Tuesday, 19 July 2016

नमस्कार लाईव्ह १९-०७-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय]
१- कंदील बलौच हत्या: कंदीलच्या आईचा धक्कादायक आरोप 
२- तुर्कस्तानमधील सत्तापलटाच्या कटात एअरफोर्स चीफचा समावेश 
३- ट्रम्प यांच्या विरोधासाठी महिलांचे विवस्त्र आंदोलन! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
४- उद्धवनी बाळासाहेबांना अंधारात ठेवून ‘त्या’ कागदावर सही घेतली - जयदेव ठाकरे 
५- 10 वर्षांपेक्षा जुन्या गाड्या हद्दपार 
६- देशभरातील 82% डॉक्टर बोगस 
७- पाकिस्तानने सोशल मिडियाच्या माध्यमातून भारताविरोधात पुकारले युद्ध 
८- डरोगे तो मरोगे... धाडसी चिमुकल्यांचा संदेश 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
९- ...तर हत्यारं उचलायला घाबरु नका, कोपर्डी प्रकरणावर नानांचा संताप 
१०- कोपर्डी बलात्कार : महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सुप्रिया सुळे 
११- हेल्मेट सक्तीची पोलखोल, 'माझा'च्या कॅमेऱ्यामुळे पोलिसाकडून दंड वसूल 
१२- बिहारमध्ये ऩक्षली हल्ल्यात सीआरपीएफचे दहा जवान शहीद 
१३- सत्र न्यायालयात दारू पार्ट्या 
१४- आठवडाभर राज्यात पाऊस बरसणारच 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१५- मुंबईत ईस्टर्न फ्री वे वर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू 
१६- रायगड; रानभाजी खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू 
१७- उत्तराखंड; पावसाचा हाहाकार, 15 जणांचा मृत्यू 
१८- जळगाव; गाडीची काच फोडून 54 लाख रुपये लंपास 
१९- वडाळा- चेंबुरदरम्यान भीषण अपघात, ३ ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२०- टायगर श्रॉफ सुपरहिरो, 'अ फ्लाईंग जट्ट'चा ट्रेलर रिलीज 
२१- ज्येष्ठ गायिका मुबारक बेगम यांचं निधन 
२२- ध्वनी प्रदुषणामुळे एमसीए, बीसीसीआयला 100 कोटींचा दंड? 
२३- सलमानच्या 'सुलतान'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, विक्रमी कमाई! 
२४- इक्वेडोरमध्ये मधमाशांमुळे फुटबॉल सामना रद्द 
२५- रुमचा स्लॅब कोसळला, इम्तियाज जलील थोडक्यात बचावले 
२६- मित्राच्या बेकायदेशीर बांधकामासाठी सचिन तेंडुलकरची संरक्षणमंत्र्यांकडे धाव 
२७- सोशल व्हायरल - आजीबाईंचा हा फोटो देतोय जगण्याचा मंत्र 
२८- राहुलने वादग्रस्त छायाचित्र टिष्ट्वटरवरून काढले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
========================================

कंदील बलौच हत्या: कंदीलच्या आईचा धक्कादायक आरोप

कंदील बलौच हत्या: कंदीलच्या आईचा धक्कादायक आरोप
लाहोर: पाकिस्तानी मॉडेल कंदील बलौचच्या हत्याप्रकरणानं आता एक नवं वळण घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीच कंदील सोबतच्या सेल्फीनं चर्चेत आलेल्या मौलवीनंच कंदीलच्या हत्येसाठी आपल्या मुलाला भडकवल्याचा आरोप कंदील बलौचच्या आईनं केला आहे.

सोशल मीडियावर कंदील बलौचसोबतचा वादग्रस्त व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच मौलवी दिसले होते. त्यामुळे कंदीलच्या खुनामध्ये मौलवींचा काही सहभाग आहे का? या दृष्टीनं तपास सुरु असतानाच कंदीलच्या आईनं हा धक्कादायक आरोप केला आहे.

कंदील सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मौलवी मुफ्ती कवी यांना रुएत ए हिलाल कमेटीवरुन हटविण्यात आलं होतं.

जीओ न्यूजशी बातचीत करताना कंदीलच्या आईनं आरोप केला आहे की, मुफ्ती कवी, कंदीलचा पहिला पती आशिक हुसैन आणि शाहीद हे देखील आपल्या मुलीच्या हत्येत सहभागी आहेत.
========================================

...तर हत्यारं उचलायला घाबरु नका, कोपर्डी प्रकरणावर नानांचा संताप

...तर हत्यारं उचलायला घाबरु नका, कोपर्डी प्रकरणावर नानांचा संताप
पुणे : अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार आणि हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलं आहे. यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना, अभिनेता नाना पाटेकर यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. अत्याचाराच्या घटनांवेळी स्वरक्षणासाठी हत्यार उचलावं लागलं, तरी मागे-पुढे पाहू नका, असं नाना म्हणाले.

पुण्यातील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुलींनी अशा घटनांचा प्रतिकार केला पाहिजे. तसंच स्वरक्षणासाठी एखादी गोष्ट केली तर कायद्याने तुम्हाला काहीही होणार नाही, असं मत नानांनी व्यक्त केलं आहे.

अत्याचार होत असताना मुलींनी प्रतिकार करायलाच हवा. मात्र तरुणांनीही अशा विकृतींना ठेचलं पाहिजे. जिच्यावर अत्याचार होत आहे, ती आपली बहिण, वहिनी, आई आहे, असं समजून त्यांनी तिचं संरक्षण करायला हवं, असंही नाना पाटकेर यांनी सांगितलं.

कोपर्डी प्रकरणाला जातीयरंग दिला जात असल्याचा आरोप होत आहे. मात्र जात हा कॉलमच हटवायला पाहिजे. भारतीय ही एकच जात असल्याचं प्रत्येकाने मानलं पाहिजे, असंही नाना म्हणाले.
========================================

कोपर्डी बलात्कार : महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सुप्रिया सुळे

कोपर्डी बलात्कार : महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सुप्रिया सुळे
नवी दिल्ली :  अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कारप्रकरणी संसदेत आवाज उठवू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाला दिली.

बलात्कार होऊन तीन दिवस लोटल्यानंतरही पोलिस यंत्रणा का दिरंगाई करतात, असा प्रश्न करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर निशाणा साधला.

महाराष्ट्राच्या पोलिसांचा आम्हाला अभिमान  होता, पण नगरच्या घटनेत पोलिसांनी २ दिवस माहिती बाहेर येऊ  दिली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी लावायला एवढा उशीर का केला? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

याशिवाय देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते त्यावेळी शेतकरी आत्महत्या झाल्याने सरकारवर खुनाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करत होते. शेतकरी आत्महत्या होणं हे चुकीचं होतंच, पण त्याच पोटतिडकीने सध्याचे मुख्यमंत्री का बोलत नाहीत, असंही सुप्रिया म्हणाल्या.
========================================

गँगरेप पीडितेवर त्याच दोषींचा तीन वर्षांनी पुन्हा गँगरेप

गँगरेप पीडितेवर त्याच दोषींचा तीन वर्षांनी पुन्हा गँगरेप
रोहतक : हरियाणातील रोहतक मध्ये 21 वर्षीय गँगरेप पीडितेवर पुन्हा एकदा गँगरेप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन वर्षांपूर्वी संबंधित पीडितेवर ज्यांनी गँगरेप केला होता, त्या दोघा दोषींसह पाच जणांनी पुन्हा गँगरेप केल्याचा आरोप आहे.

रोहतक जिल्ह्यातील भिवानीमध्ये तीन वर्षांपूर्वी काही जणांनी एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणातील दोन दोषी जामिनावर सुटले. त्यानंतर रोहतकमधील तिघांच्या साथीने या दोघांनी पुन्हा तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप आहे.

भिवानी गँगरेप प्रकरणानंतर तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेच्या कुटुंबावर दबाव टाकण्यात येत होता. त्यानंतर पीडितेसह कुटुंब रोहतकमध्ये राहण्यास गेलं. बुधवारी पीडित तरुणी नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली, मात्र परत न आल्याचं तिच्या आईने सांगितलं.

रात्री ती बेशुद्धावस्थेत सुखपुरा चौकात सापडली, त्यावेळी तिचे कपडे पूर्णपणे फाटले होते.  तिला तातडीने रोहतक रुग्णालयात नेण्यात आलं. तक्रार मागे न घेतल्यामुळेच तिच्यावर पुन्हा गँगरेप झाल्याचा दावा कुटुंबीयांतर्फे करण्यात येत आहे.
========================================

मुंबईत ईस्टर्न फ्री वे वर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत ईस्टर्न फ्री वे वर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
मुंबई : मुंबईतील इस्टर्न फ्री वेवर चार गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत.

भरधाव जाणारी इनोव्हा गाडी नियंत्रण गेल्यानं रोड डिव्हायडर पार करुन पलिकडच्या रस्त्यावर गेली. त्यावेळी समोरच्या दिशेने येणाऱ्या चार गाड्यांना इनोव्हाची धडक बसली.


अपघातग्रस्त गाड्या हटवल्या असल्या तरी यामुळे घाटकोपरहून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूकही विस्कळीत झाली आहे. चेंबूर ते वडाळा दरम्यान हा अपघात झालाय. यामुळे ऐन कामाच्या वेळी वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरु आहे.

दुसरीकडे कुर्ला-वाकोला या मार्गावरील बेस्टची बस बंद पडल्यानं एससीएलआरवरही वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
========================================

हेल्मेट सक्तीची पोलखोल, 'माझा'च्या कॅमेऱ्यामुळे पोलिसाकडून दंड वसूल

हेल्मेट सक्तीची पोलखोल, 'माझा'च्या कॅमेऱ्यामुळे पोलिसाकडून दंड वसूल
नागपूर: नागपुरात हेल्मेट सक्तीवरुन वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम सुरु केली आहे. पण या हेल्मेट  सक्तीमध्ये पोलिसांवर मात्र कारवाई होताना दिसत नाही. शहरातील विविध भागात अनेकजण  एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात हेल्मेटविना प्रवास करताना कैद झाले आहेत.

तर दुसरीकडे विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या पोलिसालाही माझाच्या कॅमेऱ्यामुळे दंड भरावा लागला आहे. शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करुन विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई केली जाते आहे.

दिसला विना हेल्मेट…  थांबवा गाडी… फाडा पावत्या

नागपूरच्या रस्त्यावर काल वाहतूक पोलिसांचा बक्कळ गल्ला जमला. ट्रफिक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या अनेक वाहन चालकांकडून दंड वसूल केला. अखेर एका विना हेल्मेट पोलिसाला आम्हीच अडवलं.

नियम मोडणारे पोलीस महाशय माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर त्यांची बोलतीच बंद झाली. त्यानंतर त्यांच्याकडूनही ट्रॅफिक पोलिसांनी दंड वसूल केला. मात्र, या कारवाईनंतरही अनेक पोलीस विना हेल्मेट फिरत होते.
========================================

बिहारमध्ये ऩक्षली हल्ल्यात सीआरपीएफचे दहा जवान शहीद

बिहारमध्ये ऩक्षली हल्ल्यात सीआरपीएफचे दहा जवान शहीद
पाटणा : बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या नक्षली हल्ल्यात दहा जवान शहीद झाले आहेत. आयईडीच्या हल्ल्यासह नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या कोबरा बटालियनवर जोरदार गोळीबार केला.

प्रत्युत्तरादाखल सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या हल्ल्यात चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. या हल्ल्यात सहभागी असलेल्या नक्षलींचा औरंगाबाद-गयाच्या जंगलात शोध सुरु आहे.


हल्ल्यात दहा जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी जवानांवर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
========================================

रायगडमध्ये रानभाजी खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

रायगडमध्ये रानभाजी खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
रायगड: एरवी पावसाळ्यात विविध प्रकारच्या रानभाज्या खाणं ही आपल्या सगळ्यांसाठी एका प्रकारे पर्वणी असते. पण रायगडमधल्या सुधागड तालुक्यात हीच रानभाजी एकाच कुटुंबातल्या तिघांच्या जिवावर उठली आहे.

रासळ गावातील खाडे कुटुंबातील तिघांचा कुलूची भाजी खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुलूची भाजी खाल्ल्यानंतर खाडे कुटुंबातील तिघांना उलट्यांचा त्रास व्हायला लागला, यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

उपचारादरम्यान तारामती खाडे यांचा मृत्यू झाला, तर पती आणि मुलगा अनिल यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारांना साथ न दिल्यामुळे या दोघांचाही मृत्यू झाला.  त्यामुळे एकाच घरातील तिघांच्या मृत्यूनंतर गावावर शोककळा पसरली आहे.
========================================

उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार, 15 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार, 15 जणांचा मृत्यू
नैनिताल : उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. नैनिताल, हरिद्वारमध्ये नद्यांना पूर आला असतानाच बस पाण्यात पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर उत्तराखंडमधील मृतांचा आकडा 15 वर गेल्याची माहिती ‘स्कायमेट वेदर’ने दिली आहे.

गलिया मार्ग या ठिकाणी नाल्याचं पाणी पुलावरुन वाहू लागल्यानं प्रवाशांनी भरलेल्या बसला पाण्यातून वाट काढणं कठीण होत होतं. पाण्यामुळे रस्त्यांना तडे गेल्याने प्रवाशांची एक बस पाण्यात पडली. बसमध्ये 35 प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला तर इतर प्रवाशांना वाचवण्यात आलं आहे.

नैनितालमध्ये कालाढूंगीजवळ एका दुचाकीस्वारनं पाण्याच्या जोरदार प्रवाहात रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला, मात्र सुदैवाने स्थानिकांनी त्याला वाचवलं. दुसरीकडे कुमाऊं नदीनंही रौद्र रूप धारण केल्यानं अनेक भागांना पुराचा फटका बसलाय.
========================================

टायगर श्रॉफ सुपरहिरो, 'अ फ्लाईंग जट्ट'चा ट्रेलर रिलीज

टायगर श्रॉफ सुपरहिरो, 'अ फ्लाईंग जट्ट'चा ट्रेलर रिलीज
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘अ फ्लाईंग जट्ट’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमात जबरदस्त अक्शन सिक्वेन्स पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात टायगरसह जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे.


सिनेमात टायगर सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. अमृता सिंह त्याच्या आईच्या भूमिकेत असून ती आपल्या सुपरहिरो मुलाला समाजातील दुष्कृत्य नष्ट करण्यासाठी प्रेरित करत.
========================================

ज्येष्ठ गायिका मुबारक बेगम यांचं निधन

ज्येष्ठ गायिका मुबारक बेगम यांचं निधन
मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायिका मुबारक बेगम यांचं वृद्धापकाळानं मुंबईत निधन झालं. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी जोगेश्वरीतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. या आजारपणातच त्यांचं निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होतील.

बेगम यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला होता. वयाच्या दहाव्या वर्षा त्या मुंबईत आल्या. मुबारक बेगम यांनी 1950 ते 1970 असा दोन दशकांचा काळ आपल्या आवाजानं गाजवला.

1955 मधील दिलीपकुमारच्या देवदास मधलं ‘वो ना आयेंगे पलटकर’, 1961 सालच्या हमारी याद आयेगी या चित्रपटातील ‘कभी तनाहाईयो मे यू हमारी याद आयेगी’ ही गाणी प्रचंड गाजली होती. त्यांच्या आवाजातील सोलो गाणी, गझल चाहत्यांच्या विशेष लक्षात राहिल्या.
========================================

ध्वनी प्रदुषणामुळे एमसीए, बीसीसीआयला 100 कोटींचा दंड?

ध्वनी प्रदुषणामुळे एमसीए, बीसीसीआयला 100 कोटींचा दंड?
मुंबई : ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून राज्यात आयपीएलच्या सामन्याचं आयोजन केल्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयला मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस पाठवलीय.

2013 मध्ये मुंबईतल्या वानखेडे स्टेडियम आणि पुण्यातल्या सहारा स्टेडियमवर रात्री झालेल्या सामन्यात मध्यरात्रीपर्यंत लाऊड स्पीकरचा वापर झाला. त्यामुळे ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचा भंग झाल्यानं एमसीए आणि बीसीसीआयला 100 कोटींचा दंड आकारावा, अशी जनहित याचिका हायकोर्टात दाखल झालीय.

यावर सुनावणी करताना हायकोर्टानं एमसीए आणि बीसीसीआयकडून उत्तर मागवलं असून 16 सप्टेंबरपर्यंत सुनावणी तहकूब केलीय.
========================================

सलमानच्या 'सुलतान'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, विक्रमी कमाई!

सलमानच्या 'सुलतान'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, विक्रमी कमाई!
मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या ‘सुलतान’ सिनेमानं अवघ्या 12 दिवसांमध्ये तब्बल 500 कोटींची विक्रमी कमाई केली आहे. याबाबतची अधिकृत माहिती यश राज फिल्मकडून ट्विटरद्वारे देण्यात आली आहे.

‘सुलतान’ चित्रपटाची तिकीट बारीवर विक्रमी घोडदौड अजूनही सुरु आहे. त्यामुळे येत्या आठवड्याभरात सुलतान याआधीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘सुलतान’ने ४० कोटींचा गल्ला जमवला होता.

सुलतान हा सिनेमा अली अब्बास जाफर यांनी दिग्दर्शित केला आहे. सलमान खानने सुलतान पैलवानाची भूमिका साकारली आहे. तर अनुष्का शर्माही मुख्य भूमिकेत आहे.
========================================

उद्धवनी बाळासाहेबांना अंधारात ठेवून ‘त्या’ कागदावर सही घेतली


मुंबई : उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरेंमधील संपत्तीचा वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे. कारण हायकोर्टात बाळासाहेबांच्या संपत्तीवरुन जयदेव यांनी उद्धव ठाकरेंबाबत गौप्यस्फोट केला आहे. “उद्धवनं बाळासाहेबांना अंधारात ठेऊन प्रॉपर्टीच्या कागदांवर सही घेतली.”, असा जबाब जयदेव ठाकरेंनी हायकोर्टात दिला आहे.

जयदेव ठाकरेंची हायकोर्टात उलटतपासणी सुरु

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मालमत्तेवरुन, ठाकरे बंधूमध्ये सुरु झालेल्या वादाचा हायकोर्टात दुसरा अंक पाहायला मिळाला. उद्धव ठाकरेंचे भाऊ जयदेव ठाकरेंची हायकोर्टात उलटतपासणी सुरु झाली आहे. यावेळी त्यांनी धक्कादायक माहिती हायकोर्टासमोर दिली.
========================================

इक्वेडोरमध्ये मधमाशांमुळे फुटबॉल सामना रद्द

इक्वेडोरमध्ये मधमाशांमुळे फुटबॉल सामना रद्द
इक्वेडोर: दक्षिण अमेरिकेच्या इक्वेडोरमध्ये मधमाशांमुळे फुटबॉल मॅच रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली. मधमाशांना पळवून लावण्याचे सर्व उपाय अयशस्वी ठरल्याने अखेर सामनाच रद्द करावा लागला.

इक्वेडोर देशात एका फुटबॉलच्या सामन्यात मधमाशांनी हल्ला केला. त्यामुळे एरवी गोल करण्याच्या नादात धावपळ सुरु असलेल्या मैदानात वेगळीच धांदल उडाली. मधमाशांना मैदानाबाहेर काढण्यासाठी खास पथकाला पाचारण करण्यात आलं.

या पथकाने मधमाशांना मैदानाबाहेर हाकलण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे अखेर नाईलाजाने हा सामना रद्द करावा लागला.
========================================

10 वर्षांपेक्षा जुन्या गाड्या हद्दपार

आता 10 वर्षांपेक्षा जुन्या गाड्या हद्दपार
नवी दिल्लीः एनजीटी अर्थात राष्ट्रीय हरित लवादाने जुन्या वाहनांसंबंधी हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. 10 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी करण्यात येणार नाही. त्यामुळे आता रस्त्यावरुन 10 वर्षांपेक्षा जुन्या गाड्या हद्दपार होणार आहेत.


आरटीओ कार्यालयांनी वाहनांची सर्व माहिती वाहतूक पोलिसांना द्यावी आणि पोलिसांनी 10 वर्ष जुन्या वाहनांवर कारवाई करावी, असे निर्देश एनजीटीने दिले आहेत. या नियमांची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार आहे.

वाहनांच्या कर्कश हॉर्नवर बंदी
एनजीटीने या निर्णयासोबतच ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी वाहनांवर लावण्यात येणाऱ्या कर्कश हॉर्नवरही बंदी आणली आहे. दुचाकींनाही हा नियम लागू असेल, असं एनजीटीने सांगितलं आहे. या निर्देशांमुळे वाहतूक पोलिसांची जबाबदारी वाढणार आहे.
========================================

गाडीची काच फोडून 54 लाख रुपये लंपास

गाडीची काच फोडून 54 लाख रुपये लंपास
जळगावः कारमधून 54 लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. व्यापारी अतुल कोठारी यांनी कार दुरुस्तीसाठी नेली असता, मागील सीटवरुन चोरट्यांची पैशांनी भरलेली बॅग लंपास केली.


जामनेरचे मका व्यापारी असलेल्या कोठारी यांनी व्यवसायासाठी बँकेतून 54 लाखाची रोकड काढली होती. रक्कम घेऊन जामनेरकडे परतत असताना त्यांची गाडी पंक्चर झाली. गाडीचा पंक्चर काढण्यासाठी ते थांबले असता ही घटना घडली.


कोठारी हे अजिंठा चौफुली येथे थांबले होते. यावेळी चोरट्यांनी कारच्या काचा फोडून मागील सीटवर ठेवलेली पैशांची बॅग लांबवली. या घटनेनंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून परिसरातील सीसीटीव्हीचं फुटेजही तपासलं जातं आहे.
========================================

देशभरातील 82% डॉक्टर बोगस

देशभरातील 82% डॉक्टर बोगस
नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटना WHOच्या एका नव्या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक निष्कर्श समोर आले आहेत. संघटनेने 2011च्या जनगणनेनुसार केलेल्या सर्वेक्षणात देशभरातील 57% डॉक्टरांकडे वैद्यकीय शिक्षणाची पदवीच नसल्याचे नमुद करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात ग्रामीण भागातील 100 पैकी 18 डॉक्टरांकडे डिग्री असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच एकूण देशभरातील अकडेवारी पाहिल्यास 82% डॉक्टर बोगस असल्याचे निष्कर्शामधून समोर आले आहे.

भारतातील डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना IMA  इंडियन मेडिकल असोसिएशन आणि त्यांना रेग्यूलेट करणारी MCI मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाच्या मतेदेखील देशातील बोगस डॉक्टरांची संख्या अधिक आहे. पण सरकारच्या मवाळ भूमिकेमुळे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

MCIच्या मते, देशभरात दोन लाख डॉक्टर बोगस आहेत. यांच्यावर गेल्या 20 वर्षांपासून कारवाईची मोहीम सुरू आहे, मात्र, तरीही यात यश आलेले नाही. देशातील गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांची दयनीय अवस्था असल्याने, बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे संघटनेचे मत आहे.

IMA च्या मतानुसार, देशात आयुर्वेदीक, होमियोपॅथी, फिजोथेरेपिस्ट आणि नॅचरोपेथची डिग्री घेऊन अनेक डॉक्टर अॅलिपॅथीची प्रॅक्टिस करत आहेत. विशेष म्हणजे, कम्पाउंडर आणि आशा वर्करदेखील डॉक्टरी करत आहेत. यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने, तसेच सरकार सर्वच ठिकाणापर्यंत जाऊन सुविधा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत असल्याने यांचे फावत असल्याचे सांगितले जात आहे.
========================================

रुमचा स्लॅब कोसळला, इम्तियाज जलील थोडक्यात बचावले

रुमचा स्लॅब कोसळला,  इम्तियाज जलील थोडक्यात बचावले
मुंबईः एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील एका दुर्घटनेत थोडक्यात बचावले. मुंबईतील नरीमन पॉईंट येथील आमदार निवासात स्लॅब कोसळल्यामुळे जलील यांना किरकोळ दुखापत झाली आहे.


इम्तियाज जलील हे औरंगाबाद मध्य मतदार संघाचे आमदार आहेत. मुंबईत कामानिमीत्त आले असता ते आमदार निवास येथे थांबले होते. त्यावेळी स्लॅब कोसळण्याची दुर्घटना घडली.
========================================

मित्राच्या बेकायदेशीर बांधकामासाठी सचिन तेंडुलकरची संरक्षणमंत्र्यांकडे धाव


  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. 19 - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मसुरीतील लॅण्डोर येथील रिसॉर्टवरुन संशोधन आणि विकास संस्थेसोबत (डीआरडीओ)  सुरक्षेच्या मुद्यावरुन सुरु असलेल्या वादामुळे केंद्रीय संरक्षणंत्री मनोहर पर्रिकरांची मदत मागितली आहे. ही संपत्ती सचिन तेंडूलकरचा व्यवसायिक भागीदार संजय नारंगची आहे. मनोहर पर्रिकरांनी मात्र या प्रकरणी दखल देण्यास नकार दिला असल्याची माहिती मिळाली आहे.
    सचिन तेंडूलकर अनेकदा या रिसॉर्टवर जात असतो. सचिन तेंडूलकरसाठी हे प्रकरण इतकं गंभीर होतं की मनोहर पर्रिकरांची भेट घेण्यासाठी त्याने ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्ध्यात संपवला होता अशी माहिती संरक्षण मंत्रालयाशी संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिली आहे. सचिन तेंडूलकरची भेट झाली असली तरी मनोहर पर्रिकरांनी मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याची कोणतेही संकेत दिलं नसल्याचंही अधिका-यांनी सांगितलं आहे.
========================================

वडाळा- चेंबुरदरम्यान भीषण अपघात, ३ ठार


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १९ - वडाळा- चेंबूर दरम्यान चार गाड्यांचा भीषण अपघात होऊन ३ जण ठार झाले असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे ईस्टर्न फ्री वेवर वाहनांची प्रचंड कोंडी झाली असून घाटकोपरकड़े जाणारी वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. 
    भरधाव वेगाने जाणा-या इनोव्हा गाडीतील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रोड डिव्हायडरवर आपटून पलीकडच्या रस्त्यावर पोहोचली. आणि त्याच वेळी समोरून येणा-या चार गाड्या इनोव्हावर आदळून भीषण अपघात घडला. या घटनेत तीन जण मृत्यूमुखी पडले असून दोघे गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
    दरम्यान या मार्गावरून अपघातग्रस्त गाड्या हटवण्यात आल्या असल्या तरीही वाहतूक कोंडी अद्याप कायमच आहे. 
========================================

पाकिस्तानने सोशल मिडियाच्या माध्यमातून भारताविरोधात पुकारले युद्ध


  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. 19 - हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वणीचा खात्मा करण्यात आल्यानंतर सोशल मिडियावर आलेल्या अर्ध्याहून अधिक प्रतिक्रिया कुठून आल्या आहेत याची काहीच माहिती मिळत नाही आहे. यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. 8 जुलै ते 14 जुलैदरम्यान ट्विटर, फेसबूक आणि अन्य सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आलेल्या एकूण 1.26 लाख प्रतिक्रियांच सर्वेक्षण करण्यात आलं. यातील 54,285 म्हणजे 45 टक्के ठिकाणांची माहिती मिळू शकलेली नाही. 
    सर्वेक्षणानुसार 49,159 म्हणजे 40 टक्के पोस्ट भारतातून करण्यात आल्या आहेत. तर 10,110 पोस्ट पाकिस्तानातून करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 'हा ट्रेंड चिंताजनक आहे, कारण यावरुन पाकिस्तान सायबर स्पेसच्या माध्यमातून प्रॉक्सी वॉर सुरु करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत मिळत आहे. समस्या निर्माण व्हाव्यात यासाठी लोक सोशल मिडियावर ट्विट करत आहेत, कमेंट करत आहेत. मात्र त्यांची जबाबदारी काही नाही', असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितलं आहे.
========================================

डरोगे तो मरोगे... धाडसी चिमुकल्यांचा संदेश


  • मुंबई : बहिणीचा मोबाइल हिसकावून पळ काढत असलेल्या चोराला पकडून त्याच्याशी दोन हात करणाऱ्या मॅथ्यू सुधाकर नाडार (११) आणि विन्सी सुधाकर नाडार (१५) यांचा पोलीस उपायुक्तांकडून सत्कार करण्यात आला. या वेळी आपली भीती हा आपला सर्वात पहिला शत्रू असतो. त्यामुळे जर ही भीतीच नसेल, तर आपण काहीही करू शकतो. त्यामुळे ‘डरोगे तो मरोगे’ असा संदेश या चिमुकल्यांनी दिला.
    अँटॉप हिल परिसरात राहाणारा मॅथ्यू हा सहावी इयत्तेत तर विन्सी दहावी इयत्तेत शिक्षण घेतात. रविवारी सकाळी प्रार्थनेसाठी चर्चकडे जात असताना एका लुटारूने विन्सीचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिवाची पर्वा न करता, या चिमुरड्याने चोराशी दोन हात केले. मॅथ्यूने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘बहिणीसोबत जात असताना अचानक एक मद्यपी बहिणीकडे येत असताना दिसला. मी थेट तिच्या पुढे उभे राहून तिला आधार दिला. त्यानंतर, चोर माझ्या बहिणीच्या हातातील मोबाइल हिसकावत होता. मी रागाने माझ्या हातातील छत्रीने त्याला मारझोड करत बहिणीचा मोबाइल परत मिळविला,’ असे त्याने सांगितले. विन्सीच्या म्हणण्यानुसार, ‘आपल्या मनातली भीती हा आपला खरा शत्रू असतो. माझ्या मम्मी-पप्पाने मला नेहमीच न घाबरता प्रत्येक परिस्थितीशी झगडायचे, कसे हे शिकविले. शाळेतही सेल्फ डिफेन्सचे धडे देतात. त्यामुळे चोर अंगावर येणार हे समजताच आम्ही त्याच्याशी सामना केला. साधारण पाच ते दहा मिनिटे आमच्यात झटापट सुरू होती. अचानक समोरून आलेल्या टॅक्सीचालकाचे लक्ष जाताच त्याने आम्हाला मदत केली. लहान असलो म्हणून काय झाले? आम्हीही कुणापेक्षा कमी नाही,’ असे म्हणत तिने ‘सर्वांनी मनातली भीती दूर करत काम केल्यास सर्व गोष्टी साध्य होऊ शकतात,’असे सांगितले. आज माटुंगा पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्तांकडून दोघा चिमुकल्यांचा सत्कार करण्यात आला. 
========================================

सत्र न्यायालयात दारू पार्ट्या


  • मनीषा म्हात्रे,
    मुंबई- नेहमी हायअ‍ॅलर्टवर असणाऱ्या सत्र न्यायालयात सध्या दारू पार्ट्या रंगत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शौचालयात दारूच्या बाटल्या असल्याचा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. त्याची खातरजमा केली असता, आजही या बाटल्यांचा खच शौचालयाच्या आवारात पाहावयास मिळाला. त्यामुळे सत्र न्यायालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
    मुंबईतील कुलाबा येथील सत्र न्यायालयात टाडा, सीबीआय, एनआयए, एनडीपीएस, मोक्कासारखी वेगवेगळी न्यायालय आहेत. दहशतवाद्यांपासून कुख्यात गुंडांचे खटले याच ठिकाणी चालतात. नेहमीच अ‍ॅलर्टवर असलेल्या न्यायालयात काटेकोर सुरक्षा ठेवण्यात आली आहे. कडेकोट सुरक्षेतून तंबाखूची पुडीही आतमध्ये नेण्यास बंदी असते. अशा परिस्थितीत येथील पहिल्या मजल्यावरील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या पुरुष शौचालयात दारूच्या सापडलेल्या बॉटलमुळे सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. दारूच्या बाटल्यांचा खच असलेला हा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला. त्यानुसार, ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने तेथे जाऊन खातरजमा केली. सत्र व दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पुरुष शौचालयात दारूच्या बाटल्या आढळून आल्या. विशेष म्हणजे याच मजल्यावर एनडीपीएसचे न्यायालय आहे. त्यात हा सर्व परिसर सीसीटीव्हीने वेढला आहे. अशात न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या या शौचालयाचा वापर पोलीस तसेच तेथील कर्मचारी बाटल्यांकडे पाहून काणाडोळा करत असल्याचे पाहावयास मिळाले. सत्र न्यायालयात प्रवेश करण्यासाठी सामान्यांसाठी दोनच प्रवेशद्वार आहेत. तसेच अन्य प्रवेशद्वारातून वकिलांसाठी सोय करण्यात आली आहे. असे असताना नागरिकांच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनर मशीन तसेच मेटल डिटेक्टर बंद असल्याने तेथील पोलीस स्वत:च सामानाची तपासणी करतात, तरीही दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. त्यामुळे पोलीस, आरोपी आणि न्यायालयातील सुरक्षा यंत्रणेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
========================================

आठवडाभर राज्यात पाऊस बरसणारच


  • मुंबई : पश्चिम समुद्र किनारपट्टीवर दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत विरळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने, येत्या ७२ तासांसाठी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. शिवाय, पूर्व मध्य अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलामुळे राज्याच्या किनारपट्टीसह गोवा आणि गुजरात किनारपट्टीवर सुरू असलेला पाऊसही कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
    मागील चोवीस तासांत कोकण-गोव्यात काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. १९ जुलै रोजी कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. २० जुलै रोजी कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २१ आणि २२ जुलै रोजी कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल. 
========================================

तुर्कस्तानमधील सत्तापलटाच्या कटात एअरफोर्स चीफचा समावेश


  • ऑनलाइन लोकमत
    इस्तांबुल, दि. १८ : तुर्कस्तान किंवा टर्की या देशाच्या लष्करातील सरकारविरोधी गटाने शुक्रवारी (१६) उठाव केला आणि सरकारशी ईमानी असलेल्या गटाने त्यास विरोध केला. या धुमश्चक्रीत २०० जण ठार झाले होते. हे बंड अखेर शमलं असून ५ जनरल्स व २७ कर्नल्स यांच्यासह लष्करामधल्या तब्बल २००० बंडखोरांना अटक करण्यात आली. या सत्तापालट प्रकरणी आज नवी माहिती समोर आली आहे.
    स्थानिक मीडियाच्या माहीतीनुसार या कटामध्ये एअरफोर्स चीफचा समावेश आहे. तशी कबूली त्याने दिली आहे. टर्कीचे एअरफोर्स चीफ अकीन उजतुर्क यांनी शुक्रवारी झालेल्या सत्तापालटाच्या कटामध्ये आपण सामील असल्याची कबूली दिली आहे. सरकार सत्तापलटमध्ये सहभागी असलेल्यानां मृत्यूदंडाची शिक्षा देणार असल्याचेही वृत्त आहे. 
========================================

ट्रम्प यांच्या विरोधासाठी महिलांचे विवस्त्र आंदोलन!


  • ऑनलाइन लोकमत
    क्लेव्हलँड, दि. १८ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत. राज्याराज्यांमध्ये होत असलेल्या प्रायमरीज आता संपत आल्या आहेत. आत्तापर्यंत झालेल्या प्रायमरींमध्ये आश्चर्यकारकपणाने इतर सगळे स्पर्धक मागे पडून डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकनची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाल्यासारखे आहे. वादग्रस्त विधानांमुळे ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका होत आलेली आहे. अशाचप्रकारे त्यांचा विरोध दर्शवण्यासाठी क्लेव्हलँड शहरातील महिला रस्त्यावर अवतरल्या, त्या पण विवस्त्र होऊन त्यामुळे स्थानिक माध्यमात हा चर्चेचा विषय तर झालाच पण हे वेगळ्या पद्धतीचे आंदोलन जगभर गाजत आहे. 
    दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्षपद भूषविण्यास डोनाल्ड ट्रम्प अपात्र आहेत, असे सांगण्यासाठी येथे शंभरपेक्षा जास्त महिलांनी विवस्त्र अवस्थेत आरसे समोर धरले होते. रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला १०० पेक्षा अधिक महिला एकत्र येऊन त्यांनी ट्रम्प यांच्या विरोधात आंदोलन छेडले होते.  या अधिवेशनात ट्रम्प यांना पक्षाचा उमेदवार म्हणून जाहीर केले जाणार आहे. ट्रम्प यांची धोरणे व विचार हे समाजात फूट पाडणारे असल्याची देशात भावना आहे व त्यांच्या पक्षातही त्याबद्दल इशारे देण्यात आले असताना अत्यंत कठीण अशी प्राथमिक फेरी ट्रम्प जिंकले आहेत.
========================================

सोशल व्हायरल - आजीबाईंचा हा फोटो देतोय जगण्याचा मंत्र


  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. 18 - मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचा भाग बनला आहे. म्हणजे एखाद्या दिवशी जर मोबाईल घरी विरसलो किंवा मोबाईल सोबत नसेल तर आपण जगापासून दूर आहोत असा भास होऊ लागतो. एखाद्या पर्यटनस्थळी किंवा कार्यक्रमाला हजेरी लावली, तर मित्रांशी गप्पा कमी मारल्या जातात आणि फोटो जास्त काढले जातात. मी त्या ठिकाणी उपस्थित होतो किंवा आम्ही मस्त एन्जॉय केलं हे सांगण्याची घाई इतकी असते की ते फोटो काढून लगेच सोशल मिडियावर अपलोडही केले जातात. बर इतकंच नाही तर त्यावर कमेंट, लाईक नाही मिळाले तर होणारी चिडचिड वेगळीच. त्यामुळेच की काय तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या आजच्या या पिढीला जगण्याचा खरा अर्थ सांगणारा हा फोटो सध्या व्हायरल होऊ लागला आहे. 
========================================

राहुलने वादग्रस्त छायाचित्र टिष्ट्वटरवरून काढले


  • नवी दिल्ली : भारतीय सलामीवीर लोकेश राहुलने वेस्ट इंडिज दौऱ्यावर बीअरसह छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले होते, पण बीसीसीआयने फटकारल्यानंतर हे वादग्रस्त छायाचित्र त्याने टिष्ट्वटरवरून काढून टाकले.
    भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यावर नाराजी व्यक्त करताना म्हटले, की क्रिकेटपटूंनी अशा प्रकारचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले, तर युवा व विशेषत: बालकांवर विपरित परिणाम होतो.
    कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विंडीज दौऱ्यावर आहे. भारतीय क्रिकेटपटू कसोटी मालिकेपूर्वी विंडीजमधील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंदही घेत आहे.
    सोशल मीडियावर जवळजवळ सर्वच क्रिकेटपटू संघासोबत जुळलेले छायाचित्र शेअर करतात, पण काही दिवसांपूर्वी राहुलने बीचवर आपल्या संघसहकाऱ्यांसह एक छायाचित्र पोस्ट केले होते. त्यात त्याच्या हातात बीअर असल्याचे दिसत होते. एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार राहुलच्या या छायाचित्रावर बोर्डाने भारतीय संघाच्या व्यवस्थापकांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली.
========================================

No comments: