Friday, 29 July 2016

नमस्कार लाईव्ह २९-०७-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- इंडोनेशियात मला मृत्यूदंड, माझं पार्थिव भारतात आणा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार, विखे-पाटलांचा इशारा 
३- भरपावसात राहुल गांधींचा काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद 
४- स्क्रिप्ट रायटर बदला, महाश्वेता देवींबद्दल चुकीच्या ट्वीटनंतर स्वराज यांना सल्ला 
५- १२ दिवसांसाठी अरविंद केजरीवालांचे 'मौन' व्रत 
६- ...तो दहशतवादी बु-हान आहे माहिती असतं तर मारलं नसतं - मेहबुबा मुफ्ती 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
'७- नो हेल्मेट नो पेट्रोल'ला 5 ऑगस्टपर्यंत स्थगिती 
८- आंबेडकर भवनात कोणीही प्रवेश करु नका, हायकोर्टाने ठणकावलं 
९- व्याघ्र दिनी आशियातील सर्वात मोठा वाघ जयच्या खाणाखुणा ? 
१०- परिवहन मंत्री दिवाकर रावते भाजप अामदारांवर धावले 
११- राज ठाकरे 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंची भेट 
१२- मोदी 15 ऑगस्टला बुलेटप्रुफ एन्क्लोजरमधून भाषण करणार 
१३- पोकेमॉन खेळता खेळता राज ठाकरे पोचले मातोश्रीवर 
१४- अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर विधान परिषदेतील कामकाज ठप्प 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- जळगाव; शौचालयासाठी सौभाग्याचं लेणं विकलं, सरकारकडून मात्र फसवणूक 
१६- शिर्डी; साई संस्थानावर भाजपचा झेंडा, काँग्रेस हद्दपार 
१७- अखेर वादग्रस्त आदर्श इमारतीवर लष्कराचा ताबा 
१८- बीड; 'कुरकुरे'च्या पुड्यातील शिट्टीसाठी 12 वर्षीय मुलानं जीव गमावला 
१९- पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, 9 जणांचा मृत्यू 
२०- मुंबई; प्रेम विवाहासाठी कुटुंबाबरोबर भांडली पण नशिबासमोर हरली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- ऐश्वर्याचे रणबीरसोबत हॉट सीन, नाराज बच्चन कुटुंबीयाची अॅशला समज 
२२- कॉमेडी आणि अॅक्शनमध्ये फसलेला ढिशुम..... 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
============================================

व्याघ्र दिनी आशियातील सर्वात मोठा वाघ जयच्या खाणाखुणा ?

व्याघ्र दिनी आशियातील सर्वात मोठा वाघ जयच्या खाणाखुणा ?
नागपूर : कुठे गेला जय? काय झालं जयचं? जयची शिकार झाली? की जय प्रवास करतोय? आशिया खंडातला सर्वात मोठा वाघ तीन महिन्यानंतरही बेपत्ताच आहे… पण जयला पाहिल्याच्या उडत्या उडत्या बातम्यांमुळे तो सुखरुप असण्याच्या अशा उंचावल्या आहेत.

जयच्या शोध मोहिमेत तीन वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या

पहिली बातमी- गळ्याला कॉलर लावलेला एक वाघ 12 जुलै रोजी चिचाड गावच्या सरपंचांना आढळून आला.

दुसरी बातमी- भंडारा-अड्याळ रोडवर जंगली गाय आणि रानडुकराची शिकार झाली होती. ती एखाद्या मोठ्या वाघाने केल्याची शक्यता आहे.

तिसरी बातमी- सालेभाटा परिसरात अनेकांना वाघाचं अस्तितत्व जाणवतंय.. तिथंही वनविभागाचा शोध सुरु आहे


जय हा आशिया खंडातला सर्वात मोठा वाघ आहे. ताडोबाच्या अभयारण्यातला जय उमरेडला आला. त्यासाठी जयने 100 किलोमीटरचे अंतर पार केले. प्रवासादरम्यान नद्या आणि महामार्गही ओलांडले. जय आल्यानंच उमरेड हे अभयारण्य घोषित झालं. उमरेडमध्ये जयने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं. अडीच वर्षात 7 नर आणि 2 माद्यांना जन्म दिला.

महाराष्ट्राच्या व्याघ्र संपदेतला सर्वात महत्त्वाचा वाघ बेपत्ता झाल्यानं व्याघ्र बचाओ मोहिमेला धक्का लागला आहे. आज जागतिक व्याघ्रदिन आहे. त्यामुळे जयच्या बेपत्ता होण्याने मोहिमेवर निर्माण झालेलं मळभ दूर करण्यासाठी जयला तातडीने शोधण्याची गरज आहे.

============================================

'नो हेल्मेट नो पेट्रोल'ला 5 ऑगस्टपर्यंत स्थगिती

'नो हेल्मेट नो पेट्रोल'ला 5 ऑगस्टपर्यंत स्थगिती
मुंबई : ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ या परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या महत्त्वाकांक्षी निर्णयाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. 5 ऑगस्टपर्यंत या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे.

दिवाकर रावते आणि पेट्रोल पंप असोशिएशनची बैठक आज पार पडली. त्यानंतर राज्य सरकार 1 ऑगस्टपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. चर्चा करुन मार्ग काढण्याचे आदेश मंत्र्यांना देणार असल्याचं काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.

रावतेंच्या या निर्णयाला पेट्रोल पंप चालकांचा मोठा विरोध आहे. त्याचप्रमाणे हेल्मेटचं महत्त्व न पटणाऱ्या वाहनचालकांमध्येही याबाबत मोठा संताप आहे. त्यामुळे यासंदर्भात चर्चा करुन मार्ग काढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनीही या मुद्द्यावरुन विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. हेल्मेटसक्ती गरजेची असल्याचं सांगतानाच त्यासाठी सरकारला असा नियम करता येणार नसल्याचं अजित पवारांनी विधानसभेत म्हटलं. त्यामुळे तूर्तास तरी रावतेंचा ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ हा निर्णय बासनात गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.

============================================

आंबेडकर भवनात कोणीही प्रवेश करु नका, हायकोर्टाने ठणकावलं

आंबेडकर भवनात कोणीही प्रवेश करु नका, हायकोर्टाने ठणकावलं
मुंबईः श्रमदानातून आंबेडकर भवन उभारण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या घोषणेला हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी शनिवारी आयोजित केलेल्या श्रमदान कार्यक्रमाविरोधात ट्रस्टींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दोन्ही गटांना सबुरीचा सल्ला देत याप्रकरणावर सोमवारी सुनावणी ठेवली आहे.


दादरमधील विवादीत आंबेडकर भवनचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहचला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर भवन श्रमदानातून उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या प्रकरणी अंतिम सुनावणी होईपर्यंत आंबेडकर भवनच्या परिसरात कोणीही घुसण्याचा प्रयत्न करू नये. तसेच आंबेडकर भवन परिसरातील परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

============================================

भरपावसात राहुल गांधींचा काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद

भरपावसात राहुल गांधींचा काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद
लखनौ : महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केल्याचं ताजं असतानाच राहुल यांनी आज पुन्हा मोदींवर टीकास्त्र सोडलं. विशेष म्हणजे भरपावसात राहुल गांधींनी भाषण सुरु ठेवलं.

राहुल गांधींच्या रॅलीचं लखनौमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. मात्र यावेळी अचानक पाऊस सुरु झाला. रॅलीसाठी आलेले कार्यकर्ते भिजत असल्याचं पाहून राहुल गांधी स्टेज सोडून बाहेर आले आणि पावसाच्या सरीत त्यांनी भाषण सुरु ठेवलं.

राहुल गांधींनी उत्तर प्रदेशला नंबर वन करण्यासाठी आलो असल्याचं सांगत समाजवादी पक्षावरही टीका केली. तसंच तूरडाळीचा दाखला देत महागाईवरुन मोदी सरकारवरही टीका केली.  त्याचप्रमाणे वय नाही तर विचार महत्वाचा असल्याचं सांगत विरोधकांच्या टीकेचाही
त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

============================================

शौचालयासाठी सौभाग्याचं लेणं विकलं, सरकारकडून मात्र फसवणूक

शौचालयासाठी सौभाग्याचं लेणं विकलं, सरकारकडून मात्र फसवणूक
जळगाव : पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारतचा नारा द्यायला सुरुवात केली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध योजनाही सुरु केल्यात. मात्र प्रत्यक्षात त्या योजनेचा कसा बोजवारा उडाला आहे, हे भुसावळमधील एका घटनेनं उघड झालं आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी एका महिलेला चक्क आपलं मंगळसूत्र गमवावं लागलं आहे.

भुसावळच्या साकेगावमध्ये राहणाऱ्या सुशीला कोळींची अवस्था लंकेच्या पार्वतीसारखी झाली आहे. पती हयात असतानाही सुशीला कोळींना मोकळ्या गळ्यानं वावरावं लागत आहे. सरकारनं केलेल्या फसवणुकीमुळे त्यांना स्वतःचं मंगळसूत्र गमवावं लागलं आहे. स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत शौचालय बांधण्याची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल, असं कोळी यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. सरपंचानं सांगितलं की शौचालय बांधा, सरकारी योजनेतून पैसे मिळवून देतो. त्यामुळे आम्ही शौचालय बांधल्याचं त्या सांगतात.

खुद्द गावच्या सरपंचांनीच गळ घातल्यामुळं कोळी कुटुंबानं पदरचे पैसे खर्च करुन शौचालय बांधायचं ठरवलं. खरं तर बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे शौचालयाचा खर्च परवडणारा नव्हता. त्यासाठी सुशीला यांनी मंगळसूत्र गहाण ठेवून सावकारासमोर पदर पसरला. शौचालय बांधून पूर्ण झालं… सरकारी अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी देखील केली. मात्र कोळी यांना शौचालय योजनेचे पैसे मिळाले नाहीत. गेल्या 7 महिन्यांपासून ते ग्रामपंचायत आणि इतर सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.

============================================

परिवहन मंत्री दिवाकर रावते भाजप अामदारांवर धावले

परिवहन मंत्री दिवाकर रावते भाजप अामदारांवर धावले
मुंबई : विधानसभेत आज परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि भाजपा आमदारांमध्ये चांगलीच जुंपली. भाजपा आमदारांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्यानंतर, परिवहनमंत्री दिवाकर रावते त्यांच्या अंगावर धावून गेले.

यावेळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन आणि भाजप आमदार राम कदम यांनी रावतेंना अडवलं.

भाजप आमदार आशिष देशमुख, विकास कुंभारे,सुधाकर देशमुख, रामचंद्र अवसरे हे वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देत होते. त्यावेळी शिवसेनेचे दिवाकर रावते आणि भाजप रामचंद्र अवसरे एकमेकांना भिडले.

वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी भाजप आमदारांनी केली. त्यामुळे विरोधी पक्षांसह सत्ताधारी शिवसेनेचे आमदारही भाजपविरोधात आक्रमक झाले.

सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

============================================

साई संस्थानावर भाजपचा झेंडा, काँग्रेस हद्दपार

साई संस्थानावर भाजपचा झेंडा, काँग्रेस हद्दपार
शिर्डीः साई संस्थानवरील काँग्रेसची सत्ता आता संपुष्टात आली आहे. दोन ते तीन हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या साई संस्थानातून विखे गटाला हद्दपार करण्यात आलं आहे.  यापुढे इथे भाजपची सत्ता असणार आहे.


राज्य सरकारच्या विधी आणि न्याय खात्याने नवे विश्वस्त म्हणून नवी मुंबईचे भाजप नेते सुरेश हावरेंची संस्थानच्या विश्वस्तपदी वर्णी लावली आहे.  तर उपाध्यक्ष म्हणून राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम असणार आहेत.

============================================

अखेर वादग्रस्त आदर्श इमारतीवर लष्कराचा ताबा

अखेर वादग्रस्त आदर्श इमारतीवर लष्कराचा ताबा
मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अखेर वादग्रस्त आदर्श इमारत आज लष्करानं ताब्यात घेतली. 31 मजल्यांची ही इमारत उभारताना जमीन अधिग्रहणापासून परवानग्या देण्यापर्यंत सगळीकडे नियम आणि कायद्यांचं उल्लंघन झाल्याचा ठपका हायकोर्टानं ठेवला होता.

विशेष म्हणजे आदर्श घोटाळ्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची खुर्ची गमवावी लागली. तर  डझनभर आयएएस अधिकारी गजाआड झाले होते.

त्या पार्श्वभूमीवर ही इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा आदेश रद्द करत, इमारत केंद्र सरकारला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज लष्कराने इमारत ताब्यात घेतली.

============================================

राज ठाकरे 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंची भेट

राज ठाकरे 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंची भेट
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ भेट  का दिली, याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

यावेळी राज ठाकरेंसोबत कोणीही नव्हतं. राज आणि उद्धव या दोघांमध्येच सुमारे दीड तास चर्चा झाली.

नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाला. 27 जुलैला शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला.  त्यानंतर राज यांनी आज मातोश्रीवर हजेरी लावली आहे.

============================================

...म्हणून मोदी 15 ऑगस्टला बुलेटप्रुफ एन्क्लोजरमधून भाषण करणार

...म्हणून मोदी 15 ऑगस्टला बुलेटप्रुफ एन्क्लोजरमधून भाषण करणार
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला 15 ऑगस्ट रोजी धोका असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन भाषण देतात. मागील वर्षी नरेंद्र मोदींनी बुलेटप्रुफ एन्क्लोजरमधून भाषण देण्याचा निर्णय आयत्यावेळी बदलला होता.
सुरक्षेच्या कारणामुळे यावर्षी पंतप्रधानांना बुलेटप्रुफ एन्क्लोजरमधून भाषण करावे लागणार आहे. तसंच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनाही यासंदर्भातील सूचना देण्यात आली आहे. जर मोदींनी सुरक्षा यंत्रणांना सल्ला मान्य केला तर त्यांच्या आजूबाजूला एवढी कडेकोट सुरक्षा असण्याची ही पहिलीच वेळ असेल.   

============================================

'कुरकुरे'च्या पुड्यातील शिट्टीसाठी 12 वर्षीय मुलानं जीव गमावला

'कुरकुरे'च्या पुड्यातील शिट्टीसाठी 12 वर्षीय मुलानं जीव गमावला
बीड: ‘कुरकुरे’च्या पुड्यामध्ये असलेल्या शिट्टीसाठी भावांचं झालेलं भांडण एकाच्या जीवावर बेतलं. बीड जिल्ह्यातल्या डूकडेगावात ही घटना घडली आहे.

दोन दिवसांपूर्वी गणेश आणि राजेश पवार या दोघाभावांची कुरकुरेच्या पुड्यात असलेल्या शिट्टीवरून भांडण झालं आणि त्यानंतर रागाच्या भरात १२ वर्षाच्या गणेशने विष प्राशन केलं.

हा प्रकार घरच्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, काल उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

स्क्रिप्ट रायटर बदला, महाश्वेता देवींबद्दल चुकीच्या ट्वीटनंतर स्वराज यांना सल्ला

स्क्रिप्ट रायटर बदला, महाश्वेता देवींबद्दल चुकीच्या ट्वीटनंतर स्वराज यांना सल्ला
नवी दिल्ली : ज्येष्ठ बंगाली लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवींच्या निधनानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करुन श्रद्धांजली दिली आहे. या ट्वीटमध्ये स्वराज यांनी महाश्वेता देवींच्या दोन पुस्तकांचीही नोंद केली आहे. पण त्यांनी ट्वीटमध्ये उल्लेख केलेली पुस्तकं ही महाश्वेता देवी यांची नसून आशापूर्णा देवी यांची असल्याचं समोर आले आहे.
परराष्ट्र मंत्र्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन असे चुकीचे ट्वीट होत असल्यामुळे आता स्वराज यांच्यावर टीका होत आहे. त्यांच्या चुकीच्या ट्वीटचा ट्विपल्सनींही समाचार घेतला. इतकंच नाही तर स्वराज यांना स्क्रिप्ट रायटर बदलण्याचा सल्लाही देण्यात आला. टीकेनंतर स्वराज यांच्या हॅण्डलवरुन हे ट्वीट डिलीट केलं.


============================================

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, 9 जणांचा मृत्यू

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, 9 जणांचा मृत्यू
पुणे : पुण्याच्या बालेवाडी परिसरातील बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीचा चौदावा मजल्याचा स्लॅब कोसळल्याने नऊ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही घटना घडली.

बालेवाडीच्या किर्लोस्कर कमिन्स ऑफिससमोरील या इमारतीचं काम सुरु होतं. मात्र त्याचवेळी चौदाव्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला.

पार्क ग्रांजर आणि पार्क एक्स्प्रेस नावाच्या सोसायटीच्या साईट्स होत्या. त्यातील पार्क एक्स्प्रेस या इमारतीचा स्लॅब कोसळला. अरविंद जैन, श्रवण अगरवाल या दोन बिल्डर्सच्या प्राईड पर्पल बांधकाम कंपनीचे हे दोन्ही प्रोजेक्ट्स आहेत.

============================================

ऐश्वर्याचे रणबीरसोबत हॉट सीन, नाराज बच्चन कुटुंबीयाची अॅशला समज

ऐश्वर्याचे रणबीरसोबत हॉट सीन, नाराज बच्चन कुटुंबीयाची अॅशला समज
मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनवर सध्या बच्चन कुटुंब नाराज आहे. आगामी ए-दिल-ए-मुश्किल या सिनेमात ऐश्वर्याने काही हॉट सीन दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब अॅशवर नाराज असल्याचं समोर आलं आहे.
ए-दिल-ए-मुश्किल या चित्रपटात ऐश्वर्याने रणबीर कपूरसोबत काही हॉट सीन दिले आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या बच्चन कुटुंबीयांनी तिला समज दिली आहे. तू एका चांगल्या कुटुंबाची सून आहेत्यामुळे असे सीन करणं तुला शोभत नाही,” असं ऐश्वर्याला सांगण्यात आलं आहे.

यानंतर ऐश्वर्याने निर्माता करण जोहरकडे ते सीन हटवण्याची मागणी केली आहे. सुरुवातीला करणने याला नकार दिला होतापण ऐश्वर्याचे सासरे आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या सांगण्यावरुन त्याने ते सीन हटवण्याची तयारी दाखवली आहे.
यापूर्वी धूम 2 मधील हृतिक रोशनसोबतच्या हॉट सीनना जया आणि अमिताभ यांनी नाराजी दर्शवली होती. करण जोहरच्या ए-दिल-ए-मुश्किलमध्ये ऐश्वर्यासोबत रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

============================================

इंडोनेशियात मला मृत्यूदंड, माझं पार्थिव भारतात आणा

'इंडोनेशियात मला मृत्यूदंड, माझं पार्थिव भारतात आणा'
नवी दिल्ली/इंडोनेशिया : अंमली पदार्थाची तस्करी केल्याच्या आरोपाखाली इंडोनेशियामध्ये एका भारतीयासह 14 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र त्यापैकी चार जणांना काल गोळी झाडू मृत्यूदंड देण्यात आला.

गुरदीप सिंह असं या भारतीयाचं नाव असून ते पंजाबचे रहिवासी आहेत. 2004 साली अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपात इंडोनेशियामध्ये गुरदीप यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2005 मध्ये गुरदीप यांना शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हापासून ते जेलमध्येच आहेत.

गुरदीप सिंह यांचा दावा
“2004 मध्ये वर्क व्हिजा घेऊन मी एजंटच्या मदतीने इंडोनेशियाहून न्यूझीलंड जात होतो. पण इंडोनेशियात पोहोचल्यावर एजंटने माझा पासपोर्ट स्वत:कडे ठेवला आणि मला न्यूझीलंडला घेऊन गेला नाही. त्यानंतर माझ्याकडून जबरदस्तीने अंमली पदार्थांची तस्करी करण्याचं काम करवून घेतलं,” असा दावा 48 वर्षीय गुरदीप सिंह यांनी केला आहे. त्यांच्यासोबत नायझेरिया, पाकिस्तान, झिम्बाब्वे आणि इंडोनेशियाच्या नागरिकांचाही समावेश आहे.

कुटुंबाला अधिकृत माहिती नाही : गुरपाल सिंह
“सुरुवातीला इंडोनेशियातील भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आलं की, गुरदीप सिंह यांना मृत्यूदंड दिला. मात्र 20 मिनिटांनी ते सुरक्षित असल्याची माहिती दिली. पुढे काय होणार याची कोणतीही अधिकृत माहिती आमच्या कुटुंबाला मिळालेली नाही, असं गुरदीप यांचा भाचा गुरपालने सांगितलं.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयही गुरदीप यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे. “गुरदीप सिंह यांनी आधीच 10 वर्षांची शिक्षा भोगली आहे, त्यामुळे त्यांच्या शिक्षेत बदल व्हावा,” अशी विनंती गुरदीप यांच्या पत्नी कुलविंदर कौर यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे. यावर स्वराज म्हणाल्या की, “आम्ही गुरदीप सिंह यांच्या मदतीसाठी सर्व प्रयत्न करत आहोत. शिवाय भारतीय दूतावासही या गुरदीप यांच्या मदतीसाठी झटत आहे.”

पार्थिव भारतात आणावं : गुरदीप सिंह
भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी गुरदीप यांच्या कुटुंबाशी संपर्क करुन दिला. यावेळी “मला रात्री गोळी घातली जाणार असून माझं पार्थिव भारतात आणावं,” अशी इच्छाही कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती.

मृत्यूदंड तूर्तास टळला, पण…
अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी काल चार जणांनाच मृत्यूदंड देण्यात आला. त्यामुळे गुरदीप सिंह यांना शिक्षा दिली जाणार की माफ होणार, असे वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवाय गुरदीपसह दहा जणांना मृत्यूदंड देणार असतील तर कधी, हेदेखील अद्याप जाहीर केलेलं नाही.

इंडोनेशियामध्ये आजही मृत्यूदंड
इंडोनेशियात अंमली पदार्थांशी संबंधित काही कायदे जगभरातील कायद्यांपैक्षा कडक आहेत. इथे आजही गोळ्या झाडून मृत्यूदंड दिला जातो. या शिक्षेविरुद्ध मानवाधिकार संघटनांनी आंदोलनेही केली आहेत.

============================================

पोकेमॉन खेळता खेळता राज ठाकरे पोचले मातोश्रीवर


  • योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
    राज ठाकरे का गेले असावेत मातोश्रीवर? मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा पत्ता कट करण्यासाठी होणार का शिवसेना मनसेची युती? जयदेव ठाकरेंशी सुरू असलेल्या मालमत्तेच्या वादात राज करणार का मध्यस्थी? इथपासून ते उद्धवना Belated Happy Birthday करायला राज गेले मातोश्रीवर अशा अनेक ब्रेकिंग न्यूज शुक्रवारी दुपारी व्हायरल होत होत्या.
    पण, कृष्णकुंजवर असलेल्या आमच्या खास सूत्रांकडून वेगळीच माहिती समोर आलीय. वर असलेल्या एकाही गोष्टीशी राज ठाकरेंच्या मातोश्री भेटीचा संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय. खरी गोष्ट अशी आहे की कुठल्याही सोशल मीडियावर अडकून न घेतलेल्या, त्यामुळे भरपूर वेळ असलेल्या राज ठाकरेंना पोकेमॉन गोनं वेड लावलंय. पोकेमॉन गोळा करता करता दादरवरून वांद्र्याला पोचलेल्या राज ठाकरेंना पोकेमॉन खुणावत होते आणि ते गोळा करता करता राज यांचं भान हरवत होतं. पाचवी लेवल पार करण्यासाठी शेवटचा पोकेमॉन उचलण्याची गरज होती त्यावेळी राज मातोश्रीच्या बाहेर पोचले होते आणि काही फूटांवरच त्यांना आपलं लक्ष्य दिसत होतं.
    साक्षात राज ठाकरे आहेत म्हटल्यावर सुरक्षा रक्षकांनी रस्ता मोकळा करून दिला आणि राज यांनी थेट उद्धव यांच्या बेडरुममध्ये जाऊन पोकेमॉन पकडलाच.
============================================

प्रेम विवाहासाठी कुटुंबाबरोबर भांडली पण नशिबासमोर हरली


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. २९ - कुटुंबियांचा विरोध पत्करुन, धमक्या सहन करुन तिने प्रेमविवाह केला. पण अवघ्या चार वर्षातच नियतीने सुखी संसार तिच्याकडून हिरावून घेतला. ऐन तारुण्यात इतका मोठा आघात झाल्यानंतरही सोनिया साटमने दुस-यांच्या आयुष्याचा विचार केला आणि मृत नव-याचे अवयवदानाचा निर्णय घेतला. ज्यामुळे काही जणांना नवे आयुष्य मिळणार आहे. 
    सोनियाचे २०१२ मध्ये शेखर साटमबरोबर लग्न झाले. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन तिने शेखर बरोबर लग्न केले. सोनियाला तिच्या कुटुंबियांनी धमक्याही दिल्या. मात्र प्रेमाखातर तिने हे सर्व सहन करत शेखरबरोबर संसार थाटला. ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणारा शेखर रविवारी कामानिमित्त बोरीवलीला जात असताना त्याच्या बाईकला अपघातात झाला. 
    अपघाताच्यावेळी शेखरने हेल्मेट घातले नव्हते त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. रस्त्यावरुन जाणा-या वाटसरुंनी शेखरला बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी साटम कुटुंबाला अपघाताची माहिती कळवल्यानंतर कुटुंबियांनी अंधेरीच्या अंबानी रुग्णालयात त्याला हलवले. 
============================================

कॉमेडी आणि अॅक्शनमध्ये फसलेला ढिशुम.....


  • रेटींग -  2/5 

    नामदेव कुंभार
    मुंबई, दि. 29 - हमराज, रेस चित्रपटात दमदार खलनायकाची भुमिका करणारा अक्षय खन्ना ढिशुम चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. ढिशुम चित्रपटातमध्ये तगडी स्टार कास्ट आहे.  जॉन, वरुन धवन, जॅकलिन, सकिब सलीम, राहूल देव, राम कपूर आणि कबीर बेदीसारखे तगडे स्टार असताना चित्रपटभर लक्षात राहतो तो फ्कत अक्षय खन्ना आणि त्याचा दमदार अभिनय. तब्बल 4 वर्षानंतर रुपरी पडद्यावर त्याने दमदार अभिनय केला आहे असचं म्हणाव लागेल. नो प्रॉब्लेम, आक्रोश, तीस मार खान सारखे फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर तो रुपेरी पड्यावरुन गायबच झाला होता. पण ढिशुमद्वारे त्याने दमदार पदार्पन केलं आहे. 
============================================

अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावर विधान परिषदेतील कामकाज ठप्प


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २९ - भाजपा खासदार नाना पटोले यांनी लोकसभेत स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा अशासकी ठराव मांडल्याचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. अखंड महाराष्ट्राबद्दल सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अखंड महाराष्ट्र आमच्या अस्मितेचा विषय आहे, याबाबत कोणतीच तडजोड केली जाणार नसल्याचे सांगत विरोधकांनी सभागृहाचे कामकाज रोखून धरले. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सुरुवातीला दहा मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केला.
    शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. भाजपा खासदार नाना पटोले यांनी लोकसभेत स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा अशासकीय ठराव मांडला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असताना नाना पटोले यांनी मांडलेला ठराव गंभीर बाब असल्याचे सांगत मुंडे यांनी लोकसभेची कामकाज पत्रिकाच सभागृहात फडकवली. तर, अखंड महाराष्ट्र हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. लोकसभेतील ही घटना अत्यंत गंभीर आहे. नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना विचारूनच ठराव मांडला असेल.
============================================

१२ दिवसांसाठी अरविंद केजरीवालांचे 'मौन' व्रत


  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. 29 - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी 12 दिवसांच्या सुट्टीवर जाणार आहेत. अरविंद केजरीवाल 30 जुलैपासून नागपुरच्या विपश्यन केंद्रात दाखल होणार आहेत. केंद्र सरकारसोबत सुरु असलेल्या वादामुळेच अरविंद केजरीवाल यांनी विपश्यनेसाठी जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. 
    विपश्यन केंद्रात दाखल झाल्यानंतर केजरीवाल यांना वृत्तपत्र, टीव्ही तसंच कोणत्याही माध्यमापासून दूर ठेवलं जाईल. अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत मनिष सिसोदिया दिल्ली सरकारचा कारभार हाती घेणार आहेत. 
    2 वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर केजरीवाल पुन्हा विपश्यनेसाठी चालले आहेत. लोकसभा निवडणुकीतील प्रचारानंतर अरविंद केजरीवाल विपश्यनेसाठी गेले होते. दिल्लीमध्ये सत्तेत आल्यापासून केंद्र सरकारसोबत अरविंद केजरीवाल यांचे वाद होत आहेत. काही दिवसांपुर्वी तर केजरीवाल यांनी' मोदी मला इतके वैतागलेत की माझी हत्या करतील', असा व्हिडिओही जारी केला होता.

============================================

...तो दहशतवादी बु-हान आहे माहिती असतं तर मारलं नसतं - मेहबुबा मुफ्ती


  • ऑनलाइन लोकमत - 
    श्रीनगर, दि. 29 - भारतीय सुरक्षा जवानांना दहशतवादी बु-हान वनीची माहिती नसल्याने त्याला ठार केल्याचं मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितलं आहे. '8 जुलै रोजी झालेल्या चकमकीत जवानांना त्या घरात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हान वनी आहे माहिती असंत तर त्यांनी त्याला मारलं नसतं, इतकंच नाही तर त्याला दुसरी संधी दिली असती', असा दावा मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. बु-हान वनीला ठार मारल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उसळला होता, ज्यामधे 47 लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. 
    पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मेहबूबा मुफ्ती यांनी गुरुवारी पत्रकारांशी बातचीत केली. 'पोलीस आणि लष्कराने मला कोकेरनागच्या बेमदूरा गावातील एका घरात 3 दहशतवादी लपले असल्याची माहिती दिली होती. जर लष्कर आणि पोलिसांना माहिती असतं की लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये बु-हानदेखील आहे, तर त्याला ठार न मारता दुसरी संधी दिली असती', असं मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितलं आहे. 
============================================

No comments: