Sunday, 8 May 2016

नमस्कार लाईव्ह ०८-०५-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- अल्लेप्पो; सीरियातून स्पेनच्या तीन पत्रकारांची सुटका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- हिंदू नेत्यांना संपवा, दक्षिण आफ्रिकेत नोकरी मिळवा - डी कंपनी 
३- काय नेसावं, हेही आता सरकार ठरवेल, बीफ बंदीवरुन ओवेसींची उपहासात्मक टीका 
४- ...म्हणून व्हॉट्सअॅप कॉलिंगवर बंदीची मागणी! 
५- ओलाच्या टॅक्सीमध्ये महिलेवर जबरदस्ती, चालकाला अटक 
६- सशक्त असण्याचा अर्थ 'या' आठ महिलांनी समजावला 
७- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज केरळ आणि तामिळनाडूमध्ये सभा. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- पुण्यात पुन्हा जळीतकांड, पार्किंगमधील 7 दुचाकी जाळल्या
९- FTII च्या संचालकांना धमकीचं पत्र, पत्रासोबत स्फोटकसदृश पावडर 
१०- नांदेड; आयात गोमांस चालतं, मग बीफबंदी का? : अजित पवार 
११- महाराष्ट्र तोडणाऱ्यांना गुंडाळायला 24 तासही लागणार नाही : नितेश राणे 
१२- 'जलयुक्त शिवार' आदर्श मॉडेल - राजेंद्रसिंह राणा 
१३- म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून लुबाडले 
१४- ७० टक्के पाणीपट्टी अनिवार्य, वसुली राज्यात सक्तीची
१५- गोवंश हत्याबंदी; निर्णयाला आव्हान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- सोलापूरच्या नवदाम्पत्याची आहेराच्या पैशातून गावकऱ्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग 
१७- कोल्हापूर; पत्नीच्या वर्षश्राद्धाला पतीची मुलासह आत्महत्या 
१८- माहीम; दुकानातील कर्मचाऱ्यांना मारहाण 
१९- कोलकाता; जादवपूर विद्यापीठही पुन्हा वादाच्या भोवऱ्यात 
२०- गया; नेत्याच्या गाडीला ओव्हरटेक केल्याने हत्या 
२१- गयामध्ये तरुणाच्या हत्ये प्रकरणी जेडीयू एमएलसी मनोरमा देवीचा अंगरक्षकाला अटक. 
२२- पुणे: शिवणे भागात दुचाकींचे जळीतकांड 
२३- कानपूरमध्ये गंगा बॅरेजमध्ये वाहून गेलेल्या तीन युवकांचे मृतदेह सापडले. 
२४- हिमाचलप्रदेश; बस दरीत कोसळून भीषण अपघातात १२ मृत्यू, ४३ जखमी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी स्मार्टफोनची गरज नाही? 
२६- वासुदेव कामत यांचा अमेरिकेत सन्मान 
२७- विराट कोहली मशीनप्रमाणे खेळतोय - झंपा 
२८- देशातील प्रमुख पर्यटनस्थळांची सैर घडवणारी भारत दर्शन पर्यटन रेल्वेगाडी सुरू. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२९- मनपा क्षेत्रातील बांधकाम परवाने आता ऑनलाईन मिळणार 
३०- उमरी. नायगाव तालुक्यातील गावांना मिळणार पैनगंगेचे पाणी 
३१- विकास कामात अडसर निर्माण करणाऱ्या 'झुरळांना' हटविण्यासाठी स्प्रेचा वापर करा - निरोप समारंभात सुशील खोडवेकर 
३२- किनवट; खोट्या निविदा काढून फसवणूक करणाऱ्या माजी नगराध्यक्षांसह तत्कालीन नायब तहसीलदारांवर गुन्हा दाखल 
३३- जगापूर-गायतोंडच्या सरपंचपदी सविता लोणे यांची निवड 
३४- सीईओ विरुद्ध खोटी तक्रार करणाऱ्या महिलेस दहा हजारांचा दंड 
३५- जिल्ह्यातील ४३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश 
३६- अर्धापूर; लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल 
३७- हदगाव; शोर्ट-सर्किट होवून लागलेल्या आगीत एक दुकान व एक घर जळून खाक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
कोणतेही काम निष्ठेने व एकाग्रतेने करा. यश तुमच्या जवळच असते
(अरुण गिरी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
भाग्यश्री पाठक, राजू कोरते, राहुल हणमंते, बालाजी गिरी, चंदन पांडे, संतोष पाटील, मनोज झाडोकर, सुनील जगताप, सोमनाथ पाटील, हारजीतसिंघ सुखमणी, राजेश लाहोटी, वैभव ढगे, लतीफ शेख 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

==========================================

आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी स्मार्टफोनची गरज नाही?

आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी स्मार्टफोनची गरज नाही?
कॅलिफोर्निया : व्हॉट्सअॅप हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप कायमच नवनवीन फीचर्स आपल्या यूझर्ससाठी आणत असतं. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपवरील टेक्स्ट बोल्ड-इटॅलिक करण्याचं फीचर्स अॅड केलं आहे. मात्र, आता एका मोठा बदल व्हॉट्सअॅपमध्ये होणार आहे.

व्हॉट्सअॅप म्हटलं की, स्मार्टफोन किंवा आयफोन आलाच. मात्र, व्हॉट्सअॅप मोबाईलसह डेस्कटॉपवर वापरता यावा म्हणून वेब व्हॉट्सअॅपची सुविधा सुरु करण्यात आली. मात्र, इथेही तुम्हाला तुमचा फोन डेस्कटॉपच्या जवळच ठेवावा लागतो. शिवाय, फोनमधील इंटरनेट डेटाही संपतो. मात्र, आता तसे होणार नाही. कारण त्यादृष्टीने बदलासाठी व्हॉट्सअॅप पावलं उचलण्याच्या प्रयत्नात आहे.

व्हॉट्सअॅप हे अॅप लवकरच फोनपासून पूर्णपणे वेगळे केले जाणार आहे. म्हणजे व्हॉट्सअॅपचं अॅप यूझर्सना फोनशिवाय विंडोज किंवा मॅक ओएसवर वापरता येईल. आता फोन डेस्कटॉपच्या जवळ असल्याशिवाय आणि फोनमध्ये इंटरनेट किंवा वायफाय सुरु असल्याखेरीज तुम्हाला डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वापरता येत नाही.

‘फेसबुक’कार मार्क झुकरबर्गच्या व्हॉट्सअॅपचे आजच्या घडीला जगभरात 100 कोटींहून अधिक यूझर्स आहेत. व्हॉट्सअॅपवर दिवसाला 42 अब्ज मेसेज आणि 1 अब्ज 60 कोटी फोटो सर्क्युलेट होतात. तर 2 अब्ज 50 कोटी व्हिडीओ सर्क्युलेट होतात. आजच्या घडीला मेसेजिंग अॅपमध्ये सर्वाधिक लोकप्रिय अॅप म्हणून व्हॉट्सअॅपकडे पाहिले जाते.
==========================================

...म्हणून व्हॉट्सअॅप कॉलिंगवर बंदीची मागणी!

...म्हणून व्हॉट्सअॅप कॉलिंगवर बंदीची मागणी!
नवी दिल्ली अॅपच्या माध्यमातून देण्यात येणारी कॉलिंगची सुविधा रोखण्याची मागणी मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांनी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटकडे (DOT) केली आहे.

टेलिकॉम सेक्रेटरी जे एस दीपक यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, “मोबाईल नंबरचा वापर करुन इंटरनेटवरुन कॉल करणे, हे मोबाईल आणि लँडलाईनसाठी तयार केलेल्या नियमांच्या विरोधात आहे. इंटरनेटवरुन कॉलिंगमुळे मोबाईल ऑपरेटर कंपन्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागेल.”

टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटने इंटरनेट किंवा व्हॉट्सअॅप कॉलिंगविरोधात ठोस पावलं उचलावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. टेलिकॉम ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियानेही अशाच प्रकारची पत्राद्वारे तक्रार केली आहे. तक्रार करणाऱ्यांमध्ये एअरटेल भारती, आयडिया, व्होडाफोनसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

नेट न्युट्रॅलिटी वादादरम्यान ओटीटी अॅप्स म्हणजेच ओव्हर द टॉप अॅप्सवर बंदी आणण्याची किंवा त्याच्याशी संबंधित नियम बनवण्याची मागणी झाली होती. तेव्हाही एअरटेल कंपनीचं म्हणणं होतं की, अॅप्समुळे टेलिकॉम कंपन्यांना मोठा नुकसान सहन करावा लागतो.

ओव्हर द टॉप अॅप्समध्ये व्हॉट्सअॅप आणि स्काईपसारख्या अॅप्सचा समावेश आहे. हे अॅप्स नेटवर्कची सुविधा देणाऱ्या कंपन्याचं प्लॅटफॉर्म वापरतात.

त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या या मागणीवर टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि यावरच व्हॉट्सअॅप आणि स्काईपसारख्या अॅप्सचं भवितव्य ठरणार आहे.
==========================================

पुण्यात पुन्हा जळीतकांड, पार्किंगमधील 7 दुचाकी जाळल्या

पुण्यात पुन्हा जळीतकांड, पार्किंगमधील 7 दुचाकी जाळल्या
पुणे पुण्यात पुन्हा एकदा जळीतकांड घडलं आहे. उत्तमनगर परिसरात तब्बल 7 दुचाकी वाहनं अज्ञातांनी जाळल्याची माहिती मिळते आहे. सातही दुचाकी वाहनं सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभी होती.

उत्तमनगर परिसरातील जळीतकांडाची ही घटना रात्री अडीचच्या सुमारास घडली. उत्तमनगरमधील मोरया पेट्रोल पंपामागील भागात ही घटना घडली आहे.

आगाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. या आगीचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरीही, आगीचं स्वरुप पाहता ही आग शॉट सर्किटमुळे नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, याआधीही पुण्यात अशाप्रकारच्या जळीतकांडाच्या घटना समोर आल्या होत्या. अगदी गेल्याच महिन्यात 21 एप्रिलला एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी 6 ट्रक आणि 6 बाईक जाळण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुण्यातील जळीतकांडाचं हे सत्र सुरुच असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
==========================================

FTII च्या संचालकांना धमकीचं पत्र, पत्रासोबत स्फोटकसदृश पावडर

FTII च्या संचालकांना धमकीचं पत्र, पत्रासोबत स्फोटकसदृश पावडर
पुणे दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला पाठिंबा दिल्याच्या कारणावरुन पुण्यातील एफटीआयआयचे माजी संचालक प्रशांत पाठारे यांना धमकीचं पत्र आलं आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

धमकीच्या पत्रासोबत एक पार्सलही पाठवण्यात आलं आहे. पार्सलमध्ये डिटोनेटर आणि स्फोटकासारखी पावडर असून, त्या पार्सलवर दिल्लीचा पत्ता आहे. हे पत्र एफटीआयआयच्या कार्यालयात आलं असून, त्यावर माजी संचालक प्रशांत पाठारे यांचं नाव आहे.

“कन्हैयाला पाठिंबा दिल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि कन्हैया कुमारला एफटीआयआयमध्ये येण्यास मनाई करावी”, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.

याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पार्सलमध्ये डिटोनेटर आणि स्फोटकासारखी पावडर आढळल्यानं बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी केल्यानंतर हे पार्सल पोलिसांकडे देण्यात आलं आहे. हे धमकीचे पत्र नेमके कोणी पाठवलं आहे याचा पोलिस शोध घेत आहेत.
==========================================

काय नेसावं, हेही आता सरकार ठरवेल, बीफ बंदीवरुन ओवेसींची उपहासात्मक टीका

काय नेसावं, हेही आता सरकार ठरवेल, बीफ बंदीवरुन ओवेसींची उपहासात्मक टीका
सोलापूर ‘काय खावं आणि काय नाही, हे पण आता सरकार ठरवू लागलं आहे. आता काय नेसावं, तेही ठरवतील’, असे म्हणत बीफ बंदीवरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यासह केंद्रावर जोरदार टीका केली. ते सोलापुरातील सभेत बोलत होते.

सोलापूर महापालिका निवडणुकचं रणशिंग फुंकलं!

ओवेसी यांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. औरंगाबादच्या धर्तीवर सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भरभरुन मतदान करण्याचं आवाहन ओवेसी यांनी केलं आहे. यावेळी ओवेसी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरच फडणवीस सरकारवरही हल्लाबोल केला.

एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जनतेला ओवेसींनी जनतेला संबोधित केलं. ओवेसींच्या या सभेला तुफान गर्दी जमली होती.
==========================================

सोलापूरच्या नवदाम्पत्याची आहेराच्या पैशातून गावकऱ्यांना अनोखी भेट

सोलापूरच्या नवदाम्पत्याची आहेराच्या पैशातून गावकऱ्यांना अनोखी भेट
सचिन आतकरे आणि प्रतिक्षा 16 एप्रिलला विवाहबंधनात अडकले. सचिन पुण्यातील आयटी कंपनीत अभियंते आहेत, तर प्रतिक्षा यांचे अभियांत्रिकीचे पदव्युतर शिक्षण सुरु आहे.
सोलापूर : सोलापुरातील एका नवदाम्पत्याने लग्नानंतर गावकऱ्यांना अनोखी भेट दिली आहे. वैराग गावातील तुळशीदास नगरमधल्या सचिन आणि प्रतिक्षा आतकरे यांनी आहेराच्या पैशांसह काही रक्कम टाकून रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम केलं आहे.

सचिन आतकरे आणि प्रतिक्षा 16 एप्रिलला विवाहबंधनात अडकले. सचिन पुण्यातील आयटी कंपनीत अभियंते आहेत, तर प्रतिक्षा यांचे अभियांत्रिकीचे पदव्युतर शिक्षण सुरु आहे.

लग्नात नातेवाईकांकडून जमलेले आहेराचे 35 हजार रुपयात स्वतः कडील एक लाख 25 हजार रुपयांची भर घातली. त्यातून गावातल्या घरांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगचं काम सुरु केलं.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आतकरे दाम्पत्याने पावसाचं पाणी साठवण्याचा केलेला निर्धार कौतुकास्पद ठरत आहे. गावातील 50 घरांमध्ये हा प्रकल्प सुरु करण्याचं त्यांचं उद्दिष्ट असून रोज दहा घरांतील काम केलं जात आहे.
==========================================

आयात गोमांस चालतं, मग बीफबंदी का? : अजित पवार

आयात गोमांस चालतं, मग बीफबंदी का? : अजित पवार
A
नांदेड : हायकोर्टाने परराज्यातून आयात केलेलं बीफ बाळगायला आणि खायला परवानगी दिल्यानं आता महाराष्ट्रातूनही बीफबंदी हटवण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

‘महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. अशावेळी भाकड जनावरं सांभाळणं परवडणारं नाही. शिवाय सरकारही त्यांची जबाबदारी घेत नाही. त्यामुळे भाकड बैल विकून चार पैसे खिशात येण्याची शक्यताही पार मावळून गेली आहे.’ असं अजित पवार म्हणाले. दुष्काळी भागाच्या दौऱ्यासाठी ते मराठवाड्यात आहेत.

‘जर महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातून आणलेलं बीफ खायला परवानगी असेल तर सरकारच्या गोवंश हत्या बंदीला कुठलाही अर्थ उरत नाही’ असं अजित पवार म्हणाले. ‘महाराष्ट्रात बीफवर 1 कोटी लोकांचा रोजगार अवलंबून आहे. तसंच चिकन, मटण महाग असल्यानं बीफमधून जे लोक आपलं पोट भरतात, किंवा त्यातून जी प्रथिनं मिळतात त्यावरही गदा आली आहे.’ असंही अजित पवार म्हणाले.
==========================================

महाराष्ट्र तोडणाऱ्यांना गुंडाळायला 24 तासही लागणार नाही : नितेश राणे

महाराष्ट्र तोडणाऱ्यांना गुंडाळायला 24 तासही लागणार नाही  : नितेश राणे
मुंबई : ‘कुणीही महाराष्ट्र तोडण्याची भाषा करु नये, ही भाषा करणाऱ्या मुठभर लोकांना गुंडाळायला आम्हाला 24 तासही लागणार नाहीत, अशी भाषा करणाऱ्या श्रीहरी अणेंना महाराष्ट्रात ठेवायचं की नाही याचाही आम्हाला विचार करावा लागेल’, असा इशारा काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाजप आणि संघ असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘आज आपण कुणामुळे इथे आहोत, हे नव्या पिढीला समजायला हवे. आज जो तो सोशल मीडियाच्या मागे आहे, पण आपल्याला संयुक्त महाराष्ट्र कसा मिळाला हे त्यांनी जाणायला हवं. सध्याचा तरुण हा आगीसारखा आहे. आग ही चूलही पेटवते आणि तीच आग घरही पेटवू शकते. त्यामुळे तरुणांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. जेव्हा कुणी महाराष्ट्र तोडण्याची भाषा करेल तेव्हा आजची पिढी स्वतःहून या लढ्यात उतरायला हवी. अणेंसारखे वळवळणारे महाराष्ट्र तोडण्याची भाषा करुन 106 हुतात्म्यांचा अपमान करत आहेत. तेव्हा त्यांची जीभ कापायची की सत्कार करायचा हे तुम्हीच सांगा.’ असंही नितेश राणे म्हणाले.

‘अणे आपला वकिली पेशा मुंबईतच करीत आहेत. मुंबईवर त्यांचे पोट भरतेय. त्यामुळे त्यांनी आपली वकिली सोडून इतर कामं करु नयेत. अणेंना जी भाषा कळत असेल त्या भाषेत आम्ही उत्तर देऊ. जर त्यांनी हिंसेची भाषा केली तर त्यांना त्याच भाषेत ठोकू’, असाही इशारा त्यांनी दिला. अणेंचा बोलविता धनी भाजप आणि आरएसएसच आहे. त्यामुळेच अणेंवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप राणे नितेश राणेंनी केला.


संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील 106 हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान संघटनेने प्रथमच कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच हुतात्म्यांच्या कुटूंबियांचा प्रातिनाधिक सत्कार करण्यात आला.
==========================================

पत्नीच्या वर्षश्राद्धाला पतीची मुलासह आत्महत्या

पत्नीच्या वर्षश्राद्धाला पतीची मुलासह आत्महत्या
कोल्हापूर : प्रेम अमर असतं असं म्हणतात. प्रेमाचे ऋणानुबंध एका जन्मापुरते नसून ते जन्मोजन्मी अतूट राहतात. अशीच एक अमर प्रेमकहाणी कोल्हापुरात घडली आहे. पत्नीचा विरह सहन झाल्याने पतीने मुलासह आत्महत्येचं पाऊल उचललं.

खरं तर काळजात चर्र करणारी अशी ही घटना. मोहन चरेगावकर आणि त्यांचा मुलगा विनायक या दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली होती. जेव्हा याबद्दल समजलं तेव्हा कोल्हापूरच्या वळीवडे परिसरातील रहिवाशांनी चरेगावकरांच्या घराकडे धाव घेतली.

ज्या दिवशी मोहन यांची पत्नी वंदनानं या जगाचा निरोप घेतला, तोच दिवस चरेगावकर पिता-पुत्रांनी आत्महत्येसाठी निवडला. बरोबर एका वर्षापूर्वी मोहन यांची पत्नी वंदना यांचा मृत्यू झाला होता. पत्नी वंदनाच्या निधनामुळे मोहन आणि त्यांचा मुलगा विनायक पुरते खचले होते. वंदनाच्या रुपात त्यांचं जणू जगच हरवलं होतं.

सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचा मोहन आणि विनायक यांचा स्वभाव. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वागण्यातला फरक मित्रांना स्पष्ट जाणवू लागला. मोहन यांना पत्नीशिवाय, तर विनायकला आईशिवाय जगणं जणू अशक्य झालं होतं. देवाघरी गेलेल्या वंदना यांना भेटण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. अखेर मोहन आणि विनायक यांनी आत्महत्या करुन इहलोकीचा प्रवास सुरु केला.
==========================================

हिंदू नेत्यांना संपवा, दक्षिण आफ्रिकेत नोकरी मिळवा - डी कंपनी

  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. ८ - गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय दंगलीत सहभागी असलेल्या हिंदू नेत्यांना तसेच जे मुस्लिम विरोधी आहेत अशा हिंदू नेत्यांना संपवा आणि त्या मोबदल्यात चांगला पैसा आणि दक्षिण आफ्रिकेत नोकरी मिळवा अशी आमिषे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीकडून दाखवली जात आहेत. 
    भारतात जातीय तणाव निर्माण करण्याची दाऊद टोळीने योजना आखली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आपल्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दाऊद टोळीला युवकांची गरज असून, त्यांना आकर्षित करण्यासाठी अशी आमिषे दाखवली जात आहेत. मागच्यावर्षी गुजरातमधील भाजप नेते शिरीष बंगाली आणि भाजप युवा नेता प्रग्नेश मिस्त्री यांची हत्या करण्यात आली होती. 
    या प्रकरणी एनआयएने अहमदाबाद न्यायालयात दाऊद टोळीच्या दहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. डी गँगने टोळीत समावेश केलेल्या नव्या सदस्यांना दारुच्या रिकाम्या बाटल्यांमधून पेट्रोल बॉम्ब फेकण्याच्या तसेच चर्चमध्ये जाळपोळ करण्याचे आदेश दिले होते. 
    जातीय तणाव निर्माण करणे हाच त्यामागे उद्देश होता असे एनआयएने सांगितले. डी गँगने जावेद चिकनाच्या माध्यमातून भाजप, आरएसएस, व्हीएचपी आणि बजरंग दलाच्या नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला होता. 
    जावेद चिकनाने यासाठी हवालामार्गे दुबईतून गुजरातमध्य पैसा पाठवला होता. त्याने आपले संबंध वापरुन मुंबई आणि सूरतमधून बंदुकीचीही व्यवस्था केली होती. मिस्त्री आणि बंगालीची हत्या केल्यानंतर आरोपीला पाच लाख रुपये देण्यात आले असे एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. 
==========================================

ओलाच्या टॅक्सीमध्ये महिलेवर जबरदस्ती, चालकाला अटक

  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. ८ - टॅक्सीमध्ये एका २३ वर्षीय बेल्जियन महिलेचा विनयभंग करणा-या ओलाच्या टॅक्सी चालकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. राज सिंह असे आरोपीचे नाव असून, तो राजस्थान अल्वरचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेने गुरगाव येथून दिल्लीत सीआर पार्कमध्ये जाण्यासाठी ओलाची टॅक्सी पकडली. 
    ही महिला टॅक्सीमध्ये असताना फोनमधल्या जीपीएसवरुन आपण योग्य मार्गावर आहोत की, नाही ते तपासत होती. ड्रायव्हरने एका ठिकणी मार्ग बदलला. जेव्हा महिलेने त्याला विचारले तेव्हा त्याने शॉर्टकटने नेत असल्याचे सांगितले. या दरम्यान तक्रारदार महिलेने या सर्व घटनेची फोनवरुन तिच्या मैत्रिणीला माहिती दिली होती. 
    महिलेच्या तक्रारीनुसार ड्रायव्हरने या महिलेला पुढच्या सीटवर शेजारी बसण्यासाठी बोलवले. जेव्हा ही महिला फ्रंटसीटवर बसली तेव्हा ड्रायव्हरने या महिलेला खाली पाडले व जबरदस्तीने तिचे चुंबन घेतले. ड्रायव्हरने आपल्या मोबाईलमधून सर्व कॉल्सची हिस्ट्री सुद्धा डिलीट केली असा या महिलेने आरोप केला आहे. 
    या महिलेने जेव्हा विरोध केला तेव्हा ड्रायव्हरने तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. पोलिसात तक्रार केली तर, ठार मारु अशी त्याने धमकीसुद्धा दिली. गोविंदपुरी येथे ही महिला टॅक्सीतून उतरली. त्यानंतर तिने लगेच आपल्या मैत्रिणीला फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. संबंधित महिलेने दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली. ओलाने या चालकाला तात्काळ निलंबित केले आहे. 
==========================================

सशक्त असण्याचा अर्थ 'या' आठ महिलांनी समजावला

  • ऑनलाइन लोकमत 
    स्त्री-पुरुष समानता, त्यांचे अधिकार यावरुन समाजात नेहमी वादविवाद सुरु असतात. अनेकदा पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी लेखले जाते. पण याच भारतात काही अशा महिला आहेत ज्यांनी आपल्या कार्य, कर्तुत्वाने जगाला आपली दखल घ्यायला भाग पाडली. स्वत:ला सिद्ध करताना त्यांनी कुठेही स्त्रीत्वाचा आधार न घेतला पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे जात आपले कर्तुत्व दाखवून दिले. अशाच आठ महिलांची आम्ही आपल्याला ओळख करुन देत आहोत. 
    १) नीरजा भानोत 
    १९८६ साली मुंबईहून अमेरिकेला निघालेल्या पॅन एएम फ्लाईट ७३ चे दहशतवाद्यांनी पाकिस्तानात अपहरण केले. त्यावेळी विमानातील ३५० प्रवाशांचे प्राण वाचवताना नीरजा अतिरेक्यांच्या गोळयांना बळी पडली. जेव्हा निरजाचा मृत्यू झाला तेव्हा ती वयाच्या विशीमध्ये होती. तिने जे शौर्य, धाडस दाखवले त्यासाठी भारत सरकारने तिला 'अशोक चक्र'ने सन्मानित केले.  हा पुरस्कार मिळवणारी ती सर्वात तरुण भारतीय आहे. नीरजाने दाखवून दिले की, धाडस, हिम्मत ही कोणा एकाची मक्तेदारी नाही किंवा त्याचा वयाशीही संबंध नाही. 
    neerja
    २) कल्पना चावला 
    कल्पना चावला भारताची पहिली महिला अवकाशवीर आहे. कल्पना चावलाच्या कामगिरीमुळे आजही प्रत्येक देशवासियाची मान अभिमानाने उंचावते. भारतीय-अमेरिकन वंशाच्या कल्पना चावलाचे २००३ मध्ये एका अवकाश दुर्घटनेत निधन झाले. २००३ मध्ये कल्पना सात अवकाशवीरांसह अवकाश मोहिम आटोपून पृथ्वीवर परतत असताना कोलंबिया अवकाश यानाचा वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करताच स्फोट झाला. त्यात कल्पनासह सात अवकाशवीरांचा मृत्यू झाला. 
    kalpna
    ३) इरॉम चानू शर्मिला 
    आपल्या मजबूत इराद्यांमुळे मणिपूरची आयर्न लेडी म्हणून इरॉम शर्मिला यांची संपूर्ण जगभरात ओळख आहे. लष्कराला विशेष अधिकार देणारा एएफएसपीए कायदा रद्द करावा यासाठी २००० साली इरॉम शर्मिला बेमुदत उपोषणाला बसल्या. मालोम हत्याकांडानंतर इरॉम यांनी बेमुदत उपोषण सुरु केले. इरॉम यांचे उपोषण अजूनही सुरु असून, जगातील हे सर्वात मोठे उपोषण आंदोलन समजले जाते. त्यांचा खंबीरपणा आणि हिम्मत अनेकांना प्रेरणा देऊन जाते. 
    irom
    ४) लक्ष्मी 
    लक्ष्मी १५ वर्षाची असताना तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या माणसाने तिला लग्नासाठी मागणी घातली. पण लक्ष्मीने तो प्रस्ताव फेटाळून लावला. म्हणून चिडलेल्या त्या माणसाने लक्ष्मीवर अॅसिड हल्ला केला. यामध्ये लक्ष्मीचे मोठे नुकसान झाले. पण ती खचली नाही. तिने उलट ज्या महिलांवर समाजामध्ये अॅसिड हल्ले झाले आहेत त्यांच्या कल्याणासाठी काम सुरु केले. 'ती' आता भारतातील अॅसिड हल्ल्यातील पिडीतांचा आवाज बनली आहे. तिने अलीकडेच कपडयांच्या एका जाहीरातीत काम केले.
    laxmi
      
    ५) इंद्रा नुयी 
    फोर्ब्सच्या जगातील १०० पॉवरफुल महिलांच्या यादीत इंद्रा नुयी १३ व्या स्थानी आहेत. त्या पेप्सिको या जगातील बलाढय कंपनीच्या सीईओ आहेत. एवढेच नव्हे तर, जगातील पॉवरफुल मॉम्सच्या यादीत फोर्ब्सने त्यांना तिसरे स्थान दिले आहे. ज्या महिलांना कॉर्पोरेट क्षेत्रात ठसा उमटवण्याची महत्वकांक्षा आहे त्यांच्यासाठी इंद्रा नुयी एक प्रेरणास्त्रोत आहेत. 
    indra
    ६) भनवरी देवी 
    बाल विवाह रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर भनवरी देवीवर वरच्या जातीतील पुरुषांनी सामूहिक बलात्कार केला होता. पण इतका मोठा आघात होऊनही भनवरी देवी आपल्या उद्दिष्टापासून तूसभरही ढळली नाही. भनवरी देवी या राजस्थानातील दलित, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 
    bhanwari
    ७) सुनिता क्रिष्णन 
    सुनिता या सामाजिक कार्यकर्त्या असून, त्या प्रज्वला या एनजीओच्या सहसंस्थापक आहेत. वेश्या व्यवसायासाठी केल्या जाणा-या मानव तस्करी विरोधात त्या काम करतात. एनजीओच्या माध्यमातून सेक्स वर्क्सच्या पुर्नवसनाचे काम त्या करतात. वयाच्या १५ व्या वर्षी सुनिता क्रिष्णन यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. त्या जे काम करतात त्यामुळे त्यांना अनेकदा धमक्या मिळाल्या. पण त्यानंतरही त्या मानव तस्करी विरोधात अधिक सशक्तपणे काम करत आहेत. 
    sunitha
    ८) प्रियांका चोप्रा 
    बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला गॉडफादरची गरज नाही हे  प्रियांका चोप्राने सिद्ध केले आहे. २००० साली मिस वर्ल्डचा किताब मिळवणा-या प्रियांकासाठी करीयरची फारशी चांगली सुरुवात झाली नव्हती. पण प्रियांकाने आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर बॉलिवु़डचे नव्हे तर, हॉलिवुडमध्येही यशाच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. 
    priyanka
==========================================

सोलापूरात लग्नाच्या आहेराच्या पैशांमधून रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम

  • ऑनलाइन लोकमत 
    सोलापूर, दि. ८ - सोलापुरातील एका नवदाम्पत्याने लग्नानंतर गावकऱ्यांना अनोखी भेट दिली आहे. वैराग गावातील तुळशीदास नगरमधल्या सचिन आणि प्रतिक्षा आतकरे यांनी आहेराच्या पैशांसह काही रक्कम टाकून रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम केलं आहे. 
    सचिन आतकरे आणि प्रतिक्षा १६ एप्रिलला विवाहबंधनात अडकले. सचिन पुण्यातील आयटी कंपनीत अभियंते आहेत, तर प्रतिक्षा यांचे अभियांत्रिकीचे पदव्युतर शिक्षण सुरु आहे. लग्नात नातेवाईकांकडून जमलेले आहेराचे ३५ हजार रुपयात स्वतः कडील एक लाख २५ हजार रुपयांची भर घातली. त्यातून गावातल्या घरांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगचं काम सुरु केलं. 
    दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आतकरे दाम्पत्याने पावसाचं पाणी साठवण्याचा केलेला निर्धार कौतुकास्पद ठरत आहे. गावातील ५० घरांमध्ये हा प्रकल्प सुरु करण्याचं त्यांचं उद्दिष्ट असून रोज दहा घरांतील काम केलं जात आहे.
==========================================

घराचे आमिष दाखवून लुबाडले

  • मुंबई : म्हाडामध्ये आमदार कोट्यातून घर मिळवून देण्याच्या नावाखाली कोटींचा गंडा घालणाऱ्या ठगाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. राजेश शिंदे असे आरोपीचे नाव
    असून, त्याच्याकडून बनावट कागदपत्रांसह दोन वाहने जप्त करण्यात आली आहे.
    म्हाडा वसाहतींमध्ये आमदारांसाठी राखीव असलेली घरे आमदार कोट्यातून मिळवून देण्याचे आमिष शिंदे दाखवत होता. बाजारभावापेक्षा कमी किमतीत घर मिळत असल्याने अनेक जण त्याच्या जाळ्यात ओढले गेले. बनावट अधिसूचनेद्वारे तो नागरिकांचा विश्वास संपादन करत होता. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल होताच तपास पथकाने शोध सुरू केला. शिंदे रायगड येथील मुरूडमध्ये राहत असलेल्या आजीच्या घरी असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार या ठिकाणी सापळा रचून शिंदेच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
    शिंदे याच्या माहीम आणि प्रभादेवी येथील राहत्या घरातून एक दुचाकी आणि कार जप्त केली आहे. तसेच अनेक बनावट कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
    या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. (प्रतिनिधी)
    - म्हाडा वसाहतींमध्ये आमदारांसाठी राखीव असलेली घरे आमदार कोट्यातून मिळवून देण्याचे आमिष शिंदे दाखवत होता.
    - त्याने अशा प्रकारे ११३ जणांना फसवून त्यांच्याकडून तब्बल ७ कोटी ७५ लाख रुपये
    उकळले.
==========================================

७० टक्के पाणीपट्टी अनिवार्य

  • - यदु जोशी, मुंबई
    राज्यात जिल्हा परिषदा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील बंद पडलेल्या योजनांसाठी पहिल्या टप्प्यात १३० कोटी रुपयांचा निधी देतानाच या योजना पुनरुज्जीवित झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींकडून पाणीपट्टीची वसुली दरमहा किमान ७० टक्के झाली नाही, तर पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
    ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या नवीन योजना हाती घेणे, बंद योजनांचे पुनरुज्जीवन आणि प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती ही त्रिसूत्री असलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा आदेश शासनाने शनिवारी जारी केला. पाणीपट्टीची वसुली दरमहा ७० टक्के न झाल्यास पाणीपुरवठा बंद करण्यात येईल आणि आम्हाला या योजनेतून वगळले जाईल, असा ठरावच आता ग्रामपंचायतींकडून/ग्राम सभेकडून करून घेण्यात येणार आहे. या योजनांच्या देखभाल, दुरुस्तीची आणि त्या चालविण्याची जबाबदारी जीवन प्राधिकरणाकडे देण्यात आली आहे.
    या कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचे कोणतेही अधिकार ग्रामसभा वा ग्राम पंचायतींकडे नसतील. हे अधिकार पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला असतील. स्वतंत्र ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक मान्यतेचे अधिकार तिच्या खर्चानुसार जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता यांना असतील. ज्या योजनांना यापूर्वी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमामधून मान्यता देण्यात आलेली आहे व ज्या योजनांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत अशा योजनांचे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमामधील प्रशासकीय मान्यतेचे आदेश रद्द करण्यात येतील. अशांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमामधून नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे.
    कार्यक्रमातील सर्व कामे ही ई-टेंडरद्वारेच करण्यात येणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार शासनाकडे प्राप्त झाली व त्यामध्ये तथ्य आढळून आले तर संपूर्ण योजना रद्द करण्याचे अधिकार राज्य शासनाला असतील. अनियमिततेस जबाबदार अधिकारी/कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. पाणीपुरवठ्याची कोणतीही योजना जास्तीतजास्त २४ महिन्यांच्या आत वेळापत्रकानुसार पूर्ण होईल.
==========================================

गोवंश हत्याबंदी; निर्णयाला आव्हान

  • मुंबई : उच्च न्यायालयाने गोवंश हत्याबंदी कायम केली असली तरी परराज्यातून आलेले मांस बाळगण्यास परवानही दिल्याने राज्य सरकार या निर्णयाबाबत समाधानी नाही, तर दुसरीकडे ही बंदी कायम केल्याने बॉम्बे बीफ डिलर असोसिएशन नाराज आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि बॉम्बे बीफ डिलर असोसिएशन सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार आहेत.
    राज्यातील गोवंशातील प्राण्यांना संरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य प्राणी संरक्षण कायदा वैध ठरवला. परंतु, त्याचवेळी उच्च न्यायालयाने या कायद्यातील कलम ५ (डी) व ९ (बी) अवैध ठरवून सरकारवर टीकाही केली. ही दोन्ही कलमे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहेत, असे न्या. अभय ओक व न्या. एस. सी. गुप्ते यांच्या खंडपीठाने म्हटले.
    उच्च न्यायालयाने दोन कलमे अवैध ठरवली असली तरी कायदा
    वैध आहे, असे म्हटले आहे. वकिलांशी सल्लामसलत करून सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला
    आव्हान देऊ,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. दुसरीकडे बॉम्बे बीफ डिलर असोसिएशननेही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची
    तयारी दर्शवली आहे. राज्यातून गोवंशातील प्राण्यांची कत्तल, विक्री,
    खरेदी करण्यावर घातलेली बंदी हटवावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे असोसिएशनने म्हटले.
==========================================

दुकानातील कर्मचाऱ्यांना मारहाण

मुंबई : माहीम येथील मिठाईच्या दुकानातील कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत दुकानात घुसून ७ कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यातील तीन हवालदारांविरुद्ध माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहीम परिसरात नंदलाल सिंग यांचे संदेश स्वीट मार्ट हे मिठाईचे दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास शाहू नगर पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी या दुकानात शिरले. त्या वेळी जवळपास १२ ते १३ कर्मचारी दुकानात झोपले होते, तर काही जण गप्पा मारत होते. पोलिसांनी थेट त्यांना बेदम चोप देण्यास सुरुवात केली. यापैकी एक पोलीस कर्मचारी गणवेशात होता, तर दोघे जण साध्या वेशात असल्याची माहिती कर्मचारी रमेश पटेल याने दिली आहे. इतकेच नव्हे, तर पोलीस दारूच्या नशेत असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. आपण गुन्हा केला असेल तर पोलीस ठाण्यात घेऊन जावे, मारू नये अशी विनवणी कर्मचाऱ्यांनी अनेकदा करूनही पोलीस मारतच राहिले, असे दुकान चालक चंदन सिंह यांनी सांगितले. त्यानंतर मारहाण करणाऱ्या पोलिसांपैकी एकाने पोलीस नियंत्रण कक्षास कॉल करून पोलिसांना मारहाण झाल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच माहीम पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी कर्मचाऱ्यांनाच ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. जखमी कर्मचाऱ्यांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी सकाळी दुकानमालकाने वकिलांसह पोलीस ठाणे गाठून याचा जाब विचारला. माहीम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी या कर्मचाऱ्यांनी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीदरम्यान येथील एका पोलीस हवालदारासोबत किरकोळ वादातून बाचाबाची झाली होती. याच रागातून तो पोलीस हवालदार त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत येथे धडकल्याची माहिती तपासात समोर येत आहे. या प्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्याचे अंमलदार राजदीप मोरे (३२), विशाल भगत (२७), महादेव कांबळे (२७) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सांगितले.
==========================================

वासुदेव कामत यांचा अमेरिकेत सन्मान

  • मुंबई : जागतिक ख्यातीचे भारतीय चित्रकार वासुदेव कामत यांना पोर्ट्रेट सोसायटी आॅफ अमेरिका या संस्थेने सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप हा पुरस्कार दिला असून, हा मोठाच गौरव मानला जातो. जे चित्रकार पोर्ट्रेट पेंटर म्हणून अविरतपणे निर्मिती करीत आहेत, या विषयाचे प्रशिक्षण देत आहेत, अशांना पोर्ट्रेट सोसायटी आॅफ अमेरिकेतर्फे सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप हा पुरस्कार देण्यात येतो.
    चित्र व शिल्पकला क्षेत्रात पोर्ट्रेटला प्रोत्साहन देणारी ही आंतरराष्ट्रीय संस्था असून, जगभरातील अनेक नामवंत पेंटर्स या संस्थेचे सभासद आहेत. दर चार वर्षांनी होणाऱ्या या संस्थेच्या परिषदेत जगातील ७00 ते ८00 कलाकार सहभागी होत असतात. त्यातील आंतरराष्ट्रीय पोर्ट्रेट स्पर्धेतही हजारो कलाकारांचा सहभाग असतो. त्यातील अंतिम विजेत्यांची चित्रे प्रदर्शनात प्रदर्शित केली जातात. कामत यांच्या माय वाइफ या पोर्ट्रेटला २00६ साली ड्रेपर ग्रँड प्राइझ या पुरस्काराने गौरवले होते. यंदा एप्रिलमध्ये झालेल्या परिषदेत त्यांना सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप या पुरस्काराने गौरविले.
==========================================

जादवपूर विद्यापीठही पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

  • कोलकाता : हैदराबाद, जेएनयू, अलिगढ आणि अलाहाबादपाठोपाठ पश्चिम बंगालमधील जाधवपूर विद्यापीठातील डाव्या विचारांचे विद्यार्थी तसेच प्राध्यापकांवरही राष्ट्रविरोधी असल्याचे आरोप सुरू झाले असून, त्यामुळे तेथेही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेथील कुलगुरू यांच्यावरही भारतीय जनता पार्टीने आरोप सुरू केले आहेत, त्यातच विद्यापीठाचे वेगाने ‘अशांत’ केंद्रात होत असून अधिकाऱ्यांनी या प्रकाराविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे पश्चिम बंगालचे राज्यपाल के. एन. त्रिपाठी यांनी म्हटल्यामुळे वादात भरच पडली आहे.
    जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. तेव्हापासूनच डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांवर राष्ट्रविरोधी असल्याचे आरोप अभाविप व भाजपाच्या नेत्यांनी सुरू केले होते. त्या वेळी कुलगुरूंनी विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या नाहीत, असे स्पष्ट केले होते. या विद्यापीठावर सुरुवातीपासून डाव्यांचे वर्चस्व असून, तिथे अभाविपला कधीच स्थान मिळालेले नाही. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये वादावादी कायमच होत आली आहे.
==========================================
नेत्याच्या गाडीला ओव्हरटेक केल्याने हत्या
गया - राजकीय नेत्याच्या अलिशान मोटारीला ओव्हरटेक केल्याच्या रागातून गया येथे एका 25 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

शनिवारी रात्री जनता दल युनायटेडच्या (जदयू) नेत्याच्या एसयूव्हीला एका युवकाने ओव्हरटेक केल्याने त्याला गोळ्या घालण्यात आल्या. आदित्य सचदेव असे या युवकाचे नाव असून, तो आपल्या मित्रांसह कारमधून जात होता. त्याने जदयू नेत्या मनोरमा देवी यांच्या रेंज रोव्हर या अलिशान मोटारीला ओव्हरटेक केले. 

देवी या बिहार विधानसभेत सदस्य आहेत. त्यांचे पती बिंदी यादव हे बाहुबली नेता म्हणून प्रसिद्ध आहेत. देवी यांचा मुलगा रॉकी हा फरार आहे. पोलिसांनी बिंदी यादव व त्यांचा सुरक्षारक्षक राजेश कुमार यांना अटक केली आहे.
==========================================
विराट कोहली मशीनप्रमाणे खेळतोय - झंपा
बंगळूर - रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा कर्णधार विराट कोहली हा सध्या मशीनप्रमाणे खेळत असून, तो त्याच्या विशेष कौशल्याच्या आधारे डावाला पूर्णपणे आकार देत आहे, असे रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा फिरकीपटू अॅडम झंपा याने म्हटले आहे.

आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्सने पुणे संघाचा पराभव केला. कोहलीने नाबाद 108 धावांची खेळी केली. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा बनविण्याचा मान विराट कोहलीकडेच आहे. तो सतत अर्धशतक किंवा शतक झळकावत आहे. त्याचे आयपीएलमधील हे दुसरे शतक आहे.

झंपा म्हणाला की, विराट कोहलीची फलंदाजी करण्याची पद्धत मशीनप्रमाणे आहे. तो डावाची सुरवात करताना कोणतीही गडबड करत नाही. तो स्वतःला वेळ देतो आणि त्यानंतर मैदानाच्या चौतर्फा फटके मारतो. त्याला गोलंदाजी करणे खरच अवघड आहे. तो आपल्या डावाला परिपूर्ण करण्यासाठी पूर्ण वेळ देतो. बंगळूरचे मैदान छोटे असल्याने कोहलीकडून चुका होण्याची शक्यता फार कमी आहे.
==========================================
सीरियातून स्पेनच्या तीन पत्रकारांची सुटका
मद्रिद - सीरियातील अलेप्पो शहरातून दहा महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या स्पेनच्या तीन पत्रकारांची शनिवारी सुटका करण्यात आली आहे.

स्पेनच्या सरकारकडून या पत्रकारांच्या सुटकेची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. अँटोनियो पेम्पलीजा, होस मॅन्युएल लोपेज आणि अँजल सास्त्रे अशी या पत्रकारांची नावे आहेत. इसिससह अनेक बंडखोर गटांचे अलेप्पो शहरातील भागांवर वर्चस्व आहे. त्यामुळे या तिन्ही पत्रकारांचे कोणत्या गटाकडून अपहरण करण्यात आले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्पेन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही पत्रकार सध्या तुर्कस्तानमध्ये असून, ते सुखरुप आहेत. त्यांना लवकरच स्पेनमध्ये आणण्यात येणार आहे. तुर्कस्तान आण कतार या देशांनी या तिघांच्या सुटकेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

यापूर्वी 2014 मध्ये स्पेनच्या दोन पत्रकारांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांची सहा महिन्यांनंतर सुटका करण्यात आली होती. सीरियामध्ये सुरु असलेल्या युद्धात आतापर्यंत अनेक परदेशी पत्रकारांची हत्या करण्यात आलेली आहे.
==========================================
पुणे: शिवणे भागात दुचाकींचे जळीतकांड
पुणे - पुणे शहरातील वाहने जाळपोळीचा प्रकार आता उपनगरात देखील सुरु झाल्याचे समोर आले आहे. आज (रविवार) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एनडीए शेजारील शिवणे येथील मोरे पेट्रोल पंपाच्यामागे असलेल्या सरडेबाग परिसरात पाच वाहने जाळण्याचा प्रकार घडला आहे. आगीचे कारण समजले नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पार्किंगमधील दुचाकी असलेली वाहने जाळण्यात आली आहेत. पहाटेची वेळ असल्याने नागरिक झोपलेले होते. आग व धूरामुळे नागरिक जागे झाले. ते सर्वजण इमारतीच्या टेरेसवर गेले. नागरिकांनी अग्निशामक व पोलिसांना माहिती दिली. इमारतीत पार्किंगमध्ये ही घरे आहेत, तसेच वर जाण्यास पायऱ्या आहेत. पायऱ्यांपासून 20 फुटावर वाहने जळत होती. आगीचा मोठा भडक झाला होता. अग्निशामक दलाच्या सिंहगड रास्ता व कोथरूड येथील दोन आगीचे बंब घटनास्थळी आले होते. घटनास्थळी जाण्यास रास्ता अरुंद होता, तरी देखील वाहने तेथे पोचली. अशी माहिती केंद्र प्रमुख प्रभाकर उमराठकर यांनी दिली. 

आगीच्या ठिकाणी पोचल्यानंतर पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविले. टेरेस वरील नागरिकांना बाहेर काढले. दीड महिन्यापूर्वी एका महिलेची गाडी दुचाकी जाळण्याच्या प्रकार घडला होता. अर्धवट जळाली होती. ती दुरुस्त करून वापरण्यास सुरवात केली होती ती दुचाकी या आगीत पूर्ण जळाली आहे.
==========================================
पाणीपट्टी वसुली राज्यात सक्तीची
केंद्राने निधी बंद केल्याने मुख्यमंत्री पेयजलचा नवा कार्यक्रम 
मुंबई - राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने तूर्त अनुदान देणे बंद केल्याने राज्यातल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. मात्र यावर पर्याय म्हणून राज्य सरकारने स्वत:च्या खर्चातून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम हाती घेतला आहे. यामधून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करताना संबंधित ग्रामपंचायत व नगरपंचायतींनी दरमहा ७० टक्‍के पाणीपट्‌टी वसूल करून देण्यात येईल, असा ठराव करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला द्यावा लागणार आहे. 

ही वसुली झाली नाही, तर पाणीपुरवठा बंद करा, असे ग्रामसभेत मंजूर केल्यानंतर या योजनांचे पुनरुज्जीवन करण्यात येईल, असा आदेशच सरकारने दिला आहे. या आदेशामुळे ज्या गावांना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून पाणीपुरवठा योजना मिळाली होती. त्या गावांना आता ७० टक्‍के पाणीपट्‌टी वसुली सक्‍तीची होणार आहे. यासाठी राज्य सरकारने या योजनांच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपवली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाकडे (जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती व नगरपंचायती) असलेले पाणीपुरवठा योजनांचे अधिकार आता जीवन प्राधिकरणकडे जाणार आहेत. 
==========================================
'जलयुक्त शिवार' आदर्श मॉडेल - राजेंद्रसिंह राणा
मुंबई - जलयुक्त शिवार योजनेसाठी महाराष्ट्रात लोकवर्गणी, श्रमदान आदी माध्यमातून लोकांचा चांगला सहभाग लाभला आहे. सरकार आणि लोकांच्या सहभागाचे "जलयुक्त शिवार‘ अभियान हे एक आदर्श मॉडेल आहे, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. 

कृषी, जलसंधारण, बांधकाम, मनरेगा आदी विभागांतील जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेचे आज मंत्रालयातील परिषद सभागृहात जलसंधारण विभागामार्फत आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी राज्याच्या ग्रामविकास आणि जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते. 

राजेंद्रसिंह म्हणाले की, कोणतीही योजना ही लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील भौगोलिक विविधता पाहता जलसंधारणाची कामे करत असताना त्याला स्थानिक परिस्थितीनुरूप स्वरूप देणे गरजेचे आहे. जलयुक्त शिवार अभियान राबविताना "माथा ते पायथा‘ या धोरणानुसार जलसंधारणाची कामे करण्यात यावीत. याशिवाय नदी खोऱ्याला केंद्रिभूत मानून जलसंधारणाची कामे करण्यात यावीत. राज्य सरकारने हाती घेतलेला नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमही आदर्श असून, तो प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले. जलयुक्त शिवार आणि नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पाणीप्रश्नावर सकारात्मक तोडगा निघू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
==========================================

No comments: