Monday, 18 July 2016

नमस्कार लाईव्ह १८-०७-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- चीन द. चिनी समुद्राचा भाग करणार "बंद'..? 
२- टर्की : 200 जणांचा बळी घेत टर्कीमधलं लष्करी बंड शमलं 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- पीए लाचखोरीनंतर दाऊद कॉलप्रकरणातही खडसेंना क्लीन चिट 
४- सिद्धूचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा, 'आप'मध्ये प्रवेश? 
५- BCCI मध्ये मंत्र्यांची लुडबूड नाही, सुप्रीम कोर्टाचा शिक्का 
६- देशात सुप्रिया सुळे अव्वल, धनंजय महाडिक दुसऱ्या क्रमांकावर 
७- नाव पाकिस्तान आहे, मात्र काम नापाक - राजनाथ सिंह 
८- IPL सामन्यादरम्यान ध्वनीप्रदूषण, BCCI, MCA ला हायकोर्टाची नोटीस 
९- विजय मल्ल्यांकडून रु.900 कोटींचा गैरव्यवहार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- गोल्डमॅन दत्ता फुगेंचा शर्ट सापडला! 
११- पूरक पोषण आहारात कुठलाही घोटाळा नाही, पंकजा मुंडे यांचा दावा 
१२- कोपर्डी बलात्कार: विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव? 
१३- पवारांच्या त्या वक्तव्याबाबत संभाजीराजे म्हणतात.... 
१४- कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- कोपर्डी बलात्कार : राज्यभरात निषेध, अनेक ठिकाणी शाळा बंद 
१६- साताऱ्यात जिवंत मगरीवर बसून तरुणाचा सेल्फी 
१७- सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून मेहेर तरार यांची 3 तास चौकशी 
१८- राजकारणात येण्याचा विचार नाही- हार्दिक पटेल 
१९- दिल्लीतील जुन्या वाहनांची नोंदणी रद्द होणार 
२०- केरळमध्ये दररोज चार मुलांवर होतो अत्याचार 
२१- कंटेनर-जीप अपघातात उदगीरजवळ नऊ ठार 
२२- श्रीनगर; जमावाच्या हल्ल्यात पीडीपीचे आमदार जखमी 
२३- कर्नाटकचे मंत्री केजे जॉर्ज यांचा राजीनामा 
२४- सोलापूर - जलसंधारण मंत्री राम शिंदे उद्या सोलापूर दौऱ्यावर 
२५- जळगाव : 8 टक्के अडतवरुन बाजार समितीत गोंधळ 
२६- सोलापूर : गाडी सोडण्यासाठी तिघांनी वाहतुक पोलीसाची केली धुलाई 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- मुंबई विमानतळावर सलमान खानची कर्मचाऱ्यांशी बाचाबाची 
२८- प्रार्थनासोबत माझी जोडी नक्की जमेल, सानियाला विश्वास 
२९- बिअरची बाटली, खेळाडूंची मस्ती; BCCIनं सुनावलं! 
३०- क्रिकेटपटू करुण नायर थोडक्यात बचावला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
====================================

गोल्डमॅन दत्ता फुगेंचा शर्ट सापडला!

गोल्डमॅन दत्ता फुगेंचा शर्ट सापडला!
पुणे गोल्डमॅन दत्त्ता फुगेंच्या हत्येनंतर आता त्यांचा साडेतीन किलो सोन्याचा शर्टही गायब झाल्याची चर्चा सुरु झाली होती. पण हा शर्ट रांका ज्वेलर्सकडे असल्याचा दावा दत्तात्रय फुगेचें चिरंजीव शुभम फुगेनं केला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव दत्ता फुगेंचा सोन्याचा शर्ट चिंचवडच्या रांका ज्वेलर्स या शाखेत ठेवण्यात आला. त्यानंतर पैश्यांची गरज भासल्यानं दत्ता फुगेंनी काही रक्कम रांका ज्वेलर्स यांच्याकडून घेतली होती. परंतू यासाठी अव्वाच्या सव्वा व्याजदर लावल्यानं रांका ज्वेलर्सविरोधात न्यायालयात दाद मागितल्याचंही शुभमनं सांगितलं आहे.
====================================

पूरक पोषण आहारात कुठलाही घोटाळा नाही, पंकजा मुंडे यांचा दावा

पूरक पोषण आहारात कुठलाही घोटाळा नाही, पंकजा मुंडे यांचा दावा
मुंबई पूरक पोषण आहाराचं 7500 कोटींचं टेंडर रद्द झाल्याचं वृत्त पंकजा मुंडे यांनी फेटाळून लावलं आहे. आज त्यांनी मुंबईत यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं. पत्रकार परिषदेदरम्यान पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ भाजप मंत्र्यांची फौज उभी राहिली होती.

शालेय पोषण आहाराचं वाटप हे महिला आणि बालकल्याण खात्याकडून केलं जात नाही, तसचं शालेय पोषण आहाराची रक्कम 7 हजार 500 कोटींची नसून, ती 3 हजार 952 कोटींची आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी पोषण आहाराचं टेंडर हे विकेंद्रीय पद्धतीनं न करता केंद्रीय पद्धतीनुसार केलं गेलं. त्यामुळे अनेक बचतगटांवर अन्याय झाला, असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. मात्र, या प्रक्रियेत कोणत्याही गैरमार्गाचा वापर झाला नसून पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
====================================

कोपर्डी बलात्कार: विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव?

कोपर्डी बलात्कार: विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव?
मुंबई : अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कारप्रकरणी चर्चा करण्यास नकार दिल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनाच लक्ष्य केलं आहे. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे.

कोपर्डी बलात्कारप्रकरणी विधानसभेत काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी तर विधानपरिषदेत धनंजय मुंडेंनी विधानपरिषदे स्थगन प्रस्ताव आणला होता. मात्र विधानसभेतील प्रस्ताव अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फेटाळला.

याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिल्यामुळे आज चर्चा करण्यास बागडे यांनी नकार दिला. एकीकडे मुख्यमंत्री आम्ही चर्चेसाठी तयार आहोत म्हणत होते, दुसरीकडे विरोधक आजच चर्चा करण्यासाठी आग्रह होते, मात्र अध्यक्षांनी चर्चेस नकार दिला. त्यामुळे विरोधक चांगलेच संतापले.

कोपर्डीत नववीत शिकणाऱ्या मुलीवर पाशवी बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. दिल्लीतील निर्भयाकांडापेक्षा हे प्रकरण अत्यंत थरकाप उडवणारं आहे. त्यामुळे याबाबत आजच चर्चा व्हायला हवी, अशी मागणी विरोधकांची होती.
====================================

पीए लाचखोरीनंतर दाऊद कॉलप्रकरणातही खडसेंना क्लीन चिट

पीए लाचखोरीनंतर दाऊद कॉलप्रकरणातही खडसेंना क्लीन चिट
मुंबई : राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसे आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यात फोनवरुन कोणतंही संभाषण झालं नाही, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसने हायकोर्टात दिली आहे.


हॅकरचा आरोप आणि खडसे अडचणीत
2014 ते 2015 दरम्यान दाऊद इब्राहिम आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरुन संभाषण झाल्याचा आरोप इथिकल हॅकर मंगेश भंगाळेने केला होता. 2014-15 या काळात हॅकिंग करुन दाऊदने कुणा-कुणाला कॉल केले होते, याची माहिती बाहेर आणली होती. त्यात आढळलेल्या 4 क्रमांकात एक नंबर खडसेंचा होता, असं त्याने म्हटलं होतं.
====================================

सिद्धूचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा, 'आप'मध्ये प्रवेश?

सिद्धूचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा, 'आप'मध्ये प्रवेश?
नवी दिल्ली : भाजपने शिफारस केलेले राज्यसभा खासदार नवज्योतसिंह सिद्धू यांनी अडीच महिन्यातच राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

महत्त्वाचं म्हणजे सिद्धू हे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

येत्या काही महिन्यात पंजाब विधानसभेसाठी निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिद्धू ‘आप’मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीवेळी सिद्धूला डावलून अरुण जेटली यांना तिकीट दिलं होतं. त्यावेळपासून सिद्धू नाराजा होता. मात्र राष्ट्रपती नियुक्त सदस्यत्वांद्वारे सिद्धूची नियुक्ती करुन भाजपने ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.

दोन महिन्यांपूर्वीच राज्यसभेच्या खासदारपदी राष्ट्रपतींकडून 6 जणांची नियुक्ती केली होती. या सहा जणांमध्ये सिद्धूचा समावेश होता. मात्र आता सिद्धूने राजीनामा दिला आहे.
====================================

मुंबई विमानतळावर सलमान खानची कर्मचाऱ्यांशी बाचाबाची

मुंबई विमानतळावर सलमान खानची कर्मचाऱ्यांशी बाचाबाची
मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांमध्ये वादविवाद झाला असल्याचे वृत्त समजतं आहे. सलमान विस्तारा एअरलाइन्सच्या विमानानं दिल्लीला रवाना होत असताना त्याची कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाली.
सलमान खान 15 मिनिटं उशीरा एअरपोर्टवर पोहचला. उशीरा पोहचल्यानं सलमानला विमानात प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे दबंग सलमान भलताच भडकला आणि त्याने कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.
====================================

प्रार्थनासोबत माझी जोडी नक्की जमेल, सानियाला विश्वास

प्रार्थनासोबत माझी जोडी नक्की जमेल, सानियाला विश्वास
मुंबईः रिओ ऑलिम्पीकमध्ये प्रार्थना ठोंबरेशी आपली जोडी नक्की जमेल, प्रार्थना एक तरुण खेळाडू आहे. तिच्या उत्साहाचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया टेनिस स्टार सानिया मिर्झाने प्रार्थना ठोंबरे बद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे.
सानिया मिर्झाच्या आत्मचरित्राचं काल मुंबईत बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी सानियाला प्रार्थना विषयी प्रश्न विचारण्यात आला. बार्शीची प्रार्थना ठोंबरे रिओ ऑलिम्पीकमध्ये सानियाच्या जोडीने खेळणार आहे. सानिया आणि प्रार्थना यांच्या जोडीबद्दल सध्या सगळीकडे चर्चा आहे.
प्रार्थना सध्या सानिया मिर्झाच्या हैदराबादच्या अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. रिओ ऑलिम्पीकमध्ये सानियाला दुहेरीमध्ये प्रार्थनाची साथ मिळणार आहे. प्रार्थना एक चांगली खेळाडू आहे. तिच्या यंग टॅलेंटचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया सानियाने दिली.
====================================

BCCI मध्ये मंत्र्यांची लुडबूड नाही, सुप्रीम कोर्टाचा शिक्का

आता BCCI मध्ये मंत्र्यांची लुडबूड नाही, सुप्रीम कोर्टाचा शिक्का
नवी दिल्ली : बीसीसीआयमध्ये यापुढे मंत्र्यांची लुडबूड चालणार नाही. कारण बीसीसीआयमधल्या सुधारणांसाठी लोढा समितीनं केलेल्या प्रमुख शिफारशी, सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारल्या आहेत.

त्यानुसार यापुढे मंत्र्यांना बीसीसीआयमध्ये पदाधिकारी होता येणार नाही. तसंच 70 वर्षांवरील व्यक्तीही BCCI पदाधिकारी होऊ शकत नाही. या आणि अशा अनेक शिफारशींना सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली.

स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी निकाल दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयच्या कारभारात सुधारणा सुचवण्यासाठी लोढा समितीची नियुक्ती केली होती.

या समितीनं केलेल्या अनेक महत्त्वाच्या शिफारशींवर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं.
====================================

पवारांच्या त्या वक्तव्याबाबत संभाजीराजे म्हणतात....

पवारांच्या त्या वक्तव्याबाबत संभाजीराजे म्हणतात....
नवी दिल्ली :  मराठा समाजालाही आरक्षण ही सध्याची गरज आहे. त्यासाठी संसदेच्या माध्यमातून आवाज उठवू, असं राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. त्यानिमित्ताने नवनिर्वाचित खासदारांनी आज शपथ घेतली.

यावेळी एबीपी माझाशी बोलताना संभाजीराजे म्हणाले,”बऱ्याच दिवसांनी राजघराण्याला न्याय मिळाल्यानं आनंद आहे. मराठा समाजाला आरक्षणासाठी आवाज उठवणार, यापुढेही काम चालू ठेवणार. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायलयात प्रलंबित आहे. मात्र चांगले वकील देण्यासाठी प्रयत्न करु”.

याशिवाय राजस्थानातल्या किल्ल्यांना अनुदान मिळते, पण  महाराष्ट्रातल्या का नाही? असा सवाल उपस्थित करत, त्यासाठी आपण प्रयत्न करु, असं संभाजीराजेंनी सांगितलं.
====================================

कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार

कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार
मुंबईविधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस कोपर्डी बलात्कारामुळे चांगलाच वादळी ठरला.मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी याबाबत निवेदन दिल्यानंतर विरोधकांनी चांगलचं रान पेटवलं.

केवळ निवेदन देऊन संपवण्यासारखा हा विषय नसून चर्चा करुन कठोर कायदा व्हायला हवा, अशा शब्दात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं. दिल्लीतल्या निर्भया बलात्काराइतकीच ही घटना गंभीर असून, राज्यात अशा घटना घडल्यानं निवडून आल्याचीही लाज वाटते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवारांनी घटनेचा निषेध केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनीही चर्चेची तयारी दर्शवली.

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तातडीने शिक्षा करावी, अशी मागणी अजित पवारांनी केली.

“आजपर्यंत राज्यात ज्या घटना घडल्या, त्यापेक्षा ही घटना वेगळी आहे. जसं दिल्लीत निर्भयाकांड झालं, त्यापेक्षा भयंकर कृत्य नगरमधील कर्जतच्या कोपर्डीत घडलं. चिमुकल्या मुलीवर पाशवी बलात्कार करुन, तिच्या गुप्तांगाची विटंबना केली. हे कृत्य इतकं भयंकर होतं की अंगावर शहारे उभे राहतील”, असं अजित पवार म्हणाले.
====================================

दत्ता फुगेच्या हत्येनंतर साडेतीन किलो सोन्याचा शर्ट गायब

दत्ता फुगेच्या हत्येनंतर साडेतीन किलो सोन्याचा शर्ट गायब
पिंपरी-चिंचवड : गोल्डमॅन दत्तात्रय फुगेच्या हत्येनंतर आता त्याचा साडेतीन किलो सोन्याचा शर्टही गायब झाला आहे. पिंपरीमध्ये दत्ता फुगेची 14 जुलै रोजी मुलासमोरच दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.
दत्ता फुगेच्या हत्येनंतर पोलिस तपास सुरु आहे. यात फुगेचा साडेतीन किलो सोन्याचा शर्ट गायब झाल्याचं समोर आलं आहे. शिवाय कुटुंबीयांनाही या शर्टबाबत माहिती नसल्याचं समजतं.
यासंदर्भात पोलिसांनी दत्ता फुगेचा मुलगा शुभमला विचारणा केली असता तो म्हणाला की, सोन्याचा शर्ट चिंचवडच्या रांका ज्वेलर्सकडे ठेवला होता. तर शर्ट बनवल्यानंतर इथे कधीही आणला नसल्याचा दावा रांका ज्वेलर्सने केला आहे. त्यामुळे शर्ट नेमका गेला कुठे, असा प्रश्न सध्या पोलिसांना पडला आहे.
फुगेने सोन्याचा शर्ट बनवल्यानंतर त्याच्यामागे आर्थिक अडचणी सुरु झाल्या. त्यातच त्याने सोन्याचा शर्ट विकला असावा, अशी शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.
====================================

कोपर्डी बलात्कार : राज्यभरात निषेध, अनेक ठिकाणी शाळा बंद

कोपर्डी बलात्कार : राज्यभरात निषेध, अनेक ठिकाणी शाळा बंद
नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटना, व्यापारी, सामाजिक संघटना यांनी पुकारलेल्या बीड जिल्हा बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. बीड, केज, धारूर, वडवणी, अंबाजोगाई या भागात सर्वसामान्य लोकांनी रस्त्यावर उतरून आरोपीना शिक्षा करण्याची मागणी केली. बंद दरम्यान तीन ते चार बसवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले.
मुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार हत्येप्रकरणी राज्यभरात निषेध नोंदवले जात आहेत.

या घटनेच्या निषेधार्थ व्यावसायिक बंद बरोबरच काही खेड्यांमध्ये शैक्षणिक बंद पुकारुन शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
====================================

देशात सुप्रिया सुळे अव्वल, धनंजय महाडिक दुसऱ्या क्रमांकावर

देशात सुप्रिया सुळे अव्वल, धनंजय महाडिक दुसऱ्या क्रमांकावर !
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.  सभागृहात जनतेचे प्रश्न पोटतिडकीने कोणता खासदार मांडणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.
केंद्रात मोदी सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष झाली आहेत. या दोन वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील खासदारांनी छाप पाडल्याचं चित्र आहे. कारण सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या देशभरातील पहिल्या 10 खासदारांपैकी 9 खासदार हे महाराष्ट्रातील आहेत.  यामध्ये पहिल्या चारपैकी तीन खासदार राष्ट्रवादीचेच आहेत.
सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे अव्वल स्थानी आहेत, तर कोल्हापूरचे राष्ट्रवादीचेच खासदार धनंजय महाडिक हे दुसऱ्या क्रमांकवर आहेत. शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील तिसऱ्या, तर सोलापूरचे राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील चौथ्या नंबरवर आहेत.
====================================

बिअरची बाटली, खेळाडूंची मस्ती; BCCIनं सुनावलं!

बिअरची बाटली, खेळाडूंची मस्ती; BCCIनं सुनावलं!
मुंबई: वेस्टइंडिजमध्ये गेलेली टीम इंडिया सध्या बरीच मजामस्ती करताना दिसून येत आहे. याचवेळी काही खेळाडूंनी बिअर पार्टी केली असल्याचीही चर्चा आहे. कारण की, त्याचे काही फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले आहेत. त्यांचे हे फोटो बीसीसीआयपर्यंतही पोहचले. त्यानंतर बोर्डानं खेळाडूंना चांगलेच खडे बोल सुनावले असल्याचं समजतं आहे.

21 जुलैपासून वेस्टइंडिज विरुद्ध पहिली कसोटी सुरु होणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाच्या खेळाडूमनी आपले काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर ते बरेच व्हायरल झाले आहेत.

वेस्टइंडिजमध्ये मजा-मस्ती करताना अनेक खेळाडू दिसून आले. त्यांचे बरेच फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळाले. पण यातील एका फोटोमध्ये टीम इंडियाचा युवा खेळाडू केएल राहुल, स्टुअर्ट बिन्नी आणि उमेश यादव हे सोबत दिसत आहेत. यामध्ये केएल राहुल आणि त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीच्या हातात बिअरची बाटली दिसत आहे.
====================================

सीईओचा दिलदारपणा, स्वत:चा पगार घटवला, कर्मचाऱ्यांचा वाढवला!

सीईओचा दिलदारपणा, स्वत:चा पगार घटवला, कर्मचाऱ्यांचा वाढवला!
मुंबई : जर तुम्हाला एखाद्याचे मनापासून आभार मानायचे असतील तर तुम्ही अनेक मार्ग अवलंबता, खरंय ना. काही जण शब्दांनी आभार मानतात तर काही जण स्पेशल करतात. अमेरिकेतील ‘ग्रॅव्हिटी पेमेंट्स’ या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सीईओ डॅन प्राईसचे आभार मानण्यासाठी असंच काहीतरी स्पेशल केलं.
कर्मचाऱ्यांनी त्यांचा 6 महिन्यांचा पगार साठवला आणि सीईओला ‘तेसला मॉडेल एस’ (Tesla Model S) ही लॅव्हिश कार भेट म्हणून दिली. तुम्हाचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. कर्मचाऱ्यांनी सीईओला महागडी कार गिफ्ट का दिली, असा प्रश्न नक्कीच पडला असेल. याचं कारण म्हणजे डॅन प्राईसने कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला होता आणि त्याचे आभार मानण्यासाठी कर्मचाऱ्यांनी केलेला हा खटाटोप.
डॅन प्राईसने सर्व कर्मचाऱ्यांचा कमीतकमी पगार तब्बल 70 हजार डॉलरपर्यंत (46,96,650 रुपये) वाढवला. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. कारण त्यांचा पगार अक्षरश: दुप्पट झाला होता. बरं एवढ्यावरच डॅन थांबला नाही, त्याने स्वत:चा पगार 1.1 मिलियन डॉलरवरुन (7,38,09,945 रुपये) सर्व कर्मचाऱ्यांप्रमाणेच 70 हजार डॉलर करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
====================================

साताऱ्यात जिवंत मगरीवर बसून तरुणाचा सेल्फी

साताऱ्यात जिवंत मगरीवर बसून तरुणाचा सेल्फी
सातारा : सेल्फीप्रेमींचा उतावीळपणा अनेकदा त्यांच्या जीवावर आला आहे. मात्र तरीही सेल्फीचं फॅड कमी होताना दिसत नाही. असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडला.
कण्हेर धरणाच्या परिसरात मगर असल्याचं गावकऱ्यांना समजलं. यावेळी तरुणांनी मगर पाहण्यासाठी धाव घेतली.
 यावेळी सुस्त पडलेल्या मगरीसोबत अनेकांनी टिंगल टवाळ्या सुरु केल्या.
कोणी मगरीला हात लाऊन हूसकवत होतं तर कोणी सेल्फीची हौस पुरवून घेतं होतं. एका दीड शहाण्यानं तर कमालच केली. चक्क मगरीवर बसून स्टंट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका तरुणाच्या हाताला गंभीर जखमही झाली आहे.
दरम्यान अशा स्टंटबाजीस्वारांवर कारवाई करण्याची मागणी प्राणीप्रेमींकडून होऊ लागली आहे.
====================================

नाव पाकिस्तान आहे, मात्र काम नापाक - राजनाथ सिंह



  • नवी दिल्ली, दि. १८ : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज (सोमवारी) सुरुवात झाली. कोणतेही विधेयक सादर होण्यापूर्वी काश्मीर हिंसाचारावर चर्चा सुरु झाली. या चर्चेदरम्यान पाकिस्तानला लक्ष करताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, जवान शहीद झाल्यानंतर कोणी उस्ताह करत असेल तर ती इंन्सानियत नाही. नाव पाकिस्तान आहे, मात्र त्यांचे काम नापाक आहे. त्यांना आमच्या अंतर्गत मामल्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. जम्मू कश्मीच्या मुख्यमंत्री महबूबा यांनी स्थिती सामान्या होण्यापर्यंत थांबण्याचा सल्ला दिला आहे, तेथिल स्थिती सामान्या झाल्यास आम्ही कश्मीरच्या नागरिकासोबत चर्चा करणार आहे. काश्मीर मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेऊन राष्ट्रहिताचा विचार सर्वच पक्षांतून व्यक्त केला गेल्याबद्दल मोदींनी विरोधी पक्षांचे आभार मानले. 
    राजनाथ सिंह पुढे बोलताना म्हणाले, परदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्मीर मुद्द्यावर बैठक घेतली होती.  कश्मीरमध्ये हिंसाचाराच्या ५६६ घटना घडल्या त्यामध्ये १९४८ नागरिक जखमी झाले आहेत. तर हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनी याचा ८ जुलै रोजी पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर खोऱ्यात उसळलेल्या हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ३६ वर गेलेली आहे.
====================================

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून मेहेर तरार यांची 3 तास चौकशी


  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. 18 - सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांची चौकशी करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही चौकशी केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही चौकशी करण्यात आली.  शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा दक्षिण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये १७ जानेवारी २०१४ रोजी मृतदेह सापडला होता.  
    सुनंदा यांनी पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार व थरुर यांच्या संबंधाबाबत ट्विट केल्यानंतर त्याच्या दुस-याच दिवशी त्यांचा मृतदेह आढळला होता. चौकशीसाठी मेहेर तरार भारतात आल्या होत्या. मध्य दिल्लीमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी डिसेंबर महिन्यात चौकशीत सहकार्य करण्यासंबंधी पत्र पाठवलं होतं, ज्याला मेहेर तरार यांनी सकारात्मक उत्तर दिलं होतं. 
====================================

IPL सामन्यादरम्यान ध्वनीप्रदूषण, BCCI, MCA ला हायकोर्टाची नोटीस


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १८ : २०१३ मध्ये मुंबईतील वानखेडे आणि पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर आयपीएलच्या सामन्यदरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम तोडल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयला हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने बीसीसीआय आणि एमसीएला यावर उत्तर देण्याचे आदेश दिल आहेत. या प्रकरणावरील पुढील सुनावणी १६ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
    दरम्यान, मुंबईतील वानखेडे आणि पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर 2013 मध्ये रात्री 8 वाजता सामने सुरू करण्यात आले. मध्यरात्री पर्यंत लाऊड स्पीकर्सचा वापर करून एमसीए आणि बीसीसीआयने ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर १००कोटींचा दंड आकारावा अशी याचिका हायकोर्टात दाखल झाली आहे. त्या याचिकेवर सुनावनी करताना हायकोर्टाने बीसीसीआय, एमसीएला स्पष्टीकरण देण्याची नोटीस पाठवली आहे.
====================================
राजकारणात येण्याचा विचार नाही- हार्दिक पटेल

उदयपूर-  मी कोणताही राजकीय पक्ष स्थापन करणार नसून, राजकारणात प्रवेश करण्याचा माझा कोणता हेतू नाही, असे प्रतिपादन पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने केले. न्यायालयाने त्याला नुकताच जामीन मंजूर केला असून, त्याने सहा महिन्यांकरिता गुजरात सोडावे, अशी अट घातली आहे. त्यानुसार हार्दिक उदयपूर येथे आला असून, या वेळी तो पत्रकारांशी बोलत होता.

हार्दिक म्हणाला, ‘मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही, तसेच उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये भाजपविरोधात प्रचारात उतरण्याचा विचारही मी केलेला नाही. यापुढे समाजकार्यास प्राधान्य देणार असून, शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाची मागणी सुरूच राहील. विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठीही मी प्रयत्न करणार आहे.‘

नऊ महिने तुरुंगात राहिल्यानंतर हार्दिकची जामिनावर सुटका झाली आहे. तो उदयपूर येथील कॉंग्रेसच्या एका माजी आमदाराच्या घरी राहणार असल्याचे समजते.
====================================
चीन द. चिनी समुद्राचा भाग करणार "बंद'..?

बीजिंग - दक्षिण चिनी समुद्र क्षेत्रामध्ये या आठवड्यामध्ये चिनी सैन्याचा लष्करी सराव होणार असल्याने या प्रदेशामधील विशिष्ट भागामध्ये इतरांना प्रवेशबंदी केली जाणार असल्याची अत्यंत संवेदनशील घोषणा चीनतर्फे आज (सोमवार) करण्यात आली. दक्षिण चिनी समुद्रावर चीनचा कोणताही अधिकार नसल्याचा स्पष्ट आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून नुकताच सुनाविण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून करण्यात आलेली ही घोषणा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

या आठवड्यामधील बुधवार ते गुरुवार या काळात होणाऱ्या या सैन्य सरावासाठी हैनान या चीनच्या बेटाच्या पूर्वेकडील सागरी प्रदेशामध्ये इतरांना प्रवेश दिला जाणार नाही, असे चीनने म्हटले आहे. हा भाग दक्षिण चिनी समुद्रामधील पॅरासेल आणि स्पार्टले बेटसमुहांपासून जवळ आहे. या दोन्ही बेटसमूहांवर चीनसहच अन्य देशांनीही दावा सांगितला आहे. 
====================================
मंत्र्यांना बीसीसीआयमध्ये प्रवेश नाही- न्यायालय

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) सदस्य म्हणून मंत्री व आयएएस अधिकाऱ्यांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी निकाल दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या कारभारात सुधारणा सुचवण्यासाठी लोढा समितीची नियुक्ती केली होती. या समितीने बीसीसीआयच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी केलेल्या अनेक महत्त्वाच्या शिफारशींवर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केले आहे. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींचे सहा महिन्यात अंमलबजावणी करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मंजूर करण्यात आलेल्या शिफारशींमध्ये प्रामुख्याने मंत्री व आयएएस अधिकाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहेत. पण, 70 वर्षांवरील व्यक्ती कार्यकारिणीत नसावी असेही सांगण्यात आले आहे. एका व्यक्तीकडे एक पद असावे. बीसीसीआयमध्ये खेळाडूंची संघटना असायला हवी. बीसीसीआयच्या व्यवहारांची कॅग मार्फत तपासणी करण्यात येईल. बीसीसीआयचा कारभार माहिती अंतर्गत कायद्यांतर्गत घेण्यासाठी संसदेने निर्णय घ्यावा. महाराष्ट्र व गुजरात या राज्यांत एकापेक्षा जास्त क्रिकेट संघटना असल्याने, यापुढे त्यांना रोटेशन पद्धतीने मतदान करावे लागेल.
====================================
दिल्लीतील जुन्या वाहनांची नोंदणी रद्द होणार

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे. राष्ट्रीय हरित लवादानेही याची दखल घेत दहा वर्षांपूर्वीच्या डिझेल वाहनांची नोंदणी रद्द करण्याचा आदेश दिल्ली वाहतूक प्राधिकरणाला सोमवारी दिला.

दिल्लीच्या प्रदूषणाने धोक्‍याची पातळी गाठली असून जगातील सर्वांत प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचा क्रमांक वर आहे. ही स्थिती बदलण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दिल्ली सरकारने नुकतीच वाहनांसाठी "सम-विषम‘ योजना राबविली होती. जुन्या गाड्या बाद करण्याचाही उपाय केला होता. न्यायालयानेही आदेश दिला होता. डिझेलवर चालणाऱ्या जड वाहनांची नोंदणी करण्यास मज्जाव करून सर्व डिझेल टॅक्‍सींचे रूपांतर "सीएनजी‘ करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने या वर्षाच्या सुरवातीस दिला होता. 
====================================
विजय मल्ल्यांकडून रु.900 कोटींचा गैरव्यवहार?
-

मुंबई: कर्ज बुडविण्यासंदर्भात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या विजय मल्ल्यांसमोर आणखी एक आव्हान निर्माण झाले आहे. सक्तवसुली संचलनालयाने युनायेट स्पिरिट्सच्या तक्रारींच्या आधारावर मल्ल्यांविरोधात 900 कोटी रुपयांच्या परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या आठवड्यात युनायटेड स्पिरिट्सने मल्ल्यांविरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या. कंपनीने केलेल्या चौकशीदरम्यान 1225 कोटी रुपयांचे ‘अनियमित व्यवहार‘ झाल्याचे आढळून होते. मल्ल्यांनी स्वतःकडे युएसएलची मालकी असताना सुमारे अर्धा डझनपेक्षा जास्त परदेशी कंपन्यांमध्ये बेकायदेशीर पद्धतीने निधी वळविल्याचा कंपनीचा आरोप आहे. सक्तवसुली संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी या आरोपाला दुजोरा दिला आहे. मल्ल्यांनी निधी वळविलेल्या बहुतांश कंपन्या ‘टॅक्स हॅवन्स‘मध्ये आहेत. युएसएलने सादर केलेल्या कागदपत्रांचा तपास सुरु झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. 
====================================
केरळमध्ये दररोज चार मुलांवर होतो अत्याचार
-

तिरुअनंतपुरम- केरळमध्ये दररोज चार मुलांवर लैंगिक अत्याचार होत आहे, अशी माहिती राज्याच्या गुन्हे विभागाने नुकतीच जाहिर केली आहे.

केरळच्या गुन्हे विभागाने गेल्या तीन वर्षांमध्ये मुलांवर होणाऱया लैंगिक अत्याचाराची माहिती जाहिर केली आहे. राज्यातील आकडेवारीनुसार दररोज चार मुलांवर लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सन 2013 मध्ये 1002 जणांवर तर 2015 मध्ये 1569 मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. यावर्षी पाच महिन्यातच 790 जणांवर लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हेगारांना शिक्षा होण्यामध्ये कायदा कुचकामी ठरत आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱयाने दिली.
====================================
क्रिकेटपटू करुण नायर थोडक्यात बचावला

कोची - केरळमधील पंपा नदीतून प्रवास करताना बोट बुडाल्याने भारतीय क्रिकेट करुण नायर थोडक्यात बचावला आहे. या बोटीतील दोघे जण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री पार्थसारखी मंदिरात सुरु असलेल्या वल्ला सद्या या उत्सावानिमित्त करुण नायर याठिकाणी जात होता. त्याच्यासह बोटीतून आणखी 100 जण प्रवास करत होते. पण, त्यांची बोट अचानक उलटली. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. बोट बुडाल्यानंतर काही क्षणांतच बचावासाठी बोट त्याठिकाणी आली आणि प्रवाशांना वाचविण्यात आले.

या बोटीतील अद्याप दोन प्रवासी बेपत्ता आहेत. बाकी नागरिकांना वाचविण्यात यश आल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले. 24 वर्षीय नायर हा कर्नाटककडून स्थानिक क्रिकेट खेळतो. नुकतेच झिंबाब्वे दौऱ्यादरम्यान त्याने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले होते.
====================================
कंटेनर-जीप अपघातात उदगीरजवळ नऊ ठार

क्रुझरचा चक्‍काचूर, अवैध वाहतुकीचे बळी
उदगीर - तालुक्‍यातील इस्मालपूरजवळ रविवारी (ता. 17) रात्री सातच्या सुमारास अवैध प्रवासी वाहतूक करणारी क्रुझर आणि कंटेनरच्या अपघातात नऊ प्रवासी ठार झाल्याची घटना घडली.

इस्मालपूरजवळ अहमदपूरहून येणारी क्रुझर गाडी (एमएच- 20, एक्‍यू- 6719) व उदगीरकडून अहमदपूरपकडे जाणारा कंटेनर (एमएच- 04, एएफ- 9604) यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात क्रुझर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात प्रवास करणाऱ्या नऊ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. त्यांची नावे अशी : राकेश नेताजी मादळे (उदगीर), बालाजी कांबळे, नरसिंग सोनवणे (शेल्हाळ), नामदेव शिंदे (इस्मालपूर), लक्ष्मीबाई जाधव, माधव जाधव (एकुर्का), अंतेश्वर शिवपुजे (देऊळवाडी), सन्ना दायमी (उदगीर), राजकुमार हलशेट्टे (मुचळंब).
या अपघातात राजकुमार बिरादार, गणेश लोहार व लक्ष्मण बिरादार हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या सध्या वाढली असून, उदगीरच्या इतिहासात आजपर्यंतचा हा सर्वांत मोठा अपघात मानला जात आहे. या अपघातातील कंटेनरचालक हा पळून जात होता; मात्र त्याच्या मनात निर्माण झालेल्या भीतीमुळे घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर त्याचा ताबा सुटून कंटेनर खड्ड्यात गेला. चालक तेथून कंटेनर सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला. याबाबत वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
====================================
जमावाच्या हल्ल्यात पीडीपीचे आमदार जखमी

श्रीनगर - श्रीनगरकडे जात असलेले सत्ताधारी पीडीपीचे आमदार मोहम्मद खलील बंध हे जमावाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वणीच्या मृत्यूनंतर गेल्या अकरा दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहे. आतापर्यंत याठिकाणी झालेल्या चकमकीत 40 हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. काश्मीर खोऱ्यात अद्याप संचारबंदी कायम आहे. आता प्रदर्शनकारी जमावाकडून सत्ताधारी आमदार मोहम्मद बंध यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

पुलवामा मतदारसंघातील आमदार असलेले मोहम्मद बंध आज (सोमवार) पहाटे श्रीनगरकडे येत असताना जमावाने त्यांच्या मोटारीवर दगडफेक केली. चालकाने गाडी जोरात नेण्याच्या प्रयत्न केल्यानंतर ती खड्ड्यात पलटली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बंध यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती रुग्णालयात पोहचल्या.
====================================

No comments: