Wednesday, 25 May 2016

नमस्कार लाईव्ह २५-०५-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- सैराटचे झिंगाट: न्यूयॉर्कमधील बॉम्बे थिएटर दणाणले 
२- अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये बॉम्बस्फोट १० ठार. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- मंत्रालयावर 'लॉकी रॅन्सन'चा हल्ला, अनेक संगणक करप्ट 
४- अंगुरलता सारख्या आमदारामुळे 'अच्छे दिन' आलेच समजा - रामगोपाल वर्मा 
५- हे प्रभो, तुम्ही पुन्हा पुन्हा या!; सर्वच रेल्वे स्थानके स्मार्ट 
६- जयललितांनी मोदींना लिहिलेली पत्रे कचऱ्यात 
७- लिनोवो भारतात नवा प्रकल्प उभारणार 
८- देशातील एक तृतीयांश एटीएम निकामी: आरबीआय 
९- सोनिया, राहुलप्रतीच एकनिष्ठ: काँग्रेस आमदार 
१०- रासायनिक खताच्या किमतीत यंदा वाढ होणार नाही 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात चुकांचे धडे 
१२- एअर इंडियाच्या सुपर सेलचा शेवटचा दिवस, स्वस्त तिकीट १४९९ रुपयात 
१३- कुर्ल्यातील हार्बर होणार एलिव्हेटेड 
१४- दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी हातात शस्त्रे घ्या - संजय राऊत 
१५- दिल्ली; पोलिसाच्या कुटुंबाची धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या 
१६- सीपीएम नेते पिनराई विजयन यांनी केरळच्या मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ
१७- औरंगाबाद - जालना उत्तर पत्रिका पुनर्लेखन प्रकरण, ४७२ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव. 
१८- बिहार - सिवानमधील पत्रकार हत्या प्रकरणी पाच जणांना अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- लखनऊ; पत्नी सोडून गेली म्हणून 'त्याने' तीन जिल्ह्यातील वीज पुरवठा केला खंडीत 
२०- कर्नाटक पोलिसांचा सातारा जिल्ह्यात गोळीबार !
२१- मुंबई; क्लस्टर डेव्हलपमेंटचा पालिका करणार अभ्यास
२२- मुंबई; नव्या ‘डीपी’ला शिवसेनेचा विरोध 
२३- कुर्ल्यात नालेसफाई दरम्यान जमीन खचली, घरे-दुकाने जमीनदोस्त 
२४- देवळा तालुक्यातील खामखेडा येथे वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- एबी डिव्हिलीयर्सबद्दल या खास '१०' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? 
२६- न्यायालयाचा हस्तक्षेप धोकादायक - बीसीसीआयचे नवनिर्वाचित सचिव अजय शिर्के 
२७- एबी सैराट, तर आरसीबी झिंगाट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
(सुमित महाजन, नमस्कार लाईव्ह वाचक )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

==========================================

सैराटचे झिंगाट: न्यूयॉर्कमधील बॉम्बे थिएटर दणाणले

  • आप्पासाहेब पाटील, सोलापूर
    झिंग...झिंग...झिंगाट, वेड लागलं... या गाण्यांनी मराठी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आरुढ झालेल्या आणि सोलापूरच्या मातीचा सुगंध दरवळणार्‍या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने अवघ्या भारतीयांना वेड लावलं आहे. बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड तोडणार्‍या या चित्रपटाने आता सातासमुद्रापार झेप घेत चक्क 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यावर न्यूयॉर्कमधील महाराष्ट्र मंडळाच्या रसिकांना थिरकायला लावलं. सोलापूरच्या कला क्षेत्राचा हा अटकेपार झेंडा सोलापूरकरांची शान राखणारा ठरला आहे. 
    न्यूयॉर्क येथील बॉम्बे थिएटरमध्ये महाराष्ट्र मंडळ आणि छत्रपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बॉम्बे थिएटर येथे सैराट हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. यावेळी मराठी रसिक प्रेक्षकांनी सैराट चित्रपटातील सर्वच गाण्यांवर झिंगाट होऊन चित्रपटाचे भरभरुन कौतुक केले.
    उभ्या महाराष्ट्राला झिंगायला लावण्याबरोबरच वास्तवतेचं भान राखायला लावणार्‍या सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आजही महाराष्ट्रातील चित्रपटगृहात सैराटचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. फँड्रीच्या यशानंतर नावारूपाला आलेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सैराटमधून पुन्हा माणसाच्या आत्मसन्मानाची गोष्ट सांगितली आहे. परशा आणि आर्चीच्या अल्लड निखळ प्रेमाच्या माध्यमातून त्यांनी उभा केलेला सामाजिक भवताल देशभरातील प्रेक्षकांना भावतो आहे. विशेष म्हणजे चित्रपट पाहताना प्रत्येकाला जणू ती आपल्याच आजूबाजूची घटना पाहतोय, अशी भावना होते. याशिवाय अजय-अतुल यांच्या संगीताच्या ठेक्यावर थिरकायला लावणार्‍या गाण्यांनी लोकांना भुरळ घातली आहे. गेल्या काही वर्षांत अनेक मराठी चित्रपटांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. 
    यात लय भारी, नटसम्राट, बालक पालक, टाईमपास, कट्यार काळजात घुसली या चित्रपटांच्या उत्पन्नाची खूप चर्चा झाली. सैराटने मात्र या चित्रपटांच्या उत्पन्नाचे सर्व आकडे ओलांडले आहेत. सर्वोच्च उत्पन्न झालेला मराठी चित्रपट ठरण्याचा मान सैराटला मिळाला आहे.
==========================================

पोलिसाच्या कुटुंबाची धावत्या ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या


  • ऑनलाइन लोकमत 
    दिल्ली, दि. २५ - दिल्ली पोलिस दलातील पोलिस निरीक्षकाच्या कुटुंबातील तीन सदस्यांनी धावत्या ट्रेनसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शामली भागात बुधवारी ही धक्कादायक घटना घडली. 
    क्रिष्ण पाल यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी मुनेश, २३ वर्षाचा मुलगा धीरज आणि २१ वर्षाची मुलगी लुना २१ मे पासूनच बेपत्ता होते अशी माहिती सर्कल ऑफीसर निशांक शर्मा यांनी दिली. 
    तिघांनी मंगळवारी आत्महत्या केली. रेल्वे रुळावर त्यांचे मृतदेह सापडले. काश्मिरी गेट पोलिस स्थानकात तैनात असलेल्या क्रिष्ण पाल यांनी २१ मे रोजीच कुटुंबिय बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. पत्नी, मुलगा आणि मुलगी यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले ते समजू शकलेले नाही. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत 
==========================================

कुर्ल्यात नालेसफाई दरम्यान जमीन खचली, घरे-दुकाने जमीनदोस्त 

  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. २५ - पावसाळयापूर्वी मुंबईत सर्वत्र नालेसफाईची कामे वेगाने सुरु असताना, बुधवारी कुर्ला शिवसृष्टी येथे नालेसफाई दरम्यान नाल्याजवळची जमीन खचल्याची घटना घडली. नाल्याजवळची जमीन खचल्यामुळे अनेक घरांचे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. 
    जवळपास २५ ते ३० घरे आणि दुकाने जमीनदोस्त झाली.  या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. 
    सकाळी सहाच्या सुमारास घरे खचण्यास सुरुवात झाली. ज्या घरांचे आणि दुकानांचे नुकसान झाले ती नाल्याला खेटून बांधण्यात आली होती.
==========================================

मंत्रालयावर 'लॉकी रॅन्सन'चा हल्ला, अनेक संगणक करप्ट

मंत्रालयावर 'लॉकी रॅन्सन'चा हल्ला, अनेक संगणक करप्ट
मुंबई मंत्रालयातील अनेक संगणकांमध्ये व्हायरसने शिरकाव केला आहे. ‘लॉकी रॅन्सन’ नावाच्या या व्हायरसमुळे अनेक संगणक करप्ट झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून हा तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. अजूनही मंत्रालयातील अनेक कॉम्प्युटर बंद असून, तात्पुरती सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक संगणक करप्ट झाले आहेत.

ई-मेल द्वारे हा व्हायरस मंत्रालयापर्यंत पोहोचला. या व्हायरसमुळे मंत्रालयातून मेल करणं कठीण बनलं आहे. या व्हायरसमुळे मेलमधील मजकूर स्पेशल कॅरॅक्टर्स जसे की ं$#़॥ असा दिसतो. केवळ जेपीजी फाईलच ओपन होत आहेत.

त्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना g mail वापरण्यास बंदी घालण्यात आली असून, ऑफिशियल मेल वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय USB च्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.

मंत्रालयात सुमारे 5000 संगणक आहेत. यापैकी कोणकोणत्या संगणकांपर्यंत हा व्हायरस पोहोचला आहे, हे शोधण्याचं काम आयटी विभाग करत आहे.
==========================================

सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात चुकांचे धडे

सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात चुकांचे धडे
पुणे: महाराष्ट्र राज्य पुस्तक मंडळाने पुन्हा एकदा घोळ घातला आहे. बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात यंदा अशा काही चुका केल्या आहेत की ते ऐकून तुम्हाला चक्करच येईल. 
इतिहासाच्या पुस्तकात अरुणाचल प्रदेश हा भारत नाही, तर चीनचा भाग असल्याचं दाखवण्यात आलं आहे. महामंडळाच्या चुकांचा पाढा इथेच संपत नाही, तर यापुढे जाऊन पाकव्याप्त काश्मिरला स्वतंत्र प्रदेश दाखवण्यात आला आहे. 
याचसोबत मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या कान्हेरी गुहा या पुस्तकातील नकाशात चक्क पाण्याच्या खाली दाखवण्यात आल्या आहेत. 
या सगळ्या चुकांचा कळस म्हणजे भारताची राजधानी दिल्ली ज्या यमुना नदीच्या काठावर वसली आहे, तिच्या विरुद्ध तीरावर दाखवण्यात आली आहे. 
त्यामुळे इतक्या तज्ज्ञ मंडळींच्या नजरेखालून तयार करण्यात आलेल्या पुस्तकात जर इतक्या गंभीर चुका राहणार असतील, तर विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन काय शिकायचं हा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
==========================================

एअर इंडियाच्या सुपर सेलचा शेवटचा दिवस, स्वस्त तिकीट १४९९ रुपयात


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. २५ - जास्तीत जास्त हवाई प्रवाशांना आपल्याकडे वळवण्यासाठी अन्य हवाई कंपन्यांप्रमाणे एअर इंडियाही आता स्वस्त तिकीट दराच्या स्पर्धेत उतरली आहे. एअर इंडियाने आणलेल्या सुपर सेल स्कीमचा आजचा शेवटचा दिवस आहे. एअर इंडियाने या स्कीमव्दारे स्वस्त हवाई प्रवासाची संधी दिली आहे. 
    सुपरसेलमध्ये तिकीट बुक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एअर इंडियाने देशांतर्गत हवाई प्रवासाचे तिकीट अवघ्या १४९९ रुपयात उपबद्ध करुन दिले आहे. २१ मे रोजी ही ऑफर सुरु झाली होती. सुपर सेलमध्ये तिकीट बुक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 
    या दरम्यान तिकीट बुक केल्यानंतर तुम्ही एक जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रवास करु शकता. जुलै-सप्टेंबर आणि जानेवारी-मार्च या दोन तिमाहीत अन्य तिमाहींच्या तुलनेत हवाई प्रवाशांची संख्या कमी असते. 
==========================================

एबी डिव्हिलीयर्सबद्दल या खास '१०' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २५ - आयपीएलच्या ९व्या सत्रातील पहिल्या क्वॉलिफायरमधील गुजरातविरुद्धचा सामना हातातून जवळजवळ निसटलेला असतानाच धडाकेबाज फलंदाजी करत बंगळुरूला अंतिम फेरी गाठून देणा-या एबी डिव्हीलीयर्सची (नाबाद ७९ धावा) सध्या बरीच चर्चा सुरू आहे. मूळचा दक्षिण आफ्रिकेचा हा फलंदाज आयपीएलमध्येही उत्तम कामगिरी करत असून त्याच्या तूफान फलंदाजीचे शेकडो चाहते आहेत. एबी डिव्हीलीयर्सने क्रिकेटप्रमाणेच इतर क्षेत्रात, खेळातही उल्लेखनीय कामगिरी केली असून त्याच्याबद्दलच्या काही खास निवडक गोष्टींची माहिती तुमच्यासाठी...
    १) एबी डिव्हीलीयर्सचा जन्म १७ फेब्रुवारी १९८४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील प्रेटोरिया येथे झाला. एक उत्तम क्रिकेटपटू असलेल्या एबी डिव्हीलीयर्सला लहानपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती.
    २) ज्युनिअर नॅशनल हॉकी स्क्वॉडमध्ये तो गोलकीपर होता. 
    ३) तसेच ज्युनिअर नॅशनल फूटबॉल संघातही डिव्हीलीयर्सची निवड झाली होती.
==========================================

पत्नी सोडून गेली म्हणून 'त्याने' तीन जिल्ह्यातील वीज पुरवठा केला खंडीत


  • ऑनलाइन लोकमत 
    लखनऊ, दि. २५ - संसाराच्या मध्यावर पत्नी साथ सोडून निघून गेली तर, अनेकांना ते दु:ख पचवणे जड जाते. काहीजण त्या दु:खावर मात करुन पुन्हा आयुष्यात उभे रहातात तर, काही जण टोकाचे पाऊल उचलतात. उत्तप्रदेशमध्ये रहाणा-या रामप्रसादने पत्नी सोडून गेल्यामुळे एकदम विचित्र कृती केली ज्यामुळे तीन जिल्ह्यात सहा तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. 
    कौटुंबिक वादातून रामप्रसादची पत्नी त्याला सोडून गेली. त्यामुळे निराश झालेला रामप्रसाद थेट इलेक्ट्रीकच्या पोलवर जाऊन चढला त्यामुळे उत्तरप्रदेशातील तीन जिल्ह्यांमध्य तब्बल सहातास वीजपुरवठा खंडीत झाला होता. सोमवारी सकाळी उत्तरप्रदेशच्या फिरोझाबाद जिल्ह्यात ही घटना घडली. 
    हताश रामप्रसाद सोमवारी सकाळी पाचच्या सुमारास असफाबाद गावातील १.३५ लाख व्होल्ट क्षमतेच्या वीजेच्या खांबावर जाऊन चढला. तो पोलिसांना पत्नीला शोधून आणण्यास सांगत होता. तुम्ही माझ्या पत्नीला शोधून आणा अन्यथा खांबावरुन उडी मारुन जीव देईन अशी धमकी तो देत होता. पोलिसांनी त्याला पत्नीला शोधून काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर ११.३० च्या सुमारास तो खाली उतरला.  
==========================================

कर्नाटक पोलिसांचा सातारा जिल्ह्यात गोळीबार !


  • मंगळवेढ्याच्या आरोपींना पकडण्यासाठी पाठलागाचा थरार; स्थानिक पोलिस मात्र अनभिज्ञ
    ऑनलाइन लोकमत
    सातारा, दि. २५ - स्थळ : वाठार स्टेशनचा चौक. वेळ : सकाळची. लोकांची लगबग सुरू झालेली... एवढ्यात मोटारसायकलवरून तिघेजण चौकात येताच पाठीमागून भरधाव वेगात पोलिसांची गाडी कचकन त्यांच्यासमोर उभी ठाकते. गाडीतून पोलिस उतरेपर्यंत मोटारसायकलवरील दोघे जण पळून जातात. एकाला पकडण्यासाठी पोलिस त्यांच्या पिस्तुलातून गोळीबार करतात. अखेर एकजण त्यांच्या तावडीत सापडतो... त्याला घेऊन ते 'गोल टोपीवाले' पोलिस निघून जातात. ग्रामस्थ मात्र पुरते हबकतात. विशेष म्हणजे ज्या गावात ही फिल्मी स्टाईल घटना घडली, तिथल्या स्थानिक पोलिसांना याचा थांगपत्ताही नसतो. कारण गोळीबार करणारे हे पोलिस कर्नाटकचे असतात.
    मंगळवेढा येथील तीन आरोपींना पकडण्यासाठी कर्नाटकचे पोलिस काल रात्रीपासून त्यांच्या पाठलागावर होते. आरोपी मोटारसायकलवर तर पोलिस त्यांच्या गाडीत... असा हा थरारक प्रवास फलटणमार्गे वाठार स्टेशनमध्ये आज सकाळी पोहोचला. कर्नाटकच्या पोलिसांनी गोळीबार करून एकाला ताब्यात घेतले असले तर बाकीचे दोघे फरार झाले. 
    कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील वाग्देव चौकात आज सकाळी ही घडल्यानंतर पोलिस खंडाळ्याच्या दिशेने घाटात निघून गेले. मात्र हे आरोपी गावातच कुठेतरी लपून बसल्याची चर्चा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील स्थानिक पोलिस यंत्रणा कामाला लागली असून खंडाळा तालुक्यात पोहोचलेल्या कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
==========================================

अंगुरलता सारख्या आमदारामुळे 'अच्छे दिन' आलेच समजा - रामगोपाल वर्मा


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. २५ - आसाम विधानसभेतील भाजपच्या नवनिर्वाचित महिला आमदार अंगुरलता डेकाबद्दल केलेल्या वादग्रस्त टि्वटवरुन दिग्दर्शक रामगोपाल वर्माने आता पलटी मारली आहे. मी फक्तअंगूरलताजींचे कौतुक केले. अनेक आमदार दिसायला चांगले नसतात. अंगूरलतामुळे एक बदल झाला आहे. प्रकरण चिघळू नये म्हणून अशी सारवासारवी करणारे टि्वट रामगोपाल वर्माने केले आहे. 
    दोन दिवसांपूर्वी राम गोपाल वर्माने आमदार जर असे दिसू लागले तर, अच्छे दिन आलेत म्हणून समजा. थँक्यू अंगूरलताजी थँक्यू मोदीजी, मला पहिल्यांदा राजकारण आवडले असे वादग्रस्त  टि्वट केले होते. रामगोपाल वर्माची वादग्रस्त टि्वट करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्याने अशी वादग्रस्त टिवटिव केली आहे.  
==========================================

क्लस्टर डेव्हलपमेंटचा पालिका करणार अभ्यास


  • मुंबई : उपनगरात रखडलेल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट अवलंबिणे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे़ तत्पूर्वी या विकासाचा उपनगरावर
    होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्याचे काम नीरी (नॅशनल एन्व्हायरोन्मेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) या संस्थेकडे पालिकेने सोपविले आहे़
    लहान इमारतींचा पुनर्विकास करण्यास विकासक तयार होत नाहीत़ विकास झालाच तर रहिवाशांना लहान सदनिकांवर समाधान मानावे लागत आहे़ त्यामुळे राज्य सरकारने दक्षिण मुंबईतील चाळींच्या पुनर्विकासासाठी काही वर्षांपूर्वी क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग अवलंबिला होता़ या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता़
    मात्र क्लस्टर डेव्हलपमेंटचा उपनगरावर कोणता परिणाम होईल, याचा अभ्यास घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत़
    त्यानुसार राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (नीरी) वर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ त्यासाठी पालिका ३५
    लाख रुपये मोजणार आहे़
==========================================

नव्या ‘डीपी’ला शिवसेनेचा विरोध


  • मुंबई : परवडणाऱ्या घरांसाठी ना विकास क्षेत्रातील मोकळ्या जमिनी, मिठागराची जागा व आरे कॉलनीतील भूखंडाचा वापर करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे़ व्यावसायिक चटईक्षेत्र निर्देशांकातील प्रस्तावित वाढीवरूनही शिवसेनेने भाजपाला आव्हान दिले आहे़ त्यामुळे मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यावरून सत्ताधारी युतीतील मित्रपक्ष एकमेकांविरोधात आखाड्यात उतरल्याचे चित्र आहे.
    शहराचा सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठीचा विकास नियोजन आराखडा वादात सापडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित आराखडा तयार करण्याचे आदेश दिले़ त्यानुसार नवीन आराखड्याची आखणीही अंतिम टप्प्यात असताना आता सत्ताधारी शिवसेनेनेच यातील काही तरतुदींना विरोध सुरू केला आहे़ त्यामुळे विकास आराखड्यावरून शिवसेना-भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण रंगणार आहे.
    विकास आराखड्यातून ना विकास क्षेत्राचा काही भाग गृहनिर्माणासाठी खुला करण्यात आल्याने शिवसेनेचे पर्यावरण प्रेमही जागे झाले आहे़ अशा तरतुदींना विरोध करण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली़ या आराखड्यात काही बदलही शिवसेनेच्या नेत्यांनी यावेळी सुचविले़
==========================================

कुर्ल्यातील हार्बर होणार एलिव्हेटेड


  • - सुशांत मोरे,  मुंबई
    मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकातील हार्बर मार्ग हे एलिव्हेटेड (उन्नत) करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या या नव्या प्रस्तावात कुर्ला स्थानकात एलिव्हेटेड हार्बर स्थानक बांधतानाच तीन प्लॅटफॉर्म उभारले जातील. त्यानुसार कुर्ला टर्मिनसही केले जाणार असून एका प्लॅटफॉर्ममधून पनवेल, वाशीला जाणाऱ्या लोकल सोडण्यात येतील. त्यामुळे सीएसटीमधून सुटणाऱ्या हार्बरच्या गाड्यांवरील ताणही बराचसा कमी होण्यास मदत मिळणार आहे. नव्याने बांधण्यात येणारा एलिव्हेटेड मार्ग कसाईवाडा ते टिळकनगर असा असेल.
    मध्य रेल्वेवर कुर्ला ते सीएसटीपर्यंत पाचवा-सहावा मार्ग तयार केला जाणार आहे. मात्र ही मार्गिका कुर्ला ते सीएसटीपर्यंत आणताना जागेची अडचण सतावत आहे. ही अडचण सोडविण्यासाठी कुर्ला स्थानकातील हार्बरचे दोन्ही प्लॅटफॉर्म एलिव्हेटेड बांधण्यात येतील. कुर्ला स्थानकात दोन अतिरिक्त मार्गिका असल्या तरी त्या मार्गिका मालवाहतुकीसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे प्रस्तावानुसार हार्बरचे दोन प्लॅटफॉर्म आठ मीटर वर उचलण्यात येतील आणि त्याखालून पाचव्या-सहाव्या मार्गिकेला जागा मोकळी केली जाईल. हार्बरचे दोन प्लॅटफॉर्म एलिव्हेटेड बांधतानाच त्यासोबत आणखी एक प्लॅटफॉर्म एलिव्हेटेड बांधण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. असे हार्बरचे एकूण तीन प्लॅटफॉर्म कुर्ला स्थानकात एलिव्हेटेड बांधतानाच तेथे तिकीट बुकिंग खिडक्या आणि अन्य सुविधा देण्यात येणार आहेत.
==========================================

न्यायालयाचा हस्तक्षेप धोकादायक


  • पुणे : इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत (आयपीएल) पाण्यावरून न्यायालयाने सामने महाराष्ट्राबाहेर स्थलांतराचा दिलेला निर्णय अत्यंत धोकादायक असून, वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे. आयपीएलबाबत असा निर्णय दिला आहे, उद्या प्रसारमाध्यमांवरदेखील अशीच वेळ येऊ शकते, अशा शब्दांत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवनिर्वाचित सचिव अजय शिर्के यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत आपली नाराजी व्यक्त केली.
    सचिवपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिर्के यांनी ‘लोकमत’शी विविध विषयांवर संवाद साधला. शिर्के म्हणाले, ‘‘आयपीएलमधील पाण्याच्या प्रश्नात अजिबात कायदेशीर तथ्य नव्हते. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर मैदानासाठी करण्यात येणार होता. तसेच गहुंजे येथील स्टेडियमला पाण्याचा कोणताही प्रश्न नव्हता. आजही पवना नदीत मुबलक पाणी आहे. तेथील पाणी लातूरला देण्याची तयारी दर्शविली होती. याशिवाय दुष्काळ निधीसाठी ५ कोटी रुपयांचा निधीदेखील देण्याची तयारी दर्शविली होती. तरीही न्यायालयाने आयपीएल सामन्यांविरोधात न्यायालयाने दिलेला निर्णय धक्कादायक होता.’’
==========================================

एबी सैराट, तर आरसीबी झिंगाट


  • बंगळुरू : सामना हातातून जवळजवळ निसटलेला असताना धडाकेबाज एबी डिव्हिलीयर्स व इक्बाल अब्दुल्ला यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने निर्णायक पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात लायन्सला ४ विकेटनी नमवून आयपीएलच्या नवव्या मोसमाची अंतिम फेरी गाठली. ६ बाद ६८ अशी केविलवाणी अवस्था असताना एबीने ४७ चेंडंूत नाबाद ७९ धावांचा तडाखा दिला. तर, अब्दुल्लाने २५ चेंडूंत नाबाद ३३ धावांची फटकेबाजी केली. या दोघांच्या धडाक्यापुढे धवल कुलकर्णीचा (४/१४) भेदक मारा झाकोळला गेला.
    एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बँगलोरने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना गुजरातला २० षटकांत १५८ धावांवर रोखले. एकूणच स्पर्धेतील बँगलोरच्या फलंदाजांनी लावलेला धडाका पाहता, त्यांचा दणदणीत विजय गृहीत धरला जात होता. मात्र, कर्णधार विराट कोहली (०), विध्वंसक ख्रिस गेल (९), लोकेश राहुल (०), शेन वॉटसन (१) व सचिन बेबी (०) झटपट परतल्याने बँगलोरचा डाव सहाव्या षटकात ५ बाद २९ असा घसरला.
==========================================
हे प्रभो, तुम्ही पुन्हा पुन्हा या!


हे प्रभो, तुम्ही पुन्हा पुन्हा या! हे वाक्‍य काही महिन्यांपूर्वी चर्चेत आले होते. तेव्हा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू ठाणे स्थानकावर आले होते. ठाण्याचे स्थानक एकदम चकाचक, त्याची रंगरंगोटीही झालेली..! आता एकच नव्हे, तर प्रभू यांनी सर्वच रेल्वे स्थानके स्मार्ट किंवा विमानतळासारखी करण्याचा निर्धार केला आहे आणि त्यांना साथ आहे नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची..! सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ते होणार आहे खासगी सहभागातून आणि सरकारच्या खिशातून पैसे न जाता किंवा टेंडर काढूनच!

वास्तविक, 2014 च्या मेमध्ये भाजपचे सरकार देशात आले. पण सुरेश प्रभू यांनी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली ती नोव्हेंबर 2014 मध्ये. पण एवढ्या कमी वेळात ‘प्रभू एक्‍सप्रेस‘ योग्य वेगात आहे, असे म्हणायला हरकत नाही. 
==========================================
'जयललितांनी मोदींना लिहिलेली पत्रे कचऱ्यात'

File Photoनवी दिल्ली - किरकोळ विषयांवर तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेली पत्रे कचऱ्यात जात असल्याचे म्हणत अलिकडेच त्यांनी "नीट‘मधून तमिळनाडूला वगळण्याबाबत लिहिलेले पत्र कचऱ्यात जाणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

स्वामी म्हणाले, ‘पंतप्रधानांना पत्र लिहिण्यामध्ये त्यांनी जागतिक विक्रम केलेला आहे. माझ्यामते त्यातील बहुतेक पत्रे निरुपयोगी पत्रांच्या टोपलीत जातात. सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या खून प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा ठोठावली तर तमिळनाडूतील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित गुन्हेगारीला अशा प्रकारच्या शिक्षेतून सूट मिळण्याबाबतचा ठराव तमिळनाडू विधानसभेत मंजूर केला आहे, अशी माहिती देणारे पत्र त्या लिहितात, असे हास्यास्पद पत्र त्या लिहितात. मला वाटते त्यांनी "नीट‘बाबत लिहिलेले पत्रही निरुपयोगी पत्रांच्या टोपलीत जाणार आहे.‘

तमिळनाडूमध्ये पूर्वीपासूनच वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता प्रवेश परीक्षेतून (नीट) राज्याला वगळण्यात यावे, याबाबत जयललिता यांनी मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वामी यांनी जयललितांवर टीका केली आहे.
==========================================
लिनोवो भारतात नवा प्रकल्प उभारणार

नवी दिल्ली : संगणक क्षेत्रातील आघाडीवर असलेली चिनी कंपनी लिनोवो भारतात व्यवसाय वृद्धीसाठी नवा उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याचा विचार करीत आहे. सध्या कंपनीचा पुद्दुचेरी येथे एक स्वतंत्र उत्पादन प्रकल्प आहे. ‘आयबीएम‘च्या पर्सनल संगणक व्यवसायाचे अधिग्रहण केल्यानंतर कंपनीकडे या प्रकल्पाची मालकी हस्तांतरित झाली होती. परंतू आता कंपनीला तेथील सरकाकडून मिळणारी कर सवलत संपल्याने कंपनी नव्या प्रकल्पाच्या शोधात असल्याची माहिती खासगी सुत्रांनी दिली आहे. लिनोवोच्या पुद्दुचेरी प्रकल्पात वर्षाला 15 लाख पर्सनल संगणक तयार केले जातात.

कंपनीच्या या निर्णयाचा ‘मेक इन इंडिया‘ प्रकल्पाला फायदा होणार आहे. नव्या प्रकल्पासाठी कंपनी तेलंगणा, आंध्र प्रदेश व गुजरातचा विचार करीत आहे. शिवाय, कंपनीने छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशातूनही पर्याय खुला ठेवला आहे. सध्या कंपनीची तेथील राज्य सरकारांशी बोलणी सुरु आहे.  

लिनोवो भारतात संगणक क्षेत्रात कंपनी आघाडीवर आहे. 2015 वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचा संगणक बाजारपेठेत 25.3 टक्के वाटा होता. परंतू आता कंपनी आपल्या स्मार्टफोन व्यवसायाच्या विस्तारासदेखील उत्सुक आहे. सध्या कंपनी बाहेरुन स्मार्टफोन तयार करुन घेते. नव्या प्रकल्पात कंपनी स्मार्टफोन्सचेदेखील उत्पादन करणार आहे. सध्या कंपनीचे दरवर्षी 96 लाख स्मार्टफोन्स विकले जातात.   
==========================================
'दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी हातात शस्त्रे घ्या'

File Photoमुंबई - बजरंगदलाच्या शस्त्र प्रशिक्षण कार्यक्रमाला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला असून "दहशतवादाविरूद्ध लढण्यासाठी शस्त्रे होतात घेणाऱ्यांविरुद्ध गुन्हा का दाखल केला?‘ असा प्रश्‍न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, "देशामध्ये जैश-ए-मोहम्मद, तोय्यबा यांचे कॅम्प चालतात. त्यासाठी ते काय सरकारची परवानगी घेतात? जर आपले लोक त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी हातात शस्त्रे घेत असतील तर त्यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला? हा केवळ निवडणुकीचा मुद्दा आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावे.‘ तसेच ‘बाळासाहेबांनी दहशतवादाविरूद्ध लढायचे असेल तर हातात शस्त्रे घ्यावी लागतील असे म्हटले असून ते योग्य आहे‘ असेही ते म्हणाले.

उजव्या विचारसरणीची संघटना असलेल्या बजरंग दलाने हिंदूंच्या संरक्षणासाठी पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. बजरंग दलाचे धार्मिक प्रशिक्षण शिबीर नुकतेच अयोध्येत पार पडले. या शिबिरात प्रतिस्पर्धी नागरिकांच्या डोक्‍याला मुस्लिम धर्मियांची ओळख असलेली स्कल कॅप होती. या शिबिराची परवानगी घेण्यात आली नसल्याने प्रशिक्षण घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

==========================================
देशातील एक तृतीयांश एटीएम निकामी: आरबीआय

मुंबई: देशातील तब्बल एक तृतीयांश एटीएम केंद्रांवरील मशीन बंद असल्याचे रिझर्व्ह बँकेने निदर्शनास आणून दिले आहे. याचाच अर्थ दर तिसरे एटीएम केंद्र निरुपयोगी ठरत आहे. त्यामुळे बँकांनी लवकरात लवकर एटीएम केंद्रे सुरळित न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा आरबीआयकडून देण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस एस मुंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने देशात विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या 4000 एटीएम केंद्रांचे सर्वेक्षण केले. त्यापैकी एक तृतीयांश एटीएम मशीन बंद असल्याचे आढळून आले. शिवाय, अंध किंवा अपंग व्यक्तींना गृहीत धरुन त्यांच्यासाठी द्याव्या
लागणाऱ्या डिसप्ले इन्फर्मेशन व इतर विशेष सुविधाही अनेक केंद्रांवर नाहीत.  
==========================================
सोनिया, राहुलप्रतीच एकनिष्ठ: काँग्रेस आमदार

कोलकत्ता - पश्चिम बंगालमधे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला प्रचंड अपयश आले. त्याचदरम्यान तिथल्या काँग्रेसचे राज्यप्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी एक थक्क करणारे पाऊल उचलले आहे. त्यांनी चक्क निवडुन आलेल्या आमदारांकडून सोनिया व राहुल गांधींप्रती निष्ठा राखणार असल्याचे नमूद केलेल्या शपथपत्रावर स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत.

100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर हे शपथपत्र तयार करण्यात आले असून त्यामध्ये इतर मुद्यांचा समावेशही करण्यात आला आहे. गांधींप्रती निष्ठा राखण्याबरोबर पक्षाविरोधात एकही चुकीचा शब्द न बोलणे, पक्षहिताच्या नसलेल्या कार्यात सामिल न होणे या ‘शपथपत्रा‘सहच पक्षाविरोधात काही बोलण्याआधी आमदार राजीनामा देतील, असेही नमूद करण्यात आले आहे. या शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यास सक्ती केली नसल्याचे सांगत चौधरी म्हणाले की पक्षाप्रती निष्ठा जाहिर करण्यासाठी सर्व आमदारांनी मिळुन हे शपथपत्र तयार केले आहे तरी काही लोकांना ही गोष्ट न पटणारी आहे. काही आमदारांच्या मते हे शपथपत्र पक्षप्रमुखांपुढे समस्या व तक्रारी व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे.  
==========================================

No comments: