Friday, 22 July 2016

नमस्कार लाईव्ह २२-०७-२०१६ चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- तुर्की; VIDEO: दोन रणगाडे अंगावरुन जाऊनही जीव वाचला
२- अमेरिका; फेसबुकच्या 'अकिला'चे पहिले यशस्वी उड्डाण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
३- झाकीर नाईकच्या PRO ला बेड्या, IS मध्ये जाण्यासाठी महिलेचं धर्मपरिवर्तन 
४- गुजरातमधील भाजपा सरकार दलित-विरोधी - अरविंद केजरीवालांचा आरोप 
५- दिल्ली; शंभर मोटारी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात! 
६- 'आप' खासदाराने संसदेची सुरक्षा वेशीवर टांगली 
७- हाशिम अन्सारींना हवी होती न्यायालयाबाहेर तडजोड 
८- पैसेमुक्त तिजोरी निधीयुक्त करण्याचे कॉंग्रेसला आव्हान 
९- नदी प्रकल्पांत अडथळे आणू नका - उमा भारती 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
१०- विधानसभेत चौथ्या रांगेत बसवल्याने एकनाथ खडसे नाराज 
११- सक्षम मुख्यमंत्री आहात तर स्वप्नीलचा खून कसा झाला? : विरोधक 
१२- खडसेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या पथ्यावर : नितेश राणे 
१३- सणांच्या काळात डाळींच्या किंमती गगनाला भिडणार 
१४- आंबेडकर भवन पुर्नउभारणीची घोषणा गुपचूप का? : अजित पवार 
१५- गणेशोत्सवापूर्वी शाळांना खूषखबर देऊ - तावडे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१६- कळंबोली; आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यानं तरुणीची आत्महत्या 
१७- सासूची हत्या करुन सुनेची आत्महत्या, दादरमधील धक्कादायक घटना 
१९- वर्ध्यात जादूटोणाच्या संशयातून विवस्त्र धिंड 
२०- सातारा; कुऱ्हाड फेकली ग्रामस्थांवर... घाव साथीदारावर 
२१- औरंगाबाद; पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालून रोखले पिस्तूल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२२- 'कबाली' पहाटे 4 वाजता रिलीज, तिकीट न मिळाल्याने चाहत्यांचा गोंधळ 
२३- ..म्हणून जॉन सीनाने विराट कोहलीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला! 
२४- गोलकिपरला अतिउत्साह नडला, फुटबॉल स्वत:च्या गोलपोस्टमध्ये फेकला 
२५- कबालीसाठी एअर एशियाचं स्पेशल विमान, तिकीट दर.... 
२६- मुंबईतही कबालीचा फिव्हर, पहाटे 5 चा शो हाऊसफुल्ल 
२७- विराट शतक... टीम इंडियाची दणदणीत सुरुवात 
२८- गायक मुकेश यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलची आदरांजली 
२९- प्रो कबड्डी लीगमध्ये सनीचा आवाज, सामन्याआधी राष्ट्रगीताचं गायन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *

===================================

झाकीर नाईकच्या PRO ला बेड्या, IS मध्ये जाण्यासाठी महिलेचं धर्मपरिवर्तन

झाकीर नाईकच्या PRO ला बेड्या, IS मध्ये जाण्यासाठी महिलेचं धर्मपरिवर्तन?
मुंबई: मुस्लीम धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईक याची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) अर्शीद कुरेशीला नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

अर्शीदवर केरळच्या मरीयम नावाच्या मुलीचं धर्मांतर करुन तिला आयएसमध्ये सहभागी होण्यासाठी पाठवल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली. महाराष्ट्र एटीएस आणि केरळ पोलिसांनी मिळून ही कारवाई केली.

अर्शीदवर केरळमध्ये गुन्हा नोंद आहे. मात्र त्याला आधी नवी मुंबई कोर्टात हजर केलं जाईल. त्यानंतर 25 जुलैपर्यंत त्याला केरळ पोलिसांकडे सोपवण्यात येईल.
===================================

VIDEO: दोन रणगाडे अंगावरुन जाऊनही जीव वाचला

VIDEO: दोन रणगाडे अंगावरुन जाऊनही जीव वाचला
अंकारा (तुर्की) : बलवत्तर नशीब म्हणजे नेमकं काय, याची प्रचिती तुर्कस्तानातील एका नागरिकाला आली. कारण एक दोन नव्हे तर तब्बल 62 टन वजनाचे दोन रणगाडे अंगावरुन जाऊनही, जीव वाचला आहे. साबरी उनाल असं या मृत्युवर मात करणाऱ्या तुर्की नागरिकाचं नाव आहे.

काय आहे प्रकरण?
गेल्या शुक्रवारी रात्री तुर्कस्थानमध्ये लष्करानं सरकारविरोधात बंड पुकारुन सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला. तुर्कीतल्या अंकारा शहरावर लष्कराच्या एका गटानं अचानकपणे हेलिकॉप्टर, रणगाड्यांद्वारे हल्ले करुन संसदेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुर्कीच्या रस्त्यावर लष्कराची दहशत पाहायला मिळत होती.

याचवेळी तुर्की नागरिकांनी रस्त्यावर उतरुन लष्कराचं हे बंड मोडून काढा, असं आवाहन राष्ट्राध्यक्षांनी केलं होतं. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला.

===================================

'कबाली' पहाटे 4 वाजता रिलीज, तिकीट न मिळाल्याने चाहत्यांचा गोंधळ

'कबाली' पहाटे 4 वाजता रिलीज, तिकीट न मिळाल्याने चाहत्यांचा गोंधळ
चेन्नई: दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतचा बहुप्रतिक्षीत ‘कबाली’ चित्रपट आज रिलीज झाला आहे. चाहत्यांनी सिनेमाच्या तिकीटासाठी रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. परंतु बल्क बुकिंग झाल्यामुळे बऱ्याच चाहत्यांना हा सिनेमा पाहता आला नाही. त्यामुळे संतप्त चाहत्यांनी ‘कबाली’ची पोस्टर्स फाडून तसंच तोडफोड करुन रोष व्यक्त केला.
===================================

..म्हणून जॉन सीनाने विराट कोहलीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला!

..म्हणून जॉन सीनाने विराट कोहलीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला!
मुंबई : डब्लूडब्लूई सुपरस्टार जॉन सीनाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे भारतीय चाहते आश्चर्यचकित झाले आहे. जॉन सीनाने टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा फोटो त्याच्या अकाऊंटवर पोस्ट केला. या फोटोमध्ये विराट अतिशय जोशमध्ये दिसत असून त्यावर टीम इंडियाचं थीम सॉन्ग ‘ब्लीड ब्लू’ ही लिहिलं आहे.

या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघ वेस्ट इंडीजविरोधात पहिला कसोटी सामना खेळत आहे. त्याआधीच जॉनने इन्स्टाग्रामवर विराटचा फोटो पोस्ट करुन भारतीय चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
===================================

गोलकिपरला अतिउत्साह नडला, फुटबॉल स्वत:च्या गोलपोस्टमध्ये फेकला

गोलकिपरला अतिउत्साह नडला, फुटबॉल स्वत:च्या गोलपोस्टमध्ये फेकला!
फोटो सौजन्य: ट्विटर व्हिडिओ
फुटबॉलच्या मैदानात आजवर तुम्ही अनेक थरारक गोल पाहिले असतील. पण आजवरचा सर्वात विनोदी गोल पाहायला मिळाला तो अमेरिकेत झालेल्या मिनेसोटा युनायटेड आणि बोर्नमाऊथ संघांमधल्या फ्रेन्डली सामन्यात.

मिनेसोटा युनायटेडचा गोलकीपर सॅमी एनजॉकनं बॉल समोर फेकण्याच्या नादात थेट आपल्याच जाळ्यात फेकला. बॉल आपल्या जाळ्यात जातोय हे लक्षात येताच सॅमी एनजॉकनं तो अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न अपयशीच ठरला.

सॅमी एनजॉकची ही चूक त्याच्या संघाला तर महागात पडली. पण सोशल मीडियावरही त्याची जोरदार थट्टा उडवली जाते आहे.
===================================

कबालीसाठी एअर एशियाचं स्पेशल विमान, तिकीट दर....

कबालीसाठी एअर एशियाचं स्पेशल विमान, तिकीट दर....
बंगळुरु देश-विदेशात आज सुपरस्टार रजनीकांतच्या कबाली सिनेमाचा फिव्हर आहे.  रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला कबाली चित्रपट आज बॉक्सऑफिसवर धडकतोय. दक्षिण भारतासह पूर्ण देशभरात आणि परदेशात कबाली चित्रपटाची चर्चा आहे. इतकंच नाही तर चेन्नई, बंगळुरुत “कबाली’च्या मुहुर्तावर कर्मचाऱ्यांचा मास बंक टाळण्यासाठी कंपनीकडून थेट सुट्टीच जाहीर करण्यात आली आहे.

तिकडे बंगळुरुमध्ये कबाली सिनेमा पाहण्यासाठी एअर एशियाने विशेष विमानसफारीचं आयोजन केलं आहे. चाहत्यांना फर्स्ट डे फर्स्ट शो पाहता यावा, यासाठी एअर एशियाने खास ऑफर दिली आहे. हे विमान बंगळुरुतून उड्डाण घेऊन चेन्नईला उतरणार आहे.
===================================

आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यानं तरुणीची आत्महत्या

आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यानं तरुणीची आत्महत्या
कळंबोली: आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून 17 वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. कळंबोलीतल्या पुष्पा सूर्यवंशी असं मुलीचं नवा आहे.

या विद्यार्थिनीला सुधागड कॉलेजमध्ये अकरावीसाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी तिनं 20 हजार रुपये डोनेशनही भरलं होतं. पण, पुष्पाला सुधागडमध्ये ऑनलाईन प्रवेश मिळाला नाही. तसंच तिनं घेतलेलं ऑफलाईन ऍडमिशनही रद्द झालं.

आवडत्या कॉलेज प्रवेश न मिळाल्यानं आणि ऑफलाईन अॅडमिशनही रद्द झाल्याच्या नैराश्येतून तिनं राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यानं आत्महत्या करीत असल्याची सुसाईट नोट पुष्पानं लिहून ठेवली होती.
===================================

मुंबईतही कबालीचा फिव्हर, पहाटे 5 चा शो हाऊसफुल्ल

मुंबईतही कबालीचा फिव्हर, पहाटे 5 चा शो हाऊसफुल्ल
मुंबई: सुपरस्टार रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेला कबाली चित्रपट आज बॉक्सऑफिसवर धडकतोय. दक्षिण भारतासह पूर्ण देशभरात आणि परदेशात कबाली चित्रपटाची चर्चा आहे. इतकंच नाही तर चेन्नई, बंगळुरुत “कबाली’च्या मुहुर्तावर कर्मचाऱ्यांचा मास बंक टाळण्यासाठी कंपनीकडून थेट सुट्टीच जाहीर करण्यात आली आहे.

===================================

सासूची हत्या करुन सुनेची आत्महत्या, दादरमधील धक्कादायक घटना

सासूची हत्या करुन सुनेची आत्महत्या, दादरमधील धक्कादायक घटना
मुंबई: मुंबईतील दादर परिसरात सुनेनं सासूची हत्या करुन स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  अक्षता कनगुटकर असं या महिलेचं नाव आहे.

32 वर्षीय सुनेनं 70 वर्षीय सुनेची गळा दाबून हत्या केल्याची घटना दादर परिसरात घडली आहे. त्यानंतर सुनेनं विषप्राशन करुन आत्महत्या केली.

अक्षता कनगुटकर आणि लक्ष्मीकांत कनगुटकर यांचा 2000 साली विवाह झाला होता. वर्षभरानेच सासू सुनेमध्ये भांडण सुरू झाली. गेल्या काही दिवसात ती विकोपाला गेली होती. त्यातूनच हे कृत्य घडल्याचा प्राथनिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येतो आहे. दोघींना सायन हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आलं
===================================

विराट शतक... टीम इंडियाची दणदणीत सुरुवात

विराट शतक... टीम इंडियाची दणदणीत सुरुवात!
अँटिगा: कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर टीम इंडियानं अँटिगा कसोटीच्या पहिल्या दिवसावर आपलं वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियानं दिवसअखेर चार बाद 302 धावांची मजल मारली.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या अँटिगा कसोटीच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीनं आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. विराटनं कर्णधाराला साजेशा खेळ करुन भारताला पहिल्या दिवसअखेर तीनशे धावांची वेस ओलांडून दिली.

वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टीप्रमाणे विराटनं कसोटीतही आपला फॉर्म कायम राखला आहे. यंदाच्या वर्षातल्या आपल्या पहिल्याच कसोटीत विराटनं शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे.

विराटनं 197 चेंडूंतली नाबाद 143 धावांची खेळी सोळा चौकारांनी सजवली. विराटचं कसोटी कारकीर्दीतलं हे बारावं शतक ठरलं. विशेष म्हणजे विराटनं आपल्या बारा शतकांपैकी नऊ शतकं ही परदेशात लगावली.
===================================

विधानसभेत चौथ्या रांगेत बसवल्याने एकनाथ खडसे नाराज

विधानसभेत चौथ्या रांगेत बसवल्याने एकनाथ खडसे नाराज
मुंबई : विधानसभेत चौथ्या रांगेत बसवल्याने माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे चांगलेच नाराज झाले आहे. पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो, त्यावेळीही चौथ्या रांगेत बसलो नव्हतो. आता बसायची वेळ आली याची खंत वाटतेय, असं खडसे म्हणाले.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्रहिमच्या फोन कॉलप्रकरणी झालेल्या आरोपांचाही एकनाथ खडसेंनी समाचार घेतला. जिसे पुरी दुनिया ढुंढ रही है, वो मुझे क्यो ढुंढे, असं म्हणत खडसेंनी अंजली दमानियांवरही टीकास्त्र सोडलं.

यावेळी मुख्यमंत्र्यांनाही खडसेंनी अप्रत्यक्ष टोला लगावला. आज जो प्रसंग माझ्यावर आला, तो तुमच्यावरही येईल.  माझ्यावर कोणत्याही जबाबदार राजकीय पक्षाने आरोप केले असते तर चाललं असतं. पण दमानिया आणि भंगाळेंनी केलेल्या आरोपांची तात्काळ दखल घेतली, असंही खडसे म्हणाले.
===================================

सक्षम मुख्यमंत्री आहात तर स्वप्नीलचा खून कसा झाला? : विरोधक

सक्षम मुख्यमंत्री आहात तर स्वप्नीलचा खून कसा झाला? : विरोधक
मुंबई : मुख्यमंत्री स्वत:ला सक्षम समजतात, तर मग विधानभवनापासून तासाभराच्या अंतरावर स्वप्नील सोनावणे या अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या कशी झाली, असा सवाल करत विरोधकांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री विरोधकांवरील आरोपांचे दाखले देऊन राजकीय भाषण करतात. प्रत्यक्षात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कुठलेही प्रयत्न दिसत नसल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि काँग्रेस आमदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

नवी मुंबईतील नेरुळच्या सेक्टर 13 मध्ये काल प्रेमप्रकरणातून 16 वर्षीय स्वप्नील सोनावणेची हत्या झाली.

त्याआधी मुलीच्या कुटुंबाची तक्रार करण्यासाठी स्वप्नील त्याचे वडील शहाजी नेरुळ पोलिसात गेले होते. मात्र तिथून त्यांना हाकलून देण्यात आलं. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांची माफी मागण्यासाठी गेलेल्या स्वप्नीलच्या कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली, ज्यात स्वप्नीलचा मृत्यू झाला.
===================================

खडसेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या पथ्यावर : नितेश राणे

खडसेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या पथ्यावर : नितेश राणे
मुंबई : जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात उत्पादन शुल्क विभागातील जवळपास 220 अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या आणि बढतीचे प्रकरण विधीमंडळात गाजत असतानाच, एकनाथ खडसे यांनी दिलेला महसूलमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पथ्यावर पडला असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी अनेक बदल्या केल्याचे गंभीर आरोप काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी विधानसभेत केले.

राज्य उत्पादन शुल्क विभागातील रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालिन अधीक्षक विजय चिंचाळकर यांना जून 2013 मध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विभागाने खटल्यास मान्यता दिल्यानंतर ऑगस्ट 2015 मध्ये नियमानुसार त्यांची चंद्रपूर जिल्ह्यात अकार्यकारी पदावर स्थापना करण्यात आली होती. शासन निर्णयानुसार त्यांना त्याच पदी ठेवणे आवश्यक असताना तसेच बदलीसाठी पात्र नसतानाही मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांची कोल्हापूर येथे कार्यकारी पदावर नेमणूक करण्यात आली.

उत्पादन शुल्क विभागातील आणखी एक पदाधिकारी मनोहर अंचुळे यांचीही घटना सारखीच असताना मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रधान सचिव राजेशकुमार यांनी त्यांची धुळे येथे कार्यकारीपदी नेमणूक करण्यात आली.
===================================

प्रो कबड्डी लीगमध्ये सनीचा आवाज, सामन्याआधी राष्ट्रगीताचं गायन

प्रो कबड्डी लीगमध्ये सनीचा आवाज, सामन्याआधी राष्ट्रगीताचं गायन
मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या मैदानात आज बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा आवाज घुमला.  प्रो कबड्डी लीगमध्ये आज राष्ट्रगीत गाण्याचा मान सनीला मिळाला.

जयपूर पिंक पँथर्स आणि दबंग दिल्लीमधल्या सामन्याआधी सनीने राष्ट्रगीत सादर केलं. राष्ट्रगीताचं गायन हा बहुमान असल्याची प्रतिक्रिया सनीने काही दिवसांपूर्वीच दिली होती.

विशेष म्हणजे सनी लिओनीने राष्ट्रगीत गाण्यासाठी कोणत्याही प्रकारचं मानधन घेतलं नाही. खेळाला प्रमोट करणाऱ्या गोष्टींचं आपण पैसे घेत नसल्याचं  सनी लिओनीने स्पष्ट केलं.

दरम्यान, याआधी अनेक अभिनेत्रींना प्रो-कबड्डीच्या व्यासपीठावरुन राष्ट्रगीत गाण्याची संधी मिळाली होती. त्यामध्ये श्रद्धा कपूर, आलिया भट, श्रुती हसन आणि सोनाक्षा सिन्हा यांचा समावेश आहे. मात्र, आज ही संधी अभिनेत्री सनी लिओनीला मिळाली.

===================================

सणांच्या काळात डाळींच्या किंमती गगनाला भिडणार

सणांच्या काळात डाळींच्या किंमती गगनाला भिडणार
नवी दिल्ली: कृषी उतन्न बजार समिती APMC नुसार, सध्या तूर डाळीची किंमत 220 रुपये प्रति किलो आहे. येणाऱ्या काळात त्याच्या किंमतीत वाढ होऊन ती 300 रुपये प्रति किलो होण्याची शक्यता आहे. हे दर नवीन स्टॉक बाजारात येईपर्यंत कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्याच्या काळात सर्वप्रकारच्या डाळींच्या किंमती वाढल्या आहेत. यात तूर डाळ ही 220 रुपये प्रतिकीलो, हरबरा डाळ 140-160 रुपये प्रतिकिलो, उडीद डाळ 180 रुपये, मूग डाळ 100 रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. सध्या हे दर मागणी आणि पुरवठा यावर आधारित आहेत. धुळ्यातील एका व्यापाऱ्याने दिलेल्य माहितीनुसार, गेल्या दोन वर्षात पडलेल्या दुष्काळामुळे डाळींच्या उत्पादनात घट झाली आहे.

तर APMC चे संचालक नानासाहेब पाटील यांच्या मते, डाळींच्या किंमतीमध्ये कोणत्याही प्रकारची कमी होण्याची शक्यता नाही. येत्या दोन महिन्यात केवळ मूगाच्या डाळीच्या दरातच कपात होण्याची शक्यता आहे. मूग डाळीची बाजार समितीत आवक ऑगस्ट महिन्यानंतर सुरु होते, तर दुसऱ्या डाळींची आवक इतर महिन्यात होते. मूग डाळीची लागवड डिसेंबर-जानेवारीमध्ये होते, तर हरबऱ्याच्या डाळीची लागवड फेब्रुवारी-मार्च महिन्यात होते. त्यामुळे येणाऱ्या काळात डाळींच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.


===================================

वर्ध्यात जादूटोणाच्या संशयातून विवस्त्र धिंड

वर्ध्यात जादूटोणाच्या संशयातून विवस्त्र धिंड
वर्धा : वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात अंधश्रद्धेपोटी माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य घडलं. जादूटोणा केल्याच्या संशयावरुन इसमाची विवस्त्र धिंड काढण्यात आली, तर एका महिलेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी 7 जणांवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांची रवानगी 15 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

महत्त्वाचं म्हणजे गिरड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मंगरुळ गावात ही घटना घडली आहे.

अटकेत असलेल्या एका आरोपीच्या मुलीच्या अंगात येत असल्याचं म्हटलं जात होतं. महिनाभरापासून हा प्रकार सुरु होता. अंगात आल्यावर तिने गावातील एका महिलेचं आणि 66 वर्षीय देवराव तुराळे यांचं नाव घेतलं. त्यामुळे ह्या दोघांनी जादूटोणा केल्याचा संशय आल्याने गावकऱ्यांनी महिलेला मारहाण केली, तर देवराव तुराळे यांची विवस्त्र धिंड काढली.

या प्रकारानंतर देवराव तुराळे पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपींविरोधात जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली. दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देवराव तुराळे यांनी केली आहे.

===================================

आंबेडकर भवन पुर्नउभारणीची घोषणा गुपचूप का? : अजित पवार

आंबेडकर भवन पुर्नउभारणीची घोषणा गुपचूप का? : अजित पवार
मुंबई : मुंबईतील आंबेडकर भवनाचा वाद चिघळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गुपचूप पुनर्विकासाची घोषणा का केली? जिथे दोन मजल्यापेक्षा अधिक बांधकाम करण्यास मनाई आहे, तिथे 17 मजल्याची इमारत कशी उभी राहणार आहे, असा सवाल करत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

विधानसभेत आज आंबेडकर भवन पाडकामाचा मुद्दा उपस्थित झाला. आंबेडकर भवनाबाबत राज्य सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. मुख्यमंत्री महाराष्ट्रापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं अजित पवार म्हणाले.

आंबेडकर भवन पाडल्यानंतर त्याठिकाणी पूर्वीसारखंच हेरिटेज स्ट्रक्चर बांधून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी काल विधानपरिषदेत दिली. मात्र ज्या ठिकाणी दोन मजल्यापेक्षा जास्त बांधकाम करण्यास मनाई असताना 17 मजली इमारत कशी उभी राहणार? सरकारचं नेमकं काय चाललं आहे?, असा सवाल अजित पवारांनी केला.

===================================

गुजरातमधील भाजपा सरकार दलित-विरोधी - अरविंद केजरीवालांचा आरोप


  • ऑनलाइन लोकमत
    अहमदाबाद, दि. २२ -  उना येथे ‘गायींचे संरक्षण’ करणाऱ्यांकडून मारहाण करण्यात आलेल्या  दलित तरुणांच्या कुटुंबियांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली. केजरीवाल यांनी राजकोट येथे जाऊन रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी तरूणांची व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तसेच जखमी तरूणांच्या तब्येतीची विचारपूसही केली.
    ' ऊनामधील अत्याचारग्रस्त दलितांना  न्याय मिळायलाच हवा, आरोपींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी' अशी मागणी केजरीवाल यांनी यावेळी केली. तसेच ' याप्रकरणी पोलिस का कारवाई करत नाहीयेत? असा सवाल विचारत राज्यातील भाजप सरकार दलितविरोधी असल्यानेच कोणतीही कारवाई होत नाही' असा घणाघाती आरोपही त्यांनी राज्य सरकारवर केला. 
    दरम्यान गुरूवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही उना येथे जाऊन पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळी राहुल यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील गुजरातेतील सरकार आणि त्याच्या गरीबविरोधी धोरणांवर जोरदार हल्ला चढवत हा संघर्ष दोन विचारसरणींतील आहे, असे म्हटले होते. त्यानंतर आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पीडित तरूणांची भेट घेत सरकारवर कडाडून हल्ला चढवला. 
===================================

गायक मुकेश यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलची आदरांजली


  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. 22 - ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातील 'जीना यहाँ मरना यहाँ' हे गाणं आजही लोकांच्या ओठावर आहे. या गाणं ज्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केलं ते सर्वाचे लाडके गायक मुकेश यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलनेही डुडुलद्वारे त्यांना आदरांजली वाहिली आहे. 
    मुकेश यांचे खंर नाव मुकेशचंद माथुर पण त्यांच्या घराण्याने माथुर हे आडनाव टाकून त्याचं नाव हेच आडनाव म्हणून धारण केलं. १९४१ साली त्यांनी ‘निर्दोष’ या चित्रपटाद्वारे अभिनेता-गायक म्हणून या क्षेत्रात पदार्पण केले. पण खरया अर्थाने त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली ती १९४५  ला  ‘पहली नजर’ या चित्रपटातील ‘दिल जलता है..’ ह्या गाण्यापासून. हे लोकांना खुप आवडल आणी मुकेश रातोरात स्टार झाले त्यानंतर त्यांनी कधी मागे वळुन पाहिले नाही. त्यांनी आपल्या तीन दशकाच्या कारकिर्दीत २०० पेक्षा जास्त चित्रपटात पार्श्वगायन केले.

===================================

फेसबुकच्या 'अकिला'चे पहिले यशस्वी उड्डाण


  • ऑनलाइन लोकमत
    अमेरिका, दि. 22-   संपूर्ण जगात इंटरनेट पोहचविण्याचे महत्त्वाकांक्षी स्वप्न फेसबुकचा निर्माता संस्थापक मार्क झुकेरबर्गने पाहिले आणि त्यादृष्टीने आता पहिले पाऊल, नाही, पहिले उड्डाण त्याने केले आहे. फेसबुक निर्मित मानवरहित आणि संपूर्णत: सौरऊर्जेवर उडणाऱ्या अकिला ड्रोनने अमेरिकेतील अ‍ॅरिझोना येथील सैनिक विमानतळावरून पहिले यशस्वी उड्डाण पूर्ण केले.
    बोर्इंग ७३७ विमानाच्या पंखाच्या आकाराचे पंख असणारे अकिला कमी उंचीवर अपेक्षेपेक्षा तीन मिनेट जास्त काळ, सुमारे ९६ मिनिटे हवेत राहिले. मागील काही महिन्यांपासून या स्वयंचलित ड्रोनची चाचणी सुरू होती. परंतु २८ जून रोजी केलेल्या पहिल्या यशस्वी विमान उड्डाणाचा व्हिडियो मार्क झुकेरबर्गने आपल्या फेसबुक पेजवर गुरुवारी (ता. २१) शेअर करून संपूर्ण जगाला याची माहिती दिली.
    यशस्वी उड्डाण झाल्यावर झुकेरबर्ग आणि सहकाऱ्यांनी एकच जल्लोष करत एकमेकांना टाळ्या देत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी झुकेरबर्गच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होता. इंटनेटपासून वंचित लोकांनाह्यअकिलाह्ण ड्रोनद्वारे इंटरनेट सुविधा पुरवून जगाला एकत्रित करण्याचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार याची अनुभूती बहुधा त्याने प्रथमच घेतली असावी.
    काय आहे अकिला?
    आकाशात घिरट्या मारणारे ह्यअकिलाह्ण ड्रोन नवीन लेझर-बीम तंत्रज्ञानाद्वारे ९६ किमी त्रिज्येतील लोकांना जलद इंटरनेट सुविधा पुरवणार आहेत. अकिलाने प्रक्षेपित केलेले सिग्नल्सला जमिनीवर असणारे टॉवर्स आणि अँटेना वाय-फाय किंवा ४-जी नेटवर्कमध्ये रुपांतरित करतील, अशी सर्व साधारण संकल्पना आहे.
    पण हे खरंच व्यवहार्य आहे का?
    ही संकल्पना प्रत्यक्षात आणि व्यवहारिक स्वरुपात उपयोगात आणण्यासाठी फेसबुकला अनेक दिव्यांना सामोरे जावे लागणार आहे. लगातार तीन महिने जमिनीपासून साठ हजार फूट किं वा त्यापेक्षा जास्त उंचीवर उडणाचे ध्येय फेसबुकने ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी तर सर्व प्रथम ड्रोनला दिवसभरात एवढी सौरऊर्जा जमा करावी लागेल ज्याद्वारे ते दिवसरात्र उडू शकेल. शिवाय एवढी प्रचंड ऊर्जा साठवणाऱ्या बॅटरीज्देखील विकसित कराव्या लागणार.
    सौरऊर्जेवर उडणारे चालकरहित विमान आजमितीला केवळ दोन आठवडे लगातार उडू शकले आहे. फेसबुकच्या अभियांत्रिकी विभागाचे उपाध्यक्ष जय पारीख म्हणाले की, अजून खूप मोठा टप्पा गाठायचा बाकी आहे.

===================================

गणेशोत्सवापूर्वी शाळांना खूषखबर देऊ


  • मुंबई : राज्यातील अनुदान प्राप्त ठरलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान देण्याबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला असून ज्या शाळा अनुदानास पात्र आहेत त्यांना अनुदान देण्याबाबत कार्यवाही करण्याचे काम वित्त व नियोजन खात्यामार्फत सुरु आहे. ते पूर्ण होताच येत्या गणेशोत्सवापूर्वी शाळांमधील शिक्षकांना त्यांचे २०% वेतन अनुदान मिळेल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिले.
    याबाबत आ. नागो गाणार, अनिल सोले, विक्रम काळे आदींनी प्रश्न विचारला होता. विद्यार्थी नसताना शिक्षक दाखवून पैसे घेणाऱ्या संस्थांची तपासणी पूर्ण झाली असून त्यात अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांना २० टक्के प्रमाणे १९२४७ शिक्षक व शिक्षकेत्तर पदांना सुमारे १६३ कोटी इतक्या रक्कमेची मंजुरी देण्यात आली आहे. शिक्षकांचा पगार योजनेत्तर आणि योजनाबाहय नियोजनातून देण्याबाबत विचार सुरु आहे तावडे यांनी सांगितले. 
===================================
शंभर मोटारी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात!
-

नवी दिल्ली - चित्रपटातून प्रेरित होऊन आलिशान मोटारी चोरणारा चोर तब्बल 100 मोटारी चोरल्यानंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

‘ओय लकी! लकी ओय!‘ या चित्रपटातून प्रेरित होऊन रॉबीन नावाचा तरुण मोटारी चोरत होता. उच्चभ्रू लोकांच्या सोसायटीत प्रवेश करून तेथील आलिशान मोटारींची पाहणी करून तो त्या चोरत होता. मॉर्निंग वॉकला निघालेल्या लोकांच्या घरात घुसून मोटारींच्या किल्ल्या शोधून मोटार चोरण्याची त्याची पद्धत होती. आतापर्यंत त्याने 100 पेक्षा अधिक मोटारी चोरल्याचे समोर आले आहे. मात्र बुधवारी अशीच एक मोटार चोरत असताना तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पश्‍चिम दिल्लीतील वाहनचोरी विरोधी पोलिस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पोलिसांनी बीएमडब्ल्यू आणि टोयोटा फॉर्च्युनर ताब्यात घेतली आहे. गुन्हेगारी क्षेत्रात तो गेल्या 14 वर्षांपासून असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चोरी केलेल्या मोटारी तो एका नवाबाकडे देत होता. तो दिल्लीतील देवली परिसरात आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
===================================
'आप' खासदाराने संसदेची सुरक्षा वेशीवर टांगली

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे संगरूर मतदारसंघातील खासदार भगवंत मान यांनी संसदेच्या सुरक्षा नियमांचा भंग केला. मान यांनी स्वतःच्या घरून संसदेत जातेवेळीचा एक संपूर्ण लाइव्ह व्हिडियो क्‍लिप बनवून ती फेसबुकवर शेअर केली आहे. मान यांच्या या लाइव्ह व्हिडियो क्‍लिपने सुरक्षा यंत्रणांची मात्र झोप उडविली आहे. 

या व्हिडिओ क्‍लिपच्या माध्यमातून मान यांनी संसदेची सुरक्षा-व्यवस्था जगासमोर मांडल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. व्हिडिओमध्ये संसदेत कसा प्रवेश होतो, कुठे कुठे वाहनांची तपासणी होते, तपास कसा होतो, तसेच सुरक्षेची काय व्यवस्था आहे, याबाबत सर्व रेकॉर्डिंग मान यांनी केले आहे. संसद सुरक्षेच्या नियमावलीनुसार संसदेच्या आवारात व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे. खासदारांनाही व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही. त्यामुळे मान यांच्यावर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 
===================================
कुऱ्हाड फेकली ग्रामस्थांवर... घाव साथीदारावर

सातारा - ग्रामस्थांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्याच्या प्रयत्नात चोरट्याने आपल्याच साथीदाराला गंभीर जखमी केल्याची घटना आज पहाटे लिंब (ता. सातारा) येथे घडली. दिव्यनगरी (शाहूपुरी) येथून दुचाकी चोरून लिंब येथील घर फोडायला हे दोन चोरटे गेले होते. या प्रकरणाशी संबंधित तीन गुन्हे तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.

संतोष मधुकर साळुंखे (रा. माजगावकर माळ झोपडपट्टी) असे गंभीर जखमी झालेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याला उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. संतोषवर जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिस व ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री दीडच्या सुमारास दोन चोरटे लिंब येथील सचिन बरकडे यांच्या बंद घरात चोरीसाठी शिरले. त्यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटत असताना आवाज झाला. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या तेजस उत्तम शिंदे यांच्या बहिणीला जाग आली. तिने तेजस यांना जागे केले. घरातून त्यांनी बरकडे यांच्या घराकडे पाहिले. तेव्हा त्यांना दोघे जण त्यांच्या घरात शिरत असल्याचे दिसले. त्यामुळे तेजसने जवळपासच्या ग्रामस्थांना फोन करून याबाबतची माहिती दिली. 
===================================
पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालून रोखले पिस्तूल

औरंगाबाद - गोलवाडी प्रकरणातील कुख्यात आरोपी अजय ठाकूरला पकडण्यासाठी गेलेल्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघ यांच्या अंगावर ठाकूरने दुचाकी घातली. यानंतर त्यांच्यावर पिस्तूल रोखून तो निसटला. दरम्यान, पोलिस पथकाने दोन किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला जेरबंद केलेच. ही गंभीर घटना गुरुवारी (ता. 21) रात्री सात ते साडेआठदरम्यान घडली. जखमी वाघ यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गोलवाडी प्रकरणात मोक्का लावल्यानंतर न्यायालयाने अजय ठाकूरविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट काढले. त्यानंतर गुन्हे शाखा त्याच्या मागावर होती. तो गोलवाडी भागात असल्याची माहिती समजताच पोलिस उपनिरीक्षक अनिल वाघ व अमित बागूल यांची दोन पथके गोलवाडीत ठाकूरच्या शोधात गेली. तो दिसताच श्री. वाघ यांनी पाठलाग सुरू केला. दरम्यान, पोलिसांच्या हाती लागत असल्याने त्याने श्री. वाघ यांच्या अंगावर दुचाकी घातली. यात श्री. वाघ जमिनीवर कोसळले. त्याच वेळी ठाकूरने स्वत:जवळील पिस्तूल काढून वाघ यांच्यावर रोखले व धाकदडपशाही करीत तेथून पळ काढला. दुचाकी अंगावर आल्याने श्री. वाघ गंभीर जखमी झाले, त्यांनी अशा अवस्थेतही पाठलाग सुरूच ठेवला, याच वेळी उपनिरीक्षक अमित बागूल यांच्या पथकानेही पाठलाग सुरू केला होता. दोन्ही पथकांनी मिळून अजय ठाकूरच्या मुसक्‍या आवळल्या. 
===================================
हाशिम अन्सारींना हवी होती न्यायालयाबाहेर तडजोड

अयोध्या - देशाच्या राजकारणास कलाटणी देणाऱ्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद वादातील सर्वांत वयोवृद्ध पक्षकार हाशिम अन्सारी (वय 95) यांना या समस्येवर न्यायालयाबाहेर तोडगा निघावा असे वाटत होते. तब्बल साडेसहा दशकांपेक्षाही अधिक काळ न्यायालयीन संघर्ष केल्यानंतर ते या निष्कर्षाप्रत पोचले होते, अशी माहिती त्यांचे पुत्र इक्‍बाल यांनी आज दिली. अन्सारी यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर इक्‍बाल आता त्यांची न्यायालयीन लढाई लढणार आहेत. या वादावर वडिलांनी घेतेलेल्या भूमिकेशी आपण पूर्णपणे सहमत आहोत, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. 

हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजघटकांत चर्चा होऊन अयोध्येचा वाद मार्गी लागावा. न्यायालयाच्या बाहेर चर्चेच्या माध्यमातून हे सहज शक्‍य असल्याचे आपल्या वडिलांना वाटत होते, असे त्यांनी नमूद केले. इक्‍बाल यांचे शहराबाहेर पंक्‍चर काढण्याचे दुकान असून, त्याला लागूनच त्यांचे एक छोटेसे घरदेखील आहे. हाशिम अन्सारी यांच्या मृत्यूनंतर इक्‍बालला आता "व्हीआयपी‘ दर्जा मिळाला आहे. या भागात कधीही न फिरकणारे मंत्रीदेखील अन्सारी यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 
===================================
पैसेमुक्त तिजोरी निधीयुक्त करण्याचे कॉंग्रेसला आव्हान

मुंबई - भारताच्या राजकारणात दीडशे वर्ष राज्य गाजविणाऱ्या अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीला सध्या तिजोरीतील खडखडाटाने ग्रासले आहे. दैनंदिन खर्च चालवणेही कठीण झाल्याने आमदारांनी किमान एक लाख रुपयांचे योगदान द्यावे आणि परिचित खासदारांना 2 लाख रुपये तिजोरीत जमा करण्याचे स्मरण करून द्यावे, अशी विनंती विधिमंडळात पाठवण्यात आली आहे. अधिवेशनादरम्यान कॉंग्रेस आमदार एकमेकांच्या भेटीत निधीचा निरोप देताना दिसून येत आहेत. 

राज्यात कॉंग्रेसचे विधानसभेत 42, तर परिषदेत 20 आमदार आहेत. कर्नाटक वगळता एकही मोठे राज्य प्रत्यक्ष राजवटीखाली नसल्याने कॉंग्रेसचे अर्थकारण ढासळले आहे. उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशातील विधिमंडळ विजयानंतर कॉंग्रेस पुन्हा एकदा सक्रिय झाली. पक्षासमोरील आव्हानांचा आढावा घेत ती सोडवण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली असल्याने अर्थकारणाकडे श्रेष्ठींचे लक्ष गेले आहे. सत्ता नसली, तरी महाराष्ट्रात आमदारसंख्या मोठी असल्याने दिल्लीहून मुंबईला वारंवार स्मरणपत्र पाठवले जाते आहे. टिळकभवनातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातून अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीवर नेमलेल्या सुमारे 95 सदस्यांनीही पक्षनिधीत भर टाकावी, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मिनी विधानसभा निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांसाठी निधीची थैली खुली करावी लागेल. त्यातच पक्षाच्या मुख्यालयाला निधीची गरज आहे. सत्ता नसल्याचे चटके आता जाणवू लागल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस आमदार खासगीत व्यक्त करत आहेत. प्रदेश कॉंग्रेसचे खजिनदार माजी मंत्री सुरेश शेट्टी यांनी पक्षाला निधीची चणचण भासत असल्याचे मान्य केले. राज्यातही कॉंग्रेस आमदारांकडून पक्ष कार्यासाठी निश्‍चित योगदान घेतले जाते, पण ते नियमितपणे देणारे नेते पूर्वीपासूनच अत्यल्प होते. विधिमंडळ पक्ष कार्यालय दरमहा आमदारांकडून चार हजार रुपये शुल्क स्वीकारते. ते मात्र मिळत असल्याचे कार्यालय सचिवांनी सांगितले.

===================================
नदी प्रकल्पांत अडथळे आणू नका - उमा भारती

नवी दिल्ली - महाराष्ट्रात पार- तापी- नर्मदा या नदीजोड प्रकल्पाबाबत कॉंग्रेसने चालविलेल्या दुष्प्रचार मोहिमेमुळे मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाच्या दमणगंगा- पिंजाळ प्रकल्पावर विपरीत परिणाम होतो आहे, अशी तोफ जलसंपदामंत्री उमा भारती यांनी कॉंग्रेसवर डागली. मुंबईच्या पेयजलाची समस्या कायमची सोडविण्यासाठी या प्रकल्पाला सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात पूर नियंत्रणाच्या प्रश्‍नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, की देशभरात आतापर्यंत पूर व्यवस्थापनावर पाच हजार कोटी रुपये खर्च झाले असले, तरी यातून होणाऱ्या हानीची व्याप्ती मोठी आहे. नद्यांच्या जोडण्यातूनच पूर समस्येवर तोडगा निघू शकतो, असाही दावा त्यांनी केला. देशभरात नद्यांच्या जोडणीसाठी 31 ठिकाणे शोधण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी जोडणी पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये तसेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्येही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यातून 3.3 कोटी हेक्‍टर जमीन ओलिताखाली येईल आणि 34 हजार मेगावॉट वीज तयार होईल, तसेच पुराचेही नियंत्रण होईल. 
===================================

No comments: