Sunday, 31 July 2016

नमस्कार लाईव्ह ३१-०७-२०१६ चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- लॉस एंजिलिस; ल्यूस अंकिसची पंचवीस हजार फुटांवरून उडी 
२- सौदी अरेबियामध्ये १० हजार भारतीयांची उपासमार - सुषमा स्वराज 
३- न्यूयॉर्क; सावत्र मुलीची उपासमार; भारतीय महिला दोषी 
४- अमेरिकेतील टेक्सासमध्ये हॉट एअर बलून कोसळून १६ ठार 
५- पाकमध्ये रुग्णालयात हिंदू डॉक्टरचा मृतदेह 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
६- देशविरोधी वक्तव्य आणि पर्रिकरांचे आमीरला खडे बोल 
७- भाजपचे गुलाम होऊन दलितांना तोडू नका, मायावतींचा रामदास आठवलेंवर पलटवार 
८- केजरीवाल सरकारला आणखी एक झटका, आमदाराला अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
९- शिवसेना-भाजप युती निवडणुकांपुरती मर्यादित : दानवे 
१०- राज-उद्धव भेटीवर अखेर शिवसेनेकडून स्पष्टीकरण 
११- एसीबीची सूत्र फणसाळकरांच्या हाती, मारियांना डावलल्याची चर्चा 
१२- राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचे नुकसान, अशोक चव्हाणांचा घणाघात 
१३- सलग चौथ्या दिवशी डी.वाय पाटील संस्थांवरची छापेमारी सुरुच 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१४- मुंबईत रेल्वेमार्गांवर आज कुठे मेगाब्लॉक 
१५- भिवंडीत दुमजली इमारत कोसळली, सात जणांचा मृत्यू 
१६- लखनऊ; राष्ट्रीय महामार्गावर कुटुंबाची लूट, मायलेकीवर बलात्कार 
१७- अहमदनगर; नगरमध्ये 15 वर्षीय तरुणीवर अत्याचार, आरोपी फरार 
१८- लातूरसह परिसरात सैराट पाऊस, लातूरचा पाणीप्रश्न मिटणार 
१९- उत्तर भारतात पावसाचा कहर, आसाममध्ये पुरामुळे 47 जणांचा मृत्यू 
२०- भिवंडीत इमारत खचली, ३० ते ३५ जण अडकले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२१- जमैका कसोटीत यजमान उताणे, भारत मजबूत स्थितीत 
२२- भारताचे दमदार प्रत्युत्तर, १ बाद १२६ के. एल. राहुलच्या नाबाद ७५ धावा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 

8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *

====================================

ल्यूस अंकिसची 'हनुमान उडी'

ल्यूस अंकिसची 'हनुमान उडी'
लॉस एंजिलिस : लॉस एंजेलिसमधील ल्यूक अॅकिन्स या व्यक्तीने विश्वविक्रम केला आहे. तब्बल 25 हजार फूट उंचीवरून पॅराशूटविना उडी घेत त्याने विक्रम रचला आहे.

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये शनिवारी हा विश्वविक्रम रचण्यात आला आहे. 42 वर्षीय ल्यूक अॅकिन्स याने याआधी 18,000 वेळा उड्या घेतल्या असून यावेळी त्याने 25,000 फूटांवरून उडी मारून विक्रम रचला आहे. त्याच्यासाठी जमिनीवर 100 चौरस फुटांची जाळी लावण्यात आली होती.

ल्यूकच्या म्हणण्यानुसार पराशुटचा वापर केल्यामुळे उडी मारण्याची जागा चुकू शकते. त्यामुळे त्याने पॅराशुटशिवाय उडी मारण्याचा निर्णय घेतला. विमानाच्या साहाय्याने त्याने ही उडी घेतली. जमिनीवर येताना त्याचा वेग जवळपास ताशी 193किमी होता.

====================================

भिवंडीत दुमजली इमारत कोसळली, सात जणांचा मृत्यू

भिवंडीत दुमजली इमारत कोसळली, सात जणांचा मृत्यू
भिवंडी : भिवंडीतील गैबीनगर परिसरात एक दुमजली इमारत पडली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या इमारतीमध्ये नऊ ते दहा कुटुंबं राहत होती. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे इमारत खचली होती. त्यानंतर इमारत पडून 30 ते 35 जण अडकल्याची भीती आहे.

संबंधित इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती. बचाव मोहीम सुरु असून पावसामुळे यात अडथळे येत आहेत. शिवाय गल्ली चिंचोळी असल्यामुळेही बचावकार्यात अडथळे येत आहेत. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून सहा ते सात जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

====================================

राष्ट्रीय महामार्गावर कुटुंबाची लूट, मायलेकीवर बलात्कार

राष्ट्रीय महामार्गावर कुटुंबाची लूट, मायलेकीवर बलात्कार
लखनौ : गाझियाबाद आणि अलिगडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या गँगरेपच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कारला अडवून कुटुंबाला लुटत मायलेकीवर गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नॉएडाहून शाहजहांपूरला जाणाऱ्या एका कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ ओढवली आहे. शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक 91 वर काही नराधमांनी सायकलचं चाक फेकून या कुटुंबाची गाडी अडवली. त्यांच्याकडील रोख रक्कम, दागिने लुटल्यानंतर मायलेकीला त्यांनी शेतात खेचून नेलं. तिथेच दोघींसोबत कुकर्म केल्यानंतर त्यांना सोडून आरोपींना पळ काढला.

विशेष म्हणजे या गजबजलेल्या राष्ट्रीय महामार्गावर चार तास हे नाट्य रंगलं. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी पीडित कुटुंबाची चौकशी केली. त्यानंतर एका पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे.

कारमध्ये दोन भाऊ आणि दोघांच्या पत्नी, एका भावाचा 10 वर्षीय मुलगा आणि दुसऱ्या भावाची 13 वर्षीय मुलगी प्रवास करत होते. अवघ्या दहा दिवसांपूर्वी त्यांच्या आईचं निधन झाल्यामुळे विधी करण्यासाठी हे कुटुंब गावी चाललं होतं. त्यावेळी धाकट्या भावाच्या पत्नी आणि मुलीवर गँगरेप झाला.

====================================

नगरमध्ये 15 वर्षीय तरुणीवर अत्याचार, आरोपी फरार

नगरमध्ये 15 वर्षीय तरुणीवर अत्याचार, आरोपी फरार
अहमदनगर : लैंगिक अत्याचाराच्या आणखी एका घटनेने अहमदनगर पुन्हा एकदा हादरलं आहे. नांदगाव शिंगवेमध्ये एका 15 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुख्य आरोपी फरार असून एकाला अटक करण्यात आली आहे.

शनिवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोपीने घराशेजारीच राहणाऱ्या पीडित तरुणीला भांडी घासण्यासाठी बोलावलं. यावेळी कोणीच नसल्याची संधी साधत आरोपी मल्हारी उमपने साथीदाराच्या मदतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

घाबरलेल्या तरुणीने घरी जाऊन कुटुंबीयांना ही माहिती दिली. त्यानंतर तक्रार करण्यासाठी पीडिता पोलिसात गेली. याची माहिती मिळताच आरोपी पसार झाला, मात्र त्याच्या साथीदाराला अटक करण्यात यश आलं आहे.

====================================

लातूरसह परिसरात सैराट पाऊस, लातूरचा पाणीप्रश्न मिटणार

लातूरसह परिसरात सैराट पाऊस, लातूरचा पाणीप्रश्न मिटणार
लातूर: लातूरमध्ये काल संध्याकाळपासूनच पावसाने चांगली बॅटिंग केली आहे. लातूर ग्रामीण पट्टयात पावसाने जोर धरला आणि लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या साई प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

काल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या पावसाने धनेगाव बॅरेज अंदाजे पाणीसाठा 4 मिलीमीटर, डोगरगाव, बॅरेज 5 मिलीमीटर, खुलगापुर- भातगळी 3 मिलीमीटर, पोहरेगाव 3 मिलीमीटरपर्यंत पाऊस झाला. तर आज झालेल्या पावसाने लातूरच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार आहे.

गेल्याकाही महिन्यांपासून लातूरकर  पावसाच्या प्रतिक्षेत होते. ऐन पावसाळ्यातही लातूरला रेल्वे आणि टँकरने पाणीपुरवठा चालू होता. मात्र, काल रात्रीपासून झालेल्या पावसाने लातूरकर सुखावले आहेत.

====================================

जमैका कसोटीत यजमान उताणे, भारत मजबूत स्थितीत

जमैका कसोटीत यजमान उताणे, भारत मजबूत स्थितीत
मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियानं जमैका कसोटीच्या पहिल्या दिवसावर आपलं वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या 196 धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय फलंदाजांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली.

जमैकाच्या सबिना पार्कवर पाहुण्यांसाठी खणलेल्या खड्ड्यात यजमानच उताणे पडावेत अशीच काहीशी अवस्था विंडीजची झाली. या कसोटीसाठी विंडीजनं वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरावी अशी खेळपट्टी बनवून घेतली होती. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीचं आमंत्रण देणार असं सोपं समीकरण दिसत होतं. पण विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरनं नाणेफेक जिंकून चक्क फलंदाजी स्वीकारली आणि त्याचे परिणाम विंडीजला भोगावे लागले.

अँटिगा कसोटीप्रमाणे जमैका कसोटीतही विंडीज फलंदाज भारतीय आक्रमणासमोर टिकाव धरु शकले नाही. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विनच्या प्रभावी माऱ्यासमोर विंडीजचा अख्खा डाव अवघ्या 196 धावांत आटोपला. इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीनं अवघ्या सात धावांतच आघाडीच्या तीन फलंदाजांना माघारी धाडून विंडीजचं कंबरडं मोडलं होतं. पण त्यानंतर मार्लन सॅम्युअल्स आणि जर्मेन ब्लॅकवूडनं चौथ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी रचून विंडीजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

====================================

देशविरोधी वक्तव्य आणि पर्रिकरांचे आमीरला खडे बोल

देशविरोधी वक्तव्य आणि पर्रिकरांचे आमीरला खडे बोल
पुणे : देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना देशाच्या नागरिकांनीच धडा शिकवायला हवा, असं म्हणत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आमीर खानला नाव न घेता खडे बोल सुनावले आहेत. आमीरचं वक्तव्य उद्धट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

देशविरोधी बोलण्याची लोकांची हिंमतच होते कशी, असा सवाल पर्रिकरांनी उपस्थित केला. ‘एका अभिनेत्याने त्याच्या पत्नीला देश सोडून बाहेर जायचं असल्याचं सांगितलं. हे अत्यंत उर्मट वक्तव्य होतं. जरी माझं घर लहान असेल आणि मी गरीब असेन, तरी माझं माझ्या घरावर प्रेम असतं आणि मी घराचा बंगला करायचं स्वप्न पाहतो.’ असं ते म्हणाले.

पर्रिकर शनिवार एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने पुण्यात बोलत होते. त्या अभिनेत्याला ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीनं जसा धडा शिकवला तसा धडा देशविरोधी वक्तव्य करणाऱ्यांना शिकवायला हवा, असं पर्रिकर म्हणाले. ‘त्याच्या वक्तव्यानंतर अनेकांनी तो ब्रँड
अॅम्बेसेडर असलेल्या ऑनलाईन कंपनीला मोठा फटका बसला. अनेकांनी आपली गुंतवणूक काढून घेतली, तर अनेकांनी मोबाईल अॅप अनइन्स्टॉल केलं. त्यानंतर संबंधित ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीने त्याला जाहिरातीतून हटवलं’ असं पर्रिकर म्हणाले.

====================================

भाजपचे गुलाम होऊन दलितांना तोडू नका, मायावतींचा रामदास आठवलेंवर पलटवार

भाजपचे गुलाम होऊन दलितांना तोडू नका, मायावतींचा रामदास आठवलेंवर पलटवार
नवी दिल्ली: केंद्र सरकारचे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या टीकेनंतर बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, ”बसपा डॉ. बाबासाहेब अंबेडकरांचा मनवतावादी विचार घेऊन काम करणारा पक्ष आहे. पण रामदास आठवलेंसारखे नेते भाजपचे गुलाम होऊन दलित चळवळीला नुकसान पोहचवत आहेत.”

बौद्ध धर्म न स्विकारण्याच्या आठवलेंच्या वक्तव्यावर मायावतींनी प्रेस रिलीज काढून आठवलेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. ”बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात लोकांना जागरुक करण्याचे, तसेच शेवटच्या क्षणीही आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्विकारला. यासाठी त्यांनी गडबड केली नाही. काशीराम यांनीही असेच केले होते. मीही जेव्हा बौद्ध धर्माचा स्विकार करेन, तेव्हा समाज जागरुक असला पाहिजे. कारण या ऐतिहासिक घटनावेळी माझ्यासोबत कोट्यवधी लोंकांनाही बौद्ध धर्माची दिक्षा घ्यावी वाटेल.”

पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या या पत्रकामध्ये ”उत्तर प्रदेशमध्ये शोषित, पीडित, दलित व इतर मागासवर्गातील नागरिक डॉ. आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी मोठा संघर्ष करत आहे. पण रामदास आठवलेंसारखे गुलामगिरीत जगणारे लोक भाजपच्या हातातील बाहुले बनुन दलितांच्या एकजुटतेला खंडित करत आहेत.”

====================================

केजरीवाल सरकारला आणखी एक झटका, आमदाराला अटक

केजरीवाल सरकारला आणखी एक झटका, आमदाराला अटक
नवी दिल्ली: आम आदमी पार्टीच्या एका महिला कार्यकर्त्याच्या आत्महत्येप्रकरणी नरेलामधून आम आदमी पार्टीचे आमदार शरद चौहान यांना अटक करण्याच आले आहे. दिल्ली गुन्हे अन्वेषण विभाग गेल्या तीन दिवासांपासून चौहान यांची चौकशी करत होती. आप कार्यकर्ता सोनीची आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी आमदारांचे निकटवर्तीय रमेश भारद्वाज यांनी सोनीला त्रास दिल्याचा आरोप केला होता. या त्रासाला कंटाळून सोनीने आत्महत्या केली होती.

या प्रकरणी आमदार शरद चौहान यांच्यासह नरेला पोलीस ठाण्याशी संबंधित माजी आयओ यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. सोनीच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी शरद चौहान यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होते. तसेच महिलेने एक व्हिडीओ प्रसिद्ध करून भारद्वाजवर गंभीर आरोप लावले होते.

दरम्यान ,या अटक प्रकरणानंतर आप नेते आशुतोष यांनी ट्विटरवरून या प्रकरणी मोदी सरकारला दोष दिला आहे. आशुतोष यांनी आपल्या ट्विटमध्ये, ”आणखी एक आप आमदाराल अटक, मोदी वेडे झाले आहेत का? कि त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे? जर पंतप्रधान नरेंद्र मोदी राग आणि द्वेषाने काम करणार असतील, तर देश सुरक्षित कसा राहिल?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

====================================

शिवसेना-भाजप युती निवडणुकांपुरती मर्यादित : दानवे

शिवसेना-भाजप युती निवडणुकांपुरती मर्यादित : दानवे
शिर्डी : योग्य वेळ आल्यावर महाराष्ट्र राज्याचे विभाजन करणार असल्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत. शिवसेना- भाजप युती केवळ निवडणुकांपुरतीच मर्यादित असल्याचंही दानवेंनी स्पष्ट केलं आहे.

वेगळ्या विदर्भाला भाजपाचा पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं. केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून राज्याचं विभाजन करणाऱ्यांना भाजपचा विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच वेगळ्या विदर्भाला शिवसेनेचा विरोध असला तरी, सेना- भाजप युती केवळ निवडणुकांपुरतीच मर्यादित आहे. भाजपच्या विदर्भाच्या भूमिकेशी युतीचा संबंध नसल्याचंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते शिर्डीत बोलत होते.

दानवेंच्या वक्तव्यानंतर आता शिवसेना या मुद्द्यावर काय भुमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिर्डीतील साई मंदिराच्या संस्थानाच्या नवनियुक्त मंडळाच्या वादावरही दानवेंनी भाष्य केलं. सध्या नियुक्त केलेलं विश्वस्त मंडळ योग्य असून त्याचं राजकारण करु नये असं आवाहनही त्यांनी केलं.


====================================

मुंबईत रेल्वेमार्गांवर आज कुठे मेगाब्लॉक

मुंबईत रेल्वेमार्गांवर आज कुठे मेगाब्लॉक?
फाईल फोटो
मुंबई : वेगवेगळ्या तांत्रिक कामांमुळे मुंबई लोकलच्या तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान तिन्ही रेल्वेमार्गांवरील काही सेवा रद्द होणार आहेत. तर काही लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतील.

पश्चिम रेल्वे – सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत माहिम ते अंधेरी अप आणि डाऊन स्लो ट्रॅकवर मेगाब्लॉक
या मेगाब्लॉकमुळे  हार्बर रेल्वेची वाहतूक काहीकाळ बंद राहणार आहे.

मध्य रेल्वे – सकाळी 11.20  ते दुपारी 3.50  दरम्यान माटुंगा ते मुलुंड डाऊन स्लो ट्रॅकवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे माटुंगा स्थानकापुढे जाणाऱ्या सर्व स्लो लोकल फास्ट ट्रॅकवरुन चालवल्या जातील.

हार्बर रेल्वे – सकाळी 11.20  ते दुपारी 3.40  दरम्यान सीएसटी ते चुनाभट्टी आणि सीएसटी ते माहीम अप आणि डाऊन मार्गांवर जंबोब्लॉक
हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकमुळे सीएसटी-अंधेरी आणि सीएसटी-पनवेल यादरम्यानच्या लोकल पूर्णपणे रद्द असतील. पनवेल-कुर्ला दरम्यान काही विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.

====================================

राज-उद्धव भेटीवर अखेर शिवसेनेकडून स्पष्टीकरण

राज-उद्धव भेटीवर अखेर शिवसेनेकडून स्पष्टीकरण
मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’वरील भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिलं आहे. “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही कौटुंबिक होती.”, असे संजय राऊत यांनी सांगितले.

“राहुल गांधी आणि वरुण गांधी दिल्लीत रोज भेटतात. म्हणून काय रोज ढवळून काढायचे का? राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आदरातिथ्य करण्याची ‘मातोश्री’ची परंपरा आहे आणि राज ठाकरे तर घरातलेच आहेत.”, असे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी भेट घेतल्याचं बोललं जात होतं. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “संपत्तीच्या वादाचे प्रकरण हाताळण्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम आहेत.”

“महापालिका निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांच्या ‘मन की बात’ लवकरच समोर येईल. निवडणुका फार लांब नाहीत. शिवसेनेच्या मोठ्या विजयासाठी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना आहेत.”, असे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत बोलताना संजय राऊत यांनी सांगितले.

====================================

एसीबीची सूत्र फणसाळकरांच्या हाती, मारियांना डावलल्याची चर्चा

एसीबीची सूत्र फणसाळकरांच्या हाती, मारियांना डावलल्याची चर्चा
मुंबई सध्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक सतीश माथूर लवकरच राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची सूत्र स्वीकारतील. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सूत्र अतिरिक्त आयुक्त विवेक फणसाळकरांच्या हाती सोपवण्यात आली आहेत.

पुढील सूचना मिळेपर्यंत फणसाळकरच जबाबदारी सांभाळणार आहेत. या पदासाठी राकेश मारिया यांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र मारियांऐवजी विवेक फणसाळकरांची  अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याने, मारियांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे.

उद्या प्रवीण दीक्षित यांचा कार्यकाळ संपणार असल्यामुळं  पोलीस महासंचालकपदी सतीश माथूर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.  1981च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या सतीश माथूर यांच्या पाठीशी पोलीस सेवेचा मोठा अनुभव आहे.

====================================

राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचे नुकसान, अशोक चव्हाणांचा घणाघात

राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचे नुकसान, अशोक चव्हाणांचा घणाघात
नाशिक : नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच काँग्रेसचं नुकसान झालं आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. शिवाय, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ऐनवेळी परिस्थिती पाहून आघाडीचा निर्णय घेऊ, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

“भाजप सरकारला डोकं नाही. हेल्मेट, कांदा असो किंवा डाळीचा मुद्दा, एकाही विषयावर काय निर्णय घ्यावा, हेच भाजप सरकारच्या मंत्र्यांना कळेना, अशी अवस्था आहे” अशी टीका अशोक चव्हाणांनी केली आहे.

आडतीच्या निर्णयावरुन अशोक चव्हाणांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. आडत बंदीच्या निर्णयाआधी कांद्याला पर्यायी व्यवस्था द्यायला हवी होती, असे अशोक चव्हाण म्हणाले.

मोदी सरकारवर निशाणा साधताना अशोक चव्हाण म्हणाले, “न खाऊंगा न खाने दूँगा, ही मोदींची घोषणा फक्त डाळींच्या बाबतीत खरी ठरली. मोदी सरकारच्या काळातही महागाई, शेतकरी आत्महत्या, पीक विमा सर्व प्रश्न जैसे थेच आहेत.”

====================================

उत्तर भारतात पावसाचा कहर, आसाममध्ये पुरामुळे 47 जणांचा मृत्यू

उत्तर भारतात पावसाचा कहर, आसाममध्ये पुरामुळे 47 जणांचा मृत्यू
गुवाहाटी आसाम, उत्तर प्रदेश आणि बिहार या तीन राज्यांना पावसानं चांगलाच तडाखा दिला आहे. पूरपरस्थितीमुळं या तिन्ही राज्यातील लाखो नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आसाममधील पूरपरस्थितीचा आढावा घेतला.

पुरामुळं आसाममधील 19 लाख नागरिक बाधित झाले असून 5 लाख जणांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर कऱण्यात आलं आहे. दरम्यान पुरामुळं आसाममधील 25 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

तिकडे बिहारमधीलही अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. पुरानं बिहारमध्ये 26 जणांचा बळी घेतलाय. महानंदा नदीसह प्रमुख नद्यांना पूर आल्यामुळं परिस्थिती चांगलीच बिकट झाली आहे.

बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशालाही पावसानं चांगलाच तडाखा दिलाय. सरकारनं उत्तरप्रदेशमध्ये 41 आपत्ती व्यवस्थापनं केंद्र उभारली असून, पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्य़ासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

====================================

सलग चौथ्या दिवशी डी.वाय पाटील संस्थांवरची छापेमारी सुरुच

सलग चौथ्या दिवशी डी.वाय पाटील संस्थांवरची छापेमारी सुरुच
पुणे : पिंपरीतील साहित्य संमेलन असो की पिंपरी पालिकेकडे असलेली मोठी थकबाकी, प्रवेशासाठी देणग्या यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवरून सतत वादात राहणाऱ्या डी. वाय. पाटील संस्थेचा ‘कारभार’ या छाप्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

सलग चौथ्या दिवशी डी वाय पाटील शिक्षण संस्थेच्या साम्राज्यावर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. नवी मुंबई, कोल्हापूर, पिंपरीतल्या संस्थेच्या कार्यालयात चार दिवसांपासून सुरु असलेल्या छापेमारीमुळे आयकर विभागाच्या हाती काय घबाड सापडलंय. याबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

एवढंच नाही तर शिक्षणसंस्थेचे सर्वेसर्वा पी. डी. पाटील यांच्या कोरेगाव पार्कमधील आलिशान घराचीही आयकर विभागानं झडती घेतली. फक्त संस्थाचालक नाही तर संस्थेचे खजिनदार, रजिस्टर , मुख्याध्यापकांच्या घरांची झाडाझडती घेतल्याची माहिती समोर येते आहे. वेगवेगळ्या संस्थामधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. यामध्ये कॉलेजमधून महत्वाची कागदपत्रं आणि इतर गोष्टी बाहेर नेताना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.

पिंपरी, आकुर्डी, कोल्हापूर, नवी मुंबई परिसरात डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचा मोठा पसारा आहे. डी.वाय. पाटील ह्यांच्या महाराष्ट्रात अनेक शिक्षणसंस्था आहेत. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूरमध्ये चार इंटरनॅशन स्कूल, मेडिकल, इंजिनिअरिंगच्या अनेक कोर्स संस्थेत शिकवले जातात.

====================================

सौदी अरेबियामध्ये १० हजार भारतीयांची उपासमार - सुषमा स्वराज



  • नवी दिल्ली, दि. ३१ - अचानक नोक-या गेल्यामुळे सौदी अरेबियामध्ये १० हजारहून अधिक भारतीय कामगारांचे हाल होत आहेत. आर्थिक चणचणीमुळे हजारो कामगारांना उपाशीपोटी रहावे लागत आहे. केंद्र सरकारने आखाती देशांमधील आपल्या दूतावासांना या बेरोजगार कामगारांना अन्य मदतीबरोबर अन्न-पाणी उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत. 
    परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सौदीमध्ये रहाणा-या तीस लाख भारतीयांना या कठीण काळात आपल्या बंधु-भगिनीना मदत करण्याचे आवाहन केले आहे. सौदी अरेबियामधील बेरोजगार भारतीय कामगारांना मोफत रेशन देण्याच्या रियाधमधील भारतीय दूतावासाला सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी टि्वटरवरुन दिली. 
    कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये रहाणारे भारतीय नोकरी आणि वेतन संकटाचा सामना करत आहेत. सध्या परिस्थिती खूपच खराब आहे असे त्यांनी सांगितले. जेद्दाहमध्ये तीन दिवसांपासून ८०० भारतीय उपाशी असल्याचे एका भारतीयाने टि्वट करुन सांगितल्यानंतर भारत सरकारकडून पावले उचलण्यात आली. 
====================================

भिवंडीत इमारत खचली, ३० ते ३५ जण अडकले


  • ऑनलाइन लोकमत 
    ठाणे, दि. ३१ - गिरगावातील भटवाडी येथील पाठारे इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना ताजी असताना रविवारी सकाळी भिवंडीतील गैबीनगरमध्ये दुमजली इमारत खचली. या दुर्घटनेत अद्यापपर्यंत जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. 
    या इमारतीत आठ ते नऊ कुटुंब रहात होती. इमारतीत ३० ते ३५ जण अडकले असून, त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. इमारत आधीच धोकादायक म्हणून घोषित केली होती. तरीही रहिवाशांनी इमारत सोडली नव्हती. 
    शनिवारी सकाळी गिरगावातील भटवाडी येथील पाठारे इमारतीचा काही भाग कोसळला. बचावपथकाच्या अधिका-यांनी तीन रहिवाशांची  सुखरूपरित्या सुटका केल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 
====================================

अहमदनगरमध्ये पुन्हा अल्पवयीन तरुणीवर अत्याचार


  • ऑनलाइन लोकमत 
    अहमदनगर, दि. ३१ - कोपर्डी बलात्काराच्या घटनेबद्दल संपूर्ण राज्यात संतापाची भावना कायम असताना अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. 
    नांदगाव शिंगवे गावामध्ये शेजारी रहाणा-या १५ वर्षाच्या मुलीला भांडी घासण्यासाठी घरी बोलवून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणी आरोपीच्या घराशेजारी रहाते. आरोपी मल्हारी उमपने भांडी घासण्याच्या बहाण्याने तिला घरी बोलावले व साथीदाराच्या मदतीने तिच्यावर अत्याचार केला. 
    शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर कुटुंबियांनी पोलिस ठाणे गाठले. आरोपीला याची माहिती मिळताच तो पसार झाला. मात्र त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. पोलिसांची विविध पथक आरोपीच्या मागावर आहेत. 
====================================

भारताचे दमदार प्रत्युत्तर, १ बाद १२६ के. एल. राहुलच्या नाबाद ७५ धावा


  • किंग्स्टन : वेस्ट इंडिजला पहिल्या डावात स्वस्तात गुंडाळल्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात दमदार सुरूवात केली आहे. विंडीजच्या १९६ धावांना प्रत्त्युत्तर देताना पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद १२६ धावा केल्या होत्या. के. एल. राहुल ७५ धावांवर तर चेतेश्वर पुजारा १८ धावांवर खेळत होते.
    मुरली विजय दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघात संधी मिळालेल्या राहुलने संधीचे सोने केले. त्याने ५८ चेंडुत अर्धशतक झळकावले. दुसरा सलामीवीर शिखर धवन आज मोठी खेळी करू शकला नाही. परंतु त्याने २७ धावा करताना राहुलला चांगली साथ दिली. डँरेन ब्राव्होने रसेल चेसच्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला.
    पहिल्या डावात भारत अजून ७० धावांनी पिछाडीवर असून त्यांचे ९ गडी बाद व्हायचे आहेत.
    तत्पूर्वी, भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ५२ धावांत घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजला पहिल्या दिवशी ५२.३ षटकांत केवळ १९६ धावांत गुंडाळले. ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन तर अमित मिश्राने एक बळी घेत अश्विनला मदत केली. विंडीजच्या ब्लॅकवूडने ६२ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. त्याची खेळी सर्वोत्तम ठरली. इतर फलंदाज मात्र अपयशी ठरले.
====================================

सावत्र मुलीची उपासमार; भारतीय महिला दोषी


  • न्यूयॉर्क : सावत्र मुलीची दीड वर्षापेक्षा अधिक काळ उपासमार करणाऱ्या भारतीय महिलेला अमेरिकेतील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मुलीचा छळ केल्याचा आरोपही तिच्यावर असून, तिला २५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
    शीतल रनोट (३५) असे या महिलेचे नाव आहे. आपली सावत्र मुलगी माया रनोट हिचा छळ केल्याचा तिच्यावर आरोप आहे. ही घटना २0१४मधील असून, माया तेव्हा १२ वर्षांची होती. शीतल ही मायाला नेहमीच मारहाण करीत असे.
    क्विन्स जिल्ह्याचे अ‍ॅटर्नी रिचर्ड ब्राऊन यांनी सांगितले की, न्यायाधीशांनी पुरावे आणि पीडित मुलीचा जबाब ग्राह्य धरून शीतल रनोटला दोषी ठरविले आहे. या मुलीला अनेक तासांपर्यंत अन्न-पाणी दिले जात नव्हते.
    याप्रकारे तिला मारहाण केल्याच्या अनेक घटना न्यायालयापुढे आल्या. एकदा मारहाणीनंतर वैद्यकीय पथक तिच्या घरी पोहोचले तेव्हा माया रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली होती. या सर्व मारहाणीच्या खुणा मायाच्या अंगावर आजही आहेत. कोणत्याही मुलीस अशी वागणूक दिली जाऊ शकत नाही.
====================================

अमेरिकेतील टेक्सासमध्ये हॉट एअर बलून कोसळून १६ ठार



  • वॉशिंग्टन, दि. 30 - अमेरिकेतील टेक्सास प्रांतात प्रचंड मोठ्या आकाराचा उष्णवात फुगा (हॉट एअर बलून) कोसळून १६ जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
    सूत्रांनी सांगितले की, स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.४0 वाजता ही घटना घडली. दुर्घटनेच्या वेळी हा फुगा आॅस्टीनच्या दक्षिणेला ३0 मैलावर असलेल्या लॉकहार्टजवळील शेतांवरून उडत होता. या अपघातातून कोणी वाचले असेल, असे प्रथमदर्शनी वाटत नाही, असे काल्डवेल काऊंटीच्या शेरीफ कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या कार्यालयाला पहिल्यांदा मदतीसाठी संदेश मिळाला होता. 
    उष्णवात फुग्याच्या टोपलीच्या भागात आग लागल्याने हा अपघात घडला असावा, असे सांगण्यात आले. फुग्याचे बास्केट जळालेल्या अवस्थेत आढळून आले. टेक्सास प्रांताचे गव्हर्नर ग्रेग अ‍ॅबॉट यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
====================================

पाकमध्ये रुग्णालयात हिंदू डॉक्टरचा मृतदेह


  • कराची : पाकिस्तानात सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात (आयसीयू) अनिल कुमार हे हिंदू डॉक्टर मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्यामुळे चौकशी सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
    कराचीत ही घटना घडली. पोलीस अधिकारी नईमुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. कुमार शस्त्रक्रिया विभागाच्या ‘आयसीयू’त मृतावस्थेत आढळून आले. ते पहाटे ५.३० वाजता आयसीयूत गेले होते. नंतर आयसीयूचा बंद दरवाजा ठोठावल्यानंतर आतून उघडला न गेल्याने तो तोडण्यात आला. आत डॉ. कुमार हे एका खुर्चीत होते. त्यांच्या शरीराची हालचाल होत नव्हती. त्यांच्याजवळ एक इंजेक्शन सापडले. हेच इंजेक्शन त्यांच्या हातावर टोचल्याचे दिसत आहे.
    त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात येत आहे, असेही नईमुद्दीन यांनी सांगितले. कुमार यांचा मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात पाठविण्यात आला. तेथे डॉक्टरांनी उत्तरीय तपासणी केली. तथापि, मृत्यूचे कारण रासायनिक अहवाल येईपर्यंत राखून ठेवण्यात आले आहे. कुमार यांच्याजवळ आढळलेले इंजेक्शन तपासणीसाठी सहायक न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 
====================================

No comments: