Monday, 16 May 2016

नमस्कार लाईव्ह १५-०५-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- रियाध; सौदी अरेबियात मिळतायत पत्नीला मारहाण करण्याचे धडे 
२- भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीचा विषय पाकिस्तान नेणार आंतरराष्ट्रीय पातळीवर 
३- सन्ना; येमेनः पोलिस भरतीदरम्यान हल्ल्यात 31 ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- नीट' वादावर राज ठाकरेंचा थेट मोदींना कॉल 
५- देश नेमकं कोर्ट चालवतय की सरकार ? - राज ठाकरे 
६- नीटप्रश्नी सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे- शरद पवार 
७- आप सरकारचे 3 महिन्यांत जाहिरातींवर 15 कोटी 
८- न्यायव्यवस्थेलाही भ्रष्टाचाराची वाळवी- मेधा पाटकर 
९- तापमानाने गाठला आणखी एक उच्चांक 
१०- डॉ. जाधव यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार -  खडसे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- मालेगाव स्फोट: मुस्लिम 'जुम्म्या'ला मशिदीत हल्ला कसा करेल? : पवार 
१२- लाचखोर गजानन पाटील तीन महिन्यांपासून ACB च्या रडारवर 
१३- सरकारचे प्रयत्न सुरु, पण विद्यार्थ्यांनीही 'नीट'साठी तयार राहावं: मुख्यमंत्री 
१४- करकरेंना सलाम, पण त्यांचा मालेगाव स्फोटाचा तपास सदोष : सामना 
१५- तृप्ती देसाई देणार दारूबंदीसाठी लढा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- गांधीनगर; भाजपच्या महिला खासदार गटारीत कोसळल्या 
१७- कोल्हापूर; दारु बंदीसाठी महिलांचं आंदोलन, दारुड्यांना लाटण्यांनी चोप 
१८- केजरीवाल यांनी गायले गाणे; व्हिडिओ व्हायरल 
१९- गुरगाव; ब्रिटानिकाच्या मुख्य अधिकाऱ्याने केली आत्महत्या 
२०- नागपूर; डॉक्‍टरच्या हातून झालेल्या एका छोट्याशा चुकीने त्यांच्या मुलाला कायमस्वरूपी अपंग 
२१- नांदेड : तामसाजवळच्या उमर गावत ४० वर्षीय इसमाने पत्नीची कु-हाडीने हत्या करून केली आत्महत्या. 
२२- परभणी - पाथरीमध्ये रेणापूर शिवारात गावातील व्यक्तीकडूनच महिलेचा खून 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- विजय नवनाथ उपांत्य फेरीत 
२४- सुरेश रैना 'बाबा' झाला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
काम करताना चिंता करू नका. जे व्हायचे ते होणारच आहे. चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत
[तातेराव इंगोले, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

============================================

मालेगाव स्फोट: मुस्लिम 'जुम्म्या'ला मशिदीत हल्ला कसा करेल? : पवार

मालेगाव स्फोट: मुस्लिम 'जुम्म्या'ला मशिदीत हल्ला कसा करेल? : पवार
अहमदनगरमालेगाव बॉम्बस्फोट तपासप्रकरणी एनआयच्या भूमिकेमुळे विश्वासार्हतेला धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

“एनआयएच्या तपासामुळे विश्वासार्हतेला धक्का बसला. हे योग्य नाही. निरपराधांची हत्या झाली. अल्पसंख्यांक समाजाचा व्यक्ती ‘जुम्मा’च्या दिवशी मशिदीत कधी हल्ला करेल, हे शक्य नाही. मी अजूनपर्यंत हे पाहिले नाही, या प्रकरणाचा तपास शहीद हेमंत करकरे यांनी केला, मात्र त्यांचा तपास चुकीचा असल्याचं बोललं जात आहे” असं पवार म्हणाले.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह सहा जणांविरोधातील मोक्का हटवला
राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने 2008 च्या मालेगाव स्फोटाप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह सहा जणांविरोधातील मोक्का हटवण्याचा निर्णय घेतला आहे. एनआयएने विशेष कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात साध्वी प्रज्ञासह सहा जणांना क्लिन चीट मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

2008 ला मालेगावमधल्या शब-ए-बारातच्या रात्री झालेल्या स्फोटात चौघांनी जीव गमावला. 79 जण जायबंदी झाले. देशात पहिल्यांदाच भगवा दहशतवाद हा शब्द रुढ झाला आणि त्याचा चेहरा बनली साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर.

2011 साली या बॉम्बस्फोटाचा तपास एटीएसकडून एनआयएकडे वर्ग करण्यात आला. 2014 साली सत्तांतर झालं. त्यानंतर एनआयएने दोन वर्षात नव्याने तपास करत, साध्वीसह सहा जणांविरोधात सबळ पुरावे नसल्याचं म्हटलं आहे.
============================================

लाचखोर गजानन पाटील तीन महिन्यांपासून ACB च्या रडारवर

'लाचखोर गजानन पाटील तीन महिन्यांपासून ACB च्या रडारवर'
मुंबई : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा कथित पीए गजानन पाटील 30 कोटीच्या लाचखोरी प्रकरणात गजाआड झाल्यानंतर, मोठी रंजक माहिती बाहेर येऊ लागली आहे.

“लाचलुचपत प्रतिबंध विभाग गेले 3 महिने गजानन पाटीलच्या मागावर होती. त्याचे रेकॉर्ड्स सरकारकडे उपलब्ध आहेत. या तपासात कुठलीही ढवळाढवळ होणार नाही” असं मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितलं.

एकनाथ खडसेंनी तक्रारदार रमेश जाधव यांना विकृत म्हणत गजानन पाटलाची पाठराखण केली होती. त्यामुळं एसीबीच्या कारवाईवर खडसे संशय कसा घेतात? असा सवाल विचारला जाऊ लागला.

काय आहे गजानन पाटील लाचखोरी प्रकरण?
राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा खासगी पीए असल्याचं सांगणाऱ्या गजमल पाटील उर्फ गजानन पाटील, याला 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयात त्याला अटक केली.

ठाण्यातील मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थेला जमीन हस्तांतरित करण्यासठी गजानन पाटीलने संस्थेच्या विश्वस्तांकडे तब्बल 30 कोटींची लाच मागितली होती. यानंतर संस्थेचे ट्रस्टी डॉ. रमेश जाधव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. त्यावर कारवाई करत एसीबीने गजानन पाटीलला मंत्रालयात अटक केली.
============================================

नीट' वादावर राज ठाकरेंचा थेट मोदींना कॉल

'नीट' वादावर राज ठाकरेंचा थेट मोदींना कॉल
मुंबई: ‘नीट’ परिक्षेच्या घोळाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेण्यापूर्वी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही फोनवरुन चर्चा केली. राज ठाकरेंनी कालच मोदींना फोन करुन ‘नीट’वर तोडगा काढण्याची विनंती केली.

‘नीट’वर तोडगा काढून विद्यार्थी आणि पालकांना दिलासा द्यावा, अशी विनंती राज यांनी पंतप्रधानांकडे केल्याचं सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट

‘नीट’ परिक्षेच्या घोळावर विद्यार्थी आणि पालकांची बाजू मांडण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली.

‘नीट’ परीक्षा कधीपासून लागू करायची यासंदर्भातला निर्णय पालक आणि मुख्यमंत्र्यांनी  घ्यावा, असं राज ठाकरे म्हणाले.  देश नेमकं कोण चालवतंय, सरकार की कोर्ट? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या पाठिशी
राज्यातील विद्यार्थ्यांवर ‘नीट’ परीक्षा लादण्यात आली असून त्यामुळे त्यांचं नुकसान होईल. राज्य सरकार संपूर्ण प्रयत्न करत आहे. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी परीक्षेची तयारी करावी. ‘नीट’प्रश्नी केंद्र सरकार काही करु शकेल का, अशी विनंती पंतप्रधानांना करणार आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विद्यार्थ्यांना दिलं आहे.
============================================

सरकारचे प्रयत्न सुरु, पण विद्यार्थ्यांनीही 'नीट'साठी तयार राहावं: मुख्यमंत्री

सरकारचे प्रयत्न सुरु, पण विद्यार्थ्यांनीही 'नीट'साठी तयार राहावं: मुख्यमंत्री
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांवर ‘नीट’ परीक्षा लादण्यात आली असून त्यामुळे त्यांचं नुकसान होईल. राज्य सरकार संपूर्ण प्रयत्न करत आहे. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी परीक्षेची तयारी करावी. ‘नीट’प्रश्नी केंद्र सरकार काही करु शकेल का, अशी विनंती पंतप्रधानांना करणार आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विद्यार्थ्यांना दिलं आहे.

‘नीट’ परीक्षेच्या घोळाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थी आणि पालकांसह ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?


“राज्य सरकारच्या सर्वोच्च न्यायालयातील भूमिकेला पालकांचं समर्थन आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक वेळी सरकारची मागणी फेटाळली. परंतु शक्य तेवढे प्रयत्न करण्याचं आश्वासन मी पालकांना दिलं आहे. मी ‘नीट’प्रश्नी पंतप्रधानांना भेटून केंद्र सरकार यावर काही तोडगा काढू शकतं का,” अशी विनंती करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितल.
============================================

करकरेंना सलाम, पण त्यांचा मालेगाव स्फोटाचा तपास सदोष : सामना

करकरेंना सलाम, पण त्यांचा मालेगाव स्फोटाचा तपास सदोष : सामना
मुंबई : हिंदू राष्ट्रवाद हा भगवा दहशतवाद कधीच नव्हता मात्र केवळ मुसलमानांची सहानुभूती मिळवण्यासाठी काँग्रेसनं या राष्ट्रवादाला दहशतवादाचा रंग दिल्याचा आरोप, शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मध्ये करण्यात आला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकऱणी एनआयएनं साध्वी प्रज्ञा सिंग यांना क्लीन चिट दिली आहे. याबाबत शिवसेने ‘सामना’तून आपली भूमिका मांडली.

या प्रकरणातून हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या संघटनांनी तपास अधिकाऱ्यांवर बदनामीचा खटला चालवावा असा सल्ला देण्यात आला आहे.

शहीद हेमंत करकरे यांचं हौतात्म्य मोठं आहे. मात्र त्यांनी या प्रकरणात केलेला तपास सदोष होता. राजकीय मालकांना सुखावणारा होता अशी टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे.
“हेमंत करकरे यांनी ‘२६/११’च्या हल्ल्यात हौतात्म्य पत्करले. त्यांच्या हौतात्म्यास आमचा सलाम, पण मालेगाव बॉम्बस्फोटाचा दहशतवादविरोधी पथकाने केलेला तपास वादग्रस्तच ठरला. राजकीय मालकांना खूश करण्यासाठीच या तपासाची आखणी झाली. दिल्लीत चिदंबरम, महाराष्ट्रात शरद पवार, आर. आर. पाटील यांच्यासारख्या लोकांनी ‘मुसलमानांना टार्गेट केले जात आहे’ असे छाती पिटून सांगितले व दहशतवादाला भगवा रंग देऊन ते मोकळे झाले”, असं ‘सामना’त म्हटलं आहे.
============================================

भाजपच्या महिला खासदार गटारीत कोसळल्या

भाजपच्या महिला खासदार गटारीत कोसळल्या
गांधीनगर : एरव्ही आंदोलनादरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अनेकदा जखमी  होण्याची वेळ येते. पण एक महिला खासदारही जखमी झाल्या आहेत. मात्र कोणत्याही आंदोलनादरम्यान नव्हे तर, एका कामाच्या पाहणी दरम्यान त्या चक्क गटारीत कोसळल्या.

गुजरातच्या जामनगरच्या भाजप खासदार पूनम माडम चक्क नाल्यात पडल्या. जामनगरमध्ये अतिक्रमण हटाव दरम्यान पूनम कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या.
mp poonam madam 5
याचदरम्यान नाल्यावरुन जात असताना पूनम यांचा पाय नाल्याच्या झाकणावर पडला आणि त्या थेट 7 फूट खोल नाल्यात पडल्या.  ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

यावेळी खासदार महोदयांसोबत काही कार्यकर्तेही नाल्यात जाऊन पडले. दरम्यान पूनम मडाम यांना उपचासाराठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान पूनम माडम या गेल्यावर्षी देशभरात चर्चेत आल्या होत्या. कारण भागवत कथा कार्यक्रमात त्यांच्या नृत्यावर 30 सेकंदात 3 कोटी रुपये उडवण्यात आलं होतं.

कोण आहेत पूनम मडाम?
*जामनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार
*काँग्रेसचे माजी खासदार विक्रम माडम पूनम यांचे चुलत आजोबा
*गुजरातच्या खंबालिया मतदारसंघातून विधानसभेत आमदार होत्या
*2015 साली भागवत कथा कार्यक्रमात पैसे उडवल्यानं वादात
*30 सेकंदात 3 कोटी रुपये उडवल्यानं पूवन माडम वादात
============================================

दारु बंदीसाठी महिलांचं आंदोलन, दारुड्यांना लाटण्यांनी चोप

दारु बंदीसाठी महिलांचं आंदोलन, दारुड्यांना लाटण्यांनी चोप
कोल्हापूर: कोल्हापूरच्या इचलकरंजीत दोन आठवड्यापासून सुरू असलेल्या रणरागिणींच्या दारुबंदी आंदोलनाने रौद्र रूप घेतलं.

गेल्या दोन आठवड्यांपासून या महिला सरकारमान्य दारु दुकान बंद करण्यासाठी ठाण मांडून आहेत. त्यामुळे इकडे फिरकायची कुणाला हिंमत होत नाही. पण तरीही हे दोन महाभाग यथेच्च ढोसण्यासाठी इथं आलेच. महिलांसोबत या दोघांची बाचाबाची झाली. या दोघांनी महिलांना धक्काबुक्की केली. त्यामुळे या बहाद्दरांना महिलांनी थेट लाटण्यानं चोप दिला.

आतापर्यंत भजन करत बसलेल्या महिलांनी थेट रुद्रावतार धारण केला. दरम्यान आज भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई दारू आंदोलना स्थळी भेट देणार आहेत.
============================================

देश नेमकं कोर्ट चालवतय की सरकार ? - राज ठाकरे


  • ऑनलाइन लोकमत  - 
    मुंबई, दि. 16 - 'नीट’ परिक्षेच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत राज ठाकरे यांच्यासोबत विद्यार्थी आणि पालकदेखील उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे यांनी विद्यार्थी आणि पालकांची बाजू मांडत 'नीट’ परिक्षेसंबंधीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी केली आहे. 
    मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश केंद्र सरकार सोयीने बदलत असल्याची टीका केली आहे. तसंच देश सरकार चालवत आहे की कोर्ट ? असा सवालही विचारला. एकीकडे शेतकरी आत्महत्या सुरु आहेतच.उद्या जर नैराश्यातून विद्यार्थ्यांनी वेडंवाकडं पाऊल उचललं तर जबाबदार कोण? असंही राज ठाकरेंनी विचारलं आहे.  
    मुख्यमंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंत पंतप्रधानांसोबत बैठकीची वेळ मिळणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी दुष्काळाच्या मुद्यावरदेखील चर्चा केली. टँकरने होणारा पाणीपुरवठा सरकारने हाती घ्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 
============================================

आता तृप्ती देसाई देणार दारूबंदीसाठी लढा


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १६ - शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर  मंदिरातील महिला प्रवेशाचा लढा यशस्वी करणा-या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आता दारूबंदीसाठी आंदोलन करणार आहेत. देसाई संपूर्ण महाराष्ट्रात फिरून जनतेला दारूबंदीचे आवाहन करणार आहेत. तसेच याप्रश्नी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे समजते. 
    शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर  व कोल्हापुरात महिलांना मंदिरात प्रवेश मिळवून दिल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर गेल्या आठवड़्यात त्यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश करुन दर्शन घेतले. मात्र त्यांना मजारमध्ये प्रवेश देण्यात आला नाही.
    या आंदोलनांनंतर त्यांनी दारूबंदीसाठी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. 
============================================

‘नीट’ प्रश्नी राज्य-केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात जावे - शरद पवार


  • ऑनलाइन लोकमत
    अहमदनगर, दि. १६ - देशभरात एकच ‘नीट’ परीक्षा घ्यावी हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश बदलण्याचा अधिकार कोणाला आहे, याची कायदेशीर तपासणी करून राज्य व केंद्र शासनाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जायला हवे, असे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणाचा फेरतपास सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली व्हावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
    राज्यात केवळ 20 टक्के मुले ही ‘सीबीएससी’ पॅटर्नची आहेत. राज्यातील मुलांना आता ‘नीट’चा अभ्यास करणे शक्य नाही. परीक्षा पध्दतीत बदल करायचाच होता तर किमान दोन वर्षाचा अवधी देणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे नीटचा गोंधळ सुरू आहे. 
    मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली फेरतपास व्हावा
    मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंगला ‘एनआयए’ने (राष्ट्रीय तपासणी संस्था) क्लीन चिट दिल्याने या संस्थेच्या विश्वासार्हतेला धक्का बसला आहे. स्व. हेमंत करकरे यांच्यासारख्या चांगल्या अधिका-याने केलेला तपास चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली फेरतपास होणे आवश्यक आहे, असे पवार महणाले.
    राज्य शासन दुष्काळ निवारण उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 
============================================

अरे बापरे ! सौदी अरेबियात मिळतायत पत्नीला मारहाण करण्याचे धडे


  • ऑनलाइन लोकमत - 
    रियाध, दि. 16 - पत्नीला मारहाण कशी करावी ? यासाठी चक्क रोगनिवारणतज्ञ सल्ला देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे सौदी अरेबियामधील नॅशनल टेलिव्हिजनवर हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला होता अशी माहिती मिळत आहे. 
    एव्हीडी न्यूज डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ फेब्रुवारी महिन्यात दाखवण्यात आला होता. एप्रिल 2016 मध्ये अमेरिकेत हा व्हिडिओ दाखवण्यात आल्यानंतर ही माहिती समोर आली. वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार सौदी सरकारने परवानगी दिल्यानंतरच नॅशनल टेलिव्हिजनवर हा व्हिडिओ दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे. 
    रोगनिवारणतज्ञ खालेद-अल-साकबे यांनी या व्हिडिओतून बायकोला मारहाण कशी आणि का करावी ? याबद्दल माहिती दिली आहे. 'बायकोला मारहाण करणे हा महत्वाचा मुद्दा आहे. यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. पण अल्लाची इच्छा आहे. आपण हे अंतर सुरक्षित पार करु', असं खालेद-अल-साकबे बोलले आहेत.
    'शिस्त लागणे हा पत्नीला मारहाण करण्याचा हेतू असून आपला राग व्यक्त करण्यासाठी नाही', असा दावा खालेद-अल-साकबे यांनी केला आहे. तसंच मारहाण करताना टोकदार वस्तू किंवा रॉडचा वापर करु नये असाही सल्ला दिला आहे. 
============================================

भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीचा विषय पाकिस्तान नेणार आंतरराष्ट्रीय पातळीवर


  • ऑनलाइन लोकमत 
    इस्लामाबाद, दि. १६ -  भारताने केलेल्या सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्र चाचणीचा विषय पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अझिझ यांनी सोमवारी ही माहिती दिली. 
    भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीवर अझीझ यांनी चिंता व्यक्त केली. अशा चाचण्यांमुळे क्षेत्रीय संतुलन बिघडते असे त्यांनी सांगितले. भारताच्या चाचणीवर आक्षेप घेणा-या अझीझ यांनी मात्र पाकिस्तान संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळवत राहील असे सांगितले. 
    अमेरिकेबरोबर दृढ झालेले भारताचे संबंधही पाकिस्तानला खुपत आहेत. भारताला अमेरिकेकडून सहकार्य मिळत आहे. चीनला रोखण्यासाठी सशक्त भारत आवश्यक आहे असे अमेरिकेला वाटते असे अझीझ म्हणाले. आम्ही हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करु असे त्यांनी सांगितले. भारताने रविवारी ओदिशाच्या तटावर स्वदेशी बनावटीच्या सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चाचणी केली. 
============================================
केजरीवाल यांनी गायले गाणे; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे (आप) नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजवील यांनी 30 सेंकदाचे एक गाणे गायले असून ते सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहे.

पंजाब व गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केजरीवाल यांनी हे गाणे गायले आहे. ‘आप‘ने हा व्हिडिओ पक्षाच्या फेसबुक पेजवर, ट्‌विटर व यूट्यूबवर अपलोड केले आहे. नेटिझन्सनी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला असून प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत. ‘एक ऐसे गगन के तले, जहां चोर भा ना हो, भ्रष्ट भी ना हों, बस आप का राज चले,‘ असे गाण्याचे बोल आहेत.

दरम्यान, केजरीवाल यांनी मुंख्यमंत्री पदाची शपथ घेताना ‘इंसान का इंसान से हो भाईचारा...‘ हे गाणे गायले होते.
============================================
आप सरकारचे 3 महिन्यांत जाहिरातींवर 15 कोटी

नवी दिल्ली- आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारने गेल्या तीन महिन्यांमध्ये जाहिरातींवर तब्बल 15 कोटी रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती माहिती अधिकारातून पुढे आली आहे.

कॉंग्रेस नेते व व्यवसायाने वकील असलेले अमन पवार यांनी केजरीवाल सरकारने केलेल्या जाहिरातींवर केलेल्या खर्चाबाबतची माहिती मागवली होती. केजरीवाल सरकारने 10 फेब्रुवारी ते 11 मे 2016 पर्यंत जाहिरातींवर 14.56 कोटी रुपये खर्च केले आहेत. कर्नाटक, केरळ, तमिळनाडूसह विविध राज्यांमधील वृत्तपत्रांमध्ये केजरीवाल सरकारने जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी या जाहिराती प्रसिद्ध केल्या असल्याचे केजरीवाल सरकारने म्हटले आहे.

कॉंग्रेस नेते अजय माकन म्हणाले, ‘स्वच्छता कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. परंतु, दुसरीकडे जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.‘
============================================
न्यायव्यवस्थेलाही भ्रष्टाचाराची वाळवी- मेधा पाटकर

बेळगाव : "देशाचा कारभार चार स्तंभांवर चालतो. त्यातील तिसऱ्या क्रमांकाचा स्तंभ हा न्यायव्यवस्थेचा आहे. भ्रष्टाचाराची वाळवी या व्यवस्थेलादेखील लागली आहे,‘‘ अशी खंत नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख व सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ कामगार नेते, स्वातंत्र्यसैनिक ऍड. राम आपटे यांचा 90 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा रिझ थिएटर येथे रविवारी (ता. 15) सकाळी झाला. त्यावेळी मेधा पाटकर बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, "ऍड. आपटे यांनी देश, समाज, चळवळी, आंदोलने व कामगारांसाठी केलेले कार्य आदर्शवत व खऱ्या समाजवाद्याचे असून त्यातून मोठी प्रेरणा व आशावाद मिळतो.‘‘

मेधा पाटकर व "आंदोलन शाश्‍वत विकासासाठी‘ मासिकाच्या कार्यकारी संपादक सुनीती सु. र. यांच्या हस्ते ऍड. राम आपटे यांना शाल, पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. सुनीती सु. र. यांनी मनोगतातून ऍड. आपटे यांच्या कार्याचा आढावा व देशातील सद्यःस्थितीचा आढावा घेतला.
ऍड. आपटे यांनी मनोगतातून विविध किस्से सांगून आठवणींना उजाळा दिला. तसेच आई-वडिलांकडून संस्कार झाल्याने न्यायाची बाजू आयुष्यभर जोपासली असल्याचे सांगितले. किरण ठाकुर यांनी अध्यक्षीय भाषण केले. मेधा पाटकर यांच्या विविध आंदोलनातील छायाचित्रांचे प्रदर्शन लक्षवेधी ठरले. 
============================================
ब्रिटानिकाच्या मुख्य अधिकाऱ्याने केली आत्महत्या

गुरगाव- ‘एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका‘ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने (COO) गुरगावमधील राहत्या इमारतीतील लिफ्टसाठी असलेल्या उभ्या अरुंद जागेतून (शाफ्ट) उडी मारून आत्महत्या केली.

पोलिसांनी सांगितले की, ब्रिटानिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनित व्हिग यांचा मृतदेह त्या ‘शाफ्ट‘च्या आतील बाजूस आढळून आला. त्याच्या खिशामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठी मिळाली. त्यांनी 19व्या मजल्यावरून उडी मारल्याचे सांगण्यात आले.
व्हिग यांनी उडी मारली की नेमके काय घडले याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

व्हिग यांचे 47 वर्षे होते. त्यांनी यापूर्वी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी विप्रोमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केले होते. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन अपत्ये आहेत. एनसायक्लोपिडियाचा उपयोग संदर्भ पुस्तिकेप्रमाणे केला जातो. विविध विषयांतील सामान्य ज्ञान तसेच काही विशेष गोष्टींबद्दलचे सखोल ज्ञान देणारे लेख यांचा समावेश या संदर्भ पुस्तिकांमध्ये असतो. 
============================================
तापमानाने गाठला आणखी एक उच्चांक

नागपूर - विदर्भात उन्हाची लाट दिवसेंदिवस तीव्र होत चालली असून, तापमानाने नागपुरात आणखी एक उच्चांक गाठला आहे. रविवारी उपराजधानीतील कमाल तापमान ४५.७  अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, जे या मोसमातील विक्रमी ठरले. विदर्भात रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे करण्यात आली.

विदर्भात मे महिना सर्वाधिक तापमानाचा मानला जातो. परंतु, अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे आतापर्यंत उन्हाची तीव्रता फारशी जाणवली नाही. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाचा कहर झपाट्याने वाढतो आहे. विदर्भातील सर्वच जिल्हे सध्या उष्णतेच्या लाटेखाली आहेत. नागपुरातही उन्हाचा जबर तडाखा जाणवत आहे. शनिवारी मोसमातील (४५.६ अंश सेल्सिअस) उच्चांक नोंदविल्यानंतर रविवारी ४५.७ अंश सेल्सिअस या आणखी एका विक्रमाची नोंद झाली.

रविवारी विदर्भातील सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४५.८ अंश सेल्अिसस इतके नोंदले गेले. येथे शनिवारी पारा ४६ अंशांवर गेला होता. याशिवाय ब्रह्मपुरीवासींनाही उन्हापासून थोडासा दिलासा मिळाला. येथील तापमानही ४६ वरून ४५.१ अंशांपर्यंत घसरले.   

उन्हामुळे उकाडा वाढला असून, पंखेसुद्धा गरम हवा फेकू लागले आहेत. उन्हाच्या काहिलीने दुपारच्या सुमारास एरवी वर्दळ असणारे अनेक रस्ते सुनसान दिसले. सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाच्या तीव्र झळा जाणवत होत्या. उन्हाची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
============================================
मुलाला वाचविण्यासाठी पित्याची धडपड
-


नागपूर : डॉक्‍टरच्या चुकीमुळे महंमद रियाझ अन्सारीची झालेली अवस्था.

नागपूर - आपल्या समाजात डॉक्‍टरला ईश्‍वराचे रूप मानले जाते. अनेकांना रोजच असे चमत्कारी अनुभव येत असतात. मात्र, महंमद शफी अब्दुल लतिफ अन्सारी यांना याच ईश्‍वराने न भरून निघणाऱ्या जखमा व दु:ख दिले. डॉक्‍टरच्या हातून झालेल्या एका छोट्याशा चुकीने त्यांच्या मुलाला कायमस्वरूपी अपंग बनविले. त्या डॉक्‍टरमुळे मुलाचे दोन्ही पाय निकामी होऊन ऐन तारुण्यात त्याला अंथरुणावर खिळून बसावे लागले.

टिपू सुल्तान चौक, पिवळी मशीदजवळ राहणाऱ्या महंमद शफी अन्सारी यांच्या परिवारात पत्नी, तीन मुले, दोन मुली, दोन सुना व तीन नातू आहेत. महंमद रियाझ अन्सारी त्यांचा सर्वांत लहान मुलगा. इतरांप्रमाणे तोसुद्धा तंदुरुस्त होता. मात्र, एकेदिवशी अचानक ताप आला आणि रियाझच्या आयुष्यात कायमचा अंधार करून गेला. सहा महिन्यांचा असताना रियाझला ताप आला. त्यामुळे उपचारासाठी पित्याने डॉक्‍टरकडे धाव घेतली. मात्र, डॉक्‍टरने दिलेल्या चुकीच्या इंजेक्‍शनचे ‘रिॲक्‍शन’ झाल्याने रियाझचे दोन्ही पाय लुळे पडले. तेव्हापासून २७ वर्षीय रियाझ एकदाही आपल्या पायावर उभा राहू शकला नाही. रियाझला आपल्या पायावर उभे करण्यासाठी पित्याने अनेक प्रयत्न केले. तीन शस्त्रक्रियांवर त्यांची आयुष्यातील अख्खी जमापुंजी (दीड ते दोन लाख रुपये) खर्च झाली. जवळच्या नातेवाइकांनीही बरीच मदत केली. तरीही काहीच फायदा झाला  नाही. उलट रियाझला एक किडनी गमवावी लागली आणि ‘इन्फेक्‍शन’ झाल्याने दुसरीही ‘डॅमेज’ झाली. त्यामुळे रियाझचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्‍टरांनी आणखी एक शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी किमान एक ते सव्वा लाख रुपये लागणार असून, एवढा खर्च करण्याची ऐपत आता अन्सारी परिवारामध्ये सध्या तरी नाही.

६४ वर्षीय अन्सारी हे मोलमजुरीचे काम करून परिवाराचे पालनपोषण करतात. दोन्ही मोठ्या मुलांचे लग्न झाल्याने ते वेगळे राहतात. शिवाय पत्नीदेखील एका डोळ्याने अंध आहे. या परिस्थितीत आपल्या मुलाला वाचविण्यासाठी अन्सारी कुटुंबीयांची सारखी धडपड सुरू आहे. 
============================================
येमेनः पोलिस भरतीदरम्यान हल्ल्यात 31 ठार
-

सना- दक्षिण येमेनमध्ये इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेने घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात 31 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकल्ला भागात पोलिसांची भरती सुरू होती. पोलिस भरतीसाठी युवकांनी मोठी रांग केली होती. यावेळी ‘आयएस‘ने आत्महघाती हल्ला घडवून आणला. यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, येमेनमध्ये ‘आयएस‘ने 2011 पासून केलेल्या हल्ल्यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
============================================

No comments: