Thursday, 28 July 2016

नमस्कार लाईव्ह २८-०७-२०१६ चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- वॉशिंग्टन; 'झिका' प्रतिबंधक औषधाचा शोध 
२- हिलरी याच सर्वांत योग्य उमेदवार: ओबामा 
३- लंडन; सहाराने हॉटेल विक्रीचा प्रस्ताव नाकारला 
४- चीनचे भारतात पुन्हा घुसखोरीचे दुःसाहस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
५- नौदलाचं ड्रोन विमान कोच्चीच्या समुद्रात कोसळलं 
६- 5 स्टार एसीमुळे वीज बचत नाही, तर 28% जास्त खर्च: CSE 
७- 1 ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद, फामपेडाचा निर्णय 
८- मोदी सरकार मला संपवू शकतं: केजरीवाल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
९- अॅसिड हल्ला, बलात्कार पीडितांना आता 3 लाख रुपये भरपाई 
१०- बालहट्टासाठी 14 कोटींचा चुराडा, मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला 
११- राज ठाकरेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करा : सामाजिक न्यायमंत्री 
१२- व्यवसायाशिवाय 18 कोटी कर्ज मिळवलं, 'आप'चे शेलारांवर गंभीर आरोप 
१३- जेलमधून आरोपी फरार, आईनंच केलं पोलिसांच्या हवाली 
१४- पीक योजना प्रीमियमची मुदत वाढवावी - शेट्टी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१५- विरार लोकलमध्ये महिलांची गुंडगिरी, तरुणीला मारहाण 
१६- न्यायासाठी पैलवान नरसिंग यादवच्या आई-वडिलांचं उपोषण 
१७- जम्मूमध्ये मुसळधार पावसानं पुराचं थैमान, दोघांचा मृत्यू 
१८- गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकावर महिलांची छेड, आरोपी अटकेत 
१९- लातुरात महिला शिक्षिकेला संस्थाचालक महिलेकडून धक्काबुक्की 
२०- अडीचशे दलित कुटुंब स्विकारणार इस्लाम ? 
२१- कुत्रा अंगावर धावून गेल्याच्या वादातून तरूणाची हत्या 
२२- भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२३- पुण्यानं मारली बाजी... प्रो कबड्डीत यू मुम्बाचं आव्हान संपुष्टात 
२४- शाहरूख पाठोपाठ आमीर, रणवीर सिंहलाही कर चुकवेगिरीची नोटीस 
२५- ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटर अॅलन बॉर्डर यांना सेहवागचं आव्हान 
२६- ड्रायव्हर म्हणतो सलमाननेच केली चिंकाराची शिकार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *

=============================================

विरार लोकलमध्ये महिलांची गुंडगिरी, तरुणीला मारहाण

विरार लोकलमध्ये महिलांची गुंडगिरी, तरुणीला मारहाण
मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमधील पुरुष आणि महिलांच्या डब्यात होणारी वादावादी आणि हाणामारी सर्वांनाच माहित आहे. त्यापैकी विरार लोकल या घटनांसाठी कुप्रसिद्धच म्हणावी लागेल. महिलांच्या गुंडगिरीची अशीच घटना मंगळवारी विरार-चर्चगेट लोकलमध्ये पाहायला मिळाली

वसईला उतरण्यासाठी विरार लोकलच का पकडली, असा उर्मट सवाल करत महिलांच्या टोळक्याने एका 20 वर्षीय इंजिनीअरिंगच्या तरुणीला जबर मारहाण केली. ऋतुजा नाईक, असं मारहाण झालेल्या तरुणीचं नाव आहे.

इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकणारी ऋतुजा ही वसईच्या विद्यावर्दनी कॉलेजमध्ये शिकते. महिलांच्या टोळक्याने तिचे केस आणि कपडे धरुन मारहाण केली. इतरंच नाही तर महिलांच्या वादानंतर ऋतुलाजा अस्थमाचा अटॅकही आला.

=============================================

पुण्यानं मारली बाजी... प्रो कबड्डीत यू मुम्बाचं आव्हान संपुष्टात

पुण्यानं मारली बाजी... प्रो कबड्डीत यू मुम्बाचं आव्हान संपुष्टात
फाईल फोटो
नवी दिल्ली: अनूप कुमारच्या यू मुम्बाचं प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या मोसमातलं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. खरं तर मनजीत चिल्लरच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पुणेरी पलटणनं बंगळुरू बुल्सचा 36-33 असा धुव्वा उडवल्यानं यू मुम्बासाठी उपांत्य फेरीची वाट आणखी खडतर बनली होती.

यू मुम्बाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी दबंग दिल्लीवर किमान 45 गुणांनी विजय आवश्यक होता. पण यू मुम्बाला दिल्लीवर 38-34 असा विजय मिळवता आला. त्यामुळं गुणतालिकेत मुंबई आणि पुण्याच्या टीम्सच्या खात्यात सम-समान म्हणजे प्रत्येकी 42 गुणच जमा झाले.

गुणातील फरकाच्या आधारे, पुण्याला चौथं स्थान मिळालं तर यू मुम्बाला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. आता 29 जुलैला प्रो कबड्डीच्या उपांत्य फेरीत पुणेरी पलटणला पटना पायरेट्सचा सामना करायचा आहे तर तेलुगू टायटन्ससमोर जयपूर पिंक पँथर्सचं आव्हान असेल.

=============================================

नौदलाचं ड्रोन विमान कोच्चीच्या समुद्रात कोसळलं

नौदलाचं ड्रोन विमान कोच्चीच्या समुद्रात कोसळलं
कोच्ची : भारतीय नौदलाचं ड्रोन विमान काल (बुधवारी) संध्याकाळी कोच्चीजवळ समुद्रात कोसळलं. रिमोटवर चालणारं हे ड्रोन विमान हेरगिरी आणि किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी वापरलं जातं. मात्र नेहमीच्या एका मोहीमेवर असताना हे विमान काल समुद्रात कोसळलं.

नौदलाचं हे विशेष ड्रोन विमान सलग 4 तास आकाशात घिरट्या घालू शकतं. तसेच 1000 किमीचा अंतरावरील निरीक्षणही करु शकतं. या ड्रोनच्या शोधासाठी नौदलाची शोधमोहीम सुरु केली आहे. शिवाय यासाठी विशेष उपकरणं घेऊन खलाशीही शोधकार्यात सहभागी झाले आहेत.
हवाईदलाचं विमान बेपत्ता होऊन आठवडा उलटण्याआधीच ही घटना घडल्याने बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान याप्रकरणी नौदलाने विशेष चौकशी समिती नेमली असून युद्धपातळीवर या ड्रोनचा शोध घेतला जात आहे.

=============================================

न्यायासाठी पैलवान नरसिंग यादवच्या आई-वडिलांचं उपोषण

न्यायासाठी पैलवान नरसिंग यादवच्या आई-वडिलांचं उपोषण
मुंबई : नरसिंग यादवविरोधात कट रचला आहे. त्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचं नरसिंगच्या आई-वडिलांनी सांगितलं. डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यामुळे कुस्तीपटू नरसिंग यादवची आलिम्पिकवारी हुकली आहे. त्याच्याऐवजी 23 वर्षीय प्रवीण राणाला रिओ ऑलिम्पिकसाठी संधी मिळाली आहे.

रिओ ऑलिम्पिकच्या तोंडावर भारतीय क्रीडा जगतात डोपिंगच्या डागामुळे खळबळ उडाली. कुस्तीपटू नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. त्यानंतर त्याचा रुममेटही डोपिंग चाचणीत दोषी ठरला. यानंतर त्याच्या जेवणात उत्तेजक पदार्थ मिसळल्याची बाब समोर आली.

या पार्श्वभूमीवर नरसिंगच्या आई-वडिलांनी उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. आपल्या मुलावर अन्याय झाला आहे. त्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान वाराणसीजवळ असलेल्या खरदहा या मूळगावातील गावकऱ्यांनी निषेध मोर्चा काढून नरसिंगला न्याय मिळावा अशी मागणी केली.

=============================================

जम्मूमध्ये मुसळधार पावसानं पुराचं थैमान, दोघांचा मृत्यू

जम्मूमध्ये मुसळधार पावसानं पुराचं थैमान, दोघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीर: जम्मूमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे नदी आणि नाल्यांनी रौद्र रूप धारण केलं. नद्यांनी आपलं पात्र सोडलं आहे. पुराचं पाणी अनेक भागात शिरलं आहे. तर जानीपूर भागात पाण्याच्या प्रवाहात 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

कार्यालय, पोलिस चौकी, पूल, बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. गाडीगड परिसरात पोलीस चौकी परिसरात 4 फुटापर्यंत पाणी भरलं आहे. शिवाय चौकी समोरच्या कार्यालयांच्या भिंती तोडून पाण्याचा प्रवाह पुढे सरकला आहे. मोठ्या प्रमाणावर घरांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.

जम्मू मधील बऱ्याच नद्या धोक्याची पातळी पार करण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं अलर्ट घोषित केलं आहे. यासाठी प्रशासनानं हेल्पलाइन नंबर जारी केला असून संबंधित कर्मचारी आणि पोलिसांना देखील अलर्ट देण्यात आला आहे.

=============================================

गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकावर महिलांची छेड, आरोपी अटकेत

गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकावर महिलांची छेड, आरोपी अटकेत
पनवेल: पनवेल रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलांची छेडछाड करणाऱ्याला पोलीसांनी अटक केली आहे. अमोल उरणकर असं त्याचं नाव आहे. तो पनवेल रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलांची छेडछाड करायचा.

यासंदर्भात एका महिलेने पनवेल पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी पनवेल स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपीने इतर महिलांची छेडछाड केल्याचंही निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी अमोल उरणकरला सापळा रचून अटक केली.

आरोपी अमोल उरणकर हा एका जाहिरात कंपनीमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, आरोपी अमोलची सध्या पोलीस कसून चौकशी करत आहेत.

=============================================

5 स्टार एसीमुळे वीज बचत नाही, तर 28% जास्त खर्च: CSE

5 स्टार एसीमुळे वीज बचत नाही, तर 28% जास्त खर्च: CSE
मुंबई: एसी खरेदी करताना आपण सगळ्यात जास्त लक्ष त्या एसीला किती स्टार आहेत याकडेच असतं. 5 स्टार एसी हा सगळ्यात चांगला आणि वीज बचत करणारा समजला जातो. पण सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एनव्हायरमेंट म्हणजेच सीएसईने दावा केला आहे की, 5 स्टार एसीच्या नावाखाली तुम्हाला धोका देण्यात येत आहे.

5 स्टार एसी हा उन्हाळ्यात वन स्टार एसीसारखं काम करतो. वीज बचत नाही तर तब्बल 28 टक्के जास्त वीज खर्च करतो.

एसी खरेदी करताना आपण त्याच्या स्टिकरवर किती स्टार आहेत हे आवर्जून पाहतो. स्टार किती रंगीत आहे तेवढं त्याचं रेटिंग असतं. म्हणजेच जेवढे स्टार जास्त असतील तेवढी विजेची बचत होईल. पण हे स्टिकर तुम्हाला भुलवण्याचा आणि एसी जास्त किंमतीत विकण्यासाठी केलेला खटाटोप आहे?

सीएसईच्या रिपोर्टनुसार, 5 स्टार एसीमुळे वीज बचतीचा दावा हा एक धोका आहे. वीज बचत होत नाही तर वीज जास्त खर्च होते. त्यामुळे पैसे जादा जातात. उन्हाळ्यात पारा जवळजवळ 40 डिग्रीपर्यंत पोहचतो तेव्हा तुमचा 5 स्टार हा एखाद्या 2 स्टार एसीप्रमाणे काम करतो. जेव्हा पार 45 डिग्रीपर्यंत पोहचतो तेव्हा 5 स्टार एसी हा 1 स्टार एसीचं काम करतो. त्यामुळेच तुमच्या वीजबिलात बरीच वाढ होते.

5 स्टार एसी खरेदी करण्यासाठी जास्त पैसा खर्च करावा लागतो. पण हाच एसी उन्हाळ्यात कमी थंडावा देतो. स्टार रेटिंग देण्याचं काम ब्युरो ऑफ एनर्जी एफ्फीसिएंसी करतं. 5 स्टार एसी 20 ते 22 टक्के वीज बचतीचा दावा करतं. पण दीड टन असणारा हा एसी तेव्हा एक टन एसीप्रमाणे चालतो.

सीएसईने व्होल्टास, एलजी आणि गोदरेजच्या तीन मॉडेल्सच्या 5 स्टार एसीचं रिपोर्ट तयार केलं आहे. बाजारात जवळजवळ 50 टक्के याच कंपनीच्या एसीची विक्री होते. सीएसईच्या दाव्यानंतर आता कंपन्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी ग्राहकांना 5 स्टार एसी द्यावा.

=============================================

1 ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद, फामपेडाचा निर्णय

1 ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद, फामपेडाचा निर्णय
मुंबई : सरकारच्या हेल्मेटसक्तीच्या धोरणाविरोधात फामपेडाने आक्रमक निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेल खरेदी 1 ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ पेट्रोल डिलर्स असोसिएशनने घेतला आहे. फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी याबाबत माहिती दिली.

सरकारच्या ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ धोरण राबवताना पेट्रोल पंप चालकांना ग्राहकांचा होणारा विरोध लक्षात घेता, हा वाद टाळण्यासाठी पेट्रोल, डिझेल खरेदीच बंद करुन विरोध दर्शवण्याचं फामपेडाने ठरवलं आहे.

हेल्मेटसक्तीच्या कायद्याला आमचा विरोध नाही. मात्र, कायद्याची अंमलबजावणीदरम्यान होणाऱ्या अडचणींना विरोध असल्याचेही फामपेडाकडून सांगण्यात आले आहे.

“कायदा पाळला, तर पब्लिकडून मारहाणीची भीती असते आणि कायदा न पाळल्यास सरकारकडून गुन्हे दाखल होणार आहेत, अशा अडचणीत आम्ही सापडलो आहे. सरकारचा हेल्मेटसक्तीचा निर्णय जनतेच्या हिताचाच आहे. मात्र, अंमलबजावणीदरम्यान आम्हाला त्रास सहन करावा लागतो.”, असे फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

=============================================

अॅसिड हल्ला, बलात्कार पीडितांना आता 3 लाख रुपये भरपाई

अॅसिड हल्ला, बलात्कार पीडितांना आता 3 लाख रुपये भरपाई
मुंबई निष्काळजीपणामुळे भ्रूण मृत्यू झाला किंवा जाणीपूर्वक त्याची हत्या झाली व अशा पीडितेने याची पोलीस तक्रार केल्यास, तिला 50 हजार रूपये नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती राज्य शासनाने बुधवारी मुंबई हायकोर्टात दिली. सरकारी वकील मानकुंवर देशमुख यांनी जस्टिस नरेश पटेल व जस्टिस प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर ही माहिती दिली.

निष्काळजीपणामुळे अंडबीज तयार करण्याची प्रक्रियाच थांबली किंवा जाणीवपूर्वक थांबवली व अशा पीडितेने याची पोलीस तक्रार केल्यास तिला दीड लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

अॅसिड हल्ला, बलात्कार पीडितांनाही 3 लाख रूपये

त्याचबरोबर अॅसिड हल्ला पीडितांना राज्य शासनाकडून 2 लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाते. ती वाढवून 3 लाख रूपये करण्यात आलीय. 2014 पासून ही नुकसान भरपाई दिली जाते. पीडित म्हणजे नेमका कोण याची व्याख्या सीआरपीसी कलम 357 अंतर्गत देण्यात आली आहे. या कलमाच्याआधारे ही नुकसान भरपाई दिली जाते. मात्र नुकसान भरपाईची ही रक्कम अगदीच तुटपुंजी आहे. या रकमेने पीडितेचे पुनर्वसन होणार नाही. तेव्हा या रकमेत वाढ करायला हवी, असे मत न्यायालयाने व्यक्त केले होते.

=============================================

मोदी सरकार मला संपवू शकतं: केजरीवाल

मोदी सरकार मला संपवू शकतं: केजरीवाल
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. मोदी सरकार सध्या सैरभैर झाले असून, हे सरकार मला संपवू देखील शकते, असा आरोपच त्यांनी केला आहे.

केजरीवालांनी आज पंतप्रधानांवर व्हिडीओ अस्त्र उगारून, मोदींवर मुस्कटदाबीचाही आरोप केला आहे. केजरीवालांनी आज एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, यामध्ये आमदारांचे अटक सत्र, आणि संसदीय सचिवांच्या मुद्द्यवरून आमित शाह आणि मोदींना दोषी ठरवले आहे.

विशेष म्हणजे, केजरीवालांनी ट्विटरवरूनही आपला राग व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये मोदीजी तुमच्या आजाराचे नाव केजरीवाल असून, हा व्हायर सर्व देशात पसरत असल्याचे म्हटले आहे.

=============================================

बालहट्टासाठी 14 कोटींचा चुराडा, मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

बालहट्टासाठी 14 कोटींचा चुराडा, मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला
मुंबई मुंबईच्या राणीच्या बागेत आणलेल्या पेग्विनवरुन आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. दक्षिण कोरियातून आणलेल्या या पेंग्विनला मनसे आणि काँग्रेसनं विरोध केला आहे.

कुणाचा तरी बालहट्ट पुरवायचा म्हणून पेंग्विनसाठी कोटींचा खर्च महापालिकेनं का उचलायचा? असा सवाल करत आदित्य ठाकरेंवर मनसेनं टीका केली आहे. तर काँग्रेसचे आमदार नितेश राणेंनीही बालहट्टापायी अवास्तव खर्च सुरु असल्याचं म्हटलं आहे.

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी राणीच्या बागेत पेंग्विन आणण्याची कल्पना आणली. पेंग्विन्सच्या देखभालीसाठी नेमलेल्या ऑस्टेलियन एजन्सीला 8 कोटींचं कंत्राट देण्यात आलं आहे. तसंच पेंग्विनसाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यासाठी 7 ते 8 कोटी असा एकूण 14 ते 15 कोटी खर्च होतो आहे.

=============================================

शाहरूख पाठोपाठ आमीर, रणवीर सिंहलाही कर चुकवेगिरीची नोटीस

शाहरूख पाठोपाठ आमीर, रणवीर सिंहलाही कर चुकवेगिरीची नोटीस
नवी दिल्ली: आयकर विभागाने बॉलीवूडचा किंग खान शाहरूखला कर चुकवेगिरीबद्दल कालच नोटीस पाठवली होती. आता आयकर विभागाने इतर बॉलीवूड स्टारवर करडी नजर ठेवली असून आज इतर दोन सेलिब्रेटींनाही नोटीस पाठवली आहे.

आयकर विभागाच्या सेवा कर विभागाने आमीर खान आणि रणवीर सिंहला टॅक्स भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे. सेवा कर विभागाने यशराज फिल्मस, सलमान खान फिल्म्स, आमीर खान फिल्म्स आणि रणवीर सिंह आदींना आपले पेमेंट डिटेल्स सादर करण्याच्या सुचना केल्या होत्या. ही सर्व माहिती विभागाच्या इंटेलिजन्स अधिकाऱ्यांनी मागितली होती.

सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइझ अॅन्ड कस्टमने टॉप फिल्म प्रोडक्शन हाऊसना आपले कर भरल्याचे विवरण सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. या अंतर्गतच आमीर खान आणि रणवीर सिंह यांना त्यांनी कर भरणा केलेली सर्व माहिती मागवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सलमान खान, यशराज फिल्मस आदींनाही सर्व पेमेंटची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. चित्रपट क्षेत्रातील जाणकारांच्या मते आयकर विभाग हाय प्रोफाईल डिफॉल्टरवरील पकड आवळत असून त्यांच्याकडून सेवा कर वसूल केला जाऊ शकतो.

=============================================

ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटर अॅलन बॉर्डर यांना सेहवागचं आव्हान

ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटर अॅलन बॉर्डर यांना सेहवागचं आव्हान
नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू अॅलन बॉर्डर यांना त्यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या सर्व क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या. मात्र, भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने आपल्या हटके स्टाईलमध्ये त्यांना शुभेच्छा देतानाच, आव्हान दिले आहे.

सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या असून, यामध्ये, ”हॅपी बर्थ डे अॅलन बॉर्डर. लहानपणी मी एक विनोद ऐकला होता. पण बॉर्डरसाहेब आम्ही ‘बॉर्डर’ नावाचा चित्रपटच बनवला. तुम्ही अजून ‘गावसकर’ बनवू शकला नाही. आता ‘तेंडुलकर’ला तरी तयार करा,” असं म्हटले आहे.

=============================================

राज ठाकरेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करा : सामाजिक न्यायमंत्री

राज ठाकरेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करा : सामाजिक न्यायमंत्री
नवी मुंबई: अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, या राज ठाकरे यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाह. जातियवाद कमी करण्यासाठी असलेला हा कायदा रद्द करण्याचा दोन्ही सरकारांना अधिकार नाही, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज केले.

नवी मुंबईतील स्वप्निल सोनावणे हत्येत दोषी पोलीस अधिकार्यावर कारवाई होणारच असल्याचे बडोले यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. सामाजिक न्यायमंत्र्यांनी आज नवी मुंबईतील स्वप्नील सोनावणेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी चर्चाही केली.

अहमदनगरमधील पाथर्डी प्रकरणातील निर्भायाच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करत, राज्य सरकारवरही चांगलेच तोंडसुख घेतले होते. यावर बडोले यांनीही प्रतिक्रीया देताना राज ठाकरेंच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला.

=============================================

व्यवसायाशिवाय 18 कोटी कर्ज मिळवलं, 'आप'चे शेलारांवर गंभीर आरोप

व्यवसायाशिवाय 18 कोटी कर्ज मिळवलं, 'आप'चे शेलारांवर गंभीर आरोप
मुंबईः आशिष शेलारांच्या सर्वेश्वर लॉजिस्टीक्स या कंपनीकडे कुठलंही बिझनेस मॉड्युल नसताना 18.5 कोटी मिळवले आहेत, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. सर्वेश लॉजिस्टीक्स या कंपनीवर आशिष शेलार संचालक असल्याचा दावाही आम आदमी पक्षानं केला आहे.


प्रिती शर्मा मेनन यांनी यासंदर्भात मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि आरोप केले. यासंदर्भात आम आदमी पक्षाने एसीबी, ईडी, निडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार देखील केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.


एकीकडे दोन्ही सभागृहात भाजपाच्या भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी करा अशी मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे ‘आप’ने  भाजपाच्या मुंबई अध्यक्षांवरच गंभीर आरोप केले आहेत.

=============================================

जेलमधून आरोपी फरार, आईनंच केलं पोलिसांच्या हवाली

जेलमधून आरोपी फरार, आईनंच केलं पोलिसांच्या हवाली
मुंबई: गुजरातच्या साबरमती जेलमधून फरार झालेला आरोपी प्रविण धवल याला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. त्याला इतर कोणी नाही तर त्याच्या आईनेच पोलिसांच्या हवाली केलं आहे. काल रात्रई त्याच्या आईनं त्याला क्राईम ब्रांचकडे सोपावलं. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनीही आरोपीच्या आईची प्रशंसा केली आहे.

आरोपी प्रवीण हा तीन दिवसांपूर्वी साबरमती जेलमधून फरार झाला होता. क्राईम ब्रांच त्याचा कसून शोधही घेत होती. पण काल रात्री 1च्या दरम्यान, आरोपीला त्याची आई आशाबेन या स्वत: क्राईम ब्रांचमध्ये घेऊन आल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला पोलिसांच्या हवाली केलं.

=============================================

लातुरात महिला शिक्षिकेला संस्थाचालक महिलेकडून धक्काबुक्की

लातुरात महिला शिक्षिकेला संस्थाचालक महिलेकडून धक्काबुक्की
लातूर : लातुरात एका महिला शिक्षिकेला संस्थाचालक महिलेनेच धक्काबुक्की करत शाळेबाहेर हाकलण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संस्थाचालक महिला अरेरावीची भाषा करतात, मानसिक त्रास देतात आणि पैसे मागतात, असे गंभीर आरोप प्राथमिक शाळेवर शिकवणाऱ्या एका महिला शिक्षिकेनं संस्थाचालकांवर केले आहेत. मात्र, शिक्षिकेच्या सर्व आरोपांचे खंडन करत असं कांही घडलंच नाही असा पवित्रा संस्थाचालकांनी घेतला आहे

शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमुळे लातूर जिल्ह्याचं नाव राज्यभर गाजलं. त्यामुळं अनेकांनी खासगी शिक्षण संस्था निर्माण केल्या. शासनानं देखील अनेक संस्थांना अनुदान देत पाठबळ दिलं. मात्र, याचाच फायदा घेत संस्थाचालकांनी शिक्षक भरतीत व्यावहारिकपणा आणत लाखोंची माया जमवली. हे सर्व चार भिंतीच्या आत झालेल्या बाबी कधी उघड झाल्याचं नाहीत.

बहुतांश संस्थानवर विविध पक्ष्याच्या कार्यकर्त्यांची मखतेदारी असल्यानं सामान्य शिक्षकांना अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागतो. लातुरात देखील शंभर टक्के अनुदानित असलेली सुदर्शन प्राथमिक आणि माध्यमिक या संस्थेच्या संस्थाचालिका वनिता काळे या काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्याबरोबरच जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा देखील आहेत. त्यांच्याच शाळेत 2008 पासून जनाबाई चिंचाळे या शिक्षिका कार्यरत आहेत.


=============================================

250 दलित कुटुंब स्विकारणार इस्लाम ?


  • ऑनलाइन लोकमत - 
    चेन्नई, दि. 28 - मंदिरात प्रवेश देत नसल्याने 250 दलित कुटुंब इस्लाम धर्म स्विकारण्याच्या तयारीत आहेत.  तामिळनाडूमधील पझंगकल्‍लीमेडू आणि नागापल्‍ली गावातील हे कुटंब आहेत. गावातील काही कुटुंबांनी तर इस्लाममध्ये धर्मातरणही केलं आहे. 
    पझंगकल्‍लीमेडू गावात एकूण 180 दलित कुटुंब राहतात. मंदिरात 5 दिवस चालणा-या उत्सवात आम्हाला एक दिवस सर्व विधी करायला मिळावेत अशी त्यांची इच्छा होची. मात्र हिंदू धर्मियांनी नकार दिल्याने त्यांना परवानगी मिळाली नाही. ज्यामुळे दलित कुटुंब नाराज आहेत, आणि त्यांनी इस्लाम धर्म स्विकारण्याचा गावातील 6 कुटुंबानी अगोदरच इस्लाममध्ये धर्मातरण केलं आहे. 
    तामिळनाडू तौहीद जमात संघटनेने गावक-यांमध्ये कुरानची प्रत वाटण्यास सुरुवात केली असल्याची माहिती एका गावक-याने दिली आहे. तर ख्रिश्चन मिशनरीनेही ग्रामस्थांशी संपर्क साधला आहे. काही हिंदू संघटनांनीदेखील या दलित कुटुंबांशी संपर्क साधला असून हे पाऊल न उचलण्यातं आवाहन केलं आहे. तसंच दलित आणि हिंदूंमध्ये समेट घडवून आणण्याचाही प्रयत्न करत आहेत.  
    पझंगकल्‍लीमेडू हे समुद्री किना-यावर वसलेलं एक गाव आहे. गावात एकूण 400 कुटुंब राहतात ज्यांच्यातील 180 दलित आहेत. पझंगकल्‍लीमेडूपासून 240 किमीवर असलेल्या नागापल्‍ली गावातही दलितांशी भेदभाव झाल्याचं समोर आलं आहे. गावातील 70 कुटुंबांनी मंदिरात प्रवेश न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत धर्मांतरण करण्याचा शेवटचा मार्ग स्विकारला आहे. सरकार आणि प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. 'अनेक दिवस झाले आम्ही विनंती करत आहोत मात्र आम्हाला आमचे अधिकार मिळवून देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचं', स्थानिकाने सांगितलं आहे. 
=============================================

दोघांच्या भांडणात तिस-याचा बळी, कुत्रा अंगावर धावून गेल्याच्या वादातून तरूणाची हत्या


  • ऑनलाइन लोकमत
    पुणे, दि. २८ -  'दोघांचे भांडण तिस-याचा लाभ' ही म्हण आपण ब-याच वेळेस ऐकली आहे,पण पुण्यात मात्र दोघांच्या भांडणामुळे तिस-याच व्यक्तीचा हकनाक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुत्रा अंगावर धावून गेल्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या वादात सागर चौघुले या तिस-याच व्यक्तीचा बळी गेल्याची घटना काल (बुधवार) रात्री हडपसर येथील दौरीनगरमध्ये घडली.
    मिळालेल्या माहितीनुसार, दौरीनगर भागात राहणा-या निलेश शिंदे यांच्या अंगावर काल संध्याकाळी गणेश वाबळे याचा गावठी कुत्रा धावून गेला.  तो कुत्रा नेहमी अंगावर येतो अशी तक्रार बावळे यांच्याकडे केली असता त्या दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी निलेशचा मित्र असणा-या समीर चौघुलेने वाद सोडवण्यासाठी पुढाकार घेतला व ते भांडण तिथेच मिटले. मात्र याचा राग मनात धरून थोड्या वेळाने वाबळे काही तरूणांसह परतला व त्याने शिंदे व मित्रांना मारहाण केली. त्यामध्ये समीर चौघुले हा गंभीर जखमी झाला व त्याचा मृत्यू झाला. या भांडणात सनी चौगुले, संदीप शिंदे, शकुंतला सावंत हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून आणखी तिघे जण फरार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 
=============================================

ड्रायव्हर म्हणतो सलमाननेच केली चिंकाराची शिकार



  • जोधपूर, दि. 28 - चिंकारा शिकार प्रकरणातील मुख्य साक्षीदार जो गेले काही दिवस गायब होता तो पुन्हा समोर आला आहे. चिंकारा शिकार झाली त्यावेळी म्हणजे 1998 मध्ये सलमान खानचा ड्रायव्हर असलेले हरिश दुलानी यांनी पुन्हा एकदा समोर येऊन सलमाननेच चिंकारा शिकार केली असल्याचं सांगितलं आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने सलमान खानची निर्दोष मुक्तता करण्यावर हरिश दुलानी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 
    हरिश दुलानी यांनी न्यायालयाने अनेकदा समन्स पाठवले होते. मात्र ते कोणत्याच सुनावणीला हजर नव्हते. 'मी सरकारी साक्षीदार झाल्याने मला धमक्या येत होत्या. मला जाणुनबुजून लांब राहावे लागत होते', असा दावा हरिश दुलानी यांनी केला आहे. 'चिंकारा शिकार प्रकरणानंतर ऑक्टोबर 1998 मध्ये दंडाधिका-यांसमोर दिलेल्या साक्षीवर मी ठाम असल्याचंही हरिश दुलानी यांनी सांगितलं आहे. जर मला न्यायालयाने समन्स पाठवला तर सलमान खाननेच चिंकाराची शिकार केली आहे हे मी पुन्हा सांगेन', असं हरिश दुलानी यांनी म्हटलं आहे. 
=============================================

'झिका' प्रतिबंधक औषधाचा शोध


  • वॉशिंग्टन: संपूर्ण जगात खळबळ उडवून देणाऱ्या झिका विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या औषधाचा शोध लावल्याचा दावा अमेरिकन संशोधकांनी केला आहे. १९४७ मध्ये यूगांडात हा विषाणू आढ़ळला होता. डासांपासून होणाऱ्या झिका विषाणू बाधित बाळ दोन दिवसापूर्वी स्पेन मध्ये जन्मले होते.









=============================================

सहाराने हॉटेल विक्रीचा प्रस्ताव नाकारला



  • लंडन : सहारा उद्योग समूहाने ब्रिटन आणि अमेरिकेतील आपल्या तीन प्रसिद्ध हॉटेलांच्या विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या एका समूहाने दिलेला १.३ अब्ज डॉलरचा प्रस्ताव धुडकावला आहे. या हॉटेलांची जास्त किंमत लावणाऱ्या इच्छुक खरेदारांना रोखण्याची खेळी म्हणून इतक्या कमी किमतीचा प्रस्ताव दिला गेला असल्याचा आरोप सहारा समूहाने केला आहे.
    गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सहारा समूहाकडून विदेशातील हॉटेले विक्रीला काढण्यात आली आहेत. गुंतवणूकदारांचे पैसे दिले नाही म्हणून सहाराचे प्रमुख सुब्रत राय तुरुंगात होते. हे पैसे देण्यासाठी मालमत्ता विकण्याचा प्रस्ताव सहाराने दिला होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले आहे.
    ब्रिटिश कंपनी जसदेव सग्गरच्या नेतृत्वाखालील ३ असोसिएटकडून ही हॉटेले खरेदी करण्याचा प्रस्ताव आला आहे. या असोसिएटमध्ये काही खाजगी संपत्ती व्यवस्थापन कंपन्यांचा समावेश आहे. सहाराच्या हॉटेलांसाठी १.३ अब्ज डॉलरचा प्रस्ताव त्यांनी दिला होता. तथापि, सहारा समूहाने त्यावर कडक प्रतिक्रिया दिली आहे. सहाराच्या प्रवक्त्याने सांगितले की, आलेला प्रस्ताव आधारहीन आहे. आमच्या मालमत्तांच्या बाजार मूल्यापेक्षा तो कितीतरी कमी आहे. या मालमत्तांची किंमत घसरविण्याची चलाखी यामागे आहे. या मालमत्ता खरेदी करू इच्छिणाऱ्या अन्य बोलीकर्त्यांना निराश आणि परावृत्त करण्यासाठी मुद्दाम कमी किमतीची बोली लावण्यात आली आहे.
=============================================
हिलरी याच सर्वांत योग्य उमेदवार: ओबामा

नवी दिल्ली - अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारमोहिमेस आता वेग आला असून राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या पार्श्‍वभूमीवर बोलताना डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्यापेक्षा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी लायक उमेदवार असू शकत नाही, असे मत व्यक्त केले.

"अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी क्‍लिंटन यांच्यापेक्षा लायक उमेदवार याआधीही कधी नव्हता. मी, बिल यांच्यापेक्षाही हिलरी या पदासाठीच्या अधिक योग्य उमेदवार आहेत,‘ असे ओबामा म्हणाले. ओबामा यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही यावेळी कठोर टीका केली. 
=============================================
भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद

जम्मू - जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झाल्याने महामार्ग बंद झाला आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामबाण जिल्ह्यात जम्मू-श्रीनगर मार्गावर भूस्खलन झाल्याने महामार्ग बंद झाला आहे. दरड हटविण्याचे काम सुरु असून, लवकरच महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. महामार्ग बंद असल्याने अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. जम्मूमध्ये बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला असून, अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

जम्मू-श्रीनगर हा 300 किमी अंतराचा महामार्ग हा काश्मीर खोऱ्याची लाईफलाईन आहे. काश्मीर खोऱ्यात पोहचण्यासाठी अमरनाथ पर्यटकांकडून हा मार्ग वापरण्यात येतो. पुरामुळे जम्मूतील जानीपूर भागात दोन मुलांचा, तर राजौरी जिल्ह्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

=============================================
चीनचे भारतात पुन्हा घुसखोरीचे दुःसाहस

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हेलिकॉप्टरच्या घिरट्या 
नवी दिल्ली - चिनी सैनिकांनी पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. चीनचे सैन्य आणि हेलिकॉप्टरने उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील बाराहोती क्षेत्रात घिरट्या घातल्याचे समोर आले आहे. दोन्ही देशांनी लष्करमुक्त भाग म्हणून सहमती दर्शविल्यानंतरही चीनने हे दुःसाहस केले आहे.

ही घटना 19 जुलै रोजी घडली. या दिवशी चामोलीचे जिल्हाधिकारी आणि इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) मधील काही अधिकारी बाराहोती भागाचे सर्वेक्षण करत होते, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. चायनीज पीपल्स लिबरेशन आर्मी पथकाने हा भाग त्यांचा असल्याचा दावा करत जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाला माघारी पाठविले होते, असेही सूत्रांनी सांगितले. चीनने घुसखोरी केल्याच्या वृत्ताला उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनीही दुजोरा दिला आहे. 

=============================================
पोकेमॉन - पोरखेळ की खेळखंडोबा !

अतिवास्तवतेचा आभास देणाऱ्या ‘पोकेमॉन गो‘ या नव्या व्हिडिओ गेमने जगभरात धुमाकूळ घातला आहे. यातून उद्‌भवणारे आरोग्य, सामाजिक आणि उन्मादाचे धोके टाळण्यासाठी निश्‍चित धोरण ठरवावे लागेल. 

‘एखादी 30 सेकंदांची जाहिरात लाखो रुपयांचा माल विकत असेल, तर एक तासाचा व्हिडिओपट त्यात दाखवलेल्या दृश्‍यांचे प्रेक्षकांवर गारुड का करणार नाही ?‘ एका हिंसक कार्टूनपटाचा परिणाम होऊन एका पौगंडावस्थेतील मुलाने विध्वंस केल्याच्या खटल्यात आरोपीच्या वकिलाने न्यायालयात हा प्रश्न उपस्थित केला, तेव्हा न्यायाधीशही क्षणभर अवाक्‌ झाले होते. व्हिडिओ गेम्स आणि हिंसा या विषयावरील एका पुस्तकात ही अमेरिकेत घडलेली सत्यकथा काही वर्षांपूर्वी वाचली होती. तेव्हा ‘आपला याच्याशी काय संबंध?‘ असे म्हणून ते विसरूनही गेलो होतो. पण तेव्हा असे नव्हते वाटले, की हे व्हिडिओ गेम्सचे वादळ आपल्यासमोरही असे काही काळजीत टाकणारे प्रश्न निर्माण करील. 


=============================================
पीक योजना प्रीमियमची मुदत वाढवावी - शेट्टी

नवी दिल्ली - नैसर्गिक आपत्तींपासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी आणलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा प्रीमियम भरण्याची 30 जुलै ही अंतिम मुदत वाढविण्यात यावी आणि 15 ऑगस्टपर्यंत प्रीमियम भरण्याची मुभा असावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज लोकसभेत केली. शून्यकाळामध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

महाराष्ट्रात गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. शिवाय हवामान खात्यानेही यंदा मॉन्सून उशिरा होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अद्यापही खरिपाच्या पेरण्या सुरू आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या थांबविण्याचे आवाहन केले होते, याकडे शेट्टी यांनी लक्ष वेधले ते म्हणाले, की केंद्र सरकारने ही पीकविमा योजना शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी सुरू केली आहे. मात्र महाराष्ट्रातील कृषी विभागाकडून या योजनेला थंडा प्रतिसाद आहे. सहकारी बॅंकांनीही शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्रचनेचे कारण देत केवळ कर्जधारक शेतकऱ्यांचाच विमा काढणे सुरू केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकाही शेतकऱ्यांना सहकारी बॅंकांकडे जाण्याचा सल्ला देत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. ते पाहता, सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा प्रीमियम भरण्याची मुदत 30 जुलैऐवजी 15 ऑगस्टपर्यंत वाढवावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. 


=============================================

No comments: