Monday, 11 July 2016

नमस्कार लाईव्ह ११-०७-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- भारत-रशिया मिळून बनवणार रडारला न सापडणारे विमान 
२- लंडन; महिलेने टीव्ही रिमोट हरवला म्हणून केला पोलिसांना फोन 
३- पाक; ट्रंकेत गुदमरून प्रियकराचा मृत्यू! 
४- अमेरिकेवर सूड घेतला जाईल : हमजा बिन लादेन 
५- दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटची चर्चा न करणे म्हणजे नो-बॉल करणेच : मोदी 
६- द. चिनी समुद्रावर चर्चा नको: चीनचा इशारा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- राजधानी एक्सप्रेसच्या 2 टायर एसीच्या तिकीट दरात हवाई सफर शक्य 
८- केरळमधील गरोदर महिला पतीसह ISIS मध्ये भरती झाल्याचा संशय 
९- काश्मीरमध्ये मशीदींमधल्या लाऊडस्पीकरवरुन पाकिस्तान समर्थनाचे आणि भारत विरोधी नारे 
१०- दिल्ली : 'तिने' डॉक्टरांकडे मागितले मृत नव-याचे स्पर्म्स 
११- पानसरे, दाभोलकरसंबंधित याचिकांवर आज सुनावणी 
१२- पंतप्रधान मोदी केनियाला रवाना 
१३- सेन्सेक्सने गाठली वर्षातील उच्चांकी पातळी 
१४- मणिपुरी युवतीच्या राष्ट्रीयत्वावरच घेतली शंका 
१५- मोदींच्या मंत्रिमंडळातील 24 मंत्री गुन्हेगार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१६- मुख्यमंत्र्यांसोबतच्या वादानंतर पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट 
१७- नंदुरबारमध्ये ढगफुटी, रेल्वेट्रॅक खचला, प्रवासी रात्रभर ट्रेनमध्ये 
१८- महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस, संततधार सुरूच 
१९- डॉ. झाकीर नाईकला आज अटक? 
२०- आखाती देशांत दुतोंड्या-मांडूळ सापांची तस्करी
२१- डॉ. झाकीर नाईक यांनी भारतात येण्याचे टाळले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२२- सांगली; नृसिंहवाडीचं दत्त मंदिर पाण्यात; गगनबावड्यात 190 मिमी 
२३- अकोला; वाहून गेलेली कार झाडाला लटकली 
२४- गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 
२५- अमरावती; निर्दयी आई-वडिलांनी स्त्रीलिंगी अर्भक पुरले जमिनीत 
२६- माजलगाव; वृक्षारोपण, संगोपनासाठी झटणारा अवलिया 
२७- कोयना धरणात 24 तासांत 6 टीएमसीने वाढ 
२८- खडकवासला प्रकल्पात 10 टीएमसी पाणीसाठा
२९- महाराष्ट्र चिंब; संततधार पाऊस सुरूच
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३०- 'फँड्री'तील जब्याच्या शालूचा नवा सिनेमा 
३१- शाहरुख, सलमाननंतर अक्षय कुमार 'चला हवा येऊ द्या'मध्ये 
३२- 'दिल दोस्ती दुनियादारी'च्या आशुची बॉलिवूडमध्ये एन्ट्री 
३३- पॅरिस; गंभीर टॅकल ते बदली खेळाडूचा गोल, कसा जिंकला पोर्तुगाल 
३४- पोर्तुगालला पहिल्यांदाच युरो कपचं जेतेपद, फ्रान्सवर मात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

===================================

'फँड्री'तील जब्याच्या शालूचा नवा सिनेमा

'फँड्री'तील जब्याच्या शालूचा नवा सिनेमा
मुंबई : ‘फँड्री’ सिनेमातील शालू अर्थात राजेश्वरी खरात लवकरच नव्या सिनेमात दिसणार आहे. ‘अॅटमगिरी’ या चित्रपटाद्वारे ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


राजेश्वरीच्या आगामी सिनेमातील नवा लूक नुकताच रिलीज झाला आहे. प्रदीप तोंगेसह मंगेश शेंडगेने या सिनेमाचं दिग्दर्शन  केलं आहे. या सिनेमात राजेश्वरीसोबत हंसराज जगताप हा मुख्य भूमिकेत आहे. तसंच राहुल पुणे हा नवा चेहरा सिनेमात दिसणार आहे.


दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘फँड्री’मध्ये शालूची भूमिका साकारणाऱ्या राजेश्वरीला सिनेमात फारसे डायलॉग नव्हते. पण सिनेमाच्या कथानकातील तिची भूमिका महत्त्वाचं होती. साधी सालास मुलगी जिच्यावर काळ्या चिमणीची राख उडवण्यासाठी जीवाचा आटापीटा करणारा जब्या सर्वांच्याच लक्षात राहिला होता.


‘अॅटमगिरी’ ही टिपीकल लवस्टोरी नसून ती एक हटके प्रेमकथा असल्याचं राजेश्वरीने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
===================================

नंदुरबारमध्ये ढगफुटी, रेल्वेट्रॅक खचला, प्रवासी रात्रभर ट्रेनमध्ये

नंदुरबारमध्ये ढगफुटी, रेल्वेट्रॅक खचला, प्रवासी रात्रभर ट्रेनमध्ये
मुंबई/नंदुरबार:  नंदुरबार जिल्ह्यात पावसाने अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. नवापूर तालुक्यातील पाचोराबारी या गावात तर ढगफुटी झाली आहे. काल रात्री अकरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.

त्यामुळे जळगाव-सुरत रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रवासी रात्रभर ट्रेनमध्ये बसून होते. जळगावहून सुरतकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन नंदुरबारपर्यंत आणि सुरतकडून येणाऱ्या नवापूरपर्यंत चालविल्या जात आहेत.

रेल्वे रुळ खचल्यामुळे ही रेल्वे वाहतूक कधी सुरु होणार हे अद्याप अस्पष्ट आहे.
===================================

नृसिंहवाडीचं दत्त मंदिर पाण्यात

नृसिंहवाडीचं दत्त मंदिर पाण्यात
सांगली:  राज्यभरात सर्वदूर पावसाने धुमाकूळ घातला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत अक्षरश: मुसळधार पाऊस कोसळत आहे.  सांगली जिल्ह्यातही संततधार सुरु आहे.
Nrusinhawadi, Sangli 1
श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात 15 फुटाने वाढ झाली आहे. कृष्णा नदीचे वाढलेले पाणी येथील दत्त मंदिरात शिरले आहे.

नदीच्या पाण्याची वाढ पाहता नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरत आज सोमवार दि.11 जुलै 2016 रोजी सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे.
===================================

शाहरुख, सलमाननंतर अक्षय कुमार 'चला हवा येऊ द्या'मध्ये

शाहरुख, सलमाननंतर अक्षय कुमार 'चला हवा येऊ द्या'मध्ये
मुंबई : ‘झी मराठी’वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ने फक्त महाराष्ट्र किंवा मराठी कलाकारच नाही तर बॉलिवूड स्टार्सनाही भुरळ घातली आहे. आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारही ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर धुमाकूळ घालताना दिसणार आहे.


‘चला हवा येऊ द्या’मध्ये आतापर्यंत शाहरुख खान, सोनम कपूर, जॉन अब्राहम, विद्या बालन यासारख्या बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. नुकतंच सलमान खाननेही सुलतानच्या प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये उपस्थिती लावली होती.
===================================

'दिल दोस्ती दुनियादारी'च्या आशुची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

'दिल दोस्ती दुनियादारी'च्या आशुची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
मुंबई : ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला आशु अर्थात पुष्कराज चिरपुटकर बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री घ्यायला सज्ज आहे. ‘बुधिया सिंह – बॉर्न टू रन’ या सिनेमातून तो बॉलिवूडमध्ये पाऊल टाकत आहे.


वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी, 50 डिग्री तापमानात पुरी ते भुवनेश्वर हा 65 किलोमीटरचा प्रवास केवळ 7 तास 2 मिनिटांत धावत पूर्ण करणाऱ्या बुधिया सिंहच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे. सौमेंद्र पढी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 5 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.


बुधिया सिंहच्या भूमिकेत पुण्याचा बालकलाकार मयुर पाटोळे असून मनोज वाजपेयी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल. तर पुष्कराज पत्रकाराच्या व्यक्तिरेखा रंगवताना दिसणार आहे. याशिवाय चित्रपटाततर श्रुती मराठेही या सिनेमात लक्षवेधी भूमिकेत दिसेल.
===================================

मुख्यमंत्र्यांसोबतच्या वादानंतर पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट

मुख्यमंत्र्यांसोबतच्या वादानंतर पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट
मुंबई : राज्य सरकारच्या खातेवाटपात जलसंधारण खातं काढून घेतल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र वर्ल्ड वॉटर लीटर समिटच्या परिषद आणि खातेबदला संदर्भात पंकजा मुंडेंनी फेसबुकवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
पंकजा मुडेंनी फेसुबकवर लिहिलं आहे की,
मी नम्र विनंती करते, कोणीही माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी मला न पटणा-या गोष्टी करू नये. कोणत्याही व्यक्तीचा अवमान होईल असे कृत्य करू नये. कायदा व सुव्यवस्था राखावी. मी इंडोनेशिया हून आज सिंगापूरला पोहोचले.देशाबाहेर असल्याने मी tweet केले . इथे वर्ल्ड वाॅटर लिडर समिट साठी मला निमंत्रित केले होते. नुकत्याच झालेल्या खाते बदलानंतर आपण जलसंधारण मंत्री नसताना जाणे मला जरा अयोग्य वाटले. माझ्या जिल्ह्यातील लोकं तसेच पञकार माझ्या बातम्या, फोटो अपेक्षित ठेवतील म्हणून न जाण्याचा निर्णय मी twitter वरून जाहीर केला. मला सिंगापूरकडुन निमंत्रण होते म्हणून मी आले होते.
सर्वच नविन मंत्री अभिनंदनास पात्र आहेत. माझे निकटवर्तीय राम शिंदे व जयकुमार रावल यांना माझ्याकडील खाती दिली गेली, याचा मला आनंद आहे. त्या दोघांचे मी ट्विटरवरून अभिनंदन देखील केले. जलयुक्त शिवार आता Peak वर आहे व ते Mission म्हणून व Passion म्हणूनही ते स्विकारतील असे विश्वास दाखवणारे स्टेटमेंट केले ..त्याना संधी मिळाली तर सहकारी म्हणून अभिमानच वाटला पाहिजे. नाराजीचा विषयच कुठे??त्या दोघांना शुभेच्छा!!! त्यांचं मनोबल वाढेल असचं सहकार्य त्यांना झालं पाहिजे आणि मी ते करणारच…..
===================================

देव तारी त्याला....वाहून गेलेली कार झाडाला लटकली

देव तारी त्याला....वाहून गेलेली कार झाडाला लटकली
अकोला/अमरावती : देव तारी त्याला कोण मारी? या म्हणीचा प्रत्यय अमरावतीत आला. मुसळधार पावसानं अख्ख्या मुंदडा कुटुंबाचा घास घेतला असता, मात्र एका झाडानं देवदूताचा काम केलं.

पावसात वाहून गेलेली चारचाकी झाडात अडकून पडली आणि मुंदडा कुटुंब थोडक्यात बचावलं.

काय आहे प्रकरण?
राज्यभरात पावसाची संततधार सुरु आहे. अकोला, अमरावतीलाही पावसाने झोडपलं आहे. त्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अकोल्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश मुंदडा, त्यांची पत्नी पुष्पा आणि चालक संजय गुलहाने हे आयट्वेण्टी गाडीतून अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जात होते.

मात्र पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने, त्यांची कार थेट पावसाच्या पाण्याने वाहून गेली.  रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
===================================

महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस, चांदा ते बांदा संततधार

महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस, चांदा ते बांदा संततधार
मुंबई : राज्यभरात सर्वदूर पावसाने धुमाकूळ घातला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत अक्षरश: मुसळधार पाऊस कोसळत आहे.
नाशिकमध्ये जोरदार
सध्या नाशकात पावसाने विश्रांती घेतली असली तरी गेले सहा दिवस पडत असलेल्या पावसामुळे नाशिकमधलं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये एकादिवशी सर्वाधिक पाऊस पडल्याचा विक्रम काल नोंदवला.
नाशिकमध्ये नऊ तासात तब्बल 991 मिमी पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसानं गोदावरी नदीला यंदा पहिल्यांदाच पूर आला. त्यामुळे शहरात पाणी शिरलं.
===================================

डॉ. झाकीर नाईकला आज अटक?

डॉ. झाकीर नाईकला आज अटक?
मुंबई : मुस्लीम धर्मगुरु डॉ. झाकीर नाईक आज भारतात परतण्याची शक्यता आहे. प्रक्षोभक भाषणांविरोधात मुंबई पोलिस डॉ. नाईकविरोधात अटकेची कारवाई करण्याची शक्यता आहे.


बांग्लादेशातील एका हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी तरुण डॉ. झाकीर नाईकच्या भाषणाने प्रेरित झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर नाईकवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसंच बांगलादेशमध्ये झाकीर नाईकच्या पीसी टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे.
===================================

गंभीर टॅकल ते बदली खेळाडूचा गोल, कसा जिंकला पोर्तुगाल

गंभीर टॅकल ते बदली खेळाडूचा गोल, कसा जिंकला पोर्तुगाल?
मुंबई/पॅरिस: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालनं यजमान फ्रान्सवर 1-0 अशी मात करुन युरो कपच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेतेपद मिळवलं. पोर्तुगालनं फ्रान्सवर तब्बल 41 वर्षांनंतर मिळवलेला हा पहिला विजय ठरला.

ख्रिस्तियानो रोनाल्डो गेल्या बारा वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होता.

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल हा युरो कप जिंकणारा आजवरचा दहावाच संघ ठरला. स्टेड दी फ्रान्सवरच्या अंतिम सामन्यात पोर्तुगालनं खरोखरंच कमाल केली. रोनाल्डोच्या या फौजेनं यजमान फ्रान्सवर 1-0 अशी मात केली.

खरं तर या सामन्यात साऱ्यांच्या नजरा ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कामगिरीकडे लागल्या होत्या. पण फ्रान्सचे खेळाडूही रोनाल्डोला रोखण्याची रणनिती आखूनच मैदानात उतरले होते आणि त्यात ते यशस्वीही झाले.
===================================

पोर्तुगालला पहिल्यांदाच युरो कपचं जेतेपद, फ्रान्सवर मात

पोर्तुगालला पहिल्यांदाच युरो कपचं जेतेपद, फ्रान्सवर मात
पॅरिस : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालने यजमान फ्रान्सवर 1-0 अशी मात करुन युरो कपच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेतेपद मिळवलं.


स्टेड दी फ्रान्समध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांना निर्धारित वेळेत गोल करण्यात अपयश आलं. पण अतिरिक्त वेळेत एडरने 109व्या मिनिटाला गोल झळकावून पोर्तुगालचा 1-0 असा विजय निश्चित केला.


खरंतर या सामन्यात फ्रान्सची रोनाल्डोला रोखण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. फ्रान्सच्या दिमित्री पायेटने सामन्याच्या नवव्या मिनिटाला रोनाल्डोला टॅकल केलं. पायेटने केलेलं टॅकल इतकं गंभीर होतं की रोनाल्डोला 24व्या मिनिटालाच सामना अर्धवट सोडावा लागला. यावेळी रोनाल्डोला आपले अश्रूही अनावर झाले होते.


पण पोर्तुगालच्या संघाने आपला कर्णधार म्हणजेच रोनाल्डोसाठी अखेरपर्यंत खिंड लढवली आणि युरो कप जिंकण्याचं रोनाल्डोचं स्वप्न पूर्ण केलं.
===================================

आता राजधानी एक्सप्रेसच्या 2 टायर एसीच्या तिकीट दरात हवाई सफर शक्य

आता राजधानी एक्सप्रेसच्या 2 टायर एसीच्या तिकीट दरात हवाई सफर शक्य
मुंबई: एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीने आपल्या तिकीट दरात मोठ्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने देशांतर्गत विमान प्रवासासाठी आपल्या तिकीट दरामध्ये कपात करून, राजधानी एक्सप्रेसच्या 2 टायर एसीच्या तिकीट दराप्रमाणे करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

तिकीट दर कपातीचा निर्णय हा शेवटच्या रिकाम्या सीट भरण्यासोबतच, दिवसागणिक विमान प्रवासाच्या वाढत्या तिकीट दरांवरून ग्राहकांना दिलासा देण्याचा, असल्याचे एअर इंडियाचे संचालक आणि प्रबंध निदेशक अश्वनी लोहानी यांनी सांगितले.

या निर्णयानुसार, एअर इंडियाच्या दिल्ली-मुंबई, दिल्ली-चेन्नई, दिल्ली-कोलकाता आणि दिल्ली-बंगळुरू आदी मार्गांवरील विमान प्रवासाचे तिकीट दर विमान उड्डाणाच्या चार तास पूर्वी लागू असतील. सध्या दिल्ली ते मुंबईदरम्यान राजधानी एक्सप्रेसच्या 2 टायर एसीचे तिकीट दर 2870 रुपये आहे, तर दिल्ली-चेन्नईदरम्यान राजधानी एक्सप्रेसचे तिकीट दर 3905 रुपये आहेत.
===================================

गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक: नाशिक शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

काल रात्रीपासून शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळपासून गोदावरीच्या पातळीत झपाट्याने वाढ होण्यास सुरूवात झाली. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या अग्निशमन दलाला नदीकिनाऱ्याच्या भागात तैनात करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील इतर भागातील नद्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता, तालुका स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सर्व नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात आले आहेत.

जिल्ह्यात उद्या दुपारपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी किनारी गर्दी करू नये , असे आवाहनदेखील प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, संततधार पावासामुळे नाशिकमधील सकाळी मोडकेश्वर मंदिराजवळील  एका घराची भिंत कोसळली. अग्निशमन दलाने मलवा बाजूला केला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दोन व्यक्ति किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर श्रद्धा लॉन्स अमरधाम रोड जवळील झोपडपट्टीत अडकलेल्या 10 नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
===================================

केरळमधील गरोदर महिला पतीसह ISIS मध्ये भरती झाल्याचा संशय


  • ऑनलाइन लोकमत - 
    थिरुवनंतपुरम , दि. 11 - लग्नानंतर इस्लाममध्ये धर्मातरण केलेली गरोदर महिला आपल्या पतीसह इसीसमध्ये भरती झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. निमिशा नाव असलेल्या या 25 वर्षीय तरुणीची आई बिंदू यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांची भेट घेतली असून चौकशीची मागणी केली आहे. केरळमधील 15 लोक इसीसमध्ये भरती झाला असल्याचा संशय आहे ज्यामध्ये निमिशादेखील आपल्या पतीसह सामील असण्याची शक्यता आहे. 
    'मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तपासात प्रगती होत असल्याचं सांगितलं', असल्याची माहिती बिंदू यांनी दिली आहे. बिंदू यांनी मुलगी निमिषा बेपत्ता झाल्यानंतर याचिका दाखल करत चौकशीची मागणी केली होती. पश्चिम आशियात गेलेले केरळातील 15 तरुण बेपत्ता झाले असून ते इस्लामिक स्टेट (आयएस) या खतरनाक अतिरेकी संघटनेत सहभागी झाले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. याची चौकशी करण्याचे आदेश केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी दिले आहेत.
===================================

काश्मीरमध्ये मशीदींमधल्या लाऊडस्पीकरवरुन पाकिस्तान समर्थनाचे आणि भारत विरोधी नारे


  • ऑनलाइन लोकमत
    श्रीनगर, दि. ११ - हिंसाचार सुरु असलेल्या काश्मीर खो-यातील मशीदींमधल्या लाऊडस्पीकरवरुन पाकिस्तान समर्थनाचे आणि भारता विरोधी नारे दिले जात आहेत. सुरक्षा पथकांना भिडण्याचे आणि भारत विरोधी जिहादमध्ये सहभागी होण्याचे युवकांना खुले आवाहन केले जात आहे. 
    एक प्रकारे मशीदींमधल्या लाऊडस्पीकरवरुन हिंसाचारासाठी जाहीर चिथावणी दिली जात आहे. जिहादच्या मार्गाने काश्मीरला भारतापासून आझादी मिळेल अशा चिथावणी देणा-या ऑडीयो कॅसेटस ऐकवल्या जात आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणी सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. 
    दोन दिवसात विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत २२ जण ठार झाले आहेत. रविवारी जमावाने पोलिसांची गाडी झेलम नदीत ढकलून दिली. यात एका पोलिसाचा मृत्यू झाला. रविवारी एकूण पाचजण ठार झाले.
===================================

भारत-रशिया मिळून बनवणार रडारला न सापडणारे विमान


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. ११ - भारत लवकरच रशियाबरोबर अत्याधुनिक लढाऊ विमान निर्मितीच्या रखडलेल्या प्रकल्पावर चर्चा सुरु करणार आहे. यामध्ये पाचव्या जनरेशनचा लढाऊ विमान प्रकल्प तसेच सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमान 'सुपर सुखोई' मध्ये बदलण्याचा प्रस्ताव आहे. सुखोई-टी ५० हे रशियाचे पाचव्या जनरेशनचे लढाऊ विमान असून, सध्या या विमानाचे प्रारुप तयार आहे. 
    भारत आणि रशियामध्ये संयुक्तपणे मिळून या विमानाची निर्मिती करण्याचा करार झाला आहे. पाचव्या जनरेशनच्या लढाऊ विमानांचे वैशिष्टय म्हणजे हे विमान रडारला सापडत नाही. सध्या अमेरिकेकडे पाचव्या जनरेशचे लढाऊ विमान आहे. अलीकडेच जपाननेही अशा विमानाची चाचणी केली होती. 
    भारत-रशियामध्ये २००७ मध्ये पाचव्या जनरेशनच्या लढाऊ विमानांच्या निर्मितीचा करार झाला होता. ही विमाने प्रत्यक्षात आल्यानंतर भारतीय वायू दलाची ताकत कैक पटीने वाढेल. भारत आणि फ्रान्समध्ये लवकरच राफेल फायटर विमान खरेदीचा करार होऊ शकतो. या करारानुसार भारत ७.८ अब्ज युरो मोजून फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने विकत घेणार आहे. 
===================================

महिलेने टीव्ही रिमोट हरवला म्हणून केला पोलिसांना फोन


  • ऑनलाइन लोकमत -  
    लंडन, दि. 11 - टीव्हीचा रिमोट हरवला म्हणून महिलेने चक्क पोलिसांना फोन केल्याची घटना टौनटोन शहरात घडली आहे. टीव्हीचा रिमोट हरवला असल्याने टीव्हीच्या आवाजाने शेजारी वैतागून पोलिसांना फोन करतील या भीतीने महिलेने पोलिसांना 999 क्रमांकावर फोन करुन रिमोट हरवला असल्याची तक्रार केली. अशाप्रकारे अनावश्यक फोन करु नयेत यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी पोलिसांनी महिलेसोबत झालेलं संभाषण सार्वजनिक केलं आहे.
    महिलेने पोलिसांना फोन केला तेव्हा सुरुवातीलाच कोणतीही इमर्जन्सी नसल्याचं सांगितलं. 'माझ्या टीव्हीचा रिमोट हरवला आहे. मी टीव्ही सुरु ठेवणार आहे. मला तुम्हाला कल्पना देऊन ठेवायची आहे की, टीव्हीचा आवाज जास्त असल्याने माझे शेजारी तुम्हाला कदाचित फोन करुन तक्रार करतील', असं महिलेने फोन करुन पोलिसांना सांगितलं होतं. पोलिसांनी आम्ही यामध्ये काही मदत करु शकत नसल्याचं उत्तर महिलेला दिलं. 
===================================

दिल्ली : 'तिने' डॉक्टरांकडे मागितले मृत नव-याचे स्पर्म्स


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. ११ - दिल्लीतील प्रसिद्ध एम्स रुग्णालयातील डॉक्टरांकडे अलीकडेच एका मृत तरुणाच्या पत्नीने नेहमीपेक्षा वेगळी विनंती केली. त्यामुळे एम्सचे डॉक्टरही चक्रावून गेले. तरुणाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने डॉक्टरांकडे त्याचे स्पर्म्स काढून देण्याची मागणी केली. 
    मृत नव-याच्या स्पर्म्सपासून गर्भवती रहाता यावे यासाठी तिने अशी मागणी केली होती. काही वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता. त्यांना मूल झाले नव्हते. या महिलेच्या सासू-सास-यांनीही तिच्या या मागणीचे समर्थन केले असे डॉक्टरांनी सांगितले. पोस्टमार्टम स्पर्म रिट्रायव्हल (पीएमएसआर) म्हणजे मृत्यूनंतर स्पर्म काढून जतन करण्यासंबंधी कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक तत्वे नसल्यामुळे डॉक्टरांनी तिची विनंती फेटाळून लावली. 
    जर्नल ऑफ हयुमन रिप्रोडक्टीव्ह सायन्स या एम्सच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जर्नलमध्ये या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. भविष्यात असे प्रसंग टाळण्यासाठी पीएमएसआरसंबंधी स्पष्ट दिशानिर्देश असावेत असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यावर निर्णय घेण्याची आता वेळ आली आहे. ज्याचा व्यक्ती आणि समाजाला फायदा होऊ शकतो असे डॉक्टरांनी म्हटले आहे. 
===================================

निर्दयी आई-वडिलांनी स्त्रीलिंगी अर्भक पुरले जमिनीत


  • ऑनलाइन लोकमत
    अमरावती : वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपुरात निर्दयतेचा कळस गाठणारी घटना शनिवारी उघडकीस आली. अज्ञाताने आठ ते नऊ महिन्यांच्या स्त्रिलिंगी अर्भकाला जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणात वलगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
    एकीकडे मुलींची संख्या वाढविण्यासाठी शासनास्तरावर प्रयत्न केले जात आहे. जनजागृती करून मुलींची हत्या थांबविण्याचे आवाहन शासनाने केले आहे. मात्र, आजही काही निर्दयी आई-वडिल आपल्या जन्मजात मुलींची हत्या करीत असल्याचे या घटनेवरून लक्षात येत आहे.
    नारायणपूर येथील रहिवासी सुधाकर पंजाब जुनघरे यांच्या मालकीच्या खुल्या जागेत शनिवारी काही श्वान स्त्रि अर्भकाचे लचके तोडत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले होते. या प्रकाराची माहिती नागरिकांनी पोलीस पाटील नितीन बबब तेलखेडे यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता ८ ते ९ महिन्याचे स्त्री अर्भक हे अर्धा फूट जमीन खोदून पुरविण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले.
===================================

आखाती देशांत दुतोंड्या सापांची तस्करी


  • गणेश वासनिक
    अमरावती: आखाती देश विशेषत: सौदी अरबमध्ये दुतोंड्या (मांडुळ) सापांची तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका दुतोंड्या सापासाठी किमान २० ते २५ लाख रुपये तस्करांना मिळत असून मुंबईमार्गे आखाती देशांत हे साप पाठविले जातात. दुतोंड्या सापांचा गुप्त धन शोधण्यासाठीदेखील वापर केला जात असल्याचे बोलले जाते.
    दुतोंड्या साप बिन विषारीमध्ये गणला जातो. अतिशय लाजाळू असा सरपटणारा हा प्राणी. वनविभागात प्राण्यांच्या वर्गवारीत दुतोंड्या सापाची नोंद वर्ग १ मध्ये करण्यात आली आहे.
    परंतु या सापाच्या पाठीच्या कण्याचे हाड उत्तेजनवर्धक औषधी निर्मितीसाठी वापरल जात असल्याची माहिती आहे. दुतोंड्या सापाच्या हाडापासून निर्मित औषधांना आखाती देशात प्रचंड मागणी असल्याचे एक वनाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, दुतोंड्या सापाच्या तस्करीत वाढ होते. ज्याप्रमाणे वाघांच्या तस्करीचे जाळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विणलेले आहे, त्याच धर्तीवर दुतोंड्या सापाची मागणी आहे. राज्यात दुतोंड्या साप पठारी भागात आढळतो.
    विशेषत: मेळघाटच्या धारणी जंगलात या सापाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने तस्कर स्थानिकांना हाताशी धरून दुतोंड्या सापाची तस्करी करीत असल्याची माहिती आहे. अमरावतीतील वडाळी वनपरिक्षेत्राही दुतोंड्या सापाचे अधिवास आहे. या सापाच्या पाठीच्या कण्याचे हाडापासून उत्तेजनवर्धक औषधी निर्मित केली जात असून या औषधीला आखाती (गल्फ) देशांत प्रचंड मांगणी आहे. दुतोंड्या सापांची संख्या कमी असून पठारी भागातच त्यांचा अधिवास आहे. त्यामुळे दुतोंड्या सापांचे तस्कर स्थानिक नागरिक अथवा सर्पमित्रांशी व्यावहारिक संपर्क ठेवून आहेत. हा साप विषारी नसला तरी त्याचे हाड अतिशय लाभदायी असल्याचे तज्ज्ञांचेदेखील म्हणणे आहे. काही सर्पमित्रांकडे दुतोंड्या साप असल्याची विश्वसनीय माहिती आहे. ५ ते ११ किलो वजनाच्या दुतोंड्या सापाची आखाती देशात सर्वाधिक मागणी असल्याचे बोलले जात आहे. गत आठवड्यात दुतोंड्या साप वसा गु्रपला आढळला असून तो वडाळी वनपरिक्षेत्रात सोडण्यात आल्याची नोंद आहे. या सापाची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाची करडी नजर आहे.
===================================

पानसरे, दाभोलकरसंबंधित याचिकांवर आज सुनावणी


  • कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित एकूण तीन खटल्यांची सुनावणी आज, सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात होत आहे. त्यामध्ये समीर गायकवाड याला जामीन मिळावा म्हणून त्याच्यावतीने केलेली याचिका, मूळ तपासाबद्दल उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली सुरू असलेली याचिका, समीर गायकवाड याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यास ११ जुलैपर्यंत उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीसंबंधित प्रकरण आदींचा यामध्ये समावेश आहे. पानसरे, डॉ. दाभोलकर व एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांसाठी वापरलेल्या शस्त्रांमध्ये साम्य आहे. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांनी तसा अहवाल दिला आहे. त्यास दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या ‘सीबीआय’नेही दुजोरा दिला आहे. स्कॉटलंड यार्डचा रिपोर्ट लवकर मिळावा, असा पत्रव्यवहार तपास अधिकाऱ्यांनी ‘सीबीआय’कडे केला होता. परंतु, रिपोर्ट प्राप्त न झाल्याने समीरविरोधातील दोषारोपपत्र लांबणीवर पडले.
===================================

पंतप्रधान मोदी केनियाला रवाना


  • दार-ए-सलाम : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी केनियाला रवाना झाले. चार देशांच्या आपल्या आफ्रिका दौऱ्यात केनिया हा शेवटचा देश आहे. टांझानियाचा दौरा छोटा असला तरी फलदायी ठरला, असे टिष्ट्वट परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी केले.
    मोदी शनिवारी रात्री टांझानियात आले. त्यांनी अध्यक्ष जॉन पोम्बे जोसेफ मॅगुफिल यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. टांझनियाशी भारताने पाच करार केले असून, टांझानियाच्या विकासाच्या गरजा भागविण्यासाठी भारत पूर्ण सहकार्य करील, असे मोदी म्हणाले.
    मोदी यांनी येथे यायच्या आधी मोझाम्बिक आणि दक्षिण आफ्रिकेला भेट दिली. मोदी यांनी ‘सोलार ममाज्’चीही भेट घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या ग्रामीण भागातील या महिला भारत सरकारने राबविलेल्या कार्यक्रमात प्रशिक्षित झालेल्या आहेत. या प्रशिक्षणात त्यांना सौरदिवे कसे तयार करतात, बसवतात, त्यांचा वापर, दुरुस्ती आणि घरात वापरायच्या सौरऊर्जेवरील साधनांची माहिती त्यांच्या खेड्यांत देण्यात आली.
===================================

ट्रंकेत गुदमरून प्रियकराचा मृत्यू!


  • मुलतान (पाकिस्तान) : 
    एखाद्या चित्रपटास साजेसे हे करुण नाट्य मध्य पाकिस्तानमधील मुज्जफरगढ गावात शनिवारी रात्री घडले.
    तेथे राहणाऱ्या राणी बीवी या दोन मुलांची आई असलेल्या विवाहितेचे तिचाच लांबचा नातेवाईक असलेल्या मुश्ताक अहमद बलोच या २२ वर्षांच्या विवाहित पुरुशाशी विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. शनिवारी रात्री राणी बीवीच्या घरातील इतर मंडळी झोपलेली असताना मुश्ताक तिला भेटण्यासाठी चोरून तिच्या घरात शिरला. मुश्ताकच्या घरात शिरण्याच्या आवाजाने व त्याच्या आणि राणी बीवीच्या कुजबुजीने घरात झोपलेले राणी बीबीचे सासरे व दोन दीर जागे झाले. दोन्ही प्रेमिकांवर मोठा बांका प्रसंग गुदरला. घाबरून गेलेल्या राणी बीवीने बिंग फुटू नये म्हणून मुश्ताकला आपल्या खोलीतील पत्र्याच्या एका मोठ्या ट्रंकेत दडविले व ट्रंकेची कडी लावून घेतली.
    घरात कोण शिरले आहे हे पाहण्यासाठी राणी बीवीचे सासरे व दीर तिच्या खोलीत आले. तोपर्यंत ट्रंकेत गुदमरून मुश्ताकचे प्राण कंठाशी आले होते. त्याने आतून ट्रंक उघडण्याची याचना सुरू केली.
    काय प्रकार झाला आहे हे लक्षात आल्यावर सासरे व दीराने
    राणी बीबीला ट्रंक उघडू दिली नाही व स्वत:ही ती उघडली नाही. गुदमरलेल्या मुश्ताकचा १५ मिनिटांनी ट्रंकेत मृत्यू झाला. 
  • प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी रात्री तिच्या घरी चोरून गेला खरा. पण त्याच्या आवाजाने घरातील इतर लोक जागे झाले. त्यामुळे घाबरून गेलेल्या प्रेयसीने आपले बिंग फुटू नये यासाठी प्रियकरास घरातील एका मोठ्या ट्रंकेत दडविले. पण दुर्दैवाने ट्रंकेतच गुदमरून प्रियकराचा मृत्यू झाला.
===================================

अमेरिकेवर सूड घेतला जाईल : हमजा बिन लादेन


  • दुबई : कुख्यात जागतिक दहशतवादी ओसामा बिन लादेन याच्या हत्येचा अमेरिकेवर सूड उगवला जाईल, अशी धमकी लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेन (२०) याने दिली आहे. या धमकीचा आॅडिओ मेसेज आॅनलाइन पोस्ट करण्यात आला आहे.
    हमजा बिन लादेन याने अमेरिका आणि अमेरिकेच्या आघाडीतील २१ देशांविरुद्ध जागतिक दहशतवादी गट संघर्ष सतत सुरूच ठेवील, असे २१ मिनिटांच्या भाषणात सांगितले. या आॅडिओचे नाव ‘आम्ही सगळे ओसामा आहोत’ (वुई आर आॅल ओसामा) असे एसआयटीई गुप्तरचर गटाने सांगितले.
    ‘‘तुम्ही मुस्लीम देशांतील लोकांवर केलेल्या अत्याचारांचा निषेध म्हणून आम्ही तुमच्यावर सतत हल्ले सुरूच ठेवू, तुम्हाला लक्ष्य करू, असेही आॅडिओमध्ये म्हटले.
===================================

दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटची चर्चा न करणे म्हणजे नो-बॉल करणेच : मोदी


  • डरबन : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिकेटचा खेळ हा उभय देशांमध्ये संबंधाचा महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगताना येथे क्रिकेटबाबत न बोलणे म्हणजे नो-बॉल केल्याप्रमाणे असल्याचे म्हटले.
    येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, ‘मित्रांनो, दक्षिण आफ्रिका आणि विशेषत: डरबनमध्ये असताना जर मी क्रिकेटबाबत बोललो नाही तर ते म्हणजे नो-बॉल केल्याप्रमाणे होईल. या खेळातील उत्साह आणि खेळाप्रती असलेले प्रेम समाजात खोलवर रुजलेले आहे. क्रिकेट उभय देशांतील संबंधामध्ये महत्त्वाचा घटक आहे. किंग्समेड मैदान भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या अनेक संस्मरणीय लढतींचे साक्षीदार आहे.’ पंतप्रधान मोदी सध्या चार आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर असून, त्यात द.आफ्रिकेचा समावेश आहे.
===================================
डॉ. झाकीर नाईक यांनी भारतात येण्याचे टाळले

मुंबई - इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक आणि वादग्रस्त धर्मगुरू डॉ. झाकीर नाईक हे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर आल्याने आज (सोमवार) त्यांनी भारतात येण्याचे टाळले. 

नाईक हे सध्या सौदी अरबमध्ये आहेत. ते देशात परतल्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. अखेर त्यांनी भारतात येण्याचे टाळले आहे. ते मदिनामधूनच पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. 

बांगलादेशातील ढाका येथे गेल्या शुक्रवारी दहशतवाद्यांनी एका भारतीय युवतीसह वीस जणांची हत्या केली होती. या हल्ल्यातील दहशतवाद्यांनी डॉ. नाईक यांचे नाव घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन आपण दहशतवादी बनलो. आम्ही त्यांचे अनुयायी आहोत, असे सांगितल्याचे उघड झाल्याने ते चर्चेत आले आहेत. ते मुस्लिम तरुणांना दहशतवादी बना, असा संदेश देत असतात. त्यांच्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी यापूर्वी अनेक वेळा करण्यात आली आहे. मात्र डॉ. नाईक यांनी हे आरोप वेळोवेळी फेटाळले आहेत. आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात भाष्य केलेले नाही आणि हिंसेला प्राधान्य देणारे वक्तव्य केलेले नाही, असा दावाही ते करतात. नाईकप्रकरणी केंद्र सरकारने आक्रमक पवित्रा घेतला असून खुद्द गृहमंत्री राजनाथसिंह यांनी, योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. डॉ. नाईक यांच्या भाषणावर सरकारचे लक्ष असल्याचे सांगताना राजनाथसिंह यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर सरकार कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असेही बजावले आहे. 

इस्लामचे प्रचारक म्हणविले जाणारे डॉ. नाईक यांची मुंबई येथे ‘इस्लामिक रिसर्च फाइंडेशन‘ही चालवतात. शिवसेनेने डॉ. नाईक यांच्या अटकेची मागणी केली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी या संदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे.
===================================
द. चिनी समुद्रावर चर्चा नको: चीनचा इशारा

बीजिंग - आशिया व युरोपमधील मुख्य नेत्यांच्या या आठवड्याच्या अखेरीस होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये दक्षिण चिनी समुद्रासंदर्भातील वादाचा मुद्दा चर्चिला जाऊ नये, असा इशारा चीनच्या एका ज्येष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने दिला आहे. ही बैठक मंगोलियामध्ये होणार आहे. दक्षिण चिनी समुद्रामधील सीमारेषेच्या चीन व फिलीपीन्समधील वादासंदर्भात उद्या (मंगळवार) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय सुनाविला जाणार आहे. या निर्णयानंतर होणारी असेम (आशिया-युरोप मीटिंग) ही पहिलीच संवेदनशील राजनैतिक बैठक आहे. या पार्श्‍वभूमीवर चीनकडून हा इशारा देण्यात आला आहे.

चीनने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या सुनावणीमध्ये सहभागी होण्यासही नकार दिला आहे. या न्यायालयास यासंदर्भात निर्णय सुनाविण्याचा कोणताही अधिकार नसून अर्थातच या न्यायालयाचा निर्णय मान्य करण्याची बळजबरी करता येणार नाही, अशी भूमिका चीनकडून घेण्यात आली आहे. दक्षिण चिनी समुद्रामधील राजकीय वादाचा अमेरिकेकडून भडका उडविला जात असल्याचा आरोप चीनने केला आहे. व्यूहात्मकदृष्टया अमूल्य महत्त्व प्राप्त झालेल्या दक्षिण चिनी समुद्रामधील बहुसंख्य भागावर चीनने हक्क सांगितला असून यामुळे व्हिएतनाम, फिलीपीन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान या देशांनी चीनच्या या आक्रमकतेविरोधात भूमिका घेतली आहे. 
===================================
वृक्षारोपण, संगोपनासाठी झटणारा अवलिया


माजलगाव - शासकीय सेवेत असताना भगवान झोंबाडे यांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात लावलेल्‍या रोपट्याचे वटवृक्षात झालेले रुपांतर.

२९ वर्षांपासून घेतले स्वत:ला वाहून - निवृत्त चालक भगवान झोंबाडे यांचा उपक्रम
माजलगाव - वृक्षारोपण करून स्वत:चे छायाचित्र काढणारे अनेकजण पाहावयास मिळतील? मात्र यास अपवाद ठरले ते पंचायत समितीचे सेवानिवृत्त कर्मचारी वृक्षमित्र भगवान झोंबाडे. कोणताही गाजावाजा न करता गेल्या २९ वर्षांपासून त्यांनी वृक्षारोपण आणि संगोपनात स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांनी लावलेले अनेक वृक्ष मोठे झाले असून पक्ष्यांना आधार आणि वाटसरूंना ते सावली देत आहेत.

माजलगाव पंचायत समिती कार्यालयात वाहनचालक पदावरून सेवानिवृत्त झालेले श्री. झोंबाडे यांना १९८७ पासून वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन करण्याचा छंद जडला.

केवळ वृक्षारोपण करूनच ते थांबले नाहीत तर दरवर्षी रोपटी लावायची आणि त्याची जिवापाड काळजी घेऊन त्याचे संगोपन करण्याचे कामही त्यांनी केले. २९ वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःच्या दारासमोर गुलमोहराचे झाड लावून ते वाढविले. त्यानंतर शासकीय सेवेत असताना व सेवानिवृत्त झाल्यावरही त्यांनी ही चळवळ सुरूच ठेवली. त्यांनी शहरातील ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती कार्यालय, शेलापुरी येथील ग्रामपंचायत कार्यालय, खरात आडगाव फाटा, जिल्हा परिषद मुलांची शाळा अशा विविध सार्वजनिक ठिकाणी गुलमोहर, सिसम, वड, करंजी, लिंब, जांभळ, आंबा, नांदुरकी, अंजीर अशी झाडे लावली. प्रत्येक रोपट्याला कुंपण करून नियमित पाणी देणे. त्याच्या भोवतीचे तण काढणे हा कार्यक्रम श्री. झोंबाडे यांनी कसलाही स्वार्थ न ठेवता सुरू ठेवला. त्यामुळे वीस वर्षांपूर्वी त्यांनी लावलेली सुरू केलेली ही चळवळ आज शेकडो पशु-पक्ष्यांचा आधार बनली असून वाटसरूंना सावली देत आहेत. नुसती रोपटी लावणारे आज अनेकजण आहेत; पण वृक्षसंगोपण करणारे अनेक भगवान झोंबाडे तयार होण्याची गरज आहे. श्री. झोंबाडे यांच्या योगदानाची दखल घेऊन कृषी कार्यालयाने घेऊन शुक्रवारी त्यांचा नुकताच पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी ए. बी. गुंजकर, कृषी अधिकारी एस. जी. हजारे, एम. एल. चव्हाण यांनी रोपटे देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला.
===================================
नृसिंहवाडी मंदिरात पाणी;गगनबावड्यात 190 मिमी

कोल्हापूर - कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात संततधार पाऊस सुरुच असून, पंचगंगा नदीच्या पातळीतही वाढ झाली आहे. 

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासांत 15 फुटाने वाढ झाली असून, कृष्णा नदीचे पाणी येथील दत्त मंदिरात शिरले आहे. नदीच्या पाण्याची वाढ पाहता नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज (सोमवार) दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे

गगनबावड्यात 190.05 मिमी
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात गगनबावडा  तालुक्यात सर्वाधित 190.05 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात रविवारी दिवसभरात सरासरी 90.91 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. तालुकानिहाय पाऊस मि.मी मध्ये पुढील प्रमाणे - गगनबावडा 190.05, करवीर 76.18, कागल 76.36, पन्हाळा 114.42, शाहूवाडी 162 हातकणंगले- 50.75, शिरोळ-54.14, राधानगरी 91.17 भुदरगड 78.02, गडहिंग्लज 34.57, आजरा 88.75 व चंदगडमध्ये 73.83 मि.मी., अशी एकूण 1090.88 मि.मि. पावसाची नोंद  झाली आहे.
===================================
सेन्सेक्सने गाठली वर्षातील उच्चांकी पातळी

मुंबई - भारतीय शेअर बाजाराने आज (सोमवार) वर्षभरातील नवा उच्चांक गाठला आहे. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने 450 अंशांच्या वाढीसह 27,500 अंशांची पातळी पार केली आहे. 

ऑक्टोबर 2015 पासूनची ही उच्चांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टीदेखील 8,450 अंशांची पातळी गाठत 11 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचला होता. निफ्टीने 115 अंशांच्या वाढीसह 8,438 अंशांची पातळी गाठली. 

अमेरिकी संसदेत एच1-बी व्हिसाविरोधी विधेयक सादर झाले आहे. भारतातील बहुतांश आयटी कंपन्यांचे व्यवहार अमेरिकेवर अवलंबून आहेत. परिणामी, आज आयटी कंपन्यांचे शेअर चर्चेत राहण्याची शक्यता आहे. निफ्टीवर सकाळच्या सत्रात भारती एअरटेल, बँक ऑफ बडोदा, एसबीआय, आयसीआयसीआय बँक व टाटा स्टीलचे शेअर सर्वाधिक तेजीत आहेत.

===================================
कोयना धरणात 24 तासांत 6 टीएमसीने वाढ

पाटण - कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरुच असून, गेल्या चोवीस तासांत धरण पातळीत 6 टीएमसीने वाढ झाली आहे. 

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात आजही (सोमवार) पावसाचा जोर कायम आहे. या परिसरात 268 मिलीमीटर (एकूण 1592) पावसाची नोंद झाली आहे. धरणात 24 तासाच्या नोंदीनंतर आज सकाळी आठ वाजेपर्यंत 6 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. धरणात एकूण 33.75 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. पावसामुळे पर्यटकांना कोयना परिसराचे वेध लागले आहेत. त्यामुळे ओझर्डे धबधब्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झालेली पाहावयास मिळत आहे. 

जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. मात्र, मध्यंतरी ओढ दिल्याने ओझर्डे धबधब्याचे त्रिशूलधारी रूप पाहावयास मिळाले नाही. जुलैची सुरवातच संततधार पर्जन्यवृष्टीने झाल्याने ओझर्डे नाल्यावरील धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने दोन दिवसांचा सुटीचा आनंद लुटण्यासाठी रविवारी पर्यटकांनी गर्दी केली होती. 
===================================
मणिपुरी युवतीच्या राष्ट्रीयत्वावरच घेतली शंका

नवी दिल्ली - मणिपुरमधील एका युवतीच्या राष्ट्रीयत्वावरच दिल्लीतील विमानतळावर शंका उपस्थित करण्यात आल्यानंतर, याची दखल घेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी माफी मागितली आहे.

मणिपुरमधील मोनिका खानगेनबम ही युवती शनिवारी दिल्ली विमानतळावरील टर्मिनल 3 वर गेली असता इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिला तु खरच भारतीय आहेस का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी तिच्याजवळ पासपोर्टही होता. मोनिका या अधिकाऱ्याला मला उशीर होत असल्याचे सांगितले. पण अधिकाऱ्याने विमान तुम्हाला सोडून जाणार नाही, आरामात मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या, असे सांगितले. मोनिकाने या अधिकाऱ्याला मणिपुरची असल्याचे सांगितल्यानंतर त्याने त्याने तिला मणिपुरच्या सीमेला लागून किती राज्ये आहेत असा प्रश्न केला. मोनिका ही घटना फेसबुकवरून शेअर केल्यानंतर याची दखल घेण्यात आली आहे. नागरिकांकडून तिच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
===================================
खडकवासला प्रकल्पात 10 टीएमसी पाणीसाठा

टेमघरला तासात 143 मिमी, तर खडकवासला धरण 74 टक्के भरलेखडकवासला - टेमघर, खडकवासला, वरसगाव व पानशेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आजही (सोमवार) कायम आहे. परिणामी खडकवासला प्रकल्पातील चारही धरणात सोमवारी आज सकाळी सहा वाजता दहा टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून, शहराला 15 मार्च 2017 पर्यंत पुरेल एवढे पाणी जमा झाले आहे.

या चारही धरणात रविवारी सकाळी 8.19 टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. आज सकाळी तो सहा वाजता 10 टीएमसी एवढा झाला होता. या धरणक्षेत्रात गेल्या 24 तासांत 1.86 टीएमसी पाणी जमा झाले, असे खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले. पुणे शहराला 46 दिवसपुरेल एवढे पाणी एका दिवसात जमा झाले. या धरणात सध्या प्रत्येक तासाला 16.41 दशलक्ष घनफुट म्हणजे तासाला 189 क्‍युसेकने पाणी टेमघर, सिंहगड, पाबे, आगळंबे, आंबी या खोऱ्यातून जमा होत आहे. 
===================================
महाराष्ट्र चिंब; संततधार पाऊस सुरूच

पुणे -  नैॡत्य मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने राज्याच्या विविध भागांत रविवारी सुटीच्या दिवशी संततधार सुरू होती. पुढील २४ तास याचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यताही रविवारी वर्तविण्यात आली आहे. 
राज्यात मॉन्सून दाखल होऊनही जूनअखेरपर्यंत मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाची प्रतीक्षा होती. कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या हवामान विभागात पावसाने जूनअखेरपर्यंतची सरासरी ओलांडली असली, तरीही पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमधील पिण्याच्या पाण्याचे संकट कायम होते. शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पाहत होता. गेल्या आठवड्यात पुणे आणि परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. अवघ्या २७ तासांमध्ये २०० मिलिमीटर पावसाची नोंद पुण्यात झाली. त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर ओसरला होता. या पार्श्‍वभूमीवर आता परत पावसाला सुरवात झाली आहे.
===================================
मोदींच्या मंत्रिमंडळातील 24 मंत्री गुन्हेगार

नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. आता एकूण 78 मंत्री असणाऱ्या मोदींच्या जंबो मंत्रिमंडळातील 24 मंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले आहेत. तर एकूण 72 मंत्री कोट्यधीश आहेत. नव्या मंत्र्यांमध्ये मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेलेले व सध्याचे पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे यांची संपत्ती सर्वांत कमी आहे. 

"असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस्‌‘ (एडीआर) या संस्थेच्या अहवालात याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. नव्या मंत्र्यांपैकी 7 जणांवर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले आहेत, तर एकूण मंत्रिमंडळात 24 मंत्री गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. वयाचा विचार करता तीन मंत्री 31 ते 40 वर्षे, 44 मंत्री 41 ते 60 वर्षे व 31 मंत्री 61 ते 80 वर्षे वयाचे आहेत. तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एकूण नऊ महिला मंत्री आहेत. 

मंत्री दवे यांच्याकडे 60.97 लाख रुपयांची स्थावर जंगम मालमत्ता आहे. मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 19 नवीन चेहऱ्यांना स्थान दिले होते. या नव्या मंत्र्यांची सरासरी संपत्ती 8.73 कोटी आहे. यासोबतच मोदींच्या मंत्र्यांची सरासरी संपत्ती वाढून ती 12.94 कोटी रुपये झाली आहे. 

एडीआरच्या अहवालानुसार 9 मंत्र्यांनी 30 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (113 कोटी), खाद्यमंत्री हरसिमरत कौर बादल (108 कोटी) व ऊर्जामंत्री पीयूष गोयल (95 कोटी) आदी प्रमुख नावे आहेत. मंत्रिमंडळातील एकूण 6 मंत्र्यांनी आपली संपत्ती एक कोटींपेक्षा कमी सांगितलेली आहे. 
===================================

No comments: