Tuesday, 10 May 2016

नमस्कार लाईव्ह १०-०५-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- इराक; बगदादजवळ आत्मघाती हल्ल्यात 13 ठार 
२- भारत-चीन व्यापारी संबंध जगाच्या हिताचे - चीन 
३- पाकः गिलानींचा अपहृत मुलगा 3 वर्षांनी ताब्यात 
४- जर्मनी; 'अल्लाहू अकबर'चे नारे देत प्रवाशांवर चाकू हल्ला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५-शाळेतच जात आणि रहिवासी दाखला मिळणार 
६- भारताला तुमचे पुत्र प्रेम माहित आहे- अमित शहा 
७- 'स्वच्छ भारत' व इतर जाहिरातींवर 350 कोटी खर्च 
८- दोन वर्षांत 50 हजार कोटींची करचुकवेगिरी उघड
९- देश शैक्षणिक गुणवत्तेवर चालत नाही- शिवसेना  
१०- स्वस्त घरांसाठी 'ईपीएफओ'चा मदतीचा विचार 
११- पंतप्रधान करा वा इस्पितळात पाठवा- आझम खान 
१२- 'हा' मोदी सरकारला मोठा धक्का- केजरीवाल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१३- आता ‘नगराध्यक्ष’ थेट जनतेतून निवडणार 
१४- पालिका भ्रष्टाचाराचं कनेक्शन मेव्हणे, पीए आणि साहेबांशी : सोमय्या 
१५- यूपीएससीमध्ये योगेश कुंबेजकर महाराष्ट्रातून पहिला 
१६- कोल्हापूर महापौरपदासाठी भाजप दावा करणार 
१७- उत्तराखंडमध्ये रावतांचीच बाजी, काँग्रेसला 34 मतं : सूत्र 
१८- तुमचा वैमानिक दारु पिऊन तर विमान चालवत नाही ना 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- अहमदनगर; आध्यात्मिक गुरु भय्युजी महाराजांवर दोन वेळा प्राणघातक हल्ला 
२०- मुंबई; फोटोग्राफर ते बिल्डर... राज कंदारींनी आत्महत्येचा प्रयत्न का केला 
२१- रत्नागिरी; अटक टाळण्यासाठी निलेश राणेंची धावाधाव 
२२- गुहागर; झुंजीमध्ये शिंगात शिंग अडकून दोन गव्यांचा मृत्यू 
२३- केरळ; मदरशात मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- शशांक मनोहर यांचा राजीनामा, शरद पवार BCCI चे नवे अध्यक्ष 
२५- रैनाऐवजी गुजरातचा कर्णधार कोण 
२६- काजलच्या संमतीविना किसिंग सीन 
२७- फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या स्पर्धेत गुगलचे नवे अॅप येणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
माणसाची सर्व कामे या सातपैकी कुठल्याही एका कारणांमुळे होतात, संधी, आरोग्य, नाईलाज, सवय, कारण, वासना, इच्छा
(राज तिडके, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

========================================================

यूपीएससीमध्ये योगेश कुंबेजकर महाराष्ट्रातून पहिला

यूपीएससीमध्ये योगेश कुंबेजकर महाराष्ट्रातून पहिला
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचे 2015 सालचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये देशातून टीना दाबी अव्वल आली असून महाराष्ट्रातील योगेश कुंबेजकरने राज्यात पहिल्या येण्याचा मान मिळवला आहे.

देशातून अथर आमीर उल शफी खानने दुसरं स्थान पटकवलं आहे, तर जसमीत सिंग संधू तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातून पहिला आलेला योगेश कुंबेजकरने देशात आठव्या क्रमांकावर आहे.

डिसेंबर 2015 मधील लेखी परीक्षा आणि मार्च-मे 2016 दरम्यान झालेल्या वैयक्तिक मुलाखतीतून गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे. आयएएस, आयएफएस, आयपीएस आणि केंद्रीय सेवांसाठी 1078 उमेदवारांची निवड झाली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा संपूर्ण निकाल upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

========================================================

पालिका भ्रष्टाचाराचं कनेक्शन मेव्हणे, पीए आणि साहेबांशी : सोमय्या

पालिका भ्रष्टाचाराचं कनेक्शन मेव्हणे, पीए आणि साहेबांशी : सोमय्या
नवी दिल्ली : मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना शिवसेना-भाजपमध्ये रोज नवनवे वाद रंगत आहेत. मात्र त्यातच आज भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी नाव न घेता थेट उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.

मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराचे तार हे साला, पीए आणि साहेबांशी आहेत, असं म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. अर्थात त्यांनी या आरोपात थेट नाव घेण टाळलं असलं तरी त्यांचा रोख हा मातोश्रीकडेच आहे.

मुंबई महापालिकेच्या नालेसफाई, रस्ते बांधकामात अनेक गैरव्यवहार उघडकीस आले. यात प्रशासनासह मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे.
========================================================

फोटोग्राफर ते बिल्डर... राज कंदारींनी आत्महत्येचा प्रयत्न का केला

फोटोग्राफर ते बिल्डर... राज कंदारींनी आत्महत्येचा प्रयत्न का केला?
नवी मुंबई : एक सामान्य फोटोग्राफर… ते सक्सेसफुल्ल बिल्डर… राज कंदारी यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.. मात्र करिअरचा आलेख चढता असलेल्या या बिल्डरने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हा प्रश्न उपस्थित होतो.

मूळचे ग्वाल्हेरचे कंदारी कोपरखैरणेत आले. फोटोग्राफीतून करियर सुरु केलेल्या कंदारी यांनी 15 वर्षांपूर्वी रियल इस्टेटमध्ये प्रवेश केला. छोट्या-मोठ्या दलालीतून ते बांधकाम व्यवसायात आले आणि 1998 मध्ये स्वराज बिल्डर्स अँड डेव्हपर्सची सुरुवात केली.

आधी छोट्या मोठ्या इमारतींपासून सुरु केलेल्या कंदारी हळूहळू मोठ्या इमारती बांधू लागले.

स्वराज किंग्स्टन- उलवे
स्वराज लगूना- नवे पनवेल
स्वराज डॅफोडिल्स- ऐरोली
स्वराज क्विन्स बे- कोपरखैरणे
स्वराज प्लॅनेट- कोपरखैरणे
स्वराज राज उदय- सानपाडा

असे कोट्यवधींचे 25 ते 30 मोठे प्रकल्प कंदारी यांनी उभे केले. कोपर खैरणेतली स्वराज क्वीन्स ही इमारत एकेकाळी नवी मुंबईतली 31 मजल्यांची सर्वात उंच इमारत होती. त्यांची उलाढाल जवळपास 500 ते 600 कोटींवर गेली होती. पण मग इतकं सगळं चांगलं असताना
नक्की बिनसलं कुठे, हा प्रश्न कायम राहतो.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या पनवेलमधल्या 50 एकर जागेत राज कंदारी यांना स्वराज लगूना हा प्रकल्प सुरु केला होता. त्यांच्या परवानग्यांसाठी त्यांनी लाखो रुपये खर्ची घातले होते. पण परवानगी अंतिम टप्प्यात असताना या जागेवर नैना सिटीचं क्षेत्र घोषित झालं.
सिडकोकडून होणारी दिरंगाई यामुळे राज कंदारी अस्वस्थ होते. इतकंच नाही, तर त्यांचे काही अधिकाऱ्यांशी वादही झाले होते.

आधीच मंदी, त्यात सरकारी बाबूंची खाबूगिरी यामुळे बिल्डरांची अवस्था बिकट झाली आहे.  सूरज परमार यांच्यानंतर आता राज कंदारी हे त्याचेच परिणाम आहेत.

========================================================

शशांक मनोहर यांचा राजीनामा, शरद पवार BCCI चे नवे अध्यक्ष

शशांक मनोहर यांचा राजीनामा, शरद पवार BCCI चे नवे अध्यक्ष?
मुंबई :  बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. बीसीसीआयचं अध्यक्षपद राखायचं की आयसीसीचं चेअरमनपद?  या यक्षप्रश्नामुळे त्यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा त्याग केला आहे.

मनोहर यांनी राजीनामा दिल्यामुळे आता शरद पवार आणि अजय शिर्के यांची नावं बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

मनोहर हे सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आयसीसीचे चेअरमन अशी दुहेरी भूमिका बजावत होते. आयसीसीच्या नव्या चेअरमनची निवड ही मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहे.

आयसीसीच्या नव्या नियमांनुसार चेअरमन पदावरच्या व्यक्तीला राष्ट्रीय किंवा राज्य क्रिकेट असोसिएशनमध्ये दुसरं पद भूषवता येणार नाही. त्यामुळे आयसीसीच्या चेअरमनदावर पुन्हा निवडून यायचं, तर शशांक मनोहर यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागणार होता.

अखेर मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

========================================================

आध्यात्मिक गुरु भय्युजी महाराजांवर दोन वेळा प्राणघातक हल्ला

आध्यात्मिक गुरु भय्युजी महाराजांवर दोन वेळा प्राणघातक हल्ला
अहमदनगर : आध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार त्यांच्या चालकानं दाखल केली आहे. या हल्ल्यामध्ये भय्यूजी महाराज सुखरुप असून त्यांच्या कारचालक आणि सहकाऱ्यांना इजा झाल्याची माहिती आहे.

तक्रारीतील माहितीनुसार रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भय्युजी महाराज पुण्याहून इंदूरच्या दिशेने निघाले. पण पुणे जिल्ह्यातल्या रांजणगावजवळ एका कारने भय्युजी महाराज यांचा रस्ता अडवला. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली.

जेव्हा भय्युजी महाराज यांचे चालक जाब विचारण्यासाठी गाडीतून उतरले, तेव्हा रस्त्याशेजारीच असलेल्या दुकानांमधून काही तरुण हत्यारांसह चाल करुन आले. त्यांनी चालकाला मारहाण केली. भय्युजी महाराज कारमधून उतरल्यानंतर त्या तरुणांनी त्यांच्यावरही
हल्ल्याचा प्रयत्न केला, पण त्यांना चालक आणि सोबत असलेल्या सहाय्यकांनी वाचवलं आणि तिथून निघण्यात ते यशस्वी झाले.

त्यानंतर गाडी जेव्हा मनमाडजवळ पोहोचली, तेव्हा तिथेही काही तरुणांनी गाड्या आडव्या लावून भय्यूजी महाराज यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण चालकानं प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेने काढली आणि सर्वजण सुखरुप इंदूरला पोहोचले.

गेल्या 48 तासात या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. पण इंदूरमध्ये पोहोचल्यानंतर भय्यूजी महाराज यांच्या वाहनचालकानं रांजणगाव पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे.

========================================================

कोल्हापूर महापौरपदासाठी भाजप दावा करणार

कोल्हापूर महापौरपदासाठी भाजप दावा करणार
मुंबई/कोल्हापूर कोल्हापूर महापालिकेत भाजप आता सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली.

कोल्हापूरच्या महापौर आणि काँग्रेस नगरसेविका अश्विनी रामाणे यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्यावर ही कारवाई  झाली. रामाणे यांच्यासह 7 जणांचे सदस्यत्व रद्द झालं आहे.

त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि ताराराणी आघाडी दावा करणार आहे.

“महापौर पदासाठी भाजपा दावा करणार असून ती जिंकण्याचा पुरेपर प्रयत्न आम्ही करु” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
नियमानुसार विजयी उमेदवारांनी सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होतं. मात्र महापौर अश्विनी रामाणे या आपलं जात वैधता प्रमाणापत्र सादर करु शकल्या नाहीत.
अश्विनी रामाणे या काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. रामाणे यांच्यासह काँग्रेसच्या दीपा मगदूम आणि राष्ट्रवादीचे सचिन पाटील यांचंही सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.

========================================================

उत्तराखंडमध्ये रावतांचीच बाजी, काँग्रेसला 34 मतं : सूत्र

उत्तराखंडमध्ये रावतांचीच बाजी, काँग्रेसला 34 मतं : सूत्र
देहरादून: उत्तराखंडमध्ये बहुमताच्या ठरावावरील मतदान अखेर पार पडलं आहे.  या मतदानाचा उद्या म्हणजेच बुधवारी निकाल लागणार आहे.

मात्र सूत्रांच्या मते, बहुमताचा आकडा काँग्रेसने पार केला आहे. काँग्रेसच्या बाजूने 34 तर भाजपकडून 26 आमदारांनी मतदान केल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. पण अंतिम निकाल उद्या लागणार आहे.

काँग्रेसच्या 9 आमदारांनी बंड केल्याने हरीश रावत सरकार अस्थिर झालं होतं. त्यामुळे केंद्राने उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली होती. हा सर्व प्रकार कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टाने बंडखोर आमदारांना बहुमत चाचणीपासून दूर ठेवलं.

========================================================

अटक टाळण्यासाठी निलेश राणेंची धावाधाव

अटक टाळण्यासाठी निलेश राणेंची धावाधाव
रत्नागिरी: काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चिपळूणचे काँग्रेस तालुकाअध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाणप्रकरणी निलेश राणेंचा अटकपूर्व जामीन खेडच्या न्यायालयानं फेटाळला आहे. तर सावंत यांना मारहाण करणाऱ्या 4 आरोपींना न्यायालयानी कोठडी सुनावण्यात आली आहे.

त्यामुळे या प्रकरणात आता निलेश राणे यांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान खेड न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर निलेश राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी याचिका दाखल केली आहे.

किरकोळ मतभेदातून निलेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी रात्री आपल्या घरात घुसून आपल्याला मारहाण केली अशी तक्रार सावंत यांनी दाखल केली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या सावंतांवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

यानंतर खुद्द नारायण राणेंनी सावंत यांची भेट घेऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता..पण त्यात फार काही यश आलं नसल्याचं सध्या तरी दिसून येतंय.

========================================================

आता ‘नगराध्यक्ष’ थेट जनतेतून निवडणार

आता ‘नगराध्यक्ष’ थेट जनतेतून निवडणार
मुंबई : नगराध्यक्षही यापुढे थेट जनतेमधून निवडून येईल. याबाबतच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. लकरच याबाबतचा अध्यादेश काढला जाणार आहे.

राज्यातील आगामी 215 नगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

नगराध्यतक्ष थेट जनतेतून निवडून देण्याला राज्यच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली असली, तर अजून अध्यादेश काढण्यात आलेला नाही. अध्यादेश लवकरच काढण्यात येणार आहे. नगरपालिकेत दोन वॉर्डचा मिळून एक प्रभाग असेल.

याआधी 2001 ते 2005 या कालावधीत अशाप्रकारे जनतेतून नगराध्यक्ष निवडले जायचे. मात्र, त्यानंतर नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडून देण्यास सुरुवात झाली. मात्र आता पुन्हा जनतेतून नगराध्यक्षा निवडला जाणार आहे.

नगराध्यक्ष निवडणुकीत होणारा घोडेबाजार, नगरेसवकांची लपवालपवी इत्यादी गोष्टींना या निर्णयामुळे चाप बसेल. शिवाय, योग्य व्यक्ती नगराध्यक्षपदी बसेल, अशी आशाही व्यक्त केली जात आहे.

========================================================

आता शाळेतच जात आणि रहिवासी दाखला मिळणार

आता शाळेतच जात आणि रहिवासी दाखला मिळणार
प्रातिनिधीक फोटो
नवी दिल्ली : देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळेत पाचवी ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र आणि रहिवासी दाखला देण्याचे आदेश सरकारने दिले आहे.


अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यास विलंब होत असल्याची अनेक तक्रारी येत असल्याने सरकारने हे पाऊल उचललं आहे.


जात प्रमाणपत्र आणि डोमेसाईल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सरकारी अधिकारी त्रास देत असल्याची तक्रारी मागील काही दिवसांपासून येत होत्या.


जातीचा दाखला आणि रहिवासी दाखला देण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची आहे. “संबंधित महसूल किंवा प्रशासनाने या दस्तऐवजांची छाननी करुन 30 ते 60 दिवसांच्या कालावधीत प्रमाणपत्र जारी करावं,” असा आदेश कार्मिक मंत्रालयाने दिला आहे.

========================================================

रैनाऐवजी गुजरातचा कर्णधार कोण

रैनाऐवजी गुजरातचा कर्णधार कोण?
गांधीनगरइंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएलच्या सर्व हंगामात एकदाही बाहेर न पडलेल्या सुरेश रैनाचं रेकॉर्ड तुटणार आहे. गुजरात लायन्सचा कर्णधार असलेला रैना पहिल्यांदाच आयपीएलमधील काही सामन्यांना मुकणार आहे.

त्याचं कारणही तसंच आहे. रैनाची बायको प्रियंका सध्या गरोदर असून हॉलंडमध्ये आहे. त्यामुळे बायकोला भेटण्यासाठी आणि आपल्या पहिल्या अपत्याच्या आगमनासाठी रैना अतुर झाला आहे. त्यामुळे हॉलंडला जाणार असल्याची माहिती ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यानंतर रैनाने दिली.

आयपीएलमध्ये 3985 एवढ्या सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम रैनाच्या नावे आहे. रैनाकडे सध्या गुजरात लायन्स संघाच्या कर्णधारपदाची धुरा आहे. यापूर्वी रैना चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएलमधून बाद झालेल्या संघाचा महत्वाचा खेळाडू होता.

भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन चेन्नई संघावर आयपीएलमध्ये दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

========================================================

झुंजीमध्ये शिंगात शिंग अडकून दोन गव्यांचा मृत्यू

  •  ऑनलाइन लोकमत 
    गुहागर, दि. १० -  अंजनवेल येथे एलएनजी गॅस प्रकल्पाच्या जेटीजवळील भागात दोन गव्यांच्या तब्बल सहा तास झुंज झाली. झुंजीदरम्यान दोघांची शिंगे अडकल्याने अखेर तडफडून दोघांचा मृत्यू झाला. अंजनवेल येथील एलएनजी जेटीजवळील जंगल भागातून गव्या रेडय़ांचे वास्तव्य आहे. 
    अनेक वेळा येथील कर्मचा-यांना त्यांचे दर्शन होत असते. रविवारी पहाटे मात्र एक अजबच प्रकार सर्वाच्या निदर्शनास आला. पहाटे पाचच्या सुमारास दोन गव्यांमध्ये झुंज झाली. या दरम्यान दोघांचीही शिंगे एकमेकांमध्ये अडकली. अडकलेली शिंगे सोडविण्यासाठी दोघांनीही प्रयत्न केले. झुंजीचे परिणाम या दोघांनाही भोगावे लागले. झुंज बाजूला राहुन एकमेकांत अडकलेली शिंगे सोडविण्यासाठी दोघांकडून झालेले प्रयत्न अखेर त्यांच्या जीवावर बेतले. 
    जसजसा दिवस उजाडू लागला तसे उन तापून तहानेने व्याकूळ व थकलेल्या अवस्थेत दोन्ही गव्यांचा मृत्यू झाला. जवळच एलएनजी प्रकल्पाचे काम चालू असल्याने येथील कर्मचा-यांनी धाडस करत या गव्या रेडय़ांचे चित्रीकरण व फोटोही घेतले. 
    याबाबत वनपाल सुधाकर गुरव यांच्याशी संपर्क  साधला असता सांगितले की, एलएनजी साठवण टँकजवळील नाल्याशेजारी दोघांची झुंज झाली. हा भाग चिंचोळा (लहान) असल्याने शिंग अडकलेल्या अवस्थेत काहीच न करता आल्याने मृत्यू झाला. हे दोन्ही गवे नर जातीचे व अंदाजे दोन वर्षे वयाचे होते. ९.३० वाजता या घटनेबाबत समजताच प्रकल्पस्थळी धाव घेतली. एलएनजी भागात जाण्यासाठी पास बनविण्यासाठीच दोन तास गेल्याने घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. दोघांची शिंगे वाकडी असल्याने विचीत्र अवस्थेत अडकल्याने सोडविण्यास दोन तास गेले. याच भागात खड्डा खणून पुरण्यात आल्याचे वनपाल गुरव यांनी सांगितले.
========================================================

काजलच्या संमतीविना किसिंग सीन

  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. १० - 'सिंघम' फेम काजल अग्रवालने आतापर्यंत कधीही ऑनस्क्रीन किसींग सीन दिलेला नाही. पण दीपक तिजोरीच्या 'दो लफजो की कहानी'च्या चित्रीकरणाच्यावेळी तिने हा नियम मोडला. दक्षिणेतील सुपरस्टार असलेल्या काजलने आपल्या प्रतिमेला धक्का लागू नये यासाठी किसींग सीन दिला नव्हता. मात्र मलेशियामध्ये 'दो लफजो की कहानी'च्या चित्रीकरणाच्यावेळी अत्यंत धक्कादायक पद्धतीने हा किसींग सीन चित्रीत झाला. 
    रणदीप हूड्डा आणि काजलमध्ये रोमँटीक दृश्य चित्रीत होत असताना रणदीपने काजोलला कुठलीही कल्पना न देता झटकन किस केले. या दृश्यानंतर काजल अवाक होऊन पाहतच राहिली. क्षणभरासाठी तिलाही धक्का बसला. रणदीपच्या या कृत्यानंतर ती अपसेट झाली. ती रणदीपला काही बोलली नाही. पण तिथून थेट आत रुममध्ये निघून गेली. 
    तिने नंतर दीपक तिजोरीकडे तो सीन काढून टाकण्याची मागणी केली. मी किसींग सीन करत नाही. या दृश्यामुळे दक्षिणेतील आपल्या करीयरवर परिणाम होऊ शकतो असे काजलने आपल्याला सांगितले. पण तिची प्रतिमा खराब करण्याचा किंवा कल्पना न देता किसींग सीन करण्याचा कोणताही हेतू नव्हता. दोन प्रेमीयुगलांमधले ते एक भावनात्मक दृश्य होते असे दीपक तिजोरीने सांगितले. किसींग सीन ही कथानकाची गरज आहे हे काजलला समजावून सांगितल्यानंतर तिला पटले असे दीपक तिजोरीने सांगितले. 
========================================================

तुमचा वैमानिक दारु पिऊन तर विमान चालवत नाही ना

  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. 10 - विमानाने प्रवास करत असताना तुमचा वैमानिक दारु पिऊन तर आलेला नाही ना ? याची नक्की चौकशी करा. कारण गतवर्षी 2015मध्ये 43 वैमानिक उद्दाणाआधी केलेल्या तपासणीत दारुच्या प्रभावाखाली असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये जेट एअरवेज आणि इंडिगोच्या वैमानिकांची संख्या जास्त आहे. 
    2015 मधील ही संख्या तीन वर्षातील उच्चांक आहे. नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली आहे. यावर्षी आत्तापर्यत 13 वैमानिक दारुच्या प्रभावाखाली आढळले आहे. 
    भारतातील दुस-या क्रमांकाची विमान सेवा जेट एअरवेजमधील वैमानिक यामध्ये सर्वात जास्त असून 2013 पासून एकूण 38 वैमानिक मद्यप्राशन करुन आल्याचं आढळलं आहे. तर इंडिगोचे 25 वैमानिक मद्यपान करुन आल्याचं चाचणीत उघड झालं होतं. 
    कोणत्याही विमानाच्या उड्डाणाआधी नियमाप्रमाणे वैमानिकासह केब्रिन क्रूमधील सर्वांची चाचणी केली जाते. जर वैमानिकाने नियमाचं उल्लंघन केलं असेल तर पहिल्या वेळी तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला जातो. दुस-यांदा उल्लंघन केल्यास तीन वर्ष आणि त्यानंतर परवाना कायमचा रद्द केला जातो.
========================================================
बगदादजवळ आत्मघाती हल्ल्यात 13 ठार


बगदाद (इराक)- शहराजवळ असलेल्या व्यापारी भागात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकारयांनी आज (मंगळवार) दिली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्याने शिया मशिदीजवळ हा स्फोट घडवून आणला. स्फोटात 13 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, आयएसआय या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
========================================================
भारताला तुमचे पुत्र प्रेम माहित आहे- अमित शहा


थ्रिसूर (केरळ)- संपूर्ण जगाला तुमचे पुत्र प्रेम माहित आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज (मंगळवार) कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका केली.

"माझे इटलीमध्ये कुटुंबीय आहेत, माझी 93 वर्षांची आई तिथे राहते आणि त्याची मला कुठलीही लाज वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही टीका केली तरी माझे भारतावर असलेले माझे प्रेम आणि निष्ठा ते हिरावून घेऊ शकत नाहीत. भारत हा माझा देश आहे. मी येथेच शेवटचा श्वास घेईन आणि माझ्या अस्तीही याच मातीत मिसळून जातील. मोदींना माझ्या भावना समजतील, असे मला वाटत नाही; परंतु या देशातील जनतेला माझ्या भावना नक्की समजतील असा मला विश्वास आहे, असे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी (ता. 9) म्हटले होते.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीदरम्यान शहा यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधीवर यांच्यावर टीका केली. सोनिया गांधीचे पुत्र प्रेमच देशाला माहित असल्याचे शहा म्हणाले.
========================================================
'स्वच्छ भारत' व इतर जाहिरातींवर 350 कोटी खर्च


नवी दिल्ली - भारत सरकारने स्वच्छ भारत आणि इतर अभियानाच्या जाहिरातीसाठी वर्ष 2015-16 मध्ये तब्बल 350 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने लोकसभेत दिली.

सत्तेत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात विविध योजनांचा वर्षाव केला आहे. यामध्ये स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ यांसारख्या अभियानांचा समावेश आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने निर्मल भारत अभियानाच्या जाहिरातीसाठी केलेल्या खर्चाची ही पुनरावृत्ती समजली जात आहे.

स्वच्छ भारत अभियानासाठी 2014-15 या वर्षामध्ये 212 कोटी 57 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. तसेच, 2015-16 या वर्षामध्ये या खर्चात वाढ करून 293 कोटी 14 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे रोजगार वाढ करण्यासाठी असलेल्या ‘स्किल इंडिया‘ योजनेच्या जाहिरातीसाठी 4.19 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
मोदी यांची आणखी एक महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मेक इन इंडिया‘च्या जाहिरातीसाठी 2015-16 मध्ये 4.71 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तर 2014-15 मध्ये यासाठी फक्त 10.7 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. 

========================================================
भारत-चीन व्यापारी संबंध जगाच्या हिताचे


मुंबई : सध्या संपुर्ण जगाचे लक्ष भारत आणि चीनच्या अर्थव्यवस्थेकडे आहे आणि दोन्ही देशांमधील दृढ आर्थिक संबंधांचा संपुर्ण जगाला फायदा होऊ शकतो, असे मत एका चीनी नेत्याने व्यक्त केले आहे.

"आम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञान, नवे उपक्रम, आर्थिक आणि आयटी सेवांसाठी भागीदारीचे पर्याय शोधत आहोत ज्यामुळे भारत-चीन आर्थिक संबंध दृढ होतील", असे प्रतिपादन चीन कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य आणि शांघायचे पार्टी सेक्रेटरी हँग झेंग यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय उद्योग मंडळाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरकारी अधिकारी आणि विविध व्यावसायिक उपस्थित होते. शिवाय, या कार्यक्रमात शांघाय म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि भारतीय उद्योग मंडळात आर्थिक आणि व्यापारी भागीदारीचा सामंजस्य करार झाला.

मुंबई आणि शांघाय यांना 2014 साली ‘सिस्टर सिटीज्‘ असा खिताब देण्यात आला होता. मुंबईत सध्या 15 अब्ज डॉलरचे प्रकल्प कार्यरत आहेत आणि चीनी कंपन्यांसाठी येथे मोठ्या प्रमाणवर संधी उपलब्ध असतील, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  
========================================================
फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या स्पर्धेत गुगलचे नवे अॅप


वॉशिंग्टन- मेसेजिंग व चॅटिंग म्हणजे सध्याच्या तरुणाईचा एक अविभाज्य भाग बनला आहे. हे लक्षात घेऊन गुगलही आता मोबाइल मेसेजिंग अॅप्लिकेशन सुरू करणार आहे.

फेसबुकच्या ‘व्हॉट्सअॅप’ आणि मेसेंजर या अॅपप्रमाणेच ‘टेनसेंट‘चे ‘वी चॅट’ हे अॅप्लिकेशनही लोकप्रिय आहे. गुगलचीदेखील ‘हँग आउट’ ही सुविधा सध्या उपलब्ध आहे. यातील सुविधांच्या तुलनेत अधिक सरस अॅप तयार करण्याचा गुगलचा प्रयत्न आहे. गुगलचे हे नवे ‘अॅप’ कधी प्लेस्टोअरवर उपलब्ध केले जाणार आणि त्याचे नाव काय याबात अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

सोशल नेटवर्किंगमधील आघाडीचे संकेतस्थळ असलेल्या फेसबुकशी गुगलची स्पर्धा असून, फेसबुक देत असलेल्या सुविधा अॅपमध्ये देण्याचा गुगलचा प्रयत्न आहे. यामुळे फेसबुकशी थेट स्पर्धा करण्यासाठी गुगल हे ‘अॅप’ तयार करीत असल्याचे स्पष्ट आहे.
मेसेजिंग आणि चॅटिंग एवढ्यापुरतेच हे ‘अॅप’ मर्यादित राहणार नसून, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशल इंटेलिजन्स) आधारित ‘नो-हाऊ’, इंटिग्रेटेड चॅटबोट्स आणि ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचीही सुविधा या ‘अॅप’मध्ये दिली जाणार आहे. 
========================================================
दोन वर्षांत 50 हजार कोटींची करचुकवेगिरी उघड


नवी दिल्ली : मागील दोन वर्षांमध्ये तब्बल 50 हजार कोटी रुपयांची कर चुकवेगिरी, तर 21 हजार कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता केंद्र सरकारने उघड केली आहे. दरम्यान, काळ्या पैशाविरोधातील कारवायांमुळे तस्करीशी संबंधित 3 हजार 963 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.
सुधारित उपायांमुळे सरकारला 50 हजार कोटी रुपयांची कर चुकवेगिरी आणि 21 हजार कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता उघड करण्यात यश आले आहे, असे अर्थ मंत्रालयाने आपल्या सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
देशातील व देशाबाहेरील काळा पैसा नष्ट करण्यासाठी सरकारने तयार केलेल्या नव्या ‘ब्लॅक मनी‘ कायद्यात कठोर दंडाची तरतूद आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. तसेच, यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. बी. शाह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आला आहे.
========================================================
मदरशात मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग


मलाप्पुरम (केरळ)- येथील एका मदरशात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 55 वर्षीय शिक्षकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.

पोलिस उपनिरीक्षक मन्जिथ लाल यांनी सांगितले की, ‘अब्दुराहिमन मुस्लैर या शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.‘

‘मदरशामध्ये इयत्ता पाचवीमध्ये मुली शिक्षण घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुस्लैर हा शिक्षक मुलींचा विनयभंग करत होता. याबद्दलची तक्रार मुलींनी आपल्या पालकांकडे केली होती,‘ असे लाल यांनी सांगितले.
========================================================
स्वस्त घरांसाठी 'ईपीएफओ'चा मदतीचा विचार


नवी दिल्ली - भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या पाच कोटी सदस्यांना स्वस्त दरात घर उपलब्ध व्हावे यासाठी योजना राबवण्याचा विचार करत असल्याची माहिती केंद्रीय श्रमिक व रोजगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी दिली आहे.

कर्मचाऱ्यांना घराचा हप्ता भरण्यासाठी "पीएफ‘ची रक्कम वापरायची परवानगी मिळणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात संघटनेच्या विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला होता. सदस्यांना त्यांच्या "पीएफ‘ योगदानाची रक्कम स्वस्त दरातील घर खरेदी करण्यासाठी वापरण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव त्यावेळी मांडण्यात आला होता. शिवाय, या संबंधी तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल विश्वस्तांसमोर सादर करण्यात आला होता. समितीच्या शिफारसीनुसार, "ईपीएफओ‘ सदस्यांना घर खरेदीसाठी पीएफ खात्यातून कर्ज मिळावे आणि उर्वरित हप्ता भरण्यासाठी योगदानाची रक्कम वापरता यावी यासाठी सर्व संमतीने मंजुरी देण्यात आली होती. ही योजना विशेषत: कमी वेतनावर काम करणाऱ्या मजुरांसाठी प्रस्तावित आहे. प्रस्तावित योजनेत ईपीएफओ सदस्य, बॅंक/ हौसिंग एजन्सी आणि ईपीएफओमध्ये त्रिपक्षीय करार केला जाईल.
========================================================
पाकः गिलानींचा अपहृत मुलगा 3 वर्षांनी ताब्यात


इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांचा अपहृत झालेला मुलगा अली हैदर गिलानी याला तब्बल तीन वर्षांनी ताब्यात घेण्यात यश आले आहे.

अमेरिका व अफगाण सैनिकांनी संयुक्तरीत्या पंजाब प्रांतात शोध मोहिम हाती घेतली होती. यावेळी सैनिकांनी अली हैदर गिलानीला ताब्यात घेतले आहे. तो सुखरूप असून लवकरच त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाईल, अशी माहिती अफगाणचे राजदूत ओमर झकीलवाल यांनी आज (मंगळवार) दिली.

पंजाब विधानसभेच्या रिंगणात असलेले अली हैदर गिलानी (वय 29) हे मुलतानच्या माटी या भागात प्रचारासाठी आले असताना सशस्त्र अपहरणकर्त्यांनी त्यांच्या मोटारीपुढे बेछूट गोळीबार केला होता. 9 मे 2013 रोजी बंदूकधाऱ्यांनी त्यांचेअपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी गोळीबार करून अली हैदर यांच्या सचिवाला ठार केले आणि नंतर हैदर यांना पळवून नेले होते.
========================================================
देश शैक्षणिक गुणवत्तेवर चालत नाही- शिवसेना


नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या कागदपत्रांविषयी वाद निर्माण झाल्याच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर देश शैक्षणिक पात्रतेवर चालत नसल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, ‘देश पदव्यांवर चालत नाही. एखाद्या व्यक्तीचा प्रशासनातील अनुभव आणि प्रशासन चालविण्यामागची भावना महत्त्वाची आहे. पदवीसंबंधीचा वाद अनावश्‍यक आहे. देशासमोर दुष्काळ, बेरोजगारीसारख्या अनेक समस्या आहेत. कोणीही अशा महत्त्वाच्या विषयांवर बोलत नाही. मी म्हणतो जर पंतप्रधानांकडे पदवी नसेल आणि ते देश चांगल्या पद्धतीने चालवत असतील तर पदवीचा वाद लवकरात लवकर थांबविण्यात यावा‘.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबतचे
प्रमाणपत्र हे बनावट असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
========================================================
पंतप्रधान करा वा इस्पितळात पाठवा- आझम खान


रामपूर (उत्तर प्रदेश)- मला पंतप्रधान करा अथवा वेड्यांच्या इस्पितळात पाठवा, असे उत्तर प्रदेशचे नगरविकास मंत्री आझम खान यांनी म्हटले आहे.

समाजवादी पक्षाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना खान म्हणाले, ‘एखाद्या व्यक्तीची किंमत काम केल्यानंतर कळते. मला पंतप्रधान करा, दोन वर्षांतच भारताला अमेरिकेपेक्षा जास्त ताकदीचा देश बनवून दाखवेल. माझे वक्तव्य चुकीचे वाटत असेल तर वेड्यांच्या इस्पितळात पाठवा.‘

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करताना खान म्हणाले, ‘एखादा मुख्यमंत्री आपल्या खात्यातील मंत्र्याला बोगस पदवीवरून कारागृहात पाठवत असेल तर पंतप्रधानांच्या पदवीवर प्रश्न उपस्थित केला तर चुकीचे काय आहे.‘

‘उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती या गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) मत मागत आहेत. परंतु, येथील मुस्लिमांना भाजपासून सावध राहण्याचे सांगत आहेत. यावरूनच त्यांचे दुहेरी रूप समोर येते,‘ असेही खान म्हणाले.
========================================================
'अल्लाहू अकबर'चे नारे देत प्रवाशांवर चाकू हल्ला


म्युनिच - जर्मनीतील म्युनिक शहराजवळील रेल्वे स्थानकात आज (मंगळवार) एका व्यक्तीने ‘अल्लाहू अकबर‘चे नारे देत प्रवाशांवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात पाच प्रवासी जखमी झाले आहेत.

पोलिसांचे प्रवक्त्या मिशेल ग्रोब यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्युनिकच्या पूर्वेला असलेल्या ग्राफींग रेल्वे स्थानकावर आज पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. एका व्यक्तीने अल्लाहू अकबरचे नारे देत थेट रेल्वे प्रवाशांवर हल्ला करण्यास सुरवात केली. या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत. या हल्लेखोराची ओळख पटविण्यात येत आहे.

जर्मनी इस्लामिक स्टेट (इसिस) विरुद्धच्या युद्धात उतरलेले आहे. जर्मनीचे शेजारी देश असलेल्या फ्रान्स, बेल्जियममध्ये इसिसने यापूर्वी हल्ले घडविले आहेत. 
========================================================
'हा' मोदी सरकारला मोठा धक्का- केजरीवाल


नवी दिल्ली - उत्तराखंडमधील बहुमताची चाचणी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला जबरदस्त धक्का असल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.

आज उत्तराखंडमध्ये बहुमताची चाचणी पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसने बाजी मारल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर पार्श्‍वभूमीवर "उत्तराखंडमधील बहुमताची चाचणी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला जबरदस्त धक्का आहे. ते आता सरकारे उलथवून टाकण्याचे सत्र थांबवतील अशी आशा आहे‘, अशा प्रतिक्रिया केजरीवाल यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्‍वास यांनीही भारतीय जनता पक्षाला उत्तराखंडमध्ये "ठुल्लू‘ मिळाल्याची टीका ट्‌विटरद्वारे केली आहे.

उत्तराखंडमधील राजकीय युद्धात आज झालेल्या बहुमताच्या चाचणीत कॉंग्रेसनेच बाजी मारल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. बहुमत चाचणीचा निकाल बुधवारी सर्वोच्च न्यायालयात जाहीर करण्यात येणार आहे.

========================================================

No comments: