Thursday, 14 July 2016

नमस्कार लाईव्ह १४-०७-२०१६ चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानचा बुरखा 'यूएन'मध्ये फाडला 
२- सिडनी; फक्त ‘ISIS’ सर्च केल्यानं तुरुंगात खितपत पडण्याची वेळ 
३- ऑपरेशन संकटमोचन : सुदानमधील भारतीयांना एअरलिफ्ट करणार 
४- पंतप्रधान म्हणून शेवटच्या भोजनात कॅमरुन यांनी मागवले भारतीय पदार्थ 
५- वॉशिंग्टन; ज्युनो यानाने पाठविले गुरुचे पहिले छायाचित्र 
६- कॅमेरुन यांचा शिफ्टींगचा 'तो' फोटो व्हायरल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
७- मुख्यमंत्री फडणवीसांच्या रशिया दौऱ्यात महत्त्वपूर्ण करार 
८- साडेतीन महिन्यांत बजेटमधील तेराच टक्के खर्च - मूनगुंटीवार 
९- ‘युवा पिढीने डोळे, कान उघडे ठेवून पोलिसांची मदत करावी’-मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर
१०- आता निर्वासितांनाही मिळणार भारतात हक्क 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
११- नवी मुंबई एपीएमसीमधील दलालांचा तूर्तास आडत न घेण्याचा निर्णय 
१२- भाजपमध्ये राक्षसराज, मुख्यमंत्री-पंकजा वादावर शिवसेनेचा टोला 
१३- शिवसेनेने केली मुख्यमंत्र्यांची वकिली 
१४- आडत न घेण्याच्या निर्णयानंतर एपीएमसीत व्यवहार सुरु 
१५- भाजपचेच लोक मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळतात-सेना 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१६- नागपूर; फुकटात पोहे खाणाऱ्या पोलिसाची चौकशी 
१७- बेळगाव; सीमावासियांना बेड्या ठोकणाऱ्या कन्नड पोलिसांनी दणका 
१८- बीड; पंचायतीत निवाडा न झाल्याने विवाहितेला जाळलं 
१९- लोणावळा; 'सेल्फी'चा मोह तरुणाच्या जीवावर बेतला 
२०- पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी नांदेडमध्ये पोलिस निरीक्षकावर गुन्हा 
२१- नवी मुंबईत घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या 
२२- पुणे; आयटी इंजिनीयरने डॉक्टर पत्नीचा मुलासमोर केला खून 
रायगड; मायलेकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२३- मुलगा की मुलगी, करीना-सैफने गर्भलिंग निदान चाचणी केली 
२४- बॅटचा आकार नाही तर खेळपट्ट्या बदलणं गरजेचं: तेंडुलकर 
२५- शाहरुखच्या उपस्थितीत सानियाच्या आत्मचरित्राचं प्रकाशन  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
=========================================
.

अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानचा बुरखा 'यूएन'मध्ये फाडला

अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानचा बुरखा 'यूएन'मध्ये फाडला !
नवी दिल्ली : दहशतवादी बुरहान वानीच्या खात्मानंतर पाकिस्ताने थयथयाट सुरु केला आहे. मात्र भारताने पाकिस्तानची नौटंकी थेट संयुक्त राष्ट्रांत उघडी पाडली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी, दहशतवादावरुन पाकिस्तानच्या बोगस मानवाधिकाराचा बुरखा टराटरा फाडला.

बुरहान वानीच्या खात्मानंतर गळा काढणारा पाकिस्तान, हा दहशवाद्याचा गड असल्याचा हल्लाबोल अकबरुद्दीन यांनी केला. काश्मीरमधील मानवाधिकाराची गोष्ट करणाऱ्या पाकिस्तानने स्वत:च्या घरात वाकून बघावं. जो देश स्वत:चं सोडून नेहमीच दुसऱ्या देशांकडे बघत असतो, त्याने मानवाधिकार शिकवू नये, असा खणखणीत टोला, अकबरुद्दीन यांनी संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन लगावला.

अकबरुद्दीन यांच्या या जबरदस्त वक्तव्यानंतर ते ट्विटरवर ट्रेण्ड होत आहेत.
.
=========================================

फुकटात पोहे खाणाऱ्या पोलिसाची चौकशी

माझा इम्पॅक्ट : फुकटात पोहे खाणाऱ्या पोलिसाची चौकशी
नागपूर : फुकट पोहे खाऊन ठेलेवाल्याकडूनच 9 हजार रुपये वसूल करणाऱ्या पोलिसाचा पर्दाफाश ‘एबीपी माझा’ने केल्यानंतर, आता पोलीस खात्याला जाग आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली आहे.

वरिष्ठ अधिकारी रवींद्र सिंह यांनी स्वत: रात्री उशिरापर्यंत सीताबर्डी पोलीस स्थानकात धाव घेऊन चौकशी केली. त्यांनी पीडित मुलाला बोलावून घेऊन, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं.

याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एका चौकशी समितीची नियुक्ती केली आहे.

दरम्यान पोलिसांनी पैसे उकळल्याप्रकरणी पीडित मुलाने तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप गुन्ह्याची नोंद झालेली नाही.

.
.
=========================================

फक्त ‘ISIS’ सर्च केल्यानं तुरुंगात खितपत पडण्याची वेळ

फक्त ‘ISIS’ सर्च केल्यानं तुरुंगात खितपत पडण्याची वेळ!
सिडनी : इस्लामिक स्टेट म्हणजेच आयसिसमध्ये भरती करणाऱ्या अरेबियन माणसाशी संवाद साधण्यासाठी मूळचा अमेरिकन असलेल्या आणि आता ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या अशेर खान याने गूगल ट्रान्सलेटचा वापर केला आहे, असा आरोप अमेरिकेच्या वकिलाने केला आहे. मात्र, गूगल ट्रान्सलेटच्या माध्यमातून आयसिसमध्ये सहभागासाठी प्रयत्न करणाऱ्या अशेरवर आयुष्यभर तुरुंगात खितपत पडण्याची वेळ आली आहे.

या प्रकरणात 21 वर्षीय अशेर खान दोषी आढळल्यास त्याला संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावं लागणार आहे. सप्टेंबरमध्ये सुनावणीदरम्यान अशेर दोषी आढळल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असं टेक्सासमधील डिस्ट्रिक्ट कोर्टाने म्हटलं आहे.

अशेर खान हा 2013 मध्ये होस्टनहून सिडनीला आपल्या कुटुंबासोबत राहायला गेला. आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियामध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता, असा आरोप अशेरवर ऑस्ट्रेलियात झाला आहे.

अमेरिकन वकिलाने फॉरेन्सिक रिपोर्ट्स सादर केले, ज्यामध्ये अशेरच्या आयफोन आणि कम्प्युटरमधील गूगल ट्रान्सलेटची हिस्ट्री, स्काईप चॅट मसेजिंग हिस्ट्री इत्यादी आहे.
.
.
=========================================

सीमावासियांना बेड्या ठोकणाऱ्या कन्नड पोलिसांनी दणका

सीमावासियांना बेड्या ठोकणाऱ्या कन्नड पोलिसांनी दणका
बेळगाव नेहमीच दंडुकशाहीचा वापर करणाऱ्या कर्नाटक पोलिसांना हायकोर्टाने चपराक लगावली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सात कार्यकर्त्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी पाच हजार रुपये कर्नाटक सरकारला द्यावे लागले. उच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे कर्नाटक सरकारने, बेळगावच्या जिल्हा पोलीस प्रमुखांना समितीच्या कार्यकर्त्यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश बजावावा लागला, अशी माहिती वकील महेश बिर्जे यांनी दिली .

महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूर येथे २६ ऑक्टोबर २००६ रोजी महामेळावा आयोजित केला होता. त्यावेळी मेळाव्यात सहभागी झालेल्या १०५ कार्यकर्त्यावर खुनाचा प्रयत्न म्हणून पोलिसांनी खटले दाखल केले होते.  त्यापैकी आठ जणांना न्यायालयात तारखेला हजर करायच्या वेळी न्यायालयात बेड्या घातलेल्या अवस्थेत आणण्यात आले होते.

ही बाब न्यायालयाच्या निदर्शनाला वकिलांनी आणली, पण आपल्या कक्षेत ही बाबा येत नसल्याचं न्यायालयाने सांगितले. यानंतर वकील महेश बिर्जे यांनी उच्च  न्यायालयात याचिका दाखल करून प्रत्येकी वीस हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली .
.
.
=========================================

मुलगा की मुलगी, करीना-सैफने गर्भलिंग निदान चाचणी केली?

मुलगा की मुलगी, करीना-सैफने गर्भलिंग निदान चाचणी केली?
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान लवकरच आई-बाबा होणार आहेत. करीना डिसेंबरमध्ये बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे. यासाठी दोघांची तयारीही सुरु आहे. दोघांचं होणारं बाळ मुलगा की मुलगी असेल, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी लंडनमध्ये गर्भलिंग निदान चाचणी केल्याचा आरोप होत आहे.


बॉलिवूडचं स्टर कपल अशी ओळख असलेल्या करीना आणि सैफचं हे पहिलंच बाळ आहे. सैफ आणि करीना 2012 मध्ये विवाहबद्ध झाले होते.
.

.
=========================================

ऑपरेशन संकटमोचन : सुदानमधील भारतीयांना एअरलिफ्ट करणार

ऑपरेशन संकटमोचन : सुदानमधील भारतीयांना एअरलिफ्ट करणार
नवी दिल्ली : दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या गृहयुद्धाचा फटका बसलेल्या 600 भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन संकटमोचन’ सुरु केलं आहे. परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह या ऑपरेशनचं नेतृत्त्व करणार आहेत. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबतची माहिती दिली.


या ऑपरेशनमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अमर सिन्हा, संयुक्त सचिव सतबीर सिंह आणि संचालक अंजनी कुमार हे तीन वरिष्ठ अधिकारी जनरल व्ही. के. सिंह यांच्यासोबत असतील. सुदानमधील भारतीय राजदूत श्रीकुमार मेनन आणि त्यांची टीम या ऑपरेशनला पार पाडत आहे. हवाईदलाची दोन C-17 ही विमानं सुदानमध्ये रवाना केली आहे.


हिंसेचं कारण
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या गटातील संघर्षामुळे सुदानला अंतर्गत यादवीने पछाडलं आहे. यामध्ये 200 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राष्ट्रपतींनी सोमवारीच युद्धविरामची घोषणा केली होती.
.
.
=========================================

नवी मुंबई एपीएमसीमधील दलालांचा तूर्तास आडत न घेण्याचा निर्णय

नवी मुंबई एपीएमसीमधील दलालांचा तूर्तास आडत न घेण्याचा निर्णय
नवी मुंबई : आडतीच्या मुद्द्यावर काल एकमत झाल्यानंतरही आज नवी मुंबईच्या व्यापारी आणि दलालांनी शेतकऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 8 टक्के आडत कुणी द्यायची, या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा तब्बल 500 ट्रक माल राहण्याची भीती होती. पण दलालांनी माघार घेत, तूर्तास कुणाकडूनही आडत घेणार नाही, अशी भूमिका घेतल्यानं भाजीपाल्याचं वितरण आता सुरु होणार आहे.

काल मुंबईत सरकार, शेतकरी प्रतिनिधी आणि अडत व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत आडत शेतकऱ्यांकडून वसूल न करणे, व्यापाऱ्यांनाही एपीएमसी कायद्याच्या बंधनातून मुक्त करणे, असे निर्णय घेण्यात आले. त्यानंतर आजपासून एपीएमसीमध्ये व्यवहार सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याप्रमाणे माल घेऊन शेतकरी बाजार समितीमध्ये दाखल झाले. पण पुन्हा तोच प्रश्न समोर आला, आडत द्यायची कुणी? शेतकऱ्यांचा माल बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी वसूल केली जाणारी आडत देण्यास व्यापारीही तयार नव्हते. त्यामुळे बाजार समितीतल्या दलालांनी आडतीशिवाय माल घेणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे नाशवंत असलेल्या मालाचं करायचं काय? असा प्रश्न उभा राहिला.
.
.
=========================================

भाजपमध्ये राक्षसराज, मुख्यमंत्री-पंकजा वादावर शिवसेनेचा टोला

भाजपमध्ये राक्षसराज, मुख्यमंत्री-पंकजा वादावर शिवसेनेचा टोला
मुंबई : जलसंधारण खात्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामधील वादात आता शिवसेनेने उडी घेतली आहे. भाजप नेत्यांमधील अंतर्गत धुसफुशीला राक्षसाची उपमा देत शिवसेनेने मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.


काश्मीरचं खोरं पेटलेलं असतानाही भाजपचा एक आमदार चकार शब्द काढत नाही. मात्र महाराष्ट्रात वेगळंच सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा, कुजबुज मोहिमा चालल्या आहेत. पुतळे जाळून निषेध केला जात आहे. पण हे भाजपाअंतर्गत धुमशान आहे. मुख्यमंत्री फक्त भाजपाचे नसून महाराष्ट्राचे आहेत याचे भान ठेवायला हवे. आपणच आपल्या मुख्यमंत्र्यांची बेइज्जत केली तर या अनागोंदीस राक्षसराज म्हणावे लागेल. मुख्यमंत्र्यांना आता अधिक सावधान राहावे लागेल, असं ‘सामना’त म्हटलं आहे.
.
.
=========================================

मुख्यमंत्री फडणवीसांच्या रशिया दौऱ्यात महत्त्वपूर्ण करार

मुख्यमंत्री फडणवीसांच्या रशिया दौऱ्यात महत्त्वपूर्ण करार
मॉस्को : महाराष्ट्र सरकार आणि रशियामध्ये महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून आज मुख्यमंत्री आणि सेंट पीटर्सबर्गचे गव्हर्नर जॉर्जी पोल्तॉवचेंको यांनी पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया विषयक सामंजस्य
करारावर स्वाक्षरी केलीय.

या करारानुसार सेंट पीटर्सबर्गकडून महाराष्ट्राला तांत्रिक आणि इतर धोरणात्मक स्वरुपाचे सहकार्य महाराष्ट्राला मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबईतल्या मिठी नदीसह इतर नद्याच्या शुद्धीकरणासाठी वोडोकॅनोल संस्थेची मदत घेतली जाणार आहे.

या करारासोबतच नगरविकास, स्मार्टसिटीची उभारणी, जहाजबांधणी, माहिती तंत्रज्ञान, उच्चशिक्षणाबाबतही सेंट पीटर्सबर्गकडून महाराष्ट्राला सहकार्य मिळेल.
.
.
=========================================

पंचायतीत निवाडा न झाल्याने विवाहितेला जाळलं

पंचायतीत निवाडा न झाल्याने विवाहितेला जाळलं
बीडः पती-पत्नीच्या टोकाला गेलेल्या वादानंतर रितसर फारकत घेण्यासाठी पंचायतीची बैठक बोलावली. परंतु त्यातही निवाडा न झाल्यामुळे विवाहितेला जाळून विहिरीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार गेवराई तालुक्यातील उमापूर येथे उघडकीस आला घडला आहे.


संगीता उर्फ लक्ष्मी एकनाथ कुऱ्हाडे असे पीडित विवाहितेचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी संगीताचा विवाह झाला होता. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सासरच्या चार जणांना अटक करण्यात आली आहे.

ट्रॅक्टर खरेदीसाठी पैसे न आणल्याने कृत्य
उमापूर हे संगीता यांचे आजोळ असून तेथे सोमवारी पंचायतीची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी संगीता आपल्या आई- वडिलांसमवेत उमापूर येथे आजोबा शंकर कुऱ्हाडे यांच्याकडे आल्या. तेथे तिचा पती एकनाथ कुऱ्हाडे, सासरा चंद्रभान कुऱ्हाडे, सासू फुलाबाई कुऱ्हाडे हे देखील उपस्थित होते.
.
.
=========================================

पोह्याचे पैसे घेतल्याने पोलिसाची सटकली, ठेलेवाल्याकडून खंडणी

पोह्याचे पैसे घेतल्याने पोलिसाची सटकली, ठेलेवाल्याकडून खंडणी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 15 दिवसांपूर्वी तुली इंटरनॅशनल परिसरात कार्यक्रम होता. त्यासाठी पोलीस रामदास पेठ परिसरात बंदोबस्ताला होते. बराच उशीर झाल्यानं त्यांना भूक लागली आणि त्यांनी ठेला गाठला. एका मुलाच्या ठेल्यावर पोहे आणि चहाचा नाश्ता केल्यावर बिल झालं 105 रुपये. ते या मुलानं वसूलही केलं, पण त्याची शिक्षा त्याला रविवारी मिळाली.
रविवारी मुलाला पोलिसांनी पकडून नेलं. हे ऐकताच त्याचे काका घाबरले. त्यांनी पोलीस ठाणं गाठलं, तर फुकट्या पोलिसांचा पारा चढलेला. फक्त पोह्याचे 105 रुपये घेतले, म्हणून सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून 9 हजार रुपये वसूल केले.
या मुलाची परिस्थिती गरीबीची आहे. घरात खाणारी तोंडं जास्त. त्यामुळे दिवसभर पोह्याचा ठेला चालवायचा, आणि रात्रशाळेत शिकायचं, असा त्याचा दिनक्रम. एवढे कष्ट करुन त्याच्या नशीबी आली ती पोलिसांची मुजोरी.
पोलिसांनी अडल्या-नडलेल्यांना मदत करणं अपेक्षित आहे, इथं पोलीस फुकटेगिरीत, हप्तेखोरीत आणि खंडणीखोरीत दंग आहेत. त्यामुळे पुन्हा अशी घटना होऊ नये, असं वाटत असेल तर सीताबर्डी पोलिसांवर खंडणीखोरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
.
.
=========================================

'सेल्फी'चा मोह तरुणाच्या जीवावर बेतला

'सेल्फी'चा मोह तरुणाच्या जीवावर बेतला
लोणावळा: लोणावळा शूटिंग पॉईंटवर मद्यधुंद अवस्थेत सेल्फी काढण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला आहे. मंगळवारी सायंकाळी एक तरुण मद्यधुंद अवस्थेत सेल्फी काढण्यासाठी झाडावर चढला. पण, त्याचवेळी त्याचा पाय घसरला आणि तो थेट साडेतीनशे फूट खोल दरीत पडला. त्याच्यासोबत असलेल्या पंचम रविदास नावाच्या मित्रानं याची माहिती लोणावळा पोलिसांना दिला.

पंचम मध्यधुंद अवस्थेत असल्याने त्याला मित्राचे नाव सांगता आले नाही. पंचमने याची माहिती लोणावळा पोलिसांना देताच, पोलिसांनी शिवदुर्ग टीम सोबत रात्री दहा वाजता युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू केली.

पाऊस आणि अंधार यामुळे शोध मोहीम मध्यरात्री थांबवून आज सकाळी पुन्हा शोधकार्यास सुरुवात झाली. अखेर १८ तासानंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यात लोणावळा पोलीस आणि शिवदुर्ग टीमला यश आलं.
.
.
=========================================

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी नांदेडमध्ये पोलिस निरीक्षकावर गुन्हा

पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी नांदेडमध्ये पोलिस निरीक्षकावर गुन्हा
नांदेड : आत्महत्या करणाऱ्या पत्नीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात सोडून पोलीस निरीक्षकानं पोबारा केल्याची घटना नांदेडमध्ये उघडकीस आलीय. या प्रकरणी पत्नीच्या नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कित्तेविरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय.

शिवप्रसादची पत्नी संगीता कित्तेनं गळफास लावून आत्महत्या केली. संगीतानं माहेरुन 27 लाख रुपये आणावे म्हणून शिवप्रसादनं तिचा छळ मांडला होता, अशी तक्रार संगीताच्या नातेवाईकांनी केलीय. याच छळाला कंटाळून संगीतानं आत्महत्या केल्याचा त्यांचा आरोप आहे.

दरम्यान या प्रकरणातील आरोपी पोलीस निरीक्षक असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यास विलंब होत असल्याचा आरोप होतोय.
.
.
=========================================

नवी मुंबईत घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या

नवी मुंबईत घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या
नवी मुंबई: नवी मुंबई पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गजाआड केलं आहे. संतोष धनगाव असं या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 6 लाख 85 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त केला आहे. या चोरट्यावर नवी मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत.

संतोष, कळंबोलीत सोनं विकण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संतोषला गजाआड केलं.

नवी मुंबईत गेल्या वर्षभरात 245 घरफोड्या झाल्या आहेत. यापैकी 168 घरफोडीच्या प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांनी यश आलं आहे. आतापर्यंत चार टोळ्यांना जेरबंद करत पोलिसांनी तब्बल 63 लाखाचा मुद्देमालही जप्त केला आहे.
.
.
=========================================

बॅटचा आकार नाही तर खेळपट्ट्या बदलणं गरजेचं: सचिन तेंडुलकर

बॅटचा आकार नाही तर खेळपट्ट्या बदलणं गरजेचं: सचिन तेंडुलकर
मुंबई: ‘बॅटचा आकार नाही तर खेळपट्ट्या बदलण्याची गरज आहे. ज्यामुळे गोलंदाजांना आपलं कौशल्य दाखवता येईल,’ असं स्पष्ट मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं व्यक्त केलं आहे. बॅटचा आकार बदलण्याबाबत सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यावरच सचिनने ही प्रतिक्रिया दिली आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगनं बॅटच्या आकाराबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता बॅटच्या आकारात बदल होण्याच शक्यता आहे. फलंदाजांचा वाढता दबदबा पाहता विश्व क्रिकेट समितीनं मंगळवारी बॅटच्या लांबी आणि जाडीबद्दल काही सूचना दिल्या आहेत.

क्रिकेट नियामक संस्था एमसीसीच्या 2014च्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, मागील काही वर्षात बॅटच्या जाडीमध्ये 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्यामुळे कधीकधी चुकीचा फटकाही सीमा रेषेपार जातो.

जर बॅटसंबंधी नियमात बदल केल्यास ऑक्टोबर 2017 पासून फलंदाजांना नव्या बॅटनं खेळावं लागणार आहे.
.
.
=========================================

शाहरुखच्या उपस्थितीत सानियाच्या आत्मचरित्राचं प्रकाशन

शाहरुखच्या उपस्थितीत सानियाच्या आत्मचरित्राचं प्रकाशन
हैदराबादः भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा हैदराबादमध्ये पार पडला. बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान यावेळी उपस्थित होता. ‘एस अगेन्स्ट ऑड्स’ हे सानियाचं आत्मचरित्र तिच्या आजवरच्या वाटचालीवर प्रकाश टाकतं.


सानियानं या पुस्तकात आपल्या भोवती निर्माण झालेल्या वादांवरही भाष्य केलं आहे. हैदराबादसह भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हे आत्मचरित्र लवकरच चाहत्यांसाठी उपस्थित होणार आहे.
.
.
=========================================

शिवसेनेने केली मुख्यमंत्र्यांची वकिली


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. १४ - भाजपतंर्गत मुख्यमंत्र्यांविरोधात असणारी नाराजी ज्या प्रकारे जाहीरपणे व्यक्त केली जात आहे त्यावर आज सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखातून पंकजा मुंडे यांना काही गोष्टी सुनावल्या आहेत. त्यांच्याकडून जलसंधारण खाते काढून घेतल्यानंतर पंकजा मुंडेंनी लगेच जाहीरपणे टि्वटरवरुन नाराजी व्यक्त केली होती. 
    त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला होता. त्यावर मुख्यमंत्री फक्त भाजपाचे नसून महाराष्ट्राचे आहेत याचे भाजप नेत्यांनी भान ठेवावे असे म्हटले आहे. अग्रलेखात काश्मीरच्या मुद्यावरुनही भाजप नेत्यांना टोले लगावले आहेत. मेहबुबा मुफ्तीचे सरकार साफ अपयशी ठरले आहे व अख्खे कश्मीर खोरे पेटले आहे. भाजपचा एकही आमदार किंवा मंत्री त्यावर संताप व्यक्त करीत नाही. महाराष्ट्रात मात्र वेगळेच सुरू आहे असे अग्रलेखात म्हटले आहे. 
.
.
=========================================

आडत न घेण्याच्या निर्णयानंतर एपीएमसीत व्यवहार सुरु


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. १४ - सरकार, व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्यानंतरही गुरुवारी सकाळी अाडत कमिशनवरुन वाद झाल्याने नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत व्यवहार ठप्प झाले होते. बाजारपेठेत ४०० पेक्षा जास्त ट्रक भरुन आलेला भाजीपाल्याचा माल पडून होता. 
    शेतक-याकडून अडत न घेण्याचा निर्णय झाल्यानंतरही नवी मुंबईतील व्यापारी, दलालांनी शेतक-याकडून अाडत वसुलीचा प्रयत्न केला. किरकोळ व्यापा-यांनी आठ टक्के अाडत भरण्यास नकार दिला. त्यामुळे अडत कोण भरणार यावरुन झालेल्या वादातून सकाळी व्यवहार ठप्प झाले होते. अखेर दलालांनी माघार घेत कोणाकडूनही आज अडत वसुली न करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर बाजारपेठेतील माल उचलला गेला. 
.
.
=========================================

पंतप्रधान म्हणून शेवटच्या भोजनात कॅमरुन यांनी मागवले भारतीय पदार्थ


  • ऑनलाइन लोकमत 
    लंडन, दि. १४ - ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हीड कॅमेरुन यांनी १० डाऊनिंग स्ट्रीट या आपल्या कार्यालयात शेवटचे भोजन घेताना भारतीय पदार्थांची ऑर्डर केली होती. मध्य लंडनमधील केनिनग्टॉन तंदुर या हॉटेलने टि्वट करुन कॅमरुन यांच्या कार्यालयात भारतीय पद्धतीच्या अन्नपदार्थांची डिलीव्हरी पोहोचवल्याची माहिती दिली. 
    हैदराबादी चिकन, काश्मीरी रोगान जोश, नशीली गोस्ट, चिकन झलफ्राझी, साग आलू, साग पनीर, पालक गोस्ट, व्हेज समोसा, नान ब्रेड असे भारतीय पद्धतीचे पदार्थ मागवले होते. सर्वपक्षीय राजकारण्यांचे हे पसंतीचे हॉटेल आहे. १९८५ साली केनिनग्टॉन तंदुरहॉटेल चालू झाल्यापासून १० डाऊनिंग स्ट्रीटचे रहिवाशी या हॉटेलमधल्या रुचकर अन्नपदार्थांचा स्वाद घेत आहेत. 
    कॅमरुन यांना भारतीय पद्धतीचे जेवण आवडते. कार्यालयाच्याच बाजूला कॅमरुन यांचे घर होते. नॉटिंग हिल भागात कॅमरुन यांचे स्वत:चे घर आहे. पण ते मध्य लंडनमध्ये भाडयाच्या घरात रहायला जाणार आहेत. 
.
.
=========================================

आयटी इंजिनीयरने डॉक्टर पत्नीचा मुलासमोर केला खून


  • ऑनलाइन लोकमत 
    पुणे, दि. १४ -  संगणक अभियंता पतीने डॉक्टर असलेल्या पत्नीचा तिच्याच दवाखान्यात धारदार हत्यारांनी वार करीत खून केल्याची घटना वाकड येथे रात्री साडेआठच्या सुमारास घडली. आईचा वडीलांकडून खून होताना पाहिलेला तीन वर्षांचा मुलगा बाहेर येऊन जोरजोरात रडू लागल्यावर ही घटना उघडकीस आली. शेजारच्या दुकानदाराने धावत पोलीस चौकीमध्ये जाऊन माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी धावले. 
    नंदीनी मनोज पाटीदार (वय 30, रा. वाकड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती मनोज पाटीदार (वय 33) याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदीनी या डॉक्टर होत्या. त्यांचा वाकडमध्येच आशिर्वाद रिजेन्सीमध्ये मदर केअर नावाचा दवाखाना आहे. तर मनोज संगणक अभियंता असून एका खासगी आयटी कंपनीमध्ये नोकरीस आहे.
.
.
=========================================

मायलेकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


  • वावोशी/रायगड : मुलाचे हृदयविकाराने निधन झाल्याचे समजताच धक्क्याने आजारी असलेल्या आईनेदेखील प्राण सोडल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना खालापूर गावात घडली.
    गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक दिवंगत गोविंदराव बोंदाऱ्डे यांच्या पत्नी कमला (८६) काही दिवसांपासून आजारी होत्या. कमलाबाई यांना खोपोलीतील डोंगरे रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री यांचा मोठा मुलगा प्रकाश (६५) कु टुंबासहआईला जेवणाचा डबा घेऊन गेले होते. सोमवारी आठ वाजण्याच्या सुमारास प्रकाश आईच्या शेजारी स्टूलवर बसत होते. त्या वेळी स्टूलचा अंदाज न आल्यामुळे पाठीमागे तोल जाऊन ते कोसळले. त्या वेळी प्रकाश यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लोखंडी बेडचा कोपरा लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. डोंगरे रुग्णालयातील डॉक्टर कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे प्रकाश यांना तातडीने खोपोलीतील डॉ. मोहिते रुग्णालयात हलविण्याचे ठरले. याच दरम्यान प्रकाश यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने खोपोलीतील रुग्णालयात पोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
    मुलाला लागलेला मार पाहून व्यथित झालेल्या कमलाबाई यांनी नातेवाईकांकडे प्रकाशच्या तब्येतीची विचारपूस केली. मुलाच्या बाबतीत काहीतरी अघटित घडलेय, याची कल्पना आल्यानंतर सोमवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास कमलाबाई यांनादेखील हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले. काही तासांच्या अंतराने बोंदाऱ्डे कुटुंबावरओढावलेल्या संकटामुळे संपूर्ण खालापूर गाव सुन्न झाले. मंगळवारी शोकाकुल वातावरणात आई आणि मुलावर खालापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 
.
.
=========================================

साडेतीन महिन्यांत बजेटमधील तेराच टक्के खर्च


  • अतुल कुलकर्णी,  मुंबई
    एप्रिल ते १५ जुलै या कालावधीत राज्याच्या एकूण बजेटच्या फक्त १३ टक्के निधी खर्च झाला असून, यातील बहुतांश भाग हा पगार, निवृत्तीवेतन यावर खर्च झाला आहे. गेल्या साडेतीन महिन्यात विकासकामांवर फारसा निधी खर्ची पडलेला नाही. मात्र, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत एकूण बजेटच्या ६० टक्के बजेट खर्च होण्याची आजवरची प्रथा रोखण्यासाठी आपले सरकार प्रयत्न करत आहे, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
    साडेतीन महिन्यांत मिळालेल्या एकूण बजेटच्या ३५.२८ टक्के खर्च करून मुख्यमंत्र्यांकडे काही काळ असणाऱ्या कृषी खात्याने आणि वन विभागाने यात पहिला नंबर मिळवलेला असून, गिरीश बापट यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा विभागाने फक्त १.२० टक्के निधी
    खर्च करून खालून पहिला नंबर मिळवलेला आहे.
.
.
=========================================

‘युवा पिढीने डोळे, कान उघडे ठेवून पोलिसांची मदत करावी’


  • मुंबई: मुंबई शहर अधिक सुरक्षित व्हावे व काही समाजविघातक कृत्य घडले अथवा घडत असल्यास पोलिसांना त्वरित पावले उचलणे शक्य व्हावे, यासाठी युवा पिढीने डोळे व कान उघडे ठेवून पोलिसांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी केले आहे.
    निवृत्त ज्येष्ठ पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांच्या अध्यक्षतेखालील ‘पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेने ‘रिस्पॉन्सिबल युथ सेफर सिटी डायलॉग’ या कार्यक्रमांतर्गत अलीकडेच युवा पिढीचा आणि खास करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पोलीस आयुक्तांशी खुल्या संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी आयुक्त पडसलगीकर बोलत होते. या मुक्त संवाद कार्यक्रमात ९५ युवक-युवकांनी भाग घेतला.
    पोलिसांच्या कामात लोकांचा सक्रिय सहभाग व सहकार्य मिळाले, तरच मुंबई शहर अधिक सुरक्षित होऊ शकेल, यावर पोलीस आयुक्तांनी भर दिला व आजच्या ‘स्मार्ट’ तरुण पिढीने यात विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. पावसाळा संपल्यावर शहरातील वाहतुकीचे नियमन करण्यात तरुण स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्याचा कार्यक्रम हाती घेण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखविला.
.
.
=========================================

ज्युनो यानाने पाठविले गुरुचे पहिले छायाचित्र


  • वॉशिंग्टन : १० दिवसांपूर्वी गुरु ग्रहाच्या कक्षेत पोहोचलेल्या ‘नासा’च्या ज्युनो या अंतराळयानाने आपल्या सूर्यमालेतील या सर्वात मोठ्या ग्रहाचे पाठविलेले पहिले छायाचित्र पृथ्वीवर पाठविले आहे.
    ज्युनो कॅमेऱ्याने १० जुलै रोजी टिपलेले हे छायाचित्र सुमारे २.७ अब्ज किमी अंतरावरून ‘नासा’च्या नियंत्रण कक्षात पोहोचायला दोन दिवस लागले. या छाचाचित्रात तप्त वायूचा महाकाय गोळा असलेला रंगीत पट्ट्यांचा गुरु ग्रह व त्याच्या चार सर्वात मोठ्या चंद्रांपैकी लो, युरोपा व गेनीमेड हे चंद्र दिसतात. गुरुच्या कक्षेत शिरल्यानंतर प्रदक्षिणा मार्गात स्थिरावत असताना, सुमारे ४.३ दशलक्ष किमी अंतरावरून घेतलेले हे छायाचित्र सुस्पष्ट नसले, तरी गुरुच्या पृष्ठभागावरील ‘रेड स्पॉट’ म्हणून ओळखला जाणारा प्रखर ठिपका त्यात दिसतो. गुरुच्या वातावरणात हजारो वर्षे सुरू असलेल्या अतिउच्च ऊर्जेच्या वादळाची खूण म्हणून हा ‘रेड स्पॉट’ ओळखला जातो.
    गुरुच्या कक्षेतील २७ महिन्यांच्या वास्तव्यात ज्युनो यान या ग्रहाच्या ध्रुव प्रदेशावरून ३७ प्रदक्षिणा घालणार असून, त्याच्याकडून अधिक सुस्पष्ट छायाचित्र २७ आॅगस्ट रोजी
    मिळणे अपेक्षित आहे, असे सांगण्यात आले. 
.
.
=========================================
कॅमेरुन यांचा शिफ्टींगचा 'तो' फोटो व्हायरल

लंडन - ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा 2007 मधील घरसामान शिफ्टिंग करतानाचा फोटो पुन्हा एकदा सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

सोशल नेटवर्किंगवर कॅमेरुन यांचा फोटोसह कॅमेरुन 10 डाऊनिंग स्ट्रीटवरून शिफ्ट होताना कामगारांना मदत करत आहेत. जगातील तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता असलेल्या ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांकडून आपण शिकले पाहिजे. त्यांनी दाखविलेली मानवता आणि नम्रपणा याचा आपण आदर केला पाहिजे, असे लिहिण्यात आले आहे.

‘डेलीमेल‘ या वृत्तपत्राने याबाबतचा खुलासा करत कॅमेरुन यांचे हे छायाचित्र 2007 मधील असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी याबरोबरच त्यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेला लेखही दिला आहे. लंडनमधील नॉर्थ केनसिंग्टन येथून घराचे शिफ्टींग करत असताना कॅमेरुन खोके घेऊन जातानाचा हा फोटो आहे. 

ब्रिटनने ‘ईयू’मधून एक्‍झिट घेतल्यानंतर मोठी उलथापालथ झाली होती. यामुळे कॅमेरॉन यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. कॅमेरॉन यांनी राणी एलिझाबेथ-द्वितीय यांची भेट घेऊन आपण राजीनामा देत असल्याचे स्पष्ट करत ‘10, डाउनिंग स्ट्रीट’ला निरोप दिला.
.
.
=========================================
आता निर्वासितांनाही मिळणार भारतात हक्क

नवी दिल्ली - केंद्र सरकारने भारताशेजारील राष्ट्रांतून आलेल्या निर्वासितांना मोठा दिलासा दिला आहे. आता शेजारी राष्ट्रांतून दीर्घकालीन व्हिसावर भारतात आलेल्या अल्पसंख्याक लोकांना भारतात बॅंक खाते उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय भारतात जमीन खरेदी करण्याचीही परवानगी देण्याचा निर्णय घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिस्ती या अल्पसंख्याक समाजातील जे लोक भारतात दीर्घकालीन व्हिसा घेऊन आले आहेत अश्यांना ही सुविधा मिळणार आहे.

या सुविधेबरोबरच या नागरिकांना पॅन कार्ड, आधार क्रमांक आणि वाहनचालक परवाना देखील मिळू शकणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे परदेशातून येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच केंद्र सरकारने निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती केल्याचेही बोलले जात आहे.
.
.
=========================================
भाजपचेच लोक मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळतात-सेना
- - वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जुलै 2016 - 10:04 AM IST

मुंबई - मेहबुबा मुफ्तीचे सरकार साफ अपयशी ठरले आहे व अख्खे कश्मीर खोरे पेटले आहे. भाजपचा एकही आमदार किंवा मंत्री त्यावर संताप व्यक्त करीत नाही. महाराष्ट्रात मात्र वेगळेच सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा, कुजबुज मोहिमा चालल्या आहेत. पुतळे जाळून निषेध केला जात आहे. पण हे भाजपाअंतर्गत धुमशान आहे. मुख्यमंत्री फक्त भाजपाचे नसून महाराष्ट्राचे आहेत याचे भान ठेवायला हवे. आपणच आपल्या मुख्यमंत्र्यांची बेइज्जत केली तर या अनागोंदीस राक्षसराज म्हणावे लागेल. मुख्यमंत्र्यांना आता अधिक सावधान राहावे लागेल, असे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील खातेबदलानंतरचा वाद चव्हाट्यावर आला होता. यावेळी काही भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. आता शिवसेनेने सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून भाजपला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

No comments: