Wednesday, 13 April 2016

नमस्कार लाईव्ह १३-०४-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ऑस्ट्रेलियात 'अदानी' प्रकल्पाच्या अडचणींत वाढ 
२- दुबई:भिकारी महिन्याला कमवतात 74 हजार डॉलर 
३- म्यानमार शहराला 6.8 रेक्टर स्केलचा भुकंपाचा धक्का 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- जात पंचायतविरोधी कायदा एकमताने मंजूर 
५- हिंदू धर्मात स्त्री-पुरुष भेदभाव नाही तर मग मंदिर प्रवेशासाठी का ? - सुप्रीम कोर्ट 
६- आंतरजातीय विवाह करणा-यांच्या मदतीसाठी 24 तास हेल्पलाइन 
७- मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची 'ईडी'ची मागणी 
८- तंबाखू उद्योगांचे दररोज 350 कोटींचे नुकसान 
९- काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मुफ्तींनी घेतली मोदींची भेट 
१०- पाकमधील मृत भारतीयासंदर्भात चौकशीचे निर्देश 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- 30 एप्रिलनंतर IPL महाराष्ट्राबाहेर : हायकोर्ट 
१२- नागपूर; श्रीहरी अणेंकडून वाढदिवसाला स्वतंत्र विदर्भाचं केक कटिंग 
१३- राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर 21 हजारांचं कर्ज 
१४- आणखी 10 वॅगन घेऊन पाणी एक्स्प्रेस लातुरला रवाना 
१५- IPL - मुंबई, पुणे संघ दुष्काळग्रस्तांना करणार मदत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- नागपूर; मनसे नेत्याकडून कन्हैयाला जेवणाचं आमंत्रण 
१७- अहमदनगर; जायकवाडी बॅक वॉटरवर आणखी एक दरोडा 
१८- 36 फूट उंच, 90 किलो वजन... देशातील सर्वात उंच राजमुद्रा सोलापुरात 
१९- जळगाव; एव्हरेस्ट शिखर पार करत राजहंस जळगावात दाखल 
२०- मुंबईत डंपर चोरट्यांना दुसऱ्या चोरट्याचा गंडा 
२१- काश्मीर गोळीबारातील मृतांची संख्या तीन 
२२- अमृतसर - बियास नदीत बुडून ६ तरुणांचा मृत्यू 
२३- नागपूर - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची दुपारी ४ वाजता फोरलोवर तुरुंगातून सुटका 
२४- छत्तीसगड - बस्तर पोलिसांसमोर ६ महिलांसह ६१ नक्षलवादी आले शरण 
२५- कोल्हापूर - कागलजवळ ट्रकची मेंढ्यांना धडक, ३० मेंढ्यांचा मृत्यू तर २० जखमी. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- शहरी भागात युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक- एक सर्व्हे 
२७- 'नाद'खुळा... दोघींची कमाल! हा व्हिडिओ पाहाल तर नक्की धराल ताल 
२८- HTCचा सर्वात जबरदस्त स्मार्टफोन लाँच, पाहा झक्कास फीचर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आयुष्यात जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल, हरलात तर मार्गदर्शन कराल
(गंगाधर संगेवार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


===========================================

जात पंचायतविरोधी कायदा एकमताने मंजूर

जात पंचायतविरोधी कायदा एकमताने मंजूर
मुंबई : महाराष्ट्राला जात पंचायतीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी राज्य सरकारने कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. विधानसभेत सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण देणारा कायदा एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) विधेयक 2016 ‘ यानुसार आता जात पंचायतींच्या कारनाम्याला आळा बसेल.

या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना तीन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

या विधेयकामुळे सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीला संरक्षण मिळेल. तसंच जात पंचायत आणि सामाजिक बहिष्कार निर्मूलनाबाबत पावले उचलली जातील.

यापुढे कोणत्याही व्यक्तीला सामाजिक बहिष्कृत करता येणार नाही, अथवा वाळीत टाकता येणार नाही. अशा प्रकारचे कृत्य यापुढे अपराध ठरणार आहे. असा अपराध करणाऱ्याला 3 वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

बहिष्कृत किंवा वाळीत टाकण्यास मदत करणाऱ्यांनासुद्धा दोषी धरले जाईल.

वाळीत टाकण्याच्या सर्वाधिक घटना रायगड जिल्ह्यात घडल्या आहेत. वर्षभरात रायगडात 46 गुन्हे दाखल झाले असून, 633 जणांचा गुन्ह्यात सहभाग आहे.
===========================================

30 एप्रिलनंतर IPL महाराष्ट्राबाहेर : हायकोर्ट

30 एप्रिलनंतर IPL महाराष्ट्राबाहेर : हायकोर्ट
30 एप्रिलनंतर महाराष्ट्रात होणारे आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई हायकोर्टाने दुष्काळप्रश्नी आयपीएलच्या भवितव्याबाबत झालेल्या सुनावणीत सामने राज्याबाहेर नेण्याचे आदेश बीसीसीआयला दिले. सामन्यांच्या आयोजनासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन हायकोर्टाने 15 दिवसांची मुदत दिली आहे.

राज्यातील पाण्याची कमतरता आणि दुष्काळी परिस्थिती पाहून हायकोर्टाने हा निर्णय घेतला आहे. याचा फटका टीम ओनर्स आणि फ्रँचायझींना बसण्याची शक्यता असली, तरी एकूणच न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागतच होताना दिसत आहे.

मुंबई : आयपीएलच्या सामन्यांच्या भविष्यावर उच्च न्यायालयात आज निकाल लागणार आहे. आयपीएल सामन्यांवर उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत बीसीसीआयने दुष्काळी भागांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

जितकं पाणी मैदानावर वापरु तितकंच दुष्काळी भागांना देऊ असं बीसीसीआयच्या वकिलांनी कोर्टात म्हटलं आहे. शिवाय मुंबई आणि पुण्याच्या टीम्स मुख्यमंत्री रिलीफ फंडमध्ये 5 कोटी रुपये देणार असल्याचीही माहिती देण्यात आली.

आयपीएलसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी काही पाणी दुष्काळग्रस्त भागाला देण्यासाठी तयार आहात का असा सवाल मुंबई उच्च न्यायालायानं बीसीसीआयला विचारला होता. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आयपीएलचे सामने व्हावे की नाही यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना कोर्टानं हा प्रश्न विचारला.

महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ आहे. अशा स्थितीमध्ये बीसीसीआय मुख्यमंत्री सहाय्यता निधीला काही मदत करु इच्छिते काय, असा सवालही कोर्टानं विचारला आहे. एका सामन्यासाठी किती पाणी वापरलं जातं याची माहिती देण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
===========================================

श्रीहरी अणेंकडून वाढदिवसाला स्वतंत्र विदर्भाचं केक कटिंग

श्रीहरी अणेंकडून वाढदिवसाला स्वतंत्र विदर्भाचं केक कटिंग
नागपूर : एकीकडे महाराष्ट्राच्या अखंडतेवरुन वादविवाद सुरु असताना नागपुरात मात्र वेगळ्याच केक कटिंगची चर्चा रंगली आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र विदर्भाचा केक कापल्याचं समोर आलं आहे.

श्रीहरी अणे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. केकवर अखंड महाराष्ट्र असून अणे यांनी सुरीने केक कापून विदर्भाचा तुकडा विलग केला.

स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या विधानानंतर श्रीहरी अणे यांनी महाधिवक्ते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर यापुढे स्वतंत्र विदर्भासाठी लढत राहीन असा निर्धारही त्यांनी केला. विदर्भ आणि मराठवाड्यावर सातत्यानं अन्याय झाल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा स्वतंत्र करा अशी भूमिका श्रीहरी अणेंनी घेतली आहे.
===========================================

राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर 21 हजारांचं कर्ज

राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर 21 हजारांचं कर्ज !
मुंबई :  तुम्ही कोणत्याही बँकेचं, संस्थेचं अथवा सावकाराकडूनही कर्ज घेतलं नसलं तरीही तुमच्या डोक्यावर 21 हजार रुपयांचं कर्ज आहे. देशाचे नियंत्रक आणि महालेखापाल अर्थात ‘कॅग‘ने आपल्या अहवालात ही माहिती प्रसिद्ध केली आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकावर 21 हजार 125 रुपयांचं कर्ज आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2010-11 साली प्रत्येकावरील कर्जाचा आकडा 17 हजार 275 रुपये होता.

राज्यातील खर्चाचा लेखाजोखा मांडणारा ‘कॅग’चा रिपोर्ट आज विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालानुसार गेल्या काही वर्षात सिंचनासाठी मूळ किंमतीच्या दुप्पट खर्च झाला. एवढं करुनही अनेक सिंचन प्रकल्प हे अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्यावर ‘कॅग’नेही शिक्कामोर्तब केलं. या सगळ्या सिंचन प्रकल्पामुळे राज्यावर कर्जाचा बोजाही वाढला आहे.
===========================================

मनसे नेत्याकडून कन्हैयाला जेवणाचं आमंत्रण

मनसे नेत्याकडून कन्हैयाला जेवणाचं आमंत्रण!
नागपूर : कन्हैया कुमारच्या नागपूर दौऱ्यावरुन मोठं घमासान सुरु झालं आहे. अभाविप आणि बजरंग दल या संघटनांचा कन्हैयाच्या कार्यक्रमाला विरोध असताना डाव्या संघटनांनी मात्र हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका घेतली आहे. तर मनसेचे नेते प्रशांत पवार यांनी कन्हैयायाला थेट जेवणाचंच निमंत्रण दिलं आहे.

14 एप्रिलला कन्हैय्या नागपुरात, बजरंग दलाचा विरोध

14 एप्रिलला कन्हैया कुमार नागपुरात येणार आहे. दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन तो नागपुरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेणार आहे. मात्र हे कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा बजरंग दलाने दिला आहे. तर आपण कन्हैयासोबत चर्चा करण्यास तयार असून त्याने 14 एप्रिल सोडून दुसऱ्या कोणत्याही दिवशी यावं, असं अभाविपनं म्हटलं आहे. तसेच 14 एप्रिलला कन्हैयाच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये यासाठी अभाविपने पोलिस आयुक्तांना देखील पत्र लिहिलं आहे.

मनसे नेत्याकडून कन्हैयाला जेवणाचं आमंत्रण!

मनसेचे नेते प्रशांत पवार यांनी कन्हैयाला जेवणासाठी आमंत्रित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रशांत पवार हे नागपुरातील मनसेचा चेहरा आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, हे जेवण ‘जय जवान जय किसान संघटने’मार्फत आहे. शेतकऱ्यांचा मुद्दा आणि जमिनीच्या मुद्द्यावर त्यांना कन्हैयाशी चर्चा करायची आहे
===========================================

'नाद'खुळा... दोघींची कमाल! हा व्हिडिओ पाहाल तर नक्की धराल ताल

'नाद'खुळा... दोघींची कमाल! हा व्हिडिओ पाहाल तर नक्की धराल ताल
मुंबई: काही तरी वेगळं करुन दाखवावं अन् जगानं त्याची दखल घ्यावी असं जवळपास प्रत्येकालाच वाटत असतं. अशावेळी अनेक जण त्या दृष्टीनं प्रयत्नही करतात. पण अनेकदा थोड्याशा अपयशानं खचून जाऊन त्याविषयी आपण प्रयत्न सोडून देतो. पण यालाच अपवाद दोन मुली ठरल्या आहेत.

एखाद्या गोष्टीची आवड आणि त्याविषयी असणारी तळमळ तसंच कठोर परिश्रम करण्याची तयारी यामुळे तुम्ही नक्कीच त्या गोष्टीत पारंगत होऊ शकता आणि एकवेळ तुमची सगळ्यांनाच दखल घ्यावी लागते. असंच काहीसं सध्या सोशल मीडियावरील एका व्हिडिओमधून पाहायला मिळतं आहे.

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामधील दोन तरुणींनी अक्षरश: कमाल केली आहे. कोणत्याही वाद्यांशिवाय फक्त प्लास्टिक ग्लास आणि टेबल यांच्या साह्यानं अक्षरश: ताल धरायला लावणारं गाणं या दोघींनी गायलं आहे.

त्यांच्या या व्हिडिओला बरीच पसंती मिळते आहे. आतापर्यंत 7 लाख 60 हजार 168 जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर तब्बल 15 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

===========================================

जायकवाडी बॅक वॉटरवर आणखी एक दरोडा

जायकवाडी बॅक वॉटरवर आणखी एक दरोडा
अहमदनगर : अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यात एरंडगावात आख्खा चर खोदून जायकवाडी बॅक वॉटरचं पाणी चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. या पाणीचोरीचे काही फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत.

जायकवाडीच्या बॅकवॉटरमधून सोडण्यात आलेलं पाणी काढण्यासाठी अक्षरशः या गावात मोटारींचं एक जाळचं तयार करण्यात आलं आहे.

एकीकडे मराठवाडा आणि नगरच्या काही भागात तीव्र पाणीटंचाई आहे. अशा प्रसंगात हा प्रकार म्हणजे पाण्यावर दरोडा टाकण्यासारखाच आहे.

यापूर्वी एबीपी माझा’ने बातमी दाखवल्यानंतर जायकवाडीच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केलं.

जायकवाडीचं पाणी चोरण्यासाठी गेल्या 15 दिवसात 30 फूट खोल आणि एक किलोमीटर लांब चर खोदण्यात आली होती. याप्रकरणी ‘एबीपी माझा’ने बातमी दाखवल्यानंतर सुभाष सिसोदे, लक्ष्मण नेहे यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला.
===========================================

36 फूट उंच, 90 किलो वजन... देशातील सर्वात उंच राजमुद्रा सोलापुरात

36 फूट उंच, 90 किलो वजन... देशातील सर्वात उंच राजमुद्रा सोलापुरात!
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सोलापूरकरांनी अभिनव पद्धतीने मानवंदना दिली आहे. बाबासाहेबांच्या 125 जयंतीच्या निमित्ताने आंबेडकर चौकात देशातील सर्वात उंच राजमुद्रा बसवण्यात आली आहे. यानिमित्ताने स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेल्या सोलापूर शहरातील आंबेडकर चौकाला पहिलं स्मार्ट चौक बनवण्यात आलं आहे.

तब्बल 36 फूट उंचावर असलेली ही राजमुद्रा आणि अशोक स्तंभ सोलापूर शहराचं वैभव बनलं आहे. महामानवाच्या जयंती दिनी राजमुद्रेचं लोकार्पण होणार आहे.
rajmudra2
26 फूट उंच अशोक स्तंभ आणि त्यावर तब्बल साडे आठ फूट उंचीची राजमुद्रा. ही देखणी कलाकृती साकार सोलापुरात झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ही कलाकृती कायमस्वरूपी बसवण्यात आली आहे.

2009 साली सोलापूर महानगरपालिकेत ही कलाकृती साकार करण्याचा प्रस्ताव झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने याला अंतिम स्वरूप प्राप्त झालं आहे.
===========================================

आणखी 10 वॅगन घेऊन पाणी एक्स्प्रेस लातुरला रवाना

आणखी 10 वॅगन घेऊन पाणी एक्स्प्रेस लातुरला रवाना
सांगलीपाण्याची पहिली पाणी एक्स्प्रेस तहानलेल्या लातूरमध्ये दाखल झाल्यानंतर आज दुसरी ट्रेनही लातूरकडे रवाना झाली.

सकाळी 11 च्या दरम्यान 10 वॅगन म्हणजेच 5 लाख लिटर पाणी भरुन एक्स्प्रेस लातूरच्या दिशेने रवाना झाली.  ही रेल्वे आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लातूरमध्ये पोहचण्याची शक्यता आहे.

यानंतर लातूरला पाणी देण्याचं काम युद्धपातळीवर सुरुच राहणार आहे. दुपारी दोन वाजल्यानंतर पुन्हा 10 वॅगनमध्ये पाणी भरण्यासाठी सुरुवात होणार आहे.

दरम्यान, कालची सकाळ ही लातुरकरांसाठी नव्या सूर्योदयासह एक नवी उमेद घेऊन आली. कारण, गेले कित्येक दिवस पाण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लातुरकरांची पाण्याची प्रतीक्षा काल संपुष्टात आली. पाण्याची मिरज – लातुर एक्सप्रेस काल सकाळी लातुरात दाखल झाली.

यंदा चांगला पाऊस

गेल्या तीन वर्षांपासून चांगल्या पावसाची आस धरुन बसलेल्या जनतेला भारतीय हवामान विभागाने मोठा दिलासा दिला आहे. कारण यंदा पाऊसमान हे उत्तम म्हणजेच सरासरीच्या तब्बल 106 % असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

इतकंच नाही तर विदर्भ आणि दुष्काळी मराठवाड्यातही चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परवाच खाजगी हवामान संस्था स्कायमेटनेही देशभरात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
===========================================

एव्हरेस्ट शिखर पार करत राजहंस जळगावात दाखल

एव्हरेस्ट शिखर पार करत राजहंस जळगावात दाखल
जळगाव  जगातील सर्वात उंचीवरून म्हणजेच एव्हरेस्ट शिखर पार करत करून आलेल्या राजहंस पक्षाचे जळगाव जिल्ह्यातील अनेक जलाशायांवर दर्शन घडू लागल्याने त्यांच्या निरीक्षणाची संधी पक्षीमित्राना मिळाली आहे. 
जळगाव जिल्ह्यात विविध ऋतूंमध्ये 95 प्रजातीचे पक्षी स्थलांतर करून येत असतात. अशाच प्रकारे स्थलांतर करून आलेल्या सुंदर अशा राजहंस पक्षाचे सध्या जळगाव जिल्ह्यातील बहुळा, हतनूर, भोकरबारी यांसारख्या जलाशयांवर दर्शन घडू लागले आहे. 
साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत भारतात मुक्काम असतो. यंदा मात्र राजहंस पक्षाचे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात देखील दर्शन घडत असल्याने पक्षी निरीक्षकांना त्यांच्या या लांबलेल्या मुक्कामाविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. राजहंस पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात उंचीवरून म्हणजेच एव्हरेस्ट शिखर पार करून हा भारतात येत असल्याचे पक्षी निरीक्षकांचे मत आहे.
===========================================

मुंबईत डंपर चोरट्यांना दुसऱ्या चोरट्याचा गंडा

मुंबईत डंपर चोरट्यांना दुसऱ्या चोरट्याचा गंडा
मुंबई : चोरट्यांनाच फसवल्याची घटना मुंबईत घडली आहे. ज्या चोरट्यांनी डंपर लुटला होता, त्यांचीच नंतर फसवणूक करण्यात आली. हा डंपर लुटणाऱ्यांची एका गुंडाकडून केवळ एक हजार रुपये देऊन बोळवण करण्यात आली. इतकंच नाही तर डंपर चोरणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

6 एप्रिल रोजी ही घटना घडली. एक डंपर चालक वाळू घेऊन वाशीहून मुंबईला येत होता. पण ट्रॉम्बेजवळ आल्यावर एका स्विफ्ट कारने डंपरला ओव्हरटेक केलं. कारमधून चार जण उतरले. त्यांनी डंपरच्या चालकाला खाली ओढलं आणि डंपर घेऊन पसार झाले.

मुंबई क्राईम ब्रान्चला घटनास्थळावरच्या सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले. या फुटेजमध्ये डंपर आणि कार दिसत होती, पण कारचा नंबर दिसत नव्हता.

यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक खोत यांनी दुसऱ्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास केला. त्यामध्ये जावेद नावाचा मुख्य आरोपी त्यांच्या हाती लागला. त्याच्या चौकशीनंतर इतर आरोपीही जाळ्यात सापडले.

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, “गुजरातमधील एका गुंडासोबत डंपरबाबत डील केली होती. आम्ही डंपर चोरुन तो गुंडाला विकणार होतो. गुंडाने हा डंपर सहा लाख रुपयांमध्ये खरेदी करण्याचं आश्वासन दिलं होतं. 7 एप्रिलला आम्ही त्याला डंपर देण्यास गेलो, त्यावेळी माझ्याकडे आता सहा लाख रुपये नाहीत, सध्या तुम्ही एक हजार रुपये टोकन म्हणून ठेवून घ्या, उरलेली रक्कम नंतर देतो, असं उत्तर गुंडाने दिलं. त्यानंतर आम्ही मुंबईत परतलो.”

पण गुजरातमधील गुंड हा डंपर घेऊन पसार झाला, तर डंपर चोरणारे चारही जण जेलमध्ये गेले.
===========================================

HTCचा सर्वात जबरदस्त स्मार्टफोन लाँच, पाहा झक्कास फीचर

HTCचा सर्वात जबरदस्त स्मार्टफोन लाँच, पाहा झक्कास फीचर
मुंबई: तैवानी कंपनी HTC नं 2016 मधील आपला सर्वात जबरदस्त स्मार्टफोन HTC 10 लाँच केला आहे. HTC 10 आणि HTC 10 लाइफस्टाइल हे दोन व्हेरिएंट लाँच केले आहेत.

HTC इंडियाच्या वेबसाइटवर HTC 10 लाइफस्टाइल लाँच करण्याचे संकेत दिले आहेत. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 820 व्हेरिएंटचा HTC 10ची किंमत जवळपास 699 डॉलर (46,500 रु.) आहे.  या स्मार्टफोनची डिलिव्हरी मे महिन्यापासून सुरु होणार आहे.

HTC 10मध्ये 32 जीबी मेमरी आणि 64 जीबी मेमरी असे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहे. तसेच 2 टीबी पर्यंत मेमरी वाढविता येणार आहे. तर HTC 10 लाइफस्टाइलमध्ये 3 जीबी रॅम असणार आहे.

HTC 10 मध्ये 5.2 इंच QHD डिस्प्ले असणार असून यामध्ये रेझ्युलेशन 1440×2560 पिक्सल आहे. तर HTC 10मध्ये 2.2Ghz क्वॉडकोअर स्नॅपड्रॅगन 820 आहे. तर HTC 10 लाइफस्टाइलमध्ये 1.8 Ghz क्वॉड कोअर स्नॅपड्रॅगन 652 प्रोसेसर आहे.

दोन्ही स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड मार्शमेलो सपोर्ट आहे. तर दोन्ही स्मार्टफोनमध्ये 12 अल्ट्रापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.

4जी, 3जी, ब्ल्यूटूथ आणि डीएलएनए हे फीचर देण्यात आले आहेत.

===========================================

हिंदू धर्मात स्त्री-पुरुष भेदभाव नाही तर मग मंदिर प्रवेशासाठी का ? - SC

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. १३ - हिंदू धर्मात महिला व पुरुष असा कोणताही भेदभाव नाही, हिंदू हा हिंदूच असतो, असे सांगत महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणा-या सबरीमाला मंदिर प्रतिष्ठानच्या अधिका-यांनासर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले. मंदीराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश करण्यापासून कसे रोखले जाऊ शकते असा सवालही न्यायालयाने विचारला आहे. 
    महाराष्ट्रात महिलांच्या मंदिर प्रवेशावरून सुरू असलेला वाद अात्ताशी थंडावलेला असतानाच शेकडो वर्षे जुने असलेल्या केरळमधील सबरीमाला मंदिरातील गाभा-यात महिलांना प्रवेश देण्यावरून वाद सुरू झाला आहे. महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली प्रथा कायम राखली पाहिजे यावर मंदिर प्रशासन तसेच केरळ सरकारही ठाम आहे. मात्र याच मुद्यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मंदिर प्रशासनाच्या अधिका-यांना खडसावले. 'हिंदू धर्मात स्त्री-पुरूष असा भेदभाव नाही, मग मंदिर प्रवेशासाठी असा भेदभाव का केला जातो? असा सवाल न्यायालयाने केला. 
===========================================

आंतरजातीय विवाह करणा-यांच्या मदतीसाठी 24 तास हेल्पलाइन

  • ऑनलाइन लोकमत
    मद्रास, दि. १३- मद्रास उच्च न्यायालयानं मद्रास सरकारला आंतरजातीय विवाह करणा-यांना आसरा देण्यासाठी 24 तास हेल्पलाइन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी एका स्पेशल सेलची स्थापना करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. तामिळनाडूतल्या एका हत्या प्रकरणात सुनावणीदरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं हा आदेश दिला आहे.
    न्यायालयानं यावेळी सरकारला आंतरजातीय विवाह करणा-यांच्या सुरक्षेसाठी विस्तारपूर्वक सामग्रीची व्यवस्थाही करण्यास सांगितलं आहे. सरकारनं आंतरजातीय विवाहाला विरोध करणा-या पालकांनाही सवाल विचारण्याची न्यायालयानं सूचना केली आहे. गेल्या तीन वर्षांत जवळपास आंतरजातीय विवाहाच्या वादातून 81 जणांची हत्या करण्यात आल्याची माहिती दलितांच्या न्यायासाठी संघर्ष करणा-या एका एनजीओनं दिली आहे.
    आरटीआय कार्यकर्त्यांच्या मते, राजकीय फायद्यासाठी सरकार हत्या करणा-याविरोधात सोम्य कारवाई करते. यावेळी उच्च न्यायालयानं 2014ला दिलीपकुमारशी आंतरजातीय विवाह केल्याचा बळी ठरलेल्या विमल देवी हत्या प्रकरणाला जबाबदार असलेल्या 5 पोलिसांवर कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत.
===========================================

IPL - मुंबई, पुणे संघ दुष्काळग्रस्तांना करणार मदत

  •   - मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी ५ कोटी तर मैदानासाठी वापरण्यात येईल तितके पाणी दुष्काळग्रस्तांना देणार
    ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १३ -  IPL मधील मुंबई , पुणे हे संघ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी ५ कोटी देणार असल्याचे  पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे महाराष्ट्रात आयपीएल स्पर्धेचे सामने खेळवण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यानन्यायालयात सांगितले. बीसीसीआयने न्यायालयात दुष्काळग्रस्तांना पाच कोटींची मदत करणार असल्याचीही माहिती दिली. याशिवाय, लातुरमधील कोणत्याही दुष्काळाग्रस्त भागात ४० लाख लीटर पाणी पुरविण्याची तयारी यावेळी बीसीसीआयने दाखवली. मात्र, महाराष्ट्रातील सामने इतरत्र खेळवण्याविषयी मौन बाळगले. 
    दरम्यान, नागपूरातील सामने अन्यत्र हलवण्याबाबत विदर्भ क्रिकेट असोसिएशनबोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असेही बीसीसीआयने सांगितले. या सुनावणीदरम्यान पुणे संघाच्या वकिलांनी त्यांच्या संघाचे सामने पुण्याबाहेर खेळविण्यास विरोध दर्शवला. हे सामने इतरत्र खेळवले गेल्यास संघाचा पाठिंबा कमी होईल, असा युक्तिवाद त्यांनी केला. आयपीएलची तिकीटे विकली गेली आहेत. याशिवाय, आयपीलमध्ये अनेक गुंतवणुकदारांचे व्यावसायिक हितसंबंध जोडले असल्याने आयपीएल सामने महाराष्ट्राच खेळवून देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी बीसीसीआयने केली.
    क्रिकेट संघटनांमध्ये सल्लागार म्हणून फक्त राजकारण्यांचीच वर्णी कशी काय लागते?, या राजकारण्यांशिवाय क्रिकेट संघटनांचा कारभार चालू शकत नाही का, असा खडा सवाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला विचारला. 
    न्यायालयाने यावेळी बीसीसीआयकडून एमसीएला इतर संघटनांच्या तुलनेत देण्यात येणाऱ्या अधिक प्राधान्याचा मुद्दाही उपस्थित केला. याशिवाय, एमसीएने त्यांच्या उत्त्पन्न आणि खर्चाचा तपशील जाहीर करावा, असे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले. 
===========================================
ऑस्ट्रेलियात 'अदानी' प्रकल्पाच्या अडचणींत वाढ
मेलबर्न : अदानी समूहाच्या ऑस्ट्रेलियातील 2.7 अब्ज डॉलरच्या खाण प्रकल्पासमोर नव्याने कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. क्वीन्सलॅंडमधील गॅलीली खोऱ्याचे पारंपरिक मालक असलेल्या वॅंगन ऍण्ड जगालिंगो (डब्लू ऍण्ड जे) या मूलनिवासी गटाने अदानी समूहाशी झालेल्या भाडेकराराला न्यायालयात आव्हान दिले आहे. 

क्वीन्सलॅंड सरकारच्या खाणमंत्र्यांनी या महिन्यात जाहीर केलेले खाणींचे भाडेकरार योग्य पद्धतीने दिले गेले नसल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला आहे. डब्लू ऍण्ड जे गटाच्या संमतीशिवाय कारमायकेल खाणींचे भाडेकरार देण्यात आले असून, अदानी समूहाला या गटाने तीन वेळा याआधी संमती नाकारली आहे. सर्व कायदेशीर संमती घेऊन अदानी समूहाला परवानगी देण्याची भूमिका स्थानिक सरकारने घेतली होती. मात्र, डब्लू ऍण्ड जे गटाने तीन वेळा संमती नाकारलेल्या अदानी समूहाला परवानगी देणे अवमानकारक असून, पारंपरिक मालकांच्या हक्कांवर गदा आणणारे आहे, असे गटाने म्हटले आहे. 

अदानी समूह ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड येथे कारमायकेल हा जगातील सर्वांत मोठा खाण प्रकल्प सुरू करीत आहे. या प्रकल्पाला सुरवातीला पर्यावरणवाद्यांचा विरोध होता. हा विरोध मावळल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ऑस्ट्रेलिया सरकारने या प्रकल्पाला पुन्हा मंजुरी दिली होती. आता येथील पारंपरिक मालकांनी आक्षेप घेतल्याने प्रकल्पासमोरील अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
===========================================
दुबई:भिकारी महिन्याला कमवतात 74 हजार डॉलर
दुबई- दुबईमध्ये भिकाऱयांविरोधात पोलिसांनी अटकसत्र सुरू केले असून, 59 जणांना अटक करण्यात आली आहे. एक भिकारी महिन्याला 73 हजार 500 डॉलर एवढे रक्कम कमवत असे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. 

दुबई नगर पालिकेच्या बाजार समितीचे प्रमुख फैजल अल्‌ बदियावी यांनी सांगितले की, ‘पोलिस व नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने भिकाऱयांविरोधात मोहिम सुरू करण्यात आली आहे. पहिल्या तिमाहीत 59 भिकाऱयांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या भिकाऱयांपैकी एकजण महिन्याला 73 हजार 500 डॉलर कमवत असे. सणांच्यावेळी तर भिकाऱयांच्या कमाईचा आकडा मोठा असे. मशिदीबाहेर अनेक भिकारी रांगेत उभे राहत असत.‘ 
===========================================
शहरी भागात युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक
नवी दिल्ली- भारतामध्ये शहरी भागात 20 वर्षांच्या आतील युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वधिक आहे, अशी माहिती सरकारी आरोग्य खात्याने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. 

गरोदर राहणाऱ्या महिलांपैकी ग्रामीण भागात 77 टक्के तर शहरी भागात 74 टक्के महिला बालकांना जन्म देतात. ग्रामीण भागात 2 टक्के तर शहरी भागात 3 टक्के एवढे गर्भपाताचे प्रमाण आहे. त्यापैकी शहरी भागात होणाऱ्या गर्भपातांमध्ये 14 टक्के गर्भपात हा 20 वर्षांखालील युवतींकडून होत आहे, अशी माहिती सर्व्हेक्षणातून पुढे आली आहे. 

देशामध्ये 20 वर्षांखालील युवतींकडून गर्भपाताचे प्रमाण 21 टक्के एवढे आहे. शहरी भागातील युवती विवाहापूर्वीच गर्भपात करत असल्याची माहिती पुढे आली आहे. 15 ते 49 वयोगटातील गर्भपाताचे प्रमाण 9.6 टक्के एवढे आहे. ग्रामीण भागातील 56 टक्के मुलांचा जन्म सरकारी रुग्णालयात तर 24 टक्के मुलांचा जन्म खासगी रुग्णालयात होत आहे. शहरामध्ये 42 टक्के मुलांचा जन्म सरकारी रुग्णालयात तर 48 टक्के मुलांचा जन्म खासगी रुग्णालयात होत आहे, अशीही माहिती पुढे आली आहे.

===========================================
मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची 'ईडी'ची मागणी
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग व आयडीबीआय कर्ज गैरव्यवहार प्रकरणात विजय मल्ल्यांचा पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे. ‘ईडी‘च्या अधिकाऱ्यांनी परराष्ट्र मंत्रालयायाला पासपोर्ट कायदा 1967 नुसार कारवाई करण्याची विनंती करुन प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे मल्ल्यांचे राजनैतिक पारपत्र (डिप्लोमॅटिक पासपोर्ट) रद्द करण्याची मागणी केली आहे. 

मल्ल्या यांनी त्यांच्यावर मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली ‘ईडी‘च्या मुंबई झोनल ऑफिसमध्ये सुरू असलेल्या कारवाईच्या तपासादरम्यान असहकार्याची भूमिका घेतली आहे, असे ‘ईडी‘ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन मार्च रोजी लंडनला प्रवास करताना मल्ल्या राज्यसभा खासदारपदी असल्याने त्यांनी मिळालेल्या डिप्लोमॅटिक पासपोर्टचा वापर केला हे गृहीत धरण्यात आले आहे. 

‘ईडी‘ने मल्ल्यांना वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यासाठी तीन वेळा सहकार्य करीत नव्या तारखा दिल्या होत्या. परंतु मल्ल्या आतापर्यंत एकदाही ‘ईडी‘च्या सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे या तपासाला विलंब होत असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. 

पासपोर्ट कायद्यानुसार, डिप्लोमॅटिक पासपोर्ट असणाऱ्या व्यक्तीच्या नेहमीच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे जमा केली जातात व ज्यावेळी तो रद्द करण्याची मागणी केली जाते तेव्हा पासपोर्ट आणि कागदपत्रे रद्द केली जातात. 
‘ईडी‘ची विनंती मंजुर झाल्यास परराष्ट्र मंत्रालयाकडून ब्रिटन प्रशासनाला याविषयी संपर्क करुन मल्ल्या यांना तेथून हद्दपार करण्याची सोय केली जाईल. 
===========================================
तंबाखू उद्योगांचे दररोज 350 कोटींचे नुकसान
नवी दिल्ली : सिगारेट उत्पादक कंपन्यांनी उत्पादन थांबविल्यापासून संपूर्ण उद्योगाला दररोज सुमारे 350 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे, अशी माहिती असोचॅमने आपल्या अहवालात प्रसिद्ध केली आहे. 
तंबाखू व सिगारेट पाकिटांवरील वैधानिक इशारा देणाऱ्या चित्राचा आकार 20 टक्क्यांवरुन 85 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याचा आदेश सरकारने दिला आहे. हा नवा नियम अस्पष्ट असल्याचे सांगत आयटीसी, गॉडफ्रे फिलिप्स आणि व्हीएसटीसारख्या मोठ्या कंपन्यांनी अनेक दिवसांपासून आपले उत्पादन प्रकल्प बंद ठेवले आहेत. 

धोरणातील अस्पष्टतेमुळे सिगारेट उत्पादनांच्या बेकायदेशीर आयातीला प्रोत्साहन मिळत असल्याचा दावा करत या उद्योगाशी जोडल्या गेलेल्या साडेचार कोटी लोकांचे रोजगार धोक्यात येऊ शकतात असा इशारा संस्थेने आपल्या अहवालात दिला आहे. 
आंतरराष्ट्रीय पातळीवर वैधानिक इशारा चित्राचा सरासरी आकार 31 टक्के आहे. परंतु आरोग्य मंत्रालयाच्या आदेशानुसार देशात सिगारेट पाकिटांवरील वैधानिक इशारा चित्राचा आकार 85 टक्के असणे आवश्यक आहे. परंतु, मोठ्या आकारात इशारा छापल्याने कंपनीचा ब्रँड नाहीसा होऊ शकतो व त्यामुळे उत्पादनांची बेकायदेशीर आयात व तस्करीला प्रोत्साहन मिळू शकते, असे असोचॅमने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

जगातील 90 टक्के तंबाखू उत्पादन करणाऱ्या चीन व ब्राझीलसारख्या उत्पादक देशांच्या तुलनेत भारतातील वैधानिक इशारा चित्राचा आकार निश्चितच जास्त असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
===========================================
काश्मीर गोळीबारातील मृतांची संख्या तीन
श्रीनगर- जम्मू-काश्‍मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हंडवाडा येथे मंगळवारी लष्करी जवानांनी केलेल्या गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आज (बुधवार) तीन झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शेर-ए-काश्मीर इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, राजा बेगम (वय 54) यांना मंगळवारी या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते गोळीबारात गंभीर जखमी झाले होते, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेत आधी मोहंमद इक्बाल (वय 21) आणि नईम भट हे दोन तरुण मंगळवारी ठार झाले होते. लष्कराने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर, काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती कारवाईचे आश्वासन दिले आहे. या घटनेचे चौकशीचे आदेश लष्कराने दिले आहेत. तर, काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती कारवाईचे आश्वासन दिले आहे. 
लष्करी जवानांकडून झालेल्या मुलींच्या कथित लैंगिक शोषणप्रकरणी छेडण्यात आलेल्या आंदोलनात हे तरुण सहभागी झाले होते. मंगळवारी याच मुद्यावरून आंदोलन करत हे तरुण रस्त्यावर उतरले होते. महंमद इक्‍बाल आणि नईम कादीर भट अशी गोळीबारामध्ये ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेनंतर हंडवाडा आणि लगतच्या परिसरामध्ये आंदोलनाचा भडका उडाला आहे. आज (बुधवार) काश्मीर खोऱ्यात बंद ठेवण्यात आला आहे.

मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, या गोळीबाराला जबाबदार असलेल्या सुरक्षा रक्षकांवर कडक कारवाई करण्यात येईल. शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारची छबी अशा घटनांमुळे नाकारात्मकरित्या पसरत आहे. लष्करानेही पोलिसांत तक्रार दाखल करत या गोळीबाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 
===========================================
काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मुफ्तींनी घेतली मोदींची भेट
नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी आज (बुधवार) दिली. 

श्रीनगर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये (एनआयटी) मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर व मंगळवारी (ता. 12) जवानांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. याविषयासह राज्यातील कायदा-सुव्यवस्था, सुरक्षा व अन्य विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान, मेहबुबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे 4 एप्रिल रोजी हाती घेतली आहेत. राज्यातील त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत.
===========================================
पाकमधील मृत भारतीयासंदर्भात चौकशीचे निर्देश
नवी दिल्ली - पाकिस्तानमधील तुरुंगामध्ये रहस्यमय पद्धतीने मरण पावलेल्या भारतीय नागरिकासंदर्भात "चौकशी‘ करण्याचे निर्देश इस्लामाबादमधील भारतीय राजदूतास देण्यात आले आहेत. याचबरोबर, किरपाल सिंग यांचे मृतावशेष भारतात परत आणण्यासंदर्भातील निर्देशही या राजदूतास देण्यात आले आहेत. 

""किरपाल सिंग यांच्यासंदर्भात इस्लामाबादमधील भारतीय राजदूतास पाकच्या परराष्ट्र मंत्रालयामधील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सिंग यांच्या मृत्युमागील कारण आणि शवविच्छेदन अहवालासंदर्भातील माहिती मिळण्यात येईल,‘‘ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी सांगितले. 

वाघा सीमेवरून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्याबद्दल सिंग (वय 50) यांना 1992 मध्ये अटक करण्यात आली होती. हेरगिरीच्या आरोपासह पंजाब प्रांतात झालेल्या बॉंबस्फोटाचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. भारतातील गुरुदासपूर येथील रहिवासी असलेले किरपाल यांनी डोके दुखत असल्याची तक्रार केली होती. परंतु, काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. लाहोर उच्च न्यायालयाने दोन्ही आरोपांमधून किरपाल यांची मुक्तता केली होती. मात्र, कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आलेली नव्हती. आर्थिक परिस्थितीमुळे आवाज उठवू शकलो नाही. मदतीसाठी कोणताही नेता पुढे आला नाही, असा आरोप किरपाल यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
===========================================

No comments: