Sunday, 17 July 2016

नमस्कार लाईव्ह १७-०७-२०१६ चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- हाफिज सईदचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
२- अण्णांच्या राळेगणचं स्वयंपूर्तीकडे पाऊल, सौरऊर्जा प्रकल्प उभारणार 
३- केजरीवालांचे मोदींच्या पावलावर पाऊल, 'मन की बात'प्रमाणेच 'टॉक टू AK'
४- विजेंदरचा विजय, मोदींच्या घोषणा, प्रेक्षकांकडून राहुल गांधींची हुर्यो  
५- बँक युनियन 7000 थकबाकीदारांची नावे जाहीर करणार 
६- राहुल गांधींसमोर 'मोदी-मोदी' घोषणा 
७- 'द ग्रेट इंडिया रन' मॅरेथॉन शर्यतीला नवी दिल्लीत इंडिया गेटवरुन सुरुवात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
८- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तेलगळती, वाहतूक धीम्या गतीने 
९- विनायक मेटेंच्या शिवसंग्रामचा महायुतीशी काडीमोड 
१०- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू 
११- मुक्त विद्यापीठाचे 57 अभ्यासक्रम रद्द, यूजीसीची कारवाई 
१२- गुजरातला भूकंपाचा सौम्य धक्का 
१३- काश्मीरमध्ये नवव्या दिवशीही संचारबंदी कायम 
१४- उ. प्रदेशात विषारी दारुमुळे 17 जणांचा मृत्यू
१५- हरयाणा - बहादुरगडजवळ सिरसा एक्सप्रेसच्या इंजिन आग 
१६- सांगली - इस्लामपूरात एमआयएमचं कार्यालय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फोडले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१७- नगरमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणी आणखीन एकाला अटक 
१८- औरंगाबाद; अंगातील भूत काढण्याच्या बहाण्याने चिमुरडीला अमानुष मारहाण 
१९- सोलापूर; सासरच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या 
२०- पुणेकरांना खुशखबर, सोमवारपासून पाणीकपात रद्द
२१- नागपूर; आत्महत्या नव्हे, जन्मदात्या आईकडून लेकीची गळा दाबून हत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२२- 37 वर्षीय सुपरस्टारसोबत 24 वर्षीय हंसिकाचा नवा चित्रपट 
२३- रितेश देशमुखच्या 'छत्रपती शिवाजी'मध्ये सलमान खान
२४- वाढदिवसाच्या निमित्ताने कतरिनाच्या चाहत्यांशी गप्पा 
२५- अनिलच्या स्टंटबाजीची नक्कल नको, जॉनचं आवाहन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *

======================================

अण्णांच्या राळेगणचं स्वयंपूर्तीकडे पाऊल, सौरऊर्जा प्रकल्प उभारणार


अण्णांच्या राळेगणचं स्वयंपूर्तीकडे पाऊल, सौरऊर्जा प्रकल्प उभारणार
अहमदनगर : राळेगणसिद्धी… ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं गाव… त्याचबरोबर जलसंधारणाची पंढरी म्हणूनही या गावाची ओळख… आता राळेगणनं आणखी एक ओळख निर्माण केलीय… सौर उर्जेच्या माध्यमातून राळेगणसिद्धी स्वयंपूर्ण होतंय…
 
नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ, रस्त्यांच्या दुतर्फा हिरवीगर्द झाडी… मुबलक पाणी… जलसंधारणाची पंढरी मानलं जाणारं राळेगणसिद्धी हे गाव आता लवकरच सौरउर्जेवरील स्वयंपूर्ण गाव होणार आहे.

संपूर्ण गावाच्या आणि जलपुनर्भरण पाणी उपसा योजनेच्या विजेची गरज भागवण्यासाठी गावात सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहे.
राळेगणची पाण्याची गरज भागवण्यासाठी गावात तब्बल 40 बंधारे बांधण्यात आलेत. यातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी यादवबाबा जलपुनर्भरण योजना सुरु करण्यात आली.
 
या योजनेत शेवटच्या बंधाऱ्याजवळच्या विहिरीतून पाणी उपसून पुन्हा डोंगरमाथ्यावर सोडलं जातं. त्यामुळे तब्बल पाचशे एकर शेतीला फायदा होतोय. यासाठी एकूण साडे सहाशे अश्वशक्तीचं पंप असून वर्षाला तब्बल तीस लाखांपर्यंत वीज बील येतंय. ते वाचवण्यासाठी कुकडीच्या कॅनॉलवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहे.
======================================

नगरमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणी आणखीन एकाला अटक

नगरमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणी आणखीन एकाला अटक
अहमदनगर : अहमदनगरमधील कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्या प्रकरणी आणखीन एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत तीनजण अटकेत होते. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळला या दोघांना पूर्वीच अटक केली आहे. तर नितीन भैलुमेला पुण्यात पहाटे अटक करण्यात आली.

या घटनेनंतर कर्जत परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्र घेत कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेडमध्ये बंद पाळण्यात आला होता. तसेच कर्जतमधील मुख्य रस्त्यावर रास्तारोको करण्यात आला होता. यात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी हस्तक्षेप करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे अंदोलन मागे घेण्यात आले.
======================================

केजरीवालांचे मोदींच्या पावलावर पाऊल, 'मन की बात'प्रमाणेच 'टॉक टू AK'

केजरीवालांचे मोदींच्या पावलावर पाऊल, 'मन की बात'प्रमाणेच 'टॉक टू AK'
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल ठेवत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही एक नवीन कार्यक्रम सुरु केला आहे. दर महिन्याला रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी जनतेशी संवाद साधतात. पण आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘टॉक टू AK’ हा नवा कार्यक्रम आजपासून दिल्लीत सुरु होत आहे. या कार्यक्रमाची वेळ सकाळी ११ वाजता आहे. हा कार्यक्रम महिन्यातून किती दिवस प्रसारित करण्यात येणार याबाबत दिल्ली सरकारने स्पष्ट केले नसले तरी, हा कार्यक्रम मोदींच्या ‘मन की बात’प्रमाणेच महिन्यातून एकदाच प्रसारित करण्यात येईल असे बोलले जात आहे.

प्रसिद्ध संगितकार विशाल ददलानी या कार्यक्रमात मॉडरेटरची भूमिका साकारणार आहे. या कार्यक्रमावेळी अरविंद केजरीवाल कार्यक्रम निर्मात्यांनी आणि दिल्ली सरकारने ठरवलेल्या प्रश्नांसोबतच फोन इन कॉलमधील प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.

मुख्यमंत्री केजरीवालांना प्रश्न विचारता यावेत, यासाठी 011-23392999 हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय या कार्यक्रमासाठी talktoak.com ही नवी वेबसाईटही सुरु करण्यात आली आहे. तसेच +91-81303344141 या क्रमांकावर एसएमएस करून प्रश्न विचारता येणार आहेत.

======================================

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तेलगळती, वाहतूक धीम्या गतीने

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तेलगळती, वाहतूक धीम्या गतीने
पिंपरी-चिंचवड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकरमधून झालेल्या तेलगळतीमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर ऑईल टँकरला धडक देऊन निघून गेल्याने टँकर लीक झाला.
 
तेलगळतीमुळे एक्स्प्रेस वेच्या रस्त्यावर अमृतांजन पुलाजवळ तेल पसरलं आहे. परिणामी मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळपासून विस्कळीत झाली आहे.
 
रस्त्यावर सांडलेले तेल धुवून काढल्यानंतर ठप्प झालेली वाहतूक संथ गतीने सुरु आहे. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी  काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
======================================

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
पुणे : मुंबई- पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस ‘वे’वर पहाटे 4च्या सुमारास भीषण अपघात झाला. कामशेतच्या दोन्ही बोगद्याजवळ मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीतील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात चालकांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

द्रुतगती महामार्गावरील डीवायडरला मध्यरात्री 4 च्या सुमारास आय 20 ही गाड़ी MH-14 DF 5994 ही गाडी धडकली. या अपघातातील तिघेही पिंपरी परिसरातील रहिवाशी असून अमित सोलेभाविकर (वय 29, रा. यमुनानगर, निगडी), संतोष उडवंत (वय 38, रा. कर्वेनगर), शरद कृष्णराव पवार (वय 35, रा. वारजे) अशी या मृतांची नावे आहेत.
======================================

37 वर्षीय सुपरस्टारसोबत 24 वर्षीय हंसिकाचा नवा चित्रपट

37 वर्षीय सुपरस्टारसोबत 24 वर्षीय हंसिकाचा नवा चित्रपट
मुंबई : कोई मिल गया, जागो सारखे चित्रपट, शाकालाका बुम बुम, देस मे निकला होगा चांद, क्योंकि सास भी.. यासारख्या मालिकांतून बालकलाकार म्हणून घराघरात पोहचलेली अभिनेत्री हंसिका मोटवानी दाक्षिणात्य चित्रपटातून नाव कमवत आहे. हंसिका आता अभिनेता गोपीचंदसोबत सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
 
टॉलिवूडचे दिग्दर्शक संपत नंदी अभिनेता गोपीचंदसोबत नव्या चित्रपटाची तयारी करत आहेत. अभिनेत्री हंसिकाची आता अभिनेत्री म्हणून निवड झाल्याची माहिती आहे. चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. मात्र हा चित्रपट मनोरंजनाने पुरेपूर भरलेला असेल अशी अटकळ बांधली जात आहे.
 
हंसिकाने हिंदी मालिका-चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अधिक भूमिका केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी ‘चेन्नई टर्न्स पिंक’ या उपक्रमाची ती ब्रँड अॅम्बेसेडर होती. 2014 मध्ये फोर्ब्सच्या शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीसाठी तिचं 250 जणांमध्ये नामांकन झालं, मात्र तिची निवड होऊ शकली नव्हती.
======================================

विजेंदरचा विजय, मोदींच्या घोषणा, प्रेक्षकांकडून राहुल गांधींची हुर्यो

विजेंदरचा विजय, मोदींच्या घोषणा, प्रेक्षकांकडून राहुल गांधींची हुर्यो
नवी दिल्ली : भारताचा बॉक्सर विजेंदर सिंग वर्ल्ड बॉक्सिंग असोसिएशनचा आशिया पॅसिफिक मिडलवेटचा चॅम्पियन ठरलाय. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची प्रेक्षकांनी हुर्यो उडवली.
 
नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये शनिवारी झालेला हा सामना पाहण्यासाठी आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासह राहुल गांधीसुद्धा उपस्थित होते. मात्र राहुल गांधींसमोरच प्रेक्षकांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. त्यामुळे राहुल गांधींचा चेहरा पडला. पंतप्रधान मोदींच्या नावे घोषणाबाजी झाल्यानंतर राजीव शुक्ला आणि राहुल गांधी यांनी काढता पाय घेतला.
 
व्यावसायिक बॉक्सिंग लढतीत विजेंदरनं ऑस्ट्रेलियाच्या केरी होपचा 22 गुणांनी पराभव केला. व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये विजेंदर सिंगचा हा सलग सातवा विजय ठरला. या लढतीअखेर तिन्ही पंचांनी 98-92, 98-92, 100-90 असा विजेंदरच्या बाजूनं कौल दिला.
======================================

अंगातील भूत काढण्याच्या बहाण्याने चिमुरडीला अमानुष मारहाण

अंगातील भूत काढण्याच्या बहाण्याने चिमुरडीला अमानुष मारहाण
औरंगाबाद : अंगातील भूत काढण्याच्या बहाण्यानं एका अल्पवयीन मुलीला औरंगाबादेत जबर मारहाण करण्यात आलीये. सुनीता जाधव असं मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव असून गेली तीन वर्ष सुनीता या मुलीकडून घरकाम करुन घेत होती.
 
पीडित मुलगी ही मूळची अकोला जिल्ह्यातली असून तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने ती सुनीताकडे काम करत होती. यावेळी मुलीच्या अंगात भूत शिरल्याचं कारण देत सुनीता जाधव या महिला मांत्रिकाने तिला जबर मारहाण केल्याचं कळतंय.
 
मारहाणीत या मुलीला अनेक ठिकाणी जखमाही झाल्यात. दरम्यान हा प्रकार लक्षात येताच सुनीता जाधव विरोधात मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला असून सुनीताला पोलिसांनी अटक केलीये. अंधश्रदा निर्मूलन कायदया अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
======================================

सासरच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या

सासरच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या
सोलापूर : माहेरहून पैसे आणण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून सोलापुरात एका उच्चशिक्षित विवाहितेनं आत्महत्या केलीय. प्रतिभा नवले असं या महिलेचं नाव आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिभानं आपल्या दीड वर्षांच्या बाळासाठी चिठ्ठी लिहून त्याची माफी मागितलीय. सोलापूर-औरंगाबाद महामार्गाच्या विस्तारीकरणात प्रतिभाच्या वडिलांची जमीन संपादित झाली होती. त्याचे तीस लाख रुपये त्यांना मिळाले. त्यातील दहा लाख रुपये प्रतिभानं आणावेत असा तगादा तिच्यामागे लावण्यात आला होता.
======================================

विनायक मेटेंच्या शिवसंग्रामचा महायुतीशी काडीमोड

विनायक मेटेंच्या शिवसंग्रामचा महायुतीशी काडीमोड?
बीडः मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यामुळे विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाने महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात शिवसंग्राम पक्षाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठकीचं आज आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात मेटे यांना मंत्रीपद मिळेल अशी आशा होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी मेटेंना खो दिल्यामुळे मेटेंनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर आता शिवसंग्राम पक्ष महायुतीतून बाहेर पडेल असं जवळपास स्पष्ट झालं आहे.
======================================

बँक युनियन 7000 थकबाकीदारांची नावे जाहीर करणार

बँक युनियन 7000 थकबाकीदारांची नावे जाहीर करणार
अहमदाबाद : द ऑल इंडिया बँक एम्पायइ असोसिएशन गुजरातमधील जवळपास सात हजार थकबाकीदारांची नावे जाहीर करणार आहे. या सात हजारजणांची संपूर्ण माहिती पुढील आठवड्यात सांगण्यात येणार असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले.

या सात हजारजणांकडून जवळपास 70 हजार कोटींची द्येयके थकित असून या सर्वांची नावे आणि संपूर्ण माहिती १९ जुलै रोजी जाहीर करण्यात येईल, असे बँकेचे सचिव सी.एच. व्यंकटाचलम यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारच्या पाच बँकांचे विलिनीकरण आणि खासगीकरणाविरोधात येत्या २९ जुलै रोजी सर्व बँकांनी एकत्रित येऊन एक दिवसाचा बंद पुकारला आहे. या बंदमध्ये जवळपास १० लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत.
======================================

हाफिज सईदचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक

हाफिज सईदचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक
नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरने गुरूवारी जमात-उद-दावाचा सर्वेसर्वा हफिज सईदचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे. हाफीज सईदचे ट्विटर हॅण्डल @hafizsaeedlive या नावाने ऑपरेट केले जात होते.

सईद या अकाउंटचा वापर देशात हिंसाचार भडकवण्यासाठी करत असल्याची चिंता भारतीय सुरक्षा एजेन्सींना होती.

यापूर्वी हाफिजचे Hafiz Saeed@HSaeedOfficial हे आणखीन एक अकाऊंट हॅण्डल बंद करण्यात आले होते. यानंतर हाफिजने हे नवे अकाउंट सुरु केले होते.

हाफिज सईद मुंबईवरील 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी मोस्ट वाँटेड आहे. या दहशतवाही हल्ल्यात 160 जणांचा मृत्यू झाला होता.
======================================

पुणेकरांना खुशखबर, सोमवारपासून पाणीकपात रद्द

पुणेकरांना खुशखबर, सोमवारपासून पाणीकपात रद्द
पुणे : पाणीकपातीमुळे वैतागलेल्या पुणेकरांसाठी एक खुषखबर आहे. येत्या सोमवारपासून पुण्यातील पाणीकपात रद्द करण्यात आलीय.
 
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतलाय. चारही धरणांमध्ये 15 टीएमसी पाणीसाठा आहे. महापौर प्रशांत जगताप यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
 
उन्हाळ्यात धरणांनी तळ गाठल्यामुळे पुण्यात एकदिवसाआड पाणीपुरवठा होत होता. मात्र वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे पुणेकरांवरचं पाणीकपातीचं संकट टळलंय.
======================================

पोकीमॉन गो गेमने जगभरातील तरुणाई 'सैराट'

पोकीमॉन गो गेमने जगभरातील तरुणाई 'सैराट'
मुंबईः रस्त्यावर एखादा व्यक्ती मोबाईल घेऊन स्वतःशीच बडबडत असेल किंवा हसत असेल, तर त्याला वेड लागलं की काय अशी शंका तुम्हाला येईल. विशेष म्हणजे ही शंका खरी ठरण्याची शक्यता आहे..त्याचं कारण आहे, पोकीमॉन गो गेम.
या पोकीमॉन गेमने अमेरिका आणि ब्रिटनच्या तरुणाईला अवघ्या दहा दिवसात सैराट केलं आहे. कँडी क्रश, मोटर रेस, अँग्री बर्ड, फाम विले आणि सुपर मारिओ सारख्या गेमने लहानग्यांपासून मोठ्यांना अक्षरश: पछाडून सोडलं आहे. त्यातच आता पोकीमॉन गो गेमची भर पडली आहे.
काय आहे पोकीमॉन गो?
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधल्या तरुणाईवर सध्या पोकीमॉन गोचं याड सवार आहे. हा गेम खेळायला एकदा सुरुवात केली की तुमच्या मेंदूचा कंट्रोल मोबाईलनं घेतलाच समजा कारण माणूस या गेमच्या विश्वातच हरवून जातो.
गेम खेळताना मोबाईलचा कॅमेरा आणि जीपीएस सुरु ठेवावा लागतो आणि पोकीमॉनला कॅमेऱ्यात कैद करावं लागतं. लोकेशन आणि मोबाईलमधल्या वेळेच्या आधारावर कुठला पोकीमॉन आपल्यासमोर येईल, हे  गेमच्या अॅपकडून निश्चित केलं जातं. या गेम्सने सध्या सर्वांना आकर्षित केलं आहे.
पोकीमॉन लवकरच भारतात
गेमच्या लोकप्रीयतेमुळे पोकीमॉन गो लाँच करणाऱ्या नितांडो कंपनीचं नशिब फळफळलं आहे. बंद पडण्याच्या अवस्थेत असलेल्या या कंपनीचा शेअर 12 दिवसात 53 टक्क्यांनी म्हणजेच 95 हजारांनी वाढला आहे.
हा गेम पोकीमॉन च्या शोधात फिरायला लावतो. त्यामुळे गेमसाठी फिरताना भान हरवल्याने एकाचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. तर 11 जणांना लूटल्याचं समोर आलंय. त्यामुळं गेम खेळताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे.
पोकीमॉन हा गेम सध्या भारतात उपलब्ध नाही. पण लवकरच भारतातही लाँच होणार आहे. त्यामुळे भारतातल्या तरुणाईला सुद्धा पोकीमॉन गो झपाटल्याशिवाय राहणार नाही.

======================================

रितेश देशमुखच्या 'छत्रपती शिवाजी'मध्ये सलमान खान

रितेश देशमुखच्या 'छत्रपती शिवाजी'मध्ये सलमान खान
मुंबई : अभिनेता रितेश देशमुख ‘छत्रपती शिवाजी’ या मराठी चित्रपटाच्या निर्मितीत गुंतला आहे. या चित्रपटात ‘सुलतान’ सलमान खानही एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखेत दिसण्याची शक्यता आहे.
 
सलमान खानने एका मुलाखतीत ‘छत्रपती शिवाजी’ चित्रपट भूमिका करण्याबाबत वाच्यता केली आहे. या चित्रपटातील माझं शूटिंग पाच-सहा दिवसांत आटपेल आणि त्याचा निर्माता रितेश आहे, हे एक बरं आहे, असं सलमान म्हणाला.
 
‘मी हा चित्रपट करण्यासाठी स्वतःच्या मनाची समजूत घातली. मला माहित आहे, मी काय करायला जातोय. तुम्ही पाहालच’ असं सलमान म्हणतो.
 
सलमानची आई सलमा खान मराठी शिकायला मदत करणार का, असा प्रश्न त्याला विचारताच सलमानने नकारार्थी मान डोलावली. ‘संवादलेखक आणि रितेशच माझी मदत करतील. माझ्या आईची मराठी हिंदी आणि इंग्रजी मिश्रित आहे’ असं म्हणत त्याने हास्याची लकेर उमटवली.
 
रितेशची पत्नी जेनेलिया डिसुझा-देशमुख तिच्या मुंबई फिल्म कंपनी बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करत आहे. टाइमपास, बीपी फेम दिग्दर्शक रवी जाधव यांच्याच खांद्यावर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा असेल.
======================================

मुक्त विद्यापीठाचे 57 अभ्यासक्रम रद्द, यूजीसीची कारवाई

मुक्त विद्यापीठाचे 57 अभ्यासक्रम रद्द, यूजीसीची कारवाई
नाशिकः यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या 135 पैकी तब्बल 57 अभ्यासक्रमांची मान्यता विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठासोबतच विद्यार्थ्यांनाही देखील मोठा फटका बसला आहे.


रद्द करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांमध्ये पत्रकारिता, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, डिझायनिंग, बीएससी अशा अनेक महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सध्या या अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेले विद्यार्थी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
======================================

आत्महत्या नव्हे, जन्मदात्या आईकडून लेकीची गळा दाबून हत्या

आत्महत्या नव्हे, जन्मदात्या आईकडून लेकीची गळा दाबून हत्या
नागपूर : नागपुरातल्या एका 22 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येला धक्कादायक वळण मिळालंय. जन्मदात्या आईनेच लेकीची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे.

नागपूरच्या वाडी परिसरातल्या आंबेडकर नगरात राहणाऱ्या अंकिता मेश्राम या तरुणीनं 14 जुलै रोजी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. घरातच गळफास लावून अंकितानं आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली होती. मात्र ही आत्महत्या नसून तिच्याच जन्मदात्या आईनं केलेली हत्या असल्याचं उघड झालंय.
 
अंकिताच्या आत्महत्येनंतर तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना काही अज्ञात व्यक्तींनी पोलिसांना अंकिताच्या संशयास्पद मृत्यूची माहिती दिली. पोलिसांनी तातडीनं अंकिताचा मृतदेह ताब्यात घेत तिचं पोस्टमार्टेम केलं आणि त्यात तिची गळा दाबून हत्या केल्याचं उघड झालंय.
 
चौकशीनंतर पोलिसांनी अंकिताची आई मुक्ताबाई मेश्रामला अटक केलीय. अंकिताचं प्रेमप्रकरण असून त्यातून ती गर्भवती राहिल्याचा त्यांना संशय होता आणि याच संशयातून त्यांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याचं उघड झालंय.
======================================

वाढदिवसाच्या निमित्ताने कतरिनाच्या चाहत्यांशी गप्पा

वाढदिवसाच्या निमित्ताने कतरिनाच्या चाहत्यांशी गप्पा

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या 33 व्या वाढदिवसाच्या सोशल मीडियावर पाऊल ठेवलं आहे. या निमीत्ताने चाहत्यांशी खास गप्पांचं सत्र आयोजित करण्यात आलं होतं. चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना कतरिनाने उत्तरं दिली.
लग्नापासून ते आवडत्या गाण्यापर्यंतची विविध प्रश्न चाहत्यांनी विचारले. कतरिनाने देखील तेवढ्याच खास अंदाजात त्याला उत्तरं दिली. कतरिनाने आजच फेसबुक अकाऊंट सुरु केलं आहे. पहिल्याच दिवशी चाहत्यांशी लाईव्ह चाटच्या माध्यमातून संवाद साधला. वाढदिवसानिमीत्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल कतरिनाने सर्व चाहत्यांचे आभारही मानले.
======================================

अनिलच्या स्टंटबाजीची नक्कल नको, जॉनचं आवाहन

अनिलच्या स्टंटबाजीची नक्कल नको, जॉनचं आवाहन
कल्याण : अभिनेता अनिल कपूरची नक्कल करत त्याच्याप्रमाणे लोकलमध्ये स्टंटबाजी करु नका, असं आवाहन बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने केलंय. आम्ही कलाकारांनी केलेले साहसी स्टंट नागरिकांनी करु नयेत, असा सल्ला जॉनने दिला.
 
देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी विद्यार्थी मोठी भूमिका बजावू शकतात असा विश्वासही जॉननं व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना गळ घातली तर भ्रष्टाचार नक्कीच थांबेल असं मत जॉननं व्यक्त केलं.
 
जॉन एका कार्यक्रमानिमित्त कल्याण-मुरबाड रोडवरील सॅक्रेड हार्ट शाळेमध्ये आला होता.  शाळेच्या विद्यार्थ्यांनी गरिबांच्या घरासाठी निधी जमा केलाय. या उपक्रमाचं जॉन अब्राहमनं कौतुक केलंय.
======================================

राहुल गांधींसमोर 'मोदी-मोदी' घोषणा


  •  ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १७ - डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक चॅम्पियनशीपचा सामना पहायला गेलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शनिवारी प्रेक्षकांनी डिवचले. दिल्लीच्या त्यागराज स्टेडियमवर बॉक्सर विजेंदरसिंगचा सामना पहायला राहुल गांधी आले होते. त्यावेळी ही घटना घडली. 
     
    राहुल गांधी स्टेडियममध्ये उपस्थित असताना जमलेल्या गर्दीने आधी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला नंतर 'मोदी मोदी' असे नारे दिले. राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम जीन्स असा पेहराव करुन आलेले राहुल आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांच्या शेजारी बसले होते. ऑस्ट्रेलियाच्या केरी होपवर विजय मिळवून विजेंदरने सामना जिंकला. त्यानंतर स्टेडियममधून बाहेर पडतानाही राहुल यांना असाच अनुभव आला. 
     
    राहुल यांना गर्दीकडून डिवचण्याचा जो प्रकार झाला त्यावर राहुल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते हस-या चेह-याने स्टेडियमबाहेर पडले. बॉक्सर मेरी कोम, योगेश्वर दत्त, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, सुरेश रैना, रणदीप हुंडा या सामन्याला उपस्थित होते. १० राउंडच्या लढतीत झुंजार विजेंदरने बाजी मारत डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियनशीपवर कब्जा केला. 
======================================
गुजरातला भूकंपाचा सौम्य धक्का

अहमदाबाद - दक्षिण गुजरातला आज (रविवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपामुळे कोठेही जिवीतहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. 

भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर सेक्लवर 4.7 इतकी मोजण्यात आली आहे. सुरतपासून 14 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचा धक्का जाणविल्याने नागरिकांनी घराबाहेर पळ काढला.

मणिपूरलाही आज सकाळी आठच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त आहे. या भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी होती. याठिकाणीही हानी झाल्याचे वृत्त नाही.
======================================
काश्मीरमध्ये नवव्या दिवशीही संचारबंदी कायम

श्रीनगर - ‘हिज्बुल मुजाहिदीन‘ या संघटनेचा कुख्यात दहशतवादी बुऱ्हाण वणी याच्या मृत्यूनंतर काश्‍मीर खोऱ्यामध्ये उसळलेला हिंसाचारामुळे लागू करण्यात आलेली संचारबंदी आज (रविवार) नवव्या दिवशीही कायम आहे.

काश्मीर खोऱ्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या 40 वर पोचली आहे. श्रीनगरमध्ये अद्यापही काही ठिकामी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी कुपवाडा जिल्ह्यातील कार्लपुरा पोलिस ठाण्यावर जमावाने हल्ला करत पोलिसांच्या गाड्या जाळल्या. तर, पोलिसांवरही हल्ला करण्यात आला होता. जमावाकडून पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेकीच्या घटना सतत घडत आहेत.

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या काही तुकड्या खोऱ्यामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. "सीआरपीएफ‘च्या 80 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. भारतीय लष्कराच्या कारवाईमध्ये बुऱ्हाण वणी ठार झाल्यानंतर दहा जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
======================================
उ. प्रदेशात विषारी दारुमुळे 17 जणांचा मृत्यू

एटा - उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील अलीगंज येथे विषारी दारु प्यायल्यामुळे 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 21 जण प्रकृती गंभीर आहे.

विषारी दारुमुळे नागरिकांचा बळी गेल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून दोषींना अटक करण्यासाठी आंदोलन केले. पोलिस अधिकाऱ्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देत नागरिकांचा राग शांत केला. या प्रकरणी दारुविक्रेता श्रीपालला अटक करण्यात आली आहे. तर, उत्पादनशुल्क अधिकारी, अलीगंजचे सीओ, एसओ यांच्यासह 11 अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

उत्पादनशुल्क विभागाचे सचिव किशनसिंह अटोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात अलर्ट घोषित करण्यात आला असून, विषारी दारुची तपासणी करण्यात येत आहे. दारु प्यायल्याने प्रकृती बिघडलेल्यांना एटा, आग्रा आणि सैफई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

======================================

No comments: