Thursday, 26 May 2016

नमस्कार लाईव्ह २६-०५-२०१६ चे बातमीपत्र



==============================================

सेनेचं पोस्टरद्वारे उत्तर, प्रकाश मेहतांचा माजलेला बोका असा उल्लेख

सेनेचं पोस्टरद्वारे उत्तर, प्रकाश मेहतांचा माजलेला बोका असा उल्लेख
मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा पोस्टरवॉर सुरु झालं आहे. मुंबईतले वाघ संपले असून आता गल्ली गल्लीत फक्त सिंह दिसेल, असं म्हणत भाजप नेते आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांनी शिवसेनेवर वार केला होता. त्याला शिवसेनेने आपल्या स्टाईलने उत्तर दिलं आहे.
घाटकोपर परिसरात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी प्रकाश मेहता यांची तुलना माजलेला बोका अशी करत, मुंबईचे खरे वाघ शिवसेनाच असल्याचं ठासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याचसोबत आजच्या सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातूनही सिंहाच्या नरडीचा घोट घेणाऱ्या वाघाचा फोटो छापत भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना-भाजपमधे गेल्या काही दिवसांपासून खटके उडत आहेत. त्यातच प्रकाश मेहतांनी केलेल्या वक्तव्याला शिवसेनेने पोस्टरमधून उत्तर दिल्याने हा वाद आता पुढचे काही दिवस अजून तापणार यात काही शंका नाही.
==============================================

शेतकऱ्याने पिकवलेल्या मोत्यांवर चोरट्यांचा डल्ला, सात लाखांचे मोती लंपास

शेतकऱ्याने पिकवलेल्या मोत्यांवर चोरट्यांचा डल्ला, सात लाखांचे मोती लंपास
गडचिरोली: गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यात मोत्यांची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला चोरट्यांनी गंडा घातला आहे. संजय गंडाटे यांच्या मोत्यांच्या शेतात चोरट्यांनी डल्ला मारुन सुमारे सात लाख रुपये किमतीचे मोती पळवले आहेत. चोरट्यांनी तब्बल 2400 मोती लांबवल्याने गंडाटे यांचं मोठं नुकसान झालं आहे.
याप्रकरणी त्यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यात कनेरी येथे संजय गंडाटे गेल्या काही वर्षापासून मोत्यांची शेती करतात. या आगळ्या-वेगळ्या शेतीतून आणि प्रचंड मेहनतीतून संजय यांनी कमी वेळातच आर्थिक प्रगती साधली.
या शेतीला आकर्षित होऊन राज्यातूनच नव्हे तर देशातून मोठ्या प्रमाणात शेतकरी या मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण घेण्यात गडचिरोलीत आले. इतकेच नव्हे तर राज्य सरकारनेही मोत्यांची शेती सरकारी योजनेत सामिल करण्याच्या हालचाली सुरु केल्या. मात्र बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कनेरी येथील मोत्यांच्या शेतात चोरी केली आणि १२०० शिंपले चोरून नेले.
एका शिंपल्यात दोन मोती ठेवलेले असतात. त्यामुळे चोरुन नेलेल्या मोत्यांची संख्या २४०० वर पोहोचते. त्यामुळे संजय यांचे सात लाखांच्यावर नुकसान झाले आहे.
==============================================

दिल्लीच्या VVIP सुरक्षा असलेल्या विजय चौकात नीलगायीचा संचार

दिल्लीच्या VVIP सुरक्षा असलेल्या विजय चौकात नीलगायीचा संचार
मानवी वस्तीत जंगली प्राणी शिरल्याचं आपण ऐकतो, मात्र चक्क दिल्लीतल्या संसद परिसरासारख्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये नीलगाय आढळल्याने खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली : मानवी वस्तीत जंगली प्राणी शिरल्याचं आपण ऐकतो, मात्र चक्क दिल्लीतल्या संसद परिसरासारख्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये नीलगाय आढळल्याने खळबळ उडाली आहे.
संसदेसमोरच्या विजय चौक परिसरात एक नीलगाय आरामात फिरत असल्याचं दिसून आलं आणि सगळ्यांची चांगलीच पाचावर धारण बसली. नीलगाय पाहिलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली.
मंत्री, खासदार, व्हीआयपींचा राबता असलेल्या संसदेच्या परिसरात नीलगाय शिरल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे पशुपालन विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली.
मात्र तब्बल दोन तासांनंतरही पशुपालन विभागाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी पोहचला नव्हता. त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या जागेची सुरक्षाव्यवस्था रामभरोसे आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
==============================================

ऋषी कपूर यांचं पुन्हा ट्विटास्त्र, काँग्रेसला 'अमर-अकबर-अँथोनी' गाण्याचा सल्ला

ऋषी कपूर यांचं पुन्हा ट्विटास्त्र, काँग्रेसला 'अमर-अकबर-अँथोनी' गाण्याचा सल्ला
मुंबई :  केंद्रात मोदी सरकार सत्तेत येऊन 26 मे रोजी दोन वर्षे पूर्ण झाले. मोदी सरकारने आपल्या या द्वितीय वर्षपूर्तीचा सोहळा साजरा करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांचं नाव चर्चेत आहे. मात्र त्यावरुन काँग्रेसने बच्चन आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
याच वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेते ऋषी कपूर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर ‘ट्विटास्त्र’ सोडलं आहे.  यासाठी त्यांनी गाजलेला चित्रपट अमर-अकबर- अँथोनी या सिनेमाचा दाखला दिला आहे.
ऋषी कपूर म्हणतात, “आता तुम्ही केवळ विनोद खन्ना यांच्यावर टीका करणं बाकी आहे. त्यांनाही वादात ओढलात, तर अमर-अकबर- अँथोनी हे गाणं गाऊ शकाल”.
==============================================

मच अवेटेड जगातील पहिला क्लाउड स्टोरेज स्मार्टफोन लाँच!

मच अवेटेड जगातील पहिला क्लाउड स्टोरेज स्मार्टफोन लाँच!
मुंबई: रॉबिन कंपनीनं आपला मच अवेटेड क्लाउड स्टोरेज स्मार्टफोन Nextbit  अखेर भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 19,999 रु. आहे. 30 मेपासून या स्मार्टफोनची फ्लिपकार्टवर विक्री सुरु होणार आहे. यासाठी प्री-रजिस्ट्रेशन आजपासून सुरु होणार आहे.
या स्मार्टफोनचं सगळ्यात खास फिचर म्हणजे स्मार्ट स्टोरेज. जो तुमच्या फोनमधील डेटा आपोआप क्लाउडवर स्टोअर करेल. इतकंच काय तर फोनवरील अॅपही क्लाउडवर स्टोर केले जातील. यामध्ये 32 जीबी इंटरनल मेमरी आणि 100 जीबी क्लाउड स्टोरेज देण्यात आलं आहे.

जेव्हा तुमचा स्मार्टफोन चार्जर किंवा वाय-फाय नेटवर्कशी जोडला असले तेव्हा डिव्हाइस तुमचा लोकल डेटा क्लाउडवर स्टोअर करेल. त्यामुळे स्मार्टफोनमधील लोकल स्टोरेजचा तुम्हाला फायदा होईल.
==============================================

बॉयफ्रेण्डला बाईक देण्यासाठी आईच्या दागिन्यांची चोरी

बॉयफ्रेण्डला बाईक देण्यासाठी आईच्या दागिन्यांची चोरी
नवी मुंबई : आपल्या बॉयफ्रेण्डला नवी बाईक घेता यावी यासाठी स्वतःच्याच घरात एका तरुणीने दागिन्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीने आईचे 1.76 लाख किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचं वृत्त आहे.
 
9 मे रोजी डॉक्टर आणि त्यांची पत्नी काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची 15 वर्षीय मुलगी घरात एकटीच होती. घरी परतल्यावर कपाटातील सात तोळे सोनं गायब असल्याचं दाम्पत्याच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ पोलिसात चोरीची तक्रार नोंदवली.
 
दोन आठवड्यांनंतर म्हणजे 23 मे रोजी त्यांची मुलगीही बेपत्ता झाली. ती अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी अपहरणाची केस दाखल केली. तिच्या शाळेतील मित्रांच्या माहितीनुसार 20 वर्षीय कॉलेज विद्यार्थ्यासोबत तिचं प्रेमप्रकरण होतं. त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही नुकतीच त्याने 85 हजारांची स्पोर्ट्स बाईक घेतल्याचं, मित्रांनी सांगितलं.
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणी घरी परतली. आईने तिला ठावठिकाणा विचारला असता, मोठ्या भावासोबत भांडण झाल्यामुळे रागात आपण घर सोडल्याचं तिने सांगितलं. ट्रेनने कर्जतला गेले आणि प्लॅटफॉर्मवरच रात्र काढली. मात्र राग शांत झाल्यावर घरी आले, असा दावा तिने केला.
==============================================

बिल्डर डी. एस. कुलकर्णी कार अपघातात जखमी, चालकाचा मृत्यू

बिल्डर डी. एस. कुलकर्णी कार अपघातात जखमी, चालकाचा मृत्यू
पुणे : सुप्रसिद्ध बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांच्या गाडीला बुधवारी रात्री मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. यात त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला, तर डी. एस. कुलकर्णी जखमी झाले आहेत.
 
बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबईहून पुण्याला जाताना खंडाळा एक्झिटजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात त्यांच्या डाव्या बरगड्यांना फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.
 
अपघातानंतर कुलकर्णींना तात्काळ लोकमान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये तिघे जण होते.
 
बिल्डर दीपक सखाराम कुलकर्णी हे डी. एस. के या नावाने सुप्रसिद्ध आहेत. ‘घराला घरपण देणारी माणसं’ हे डी. एस. केंचं घोषवाक्य आहे. डीएसकेंचा अनेक उद्योगांमध्ये विस्तार आहे.
==============================================

राजीव शुक्लांच्या कुकला पायघड्या, 'व्हिवो'ला पोटदुखी?

राजीव शुक्लांच्या कुकला पायघड्या, 'व्हिवो'ला पोटदुखी?
नवी दिल्ली : अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी आयपीएलला हजेरी लावल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला, मात्र आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी कूक यांच्यासाठी जणू पायघड्या घातलेल्या पाहून आयपीएलचे टायटल स्पॉन्सर्स नाराज असल्याचं चित्र आहे.
 
कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर गुजरात लायन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समधील एका सामन्याला कूकनं राजीव शुक्लांसोबत हजेरी लावली होती. त्यानंतर आयपीएलची टायटल स्पॉन्सर आणि अॅपलची प्रतिस्पर्धी असलेल्या विवो या चीनच्या कंपनीनं आपली नाराजी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांकडे बोलून दाखवल्याचीही चर्चा आहे. बीसीसीआयकडून मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
 
‘व्हिवोकडून अद्याप कोणतंही पत्र आलेलं नाही. तक्रार आल्यास आम्ही या प्रकरणात लक्ष घालू. हे प्रकरण घडलं त्यावेळी मी पदावर नव्हतो’ असं बीसीसीआयचे नवनिर्वाचित सचिव अजय शिर्केंनी म्हटल्याचं ‘मुंबई मिरर’ने सांगितलं आहे.
 
स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पेप्सीनं गेल्या वर्षी आयपीएलसोबतचा करार पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंर विवोनं आयपीएलच्या स्पॉन्सरशिपचे हक्क मिळवले होते.
==============================================

भाजप मित्रपक्षांवर उदार, मेटे, खोत मंत्रिमंडळात, आठवले केंद्रात?

भाजप मित्रपक्षांवर उदार, मेटे, खोत मंत्रिमंडळात, आठवले केंद्रात?
मुंबई : मित्रपक्षांना सरकारमध्ये संधी देण्यासाठी जून महिन्यात राज्यातील मत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. विस्तारानंतर मंत्रिमंडळात सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर रामदास आठवलेंची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागू शकते.
 
याशिवाय राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 10 नवीन मंत्र्याचा समावेश होण्याचे संकेत आहेत. याआधी अनेदा मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल सांगण्यात आलं, मात्र हा विस्तार लांबणीवर पडत गेला. मात्र आता जून महिन्यात हा विस्तार प्रत्यक्षात होणार असल्याचं समजतं.
 
दुसरीकडे, 10 जूनला होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारांची नाव निश्चित करायला सुरुवात केली आहे. भाजप विधानपरिषदेच्या 2 जागा मित्र पक्षांना सोडणार असून, त्या जागांवर सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांची वर्णी लागण्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून मिळते.
 
दरम्यान भाजप विधानपरिषदेच्या 3 जागा लढवणार आहे. त्यासाठी मनोज कोटक, सुरजितसिंह ठाकूर, रघुनाथ कुलकर्णी आणि माधव भंडारी यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेनेकडून संजय राऊत हे राज्यसभेसाठी आज अर्ज भरणार आहेत, तर सुभाष देसाई आणि दिवाकर रावते हे विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
==============================================

18 वर्षांनी 'सीआयडी'ला ब्रेक, एसीपी प्रद्युम्नचं स्पष्टीकरण

18 वर्षांनी 'सीआयडी'ला ब्रेक, एसीपी प्रद्युम्नचं स्पष्टीकरण
मुंबई : सोनी वाहिनीवरील ‘सीआयडी’ मालिकेच्या प्रेक्षकांना गेले काही दिवस आपल्या लाडक्या मालिकेचं दर्शन घडलेलं नाही. एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत, साळुंके यासारख्या व्यक्तिरेखांनी गाजलेल्या सीआयडीने शॉर्ट ब्रेक घेतल्याचं वृत्त आहे.
 
सीआयडी मालिका कायमची बंद होणार असल्याच्या चर्चांना ऊत आल्यानंतर एसीपी प्रद्युम्न साकारणारे शिवाजी साटम यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. सीआयडी ऑफ एअर जाणार नसून छोटा ब्रेक घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मालिकेला शॉर्ट ब्रेक देण्याचं कारण आपल्यालाही ठाऊक नसल्याचं सांगताना साटम यांनी पुढील महिन्यात सीआयडी पुन्हा रुजू होण्याचं आश्वासन दिलं आहे. टाईम्स ऑफ
इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
 
भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात सर्वात दीर्घकाळ चाललेली मालिका अशी सीआयडी मालिकेची ख्याती आहे. मात्र सोनी वाहिनीवर ‘द कपिल शर्मा शो’ सुरु झाल्यानंतर सीआयडीचे नवे भाग प्रक्षेपित होत नाही आहेत. सीआयडी मालिकेला मोठा प्रेक्षकवर्ग आहे. नव्या भागांसोबत सीआयडीचे जुने भाग पाहणारा रिपीट ऑडिअन्सही मोठा आहे.
 
वेळ बदलण्याऐवजी सीआयडीला छोटा ब्रेक देण्यात आला आहे. त्यामुळे आपली फेव्हरेट मालिका बंद झाल्याची भीती अनेक प्रेक्षकांना सतावत होती. अनेकांनी त्याबाबत निर्माते आणि वाहिनीला पत्र, इमेल पाठवून विचारणा केली.
 
गेली 18 वर्ष अविरत मनोरंजन करणाऱ्या क्राईम मालिकेचं प्रक्षेपण पुढील काही कालावधीसाठी बंद राहील. 21 जानेवारी 1998 रोजी मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित झाला होता. त्यानंतर 16 एप्रिल 2016 पर्यंत 1348 एपिसोड्स टेलिकास्ट झाले आहेत.
==============================================

मुलींची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दलाल महिलेसह तिघे अटकेत

मुलींची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दलाल महिलेसह तिघे अटकेत
नाशिक: नाशिकमध्ये मुलींची खरेदी विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी दलाल महिलेसह राजस्थानचे रहिवाशी असलेल्या ३ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. या टोळीनं आतापर्यंत नाशिकमधल्या ८ ते १० मुलींची खरेदी विक्री केली असून शहरात यांचे अनेक एजंट असल्याचा संशयही व्यक्त केला जातो आहे.

श्रीमंत व्यक्तीशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली दलाल अल्पवयीन मुलींची फसवणूक करीत असे. अशीच फसवणूक झालेली एक मुलगी स्वत:ची सुटका करुन नाशिकमध्ये आली आणि  पंचवटी पोलीस स्थानकात या सर्व प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून राजस्थानमधल्या टोळीच्या म्होरक्यांशी संवाद साधला आणि मंगळवारी या टोळीतील काहीजणांना जेरबंद केलं.

गरीब कुटुंबातल्या पालकांना पैसे द्यायचे, श्रीमंत घरात मुलींच लग्न लावून देण्याच आमिष दाखवायचं आणि अल्पवयीन मुलींची परस्पर विक्री करायची अशी या टोळीची कार्यपध्दत होती. या टोळीची पाळंमुळं नाशिकमध्ये चांगलीच रुजली असून अनेक एजंट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. त्यामुळं नागरिकांना सावध राहण्याची गरज आहे.
==============================================

मनपाच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिनगळती

मनपाच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरिनगळती
पुणे : महानगरपालिकेच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रामधे मध्यरात्री दोन वाजल्यापासून क्लोरिन वायूची गळती सुरु आहे. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी वायूगळती थांबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
 
वायुगळतीमुळे मनपाच्या दोन कर्मचाऱ्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर दोघांना संजीवनी हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आलं.
==============================================

बाळासाहेबांची सेना वाघांची होती, आता ती शेळ्यांची झाली: सुनील तटकरे

बाळासाहेबांची सेना वाघांची होती, आता ती शेळ्यांची झाली: सुनील तटकरे
जालना: ‘शिवसेना दुटप्पीपणे वागत असून एकीकडे मंत्रीपदाचा लाल दिवा घेऊन फिरते तर दुसरीकडे सरकारचेच वस्त्रहरण करत असते. बाळासाहेबांची शिवसेना वाघांची होती आता ती शेळ्यांची कशी झाली हेच कळत नाही.’ अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. ते काल जालन्यात आयोजित दुष्काळी परिषदेत बोलत होते.

जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दुष्काळी परिषदेचं आयोजन करण्यात आल होतं. यावेळी जालना जिल्ह्यातील 143 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 हजार रूपये मदतीच्या धनादेशाचे तटकरेंच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी पक्ष कार्यकार्त्यांसह शेकडो शेतकरी या परिषदेसाठी उपस्थित होते. दरम्यान, तटकरेंनी केलेला टीकेला सेना काय उत्तर देणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
==============================================

हैदराबादची कोलकातावर मात, आयपीएलमधील आव्हान कायम

हैदराबादची कोलकातावर मात, आयपीएलमधील आव्हान कायम
नवी दिल्ली : डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सला हरवून आयपीएलमधलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. या विजयामुळे हैदराबादला दुसऱ्या पात्रता सामन्यात खेळण्याची संधी मिळाली असून शुक्रवारी दिल्लीत होणाऱ्या लढतीत हैदराबादसमोर गुजरात लायन्सचं आव्हान असेल. हैदराबाद आणि गुजरातमधल्या लढाईचा विजेता आयपीएलच्या फायनलमध्ये रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा मुकाबला करेल.
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या लढतीत हैदराबादने कोलकात्यावर 22 धावांनी मात केली. या सामन्यात हैदराबादने कोलकात्याला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं होतं. पण कोलकात्याला ते पेलवलं नाही. 20 षटकांत आठ बाद 140 धावांच करता आल्या.
हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने तीन आणि मोझेस हेन्रिक्सने दोन विकेट्स काढून आपल्या टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याआधी हेन्रिक्सने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 31 धावांची खेळी केली होती. तर युवराज सिंहने 30 चेंडूंत 44 धावा फटकावल्या होत्या. त्यामुळेच हैदराबादला 20 षटकांत आठ बाद 162 धावांची मजल मारता आली.

==============================================

मध्य रेल्वेचा बोजवारा, तीन स्टेशनवर तांत्रिक बिघाड

मध्य रेल्वेचा बोजवारा, तीन स्टेशनवर तांत्रिक बिघाड
मुंबई : मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. तीन स्टेशनवर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
सायन आणि मुंब्रा स्टेशनवर पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. तर त्याच भरीस भर म्हणून विक्रोळी स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटली आहे.
यामुळे धीम्या आणि जलद ट्रॅकवरील अप-डाऊन मार्गावरील वाहतूक जवळपास ठप्प आहे. 40 ते 50 मिनिटं गाड्या एकाच जागेवर उभ्या आहेत.
हा बिघाड कधी दुरुस्त होणार याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र मध्य रेल्वेच्या या खोळंब्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
==============================================

10 एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलं

10 एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलं
अकोला : अकोला जिल्ह्यातील संजय तिडके या शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर चक्क छोटं धरण बांधलं आहे. यामुळे इथली शेकडो एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणेने वारंवार खोडा घालून हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण तिडकेंनी आपले भागिरथ प्रयत्न थांबले नाहीत.
इथलं शिवार जलयुक्त करण्याची जिद्द, दुष्काळाला हरवण्याची जिद्द, सगळीकडे हिरवळ निर्माण करण्याची जिद्द आणि संजय तिडके यांच्या याच जिद्दीतून हा बंधारा उभा राहिला आहे.
सांगवी दुर्गवाडाच्या संजय यांची 80 एकर जमीन. दरवर्षीच्या पावसात पीक आणि माती वाहून जायची. तर उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा. यावर कायमचा पर्याय म्हणून शिरपूर पॅटर्नचा बंधारा बांधण्याचा निर्णय झाला. आसपासच्या शेतकऱ्यांनीही साथ दिली. काम सुरुही झालं. मात्र अवैध वाळू उपसा करण्याचं कारण देत प्रशासनाने कामात खोडा घातला.
दरवर्षीचा प्रश्न सोडवण्यासाठी बंधाऱ्याचं काम सुरु केलं. मात्र अवैध वाळू उपसा करता असं सांगत प्रशासनाने काम थांबण्याचा इशारा दिला. माझ्याकडे रॉयल्टी आहे तरी हा खोडा, असं संजय तिडके म्हणाले.
प्रशासनाच्या भितीपोटी शेतकऱ्यांनी साथ सोडली, काम थांबलं. मात्र अशातही ध्येयवेड्या संजय यांनी माघार घेतली नाही. त्यांनी स्वत:ची दहा एकर जमीन विकली. पैसा उभा केला आणि थांबलेलं काम पुन्हा सुरु झालं.
==============================================

डोंबिवली एमआयडीसी परिसरात केमिकल फॅक्टरीत स्फोट, १०० जखमी


  • ऑनलाइन लोकमत
    डोंबिवली, दि. २६ - डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट होऊन १०० जण जखमी झाले आहेत. गुरूवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील अभिनव शाळेसमोरील 'आचार्य' केमिकल कंपनीतील बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की स्फोटाच्या आवाजाने २ ते ३ किमी परिसर दणाणून गेला तर आसपासच्या परिसरातील अनेक इमारती तसेच गाड्यांच्या काचाही फुटल्या. या स्फोटात कंपनीतील तसेच त्या परिसरातील रस्त्यावरच्या नागरिकांसह एकूण १०० जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला ते अद्याप समजू शकलेले  नाही.
    दरम्यान या स्फोटाचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून ३ ते ४ रुग्णवाहिकाही दाखल झाल्या आहेत. 
     डोंबिवली पूर्वेकडील  प्लॉट नंबर W2 58/59, MIDC Phase 2, येथील हर्बर्टब्राऊन (आचार्य)' कंपनीत ११.३०- ११.४५ च्या सुमारास मोठा स्फोट झाला. या भीषण शक्तीशाली स्फोटामुळे आजूबाजूच्या सहा कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 
==============================================

आता भारताकडे दुर्लक्ष करता येणार नाही - पंतप्रधान मोदी


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. २६ - आपल्या सरकारने मागच्या दोन वर्षात मोठया प्रमाणावर सुधारणा केल्या असून, जागतिक स्तरावर भारताने दखल घेण्याजोगी कामगिरी केली आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. सरकारला दोनवर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी यांनी वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला. 
     
     
    आपण देशाची सूत्रे स्वीकारल्यापासून जागतिक राजकारणात भारत महत्वाची भूमिका बजावत असून, अमेरिकेबरोबरचे संबंध अधिक दृढ झाले आहेत असे मोदींनी म्हटले आहे. विकासाला चालना देण्यासाठी आपण मार्ग तयार केला असून आता राज्यांनी मदत करण्याची आवश्यकता आहे असे मोदी म्हणाले. 
==============================================

परीक्षा पध्दती बदलणार


  • पुणे : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) च्या गोंधळानंतर राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीतही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अभ्यासक्रमात बदल करणे यंदा शक्य नसल्याने परीक्षा पद्धतीत काही तातडीचे बदल करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. याबाबत दहावीच्या निकालानंतर तज्ज्ञांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली.
    दहावीच्या निकालानंतर मंडळामध्ये तज्ज्ञांची बैठक घेतली जाणार आहे. अकरावी व बारावीच्या सीबीएसई व मंडळाच्या अभ्यासक्रमात फारसा फरक नाही. जवळपास सारखाच अभ्यासक्रम असला तरी सीबीएसईमध्ये अनेक संकल्पना विस्तृतपणे देण्यात आल्या आहेत. एका वर्षात अभ्यासक्रम बदलता येत नाही. सीबीएसईचा अभ्यासक्रम तसेच परीक्षा पद्धतीची माहिती घेऊन त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असेही म्हमाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
    दीड हजार निकाल राखीव
    विविध कारणास्तव १ हजार ५६२ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. त्यात औरंगाबाद विभागात परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते.
==============================================

जलदूत एक्स्प्रेस पुन्हा सुरू


  • मिरज (जि. सांगली) : वारणा धरणातून सोडलेले पाणी बुधवारी मिरजेपर्यंत पोहोचल्यानंतर गेले पाच दिवस बंद असलेली जलदूत एक्स्प्रेस सायंकाळी लातूरला पाठविण्यात आली.
    मिरजेत कृष्णा घाटावर रेल्वेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलजवळ नदीपात्र कोरडे पडल्याने रेल्वेसाठी होणारा पाणी उपसा शुक्रवारपासून बंद झाला होता. त्यामुळे पाच दिवस दररोज लातूरला पाणी घेऊन जाणारी जलदूत एक्स्प्रेस बंद झाली. पाण्याअभावी म्हैसाळ उपसा सिंचन योजनासुध्दा बंद झाल्याने वारणा धरणातून रविवारी पाणी सोडण्यात आले.
    बुधवारी सकाळी मिरजेत नदीपात्रात पाणी आल्यानंतर रेल्वे स्थानकात पाणीपुरवठा करणारे दोन्ही पंप सुरू करून हैदरखान विहिरीत पाणी साठा करण्यात आला. सायंकाळी चारपर्यंत जलदूत एक्स्प्रेसचे ५० टँकर भरून लातूरला पाठविण्यात आले.
    मिरजेतून लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मिरज रेल्वेस्थानकाला व रेल्वे वसाहतीला गेले पाच दिवस टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू होता. मिरज रेल्वेस्थानकात पाणी टंचाईमुळे रेल्वेगाड्यांत मिरजेऐवजी पुणे व हुबळी स्थानकात पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मिरज स्थानकात पाणी बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. आता जलदूत एक्स्प्रेस दररोज मिरजेतून पाठविण्याचे नियोजन सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
    दरम्यान, पाण्याचा वेग कमी असल्याने म्हैसाळ बंधाऱ्यात अद्याप पुरेसा साठा झालेला नाही. गुरुवारपासून म्हैसाळ योजनेचे ६५ पंप बंद असून ते कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.
==============================================

लग्नसराईच्या हंगामाचा एसटीला अहेर


  • मुंबई : उत्पन्नात मोठी भर पडावी यासाठी एसटी महामंडळाने मोसमातील लग्नाच्या शेवटच्या मुहूर्ताचा फायदा घेत जादा वाहतूक करण्याचा निर्णय घेतला होता. ३0 एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी असलेल्या मुहूर्ताच्या दिवशी एसटी महामंडळाने
    राज्यात जादा वाहतूक केल्याने एकूण
    ३९ कोटी ४0 लाखांचे उत्पन्न मिळविले
    आहे.
    एसटी महामंडळाने ३0 एप्रिल आणि १ मे या दोन दिवसांत असणाऱ्या लग्नसराईचा फायदा घेऊन १0 टक्के जादा वाहतूक केली. जवळपास १,७00 पेक्षा अधिक बस महामंडळाकडून सोडण्यात आल्या. ज्या मार्गांवर आरक्षण पूर्ण झाले आहे अशा मार्गांवर प्रवासी गर्दीचा अंदाज घेऊन एसटी महामंडळाकडून जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे ३0 एप्रिल रोजी २0 कोटी रुपये तर १ मे रोजी सोडलेल्या जादा वाहतुकीतून १९ कोटी ४0 लाख रुपये उत्पन्न महामंडळाला मिळाले आहे. एप्रिलपासून दर दिवशी महामंडळाला दुष्काळामुळे १७ कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. मात्र लग्नसराईतल्या या दोन दिवसांत महामंडळाने चांगली कमाई केली. मागील वर्षातील एप्रिल महिन्याच्या ३0 तारखेला आणि १ मे या दोन दिवसांत महामंडळाला एकूण ३६ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यात ३ कोटी ४0 लाखांची अधिक भर पडली आहे. 
==============================================

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, गारव्याने मुंबईकर सुखावले


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २६ - कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना गुरूवारी सकाळी आलेल्या अनपेक्षित पावसामुळे सुखद गारव्याचा दिलासा मिळाला. गुरूवारी सकाळी मुंबईसह उपनगरांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने वातारवणात गारवा आला आहे. दादर, परळ, भायखळा यासह अनेक भागात सकाळी सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या असून आणिखी वृष्टीची शक्यता आहे.
    दरम्यान यंदा राज्यात सरासरीच्या २५ टक्क्यांहून अधिक पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला दिले आहेत. राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे हवामान खात्याने राज्य शासनाला कळविले आहे. हे लक्षात घेता आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या धर्तीवर संबंधित सर्व घटकांशी समन्वय राखून काम करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
==============================================

दोन वर्षांत काय झाले? उद्धव ठाकरेंचा सवाल


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २६ - केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवर येऊन आज (२६ मे) दोन वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्त विविध माध्यमातून सरकारच्या कामगिरीचा लेखाजोगा मांडला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रात व राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेला व भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही या सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून त्यांनी सरकारच्या कामगिरीवर टिप्पणी करतानाच ' मोदी सरकारने काय केले व काय नाही याची बेरीज-वजाबाकी अवघ्या दोन वर्षात करणे बरोबर नसल्याचे सांगत मोदी यांचे सरकार पाच वर्षांसाठी लोकांनी निवडले आहे. त्यामुळे जे काही सांगायचे ते शेवटच्या वर्षातच सांगणे उचित ठरेल' असे म्हटले आहे. 
    शिवसेना व भाजपा हे एकमेकांचे मित्रपक्ष असले तरी सत्तेच्या राजकारणावरून त्यांच्यात नेहमी धुसफूस सुरू असते, टोमणेही मारले जात असतात, मात्र असे असले तरी दोन्ही पक्षांची युती अद्याप कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव यांनी आजच्या अग्रलेखातून सरकारबद्दल परखडपणे मतं मांडतानाच काही मुद्यांवर पंतप्रधान मोदींची पाठराखणही केल्याचे दिसते. तसेच गेल्या ६० वर्षांत सत्तेवर असलेल्या सरकारचे पाप धुण्यासाठी व विकास घडवण्यासाठी या सरकारल पुरेसा कालावधी देणे आवश्यक असल्याचे सांगत ५ वर्षांनीच सरकारचे मूल्यमापन करणे योग्य ठरेल असे त्यांनी म्हटले आहे.
==============================================

बसमध्ये पॅनिक बटन सक्तीचे !


  • नवी दिल्ली : महिला प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्ये ‘पॅनिक बटन’, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहनाचा शोध घेणारे उपकरण लावणे बंधनकारक करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी दिली. या संदर्भात सरकार येत्या २ जून रोजी अधिसूचना जारी करणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
    ‘निर्भयाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सर्व सार्वजनिक बसगाड्यांमध्ये आपत्कालीन पॅनिक बटन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस उपकरण लावणे अनिवार्य करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे’, असे गडकरी म्हणाले.
    नवी दिल्ली येथे राजस्थान सरकारच्या एका पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ केल्यानंतर गडकरी पत्रकारांशी बोलत होते. या प्रकल्पांतर्गत राजस्थान राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपत्कालीन बटन व सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेल्या आपल्या दहा लक्झरी बसगाड्या व दहा सामान्य बसगाड्यांचे परिचालन करेल. या यंत्रणेची निगराणी स्थानिक पोलीस नियंत्रण कक्षातून केली जाईल. 
==============================================
'केवळ दीड लाख रुपये भरपाई अस्वीकारार्ह'

File Photoनवी दिल्ली - इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमधील (आयआयटी) विद्यार्थ्यांना "फ्लिपकार्ट‘ या ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनीने कॅम्पम मुलाखतीमध्ये नोकरी देऊन नंतर रूजू होण्याची तारीख बदलण्याच्या प्रकारावर आयआयटीने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांना भरपाई म्हणून देण्यात येणारी प्रत्येकी दीड लाख रुपयांची रक्कम अस्वीकारार्ह असल्याचेही म्हटले आहे.

आयआयटी अहमदाबादमधील सात विद्यार्थ्यांना फ्लिपकार्टने कॅम्पस मुलाखतीत नोकरी दिली होती. रूजू होण्यासाठी त्यांना जुलैमधील तारीख दिली होती. मात्र आता या विद्यार्थ्यांना डिसेंबर 2016 मध्ये रूजू करून घेण्यात येईल असे कळविण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी भरपाई म्हणून एकत्रित दीड लाख रुपये देण्यात येतील असेही कळविले आहे. यावर आयआयटीने फ्लिपकार्टला लिहिलेल्या ई-मेलमध्ये नाराजी व्यक्त करत या विद्यार्थ्यांना नोकरीची हमी देण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या भरपाईबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. यावर एक व्यवस्थापन म्हणून आमच्यासाठी हा कठोर निर्णय असल्याचे म्हणत या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज झाले असतील याची आम्हाला जाणीव असल्याचे फ्लिपकाटर्न म्हटले आहे. 
==============================================
शेतकऱ्याचे विहिरीत उपोषण!



दोन वर्षांपासून पैसे देण्यास टाळाटाळ : रोहयोचा भोंगळ कारभार

नागपूर/पचखेडी - रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे पैसे दोन वर्षांपासून दिले जात नसल्याने एका शेतकऱ्याने चक्क विहिरीतच बुधवारपासून उपोषण सुरू केले. यामुळे प्रशासनाची चांगलीच तारंबळ उडाली आहे.

कुही तालुक्‍यातील वेलतूर येथील सुधीर बबनराव बेले या शेतकऱ्याने रोहयोअंतर्गत विहिरीसाठी अर्ज केला होता. त्याला २०११-१२ साली विहीर मंजूर झाली. सोबतच १ लाख ९० हजार रुपयांचे अनुदानही मंजूर झाले.

दप्तर दिरंगाईमुळे विहिरीच्या कामाला वर्षभरानंतर सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच बांधकामाचे पैसे वेळेत दिले जात नव्हते. मात्र, बेले यांनी काम थांबवले नाही. विहिरीचे बऱ्याच प्रमाणात काम पूर्ण झाले आहे. एकूण रकमेपैकी आतापर्यंत त्याला केवळ ८६ हजार रुपये मिळाले. विहिरीला पाणी कमी लागल्याने विहिरीत बोअर मारण्यासाठी रोहयोने मंजुरी दिली. त्यासाठी वेगळे २५ हजार रुपये मंजूर केले. तेदेखील अद्याप मिळाले नाही. गेल्या दोन वर्षांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहेत. पण, कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयोचे उपजिल्हाधिकारी जायभाये यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीसुद्धा गांर्भीयाने घेतले नाही. महिनाभरापूर्वीच त्यांनी विहीर बांधकामाचे पैसे न मिळाल्यास विहिरीतच उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता. यानंतरही रोहयो विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुठलीच हालचाल केली नाही. अखेर बुधवारी (ता.२५) पासून बेले यांनी शेतातील विहिरीत उपोषण सुरू केले. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. जिल्हा  परिषद सदस्य व शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पोहोचत त्यांना पाठिंबा दिला. बेले यांच्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांना विहीर बांधकामाचे पैसे मिळणे बाकी आहे. ते त्वरित न मिळाल्यास अन्य शेतकऱ्यांनीसुद्धा विहिरीतच उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. 
==============================================
बिहारमध्ये जीतनराम मांझींच्या ताफ्यावर हल्ला

गया - बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या ताफ्यावर आज (गुरुवार) सकाळी गया जिल्ह्यातील डुमरिया येथे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून मांझी थोडक्यात बचावले असून, त्यांच्या ताफ्यातील गाडी पेटवून देण्यात आली आहे.

डुमरिया येथे बुधवारी लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) नेत्याची हत्या करण्यात आली होती. या नेत्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मांझी आपल्या ताफ्यासह याठिकाणी आले होते. पण, नागरिकांनी मांझी यांच्या ताफ्यावर दगडफेक करत ताफ्यातील एक कार पेटवून दिली. यामुळे मांझी यांना पुन्हा परतावे लागले. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी हवेत गोळीबार केला. 

एलजेपी नेते सुदेश पासवान यांची बुधवारी हत्या करण्यात आली होती. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक हत्येच्या घटना घडल्या आहेत. यामुळे बिहार सरकारवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

==============================================
दोन वर्षांत १५ लाख जमा झाले नाहीत- सेना

मुंबई - ‘मोदी यांनी ज्याप्रमाणे "अच्छे दिन‘ची आशा दाखवली, त्याप्रमाणे "गरिबी हटाव‘चे नारे देत कॉंग्रेसने गरीबांना जास्त गरीब व श्रीमंतांना जास्त श्रीमंत केले. काळा पैसा वाढला व परदेशी बॅंकांत ही लूट गेली. हा काळा पैसा परत आणू व जनतेच्या बॅंक खात्यात प्रत्येकी किमान 15 लाख जमा होतील असे वचन श्री. मोदी यांनी दिले होते. पण हे आश्‍वासन दोन वर्षांत पूर्ण झालेले नाही‘, असे म्हणत शिवसेनेचे केंद्र सरकारला दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने आपल्या आश्‍वासनाची आठवण करून दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशभर सरकारच्या कामाचा प्रचार आणि प्रसार करण्यात येत आहे. मात्र केंद्रातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने दोन वर्षांचा लेखाजोखा "सामना‘तील अग्रलेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. "दोन वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधानांचा मुक्काम स्वदेशी आहे की परदेशी ते पाहावे लागेल. पंतप्रधान बहुधा इराणला होते व तेथून ते आसाम येथे भाजप राज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी गेले असावेत‘, असे अग्रलेखात म्हटले आहे. तसेच "योजनांचा वर्षाव दोन वर्षांत झाला. त्या योजनांचे पुढे काय झाले? मोदी सरकारने योजनांचा धडाका लावला असला तरी लोकांना फक्त ते योजनांचीच माहिती असल्याचे पाहणीत आढळून आले. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून योजनांची घोषणा करण्यात आली. पण "जनधन योजना‘, "स्वच्छ भारत योजना‘, "पंतप्रधान ग्रामीण सडक योजना‘ वगळता इतर योजना लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. अर्थात, फक्त योजनांवर देश चालत नाही.‘ असा संदेशही सरकारला देण्यात आला आहे. 
==============================================
संबंध सुधारण्यासाठी लाहोरला गेलो होतो: मोदी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकेच्या वृत्तपत्राला मुलाखत दिली असून, त्यांनी या मुलाखतीत भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठीच लाहोरला भेट दिल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी या मुलाखतीत अनेक विषयांवर चर्चा केली आहे. मोदी म्हणाले की, मी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी लाहोरला भेट दिली होती. दहशतवाद हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे व दहशतवादसोबत कधीच तडजोड केली जाऊ शकत नाही".

जमीन अधिग्रहणाबाबत विचारले असता मोदी म्हणाले, "केंद्रीय स्तरावर कायद्याचे संशोधन व्हायचे दिवस आता गेले व बदल घडवण्यासाठी राज्यांना पुढाकार घ्यावा लागेल. परदेशी गुंतवणुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत पण अजून बराच मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. अर्थव्यवस्था ही केवळ उद्योगपतिंसाठी फायदेशीर न ठरता कामगराभिमुख सुद्धा असायला हवी आणि मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबर व्यापार संचालन आधिक सोपे व्हावे यावर केंद्राचा भर आहे.‘‘
==============================================
'बजरंग दलाकडून समाजाच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न'

File Photoरामपूर (उत्तर प्रदेश) - शस्त्र प्रशिक्षणाचे प्रशिक्षण देणारे कॅम्प आयोजित करणा-या बजरंग दलाकडून समाजाचे ध्रुवीकरणाचा करण्यात येत प्रयत्न असल्याची टीका समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना खान म्हणाले, "कोणत्याही प्रकारचे ध्रुवीकरण असू नये. काही राजकीय पक्ष त्यांच्या फायद्यासाठी तसा प्रयत्न करत आहेत. हे चांगले राजकारण नव्हे. असे प्रकारचे कॅम्प आयोजित करायला नकोत. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी.‘ तसेच देशातील धार्मिक वातावरण बिघडवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. अशा प्रकरणांतून राजकीय उद्दिष्ट गाठण्याचा राजकीय पक्षांनी प्रयत्न करू नये, असेही ते म्हणाले.

इतर धर्मांच्या नागरिकांपासून हिंदू धर्माचे संरक्षण करण्यासाठी बजरंग दलाने त्यांच्या सदस्यांना बंदूक, तलवार व लाठ्यांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अयोध्येमध्ये अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित केल्याप्रकरणी बजरंग दलाचे नेते महेश शर्मा यांना पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने बजरंग दलाला पाठिंबा दर्शविला असून ते दहशतवादाविरुद्ध लढत असल्याचे म्हटले आहे.
==============================================
'स्मृति इराणी हुई बीमार, वरुण गांधी अबकी बार’

अलाहाबाद - पुढील वर्षी होणार्‍या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपच्या अलाहाबाद येथील कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. या वेळी त्यांनी चक्क त्यांच्याच पक्षाच्या एका मंत्र्याविरुद्ध म्हणजेच स्मृति इराणींविरुद्ध प्रचार करत वरुण गांधी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याचे पोस्टर झळकाविले आहे.

मनुष्यबळ विकासमंत्री स्मृति इराणी भाजपच्या उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील अशी चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेला उत्तर देत वरुण गांधींच्या समर्थकांनी इराणी यांच्याविरोधात पोस्टर झळकावत स्मृति इराणी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे नेतृत्त्व करू शकत नाही. फक्त वरुण गांधी हे त्यांचे नेतृत्त्व करू शकतात, असे पोस्टरमधून म्हटले आहे. तसेच वरुण यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी दिली तर, तीनशेहून आधिक जागा भाजप बळकावू शकेल, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ‘‘स्मृति इराणी हुई बीमार, उत्तर प्रदेश की यही पुकार, वरुण गांधी अबकी बार… लक्ष्य 333+‘‘ असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.
==============================================
पुणे: वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून वायूगळती

पुणे - महानगरपालिकेच्या वारजे येथील जलशुध्दीकरण केंद्रामधे आज (गुरुवार) पहाटे दोन वाजता मोठ्या प्रमाणात क्लोरिन वायूची गळती झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी वायूगळती थांबविण्यात यश आले आहे. संबंधित कंपनीचे तांत्रिक विभागाच्या पथकाने वायूगळती थांबल्याचे स्पष्ट केले आहे.. या वायूगळतीमुळे महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना त्रास झाला होता. त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून संजीवनी रुग्णालयामधे दाखल करण्यात आले आहे.
==============================================

No comments: