Monday, 25 July 2016

नमस्कार लाईव्ह २५-०७-२०१६ चे बातमीपत्र


=====================================

सलमानसुटला : काळवीट शिकारप्रकरणातही सलमान खान निर्दोष

#सलमानसुटला : काळवीट शिकारप्रकरणातही सलमान खान निर्दोष !
जयपूर : हिट अँड रन प्रकरणानंतर अभिनेता सलमान खानला आता काळवीट शिकार प्रकरणातूनही दिलासा मिळाला आहे. कारण जोधपूर हायकोर्टाने सलमान खानला निर्दोष ठरवलं आहे.

सत्र न्यायालयानं याआधी सलमानला भवाद काळवीट शिकारप्रकरणी 1 वर्षाची, तर  घोडाफार्म काळवीट शिकारप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र या दोन्ही प्रकरणांमध्ये सलमानची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर कांकणी शिकार प्रकरणी आणि अवैध आर्म्स अॅक्टप्रकरणी अद्याप शिक्षेची सुनावणी सुरु आहे.

=====================================

विंडीजचा डावानं पराभव, भारताचा दणदणीत विजय

विंडीजचा डावानं पराभव, भारताचा दणदणीत विजय
अँटिगा: विराट कोहलीच्या टीम इंडियानं अँटिगा कसोटी जिंकून वेस्ट इंडिज दौऱ्यात विजयी सलामी दिली. टीम इंडियानं वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 92 धावांनी धुव्वा उडवून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन. अश्विनच्या फिरकी माऱ्यासमोर विंडीज फलंदाजांनी दुसऱ्या डावात अक्षरश: नांगी टाकली. अश्विननं 83 धावांच्या मोबदल्यात सात विकेट्स काढण्याचा पराक्रम गाजवला.

चौथ्या दिवसाच्या उपाहारापर्यंत वेस्ट इंडिजनं दोन बाद 76 धावांची मजल मारली होती. पण उपाहारानंतर अश्विननं प्रभावी मारा करुन वेस्ट इंडिजचं कंबरडं मोडलं. त्यामुळं विंडीजची आठ बाद 132 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मग कार्लोस ब्रॅथवेट आणि देवेंद्र बिशूनं नवव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी रचून विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अश्विननं बिशूला माघारी धाडून ही जोडगोळी फोडली आणि विंडीजचा दुसरा डाव 231 धावांवर आटोपला.

कार्लोस ब्रॅथवेटनं नाबाद 51, तर बिशूनं 45 धावांची खेळी केली. दरम्यान टीम इंडियाचा आशिया खंडाबाहेरचा हा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला.
=====================================

ओला-उबेरला टक्कर देण्यासाठी मेरुच्या भाडेदरात घसघशीत कपात

ओला-उबेरला टक्कर देण्यासाठी मेरुच्या भाडेदरात घसघशीत कपात
मुंबई: ओला आणि उबेर या खासगी टॅक्सी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आता ‘मेरु’नं आपल्या भाडे दरात कपात केली आहे.

मेरुनं आपल्या भाडेदरात पहिल्या टप्प्यासाठी जवळजवळ 6 रुपयांची कपात केली आहे. तर प्रत्येक किलोमीटर प्रवासाच्या भाड्यात 4 रुपयानं कपात केल आहे. राज्य सरकरानं टॅक्सीसाठी किमान भाडं 22 रुपये निश्चित केलं आहे. मात्र, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मेरुनं आता आपल्या दरामध्ये भरघोस कपात केली आहे.

पहिल्यांदाच टॅक्सी कंपन्यांनी अशा प्रकारची दरामध्ये कपात केली आहे. मेरु तब्बल 20 टक्क्यांची सूट दिली आहे. इतर टॅक्सी कंपन्यांच्या तुलनेत मेरुच्या सेवा फार उत्कृष्ट नसल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे.

मेरुचे सीईओ सिद्धार्थ पहवा यांनी सांगितलं की, ‘मुंबईमधील ग्राहकांना स्वस्त दरात टॅक्सी सेवा मिळावी हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही 20 टक्क्यांची कपात केली आहे. मात्र, या कपातीचा आमच्या टॅक्सी सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही.
 
मेरुप्रमाणेच टॅबनंही ग्राहकांना टॅक्सी भाड्यात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण टॅक्सी प्रवास भाड्यावर टॅब कॅब 18% सूट देणार आहे. तर टॅब कॅब गोल्डच्या एकूण प्रवास भाड्यावर 28% सूट देणार आहे.

=====================================

रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेनची स्कूल बसला धडक, 7 चिमुरड्यांचा मृत्यू

रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेनची स्कूल बसला धडक, 7 चिमुरड्यांचा मृत्यू
लखनौ : उत्तर प्रदेशात रेल्वेने स्कूलबसला दिलेल्या धडकेत सात शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भदोही जिल्ह्यातल्या मेघीपूर गावात असलेल्या रेल्वे फाटकावर क्रॉसिंग दरम्यान हा अपघात घडला.
 
सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. माधव सिंग रेल्वे स्टेशनजवळ वाराणसी-अलाहाबाद पॅसेंजरने दिलेल्या धडकेत स्कूलबसचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर 19 जण जखमी असल्याची माहिती आहे.

जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून सर्व अपघातग्रस्त विद्यार्थी टेंडर हार्ट स्कूलमध्ये शिकत होते.

=====================================

मुंबई, ठाणे, पुण्यातील इंटरनेटवर हल्ला

मुंबई, ठाणे, पुण्यातील इंटरनेटवर हल्ला
मुंबई : गेल्या काही दिवसात तुमच्या घरातल्या इंटरनेटचा स्पीड कमी होत असल्याचं तुम्हाला लक्षात आलं असेल, तर यामागच्या कारणाचा शोध पोलिसांनी लावला आहे. मुंबई, ठाणे तसंच पुण्यातील इंटरनेट सेवेवर डि‌स्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसेस (डीडीओएस) चा हल्ला झाला आहे.

तिन्ही शहरातील इंटरनेट सेवेवर परिणाम झाला असून याप्रकरणी सायबर सेलकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. मुंबई सायबर सेलचे महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.

युझरचा आयपी अॅड्रेस हॅक करण्यासाठी हल्ला
मुंबई, पुणे आणि ठाण्यात इंटरनेट पुरवणाऱ्या आयएसपी कंपनीच्या सर्व्हरवर हल्ला झाल्याचं कळतं. यामुळे इंटरनेट वापरणारे लॉग इन अचानक वाढतात. याचा फटका बसल्याने इंटरनेट सेवा बंद होते. युझरसचा आयपी अॅड्रेस हॅक करण्यासाठी केला जातो. स्पॅमच्या माध्यमातून हे हल्ले होत असल्याने, याच्याशी निगडीत काहीही तक्रार असल्यास युझर्सनी सायबर सेलकडे संपर्क साधावा, असं आवाहन ब्रिजेश सिंह यांनी केलं आहे.

=====================================

फुटबॉलच्या मैदानात रामदेव बाबांची किक!

VIDEO : फुटबॉलच्या मैदानात रामदेव बाबांची किक!
नवी दिल्ली : कधी योग करताना तर कधी कुस्तीच्या आखाड्यात दिसणारे योग गुरु रामदेवबाबा चक्क फुटबॉलच्या मैदानावर अवतरले आहेत. विशेष म्हणजे रामदेवबाबांनी फक्त  आणि थेट फुटबॉल खेळताना दिसले.
 
स्वच्छ भारत मिशन आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाच्या समर्थनार्थ हा फुटबॉलचा सामना खेळवला गेला. बॉलिवूडचे कलाकार आणि खासदारांमध्ये हा सामना रंगला ज्याला रामदेवबाबांनी रंगत आणली.
 
मैदानावर रामदेवबाबा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरले होते. विशेष म्हणजे या अभियानाचे ब्रँड अँबेसिडर खुद्द रामदेव बाबा आहेत. खासदारांच्या टीममधून बाबुल सुप्रियो, मनोज तिवारी तर बॉलिवूड कलाकारांच्या टीममध्ये अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, अर्जुन कपूर यांनी सहभाग घेतला.


=====================================

=====================================

=====================================

=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================

No comments: