Saturday, 7 May 2016

नमस्कार लाईव्ह ०७-०५-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- कॅनडामधल्या आगीमुळे लाखो नागरिक विस्थापित 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- सोनिया गांधींना तात्काळ अटक करा : अरविंद केजरीवाल
३- उजैन; 9 नोव्हेंबर रोजी राममंदीराचं निर्माण सुरू करणार - धर्म संसद
४- औद्योगिक घराण्यांकडे थकले बँकांचे ५ लाख कोटी 
५- दर वर्षी कर्करोग घेतोय पाच लाख लोकांचा बळी 
६- भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी हाजीअली सबके लिये या फोरमचा पाठिंबा काढून घेतल्याचे वृत्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- फडणवीसांची मोदींकडे 10 हजार कोटींची मागणी 
८- फुटबॉलपटूचा मैदानातच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू 
९- अखिलेश यादवांनी मागितली 10,600 कोटींची मदत 
१०- पाणीमाफिया, टँकरमाफियांना राजाश्रय देऊ नये, आशिष शेलार यांची मित्रपक्षाला विनंती. 
११- नागपूर : रेल्वे कर्मचा-यांनी लातूरला पाठविले 15 हजार लिटर पिण्याचे पाणी. 
१२- बिनकामाच्या पदव्या देणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या जाळ्यात अडकू नका- रघुराम राजन 
१३- कर्जमाफीचा फायदा बँकांनाच, हा मुख्यमंत्र्यांचा जावईशोध - अजित पवार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- नागपूर; हातातून पाण्याचा पेला पडल्याने चिमुकल्याची हत्या, बापाला अटक 
१४- सोलापूर; विवाहित डॉक्टरचं प्रेमप्रकरण, पत्नीची हत्या, 4 डॉक्टरांवर गुन्हा 
१५- कोलकाता; जाधवपूर विद्यापीठात अभाविप व डाव्यांत जुंपली 
१६- सोलापूर - खासदार असाऊद्दीन ओवेसी सोलापूरात दाखल. 
१७- नांदेडसह वाशिममध्ये पावसाची हजेरी. 
१८- नांदेडला फटाके वाजवून करण्यात आलं पावसाचं स्वागत.
१९- अकोला: रुग्णवाहिकेला वाहनाने दिलेल्या घडकेत महिला रुग्ण ठार, एक जखमी 
२०- सोलापूर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपाचे नगरसेवक नरेंद्र काळे याची निवड. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- गायक, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो बाईक अपघातात जखमी 
२२- कॅप्टन अमेरिकाने भारतात मारली बाजी, पहिल्याच दिवशी 8.53 कोटींचा गल्ला 
२३- आज आहे जागतिक नग्न बागकाम दिवस 
२४- भारतीय महिला हॉकी संघाचा इंग्लंडकडून सलग तिसरा पराभव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आपण अशा ठिकाणी पोहचले पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी काम केले पाहिजे
(रमेश तालीमकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

=================================================

सोनिया गांधींना तात्काळ अटक करा : अरविंद केजरीवाल

सोनिया गांधींना तात्काळ अटक करा : अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात भाजप आणि काँग्रेसची हातमिळवणी झाल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीत आज याप्रकरणी आम आदमी पक्षानं जोरदार निदर्शनं केली. त्यानंतर जंतर-मंतरवर झालेल्या सभेवेळी त्यांनी भाजप-काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीप्रकरणी गप्प आहे आणि भाजप ऑगस्टा प्रकरणात सोनियांवर कारवाई करत नाही, असा आरोप करत सोनियांना तात्काळ अटक करा, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.

यूपीए-1 च्या काळात भारतानं इटलीकडून हेलिकॉप्टर खरेदी केली होती. मात्र, या व्यवहारात लाच दिली गेल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी इटलीच्या न्यायालयानं दिला. निकालात न्यायालयानं सोनिया गांधी, मनमोहन सिंह यांचादेखील उल्लेख केला. त्यामुळे हे प्रकरण सध्या चांगलचं गाजतं आहे.

=================================================

फुटबॉलपटूचा मैदानातच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

फुटबॉलपटूचा मैदानातच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
मुंबई : कॅमेरुनचा फुटबॉलपटू पॅट्रिक एकेन्गचा अचानक मृत्यू झाल्यानं फुटबॉलविश्वावर शोककळा पसरली आहे. फुटबॉलच्या मैदानावरच हृदयविकाराच्या झटक्यानं एकेन्गची प्राणज्योत मालवली.

26 वर्षीय पॅट्रिक एकेन्ग रोमानियाच्या डायनामो बुकारेस्ट क्लबचं प्रतिनिधित्व करायचा. शुक्रवारी डायनामो आणि व्हिटोरुल कॉन्सटन्टा संघांमधल्या सामन्याच्या उत्तरार्धात पॅट्रिक 63 व्या मिनिटाला मैदानात उतरला. पण सातच मिनिटांनी तो मैदानातच कोसळला.

पॅट्रिकला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दीड तासाने डॉक्टरांनी पॅट्रिकला मृत घोषित केलं. पॅट्रिकचा मृत्यूने रोमानिया आणि कॅमेरुनसह जगभरातल्या फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

=================================================

हातातून पाण्याचा पेला पडल्याने चिमुकल्याची हत्या, बापाला अटक

हातातून पाण्याचा पेला पडल्याने चिमुकल्याची हत्या, बापाला अटक
नागपूर: मुलाच्या हातातून पेलाभर पाणी जमिनीवर सांडलं, या रागातून पित्यानं केलेल्या मारहाणीत तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नागपूरच्या इंदिरानगर भागात ही घटना घडली.

धक्कादायक म्हणजे, मुलाची हत्या करून, तो अपघात असल्याचा बनाव आरोपी वडील धर्मेंद डोंगरेने केला. मुलाची मृत्यू पाण्याच्या टाकीत पडून झाल्याचा त्याचा दावा पोस्टमॉर्टम अहवालात उघडा पडला.

याप्रकरणी आरोपी धर्मेंद्र डोंगरे याला अटक करण्यात आली आहे.

=================================================

गायक, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो बाईक अपघातात जखमी

गायक, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो बाईक अपघातात जखमी
नवी दिल्ली : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो बाईक अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जाताना सुब्रतो पार्कजवळ सुप्रियो अपघातग्रस्त झाले.

बाबुल सुप्रियो यांच्या प्रकृतीचा धोका टळल्याची माहिती त्यांच्या पीएने दिली आहे. सुप्रियो हे केंद्रात नगरविकास, गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन राज्यमंत्री आहेत.

बाबुल सुप्रियो त्यांच्या मुलीला घेण्यासाठी विमानतळावर चालले होते. मुलीला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी सुप्रियो यांनी स्वतःच बाईक चालवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ते स्वतःची रॉयल एन्फिल्ड घेऊन निघाले.

ड्रायव्हर त्यांची गाडी बाईकमागोमाग घेऊन येत होता. बाईक चालवताना अचानक सुप्रियो यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. मागून येणाऱ्या गाडीने जोराने ब्रेक दाबले, मात्र बाबुल सुप्रियो यांना थोडीशी धडक बसली.

बाबुल सुप्रियो यांच्या कोपराला दुखापत झाली असून त्यांच्या ‘एम्स’मध्ये उपचार करण्यात आले.

=================================================

विवाहित डॉक्टरचं प्रेमप्रकरण, पत्नीची हत्या, 4 डॉक्टरांवर गुन्हा

विवाहित डॉक्टरचं प्रेमप्रकरण, पत्नीची हत्या, 4 डॉक्टरांवर गुन्हा
डॉ. एस प्रभाकर यांचे गंगामाई हॉस्पिटल, सोलापूर
सोलापूर: एका हायप्रोफाईल खून खटल्याचा तपास लावण्यात सोलापूर शहर पोलिसांना यश आलं आहे. अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या महिला डॉक्टरचा खुद्द डॉक्टर पतीनेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी मारेकरी डॉक्टरच्या  प्रेयसीसह चार प्रतिथयश डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी  हा क्लिष्ट खून खटला उघडकीस आणला. दहा महिन्यापूर्वी घडलेल्या या हायप्रोफाईल खुनाचा कसा लागला तपास ?

हायप्रोफाईल खुनाचा कसा लागला तपास ?
सोलापुरातील नामवंत डॉक्टर एस. प्रभाकर याचं गंगामाई हॉस्पिटल. सध्या हे सुसज्ज रुग्णालय पोलिसांच्या रडारवर आहे. याच रुग्णालयात कार्यरत असणारा मेंदूरोग तज्ञ डॉ. प्रसन्ना अग्रहार याचा पोलीस शोध घेत आहेत. डॉक्टर प्रसन्नवर आपल्याच डॉक्टर असलेल्या पत्नीचा खून केल्याचा आरोप आहे. गंगामाई हॉस्पिटलच्या अन्य तीन डॉक्टरांना सुद्धा या खून खटल्यात आरोपी बनवण्यात आलं आहे. सर्वांनी मिळून डॉक्टर रश्मी अग्रहार हिच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

९ जुलै २०१५ रोजी खून
९ जुलै २०१५ रोजी राहत्या घरी रश्मीचा खून झाला. पण डॉ. प्रसन्ना यांनी पत्नीला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगून त्यांच्याच रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी ना पोलिसांना खबर दिली, ना शवविच्छेदन केलं. प्रसन्न यांनी स्वतः मृत्यू प्रमाणपत्र तयार करून अंत्यविधी उरकला.


=================================================

फडणवीसांची मोदींकडे 10 हजार कोटींची मागणी

फडणवीसांची मोदींकडे 10 हजार कोटींची मागणी
नवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थितीमांडली. दुष्काळाबाबत पंतप्रधानांसोबत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्रानं केंद्रकडे १० हजार कोटींची मागणी केली आहे. त्यासाठी केंद्र सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीदरम्यानचा तपशील मांडला.

10 हजार कोटींची मागणी

केंद्रानं राज्याच्या अनेक मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दर्शवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मराठवाडा-विदर्भ यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. त्यासाठी महाराष्ट्रानं केंद्रकडे 10 हजार कोटींची मागणी केली आहे. त्यासाठी केंद्र सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

=================================================

9 नोव्हेंबर रोजी राममंदीराचं निर्माण सुरू करणार - धर्म संसद


  • ऑनलाइन लोकमत
    उज्जैन, दि. 7 - येत्या 9 नोव्हेंबर रोजी अयोध्येमध्ये राम मंदीराच्या उभारणीचे काम सुरू करण्याचा निर्णय धर्म संसदेने घेतला आहे. उज्जैनमध्ये सिंहस्थादरम्यान धर्म संसद आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. रामलला परीसरामध्ये सिंहद्वारापासून राम मंदीराच्या बांधकामास सुरुवात होईल असे वृत्त आजतकने दिले आहे.
    9 नोव्हेंबर 2016 रोजी कार्तिक अक्षय नवमी असून त्यादिवशीच मंदीर निर्माणाचा आरंभ करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय अशावेळी घेण्यात आला आहे की, एकीकडे राज्यसभेमध्ये सुब्रमण्यम स्वामींनी नुकताच हा प्रश्न उपस्थित केला होता, आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेचे वारे लवकरच वाहू लागणार आहेत.
    राम मंदीराच्या निर्मितीमध्ये सरकारचा काही संबंध नसून जनतेच्या सहकार्याने मंदीर निर्माण करण्यात येईल असा दावा धर्म संसदेमध्ये करण्यात आला आहे. धर्म संसदेमध्ये संत आत्मानंद, शाश्वतानंद, नरेंद्रानंद, सुदर्शन महाराज, श्रीमहंत अवध किशोर दास, चंद्रदेव दास यांच्यासह मोठ्या संख्येने संत व भक्तगण उपस्थित होते. 
    श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माण न्यास अयोध्याचे अध्यक्ष महंत जन्मेजय शरण महाराज यांनी सांगितले की, विवादित रामजन्मभूमीची 77 एकर जागा निर्मोही आखाड्याची आहे. मंदीर निर्माण व जमिनीसाठी आखाडा लढाई लढत आहे आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मंदीर निर्माणची गोष्ट करण्यात येत आहे.
=================================================

कॅप्टन अमेरिकाने भारतात मारली बाजी, पहिल्याच दिवशी 8.53 कोटींचा गल्ला

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 7 - कॅप्टन अमेरिका सिविल वॉर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी 8.53 कोटी रुपयांचा गल्ला भारतामध्ये गोळा केला असून सगळ्यात जास्त ओपनिंग मिळवणाऱ्या चित्रपटांमध्ये चौथे स्थान मिळवले आहे. जगभरात या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून भारत अपवाद नसल्याचे दिसून आले आहे.
    बॅटमन वि सुपरमॅन या इंग्रजी चित्रपटासोबतच ट्रॅफिक व 1920 लंडन या दोन्ही हिंदी चित्रपटांनाही कॅप्टन अमेरिकाने दणका दिला आहे. 
    स्टीव्ह रॉजर्स आणि टोनी स्टार्क अधिकाऱ्यांकडे स्वत:चे अधिकार गहाण टाकण्याच्या मुद्यावरून समोरासमोर उभे ठाकतात असा या सिनेमाचा प्लॉट आहे. जगभरात या सिनेमाने 261.6 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे. अमेरिकेमध्ये सर्वाधिक ओपनिंग देण्याच्या बाबतीत सार्वकालिक पाचव्या क्रमांकावर हा सिनेमा असल्याचा अंदाज आहे. कॅप्टन अमेरिकाने ओपनिंगला अमेरिकेत 180 दशलक्ष डॉलर्सची कमाई केल्याचा अंदाज असून यापेक्षा जास्त कमाई ओपनिंगला केवळ स्टार वॉर्स: दी फोर्स अवेकन्स, जुरासिक वर्ल्ड, मार्व्हल्स दी अॅव्हेन्जर्स आणि अॅव्हेन्जर्स: एज ऑफ अल्ट्रॉन या चार चित्रपटांनी केली होती असे वृत्त आहे.
=================================================

आज आहे जागतिक नग्न बागकाम दिवस

  • आंतरराष्ट्रीय स्तरावर आजचा दिवस म्हणजे मे महिन्यातला पहिला शनिवार वर्ल्ड नेकेड गार्डनिंग डे किंवा जागितक नग्न बागकाम दिवस म्हणून साजरा केला जातो. निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिक अवस्थेत माणसानं रममाण व्हावं हा यामागचा मुख्य हेतू.
    न्यूड अँड नॅचरल मॅगझिनचे संपादक सल्लागार मार्क स्टोरी व पर्माकल्चरलिस्ट जेकब ग्रब्रिएल यांनी हा दिवस साजरा करण्यास प्रथम सुरुवात केली. हा दिवस म्हणजे एक गंमत असावी, माणसांनी मोकळं व्हावं आणि सगळ्यात म्हणजे यात काहीही राजकीय असू नये अशी अपेक्षा हा दिवस साजरा करणाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
    वर्ल्ड नेकेड बाइक राइडपासून प्रेरणा घेत स्टोरी व गॅब्रिएल यांना नग्न बागकाम दिवसाची कल्पना सुचली. आधी 10 सप्टेंबर 2005 रोजी प्रथम हा दिवस साजरा करण्यात आला, परंतु नंतर 2007 पासून मे महिन्याचा पहिला शनिवार निश्चित करण्यात आला, तेव्हापासून गेली 10 वर्षे आज हा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो.
    पोहणं वगळता, बागकाम हाच एक प्रकार असा आहे, ज्यामध्ये माणसं नैसर्गिकरीत्या कामाचा आनंद घेऊ शकतात असा काही जणांचा दावा आहे. निसर्ग हेच एक पुरेसं आवरण आहे ही देखील यामागची एक भावना असल्याचं सांगण्यात येतं.
    काहीजणांनी तर याची संगती अॅडम व ईव्ह बागेमध्ये नग्नावस्थेत होते इथपर्यंत याची संगती लावली आहे. आज जागतिक नग्न बागकाम दिवस असला तरी भारतामध्ये असं काही करण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो हे वाचकांनी ध्यानात ठेवलेलं बरं...
=================================================

औद्योगिक घराण्यांकडे थकले बँकांचे ५ लाख कोटी


  • नवी दिल्ली : देशातील औद्योगिक घराण्यांकडे सार्वजनिक बँकांचे पाच लाख कोटी रुपये कर्ज थकल्याचा दावा गुरुवारी राज्यसभेत जद (यू)च्या एका सदस्याने केला. विशेषत: अदाणी समूहावर अकल्पनीय कृपा करण्यात आली असून, या समूहाकडे ७२ हजार कोटी रुपये कर्ज थकले आहे, असेही हे सदस्य म्हणाले.
    शून्य प्रहरात जद (यू)चे पवन वर्मा यांनी हा प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, जे लोक घेतलेले कर्ज परत करीत नाहीत, त्यांना हे कर्ज देण्यासाठी सरकारी बँकांवर दडपण आणले जाते. औद्योगिक घराण्यांकडे असलेल्या पाच लाख कोटी कर्जापैकी १.४ लाख कोटी रुपये कर्ज केवळ पाच कंपन्यांकडे आहे. त्यात लेंको, जीबीके, सुजलॉन एनर्जी, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी आणि अदाणी समूहाच्या कंपनीवर ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.
    देशभरातील शेकऱ्यांवर जेवढे कर्ज आहे, तेवढे कर्ज एकट्या अदाणी समूहाकडे आहे. बुधवारीच सभागृहात शेतकऱ्यांकडे ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती देण्यात आली होती.
    पवन वर्मा म्हणाले की, सरकारचा या औद्योगिक घराण्यांशी काय संबंध आहे, याची मला माहिती नाही. सरकार आणि ही औद्योगिक घराणी परस्परांना ओळखतात काय हेही मला माहीत नाही. पंतप्रधानांच्या प्रत्येक विदेशी दौऱ्यात या समूहाचे मालक (गौतम) अदाणी सोबत दिसतात.
    वर्मा म्हणाले की, या कंपनीवर ‘अकल्पनीय’ कृपा झाल्याचे दिसते. गुजरात उच्च न्यायालयाने फटकारूनही या समूहाच्या ‘सेझ’ला परवानगी देण्यात आली आहे.
=================================================
दर वर्षी कर्करोग घेतोय पाच लाख लोकांचा बळी
नवी दिल्ली : गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे दर वर्षी देशातील पाच लाख लोक मरण पावत असून, याला तोंडाचा कर्करोग कारणीभूत ठरतो आहे. खुद्द आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनीच ही माहिती दिली. सर्वसाधारणपणे दर वर्षी 30 लाख लोक कर्करोगास बळी पडतात, त्यातील 10 लाख लोकांना झालेल्या आजाराचे निदान होते; पण पाच लाख लोक मरण पावत असल्याचे दिसून आले आहे. पुरुषांमधील तोंडाच्या आणि पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. महिलांमध्ये छाती, गर्भाशयांचे प्रमाण अधिक असल्याचेही नड्डा यांनी नमूद केले. 

कर्करोगाच्या समस्येचा सामना करण्यासाठी हरियानातील झाज्जर शहरात "नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट‘ची स्थापना केली जाणार असून यासाठी दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षांमध्ये या संस्थेच्या उभारणीचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. पश्‍चिम बंगाल मध्ये पाचशे कोटी रुपये खर्च करून "चित्तरंजन कर्करोग संस्था‘ उभारली जाणार असून अन्य 20 राज्यांमध्येदेखील कर्करोग उपचार संस्था सुरू केल्या जातील. आतापर्यंत या संस्थांसाठी आम्हाला 47 प्रस्ताव आले असून, भविष्यामध्ये आणखी प्रस्ताव आल्यास यावर गांभीर्याने विचार केला जाईल, असेही नड्डा यांनी नमूद केले.
=================================================
अखिलेश यादवांनी मागितली 10,600 कोटींची मदत
नवी दिल्ली - दुष्काळ निवारणासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज (शनिवार) झालेल्या बैठकीत मदत म्हणून 10 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

देशात दुष्काळाची तीव्रता वाढत चालली असून, देशातील किमान 21 राज्यांत भीषण दुष्काळी स्थिती आहे. याबाबत संसदीय अधिवेशनात झालेल्या चर्चेत केंद्राकडून अपेक्षित निधी न मिळाल्याची तक्रार उत्तर प्रदेशसह काही राज्यांनी केली होती. त्यामुळे पंतप्रधानांनी आज उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावून दुष्काळाबाबत माहिती जाणून घेतली. अखिलेश यादव यांनी आपल्या शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह हेही उपस्थित होते.

उत्तर प्रदेशातील 75 पैकी 55 जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती आहे. बुंदेलखंडमध्ये दुष्काळी परिस्थिती भयावह आहे. अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारकडे दुष्काळ निवारणासाठी 10,600 कोटींची मदतीबरोबरच 10 हजार टँकर आणि 5 हजार हँडपंपांची मागणी केली आहे.
=================================================
जाधवपूर विद्यापीठात अभाविप व डाव्यांत जुंपली
कोलकता - जाधवपूर विद्यापीठात शुक्रवारी रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परीषद (अभाविप) व डाव्या विचारसरणीच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी एका विद्यार्थिनीची छेड काढण्यात आली.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम या चित्रपटाचे स्क्रिनिंग शुक्रवारी जाधवपूर विद्यापीठात होणार होते. या स्क्रिनिंगला डाव्या विचारसरणीच्या समर्थकांनी विरोध केला. तसेच विद्यापीठाच्या गेटवरच अग्निहोत्री यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी अभाविपचे कार्यकर्ते आणि डाव्या समर्थकांमध्ये जोरदार जुंपली. या वेळी एका विद्यार्थिनीची छेड काढण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अभाविपच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. 

या घटनेची माहिती मिळताच जाधवपूर विद्यापीठाकडे रवाना झालेले भाजप नेत्या रुपा गांगुली यांनी गेटवरच रोखण्यात आले.

जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादीचाच हिसका

आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षाने पहिल्या फळीतील सर्व नेत्यांकडे जबाबदारी सोपविली असली तरी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासातील मानल्या जाणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा पत्ता मात्र कापण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादीने आतापासूनच गांभीर्याने घेतल्या आहेत. यासाठीच पक्षाच्या पहिल्या फळीतील साऱ्या नेत्यांकडे जिल्ह्य़ांची जबाबदारी सोपविण्यात आली. अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, गणेश नाईक, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, भास्कर जाधव या साऱ्या नेत्यांकडे विशिष्ट जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रदेश युवकचे माजी अध्यक्ष उमेश पाटील यांचाही नेतेमंडळींच्या यादीत समावेश आहे. वादग्रस्त आमदार अशी प्रतिमा असलेल्या आव्हाड यांना मात्र नेतेमंडळींच्या यादीत स्थान मिळालेले नाही. जबाबदारीचे वाटप करताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आव्हाड यांना चार हात लांबच ठेवल्याची पक्षात चर्चा आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून झालेल्या वादानंतर आव्हाड यांना धमक्या देण्यात आल्या असता स्वत: पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आव्हाड यांचा ओबीसी समाजातील लोकप्रिय आणि सुविद्य नेते असल्याचा उल्लेख केला होता. अल्पसंख्याक समाजाची बाजू आव्हाड हे प्रभावीपणे मांडतात, असे प्रशंसोद्गार पवार यांनी काढले होते.

No comments: