Saturday, 7 May 2016

नमस्कार लाईव्ह ०७-०५-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 

१- लंडनच्या महापौरपदी प्रथमच मुस्लिम व्यक्तीची निवड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- वापरा आणि फेकून द्या, हीच मोदींची नीती, अरुण शौरींचा मोदींना घरचा आहेर 
३- मोदी सरकार देशासाठी धोकादायक, मोदींचा कारभार अध्यक्षीय थाटाचा - अरूण शौरी 
४- ‘ऑगस्टा’ म्हणजे ‘बोफोर्स’ नाही - मनोहर पर्रीकर 
५- सरकारचे दिवस भरले आहेत - सोनिया गांधी 
६- काश्मीरचं खोरं पुन्हा धुमसलं, 3 दहशतवादी ठार 
७- खासगी कॉलेजांना ‘नीट’च बंधनकारक 
८- सोनियांना अटक करण्याची हिंमत नाही- केजरीवाल
९- ऑगस्टा वेस्टलँडवरून 'आप'ची निदर्शने 
१०- पदवी घेणारे मोदी वेगळेच - आप 
११- कन्हय्या कुमारनं 9 दिवस सुरू असलेलं उपोषण मागे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- बारावीत मुंबईची आद्या मद्धी प्रथम 
१३- पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज दुष्काळग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक 
१४- भ्रष्ट अधिकाऱ्यांचं मुंबई पालिकेत पुन्हा वेलकम, विशेषाधिकार वापरत आयुक्तांचे आदेश 
१५- हँकॉक पुलाऐवजी एफओबी बांधा - उच्च न्यायालय 
१६- पोलिसांच्या टिष्ट्वटर अकाउंटमुळे शोध 
१७- 'बीफ' बंदीबाबत सरकारला झटका 
१८- उत्तराखंडमध्ये होणार शक्तिपरीक्षा 
१९- राज्य दुष्काळात होरपळत असताना मंत्री पाण्यात चिंब 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- उस्मानाबाद; मंगळसूत्र गहाण ठेवून मुलीचं शिक्षण, जाधव कुटुंबीयांना अनेकांचे मदतीचे हात 
२१- लखनऊ; वडील चहा विकतात म्हणून शाळेनं अॅडमिशन नाकारलं 
२२- नागपुरात ट्रकखाली चिरडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू 
२३- कोलकाता; जाधवपूर विद्यापीठात अभाविप व डाव्यांत जुंपली 
२४- पुलवामा जिल्ह्यात चकमकीत 3 दहशतवादी ठार 
२५- उत्तर प्रदेश; ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या अपघातात दोन जण ठार 
२६- राजस्थानात रोड अपघातात एका परिवारातील 6 जणांचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- हैदराबादच्या विल्यमसनचा जबरदस्त झेल 
२८- व्हॉटसअॅप वर करा Text formatting 
२९- सैफची मुलगी सारा सुशिलकुमार शिंदे यांच्या नातवाच्या प्रेमात 
३०- जीवनावर, कुटुंबियांवर प्रेम करा, ते कोकेनपेक्षा चांगलं आहे - संजय दत्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३१- जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर; एक लाख ३४ हजार मे, टन चाऱ्याची मागणी 
३२- गणित एम-१ ऐवजी एम-२ ची प्रश्नपत्रिका; अभियांत्रिकी प्रथम वर्षाची परीक्षा रद्द 
३३- महिला व बाल कल्याण, सामान्य प्रशासन विभागातील ६२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या 
३४- नांदेड जिल्हा परिषदेचा मिनी बिडीओ पॅटर्ण आता बीड जिल्ह्यात 
३५- दुष्काळाच्या पाहणीसाठी आज अजित पवार, धनंजय मुंडे कंधारच्या दौऱ्यावर 
३६- देगलूर; वादळी वाऱ्यासह विजेच्या तारा तुटल्या, १६ तास वीज गुल, पत्रेही उडाली 
३७- दत्त नगर; पाणी भरण्याच्या कारणावरून महिलेस ठार मारण्याचा प्रयत्न 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आयुष्य जितकं कठीण, तितके तुम्ही मजबूत.
जितके तुम्ही मजबूत, तितकं आयुष्य सोप्प....!!!
(रमेश तालीमकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
प्रेम चव्हाण, संतोष धोंडे, माधव कुलकुलवाड, विजय कमालेकर, चैतन्य इंगोले, विवेक दापके, फेरोज मणियार, अयुब शेख, विक्रम चव्हाण, सुनील गुद्दटवार, राजेश वाघमारे, सतीश टेळके, बालाजी गिरी, श्रीकांत जाधव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

=============================================

मंगळसूत्र गहाण ठेवून मुलीचं शिक्षण, जाधव कुटुंबीयांना अनेकांचे मदतीचे हात

मंगळसूत्र गहाण ठेवून मुलीचं शिक्षण, जाधव कुटुंबीयांना अनेकांचे मदतीचे हात
उस्मानाबाद/मुंबई: उस्मानाबादच्या कोंडमध्ये मुलीच्या शिक्षणासाठी एका आईनं सौभाग्याचं लेणं अर्थात मंगळसूत्र गहाण ठेवूनही तीचं शिक्षण अर्धवट राहिलं. याबाबतची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर, समाजातील संवेदनशील माणुसकीचा झरा मदतीच्या रुपाने धावला आहे.

कोंडमधील सुरेखा जाधव यांच्या कुटुंबाला आता आर्थिक मदत मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे एबीपी माझाची बातमी पाहून, जाधव कुटुंबीयांना देश-विदेशातून मदतीचा हात मिळत आहे. सुरेखा यांची मुलगी प्रगतीच्या शिक्षणासाठी आतापर्यंत 1 लाख रुपयांपर्यंतची मदत मिळाली आहे.  इतंकच नव्हे तर धान्य, कपडे यांचाही पुरवठा करण्यात येत आहे.

मंगळसूत्र गहाण ठेवून मिळालेले 1200 रुपये मुलीच्या शिक्षणासाठी खर्च केले. मात्र तेही न पुरल्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलं होतं.
=============================================

पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज दुष्काळग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज दुष्काळग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक
नवी दिल्ली : देशातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महत्वाची बैठक बोलवली आहे. यामध्ये दुष्काळग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग असणार आहे. त्यामुळं आजच्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

त्याचबरोबर उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीला उपस्थित राहतील. दुष्काळ निवारण करण्यासाठी उपाय योजना करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये भीषण दुष्काळ आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त राज्यांच्या मुख्यंमंत्र्यांशी चर्चा करुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थिती जाणून घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी दुष्काळाशी लढण्यासाठी केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या मदत निधीवरही चर्चा करणार आहेत.
=============================================

काश्मीरचं खोरं पुन्हा धुमसलं, 3 दहशतवादी ठार

काश्मीरचं खोरं पुन्हा धुमसलं, 3 दहशतवादी ठार
पुलवामा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लष्करी जवान आणि दहशदवाद्यांमध्ये चकमक झाली. पुलवामा जिल्ह्यात घुसखोरी करु पाहणाऱ्या हिजबुल मुजाहीद्दीनच्या 3 अतिरेक्यांना लष्कराच्या जवानांनी कंठस्नान घातलं आहे.

दहशतवादी घुसखोरी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून  मिळाल्यानंतर आज सकाळी लष्कराच्या जवानांनी पुलवामात शोधमोहीमेला सुरुवात केली होती. यावेळी झालेल्या गोळीबारात हिजबुलचे 3 अतिरेकी मारले गेलेत. तिन्ही दहशदवाद्यांना दक्षिण काश्मीर भागात ठार करण्यात आले आहे.

अशफाक दर, अशफाक अहमद आणि हसिब पहला अशी या अतिरेक्यांची नाव असल्याचं समजतं आहे. या तिनही अतिरेक्यांकडून जवानांनी एके- 47 आणि आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. अजुनही या भागात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लष्कराची शोधमोहीम सुरु आहे.
=============================================

VIDEO: : हैदराबादच्या विल्यमसनचा जबरदस्त झेल

VIDEO: : हैदराबादच्या विल्यमसनचा जबरदस्त झेल
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या केन विल्यमसने अप्रतिम झेल टिपत, जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश केला.
मुंबई : आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या केन विल्यमसने अप्रतिम झेल टिपत, जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश केला.

गुजरात लायन्स विरुद्धचा सामना सनरायझर्स हैदराबादने 6 विकेट्स राखून जिंकला. याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनने सूर मारुन गुजरात लायन्सच्या दिनेश कार्तिकचा झेल टिपला.

मुस्तफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिक चकला आणि त्याच्या बॅटची कडा घेऊन चेंडू पार झाला. त्याचवेळी गली या पोझिशनला उभा असलेल्या विल्यमसनने सूर मारला आणि त्याचा झेल टिपला.

मात्र हा झेल खरोखरच टिपलाय की नाही, याबाबत विल्यमसनलाही खात्री नव्हती. त्यामुळे अंपायर्सनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. त्यावेळी विल्यमसनने अलगद झेल टिपल्याचं स्पष्ट झालं.

=============================================

भ्रष्ट अधिकाऱ्यांचं मुंबई पालिकेत पुन्हा वेलकम, विशेषाधिकार वापरत आयुक्तांचे आदेश

भ्रष्ट अधिकाऱ्यांचं मुंबई पालिकेत पुन्हा वेलकम, विशेषाधिकार वापरत आयुक्तांचे आदेश
मुंबई मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे ताजी असताना भ्रष्टाचाराला आळा घालण्यापेक्षा भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांनाच पुन्हा सेवेत रुजू करण्याचा प्रकार घडला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे.


धक्कादायक बाब म्हणजे एक, दोन नव्हे तर अशा तब्बल 26 अधिकाऱ्यांना सेवेत परत घेण्यात आलं आहे. खुद्द महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी आपला विशेषाधिकार वापरुन हे आदेश काढले आहेत.


नुकताच रस्ते घोटाळा प्रकरणातील काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना पुन्हा कंत्राटे दिल्याचा प्रकार घडला आहे. त्यावरुन टीकेची झोड उठलेली असताना, आता हा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, यासंदर्भातील खटले न्यायप्रविष्ट असताना पालिका आयुक्तांनी या अधिकाऱ्यांवर मेहेरबानी का दाखवली हा प्रश्नच आहे.

=============================================

वडील चहा विकतात म्हणून शाळेनं अॅडमिशन नाकारलं

वडील चहा विकतात म्हणून शाळेनं अॅडमिशन नाकारलं!
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बागपत या परिसरातून करणारी घटना समोर आली आहे. वडील चहा विक्रेते असल्याने मुलाला चक्क शाळेने अॅडमिशन देण्यास नकार दिला. एकीकडे देशातील गरिबांनाही शिक्षण मिळावं, म्हणून सरकार घोषणा करत आहे आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे.

बागपत या परिसरातील लॉर्ड महावीर अॅकेडमी शाळेत वडील चहा विक्रेता असल्याने मुलाला शाळेत प्रवेश देण्यास नाकारण्यात आलं. विद्यार्थी अरिहंतला सहावी इयत्तेत प्रवेश नाकारला, असा आरोप शाळेवर करण्यात आला आहे.

एका अहवालानुसार, वडील चहा विक्रेता असल्याने प्रवेश नाकारला असं समोर आलाय. विद्यार्थी अरिहंतने त्याच शाळेत पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तरीही अरिहंतला सहावी इयत्तेत प्रवेश दिला गेला नाही.

आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करुन चांगल्या शाळेत शिक्षण देऊन काहीतरी बनावं, असं स्वप्न उराशी बाळगून चहा विकून पैसे जमा करणारे वडील मंगत राय या घटनेने दुःखी आहे.

या प्रकरणी जिल्हा शिक्षण विभागाने शाळेतील प्राचार्यांना ताकीद दिली आहे. मात्र, शाळेने या प्रकरणावर सूचक मौन धारण केले आहे.
=============================================

वापरा आणि फेकून द्या, हीच मोदींची नीती, अरुण शौरींचा मोदींना घरचा आहेर

वापरा आणि फेकून द्या, हीच मोदींची नीती, अरुण शौरींचा मोदींना घरचा आहेर
नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च्याच प्रेमात पडलेले आहेत आणि त्यांची एकाधिकारशाही भारतासाठी घातक आहे, अशा शब्दात भाजपचे माजी नेते आणि मंत्री अरूण शौरींनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. वापरा आणि फेकून द्या, हीच मोदींची नीती’, असे म्हणत अरुण शौरींनी पंतप्रधान मोदींना घरचा आहेरही दिला आहे.

येत्या तीन वर्षात नागरी स्वातंत्र्यावर आणखी गदा येण्याची भीतीदेखील भाजपच्या सक्रीय राजकारणातून बाहेर गेलेल्या शौरींनी व्यक्त केली.

मोदी हे प्रत्येक इव्हेंट आपल्या फायद्याकरता वापरून घेतात. त्यासोबतच माणसांबद्दलही ‘वापरा आणि फेकून द्या’ अशी मोदींची नीती असल्याचाही आसूड शौरींनी यावेळी ओढला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शौरींनी मोदींवर विविध मुद्यांवर निशाणा साधला.

अरुण शौरी हे अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते आणि मोदी सरकारमध्येही त्यांना मंत्रिपद मिळण्याचे अंदाज वर्तवले जात होते. मात्र, ते आता भाजपपासून पूर्णपणे बाजूला सारले गेले आहेत. मोदींच्या कारभारावर स्वपक्षातील माजी वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने प्रहार होताना यानिमित्ताने दिसत आहेत.
=============================================

नागपुरात ट्रकखाली चिरडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू

नागपुरात ट्रकखाली चिरडून चिमुकल्याचा जागीच मृत्यू
नागपूर रामटेक तालुक्याच्या सलाका बोर्डा गावात ट्रकखाली चिरडून 8 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. चिमुरड्याच्या मृत्यूनं संतप्त गावकऱ्यांनी 6 ट्रक जाळले. हे ट्रक ओरियंट कंपनीचे होते.

मनीष देवगडे असे या 8 वर्षीय चिमुरड्याचं नाव आहे. अपघात संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास घडला.
20160506090941
गावकऱ्यांनी जळपोळ केलेले ट्रक ओरियंट कंपनीचे असून, घटनास्थळी हे फोर लेनचं बांधकाम सुरु होतं.

जाळपोळीनंतर गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
=============================================

व्हॉटसअॅप वर करा Text formatting

  • व्हॉट्स अॅपवर आता ठराविक शब्द फॉरमॅट करण्याची म्हणजे बोल्ड, इटालिक किंवा खाडाखोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
    कसं कराल Text Formatting
    बोल्ड टाईप करण्यासाठी * हे चिन्ह (asterisk) शब्दाच्या सुरूवातीला आणि अखेरीस टाका. 
    उदाहरणार्थ *लोकमत* असं लिहिलंत तर लोकमत हा शब्द बोल्ड होतो.
    याच पद्धतीने Underscore चिन्ह वापरून Italics करू शकाल.
    उदाहरणार्थः _लोकमत_ असं टाईप केलंत तर लोकमत इटालिक होईल.
    बोल्ड व इटालिक दोन्हीसाठी * हे आणि_ ही दोन्ही चिन्हे सुरूवातीला व अखेरीस टाका. 
    उदाहरणार्थ *_लोकमत_* त्यामुळे लोकमत खोडलं जाईल...
    तर आता व्हॉट्सअॅपवर व्यक्त होताना खास शब्दांना द्या कास ट्रीटमेंट
=============================================

हँकॉक पुलाऐवजी एफओबी बांधा

  • मुंबई : हँकॉक ब्रिज पाडल्यानंतर ट्रॅक क्रॉस करताना मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची बाब लक्षात घेत उच्च न्यायालयाने येत्या चार आठवड्यांत योग्य ती जागा पाहून पादचारी पूल बांधा, असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिका व पश्चिम रेल्वेला दिले.
    सँॅडहर्स्ट रोड व मस्जीद बंदरजवळील अनुक्रमे हँकॉक व कर्नाक पूल तांत्रिक कारणास्तव तोडण्यात येणार असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. हे दोन्ही पूल तोडण्यापूर्वी रेल्वे व महापालिकेने नागरिकांना रेल्वे क्रॉसिंगसाठी तात्पुरत्या स्वरूपाचा पूल बांधून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेनॉय यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.
=============================================

मोदी सरकार देशासाठी धोकादायक - अरूण शौरी

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. 7 - एनडीएचे माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनी नरेंद्र मोदी हे एकानुवर्ती अध्यक्षीय सरकार चालवत असल्याची टीका केली आहे. ही दिशा देशासाठी अत्यंत धोकादायक असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वाजपेयी सरकारच्या मंत्रिमंडळात असलेल्या शौरींनी इंडिया टुडे या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अध्यक्षीय पद्धतीचं सरकार मोदी चालवत असून समतोल साधण्याची यंत्रणा नसल्याचा आरोप केला आहे.
    मोदी सरकारची गेल्या दोन वर्षातली कामगिरी आपण नीट न्याहाळली असून येत्या तीन वर्षांमध्ये मानवी हक्कांवर गदा येण्याचा धोका असल्याचा इशारा शौरींनी दिला आहे. आपल्याला सोयीस्कर नसलेल्या मतांची गळचेपी करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होईल असेही त्यांनी म्हटले आहे.
=============================================

लंडनच्या महापौरपदी प्रथमच मुस्लिम व्यक्तीची निवड

  • ऑनलाइन लोकमत 
    लंडन, दि. ७ - लंडनच्या महापौरपदी प्रथमच मुस्लिम व्यक्तीची निवड झाली आहे. सादिक खान यांच्या रुपात पहिल्यांदाच मुस्लिम व्यक्ती महापौर झाली आहे. पाकिस्तानी वंशाचे असलेले सादीक खान यांनी लेबर पक्षाच्या तिकीटावर लंडनच्या महापौरपदाची निवडणूक लढवली होती.  इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समध्ये महापौर, विधिमंडळ आणि संसदीय निवडणुकांसाठी झालेल्या मतदानात त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कंझर्व्हेटीव्ह पक्षाचे उमेदवार झॅक गोल्डस्मिथ यांचा दारुण पराभव केला.
    कंझर्व्हेटीव्ह यांनी हिंदू आणि शिख मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा वापर केला होता हे विशेष. लंडनच्या महापौरपदाची लढाई सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाते. माजी मानवाधिकार कार्यकर्ते आणि २००५ पासून लेबर पक्षाचे खासदार असणारे सादीक खान (४५) यांनी यंदाच्या निवडणुकीत बाजी मारती आहे. 
    सादीक खान यांचे वडील बस चालक होते. खान यांनी ही निवडणूक जिंकल्यामुळे युरोपातील सर्वात प्रभावशाली मुस्लिम नेतृत्व म्हणून त्यांचा उदय होईल असा कयास व्यक्त होत आहे. माजी पंतप्रधान गॉरडन ब्राऊन यांच्या सरकारमध्ये २००९-१० मध्ये सादीक खान वाहतूक मंत्री होते. कॅबिनेट बैठकीतील ते पहिले मुस्लिम मंत्री होते. सॉलिसिटर सादीया अहमदबरोबर त्यांचा विवाह झाला असून त्यांना दोन मुली आहेत. स्वत:चा उल्लेख करताना त्यांनी मी युरोपियन, ब्रिटीश, इंग्लिशमन लंडनर आहे असे त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. १९४७ फाळणी झाल्यानंतर सादीक खान यांचे आजी-आजोबा भारतातून पाकिस्तानात गेले. सादीक खान यांचा जन्म होण्याआधी त्यांचे माता-पिता इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले होते.  
=============================================

सैफची मुलगी सारा सुशिलकुमार शिंदे यांच्या नातवाच्या प्रेमात

  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. ७ - करण जोहरच्या आगामी 'स्टुडंट ऑफ द इयर'च्या सिक्वेलमध्ये झळकणारी सैफ अली खानची कन्या सारा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे. सारा खानचे एका मुलाबरोबरचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. मुंबई मिररच्या वृत्तानुसार सारा सोबत असलेला हा मुलगा वीर पहारिया आहे. या फोटोत ती वीरचे चुंबन घेताना दिसत आहे.
    सारा आणि वीर दुबईत एकत्र शिकतात. वीर हा माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर आणि सारा हे एकमेकांच्या प्रेमात असल्याचा चर्चाही सध्या सुरु आहेत. त्यातच या दोघांच्या फोटोंमुळे मात्र या चर्चांसाठी चांगलेच खाद्य मिळाले आहे.
=============================================

जीवनावर, कुटुंबियांवर प्रेम करा, ते कोकेनपेक्षा चांगलं आहे - संजय दत्त

  • जगामध्ये असा एक अमली पदार्थ नसेल जो मी घेतलेला नाही. परंतु, ते सगळं मी सोडलं कारण मला चांगलं जीवन जगायचं होतं. इच्छाशक्तिच्या बळावर मी अमली पदार्थांचा नाद सोडल्याचं संजय दत्तनं एका कार्यक्रमात सांगितलं.
    तुरुंगातून सुटल्यानंतर सहसा लोकांमध्ये न मिसळणारा संजय दत्त दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाला आणि त्यानं तब्बल तासभर मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि आपले अनुभव सांगितले.
    मुलांनी कैद्याच्या कपड्यात बघू नये अशी इच्छा होती
    मुलांनी मला तुरुंगात कधीही कैद्याच्या कपड्यात बघू नये अशी माझी इच्छा होती. त्यामुळे त्यांना कधीही तुरुंगात भेटायला आणलं नाही. महिन्यातून दोनवेळा त्यांच्याशी मी फोनवर बोलायचो आणि सांगायचो की मी डोंगरांमध्ये कामासाठी आलोय. त्यांनी मोठं होताना माझ्या कैद्याच्या कपड्यांमधल्या प्रतिमेला वागवू नये असं मला वाटत होतं.
=============================================

बारावीत मुंबईची आद्या मद्धी प्रथम

  • मुंबई : कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयएससीई) घेतलेल्या दहावी (आयएससीई) आणि बारावी (आयएससी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. बारावीच्या परीक्षेत मुंबईच्या आद्या मद्धी या विद्यार्थिनीने देशात प्रथम येण्याचा मान पटकावला. तिला ९९.७५ टक्के गुण मिळाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरही ९९.५० टक्के गुणांसह मुंबईच्या मानसी पुग्गल हिने नाव कोरले आहे.
    दहावीमध्ये ओदिशामधील अबिनीत परीछा हा ९९.२ टक्के मिळवून प्रथम आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर चार विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले असून, त्यातील ईशा सेठी आणि मनन शाह हे दोघे मुंबईचे आहेत. त्यांनी ९९ टक्के गुण मिळवले.
    यंदा २९ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत पार पडलेल्या आयसीएसई परीक्षेला १ लाख ६९ हजार ३८१ विद्यार्थी बसले होते. तर आयएससीची परीक्षा ८ फेब्रुवारी ते ८ एप्रिलदरम्यान घेण्यात आली. या परीक्षेला ४२ हजार ८८० विद्यार्थी बसले होते. (प्रतिनिधी)
    ठाण्याचा मयांक वैद्य राज्यात तिसरा
    आयएससी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत ठाण्याचा मयांक वैद्य ५०० पैकी ४९२ गुण (९८.४० टक्के) मिळवून राज्यात तिसरा आला.
    १० वीच्या परीक्षेत ठाण्याच्या प्रियंका बागडे या विद्यार्थिनीने ९८.८ टक्के गुण मिळवून देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे खासगी क्लासचा तिने आधार घेतला नव्हता.
    कधीच ठरवून अभ्यास केला नाही. वर्षभर शाळेतील अभ्यास नियमाने करीत होते. मात्र सोबतच मनाला आवडेल तेच केले. वडील खासगी कंपनीत नोकरीस असून आई गृहिणी आहे. शाळेसोबत त्यांनीही खूप प्रोत्साहन दिले होते. पुढे कॉम्प्युटर सायन्स करण्याचा विचार आहे.
    - आद्या मद्धी
=============================================

खासगी कॉलेजांना ‘नीट’च बंधनकारक

  • नवी दिल्ली : खासगी महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे आणि संस्थांना स्वत:च्या वैद्यकीय आणि दंत प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यास परवानगी देता येणार नाही; आणि त्यांना २०१६-२०१७मध्ये राष्ट्रीय पात्रतावजा प्रवेश परीक्षेचे (नीट) कठोरपणे पालन करावेच लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.
    राज्य सरकारतर्फे होणाऱ्या सीईटीबाबत मात्र सोमवार, ९ मे रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. यंदा राज्यांनी सीईटी
    घेण्यास आमची हरकत नसल्याचे मत मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने न्यायालयात व्यक्त केले. त्यानंतर त्याबाबत केंद्र सरकारची भूमिका काय आहे, असा सवाल न्यायालयाने केला, त्यावर आम्ही राज्याशी चर्चा करून आमचे मत सोमवारी मांडू, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे राज्यांच्या सीईटीबाबत निर्णय झाला नाही. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना त्यांना स्वत:ची परीक्षा
    घेऊ देण्यास परवानगी दिली जाऊ नये व त्यांनी नीटचे पालन केले पाहिजे, असे मेडिकल कौन्सिलच्या वतीने अ‍ॅड. विकास सिंह म्हणाले.
    मात्र न्या. अनिल आर. दवे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिलेल्या या आदेशामुळे अनेक खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची बाजू मांडणाऱ्या वकिलांमध्ये प्रक्षोभ निर्माण झाला. हा निर्णय म्हणजे आमच्या स्वत:ची संस्था स्थापन करून तिचे प्रशासन करण्याच्या घटनेने मिळालेल्या हक्काचे उल्लंघन आहे, अशा शब्दांत या वकिलांनी निषेध केला. वरिष्ठ वकील राजीव धवन तर असेही म्हणाले की, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना नीट (नॅशनल इलिजिबिलिटी अ‍ॅण्ड एन्ट्रन्स टेस्ट) स्वीकारण्यास भाग पाडण्यात आल्यास राज्यांच्या सामाजिक दर्जांच्या यादीतील विद्यार्थ्यांसाठी (विशेषत: गरीब) दरवर्षी राखून ठेवल्या जाणाऱ्या ५० टक्के जागा मागे घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
=============================================

पोलिसांच्या टिष्ट्वटर अकाउंटमुळे शोध

  • मुंबई : चांदिवली परिसरात एका अल्पवयीन मुलाकडून मजुरी करवून घेतली जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटर अकाउंटवर प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेपाळच्या १६ वर्षीय मुलाची सुटका केली. सध्या त्याला डोंगरी येथील बालगृहात ठेवण्यात आले आहे.
    पोलिसांच्या टिष्ट्वटर अकाउंंटवर १ मे रोजी चांदिवली येथील म्हाडा कॉलनीत एका मुलाला कामावर ठेवून त्याची पिळवणूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जापू शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे छापा टाकला. मुलाकडून दिवसरात्र काम करून घेतले जात होते. पोलिसाने मुलाला ताब्यात घेत हॉटेलचालकाविरुद्ध साकीनाका पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
=============================================

हँकॉक पुलाऐवजी एफओबी बांधा

  • मुंबई : हँकॉक ब्रिज पाडल्यानंतर ट्रॅक क्रॉस करताना मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याची बाब लक्षात घेत उच्च न्यायालयाने येत्या चार आठवड्यांत योग्य ती जागा पाहून पादचारी पूल बांधा, असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिका व पश्चिम रेल्वेला दिले.
    सँॅडहर्स्ट रोड व मस्जीद बंदरजवळील अनुक्रमे हँकॉक व कर्नाक पूल तांत्रिक कारणास्तव तोडण्यात येणार असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. हे दोन्ही पूल तोडण्यापूर्वी रेल्वे व महापालिकेने नागरिकांना रेल्वे क्रॉसिंगसाठी तात्पुरत्या स्वरूपाचा पूल बांधून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेनॉय यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले.
=============================================
सोनियांना अटक करण्याची हिंमत नाही- केजरीवाल


नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अटक करण्याची केंद्र सरकारमध्ये हिंमत नसल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्लीत आज (शनिवार) हेलिकॉप्टर गैरव्यवहारावरून आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. जंतर मंतर येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या प्रमुख नेत्यांनी आंदोलन केले. यावेळी केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार टीका केली.

केजरीवाल म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप मिळून भ्रष्टाचार करत आहे. सरकारमध्ये सोनिया गांधींना अटक करण्याची हिंमत नाही. भाजप आणि काँग्रेसमध्ये सेटिंग झाले असून, सोनिया गांधींना ऑगस्टा प्रकरणी अटक करा. पंतप्रधानांनी भ्रष्टाचाऱ्यांना कारागृहात पाठविणार असे म्हटले होते. आता भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई का करत नाहीत. गांधी परिवाराजवळ मोदींची अनेक गुपीते आहेत. सोनियांना कारागृहात पाठविले तर आपल्याबद्दल काही खुलासा होईल, याची मोदींना भीती वाटत आहे. मोदींनी रॉबर्ट वद्रांना दत्तक घेतल्यासारखे वाटत आहे. मोदीजी सोनियांना एवढे का घाबरत आहेत.
=============================================
ऑगस्टा वेस्टलँडवरून 'आप'ची निदर्शने
नवी दिल्ली - ऑगस्ट वेस्टलँड कंपनीच्या हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारावरून आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांनी आज (शनिवार) निदर्शने केली.

जंतर मंतर येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या प्रमुख नेत्यांनी आंदोलन केले. या प्रकरणी चौकशी करण्यात सरकार गांभीर्य दाखवत नसल्याचा आरोप करण्यात आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना वाचवत असल्याचेही आप नेत्यांनी म्हटले आहे.

आपच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी पंतप्रधानांचे निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांना रोखल्याने पोलिस व आप कार्यकर्त्यांत वाद झाल्याचे पहायला मिळाले. आपच्या कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेरही निदर्शने केली.
=============================================
जाधवपूर विद्यापीठात अभाविप व डाव्यांत जुंपली
कोलकता - जाधवपूर विद्यापीठात शुक्रवारी रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परीषद (अभाविप) व डाव्या विचारसरणीच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी एका विद्यार्थिनीची छेड काढण्यात आली.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम या चित्रपटाचे स्क्रिनिंग शुक्रवारी जाधवपूर विद्यापीठात होणार होते. या स्क्रिनिंगला डाव्या विचारसरणीच्या समर्थकांनी विरोध केला. तसेच विद्यापीठाच्या गेटवरच अग्निहोत्री यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी अभाविपचे कार्यकर्ते आणि डाव्या समर्थकांमध्ये जोरदार जुंपली. या वेळी एका विद्यार्थिनीची छेड काढण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अभाविपच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. 

या घटनेची माहिती मिळताच जाधवपूर विद्यापीठाकडे रवाना झालेले भाजप नेत्या रुपा गांगुली यांनी गेटवरच रोखण्यात आले.
=============================================
पुलवामा जिल्ह्यात चकमकीत 3 दहशतवादी ठार
श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. या चकमकीत एकही जवान व नागरिक जखमी झालेला नाही.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील पंझगाम गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती शुक्रवारी रात्री मिळाली होती. त्यानंतर लष्करी जवानांकडून परिसरात शोधमोहिम सुरु होती. दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत या तिन्ही दहशतवाद्यांना ठार केले.

चकमकीत ठार झालेले तिन्ही दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. त्यांच्याजवळून 3 एके-47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून, अश्फाक अहमद दार, इश्फाक अहमद बाबा आणि हसीब अहमद अशी त्यांची नावे आहेत. या भागात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लष्कराची शोधमोहीम सुरु आहे.
=============================================
'बीफ' बंदीबाबत सरकारला झटका
मुंबई - परराज्यांतून आलेले गोमांस (बीफ) बाळगण्यास व खाण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 6) एका निकालपत्राद्वारे संमती दिली. तसेच, एखाद्याकडे गोमांस आढळल्यास त्यावर सरसकट गुन्हा दाखल करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. यामुळे राज्य सरकारला चांगलाच झटका बसला आहे. मात्र, सरकारचा गोवंश हत्या बंदीचा कायदा न्यायालयाने कायम ठेवला आहे. 

गतवर्षी सरकारने प्राणी सुरक्षा कायद्यात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार गोवंश हत्या बंदीचा निर्णय राज्यभर लागू झाला होता. यामुळे गोमांस जवळ बाळगण्यास व विकण्यास सरकारने बंदी घातली होती. तसेच, परराज्यातून गोमांस आणून ते बाळगण्यासही सरकारने विरोध केला होता. शुक्रवारी न्या. अभय ओक व न्या. एस. सी. गुप्ते यांच्या खंडपीठाने सरकारचा गोवंश हत्या बंदीचा निर्णय कायम ठेवत कायद्यातील कलम 5 (ड) व 9 (ब) च्या तरतुदी अवैध ठरवून रद्दबातल केल्या. कलम 5 (ड) नुसार परराज्यातून आलेले बीफ जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली होती, तर कलम 9 (ब) नुसार अशा कृत्यासाठी एक वर्ष तुरुंगवास व दोन हजारांच्या दंडाची शिक्षा निर्धारित केली होती. मात्र, या दोन्ही तरतुदी न्यायालयाने रद्द केल्यामुळे आता ज्या राज्यांत गोमांस विक्रीला परवानगी आहे, अशा राज्यांतून महाराष्ट्रात आणलेले गोमांस जवळ बाळगण्यास न्यायालयाने संमती दिली आहे. नागरिकांच्या खासगी आयुष्याच्या हक्कात बाधा आणता येणार नाही, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिगत अधिकारांवर गदा आणणारी तरतूद रद्द व्हायला हवी, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. 
=============================================
उत्तराखंडमध्ये होणार शक्तिपरीक्षा
मंगळवारी बहुमत चाचणीचा न्यायालयाचा आदेश
नवी दिल्ली - उत्तराखंड विधानसभेत मावळते मुख्यमंत्री हरीश रावत यांना शक्तिपरीक्षा घेण्याची संधी दिली पाहिजे, असे सांगत येत्या १० मे रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत बहुमत चाचणी घेण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. 

बहुमत चाचणी दरम्यान दोन तासांसाठी उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट उठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या बहुमत चाचणी दरम्यान विधानसभेतून निलंबित करण्यात आलेले काँग्रेसचे नऊ बंडखोर सदस्य मतदान करू शकणार नाहीत. मात्र, उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यास या सदस्यांना मतदान करता येणार आहे. 

आज झालेल्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने उत्तराखंडमध्ये बहुमत चाचणी घेण्याच्या बाजूने भूमिका मांडताना मतदान प्रक्रियेच्या देखरेखीसाठी निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त किंवा माजी न्यायाधीशांची नियुक्ती करावी, अशी मागणी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी केली. त्यावर न्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्यायाधीश शिव कीर्ती सिंह यांनी विधिमंडळाच्या मुख्य सचिवांच्या देखरेखीखाली ही चाचणी होईल आणि याचे व्हिडिओ शूटिंग करण्याचे निर्देश दिले. 
हरीश रावत यांना पहिल्यांदा बहुमत चाचणीची संधी मिळेल. ९ बंडखोर आमदारांना मतदानाची परवानगी नसेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. १० मे रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविले जाईल आणि यामध्ये बहुमत चाचणीशिवाय अन्य कोणतीही चर्चा होणार नाही. 
=============================================
मोदींचा कारभार अध्यक्षीय थाटाचा - अरुण शौरी
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधत त्यांचा कारभार अध्यक्षीय थाटाचा असल्याचा घणाघाती आरोप केला. मोदींचा अहंकार देशासाठी घातक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. आज एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी केंद्र सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ज्या दिशेने हे सरकार काम करते आहे ती देशासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरी स्वातंत्र्य दडपून टाकण्यासाठी पुढील काही वर्षांत अधिक नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले जाऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे. शौरी यांनी कधी काळी वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये काम केले आहे. 

पंतप्रधानांची इंदिरा गांधी आणि जयललिता यांच्याशी तुलना करताना शौरी म्हणाले, की मोदी हे अहंकारी असून ते स्वतःच्याच प्रेमात पडले आहेत. त्यामुळे त्यांना नेहमी असुरक्षितता जाणवत असते. स्वतःच्या फायद्यासाठी इव्हेंटचा वापर करणे हे त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने जमते. लोकांना वापरा आणि नंतर फेकून द्या अशी पंतप्रधानांची मनोवृत्ती असून पेपर नॅपकिनसारखा जनतेचा वापर केला जातोय, असेही त्यांनी नमूद केले.
=============================================
ऐन दुष्काळात मंत्री पाण्यात चिंब
मलबार हिलवरील बंगल्यांत बेसुमार वापर; राजभवनातही महामूर 
मुंबई - राज्य दुष्काळात होरपळत असताना नागरिकांना "पाणी जपून वापरा,‘ असे मंचावरून सांगणारे मंत्री "कोरडे पाषाण‘ राहून आपल्या बंगल्यात मात्र सढळ हस्ते होत असलेला पाण्याचा वापर थांबवू शकलेले नाहीत. मुंबईत 25 टक्के पाणीकपात लागू असताना मंत्र्यांच्या बंगल्यावर दररोज तब्बल 70 लाख लिटर पाणी जिरते आहे. अंदाजे 50 एकरावर पसरलेल्या "राजभवन‘मध्येही उदकाचा महिमा कुणाला कळलेला नाही. राज्यकर्ते आपल्या मलबार हिल परिसरातील बंगल्यांत पाण्याची कशी उधळपट्टी करत आहेत, याची धक्कादायक माहिती "सकाळ‘ला मिळाली आहे. 

विदर्भ, मराठवाड्यातील नागरिक पाण्याच्या एकेका थेंबासाठी रक्त आटवत आहेत. जीव धोक्‍यात घालत आहेत. गुरांची पोटे खपाटीला गेली आहेत. शेतकऱ्यांचे गोठे रिकामे झाले आहेत. गुरे खाटकांना विकली जात आहेत; पण मंत्र्यांच्या बंगल्यांकडे वाहणारी गंगा काही आटलेली नाही. गेल्या वर्षीइतकाच पाण्याचा पुरवठा त्यांना होत असल्याचे "सकाळ‘ने मिळविलेल्या कागदपत्रांतून उघड झाले आहे. 

"राजभवना‘मध्ये दररोज तब्बल तीन लाख 74 हजार लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या "वर्षा‘ निवासस्थानात दिवसाला 44 हजार 435 लिटर पाणीपुरवठा सुरू आहे. मंत्र्यांच्या निवासस्थानासह तेथील कर्मचारी निवास, कार्यालये, पोलिस यांनाही पाणी लागते. मलबार हिल परिसरातील राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह वीस बंगल्यांवर दररोज सत्तर लाख लिटर पाणी वापरले जात आहे. त्याची किंमत कुणालाच कळलेली नाही. उन्हाने शेतकऱ्यांचे चेहरे करपले; पण "राजभवन‘समोरच्या विस्तीर्ण हिरवळीला शुष्कतेचा वाराही लागलेला नाही! 
=============================================
‘ऑगस्टा’ म्हणजे ‘बोफोर्स’ नाही - मनोहर पर्रीकर
नवी दिल्ली - ‘ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणात तत्कालीन हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी तसेच गौतम खेतान यांनी केवळ वाहत्या गंगेत हात धुतले. पण ही गंगा नेमकी कुठे जाते आहे, याचा शोध घेणार आहोत. ‘बोफोर्स’मध्ये आम्ही जे करू शकलो नाही, ते ‘ऑगस्टा वेस्टलॅंड’मध्ये करून दाखवू,’ अशा शब्दांत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकसभेत काँग्रेसला इशारा दिला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची कालबद्ध चौकशी व्हावी, या मागणीचा पुनरुच्चार करत काँग्रेसने सभात्याग करून सरकारवर अविश्‍वास व्यक्त केला. 

राज्यसभेनंतर आज लोकसभेत ‘ऑगस्टा वेस्टलॅंड’ गैरव्यवहारावरील लक्षवेधीवरून सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस अशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. सत्ताधारी बाकांवरून होणाऱ्या आरोपांच्या वेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी बऱ्याचदा आक्रमक झाल्याचे दिसले. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी, या प्रकरणात तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अँटनी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना बेकायदेशीर काम कोणी करायला लावले, याचा सरकारने खुलासा करावा अशी मागणी केली, तर किरीट सोमय्या यांनी काँग्रेसकडे अंगुलीनिर्देश करताना या गैरव्यवहाराचा संबंध बड्या राजकीय नेत्याच्या मित्रपरिवाराशी असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी, भाजपच्या आरोपांचे मायाजाल उद्‌ध्वस्त करण्यासाठी काँग्रेसकडे सज्जड पुरावे असल्याचा दावा करताना, सत्तेत येऊन दोन वर्षे होऊनही मोदी सरकारने चौकशी का नाही केली, असा सवाल केला. सोनिया गांधींचे, अहमद पटेल यांचे नाव कोठेही नसताना पीटर होलेट याच्या पत्रातील सांकेतिक उल्लेखांच्या आधारे काँग्रेस नेतृत्वाला लक्ष्य करणे सरकारने चालवले आहे. लाचखोरीबाबत चर्चेत आलेले कुटुंब हे त्यागी कुटुंब आहे. गांधी कुटुंब नव्हे, असाही दावा त्यांनी केला.
=============================================
पदवी घेणारे मोदी वेगळेच - आप
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीसंदर्भातील वादात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाने आज पुन्हा एकदा नवा आरोप केला. दिल्ली विद्यापीठातील नोंदी तपासल्या असून, त्यात नरेंद्र मोदी यांचा कोणताही उल्लेख नाही, असा दावा आम आदमी पक्षाने (आप) केला. विशेष म्हणजे, दिल्ली विद्यापीठातून "नरेंद्र मोदी‘ या व्यक्तीला पदवी दिली आहे; मात्र "ते‘ मोदी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाहीत, असेही "आप‘ने म्हटले आहे. 

‘आप‘चे नेते आशिष खेतान म्हणाले, ‘दिल्ली विद्यापीठातील 1975 ते 1980 या कालावधीतील सर्व नोंदी आम्ही आमच्या पातळीवर तपासल्या. "नरेंद्र दामोदरदास मोदी‘ या नावाच्या व्यक्तीला दिल्ली विद्यापीठातून कोणतीही पदवी प्रदान केलेली नाही. 1975 ते 1978 या कालावधीत दिल्ली विद्यापीठातून पदवी मिळविलेल्या एका व्यक्तीचे नाव पंतप्रधानांशी मिळते-जुळते आहे. मात्र, त्यांचे संपूर्ण नाव नरेंद्रकुमार महावीरप्रसाद मोदी असे असून, ते राजस्थानमधील रहिवासी आहेत. त्यांची जन्मतारीख 19 ऑक्‍टोबर 1958 अशी आहे.‘‘ आम्ही केलेल्या तपासानुसार, पंतप्रधान मोदी यांची पदवी खोटी आहे. हा गंभीर गुन्हा आहे, असे "आप‘चे नेते आशुतोष म्हणाले.
=============================================
सरकारचे दिवस भरले आहेत - सोनिया गांधी
‘लोकशाही बचाव‘द्वारे कॉंग्रेसचे दिल्लीत शक्तिप्रदर्शन 
नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेश, उत्तराखंडमधील अस्थिरता, "ऑगस्टा वेस्टलॅंड‘सारख्या प्रकरणांवरून संतप्त झालेल्या कॉंग्रेसने संसदेपाठोपाठ आज "लोकशाही बचाव‘ सभेद्वारे रस्त्यावर उतरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरुद्ध शक्तिप्रदर्शन केले. मोदी सरकारने ज्याप्रकारे जनादेशाला धोका दिला आहे, 

त्यावरून सरकारचे दिवस भरले आहेत असे दिसते, असा हल्ला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी केला. कॉंग्रेस देशाचा आत्मा असून भारत कधीही कॉंग्रेसमुक्त होणार नाही, असा इशारा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी दिला. 

जंतरमंतर येथे कॉंग्रेसची आज "लोकशाही बचाव‘ सभा झाली. सभेत सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांची भावनिक साद कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी होती. दहा मिनिटांच्या भाषणात सोनियांनी मोदी आणि संघावर प्रहार केले. तुलनेने राहुल गांधींचे साडेचार मिनिटांचे भाषण विस्कळित आणि प्रभावहीन जाणवले. या सभेनंतर पदयात्रेद्वारे संसदेला घेराव घालण्यासाठी निघालेल्या सोनिया, डॉ. मनमोहनसिंग आणि राहुल गांधींना पोलिसांनी अटक केली. काही वेळानंतरच त्यांची मुक्तता करण्यात आली. 

राहुल गांधींनी मोदींच्या दोन कोटी रोजगार निर्मितीच्या घोषणेची खिल्ली उडवताना गेल्या वर्षी फक्त 1.3 लाख लोकांनाच रोजगार मिळाल्याचा चिमटा काढला. देशात फक्त मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचेच म्हणणे ऐकले जात असून त्यांच्याविरुद्ध बोलणाऱ्यांवर आक्रमण केले जात असल्याचे टीकास्त्र राहुल यांनी सोडले. डॉ. मनमोहनसिंग यांनी देश कधीही कॉंग्रेसमुक्त होऊ शकणार नाही, असा इशारा देताना कॉंग्रेसला दुबळे करण्यासाठी 1885 पासून अनेक प्रयत्न झाले; परंतु ते सर्व फोल ठरले असे सांगितले
=============================================

No comments: