Wednesday, 25 May 2016

नमस्कार लाईव्ह २५-०५-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- वॉशिंग्टन; अमेरिकेने रोखली पाकची लष्करी मदत 
२- लंडन; मालदीवचे माजी अध्यक्ष ब्रिटनमध्ये राजकीय निर्वासित 
३- गुआंगझोवू; राष्ट्रपती मुखर्जींचे चीनमध्ये आगमन 
४- चीनची रेल्वेच्या माध्यमातून बिहारपर्यंत पोहोचण्याची मनीषा 
५- काबुल; अफगाण तालिबानकडून नव्या म्होरक्‍याची घोषणा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- लखनऊ; बजरंग दलाचं ट्रेनिंग वादात, प्रतिस्पर्ध्यांना मुस्लिम दाखवल्याने गुन्हा दाखल 
७- ISI व IM च्या मदतीने 'जैश-ए-मोहम्मद' करणार पठाणकोट हल्ल्याची पुनरावृत्ती? 
८- दारू कारखान्यांचे पाणी बंद करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार 
९- मेनका गांधींच्या विकास पुस्तिकेतून मोदी गायब 
१०- सरकारी महाविद्यालयांत ‘सीईटी’नुसार प्रवेश 
११- कर चुकविणाऱ्यांची नावे जाहीर होणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
१३- बारावीचा निकाल जाहीर, 86.60 टक्के उत्तीर्ण 
१४- जोडप्याला मारहाण करणाऱ्या पँट्री कर्मचाऱ्यांना रेल्वेनं ठोठावला ५ लाखांचा दंड 
१५- आयोध्या; शस्त्र प्रशिक्षण घेणाऱ्या 'बजरंग'च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा 
१६- महाराष्ट्राचे हक्‍काचे पाणी गुजरातला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- नागपूर; जेलमध्ये फिल्मी राडा, हिमायत बेगचे राजेश दवारेच्या डोक्यात पळीने वार 
१८- सोलापूर; वादळी वाऱ्यात पाळण्यातला चिमुरडा 60 फूट हवेत उडाला अन् झाडामुळे वाचला! 
१९- चेंबूर; भरदिवसा तरुणीची हत्या, आरोपी पसार 
२०- हरिद्वार; दगड, माती, वाळू खाऊन 'या' माणसाचा आजार झाला बरा...! 
२१- मुंबई; नव्या ‘डीपी’ला शिवसेनेचा विरोध 
२२- पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घ्या - आयुक्त अजय मेहता 
२३- मुंबई; २००० नंतरच्या झोपड्यांना पाणी मिळणार? 
२४- नागपूर; पारंपरिक अंत्यविधीसाठी बाहेर काढले पार्थिव 
२५- यवतमाळ; सांभाळ या घराला बोलून बाप गेला... 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- सलमानसोबत काम करणार का? ऐश्वर्याला थेट सवाल 
२७- सलमान, माफ कर, 2 वर्षांपूर्वीच्या वादासाठी अरिजीतची माफी 
२८- चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीला कन्यारत्न 
२९- एबीची तुफानी खेळी, गुजरातचा धुव्वा, बंगलोर अंतिम फेरीत 
३०- आशिष नेहरावर लवकरच शस्त्रक्रिया 
३१- अर्जुन तेंडुलकरची अंडर-16 वेस्ट झोन संघात निवड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
गौस पठाण, दयानंद भालेराव, गजानन देशमुख, ऋषिकेश ताकोडे, संतोष गिरी, राजेश कपूर, मयूर शेरे, संजय पाटील, दीपक सूर्यवंशी, कैलाश कपवर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
चुकीचा रस्ता..चुकीची माणसं..वाईट परिस्थिती..वाईट अनुभव..हे अत्यंत गरजेचे आहेत...
कारण...यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे
(डाॅ. राहुल कांबळे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

==========================================

बारावीचा निकाल जाहीर, 86.60 टक्के उत्तीर्ण

बारावीचा निकाल जाहीर


एकूण निकाल 86.60 टक्के


मुलांची टक्केवारी- 83.46 टक्के

मुलींची टक्केवारी – 90.50 टक्के


कला – 78.11 टक्के

विज्ञान– 93.16 टक्के

वाणिज्य- 79.10 टक्के

व्यावसायिक अभ्यासक्रम- 81.68 टक्के


विभागवार –


कोकण- 93.29 टक्के

कोल्हापूर- 88.10 टक्के

औरंगाबाद- 87.80 टक्के

पुणे- 87.26 टक्के

नागपूर- 86.35 टक्के

लातूर- 86.28 टक्के

मुंबई- 86.08 टक्के

अमरावती- 85.81 टक्के

नाशिक- 83.99 टक्के

==========================================

जेलमध्ये फिल्मी राडा, हिमायत बेगचे राजेश दवारेच्या डोक्यात पळीने वार

जेलमध्ये फिल्मी राडा, हिमायत बेगचे राजेश दवारेच्या डोक्यात पळीने वार
नागपूर : युग चांडक हत्याप्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला दोषी आरोपी राजेश दवारे आणि जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेग यांचा जेलमध्ये राडा झाला. हिमायत बेगने राजेश दवारेला नागपूर जेलमध्ये मारहाण केली आहे.

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये जेवण वाढण्यावरून हा वाद झाला. या वादाचं पुनर्वसन मारहाणीत झालं. यावेळी हिमायत बेगला पुण्यातल्या 5 महिलांच्या हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला आरोप जितेंद्रसिंह तोमरनेही साथ दिली.

जितेंद्रसिंह तोमर आणि हिमायत बेगने राजेश दवारेला मारहाण केली.

हिमायतने रागाच्या भरात भाजी वाढण्याच्या पळीने राजेश दवारेच्या डोक्यात वार केला. याप्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात हिमायत बेग आणि जितेंद्रसिंह तोमर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
==========================================

सलमान, माफ कर, 2 वर्षांपूर्वीच्या वादासाठी अरिजीतची माफी

सलमान, माफ कर, 2 वर्षांपूर्वीच्या वादासाठी अरिजीतची माफी
मुंबई : सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची फेसबुकवर जाहीर माफी मागितली आहे. दोन वर्षांपूर्वी दोघात झालेल्या गैरसमजाबद्दल अरिजीतने पडती बाजू घेतली आहे. ही पोस्ट अरिजीतने नंतर फेसबुकवरुन डिलीट केली आहे.


‘मी सलमान खानचा अपमान केला नव्हता. ही गोष्टी मी त्याला हरतऱ्हेने समजवण्याचा प्रयत्न केला होता. अनेकदा मेसेज करुनही काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे फेसबुकवरुन सार्वजनिकरित्या माफी मागणं हा एकमेव पर्याय दिसत आहे’ असं अरिजीतने आपल्या एफबी पोस्टमध्ये लिहिलं आहे.


‘नीता यांच्या घरी मी केवळ तुमची माफी मागण्यासाठी आलो होतो. मात्र तुम्ही ऐकलं नाहीत. काही हरकत नाही. मी इथे सर्वांसमक्ष तुमची माफी मागतो. मात्र मी तुमच्यासाठी सुलतान चित्रपटात गायलेलं गाणं कृपया हटवू नका, अशी नम्र विनंती करतो. तुम्हाला हे गाणं दुसऱ्या गायकाकडून गाऊन घ्यायचं असेल, तर काहीही हरकत नाही, पण हे व्हर्जन राहू द्या.’ असं अरिजीत प्रांजळपणे लिहितो.
==========================================

बजरंग दलाचं ट्रेनिंग वादात, प्रतिस्पर्ध्यांना मुस्लिम दाखवल्याने गुन्हा दाखल

बजरंग दलाचं ट्रेनिंग वादात, प्रतिस्पर्ध्यांना मुस्लिम दाखवल्याने गुन्हा दाखल
लखनऊ : अयोध्येत बजरंग दलाने आयोजित केलेला शस्त्र प्रशिक्षणाचा कार्यक्रम वादात अडकला आहे. या कार्यक्रमात बजरंग दलानं प्रतिस्पर्धींना मुस्लिम वेशात दाखवलं होतं. यामुळे विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महत्वाचं म्हणजे राज्यपाल राम नाईक यांनी अशा प्रकारच्या शस्त्र प्रशिक्षण कार्यक्रमांचं समर्थन केल्यानं हा वाद आधीच चर्चेत होता.

आता अयोध्येनंतर बजरंग दल हा कार्यक्रम इतर ठिकाणी आयोजित करणार आहे. अर्थात उत्तर प्रदेश निवडणूक जवळ आलेली असताना केवळ मतांच्या ध्रुवीकरणासाठी हे प्रयत्न होत आहेत का, अशीही चर्चा रंगली आहे.

बजरंग दलाने स्वरक्षण आणि शस्त्र प्रशिक्षणासाठी 14 मे रोजी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र सामाजिक सौहार्दाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न आणि विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्यामुळे, आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
==========================================

सलमानसोबत काम करणार का? ऐश्वर्याला थेट सवाल

सलमानसोबत काम करणार का? ऐश्वर्याला थेट सवाल
मुंबई : सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या प्रेम प्रकरणाची आणि ब्रेकअपची कल्पना सर्वांनाच आहे. मात्र त्या प्रकरणावरुन छेडण्याचा मोह काही जणांना आवरता येत नाही. आडून आडून प्रश्न विचारणाऱ्या काही जणांनी आता थेट विषयाला हात घातला.

निर्माते वाशू भगनानी यांच्या कार्यालयात झालेल्या एका पत्रकार परिषदेत एकाने ‘भविष्यात सलमानसोबत काम करणार का?’ असा प्रश्न ऐश्वर्या राय बच्चनला विचारला. मात्र पत्रकाराच्या आगाऊ प्रश्नामुळे ऐश्वर्याचा पारा चांगलाच चढला.

ऐश्वर्याने हा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम तात्काळ थांबवला. इतकंच नाही, तर या प्रश्नाचं आणि त्यानंतर तिने फणकारल्याचं झालेलं व्हिडिओ शूट डिलीट करण्याचा इशाराही तिने दिला. वाशूंचा मुलगा, अभिनेता जॅकी भगनानीने या प्रकरणात मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र ऐश्वर्या इतकी चिडली होती, की तिने सर्व पत्रकारांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचं ‘स्पॉटबॉय.कॉम’च्या वृत्तात म्हटलं आहे.

विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात रिओ ऑलिम्पिकसाठी सलमानच्या गुडविल अॅम्बेसेडर म्हणून झालेल्या निवडीवर ऐश्वर्याने अप्रत्यक्ष समर्थन दर्शवलं होतं. अनेक स्तरातून सलमानवर टीकेची झोड उठली असताना ऐश्वर्याच्या पाठिंब्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं.

“जर एखादी व्यक्ती देशासाठी काहीतरी चांगलं करत असेल आणि कुणाला देशाचं प्रतिनिधित्त्व करण्याची इच्छा असेल, तर मग क्रीडा क्षेत्र असो, संगीत असो किंवा कला, अशा व्यक्तींचं स्वागतच करायला हवं.” असं मत तिने व्यक्त केलं होतं. त्यामुळे पुन्हा दोघं एकत्र काम करण्याची शक्यता निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं.
==========================================

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीला कन्यारत्न

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीला कन्यारत्न
मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातला चॉकलेट हिरो म्हणून अभिनेता स्वप्नील जोशीची ओळख आहे. या चॉकलेट हिरोला गोड बातमी मिळाली आहे. स्वप्नील जोशीला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.

सोमवारी रात्री स्वप्निलची पत्नी लीनाने एका मुलीला जन्म दिला. स्वप्निल-लीना यांच्या आयुष्यात आलेल्या छोट्या परीमुळे कुटुंबीयांसह मित्र-मंडळींमध्येही आनंदाचं वातावरण आहे.

बाळाच्या बातमीमुळे स्वप्निल जोशीला डबल सेलिब्रेशनची संधी चालून आली आहे. संजय लीला भन्साळी यांचा पहिला वहिला मराठी चित्रपट ‘लाल इश्क’ प्रदर्शनाच्या वाटेवर असून स्वप्नील जोशी त्यात मुख्य भूमिकेत आहे.
==========================================

जोडप्याला मारहाण करणाऱ्या पँट्री कर्मचाऱ्यांना रेल्वेनं ठोठावला ५ लाखांचा दंड

जोडप्याला मारहाण करणाऱ्या पँट्री कर्मचाऱ्यांना रेल्वेनं ठोठावला ५ लाखांचा दंड
मुंबई: रेल्वेतल्या पँन्ट्रीकारमध्ये प्रवाशी दाम्पत्याला केलेल्या मारहाणीप्रकरणी पॅन्ट्री स्टाफच्या 20 जणांना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

भाईंदर परिसरात राहणाऱ्या गुप्ता परिवाराला रविवारी रात्री कोटा ते रतलाम प्रवासादरम्यान रेल्वे पँट्रीकार मधल्या 20 कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. रेल्वेत मिळणाऱ्या रेल नीर ऐवजी दुसऱ्या कंपनीच्या पाण्याची बाटली का दिली? याचा जाब विचारणाऱ्या गुप्ता यांना पँट्रीकारमधल्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती.
Railway Pantry Car 4

एका प्रवाशानं सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केला. त्यानंतर रेल्वेच्या ट्वीटर हँडलरवर तक्रार दाखल केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी पँट्रीकारच्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
==========================================

वादळी वाऱ्यात पाळण्यातला चिमुरडा 60 फूट हवेत उडाला अन् झाडामुळे वाचला!

वादळी वाऱ्यात पाळण्यातला चिमुरडा 60 फूट हवेत उडाला अन् झाडामुळे वाचला!
सोलापूर: चक्रीवादळात उडून गेलेला मुलगा झाडाच्या बेचकीत अडकून बचावल्याची थरारक घटना सोलापूरच्या सांगोला तालुक्यात घडली आहे. मंगेवाडी गावात रविवारी चक्रीवादळानं धुमाकूळ घातला. त्यावेळी डोरले यांच्या घरालाही त्या चक्रीवादळाचा तडाखा बसला. घरातल्या एका तुळईला बांधलेलया पाळण्यात श्रेयस हा 11 महिन्यांचा चिमुकला झोपला होता. पण वादळाच्या जोरदार वाऱ्यांनी त्याचा पाळणा छतासह उडून गेला.

वादळ थांबल्यानंतर श्रेयस आणि त्याचा पाळणा दिसेनासा झाल्यानं डोरले कुटुंबियांची घालमेल वाढली. आईने तर हातपाय गाळले. शोधाशोध सुरु झाली आणि तितक्यात घरापासून 60 फूट अंतरावर असलेल्या एका झाडाच्या बेचकीमध्ये अडकलेल्या त्या बाळाचा पाळणा दिसला.

कुटुंबीयातल्या एका सदस्यानं झाडावर चढून पाहिलं. तर आत पाळण्यात भेदरलेला श्रेयस धाय मोकलून रडत होता. श्रेयसला खाली घेतल्यानंतर तो सुरक्षित असल्याचं पाहून कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या आपत्तीला सामोरे गेल्यानंतरही श्रेयसला साधं खरचटलंही नाही. आपलं घर भुईसपाट झालेलं असलं, तरी आपला लाडका सुखरुप बचावल्याचा जास्त आनंद पालकांना होता.
==========================================

मुंबईच्या चेंबुरमध्ये भरदिवसा तरुणीची हत्या, आरोपी पसार

मुंबईच्या चेंबुरमध्ये भरदिवसा तरुणीची हत्या, आरोपी पसार
मुंबई : चेंबुरमधील सुमननगरमध्ये भरदिवसा 19 वर्षीय तरुणीच्या हत्येने खळबळ उडाली आहे. चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा रुग्णालयात मृत्यू झाला.

चेंबूरच्या सुमननगर येथील अण्णाभाऊ साठे उद्यानाजवळ ही घटना घडली. मृत तरुणीचं नाव करिश्मा असल्याची माहिती आहे. करिश्मा कामावर जात असताना एका तरुणाने मागून येऊन तिच्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली.

त्यानंतर तिला सुराणा-सेठीया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान तरुणीवर हल्ला करणारा कोण होता याचा शोध अजून लागलेला नाही. मात्र प्रेमप्रकरणातून तरुणीवर हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
==========================================

एबीची तुफानी खेळी, गुजरातचा धुव्वा, बंगलोर अंतिम फेरीत

एबीची तुफानी खेळी, गुजरातचा धुव्वा, बंगलोर अंतिम फेरीत
बंगळुरु : एबी डिव्हिलियर्सच्या तुफानी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने गुजरात लायन्सचा चार विकेट्सनी धुव्वा उडवला आणि आयपीएलच्या नवव्या मोसमाच्या फायनलमध्ये धडक मारली.

बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने बंगलोरला विजयासाठी 159 धावांचं आव्हान दिलं होतं. पण धवल कुलकर्णीच्या भेदक माऱ्यासमोर बंगलोरची पाच बाद 29 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. पण डिव्हिलियर्सने आधी स्टुअर्ट बिन्नीच्या साथीने सहाव्या विकेटसाठी 39 धावांची आणि मग इक्बाल अब्दुल्लाच्या साथीने सातव्या विकेटसाठी 91 धावांची अभेद्य भागीदारी रचून बंगलोरला फायनलचं तिकीट मिळवून दिलं.

डिव्हिलियर्सने 47 चेंडूंत 5 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 79 धावांची खेळी उभारली. तर इक्बाल अब्दुल्लाने नाबाद 33 आणि स्टुअर्ट बिन्नीने 21 धावांची खेळी केली. बंगलोरकडून धवल कुलकर्णीने चार षटकांत 14 धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढल्या.

त्याआधी शेन वॉटसन, इक्बाल अब्दुल्ला आणि ख्रिस जॉर्डनच्या प्रभावी माऱ्यासमोर गुजरात लायन्सला 20 षटकांत सर्व बाद 158 धावांचीच मजल मारता आली. वॉटसनने चार, तर इक्बाल अब्दुल्ला आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. गुजरातकडून ड्वेन स्मिथने एकाकी झुंज देत 73 धावांची खेळी केली.
==========================================

आशिष नेहरावर लवकरच शस्त्रक्रिया

आशिष नेहरावर लवकरच शस्त्रक्रिया
मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा शिलेदार आशिष नेहरा याच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी ही माहिती दिली.

आयपीएलमध्ये पंजाब विरुद्धच्या सामन्यात नेहराच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे नेहराने आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांतून माघार घेतली होती.

यानंतर आशिष नेहराच्या दुखापतीवर लंडनमध्ये तपासणी करण्यात आली. त्यावेळी डॉक्टरांनी नेहराच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.

आशिष नेहराने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात हैदराबादकडून 8 सामन्यांत 9 विकेट्स काढल्या आहेत.
==========================================

दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई दाऊद कॉलिंग प्रकरणात महसूलमंत्री एकनाथ खडसें यांनी आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन, मनीष भंगाळे आणि जयेश दवे यांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी पत्राद्वारे राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

“साईट हॅक करणं किंवा एखाद्याबाबत माहिती घेणं हा गुन्हा आहे. पाकिस्तानची साईट हॅक करुन काढलेली माहिती सर्वप्रथम पोलिसांना देणं गरजेचं होतं. मात्र, मनीष भंगाळेंनी ही माहिती स्वत:कडे ठेवली. त्यामुळे क्राईम ब्रँचने त्यांची चौकशी करुन या तिघांवरही गुन्हे दाखल करावे. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत.”, अशी मागणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली आणि एकनाथ खडसेंचा राजीनामा घेऊन दाऊद कॉलिंग प्रकरणात चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, मुंबई पोलिसांनी एकनाथ खडसेंना या प्रकरणात क्लीन चिट दिली. त्यामुळे आता एकनाथ खडसेंनी प्रीती मेनन, मनीष भंगाळे आणि जयेश दवे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.
==========================================

अर्जुन तेंडुलकरची अंडर-16 वेस्ट झोन संघात निवड

अर्जुन तेंडुलकरची अंडर-16 वेस्ट झोन संघात निवड
मुंबई : ‘बाप तसा बेटा’ असं म्हणतात आणि त्यावर अर्जुन तेंडुलकरने शिक्कामोर्तब केलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल टाकत, त्याचा मुलगा अर्जुनही आता वरच्या दर्जाचं क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

अर्जुन तेंडुलकरची आंतर विभागीय स्पर्धेच्या 16 वर्षांखालील पश्चिम विभाग संघात निवड झाली आहे. हुबळीमध्ये आजपासून या स्पर्धेची सुरुवात झाली आहे.

ओम भोसले हा या संघाचा कर्णधार असून 6 जून रोजी ही स्पर्धा संपणार आहे.

बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी स्नेहल परिख यांनी अंडर-16 वेस्ट झोन संघाची घोषणा केली.

राकेश परिख यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ज्युनिअर सिलेक्शन कमिटीची सोमवारी बैठक पार पडली. या समितीत प्रशिक्षक तुषार अरोठे, शंतनु सुगवेकर, समीर दिघे आणि जे कृष्ण राव यांचा याचा समावेश होता.
==========================================

ISI व IM च्या मदतीने 'जैश-ए-मोहम्मद' करणार पठाणकोट हल्ल्याची पुनरावृत्ती?


  • ऑनलाइन लोकमत
    चंदीगड, दि. २५ - नववर्षाच्या सुरूवातीलाच भारतातील पंजाबमधील पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'च्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात ७ हून अधिक जवान शहीद झाले. पुरेसे पुरावे मिळूनही पाकिस्तानने या हल्ल्यास जबाबादार असणा-या दहशतवादी संघटनेवर कोणतीही कारवाई केलेली नाही. या हल्ल्याची तीव्रता अद्याप कायम असतानाच भारतात पठाणकोट हल्ल्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जैश-ए-मोहम्मद' दशतवादी संघटनेच्या सूचनेवरून दहशतवादी स्लीपर सेल्सनी उत्तर भारतातील ठिकाणांची रेकी करण्यास सुरूवात केली असून भारतात पुन्हा पठाणकोट व गुरूदासपूरसारखे आत्मघाती हल्ले करण्याचा कट रचला जात आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय (ISI) व इंडियन मुजाहिद्दीनच्या काही दहशतवाद्यांच्या मदतीने हा हल्ला करण्यात येणार असल्याचे समजते.
    'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, लष्कराच्या गुप्तचर विभागाने पंजाब सरकारला दिलेल्या अहवालात याप्रकरणी तपशीलवार माहिती नमूद करण्यात आली असून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या अहवालानुसार, ' जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अवैस मोहम्मद हा मलेशियाला जाणार असून, तेथे त्याला बनावट मलेशियन पासपोर्ट देण्यात येणार आहे. त्या आधारे तो भारतात प्रवेश करून हल्ले घडवून आणू शकेल. पाकिस्तानमधील ओकारा येथे राहणा-या अवैसवर भारतातील हल्ल्यांवर नजर ठेवण्याची कामगिरी सोपवण्यात आली आहे,' असेही अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते. 
==========================================

दगड, माती, वाळू खाऊन 'या' माणसाचा आजार झाला बरा...!


  • ऑनलाइन लोकमच
    हरिद्वार, दि. २५ - लहानपणी अनेक मुलांना दगड, माती खाण्याची सवय असते आणि पालक त्यांना ओरडून, वेळप्रसंगी एखादी चापट देऊन ही वाईट सवय सोडवतात. पण उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये तर एका इसमाला रोज दगड, माती, वाळू खायचे व्यसन लागले आहे. रामेश्वर असे त्या इसमाचे नाव असून ब-याच काळापासून तो दगड, माती, वाळू खात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या काळापासून पोटात या गोष्टी गेल्या तरीही रामेश्वरला कोणताही त्रास झाला नसून उलट हे खाल्ल्यामुळेच आपल्या प्रकृतीच्या तक्रारी दूर झाल्याचा दावा त्याने केला आहे. 
    ' माझ्या प्रकृतीच्या काही तक्रारी होत्या, मला बरं वाटत नसे. पण जेव्हापासून मी दगड, माती खायला लागलो, तेव्हापासून माझी तब्येत सुधारली आहे, मी आता ठणठणीत आहे' असे रामेश्वरने सांगितले. त्याची ही माती, दगड, वाळू खायची विचित्र सवय पाहून नातेवाईकांनी, अनेक लोकांनी त्याला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला, मात्र रामेश्वरने त्या सर्वांना साफ नकार दिला. ' माझू तब्येत उत्तम असताना मी डॉक्टरांकडे का जावं?' असा सवाल त्याने विचारला आहे. 
    बाकी काही असो पण त्याच्या या विचित्र सवयीमुळे तो संपूर्ण भागात लोकप्रिय नक्कीच झाला आहे. 
==========================================

दारू कारखान्यांचे पाणी बंद करण्यास नकार


  • नवी दिल्ली : दुष्काळग्रस्त भागात पाणी वळते करण्यास दारू कारखाने व डिस्टिलरींना केला जाणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्याचा आदेश राज्य सरकारला देण्यास सुप्रीम कोर्टाने मंगळवारी नकार दिला.
    न्या. पी.सी. पंत आणि डी.वाय. चंद्रचूड यांच्या अवकाशकालीन खंडपीठाने दारू कारखान्यांचा पाणीपुरवठा पूर्णपणे (१०० टक्के) बंद करण्याची मागणी करणारे याचिकाकर्ते संजय भास्करराव काळे यांची चांगलीच कानउघाडणी केली. आम्ही अशा प्रकारचा आदेश राज्य सरकारला देऊ शकत नाही. ते शक्य नसताना याचिकाकर्त्याने केवळ प्रसिद्धीसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याआधीच अंतरिम आदेश दिला असताना तुम्ही त्या आदेशाविरुद्ध आमच्याकडे का आलात? उच्च न्यायालयाने ६० टक्के पाणीकपातीचा आदेश दिला आहे. तुम्हाला आता काय हवे आहे, असा सवालही खंडपीठाने केला. हा धोरणात्मक निर्णय असून, त्याबाबत संतुलन राखायला हवे, असेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
==========================================

नव्या ‘डीपी’ला शिवसेनेचा विरोध


  • मुंबई : परवडणाऱ्या घरांसाठी ना विकास क्षेत्रातील मोकळ्या जमिनी, मिठागराची जागा व आरे कॉलनीतील भूखंडाचा वापर करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे़ व्यावसायिक चटईक्षेत्र निर्देशांकातील प्रस्तावित वाढीवरूनही शिवसेनेने भाजपाला आव्हान दिले आहे़ त्यामुळे मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यावरून सत्ताधारी युतीतील मित्रपक्ष एकमेकांविरोधात आखाड्यात उतरल्याचे चित्र आहे.
    शहराचा सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठीचा विकास नियोजन आराखडा वादात सापडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार नवीन आराखड्याची आखणीही अंतिम टप्प्यात असताना आता सत्ताधारी शिवसेनेनेच यातील काही तरतुदींना विरोध सुरू केला आहे़ त्यामुळे विकास आराखड्यावरून शिवसेना-भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण रंगणार आहे.
    विकास आराखड्यातून ना विकास क्षेत्राचा काही भाग गृहनिर्माणासाठी खुला करण्यात आल्याने शिवसेनेचे पर्यावरण प्रेमही जागे झाले आहे़ अशा तरतुदींना विरोध करण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली़ या आराखड्यात काही बदलही शिवसेनेच्या नेत्यांनी यावेळी सुचविले़
==========================================

पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घ्या - आयुक्त


  • मुंबई : येत्या पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी तुंबण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून महापालिकेने आता पावसाळापूर्व कामांवर जोर दिला आहे. विशेषत: ज्या भागात पावसाचे पाणी साचते; अशा ठिकाणांची आयुक्त अजय मेहता पाहणी करत आहेत. मंगळवारी करण्यात आलेल्या पाहणीवेळी येत्या पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.
    हाजी अली, लव्ह ग्रोव्ह, क्लिव्हलँड बंदर येथील पर्जन्य जल उंदचन केंद्रांसह रे रोड स्टेशनजवळील प्रस्तावित ब्रिटानिया पर्जन्य जल उंदचन केंद्राची अजय मेहता यांनी मंगळवारी पाहणी केली. या सर्व ठिकाणी तेथील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर व पूर्वतयारीविषयक बाबींचा आढावा घेतल्यानंतर आयुक्तांनी सर्व पर्जन्य जल उदंचन केंद्रांमध्ये डिझेलचा पुरेसा साठा ठेवण्याबाबत संबंधितांना आदेश दिले. त्याचबरोबर काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास समस्येचे तत्काळ निराकरण व्हावे, या उद्देशाने सर्व ठिकाणांसाठी कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांसह महापालिकेचे कर्मचारीदेखील गरजेनुसार पर्यायी स्वरूपात कार्यतत्पर असावेत, असेही आदेश आयुक्तांनी दिले. मंगळवारच्या पाहणी दौऱ्यावेळी आयुक्तांनी पावसाळ्याच्या दिवसात नेहमी पाणी भरण्याच्या ठिकाणांचादेखील दौरा केला. यामध्ये हिंदमाता, मुंबई सेंट्रल परिसरातील नायर रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालय या परिसरांचा समावेश होता. या सर्व ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी असणारे पंप हे पूर्ण क्षमतेने चालू असावेत व त्या पंपांची चाचणी नियमितपणे घ्यावी,
==========================================

२००० नंतरच्या झोपड्यांना पाणी मिळणार?


  • मुंबई : दीड वर्षापूर्वी स्थायी समितीने फेटाळलेला सन २००० नंतरच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा मंजुरीसाठी आणला आहे़ पाणीचोरीवर नियंत्रण आणि उत्पन्नात वाढ करण्यासाठी हा प्रयोग असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे़ त्यामुळे आतापर्यंत या प्रस्तावाला विरोध करणारी सत्ताधारी शिवसेना पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
    १ जानेवारी २००० नंतरच्या झोपड्यांनाही पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी पाणी हक्क समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती़ त्यानुसार बेकायदा झोपड्या अस्तित्वात असेपर्यंत त्यांना पाणीपुरवठा करण्याचे आदेश डिसेंबर २०१४ मध्ये न्यायालयाने दिले़ मात्र या धोरणाला स्थायी समितीच्या बैठकीत दोन वेळा सत्ताधाऱ्यांनी केराची टोपली दाखविली आहे़ सप्टेंबर २०१५ मध्ये हा प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारार्थ पाठविण्यात आला़
    मात्र न्यायालयात पालिकेने योग्य बाजू मांडली होती़ सध्या बेकायदा झोपड्यांमध्ये राहणारे रहिवासी पालिकेच्या जलवाहिनीतील पाणी चोरतात अथवा पाणी माफियांकडून विकत घेतात़ त्यामुळे हे धोरण मंजूर झाल्यास पालिकेचे पाणी वाया न जाता महसुलात वाढ होईल व पाणीचोरीला आळा बसेल़ भविष्यात चोरी बंद झाल्यास पाणीपुरवठा करण्याची गरज पडणार नाही, असे प्रशासनाने आपल्या प्रस्तावातून स्पष्ट केले आहे़ 
==========================================

अमेरिकेने रोखली पाकची लष्करी मदत


  • वॉशिंग्टन : दहशतवादी हक्कानी गटाविरुद्ध पाकिस्तान स्पष्ट अशी पावले उचलत आहे हे अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी काँग्रेसला प्रमाणपत्रासह पटवून देईपर्यंत अमेरिकेकडून पाकिस्तानला ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची लष्करी मदत अडवून ठेवणारा कायदा सिनेटच्या समितीने संमत केला आहे.
    गेल्या आठवड्यात नॅशनल डिफेन्स अ‍ॅथॉरायझेशन अ‍ॅक्ट (एनडीएए) २०१७ या समितीने संमत केला. गेल्या वर्षीही समितीने हक्कानी नेटवर्कवर कारवाईची अट घातली होती. एनडीएए सिनेटसमोर मतदानासाठी येईल त्यावेळी अनेक सिनेटर्स त्यात सुधारणा सुचविण्याची अपेक्षा आहे. सिनेटची एनडीएएबद्दलची भूमिका ही सभागृहाच्या त्याबद्दलच्या भूमिकेपेक्षा (पाकिस्तानसह अनेक मुद्द्यांवर) वेगळी आहे. सभागृहाने गेल्या आठवड्यात संमत केलेल्या विधेयकाने पाकला अमेरिकेकडून मिळणाऱ्या ९०० दशलक्ष डॉलरच्या मदतीपैकी ४५० दशलक्ष डॉलर रोखून धरले आहेत. तर सिनेटने या दोन्ही रकमा अनुक्रमे ३०० आणि ८०० दशलक्ष डॉलरपर्यंत खाली आणल्या आहेत. अर्थात या दोन्ही रकमा पाकला देण्याआधी पाकिस्तान हक्कानी नेटवर्कविरोधात स्पष्ट अशी उपाययोजना करीत आहे, असे प्रमाणपत्र संरक्षणमंत्र्यांनी काँग्रेसला देणे आवश्यक आहे.
==========================================

मालदीवचे माजी अध्यक्ष ब्रिटनमध्ये राजकीय निर्वासित


  • लंडन : मालदीवचे माजी अध्यक्ष मोहम्मद नशीद (४९) यांना ब्रिटनने राजकीय निर्वासिताचा आश्रय
    दिला असल्याचा दावा त्यांच्या वकिलाने केला. या दाव्यावर
    ब्रिटनने अजून भाष्य केलेले नाही.
    नशीद हे मानवी हक्कांसाठी झगडणारे असून, मालदीवच्या अध्यक्षपदी ते लोकशाही मार्गाने निवडून गेलेले पहिलेच नेते ठरले. नशीद यांना गेल्या जानेवारी महिन्यात पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी ब्रिटनला जाण्याची परवानगी श्रीलंका, भारत आणि ब्रिटनने घडवून आणलेल्या वाटाघाटीनंतर दिली गेली होती. नशीद प्रकरणात ब्रिटनचे सरकार सहभागी झाल्याबद्दल मालदीव सरकारने सोमवारी नाराजी व्यक्त केली आहे. नशीद यांना दहशतवादाच्या आरोपावरून १३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. उपचारानंतर ते मालदीवला यायला हवे होते. नशीद ब्रिटनमध्ये उपचारांसाठी आल्यावर पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी त्यांचे गालिचा अंथरूण स्वागत केले होते.
==========================================

राष्ट्रपती मुखर्जींचे चीनमध्ये आगमन


  • गुआंगझोवू : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चार दिवसांच्या चीन भेटीवर मंगळवारी येथे आगमन झाले.
    उभय देशांतील राजकीय व आर्थिक संबंध वृद्धिंगत करणे, तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे भारताला सदस्यत्व मिळू न देण्यास चीनचा असलेला विरोध आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर करण्याच्या युनोच्या प्रयत्नांमध्ये चीनने आणलेली आडकाठी हे विषय या दौऱ्यात चर्चेत असतील.
    राष्ट्रपती या नात्याने मुखर्जी प्रथमच चीनला भेट देत आहेत. त्यांचे गुरुवारी बीजिंगमध्ये आगमन होईल. तेथे त्यांची अध्यक्ष शी जिनपिंग व इतर चिनी नेत्यांशी भेट होईल.
==========================================

चीनची रेल्वेच्या माध्यमातून बिहारपर्यंत पोहोचण्याची मनीषा


  •  ऑनलाइन लोकमत
    चीन, दि. 24-  नेपाळला रोड आणि रेल्वेच्या माध्यमातून तिबेटशी जोडल्यानंतर आता चीन बिहारपर्यंत रेल्वेचं जाळं विस्तारण्याचा विचार करतं आहे. चीननं नेपाळला आधीच स्वतःच्या अधिपत्याखाली आणलं आहे. आता चीनचा भारत आणि दक्षिण आशियापर्यंत रेल्वेच्या माध्यमातून पोहोचण्याचा विचार असल्याची माहिती चीनच्या मीडियानं दिली आहे.
    नेपाळमधल्या रसूवागधी या सीमावर्ती भागाला रेल्वेनं जोडण्याचा करार आधीच चीन आणि नेपाळमध्ये झाला आहे. नेपाळच्या सीमेपर्यंत चीन 2020पर्यंत रेल्वेचं जाळं विस्तारणार आहे, अशी माहिती ग्लोबल टाइम्सनं दिली आहे. रसूवागधी या सीमेच्या माध्यमातूनच भारतात रेल्वेचं जाळं विस्तारण्याचा विचार आहे. रसूवागधीहून बिरगुंजपर्यंत चीन रेल्वे नेणार आहे. बिरगुंजपासून बिहार फक्त 240 किलोमीटरवर आहे. या माध्यमातून चीनला कोलकाताला वेळेची बचत आणि अंतरही कमी कापून पोहोचता येणार आहे. चीनला उद्देश फक्त नेपाळच्या लोकांचा विकास करणं हा नाही.
    चीनला पूर्ण दक्षिण आशियामध्ये रेल्वेचं जाळं विस्तारून अधिपत्य स्थापन करायचं आहे. नेपाळची जनता यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार असून, चीनच्या मदतीमुळे नेपाळ आधीच भारतापासून दुरावला आहे. चीनचा नेपाळच्या माध्यमातून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची आता माहिती समोर येते आहे.  
==========================================
अफगाण तालिबानकडून नव्या म्होरक्‍याची घोषणा

काबूल - मुल्ला अख्तर मन्सूर या तालिबानच्या म्होरक्‍याला अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यांत ठार करण्यात आल्याच्या वृत्तास अफगाणिस्तानमधील तालिबानने एका निवेदनाद्वारे पुष्टी दर्शविली आहे.

याच निवेदनामध्ये तालिबानने मन्सूर याच्याजागी आता मुल्ला हैबतुल्ला अखुंदझादा याची नेमणूक करण्यात आल्याची घोषणाही केली आहे. अखुंदझादा हा तालिबानच्या दोन उपप्रमुखांपैकी एक असून तालिबानच्या न्यायव्यवस्थेचा प्रमुख म्हणूनही त्याने काम पाहिलेले आहे. तालिबानी नेत्यांच्या बैठकीत अखुंदझादा याच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. ही संवेदनशील बैठक पाकिस्तानमध्ये झाल्याचे मानले जात आहे.

अफगाणिस्तानमधील कुरसिद्ध हक्‍कानी नेटवर्कचा म्होरक्‍या सिराजुद्दीन हक्‍कानी आणि तालिबानचा माजी म्होरक्‍या मुल्ला मोहम्मद ओमर याचा मुलगा असलेल्या मोहम्मद याकूब हे अखुंदझादा याचे उपप्रमुख याचे म्हणून काम पाहणार आहेत. तालिबानचा मुख्य प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने यासंदर्भातील माहिती दिली.
==========================================
शस्त्र प्रशिक्षण घेणाऱ्या 'बजरंग'च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

अयोध्या - इतर धर्मांच्या नागरिकांपासून हिंदू धर्माचे संरक्षण करण्यासाठी बंदूक, तलवार व लाठ्यांचे प्रशिक्षण घेणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उजव्या विचारसरणीची संघटना म्हणून प्रसिद्ध असलेल्या बजरंग दलाने हिंदूंच्या संरक्षणासाठी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. बजरंग दलाचे धार्मिक प्रशिक्षण शिबीर नुकतेच अयोध्येमध्ये पार पडले आहे. या प्रशिक्षण शिबिरात प्रतिस्पर्धी नागरिकांच्या डोक्याला मुस्लिम धर्मियांची ओळख असलेली स्कल कॅप होती. या शिबिराची परवानगी घेण्यात न आल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बजरंग दलाने एक शिबिर पार पडल्यानंतर आता पुढील शिबीर 5 जूनला सुल्तानपुर, गोरखपुर, पिलिभित, नोएडा व फतेहपुर येथे आयोजित केले जाणार आहे. पण, आता या प्रशिक्षण शिबिरावर प्रश्न निर्माण झाला आहे. बजरंग दल ही विश्व हिंदू परिषदेची (विहिंप) युवा संघटना आहे. बजरंग दलावर यापूर्वी धार्मिक भावना भडकाविण्याचे, अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसेचे व दंगल भडकवण्याचे आरोप झालेले आहेत.
==========================================
मेनका गांधींच्या विकास पुस्तिकेतून मोदी गायब

नवी दिल्ली - केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांनी बनविलेल्या विकास पुस्तिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांचाच उल्लेख गायब असल्याचे समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला उद्या (गुरुवार) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकासाची माहिती देण्यासाठी प्रत्येक केंद्रीय मंत्र्याला विकास पुस्तिका बनविण्यास सांगण्यात आले आहे. यानिमित्त मेनका गांधी यांनी बनविलेल्या ‘पिलीभीत का उत्थान‘ या पुस्तिकेचे नुकतेच प्रकाशन झाले. 

मेनका गांधींच्या विकास पुस्तिकेत महत्त्वाची बाब म्हणजे या पुस्तिकेमध्ये पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र व नावाचा उल्लेख नाही. तसेच भाजपलाही पुस्तिकेत स्थान देण्यात आलेले नाही. मेनका गांधी यांनी त्यांच्या मतदारसंघात, उत्तर प्रदेशातील पीलीभीत येथे जाऊन या पुस्तिकेचे प्रकाशन केले.  
==========================================
पारंपरिक अंत्यविधीसाठी बाहेर काढले पार्थिव

नागपूर - लोहमार्ग पोलिसांसह नलिनी डॅनीयल आणि मीनाक्षी रिफली.

आईच्या इच्छापूर्तीसाठी अमेरिकन मुलींची धडपड, बनारसला अस्थिविसर्जन, तर उज्जैनला पिंडदान
नागपूर - अनिवासी भारतीय महिलेचा धावत्या रेल्वेत मृत्यू झाला. हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार व्हावा, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत स्थायिक मुली नागपुरात आल्या. आईचे पुरलेले पार्थिव बाहेर काढून हिंदू परंपरेने अंत्यसंस्कार केले. बनारसला अस्थिविसर्जनानंतर उज्जैनला जाऊन उर्वरित धार्मिक विधी पूर्ण केले.

उमादेवी विनोद शर्मा (७०) असे मृत आईचे नाव आहे. त्या मुळच्या भारतीय असल्यातरी अमेरिकेतील वर्जेनिया येथे वास्तव्यास होत्या. त्यांच्या तिन्ही विवाहित मुलीदेखील अमेरिकेतच स्थायिक आहेत. नातेवाइकांच्या भेटीसाठी उमादेवी भारतात आल्या होत्या. हैदराबाद-दिल्ली दुरांतो गाडीतून प्रवास करीत असताना वाटेतच १७ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. नागपूर स्थानकावर मृतदेह उतरवून घेण्यात आला. उमादेवीसोबत असलेल्या नातेवाइकाच्या उपस्थितीत मोक्षधाम घाटावर पुरण्यात आले. उमादेवींनी मुलींकडे हिंदू पद्धतीने अंत्यसंस्काराबाबत इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार, नलिनी जासेफ डॅनीयल आणि मीनाक्षी शॉन रिफली या दोन मुली २७ एप्रिल रोजी नागपुरात आल्या. त्यांनी आईच्या पार्थिवावर परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी आवश्‍यक प्रशासकीय प्रक्रियाही पूर्ण केली. लोहमार्ग पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढून मोक्षधाम घाटावरच मुलींनी पार्थिवाला अग्नी दिला. यानंतर दुसऱ्या दिवशी बनारस येथे जाऊन अस्थिविसर्जन केले.

श्रीरामाने वडील दशरथ यांच्या मृत्यूनंतर उज्जैनला पिंडदान केले होते. सध्या उज्जैनला कुंभमेळा सुरू आहे. याबाबत माहिती कळताच नलिनी जोसेफ पुन्हा भारतात आली. तिने शीप्रा नदीच्या तिरावर उर्वरित विधी पार पाडले.

प्रसंगाचा पुस्तकात उल्लेख करणार
नलिनी जोसेफ यांनी विधी पूर्ण केल्यानंतर स्वत:हून लोहमार्ग पोलिस अधीक्षक राजीव जैन यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या सहकार्यासाठी आभार मानले. लवकरच पुस्तक लिहिणार असून, या कथानकाचा त्यात उल्लेख असेल. घटनाक्रमाचे फोटो आणि पोलिसांचे सहकार्य पुस्तकात मांडण्याचा मानस तिने बोलून दाखविला.

==========================================
सांभाळ या घराला बोलून बाप गेला...



मातीत जीवनाला गाडून बाप गेला साऱ्याच भावनांना जाळून बाप गेला ओल्याच आसवांनी केले बकाल आम्हा सांभाळ या घराला बोलून बाप गेला सावनेर येथील कवी गणेश भाकरे यांच्या या ओळी. अशीच काहीशी वाताहात यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दाभडी येथील राठोड कुटुंबाची झाली आहे. येथील विठ्ठल सवाई राठोड यांनी २४ फेब्रुवारी २०१५ रोजी आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी (मध्यभागी) रुख्मा आणि कन्या माया आणि छाया. वडील गेल्यानंतर या सर्वांचा घर सांभाळण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. ‘सकाळ’च्या स्वयंसिद्धा अभियानातून यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना स्वावलंबी करणार
दाभडी (जि. यवतमाळ) - नरेंद्र मोदींनी पंतप्रधान होण्यापूर्वी ‘चाय पे चर्चा’ घेतल्यामुळे दाभडी गाव चर्चेत आले. याच गावात एक दोन नव्हे तब्बल १२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. शेतीप्रश्‍नाने किती उग्र रूप धारण केले आहे, हे या गावातील ‘शेतकरी आत्महत्यां’तून कळते. या गावातील शेतकरी कुटुंबांना स्वावलंबी करण्यासाठी स्वसंसिद्धा अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे.

दैनिक सकाळ आणि युवा चेतना मंच या संघटनेच्या वतीने जिजाऊ जयंतीदिनापासून स्वयंसिद्धा अभियानाचा प्रारंभ झाला. हिंगणघाट तालुक्‍यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शिवणयंत्र, खेळण्याचे दुकान, महिलांसाठीच्या वस्तूंचे दुकान, शेवया, कुरोड्या, पापडांच्या यंत्राचे सेट आदी वाटप करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्‍यात ‘यिन’च्या पुढाकाराने साहित्य वाटप करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात आर्णी तालुक्‍यातील दाभडी या गावाची निवड करण्यात आली असून, नुकतीच या गावातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी दिल्या. त्यातून काही कुटुंबांची प्रारंभिक मदतीसाठी निवड करण्यात आली. त्यांना शिवणयंत्र, महिलांच्या वस्तूंचे दुकान, किराणा दुकानातील साहित्य आणि सौर कुंपण आदी वाटप करण्यात येणार आहे.

दाभडी भागातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि जळका येथील तलाठी श्‍याम रणनवरे यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाला हिंगणघाट येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा.  दिवाकर गमे, पैसेवारीच्या जनहित याचिकेमुळे महाराष्ट्रभर चर्चेत आलेले देवानंद पवार, राजू चव्हाण, गावाचे सरपंच, डॉ. स्वप्नील रेवतकर, युवा चेतना मंचचे दत्ता शिर्के, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे, अमरावती येथील सुनील धोटे, महालेखाकार कार्यालयातील अधिकारी आदी उपस्थित राहतील.

महालेखाकार कार्यालयाने दिले बळ 
‘सकाळ’च्या स्वयंसिद्धा अभियानाला नागपूर येथील महालेखाकार (लेखा परीक्षा) आर्थिक मदत दिली होती. त्यातूनच येथील कुटुंबांना मदत देणे शक्‍य होणार आहे.

सहृदयांना मदतीचे आवाहन 
दाभडी गावात एक नव्हे तर अनेक समस्या आहेत. त्यावर ‘स्वयंसिद्धा अभियाना’तून येथे टप्प्याटप्प्याने मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी सहृदयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. संपर्कासाठी - ९८५०२०९९४५
==========================================
सरकारी महाविद्यालयांत ‘सीईटी’नुसार प्रवेश

नवी दिल्ली - बरीच भवती न भवती झाल्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेबाबतच्या (नीट) अध्यादेशावर आज सकाळी स्वाक्षरी केली. यानुसार विरोध असणाऱ्या राज्यांत "नीट‘ परीक्षा किमान वर्षभर पुढे ढकलण्याचा मार्ग तूर्तास मोकळा झाला आहे. दरम्यान, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना "नीट‘च्याच माध्यमातून प्रवेश द्यावे लागतील, असे आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत एमबीबीएसच्या 2810 जागा आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील ज्या लाखो मुलांनी नीट दिली होती, त्यांचे काय, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. राज्य सरकारांसमोर त्यांच्या जागांसाठी वेगळी स्वत:ची प्रवेश परीक्षा घ्यावी किंवा "नीट‘द्वारे प्रवेश करावा, असे पर्याय ठेवण्यात आले आहेत व खासगी महाविद्यालयांसाठी मात्र "नीट‘ सक्तीची आहे. 
==========================================
महाराष्ट्राचे हक्‍काचे पाणी गुजरातला

मुंबई - दुष्काळाच्या झळांनी महाराष्ट्राची जनता पाणी पाणी करत असताना, राज्य सरकारने मात्र गुजरातच्या दबावाखाली नर्मदा खोऱ्यातील हक्‍काच्या पाच टीएमसी पाण्यावरच पाणी सोडले आहे. न्यायालयाच्या निर्णयाने नर्मदा खोऱ्यातून मिळालेल्या अकरा टीएमसी पाण्यापैकी महाराष्ट्राने गुजरातच्या मागणीनंतर पाच टीएमसी पाण्यावरचा हक्‍क सोडला आहे. याबाबतचा करारदेखील सात जानेवारी 2015 रोजी करण्यात आला असून, तापी सिंचन महामंडळाचा या कराराला विरोध असल्याचे समोर आले आहे. 

आंतरराज्य पाणीवाटपात महाराष्ट्राने मागील पंधरा वर्षे लढा दिल्यानंतर न्याय हक्‍काचे पाणी पदरात पडले आहे. त्यातच नर्मदा खोऱ्यातले हक्‍काचे पाणी गोदावरीत आणून मराठवाड्याच्या दुष्काळावर मात करण्याचे आडाखे बांधले जात आहेत. मात्र राज्य सरकारने मागील पंधरा वर्षे सुरू असलेल्या गुजरातसोबतच्या वादात माघार घेत पाच टीएमसी पाणी देण्याच्या करारावर स्वाक्षरी करत सपशेल माघार घेतल्याचे चित्र आहे. 

तेलंगणाच्या मेडिगट्‌टा धरणाला परवानगी देऊन विदर्भातल्या जिल्ह्यात रोष आहे. त्यातच नर्मदेतले पाणीही गुजरातला दिल्याने उत्तर महाराष्ट्रात वाद पेटण्याची शक्‍यता आहे. 
==========================================
कर चुकविणाऱ्यांची नावे जाहीर होणार

नवी दिल्ली - येत्या आर्थिक वर्षापासून प्राप्तिकर विभागाने एक कोटींहून अधिक कर बुडविलेल्या व्यक्तींची नावे जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्राप्तिकर विभागाने गेल्या वर्षापासूनच करचुकवेगिरी करणाऱ्यांची नावे वर्तमानपत्रांमधून जाहीर करण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत 67 जणांची नावे जाहीर केली असून त्यांचे पत्ते, संपर्क, पॅन क्रमांक अशी माहिती छापण्यात येत आहे. मात्र, हे सर्व वीस ते तीस कोटी आणि त्याहून अधिक कर चुकविणारे आहेत. नव्या निर्णयामुळे एक कोटी आणि त्यापेक्षा अधिक रुपयांची करचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्यांची नावे जाहीर करण्याचा निर्णय झाल्याने अनेक लोकांची नावे जाहीर होण्याची शक्‍यता आहे. ही नावे पुढील वर्षी 31 जुलैपूर्वी जाहीर करण्यात येतील.
हा निर्णय जाहीर करणारे परिपत्रक सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्‍ट टॅक्‍सेसने (सीबीडीटी) जारी केले आहे. अनेक उपायांनीही ज्या करचुकवेगिरी करणाऱ्यांविरोधात पोचता येत नाही, त्यांची नावे जनतेला समजावीत, हा यामागील हेतू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ही सर्व नावे वृत्तपत्रांबरोबरच प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध केली जाणार आहेत. 

==========================================

No comments: