Monday, 9 May 2016

नमस्कार लाईव्ह ०९-०५-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- चीनमध्ये भूस्खलनात 14 ठार 25 बेपत्ता
२- सौदी अरेबियाच्या तेल मंत्र्यांची उचलबांगडी  
३- कोणत्याही अटीविना एफ-16 द्या- पाकिस्तान  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- सत्तेच्या गैरवापरातून भुजबळांना अटक : पवार 
५- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मिळाली जीवे मारण्याची धमकी 
६- भारत मुलींसाठी सुरक्षित नाही; सोडा- प्रियमणी 
७- वर्षभरात वाढल्या रिअल इस्टेटच्या अडचणी ! 
८- बँक घोटाळ्यात झाडूवाला ते व्यवस्थापक! 
९- केजरीवाल, ही घ्या पंतप्रधान मोदींची पदवी  - अमित शहा 
१०- सिलिंडर अनुदानासाठी आता 'आयटी'रिटर्नची माहिती  
११- पंतप्रधानांनी राज्यसभेत स्पष्टीकरण द्यावे- काँग्रेस   
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- पुण्यात झोपडपट्टीला भीषण आग, आगीनंतर 10 सिलेंडरचा स्फोट 
१३- आजच्या दिवशी मुंबईत धावली होती पहिली घोडा गाडी 
१४- अबब..! २ वर्षांत चपला चोरून 'हा चोर ' बनला लखपती.. 
१५- दुष्काळाबाबत विभागापुरते लक्ष देऊ नये- पवार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- नागपुरातील गे आरोपीची भावासह भोपाळमधून धरपकड 
१७- सांगलीत 'आर्ची'च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार 
१८- दुष्काळात माणुसकीही आटली! सावरगावात 7 जातींच्या 7 विहिरी 
१९- अहमदाबाद; सोमनाथ मंदिरात मुंबईतील भक्ताकडून 100 किलो सोनं दान 
२०- लखनऊ; तलबेहट गावात 200 वर्षांपासून अक्षय्य तृतीया साजरी न करण्याची परंपरा 
२१- कोलकाता; कॅन्सरग्रस्त विद्यार्थ्याला मिळाले 95.8 टक्के गुण! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- "हॅलो, आर्ची अभिनंदन'!, अहो मी आर्ची नाही, उद्योगमंत्री बोलतोय" 
२३- कोहलीची शिफारस, व्हेटोरीला भारताचा कोच करा
२४- भडकलेल्या रणबीरचा पत्रकाराचा फोन हिसकावून पोबारा 
२५- दीपिका पदुकोनचा खऱ्याखुऱ्या बंदुकीसह क्लायमॅक्स सीन 
२६- बिपाशा-करणचे हनिमून फोटो व्हायरल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण होय 
{माधव गायकवाड, नमस्कार लाईव्ह }
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

===============================================

"हॅलो, आर्ची अभिनंदन'!, अहो मी आर्ची नाही, उद्योगमंत्री बोलतोय"


मुंबई :  ‘सैराट’ फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत असला तरी त्याची डोकेदुखी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना सहन करावी लागत आहे. कारण रिंकू राजगुरूच्या वेब पेजवर सुभाष देसाई यांचा मोबाईल नंबर रिंकूचा नंबर म्हणून झळकला आहे.

त्यामुळे सुभाष देसाईंना अभिनंदनाचे हजारो फोन येऊ लागले. बरं हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं असतं तर ठीक, पण ‘सॉरी राँग नंबर आहे’ असं सांगूनदेखील देसाईंची खरी पंचाईत तेव्हा होते, जेव्हा समोरचा कॉलर त्यांना विचारतो की ‘मग तुम्ही कोण बोलताय?’

चार-चौघात किंवा कुठल्या कार्यक्रमात सारखं ‘मी उद्योग मंत्री बोलतोय’ हे सांगणं सुद्धा त्यांना कठीण होऊन बसलं.

थेट मंत्री महोदयांचा नंबर एखाद्या लोकप्रिय नायिकेच्या संकेतस्थळावर येणं, हा नक्कीच योगायोग नसावा. हा प्रकार नजरचुकीने झाला की कोणाचा खोडसाळपणा याचा थांगपत्ता अजून लागलेला नसला, तरी योग्य ठिकाणी तक्रार करून या कॉल्सचा मी बंदोबस्त केल्याचं स्पष्टीकरण सुभाष देसाईं यांनी दिलं आहे.

===============================================

नागपुरातील गे आरोपीची भावासह भोपाळमधून धरपकड

नागपुरातील गे आरोपीची भावासह भोपाळमधून धरपकड
नागपूर : गुन्हेगार कितीही चाणाक्ष असला तरी तो काही ना काही चूक करतोच. नागपुरातल्या समलैंगिक आरोपीच्या बाबतीतही असंच घडलं आणि पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचले.

जितू जाधव याच्यावर हत्येचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, लूटमार असे तब्बल 20 गुन्हे दाखल आहेत. तर जितूचाच भाऊ राकेश जाधव 2013 मधल्या गोलू मेश्राम हत्याकांडातील प्रमुख फरार आरोपी. या दोघांनीही पोलिसांची डोकेदुखी चांगलीच वाढवली होती. मात्र एका
फोन कॉलने पोलिसांना सुगावा लागला.

या दोन्ही गुन्हेगारांनी भोपाळमध्ये आश्रय घेऊन तिथंही आपला अवैध धंदा सुरु केला होता. पानटपरी टाकून अवैध दारुची विक्री करायचे. भोपाळहून नागपुरातील समलैंगिक मित्राशी त्याने संपर्क साधला आणि याची माहिती पोलिसांना मिळाली.

भोपाळच्या स्थानिक पोलिसांनी सहकार्य केलं नाही, तरी छापा टाकला तेव्हा दोघं जाळ्यात आले. एका आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हाती दोन आरोपी आले.

जितूवर MPDA अंतर्गत पोलिस कारवाई होणार आहे. तर राकेश जाधवही जाळ्यात अडकल्यानं गोलू मेश्राम हत्याकांडाचा निकाल लागणं शक्य होणार आहे. तसंच या दोन्ही मार्फत इतर फरार गुन्हेगारांचाही शोध घेण्यास नागपूर पोलिसांना मदत होईल.
===============================================

कोहलीची शिफारस, व्हेटोरीला भारताचा कोच करा

कोहलीची शिफारस, व्हेटोरीला भारताचा कोच करा !
मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी निवड होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनेच व्हेटोरीच्या नावाची शिफारस केल्याचं सांगण्यात येत आहे.

इंग्रजी वृतपत्र ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

गेल्या वर्षीच व्हेटोरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या व्हेटोरी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रशिक्षक आहे.

यंदा टीम इंडियाला 18 कसोटी सामन्या खेळायचे आहेत. कोहली भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे कोहलीच्या शिफारशीचा विचार होऊ शकतो.

व्हेटोरीने वन डे, कसोटी आणि टी ट्वेण्टी मिळून 442 सामन्यांमध्ये 705 बळी टिपले  आहेत. वन डेमध्ये त्याने 295 सामन्यात 305 विकेट्स, तर 113 कसोटी सामन्यात 362 विकेट घेतल्या आहेत.
===============================================

भडकलेल्या रणबीरचा पत्रकाराचा फोन हिसकावून पोबारा

भडकलेल्या रणबीरचा पत्रकाराचा फोन हिसकावून पोबारा
मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफसोबत झालेल्या कथित ब्रेकअपनंतर रॉकस्टार अभिनेता रणबीर कपूर अनेकदा चिडचिडा झाल्याचं पाहिलं जात आहे. काहीच दिवसांपूर्वी रणबीर एका फोटो जर्नलिस्टवर भडकला आणि त्याचा फोन हिसकावून घेतल्याचं वृत्त आहे.

रणबीर त्याचा मित्र, प्रसिद्ध दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या घरी चालला होता. त्यावेळी एका पत्रकाराने त्याचा पाठलाग केल्याचं पाहून रणबीरचा पारा चढल्याचं ‘स्पॉटबॉय.कॉम’च्या वेबसाईटने दिली आहे. रणबीरने तंबी देऊनही न जुमानणाऱ्या पत्रकाराचा फोनच त्याने
हिसकावला.

फोन घेऊन रणबीर निघाला आणि नंतर माझ्याकडून कलेक्ट कर असं संबंधित पत्रकाराला सांगितलं. अयानसोबत डिनर घेतल्यानंतर पहाटे तीन वाजता रणबीर तिथून निघाला. रडवेल्या चेहऱ्याने तो पत्रकार तिथेच रणबीरची आणि पर्यायाने आपल्या फोनची वाट पाहत होता. ते पाहून पुन्हा रणबीरने त्याला कडक शब्दात समज दिली आणि निघून गेला.

‘माझा ठावठिकाणा लपवण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न करुनही जवळजवळ रोजच हे पत्रकार आमचा पिछा पुरवतात. माझं वैयक्तिक आयुष्य आहे आणि माझा पाठलाग करु नका असं वारंवार सांगूनही ते ऐकत नाहीत. अगदी आमच्या फॅमिली डॉक्टरच्या क्लिनिकबाहेरही पत्रकार दबा धरुन बसतात.’ अशी विनवणी रणबीरने केली.
===============================================

दीपिका पदुकोनचा खऱ्याखुऱ्या बंदुकीसह क्लायमॅक्स सीन

दीपिका पदुकोनचा खऱ्याखुऱ्या बंदुकीसह क्लायमॅक्स सीन
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या आगामी हॉलिवूडपटाबद्दल भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दीपिकाच्या ट्रिपल एक्स : रिटर्न ऑफ झँडर केजच्या क्लायमॅक्स सीनसाठी ती खरीखुरी बंदूक वापरणार आहे.

टोरांटोमध्ये सुरु असलेल्या सिनेमाच्या शूटिंगसाठी दीपिका अत्याधुनिक बनावटीच्या रायफल्स हाताळण्याचे प्रशिक्षण घेत आहे. गेल्या सहा सात आठवड्यांपासून दीपिका रायफल चालवण्याचं प्रशिक्षण घेत आहे.


दीपिका यात सेरेना या शिकारी तरुणीची भूमिका साकारत आहे. या क्लायमॅक्स सीनसाठी तिला काही अवघड अॅक्शन सीन्स करावे लागणार आहेत. त्यासाठी दीपिका व्यायामशाळेत कसून सरावही करत आहे.

दीपिकाने सेटवरचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. हा चित्रपट जानेवरी 2017 मध्ये रिलीज होणार आहे. दीपिकासह विन डिजेल आणि रुबी रोज प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
===============================================

सांगलीत 'आर्ची'च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार

सांगलीत 'आर्ची'च्या झिंगाट चाहत्यांवर लाठीमार
सांगली: सैराट सिनेमातील अप्रतिम अभिनयाने सर्वांची मन जिंकणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरुच्या चाहत्यांना पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या.

रिंकू राजगुरू सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ इथं एका खाजगी कार्यक्रमासाठी आली होती. आर्ची येणार असल्याची बातमी जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली आणि कवठेमहांकाळ इथं तोबा गर्दी झाली. चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी तुफान गर्दी केली.
===============================================

पुण्यात झोपडपट्टीला भीषण आग, आगीनंतर 10 सिलेंडरचा स्फोट

पुण्यात झोपडपट्टीला भीषण आग, आगीनंतर 10 सिलेंडरचा स्फोट
पुणे : पुण्यातील मंगळवार पेठेतील भीमनगरमधील झोपडपट्ट्यांनी भीषण आग लागली आहे. या आगीत शेकडो झोपटपट्ट्या जळून खाक झाल्याचं समजतं.


शिवाजी स्टेडियमजवळील झोपडपट्टीत दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आगीदरम्यान 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याचं कळतं. त्यामुळे ही आग आणखी भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
===============================================

सत्तेच्या गैरवापरातून भुजबळांना अटक : पवार

सत्तेच्या गैरवापरातून भुजबळांना अटक : पवार
सातारा : भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करुन छगन भुजबळांवर कारवाई करत आहे. मात्र याचा राष्ट्रवादी काँग्रेसवर काहीही परिणाम होणार नाही, असं पक्षाध्यक्ष शरद पवार म्हणाले.

जर या प्रकरणात छगन भुजळांनी चूक केली असेल तर त्यांना ती भोगावीच लागेल पण यात भुजबळ निर्दोष असले तर त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल असं म्हणत पवारांनी सेना-भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज ५७ वी पुण्यतिथी. या निमीत्ताने रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाऊराव पाटलांच्या समाधीच दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी शरद पवारांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कामाचं कौतुक केलं.

यावेळी शरद पवारांसोबत खासदार उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर, दिलीप वळसे पाटील आणि पतंगराव कदम हे नेते देखील उपस्थित होते. या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमा दरम्यान राज्यभरातील रयतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
===============================================

दुष्काळात माणुसकीही आटली! सावरगावात 7 जातींच्या 7 विहिरी

दुष्काळात माणुसकीही आटली! सावरगावात 7 जातींच्या 7 विहिरी
नांदेड : माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जात-धर्म हा त्याला चिकटलेला असतो. त्यामुळेच राज्यात अनेक ठिकाणी विविध जातींच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी असल्याचं आपण पहिले आहे. पण जातींच्या वेगळ्या स्मशानभूमीप्रमाणे वेगळे पाणवठे असल्याच कधी तुम्ही ऐकलं आहे का? पण नांदेड जिल्ह्यातील एका गावात जातीनिहाय विहिरी आहेत आणि इथले नागरिक आपल्या जातीप्रमाणे विहिरींवर जाऊन पाणी भारतात.

2

7 जातींच्या 7 वेगवेगळ्या विहिरी

सावरगाव हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील गाव. सुमारे 5 हजार लोकवस्तीच्या या गावात मराठा, बौद्ध, मातंग, लिंगायत, आदिवासी अशा अनेक जाती-धर्माचे लोक राहतात. गावात निजामाने एक तलाव बांधला होता, जो आता पूर्ण आटला आहे. त्यामुळे गावात पाणीटंचाई आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने टँकर दिला आहे. पण तो अपुरा पडतो. त्यामुळे इथल्या लोकांना 2 किलोमीटर पायपीट करुन पाणी आणावे लागते.


तंटा होऊ नये म्हणून….

पाणी टंचाई घालवण्यासाठी गावकऱ्यांनी निजामकालीन तलावात विहिरी खोदण्याचा निर्णय घेतला. पण प्रत्येक जातीने आपापली विहीर खोदायची, असा सर्वानुमते निर्णय झाला. प्रत्येक जातीने आपल्या विहिरीसाठी निधी दिला. त्यातून आता 7 विहिरी खोदल्या गेल्या आहेत. ज्या जातीची विहीर, त्याच जातीच्या लोकांनी त्या विहिरीतून पाणी घ्यायचे, असा नियम आहे. तंटे होऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचं गावकरी सांगतात.

5

पाणी चोरु नये म्हणून 24 तास पहारा….

काही विहिरींना अधिक पाणी आहे, तर काही विहिरींना कमी पाणी आहे. त्यामुळे दुसऱ्या जातीने आपल्या विहिरीतील पाणी चोरु नये, यासाठी प्रत्येक जातीने आपल्या विहिरींवर पहारा ठेवला आहे. ज्या जातीची विहीर आहे, त्या जातीची 2 माणसे त्या विहिरीवर 24 तास पहारा देतात.

दुष्काळातही जातीच्या भिंती कोसळत नाहीत?

दुष्काळात अनेक गावातील जातींच्या भिंती कोसळल्या आहेत. सांगलीकरांनी लातूरकारांना पाणी देताना जाती धर्माचा विचार अजिबात केला नाही. सरकारही तसा विचार करत नाही. पण नांदेड जिल्ह्यातील सावरगाव मात्र याला अपवाद ठरतं आहे. कदाचित संपूर्ण राज्यात जातीनिहाय विहीर असलेल, हे एकमेव गाव असावं.

दुष्काळात पाणी आटलं, पण माणुसकीचा झरा जिवंत ठेवायला हवा. पण तंटा नकोच्या भूमिकेतून वेगळ्या विहिरी खोदणाऱ्या सावरगाव वासियांना हे कुणी सांगाव?
===============================================

सोमनाथ मंदिरात मुंबईतील भक्ताकडून 100 किलो सोनं दान

सोमनाथ मंदिरात मुंबईतील भक्ताकडून 100 किलो सोनं दान
90075023
अहमदाबाद गुजरातमधील सोमनाथ महादेव मंदिरावर सोन्याची वृष्टी होत आहे. या सोमनाथ मंदिराला भक्ताने गेल्या तीन वर्षांत 100 किलो सोनं दान केलं आहे. देशातील पहिले ज्योर्तिंलिंग सोमनाथ महादेव मंदिराच्या गाभाऱ्याला सोन्याने मढवण्याच काम आज अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर  पूर्ण झाले आहे.

सोमनाथ मंदिराच्या आतील भाग 40 किलो सोन्याने मढवण्यात आलं आहे. हजारो वर्षांपूर्वी सोमनाथ मंदिर सोन्याचे होते, असे म्हटले जाते. पण अनेकदा या लुटारुंनी सोने लुटल्यानं आता मंदिर केवळ दगडांचं राहिलं आहे.

सोमनाथ महादेव मंदिराची सुवर्णयुग शतक परत आले आहे, असे म्हटले तरी वावगं ठरु नये. मुंबईच्या एका भक्ताने सोमनाथ महादेव मंदिराला तीन वर्षांपूर्वी 100 किलो सोनं दान करण्याचा संकल्प केला होता. दोन वर्षांपूर्वी त्यांनी 60 किलो सोनं दानही केलं होतं. दिलीपभाई लखी असे या भक्ताचे नाव आहे.


या सोन्यातून मंदिराचा त्रिशूळ, गाभारा, डमरु, ध्वजादंड आणि कळस सोन्याने मढवण्यात आले. काही दिवसांपूर्वीच दिलीपभाई लखी यांनी 40 किलो सोनं सोमनाथ मंदिराला दान करुन त्यांचा 100 किलो सोन दान करण्याचा संकल्प पूर्ण केला.
===============================================

नरेंद्र मोदींच्या पदव्या खोटयाच - आप

  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. ९ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पदवीवरुन दिल्लीत राजकीय रणकंदन सुरु झाले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा  आणि अरुण जेटली यांनी मोदींच्या बीए आणि एमच्या पदव्या सार्वजनिक करुन आम आदमी पक्षावर निशाणा साधला. त्यानंतर लगेच आपने पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदींच्या पदव्या खोटयाच असल्याचा आरोप केला आहे. 
    नरेंद्र मोदींची बीएची उत्तरपत्रिका १९७७ सालची आणि त्यांना पदवी १९७८ साली मिळाल्याचा आरोप केला. मोदींच्या उत्तरपत्रिकेवर नरेंद्रकुमार दामोदारदास मोदी असे नाव आहे तर, पदवीवर नरेंद्र दामोदरदास मोदी असे नाव आहे. उत्तरपत्रिका आणि पदवीवरील नावात फेरफार कसा झाला असा सवाल विचारत आपने मोदींची डीग्री खोटी असल्याचा आरोप केला. 
===============================================

बिपाशा-करणचे हनिमून फोटो व्हायरल


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. ९ - बॉलिवूडमधील बहुचर्चित कपल बिपाशा बासू आणि करणसिंह ग्रोव्हर विवाहानंतर आता हनिमूनचा आनंद लुटत आहेत. ३० एप्रिलला बिपाशा आणि करणचा विवाह झाला. बिपाशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत. हे सर्व फोटो समुद्रावरचे आहेत. 
    निवांत सागराचे सौदर्य या फोटोंमध्ये दिसते. बिपाशा-करणने हनिमूनसाठी मालदीवची निवड केली आहे. शनिवारी दोघे हनिमूनला रवाना झाले. विवाहानंतर बिपाशा-करण दोघेही मित्र-नातेवाईकांना डिनर पाटर्या देण्यामध्ये व्यस्त होते. मालदीव दोघांचेही आवडते ठिकाण असून, १३ मे रोजी दोघे भारतात परतणार आहेत. 
    २०१५ मध्ये अलोन चित्रपटाच्या निमित्ताने दोघे एकत्र आले त्यावेळी दोघांच्याही मनात प्रेमाची पालवी फुलली. त्यानंतर मिडीयामध्ये दोघांच्या प्रेमसंबंधांची चर्चा होती. करणचा हा तिसरा विवाह आहे.
===============================================

आजच्या दिवशी मुंबईत धावली होती पहिली घोडा गाडी


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. ९ - मुंबईत घोडागाडीचा प्रवास आता जवळपास बंदच झाला आहे. घोडा गाडीत बसण्याचा एक वेगळा आनंद असतो म्हणून अनेकजण चौपाटीवर जाऊन घोडागाडीत बसण्याचा आनंद घेत होते. पण न्यायालयाच्या निर्णयानंतर घोडागाडीचा वापर आता बंदच झाला आहे. 
    आजच्या दिवशी ९ मे १८७४ रोजी मुंबईच्या रस्त्यावर पहिली घोडा बस गाडी धावली होती. परेल ते कुलाबा या मार्गावर पहिली घोडा बस गाडी धावली होती. त्याकाळी गाडया नव्हत्या तेव्हा घोडागाडी मुंबईतील प्रवासाचे प्रमुख साधन होते. 
    धनिकवर्ग त्याकाळी घोडा गाडीचा प्रामुख्याने वापर करत असे. घोडागाडीतून फिरणारी व्यक्ती म्हणजे श्रीमंत असा एक समज होता. परेल ते कुलाबा मार्गावर पहिली घोडा बस गाडी धावली होती. त्या घोडा बस गाडीला सहा ते आठ घोडे जोडले होते. 
    काही महिन्यांपूर्वी मुंबईत रस्त्याखाली गडप झालेले ट्रामचे ट्रॅक सापडले होते. त्याचबरोबर ९ मे हा दिवस रशियामध्ये विजयदिन म्हणून साजरा केला जातो. दुस-या महायुद्धात याच दिवशी सोव्हियत युनियनने हिटलरच्या नाझी फौजांवर विजय मिळवला होता. 
===============================================

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मिळाली जीवे मारण्याची धमकी


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. ९ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते अहमद पटेल, राजीव शुक्ला, मोतीलाल व्होरा आणि आनंद शर्मा आज दुपारी गृहमंत्री राजनाथ सिंग यांची घेणार भेट घेणार असून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करणार आहेत. 
    इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तामिळ भाषेत लिहीलेल्याएका निनावी पत्राद्वारे राहुल गांधींना ही धमकी देण्यात आली असून ४ मे रोजी पाँडेचेरी येथून हे पत्र पोस्ट करण्यात आले होते. युपीएच्या कार्यकाळात मंत्री असलेले व्ही. नारायणस्वामी यांना हे पत्र पाठवण्यात आले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे राहुल गांधी उद्या ( १० मे ) एका सभेसाठी कराइकल येथे जाणार आहेत.
    पाँडेचेरी येथील सर्व उद्योगधंदे बंद पडण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला असून कराइकल येथील सभेदरम्यान राहुल गांधींना उडवण्यात येईल, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. 
===============================================

...या गावात 200 वर्षांपासून अक्षय्य तृतीया साजरी न करण्याची परंपरा


  • ऑनलाइन लोकमत - 
    लखनऊ, दि. 09 - आज संपुर्ण देश अक्षय्य तृतीया साजरी करत असताना उत्तर प्रदेशमधील एक गाव मात्र गेली 200 वर्ष झाले तरी अक्षय्य तृतीया साजरी करत नाही. 
    झाशी आणि ललितपूर यांच्यामध्ये स्थित असलेल्या तलबेहटमधील ग्रामस्थ मोर प्रल्हाद (1802-42) यांच्या कार्यकाळापासून सुरु असलेल्या या परंपरेचं अजूनही पालन करत आहेत. त्याकाळी अक्षय्य तृतीया साजरी करण्यासाठी पाने गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांचं अपहरण करुन त्यांना तलबेहटमधील किल्ल्यात नेण्यात आलं होतं. आणि त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला होता. बलात्कार करणारे राज्यकर्त्यांचीच लोक होती. या घटनेनंतर अक्षय्य तृतीया साजरी करणं बंद झालं. 
    घटनेनंतर ग्रामस्थांनी, लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला. अक्षय्य तृतीया साजरी करण्याची परंपरा तर बंद झाली मात्र यानंतर महिलांना आदर देण्याची परंपरा सुरु झाली. महिलांचा सन्मान करण्यासाठी पुरुषांनी महिलांच्या पाया पडण्याची परंपरा सुरु करण्यात आली. या नव्या परंपरेत जात, धर्म, उच्च, कनिष्ठ या गोष्टींना लांब ठेवण्यात आलं. जर एखादा पुरुष एखाद्या महिलेच्या पाया पडत असेल तर तिची जात, धर्म कोणता आहे या गोष्टीचा त्याच्याशी काही संबंध नाही.
===============================================

अबब..! २ वर्षांत चपला चोरून 'हा चोर ' बनला लखपती..


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. ९ - पैसे कमावण्यासाठी माणूस काहीही करू शकतो, सरळ मार्गाने पैसे न मिळाल्या, तो वाममार्गाला लागतो. मुंबईत एका चोराने अवघ्या २ वर्षांत तब्बल ४० लाख रुपये किमतीच्या चपला चोरल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून हे वृत्त ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. 
    माटुंगा पोलिसांनी नुकतीच इब्राहिम शेख याला घरफोडीच्या आरोपाखाली अटक केली असून त्याने इतर विविध गुन्हे कबूल केले आहेत. त्यातील एक गुन्हा म्हणजे चप्पलचोरी...शेख याने सुमारे २ वर्षे विविध ठिकाणांहून चपला चोरल्या असून त्याची किंमत तब्बल ४० लाखांच्या घरात जाते.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम दररोज सुमारे ८ ते १० चपलांचे जोड चोरी करून दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध नळबाजार येथे विकत असे. अशा प्रकारे आत्तापर्यंत त्याने तब्बल ४० लाख रूपयांच्या चपला चोरल्या आहेत. 
    सुमारे तीन वर्षांपूर्वी माटुंगा येथील एका घरफोडीच्या घटनेत इब्राहिम शेखचा चेहरा तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. तेव्हापासून पोलिस शेख याचा शोध घेत होते. काही वर्ष तो सेकन्ड हॅण्ड मोबाईलही विकत असे मात्र त्याला त्यात बराच तोटा झाला. त्यानंतर शेखने ब्रँडेड चपला व बूट चोरण्याचा धंदा सुरू केला आणि पाहता पाहता तो लखपती बनला. अखेर तीन वर्षांनी पोलिसांना शेखला पकडण्यात यश आले आणि त्या गुन्ह्यांसह चप्पलचोरीच्या या अजब गुन्ह्याचीही उकल झाली.
===============================================

वर्षभरात वाढल्या रिअल इस्टेटच्या अडचणी !


  • देशाच्या विविध शहरांत विक्री न झालेली निवासी घरे आणि व्यावसायिक दुकाने यांची संख्या वाढत चालली आहे. ही बाब पाहता, रिअल इस्टेट क्षेत्रासमोरील अडचणी वाढल्या आहेत. असोचेम या औद्योगिक व व्यावसायिक संघटनेतर्फे ही माहिती देण्यात आली. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) दिल्लीत ही स्थिती सर्वाधिक गंभीर आहे. त्यामुळे वित्तीय सेवा लोखंडासह अन्य अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला आहे.
    घरांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत; शिवाय व्याजदरही कमी झाले आहेत. असे असूनही गेल्या एका वर्षात दिल्लीत निवासी घरांची मागणी
    25-30
    टक्क्यांनी, तर दुकानांची मागणी 35-40
    > असोचेमने म्हटले आहे की,
    एनसीआर दिल्लीत अडीच लाख ठिकाणी घरांची विक्री झालेली नाही. त्यातील मंजुरी न मिळालेल्या आणि न्यायालयीन प्रकरणात अडकलेल्या घरांचे प्रमाण 35% विकासक आणि ग्राहक या दोघांसाठीही सध्याची स्थिती कठीण आहे. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकारी, विकासक, बँका, ग्राहक यांना संयुक्त प्रयत्न करावे लागतील.
    या क्षेत्रात १ कोटी २० लाख मजूर काम करतात. त्यांच्यावरही या परिस्थितीचा परिणाम झाल्याचे असोचेमचे म्हणणे आहे.
===============================================

बँक घोटाळ्यात झाडूवाला ते व्यवस्थापक!


  • नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील भ्रष्टाचारात सहभाग असल्याच्या आरोपावरून सफाई कामगार ते वरिष्ठ व्यवस्थापक अशा ९६ जणांवर गुन्हे दाखल करण्याची परवानगी केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) बँकांकडे मागितली आहे. तथापि, चार महिन्यांपासून हे प्रकरण परवानगीविना अडकून पडले आहे.
    यात ६ सफाई कामगारांसह ८५ कर्मचारी एकट्या इंडियन ओव्हरसीज बँकेचे आहेत. इतर बँकांमध्ये ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स, स्टेट बँक आॅफ पटियाला, कॉर्पोरेशन बँक, एक्झिम बँक, युनायटेड बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ बडोदाचा समावेश आहे. भ्रष्टाचारात
    मुख्य व्यवस्थापक, महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, विशेष सहायक, कारकून आणि ११ मेसेंजर्सचा समावेश आहे. परवानगी चार महिन्यांपूर्वीच मागण्यात आली आहे. गुन्हे दाखल करण्यास परवानगी देण्याचा निर्णय नियमांनुसार चार महिन्यांत व्हायला हवा. ही माहिती सीव्हीसीच्या मासिक अहवालात देण्यात आली आहे.
    भ्रष्ट कर्मचारी, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास परवानगी देण्यास केवळ बँकांच उशीर करतात, असे नाहीतर सरकारी कार्यालयेही तातडीने निर्णय घेत नाहीत, अशी तक्रार अहवालात करण्यात आली आहे.
===============================================
भारत मुलींसाठी सुरक्षित नाही; सोडा- प्रियमणी
नवी दिल्ली- भारत मुलींसाठी सुरक्षित नसून मुलींनी देश सोडावा, असे तमिळ अभिनेत्री प्रियमणी हिने ट्‌विटरवरून म्हटले आहे. तिरुअनंतपुरम येथे एका दलित विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाबाबत तिने ट्‌विट केले आहे. 

प्रियमणी हिने ट्‌विटरवरून म्हटले आहे की, ‘बलात्कार व खुनाच्या घटना ऐकल्यानंतर वाईट वाटते. भारत मुलींसाठी सुरक्षित असल्याचे मला वाटत नाही. बंगळूरमध्येही अशा प्रकारची घटना घडली आहे. काय चालले आहे? महिला व युवतींना माझी विनंती आहे की त्यांनी देश सोडून अशा ठिकाणी जावे की जेथे त्या सुरक्षित राहतील.‘ 

प्रियमणीच्या ट्‌विटनंतर चाहत्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठविली. यानंतर तिने पुन्हा म्हटले की, ‘माझे ट्‌विट व्यवस्थित वाचा. देशविरोधात काहीही लिहिलेले नाही. मी, केवळ माझे मत मांडले आहे. देश विरोधी हे कसे असू शकेल.‘
===============================================
दुष्काळाबाबत विभागापुरते लक्ष देऊ नये- पवार
सातारा- राज्याचे नेतृत्व करणाऱ्यांनी दुष्काळाबाबत एखाद्या विभागापुरते लक्ष देऊ नये इतर भागातही दुष्काळ आहे, तिकडेही लक्ष द्यावे असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी आज (सोमवार) येथे व्यक्त केले. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री. पवार साताऱ्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. 

प्रश्‍न ः दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात राज्य सरकार कमी पडत आहे का?
शरद पवार ः 
मदतीची प्रक्रिया अतिशय मंदगतीने चालली आहे. मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागातही दुष्काळाचे चटके बसत आहे. मराठवाडा, विदर्भास भरभरून द्याच त्यांना मदत करण्यास काहीच हरकत नाही. त्याचबरोबर इतर भागालाही मदत करणे आवश्‍यक आहे. हे विसरता कामा नये दुष्काळासारख्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जावेत. राज्याचे नेतृत्व करणाऱ्यांनी दुष्काळाबाबत एखाद्या विभागापुरते लक्ष देऊ नये इतर भागातही दुष्काळ आहे, तिकडेही लक्ष द्यावे. 
===============================================
कॅन्सरग्रस्त विद्यार्थ्याला मिळाले 95.8 टक्के गुण!
कोलकता- कॅन्सरने ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्याने रुग्णालयात उपचारादरम्यान अभ्यास करून आयसीएसई परिक्षेत 95.8 टक्के गुण मिळविले आहेत. राघव चांडक असे विद्यार्थ्याचे नाव आहे.

राघव (वय 16) हा हेरिटेज शाळेमध्ये शिकत आहे. कॅन्सरने तो आजारी आहे. येथील एका रुग्णालयामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णलायत त्याने अभ्यास करून 95.8 टक्के गुण मिळविले आहेत.

राघव म्हणाला, ‘माझी चुलत बहिण सु्द्धा आयसीएईची परिक्षा देत होती. मला क्लासमध्ये जाणे शक्य होत नव्हते. यामुळे बहिणीच्याच वह्यांवरून अभ्यास केला. माझ्या यशामागे कुटुंबिय, शाळा, शिक्षक व डॉक्टरांचा मोठा वाटा आहे.‘
===============================================
चीनमध्ये भूस्खलनात 14 ठार 25 बेपत्ता
बीजिंग- दक्षिण चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, हायड्रोपॉवर या प्रकल्पाजवळ झालेल्या भूस्खलनात 14 ठार तर 25 जण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे, अशी माहिती सूत्रांनी आज (सोमवार) दिली. 

‘पर्वत भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. हायड्रोपॉवर या प्रकल्पाजवळ झालेल्या भूस्खलनात 14 ठार तर 25 जण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव दलाचे पथक दाखल झाले आहे. परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत,‘ अशी माहिती डेंग छुन्वा यांनी दिली. 

दरम्यान, भूस्खलन झालेल्या ठिकाणी 600हून अधिक सुरक्षा दलाचे जवान व पोलिस दाखल झाले आहेत.
===============================================
केजरीवाल, ही घ्या पंतप्रधान मोदींची पदवी 
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदवी नसल्याचा आम आदमी पक्षाकडून (आप) करण्यात आलेला आरोप भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (सोमवार) फेटाळून लावला. 

दिल्ली विद्यापीठातील नोंदी तपासल्या असून, त्यात नरेंद्र मोदी यांचा कोणताही उल्लेख नाही, असा दावा आप केला आहे. विशेष म्हणजे, दिल्ली विद्यापीठातून "नरेंद्र मोदी‘ या व्यक्तीला पदवी दिली आहे; मात्र "ते‘ मोदी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाहीत, असेही "आप‘ने म्हटले आहे. 

या पार्श्वभूमीवर, शहा यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनीही मोदी यांना भक्कम पाठिंबा व्यक्त करत सर्व आरोप निखालस खोटे असल्याची भूमिका व्यक्त केली. याचबरोबर, शहा यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये मोदी यांची पदवीही सादर केली. 
===============================================
सौदी अरेबियाच्या तेल मंत्र्यांची उचलबांगडी 
रियाध - प्रस्थापित व्यवस्थेत मोठे बदल करण्याचे संकेत देत सौदी अरेबियाचे राजे किंग सलमान यांनी देशाच्या तेल मंत्र्यांना पदमुक्त करण्याची घोषणा केली. 

सौदी अरेबियाने गेल्या महिन्यामध्येच अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्याबरोबरच तेलावरील अतिअवंलबित्व कमी करण्यासंदर्भातील महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाची घोषणा केली होती. या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून कार्यरत असलेल्या तेलमंत्र्यांना पदमुक्त करण्यासंदर्भातील हा निर्णय अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. 

अली अल-नैमी हे सौदी राजकारणामधील अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व मानले जाते. परंतु, किंग सलमान यांचे पुत्र राजपुत्र प्रिन्स मोहम्मद यांच्या झालेल्या उदयानंतर नैमी यांच्या प्रभावास आव्हान मिळाल्याचे मानले जात आहे. नैमी यांच्या जागी खालेद अल-फलिह यांची नेमणूक करण्यात आली आहे. अरामको या सौदी अरेबियाच्या राष्ट्रीय तेल कंपनीचे प्रमुखपद दीर्घ काळासाठी सांभाळलेल्या फलिह यांनी आरोग्य मंत्री म्हणूनही काम केले आहे. उर्जेबरोबरच फलिह यांच्याकडे खनिज संपत्ती आणि उद्योग क्षेत्राची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. नैमी हे आता किंग सलमान यांचे सल्लागार म्हणून काम पाहतील.
===============================================
सूर्यावर काळा ठिपका अनुभवण्याची आज संधी 
जळगाव - नभांगणातील अद्‌भुत खगोलीय आविष्काराचा दुर्मिळ योग आज (9 मे) सूर्यावरील बुधाच्या अधिक्रमणाच्या माध्यमातून अनुभवण्यास मिळणार आहे. सूर्यबिंबावरून एक छोटा काळा ठिपका सरकताना दिसणार आहे. दहा वर्षांनंतर हे अधिक्रमण अनुभवता येणार आहे. 

खगोलीय घटनांच्या अद्‌भुत नजाऱ्यांमधील सूर्यावरील बुधाच्या अधिक्रमणाची ही दुर्मिळ घटना आहे. ग्रहण हा निसर्गातील अभूतपूर्व आविष्कार असतो. ग्रहणे फक्त चंद्र व सूर्यामुळे घडत नाहीत, तर अन्य ग्रहांमुळे ग्रहणे होतात. चंद्रबिंबाने सूर्याला झाकल्यास सूर्यग्रहण घडते. त्याप्रमाणे बुध आणि शुक्र हे अंतर्ग्रहदेखील सूर्याला ग्रहण लावू शकतात. मात्र, हे दोन्ही ग्रह पृथ्वीपासून दूर असल्याने त्यांनी सूर्याला पूर्णपणे झाकल्याचे दिसू शकत नाही. या ग्रहांचा छोटासा ठिपका सूर्यबिंबावरून सरकताना तेवढा दिसतो, त्याला ग्रहण म्हणण्याऐवजी अधिक्रमण म्हटले जाते. शंभर वर्षांत बुधाची तेरा-चौदा अधिक्रमणे होतात, तर शुक्राची अधिक्रमणे अगदीच दुर्मिळ असतात. 
===============================================
... कोणत्याही अटीविना एफ-16 द्या- पाकिस्तान 
इस्लामाबाद- पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी अत्याधुनिक एफ-16 या लढाऊ विमानांची गरज असून अमेरिकेने कोणत्याही अटीविना ही विमाने पाकिस्तानला द्यावीत, असे पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव अझीज चौधरी यांनी म्हटले आहे. 

एका वृत्तसंस्थेशी बोलताना चौधरी म्हणाले, पाकिस्तानला लढाऊ विमानांचा वापर दहशतवाद्यांशी लढण्यासाठी करायचा आहे. यासाठी अत्याधुनिक विमानांची गरज आहे. अमेरिकेने कोणत्याही अटीविना पाकिस्तानला एफ-16 ही लढाऊ विमाने द्यावीत. 

दरम्यान, "एफ-16‘ या लढाऊ विमानांची खरेदी करायची असेल, तर त्याची पूर्ण रक्कम पाकिस्तानने अमेरिकेला द्यावी, असे ओबामा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. "एफ-16‘ लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी अमेरिकेने निधी उपलब्ध करून दिला नाही, तर ही विमाने दुसऱ्या देशाकडून खरेदी करण्यात येतील, असा थेट इशारा पाकिस्तानने आज अमेरिकेला दिला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझीज यांनी हा इशारा दिला होता.
===============================================
सिलिंडर अनुदानासाठी आता 'आयटी'रिटर्नची माहिती 
नवी दिल्ली - घरगुती गॅस सिलिंडरवर अनुदान (सबसिडी) घेणार्‍यांसाठी केंद्र सरकार लवकरच नवीन नियम लागू करणार आहे. नवीन नियमानुसार गॅस सिलिंडरवर अनुदान घेणार्‍या ग्राहकांना इन्कम टॅक्स रिटर्न भरला असल्यास त्याची पावती (आयटीआर) जमा करावी लागणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे (सीबीडीटी) याबाबत एक प्रस्ताव पाठवला आहे.

दहा लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांना यापुढे गॅस सिलिंडरवर अनुदान प्राप्त होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अश्या लोकांची संख्या आणि माहिती जाणून घेण्यासाठी सरकारने असा निर्णय घेतला आहे. प्राप्तिकर कायदा 138 नुसार सरकारला दहा लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांची माहिती मिळविणे शक्य होणार आहे. यामुळे गरजू लोकांनाच घरगुती गॅस सिलेंडरवर अनुदान मिळण्यास मदत होणार आहे. 

नरेंद्र मोदी सरकारने हाती घेतलेल्या ‘गिव इट अप‘ मोहिमेला अद्याप हवा तसा प्रतिसाद मिळवता आलेला नाही. त्यामुळे आता पेट्रोलियम मंत्रालयाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे अर्थात सीबीडीटीकडे नवीन प्रस्ताव पाठवला आहे.
===============================================
पंतप्रधानांनी राज्यसभेत स्पष्टीकरण द्यावे- काँग्रेस 
नवी दिल्ली - ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरण प्रचाराचा मुद्दा बनविल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

या प्रकरणावरून आजही (सोमवार) राज्यसभेत गोंधळ पहायला मिळाला. काँग्रेसच्या खासदारांनी वेलमध्ये उतरून पंतप्रधानांच्या निवेदनाची मागणी केली. तसेच त्यांनी माफी मागण्याचीही मागणी केली. पंतप्रधानांनी तमिळनाडूत प्रचारसभेदरम्यान या प्रकरणावर वक्तव्य केले होते. मोदींनी प्रचारसभेत या प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याने काँग्रेस खासदारांनी लोकसभेतून सभात्याग केला.

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी आज लोकसभेत सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्यावरील जमीन गैरव्यवहाराचे प्रकरण उपस्थित करणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस खासदारांच्या गोंधळामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज अनेकवेळा तहकूब करावे लागले आहे.
===============================================

No comments: