Wednesday, 27 July 2016

नमस्कार लाईव्ह २७-०७-२०१६ चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- न्यूयॉर्क; यूएस अध्यक्षपदासाठी हिलरींना उमेदवारी, पहिल्यांदाच महिला शर्यतीत 
२- फ्रान्समधील चर्चवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अमेरिकेकडून निषेध व्यक्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
३- कोहिनूर हिरा भारतात परतण्याच्या शक्यता धूसर 
४- नरसिंग यादवच्या जेवणात औषध मिसळणारा सापडला : महासंघ 
५- पारल्याची ओळख असलेला पारले-जी प्लांट 87 वर्षांनी बंद 
६- झाकीर नाईक इस्लामला बदनाम करतो आहे- सय्यद आलमगीर अश्रफ 
७- पंकजा मुंडेंच्या खासगी रेंज रोव्हरला लाल दिवा का?, 'आप'चा आक्षेप 
८- भाजप आमदार मंगलप्रभात लोढांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
९- भावी मुख्यमंत्री शिवसेनेचाच, उद्धव ठाकरेंना विश्वास 
१०- डी वाय पाटील शिक्षणसंस्थेवर आयकर विभागाचा छापा 
११- मॉलमध्ये महिलेची छेड, मनसे कार्यकर्त्यांकडून सेल्समनची धुलाई 
१२- शाळकरी मुलांच्या दप्तराचे ओझे कमी झाले, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१३- चंद्रपूर; चुकीच्या इंजेक्शनमुळे दोन महिलांचा मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा 
१४- दोन रुपयांचा वाद जीवावर, रिक्षा अंगावर उलटून तरुणाचा मृत्यू 
१५- गोंदिया; पती-मुलाला जमावाची मारहाण, गोंदियात महिलेची आत्महत्या 
१६- अकोला; गुंडाची पोलिसाला जीवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यातच धिंगाणा 
१७- ठाणे महापालिकाः काळ्या यादीतील कंत्राटदारांना कामं, मनसेचा आरोप 
१८- अकोला शहरात सकाळपासून दमदार पाऊस 
१९- काश्मीरमध्ये पोस्ट पेड मोबाईल सेवा पुन्हा सुरु 
२०- पुणे; २७ वर्षीय नराधमाने चॉकलेटचे आमिष दाखवत ९ वर्षांच्या मुलावर केला अत्याचार 
२१- लातुर : पाच लाँटरी सेंटरवर धाडी, रोख 70 हजारासह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२२- मुंबई की पुणे... प्रो कबड्डीच्या उपांत्य फेरीत कोण मारणार धडक? 
२३- बी. विल्सन व टी.एम.कृष्णा या भारतीयांना मानाचा 'मॅगसेसे' पुरस्कार जाहीर 
२४- दुखापतीमुळे रॉजर फेडररची रिओ ऑलिम्पिकमधून माघार 
२५- कबालीसाठी रजनीकांतला किती पैसे मिळाले माहीत आहे का? 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
============================================

डी वाय पाटील शिक्षणसंस्थेवर आयकर विभागाचा छापा

डी वाय पाटील शिक्षणसंस्थेवर आयकर विभागाचा छापा

डी वाय पाटील शिक्षणसंस्थेवर आयकर विभागाचा छापा

पिंपरी चिंचवड/कोल्हापूर : पिंपरी चिंचवड आणि कोल्हापुरातील डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. पिंपरीत 3 ते 4 कार्यालयात आयकर विभागाने सकाळी साडेसातच्या सुमारास धाड टाकली. शिवाय कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात जाण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.

पिंपरीत 22 अधिकाऱ्यांनी डी वाय पाटील संस्थेच्या मेडिकल, डेन्टिस्ट, फार्मसी तसंच इंजिनीअरिंग अशा विविध कार्यालयांवर छापा टाकला. यावेळी त्यांच्यासोबत 20 पोलिसही उपस्थित आहेत. आयकर विभागाचे अधिकारी साडेतीन तासांपासून कागदपत्रांचा कसून तपास करत आहेत.

दुसरीकडे कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरातील डी वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि इंजिनीअरिंग कॉलेजवर आयकर विभागाने सकाळी साडेआठच्या सुमारास छापा टाकला आहे.

छाप्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
============================================

नरसिंग यादवच्या जेवणात औषध मिसळणारा सापडला : महासंघ

नरसिंग यादवच्या जेवणात औषध मिसळणारा सापडला : महासंघ
नवी दिल्ली : सोनीपत कँपमध्ये कुस्तीपटू नरसिंग यादवच्या जेवणात कथित औषध मिसळणाऱ्या आरोपीची ओळख पटल्याचा दावा, कुस्ती महासंघाने केला आहे.

ज्याने हे कटकारस्थान केलं, तो एका सीनियर आंतरराष्ट्रीय खेळाडूचा भाऊ आहे, सध्या तो छत्रसाल आखाड्यात सराव करतो, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांनी दिली. ‘एनडीटीव्ही’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

साईच्या आचाऱ्यांनी ओळखलं
इतकंच नाही तर भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया – साई) आचाऱ्यांनीही आरोपीला ओळखल्याचं सांगण्यात येत आहे.

रिओ ऑलिम्पिकच्या तोंडावर भारतीय क्रीडा जगतात डोपिंगच्या डागामुळे खळबळ उडाली आहे. कुस्तीपटू नरसिंग यादव उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे, त्याची ऑलिम्पिकवारी हुकली आहे. मात्र नरसिंगने आपल्याशी घातपात झाल्याचा दावा केल्यामुळे, कुस्ती महासंघाने त्याची पाठराखण केली होती.
============================================

चुकीच्या इंजेक्शनमुळे दोन महिलांचा मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा

चुकीच्या इंजेक्शनमुळे दोन महिलांचा मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा
चंद्रपूर : चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे दोन महिलांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी डॉक्टरवर हलगर्जीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रपुरातील डॉक्टर भुपाल यांनी काही महिलांना इंजेक्शन दिलं होतं. त्यानंतर त्यांना त्रास झाला आणि त्यातच दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

कुटुंबीयांच्या आरोपानंतर डॉक्टर भुपाल यांच्याविरोधात हलगर्जीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, डॉक्टरांनी महिलांना कोणतं इंजेक्शन दिलं होतं याविषयी अद्याप कोणतंही स्पष्टीकरण नाही.

============================================

कोहिनूर हिरा भारतात परतण्याच्या शक्यता धूसर

कोहिनूर हिरा भारतात परतण्याच्या शक्यता धूसर
नवी दिल्ली : कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास इंग्लंड सरकार बांधिल नाही, असं म्हणत इंग्लंडने पुन्हा एकदा भारताला झटका दिला आहे. याआधीच केंद्र सरकारनंही कोहिनूर भारतात परत आणण्यासंदर्भात असमर्थता व्यक्त केली होती.

कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार नाही, असं ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कोहिनूर पुन्हा मायदेशी परत येण्याच्या शक्यता मावळल्या आहेत.

इंग्रजांनी कोहिनूर भारतातून लुटून किंवा चोरुन नेला नव्हता, तर 19 व्या शतकात पंजाबच्या राजानं ब्रिटनच्या महाराणीला तो भेट म्हणून दिला होता. त्यामुळे कोहिनूर परत करण्याची मागणी आपण इंग्लंडकडे करु शकत नाही. असं केंद्र सरकारनं 4 महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं होतं. त्यामुळे कोहिनूर भारतात येण्याची आशा धूसर होत चालली आहे.

============================================

पारल्याची ओळख असलेला पारले-जी प्लांट 87 वर्षांनी बंद

पारल्याची ओळख असलेला पारले-जी प्लांट 87 वर्षांनी बंद
मुंबई : मुंबई लोकलने सांताक्रूझ स्टेशन सोडल्यानंतर विलेपार्ले येण्याआधी दरवळणारा ओळखीचा सुगंध आता अनुभवता येणार नाही. कारण जगविख्यात पारले-जी कंपनीने आपला विले-पारलेचा प्लान्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि प्लांटच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पारले बिस्किटांच्या त्या सुगंधाची सवय लागली आहे. मात्र जवळपास 87 वर्षांनी हा दरवळ थांबणार आहे. पारले स्टेशनवरुन नामकरण झालेल्या या ब्रँडकडून पारल्याच्या जागेला अलविदा केला जाणार आहे.

1929 साली याच ठिकाणाहून पारले उत्पादनांच्या निर्मितीला सुरुवात झाली होती. सुरुवातीला फक्त गोळ्यांचं (कँडीज) उत्पादन व्हायचं. त्यानंतर दहा वर्षांनी बिस्किटांची निर्मिती सुरु झाली. त्यानंतर या बिस्किटांनी संपूर्ण जगाला वेड लावलं. निल्सनच्या सर्व्हेनुसार पारले-जी जगातलं सर्वाधिक विकलं जाणारं बिस्किट आहे. मात्र आता त्यांचा मुंबईस्थित प्लँट बंद होणार आहे.

या प्लांटमध्ये तीनशे कर्मचारी कार्यरत होते, त्या सर्वांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची माहिती आहे. 10 एकरावर पसरलेल्या या भागाचा 25 ते 28 हजार रुपये प्रति चौरस फूट दर असल्याचं रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार सांगतात. या प्लान्टमधून हव्या त्या प्रमाणात उत्पादन होत नसल्यानं हा प्लँट बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी संचालक अरुप चौहान यांनी दिली आहे. दोन महिन्यांपूर्वीच इथल्या बिस्किट आणि गोळ्यांचं उत्पादन थांबवण्यात आलं. दरम्यान, इतर प्लँट सुरुच असल्याने ग्राहकांना त्यांच्या आवडत्या बिस्किटांची चव यापुढेही चाखता येणार आहे.

ब्रिटानिया आणि आयटीसी हे पारलेचे प्रमुख स्पर्धक आहेत. पारलेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार बिस्किट मार्केटमध्ये पारलेचा 40 टक्के वाटा आहे, तर भारतातील बेकरी उत्पादनांमध्ये 15 टक्के मार्केट शेअर आहे. पारले जी प्रमाणे मोनॅको, हाईड अँड सीक, क्रॅकजॅक, मिलानो यासारखी प्रसिद्ध बिस्किटं आहेत.

============================================

दोन रुपयांचा वाद जीवावर, रिक्षा अंगावर उलटून तरुणाचा मृत्यू

दोन रुपयांचा वाद जीवावर, रिक्षा अंगावर उलटून तरुणाचा मृत्यू
मुंबई : रिक्षाचालकासोबत दोन रुपयांसाठी झालेला वाद मुंबईतल्या 26 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतल्याचं समोर आलं आहे. वादानंतर पळणाऱ्या रिक्षाचालकाला पकडण्याच्या नादात रिक्षा अंगावर उलटल्याने चेतन आचिर्णेकर या तरुणाचा मृत्यू झाला.

गोव्याहून पहिला विमान प्रवास करुन चेतन घरी परतत होता. त्याचवेळी विक्रोळीतील गोदरेज कॉलनीमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी रिक्षाचालक कमलेश प्रसाद याला अटक केली आहे.

शुक्रवारी चेतन रात्री सव्वा वाजण्याच्या गोव्याहून विमानाने मुंबई विमानतळावर उतरला. तिथून त्याने विक्रोळीतील गोदरेज कॉलनीला जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षाचं भाडं 172 रुपये झालं.

तेव्हा चेतनने पाचशे रुपयांची नोट दिली, पण रिक्षाचालकाने सुट्टे नसल्याचं सांगितल्यावर चेतन घरी गेला आणि 200 रुपये घेऊन आला.
मात्र सुट्ट्या दोन रुपयांवरुन दोघांमध्ये वादावादी झाला. तितक्यात चेतनचे वडील खाली आले आणि दोन रुपये नसतील तर आठ रुपये सोड असं चेतनला सांगितलं. वडिलांचं ऐकून चेतन वीस रुपये घेऊन घरी परतत होता, मात्र त्याचवेळी रिक्षाचालकाने त्याला उद्देशून शिवीगाळ केली.

============================================

भावी मुख्यमंत्री शिवसेनेचाच, उद्धव ठाकरेंना विश्वास

भावी मुख्यमंत्री शिवसेनेचाच, उद्धव ठाकरेंना विश्वास
मुंबई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपला ठणकावलं आहे. “काही जण मुंबई महापालिका काबिज करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही”, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. तसंच भावी मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होणार, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी ’50 वर्षांची घौडदौड’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार, मंत्री, नेते उपस्थित होते.

दरम्यान, काल शिवसेना आमदारांच्या बैठकीतही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सत्तेबाबत नाराजी दर्शवली होती. सेना आमदारांच्या मतदारसंघातील कामं न झाल्यास, सत्तेतू पाठिंबा काढून घेऊ, असे संकेत उद्धव ठाकरेंनी काल शिवसेना आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत दिल्याची सूत्रांनी माहिती दिली. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर कोणता मोठा निर्णय होतो का, याकडे सर्वांचीच नजर लागून राहिली आहे.

============================================

झाकीर नाईक इस्लामला बदनाम करतो आहे- अखिल भारतीय उलेमा बोर्डचे अध्यक्ष सय्यद आलमगीर अश्रफ 

'झाकीर नाईक इस्लामला बदनाम करतो आहे'
नागपूर: ‘झाकीर नाईक इस्लामला बदनाम करत असून ते संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे.’ असं मत अखिल भारतीय उलेमा बोर्डचे अध्यक्ष सय्यद आलमगीर अश्रफ यांनी व्यक्त केलं. त्यांच्या नेतृत्वात काल नागपुरात डॉ झाकीर नाईक विरोधात आंदोलन करण्यात आलं.

भारतासह संपूर्ण जगात कट्टरता पसरवणाऱ्या झाकीर नाईक विरोधात कडक केली पाहिजे अशी मागणी यावेळी मुस्लिम बांधवांनी केली. तसंच झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला मिळणाऱ्या निधीचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम आंदोलनकर्त्यांनी केली.

‘प्रक्षोभक भाषणांमधून झाकीर नाईक देशातील नागरिकांना भडकवण्याचे काम करत आहे. मुस्लिम युवकांनी त्याच्या भूलथापांवर विश्वास ठेऊ नये.’ असेही सय्यद आलमगीर अश्रफ म्हणाले.


============================================

पती-मुलाला जमावाची मारहाण, गोंदियात महिलेची आत्महत्या

पती-मुलाला जमावाची मारहाण, गोंदियात महिलेची आत्महत्या
गोंदिया : गावकऱ्यांनी पती आणि मुलाला मारहाण करुन अपमानित केल्यामुळे विवाहितेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील राजोली गावात हा प्रकार घडला.

सुभद्रा उईके यांनी विहिरीत उडी मारुन आयुष्य संपवलं. राजोली गावात राहणाऱ्या उईके पिता-पुत्राला 19 जुलै रोजी गावातल्या जमावानं मारहाण केली. या प्रकरणी सुभद्रा उईके यांनी 20 जुलैला पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र त्यानंतरही उईके कुटुंबाचा छळ सुरुच राहिला.


याला कंटाळून सुभद्रा उईके यांनी 23 जुलैला विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. सुभद्रा यांच्या आत्महत्येनंतर जाग आलेल्या पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सात जणांना अटक केली आहे. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर सुभद्रा यांची आत्महत्या टळली असती, असं म्हटलं जात आहे.

============================================

यूएस अध्यक्षपदासाठी हिलरींना उमेदवारी, पहिल्यांदाच महिला शर्यतीत

यूएस अध्यक्षपदासाठी हिलरींना उमेदवारी, पहिल्यांदाच महिला शर्यतीत
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात त्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्याच महिला उमेदवार ठरल्या आहेत.

व्हरमाँटचे सिनेटर बर्नी सँडर्स यांना मागे टाकत अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी यांनी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवली. पक्षातील एकजूट दाखवण्यासाठी सँडर्स यांनीच पक्षाध्यक्षांकडे हिलरी यांना उमेदवारी देण्यास सांगितल्याची माहिती आहे.

हिलरी यांना 2842 मतं मिळाली होती, तर सँडर्स यांच्या पारड्यात 1865 मतं पडली. मात्र आता सँडर्स समर्थकांनी हिलरींविरोधात निदर्शने सुरु केल्याची माहिती आहे.

रिपब्लिकन पक्षाने अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची यापूर्वीच घोषणा केली आहे. त्यामुळे 8 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या लढतीत आता हिलरी विरुद्ध ट्रम्प असा सामना रंगणार आहे.

============================================

गुंडाची पोलिसाला जीवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यातच धिंगाणा

गुंडाची पोलिसाला जीवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यातच धिंगाणा
अकोला: अकोल्यात गुंडानेच पोलिसाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गुंड पोलिसांना अश्लील शिवीगाळही करत होता. रविवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

अकोल्यातील सुरांगीनी बारमध्ये रविवारी रात्री रवी सरदार गेला होता. मात्र, बार बंद झाल्याने बारमालकाने त्याला मद्य देण्यास नकार दिला. यावर रवी सरदारने बारमध्ये गोंधळ घालत तोडफोड केली. त्यानंतर रामदासपेठ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मात्र, रवी सरदारने पोलीस ठाण्यातही गोंधळ घातला.

यावेळी सरदाराने कर्तव्यावर असलेल्या गोपाल जाधव या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला अन् त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. सोमवारी पोलीस कर्मचारी गोपाल जाधव यांच्या तक्रारीवरून रवी सरदार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

============================================

मॉलमध्ये महिलेची छेड, मनसे कार्यकर्त्यांकडून सेल्समनची धुलाई

मॉलमध्ये महिलेची छेड, मनसे कार्यकर्त्यांकडून सेल्समनची धुलाई
मुंबई : मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी बोरिवलीतल्या शिंपोली परिसरातल्या परिचय सुपर मार्केटमधील सेल्समनला चोप दिला आहे. सेल्समनवर महिलेशी छेडछाड केल्याचा आरोप मनसेने केला आहे.

खरेदीसाठी परिचय सुपर मार्केटमध्ये आलेली महिला चेंजिंग रुममध्ये गेली होती. त्यावेळी संबंधित सेल्समनही तिच्या मागे गेला. त्यानंतर आपण आरडाओरड केली तेव्हा तो बाहेर आला, अशी तक्रार महिलेनं केली आहे.

सेल्समनने महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचं समजताच मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी मॉल गाठला. त्यानंतर आरोप असलेल्या सेल्समनला त्यांनी चांगलाच चोप दिला.

============================================

मुंबई की पुणे... प्रो कबड्डीच्या उपांत्य फेरीत कोण मारणार धडक?

मुंबई की पुणे... प्रो कबड्डीच्या उपांत्य फेरीत कोण मारणार धडक?
पुणेरी पलटणनं दबंग दिल्लीचा 39-34 असा पराभव करून प्रो कबड्डी लीगच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली. त्यामुळं उपांत्य फेरीच्या चौथ्या तिकीटासाठी पुणेरी पलटण आणि यू मुम्बा संघांत तीव्र चुरस निर्माण झाली आहे.

पुण्याच्या खात्यात 13 सामन्यांमध्ये पाच विजय, सहा पराभव आणि दोन बरोबरींसह 37 गुण झाले आहेत. पाचव्या स्थानावरच्या यू मुम्बाच्याही खात्यात 13 सामन्यांमध्ये सहा विजय, सहा पराभव आणि एका बरोबरीसह 37 गुणच आहेत.

प्रो कबड्डीच्या साखळीत पुणे आणि मुंबईचा एकेक सामना उरला असून, अखेरचा साखळी सामना जिंकून दोन्ही संघ उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी उत्सुक असतील. अखेरच्या साखळी सामन्यात पुण्याची गाठ बंगळुरू बुल्सशी असून, यू मुम्बाला दबंग दिल्लीचा सामना करायचा आहे.

============================================

पंकजा मुंडेंच्या खासगी रेंज रोव्हरला लाल दिवा का?, 'आप'चा आक्षेप

पंकजा मुंडेंच्या खासगी रेंज रोव्हरला लाल दिवा का?, 'आप'चा आक्षेप
मुंबई : एकनाथ खडसेंनंतर आता पंकजा मुंडे विरोधकांच्या रडारवर असल्याचे दिसू येते आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या खासगी वाहनाला लाल दिवा बसवून घेतला असून, ते बेकायदेशीर आहे, असा आरोप आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती शर्मा-मेनन यांनी केला आहे.

पंकजा मुंडे यांच्याकडे असलेल्या महागड्या रेंज रोव्हर कारवरुन आम आदमी पक्षाने टीकास्त्र सोडलं आहे. “पंकजा मुंडे या महागडी कार वापरु शकतात. मात्र, कारचं कर भरु शकत नाहीत. शिवाय, त्यांच्या रेंज रोव्हरचा क्रमांक DL 12 CD 1212 आहे. या कारला राज्य शासनाचा लाल दिवा बसवण्यात आला असून, कारची नोंदणी दिल्लीतील रॅडिको एन व्ही डिस्टीलरीस नावाने झाली आहे. या कंपनीचे संचालक पंकजा यांचे पती चारुदत्त पालवे हे आहेत.”, असा आरोप आपकडून करण्यात आला आहे.

“दिल्लीत नोंदणी असलेली कार इतर राज्यात घेऊन जात असताना राज्य बदलीची एनओसी द्यावी लागते. मात्र, दिल्ली वाहतूक शाखेकडे अशाप्रकारची कुठलीही एनओसी देण्यात आली नाही. किंबहुना एनओसीसाठी साधा अर्जही करण्यात आला नाही.” असाही आरोप प्रिती शर्मा-मेनन यांनी केला आहे.

============================================

भाजप आमदार मंगलप्रभात लोढांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

भाजप आमदार मंगलप्रभात लोढांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई मुंबईत टोलेजंग इमारत उभारणारे बिल्डर आणि भाजपचे आमदार मंगल प्रभात लोढांविरोधात मुंबईतील वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महारष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट म्हणजेच मोफा कायद्यातंर्गत लोढांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रवी अगरवाल नावाच्या इसमान मंगलप्रभात लोढा आणि लोढा कन्स्ट्रक्शनविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

मोफा  कायद्यानुसार मुंबईतल्या एखाद्या बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं समजतं आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस देशबंधू गुप्ता, खुशिराम गुप्ता आणि निलेश गुप्ता यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

============================================

ठाणे महापालिकाः काळ्या यादीतील कंत्राटदारांना कामं, मनसेचा आरोप

ठाणे महापालिकाः काळ्या यादीतील कंत्राटदारांना कामं, मनसेचा आरोप
ठाणेः मुंबई महापालिकेच्या काळ्या यादीतील कंत्राटदारांना ठाणे महापालिकेनं दिलेली कंत्राट रद्द करावी, अशी मागणी करत मनसेनं जोरदार आंदोलन केलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात घोषणाबाजी केली.


मनसेने पालिका प्रशासनाला निवेदन देऊन काळ्या यादीतील कंत्राटदारांची कामं त्वरीत रद्द करण्याची मागणी केली. मुंबई महापालिकेनं जे. कुमारसह 3 बड्या कंत्राटदारांची नावं काळ्या यादीत टाकली. मात्र याच वादग्रस्त कंत्राटदारांना ठाणे महापालिकेनं 200 कोटींची कामं दिल्याचा आरोप मनसेनं केला आहे.


महापालिकेने ही कंत्राट रद्द न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ठाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला. मुंबई महापालिकेचा रस्ते घोटाळा एकीकडे गाजत असतानाच ठाणे महापालिकेच्या प्रशासनावर मनसेने हा गंभीर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

============================================

बी. विल्सन व टी.एम.कृष्णा या भारतीयांना मानाचा 'मॅगसेसे' पुरस्कार जाहीर



  • नवी दिल्ली, दि. २७ -  सामाजिक कार्यकर्ते बी. विल्सन आणि संगीतकार टी.एम.कृष्णा या दोन भारतीयांना आशिया खंडातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा २०१६ सालचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. दरम्यान या दोन भारतीयांशिवाय काँचिटा कॅप्रिओ-मॉरेल्स, डॉम्पेट धौफा या दोघांनाही हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 
    कर्नाटकातील एका दलित कुटुंबात जन्माला आलेले बी. विल्सन हे एक सामाजिक कार्यकर्ते असून मानवी हक्कांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर चेन्नईत जन्मलेले संगीतकार टी.एम.कृष्णा यांना संगीतात सर्व संस्कृतींचा समावेश करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.  
    आशियाचा ‘नोबेल’ म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाऊंडेशन (आरएमएएफ)च्या विश्वस्त बोर्डाने बुधवारी या पुरस्काराची घोषणा केली. यापूर्वी सामाजिक कार्य करणा-या भारतातील अनेक नामवंत व्यक्तींना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. विनोबा भावे, प्रकाश व मंदाकिनी आमटे, नीलिमा मिश्रा यांसारख्या अनेक दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
============================================

दुखापतीमुळे रॉजर फेडररची रिओ ऑलिम्पिकमधून माघार



  • नवी दिल्ली, दि. २७ - एकेकाळी टेनिस जगतावर अधिराज्य गाजवणारा पण सध्या दुखापतींनी त्रस्त असलेला स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर याने दुखापतीमुळेच रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतूनन माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच यावर्षातील इतर कोणत्याही स्पर्धांमध्ये आपण सहभागी होणार नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. फेडररच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 
    १७ वेळा ग्रँडस्लॅम खिताब पटकावणारा फेडरर गेल्या काही काळापासून दुखापतींनी त्रस्त आहे. त्याच्या गुडख्याला जबर दुखापत झाली असून फेब्रुवारीमध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्याचमुळे तो मे महिन्यातील फ्रेंच ओपन स्पर्धेलाही मुकला होता. त्यानंतर जून महिन्यात झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली. मात्र त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीने पुन्हा उचल खाल्ली असून परिणामी तो पुढील महिन्यात होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेला तसेच या मोसमातील इतर स्पर्धांनाही मुकणार आहे. 

============================================

कबालीसाठी रजनीकांतला किती पैसे मिळाले माहीत आहे का?



  • चेन्नई, दि. २७ - दाक्षिणात्य सुपरस्टार यांच्या 'कबाली' चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडत २५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.  भारतासोबत चीन, मलेशिया आणि इतर देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या कबाली चित्रपटाने फक्त तामिळनाडूमध्येच 100 कोटींची कमाई केली होती. रजनीकांत यांचा हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला असून त्यांचे चाहते मोठ्या संख्येने हा चित्रपट पाहण्यास जात आहेत. पहिल्या आठवड्यातच २०० कोटींचा टप्पा पार केलेल्या या चित्रपटासाठी खुद्द रजनीकांत यांना किती मानधन मिळाले माहीत आहे का ? या चित्रपटासाठी त्यांना 35 कोटी रुपये मानधन देण्यात आल्याचे वृत्त आहे. 
    रिलीज होण्याआधीच कबाली चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. सोशल मिडियावरदेखील चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. पहिल्यांदाच सकाळी 5 वाजल्यापासून चित्रपटाचे शो सुरु करण्यात आले होते. रजनीकांत यांच्या चित्रपटांचं वेड इतकं आहे की चेन्नई, बंगळुरुमधील कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. इतकंच नाही सोशल मिडियावरही जोक्सनी धुमाकूळ घातला होता. 'सलमान, शाहरुख सुट्ट्यांना चित्रपट रिलीज करतात मात्र रजनीकांत यांनी चित्रपट रिलीज केला की सुट्टी जाहीर होते' हा विनोद तर हमखास रोज कोणत्या ना कोणत्या व्हाट्सअॅप ग्रुपवर पडतो आहे. एका चाहत्याने तर आपल्या एक दोन नाही तर 200 मित्रांसाठी चित्रपटाचा शो बुक केला, आणि यासाठी मोजले तब्बल 1 लाख 2 हजार 500 रुपये. 
============================================

No comments: