Tuesday, 3 May 2016

नमस्कार लाईव्ह ०३-०५-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- आम्ही एफ-16 विमानं कुठूनही खरेदी करू, पाकिस्ताननं अमेरिकेला ठणकावलं 
२- अंकारा; टर्कीच्या संसदेमध्येच खासदारांची तुफान हाणामारी 
३- पाकिस्तानातील हिंदूंच्या मंदीरांचं संरक्षण करणार - हाफीज सईद 
४- ...नाहीतर दुसरीकडून एफ-16 खरेदी करु:पाकिस्तान 
५- भारत इराणला दीड टक्का दराने व्याज देणार 
६- ट्विटरची डुबकी, फेसबुकची तेजी 
७- ब्राझीलमध्ये तपासासाठी व्हॉट्सअॅपवर बंदी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
८- पठाणकोट हल्ला झालाच कसा?: संसदीय समिती 
९- आधी तुमच्या देशातील असहिष्णुता पाहा- भाजप 
१०- खासदारांच्या 'अच्छे दिना'वर मोदींची नाराजी! 
११- धक्कादायक ! बंगळुरुत भररस्त्यातून तरुणीचं अपहरण 
१२- सर्वोच्च न्यायालयात 'नीट'बाबत गुरुवारी सुनावणी 
१३- डिझेल वाहन बंदीबाबत दिल्ली सरकार न्यायालयात 
१४- आसाममध्ये गेंड्याच्या शिकारीबद्दल नऊ अटकेत 
१५- मॉन्सूनच्या बीजरोपणाला प्रारंभ 
१६- नाशिक; पारख यांच्या सोन्याच्या शर्टची 'गिनीज' मध्ये नोंद 
१७- दिल्ली विद्यापीठ इतरांसाठी आदर्श-हमीद अन्सारी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१८- स्वतंत्र विदर्भाचे निशाण फडकवणारी ही अवलाद कुणाची?, उद्धव ठाकरेंची सणसणीत टीका 
१९- शिर्डी; शिर्डीत अवघ्या सव्वा रुपयात सर्वधर्मीयांचा विवाह, 41 जो़डपी लग्नबंधनात 
२०- मुंबई; विमानतळावर वॉशिंग मशिनमधून 60 लाखांच्या सोन्याची तस्करी 
२१- पुण्यात मनसेची सिंचन भवनात घुसून तोडफोड 
२२- मराठवाड्यातील धरणांत केवळ 2% पाणीसाठा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- सिंधुदुर्ग; वाळू उपसा प्रकरण: सेनेचे आमदार वैभव नाईकांसह 15 संशयितांना अटक 
२४- अहमदनगर; ‘शांताबाई’वरुन नगरमध्ये राडा, तलवारी काढत तुफान हाणामारी 
२५- बुलडाणा; पाण्याच्या शोधात नीलगाय नाल्यात पडून जखमी
२६- सोलापूर : मोटारसायकलची जोरदार धडक, दोन ठार 
२७- मेट्रोच्या प्रवाशांना २० जूनपर्यंत दिलासा 
२८- नागपुरात एमआयडीसी गाडगेनगरात घरफोडी करून 20 लाखांची लूट 
२९- सोलापूर मध्य रेल्वेच्या पार्सल विभागाला लागली आग, २० मोटारसायकली जळून खाक, अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू 
३०- सोलापूर : ११ वर्षीय मुलाचे अपहरण, जोडभावी पेठ पोलीस चौकीत गुन्हा दाखल़ 
३१- बीड - परळी तालुक्यातील तडोळी गावात विहिरीवर पाणी काढतांना 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू 
३२- लातूरमध्ये कला पथकाची जीप पुलावरून कोसळून चौघांचा मृत्यू, चार जखमी. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३३- क्रिकेट: जूनमध्ये भारताचा झिंबाब्वे दौरा 
३४- 'बाहुबली'च्या डाएटमधील मोठी अडचण 
३५- मराठी 85, इंग्रजी 73, 'सैराट'मधील आर्चीचं नववीतील मार्कशीट 
३६- विराट 'खेलरत्न', रहाणे 'अर्जुन' पुरस्काराने होणार सन्मानित 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
समृध्दता हे एक जगण्याचे साधन आहे, त्याची पूजा करून दैवत बनायचे नसते.
(संदीप सावते, नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

=========================================

वाळू उपसा प्रकरण: सेनेचे आमदार वैभव नाईकांसह 15 संशयितांना अटक

वाळू उपसा प्रकरण: सेनेचे आमदार वैभव नाईकांसह 15 संशयितांना अटक
सिंधुदुर्ग : मालवण कालावल वाळू उपशाप्रकरणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह 15 संशयितांना अटक करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान कायदेभंग केल्याचा आरोप प्रकरणी यांनी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

गेल्या वर्षी वाळू उपशावरील आंदोलनादरम्यान कायदेभंग केला होता. वर्षभरापासून हे प्रकरण प्रलंबित होतं.

वाळू चोरीप्रकरणी तहसीलदार वनिता पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आमदार वैभव नाईक यांच्यासह 26 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा प्रशासनाने वाळू उत्खनन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करुन, होड्या जप्त केल्या होत्या. त्यानंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी मालवण कालावल खाडीतील सील तोडून, वाळू उत्खनन व वाहतूक करण्यासाठी आंदोलन केलं होतं.
=========================================

‘शांताबाई’वरुन नगरमध्ये राडा, तलवारी काढत तुफान हाणामारी

‘शांताबाई’वरुन नगरमध्ये राडा, तलवारी काढत तुफान हाणामारी
अहमदनगर अहमदनगरच्या श्रीगोंद्यात तमाशात नाचण्यावरुन तुफान हाणामारी झाली आहे. ‘शांताबाई’ या गाण्यावर नाचण्यासाठी दोन राजकीय गटात झालेल्या हाणामारीत चक्क तलवारी काढण्यात आल्या. या मारहाणीत सतीश म्हस्के आणि किरण म्हस्के गटाचे दहा जण जखमी झाले असून तिघांची तब्येत गंभीर आहे. 
चांडगावला भैरवनाथच्या यात्रेनिमित्त गावात तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शांताबाईचं गाणं सुरु झाल्यावर काही तरुणांनी ठेका धरला. त्यावेळी पाठीमागून नाचणाऱ्या तरुणांना विरोध सुरु झाला आणि दगडफेक सुरु झाली. त्यानंतर तलवार आणि काठीनं मारहाण सुरु झाली. 
या सर्व प्रकारामुळे प्रचंड गोंधळ उडाल्यानं नागरिक सैरभैर पळू लागले, तर काहींनी ट्रक आणि कलावंतांच्या तंबूचा आसरा घेतला. 
या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीमागं ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद असल्याचं बोललं जात आहे.
=========================================

शिर्डीत अवघ्या सव्वा रुपयात सर्वधर्मीयांचा विवाह, 41 जो़डपी लग्नबंधनात

शिर्डीत अवघ्या सव्वा रुपयात सर्वधर्मीयांचा विवाह, 41 जो़डपी लग्नबंधनात
शिर्डी :  अवघ्या सव्वा रुपयात सर्वधर्मीयांचा सामूहिक विवाह सोहळा साईंच्या शिर्डीत पार पडला. महत्त्वाचं म्हणजे तब्बल 41 जोडपी यावेळी विवाहबंधनात अडकली.

या अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. कारण या लग्नात भव्य मंडपही होता, जेवणावळीही आणि आतिषबाजीही झाली. मात्र वधू वरांना खर्च आला, फक्त सव्वा रुपया..

थाटात लग्न लागलं फक्त सव्वा रुपयात. सव्वा रुपया म्हटल्यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. पण साई सिद्धी चॅरिटेबल ट्स्टचे कैलास कोते आणि नागरिकांच्या मदतीतून सामूहिक विवाह सोहळा गेल्या 15 वर्षांपासून सुरु आहे. नुकतीच 41 जोडपी विवाह बंधनात अडकली.

साई सिद्धी चॅरिटेबल ट्स्टने आतापर्यंत 1500 लग्न लावल्याचं कैलास कोते यांनी सांगितलं.

सर्व धर्माची जोडपी भव्य मंडपात एकत्र आली. त्याच्या पाहुण्यांचीही सोय करण्यात आली. प्रत्येक जोडप्याचं लग्न त्यांच्या धर्माच्या परंपरेनुसार अगदी विधीवत पद्धतीनं लावण्यात आलं..

विशेष म्हणजे नवविवाहित जोडप्यांच्या अपत्यांचीही काळजी करत, मुलगी जन्माला आल्यास 5 हजारांचं फिक्स डिपॉझिटही करण्यात येणार आहे.

सध्या राज्यात भीषण दुष्काळ आहे. शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही…मात्र यंदाही साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिर्डीतल्या ग्रामस्थांनी सामाजिक भान जपलंय. म्हणूनच ग्रामीण भागातील तरुण, तरुणींचं लग्न पार पडलं. तेही थाटात. लग्नात अगदी भव्य मंडप, जेवणावळी..आणि आतिषबाजीही..
=========================================

विमानतळावर वॉशिंग मशिनमधून 60 लाखांच्या सोन्याची तस्करी

विमानतळावर वॉशिंग मशिनमधून 60 लाखांच्या सोन्याची तस्करी
मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून 19 किलो सोन्याची बिस्कीटं जप्त केली आहेत. विशेष म्हणजे आखाती देशातून आलेल्या या प्रवाशाने एका वॉशिंग मशीनमध्ये सोनं लपवून आणलं होतं, मात्र ते कस्टम अधिकाऱ्यांच्या नजरेतून वाचलं नाही.

मशीनच्या काही पार्ट्समध्ये सोनं लपवण्यात आलं होतं. मशीन पूर्णपणे उघडून त्यातून सोन्याची 19 बिस्किटं जप्त करण्यात आली. या प्रत्येक बिस्किटाचं वजन 2204 ग्रॅम होतं. या सोन्याची किंमत जवळपास 60 लाख 15 हजार रुपये आहे.

मुंबई विमानतळावर रात्री उशिरा मोहम्मद अस्लम शेख हा भारतीय प्रवासी आला. रियाधहून तो जेट एयरवेजच्या विमानाने मुंबईला आला होता. कस्टम अधिकाऱ्यांना त्याच्या सामानाची तपासणी करताना त्यात वॉशिंग मशीन पाहून थोडं आश्चर्य वाटलं, तसंच संशयही आला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मशिन उघडून पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

सर्वाधिक सोनं मशीनच्या मोटरमध्ये लपवून ठेवण्यात आलं होतं. कस्टमने सगळं सोनं जप्त केलं असून आरोपीची अधिक चौकशी सुरु आहे.
=========================================

'बाहुबली'च्या डाएटमधील मोठी अडचण

'बाहुबली'च्या डाएटमधील मोठी अडचण
मुंबई: ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास ‘बाहुबली 2’ या सिक्वलसाठी प्रचंड मेहनत घेत आहे. त्यासाठी प्रभास त्याच्या डाएट चार्टचं तंतोतंत पालन करत आहे. पण प्रभास एका मोठ्या अडचणीत सापडला आहे. कारण, डाएटमध्ये त्याला जंक फूड, फास्ट फूड, गोड पदार्थ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आईस्क्रिम खाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पण आईस्क्रिमला मनाई म्हणजे प्रभाससाठी अशक्य गोष्ट आहे.

प्रभासचा आईस्क्रिम हा सर्वात आवडता पदार्थ असून फ्रूट इक्झॉटिका हा त्याचा आवडता फ्लेवर आहे. आवडीचा पदार्थ म्हणजे त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. मात्र प्रभास दिग्दर्शक राजमौली यांची परवानगी घेऊन, आईस्क्रिमवर ताव मारतो.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’ या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या सिनेमाच्या यशासोबतच ‘बाहुबली’चा दुसरा भाग म्हणजेच ‘बाहुबलीः द कन्क्लुजन’ हा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर 14 एप्रिल 2017 रोजी मिळणार आहे.
=========================================

मराठी 85, इंग्रजी 73, 'सैराट'मधील आर्चीचं नववीतील मार्कशीट

मराठी 85, इंग्रजी 73, 'सैराट'मधील आर्चीचं नववीतील मार्कशीट !
पंढरपूर : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मोहर उमटवलेली ‘सैराट’फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने रिअल लाईफमध्येही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.  रिंकूने नववीमध्ये तब्बल 81.06 टक्के गुण मिळवले आहेत.

रिंकू अर्थात प्रेरणा महादेव राजगुरूचं मार्कशीटही एबीपी माझाला मिळालं आहे. रिंकूने ‘सैराट’ सिनेमातील अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेतच, पण तब्बल 81 टक्के गुण मिळवून, शिक्षणातही आपण सुसाट असल्याचं तिने दाखवून दिलं आहे.
Rinku Rajguru Marksheet 2-compressed
रिंकू राजगुरुचा नुकताच निकाल जाहीर झाला. रिंकू अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालामध्ये शिक्षण घेत आहे.

रिंकूसाठी हे वर्ष चांगलेच लकी ठरले आहे, असंच म्हणावे लागेल. ‘सैराट’मधील अभिनयानंतर राष्ट्रीय पुरस्कार, आताची सैराटची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी आणि शिक्षणामध्येही अव्वल येऊन रिंकूने चाहत्यांवर छाप सोडली आहे.
=========================================

पुण्यात मनसेची सिंचन भवनात घुसून तोडफोड

  • ऑनलाइन लोकमत
    पुणे, दि. 3 - पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसताना दौंड आणि इंदापूर तालुक्यासाठी पाणी सोडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिंचन भवन  इमारतीत घुसून तोडफोड केली. 
    पुणे शहराला पुरेसा पाणीसाठा नसताना कालव्यातून पाणी सोडण्याच्या घेण्यात आलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून हे पाऊल उचलल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. पाणी सोडण्यास विरोध नसून पालक मंत्री गिरीश बापट यांच्या हुकूमशाही पध्दतीला विरोध असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.
    खडकवासला कालवा समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार आमदार आणि महापालिका पदाधिकारी यांच्या बैठकीनंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते.
    मात्र, केवळ पालक मंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी दोघांनीच हा निर्णय घेतला.
=========================================

आम्ही एफ-16 विमानं कुठूनही खरेदी करू, पाकिस्ताननं अमेरिकेला ठणकावलं

  • ऑनलाइन लोकमत
    इस्लामाबाद, दि. 3- पाकिस्ताननं एफ 16 विमानं आम्ही कुठूनही खरेदी करू, अशा इशाराच अमेरिकेला दिला आहे. जर अमेरिकेनं आम्हाला एफ 16 विमानं खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही, तर आम्ही दुसरीकडून विमानं खरेदी करू, असा सल्लावजा इशाराच पाकिस्ताननं अमेरिकेला दिला आहे.
     आमच्यासाठी एफ 16 विमानं महत्त्वाची आहेत. मात्र दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही जेएफ-17 थंडर विमानंही वापरू, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार सरताज अजिज यांनी म्हटलं आहे. जेएफ-17 थंडर विमानं चीन आणि पाकिस्ताननं एकत्रितपणे विकसित केली आहेत. ही विमानं पाकिस्तान हवाई दलामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, असाही इशारा सरताज अजिज यांनी दिल आहे. 
    पाकिस्ताननं अमेरिकेकडून खरेदी केलेल्या एफ-16 विमानांचं पूर्ण पैसे द्यावेत, असं ओबामा सरकारकडून आधीच सुनिश्चित करण्यात आलं होतं. या विमान खरेदीत पाकिस्तानला कोणतेही अनुदान मिळणार नसल्याचं अमेरिकेनं आधीच स्पष्ट केलं आहे.
=========================================

विराट 'खेलरत्न', रहाणे 'अर्जुन' पुरस्काराने होणार सन्मानित

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. ३ : भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड (बीसीसीआय़)ने क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च व प्रतिष्ठित अशा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नावाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. याबरोबरच बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी अजिंक्य रहाणेच्या नावाची शिफारीश केली आहे. बीसीसीआयने चार वर्षानंतर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी एखाद्या क्रिकेटपटूच्या नावाच्या शिफारीश केली आहे.
    राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी यापूर्वी २०१२ साली माजी कर्णधार राहुल द्रविडच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु त्यावेळी लंडन ऑलंपिक पदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि निशानेबाज विजय कुमार यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
    आतापर्यंत केवळ दोन क्रिकेटपटूंना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामध्ये सचिन तेंडुलकर (१९९७-९८) आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (२००७) यांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. कोहलीला २०१३ यावर्षी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
    भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज क्रीडा मंत्रालयाकडे कोहली आणि अजिंक्य रहाणेची पुरस्कांरासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. विविध क्रीडा प्रकारातून या पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस करण्यात येत असते. क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल बीसीसीआयने या दोघांची शिफारस केलेली आहे. कोहलीला देशातील सर्वोच्च क्रिडा पुरस्कारासाठी निशानेबाज जीतू राई, गोल्फर अनिर्बान लहरी, स्क्वॉश खेळाडू दीपिका पल्लीकल तथा एथलीट टिंटू लुका यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे.
=========================================

स्वतंत्र विदर्भाचे निशाण फडकवणारी ही अवलाद कुणाची?, उद्धव ठाकरेंची सणसणीत टीका

  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. 03 - महाराष्ट्र दिनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवरुन करण्यात आलेल्या आंदोलनावर शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून सणसणीत टीका केली आहे. महाराष्ट्र राज्य काळे फुगे आकाशात सोडून निर्माण झाले नाही, तर पंडित नेहरूंसारख्या शक्तिमान नेत्यांच्या मोटारींपुढे आडवे पडून, प्रतापगडावर त्यांना काळे झेंडे दाखवून आणि पोलिसांच्या लाठ्या व गोळ्या खाऊन निर्माण झाले आहे. पुन्हा हे सर्व करताना आंदोलकांच्या हातात हिंदुस्थानचाच तिरंगा होता. महाराष्ट्राने बंडाचे स्वतंत्र निशाण फडकवून हे राज्य मागितले नव्हते. स्वतंत्र विदर्भाचे निशाण फडकविणार्‍या अवलादीने हे लक्षात घ्यायला हवे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 
    विदर्भाला बदनाम करण्याचे हे राष्ट्रद्रोही कारस्थान आहे. ते उधळून लावलेच पाहिजे. नागपुरात काही मंडळींनी एकत्र येऊन वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवला व काळ्या रंगाचे फुगे आकाशात सोडले. त्यानंतर बाजूच्या रसोईत जाऊन सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला, पण अशा नवथर मंडळींकडे फारसे लक्ष न देता महाराष्ट्रीय जनतेने आपली घोडदौड सुरू ठेवली पाहिजे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. 
    हिंदुस्थान हे एक सार्वभौम असे स्वतंत्र राष्ट्र आहे व अनेक संघराज्यांचे मिळून ते बनले आहे. ही राज्ये म्हणजे स्वतंत्र राष्टे्र नाहीत. त्यामुळे कोणत्याही राज्याचा स्वतंत्र ध्वज व स्वतंत्र संविधान असूच शकत नाही. सगळ्यांचा ध्वज एकच तो म्हणजे तिरंगा. असे असताना तथाकथित विदर्भवाद्यांनी विदर्भ राज्याचा स्वतंत्र ध्वज फडकवून देशाच्या घटनेशी व तिरंग्याशी द्रोहच केला आहे आणि हा द्रोह केल्यानेच तो खर्‍या अर्थाने काळा दिवस ठरला असे आम्ही मानतो असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
=========================================

बुलडाण्यात पाण्याच्या शोधात नीलगाय नाल्यात पडून जखमी

  • ऑनलाइन लोकमत - 
    बुलडाणा, दि. 03 - दुष्काळाचा फटका फक्त माणसांनाच नाही तर मुक्या जनावरांनाही बसत आहे. पाण्याच्या शोधात भटकी जनावरं गावागावात फिरताना दिसत आहे. अशाच प्रकारे पाण्याच्या शोधात बाहेर पडलेली नीलगाय नाल्यात पडून जखमी झाली आहे. पाडळी मार्गावरील पळसखेड नाईक गावात ही घटना घडली आहे. काल रात्री नीलगाय पाण्याच्या शोधात ग्रामपंचायत इमारतीच्या सांडपाण्याच्या नालीत पडून गंभीर जखमी झाली आहे. सध्या तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
=========================================

सोलापूर : मोटारसायकलची जोरदार धडक, दोन ठार

  • ऑनलाइन लोकमत
    सोलापूर. दि. ३  : मंद्रुप-निंबर्गी रस्त्यावर कुंभार तलावाजवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन भिमराव उर्फ आप्पासाहेब नवघरे (वय ४५ रा़ भंडारकवठे) व चंद्रकांत कल्लप्पा राजबिदले (वय ४४ रा़ मंद्रुप) हे दोघे जागीच ठार झाले आहेत़ तर खंडू रामा तुर्भे व राघवेंद्र चंद्रकांत राजाबेंदले हे दोघेजण गंंभीर जखमी झाले आहेत़
    भिमराव नवघरे व खंडू रामा तुर्भे हे दोघेजण हिरोहोंडा स्पेल्डर एमएच १३ डीजी ७८८७ वरून मंद्रुपहुन भंडारकवठेकडे जात होते़ तर चंद्रकांत राजाबेंदले व राघवेंद्र राजाबेंदले हे दोघे सेट्रींग काम करणारे पितापुत्र होंडा गाडी एमएच १३ सीसी ९३२ वरून भंडारकवठ्याहुन मंद्रुपला जात होते़ दोघांची निंबर्गी-मंद्रुप रस्त्यावरील जे़जी़पाटील इंग्लिश मेडियम स्कुलजवळील कुंभार तलावाजवळ समोरासमोर जोरदार धडक बसली़ या धडकेत नवघरे व राजबंदिले यांचा मृत्यू झाला़ तर खंडू तुर्भे व राघवेंद्र राजबंदिले हे दोघेजण जखमी झाले़
    या अपघाताचे वृत्त समजताचमंद्रुपचे सपोनि अजित त्रिपुटे, उपसरपंच रमेश नवले, भंडारकवठेचे रफीकअहमद मुजावर व इतर बचावकार्य करून जखमींना उपचारासाठी मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ याप्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
=========================================

जळगाव : पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

  • ऑनलाइन लोकमत -
    जळगाव, दि. ३ - राज्य दुष्काळाने होरपळत असताना जळगातील मात्र मुख्य जलवाहिनींना लागलेल्या गळतीमुळे ४ - ५ दिवसांपासून हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे.
    एकीकडे दुष्काळाचा सामना करावा लागत असताना जळगावतील मुक्ताईनगर बोदवड रस्त्यावरील निमखेड फाट्या जवळ 4 ते 5 दिवसापासून पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया जात आहे .पाईपलाईन फुटून ५ दिवस उलटले असतानादेखील दुरुस्तीचं काम करण्यात आलेलं नाही.
=========================================

मेट्रोच्या प्रवाशांना २० जूनपर्यंत दिलासा

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई. दि ३ : मुंबई मेट्रोची भाववाढ पुन्हा टळली आहे. मेट्रो भाववाढीच्या याचिकेवरची सुनावणी २० जूनपर्यंत पुढे ढकलली आहे त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांना २० जूनपर्यंत दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयात दरवाढीची अंतिम सुनावणी २० जूनला होणार आहे. 
    १ डिसेंबर २०१५ पासून मेट्रोच्या भाड्यात ५ रुपये वाढ करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वनने घेतला. या निर्णयाविरुद्ध एमएमआरडीएने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
=========================================

धक्कादायक ! बंगळुरुत भररस्त्यातून तरुणीचं अपहरण

  • ऑनलाइन लोकमत - 
    बंगळुरु, दि. 03 - तरुणीचं तिच्याच घरासमोरुन अपहरण करुन बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आश्चर्याची गोष्टी म्हणजे या 22 वर्षीय तरुणीचं अपहरण होत असताना रस्त्यावरुन जाणा-यांनी मात्र बघ्याची भुमिका घेतली. तरुणी मदतीसाठी ओरडत असतानादेखील मदतीला कोणीच धावून आलं नाही. हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 
    23 एप्रिलला दक्षिण बंगळुरुमध्ये ही घटना घडली. ही पिडीत तरुणी रस्त्यावर फोनवर बोलत उभी होती. त्यावेळी एका व्यक्तीने तिचं अपहरण केलं. महत्वाचं म्हणजे ही तरुणी राहत असलेल्या घरासमोरुनच तिचं अपहरण करण्यात आलं. अपहरपणकर्त्याने तोंडावर कपडा बांधला होता. त्याने तिला ओढतच नेले. हे अपहरणनाट्य चालू असताना एक महिला आणि स्कूटरवर दोन व्यक्ती जाताना दिसत आहेत. मात्र त्यांच्यापैकी कोणीच मदतीला धावून गेलं नाही. ही पिडीत तरुणी मणिपूरची राहणारी असल्याची माहिती मिळाली आहे. 
    पिडीत तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 'माझं अपहरण करुन बांधकाम सुरु असलेल्या एका ठिकाणी नेऊन माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मी ओरडत असल्याने अपहरणरकर्त्याने लोक जमतील या भीतीने तेथून पळ काढला', अशी माहिती तरुणीने पोलिसांना दिली आहे. 'मी ओरडत असताना त्याने माझं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. बचाव करण्यासाठी मी त्याला चावले. त्याने मला मारहाण केल्यानंतर मी बेशुद्ध पडले होते', असंही तरुणीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. 
    या घटनेनंतर पिडीत तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. तिने प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली होती. कर्नाटक महिला आयोगच्या अध्यक्षा मंजुला यांनी पोलिसांनी कारवाई घेतलीच पाहिजे असं म्हटलं आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.  
=========================================

टर्कीच्या संसदेमध्येच खासदारांची तुफान हाणामारी

  • ऑनलाइन लोकमत
    अंकारा (टर्की), दि. 3 - टर्कीचा सत्ताधारी पक्ष एके पार्टी आणि कुर्दीश विरोधक पक्षाचे सदस्य यांच्यामध्ये संसदेमध्ये अक्षरश: लाथाबुक्यांची हाणामारी झाली असून त्यामध्ये अनेकजणजखमी झाले आहेत. संसदपटूंना अटक करता येत नाही, या तरतुदीवरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीमध्ये झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
    संसदपटूंना या कायद्यान्वये असलेले कायदेशीर संरक्षण काढून घ्यावे अशी सत्ताधारी एके पार्टीची मागणी आहे. मात्र, ही चाल कुर्दीश लोकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने त्यांच्याविरोधी असल्याचा दावा केला. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने हा असहिष्णू प्रकार असल्याचे म्हटले आणि आमचा आवाज दडपता येणार नाही असे ठणकावले.
=========================================

पाकिस्तानातील हिंदूंच्या मंदीरांचं संरक्षण करणार - हाफीज सईद

  • ऑनलाइन लोकमत
    इस्लामाबाद, दि. 3 - पाकिस्तानमधल्या हिंदूंच्या मंदीरांचा विध्वंस होऊ देणार नाही, असं वक्तव्य जमात उल दावा या संघटनेचा प्रमुख हाफीज सईदने केलं आहे. मुंबईवरच्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासाठी हाफीज सईदला मुख्य आरोपी म्हणून भारताने घोषित केले असताना आणि पाकिस्तानने त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली असताना सईदचं हे वक्तव्य अनेकांसाठी धक्कादायक आहे.
    सिंध प्रांतातल्या एका सभेत बोलताना सईदनं हिंदू बांधवांच्या प्रार्थनास्थळांचं रक्षण करणं आपलं कर्तव्य असल्याचं म्हटलं आहे. अन्य धर्मींयांच्या प्रार्थनास्थळांना आम्ही तोडू देणार नाही, असं सांगणाऱ्या सईदनं भारताच्या आरोपांचं खंडन केलं आहे. मदरशांच्या माध्यमातून कट्टर पंथीयांना सईद प्रोतास्हन देत असल्याचा आरोप असून आपण असं काही करत नसल्याचा दावा त्यानं केला आहे.
=========================================

ट्विटरची डुबकी, फेसबुकची तेजी!

  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २ : आजच्या टेक्नोसॅव्ही युगात आबालवृद्धांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेलं फेसबूक आणि ट्विटर यामध्ये आघाडीवर कोण जाणार यासाठी दोन्ही दररोज बदल करत असतात. आपले जाळे वाढवण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियामध्ये कोण अधिराज्य गाजवणार, या युद्धात ट्विटरवर आणि फेसबुक यांच्यापैकी फेसबुकने बाजी मारली आहे. अमेरिकेच्या नॅस्डॅक शेअर बाजारात फेसबुकचे शेअर झपाट्याने वाढत आहेत आणि दुसरीकडे ट्विटररने गेल्या वर्षभरात सपाटून मार खाल्ला आहे.
    गेल्या वर्षभरात फेसबुकचे शेअर जवळपास ५० टक्क्यांनी तेजीत आहेत तर ट्विटरचे शेअर्स ८० टक्क्यांनी घटले आहेत. 
    फेसबूक कंपनीच्या नफ्यात सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे महसूल ६५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढला. सोशल मीडियात फेसबुकची मोठी क्रेझ आहे. फेसबूकच्या युजर संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. नेटीझन्सचा फेसबुकच्याच इन्स्टाग्रामला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
    याउलट परिस्थिती ट्विटरची आहे. ट्विटर कंपनीच्या उत्पन्नात वर्षभरात फारशी तेजी आली नाही. गेल्या काही महिन्यांतील नफा फारसा उत्साहजनक नाही. युजर्सची संख्या वाढावण्यात म्हणावे तेवढे यश नाही. यामुळे सोशल मिडियात ट्विटरची डुबकी, फेसबुकची तेजी! बघायला मिळत आहे. 
=========================================
आसाममध्ये गेंड्याच्या शिकारीबद्दल नऊ अटकेत
जोऱ्हाट (आसाम)- काझिरंगा राष्ट्रीय उद्यानातील गेंड्याची शिकार करणाऱ्या नऊ शिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यात वनविभागाच्या बुरापहाड कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती उद्यानाचे विभागीय वन अधिकारी शुभाशिष दास यांनी दिली. 

सोमवारी (ता. 2) रात्री या टोळीने पूर्ण वाढ झालेल्या एका गेंड्याची शिकार करून त्याचे शिंग काढून घेतले व मृतदेह पुरून टाकला होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत केशव गयान, टोंकेश्वर बोरडोलोई व पिंकू दास या कर्मचाऱयांना अटक केली. 

शिवाय, मोस्ट वॉंटेड म्हणून हवे असलेले अदरीश अली, फपीक अली, सैफुल अली, इब्राहिम अली, सौरव अली व टारझन ओरांग यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने 22 नोव्हेंबर 2015 मध्ये गेंड्याची शिकार केली होती, असे दास यांनी सांगितले.
=========================================
क्रिकेट: जूनमध्ये भारताचा झिंबाब्वे दौरा
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात झिंबाब्वेच्या दौऱ्यावर जात असून या दौऱ्यात मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिकाच होणार आहे. यापूर्वीच्या नियोजनानुसार, भारताच्या झिंबाब्वे दौऱ्यात एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने आयोजित केले जाणार होते. त्याऐवजी आता तीन एकदिवसीय सामने आणि तीन ट्‌वेंटी-20 सामने असा नवा कार्यक्रम असेल. 

भारताच्या दौऱ्यातील सर्व सामने हरारे येथे होणार आहेत. या दौऱ्यातील पहिला सामना 11 जून रोजी होणार आहे. सध्या सुरू असलेली ‘इंडियन प्रीमिअर लीग‘ 29 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे झिंबाब्वे दौऱ्यासाठी संघात निवडलेल्या खेळाडूंना विश्रांतीसाठी कमी वेळ मिळणार आहे. यापूर्वी भारताने गेल्या वर्षी जुलैत झिंबाब्वेचा दौरा केला होता. त्यावेळी महेंद्रसिंह धोनी, विराट कोहलीसह संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व अजिंक्‍य रहाणेने केले होते. 

झिंबाब्वे दौऱ्यानंतर लगेचच भारत वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर न्यूझीलंड भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने होतील. त्यानंतर इंग्लंडही भारत दौऱ्यावर येत असून त्यात पाच कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक ट्‌वेंटी-20 सामना होईल. यानंतर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल होणार आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर आणि न्यूझीलंड भारतात दाखल होण्याआधी बांगलादेशविरुद्ध मायदेशात एक कसोटी सामना आयोजित होण्याची दाट शक्‍यता आहे. 

वेळापत्रक 
11 जून : पहिला एकदिवसीय सामना 
13 जून : दुसरा एकदिवसीय सामना 
15 जून : तिसरा एकदिवसीय सामना 
---------- 
18 जून : पहिला ट्‌वेंटी-20 सामना 
20 जून : दुसरा ट्‌वेंटी-20 सामना 
22 जून : तिसरा ट्‌वेंटी-20 सामना
=========================================
पठाणकोट हल्ला झालाच कसा?: संसदीय समिती
नवी दिल्ली - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेला रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल संसदीय समितीने तीव्र नाराजी दर्शवित देशाच्या दहशतवादविरोधी व्यवस्थेमध्ये गंभीर दोष असल्याचे मत आज (मंगळवार) व्यक्त केले. 

याचबरोबर, 2 जानेवारी रोजी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यावेळी पंजाब पोलिस दलाची भूमिकाही संशयास्पद व प्रश्‍न निर्माण करणारी असल्याचे कठोर मत या स्थायी समितीकडून व्यक्त करण्यात आले आहे. दहशतवादी हल्ला होण्यासंदर्भातील इशारा कितीतरी आधी देण्यात आला असताना कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या हवाई तळावर दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला कसा घडविला, असा प्रश्‍न या समितीने उपस्थित केला आहे. तेव्हा देशाच्या दहशतवादविरोधी यंत्रणेमध्ये काहीतरी गंभीर दोष असल्याची भावना या समितीकडून व्यक्त करण्यात आली आहे. 

पठाणकोट येथे जैश-इ-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेकडून घडविण्यात आलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 7 जवान हुतात्मा झाले होते. या पार्श्‍वभूमीवर सीमारेषेवर अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशा कानपिचक्‍याही समितीकडून देण्यात आल्या आहेत.
=========================================
मॉन्सूनच्या बीजरोपणाला प्रारंभ
- समुद्रावर वाऱ्यांच्या अनुकूलतेत वाढ 
- हवेच्या दाबाचा पॅटर्न होतोय निश्चित 
- विषुववृत्तीय भागात ढगांची दाटी 

संतोष डुकरे 
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) भारतीय उपखंडाच्या दिशेने वाटचाल सुरू होण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) बीजरोपणाला हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ प्रारंभ झाल्याचे चित्र आहे. हिंदी महासागराच्या ५० ते ७० रेखांश आणि पाच ते १० अक्षाशांदरम्यानच्या समुद्रसपाटीच्या पातळीवर विषुववृत्तीय भागापासून भारतीय उपखंडापर्यंत हवेचा दाब कमी कमी होत गेला आहे. यामुळे मॉन्सूनचे आगमन वेळेत किंवा वेळेअगोदर व जोरदारपणे होण्याची शक्यता वाढली आहे. 

मॉन्सून वाऱ्यांच्या प्रवासाची सुरवात विषुववृत्ताच्या दक्षिण बाजूने होते. विषुववृत्त ओलांडून हे वारे उत्तर गोलार्धात प्रवेश करतात, या वेळी त्यांची दिशा बदलते अाणि निश्‍चित होते. नैर्ऋत्येकडून ते उपखंडाकडे वाहत जातात. जाताना समुद्रावरून बाष्पयुक्त ढग वाहून नेतात आणि पाऊस रिचवतात. सध्या या भागात ढगांची दाटी झालेली असून, त्या भागातील पुढील आठ दिवसांची स्थितीही मॉन्सूनसाठी अनुकूल असल्याचे हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या संभाव्य हवेचा दाब, वाऱ्यांची दिशा, ढगांची स्थिती इ. विषयक उपग्रह छायाचित्रांवरून दिसते. 

हिंदी महासागरावरून बाष्पयुक्त ढग भारतीय भूभागावर वाहून आणण्यासाठी समुद्रावरील हवेचा दाब जास्त व भूभागावरील हवेचा दाब कमी असणे आवश्यक असते. या दोन्ही भागांच्या दाबात जेवढा जास्त उतरता फरक असेल तेवढा मॉन्सून अधिक जोरदार असतो. सद्यःस्थितीत विषुववृत्तीय भागात हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल, अरबी समुद्र व उपसागराच्या किनारी भागात १००८, त्यातून आत भूभागावर कमी हमी होत १००२ पर्यंत कमी होत गेला आहे. ही स्थिती वाऱ्यांच्या विषुववृत्तापासून भारतीय भूभागापर्यंत वेगाने वहन होण्यास अनुकूल मानली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन- तीन वर्षांत यंदा प्रथमच हवेच्या दाबाची स्थिती मॉन्सूनसाठी अतिशय बळकट असल्याचे निदर्शनास येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे अनुकूलता कायम राहिल्यास मॉन्सूनचे आगमन वेळेपूर्वी व जोरदार असण्याची शक्यता अधिक राहील.
=========================================
सर्वोच्च न्यायालयात 'नीट'बाबत गुरुवारी सुनावणी
नवी दिल्ली- वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षेबाबत (नीट) सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी गुरुवारी (ता. 5) होणार आहे. 

राष्ट्रीय पातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज (मंगळवार) सुनावणी झाली. याबाबतची पुढील सुनावणी गुरुवारी ( मे) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. नीट परीक्षेला विविध राज्यांनी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी विरोध केला आहे. नीट परीक्षेची सक्ती मागे घ्यावी यासाठी विविध राज्य आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. 

दरम्यान, राज्य सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेची (सीईटी) तयारी अंतिम टप्प्यात असून, ती नियोजनाप्रमाणे येत्या पाच मे रोजी होणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातील (डीएमईआर) अधिकाऱ्यांनी दिली. 

राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (नीट) याच वर्षी घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्याच्या "सीईटी‘बाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. पण, राज्यात "सीईटी‘ होणारच अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात "सीईटी‘ची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
=========================================
...नाहीतर दुसरीकडून एफ-16 खरेदी करु:पाकिस्तान
इस्लामाबाद - एफ-16 लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी अमेरिकेने निधी उपलब्ध करुन दिला नाही; तर ही विमाने "दुसरीकडून‘ खरेदी करण्यात येतील, असा थेट इशारा पाकिस्तानने आज (मंगळवार) दिला. 

पाकिस्तानचे परराष्ट्र संबंध सल्लागार सरताज अझीझ यांनी हा इशारा दिला. "एफ-16 विमाने महत्त्वपूर्ण आहेत; मात्र दहशतवादविरोधी लढाईसाठी जेएफ-17 थंडर जेट विमानेही वापरता येऊ शकतील,‘ असे अझीझ म्हणाले. जेएफ -17 थंडर विमान चीन व पाकिस्तान यांनी संयुक्तरित्या विकसित केले आहे. हे विमान पाकिस्तानी हवाई दलामध्ये येत्या भविष्यकाळात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

पाकिस्तानने अमेरिकेकडून खरेदी केलेल्या एफ-16 या लढाऊ विमानांचे पूर्ण पैसे अमेरिकेला द्यावेत, असे ओबामा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या विमान खरेदीत पाकिस्तानला कोणतेही अनुदान अमेरिकेकडून देण्यात येणार नाही. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील करदात्यांकडून येणारा पैसा पाकिस्तानला अनुदान म्हणून देण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानकडून देण्यात आलेला हा इशारा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 
=========================================
पारख यांच्या सोन्याच्या शर्टची 'गिनीज' मध्ये नोंद
येवला (नाशिक)- येथील गोल्डमॅन, उपनगराध्यक्ष पंकज पारख यांच्या सोन्याच्या शर्टाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वांत महागडा शर्ट म्हणून नोंद झाली आहे. सोन्याच्या जरीचा वापर करून बनवलेल्या पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातील कापड व्यापारी गोल्डमॅन पारख यांनी 8 ऑगस्ट 2014 रोजी 45व्या वाढदिवसानिमित्त 4 किलो सोन्याचा वापर करून सोन्याचा शर्ट परिधान केला होता. 

चार किलो सोन्याच्या शर्टांसह पंकज पारख यांच्या अंगावर दीड ते दोन किलो सोन्याचे दागिने असतात. चांदीचा बूट ही त्यांनी बनवून घेतला असून, सोन्याच्या फ्रेमचा चष्मा, सोन्याचे घड्याळ याव्यतिरिक्तही पंकज पारख यांच्याकडे हातात कडे, गळ्यात गोफ, रत्नजडित अंगठ्या असे सोन्याचे दागिने अंगावर आहेत. लहानपणापासून सोन्याच्या दागिन्यांची हौस असलेल्या पंकज पारख यांनी नाशिकच्या बाफणा ज्वेलर्सकडून हा शर्ट बनवून घेतला आहे. दुबई येथील एका कारागिराने या शर्टचे डिझाईन केलेले आहे. 6 जून 2014ला लग्नाच्या वाढदिवशी त्यांना शर्ट बनवण्याची कल्पना सुचली तेव्हापासून 19 कारागीर याकामात गुंतलेले होते. 8 ऑगस्ट 2014 रोजी 45व्या वाढदिवसानिमित्त 4 किलो सोन्याचा वापर करून सोन्याचा शर्ट परिधान केला होता. 

8 ऑगस्ट 2014 रोजी सोन्याच्या शर्ट परिधान केल्यानंतर जागतिक माध्यमांसह देशभरातील माध्यमांनी सगळीकडे पंकज पारख यांची गोल्डमॅन म्हणून ओळख निर्माण केली. रेडिओ रुस, बीबीसी यासारख्या माध्यमांनी मुलाखती घेतल्या होत्या. शिवाय, जपान मधील माध्यमांनी लघुपटही निर्माण केले असून, जवळपास जगातील प्रत्येक माध्यमांनी त्यांच्यासंबंधीत माहिती प्रकाशित केली आहे

=========================================
आधी तुमच्या देशातील असहिष्णुता पाहा- भाजप
संग्रहित चित्रनवी दिल्ली - भारतामध्ये 2015 सालामध्ये असहिष्णुता वाढल्याचा अहवाल देणाऱ्या "यूएस कमिशन फॉर इंटरनॅशनल रिजिलस फ्रिडम‘वर भारतीय जनता पक्षाने टीका केली असून भारतातील अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करण्याआधी आपल्या देशात काय चालले आहे त्याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला दिला आहे. 

भारतात 2015 सालात धार्मिक स्वातंत्र्याची वाटचाल नकारात्मक दिशेने सुरू झशली असून धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करण्याच्या घटनेतही वाढ झाली असल्याचे युएससीआयआरएफच्या अहवालात म्हटले आहे. यावर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नलीन कोहली वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, ‘भारतातील अंतर्गत विषयावर भाष्य करण्याआधी त्यांनी (अमेरिकेने) आधी त्यांच्याकडे काय चालले आहे ते पाहावे. गेल्या दोन वर्षांत अमेरिकेत मंदिरांची, गुरुद्वारांची विटंबना करण्यात आली. तसेच हिंदूंवर हल्ले करण्यात आले. मुस्लिमांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेतील उमेदवारही धार्मिक सहिष्णुता टिकविण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे भारताताबाबत भाष्य करणे अवाजवी आहे.‘ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार संविधानानुसार चालणारे असल्याचेही कोहली पुढे म्हणाले.
=========================================
भारत इराणला दीड टक्का दराने व्याज देणार
इराणसोबतचे व्यापारी संबंध आणखी दृढ करण्याच्या दृष्टीने तेल थकबाकीवर 1.5 टक्का दराने व्याज देण्यास भारताने होकार दिला आहे. देशातील तेल उत्पादक कंपन्यांनी इराणमधून खरेदी केलेल्या तेलाची 6.5 अब्ज डॉलरची थकबाकी आहे. इराणने भारताला ‘लंडन इंटरबँक ऑफर्ड रेट‘ (लिबॉर-प्लस) 75 बेसिस अंशांनुसार ही मागणी केली आहे. लिबॉर-प्लस 75 बेसिस अंश म्हणजे सुमारे 1.5 टक्के व्याजदर.   

"आमच्या मते, कोणतीही थकबाकी उरलेली नाही. परंतू ‘गूडविल जेश्चर‘ म्हणून तेल उत्पादक कंपन्या थकबाकीवर व्याज देण्यास तयार झाल्या आहेत", अशी माहिती अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्याने दिली आहे. 
भारताचे ऊर्जामंत्री धर्मेंद्र प्रधान व इराणच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर वलीओल्ला सैफ यांच्यात झालेल्या बैठकीनंतर इराणने व्याजाची मागणी केली होती. 

इराणने भारतीय कंपन्यांना अमेरिकी डॉलरमध्ये तेलाची विक्री केली होती. परंतू युको बँकेमार्फत रक्कम भारताने रुपयांमध्ये देण्यात आली होती. ऊर्वरित 55 टक्के रक्कम बँकिंग चॅनल खुले झाल्यावर देण्यात येणार होती. आर्थिक निर्बंध रद्द झाल्यानंतर इराणने थकित रकमेची मागणी केली आहे. परंतू भारतातील कंपन्यांनी तेल खरेदीवेळच्या परदेशी विनिमय दराने ही रक्कम घेण्याची मागणी केली आहे. कारण, फेब्रुवारी 2013 साली ज्यावेळी 45:55 पद्धत लागू झाली होती डॉलरचा विनिमय दर 55 रुपये होता आता तो 67 रुपये झाला आहे. 
=========================================
खासदारांच्या 'अच्छे दिना'वर मोदींची नाराजी!
नवी दिल्ली - संसदेतील विशेष समितीने खासदारांच्या वेतनामध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त करत खासदारांनीच खासदारांच्या वेतनामध्ये वाढ करू असे म्हणत नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. 



संसदेतील एका विशेष समितीने खासदारांचे वेतन दुप्पट करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर अर्थ मंत्रालयानेही शिक्कामोर्तब केले होते. त्यावर केवळ पंतप्रधानांची स्वाक्षरी होणे बाकी होते. पंतप्रधानांच्या स्वाक्षरीनंतर याबाबत संसदेच्या पुढील सत्रात विधेयक आणले जाणार होते. मात्र मोदींनी अशा प्रकारे खासदारांनी स्वत:च स्वत:ची वेतनवाढ करणे योग्य नसल्याचे म्हणत खासदारांची वेतनवाढ ही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि कॅबिनेट सचिवांच्या वेतनवाढीशी जोडायला हवी, तसेच यासाठी एखादा आयोग किंवा मंडळ स्थापन करावा, असा सल्ला दिला आहे. विशेष समितीने खासदारांचे वेतन 50 हजारावरून एक लाख करावे तसेच खासदारांच्या विविध भत्त्यांमध्येही वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
=========================================
ब्राझीलमध्ये तपासासाठी व्हॉट्सअॅपवर बंदी
ब्रासिलिया- अमली पदार्थांच्या तस्करीबाबत तपास करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती देण्यास व्हॉट्सअॅपने सहकार्य न करता तटस्थ भूमिका घेतल्याने ब्राझीलमध्ये व्हॉट्सअॅपवर तीन दिवसांकरीता बंदी घालण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप हे मेसेंजर अॅप्लिकेशन फेसबुकने 2014 मध्ये विकत घेतले आहे. दोन व्यक्तींच्या दरम्यान झालेली संवाद, संदेश पूर्णपणे गोपनीय ठेवण्याचे धोरण फेसबुकने स्वीकारले आहे. त्यामुळे यासंदर्भात गुंतागुंत वाढत आहे. सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हाही आम्हाला व्हॉट्सअॅपचे संदेश उघड करता येणार नाहीत, अशी फेसबुकची भूमिका आहे. 

ब्राझीलमधील न्यायाधीशांनी मोबाईल सेवा पुरवणाऱ्या सर्व दूरसंचार कंपन्यांना व्हॉट्सअॅपवर बंदी घालण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येथे तीन दिवस व्हॉट्सअॅपचा वापर करता येणार नाही. व्हॉट्सअॅपमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाढले, परंतु सार्वजनिक किंवा राष्ट्रीय हित मर्यादित होत गेले आहे, अशी भूमिका मांडत न्यायालयाने बंदी घालण्याचा निर्णय दिला. 
=========================================
डिझेल वाहन बंदीबाबत दिल्ली सरकार न्यायालयात
प्रातिनिधिक चित्रनवी दिल्ली - राजधानी दिल्लीत डिझेल वाहनांवर बंदीचा निर्णय हा टप्प्याटप्प्याने राबविण्यात यावा अशी मागणी करत दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

दिल्लीत डिझेलवर चालणाऱ्या मोटारींना सीएनजीमध्ये परावर्तित करण्यासाठी कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याचा दावा दिल्लीतील कॅब चालकांनी केला आहे. मात्र डिझेलवरील वाहनांना सीएनजीमध्ये परावर्तित करण्यासाठी मुदतवाढीची मागणी फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी डिझेलवर चालणाऱ्या मोटारींवर बंदी आणली. या निर्णयावर नाराजी व्यक्त कॅब चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सलग दुसऱ्या दिवशीही त्यांचे आंदोलन सुरूच होते. या निर्णयामुळे अनेक चालक बेरोजगार होतील असेही कॅब चालकांनी म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर दिल्ली सरकारने हा निर्णय टप्प्याटप्प्याने राबवावा अशी विनंती करणारी याचिका न्यायालयात सादर केली आहे. 

कॅब चालकांच्या सोमवारी दिल्लीतील राजोकरी भागातील रस्त्यावरील "रस्ता रोको‘ आंदोलनामुळे परिसरात प्रदीर्घ कोंडीचा अनुभव दिल्लीकरांनी घेतला. धौला कुँवामार्गे गुडगावला जाणाऱ्या नोकरदारांना कोंडीचा सर्वाधिक फटका बसला. आजही त्यांचे हे आंदोलन सुरूच आहे.
=========================================
दिल्ली विद्यापीठ इतरांसाठी आदर्श-हमीद अन्सारी
नवी दिल्ली- दिल्ली विद्यापीठ हे इतर विद्यापीठांसाठी एक आदर्श विद्यापीठ असून, शिक्षण व संशोधनाचा दर्जा कायम टिकवून ठेवला आहे, असे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी म्हटले आहे. 

दिल्ली विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त हन्सारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यापीठाने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘दिल्ली विद्यापीठाच्या 94व्या स्थापना दिनानिमित्त उपराष्ट्रपती अन्सारी यांनी कुलगुरू, कर्मचारी व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. विद्यापीठात शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी मोठे झाले आहेत. विद्यापीठाच्या योगदानामध्येही त्यांचा मोठा सहभाग आहे.‘ 

दिल्ली विद्यापीठ हे एक आदर्श विद्यापीठ आहे. विविध भागातील अनेक विद्यार्थी येथे येत असल्यामुळे कल्पनांची फॅक्‍टरी पाहायला मिळत आहे. युवकांच्या कला-गुणांना वाव मिळत आहे. या सर्व गोष्टींचा देशाला मोठा फायदा होत आहे, असेही अन्सारी म्हणाले. 
=========================================
मराठवाड्यातील धरणांत केवळ 2% पाणीसाठा
मुंबई - दुष्काळाच्या असह्य झळांत होरपळून निघत असलेल्या मराठवाडा भागामधील धरणांत केवळ 2% पाणीसाठा राहिल्याचे वृत्त आज (मंगळवार) सूत्रांनी दिले. 

या भागामधील एकूण 11 धरणांपैकी 8 धरणांमधील पाणीसाठा हा नगण्य (मृतसाठा) असून धरणांमध्ये साठलेल्या पाण्यास बाहेर उपसून काढण्याची वेळ ओढविली आहे. मराठवाड्यातील मांजरा व लोअर तेरणा ही धरणे तर पूर्णत: कोरडी झाली आहेत. गेल्या वर्षी (2015) याच काळामध्ये मराठवाड्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा हा सुमारे 10% इतका होता. मराठवाड्यात गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा दुष्काळ पडला आहे. या पार्श्‍वभूमीवर, मॉन्सूनचे आगमन लवकर होईल, अशी आशा असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्रामध्ये 2014 पासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत असून राज्यातील एकूण धरणांमध्ये केवळ 16% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळामध्ये हा पाणीसाठा 27% इतका होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्रामधील पाणीसाठा हा निम्म्याने खालावल्याचेही निष्पन्न झाले आहे.
=========================================
=========================================

No comments: