Thursday, 21 April 2016

नमस्कार लाईव्ह २१-०४-२०१६ सकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाक:१७ दिवसांत ४ शरीरसौष्ठवपटूंनी गमावले प्राण 
२- न्यूयॉर्क; दहशतवादाविरुद्ध जागतिक लढ्याची आवश्‍यकता 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- ट्रेनमध्ये गर्भवती महिलेची छेड काढणा-यांना प्रभूंच्या कृपेने अटक 
४- बुलेट ट्रेन पाण्याखालूनही धावणार 
५- नैनीताल; राष्ट्रपतीही चुकू शकतात; उत्तराखंड हायकोर्टाचे मत 
६- उस्मानाबाद; सुभाषचंद्र बोस 2002 पर्यंत उस्मानाबादमध्ये राहत होते 
७- देशात रस्ते अपघातात ४०० नागरिक दररोज गमावतात जीव 
८- ..तर मुलींना पडद्यामागे ठेवावे लागेल- गिरिराजसिंह 
९- 'शक्तिमान'च्या मारेकऱ्यांना अटक करा: मनेका 
१०- "कॅम्पा' दुरुस्तीवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब 
११- पंतप्रधानपदासाठी नितीशना पाठिंबा- लालू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- मुंबई महापालिकेच्या टँकर घोटाळ्यात शिवसेनेचा हात: सोमय्या 
१३- राज ठाकरेंचा दुष्काळ दौरा की कोर्टात हजेरी 
१४- ठाणे इफेड्रीन ड्रगप्रकरणात माजी आमदाराचा मुलगा  
१५- नाशिक; अखेर महिलांचा त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश 
१६- ‘आपलं घर’ योजनेत घर बुकिंग करणाऱ्यांना पैसे परत मिळणार 
१७- मुख्यमंत्र्यांचं पैलवान राहुल आवारेला निव्वळ तोंडदेखलं आश्वासन 
१८- लातूरमधील रेल्वे स्थानकाजवळ पाणी वितरण व्यवस्थेसाठी तयार केलेली विहीर ओव्हरफुल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- देहरादून; भाजपच्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या 'शक्तीमान'चा मृत्यू 
२०- मुंबईत पार्किंग लिफ्टमधून कार कोसळली, दोन मृत्यूमुखी 
२१- बुलढाणा; कर्फ्यूमुळे थेट मोबाईलवर निकाह 
२२- चंद्रपुरात मुलाकडून आईची हत्या, गळा आणि दोन्ही हातांच्या नसा कापल्या 
२३- पोलिसांचं हैवानी कृत्य, गुन्हा वदवण्यासाठी तरुणाच्या गुदद्वारात पेट्रोल ओतलं 
२४- बीड; विहिरीतून पाणी काढताना मुलाचा मृत्यु 
२५- कुपवाडातील कारवाईत दोन दहशतवादी ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- रोहित शर्माची तुफानी खेळी, मुंबईची बंगलोरवर मात 
२७- टीव्ही अभिनेत्री इंदू वर्माला तीन वर्षांचा तुरुंगवास 
२८- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज डिस्चार्ज मिळणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असते
(उमेश जानापुरीकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
राज गायकवाड, राज सोळंकी, अमेर खान पठाण, पांडुरंग चव्हाण, चंदू काळे, कल्पेश सूर्यवंशी, लक्ष्मण गोपतवाड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

=============================================

राज ठाकरेंचा दुष्काळ दौरा की कोर्टात हजेरी

राज ठाकरेंचा दुष्काळ दौरा की कोर्टात हजेरी?
उस्मानाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यावर आहेत की न्यायालयीन सुनावणीसाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण 2008 च्या तोडफोड प्रकरणी राज ठाकरे आज परांडा आणि उस्मानाबाद न्यायालयात हजर राहणार आहेत.

राज ठाकरे आज सकाळी 11 वाजता परांडा न्यायालयात हजर राहणार आहेत तर तर दुपारी साडे बारा वाजता उस्मानाबाद न्यायालयात उपस्थित राहतील.

राज ठाकरेंना काल निलंगा कोर्टाकडून 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला होता. शिवाय त्यांना 2000 रुपयांचा दंडही ठोठावला होता

राज ठाकरे दहा दिवसांच्या दुष्काळ दौऱ्यासाठी मराठवाड्यात होचले आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर राज ठाकरे दुष्काळ दौरा करत आहेत. मात्र या दुष्काळ दौऱ्यातच राज ठाकरे कोर्टाचे खटले आटोपून घेत आहेत.
=============================================

ठाणे इफेड्रीन ड्रगप्रकरणात माजी आमदाराचा मुलगा

ठाणे इफेड्रीन ड्रगप्रकरणात माजी आमदाराचा मुलगा?
ठाणे: ठाणे पोलिसांनी कारवाई केलेल्या इफेड्रीन ड्रग प्रकरणी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. कारण तब्बल 2 हजार कोटीच्या या ड्रग प्रकरणी गुजरातमधील काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाचं नाव आता समोर येत आहे.

एका नायझेरीयन व्यक्तीवर कारवाई केल्यानंतर 2 हजार कोटी किमतीच्या या ड्रगचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. मात्र आणखी मोठे मासे अजून गळाला लागण्याची शक्यता आहे.

ड्रग्ज प्रकरणाचे सोलापूरशी धागेदोरे मिळाल्यानंतर पोलिसांनी धानेश्वर राजाराम स्वामीला अटक केली. चौकशीतून राजेंद्र डीमरी नावाच्या व्यक्तीचं नाव समोर आलं. पोलिसांनी पुण्यातून स्वामीला अटक केली. त्याच्याकडे साडेपाच किलो इफेड्रीन सापडलं. त्यानंतर पोलीस सोलापुरातील त्या फॅक्टरीपर्यंत पोहोचले.

अव्होन ऑर्गनिक्स, अव्होन मेडिसायन्सेस आणि अव्होन लाईफ सायन्सेस अशा वेगवेगळ्या नावाने कार्यरत असलेल्या सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतली एक वादग्रस्त कंपनी. सुरुवातीपासूनच या कंपनीतल्या उत्पादनावर संशयाने पाहिलं जायचं. अखेर १५ एप्रिल २०१६ रोजी ठाणे आणि अहमदाबाद पोलिसांनी मारलेल्या छाप्यात या कंपनीच खरं रूप समोर आलं.
=============================================

अखेर महिलांचा त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश

अखेर महिलांचा त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश
नाशिक : शनी चौथरा प्रवेशाननंतर आता त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातही महिलांनी प्रवेश मिळवला आहे. स्वराज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा विनीता गुट्टे यांच्यासह चार महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करुन दर्शन घेतलं.

स्वराज्य संघटनेच्या महिलांनी आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास कडेकोट पोलिस बंदोबस्तात गर्भगृहात प्रवेश केला केला.

शनी मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा लढा चालू असताना त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात प्रवेश करण्याची मागणी जोर धरु लागली होती. स्वराज्य संघटनेच्या महिला यासाठी प्रयत्नशील होत्या. मात्र मंदिर प्रशासन आणि स्थानिक भाविकांचा त्यांना प्रवेश देण्यास विरोध होता.

अटींना विरोध केल्याने महिलांना मारहाण
महिलांचा गर्भगृह प्रवेश टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर प्रशासनाने कडक अटी, शर्ती लागू केल्या आहेत. त्यानुसार सकाळी 6 ते 7 ही दर्शनासाठीची वेळ म्हणून निश्चित करण्यात आली आहे. बुधवारी स्वराज्य संघटनेच्या महिला ठरवून दिलेल्या वेळेनंतर प्रवेश करण्यासाठी आल्या. मात्र दर्शनाची वेळ संपल्याचं कारण देत मंदिर प्रशासन आणि गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या अटींना विरोध केल्यानंतर गर्भगृहासमोर असलेल्या तथाकथित संस्कृतीरक्षकांनीच महिलांना अमानुष मारहाण केली. या प्रकरणी 150 गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र आज स्वराज्य संघटनेच्या महिलांनी मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी निश्चित केलेल्या वेळेतच गर्भगृहात प्रवेश केला.
=============================================

मुंबईत पार्किंग लिफ्टमधून कार कोसळली, दोन मृत्यूमुखी

मुंबईत पार्किंग लिफ्टमधून कार कोसळली, दोन मृत्यूमुखी
मुंबई : मुंबईच्या आग्रीपाडा परिसरात 15 मजली इमारतीच्या पार्किंग लिफ्टमधून कार कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. इक्बाल हाईट्स या इमारतीत बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली.

कार लिफ्टमधून वर जाताना चालकाने चुकून अॅक्सिलेटर दाबला. त्यानंतर चालकाचा ताबा सुटला आणि लिफ्टचा दरवाजा तोडून कार दुसऱ्या मजल्यावरुन थेट जमिनीवर कोसळली. या घटनेत आठवीत शिकणारा हाफिज पटेल आणि चालक जावेद अहमद यांचा मृत्यू झाला आहे.

आठवीत शिकणारा हाफिज पटेल हा विद्यार्थी शेवटचा पेपर देऊन कारने घरी आला होता. त्यावेळी ड्रायव्हरने कार पार्किंग लिफ्टमध्ये नेली. कार दुसऱ्या मजल्यावर पोहोचली, मात्र त्याचवेळी चालकाचा पाय चुकून अॅक्सिलेटर पडला. यानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून कार जमिनीवर कोसळली.

कुटुंबीयांना या घटनेची काहीच कल्पना नव्हती. हाफिज बराच वेळ घरी न आल्याने कुटुंबीयांनी जावेद अहमदला फोन केला. परंतु प्रतिसाद न मिळाल्या त्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी जावेद अहमदच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं असता ते इक्बाल हाईट्समध्येच आढळलं. यानंतर घराजवळ शोध घेतला असता, या घटनेचा उलगडा झाला. आग्रीपाडा पोलिस पुढील तपास करत आहेत.
=============================================

मुंबई महापालिकेच्या टँकर घोटाळ्यात शिवसेनेचा हात: सोमय्या

मुंबई महापालिकेच्या टँकर घोटाळ्यात शिवसेनेचा हात: सोमय्या
मुंबई : भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. टँकर घोटाळ्यात महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा हात असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.

टँकर माफिया, पालिका अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेना नेत्यांचे लागेबांधे असून वर्षाला 500 कोटींचा घोटाळा होत असल्याचा गंभीर आऱोप सोमय्यांनी केला आहे.

मुंबईत ३० टक्के पाणीकपात करायची आणि मुंबईकरांचे पिण्याचे पाणी टॅंकरद्वारे बिल्डरांना देण्याचं काम सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

या संपूर्ण प्रकरणावर तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने महापालिका आयुक्तांची भेट घेतल्याचंही सोमय्यांनी म्हटलं आहे.
=============================================

भाजपच्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या 'शक्तीमान'चा मृत्यू

भाजपच्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या 'शक्तीमान'चा मृत्यू
देहरादून : उत्तराखंडच्या देहरादूनमधील भाजपच्या आंदोलनादरम्यान जखमी झालेला शक्तीमान घोड्याचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून शक्तीमानवर औषधांवर परिणाम होत नव्हता. शिवाय त्याच्या हालचालीही बंद झाल्या होत्या, असं डॉक्टरांनी सांगितलं.

भाजप आमदार गणेश जोशी यांच्या आंदोलनादरम्यान शक्तीमानच्या पायाला दुखापत झाल्याने त्याचा पाय कापावा लागला होता. त्यानंतर शस्त्रक्रिया करुन शक्तीमानला अमेरिकेतून मागवलेला  कृत्रिम पाय बसवण्यात आला होता. शक्तीमान बरा होऊन पुन्हा धावू शकेल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला होता. मात्र बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
=============================================

यवतमाळमध्ये लग्नसोहळ्यातून परतताना अपघात, 7 जणांचा मृत्यू

यवतमाळमध्ये लग्नसोहळ्यातून परतताना अपघात, 7 जणांचा मृत्यू
यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील पुसद-उमरखेड मार्गावर आज दुपारी तीन दुचाकीना ट्रॅक्टरने मागून धडक दिल्यानी भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये दोन सख्ख्या भावंडांचा समावेश आहे.

लग्नसोहळ्यातून परतताना भीषण अपघात

पुसदच्या चिलवाडीमधील लग्नसोहळ्यातून तीन दुचाकींवरुन ते हर्षी गावाकडे परतत होते. रस्त्यात मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, जागीच पाच जणांचा मृत्यू झाला, तर इतर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मृतांमध्ये शेषराव काळे, युवराज बुहाडे, बाळू बुहाडे, यादव ढांकरे, विलास काळे, खंडू साभारे, रवी कराळे या सात जणांचा समावेश आहे. हे सर्व लग्नसोहळा आटोपून हर्षी गावाला परत येत असताना मागून ट्रॅक्टरने धडक दिल्याने यांचा यात मृत्यू झाला. हे सर्व हर्षी आणि मारवाडी गावचे रहिवाशी आहेत. या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
=============================================

छगन भुजबळ आयसीयूत, उपचार सुरु

छगन भुजबळ आयसीयूत, उपचार सुरु
मुंबई: आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. छातीत दुखत असल्याने भुजबळ यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

भुजबळ यांना सोमवारी अचानक छातीत दुखू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भुजबळांना उच्च रक्तदाब अर्थात ब्लडप्रेशरचाही त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. मात्र त्यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नसल्याचा अहवाल,सेंट जॉर्ज रुग्णालयाने आर्थर रोड जेल प्रशासनाकडे सोपावला आहे.

भुजबळांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 27 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. छगन भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ दोघांचीही रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे.
=============================================

रोहित शर्माची तुफानी खेळी, मुंबईची बंगलोरवर मात

रोहित शर्माची तुफानी खेळी, मुंबईची बंगलोरवर मात
मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील द्वंद्वात अखेर रोहितची सरशी झाली. रोहितच्या मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरला सहा विकेट्सनी हरवून यंदाच्या मोसमातला दुसरा विजय साजरा केला. तर बंगलोरचा यंदाच्या मोसमातला हा दुसरा पराभव ठरला.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बंगलोरने मुंबईला 171 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना रोहितने सलामीला 44 चेंडूमध्ये 4 चौकार आणि तीन षटकारांसह 62 धावांची खेळी करून मुंबईच्या विजयाचा पाया घातला. मुंबईसाठी अंबाती रायुडूने 31 धावांची तर जोस बटलरनं 28 धावांची खेळी केली. मग कायरन पोलार्डच्या फटकेबाजीनं मुंबईचा विजय निश्चित केला. पोलार्डनं 19 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 40 धावा कुटल्या.

त्याआधी बंगलोरने 20 षटकांत सात बाद 170 धावा केल्या होत्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराने तीन तर हार्दिक पंड्याने दोन विकेट्स काढल्या. मिचेल मॅकलेहाननेही एक विकेट काढून मुंबईच्या विजयाला हातभार लावला.
=============================================

‘आपलं घर’ योजनेत घर बुकिंग करणाऱ्यांना पैसे परत मिळणार

‘आपलं घर’ योजनेत घर बुकिंग करणाऱ्यांना पैसे परत मिळणार
पुणे : ‘एबीपी माझा’च्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालं आहे. नागरिकांना स्वस्त घराचं स्वप्न दाखवणाऱ्या मेपल ग्रुपने नागरिकांना पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे. ‘आपलं घर’ योजनेत घर बुकिंग केलेल्या नागरिकांना पैसे परत करण्याची माहिती मेपल ग्रुपने अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

पाच लाखांत स्वस्त घर देण्याचा दावा करणाऱ्या ‘आपलं घर’ योजनेत ज्या नागरिकांनी घर बुक केलं आहे, त्यांचे पैसे परत केले जात आहेत. मात्र, याआधी ज्यांनी घर बुक केले आहेत, त्यांचे पैसे परत दिले जात नाहीत.

खरंतर मेपल ग्रुपला नागरिकांचे पैसे परत करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वीच देण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांपासून मेपल ग्रुपने सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. मात्र, आता अटक टाळण्यासाठी मेपल ग्रुपने नागरिकांचे पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे.

मेपल ग्रुपने आज दुपारपासून ‘आपलं घर’ योजनेत घर बुक केलेल्या नागरिकांचे पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे.

=============================================

टीव्ही अभिनेत्री इंदू वर्माला तीन वर्षांचा तुरुंगवास

टीव्ही अभिनेत्री इंदू वर्माला तीन वर्षांचा तुरुंगवास
नवी दिल्ली : टीव्ही अभिनेत्री इंदू वर्माला तीन वर्षांच्या सक्त तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 1996 च्या फसवणुकीप्रकरणी दिल्ली कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. तब्बल 20 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे.

न्यायाधीश लवलीन यांनी फसवणूक, कट रचणं, तोतयेगिरी आणि चेकची अफरातफर करणं या आरोपांअंतर्गत इंदू वर्माला दोषी ठरवलं. तसंच थॉमक कूक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 20 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

इंदू वर्माने शिवानी अरोरा नावाने ‘थॉमस कूक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीशी संबंधित बनावट चेकद्वारे, एका दुकानातून 6 सप्टेंबर 1996 आणि 3 ऑक्टोबर 1996 रोजी सुमारे 17.50 लाख रुपयांचे दागिने खरेदी केले होते.

दोषी इंदू वर्माने केवळ कंपनीविरोधात काम केलं नाही तर मालकाची 17.50 लाख रुपयांची फसवणूकही केली. त्यामुळे ती दया दाखवण्यासाठी लायक नाही, असं न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे.
=============================================

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज डिस्चार्ज मिळणार

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज डिस्चार्ज मिळणार
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने दिलीप कुमार यांना 15 एप्रिल रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल केलं होत.

“93 वर्षीय दिलीप कुमार यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉ.जलील पारकर यांनी दिली.
दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी सांगितलं होतं की, “दिलीपजींना ताप, छाती, कफ आणि श्वसनसंबंधित कारणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं”.
दरम्यान, अभिनेता आमिर खाननेही रुग्णालयात जाऊन दिलीप कुमार यांची विचारपूस केली होती.
=============================================

सुभाषचंद्र बोस 2002 पर्यंत उस्मानाबादमध्ये राहत होते

सुभाषचंद्र बोस 2002 पर्यंत उस्मानाबादमध्ये राहत होते?
उस्मानाबाद : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुभाषबाबू कुठं गेले? त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला की आणखी काय झालं? याचा शोध घेण्याचा प्रयत्न सरकार, संशोधक आणि तज्ज्ञांनीही केला. त्यातून बऱ्याचदा उलटसुलट माहितीही समोर आली आहे. पण आता 2002 पर्यंत सुभाषबाबू उमरग्यात राहायला होते, असा दावा मुरझानी कुटुंबानं केला आहे.

मात्र अभ्यासकांनी संबंधित व्यक्ती ही फक्त नेताजींच्या प्रेमात बुडालेला भक्त असू शकतो असं म्हटलं आहे.

उमरग्यात तीन एकरवर भारतीय संसदेच्या इमारतीची प्रतिकृती वसली आहे. 32 खांबाची ही इमारत लोकांनी नामकरण केलेल्या या लालदरी मुत्यांनी 1990 साली बांधली. या भव्य इमारतीत मुत्यानं सुभाषचंद्र बोस यांचेचं दोन फोटो लावले होते. मुत्या सुभाषबाबूंच्या फोटाला हार घालू द्यायचे नाहीत. या इमारतीत 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशी भारतमातेच्या फोटोसमोर 40 वर्षापासून झेंडावंदन सुरु आहे.
=============================================

कर्फ्यूमुळे थेट मोबाईलवर निकाह

कर्फ्यूमुळे थेट मोबाईलवर निकाह !
बुलडाणा : समुद्रात, आकाशात लग्नसोहळे पार पडल्याचं आपण ऐकलंय. पण बुलडाण्याच्या जामोद गावात एक आगळावेगळा विवाहसोहळा पार पडला. या लग्नात फोनवरच सगळे विधी पार पडले.

तारीख – 17 एप्रिल 2016,  स्थळ – जामोद, बुलढाणा जिल्हा

संग्रामपूरचे शेख रहिम यांची कन्या शबिना परवीन
आणि
जामोदमधील शेख हरून यांचा मुलगा
शेख वासिम  यांचा निकाह

आपल्या होणाऱ्या दुल्हे राजाची वाट पाहत शबिना नटून-थटून बसली. मात्र संग्रामपूरमध्ये दुल्हे राजा पोहचण्याआधी जामोदमध्ये भडकलेल्या दंगलीची बातमी थडकली.

जामोदमध्ये दोन गटात वाद उफाळला. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की पोलिसांनी कर्फ्यू लावला. शबिनाचा होणारा पती जामोदचा असल्यामुळं तो निकाहच्या मुहुर्तावर संग्रामपूरमध्ये पोहोचणं अशक्य होतं.  इकडे संग्रामपूरमध्ये शबिनाच्या घरी आनंदाच्या वातावरणावर चिंतेचं मळभ दाटलं.
=============================================

चंद्रपुरात मुलाकडून आईची हत्या, गळा आणि दोन्ही हातांच्या नसा कापल्या

चंद्रपुरात मुलाकडून आईची हत्या, गळा आणि दोन्ही हातांच्या नसा कापल्या
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. उच्चभ्रू घराण्यातील एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली आहे. अंजली हेमंत कुलकर्णी असे मृत्युमुखी पडलेल्या आईचं नाव आहे.

59 वर्षीय अंजली कुलकर्णी यांची हत्या पोटच्या मुलाने केली. मुलाने आईच्या हाताच्या दोन्ही नसा आणि गळा कापून अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. चंद्रपूर शहरातील तुकूम भागातील अपगन्लावर लेआऊटमध्ये ही घटना घडली आहे.

आरोपी मुलाने बहिणीला एसएमएसद्वारे दिलेल्या माहितीवरुन ही खळबळजनक घटना उघडकीस आली.

चंद्रपुरातील खत्री कॉलेजसमोर आरोपी मुलाचं मोबाईलचं दुकान आहे. पोलिसांनी हत्येमागच्या कारणाचा शोध सुरु केला आहे. मात्र, पैशाच्या कारणावरुन हत्येची घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
=============================================

पोलिसांचं हैवानी कृत्य, गुन्हा वदवण्यासाठी तरुणाच्या गुदद्वारात पेट्रोल ओतलं

पोलिसांचं हैवानी कृत्य, गुन्हा वदवण्यासाठी तरुणाच्या गुदद्वारात पेट्रोल ओतलं!
चंद्रपूर : तळपायाची आग मस्तकात जावी, असं अमानवी कृत्य चंद्रपूर पोलिसांनी केलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारु बंदी आहे. पोलिसांनी शेगावमधील दारु अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत सापडलेल्या अल्पवयीन मुलाकडून गुन्हा वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चक्क त्याच्या गुदद्वारात पेट्रोल ओतल्याची घटना घडली आहे.

सध्या या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

पीडित मुलगा हा शेगावमध्ये आजोबांकडे पाहुणा म्हणून आला होता. पीडित मुलगा आजोबांनी सांगितलेल्या इसमाला बोलवण्यासाठी गेला असता, त्याठिकाणी पोलिसांची धाड पडली होती. त्यावेळी पोलिसांनी अल्पवयीन मुलालाही अटक केली आणि गुन्हा वदवून घेण्यासाठी पोलिसांनी पीडित मुलाच्या गुदद्वारात पेट्रोल ओतले.

जमिनावर सुटल्यानंतर पीडित मुलानं पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
=============================================

मुख्यमंत्र्यांचं पैलवान राहुल आवारेला निव्वळ तोंडदेखलं आश्वासन

मुख्यमंत्र्यांचं पैलवान राहुल आवारेला निव्वळ तोंडदेखलं आश्वासन!
मुंबई : महाराष्ट्राचा गुणी पैलवान राहुल आवारेला मंगोलियातल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळण्याची संधी मिळवून देऊन, त्याच्यावरचा अन्याय दूर करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिलेले आश्वासन निव्वळ तोंडदेखलं ठरलं. 22 एप्रिलपासून मंगोलियात सुरू होत असलेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघ जॉर्जियाहून रवानाही झाला. पण राहुल आवारे मंगोलियाच्या व्हिसाअभावी अजूनही भारतातच अडकून पडला आहे.
 आणि राहुलचं स्वप्न अधुरंच राहिलं!
 मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दिलेल्या आश्वासनानुसार, राहुलला खरं तर मंगळवारी दिवसभरात भारतीय कुस्ती फेडरेशनचं निवडीचं पत्र मिळणं अपेक्षित होतं. जेणेकरून राहुलला मंगोलियाच्या व्हिसासाठी अर्ज दाखल करता आला असता. पण मंगळवारी दिवसभर ताटकळूनही राहुलला भारतीय कुस्ती फेडरेशनचं पत्र मिळालं नाही. त्यामुळं दिवसभरात त्याचा व्हिसा होऊ शकला नाही. परिणामी रिओ ऑलिम्पिकसाठी आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर पात्र ठरण्याचं राहुल आवारेचं स्वप्न अधुरंच राहिलं.
=============================================

देशात रस्ते अपघातात ४०० नागरिक दररोज गमावतात जीव

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. २१ - जगभरात भारतातील रस्ते अतिशय धोकादायक मानले जातात. २०१५ साली यावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे. इतर वर्षांच्या तुलनेत २०१५ सालात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या प्रमाणात ५ टक्के वाढ झाली असून हा आकडा १.४६ लाखांवर पोचला आहे. गेल्या वर्षी रस्ते अपघातात दररोज सुमारे ४०० नागरिकांनी जाव गमावल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, दर साडेतीन मिनिटांनी एक नागरिक अपघातात मृत्यूमुखी पडतो. 
    हा आकडा म्हणजे सरकारसाठी धोक्याचा इशारा आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी २०२० पर्यंत रस्ते अपघातात जीव गमवाव्या लागणा-यांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य समोर ठेवले होते. 
    विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातामुळे जीव गमवाव्या लागणा-यांची संख्या सर्वाधिक (१७,६६६) आहे, त्यामागोमाग तामिळनाडूचा (१५,६४२) नंबर लागतो. या यादीत महाराष्ट्र तिस-या (१३,२१२) क्रमांकावर असून राजस्थानमध्ये मृतांचा आकडा १०,५१० इतका असल्याचे समजते. 
    दरम्यान मोठ्या राज्यातींल मृतांचा आकडा वाढत असतानाच, १० छोट्या राज्यांसह दिल्ली, चंदीगडसहित केंद्रशासित प्रदेशांमधील मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. आसाममध्ये हे प्रमाण सर्वात कमी आहे.
=============================================

ट्रेनमध्ये गर्भवती महिलेची छेड काढणा-यांना प्रभूंच्या कृपेने अटक

  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. २१ - ट्रेनमध्ये गर्भवती महिलेची छेड काढणा-या आरोपींना केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. महिलेच्या पतीने काही लोक पत्नीची छेड काढत असल्याची तक्रार केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्विटरच्या माध्यमातून केली. त्यानंतर सुरेश प्रभू यांनी लगेच रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले. आरपीएफने तात्काळ धनाबाद रेल्वे स्थानकार पोहोचून कारवाई करत पाचही आरोपींना अटक केली. 
    हे दांपत्य अजमेर - सियालदह एक्स्प्रेसने अजमेरहून गयाला जात होते. यावेळी तरुणांचा एक ग्रुप या ट्रेनमध्ये चढला. या तरुणांनी महिलांची छेड काढण्यास सुरुवात केली. पिडीत महिलेच्या पतीने आणि इतर प्रवाशांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांना नीट वागण्याची तंबीही दिली. पण तरीही हे तरुण ऐकण्यास तयार नव्हते. प्रवाशांनी तिकीट तपासणीस आणि कोच अटेंडंटलादेखील तक्रार केली. मात्र कोणताच रेल्वे अधिकारी मदतीसाठी पुढे आला नाही. 
    गया रेल्वे स्थानकावर या दांपत्याने ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला मात्र या ग्रुपने त्यांना अडवलं. शेवटी महिलेच्या पतीने धनाबाद रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाच ट्विट करुन तक्रार केली. धनाबाद आरपीएफने कारवाई करत पाचही आरोपींना अटक केली. हे प्रकरण रेल्वे पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे. आरोपींची चौकशी अगोदरच करण्यात आली आहे अशी माहिती आरपीएफ धनाबादचे अधिकारी बी के मिश्रा यांनी दिली आहे.
=============================================

बुलेट ट्रेन पाण्याखालूनही धावणार

  • नवी दिल्ली : मुंबई ते अहमदाबाद ही बुलेट ट्रेन तब्बल २१ किलोमीटरचे अंतर समुद्रातून धावणार आहे.
    त्यामुळे समुद्रातून रेल्वेने प्रवास करण्याचा अनुभव लाखो भारतीयांना मिळणार आहे. मात्र त्यासाठी भारतात बुलेट ट्रेन सुरू होण्याची वाट पाहावी लागेल.
    मुंबई ते अहमदाबाद या मार्गात २१ किलोमीटर अंतर समुद्रातील असून, तो भाग ठाण्याचा आहे. तिथे बुलेट ट्रेनसाठी समुद्रामध्ये बोगदे बांधण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे रेल्वेने ठरवले असले तरी तो प्रत्यक्षात कधी पूर्ण होईल, हे मात्र रेल्वेचे अधिकारी सांगू शकले नाहीत. याचे कारण प्रत्यक्ष काम सुरू व्हायलाच २0१८ साल उजाडेल, असे सांगण्यात येत आहे.
    या प्रकल्पाला ९७ हजार ६३६ कोटी रुपये खर्च येणार असून, त्यापैकी ८१ टक्के रकमेचे कर्ज जपानकडून 0.१ टक्के व्याजाने मिळणार आहे. उरलेल्या रकमेत ५0 टक्के वाटा रेल्वेचा असेल आणि महाराष्ट्र व गुजरात प्रत्येकी २५ टक्के रक्कम देतील.
=============================================

राष्ट्रपतीही चुकू शकतात; उत्तराखंड हायकोर्टाचे मत

  • नैनीताल : राष्ट्रपतीही चुकू शकतात त्यामुळे उत्तराखंड विधानसभा निलंबित ठेवण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाच्या वैधतेबाबत न्यायालयीन समीक्षा केली जाऊ शकते, असे उत्तराखंड उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्टकेले.
    उत्तराखंडमध्ये कलम ३५६ अन्वये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय राजकीय शहाणपणातून घेतल्याचा युक्तिवाद मोदींच्या सरकारने केला. त्यावर लोक चूक करू शकतात. मग ते राष्ट्रपती असोत किंवा न्यायाधीश. राष्ट्रपतींनी त्यांच्यासमोर सादर केलेल्या तथ्यांच्या आधारे कायदेशीर हस्तक्षेप केला असला तरी त्यांचा निर्णय न्यायालयीन समीक्षेसाठी खुला आहे, असे मुख्य न्यायाधीश के.एम. जोसेफ आणि व्ही.के. बिस्त यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. त्यावर राष्ट्रपतींच्या समक्ष ठेवण्यात आलेली तथ्ये पाहता त्यांचा निर्णय न्यायालयापेक्षा भिन्न असू शकतो, असा दावा केंद्राने केला.
    उत्तराखंडच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे या राज्यातील परिस्थितीबाबत पाठविलेला अहवाल पाहता २८ मार्च रोजी विधानसभेत शक्तिपरीक्षणाकडे वाटचाल चाललेली होती, हे स्पष्ट होते असे खंडपीठाने म्हटल्यानंतर केंद्राने उपरोक्त युक्तिवाद केला.
    ३५ आमदारांनी तसेच काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांनी मतविभाजनाची मागणी केल्याचा उल्लेख राज्यपालांनी १९ मार्च रोजी राष्ट्रपतींकडे पाठविलेल्या अहवालात केलेला नाही. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज व्यक्त करणारी कोणतीही भीती राष्ट्रपतींच्या मनात नव्हती. त्याबाबत कोणतीही
    तथ्ये त्यांच्यासमक्ष नव्हती. असे असताना ३५ आमदार विरोधात उभे ठाकले ही बाब किंवा राज्यपालांनी तसा सुपूर्द केलेला अहवाल केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवटीच्या निर्णयाप्रत येण्यासाठी समाधानकारक कसा मानला? असा सवालही न्यायालयाने केला. 
=============================================
..तर मुलींना पडद्यामागे ठेवावे लागेल- गिरिराजसिंह
पाटना (बिहार) - भारत सरकारने आपल्या लोकसंख्येच्या धोरणात बदल केला नाही भारतातील मुलींनाही पाकिस्तानप्रमाणे पडद्यामागे ठेवावे लागेल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीराज सिंह यांनी केले आहे. 

संग्रहित चित्र

बिहारमधील पश्‍चिम चंपारण्य येथे एका कार्यक्रम सिंह बोलत होते. ते म्हणाले, "हिंदूंना दोन मुले आणि मुस्लिमांनाही दोनच मुले असली पाहिजे. आपली लोकसंख्या कमी होत आहे. बिहारमध्ये सात जिल्हे असे आहेत जेथे आपली लोकसंख्या कमी होत आहे. लोकसंख्या नियंत्रणाच्या नियमांमध्ये बदल करायला हवा. जर आताच नियमांमध्ये सुधारणा केली नाही तरच आपल्याकडील मुली सुरक्षित राहतील. अन्यथा पाकिस्तानप्रमाणे आपल्या मुलींनाही पडद्यामागे ठेवावे लागेल.‘ 

या कार्यक्रमाला अनेक साधू तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी "धर्म वाचवा‘ असे आवाहनही सिंह यांनी उपस्थित साधूंना केले. त्यासाठी सांस्कृतिक यात्रा काढण्याची सूचनाही त्यांनी केली.
=============================================
विहिरीतून पाणी काढताना मुलाचा मृत्यु
बीड : दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात पाणी टंचाईचा आणखी बळी केला असून विहरीतून पाणी काढताना एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. 

बीड जिल्ह्यातील केज तालुक्‍यातील विडा येथे एक आज (गुरुवार) सकाळी एक 11 वर्षांचा मुलगा घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतील पाणी काढण्यासाठी गेला. दरम्यान पाणी काढताना विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यु झाला. बीड जिल्ह्यात रविवारी अशाच एका घटनेत एका शाळकरी मुलीचा मृत्यु झाला. बीड जिल्ह्यातील योगिता अशोक देसाई (वय 11) ही शाळकरी मुलगी आईसोबत हातपंपावरून पाणी आणण्यासाठी गेली होती. दरम्यान तीव्र उन्हात हंडा भरण्यासाठी अर्धा तास थांबावे लागण्याने तिचा उष्माघाताने मृत्यु झाला.

=============================================
'शक्तिमान'च्या मारेकऱ्यांना अटक करा: मनेका
नवी दिल्ली- ‘शक्तिमान‘च्या मृत्युबद्दल केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी दु:ख व्यक्त करत त्याच्या मृत्युला जबाबदार असलेल्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. 

भारतीय जनता पक्षाचे आमदार गणेश जोशी यांनी आपल्या समर्थकांसह 14 मार्च रोजी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांच्याविरोधात केलेल्या आंदोलनात शक्तिमान हा घोडा जखमी झाला होता. त्यामध्ये घोड्याचा एक पाय निकामी झाला होता. त्यानंतर घोड्यावर उपचार करून कृत्रिम पाय बसविण्यात आला होता. मात्र बुधवारी त्याचा मृत्यु झाला. या पार्श्‍वभूमीवर बोलताना गांधी म्हणाल्या, ‘शक्तिमानच्या मृत्युमुळे मला खूप दु:ख झाले आहे. ही एक दुर्दैवी घटना आहे. यापुढे घोड्यांचा पोलिसांकडून वापर होऊ नये. तसेच "शक्तिमान‘ला पोलिस अधिकारी असल्याचे म्हणत पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येला कारणीभूत असलेल्यांना अटक करण्यात यावी अशी मागणीही गांधी यांनी केली.
=============================================
‘प्रभू’ आले द्यायला, पदर नाही घ्यायला

लातूर - मिरजहून आणलेल्या रेल्वेने येथील रेल्वे स्थानकाजवळ पाणी वितरण व्यवस्थेसाठी तयार केलेली विहीर पाण्याने भरली आहे.

पाइपलाइन निखळल्याने पाणी वाया; विहीर तुडुंब; रेल्वे जागेवरच

लातूर - केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कृपेने बुधवारी ५० वॅगनने पाणी घेऊन आलेली पहिली रेल्वे लातुरात दाखल झाली. हे पाणी उपसताना पाइप निखळल्याने पाणी तर वाया गेलेच; पण विहिरीतील पाण्याचा उपसा दिवसभर थांबला. विहीर पाण्याने काठोकाठ भरल्याने वॅगनमधील पाणी उतरविता आले नाही, त्यामुळे ‘प्रभू’ आले द्यायला पदर नाही घ्यायला, अशी काहीशी अवस्था महापालिकेची झाली.

मिरजहून ५० वॅगनमध्ये पाणी घेऊन आलेली जलदूत बुधवारी सकाळी येथील रेल्वे स्टेशनमध्ये दाखल झाली. सकाळी सव्वाआठपासून विहिरीत पाणी उतरवून घेण्याचे काम सुरू झाले होते. सकाळी साडेदहापर्यंत ४० वॅगनमधील पाणी विहिरीत उतरवून घेण्यात आले. त्याचा उपसाही सुरू होता. याकरिता २० अश्‍वशक्तीच्या बारा मोटारी बसविण्यात आल्या होत्या. एका पाइपद्वारे हे पाणी टॅंकर पॉइंटपर्यंत नेले जात होते. तेथून मोठ्या टॅंकरद्वारे हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रात नेले गेले. पण, अवघ्या दोन तासांत विहिरीतील पाण्याचा उपसा करून टॅंकर पॉइंटकडे पाणी नेण्यासाठी बसविण्यात आलेला पाइप निखळला. यामुळे पाणी वाया गेले. त्यानंतर सर्व उपसा पंप बंद करण्यात आले. 
=============================================
पाक:१७ दिवसांत ४ शरीरसौष्ठवपटूंनी गमावले प्राण
उत्तेजक अतिसेवनाच्या महाभयंकर परिणामाने क्रीडाविश्‍व हादरले

कराची - उत्तेजक सेवनाच्या वेगळ्याच घटनेने पाकिस्तान क्रीडा क्षेत्र आज हादरून गेले. शरीरसंपदा जपण्यासाठी स्टेरॉइड्‌सचे बेकायदेशीररीत्या अतिसेवन केल्याने पाकिस्तानात गेल्या १७ दिवसांत चार शरीरसौष्ठवपटूंना प्राण गमवावे लागल्याचे वृत्त समोर आले आहे.

अवघे क्रीडा विश्‍व या ना त्या प्रकारे उत्तेजक सेवनाच्या पडलेल्या विळख्याचा सामना करत असतानाच पाकिस्तानातील या घटनेने केवळ पाकिस्तानच नाही, तर संपूर्ण क्रीडा विश्‍वच हबकून गेले आहे. यशासाठी शॉर्ट-कट मारण्याचा फटका किती जीवघेणा असू शकतो, हेच या घटनेवरून समोर आले. जीव गमावलेल्या चार पाकिस्तानी शरीरसौष्ठवपटूंमध्ये दोन खेळाडू हे दक्षिण आशियाई स्पर्धेतील पदकविजेते होते. यामध्ये एका कुस्तीपटूचाही समावेश आहे. 

शरीरसौष्ठवपटू मकलूब हैदर याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यापूर्वी कुस्तीपटू रिझवान आणि दक्षिण आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते शरीरसौष्ठवपटू हुमायून खुर्रम आणि ब्राँझ पदक विजेता हमिद अली यांचा यात समावेश आहे. या चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण अजून समोर आले नसले, तरी चौघांनी उत्तेजकाचे अतिसेवन केल्याचे उघड झाले आहे. 

‘दि नेशन’ या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार या चौघांच्या मृत्यूचे कारण उत्तेजकांचे अतिसेवन असून, स्टेरॉइड्‌स आणि शरीरसंपदा वाढवणारी औषधे ही पाकिस्तानात बेकायदेशीररीत्या दुबई आणि इराण येथून येतात. विशेष म्हणजे यातील काही औषधे ही कालबाह्य झालेली असतात. 
=============================================
पहिली बुलेट धावणार समुद्राच्या पोटातून
नवी दिल्ली - मुंबई-अहमदाबाददरम्यान सुरू होणारी पहिली हायस्पीड बुलेट ट्रेन चक्क समुद्राच्या पोटातून धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांना पाण्याखालील प्रवासाचे थ्रिल अनुभवता येईल. या हायस्पीड बुलेट ट्रेन कॉरिडॉरची लांबी 508 किलोमीटर एवढी असून, त्यामध्ये 21 कि.मी. लांबीच्या समुद्राखालील मार्गाचा समावेश असेल, असे रेल्वे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या कॉरिडॉरचा बहुतांश भाग हा उन्नत मार्ग असून, ठाणे आणि विरारदरम्यान ही मेट्रो ट्रेन समुद्राखालून धावेल. या प्रकल्पावर 97,636 कोटी रुपये खर्च केले जाणार असून, यातील 81 टक्के गुंतवणूक ही जपान सरकारची असेल. 

या प्रकल्पाची एकून किंमत निर्धारित करताना संभाव्य किंमत, व्याजदरातील वाढ, बांधकाम व आयात शुल्काचाही विचार करण्यात आला आहे. यासाठीची रक्कम ही 50 वर्षांसाठी कर्जाऊ स्वरूपात दिली जाणार असून, तिच्या मुदतीमध्ये आणखी पंधरा वर्षांची वाढ केली जाऊ शकते, अशी माहितीही अधिकाऱ्याने दिली. या मेट्रो प्रकल्पासाठी लागणारे रेल्वे इंजिन, डबे, सिग्नल आणि ऊर्जा प्रणालीसाठीचे बहुतांश साहित्य जपानमधून आयात करण्यात येईल. तसा अधिकृत करारदेखील जपानसोबत करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीचे अधिकृत खोदकाम 2018 च्या अखेरीस सुरू होणार आहे. 

विशेष कंपनी 
या प्रकल्पाचा अग्रक्रम लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने "नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड‘ ही विशेष कंपनी स्थापन केली असून, त्यासाठी पाचशे कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. रेल्वे खात्याने दोनशे कोटी रुपये यासाठी दिले असून, महाराष्ट्र आणि गुजरातला प्रत्येकी 25 टक्‍क्‍यांचा वाटा उचलावा लागेल.
=============================================
कुपवाडातील कारवाईत दोन दहशतवादी ठार
संग्रहित चित्रकुपवाडा - लष्कर आणि जम्मू काश्‍मीर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी झाले असून अन्य दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. 

जम्मू काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब येथील पुतशाही परिसरात झालेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. लोलाब परिसरात चार दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेण्याची मोहिम राबविण्यात आली. आज (गुरवार) सकाळी सुरु झालेली ही कारवाई अद्यापही सुरु असून अन्य दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.
=============================================
दहशतवादाविरुद्ध जागतिक लढ्याची आवश्‍यकता
न्यूयॉर्क - अमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवाद्यांचे जाळे यांची वाढत जाणारी एकजूट रोखण्याच्या दृष्टीने त्यांचे अर्थकारण विस्कळित करण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्रितपणे लढा दिला पाहिजे, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली. या राक्षसामुळे जगभरातील शांतता, सुरक्षितता आणि स्थिरतेला धोका निर्माण झाला असल्याचेही भारताने नमूद केले. 

भारताचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दहशतवाद आणि अमली पदार्थांची तस्करी, तसेच सीमेपलीकडून होणाऱ्या गुन्ह्यांमुळे बेकायदेशीर आर्थिक स्रोतांचा प्रवाह वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी याविरुद्ध लढा देण्यासाठी भारताच्या पूर्ण सहकार्याचे आश्‍वासनही दिले. भारताचे शेजारी देश लवकरच अमली पदार्थाशी संबंधित गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी योजना तयार करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

जेटली यांनी अमली पदार्थांच्या समस्येवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेच्या 30व्या विशेष सत्रात बोलताना मंगळवारी सांगितले, की अमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादी नेटवर्कच्या वाढत्या व्याप्तीमुळे जगभरातील शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेला धोका निर्माण झाला आहे. आपल्याला या वाईट गोष्टींविरुद्धचा आपला एकत्रित लढा या पुढेही भक्‍कम ठेवावा लागेल. अमली पदार्थांच्या बाबतीत भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या तिन्ही करारांविषयी वचनबद्ध आहे. 

प्रखर आणि प्रामाणिक राष्ट्रीय प्रयत्नही अमली पदार्थांची समस्या रोखू शकत नाहीत. त्यासाठी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्‍यक आहे. 
- अरुण जेटली, भारताचे अर्थमंत्री 
=============================================
"कॅम्पा' दुरुस्तीवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब
नवी दिल्ली - वनीकरण वाढीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि आर्थिक मदत देणाऱ्या "कॅम्पा‘ विधेयकातील दुरुस्त्यांवर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले. विधेयकावर संसदेच्या मंजुरीनंतर बॅंकांमध्ये पडून असलेला 42 हजार कोटींचा निधी वनीकरणासाठी उपलब्ध होणार आहे. याशिवाय, 22 एप्रिलला भारत पर्यावरणविषयक महत्त्वाच्या पॅरिस करारावर सह्या करणार असून, या भूमिकेला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला. 

पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती दिली. "कॉम्पन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग ऍथॉरिटी‘ या नावाने प्राधिकरण स्थापनेची तरतूद असलेले "कॅम्पा‘ विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आहे. संसदेच्या स्थायी समितीने विधेयकाच्या अध्ययनानंतर त्यात आणखी सुधारणा सुचविल्या होत्या. स्थायी समितीच्या शिफारशींनुसार विधेयकात दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. या दुरुस्त्यांना मंत्रिमंडळाने होकार दर्शवला. आता सुधारित विधेयक मंजुरीसाठी संसद अधिवेशनात सादर केले जाणार आहे. विधेयक मंजूर झाल्यास राज्यांना 42 हजार कोटी रुपयांचा निधी वनीकरणासाठी दिला जाईल, असे जावडेकर यांनी सांगितले. 

पॅरिस करारावरील भारताच्या भूमिकेला मंत्रिमंडळाने होकार दिला असून, या करारावर भारतासोबत 130 हून अधिक देश सह्या करणार आहेत. जावडेकर म्हणाले, की या करारामध्ये पर्यावरणीय न्याय (क्‍लायमेट जस्टिस) आणि शाश्‍वत ऊर्जा उपयोग जीवनशैली या दोन्हींचा समावेश असून विकासाला प्राधान्य देणारा आणि विकसित देशांवर अधिक जबाबदारी टाकणारा हा करार आहे. 
=============================================
पंतप्रधानपदासाठी नितीशना पाठिंबा- लालू
पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची "दिल-दोस्ती‘ विधानसभा निवडणुकीपासून दिसू लागली आहे. अनेक वर्षे विरोधात असणारे हे दोन्ही तुल्यबळ नेते आता एकमेकांच्या इतके जवळ आले आहेत की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीशकुमार यांना पंतप्रधानपद मिळण्यासाठी आपला पाठिंबा असल्याचे लालूप्रसाद यांनी जाहीर केले. 

बिहारचा नेता पंतप्रधानपदी विराजमान झाल्यास राज्यासाठी ती अभिमानाची व आनंदाची घटना असेल, असे त्यांनी सांगितले. 1995 नंतर खुद्द लालूप्रसाद यांच्याकडेच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहिले जात होते. नितीशकुमार यांनी "संघमुक्त भारता‘ची घोषणा करीत भारतीय जनता पक्षाविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येण्याची वेळ आली असल्याचे नुकतेच म्हटले आहे. देशात एकेकाळी कॉंग्रेसला विरोध होत होता. आता भाजप देशासाठी धोकादायक ठरू लागल्याने भाजपच्या विरोधात वातावरण आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधानपदासाठी नितीशकुमार यांचे नाव पुढे करून लालूप्रसाद थांबले नाहीत, तर त्यांच्या संघविरोधी भूमिकेचेही समर्थन केले. ""भाजप ही संघाची कठपुतळी आहे. संघाची विचारसरणी देशाचे तुकडे करणारी आहे,‘‘ अशी टीका त्यांनी केली. भाजप देश तोडायला निघाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा "अजेंडा‘ राबविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजप केवळ मुखवटा आहे. देशावर खरी सत्ता तर संघाची आहे, असे सांगून लालूप्रसाद यांनी संघ व भाजपला लक्ष्य केले. भाजप व संघाला रोखण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. नितीशकुमार यांनी संघाच्या विरोधात जी मोहीम सुरू केली आहे, ती योग्यच असून, काळाची ती गरज आहे, असेही ते म्हणाले.
=============================================

No comments: