Tuesday, 5 April 2016

नमस्कार लाईव्ह ०५-०४-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तानची कोलांटीउडी, पठाणकोट हल्ल्याचा कट भारतानेच रचल्याचा आरोप 
२- मोदी आयएसआय एजंट आहेत का?-कपिल मिश्रा 
 ३- चीनला लवकरच मिळेल पाक दहशतवादाचा 'आहेर' - निवृत्त लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह 
४- अफगणिस्तानात आत्मघाती हल्ल्यात 6 ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- गतिमान एक्स्प्रेस सुसाट, दिल्ली-आग्रा अंतर 100 मिनिटांत पार 
६- बीसीसीआयने क्रिकेटच्या विकासासाठी काही केले नाही - सर्वोच्च न्यायालय 
७- 'जेआयटी'बाबतचे पाकमधील वृत्त अर्थहीन 
८- बिहारमध्ये आजपासून 'ड्राय डे' 
९- "भारतमाता की जय' म्हणणे राष्ट्रीय कर्तव्य-नक्वी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- देशमुखांच्या कारखान्यांमुळेच लातुरात पाणी टंचाई : खडसे 
११- शिवाजी पार्कवर मनसेच्या मेळाव्याला परवानगी कशी?: हायकोर्ट 
१२- आयपीएलसाठी पाण्यावर प्रतिलीटर हजार रुपये कर लावा 
१३- आव्हाडांनी तिरंग्याला तोंड पुसलं, भाजपचा आरोप 
१४- लातूरसाठी मिरजहून रेल्वेने पाणी आणणार - खडसे 
१५- विदेशातील खात्यांची योग्यता तपासू- रघुराम राजन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- परभणी; मेंढ्यांच्या जीवावर उठलेल्या 'अॅथ्रॅक्स'चा माणसांनाही धोका 
१७- प्रत्युषा आत्महत्या : बॉयफ्रेण्ड राहुल राजविरोधात गुन्हा दाखल 
१८- नाशकात शिवसेना नगरसेवक बडगुजर यांना अटक 
१९- राजस्थान; संशयावरून दलित मुलांना अमानुष मारहाण 
२०- मेघालय, आसामला भूकंपाचा सौम्य धक्का 
२१- हिंजवडी; 'फी' न भरल्याने विद्यार्थ्यांना कोंडले लायब्ररीत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- तेव्हा बॉलिवूडही हादरलं होतं... 23 वर्षानंतरही 'तिचा' मृत्यू गूढच 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
पूर्ण ते आहे ज्याला प्रारंभ,मध्य आणि अंत आहे
(संतोष धोंडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


=========================================

देशमुखांच्या कारखान्यांमुळेच लातुरात पाणी टंचाई : खडसे

 देशमुखांच्या कारखान्यांमुळेच लातुरात पाणी टंचाई : खडसे
लातूर काँग्रेस आमदार अमित देशमुखांच्या साखर कारखान्यांमुळेच लातूकरांवर पाणी टंचाईचं भीषण संकट ओढवलं असल्याचा घणाघात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. विलासराव देशमुखांच्या गावात असं व्हावं, ही गंभीर बाब असल्याची खंतही एकनाथ खडसेंनी यावेळी व्यक्त केली. सांगली आणि त्यानंतर लातूर दौऱ्यासाठी रवाना झालेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली.

मिरज टू लातूर… पाणी एक्स्प्रेस

लातूरला रेल्वेनं येणारं पाणी आता उजनीऐवजी मिरजेतून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उजनीऐवजी लातूरकरांसाठी मिरजेहून पाणी आणलं जाणार आहे. येत्या 15 दिवसांत दोन ट्रेनच्या माध्यमातून 5 एमएलडी पाणी लातूरकरांसाठी आणणार असल्याचं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.

उजनीतून पाणी आणण्यास यंत्रणा नाही!

आधी लातूरमध्ये उजनीतून रेल्वेच्या माध्यमातून पाणी आणण्याचा निर्णय झाला होता. मात्र, उजनी धरणापासून पंढरपूर रेल्वे स्थनाकापर्यंत पाणी आणण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी राहिली नाही. त्यामुळे अखेर मिरजेतून पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
=========================================

शिवाजी पार्कवर मनसेच्या मेळाव्याला परवानगी कशी?: हायकोर्ट

शिवाजी पार्कवर मनसेच्या मेळाव्याला परवानगी कशी?: हायकोर्ट
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला टक्कर देण्यासाठी या वर्षीपासून सुरु होणारा मनसेचा गुढीपाडवा मेळावा अडचणीत आला आहे.
सायलेसन्स झोनमध्ये लाऊड स्पीकरला बंदी असताना मनसेच्या मेळाव्याला परवानगी कशी दिली? असा सवाल  मुंबई हायकोर्टानं सरकारला विचारला आहे.


शिवाजी पार्कवर होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यालाही आवाजाचे निर्बंध घाला, अशी मागणी वेकॉम ट्रस्टने सोमवारी मुंबई हायकोर्टात केली होती. त्याची दखल घेत कोर्टाने या मागणीसाठी रितसर अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत.

आवाजाचे निर्बंध पाळण्याचे आदेश याआधी न्यायालयानेच दिल्याने वेकॉमच्या मागणीवर मनसेच्या मेळाव्यालाही आवाजाचे निर्बंध पाळण्याचे आदेश न्यायालयाला द्यावे लागतील. शिवाजी पार्क मैदान निवासी क्षेत्र असल्याने मनसेलाही 55 डेसिबलमध्ये मेळावा साजरा करावा लागेल.

याच मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला न्यायालयाने वेळोवेळी आवाजाचे निर्बंध पाळण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हाही नोंदवला होता. आता मनसेही यंदाच्या गुढी पाडव्यापासून मेळाव्याची गुढी याच मैदानात उभारणार आहे. न्यायालयाने मनसेला आवाजाचे निर्बंध घातल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याचे पालन करणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हे मैदान शांतता क्षेत्र घोषित करावे, या मागणीसाठी वेकॉमने न्यायालयात याचिका केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने 26 जानेवारी, 1 मे व 6 डिसेंबर हे दिवस वगळून या मैदानावर कोणत्याच कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, असे आदेश शासन व महापालिकेला दिले. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेला न्यायालयाचे दार ठोठवावे लागत होते.

अखेर गेल्यावर्षी राज्य शासनाने शिवाजी पार्क मैदानावर परवानगी दिल्या जाणाऱ्या यादीत शिवसेनेचा दसरा मेळावा व मनसेचा गुढी पाढवा मेळावा यांचा समावेश केला. परिणामी मनसेला मेळाव्यासाठी न्यायालयात यावे लागले नाही. 2017 मधील पालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला नवसंजीवनी देण्यासाठी पाडवा मेळावा महत्त्वपूर्ण ठरु शकतो.
=========================================

प्रत्युषा आत्महत्या : बॉयफ्रेण्ड राहुल राजविरोधात गुन्हा दाखल

प्रत्युषा आत्महत्या : बॉयफ्रेण्ड राहुल राजविरोधात गुन्हा दाखल
मुंबई : टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणी तिचा बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंहविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल राजवर प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

प्रत्युषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज पोलिसांच्या ताब्यात

मुंबईच्या बांगूरनगर पोलिस स्टेशनमध्ये राहुल राजविरोधात भारतीय दंडविधान कलम 306, 504, 506, 323 अंतर्गत आत्महत्येला प्रवृत्त करणं, मारहाण, धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिल रोजी गोरेगावमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘बालिका वधू’ या मालिकेतील ‘आनंदी’च्या भूमिकेमुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर होती. मात्र वैयक्तिक आयुष्यातील चढउतारामुळे तिने आयुष्य संपवलं.

प्रत्युषा बॅनर्जी आणि बॉयफ्रेंड राहुलची ‘ती’ मुलाखत!

प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तिचा बॉयफ्रेण्ड राहुल राजला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता गुन्हा दाखल झाल्याने त्याला अटक होण्याची शक्यता आहे.
=========================================

'आयपीएलसाठी पाण्यावर प्रतिलीटर हजार रुपये कर लावा'

'आयपीएलसाठी पाण्यावर प्रतिलीटर हजार रुपये कर लावा'
मुंबई : आयपीएलचे सामने महाराष्ट्रातच होणार, अशी माहिती आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली आहे. दुष्काळग्रस्तांना बीसीसीआय सर्वोतोपरी मदत करेल, असं आश्वासनही देण्यात आलं आहे.

एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ असताना आयपीएलचे सामनेही खेळवले जाणार आहेत. दुष्काळ असतानाही जर आयपीएल सामन्यांची चैन होणार असेल तर आयोजकांकडून पाण्यावर 1 हजार रुपये प्रति लीटर दराने कर आकारण्यात यावा, आणि त्या पैशातून दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवावं अशी मागणी करणारी याचिका केतन तिरोडकर यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.

आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियम, नवी मुंबईतील डी वाय पाटील, पुण्यातील सहारा स्टेडियमवर आणि नागपुरात सामने खेळवले जाणार आहेत. एका मॅचसाठी जवळपास 22 लाख लीटर पाणी वापरण्यात येतं असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. 2013 च्या आयपीएलमध्ये महाराष्ट्रात तीन ठिकाणी मिळून जवळपास 65 लाख लीटर पाणी वापरण्यात आलं होतं, असंही त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.

एकीकडे राज्य सरकार लातूर जिल्ह्याला 50 बोगींच्या ट्रेनमधून पाणी पुरवठा करण्याचा विचार करत आहे. 55 हजार लीटरची एक बोगी या हिशोबाने 30 लाख लीटरचा पाणी पुरवठा करण्यात येईल. जेणेकरुन प्रत्येक कुटूंबाला 20 लीटर पाणी पाण्याचा पुरवठा करण्यात येईल.

दुसरीकडे एका सामन्यासाठी पिच तयार करताना किमान 60 हजार लीटर पाणी एका दिवसात वापरण्यात येतं. त्यामुळे राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांची बोली लावून खेळाडूंचा लिलाव लावून हजारो कोटींची उलाढाल करणाऱ्या बीसीसीआयसारख्या गर्भश्रीमंत संघटनेकडून वॉटर टॅक्सच्या रुपात मोठी रक्कम आकारुन राज्यातील दुष्काळाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी या
याचिकेत करण्यात आली होती.
=========================================

गतिमान एक्स्प्रेस सुसाट, दिल्ली-आग्रा अंतर 100 मिनिटांत पार

गतिमान एक्स्प्रेस सुसाट, दिल्ली-आग्रा अंतर 100 मिनिटांत पार
नवी दिल्ली : देशातील पहिली सेमी बुलेट ट्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गतिमान एक्सप्रेसने पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्थानकातून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सकाळी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर बरोबर 11 वाजून 50 मिनिटांनी ही ट्रेन आग्रा स्थानकात दाखल झाली.

दिल्ली ते आग्रा स्थानकादरम्यानचं 188 किलोमीटरचं अंतर या गाडीने निर्धारित वेळेत पार केलं. ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या ट्रेनमध्ये काही अत्याधुनिक यंत्रणांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय अनेक सोयी-सुविधांनी ही रेल्वे सज्ज आहे.

या मार्गावर आतापर्यंत शताब्दी एक्सप्रेसने दोन तासात हे अंतर पार केलं आहे. पण गतिमान एक्सप्रेसमुळे प्रवाशांचा जवळपास अर्धा तास वाचणार आहे.

=========================================

आव्हाडांनी तिरंग्याला तोंड पुसलं, भाजपचा आरोप

आव्हाडांनी तिरंग्याला तोंड पुसलं, भाजपचा आरोप
मुंबई : विधानसभेत भारतमातावरुन उठलेला गदारोळ थांबत नाही तोच तिरंग्यावरुन नवा वादंग सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तिरंग्याला तोंड पुसल्याचं चित्रिकरण असल्याचा दावा करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी आव्हाडांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावरुन सभागृहात एकच गोंधळ उडाला.

आव्हाडांनी तिरंग्याला तोंड पुसल्याची क्लिप आमच्याकडे असून ती पाहिल्यानंतरच अध्यक्षांनी निर्णय घ्यावा अशी मागणी संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी केली.

मात्र सभागृहात मोबाईल घेऊन चित्रिकरण झालंच कसं? ते कोणी केलं? आणि कोणाच्या आदेशावरुन केलं ?हे आधी शोधून काढा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केली. तसंच राष्ट्रगीत सुरू असताना पंतप्रधान मोदी चालत होते याची आठवणही भाजप नेत्यांना करुन दिली.

जयंत पाटलांच्या या विधानानंतर भाजप नेते आक्रमक झाले आणि सगळेच एकावेळी वेलमध्ये उतरले.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या गोष्टी आता बोलणं गरजेचं नाही. तिरंग्याची आचारसंहिता जपणं गरजेचं आहे असं सांगत अर्ध्या तासासाठी विधानसभा तहकूब केली.
=========================================

तेव्हा बॉलिवूडही हादरलं होतं... 23 वर्षानंतरही 'तिचा' मृत्यू गूढच!

तेव्हा बॉलिवूडही हादरलं होतं... 23 वर्षानंतरही 'तिचा' मृत्यू गूढच!
मुंबई: टीव्ही मालिका ‘बालिका वधू’ प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येनंतर मनोरंजन विश्वाला चांगलाच धक्का बसला आहे. पण असं काही पहिल्यांदाच घडलेलं नाही की, या इंडस्ट्रीतील अभिनेत्रींनी असं पाऊल उचललं आहे. याआधी देखील बॉलिवूडमध्ये अशा घटना घडल्या आहेत.

मात्र, साधारण 23 वर्षापूर्वी बॉलिवूड विश्वात एक अशी घटना घडली जिने साऱ्यांनाच हादरा बसला होता. दिव्या भारतीचा मृत्यू…

90च्या दशक म्हटलं तर दिव्या भारती हे नाव सगळ्यांचाच ओठावर येतं. अवघ्या 19 व्या वर्षाच्या या अभिनेत्रीनं अगदी कमी वयात यशाची शिखरं गाठली होती. जे मिळविण्यासाठी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना आयुष्य खर्ची घालावं लागतं.
=========================================

नाशकात शिवसेना नगरसेवक बडगुजर यांना अटक

नाशकात शिवसेना नगरसेवक बडगुजर यांना अटक
नाशिकभाजप महिला मेळाव्यातील राड्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना अटक झाली आहे. नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

या अटकेनंतर नाशिकमध्ये तणावाचं वातावरण आहे. शिवसैनिकांनी बडगुजर यांच्या अटकेला विरोध दर्शवत घोषणाबाजी सुरु केली आहे.  तसंच या अटकेनंतर शिवसेना कार्यालयात उत्तर महाराष्ट्र नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी शिवसेनेचे नाशिक संपर्क प्रमुख आमदार अजय चौधरी उपस्थित आहेत.

काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये 22 मार्चला भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा मेळावा होता. या मेळाव्यात भाजपच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीचं समर्थन केल्याचा दावा शिवसेनेचा होता. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी गोंधळ घातला.

स्वतंत्र मराठवाड्यावरुन शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्यांनी नाशिक-पुणे महामार्गावर श्रीकृष्ण लॉन्सवर असलेल्या भाजपच्या महिला मेळाव्यात धुडगूस घालत तोडफोड केली. एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेक करून हाणामारी झाली.

शिवसैनिकांनी महिला मेळावा उधळल्यानंतर भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. नाशिक-पुणे हायवेवर भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको  सुरु केला आहे.
=========================================

मेंढ्यांच्या जीवावर उठलेल्या 'अॅथ्रॅक्स'चा माणसांनाही धोका !

मेंढ्यांच्या जीवावर उठलेल्या 'अॅथ्रॅक्स'चा माणसांनाही धोका !
परभणी:  दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्यातील पशूपालकापुढं अॅथ्रॅक्स नावाचं नवं संकट उभ राहिलं आहे. परभणीतील भारस्वाडा गावातील मेंढ्याना अॅथ्रॅक्स रोगाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या रोगामुळं आतापर्यंत परिसरातील 100 पेक्षा जास्त मेंढ्या दगावल्या आहेत. तर अजूनही अनेक मेंढ्यांना या रोगाची लागण झाल्याचा संशय पशू वैद्यकांना आहे.

भारस्वाड गावात 15 कुटुंब मेंढी पालनाचा व्यवसाय करतात. महिनाभरापूर्वी यातील काही मेंढ्या अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळू लागल्या. काही उपचार करायच्या आतच त्या मरणही पावल्या. रोगाची कोणतीही लक्षणं दिसायच्या आतच मेंढ्या जीव सोडत असल्यानं पशूपालकही घाबरले. त्यांनी तातडीने कृषी विद्यापीठातील पशूवैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क केला.

यानंतर महाविद्यालयाने मेंढ्यांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या शासकीय रोग निदान प्रयोग शाळेकडे पाठवले. रक्ताच्या विविध चाचण्या केल्यानंतर हा अॅथ्रॅक्स रोग असल्याचं राज्य रोग निदान प्रयोगशाळेतर्फे सांगण्यात आलं.
=========================================

बीसीसीआयने क्रिकेटच्या विकासासाठी काही केले नाही - सर्वोच्च न्यायालय

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली,  दि. ५ -  बीसीसीआयमधील सदस्यांनी क्रिकेट संघटनेला परस्परांना फायदा करुन देणारी सोसायटी बनवले आहे अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) कानउघडणी केली. बीसीसीआयकडून संलग्न क्रिकेट संघटनांना ज्या पद्धतीने निधी वाटप केले जाते त्यावरही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
    लोढा पॅनलने केलेल्या शिफारशीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी केली. २०१३ आयपीएल मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने क्रिकेट संघटनेमध्ये सुधारणांसाठी काही शिफारशी केल्या आहेत.
    लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणार नाही हे आता सांगू नका असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बीसीसीआयच्या वकिलांना सांगितले. संलग्न संघटनांना निधी मंजूर करण्याच्या बीसीसीआयच्या पद्धतीवरही सर्वोच्च न्यायालयाने टीका केली.  बीसीसीआयशी संलग्न असणा-या २९ राज्य संघटनांपैकी ११ संघटना पैशांसाठी याचना करत आहेत. हे चांगले नाही. स्पष्टीकरण घेतल्याशिवाय तुम्ही निधी मंजूर करता हा सुद्धा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
    तुम्ही निधी दिला नाही तर, दुर्लक्षित राज्यांनी त्यांच्याकडे क्रिकेटचा विकास कसा करायचा ? मागच्या सहावर्षांपासून तुम्ही बिहारला एक पैसाही दिलेला नाही. खेळाच्या विकासासाठी तुम्ही काहीही केलेले नाही असे ताशेरे भारताचे मुख्य सरन्यायाधीश टीएस ठाकूर यांनी ओढले.
=========================================

पाकिस्तानची कोलांटीउडी, पठाणकोट हल्ल्याचा कट भारतानेच रचल्याचा आरोप

  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. ५ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला दिले असताना तसंच पाकिस्तानचं तपास पथक भारतात येऊन तपास करुन गेले असतानादेखील पाकिस्तान या हल्ल्याचा कट त्यांच्याच देशात दहशतवाद्यांनी रचला असल्याचं मान्य करायला तयार नाही आहे. भारताने दिलेले पुरावे पाकिस्तान तपास पथकाला पुरेसे वाटत नसल्याची माहिती आली होती. आणि आता तर पाकिस्तानने हा हल्ला भारतीय अधिका-यांनीच रचला असल्याचा दावा केला आहे. 
    पाकिस्तान टुडेने तपास पथकातील अधिका-याने ही माहिती दिल्याचं वृत्त दिलं आहे. 'भारतीय अधिका-यांकडे पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचे काहीच पुरावे नसल्या कारणाने पाकिस्तानविरोधात लबाडीने प्रचार करण्यात येत असल्याचा', आरोप या अधिका-याने केला आहे. पाकिस्तानचं तपास पथक आपला हा अहवाल पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडे येत्या काही दिवसांत सोपवणार आहे. 
    या अहवालात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी तन्जील अहमद यांच्या हत्येचीदेखील माहिती देण्यात आली आहे. 'तपास करणा-या मुस्लिम अधिका-याची हत्या हा या गोष्टीचा पुरावा आहे की भारताला हा मुद्दा दाबायचा आहे', असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. एनआयएने पाकिस्तान तपास पथकाला भारत दौ-यादरम्यान अजिबात सहकार्य केलं नसल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. 
=========================================

लातूरसाठी मिरजहून रेल्वेने पाणी आणणार

  • ऑनलाइन लोकमत
    लातूर, दि. ५ - न्हाळयाची तीव्रता वाढत चाललेली असताना दिवसेंदिवस लातूरमधील परिस्थिती गंभीर रुप धारण करु लागली आहे. लातूरमधील जलसाठे आटत चालले असून, अपु-या पाण्यामुळे लातूरच्या जनतेचे प्रंचड हाल होत आहेत. लातूरची पाण्याची गरज भागवण्यासाठी आता मिरजहून रेल्वेने पाणी आणण्यात येणार आहे. लातूरच्या दौ-यावर असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली.
    एकनाथ खडसे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी आज लातूरचा दौरा केला. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे लातूरला रेल्वेने पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या पंधरा दिवसात दोन ट्रेनभरुन लातूरसाठी पिण्याचे पाणी आणले जाईल. लातूरमध्ये टॅंकरच्या पाण्यासाठी लोक रात्र-रात्र जागून काढत आहेत.
=========================================
मोदी आयएसआय एजंट आहेत का?-कपिल मिश्रा
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेचे एजंट आहेत का? असा धक्‍कादायक प्रश्‍न दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी उपस्थित केला आहे.



मिश्रा हे दिल्ली सरकारमध्ये पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. पठाणकोटवरील दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी अलिकडेच पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) भारताला भेट दिली होती. या पार्श्‍वभूमीवर मिश्रा बोलत होते. त्यांनी ट्विटरद्वारे मोदींवर टीका करताना म्हटले की, ‘आपले पंतप्रधान आयएसआयचे एजंट आहेत का? भारतविरोधी शक्तींसमोर पंतप्रधानांनी शरणागती पत्करणे गंभीर आहे.‘ दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही, "मुँह मे राम बगल मे छुरी. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले एका बाजूला "भारतमाता की जय‘ म्हणत आहेत आणि दुसरीकडे आयएसआयला भारताच्या भूमीवर परवानगी देऊन भारतमातेच्या पाठीत चाकू खुपसत आहेत.‘ अशा शब्दांत सरकारवर टीका केली आहे.
=========================================
संशयावरून दलित मुलांना अमानुष मारहाण
चित्तोडगढ (राजस्थान) - मोटर सायकल चोरी केल्याचा आरोप ठेवत येथील तीन किशोरवयीन दलित मुलांना जमावाने अर्धा तास झाडाला बांधून अमानुष मारहाण करून नग्नावस्थेत धिंड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

एका उच्चवर्णीय व्यक्तीची मोटर सायकल चोरी केल्याचा आरोप ठेवत जमावाने तीन मुलांना पकडले. जमावाने त्यांना झाडाला बांधून अर्धा तास जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांचे कपडे काढून नग्नधिंड काढण्यात आली. दरम्यान काही पाहणाऱ्यांनी या घटनेची पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस पोचले आणि त्यांनी या मुलांची सुटका केली. शनिवारी घडलेल्या या घटनेचे एका प्रत्यक्षदर्शीने केलेले छायाचित्रण (व्हिडिओ) समोर आल्याने ही घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना ओळखू न शकल्याने अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी पीके खामसारा यांनी दिली. 

या प्रकरणी राजस्थानच्या बालकल्याण मंत्री अनिता भाडेल म्हणाल्या, "मी आताच व्हिडिओ पाहिला आहे. मी चित्तोडगढ प्रशासनाच्या संपर्कात आहे. या घटनेमागच्या कारणांचा शोध घेतल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल.‘ या प्रकरणी तीनही तरुणांवर चोरीचा गुन्हा दाखल केला असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.
=========================================
चीनला लवकरच मिळेल पाक दहशतवादाचा 'आहेर'
गोरखपूर- पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा फटका चीनला लवकरच बसेल, आणि पाक-चीन मैत्रीमध्ये त्यांना घरचा आहेर मिळेल तो दिवस दूर नाही, असे मत केंद्रीय मंत्री व निवृत्त लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांनी व्यक्त केले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघातर्फ जाहीर करण्यात येणाऱ्या दहशतवाद्यांच्या यादीत जैश-ए-मोहंमद संघटनेचा प्रमुख मसूद अजहर याचा समावेश करण्याचे भारताच्या प्रयत्नांना चीनने नुकताच विरोध दर्शविला आहे.

जनरल सिंह म्हणाले, "चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्री सध्या खूप घट्ट असल्याचे दिसते, परंतु पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा फटका चीनला लवकरच बसल्याचे दिसून येईल. आणि अशी परिस्थिती उदभवल्यानंतर चीनला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे."
=========================================
विदेशातील खात्यांची योग्यता तपासू- रघुराम राजन
मुंबई : जगभरातील काळ्या पैशासंदर्भातील दस्ताऐवज ‘पनामा पेपर्स‘च्या पार्श्वभूमीवर बोलताना परदेशात बँक खाते काढण्यासाठी काही कायदेशीररित्या योग्य कारणेदेखील असू शकतात, परंतु चौकशीदरम्यान त्याची योग्यता तपासली जाईल, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. 

पनामा पेपर्समध्ये नाव आढळलेल्या 500 भारतीयांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या विविध संस्थांच्या गटात रिझर्व्ह बँकेचा समावेश आहे. 
"सरकारने स्थापन केलेल्या तपास गटाचा आम्हीदेखील भाग आहोत. परंतु परदेशात बँक खाती काढण्याची काही योग्य कारणेदेखील असू शकतात हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे", असे राजन म्हणाले. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात ते बोलत होते. बँकेने आज रेपो दर 0.25 टक्क्यांनी कमी करुन 6.50 टक्के केला आहे. 

"‘लिबर्लाइज्ड रेमिटन्स स्कीम‘ अर्थात ‘एलआरएस‘ योजनेद्वारे नागरिकांना देशाबाहेर पैसा नेण्याची परवानगी आहे. परंतु हा पैसा नक्की कोणत्या मार्गाने बाहेर गेला आहे हे तपासण्याची गरज राजन यांनी यावेळी व्यक्त केली.
लिबर्लाइज्ड रेमिटन्स स्कीमअंतर्गत भारतीयांना बँकिंग व्यवहारामार्फत 2,50,000 डॉलरपर्यंत रक्कम देशाबाहेर नेण्याची परवानगी आहे. 

भारतातील सुमारे 500 उद्योजक, सत्ताधीश आणि कलाकारांचा काळा पैसा पडून असल्याची धक्कादायक बाब ‘पनामा पेपर्स‘मध्ये उघड झाली आहे. पनामामधील लॉ फर्म मोसॅक फॉन्सेकाची 11 लाख गोपनीय कागदपत्रे उघड झाली आहेत. मोसेक फॉन्सेस्का परदेशात कंपन्या स्थापन करुन देण्यास मदत करणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक नागरिकांनी आपला कर चुकवण्यासाठी मोसॅक फॉन्सेकाला पैसै देऊन टॅक्स हॅवन्समध्ये कंपन्या स्थापन केल्याचे समोर आले आहे.
=========================================
'जेआयटी'बाबतचे पाकमधील वृत्त अर्थहीन
नवी दिल्ली - पठाणकोट येथील भारतीय हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी करणाऱ्या पाकिस्तानच्या संयुक्त चौकशी पथकाला (जेआयटी) भारताच्या राष्ट्रीय तपास (एनआयए) संस्थेने सहकार्य केले नसल्याच्या वृत्त अर्थहीन असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. 

जेआयटीच्या मते पठाणकोटचा हल्ला हा भारतानेच रचलेला "ड्रामा‘ असल्याचे वृत्त पाकिस्तानमधील माध्यमांत आज प्रसारित झाले. मात्र, या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचे एनआयएने स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. जेआयटीला तपासादरम्यान भारताने वेगवेगळ्या माध्यमातून पुरेसे पुरावे दिलेले असून त्यामध्ये फोन रेकॉर्डिंग, दहशतवाद्यांच्या डीएनएचे नमुने यासह अन्य बाबींचा समावेश आहे. याशिवाय जेआयटीने मागितलेली अतिरिक्त माहितीही पुरविण्यात आली होती. तसेच दहशतवाद्यांचे मृतदेह दाखविण्याची तयारीही भारताने दाखविली होती. मात्र जेआयटीने मृतदेह पाहण्यास नकार दिला, असे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच एनआयएने जेआयटीला तपासादरम्यान सहकार्य केले नसल्याचे वृत्त नाकारत या प्रकरणामध्ये गुंतागुंत निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानमधील काही घटक करत असल्याचे एनआयएने म्हटले आहे. मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही जाळ्यात एनआयए अडकणार नसल्याचेही सांगितले आहे.
=========================================
मेघालय, आसामला भूकंपाचा सौम्य धक्का
गुवाहाटी- मेघालय, आसाम व व ईशान्येकडील काही भागांना आज (मंगळवार) दुपारी 5.4 रिश्‍टर स्केल एवढ्या क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

शिलॉंग येथील हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार, मेघालय व आसाममध्ये आज दुपारी 1 वाजून 12 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. भूकंपानंतर नागरिकांनी सुरक्षितस्थळी धाव घेतली होती. या भूकंपामध्ये कोणत्याही प्रकारची पडझड अथवा हानीचे वृत्त नाही.
=========================================
अफगणिस्तानात आत्मघाती हल्ल्यात 6 ठार
काबूल- पूर्व अफगणिस्तानमध्ये मोटार सायकलवरून आलेल्या एकाने आत्मघाती स्फोट घडवून आणला. या स्फोटात 6 ठार तर 22 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (मंगळवार) दिली. 

पोलिस अधीक्षक परवान मोहम्मद झमन ममोझई यांनी दिलेल्या माहितीनुसार, परवान येथे गजबजलेल्या भागात हा आत्मघाती स्फोट झाला. पोलिसांना लक्ष करून आत्मघाती स्फोट घडविणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु, त्याने शाळा व दवाखाने असलेल्या भागात स्फोट घडवून आणला. या स्फोटात 6 नागरिकांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. 
दरम्यान, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
=========================================
'फी' न भरल्याने विद्यार्थ्यांना कोंडले लायब्ररीत
हिंजवडी/वाकड- येथील यूरो स्कूल या इंग्रजी माध्यमच्या शाळा व्यवस्थापनाने मनमानी पद्धतीने शुल्कामध्ये अचानक वाढ केल्याने पालकांनी गोंधळ सुरू केला आहे. फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना लायब्ररीमध्ये कोंडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, फी न भरल्याच्या कारणावरून सुमारे 17 विद्यार्थ्यांच्या हातात थेट शाळेचे दाखले देण्यात आले आहेत. 

शाळा व्यवस्थापनाने नियमाच्या विरुद्ध ‘फी‘मध्ये वाढ केल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना लायब्ररीमध्ये कोंडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यास शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी ही दुजोरा दिला त्यामुळे शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. 

घटनेची माहिती मिळताच शिक्षण मंड़ळाचे काही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिकारी व शाळा प्रशासन यांच्यात चर्चा झाली. त्यांनतर या स्कूलला तीन दिवसाची नोटीस बजावण्यात आली आहे. अन्यथा मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
=========================================
बिहारमध्ये आजपासून 'ड्राय डे'
नवी दिल्ली - देशीदारुवरील बंदीनंतर बिहारमध्ये आज (मंगळवार) सर्व प्रकारच्या दारूवर बंदी करण्यात आली असून संपूर्ण दारूबंदी करणारे बिहार हे गुजरात, केरळ आणि नागालॅण्डनंतर देशातील चौथे राज्य ठरले आहे. 

यापुढे हॉटेल आणि बारमध्ये मद्याची विक्री करता येणार नाही तसेच मद्यविक्रीसाठी परवानाही दिला जाणार नाही, असे आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीर केले. मात्र, लष्कराच्या उपहारगृहात मद्यविक्री सुरूच राहणार असल्याचेही ते म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीच्यावेळी नितीश कुमार यांनी दारु बंदीवर मोठी मोहिम उघडणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. तसेच राज्यात संपूर्ण दारूबंदी करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले होते. 2014-15 या आर्थिक वर्षात राज्याला मद्यविक्रीतून 3 हजार 700 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. तर 2015-16 साठी 4 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापूर्वी गुजरात, केरळ आणि नागालॅण्डमध्ये संपूर्णपणे दारूबंदी करण्यात आली आहे.
=========================================
"भारतमाता की जय' म्हणणे राष्ट्रीय कर्तव्य-नक्वी
नवी दिल्ली - ‘भारतमाता की जय‘ म्हणणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याच्या प्रतिक्रिया संसदीय कामकाज मंत्री मुख्यतार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केल्या आहेत. 

वृत्तसंस्थेशी बोलताना नक्वी म्हणाले, ‘मला एक कळत नाही की ‘भारतमाता की जय‘ म्हणायला काय अडचण आहे. ‘भारतमाता की जय‘ म्हणण्याचे बंधन नाही. पण ज्या पद्धतीने या घोषणेचा द्वेष केला जात आहे ते अत्यंत भयानक आहे. ही मानसिकता वाईट आहे. ही घोषणा देणे घटनात्मक कर्तव्य नव्हे तर राष्ट्रीय कर्तव्य आहे.‘ 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच ‘यांना या देशात राहायचे आहे त्यांना ‘भारतमाता की जय‘ म्हणावेच लागेल‘ असे म्हटले आहे. तर योगगुरू रामदेवबाबा यांनी रोहतकमधील एका कार्यक्रमात बोलताना, "देशात कायद्याचे राज्य आहे. अन्यथा भारतमातेचा अपमान करणाऱ्या कोण्या एका व्यक्तीचे नाही, तर लाखो लोकांचे डोके उडवले असते‘, असे वक्तव्य केले आहे. त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला असून रामदेवबाबांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तीन मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी "नव्या पिढीला "भारतमाता की जय‘ म्हणा असे सांगावे लागते‘ असे म्हटले होते. दारुल उलूम देवबंद या इस्लामिक शिक्षण देणाऱ्या संस्थेने "भारतमाता की जय‘ म्हणणे हे इस्लामिक तत्त्वांत नसल्याचे म्हटले आहे.
=========================================

No comments: