Tuesday, 12 April 2016

नमस्कार लाईव्ह १२-०४-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- नेपाळमधील बस अपघातात 23 मृत्युमुखी 
२- मलेशिया; पंचवीस फूट लांबीचा अवाढव्य अजगर आढळला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- यंदा चांगला पाऊस, स्कायमेटपाठोपाठ IMD चाही अंदाज 
४- शेतकऱ्यांच्या मागे लागता, मग उद्योजकांचं कर्ज का थकलं' - सुप्रीम कोर्ट  
५- लखनऊ; उ. प्रदेश निवडणुकीत राममंदिर मुद्दा नाही- भाजप 
६- वाघांना वाचवण्याचे भारताचे प्रयत्न यशस्वी- मोदी 
७- शेतकऱयांपेक्षा महिलांचे आत्महत्येचे प्रमाण जास्त - एक सर्वे 
८- भारतामुळे दक्षिण आशियाचा विकासदर सर्वाधिक - जागतिक बँक 
९- राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण 
१०- कर्जबुडव्यांची माहिती होणार उघड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- IPL महाराष्ट्राबाहेर नेण्याचा विचार करा, कोर्टाचा BCCI ला सल्ला 
१२- देवनार डम्पिंग ग्राऊण्डवरुन राहुल गांधींचं मोदींवर टीकास्त्र 
१३- भोपाळ; देशभ्रमंतीसाठी निघालेल्या लेडी बायकरचा अपघाती मृत्यू 
१४- साखर कारखान्यांना पाणी पुरवणं हीच चूक', उद्योगमंत्र्यांची कबुली 
१५- लातुरसाठी 10 लाख लि. पाणी देतो, केंद्राने नेण्याची सोय करावी : केजरीवाल 
१६- सरकार गरिबांचे नव्हे, धनदांडग्यांचे - राहुल गांधी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- काश्‍मीरमध्ये गोळीबारात दोन आंदोलकांचा मृत्यू 
१८- औरंगाबाद; जायकवाडीच्या पाण्यावर दरोडा घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल 
१९- नागपूर; श्रीराम सेनेच्या गुंडांची व्यापाऱ्याला बेदम मारहाण, 20 जणांवर दंगलीचे गुन्हे 
२०- मुंबईकरांना दिलासा, मेट्रोची भाववाढ काही काळासाठी टळली  
२१- हैदराबाद; तोंडात रॉकेल घेऊन आगीवर फुंकर मारण्याचा स्टंट जीवावर 
२२- अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणी प्रियकर राहुल राज सिंगला अटकपूर्व जामीन मंजूर 
२३- कोल्हापूर; साडी शिवाय महिलांना मंदिरात प्रवेश नाही, अंबाबाई देवस्थानचा नवा निर्णय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताकडून पाकचा धुव्वा 
२५- 'जंगलबुक'ने केला 48 कोटींचा व्यवसाय 
२६- रजनीकांत 'पद्मविभूषण' तर सानिया पद्मभूषणने सन्मानित 
२७- अॅपलची धमाकेदार ऑफर, अवघ्या रु. 999मध्ये आयफोन 
२८- 'सुलतान'चा टीझर रिलीज, रांगड्या पैलवानाच्या भूमिकेत सलमान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
स्वाभिमान असावा पण गर्व नसावा
(ओंकार मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


=====================================

यंदा चांगला पाऊस, स्कायमेटपाठोपाठ IMD चाही अंदाज

यंदा चांगला पाऊस, स्कायमेटपाठोपाठ IMD चाही अंदाज
नवी दिल्ली: गेल्या तीन वर्षांपासून चांगल्या पावसाची आस धरुन बसलेल्या जनतेला भारतीय हवामान विभागाने मोठा दिलासा दिला आहे. कारण यंदा पाऊसमान हे उत्तम म्हणजेच सरासरीच्या तब्बल 106 % असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

इतकंच नाही तर विदर्भ आणि दुष्काळी मराठवाड्यातही चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कालच खाजगी हवामान संस्था स्कायमेटनेही देशभरात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.

स्कायमेट आणि भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज जवळपास सारखाच आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, जून महिन्यात सरासरीच्या 90 टक्के, जुलै महिन्यात 105 टक्के, ऑगस्ट महिन्यात 108 टक्के, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 115 टक्के पाऊस पडणार आहे. एकूण सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे.
=====================================

IPL महाराष्ट्राबाहेर नेण्याचा विचार करा, कोर्टाचा BCCI ला सल्ला

IPL महाराष्ट्राबाहेर नेण्याचा विचार करा, कोर्टाचा BCCI ला सल्ला
मुंबई : आयपीएलसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी काही पाणी दुष्काळग्रस्त भागाला देण्यासाठी तयार आहात का असा सवाल मुंबई उच्च न्यायालायानं बीसीसीआयला विचारला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आयपीएलचे सामने व्हावे की नाही यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना कोर्टानं हा प्रश्न विचारला.

महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ आहे. अशा स्थितीमध्ये बीसीसीआय मुख्यमंत्री सहाय्यता निधीला काही मदत करु इच्छिते काय, असा सवालही कोर्टानं विचारला आहे. एका सामन्यासाठी किती पाणी वापरलं जातं याची माहिती देण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.

वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब अर्थात महालक्ष्मी रेसकोर्सवरुन पाणी आणू, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनं कोर्टाला दिली. याप्रकरणी आजची सुनावणी स्थगिती करण्यात आली असून उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.
=====================================

माझा इफेक्ट : जायकवाडीच्या पाण्यावर दरोडा घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल

माझा इफेक्ट : जायकवाडीच्या पाण्यावर दरोडा घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल
औरंगाबाद : ‘एबीपी माझा’ने बातमी दाखवल्यानंतर जायकवाडीच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, जेसीबी आणि खोदकामाचं साहित्य काही जप्त केलं गेलं नाही. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

काल जायकवाडीच्या धरणात 15 जेसीबी होते. आज मात्र सगळे जेसीबी गायब झाले आहेत. त्यामुळे दोषींवर फक्त गुन्हा दाखल करुन चालणार का, हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

जायकवाडीचं पाणी चोरण्यासाठी गेल्या 15 दिवसात 30 फूट खोल आणि एक किलोमीटर लांब चर खोदण्यात आली आहे. याप्रकरणी ‘एबीपी माझा’ने बातमी दाखवल्यानंतर सुभाष सिसोदे, लक्ष्मण नेहे यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला. पण खोदकामाचं साहित्य जप्त का केलं नाही, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो आहे.

शिवाय, ज्या ठिकाणी जायकवाडी धरणाचं खोदकाम केलं आहे. ते पुन्हा बुजवणं आवश्यक आहे. तसं केलं नाही तर पुन्हा एकदा या पाण्यावर डल्ला मारला जाऊ शकतो. त्यामुळे याप्रकरणात फक्त गुन्हे दाखल करुन चालणार नाही तर दोषींना जरब अशी कारवाई करणंही आवश्यक आहे.
=====================================

सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताकडून पाकचा धुव्वा

सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताकडून पाकचा धुव्वा
नवी दिल्ली : सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत सरदार सिंगच्या भारतीय हॉकी संघानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानवरच्या या विजयामुळे भारतानं गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर अगदी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. मनप्रीत सिंगनं सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला गोल करुन भारताचं खातं उघडलं. पण मोहम्मद इरफाननं सातव्या मिनिटाला गोल डागून पाकिस्तानला बरोबरी साधून दिली. मात्र त्यानंतर भारतानं पाकिस्तानला
सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही.

एस. व्ही. सुनीलनं दहाव्या आणि 41व्या मिनिटाला गोल झळकावून भारताची आघाडी 3-1 अशी वाढवली. मग तलविंदरन सिंगनं 50व्या आणि रुपिंदरपाल सिंगनं 54व्या मिनिटाला गोल करुन भारताचा 5-1 असा विजय निश्चित केला.
=====================================

देवनार डम्पिंग ग्राऊण्डवरुन राहुल गांधींचं मोदींवर टीकास्त्र

देवनार डम्पिंग ग्राऊण्डवरुन राहुल गांधींचं मोदींवर टीकास्त्र
मुंबई : स्वच्छ भारतची घोषणा करणं आणि प्रत्यक्षात भारत स्वच्छ करणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असा टोमणा मारत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देवनार कचरा प्रश्नावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

नागपूरनंतर मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी देवनार कचराभूमीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अशोक चव्हाण, संजय निरुपम आणि काँग्रेसचे काही आमदार तसेच स्थानिक नेते उपस्थित होते.

देवनार कचराभूमीतील मोठ्या ढिगाऱ्याला 27 जानेवारीला आग लागली होती, तेव्हापासून ही आग धुमसतेच आहे. या प्रश्नावरुन काँग्रेसनं आता सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

देवनार दौऱ्यानंतर राहुल गांधींनी झवेरी बाजाराला भेट दिली आणि आपण सराफा व्यापाऱ्यांसोबत असल्याचं सांगत पाठिंबा दर्शवला. केंद्र सरकार व्यापाऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोपही यावेळी राहुल गांधींनी केला.
=====================================

श्रीराम सेनेच्या गुंडांची व्यापाऱ्याला बेदम मारहाण, 20 जणांवर दंगलीचे गुन्हे

श्रीराम सेनेच्या गुंडांची व्यापाऱ्याला बेदम मारहाण, 20 जणांवर दंगलीचे गुन्हे
नागपूर श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. आपल्या हॉटेलमधून काढून टाकलेल्या तरुणाला पुन्हा नोकरी देणाऱ्यास श्रीराम सेनेच्या गुंडांनी बेदम मारहाण केली आहे. धक्कादायक म्हणजे हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात घडलं आहे.

एखाद्या जनावराप्रमाणं श्रीराम सेनेच्या गुंडांनी हर्षदला बडवलं. त्याचा दोष इतकाच होता की, श्रीराम सेनेच्या तुषार घागरेनं ज्या कुकला त्याच्या हॉटेलातून काढून टाकलं, त्याला हर्षदनं नोकरी दिली.

हर्षद आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण होत असताना गस्तीवरचं पोलीस पथक पोहोचलं. त्यानंतर श्रीराम सेनेचा उपाध्यक्ष तुषार घागरे आणि त्याचे साथीदार फरार झाले. त्यांना शोधून जेरबंद करण्याऐवजी पोलिसांनी चक्क प्रकरण मिटवून घेण्याचा सल्ला दिला.

हर्षद आणि त्याच्या भावानं अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर सूत्रं हलली आणि तुषार घागरेसह 15  जणांवर दंगल घडवल्याचा गुन्हा दाखल झाला.

काही दिवसांपूर्वीच श्रीराम सेनेच्या अध्यक्षावर प्लॉट बळकावल्यामुळं गुन्हा दाखल झाला. आता उपाध्यक्षानं दहशत निर्माण करुन पुढचं पाऊल टाकलं आहे. त्यामुळं किमान घरात तरी शांतता राहावी यासाठी फडणवीसांनी अशा टोळ्यांचा बंदोबस्त तातडीनं करावा म्हणजे मिळवलं.
=====================================

शेतकऱ्यांच्या मागे लागता, मग उद्योजकांचं कर्ज का थकलं' - सुप्रीम कोर्ट 

'शेतकऱ्यांच्या मागे लागता, मग उद्योजकांचं कर्ज का थकलं'?
नवी दिल्ली :  लहान शेतकऱ्याला कर्जफेड करण्यास विलंब झाल्यास त्याच्या मागे बँकांचा ससेमिरा लागतो, , पण मोठे उद्योजक, कर्जदारांशी सेटलमेंट केली जाते. अशा मोठ्या माशांच्या कर्जाच्या वसुलीबाबत काय पावलं उचलली असा सवाल करत, सुप्रीम कोर्टाने रिझर्व्ह बँकेला चांगलंच फटकारलं.

एवढ्या मोठ्या रकमांच्या कर्जसवुसलीबाबत तुम्ही काय करताय असा प्रश्न कोर्टाने आरबीआयला विचारला.

एखाद्या शेतकऱ्यानं कर्ज थकवलं तर त्याच्यामागे बँकेचा ससेमिरा लागतो. मात्र तेच जर एखाद्या बड्या कंपन्यांनी थकवलं तर त्यांच्या कर्जाची पुनर्रचना केली जाते, हप्ते बनवले जातात, वाटाघाटी केल्या जातात आणि तरीही पैसे वसूल झाले नाहीत तर कंपनीला दिवाळखोर जाहीर केलं जातं असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं.

गेल्या सुनावणीत रिझर्व्ह बँकेनं एका बंद लिफाफ्यात या बड्या कर्जदारांची नावं दिली होती आणि ती जाहीर न करण्याची विनंती केली होती. मात्र नाव न सांगणं ठीक असलं तरी एकूण रक्कम किती आहे ते तरी कळलं पाहिजे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.
=====================================

देशभ्रमंतीसाठी निघालेल्या लेडी बायकरचा अपघाती मृत्यू

देशभ्रमंतीसाठी निघालेल्या लेडी बायकरचा अपघाती मृत्यू
भोपाल : वेगाचा थरार आणि बाईक रायडिंगमधील आघाडीचं नाव असलेल्या लेडी बायकर वीनू पालीवाल यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. 40 वर्षीय वीनू या बाईकवरून देशभ्रमंतीला निघाल्या होत्या. मात्र त्यांचा हा प्रवास पूर्ण होण्याआधीच त्यांना काळाने गाठलं.

वीनू आणि त्यांचा मित्र दीपेश हे 24 मार्चपासून ‘हार्ले डेविडसन’वरून देशभ्रमंतीसाठी निघाले होते. दोघेही आपापल्या बाईक्स घेऊन मध्य प्रदेशातील सागर इथून भोपाळला जात होते. मात्र यादरम्यान ग्यारसपूर इथं वीनू यांची बाईक स्लिप झाली.

वीनू यांच्या बाईकने वेग पकडला असल्यामुळे या अपघातात त्यांचा मृत्यू  झाल्याचं सांगण्यात येत आहे.

वीनू पालीवाल हे बाईक रायडिंग क्षेत्रातील आघाडीचं नाव आहे. एक महिला असूनही त्यांनी या क्षेत्रात दबदबा निर्माण केला होता. गेल्या वर्षापासून त्यांनी हार्ले डेविडसन 48 मॉडेलवरून हॉग रॅली पुरी केली होती. त्यामुळेच त्यांना ‘लेडी ऑफ द हार्ले 2016’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

वीनू यांचं ड्रायव्हिंग अत्यंत सहज होतं. हार्ले डेविडसन या बाईकवर तर त्यांचा चांगलाच हात बसला होता. त्यामुळेच तब्बल 180 च्या स्पीडनेही त्या हार्ले डेविडसन चालवत होत्या. मात्र आज त्यांच्या अपघाती मृत्यू झाला.
=====================================

रजनीकांत 'पद्मविभूषण' तर सानिया पद्मभूषणने सन्मानित

रजनीकांत 'पद्मविभूषण' तर सानिया पद्मभूषणने सन्मानित
नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांच वितरण करण्यात आलं. अभिनेते रजनीकांत, गिरीजा देवी, रामोजी राव, पार्श्वगायक उदित नारायण, टेनिसपटू सानिया मिर्झा, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, इनाडू ग्रुपचे चेअरमन रामोजी रावा यांच्यासह 56 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

सुपरस्टार रजनीकांत आणि रामोजी राव यांचा पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च पुरस्कारने गौरव करण्यात आला. तर सानिया मिर्झा आणि उदित नारायण यांचा पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं. याशिवाय प्रियांका चोप्रा आणि बाहुबलीचा दिग्दर्शक एसएस राजमौली यांना पद्मश्री पुरस्कार देऊ गौरव केला.
=====================================

साखर कारखान्यांना पाणी पुरवणं हीच चूक', उद्योगमंत्र्यांची कबुली

'साखर कारखान्यांना पाणी पुरवणं हीच चूक', उद्योगमंत्र्यांची कबुली
मुंबई: एकीकडे लातूरला रेल्वेनं पाणी देण्याची सर्कस सुरु असताना लातूरकरांवर हात पसरण्याची वेळ राज्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनीच आणल्याचं समोर आलं आहे. भीषण पाणीटंचाईच्या काळातही पिण्याचं पाणी लातूर जिल्ह्यातील 12 ते 14 साखर कारखान्यांना दिल्यानंच लातूरकरांना दाहीदिशा फिरावं लागल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी मान्य केलं आहे.

लातूरच्या पाणीप्रश्नावर आज त्यांनी विधीमंडळात निवेदन दिलं. यावेळी त्यांनी लातूरचे उद्योग अंशत: बंद झाले असून 3 हजारावर कामगार बेरोजगार झाल्याचं मान्य केलं. बेरोजगार झालेल्या कामगारांना स्वस्त रेशन देण्याचीही घोषणा देसाई यांनी केली

‘पाणी टंचाई असताना 12 ते 14 साखर कारखान्यांना पाणी दिलं. त्यामुळे नियोजन चुकले. त्याचाच परिणाम इतर उद्योगांवर झाला. टंचाईच्या काळात पाणी कारखान्यांना द्यायला नको होतं. यापुढे हे होणार नाही. याची काळजी सरकार यापुढे घेईल. ‘ असं म्हणत देसाई यांनी भाजपच्या हातात असलेल्या महसूल, कृषी आणि सहकार मंत्र्यांवर निशाणा साधला.
=====================================

लातुरसाठी 10 लाख लि. पाणी देतो, केंद्राने नेण्याची सोय करावी : केजरीवाल

लातुरसाठी 10 लाख लि. पाणी देतो, केंद्राने नेण्याची सोय करावी : केजरीवाल
नवी दिल्ली: भीषण पाणीटंचाईत अडकलेल्या लातूरकरांच्या मदतीसाठी आता देशभरात अनेक मदतीचे हात येण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील तहानलेल्या लातूरला पाणी देण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलं आहे.

दिल्लीकर नागरिक दररोज पाणी वाचवून 10 लाख लिटर पाणी लातूरला देण्यास तयार आहेत, फक्त केंद्र सरकारने ते पाणी लातूरपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करावी असं या पत्रात म्हटलं आहे.

मिरजहून पाणी एक्स्प्रेस लातुरात

दरम्यान, दुष्काळानं त्रस्त झालेल्या लातुरकरांसाठी आजची सकाळ ही नव्या सुर्योदयासह एक नवी उमेद घेऊन आली.  कारण, गेले कित्येक दिवस पाण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लातुरकरांची पाण्याची प्रतीक्षा अखेर आज संपुष्टात आली. पाण्याची मिरज एक्सप्रेस आज सकाळी लातुरात दाखल झाली.

पाण्याचे 10 वॅगन्स या एक्सप्रेसला जोडण्यात आले होते. एका वॅगनमधून साधारणपणे 50 हजार लिटर पाणी नेण्यात आलं आहे. त्यामुळे या पहिल्या खेपेला लातूरकरांना तब्बल ५ लाख लीटर पाणी मिळालं. तसेच लवकरच उर्वरित वॅगनही लवकरच लातूरकडे पाठवली जाणार आहेत.

दरम्यान, लातूरात भीषण पाणीटंचाई असल्याने सरकार याआधी उजनी धरणातून रेल्वेनं लातूरला पाणी देणार होतं. मात्र त्यातही अडचणी आल्याने मिरजची निवड करण्यात आली. एखाद्या जिल्ह्याला रेल्वेने पाणी देण्याची वेळ महाराष्ट्रावर पहिल्यांदाच ओढावली आहे.
=====================================

अॅपलची धमाकेदार ऑफर, अवघ्या रु. 999मध्ये आयफोन

अॅपलची धमाकेदार ऑफर, अवघ्या रु. 999मध्ये आयफोन!
मुंबई: जगभरात प्रसिद्ध असलेली स्मार्टफोन कंपनी अॅपलनं आता आपलं लक्ष भारतीय बाजारपेठेकडे वळवलं आहे. त्यामुळेच भारतीय बाजारपेठेचा विचार करुन काही दिवसांपूर्वीच आयफोन SE हा स्वस्त स्मार्टफोन लाँच केला होता.

आता हाच स्मार्टफोन 999 रुपयांच्या ईएमआयवरही मिळणार आहे. दोन वर्षापर्यंत 999 रुपयांच्या हप्त्यांवर हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

याआधी आयफोन 6 आणि आयफोन 6s साठी लीजिंग प्लान आणला होता. या प्लाननुसार, आयफोन 6साठी दोन वर्ष 1199 रु. ईएमआय आणि आयफोन 6S साठी दोन वर्ष 1,399 ईएमआय असणार आहे.

कंपनीने आयपॅड मॉडेल्सवरही ऑफर सुरु आहेत. ईएमआयवर स्मार्टफोन विक्री यावर यंदा अॅपलनं जोर दिला आहे. 8 एप्रिलला भारतात लाँच करण्यात आलेल्या आयफोन SE बाबत मार्केटमध्ये म्हणावा तसा उत्साह पाहायला मिळाला नाही. यासाठीच ही नवी ऑफर आणल्याचं समजतं आहे.
=====================================

मुंबईकरांना दिलासा, मेट्रोची भाववाढ काही काळासाठी टळली

मुंबईकरांना दिलासा, मेट्रोची भाववाढ काही काळासाठी टळली
मुंबई: मुंबईकरांच्या डोक्यावर मेट्रोच्या भाववाढीची टांगती तलवार काही काळासाठी टळली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कानडे यांच्या खंडपीठाने मेट्रोची याचिका सरन्यायाधीश धिरेंद्र वाघेला यांच्याकडे पाठवली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती नेमका कधी निर्णय देतील हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत मेट्रोच्या भाववाढीला स्थगिती मिळाली आहे.

मेट्रोची भाववाढ करण्यात आल्यानंतर सरकारने रिलायन्सविरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर झालेल्या अनेक सुनावणीनंतर न्यायालय आज सुनावणी करणार होतं. पण मेट्रोची याचिका मूख्य न्यायमूर्तींकडे वर्ग झाल्याने ही भाववाढ काही काळ टळली आहे.

दरम्यान, मेट्रो दरवाढी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती देण्यात आली होती. परिणामी मुंबई उच्च न्यायालयानं रिलायन्स आणि एमएमआरडीएला चूक दुरूस्त करण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाडलं होतं. त्यानंतर याबाबतच सुनावणी मुंबई हायकोर्टातच होईल असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते.
=====================================

'सुलतान'चा टीझर रिलीज, रांगड्या पैलवानाच्या भूमिकेत सलमान

'सुलतान'चा टीझर रिलीज, रांगड्या पैलवानाच्या भूमिकेत सलमान
Photo Courtesy : YRF Video
मुंबई : बॉलिवू़ड अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतिक्षीत ‘सुलतान’ सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये पैलवान बनलेल्या सलमानचा दबंग अंदाज दिसत आहे.

या चित्रपटात सलमान खानची भूमिका अतिशय दमदार आहे. सुलतान प्रतिस्पर्धी पैलवानाला धोबीपछाड देत पुन्हा एक हरियाणा केसरी झाल्याचं टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे.
Photo Courtesy : YRF Video
Photo Courtesy : YRF Video
दरम्यान, सलमानने सोमवारीच ट्विटरवर सुलतानचं पोस्टर रिलीज करुन सुलतान का पहला दांव, असं लिहिलं होतं.

हा सिनेमा प्रसिद्ध पैलवान सुलतान अली खानच्या आयुष्यावर आधारित आहे. आदित्य चोप्राने चित्रपटाची निर्मिती केली असून पटकथा लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे. यंदा ईदला ‘सुलतान’ प्रदर्शित होणार आहे.

पाहा व्हिडीओ

=====================================

तोंडात रॉकेल घेऊन आगीवर फुंकर मारण्याचा स्टंट जीवावर

तोंडात रॉकेल घेऊन आगीवर फुंकर मारण्याचा स्टंट जीवावर
हैदराबाद : ‘इंडियाज गॉट टॅलेण्ट’ या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी केलेल्या स्टंटदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये ही घटना घडली.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तरुण धोकादायक फायर स्टंट करत होता. यावेळी त्याने रॉकेल तोंडात घेतलं आणि नंतर आगीवर फुंकलं. या स्टंट दरम्यान होरपळलेल्या तरुणाने रुग्णालयात प्राण सोडले.

मृत तरुण हैदराबादच्या ओल्ड सिटीच्या बरकस परिसरातील रहिवासी होता. ही घटना 7 एप्रिल रोजी घडली. 19 वर्षांचा मृत जलीलुद्दीन कॉलेज स्टुडंट होता. फलकनुमामध्ये खतरनाक स्टंट करताना त्याने स्वत:च्या तोंडात रॉकेल टाकलं आणि मग आगीवर फेकलं. यानंतर त्याने रॉकेल अंगावर ओतलं आणि आग लावली. मात्र तो या घटनेत गंभीर जखमी झाला.

जलीलुद्दीने सुरुवातीला रॉकेल तोंडत टाकलं. मग रॉकेल तोंडानेच आगीच्या लोटांवर फेकण्याचा स्टंट केला. हा स्टंट झाल्यानंतर त्याने अंगावर रॉकेल ओतून आग लावली. मात्र हा स्टंट फसला आणि तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला ओस्मानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे काल त्याने प्राण सोडले, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त एम ए बरी यांनी दिली.

खरंतर जलीलुद्दीनला फायर स्टंट करण्याचा अनुभव नव्हता. पण त्याला एका लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये भाग घ्यायचा होता. मात्र जलीलला ‘इंडियाज गॉट टॅलेण्ट’मध्ये सहभागी होण्याची इच्छा असल्याची कल्पना त्याच्या आई-वडिलांना नव्हती, असंही एम ए बरी म्हणाले.

पाहा व्हिडीओ
=====================================

सरकार गरिबांचे नव्हे, धनदांडग्यांचे - राहुल गांधी

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १२ - सराफांवर जबरदस्तीने लादण्यात येणारा कर हा छोट्या व्यापाऱ्यांसह कारागिरांना संपवण्याचे मोठे षडयंत्र आहे, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष खा.राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. काही बड्या उद्योजकांना फायदा व्हावा म्हणून सरकार छोट्या सराफांसह कारागिरांनी चिरडू पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशभरातील सराफांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घेतलेल्या जाहीर सभेत खा. गांधी बोलत होते.
    मुंबई ज्वेलर्स असोसिएशन, संघटना आणि सुवर्ण कारागिर संघटनांनी आयोजित केलेल्या या सभेसाठी झवेरी बाजारमधील शेख मेनन स्ट्रीट हाऊसफुल्ल झाला होता. कडक ऊन्हातही हजारो किरकोळ आणि घाऊक सराफा व्यापारी, कारागिर आणि सुवर्णकार सभेसाठी तळ ठोकून होते. यावेळी बोलताना खा. गांधी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांना कमी लेखत भाजपप्रणित केंद्र सरकारने गरीबांच्या जमिनी मुठभर बड्या उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी सुधारित जमीन अधिग्रहण कायदा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहत या कायद्याला कडाडून विरोध केला होता. त्यांतर तीन वेळा सरकारने अध्यादेश काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसने तो हाणून पाडला

=====================================

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्येप्रकरणी प्रियकर राहुल राज सिंगला अटकपूर्व जामीन मंजूर

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १२ - अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रियकर राहुल राज सिंगला कोर्टाकडून ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. १८ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राहुल राजला १८ एप्रिलपर्यंत रोज सकाळी ११ ते  दुपारी १च्या दरम्यान पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. 
    अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्या नंतर राहूलने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 
    प्रत्युषाची आई सोमा बॅनर्जीनी राहुलविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. त्याच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करून प्रत्युषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
    दरम्यान, प्रत्युषाने आर्थिक तणावातून आत्महत्या केली असावी असे राहुलने कोर्टात दिलेल्या जमीन अर्जामध्ये म्हटले आहे. तिच्यावर चार बँकांचे कर्ज होते. ज्याचे हफ्ते तिला भरता येत नव्हते. मला तिच्याशी लग्न करायचे होते, मी तिला एक हिऱ्याची अंगठी देखील दिली होती, असेही त्याने नमूद केले आहे.
=====================================

साडी शिवाय महिलांना मंदिरात प्रवेश नाही, अंबाबाई देवस्थानचा नवा निर्णय

  • ऑनलाइन लोकमत
    कोल्हापूर, दि. १२ - पंजाबी ड्रेसवर आलेल्या महिलेला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही असा फतवा अंबाबाई देवस्थानने काढला असल्याचे वृत्त जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीने दिले आहे. दवेस्थानच्या या निर्णयामुळे सोमवारी महिलांनी केलेल्या गाभाराप्रवेशाचा आनंद क्षणभंगूर ठरला आहे.
    महिलांना गाभाराप्रवेश मिळू नये यासाठी मंदिर समितीने नव्या अटी टाकायला सुरुवात केली आहे. साडीमध्ये असलेल्या स्त्रीयांना गाभाराप्रवेशाची अट टाकण्यात आली आहे. भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांना जुना राजवाडा पोलिसांनी तशा सूचना केल्याची वृत्त आहे.
    दवेस्थानच्या या निर्णयावर तृप्ती देसाई यांनी तीव्र शद्बात नाराजी व्यक्त केली आहे. पंजाबी ड्रेसमध्ये महिलांचे कोणत्याही प्रकारे अंग प्रदर्शन होत नाही. असे असताना पंजाबी ड्रेसवर आक्षेप का? असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे. तसेच मी आता पंजाबी ड्रेस घालूनच गाभार प्रवेश करणार असे आव्हान तृप्ती देसाई यांनी दिले आहे.
    साडी हा महिलांचा पारंपारिक वेष आहे. यामुळे महिलांनी साडी घालून दर्शनाला यावे अशा सूचना आम्ही केल्याचे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल देशमुख यांनी सांगीतले.
=====================================

No comments: