Saturday, 21 May 2016

नमस्कार लाईव्ह २१-०५-२०१६ चे बातमीपत्र



===========================================

मुंबई विद्यापीठात इंजिनिअरिंग पेपर स्कॅमचा पर्दाफाश

मुंबई विद्यापीठात इंजिनिअरिंग पेपर स्कॅमचा पर्दाफाश
मुंबई: मुंबई पोलिसांनी मुंबई विद्यापीठातील इंजिनिअरिंग पेपर स्कॅमचा पर्दाफाश केला आहे. मुलांना पेपर सोडवण्यासाठी मदत करणाऱ्या 4 कारकून, 3 शिपाई आणि एका अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. 
बऱ्याच वेळेला विद्यार्थी इंजिनिअरिंगचे पेपर उत्तर येत नसल्याने कोरे सोडून देतात. अटक केलेले आरोपी विद्यापीठातले पेपर आपल्या घरी घेऊन जायचे आणि काही पैशांच्या मोबादल्यात कोऱ्या पेपरवर उत्तर लिहून विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी मदत करायचे. 
पण अखेर या प्रकरणाची कुणकुण लागताच मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
===========================================

'नीट' रद्द नाही, जे पी नड्डांनी ठणकावलं, सरकारी कॉलेजचे प्रवेश CET नुसार

'नीट' रद्द नाही, जे पी नड्डांनी ठणकावलं, सरकारी कॉलेजचे प्रवेश CET नुसार
मुंबई : ‘नीट’ परीक्षेवरुन सुरु झालेला गोंधळ थांबला असं वाटत असतानाच,  आता तो आणखी वाढणार हे स्पष्ट झालं आहे. कारण ‘केंद्र सरकारने यंदा ‘नीट’ रद्द केलेली नाही, गैरसमज करुन घेऊ नका’ असं स्पष्ट शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी, केंद्राने अध्यादेश काढून यंदा ‘नीट’ मधून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा दिल्याबद्दल केक कापून सेलिब्रेशन केलं. तसंच आम्ही पाठपुरावा केल्यामुळे केंद्राने दखल घेतल्याची टिमकी वाजवली. मात्र केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी सर्वांना तोंडावर पाडल्याचं चित्र आहे.
===========================================

CBSE बोर्डाचा निकाल एक तास अगोदर जाहीर, तुमचा निकाल इथे पाहा

CBSE बोर्डाचा निकाल एक तास अगोदर जाहीर, तुमचा निकाल इथे पाहा
नवी दिल्ली: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनचा (सीबीएसई) 12 वीचा निकाल आज वेळपूर्वी एक तास अगोदर म्हणजे 11 वाजताच जाहीर झाला आहे.   CBSE च्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.

कुठे पाहाल निकाल? :

सीबीएसईचे विद्यार्थी  www.results.nic.inwww.cbseresults.nic.in  आणि  www.cbse.in  या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात.

बारावीच्या (सीबीएसई) परीक्षेसाठी 10,67,900 परीक्षार्थी होते. एक मार्च ते 22 एप्रिल 2016 या कालावधीत सीबीएसईची परीक्षा पार पडली.

दरम्यान, मागील वर्षी सीबीएसईचा निकाल 82 टक्के लागला होता. त्यात 87 टक्के मुली, तर 77 टक्के मुलं उत्तीर्ण झाले होते.
===========================================

फेसबुकवर मधू शाहची फ्रेण्ड रिक्वेस्ट तुम्हालाही येऊ शकते

फेसबुकवर मधू शाहची फ्रेण्ड रिक्वेस्ट तुम्हालाही येऊ शकते
सोशल साईट्सच्या माध्यमातून एकाच वेळी अनेकांशी संपर्कात राहता येतं, मात्र या फायद्यांसोबतच अनेक धोकेही वारंवार समोर येत असतात. फेसबुकवरचे मित्र अनेक वेळा तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता असते. असाच एक प्रकार म्हणजे मधू शाह या नावाने एका महिलेच्या फेसबुक प्रोफाईलने घातलेला धुमाकूळ.
मुंबई : सोशल साईट्सच्या माध्यमातून एकाच वेळी अनेकांशी संपर्कात राहता येतं, मात्र या फायद्यांसोबतच अनेक धोकेही वारंवार समोर येत असतात. फेसबुकवरचे मित्र अनेक वेळा तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता असते. असाच एक प्रकार म्हणजे मधू शाह या नावाने एका महिलेच्या फेसबुक प्रोफाईलने घातलेला धुमाकूळ.
 
मधू शाह या नावाने एका महिलेची एक-दोन नव्हे तर तब्बल 27 हून अधिक फेसबुक अकाऊण्ट्स तयार करण्यात आली आहेत. धक्कादायक म्हणजे ज्या मधू शहाच्या नावाने ही अकाऊंट आहेत आणि रिक्वेस्ट्स पाठवल्या जात आहेत, ती मुळात अस्तित्वातच नाही. काही जणांनी फेक अकाऊंट्स सुरु करुन लोकांशी मैत्री करत त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे.
===========================================

आयसीसची भारताला धमकी, ठाण्यातून पळालेल्या तरुणाचा व्हिडिओ

आयसीसची भारताला धमकी, ठाण्यातून पळालेल्या तरुणाचा व्हिडिओ
मुंबई : जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या आयसिस या दहशतवादी संघटनेने आपला मोर्चा आता भारताकडे वळवला आहे. बाबरी मस्जिद, मुझफ्फरनगर दंगल यांचा सूड आम्ही घेऊ, अशी धमकी देणारा व्हिडिओ आयसिसनं प्रसारित केला आहे.
 
ठाण्यातून पळून जाऊन आयसिसमध्ये दाखल झालेला फहाद शेख या व्हिडीओत धमकी देताना दिसत आहे. 2014 साली फहाद शेख सीरियात गेला होता.


‘आम्ही परत येऊ, पण यावेळी हातात तलवार घेऊन. बाबरी मस्जिद, मुझफ्फरनगरच्या दंगली, गुजरात आणि काश्मीरमधील मुस्लीमांच्या हत्येचा बदला घेऊ’ आम्ही लवकरच भारतात येत असल्याची धमकी या व्हिडीओत देण्यात आली आहे.
 
गेल्या वर्षी रक्कामध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला ठाण्यातील मित्र शहीद तन्कीला त्याने श्रद्धांजली दिली आहे.
 
सुमारे 22 मिनिटांचा व्हिडिओ अरबी भाषेमध्ये आहे. प्रामुख्याने भारत आणि दक्षिण आशियाई राष्ट्रांना यातून इशारा देण्यात आला आहे.
===========================================

'व्हाईट हाऊस'बाहेर गोळीबार सुरु होता, ओबामा गोल्फ खेळत होते

'व्हाईट हाऊस'बाहेर गोळीबार सुरु होता, ओबामा गोल्फ खेळत होते
न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचं निवासस्थान असलेलं व्हाईट हाऊस आज गोळीबाराच्या थराराने हादरलं. एका तरुणाने गोळीबार करत ‘व्हाईट हाऊस’मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडत, त्याला जेरबंद केलं.

या थरारानंतर व्हाईट हाऊस तातडीने बंद करुन सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली.
अमेरिकी मीडियानुसार,” एक 20 वर्षीय तरुण व्हाईट हाऊसबाहेर मुख्य चेकपोस्टवर पोहोचला आणि त्याने गोळी झाडली. त्यानंतर ‘यूएस सिक्रेट सर्व्हिस’च्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, त्यात तो जखमी झाला.

गंभीर जखमी झालेल्या आरोपीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
===========================================

माझ्याकडे जगातली सर्वात मोठी बॅट, गेलचा महिला पत्रकाराशी रंगेलपणा

माझ्याकडे जगातली सर्वात मोठी बॅट, गेलचा महिला पत्रकाराशी रंगेलपणा
बंगळुरु : वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. महिला, सेक्स आणि समानता याविषयी खालच्या पातळीवर टिपण्णी केल्याने गेलवर टीकेची झोड उठली आहे.
 
द टाईम्स या ब्रिटीश वृत्तपत्राची महिला पत्रकार शार्लेट एडवर्ड्स यांच्याशी बोलताना गेलची भाषा घसरली. ‘माझ्याकडे जगातली सर्वात मोठी बॅट आहे. तुला वाटतं का तू ती उचलू शकशील? मला वाटतं ती धरायला तुला दोन हात लागतीलच.’ असा चहाटळपणा त्याने केला.
 
एडवर्ड यांनी गेलचे हा अश्लाघ्यपणा स्पष्ट करुन सांगितला आहे. ‘आतापर्यंत किती कृष्णवर्णीय पुरुष तुला मिळाले? तू कधी थ्रीसम केलं आहेस का? मी पैज लावून सांगतो तू केलं असशील. सांग ना’ असे अभद्र प्रश्न गेलने विचारल्याचं त्या सांगतात.
 
‘दहा हजार मुली माझ्यावर स्वतःला झोकून देतील. कारण मी गुड लूकिंग आहे’ असं गेल गर्विष्ठपणे म्हणतो. जानेवारी महिन्यातच महिला प्रेझेंटरशी केलेली सलगी त्याला महागात पडली होती. याबद्दल ख्रिस गेलला दंडही ठोठावण्यात आला होता.
===========================================

पोलार्ड, तुझं टीममध्ये सिलेक्शन कसं, सॅमीचा खोचक सवाल

पोलार्ड, तुझं टीममध्ये सिलेक्शन कसं, सॅमीचा खोचक सवाल
नवी दिल्ली : ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, डॅरेन सॅमी आणि आंद्रे रसेल या वेस्ट इंडीजच्या स्टार क्रिकेटर्सनी विंडीज क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीवर टीका केली आहे. सॅमीनं पोलार्डचं अभिनंदन करतानाच तुला संघात स्थान कसं मिळालं असा खोचक प्रश्न विचारला आहे.
 
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी तिरंगी मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ गुरुवारी जाहीर झाला. विंडीजच्या संघात गेल, ब्राव्हो आणि सॅमीचा समावेश नाही, पण कायरन पोलार्ड आणि सुनील नारायणला मात्र स्थान मिळालं आहे.
 
वेस्ट इंडीजच्या संघात स्थान मिळवायचं, तर जानेवारीत झालेल्या सुपर फिफ्टी या वेस्ट इंडीजच्या वन डे स्पर्धेत सहभागी होणं गरजेचं होतं. पण गेल, ब्राव्हो आणि सॅमी त्यादरम्यान ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगमध्ये खेळत होते. दुसरीकडे पोलार्ड दुखापतीमुळे सुपर फिफ्टीमध्ये खेळू शकला नाही तर सुनील नारायण अवैध गोलंदाजी शैलीमुळे एप्रिलपर्यंत निलंबित होता.
 
पोलार्ड फिट असता तर आमच्याप्रमाणेच तोही बिगबॅश लीगमध्ये खेळला असता, असं गेलनं नमूद केलं आहे. ब्राव्होनं तर निवड समितीचा करभार म्हणजे एक जोकच असल्याचं ट्विटरवर म्हटलं आहे.
===========================================

धर्मनिहाय लोकसंख्या जाहीर, देशात हिंदू-मुस्लिमांची संख्या किती?

धर्मनिहाय लोकसंख्या जाहीर, देशात हिंदू-मुस्लिमांची संख्या किती?
नवी दिल्लीधर्मावर आधारित 2011 साली झालेल्या जनगणनेचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. या आकडेवारीनुसार देशात हिंदूंची संख्या 79.8 टक्के तर हिंदू घरांची संख्या ही 81 टक्के इतकी आहे. म्हणजेच देशात सुमारे 20.24 कोटी हिंदू कुटुंब राहतात.

देशात मुस्लिम घरांची संख्या 12.5 टक्के तर लोकसंख्येच्या तुलनेत देशाच्या 14.23 टक्के मुस्लिम आहेत. म्हणजेच देशात 3.12 कोटी मुस्लिम कुटुंब राहतात.

धर्मनिहाय लोकसंख्या जाहीर करण्यावरुन याआधी बराच वाद झाला होता. हिंदूंची लोकसंख्या वेगानं कमी होत असल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता. मात्र गेल्या दहा वर्षात सर्वच धर्मात सरासरी समान वाढ झाली आहे.

जनगणनेनुसार देशात 24.88 कोटी कुटुंब आहेत. त्यामध्ये 20.24 कोटी हिंदू, 3.12 कोटी मुस्लिम, 63 लाख ईसाई,41 लाख शीख आणि 19 लाख जैन कुटुंबांचा समावेश आहे.
===========================================

केंद्रीय ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच विजेचा लपंडाव

केंद्रीय ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच विजेचा लपंडाव
नवी दिल्ली : ऊर्जा खात्याचा दोन वर्षांचा लेखाजोखा मांडण्यासाठी केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषद बोलावली, मात्र याचवेळी वीज गेल्याने त्यांची चांगलीच पंचायत झाली.
 
पियुष गोयल ऊर्जा खात्याची प्रगती सांगत असताना पत्रकार परिषदेतच तब्बल तीन वेळा बत्ती गुल झाली. अचानक ओढावलेल्या या परिस्थितीमुळे गोयल भांबावले, मात्र त्यांनी वेळ मारुन नेली. ‘बहुत काम करना बाकी है’ असा डायलॉग यावेळी गोयल यांनी मारला.
 
‘माझी बायको म्हणते, माझ्या प्रत्येक कार्यक्रमात एकदा तरी वीज गेलीच पाहिजे. यामुळे दररोज झोपण्यापूर्वी आपल्याला भरपूर काम करणं बाकी आहे, याची जाणीव होत राहील. म्हणूनच वीज गायब होते, की खरंच जाते, हे मला माहित नाही’ अशी खुमासदार प्रतिक्रिया त्यांनी दिली.
 
भारतातील प्रत्येक गावात वीज पोहचवण्यासाठी केंद्र सरकारनं संकल्प केला आहे, मात्र असं असताना ऊर्जामंत्र्यांनाच ‘बत्ती गुल’चा सामना करावा लागल्याने दबक्या आवाजात चर्चांना ऊत आला होता.
===========================================

1760 वेळा टीव्हीवर दिसणाऱ्या 'सूर्यवंशम'ला 17 वर्ष पूर्ण

1760 वेळा टीव्हीवर दिसणाऱ्या 'सूर्यवंशम'ला 17 वर्ष पूर्ण
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने #17YearsOfSooryavansham हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्डिंग असून बिग बी यांनीही आठवणी जागवल्या आहेत.
 
सूर्यवंशम हा सिनेमा 1999 मध्ये रिलीज झाला होता. वडिल भानुप्रताप यांच्या इच्छेविरोधात हिरा हा तरुण लग्न करतो. वडिलांच्या दृष्टीने नालायक असलेला हिरा नंतर वडिलांचं मन कसं जिंकतो, ही या सिनेमाची कथा. वडिल आणि मुलगा अशा दुहेरी भूमिकेत अमिताभ बच्चन दिसले होते.
 
1997 मध्ये रिलीज झालेल्या सूर्यवंशम याच नावाच्या तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. आजही हा सिनेमा अनेक जण पाहतात, अनेकांच्या काळजाला या सिनेमाने हात घातला आहे, अशा भावना बिग बींनी ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत.
===========================================

रेड कार्पेटवर ऐश्वर्याला सोडून गेला अभिषेक, दृश्यं कॅमेऱ्यात कैद

सरबजीतच्या प्रिमियरसाठी संपूर्ण बच्चन कुटुंब रेड कार्पेटवर अवतरलं होतं. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांना एकत्र टिपण्यासाठी फोटोग्राफर्सची एकच झुबंड उडाली होती.

बच्चन कुटुंबाचं फोटोसेशन झाल्यानंतर फोटोग्राफर्सनी अभिषेक आणि ऐश्वर्याला फोटोसाठी पोझ देण्याचा आग्रह धरला. अभिषेक बच्चन तयार तर झाला. मात्र, त्याच्या चेहऱ्यावरची भावमुद्रा बरंच काही सांगून गेली.

हसतमुख ऐश्वर्याच्या कमरेत हात घालून उभ्या असलेल्या अभिषेक बच्चनच्या चेहऱ्यावरची रेघही हलत नव्हती. ऐश्वर्या फोटोग्राफर्सना प्रतिसाद देत होती. मात्र, अभिषेक चेहऱ्यावर वैतागलेली भावमुद्रा घेऊन उभा होता.

आता तुम्ही फक्त ऐश्वर्याचे फोटो काढा, या अनुषंगाचे हातवारे करून अभिषेकनं फोटोग्राफर्सचा निरोप घेतला. अभिषेकच्या अशा जाण्यानं ऐश्वर्या देखील चांगलीच अपसेट झाली.

सध्या अभिषेकच्या करियरचा बॅड पॅच सुरू आहे. तर ऐश्वर्याकडे त्यामानानं बऱ्यापैकी प्रोजक्टस आहेत. त्यामुळं अभिषेक आणि ऐश्वर्याच्या आयुष्यात अभिमानच्या अंकाला तर सुरूवात झाली नाही ना? असा सवाल चाहत्यांना सतावतो आहे.
===========================================

पाळणा हलला, पण कोणाच्या घरात? विधानसभा निवडणूक निकालांवरून उद्धव ठाकरेंचा भाजपाला चिमटा


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २१ - आसाममधील दणदणीत यश आणि केरळ, तामिळनाडू,पश्चिम बंगाल आणि पाँडिचेरी या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या चांगल्या निकालामुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण असतानाच भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र हा निकाल म्हणजे भाजपाचे 'निर्भेळ' यश नसल्याचे म्हटले आहे. 'भाजपा प्रादेशिक पक्षाचा पराभव करू शकला नाही' अशी टीका कालच्या अग्रलेखात केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजही अग्रलेखातून या विजयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ' एक आसामात शतप्रतिशत (आसाम गणपरिषदेच्या सहकार्याने) सोडले तर उरलेल्या चार राज्यांत भाजप एक प्रतिशतही नाही.तरीही विजयाने भाजपात नवा उत्साह संचारला असेल तर चांगलेच आहे. प्रतीक्षेनंतर घरात पाळणा हलला की असे व्हायचेच! मात्र चार पाळणे दुसर्‍यांच्या घरातही हलले आहेत' असे सांगत उद्धव यांनी भाजपाला चिमटे काढले आहेत. 
===========================================

सीबीएसई १२वीचा निकाल जाहीर, मुलीच ठरल्या अव्वल


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. २१ - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, दिल्ली(सीबीएसई) मंडळामार्फत मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून गतवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. दिल्लीच्या सुकृती गुप्ताने ५०० पैकी ४९७ गुण मिळवत देशात प्रथन येण्याचा मान मिळवला आहे. 
    यावर्षी एकूण ८३.०५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८८.५८ टक्के विद्यार्थिनींना  व ७८.८५ टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळाले.
    १ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान झालेल्या या परीक्षेसाठी एकूण १० लाख ६७ हजार, ९०० विद्यार्थी बसले होते. विशेष म्हणजे गतवर्षीप्रमाणेच यंदाच्या निकालातही तिरूअनंतपुरम विभागाने बाजी मारली आहे. तिरूअनंतपुरम्चा निकाल सर्वाधिक म्हणजे ९७.६१ टक्के लागला आहे.
===========================================

दवाखान्यात नाव न नोंदवल्याने भर रस्त्यातच झाली महिलेची प्रसूती


  • महापालिका दवाखान्यातील कर्मचाऱ्यांची अनास्था
    ऑनलाइन लोकमत
    सोलापूर, दि. २१ -  प्रसूतीचा क्षण जवळ आला असतानाही केवळ नाव नोंदविले नाही म्हणून दवाखान्यात न घेतल्याने एका महिला दवाखान्यासमोरील रस्त्यावरच प्रसूत झाली. परिसरातील महिलांनी चादरी, साड्या आणून तिची प्रसूती केली. एखाद्या सिनेमातील प्रसंग वाटावा अशी घटना आज सकाळी महापालिकेच्या चन्नवाबाई चाकोते प्रसुतीगृहासमोर घडली.
    मड्डी वस्ती येथील एका गरोदर महिलेचे पोट दुखू लागल्याने तिच्या नातेवाईकाने चाकोते प्रसुतीगृहात दाखल करण्यासाठी नेले. त्या महिलेने पूर्वी नाव नोंदविले नव्हते. या एकाच तांत्रिक मुद्यावरून या प्रसुतीगृहातील परिचारिकांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला आणि तिला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. महिला काही क्षणात प्रसूत होईल, तुम्ही दाखल करून घ्या, अशी विनवणी महिलेच्या नातेवाईकाने केली. मात्र पैशाला चटावलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत, त्यांना तातडीने जाण्यास सांगितले. दुर्देवाने त्यावेळेस रिक्षाही उपलब्ध नव्हती. हा गोंधळ सुरु असतानाच ती महिला चालत रस्त्यावर आली आणि त्याच ठिकाणी तिची प्रसूती झाली. हा प्रकार पाहिल्यावर प्रसुतीगृहाच्या परिसरातील महिला धावत आल्या. त्यांनी घरातील साड्या, चादरी आणून त्या महिलेची प्रसुती केली.
===========================================

बाबरी, गुजरातचा बदला घेण्यास येऊ - 'इसिस'ची धमकी


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि.२१ - 'बाबरी मशीद आणि गुजरात, काश्मिर व मुझफ्फरनगरमध्ये मारल्या गेलेल्या मुस्लिमांचा बदला घेण्यासाठी हातात तलवार घेऊन आम्ही भारतात येऊ' अशी धमकी 'इसिस' (इस्लामिक स्टेट) या दहशतवादी संघटनेने एका व्हिडीओमार्फत दिली आहे. दोन वर्षांपूर्वी 'इसिस'मध्ये सामील होण्यासाठी भारतातून सीरियात गेलेल्या फवाद शेख या दहशतवाद्याचा चेहरा व्हिडीओ स्पष्ट दिसत असून त्याने भारताला धमकी दिली आहे.
    'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार,  'इसिस'तर्फे अरेबिक भाषेतील २२ मिनिटांचा हा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.या व्हिडीओमध्ये भारतातून इसिसमध्ये सहभागी झालेल्या काही जिहादी तरूणांचे चेहरे दिसत असून ठाण्यातील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असणारा फवाद शेखचाही त्यात समावेश आहे. इराक व सीरियामध्ये हिंसाचार करणा-या काही जिहादींची मुलाखत या व्हिडीओत दाखवण्यात आली असून त्यातूनच भारतात घातपात करण्याची धमकी दिली आहे. 
===========================================

उष्णतेच्या लाटेचे आणखी ९ बळी


  • पुणे/जळगाव/बुलढाणा : राज्यातील अतिउष्णतेच्या लाटेने शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही नऊ जणांचा बळी घेतला. विदर्भ, खान्देशातील होरपळ कायम असून, सर्वाधिक तापमान उपराजधानी नागपुरात ४५.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील २४ तास राज्याचे तापमान चढेच राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा सातत्याने चढाच आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून अतिउष्णतेची लाट आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वाधिक होरपळ विदर्भ, खान्देशवासीयांची होत आहे. या लाटेत बुधवारी आठ तर सगल दुसऱ्या दिवशी गुरुवारी १४ जणांचा बळी गेला. पाठोपाठ शुक्रवारी नऊ जणांचा बळी गेला. मृतांमध्ये सहा जण खान्देशातील तर तीन जण विदर्भातील आहेत. धुळे जिल्ह्यातील विकास माळी, मिलिंद चित्ते आणि जळगाव जिल्ह्यातील मनोज भादलीकर, सुनील शालिग्राम, वाणी येथील रवीकांत चौधरी आणि रघुनाथ बाविस्कर अशी खान्देशातील मृतांची नावे आहेत. अकोल्यात शिवहरी धाडसे (७०) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. बुलडाण्यातील कांद्याचे व्यापारी बशीरखान अब्दुल्लाखान पठान (६५) आणि मोताळा येथील सुभाष दोडे (६३) यांचाही उष्माघाताने बळी गेला.
===========================================

बिल्डरांची सुरक्षा घेतली परत


  • डिप्पी वांकाणी,
    मुंबई- बिल्डरांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर आणि संभाव्य धोक्याची समीक्षा केल्यानंतर मुंबई पोलिसांनी चाळीसपेक्षा अधिक बिल्डरांना पुरविलेली सुरक्षा काढून घेतली आहे. 'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार 'एचडीआयएल'चे वाधवा, लोढा समूहाच्या मंगलप्रभात लोढा यांची दोन मुले, तसेच लोखंडवाला, विनोद गोएंका आणि डी.बी. रिअल्टीचे शाहीद बलवा यांचा या यादीत समावेश आहे. या बिल्डरांना सरकारकडून नॉन कॅटेगरीतून पुरविलेल्या सुरक्षेसाठी दरमहा प्रति बिल्डर एक लाख रुपये खर्च येत आहे. अर्थात ज्या बिल्डरांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे, त्यात प्रामुख्याने मंगलप्रभात लोढा आणि नुस्ली वाडिया यांचा समावेश आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या एका समितीने बिल्डरांच्या सुरक्षेचा हा आढावा मार्चमध्ये घेतला. सुरक्षा काढण्यात आलेल्यांमध्ये राकेश, धीरज, कपिल आणि सारंग वाधवा हे एचडीआयएल समूहाचे सदस्य आहेत. अभिषेक आणि अभिनंदन लोढा यांचीही सुरक्षा काढण्यात आली. ज्या चाळीस बिल्डरांची सुरक्षा काढून घेण्याचे ठरले, त्यात गौरव पोरवाल, युनिटी एन्फ्राचे अवरसेकर, गुलाम रस्सीवाला, पिरामल, कांचवाला समूह, सूरज मुचाला, युसूफ शेख, गणेश गुप्ता आणि सेठी समूहाच्या मालक आहेत. मुंबई पोलिसांकडून यापूर्वी तीन डझन कलाकारांना सुरक्षा होती. ही संख्या १५ वर आली आहे.
===========================================

इफेड्रिनपासून ब्राऊन शुगर बनवल्याचा संशय


  • ठाणे : इफेड्रिनप्रकरणी ठाणे पोलिसांनी मुंबई, कलिना न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या सुमारे १०१ नमुन्यांपैकी ४३ नमुन्यांच्या अहवालात ते अमलीपदार्थ असल्याचे समोर आले आहे. त्याची तीव्रता ८० ते ९९ टक्के असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी दिली. यापासून ब्राऊन शुगर, हेरॉइन, कोकेन आदी ड्रग्ज तयार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
    सोलापूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीत ठाणे पोलिसांनी छापा टाकून २ हजार कोटींचे इफेड्रिन पकडल्यावर हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. पोलिसांनी हस्तगत केलेल्या इफेड्रिनचे नमुने कलिना येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचा अहवाल ठाणे पोलिसांना नुकताच मिळाला आहे. इफेड्रिनच्या ४३ नमुन्यांमध्ये अमलीपदार्थांची तीव्रता ८० ते ९९ टक्के असल्याचे आढळले आहे. यावरून इफेड्रिनवर प्रक्रिया करून त्याद्वारे ब्राऊन शुगर, हेरॉइन, कोकेन आदी ड्रग्ज तयार केले जात असल्याचे पुढे आले आहे.
===========================================

मुंबईला जलप्रलयाचा धोका - संयुक्त राष्ट्रांचा अहवाल



    •  ऑनलाइन लोकमत, 
      अमेरिका, दि. 21- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणा-या व्हाइट हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करणा-या अज्ञात व्यक्तीला थोपवण्यासाठी गोळीबार करण्यात आला असून त्यात ती व्यक्ती जखमी झाली आहे. या घटनेनंतरर व्हाइट हाऊस तातडीनं बंद करून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 
      स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हाइट हाऊसच्या मुख्य भवनाजवळील चेकपोस्टवर एक सशस्त्र व्यक्ती उभे असल्याचे दिसत होते. अधिक-यांनी त्याला थांबण्याची सूचना केल्यानंतरही तो व्हाइट हाऊसच्या दिशेने पुढे सरकू लागल्यानंतर सुरक्षा अधिका-यांनी त्याला रोखण्यासाठई गोळीबार केला, ज्यामध्ये ती व्यक्ती जखमी झाल्याचे समजते.
      दरम्यान या घटनेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुदैवाने व्हाइट हाऊसमध्ये नव्हते. काही काळानंतर व्हाइट हाऊसचा कारभार पु्न्हा नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आला.
      गोळीबारा जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते. 
  • ऑनलाइन लोकमत
    संयुक्त राष्ट्रे, दि. 20 - जवळपास चार कोटी भारतीयांना समुद्राच्या वाढत्या पातळीचा धोका असून विशेषत: मुंबई व कोलकात्यावर सगळ्यात जास्त भीतीचे सावट असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2050 पर्यंत भारतातील समुद्रकिनाऱ्यानजीक राहणाऱ्या सुमारे 4 कोटी लोकांना पूराचा फटका बसू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्या शहरांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे, त्यांना जास्त धोका आहे.
    ग्लोबल एन्व्हायर्नमेंट आउटलुकच्या अंदाजानुसार पॅसिफिक आणि आशियामधील देशांना वातावरणातील बदलांमुळे सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे. 2050 पर्यंत समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे सगळ्यात जास्त 10 शहरांचे नुकसान होणार असून त्यातली 6 शहरे आशिया पॅसिफिकमध्ये येतात.
===========================================

अमेरिकेत व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार, १ जखमी


  •  ऑनलाइन लोकमत, 
    अमेरिका, दि. 21- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणा-या व्हाइट हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करणा-या अज्ञात व्यक्तीला थोपवण्यासाठी गोळीबार करण्यात आला असून त्यात ती व्यक्ती जखमी झाली आहे. या घटनेनंतरर व्हाइट हाऊस तातडीनं बंद करून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 
    स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हाइट हाऊसच्या मुख्य भवनाजवळील चेकपोस्टवर एक सशस्त्र व्यक्ती उभे असल्याचे दिसत होते. अधिक-यांनी त्याला थांबण्याची सूचना केल्यानंतरही तो व्हाइट हाऊसच्या दिशेने पुढे सरकू लागल्यानंतर सुरक्षा अधिका-यांनी त्याला रोखण्यासाठई गोळीबार केला, ज्यामध्ये ती व्यक्ती जखमी झाल्याचे समजते.
    दरम्यान या घटनेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सुदैवाने व्हाइट हाऊसमध्ये नव्हते. काही काळानंतर व्हाइट हाऊसचा कारभार पु्न्हा नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आला.
    गोळीबारा जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते. 
===========================================

‘लख्वीवर मुंबई हल्ल्याचा आरोप ठेवा’


  • लाहोर : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधार व लष्कर-ए-तोयबाचे हस्तक कमांडर झकी-उर-रहमान लखवीसह इतर ६ जणांविरुद्ध १६६ लोकांच्या मृत्यूप्रकरणी हल्ल्यांना चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात येणार आहे. पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयाने हा आदेश दिला. मुंबईवरील या हल्ल्यात १६६ जण मरण पावले होते. त्यात अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता. या प्रकरणी प्रत्येक आरोपीवर हे आरोप निश्चित केले जाणार आहेत, असे न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देऊन एका ज्येष्ठ न्यायालयीन अधिकाºयाने सांगितले. मात्र न्यायालयाने या सात संशयितांची उलटतपासणी घेण्यास परवानगी दिलेली नाही. या सर्वांवर ठेवण्यात आलेल्या आरोपात सुधारणा करावी आणि प्रत्येक आरोपीवर हल्ल्यांना चिथावणी दिल्याचा आरोप ठेवावा, अशी मागणी करणारी याचिका सरकारी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी दहशतवादविरोधी न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींवर हत्येला चिथावणी दिल्याचा आरोप व्यक्तिश: ठेवावा की नाही यावरून सरकारी आणि बचाव पक्षांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता.
    >मुंबईवर झालेल्या या हल्ल्यात १६६ जण ठार आणि अन्य ३०० जण जखमी झाले होते. मृतांत ६ अमेरिकी नागरिकांचा समावेश होता. गेल्या सात दिवसांत या प्रकरणी एकही सुनावणी झाली नाही. आता पुढील सुनावणी २५ मे रोजी ठेवण्यात आली आहे.
===========================================

अमेरिकेत पाकिस्तानविरोधी विधेयक मंजूर


  • वॉशिंग्टन : व्हाइट हाउसचा आक्षेप धुडकावून रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या अमेरिकी प्रतिनिधी सभेने पाकिस्तानविरोधी ‘राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण विधेयक’ (एनडीएए) संमत केले. हक्कानी नेटवर्कविरुद्ध कारवाई करण्यात अपयश आल्यास पाकला मिळणारी ४५ कोटी डॉलरची मदत रोखण्याची तरतूद या विधेयकात आहे.
    अमेरिकी प्रतिनिधी सभेने बुधवारी रात्री १४७ विरुद्ध २७७ मतांनी ‘एनडीएए’-२0१७ (एचआर ४९0९) पारित केले. त्यात तीन प्रमुख दुरुस्त्याही सामील करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे अमेरिकी खासदारांची पाकिस्तानविरोधी भावना ध्वनित होते. प्रतिनिधी सभेत मंजूर झालेल्या विधेयकानुसार मदत म्हणून पाकिस्तानला ४५ कोटी डॉलरची रक्कम जारी करण्यापूर्वी पाकिस्तानने अटींचे पालन केल्याचे प्रमाणपत्र ओबामा प्र्रशासनाने द्यावे लागेल.
    ‘पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कच्या वरिष्ठ नेत्यांवर आणि मध्यम स्तरावरील टोळ्यांना पकडून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात प्रगती दाखविली आहे,’ ही ती मुख्य अट आहे. खासदार डाना रोहराबाथर यांच्या दुरुस्तीत आणखी एक अतिरिक्त आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. ओबामा यांनी त्यावर स्वाक्षरी केल्यानंतरच त्याचे रूपांतर कायद्यात होईल. याच आठवड्यात व्हाइट हाउसने विधेयकातील तरतुदींवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
===========================================

२६/११ दहशतवादी हल्ला : लख्वीसह ६ आरोपींवर चालणार खटला


  • ऑनलाइन लोकमत
    इस्लामाबाद, दि. २०  - मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वीलह ६ आरोपींवर पाकिस्तान कोर्टात  खटला टालणार आहे. याची मंजूरी पाकिस्तान कोर्टाने आज दिली आहे. १६६ सामान्य नागरिकांच्या हत्या करण्यास उसकावल्याचा आरोप त्याच्यावर आहे. २५ मे रोजी या खटल्याची पुढील सुनावणी होणार आहे. 
     यापुर्वी, १३ मार्च २०१५ रोजी लख्वी विरोधात ठोस पुरवे नसल्यामुळे लख्वीची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत इस्लामाबाद कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता व लख्वीची तत्काळ सुटका करण्याचे आदेश ही न्यायालयाने होते. लख्वी हा फेब्रुवारी २००९ पासून तुरूंगात होता.  
     
    मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जण मृत्युमखी पडले होते, तर शेकडो जण गंभीर जखमी झाले होते.
===========================================
टिम कुक यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली - अॅपलचे मुख्य कार्यकारी आधिकारी (सीईओ) टिम कुक यांच्या हस्ते आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोबाईल अॅपचे अपडेटेड व्हर्जन सादर करण्यात आले. 

भारत दौऱ्यावर असलेल्या टिम कुक यांनी आज नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. ट्विटरवर कुक यांच्यासोबत काढलेला फोटो शेअर करत मोदी म्हणाले, "धन्यवाद @टिम_कुक! तुमचे मत आणि प्रयत्न समृद्ध करणारे आहेत".

मोदींची भेट हा विक्रीतील वाढ करण्याच्या उद्देशाने कुक यांच्या आशिया दौऱ्याचा एक भाग आहे.  मागील वर्षी भारतात एक कोटी मोबाईलची विक्री होऊनही अॅपलचा त्यामध्ये दोन टक्के इतकाच वाटा आहे. अॅपलचा विकास व जागतिक खप कमी झाला आहे व तो सुधारण्याच्या हेतूने कुक भारतात आल्याचे म्हटले जात आहे. बुधवारी कुक भारतात आल्यानंतर त्यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली होती. तसेच त्यांनी रिलायन्स उद्योगाचे अध्यक्ष मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानींचीही भेट घेतली होती. 
===========================================
'धग' चित्रपटाचे निर्माते गवारे यांचे निधन

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘धग‘ मराठी चित्रपटाचे निर्माते विशाल गवारे (वय 38) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल गवारे यांचा अंत्यविधी आज (शनिवार) सायंकाळी चार वाजता वरखेडे (ता. चाळीसगाव) या गावी करण्यात येणार आहे. गवारे यांच्या आजीचे चार दिवसांपूर्वी निधन झाले होते, त्यासाठी ते आपल्या कुटुंबियांसह चाळीसगावला आले होते. रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

===========================================
दिल्लीत परदेशी युवकाची अमानुष हत्या

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत शुक्रवारी मध्यरात्री एका परदेशी युवकाची रस्त्याने पळवून पळवून मारहाण करत अमानुषपणे हत्ये केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिका खंडातील किंगडम ऑफ कोंगो या देशाचा नागरिक असलेल्या ऑलिवा याचे वसंत कुंज भागातील एका गटाशी वाद झाले. त्यानंतर या गटाने त्याला रस्त्याने पळवून पळवून मारहाण केली. त्यानंतर त्याला दगडाने ठेचण्यात आले. जखमी अवस्थेत असलेल्या ऑलिवला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

ऑलिव या भागात काही कामासाठी आला होता. त्याची स्थानिक 3-4 युवकांशी वाद झाला. त्यानंतर या युवकांनी त्याला सुमारे 20 मीटर रस्त्याने पळवत मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे.
===========================================
छत्तीसगडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार

विजापुर - छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात आज (शनिवार) पहाटे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. 

सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजापूर जिल्ह्यातील कोट्टर-केरेनारजवळील जंगलात पहाटे अडीचच्या सुमारास ही चकमक झाली. गंगलूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी, सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियनच्या जवानांनी संयुक्तरित्या मोहिम राबवत दोन नक्षलवाद्यांना ठार केले. यामध्ये एका महिला नक्षलवादीचाही समावेश आहे.

सध्या परिसरात शोध मोहिम सुरू असून घटनास्थळावरून दोन रायफल व एक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. या चकमकीत एकही जवान जखमी झालेला नाही.
===========================================
उत्तराखंडमध्ये भाजप खासदार दगडफेकीत जखमी

डेहराडून - उत्तराखंडमधील चकराता येथील मंदिरात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार तरुण विजय यांच्यावर जमावाकडून झालेल्या दगडफेकीत ते जखमी झाले आहेत.

चकराता येथील पुनाह-पोखरी गावातील सिलगुर देवता मंदिरात शुक्रवारी ही घटना घडली. दलितांचा छळ आणि मंदिरात त्यांना प्रवेश नाकारण्याच्या विरोधात तरुण विजय यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन यात्रा काढण्यात आली होती. या आंदोलनावेळी त्यांच्यावर सुमारे 2 हजार नागरिकांच्या जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत विजय यांच्यासह बसप नेते दौलत कुंवर हेही जखमी झाले आहेत. विजय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यात त्यांचे काही समर्थकही जखमी झाले आहेत. विजय आणि अन्य जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डेहराडून पोलिस अधीक्षक टी. डी. वालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दलितांना या मंदिरात प्रवेश देण्यात येत नव्हता. यावरून करण्यात आलेल्या आंदोलनावेळी ही घटना घडली आहे. या प्रकाराबाबत सविस्तर माहिती घेण्यात येत आहे. लवकरच दोषींना अटक करण्यात येईल.
===========================================
मॉन्सूनच्या प्रगतीस अनुकूल स्थिती

पुणे - बंगालच्या उपसागरातील रोअनु चक्रीवादळाने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) बंगालच्या उपसागरावरील शाखेला चालना दिली आहे. बंगालचा उपसागर आणि अंदमान बेटांचा उर्वरित भाग; तसेच अग्नेय बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग मॉन्सूनने शुक्रवारी व्यापला. रविवारपर्यंत (ता. 22) बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

मॉन्सूनने बुधवारी निकोबार आणि दक्षिण अंदमान बेटांवर धडक दिल्यानंतर दोनच दिवसांत आणखी प्रगती केली आहे. बंगालच्या उपसागरातील रोअनु चक्रीवादळ बांगलादेशातील चिटगावपासून नैर्ऋत्यकडे बंगालच्या उपसागरात घोंगावत होते. हे वादळ ताशी 25 किलोमीटर वेगाने ईशान्यकडे सरकत असून, शुक्रवारी रात्री त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्‍यता आहे.
पुढील चोवीस तासांमध्ये चक्रीवादळ दक्षिण बांगलादेशाच्या खेपुपारा आणि कॉक्‍स बाजार किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यालगत सुमारे प्रतितास 90 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
===========================================
आगामी काळात आश्‍वासनपूर्ततेवर भर- जावडेकर

पुणे - पारदर्शक कारभार आणि राज्य सरकारे व जनतेचा सहभाग हे केंद्र सरकारचे दोन वर्षांचे फलित असल्याचे केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. आगामी काळात जनतेला दिलेल्या आश्‍वासनांच्या पूर्ततेवर सरकारचा सर्वाधिक भर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जावडेकर यांनी शुक्रवारी "सकाळ‘ कार्यालयाला भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. नुकत्याच झालेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे विश्‍लेषण, उत्तराखंड प्रकरणात न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेली चपराक, राज्य सरकारचा कारभार, शिवसेनेसोबतची युती, पर्यावरण मंत्रालयाचा कारभार, न्यायालयाची सक्रियता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती आदी विविध विषयांवर जावडेकर यांनी स्पष्ट मते व्यक्त केली. यूपीए सरकारच्या काळात कोळसा गैरव्यवहार, स्पेक्‍ट्रम गैरव्यवहार अशा प्रकारचे केवळ गैरव्यवहार घडत होते; परंतु मोदी सरकारने लिलावाच्या माध्यमातून पारदर्शक कारभार केल्यामुळे खाणींचे परवाने, स्पेक्‍ट्रमच्या लिलावातून कोट्यवधी रुपयांचा महसूल तिजोरीत जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. 
===========================================
"मुठे'साठी महिन्यातील एक दिवस

पुणे - "सकाळ माध्यम समूहा‘च्या मुठा नदीसंवर्धन मोहिमेतील उपक्रमासाठी महिन्यातील एक दिवस आपण देणार आहोत, असा संकल्प पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज केला. तसेच जलसंवर्धनासाठी बंधारे बांधण्याबरोबरच नदीत येणाऱ्या कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यापर्यंतच्या अनेक बाबींविषयी जिल्हाधिकारी; तसेच इतर शासकीय अधिकारी, तज्ज्ञांची बैठक आयोजित करण्यात येईल आणि "सकाळ‘च्या मुठा नदी परिक्रमेतील निष्कर्षांबाबतही त्यात चर्चा होईल, असेही त्यांनी जाहीर केले. 

""मुठाई म्हणजे मुठा आई. आज आईची दुरवस्था झालेली असताना आपण चांगल्या अवस्थेत आहोत, ही तर ती आईशी केलेली प्रतारणाच आहे. आपण कोणीही आईशी प्रतारणा करणार नाही, अशी जिद्द मनात असेल, तर बदल निश्‍चित घडू शकतो,‘‘ असा आशावाद बापट यांनी व्यक्त केला. 

"मुठे‘ला पुनर्जीवित करण्यासाठी "सकाळ‘च्या वतीने मोहीम हाती घेण्यात येत आहे. तिची सुरवात शुक्रवारी "मुठा नदी परिक्रमे‘ने झाली. या दोनदिवसीय परिक्रमेचा प्रारंभ मुठेच्या मूळ उगमानजीक असलेल्या निरगुडवाडी गावाजवळील पात्रातील जलपूजेने करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. 
===========================================

No comments: