Thursday, 5 May 2016

नमस्कार लाईव्ह ०५-०५-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- न्युयोर्क; 10 वर्षांच्या बालकाला फेसबुककडून 10 हजार डॉलरचं बक्षिस 
२- वॉशिंग्टन; डोनाल्ड ट्रम्प उमेदवारीच्या जवळ 
३- सेंट लुईस; टॅल्कम पावडरमुळे कर्करोग महिलेला ३२५ कोटी भरपाई 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- IRCTC ची वेबसाईट हॅक, कोट्यवधी ग्राहकांचा डेटा चोरी झाल्याची भीती 
५- जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी दिल्लीत करणार होते पठाणकोट हल्ल्याची पुनरावृत्ती 
६- वीजनिर्मिती खर्चात 25 हजार कोटींची बचत 
७- पठाणकोट हल्ल्यातील दहशतवाद्यांचे मृतदेह पुरले 
८- मोदींनी केले पर्रीकरांच्या भाषणाचे कौतुक 
९- लाचखोरी तपासाच्या केंद्रस्थानी- पर्रीकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- पनामा पेपर्समध्ये अभिनेता अजय देवगनचंही नाव 
११- 'सैराट'च्या पायरसी प्रकरणी पुण्यात पहिला गुन्हा दाखल 
१२- आमीर खानचं अमरावतीमध्ये श्रमदान 
१३- किनन-रुबेन हत्या प्रकरणी चारही आरोपींना जन्मठेप 
१४- ७.५ लाख किलो डाळ गोदामात पडून 
१५- राज्यात आज सीईटी 
१६- एसटीला डिझेल दरवाढीचे चटके 
१७- ८ मेपर्यंत राज्याला पावसाचा इशारा 
१८- पाण्यावर कुणा एकाचा हक्क नाही - बापट 
१९- युरोपात मिळाली शिवरायांची मूळ चित्रे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- रायपुर; आंध्र प्रदेशमधील रेल्वे स्थानकांवर वाय-फाय 
२२- मुझफरनगर; उच्चदाबाची विद्युत तार कोसळल्याने सहा ठार 
२३- चांदूरबाजार; स्वखर्चातून भागवितात रेल्वेप्रवाशांची तृष्णा 
२४- छत्तीसगडमध्ये बस अपघातात 13 जणांचा मृत्यू 
२५- मध्यप्रदेश - घरात फक्त बल्ब असताना 74 हजारांचं वीजबिल पाठवल्याचा आरोप. 
२६- मध्यप्रदेश - बिना एटावा येथे जुनी इमारत कोसळून दोन महिलांचा मृत्यू, 12 जखमी. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२७- जिल्ह्यातील १६ सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या अधिकारावर गदा 
२८- भोकर; वीज पडून शेतमजूर, दोन बैल ठार, एक जखमी 
२९- देगाव कुराडा दंगल प्रकरणी ४०० जणांवर अॅट्रासिटी 
३०- शिवसाईनगरात पत्नीचा खून करून आत्महतेचा प्रयत्न 
३१- महापालिकेच्या शाळेतून मिळणार ई-लर्निंग व सेमी इंग्रजीतून शिक्षण 
३२- नवीन पूल दुरुस्तीचे काम सुरु, एक महिना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन 
३३- जि.प. कर्मचारी पतसंस्थेची सव्वाकोटी थकबाकी, ११८ थकबाकीदारांकडून होणार सक्तीने वसुली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
मनात नेहमी जिंकण्याची अशा नसावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते
(साईनाथ शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

==========================================

10 वर्षांच्या बालकाला फेसबुककडून 10 हजार डॉलरचं बक्षिस

10 वर्षांच्या बालकाला फेसबुककडून 10 हजार डॉलरचं बक्षिस
न्यू यॉर्क : फेसबुकने फिनलंडमध्ये राहणाऱ्या एका 10 वर्षांच्या बालकाला 10 हजार डॉलर म्हणजे अंदाजे 6 लाख 65 हजार रुपयांचं बक्षिस दिलं आहे. फेसबुकचं फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्राममधला एक बग शोधल्याबद्दल हे इनाम देण्यात आलं आहे.

जानी नावाच्या या बालकाने इन्स्टाग्राममधला हा बग आपणहून शोधून काढल्याची माहिती वेन्चरबीट.कॉम या टेक्नॉलॉजी वेबसाईटने दिली आहे. इन्स्टाग्रामवर अकाऊण्ट ओपन करण्यासाठी तुमचं वय 13 वर्ष असणं आवश्यक आहे, मात्र 10 वर्षांच्या या बालकाने चक्क
या सोशल साईटमधल्या उणिवा शोधल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.

काय आहे हा बग ?
जानीने शोधलेल्या या बगमुळे तुम्ही इन्स्टाग्रामवर कोणत्याही यूझरने कोणाच्याही फोटोवर केलेली कमेंट डिलीट करु शकत होतात. या चिमुरड्याने ईमेलद्वारे या बगची माहिती फेसबुकला दिली आणि पुरावा म्हणून इन्स्टाग्रामवरील फेसबुकच्या एका टेस्ट अकाऊण्टवरील
कमेंट डिलीट करुन दाखवली.

‘मी कोणाचीही कमेंट डिलीट करु शकत होतो, अगदी जस्टिन बिबरसारख्या परफॉर्मरचीही’ अशी प्रतिक्रिया जानीने दिली. फेब्रुवारीमध्ये हा बग फिक्स करण्यात आला आणि मार्चमध्ये त्याला पारितोषिक देण्यात आलं.

भविष्यात जानीला सिक्युरिटी रिसर्चर होण्याची इच्छा आहे. ‘हा माझा ड्रीम जॉब असेल, सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते’ असं तो म्हणतो. जानीने ही रक्कम त्याच्या दोन भावांसाठी नवीन बाईक, फुटबॉल गेअर आणि कॉम्प्युटर घेण्यासाठी वापरली आहे.
==========================================

पनामा पेपर्समध्ये अभिनेता अजय देवगनचंही नाव

 पनामा पेपर्समध्ये अभिनेता अजय देवगनचंही नाव
मुंबई : पत्रकारितेच्या क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या पनामा पेपर्स लीकमध्ये आता बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगनचंही नाव आलं आहे. बच्चन कुटुंबीयांनंतर अजय देवगनचंही नाव पनामा प्रकरणात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या बातमीनुसार 2013 मध्ये अजय देवगनने ब्रिटीश वर्जिन आईसलँडमधील मेरिलबोन एन्टरटेनमेंट लिमिटेड कंपनीचे पूर्ण शेअर्स खरेदी केले होते. लंडनचे के हसन एन सयानी या कंपनीचे मूळ शेअर होल्डर आहेत. सयानी यांनी 31 ऑक्टोबर
2013 रोजी एक हजार समभाग जारी केले होते, तर अजयने त्याच दिवशी सगळे शेअर्स खरेदी केले.

दरम्यान, अजय देवगनने या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. परदेशात हिंदी चित्रपटांचे हक्क विकत घेण्यासाठी गुंतवणूक केल्याचा दावा अजयने केला आहे. माझ्या कुटुंबीयांनी याची पूर्ण नोंद टॅक्स रिटर्नमध्ये केली असल्याने सरकारला याबाबत माहिती असल्याचंही त्याने म्हटलं आहे.

अजय देवगनने या कंपनीतून राजीनामा दिला असून दोन परदेशी कंपन्यांचं नामांकन केलं आहे. आतापर्यंत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन यांचीही नावं या प्रकरणात पुढे आली आहेत.

जगभरातल्या पत्रकारांनी मिळून पनामा पेपर्स या नावाने ब्लॅकमनी साठवण्याच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. पत्रकारितेच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट मानला जातो. पनामा पेपर्स या नावाने केलेला हा गौप्यस्फोट जगभरात चर्चेचा विषय आहे.
==========================================

'सैराट'च्या पायरसी प्रकरणी पुण्यात पहिला गुन्हा दाखल

'सैराट'च्या पायरसी प्रकरणी पुण्यात पहिला गुन्हा दाखल
पुणे : सैराट चित्रपटाची पायरेटेड कॉपी विकणाऱ्या दुकानदाराविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या तक्रारीनंतर ‘सैराट’ प्रकरणी राज्यातला पहिलाच गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कासम दस्तगीर शेख या 23 वर्षीय आरोपीचं स्वारगेट परिसरात मोबाईल दुरुस्तीचं दुकान आहे. तो शंभर रुपयात मोबाईल किंवा सीडीवर सैराट सिनेमाच्या पायरेटेड कॉपी तो डाऊनलोड करुन देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी पायरसी करताना कासमला रंगेहाथ पकडलं. पुण्याच्या स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून राज्यातला हा पहिलाच गुन्हा आहे.


प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या ‘सैराट’ची कॉपी यू ट्यूबवर लिक झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे यू ट्यूबवर चक्क सेन्सॉर कॉपी अपलोड करण्यात आली होती. याप्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी थेट पोलिसात धाव घेतली.  मंजुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.
==========================================

आमीर खानचं अमरावतीमध्ये श्रमदान

आमीर खानचं अमरावतीमध्ये श्रमदान
अमरावती : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील गावांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता आमीर खान आज अमरावतीमध्ये पोहोचला आहे. वाठोडा गावात आमीर खानने भल्या पहाटे श्रमदानाला सुरुवात केली आहे.

आमीरसोबत अभिनेत्री रिमा लागू, सई ताम्हणकर, सुनील बर्वे हेदेखील श्रमदान करत आहेत. कलाकारांनी श्रमदानाला सुरुवात केल्याने गावकऱ्यांमध्येही हुरुप चढला आणि त्यांनी कामाला सुरुवात केली.

आमीर गावात येणार असल्याने पहाटे तीन वाजल्यापासून त्याच्या स्वागताची तयारी केली होती. आमीर खान सहा वाजता वाठोड्यात पोहोचला आणि थेट कामाला सुरुवात केली.

एकूण दीडशे गावं वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यापैकी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 60 लाख तर त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी अनुक्रम 30 आणि 20 लाख बक्षीस दिलं जाणार आहे. एखाद्या स्पर्धेच्या माध्यमातून दुष्काळ घालवण्याची ही पहिलीच अनोखी स्पर्धा आहे.
==========================================

IRCTC ची वेबसाईट हॅक, कोट्यवधी ग्राहकांचा डेटा चोरी झाल्याची भीती

IRCTC ची वेबसाईट हॅक, कोट्यवधी ग्राहकांचा डेटा चोरी झाल्याची भीती
नवी दिल्ली : आयआरसीटीसीची वेबसाईट हॅक झाली असून अंदाजे एक कोटी ग्राहकांचा पर्सनल डेटा चोरी झाल्याची शक्यता वर्तवली आहे. इतकंच नाही तर वेबसाईट हॅक झाल्याने सुरक्षा आणि प्रायव्हसी भंग होण्याची भीती आहे.

आयआरसीटीसी ही भारताची सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबासाईट असून यावर दरदिवशी लाखोंचे व्यवहार होता. तसंच याचा डेटा अतिशय महत्त्वाचा आणि गोपनीय आहे. कारण लाखो ग्राहक रिझर्व्हेशन करताना पॅन कार्ड नंबरसह खासगी माहितीही देतात. चोरलेल्या डेटाचा दुरुपयोग केला जाऊ शकतो, त्याद्वारे बनावट डॉक्युमेंट्सही बनवू शकतो, असं एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं.

या तपशीलाची किंमत फार जास्त आहे, जो कॉर्पोरेशनला विकला जाऊ शकतो. शिवाय याद्वारे लोकांना टार्गेट करता येऊ शकतं, असं आयआरसीटीच्या सुत्रांनी सांगितलं.

आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत महाराष्ट्र सरकारला अलर्ट केलं आहे. तसंच पोलिसांना याची सूचना दिल्याचं राज्याचे अतिरिक्त गृहसचिव के पी बक्षी यांनी सांगितलं.

सध्या आयआरसीटीसीची वेबसाईट सुरु आहे. मात्र, वेबसाईटवरील डेटा चोरीला गेल्याचं उघडकीस झालं आहे.
==========================================

डोनाल्ड ट्रम्प उमेदवारीच्या जवळ

  • वॉशिंग्टन : अमेरिकन अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे इच्छुक डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी आपले पक्षातील प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांना शर्यतीतून बाहेर टाकले. इंडियाना प्रायमरीत ट्रम्प यांनी क्रूझ यांना जोरदारपणे पराभूत केले. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत ट्रम्प यांची गाठ डेमोक्रॅटिक पक्षातर्फे आघाडीवरील इच्छुक हिलरी क्लिंटन यांच्याशी होण्याची मोठी शक्यता आहे. क्लिंटन यांना मात्र इंडियानात त्यांचे स्पर्धक बर्नी सँडर्स यांनी पराभूत केले.
    अनुमानावर का असेना मी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवार आहे याचा मला अभिमान आहे. ही वेळ आमच्या पक्षात ऐक्य निर्माण करण्याची व हिलरी क्लिंटन यांना पराभूत करण्याची आहे, असे डोनाल्ड ट्रम्प इंडियाना प्रायमरीतील विजयानंतर आपल्या पाठीराख्यांना पाठविलेल्या संदेशात म्हणाले.
    क्रूझ यांचे ट्रम्प यांच्याशी कडवट व ओंगळ असे शाब्दिक युद्ध झाले होते. या स्पर्धेतून माघार घ्यायचा निर्णय क्रूझ यांनी मतमोजणी पूर्ण झालेली नसतानाही जाहीर केला. आता ट्रम्प यांना पक्षातर्फे निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी १,२३७ डेलिगेट्सची गरज असून आता त्यांना २०० पेक्षा कमी डेलिगेट्स मिळवायचे आहेत. अजूनही त्यांना ओहियोचे गव्हर्नर जॉन कॅसिच यांचे आव्हान आहे. कॅसिच यांच्याकडे २०० पेक्षा कमी डेलिगेट्स आहेत. मी शर्यतीतून माघार घेणार नाही, असे कॅसिच यांनी जाहीर केले.
==========================================

टॅल्कम पावडरमुळे कर्करोग महिलेला ३२५ कोटी भरपाई

  • सेंट लुईस (अमेरिका): सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या टॅल्कम पावडरमुळे कर्करोग
    झाल्याचा दावा मान्य करून येथील न्यायालयाने बाधित महिलेला ५५ दशलक्ष डॉलरची (सुमारे ३२५ कोटी रु.) भरपाई देण्याचा आदेश
    जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या
    बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीला दिला आहे.
    कंपनीची टॅल्कम पावडर कित्येक वर्षे वापरल्याने आपल्याला बिजांडकोशाचा (ओव्हरिज) कर्करोग झाला, असा आरोप करून दक्षिण डाकोटा राज्यातील ग्लोरिया रिस्तेसूंद या महिलेने जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनविरुद्ध दावा दाखल केला होता. त्यात झालेल्या साक्षीपुराव्यांवर ज्युरींनी आठ तास विचार केला आणि फिर्यादी महिलेचा दावा मान्य करून तिला वरीलप्रमाणे भरपाई देण्याचा आदेश दिला.
    सेंट लुईस येथील न्यायालयाने गेल्या तीन महिन्यांत या कंपनीविरुद्ध अशी मोठी भरपाई देण्याचा दिलेला हा दुसरा आदेश आहे.याआधी फेब्रुवारीत ७२ दशलक्ष डॉलर भरपाई देण्याचा निकाल झाला होता. बिजांडकोशाच्या कर्करोगाने मृत्यू झालेल्या अलाबामा राज्यातील एका महिलेच्या कुटुंबियांनी तो दावा दाखल केला होता. ती महिला कित्येक वर्षे या कंपनीची जॉन्सन्स बेबी पावडर व अन्य सौंदर्य परसाधने वापरायची. या उत्पादनांच्या सततच्या वापराने
    तिला कर्करोग झाल्याची ती फिर्याद होती.
==========================================

किनन-रुबेन हत्या प्रकरणी चारही आरोपींना जन्मठेप

  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. 05 - किनन आणि रुबेन हत्या प्रकरणी सत्र न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवलं असून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुनील, सतीश, दीपक आणि जितेंद्र राणा यांनी २०११ मध्ये किनन आणि रुबेन यांची हत्या केली होती. मैत्रिणीची छेड काढणार्‍यांचा विरोध केला म्हणून 24 वर्षांचा किनन सँतोज आणि 28 वर्षांचा रुबेन फर्नांडिस यांची भर रस्त्यात चाकू भोसकूनं हत्या करण्यात आली. 
    '28 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात घेण्यात आली होती ज्यामधील पाच जण त्या ठिकाणी उपस्थित होते. यामध्ये किनन आणि रुबेन यांच्या दोन पिडीत मैत्रिणींचादेखील समावेश होता', अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. 'आरोपी छेड काढण्याचा आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न करत होते याचे थेट पुरावे उपलब्ध आहेत. त्यावेळी पिडीतांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी धमकी दिली होती आणि त्यानंतर हत्यारांसोबत त्या ठिकाणी घेऊन हत्या केली होती', असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं आहे.
==========================================

जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी दिल्लीत करणार होते पठाणकोट हल्ल्याची पुनरावृत्ती

  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. 05 - जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी दिल्लीतील एअरबेस तसंच दिल्ली गाजियाबाद सीमारेषेवरील मॉलवर हल्ला करण्याच्या तयारीत होते अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिली आहे. दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला करुन पठाणकोट दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा कट आखण्यात आला होता. दिल्ली एनसीआरमध्ये हे हल्ले करण्यात येणार होते. मात्र दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांचा कट उधळण्यात आला आहे. 
    दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्लीच्या बाहेर तसंच उत्तर आणि पश्चिम दिल्लीत छापेमारी करत 12 दहशतवाद्यांना अटक केली होती. यामध्ये या तीन दहशतवाद्यांचादेखील समावेश आहे.त्यांची चौकशी केली असता ही माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांचा म्होरक्या साजीदला उत्तर-पूर्व दिल्लीच्या चांदबाग नगरमधून अटक करण्यात आली होती. तर शाकीर आणि समीर यांनी उत्तरप्रदेश आणि गोरखपूरमधून अटक करण्यात आली होती. 
==========================================

७.५ लाख किलो डाळ गोदामात पडून

  • मुंबई : राज्यातील गोदामांमध्ये ७.५ लाख किलो डाळ पडून आहे. व्यापारी हा माल घ्यायला तयार नसल्याने डाळ गोदामात सडत आहे. सर्वसामान्य जनतेसाठी ही डाळ स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी , अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.
    गेल्या वर्षी डाळींचे भाव गगनाला भिडले होते. सामान्य नागरिकांच्या रोजच्या जेवणातील डाळ प्रति किलो २०० रुपयांच्याही पुढे गेली होती. व्यापारी आणि दलालांनी दर वाढ घडवून आणल्याचा आरोप विरोधकांनी त्यावेळी केला होता. काँग्रेसने तर डाळींच्या दरवाढीविरोधात आंदोलन करीत दलालांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने कारवाई करीत काही गोदामांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणात डाळ पकडली होती. जप्त केलेली ही डाळ सरकारने विकायला बाहेर काढली होती पण व्यापाऱ्यांनी सदर डाळ विकत घेतली नाही. त्यामुळे राज्यातील गोदामांत ७.५ लाख किलो डाळ अशीच सडत असल्याची माहिती मिळाल्याचे संजय निरुपम यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 
==========================================

राज्यात आज सीईटी

  • मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सरकारकडून घेण्यात येणारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) गुरुवारी होणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील १ हजार ५४ कनिष्ठ महाविद्यालयांतील केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल. त्यासाठी एकूण ४ लाख ९ हजार २६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
    वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी सर्वोच्च न्यायालयात ‘नीट’विरोधात राज्य सरकारची लढाई सुरू असल्याने एमएचटी-सीईटीबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही धाकधूक कायम आहे. नीटविरोधात
    राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात
    दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारीच सुनावणी होत असल्याने विद्यार्थ्यांवरील ताण कायम आहे.
==========================================

एसटीला डिझेल दरवाढीचे चटके

  • मुंबई : एसटी महामंडळाला डिझेल दरवाढीचे चटके बसत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यातील सलग तीन वेळा डिझेल दरवाढीमुळे एसटीला वर्षाला १८0 कोटींचा फटका बसणार आहे.
    एसटी महामंडळाच्या राज्यात सुमारे १७ हजार बस धावतात. बहुतांश डिझेलवर बसेस धावत असून वर्षाला १२ लाख लिटर डिझेल एसटी महामंडळाला लागते. एसटी महामंडळाकडून एकूणच डिझेलवर वर्षाला २,४00 ते २,६00 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. एसटीकडून होणाऱ्या खर्चात ३५ टक्के खर्च हा डिझेलवरच केला जातो. एप्रिल महिन्यात दोन वेळा आणि मे महिन्याच्या सुरुवातीला एकदा डिझेलच्या दरात वाढ झाली. या दरवाढीमुळे एसटी महामंडळाला यापुढे वर्षाला १८0 कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचा अंदाज एसटी महामंडळाकडून बांधण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या दरवाढीमुळे महामंडळाला दररोज ६ कोटी ६0 लाख रुपये जादा मोजावे लागत आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनही दरवाढ झाल्यामुळे आणखी प्रत्येक दिवशी ३६ लाख रुपयांची भर पडली आहे.
==========================================

८ मेपर्यंत राज्याला पावसाचा इशारा

  • मुंबई : देशासह राज्याच्या वातावरणात बदल नोंदवण्यात येत असतानाच ८ मे पर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचप्रमाणे सध्या तापलेल्या मुंबईमधील हवामानही पुढील ४८ तासांसाठी ढगाळ राहील, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
    देशाच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे कमाल तापमानात वाढच होते आहे. राज्यातील शहरांचे सरासरी कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास नोंदवण्यात येत असून, ऊकाड्यातही वाढ झाली आहे.५ आणि ६ मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ७ मे रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. 
==========================================
वीजनिर्मिती खर्चात 25 हजार कोटींची बचत
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने वीज निर्मितीचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने देशांतर्गत कोळसा वापरासंबंधीचे नियम शिथिल केली आहेत. त्यामुळे सरकारला वीज निर्मितीसाठी येणारा खर्च प्रति युनिट 40 ते 50 पैशांनी कमी होणार आहे. तसेच, येत्या 4 ते 5 वर्षांत वीजनिर्मिती खर्चातून सरकारची एकूण 25 ते 30 हजार कोटी रुपयांची बचत होईल, अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. 

दळणवळणाचा खर्च कमी करण्यासाठी 19 कोळसा खाणींची अदलाबदल करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे कंपन्यांना वीजनिर्मितीसाठी जवळच्या खाणीतील कोळसा वापरता येणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाच्या किंमती कमी आहेत. पर्यायाने, कोळश्याची आयात वाढली असून देशात तयार झालेल्या कोळशाच्या साठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे या घडीला नियमांमध्ये शिथिलता आणण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

कोळसा वापरासंबंधीच्या नियमांमधील या बदलांचा वीज क्षेत्रातील कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. वीज उत्पादनाचा खर्च कमी झाला तर सामान्य माणसाच्या वीजबिलात कपात होण्यास मदत होणार आहे. 
==========================================
पठाणकोट हल्ल्यातील दहशतवाद्यांचे मृतदेह पुरले
पठाणकोट- येथील पठाणकोट हवाईतळावर जानेवारीमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी चारजणांचे मृतदेह काल (बुधवार) रात्री अज्ञात स्थळी पुरण्यात आले. 

या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेतील (एनआयए) अधिकाऱ्यांनी येथील सरकारी रुग्णालयात जाऊन त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. 
मागील वर्षी गुरदासपूर येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यावर त्यांचे मृतदेह ज्या ठिकाणी पुरण्यात आले त्या ठिकाणाजवळ हेही मृतदेह पुरण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

2 जानेवारी रोजी सहा दहशतवादी सीमेवरून घुसखोरी करून भारतात घुसले, आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या हवाईतळावर त्यांनी गोळीबार केला. येथे ऐंशी तास चाललेल्या चकमकींमध्ये हे दहशतवादी मारले गेले. या दरम्यान भारतीय लष्कराच्या सात जवानांना प्राण गमवावे लागले. 
==========================================
आंध्र प्रदेशमधील रेल्वे स्थानकांवर वाय-फाय
प्रातिनिधिक चित्ररायपूर - रेल्वे प्रवाशांना वेगवान इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी आंध्र प्रदेशमधील विजयवाडा, काचीगुडा आणि छत्तीसगढमधील रायपूर स्थनकांवर गुगलच्या मदतीने येत्या गुरुवारी विनामूल्य वाय-फाय सेवा सुरु करण्यात येणार आहे. 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू दिल्लीतील रेल्वे भवनातून या सेवेचे उद्‌घाटन करणार आहेत. एप्रिलमध्ये भुवनेश्‍वर येथील रेल्वे स्थानकावर अशी सेवा सुरु करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांना वेगवान इंटरनेट सेवा पुरविणे हा या मागील उद्देश असून ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहे अशा प्रत्येकाला ही सेवा वापरता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने चांगली इंटरनेट सेवा पुरविण्याच्या उद्देशाने या वर्षअखेर देशभरातील 100 सर्वांत गर्दीच्या स्थानकांवर वाय-फाय सेवा पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
==========================================
मोदींनी केले पर्रीकरांच्या भाषणाचे कौतुक
नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीव्हीआयपी) हेलिकॉप्टर खरेदीच्या हजारो कोटी रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी राज्यसभेत केलेल्या भाषणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

आज (गुरुवार) सकाळी पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून पर्रीकर यांनी दिलेल्या भाषणाबाबत आनंद व्यक्त केला. त्यांनी पर्रीकरांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. पंतप्रधान म्हणाले की, हे भाषण सर्वोत्तम भाषणांपैकी एक आहे. या भाषणातून चांगल्या संसदीय परंपरांचे प्रदर्शन होते. राजकारणापेक्षा संरक्षण मंत्र्यांनी सत्यता समोर ठेवली. माझा सर्वांना आग्रह आहे की त्यांनी हे भाषण ऐकावे. 

हेलिकॉप्टर खरेदीच्या हजारो कोटी रुपयांच्या व्यवहारात ज्यांनी लाच घेतली ते कोण आहेत हे सारा देश जाणू इच्छितो, असे सांगतानाच मनोहर पर्रीकर यांनी ज्यांची ज्यांची नावे समोर आली आहेत त्या साऱ्यांचीच चौकशी होईल व सीबीआयने या तपासाला गती दिली आहे, असे राज्यसभेत स्पष्ट केले होते.
==========================================
उच्चदाबाची विद्युत तार कोसळल्याने सहा ठार
संग्रहित चित्रमुझफ्फरनगर (बिहार) - उच्चदाबाने विद्युत वहन करणारी विद्युत तार कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जण ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुझफ्फरनगर येथील बेनीबाद गावात ही दुर्दैवी घटना घडली. एकाच कुटुंबातील काही व्यक्तींच्या अंगावर ही तार कोसळल्याने सहा जण ठार झाले आहेत. दरम्यान गेल्या 24 तासात बिहारमध्ये गारपीट आणि वीजेमुळे नऊ जण ठार झाले आहेत. त्यापैकी पुरेना, जहानाबाद आणि जमुई जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर मुझफ्फरनगर, दरभंगा आणि नावडा येथे प्रत्येकी एक जण ठार झाले आहेत. गारपीट, वीज आणि पावसामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले असून आंबे आणि लिचीचे पीक खराब झाले आहे. हवामानखात्याच्या अंदाजानुसार राज्यातील पूर्वेकडील भागात आज पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
==========================================
स्वखर्चातून भागवितात रेल्वेप्रवाशांची तृष्णा
चांदूरबाजार (जि. अमरावती) - नागपूर-भुसावळ लोहमार्गावरील माना (जि. अकोला) या रेल्वेस्थानकामध्ये पुरेसे पिण्याचे पाणी नाही. भर उन्हाळ्यात प्रवाशांची पाण्यासाठी होत असलेली धावपळ पाहून येथील व्हॉलीबॉलपटूंनी एक निर्णय घेतला. स्वतःपैशातून थंड पाण्याच्या कॅन विकत घेऊन त्यातील पाणी स्थानकात थांबलेल्या रेल्वेगाडीतील प्रवाशांना निःशुल्क पाजणे सुरू केले. 

बडनेऱ्यापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या माना रेल्वेस्थानकामध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे. प्रवाशांना पिण्यासही पाणी मिळत नाही. त्यात उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांचा जीव तहानेने व्याकूळ होतो. मग तहान भागविण्यासाठी ते गाडीतून उतरून फलाटावर पाण्याचा शोध घेत फिरतात. यात गाडी सुटण्याच्या भीतीपोटी अनेकांची तारांबळ होते. हे रोजचे दृश्‍य येथील महंमद नतीक, म. असीम, रियाज उद्दीन, म. रिजवान, म. नतीक, म. सलीम, नवेद, म. ग्यासू म. शारुख या तरुणांच्या ध्यानात आले. त्यांना प्रवाशांची पाण्यासाठी होणारी धावपळ पाहवली नाही. ते दररोज पिण्याच्या पाण्याच्या कॅन विकत घेतात आणि रेल्वे प्रवाशांना थंड पाणी पाजतात. या युवकांना विचारणा केली, तेव्हा त्यांनी सांगितले की, आमची आठ ते दहा युवकांची व्हॉलीबॉल चमू आहे. आम्ही दररोज शर्यत लावायचो. यात 100 ते 200 रुपये खर्च व्हायचे. एकदिवस वडीलधाऱ्या मंडळींनी आम्हाला यापेक्षा वेगळा सामाजिक उपक्रम राबविण्याचा सल्ला दिला. तेव्हा सर्वांनी रेल्वेप्रवाशांना थंड पाणी पाजण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आम्ही 30 ते 40 कॅन पाणी दररोज विकत घेतो आणि ट्रॅक्‍टरद्वारे ते रेल्वेस्थानकात आणून प्रवाशांना मोफत पिण्याचे पाणी देतो. या उपक्रमासाठी आम्हाला दररोज 300 ते 400 रुपये खर्च येतो. पण, मनाला समाधान मिळणारे कार्य आपल्या हातून घडत असल्याचा आनंदही होतो.
==========================================
पाण्यावर कुणा एकाचा हक्क नाही - बापट
पुणे - पाण्यावर कुणा एकाचा हक्क नाही. पाणी हे राज्याचे आहे. पुण्याच्या पाण्यासाठी मी यापूर्वीही भांडलो आहे. पिण्याच्या पाण्याचे राजकारण न करता आंदोलने थांबवावीत, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी सांगितले.

खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूरला एक टीएमसी पाणी सोडण्याच्या पालकमंत्री बापट यांच्या निर्णयाला सर्व इतर पक्षीयांनी विरोध केला आहे. विरोधानंतरही बुधवारपासून कालव्यातून पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. बापट यांनी आज (गुरुवार) पाणी सोडण्याच्या निर्णयाबाबत पत्रकार परीषद घेत आपले म्हणणे स्पष्ट केले.

बापट म्हणाले की, खडकवासला धरणातून शहर जिल्हा यांना पाणी सोडतो. कालवा समितीने पाण्याचे नियोजन केले आहे. महापालिकेने खराडी जैकवेलला तातडीने मंजूरी दिल्याने एक टीएमसी पाणी शेतीला देता आले, तेवढे धरणातले पाणी वाचले. आता कालव्यावर 500 ते 600 पोलीस पाणी चोरी थांबविण्यासाठी नेमले आहेत. मोटारी बंद व्हाव्यात म्हणून लोडशेडिंग सुरु केले आहे. दौंड इंदापूरला फक्त पिण्यासाठीच पाणी सोडले आहे. बेकायदा बंधारे बंद केले आहेत. पुणे महापालिकेच्या वाट्याचा एक थेंब कमी होणार नाही. जूनमध्येच पाऊस पडेल असा अंदाज आहे. उसाला कुठेही पाणी दिले जात नाही. कालव्याची भगदाडे बंद करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
==========================================
छत्तीसगडमध्ये बस अपघातात 13 जणांचा मृत्यू
रायपूर - छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात बुधवारी रात्री पुलावरून खासगी प्रवासी बस कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. तर, 53 जण जखमी झाले आहेत.

रायपूरपासून 400 किमी अंतरावर असलेल्या दालधोवा घाटात पुलावरून कोरड्या नाल्यात ही बस कोसळली. रायपूरहून झारखंडमधील गाधवा येथे ही बस जात होती. रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. समोरून आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी आहेत. गंभीर जखमी असलेल्या 16 प्रवाशांना अंबिकापूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मृतांमध्ये सर्व पुरुषांचा समावेश आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी अपघातावर शोक व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासनाला जखमींना योग्य उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.
==========================================
युरोपात मिळाली शिवरायांची मूळ चित्रे
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांची सुमारे चारशे वर्षांपूर्वी काढलेली व आजवर देशाबाहेर असलेली दोन मूळ चित्रे भारतात आणण्याची महत्त्वाची कामगिरी पुण्यातील मालोजीराव जगदाळे या युवा अभियंत्याने केली आहे. गेली अनेक वर्षे युरोपात असणारी ही चित्रे मोठ्या खटाटोपीनंतर महाराष्ट्रापर्यंत कशी आणली, याची माहिती जगदाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

महाराजांची मूळ चित्रे म्हणून माहिती असतानाही ही दोन चित्रे त्यांच्या मूळ प्रतीच्या स्वरूपात आजवर भारतात उपलब्ध नव्हती. त्यातील एक चित्र हे काळ्या शाईत काढलेले असून, दुसरे चित्र रंगीत आहे. काळ्या शाईतील चित्र हे महाराजांच्या उपस्थितीत रेखाटण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे, तर रंगीत चित्र हे यापूर्वी कधीही भारतातील लोकांपर्यंत आलेले नव्हते. नेदरलॅंड आणि क्रोएशिया येथील हौशी संग्राहकांकडून मोठ्या प्रयत्नांनंतर ही चित्रं जगदाळे यांनी मिळविली. 

काळ्या शाईतील चित्र हे मार्गो एन फ्रॅंक वॅन लॅटम-वॅन डंगन या डच संग्राहकाकडून, तर रंगीत चित्र क्रोएशियातील लादिमीर मेडमोर या संग्रहकाकडून त्यांनी विकत घेतले आहे. 
==========================================
लाचखोरी तपासाच्या केंद्रस्थानी- पर्रीकर
नावे समोर आलेल्यांची चौकशी करण्याची संरक्षणमंत्री पर्रीकर यांची ग्वाही
नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीव्हीआयपी) हेलिकॉप्टर खरेदीच्या हजारो कोटी रुपयांच्या व्यवहारात ज्यांनी लाच घेतली ते कोण आहेत हे सारा देश जाणू इच्छितो, असे सांगतानाच संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ज्यांची ज्यांची नावे समोर आली आहेत त्या साऱ्यांचीच चौकशी होईल व सीबीआयने या तपासाला गती दिली आहे, असे राज्यसभेत स्पष्ट केले. 

या गैरव्यवहाराची चौकशी कालबद्ध व सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी ही विरोधकांची मागणी होती. त्यावर पर्रीकर यांनी सीबीआय चौकशी आधीच सुरू झाली असून, त्यात प्रगतीही झाली आहे. अशा स्थितीत न्यायालयाच्या देखरेखीची सूचना मान्य होण्यासारखी नाही, अशी भूमिका मांडली. संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी काँग्रेसने याआधी हीच मागणी फेटाळली होती व आता तो पक्ष दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप केला. या हेलिकॉप्टर व्यवहारात लाचखोरी व भ्रष्टाचार झालेला आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
==========================================

No comments: