Monday, 11 April 2016

नमस्कार लाईव्ह ११-०४-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- मॉस्को; रशियात पोलिस चौकीबाहेर तीन आत्मघाती हल्ले 
२- होरोशिमा; जॉन केरींची हिरोशिमास ऐतिहासिक भेट 
३- युक्रेनमध्ये 2 भारतीय विद्यार्थ्यांची भोसकून हत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- जेलमधून भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र 
५- ना थांबा, ना क्रॉसिंग, 8 तासात पाणी एक्स्प्रेस लातुरात? 
६- सुरक्षित, स्थिर मालदीव भारताच्या हिताचा: मोदी 
७- 'एनआयए' मसूदला रेड कॉर्नरची नोटीस बजावणार 
८- जयपूर; पंतप्रधान देशातील 'सेक्‍युलर टोळी'चे बळी: नक्वी 
९- शेतकऱ्यांचं जिणं 'ट्रॅजेडी'; कारखाने बंद करा- यादव 
१०- मोदींच्या सभेला गर्दी करण्याचे कॉलेजांना 'टार्गेट' 
११- विमानात ऐकतो जगजित, गुलाम अली - गडकरी 
१२- केरळ: आगीनंतर मंदिराचे विश्वस्त बेपत्ता 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१३- डान्सरवर पैसे उडवण्याऐवजी बिलातून चुकते करा, सुधारित विधेयकात तरतूद 
१४- डान्सबार सुधारीत विधेयक विधानपरिषदेत एकमताने मंजूर, डान्सबारला सरसकट बंदी नाही 
१५- उत्तर प्रदेश; मुलींनी 'जीन्स' पॅन्ट घालू नये; पंचायतीचा फतवा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- विरार; रेल्वे स्थानकावर भरगर्दीत माथेफिरुनं तरुणाला भोसकलं, थरार सीसीटीव्हीत कैद 
१७- पुणे; सतीश शेट्टी हत्या : आणखी एक माजी पोलीस अधिकारी अटकेत 
१८- 30 लाख लुटून विरारमध्ये व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या
१९- सोरभोग; आसाममध्ये मतदानावेळी भांडण; ज्येष्ठाचा मृत्यू 
२०- नाशिक; लांडे खून- चौघांना जन्मठेप, दोघांना सक्तमजुरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- अजय-अतुलही झाले सैराट, झिंगाटवर तुफानी डान्स 
२२- पेट्रोल भरताना तुमची अशी फसवणूक तर होत नाही ना? 
२३- सॅमसंग गॅलक्सी नोट 5 स्वस्त, तब्बल 9000 रुपयांची सूट 
२४- दररोज 21 किमी चालणं, 5 तास व्यायाम, अनंत अंबानीचे खडतर परिश्रम 
२५- रैनाच्या गुजरात लायन्ससमोर मिलरच्या किंग्ज XI पंजाबचं आव्हान 
२६- ‘द जंगल बुक’ आणखी सुसाट, विकेंडला बक्कळ कमाई 
२७- मास्टर ब्लास्टर सचिनच्या चित्रपटाचे पोस्टर लाँच 
२८- आयपीएल कोणाची? सामान्यांची की श्रीमंतांची? 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
विश्वास मागून मिळत नसतो, तों कमवावा लागतो
(सोमेश मारावर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


===========================================

जेलमधून भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र

जेलमधून भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तुरुंगातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. या पत्रात महात्मा जोतिबा फुले यांची 125 वी पुण्यतिथी आणि शतकोत्तर रौप्य स्मृतीवर्षाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याबद्दल भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात भुजबळांनी लिहिलं आहे की, “जोतिबा फुले यांचं निधन 28 नोव्हेंबर 1890 रोजी झालं. त्याला 125 पू्र्ण होत असल्याने राज्य सरकारने शतकोत्तर रौप्य स्मृती वर्ष पाळावा, अशी मागणी. अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने केली होती. पंरतु तुमच्या नेतृत्त्वाखालील सरकारने त्याकडे दुर्लक्ष करुन 28/11/2016 ते 28/11/2017 या काळासाठी कोणतंही नियोजन केलेलं नाही. अशाप्रकारचं दुर्लक्ष महाराष्ट्राच्या सामाजिक पुरोगामी विचारांचा अवमान करणारे आहेत.”
===========================================

रेल्वे स्थानकावर भरगर्दीत माथेफिरुनं तरुणाला भोसकलं, थरार सीसीटीव्हीत कैद

रेल्वे स्थानकावर भरगर्दीत माथेफिरुनं तरुणाला भोसकलं, थरार सीसीटीव्हीत कैद
मुंबई: विरार रेल्वे स्थानकावर एका माथेफिरुनं तरुणाची धारदार चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.  परंतु हत्या करणाऱ्या तरुणाला विरार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर हत्या करणारा तरुण पाच मिनिटे ब्रिजवर हातात चाकू घेऊन फिरत होता. ही घटना रेल्वेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रेल्वेच्या आर.पी.एफ. जवानांनी त्याला मोठया शिताफीने पकडलं. 
या घटनेनं प्रवाशांची मोठी धावपळ सुरु होऊन काही वेळ त्या ठिकाणी दहशत पसरली होती.  हत्या झालेल्या तरुणाची ओळख अजून पटलेली नसून, हत्या रेल्वेत वर्ग करायची किंवा विरार पोलिस ठाण्यात याबाबात दोघांत उशिरापर्यंत संमभ्र होता.
 विरार रेल्वे स्थानकाचे पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे ब्रिजवरती एका माथेफिरु तरुणाने आज सकाळी दहाच्या सुमारास हातातील धारदार चाकूने ३० ते ३५  वयोगटातील इसमाची हत्या केली. महेंद्र कुमार पाल नाव आणि दहिसर येथील रहिवासी असल्याचे हा माथेफिरु सध्या सांगत आहे. परंतु त्याने ही हत्या का व कशासाठी केली याचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. 
रेल्वे स्थानकात अनेक फेरीवाले आणि गर्दुल्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होत असल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.
===========================================

ना थांबा, ना क्रॉसिंग, 8 तासात पाणी एक्स्प्रेस लातुरात?

ना थांबा, ना क्रॉसिंग, 8 तासात पाणी एक्स्प्रेस लातुरात?
सांगली : लातुरकरांची तहान भागवण्यासाठी मिरजेतून पाण्याने भरलेल्या 10 वॅगनची रेल्वे रवाना झाली आहे.  या दहा वॅगनमध्ये पाणी भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरु होतं. या 10 वॅगन भरल्यानंतर त्या तातडीने लातुरकडे रवाना करण्यात आल्या. 
एका वॅगनमध्ये 50 हजार लिटर पाणी आहे. म्हणजे या 10 वॅगनमधून तब्बल 5 लाख लिटर पाणी घेऊन रेल्वे रवाना झाली आहे.
पंढरपूर – कुर्डवाडी – उस्मानाबाद – लातूर असा या पाणी एक्स्प्रेसचा मार्ग असेल. हा प्रवास पूर्ण होण्यासाठी साधरणात: 9 तास लागतात. पण या पाणी एक्स्प्रेससाठी रेल्वेने जय्यत तयारी केली आहे. 
पाणी एक्स्प्रेस 8 तासात लातूर मध्ये पोहचेल असा अंदाज आहे. ही रेल्वे विनाथांबा जाणार असून, या मार्गात कोणत्याही गाडीचे क्रॉसिंग नसेल. उलट ही गाडी ज्या मार्गावर आहे त्या मार्गावरील गाड्या बाजूला वळवण्यात येणार आहेत. 
दुसरीकडे आणखी 10 वॅगन्समध्ये पाणी भरण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. 
रेल्वेच्या जॅकवेलपासून रेल्वेपर्यंत येणाऱ्या पाईपलाईनचं काम काल पूर्ण न झाल्याने, रेल्वे स्थानकावरच्या छोट्या पाईपलाईनमधून पाणी भरण्याचं काम सुरु करण्यात आलं. पण पाण्याचा वेग अत्यंत कमी असल्याने गाडी रवाना होण्यास उशीर झाला होता. 
मात्र असं असलं, तरी पाण्याची 20 वॅगन्सची पहिली खेप पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नांना आज यश आलं. 
यामुळे वेळ आणि श्रम यांची बचत होऊन, दुसरीकडे नव्या पाईपलाईनचं कामही पुढे सरकणार आहे. 10 वॅगन भरण्यास साधारण 14 तासांपेक्षा जास्त अवधी लागला. तर दुसरीकडे पाईप लाईनचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. 
दरम्यान, लातूरात भीषण पाणीटंचाई असल्याने सरकार याआधी उजनी धरणातून रेल्वेनं लातूरला पाणी देणार होतं. मात्र त्यातही अडचणी आल्याने मिरजची निवड करण्यात आली. एखाद्या जिल्ह्याला रेल्वेने पाणी देण्याची वेळ महाराष्ट्रावर पहिल्यांदाच ओढावली आहे.
===========================================

सतीश शेट्टी हत्या : आणखी एक माजी पोलीस अधिकारी अटकेत

सतीश शेट्टी हत्या : आणखी एक माजी पोलीस अधिकारी अटकेत
पुणे: माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणी सीबीआयनं पुण्यातून आणखी एका माजी पोलिस अधिकाऱ्याला अटक केली आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव कौठाळेला आज पुण्यातून अटक करण्यात आली. कौठाळेला आज दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. 13 जानेवारी 2010 मध्ये तळेगाव इथं सतीश शेट्टी यांची हत्या करण्यात आली होती.

स्थानिक पोलीस यंत्रणा तपासात अपयशी ठरल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला . मात्र सीबीआयनंदेखील या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांच्या पाठपुराव्यानंतर सीबीआयनं पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला. याच तपासांतर्गत 6 एप्रिल रोजी पुणे ग्रामीण पोलिस दलातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस भाऊसाहेब आंधळकर यांनाही अटक करण्यात आली आहे.
===========================================

डान्सरवर पैसे उडवण्याऐवजी बिलातून चुकते करा, सुधारित विधेयकात तरतूद

डान्सरवर पैसे उडवण्याऐवजी बिलातून चुकते करा, सुधारित विधेयकात तरतूद
मुंबई : डान्स बारच्या नियमावलीसंदर्भात राज्य सरकारने तयार केलेल्या सुधारित विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हे विधेयक उद्या विधानसभेत मांडण्यात येणार आहे. डान्सरवर पैसे उधळण्याऐवजी ते बिलातून चुकते करावे, असं सुधारित विधेयकात नमूद केलं आहे.

डान्स असून महाराष्ट्र हॉटेल रेस्टॉरंट व बार रुम असं या कायद्याचं नवं नाव आहे. या विधेयकात डान्स बारमधील महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आलं आहे. तसंच डान्स बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा नियम कायम ठेवण्यात आला आहे.
मसुद्यातील काही तरतुदी…
– डान्स बारमध्ये महिला आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नावाने पीएफ सुरु करणं अनिर्वाय
– डान्स बारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने नोंद आवश्यक, तसंच कर्मचाऱ्यांची तपशीलवार माहिती बार मालकाकडे असणं गरजेचं
– डान्सर (नर्तक/नर्तिका) यांच्यावर पैसे उधळण्यास मनाई, नर्तिक /नर्तिकेच्या गुणगौरवासाठीचे हे पैसे बिलातून चुकते करावे लागतील
– बार रुम ही संध्याकाळी 6 ते 11.30 या वेळेतच सुरु रहाणार
– प्रत्येक बारसाठी किमान तीन महिला सुरक्षा रक्षक असाव्यात. त्या महिला कर्मचाऱ्यांना घरापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याची व्यवस्था करावी, आवश्यक असेल तर पाळणाघराची सुविधाही द्यावी.
– परमिट रुम आणि नृत्य कक्ष यामध्ये पक्की विभाजक भिंत असेल
– मंच हा सर्व बाजूंनी तीन फुट उंचीचा कठडा घालून अलग करण्यात यावा
– कठडा आणि ग्राहक बैठक क्षेत्र यामध्ये पाच फुटांचे अंतर असेल
– ग्राहकाने विभागनी पार करु नये, कमीत कमी सहा इंच उंचीचा कठडा असेल
– एका मंचावर केवळ 4 नर्तिका/नर्तक/कलाकार यांना नाचण्याची परवानगी
===========================================

30 लाख लुटून विरारमध्ये व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या

30 लाख लुटून विरारमध्ये व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या
विरार : विरारमध्ये तांदूळ व्यापाऱ्यावर गोळीबार करुन अंदाजे 30 लाखांची रक्कम लुटून चोरटे पसार झाले आहेत. व्यापारी अशोक रमणलाल शहा यांच्यावर विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.

विरारच्या चंदनसार रोडवर रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास व्यापाऱ्याच्या दुकानासमोरच ही घटना घडली. रमणलाल घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि रमणलाल यांच्याकडील 30 लाख रुपयांची पिशवी लंपास केली. हल्ला केल्यानंतर रोकड घेऊन चोरट्यांनी विरार हायवेच्या दिशेने पळ काढल्याचा संशय पोलिसांना आहे.

विरार पूर्व चंदनसार रोडवर होलसेल तांदूळचं मोठं दुकान आहे. या दुकानात रविवार, सुट्टीच्या दिवशी तांदळाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. दिवसभराचा गल्ला तांदळाच्या थैलीत घेऊन अशोक शाह रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास घरी जात होते. त्याचवेळी गोळीबाराची घटना घडली.
===========================================

VIDEO: अजय-अतुलही झाले सैराट, झिंगाटवर तुफानी डान्स

VIDEO: अजय-अतुलही झाले सैराट, झिंगाटवर तुफानी डान्स!
मुंबई: सध्या अवघा महाराष्ट्र फक्त एकाच गाण्यावर थिरकतो आहे. ते म्हणजे अजय-अतुलच्या झिंग झिंग झिंगाटवर… दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ सिनेमातील या गाण्यानं अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे.

झालं झिंग झिंग झिंगाट.. हे गाणं वाजू लागताच तरुणांपासून आबालवृद्धांपर्यत सगळेच यावर ठेका धरु लागतात. संगीतकार  अजय-अतुलच्या या गाण्याची जादूच तशी आहे म्हणा.

आजवर अजय-अतुल यांच्या गाण्यांनी अनेकांना ताल धरायला लावला आहे. पण यंदा पहिल्यांदाच हे दोघंही आपल्याच गाण्यावर बेधुंद होऊन नाचत होते.

काय खरं वाटत नाही ना? सैराट सिनेमातीला गाण्यांच्या लाँचिंगच्या निमित्तानं अवघी सैराटची टीम झिंग झिंग झिंगाटवर थिरकली. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अजय-अतुल यांनी तर अक्षरश: तुफानी डान्स केला.

स्वत: नागराज मंजुळे यांनी त्यांच्या डान्सचा एक खास व्हिडिओ आपल्या फेसबूकवर अकांउटवर अपलोड केला आहे. ‘दस्तूरखुद्द सैराटांचं झिंगाट…’ या नावाने हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. अवघ्या तासाभरापूर्वी अपलोड केलेला व्हिडिओ शेकडो जणांनी शेअर केला आहे.
सध्या सैराट सिनेमातील गाणी चांगलीच गाजत आहेत. त्यात झिंगाटने तर कमालच केली आहे. अनेक कार्यक्रमात हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. नागराज यांचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
===========================================

पेट्रोल भरताना तुमची अशी फसवणूक तर होत नाही ना?

पेट्रोल भरताना तुमची अशी फसवणूक तर होत नाही ना?
मुंबई: पेट्रोल भरताना बऱ्याचदा आपली फसवणूक होते असं म्हटलं जातं. पण खरंच असं होतं का? कारण की, पेट्रोल भरताना मीटरकडं आपलं लक्ष असतं. त्यामुळे आपली काही फसवणूक होईल असं आपल्या मनात येत नाही. पण काय आहे यामागील नेमकं सत्य जाणून घ्या.

सारखं सारखं नोजल दाबणं: पेट्रोल पंपावरी कर्मचाऱ्यारी पेट्रोल भरत असताना पेट्रोल भरण्याच्या पाईपाजवळील नोजल दाबत असल्यास नक्कीच गडबड आहे. कारण की, एकदा स्विच ऑन केल्यानंतर नोजल सारखं दाबणं म्हणजे तुमची नक्कीच फसवणूक होते आहे.

नोजलाचा संबंध हा थेट मीटरशी असतो. जर मीटरमध्ये 200 रुपयाचं पेट्रोल फीड केलं असेल तर एकदा नोजलचं स्विच दाबल्यानंतर 200 रुपयाचं पेट्रोल टाकल्यानंतर त्याचं स्विच आपोआप बंद होईल. स्विच फक्त मीटर ऑन करण्यासाठी असतो. फीड केलेली व्हॅल्यू संपल्यानंतर मीटर थांबतं.

पेट्रोल टाकताना जर नोजलचं स्विच बंद केलं तर मीटर चालू राहतं. मात्र, पेट्रोल बाहेर येत नाही. या गोष्टीचा फायदा घेऊन कर्मचारी पेट्रोल टाकताना मध्येमध्ये स्वीच बंद करतात. ज्यामुळे पेट्रोल टाकीमध्ये हळूहळू जातं.

200 रुपयाचं पेट्रोल भरण्यासाठी 30 ते 45 सेंकद लागतात. त्यामुळे आपलं सगळं लक्ष मीटरवर असतं. जर कर्मचारी 10 सेकंदासाठी स्विच बंद केलं तर समजा तुमच्या 50 रुपयांचं पेट्रोल कमी भरलं गेलं.

चिपमधून चोरी: पेट्रोलच्या मशीनमध्ये एक खास चीप बसवली जाते. त्याला रिमोटनं नियंत्रित केलं जातं. सेल्समन याला बटणानं कंट्रोल करतो. पेट्रोल भरताना बटण दाबल्यास पेट्रोल कमी पडतं. यानं मीटर तर सुरु राहतं मात्र तुम्हाला त्यापेक्षा कमी पेट्रोल मिळतं.

कधीही ठराविक किंमतीचं पेट्रोल भरु नका: कधीही 100, 200 किंवा 500 रुपयाचं पेट्रोल किंवा डिझेल भरु नका. नेहमी जरा वेगळ्या किंमतीचं पेट्रोल भरा. उदा. 104, 207 असं पेट्रोल भरा. कारण की, अनेक पेट्रोल पंपमध्ये मशीनशी छेडछाड करुन त्यांचा वेग वाढवतात. यामुळे मीटर जम्प करतं. जेव्हा तुम्ही ऑड नंबरचं पेट्रोल टाकतात त्यावेळी म्यॅनुअली पेट्रोल टाकावं लागतं आणि मीटरही जम्प होत नाही.

सुट्ट्या पैशांचा झोल: अनेकदा पेट्रोल भरण्यासाठी सकाळी सकाळी आपण जातो. त्यावेळेस कामावर जाण्याचीही घाई असते. बऱ्याचदा 200 किंवा 300 रुपयांचं पेट्रोल भरल्यानंतर 1000 रुपयाची नोट देतो. पण त्याचवेळस पैसे परत करताना अनेकदा ग्राहकाला कमी पैसे देतात. त्यामुळे पेट्रोल पंप सोडण्यापूर्वी नक्की पैसे मोजून घ्या.

पेट्रोल पंपावर या गोष्टीकडे लक्ष द्या: पेट्रोल भरण्यापूर्वी मीटरचं रिडींग शून्य असणं गरजेचं. भेसळ असल्याचा संशय असल्यास फिल्टर पेपर परीक्षण करण्याची मागणी करा. बील घेणं विसरु नका. काही गोष्टी खटकल्यास नक्की तक्रार करु शकतात.
===========================================

सॅमसंग गॅलक्सी नोट 5 स्वस्त, तब्बल 9000 रुपयांची सूट

सॅमसंग गॅलक्सी नोट 5 स्वस्त, तब्बल 9000 रुपयांची सूट
मुंबई: सॅमसंगनं मागील वर्षी लाँच केला आपला शानदार स्मार्टफोन गॅलक्सी नोट 5 च्या किंमतीत भरघोस कपात केली आहे. आता 32 जीबी आणि 64 जीबी व्हेरिएंट मॉडेलमध्ये तब्बल 9000 हजारांची कपात करण्यात आली आहे. आता ३२ जीबी मॉडेल रु. 42,900 आणि 64 जीबी मॉडेल 48,900 रुपयात खरेदी करता येणार आहे.

किंमतीतील ही कपात सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये करण्यात आली आहे. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 1440×2560 पिक्सल 5.7 इंच क्यूएचडी सुपर-एमोल्ड डिस्प्ले आहे. तसंच यामध्ये ऑक्टा-कोअर Exynos 7420 प्रोसेसरही आहे. फोर कोरटेक्स-A57 कोर्स 2.1GHz आणि फोर कोरटेक्स-A53 1.5GHz सोबत येणार आहे.

हा स्मार्टफोन दोन मेमरी वेरिएंटमध्ये आहे. 32 जीबी आणि 64 जीबी. मात्र यामध्ये मायक्रो एसडी कार्ड ऑप्शन देण्यात आलेला नाही. तसेच यामध्ये 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. कंपनी सीईओच्या मते, सॅमसंगच्या आजवरच्या स्मार्टफोनपैकी हा सर्वाधिक रॅम असणारा स्मार्टफोन आहे. सॅमसंग गॅलक्सी नोट 5मध्ये 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून यात 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसंच यामध्ये 3000 mAh बॅटरी क्षमता आहे. 4जी, ब्ल्यूटूथ, वाय-फाय हे ऑप्शनही देण्यात आले आहेत.
===========================================

दररोज 21 किमी चालणं, 5 तास व्यायाम, अनंत अंबानीचे खडतर परिश्रम

दररोज 21 किमी चालणं, 5 तास व्यायाम, अनंत अंबानीचे खडतर परिश्रम
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अनंत अंबानी म्हटल्यावर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या सामन्यात दिसणारा चेहरा. मैदानाबाहेर एका सोफ्यावर बसलेला लठ्ठ मुलगा. त्याच्या लठ्ठपणाची अनेक जण थट्टा करत. अनंतने ही थट्टा मनावर घेतली पण चांगल्या अर्थाने. त्याने बोलण्यातून नाही तर कृतीतून थट्टा करणाऱ्यांना उत्तर दिलं. 20, 40 किंवा 50 किलो नाही तर अनंत अंबानीने तब्बल 108 किलो वजन कमी करुन अनेकांना बोटं तोंडात घालायला लावली.
अनंतचा संकल्प
21 व्या वाढदिवसापर्यंत वजन कमी करण्याचा संकल्प त्याने केला होता. अनंत अंबानीने 18 महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर 108 किलो वजन कमी केलं. लठ्ठ अनंत ते फिट अनंत हा बदल तसा सोपा नव्हता. यासाठी त्याने घेतलेली मेहनत अतिशय खडतर होती. त्याने दररोज 5 तासांचा व्यायाम करुन त्याने 108 किलो वजन कमी केलं.
क्रोनिक अस्थमामुळे वजन वाढलं
अनंत अंबानीला क्रोनिक अस्थमा नावाचा आजार होता. या आजारावरील गोळ्यांमुळे त्याचं वजन अनिर्बंध वाढलं होतं. मात्र यानंतर तो वजनाबाबत अतिशय जागरुक झाला आणि वजन कमी करण्याचा निश्चय केला.
व्यायामाचं शेड्यूल आणि आहार
वजन कमी करण्यासाठी अनंत मागील 18 महिन्यांपासून प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याने आहारावर कडक नियंत्रण ठेवलं. तो रोज 5 ते 6 तास व्यायाम करत असे. योगासनं झाल्यानंतर 21 किमी चालायचा. खाण्यात साखर पूर्णपणे वगळली. कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात आणि आवश्यक त्या प्रमाणात फॅटस् तसंच प्रोटीनचा आहारात समावेश केला होता.
वजन घटवण्यात अमेरिकन ट्रेनरची मदत
अमेरिकन ट्रेनरच्या देखरेखीखाली अनंतने कठोर मेहनत घेतली. त्याने गुजरातच्या जामनगरमधील रिलायन्सच्या रिफायनरीमध्ये ट्रेनिंग घेतली. ट्रेनिंगदरम्यान त्याने खूप घाम गाळला. धावणं, योगा, कार्डिओ एक्झरसाईजच्या मदतीने वजन कमी केलं.
अनंतचं नवं रुप पाहून अनेक जण आश्चर्यचकित
काही दिवसांपूर्वी अनंत कुटुंबीयांसह गुजरातच्या सोमनाथ मंदिरात गेला होता. तिथे अनंतचं नवं रुप पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आता बारीक झालेल्या अनंत अंबानीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
===========================================

रैनाच्या गुजरात लायन्ससमोर मिलरच्या किंग्ज XI पंजाबचं आव्हान

रैनाच्या गुजरात लायन्ससमोर मिलरच्या किंग्ज XI पंजाबचं आव्हान
मोहाली: आयपीएलच्या रणांगणात आज सुरेश रैनाच्या गुजरात लायन्सची डेव्हिड मिलरच्या किंग्स इलेव्हन पंजाबशी टक्कर होणार आहे. गुजरात लायन्सचा हा आयपीएलमधला पहिलाच सामना आहे. मोहालीत आज रात्री आठ वाजता हा सामना खेळवला जाईल.

गेली आठ वर्ष चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधित्त्व करणारा रैना यंदा गुजरात लायन्स या नव्या संघाचं नेतृत्त्व करतोय आणि ही जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी सज्ज झाला आहे.

गुजरातचा संघ हा आयपीएलमध्ये नवखा असला तरी त्यांच्याकडे सुरेश रैनासह रवींद्र जाडेजचाही समावेश आहे. त्याशिवाय गुजरातकडे ब्रेण्डन मॅक्युलम, जेम्स फॉकनर, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन स्मिथ, डेल स्टेनसारखे तगडे विदेशी शिलेदारही गुजरातच्या संघात आहेत.

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकादरम्यान अवघ्या जगाला चॅम्पियन गाण्यावर ठेका धरायला लावणाऱ्या ड्वेन ब्राव्होच्या कामगिरीवर तर सर्वांची नजर राहील. विंडीजला दुसऱ्यांदा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावणारा ड्वेन ब्राव्हो आता गुजरात लायन्सला चॅम्पियन बनवण्यासाठी सज्ज झाला आहे.

दुसरीकडे किंग्स इलेव्हन पंजाबनं यंदा जॉर्ज बेलीऐवजी दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरच्या हाती नेतृत्त्वाची धुरा सोपवली.

डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल, शॉन मार्श, मिचेल जॉन्सन आणि मुरली विजयच्या खांद्यावर पंजाबच्या संघाची जबाबदारी असेल.

आता मोहालीत पंजाबच किंग ठरणार की गुजरात चॅम्पियन डान्स करणार, यावरच सर्वांची नजर राहील.
===========================================

‘द जंगल बुक’ आणखी सुसाट, विकेंडला बक्कळ कमाई

‘द जंगल बुक’ आणखी सुसाट, विकेंडला बक्कळ कमाई
मुंबई : बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटलेल्या ‘द जंगल बुक’च्या गाडीने आणखी वेग पकडला आहे. कारण पहिल्याच विकेंडमध्ये या सिनेमाने तब्बल 40.19 कोटींचा गल्ला जमवला आहे.

डिस्नेचा लाईव्ह-अॅक्शन अॅडव्हेंचर सिनेमा ‘द जंगल बुक’ची गाडी पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 9.76 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर शनिवारी 13.51 कोटी तर रविवारी तब्बल 16 .59 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे अवघ्या तीन दिवसात सिनेमाने 40.19 कोटी रुपये जमवले आहेत.

8 एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सिनेमाला सुट्टीमुळे पहिल्याच दिवशी चांगली ओपनिंग मिळाली. यानंतर तीन दिवसांच्या लाँग विकेंडचा फायदा चित्रपटाला मिळाला. शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांना लागलेल्या सुट्ट्यांचाही फायदा सिनेमाला झाला.

अक्षय कुमारच्या एअरलिफ्टनंतर जंगल बुक हा 2016 मधला सर्वात मोठं ओपनिंग मिळालेला दुसऱ्या क्रमांकाचा सिनेमा ठरला आहे. बॉलिवूड ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
===========================================

मास्टर ब्लास्टर सचिनच्या चित्रपटाचे पोस्टर लाँच

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. ११ -  बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक्सची भलतीच चलती असून  ‘भाग मिल्खा भाग’, ‘मेरी कोम’, ‘नीरजा’, ‘साला खडूस’ असे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आगामी काळातही ‘अझहर’, ‘एम. एस. धोनी’, ‘रईस’, ‘दंगल’ यासारखे बायोपिक प्रदर्शित होणार असून त्याच पंक्तीत आता आणखी एक चित्रपट आला आहे.... आणि तो चित्रपट असणार आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित...!
    क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला सचिन तेंडुलकरच्या चित्रपटाचे पोस्टर आज लाँच झाले असून येत्या १४ एप्रिलला चित्रपटाचा टीझरही लाँच होणार आहे. खुद्द सचिननेच आज त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर लाँच टाकले आहे.
    अझहर चित्रपटात अझहरच्या भूमिकेत इम्रान हश्मी तर  ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या  चित्रपटात धोनीची भूमिका सुशांतसिंह राजपूत करणार आहे. मात्र सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सचिनची भूमिका कोण करेल हे अद्याप गुलदस्त्यातचं आहे.  
    दरम्यान शाहरुख खान, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, सुरेश रैना या सेलिब्रिटीजनीही चित्रपटाबद्दल रिट्विट करत उत्सुकता दर्शवली आहे.
===========================================

डान्सबार सुधारीत विधेयक विधानपरिषदेत एकमताने मंजूर, डान्सबारला सरसकट बंदी नाही

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. ११ - राज्य सरकारचे डान्सबार विरोधी सुधारीत विधेयक विधानपरिषदेत एकमताने मंजूर झाले आहे. या सुधारीत विधेयकात अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या सुधारित विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून उद्या विधानसभेत हे विधेयक मांडण्यात येणार आहे. नव्या कायद्याच्या मसुद्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय २५ आमदारांची समिती स्थापन केली होती. राज्य सरकारचा डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर ही समिती स्थापन करण्यात आली. 
    महाराष्ट्र सरकार डान्सबारना परवानगी देण्यासाठी नव्याने तयार केलेल्या कायद्यामध्ये अनेक कठोर तरतुदींचा समावेश केला आहे. फ्लोअरवर नाचणा-या बार डान्सर्सना स्पर्श केला किंवा त्यांच्यावर पैसे उधळले तर, सहा महिने तुरुंगवास किंवा ५० हजार रुपये दंडाची तरतूद या कायद्यामध्ये आहे. 
    डान्सबार विधेयकाचे पुर्वीचे नाव बदलुन आता महाराष्ट्र हॉटेल रेस्टोरेंट व बार रुमध्ये चालना-या अश्लील नृत्यावर प्रतिबंध व त्यामध्ये काम करणा-या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करणाबाबत अधिनियम २०१६ असे करण्यात आले आहे. 
     डान्सबारच्या प्रवेशव्दारावर आणि डान्स फ्लोअरवर सीसीटीव्ही बंधनकारक असेल. नव्या कायद्याच्या मसुद्यामध्ये बार मालकाने बार डान्सरला आपला उपयोग करण्याची परवानगी दिली तर, १० लाख रुपये दंड व तीन वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
===========================================
आयपीएल कोणाची? सामान्यांची की श्रीमंतांची?
ऊ वर्षांपूर्वी आयपीएल नावाच्या सर्कशीचा पडदा वर गेला होता. हत्ती, घोडे विदूषक यांच्यासह अनेक पात्रे असल्यामुळे सर्कस नेमकी कशी असते याचा अंदाज तरी असतो; परंतु आयपीएलच्या सर्कशीत नेमके काय असणार हे पडदे उघडल्यावरच दिसले. कारण खेळ क्रिकेटचा होता; परंतु त्याच्या आडून सर्कशीतली पात्रेच नाचत होती. मुळात क्रिकेट अधिक मनोरंजन या संकल्पनेतूनच आयपीएलचा घाट घालण्यात ललित मोदी नावाचा व्यापारी यशस्वी ठरला होता. या समीकरणात क्रिकेटचा वाटा 80 टक्के होता. काळ बदलत गेला. क्रिकेट... मनोरंजन... झगमगाट... वाद... स्पॉट फिक्‍सिंग आणि सट्टेबाजी अशा घटकांचा समावेश झाला. ज्या क्रिकेटचा वाटा सुरुवातीस 80 टक्‍क्‍यांचा होता, तो बघता बघता अर्ध्यावर आला. कारण गेल्या काही वर्षांतील कोणत्याही आयपीएलचे नाव घ्या, विजेता कोण किंवा सर्वोत्तम खेळाडू कोण? हे आठवणार नाही; पण श्रीशांत, चंडिला, मय्यपन, राज कुंद्रा ही नावे पटकन आठवतील आणि याला एकमेव कारण आहे, ते पैशांच्या बाजाराचे... 

खेळाडूंना कुबेराचे दार आणि प्रसिद्धीचा झोत या आयपीएलने आणला हे खरे आहे, पण वाहत्या गंगेत हात धुणारे, लोणी ओरबडणारे आणि संधीसाधूही अनेक निघाले. ललित मोदींनी तर परदेशात पळ काढला. क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची सद्दी दुहेरी हितसंबंधांनी संपली ती इतकी की, त्यांना आयसीसीमधली खुर्चीही खाली करावी लागली. इतिहासाची ही पाने चाळायचा हेतू एवढाच की, क्रिकेटचा हा अवतार सर्वसामान्यांपासून दूर होत गेला. आता हेच पाहा ना काल उद्‌घाटन सोहळा झाला. आठ संघांच्या कर्णधारांची उपस्थिती सोडली तर हा सोहळा क्रिकेटचा होता की, बॉलीवूडचा होता? हे समजण्याच्या पलिकडचे होते. मुळात असा कार्यक्रम करण्याची गरज होती का, एकीकडे दिल्लीत सर्वोच्च न्यायालय दर आठवड्यात चाबकाचे फटके मारत आहे. मुंबईत उच्च न्यायालय पाण्यावरून सणसणीत टोला मारत आहे; तरी उद्‌घाटन सोहळ्यावर करोडो रुपयांची उधळण करण्याची गुर्मी आयपीएलने दाखवलीच. 
===========================================
सुरक्षित, स्थिर मालदीव भारताच्या हिताचा: मोदी
नवी दिल्ली - हिंदी महासागरामधील द्वीपकल्पीय देश असलेल्या मालदीवची सुरक्षा व स्थिरता भारतीय हिताच्या दृष्टिकोनामधून अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) व्यक्त केले. 

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यमीन अब्दुल गयूम हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. गयूम यांच्याशी भारतीय पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांमधील विविध क्षेत्रांसंदर्भात चर्चा केली. मालदीव हा भारताच्या अत्यंत निकटच्या भागीदार देशांपैकी एक असल्याचा निर्वाळा मोदी यांनी यावेळी दिला. मालदीव व भारतामध्ये पर्यटन, अवकाश संशोधन, संरक्षण आणि मालदीवमधील पुरातन मशिदींच्या संरक्षणासंदर्भातील सहा करार करण्याची घोषणा करण्यात आली. 

""भारताची भूमिका ही हिंदी महासागर क्षेत्रामध्ये सुरक्षा पुरविणाऱ्या देशाची असल्याची आम्हाला जाणीव आहे. या भागामधील राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्याप्रतीही भारत कटिबद्ध आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारत व मालदीवमधील संरक्षण क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढविण्याकरिता आखण्यात आलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल. बंदरांचा विकास व सागरी सुरक्षेसाठी आवश्‍यक साहित्याचा पुरवठा हे दोन घटक या योजनेचा मुख्य भाग आहेत. दोन्ही देशांना सीमेपलीकडील दहशतवाद आणि मूलतत्त्ववादाच्या दक्षिण आशियात वाढणाऱ्या प्रभावाचीही जाणीव आहे,‘‘ असे मोदी म्हणाले.
===========================================
आसाममध्ये मतदानावेळी भांडण; ज्येष्ठाचा मृत्यू
सोरभोग (आसाम)- विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी बारपेटा मतदारसंघातील सोरभोग येथे मतदार व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांमध्ये (सीआरपीएफ) झालेल्या भांडणात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (सोमवार) दिली. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदानादरम्यान जवानांनी रांगेत उभे राहून मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. यावेळी काही नागरिकांनी जवानांशी वाद घालण्यास सुरवात केली. वादाचे रूपांतर भांडणात झाले. मारहाणीत अब्दुल रशीद (वय 80) यांच्यासह तीन जण जखमी झाले. रशीद यांना उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

दरम्यान, जखमींमध्ये सहाय्यक समादेशक नवल किशोर व जवान अमरजीत यांचा समावेश आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील मतदान शांततेत पार पडले.

===========================================
'एनआयए' मसूदला रेड कॉर्नरची नोटीस बजावणार
नवी दिल्ली- पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार व जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर यांच्या विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणांनी (एनआयए) रेड कॉर्नरची नोटीस बजावण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. 

‘एनआयए‘च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर 2 जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जवान हुतात्मा झाले होते. या हल्लाप्रकरणी ‘एनआयए‘ने गेल्या आठवड्यात मसूद अजहर व त्याच्या तीन साथीदारांविरोधात वॉरंट जारी केले होते. मसूद अजहर व त्याचे तीन साथीदार अब्दुल रऊफ, कासिफ जान व शाहीद लतीफ यांच्या विरोधात रेड कॉर्नरची नोटीस बजावण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे.
===========================================
लांडे खून- चौघांना जन्मठेप, दोघांना सक्तमजुरी
नाशिक- नगरचे अशोक भीमराव लांडे यांच्या खून प्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने भानुदास कोतकरसह एकूण चारजणांना जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला, तर दोनजणांना 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

न्यायाधीश आर.एस. कदम यांनी आज (सोमवार) या प्रकरणाचा निकाल दिला. भानुदास कोतकर, सचिन, संदीप, अमोल कोतकर यांना जन्मठेप व 5 हजार दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, स्वप्नील पवार आणि वैभव अरसूल यांना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील एकूण 12 साक्षीदार फुटले व त्यांनी साक्ष फिरवली होती. 

आरोपींनी 19 मे 2008 रोजी नगरमधील भैरवनाथ सोसायटीमध्ये अशोक लांडे यांचा खून केला. तो अपघात असल्याचे भासवून त्यांनी लांडे यांना तेथील रुग्णालयामध्ये दाखल केले होते. लांडे यांच्या मृत्यूचे कारण खोटे दाखविण्यात आले होते. तलवार, गज, हॉकी स्टिकने मारहाण केली होती. हे प्रकरण नाशिक न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. त्यावर न्यायालयाने आज निर्णय दिला. 
===========================================
रशियात पोलिस चौकीबाहेर तीन आत्मघाती हल्ले
मॉस्को- दक्षिण रशियात पोलिस चौकीबाहेर तीन आत्मघाती हल्ले करण्यात आले आहेत, अशी माहिती प्रवक्‍त्यांनी आज (सोमवार) दिली. 

प्रवक्‍त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्सवरोपोल भागातील नोवोसेलित्सकोये गावातील जिल्हा पोलिस चौकीच्या प्रवेशद्वाराबाहेर हल्लेखोरांनी आत्मघाती स्फोट घडवून आणले. या स्फोटात कोणी जखमी अथवा मृत्युमुखी पडल्याची माहिती हाती आलेली नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
===========================================
मुलींनी 'जीन्स' पॅन्ट घालू नये; पंचायतीचा फतवा
बघपत (उत्तर प्रदेश)- मुलींनी ‘जीन्स‘ पॅन्ट सारखी तंग कपडे घालू नये. याबरोबरच विवाह सोहळ्यादरम्यान ‘डीजे‘ लावू नये, असा फतवा बावळी गावच्या पंचायतीने काढला आहे. 

‘गावातील मुलींनी ‘जीन्स‘ पॅन्ट सारखी तंग कपडे घालू नये व विवाह सोहळ्यादरम्यान हुंडा घेऊ नये व ‘डीजे‘ही वाजवू नये. दोन्ही नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या कुटुंबावर बहिष्कार टाकला जाईल,‘ पंचायतीमधील बैठकीदरम्यान असे निर्णय घेण्यात आल्याची माहिती सदस्य ओमवीर यांनी दिली. 

‘एखाद्या कुटुंबातील सदस्याचे निधन झाले असेल तर त्याच्या तेराव्याला कोणी उपस्थित राहू नये व अन्न कोणी खाऊ नये,‘ असाही फतवा काढण्यात आला आहे.
===========================================
पंतप्रधान देशातील 'सेक्‍युलर टोळी'चे बळी: नक्वी
जयपूर - गेल्या 20 वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धर्मनिरपेक्षतावाद्यांकडून सातत्याने लक्ष्य करण्यात येत असले; तरी त्याचा देशामधील सध्याच्या विकास प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज (सोमवार) सांगितले. 

""गेल्या दोन दशकांपासून मोदी हे राज्यव्यवस्थेशी निकटता असलेल्या सेक्‍युलर टोळीच्या असहिष्णुतेचे बळी ठरले आहे. मात्र गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना ते विकासाचा चेहरा होते; आणि आताही पंतप्रधान म्हणून ते गरीब व युवकांच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहेत. सत्तेत आल्यानंतर मोदी यांनी सत्तेच्या दलालांची सद्दी संपविली आहे. यामुळेच विकासाचा कार्यक्रम अंगीकारत असलेला हा पंतप्रधान भ्रष्ट लोकांना सहन करता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे,‘‘ असा हल्ला नक्‍वी यांनी चढविला. 

सरकार हे विकासासाठी कटिबद्ध असतानाही या विकासमोहिमेत अडथळा निर्माण करण्याचे विविध प्रयत्न करण्यात येत असले; तरी प्रगतीची प्रक्रिया सुरुच राहिल, असा आशावाद नक्‍वी यांनी यावेळी व्यक्‍त केला.
===========================================
शेतकऱ्यांचं जिणं 'ट्रॅजेडी'; कारखाने बंद करा- यादव
पुणे- दुष्काळाने जमीन तर कोरडी झालीच, त्याबरोबरच अश्रू, मन व मेंदूही कोरडा केला आहे. शेतकरयांचे जीवन अक्षरशः एक खूप मोठी ‘ट्रॅजेडी‘ बनले आहे. रेल्वेने पाणी पुरविण्याची वेळ का आली, याचा सरकारने विचार करावा, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी केले.
तसेच, महाराष्ट्रात कठीण राजकीय निर्णय घेण्याची वेळ आली आहे. साखर कारखाने, मद्यांचे कारखाने, ऊस उत्पादन आणि वॉटर प्लांट थांबविण्याची गरज आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक कै. ज. स. करंदीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात "महाराष्ट्र व देशातील दुष्काळाची सद्यस्थिती" या विषयावर बोलत होते.
यादव म्हणाले, "मराठवाडा, बुंदेलखंड आणि तेलंगणाच्या काही भागात दुष्काळाची स्थिती अतिशय भयानक आहे. पिण्याचे पाणी व सिंचनाच्या पाण्याची कमतरता, अन्नाची टंचाई, पिकांचे नुकसान, पक्षी, प्राणी आणि गाई-गुरांच्या पाण्याची स्थिती वाईट आहे."
 केंद्र व राज्य सरकारला या संकटाची माहिती असूनही त्यांनी दुर्लक्ष केले. ‘आयपीएल‘मुळे दुष्काळाची झळ प्रसारमाध्यमांना दिसली. सरकारने आता तरी दीर्घकालीन उपाययोजना करण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, असे मत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.
===========================================
जॉन केरींची हिरोशिमास ऐतिहासिक भेट
हिरोशिमा - दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेच्या अणुहल्ल्यानंतर उध्वस्त झालेल्या जपानमधील हिरोशिमा शहरातील स्मारकास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी आज (सोमवार) भेट दिली. हिरोशिमास भेट देणारे केरी हे पहिलेच अमेरिकन परराष्ट्र मंत्री असून त्यांची ही भेट ऐतिहासिकदृष्टया आणि जपान-अमेरिकेमधील द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टिकोनामधूनही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

हिरोशिमामध्ये होणाऱ्या जी-7 गटाच्या प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्यासाठी केरी हे येथे आले आहेत. त्यांच्यासहित इतर देशीय मंत्र्यांनीही या स्मारकाच्या स्थळी पुष्प वाहून एक मिनिटभरासाठी शांतता पाळून मृतांना आदरांजली वाहिली. अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी हिरोशिमा येथे जाणे आत्तापर्यंत टाळल्याचे दिसून आले आहे. 

महायुद्ध संपविण्यासाठी जपानवर अणुबॉंब टाकणे आवश्‍यकच होते, अशी अमेरिकेमधील बहुसंख्य राजनैतिक व लष्करी अधिकाऱ्यांची भूमिका आहे. या पार्श्‍वभूमीवर, हिरोशिमावर अणुबॉंब टाकल्याप्रकरनी अमेरिकेस माफी मागावी लागू नये, यासाठी अमेरिकन नेतृत्व प्रयत्नशील आहे. तेव्हा केरी यांनी हिरोशिमास दिलेली ही भेट अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापुढेही हिरोशिमा भेटीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मानण्यात येत आहे. 
===========================================
मोदींच्या सभेला गर्दी करण्याचे कॉलेजांना 'टार्गेट'


भोपाळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयाने किमान शंभर विद्यार्थी पाठवावेत असे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांची 14 एप्रिल रोजी महू येथे जाहीर सभा होणार आहे. 

महू हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मठिकाण असल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
या कार्यक्रमाला प्रत्येक खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयाने शंभर विद्यार्थी पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

‘आपल्या कार्यक्रमासाठी लोकांची गर्दी होईल का याची खात्री भारतीय जनता पक्षाला नाही,‘ असे सांगत काँग्रेसने या आदेशावरून भाजपवर टीका केली आहे. 
इंदोरपासून 30 किलोमीटर अंतरावर हा कार्यक्रम होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी काहींच्या सध्या परीक्षा चालू आहेत, तर सर्व विद्यार्थ्यांकडे स्वतःची वाहने नसल्याने या कार्यक्रमाला जाण्यात त्यांना अडचणी आहेत. प्रत्येक महाविद्यालयाने बसची व्यवस्था करावी, तसेच विद्यार्थ्यांसोबत एक शिक्षक पाठवावा, असे सांगण्यात आले आहे. 
===========================================
युक्रेनमध्ये 2 भारतीय विद्यार्थ्यांची भोसकून हत्या
नवी दिल्ली- युक्रेनमध्ये दोन भारतीय विद्यार्थ्यांना लुटल्यानंतर त्यांची भोसकून हत्या करण्यात आली तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने आज (सोमवार) दिली. 

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘युक्रेनमध्ये तीन भारतीय विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होते. रविवारी (ता. 10) अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्याकडील रक्कम काढून घेतली व गंभीर जखमी केले. याघटनेत प्रणव शांडिल्य व अंकुर सिंग यांचा जागीच मृत्यू झाला. इंद्रजित चौव्हाण हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.‘ 

विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असून, युक्रेनमधील पोलिस व भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. युक्रेनमधील पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
===========================================
विमानात ऐकतो जगजित, गुलाम अली - गडकरी
नागपूर - जिल्हा वकील संघटनेतर्फे (डीबीए) आयोजित "जस्टिशिया‘चा समारोप सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे किस्से, त्यामागून येणारे हास्य आणि टाळ्यांच्या कडकडाटाने गाजला. दिवसभर विविध कार्यक्रमांमुळे त्रस्त झालेले मन विमानात ऐकलेल्या जगजित सिंग, गुलाम अली यांच्या गझलेच्या रेकॉर्डमुळे "रिलॅक्‍स‘ होत असल्याचे सांगत गडकरी यांनी पंतप्रधान मोदी मात्र टीव्ही, पेपर, रेडिओ ऐकून फार "टेन्शन‘ घेत असल्याचा रहस्योद्‌गार केला. 

"ज्यांची खासगी वकिली चालत नाही ते सरकारी वकील होतात‘ या स्वर्गीय श्रीकांत जिचकार यांच्या वक्‍तव्यावर तेव्हा बरेच वादळ उठले होते. मुख्य म्हणजे तत्कालीन हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी आक्षेप घेतल्याची आठवण यावेळी गडकरींनी सांगितली. डीबीएशी असलेल्या संबंधावर प्रकाश टाकताना गडकरींनी आपल्या किश्‍श्‍यांच्या बटव्यातून अजून एक किस्सा पुढे केला. ते म्हणाले, 1995-96 साली सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना जिल्हा न्यायालयाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेव्हा इमारतीची स्थिती अत्यंत वाईट होती. त्यावर वकील मंडळी पैसे देत नसून त्यांना फुकट सोयी असल्याची बाब उघडकीस आली. अखेर मीच पुढाकार घेतला आणि सोयी-सुविधा पुरविल्या. आता काय स्थिती आहे माहिती नाही; पण परत मी त्या भागडीत पडलो नसल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला. 
===========================================
केरळ: आगीनंतर मंदिराचे विश्वस्त बेपत्ता
कोल्लम - केरळमधील परावूर पुट्टींगल देवी मंदिरात रविवारी पहाटे फटाक्‍यांमुळे लागलेल्या आगीच्या घटनेनंतर मंदिराचे 10 विश्वस्त बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या आगीतील मृतांची संख्या 108 झाली आहे. 

कोल्लम जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिरात फटाक्यांच्या आतषबाजीला परवानागी दिली नसल्याचे म्हटले आहे. या आगीप्रकरणी तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे. मंदिराच्या विश्वस्तांपैकी दहा जण बेपत्ता असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या आगीत 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 

रविवारी पुट्टींगल मंदिराचा वार्षिकोत्सव सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. ही आग एवढी भीषण होती, की यात होरपळलेल्या अनेकांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. सर्व जखमींना तिरुअनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
===========================================

No comments: