश यांनी अर्थमंत्रालयाकडून निःपक्षपातीपणे चौकशी होण्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे.
===============================================
आयपीएलचा मुंबईतील पहिला सामना तर होणार...
नवी दिल्ली - महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट असताना इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) ही क्रिकेटची स्पर्धा भरविण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी आशयाची मागणी करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईमधील वानखेडे मैदानावरील 9 एप्रिल रोजीचा नियोजित सामना खेळविण्यास परवानगी दिल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळास (बीसीसीआय) मोठा दिलासा मिळाला. यासंदर्भातील जनहित याचिकेची सुनावणी न्या. विद्यासागर कानडे व न्या. मकरंद कर्णिक यांच्यासमोर झाली. 

मात्र महाराष्ट्रात खेळविल्या जाणाऱ्या इतर 19 सामन्यांचे भविष्य अद्यापी अनिश्‍चित आहे. यासंदर्भात आता 12 एप्रिल रोजी पुन्हा सुनावणी होणार असून त्याआधी महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील मैदानांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. आयपीएलचा प्रारंभ येत्या 9 एप्रिलपासून होणार आहे. खंडपीठाने मुंबईतील पहिल्या सामन्याला स्थगिती देण्यास नकार दिला. पुढील सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब करताना तेव्हा यासंदर्भात सरकारचे उत्तर पाहून पुढील निर्णय घेऊ असे न्यायालयाने स्पष्ट केले.
===============================================
अमेरिकेतील व्हिसा गैरव्यवहारात 10 भारतीय!
वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये उघडकीस आलेल्या व्हिसा गैरव्यवहारप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या 21 जणांमध्ये 10 भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे. 

या सर्व आरोपींनी परदेशी नागरिकांची एका बनावट विद्यापीठात नोंदणी केली होती. त्यानंतर त्यांनी बेकायदेशीर आणि गैरमार्गाने विद्यार्थ्यांना विद्यार्थी आणि रोजगार व्हिसा दिला होता. या टोळीने अशा प्रकारे 26 देशातील एक हजार परदेशी नागरिकांना व्हिसा दिला होता, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. एका स्टिंग ऑपरेशनद्वारे हे प्रकरण उघडकीस आणले गेले. या बोगस विद्यापीठात प्रवेश मिळवून देऊन त्यांच्यासाठी विद्यार्थी व्हिसा आणि परदेशी कामगार व्हिसा मिळविला. त्यानंतर या सर्वांना अटक करण्यात आली. 

ताब्यात घेण्यात आलेले सर्व जण हे एजंट, नोकरी देणारे आहेत. दरम्यान प्रशासनाने ताब्यात घेण्यात आलेले नागरिकांचे राष्ट्रीयत्व जाहीर केले नसून अधिकाऱ्यांनी दिलेल्या संकेतावरून त्यामध्ये 10 भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश असल्याचे समजले.
===============================================
उड्डाणपूल कोसळणे ही 'ऍक्‍ट ऑफ फ्रॉड'- मोदी
मदारीहाट (पश्‍चिम बंगाल) - कोलकाता येथील उड्डाणपूल कोसळण्याची घटना ही ‘ऍक्‍ट ऑफ गॉड‘ नव्हे तर ‘ऍक्‍ट ऑफ फ्राड‘ होती, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी मदारीहाट येथील प्रचारसभेत मोदी बोलत होते. ते म्हणाले, "मागील विधानसभा निवडणुकीत ‘मां, माटी, मानुष‘ ही घोषणा ऐकायला मिळाली होती. आता "मां, माटी, मानुष‘ची जागा मृत्यूने घेतली आहे. येथे कधी मृत्यूचा तर कधी पैशांचा आवाज येत असतो‘, अशा तीव्र शब्दांत मोदी यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका केली. मोदी पुढे म्हणाले, ‘ममता स्वत:ला एवढ्या मोठ्या समजतात की, पंतप्रधानांच्या बैठकीलाही त्या उपस्थित राहत नाहीत. ममता दिल्लीत येतात तेव्हा माझी भेट घेण्यास कचरतात. पण, सोनियांना मात्र आवर्जून भेटतात.‘ 

कोलकातातील उड्डाणपूल अपघातावरूनही मोदींनी ममतांना टोला लगावला. ही दुर्घटना ‘ऍक्‍ट ऑफ गॉड‘ नाही तर ‘ऍक्‍ट ऑफ फ्रॉड‘ होती, असे मोदी म्हणाले.
===============================================
शस्त्रास्त्रे नियंत्रणाबाबत भारताशी चर्चेस तयार-पाक
इस्लामाबाद- भारत व पाकिस्तानमध्ये अनावश्‍यक शस्त्रास्त्रे तयार होत आहेत. यामुळे शस्त्रास्त्रे नियंत्रणाबाबत भारताबरोबर चर्चा करण्यास तयार आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दोन्ही देशांना शस्त्रास्त्रे कमी करण्याचा सल्ला दिला होता. पाकिस्तानचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नाफीज झकेरिया म्हणाले, ‘बराक ओबामा यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आम्ही शस्त्रास्त्रे नियंत्रणाबाबत भारताबरोबर चर्चा करण्यास तयार आहोत. यामुळे अनावश्‍यक होत असलेल्या शस्त्रास्त्रांवर काही प्रमाणात मर्यादा येतील. पाकिस्तानला शांतता व स्थिरता हवी आहे.‘ 

पाकिस्तान स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्रास्त्रे तयार करत आहे. परंतु, त्याचे प्रमाणही कमी आहे. देश शस्त्रास्त्रे मोठ्या प्रमाणात तयार करण्याच्या शर्यतीत नाही, असेही झकेरिया म्हणाले.
===============================================
उष्माघातामुळे तेलंगणात 66 जणांचा मृत्यू
हैदराबाद : तेलंगणा राज्यात आतापर्यंत उष्माघातामुळे 66 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्य उन्हामध्ये होरपळून निघत असून, यापैकी बहुतांश लोक मागील आठवडाभरात मृत्युमुखी पडले आहेत, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तेलंगणाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मेहबूबनगर जिल्ह्यात 28, मेडकमध्ये 11, निजामाबाद 7, खमान आणि करीमनगरमध्ये प्रत्येकी 5 जण उष्माघातामुळे मृत्युमुखी पडले आहेत. 

अनेक राज्यांमध्ये मागील काही महिन्यांत तापमानात वाढ झाली असून, त्यामुळे सर्वांत जास्त हानी तेलंगणामध्ये झाल्याचे निदर्शनास आले आहे. तेलंगाणातील तापमान 40 अंश सेल्सियसच्या पुढे आहे.
===============================================
अब्रुनुकसानीप्रकरणी केजरीवालांना जामीन
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या नेत्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेमधील (डीडीसीए) गैरव्यवहाराप्रकरणी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी जेटली यांच्यावर आरोप ठेवले होते. खोटे आणि बदनामीकारक आरोप केल्याचे म्हणत जेटली यांनी केजरीवाल यांच्यासह अन्य काही नेत्यांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल, कुमार विश्‍वास, आशुतोष, संजय सिंह, राघव चंडा आणि दीपक वाजपेयी यांना जामीन मंजूर केला आहे. दिल्लीचे मुख्य न्यायदंडाधिकारी सुमीत दास यांनी या सर्वांची प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर केला.
===============================================
शनि चौथऱ्यावर जाऊन अभिषेक करणारच!
सोनई : गुढीपाडव्याला शनिचौथऱ्यावर कावडीच्या पाण्याचा अभिषेक करण्यास बंदी आणल्यानंतर शनैश्‍वर देवस्थान विश्‍वस्त मंडळ विरुद्ध गावकरी असा वाद रंगला आहे. विश्‍वस्त मंडळाच्या या निर्णयाला गावकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. चौथऱ्यावर जाऊन शनिमूर्तीला कावडीच्या पाण्याचा अभिषेक करण्याचा निर्णय तरुणांनी घेतला आहे. त्यामुळे गावात पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी देवस्थान ट्रस्टने पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्याकडे आज केली.

गुढीपाडव्याच्या दिवशी चौथऱ्यावर जाऊन कावडीच्या पाण्याचा अभिषेक करण्यास, तसेच श्रावण महिन्यात रोज सकाळी होणाऱ्या जलाभिषेकाची परंपरा यंदा बंद करण्याचा निर्णय विश्‍वस्त मंडळाने घेतला. त्यावरून विश्‍वस्त मंडळ व गावकऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
मागील काही वर्षांपासून गावात विश्‍वस्त मंडळाविरुद्ध ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, असे चित्र आहे. काल सायंकाळी विश्‍वस्त मंडळाने सामंजस्य बैठक घेऊन "बंद‘च्या निर्णयाबाबत खुलासा केला. मात्र, या वेळी अनेक तरुणांनी चौथऱ्यावर जाऊनच अभिषेक करणार असल्याचे सांगितले. देवस्थान बचाव कृतिसमितीचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनीही परंपरा खंडित करण्यास विरोध केला. तसेच, स्वत: चौथऱ्यावर जाऊन अभिषेक करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे विश्‍वस्त मंडळाविरुद्ध गावकरी, असा वाद पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे.

न्यायालयात सांगितल्यामुळे ‘बंद‘चा निर्णय

देवस्थानाचे सहायक कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले म्हणाले, ""रूढी-परंपरा सुरू राहाव्यात, असे ग्रामस्थांप्रमाणेच ट्रस्टलाही वाटते; पण न्यायालयात "स्त्री-पुरुष चौथऱ्याखालूनच दर्शन घेतात,‘ असे सांगितले आहे. त्यामुळे पुरोहितांशिवाय सर्वांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. कावडीचे पाणी चौथऱ्याखालील कुंडात टाकल्यानंतर वीजपंपाने ते लगेच शनिमूर्तीवर पडण्याची व्यवस्था केली आहे.‘‘ 

===============================================
नीता अंबानी आशियातील सर्वात प्रभावी उद्योजिका
नवी दिल्ली : रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना फोर्ब्सच्या यादीत ‘आशियातील सर्वात प्रभावी महिला उद्योजका‘चा मान मिळाला असून त्यांना भारतीय उद्योगाच्या ‘फर्स्ट लेडी‘ असेही संबोधण्यात आले आहे. फोर्ब्स मासिकाने आशियातील आघाडीच्या 50 प्रभावी महिला उद्योजकांची यादी सादर केली आहे. यादीत चीन, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, थायलंड, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, फिलीपाईन्स आणि न्युझीलंडमधील आघाडीच्या महिला उद्योजकांची नावे आहेत.

"ज्या देशात बहुतांश अब्जाधीश उद्योजकांच्या पत्नी पतीची सावली म्हणून वावरणे पसंत करतात, तेथे नीता अंबानींचा रिलायन्स इंडस्ट्रीजमधील वाढता सहभाग लक्षणीय आहे व त्यामुळे त्यांना या यादीत पहिले स्थान मिळाले आहे", असे फोर्ब्सने म्हटले आहे.

भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांना या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. अंबानी आणि भट्टाचार्य यांच्याशिवाय एमयु सिग्माच्या अंबिगा धीरज (14), वेलप्सन इंडियाच्या मुख्य कार्यकारी दिपाली गोयंका (16), ल्युपिनच्या सीईओ विनिता गुप्ता (18), आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर (22), व्हीएलसीसी हेल्थकेअरच्या संस्थापक वंदना लुथरा (26) आणि बायोकॉनच्या संस्थापक व अध्यक्ष किरण मजुमदार शॉ (28) यांनादेखील स्थान मिळाले आहे.

"एकीकडे उद्योग जगतात महिला प्रगती करीत आहेत तरीही लैंगिक असमानता अजूनही कायम आहे. मुख्य जबाबदार घेऊन त्या पार पाडण्यासाठी काय आवश्यक आहे याची महिलांना पुरेपुर जाणीव आहे," असे फोर्ब्सने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
===============================================
मुलगी ऐवजी मुलगा झाल्याने केली हत्या
हैदराबाद- मुलगी हवी होती. परंतु, मुलगा झाल्यामुळे मातेने 24 दिवसांच्या नवजात मुलाची हत्या केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुर्णिमा (वय 30) या महिलेला पहिली दोन मुले आहेत. तिसऱ्यांदा तिला मुलगी हवी होती. परंतु, मुलगा झाल्यामुळे ती नाराज होती. अपत्य नसलेल्या नातेवाइकांना नवजात मुलगा देण्याची मागणी तिने पतीकडे केली होती. परंतु, तिची मागणी पतीने धुडकावून लावली होती. तेव्हापासून ती मुलाकडे दुर्लक्ष करत होती. 

मंगळवारी (ता. 5) चोरट्यांनी आपले मंगळसूत्र गळ्यातून हिसकावले व यावेळी झालेल्या झटापटीत मुलगा पडला आहे, अशी माहिती पोर्णिमाने पतीला दिली. पती तत्काळ घटनास्थळी दाखल झाला त्यावेळी चिमुकला रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात अढळून आला. यावेळी ती रडत नव्हती. पतीला यामुळे संशय आल्यामुळे पोलिसांकडे तक्रार दिली. ब्लेडने चिमुकल्याची हत्या केल्याचे तिने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले. दरम्यान, पोर्णिमावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
===============================================
दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही- स. न्यायालय
नवी दिल्ली- दुष्काळासंदर्भातील सुनावणीला केंद्र सरकारच्या वतीने वकील उपस्थित न राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवारी) सरकारवर ताशेरे ओढले. 

‘थोडेसे गांभीर्य दाखवा... आम्ही बिनकामाचे आहोत म्हणून येथे बसलो आहोत का,‘ असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. 
दहा राज्यांमधील दुष्काळी स्थितीमुळे तेथील शेतकऱ्यांना संदर्भात योगेंद्र यादव यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी गुरुवारी होती, मात्र सरकारच्या वतीने वकीलच गैरहजर राहिले.

केंद्र सरकारचे अतिरिक्त महाधिवक्ता दुसऱ्या खटल्यासाठी दुसऱ्या न्यायालयात गेले, असे सरकारच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. 
"हे काही गाई-गुरांसारखे आहे का.. इकडे गेले, तिकडे गेले. दुष्काळाच्या विषयाला तुमचे प्राधान्य नाही का? दोन न्यायमूर्ती इथे बसले आहेत. आम्ही काहीच करू नये. आम्ही घड्याळाकडे बघत वेळ घालवावा अशी तुमची अपेक्षा आहे का?, असा सवाल न्यायाधीशांनी यावेळी विचारला.
===============================================
इस्लामी मूलतत्त्वादाच्या टीकाकाराची क्रूर हत्या
ढाका - बांगलादेशमधील धार्मिक मूलतत्त्वावाद्यांवर टीका करणाऱ्या 28 वर्षीय विद्यार्थी-कार्यकर्त्याची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राचे वार करुन क्रूर हत्या केली. नझीमुद्दीन समद असे या कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचे नाव असून तो येथील जगन्नाथ विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होता. 

जुन्या ढाक्‍यामधील सूत्रपूर भागामध्ये समद याची संशयित इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी हत्या केली. विद्यापीठामधील वर्ग संपल्यानंतर समद हा त्याच्या मित्रासमवेत घरी निघाला असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. समद याला ठार करताना हल्लेखोरांनी "अल्लाहु अकबर‘ अशा घोषणा दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. समद याचा मित्रा हा या घटनेनंतर बेपत्ता झाल्याचे पोलिसांनी सांगितले. समद याच्यावर प्रथम वार करुन नंतर तो ठार झाल्याची खात्री करण्याकरता गोळीबारही करण्यात आला. 

मूळचा सिल्हेट येथील असलेला समद हा येथील बंगबंधु जातीय जुबो परिषदेचा माहिती व संशोधन सचिव होता. इस्लामी मूलतत्त्ववादाचा स्पष्ट टीकाकार असलेल्या समद याने धर्मनिरपेक्षतेच्या विचाराचा प्रसार करण्याकरता फेसबुकचा आधार घेतला होता. हल्ला होण्याच्या एकच दिवस आधी त्याने देशातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. 

बांगलादेशमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून धर्मनिरपेक्ष विचारवंत, ब्लॉगर्स आणि अल्पसंख्याकांना पद्धतशीरपणे लक्ष्य करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. सुन्नी बहुसंख्याक असलेल्या बांगलादेशमधील काही हल्ले घडविल्याचा दावा इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेनेही केला आहे.
===============================================
गडचिरोली: सहा जहाल माओवाद्यांची शरणागती
गडचिरोली - नक्षल चळवळीतील हिंसक कृत्यांना तसेच दगदगीला कंटाळून दर्रेकसा दलम एरिया कमिटी सदस्यासह सहा जहाल माओवाद्यांनी जिल्हा पोलिसांपुढे शरणागती पत्करली. या सर्वांचा विविध गुन्ह्यांत सहभाग असून त्यांनी अनेक हिंसक घटना घडवून आणल्या आहेत. 

शरण आलेल्या माओवाद्यांमध्ये एरिया कमिटी सदस्य मानू ऊर्फ सुखदेव चैतू कोडापे, माड एरिया सदस्य मुकबल ऊर्फ हर्ष ऊर्फ अतुल ऊर्फ सुदर्शन सत्यदेव रामटेके, गट्टा दलम सदस्य कमला रैनू आत्राम, सी. एन. एम. टीम सदस्य नोनी ऊर्फ रासो सोमा गावडे, कसनसूर दलम सदस्य कोरिया ऊर्फ लिंगा रैनू झोरे, डिव्हिजनल स्टॉफ टीम सदस्य जैलो रैनू पदा आदींचा समावेश आहे. पैकी एरिया कमिटी सदस्य मानू ऊर्फ सुखदेव चैतू कोडापे याच्यावर सहा लाखांचे तर उर्वरित पाच माओवाद्यांवर प्रत्येकी दोन लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

सहा जहाल माओवादी शरण आल्याने गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळीला जबर धक्‍का बसला असून, गेल्या वर्षभरात पोलिसांची उपलब्धी बघता नक्षल चळवळ खिळखिळी झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी मोठ्या संख्येने शरण येत आहेत. नक्षलविरोधी अभियानासोबतच समाजजागृती, नक्षल आत्मसमर्पण योजनेची माहिती सामान्यांपर्यंत तसेच नक्षल्यांपर्यंत पोचविण्यात पोलिसांना यश आले. याचाच परिणाम म्हणून मागील दीड वर्षात 97 जहाल माओवादी गडचिरोली पोलिस दलासमोर शरण आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
===============================================
शनीच्या छायेपासून महिलांनी दूर राहावे-शंकराचार्य
सहारनपुर - शनि हा देव नसून ग्रह असल्याचे म्हणत त्याच्या छायेपासून महिलांनी दूर राहावे असे सल्ला द्वारकापीठाचे जगद्‌गुरू शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी दिला आहे. 



महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात वाद निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्वामी स्वरुपानंद म्हणाले, ‘शनिच्या दुष्परिणामांपासून दूर राहण्यासाठी शनिऐवजी हनुमानाची उपासना करा. सनातन धर्मामध्ये महिलांना सर्वाधिक सन्मान देण्यात आला आहे. बहुतेक मंदिरांमध्ये महिलांची संख्या जास्त असते.‘ असे म्हणत "अशा परिस्थितीत शनि ग्रहाजवळ पोचण्यासाठी महिलांनी जास्त गोंधळ करू नये‘, असा सल्ला त्यांनी दिला. 

अलिकडील विवाह व्यवस्थेबद्दल बोलताना ते म्हणाले, "इंटरनेटच्या माध्यमातून होत असलेले विवाह फार कमी प्रमाणात यशस्वी ठरत आहेत. परस्परांना, त्यांच्या कुटुंबाला जाणून घेतल्याशिवाय होत असलेले विवाह दोन-तीन वर्षांमध्ये संपुष्टात येत आहेत. समाजव्यवस्थेसाठी हा मोठा चिंतेचा विषय आहे.‘
===============================================
मुखेड मध्ये माजी न्यायमूर्ती बि.जी.कोळसे पाटील यांचे शनिवारी व्याख्यान 

" मुखेड मध्ये माजी न्यायमूर्ती बि.जी.कोळसे पाटील यांचे शनिवारी व्याख्यान "
' फुले-आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सवाचे आयोजन "
मुखेड :-
       शहरामध्ये एक शहर एक जयंती संकल्पनेतुन राष्ट्रनिर्माते क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले व विश्वभुषण डाँ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सवामध्ये दि.9 एप्रिल रोज शनिवारी प्रसिद्ध व्याख्याते माजी न्यायमूर्ती बि.जी.कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले अाहे. अशी माहीती जयंती समन्वयक राहुल दशरथराव लोहबंदे, शेख रियाज चांदपाशा यांनी दिली.
       दि.9 एप्रिल रोज शनिवारी सांय 7 वाजता जिल्हा परिषद हायस्कुल मुलिंचे मैदानात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष बाबुसावकार देबडवार, उद्घाटक मुखेड भुषण डाँ.दिलीपराव पुंडे, प्रमुख उपस्थिती जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, माजी उपनगराध्यक्ष भाई श्रीराम गरुडकर, भाजपा नेते माधवअण्णा साठे, माजी नगराध्यक्ष गणपतराव गायकवाड़, बालाजी पाटील कबनुरकर, शिवाजी जाधव, सदाशिव पाटील, बालाजी बंडे, दिलीप कोडगीरे, डाँ.रामराव श्रीरामे, बार असोसिएशन चे अध्यक्ष शिवराज पाटील कुंद्राळकर, अँड अस्लम शेख, अशोक पांपटवार, आदी सह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी नगरसेवक उत्तम बनसोडे, श्रावण रँपनवाड, अँड.गोविंद डुमणे, काँ.बालाजी घोडके, शिवकुमार बंडे, शौकत होनवडजकर, पंकज गायकवाड़, हसन बेळीकर, बालाजी बनसोडे, एकबार बनसोडे, विजय लोहबंदे, आकाश कलेपवार, शेख मुकतार, गौतम कांबळे सह फुले-आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीने केले आहे.
===============================================
मुखेड; राजुदादा गंदपवाड मित्रमंडळ तर्फे पाणीपोईचे उद्घाटन

"राजुदादा गंदपवाड मित्रमंडळ तर्फे पाणीपोईचे उद्घाटन "
मुखेड :- 
     शहरातील युवा नेते राजुदादा गंदपवाड व मित्रांच्या वतीने शहरातील बा-हाळी नाका परिसरात सार्वजनिक पाणीपोईचे उद्घाटन करण्यात आले.
    तालुक्यातील सध्या चोहीकडे दुष्काळ परिस्थिती निमार्ण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. अशा परिस्थिती मध्ये सामाजिक बांधिलकी जपत राजुदादा गंदपवाड, धनंजय कोडगीरे व मित्रांच्यावतीने सार्वजनिक पाणीपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बालाजी नांदूरकर, बालाजी बिजलवाड, योगेश नगरे, संजूभाऊ गायकवाड, बाळू उमाटे, विक्की कासले, गणेश बिजलवाड, ओमप्रकाश बिजलवाड, कपिल सोनकांबळे, कैलास चैनपुरे, गणेश नगरे, अतूल सिरसीकर, कृष्णा कानडे सह मित्र परिवार उपस्थित होते.

===============================================

No comments: