Friday, 29 July 2016

नमस्कार लाईव्ह २९-०७-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय]*
१- लंडन; तपासणीच्या नावाखाली लैंगिक चाळे करणा-या डॉ. पटवर्धनला तुरुंगावास 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
२- देशभरातील बँकाचा आज एकदिवसीय संप, पुढचे सलग 3 दिवस बँका बंद 
३- सहा  जनपथचा रुबाब कायम, पवारांच्या घरी गडकरी, सेना खासदार 
४- एक्स्प्रेस वेवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर 
५- वेळ पडल्यास आणखी कर्ज काढा, पण शेतकऱ्यांना मदत करा 
६- पाकिस्तानात मरणा-या हिंदूंचा आक्रोश ऐका - उद्धव ठाकरे 
७- काश्मीरमधील असंतोष आम्हीच भडकाविला! - हाफीज सईद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
८- मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग, रस्त्यांवर पाणीच पाणी, लोकलही मंदावली 
९- ड्रग्ज प्रकरणी ममता कुलकर्णीचं नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव: साक्षीदार 
१०- म्हाडाच्या घरांसाठी लाखो अर्ज, आता प्रतीक्षा लॉटरीची 
११- शंभरावी पाणी एक्स्प्रेस, अजूनही लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा 
१२- ३,६५६ कोटींच्या पीकविम्याचे वाटप  
१३- मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१४- मनमाडमध्ये प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या 
१५- बुलढाणा; सुनेच्या छळाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या 
१६- हरवलेला करण तब्बल 2 वर्षानं सापडला, विरार पोलिसांची कामगिरी 
१७- सोलापूर; बाईकस्वाराला चुकवताना एसटी झाडाला धडकली, 4 मृत्यूमुखी 
१८- दिघावासियांना मोठा दिलासा, सरकार अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणार 
१९- महापालिकेत गोंधळ घातल्यास नगरसेवकपद रद्द होणार 
२०- अकोला; विवाहितेचे प्रियकरासोबत तिस-यांदा पलायन 
२१- पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून ९ मजूर ठार 
२२- बीड; उपोषणाची दखल न घेतल्याने संतप्त महिलेचा टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न 
२३- मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे झाड कोसळून १ ठार 
२४- बारामती सुधारगृहातून पळालेल्या मुलींना भिगवण पोलीसांनी केली अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२५- पैलवान नरसिंग यादवबाबत शनिवारी किंवा सोमवारी निर्णय 
२६- टीम इंडियाचा जमैकात कसून सराव 
२७- भारत-विंडीज टी-२० मालिकेची शक्यता 
२८- मराठी पताका फडकविण्यासाठी ‘रिओ’त धावणार ललिता बाबर  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *
=========================================

मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग, रस्त्यांवर पाणीच पाणी, लोकलही मंदावली

मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग, रस्त्यांवर पाणीच पाणी, लोकलही मंदावली
मुंबई : मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं असून लोकल वाहतूकही मंदावली आहे.

दरम्यान या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा

– ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर सायनपासून मुंबईकडे जाणारी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने
– माटुंगा किंग्जसर्कल पुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक रखडली
– वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर बोरीवली ते वांद्रे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने
– रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबली
– जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवरही पावसाचे पाणी आणि खड्ड्यांमुळे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने
– मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील वाहतूक 10-15 मिनिटं उशिराने, तर ट्रान्सहार्बरवर पनवेलकडे जाणारी वाहतूक 20-25 मिनिटं उशिराने
– एलबीएस मार्गावर गांधीनगर,कांजूर ते एशिअन पेंट्स पर्यंत पाणी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने
– अंधेरी सबवेमधे पाणी साचल्याने वाहतुकीसाठी बंद
– वांद्रे-वरळी सी लिंकवर मुसळधार पावसाने वाहनांचा वेग मंदावला
– मुंबईतील पावसामुळे विमानांची उड्डाणं रखडली, धावपट्टीवरील पाणी आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान वाहतूक 15-20 मिनिटे उशिराने

=========================================

ड्रग्ज प्रकरणी ममता कुलकर्णीचं नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव: साक्षीदार

ड्रग्ज प्रकरणी ममता कुलकर्णीचं नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव: साक्षीदार
मुबंई: दोन हजार कोटींचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. ठाणे पोलिसांनी अभिनेत्री ममता कुलकर्णी ही या रॅकेटची मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा प्रमुख साक्षीदार जय मुखीनं आरोप केला आहे की, ‘ममताचं नाव घेण्यासाठी माझ्यावर पोलिसांनी दबाव आणला होता.’

ठाणे पोलिसांनी ममता कुलकर्णी आणि तिचा कथित पती विकी गोस्वामी हे रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला होता.

पोलिसांनी याप्रकरणी साक्षीदार जय मुखीला कोर्टात पेश केलं. जय मुखीनं दिलेल्या जबाबानुसार, पोलिसांनी सांगितलं होतं की, जानेवारी 2016मध्ये केनियातील मोम्बासा इथं मीटिंग झाली होती. ज्यामध्ये एवॉन कंपनीचे अधिकारी आणि विकी गोस्मावी यांच्यामध्ये दर महिन्याला 1000 कोटीच्या 10 टन एफिडरीन ड्रग्स पुरवण्याचा करार झाला होता. या मीटिंगमध्ये ममता कुलकर्णीही होती.

या प्रकरणातील प्रमुख साक्षीदारानं आपला जबाब पलटल्यानं या केसमध्ये नवं वळण आलं आहे. जय मुखीनं पोलिसांवर आरोप लावला आहे की, ‘ममता कुलकर्णीचं नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्याता आला तसेच माझा छळही करण्यात आला. पोलीस कोठडीदरम्यान बरीच मारहाण करण्यात आली आणि वीजेच झटकेही देण्यात आले.’

=========================================

म्हाडाच्या घरांसाठी लाखो अर्ज, आता प्रतीक्षा लॉटरीची

म्हाडाच्या घरांसाठी लाखो अर्ज, आता प्रतीक्षा लॉटरीची
मुंबई : मुंबईकरांच्या स्वप्नातलं घर अर्थात म्हाडाच्या लॉटरीसाठी लाखो जणांनी अर्ज केले आहेत. म्हाडाच्या लॉटरीसाठी एकूण 1,69,702 जणांनी अर्ज केला होता. मात्र, 1,25,219 जणांनी त्यासाठी आवश्यक अनामत रक्कम भरली आहे. त्यामुळे ज्यांनी ही रक्कम भरली आहे तेच लॉटरीसाठी पात्र ठरणार आहेत.

म्हाडानं मुंबई विभागातल्या 972 घरांसाठी 22 जून 2016 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या घरांसाठी 1 लाख 69 हजार 702 जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1 लाख 25 हजार 219 जणांनी पैसे भरले आहेत.

आलेल्या लाखो अर्जांची सध्या छाननी सुरु आहे. पात्र अर्जांची पहिली यादी 5 ऑगस्ट 2016 संध्याकाळी 6 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

तर पात्र अर्जांची अंतिम यादी ही 8 ऑगस्ट 2016 दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, एकीकडे रियल इस्टेट बाजार मंदावला असला तरीही दुसरीकडे म्हाडाच्या घरांसाठी मोठी पसंती पाहायला मिळते आहे. यंदा 972 घरांच्या लॉटरीसाठी 1,25,219 अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत. म्हणजेच एका घरासाठी तब्बल 128 दावेदार आहेत.

=========================================

शंभरावी पाणी एक्स्प्रेस, अजूनही लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा

शंभरावी पाणी एक्स्प्रेस, अजूनही लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा
सांगली: राज्यभरात समाधानकारक पाऊस होत असताना लातूरला मात्र अजूनही रेल्वेनं पाणीपुरवठा सुरूच आहे. लातूरला पाणी नेणारी शंभरावी जलदूत एक्सप्रेस मिरजवरून रवाना झाली.

या शंभराव्या फेरीमधून लातूरला आतापर्यंत २३ कोटी २० लाख लिटर पाणी रवाना करण्यात आलं आहे. लातूरला अपेक्षित पाऊस अजूनही झाला नाही. मांजरा धरणही अद्याप कोरडंच आहे. त्यामुळे लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा करण्यात यावा असा विनंतीवजा प्रस्ताव रेल्वेला पाठवला होता.

रेल्वे प्रशासनाने प्रस्ताव तात्काळ मंजूरही केला. यामुळे जलदूतला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

=========================================

मनमाडमध्ये प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

मनमाडमध्ये प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो
नाशिक : प्रियकराकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली. मालेगावमधील शिवाजीनगर इथे बुधवारी ही घटना घडली. मोनाली खरे असं मृत तरुणीचं नाव आहे.

मोनालीचे जय शेलार या तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र प्रियकराकडून होत असलेल्या छळाला ती कंटाळली होती. मोनाली बुधवारी दुपारी परीक्षेचा फॉम भरण्यासाठी जाते, असं सांगून घरातून बाहेर पडली. मात्र जाजूवाडीत जाऊन तिने विष प्राशान केलं.

यानंतर ती काही काळ ती तिथेच पडून होती. एका रिक्षाचालकाच्या हे निदर्शनास आलं आणि त्याने तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, मोनालीच्या आईने प्रियकर जयवर विष पाजून मारल्याचा आरोप केला आहे. आईच्या तक्रारीनंतर जयवर वडनेर खाकुर्डी पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

=========================================

देशभरातील बँकाचा आज एकदिवसीय संप, पुढचे सलग 3 दिवस बँका बंद

देशभरातील बँकाचा आज एकदिवसीय संप, पुढचे सलग 3 दिवस बँका बंद
मुंबई: केंद्र सरकार बँकिग क्षेत्रात करत असलेल्या विविध बदलांना विरोध म्हणून आज देशभरातील बँकांचा एकदिवसीय संप आहे. त्यामुळे शनिवार, रविवार पकडून 3 दिवस सलग बँका बंद असणार आहेत. यामध्ये सहकारी, खासगी आणि विदेशी बँकांचा समावेश आहे.

या बंदमध्ये स्टेट बँकेसह १० लाख बँक कर्मचारी सहभागी होणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचं विलनीकरण आणि आयडीबीआय बँकेचं खाजगीकरण या आणि इतर कारणांसाठी बँकांचा आज संप असणार आहे.

या संपामुळे बँकांच्या चेक क्लिअरन्स, पैसे भरणे, पैसे काढणे यासारख्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होईल.

=========================================

सुनेच्या छळाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या

सुनेच्या छळाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या
बुलडाणा: सुनेच्या छळाला कंटाळून सासऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुलडाण्यातील खामगावात घडली आहे. खामगावातील साहेबराव अंबिळडीगे हे ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त सदस्य होते. काल विष प्राशन करुन त्यांनी आत्महत्या केली.

साहेबराव अंबिळडीगे यांच्या मुलाचं मागच्या वर्षी पूनम नावाच्या मुलीबरोबर लग्न झालं. मात्र, पूनम ही साहेबरावांना पोलिसांत खोट्या तक्रारी देण्याची आणि बदनामीची धमकी देत होती. अखेर तिने दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून साहेबराव यांनी विष प्राशान करून आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी त्यांनी ३५ पानांची सुसाईट नोट लिहिली आहे. ज्यामध्ये सुनेकडून होणाऱ्या छळवादाचा सगळा घटनाक्रम त्यात लिहिला आहे.

=========================================

हरवलेला करण तब्बल 2 वर्षानं सापडला, विरार पोलिसांची कामगिरी

हरवलेला करण तब्बल 2 वर्षानं सापडला, विरार पोलिसांची कामगिरी
विरार: तब्बल दोन वर्षांपूर्वी विरारमधून हरवलेल्या एका 12 वर्षीय मुलाला शोधण्यात विरार पोलिसांना यश आलं आहे. करण असं या मुलाचं नाव असून तो भाईंदर उत्तन येथे आपल्या भावाकडे राहायला आला होता. मात्र. फिरायला गेला असतान 2014 साली करण हरवला. मात्र मुळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या करणचा फोटो नसल्याने त्यावेळी करण हरवल्याची तक्रार पोलिसांनी घेतली नाही.

करण घर शोधत शोधत विरारला आला. घराचा पत्ता माहित नसल्याने तो रस्त्यावर उपाशी तापाशी वणवण फिरत अशा अवस्थेत त्याला सकवार विरार येथील एका आदिवासी व्यक्तीला सापडला. तो करणला आपल्या घरी घेऊन गेला आणि त्याचा सांभाळ करू लागला. पण परिस्थिती गरीब असल्याने त्याला सांभाळणे कठीण होऊ लागले. म्हणून हा व्यक्ती ज्या हॉटेलवर काम करत होता तेथे करण काम करू लागला. पण नीट वागणूक न मिळाल्याने तो तेथून पाळला. यावेळी त्या व्यक्तीन विरार पोलिसांत २०१५ रोजी करण हरविल्याची तक्रार दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि भिवंडी येथील एका हॉटेल मधून करणाला शोधून काढले. विरार पोलिसांच्या पथकाने भिवंडीतून करणला ताब्यात घेऊन त्याला त्याच्या परिवाराकडे सोपवलं आहे.

=========================================

बाईकस्वाराला चुकवताना एसटी झाडाला धडकली, 4 मृत्यूमुखी

बाईकस्वाराला चुकवताना एसटी झाडाला धडकली, 4 मृत्यूमुखी
सोलापूर : साताराहून करमाळ्याकडे जाणाऱ्या एसटीला अकलूजजवळील वठफळी इथे भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले आहेत.

करमाळा डेपोची एसटी साताराहून करमाळाकडे जात होती़. मात्र वटफळीजवळ बाईकस्वाराला चुकवताना एसटी बस झाडाला धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे.

या घटनेत बाईकस्वारासह चार जणांनी जागीच प्राण सोडले. एकूण 22 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी 8 जण गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातातील जखमींना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

या भीषण अपघातात बस चालक अंकुश आणि कन्डक्टर पाटील सुदैवाने बचावले. अपघातानंतर परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. स्थानिकांच्या मदतीने अपघातातील रुग्णालयात दाखल केलं.

=========================================

6 जनपथचा रुबाब कायम, पवारांच्या घरी गडकरी, सेना खासदार

6 जनपथचा रुबाब कायम, पवारांच्या घरी गडकरी, सेना खासदार
नवी दिल्ली : वेळ सायंकाळी साडेचारची… ठिकाण- 6 जनपथ.. पवारांचं दिल्लीतलं निवासस्थान.. शिपिंग खात्याच्या सचिवांचा ताफा बंगल्यावर पोहचतो. त्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, श्रीरंग बारणेही येतात, आणि शेवटी खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.


पवारांच्या बंगल्याबाहेर जवळपास 10- 15 गाडयांचा ताफा उभा असतो. प्रश्न दोन तीन आहेत, एक मुंबईतल्या बीपीटी जागेतल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा, दुसरा पुण्यातल्या HAL या कंपनीसंदर्भातला.. पुढचे जवळपास चाळीस मिनिटे पवारांच्या दरबारात यावर
चर्चा होते.
Pawar Meeting


हे वर्णन ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की ही घटना नेमकी आजचीच आहे की 2014 च्या आधीची? कारण या प्रश्नासाठी सगळ्या यंत्रणेनं पवारांच्याकडे जायचं काय कारण? पण बहुधा सत्ता गेली तरी 6 जनपथचा रुबाब मात्र कायम आहे असं दिसतंय.


मुंबईतल्या बीपीटी अर्थात बॉम्बे पोर्ट ट्रस्टवरच्या जागेवर अतिक्रमणांचा विषय गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यासंदर्भात इथले रहिवाशी, काही एनजीओ संघटना यांनी आपलं म्हणणं पवारांच्या कानावर टाकलं. त्यासाठी गडकरींच्या भेटीची वेळ मागून घेण्यात आली. पण मीटिंगला माझ्याकडे येण्यापेक्षा मीच तुमच्याकडे येतो असं सांगत गडकरींनी औदार्य दाखवलं.

दिघावासियांना मोठा दिलासा, सरकार अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणार

दिघावासियांना मोठा दिलासा, सरकार अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणार
मुंबई : ऐन पावसाळ्यात बेघर होण्याची टांगती तलवार डोक्यावर असलेल्या नवी मुंबईतील दिघावासियांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अनधिकृत बांधकाम नियमित करायचं असेल तर त्यासंदर्भात 31 जूलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. त्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना सरकाराने हा निर्णय घेतल्याने दिघावासियांचा जीव भांड्यात पडला आहे.

अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकार हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. दरम्यान या निर्णयामुळे बेघर होण्याची टांगती तलवार असणाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.


=========================================

पैलवान नरसिंग यादवबाबत शनिवारी किंवा सोमवारी निर्णय

पैलवान नरसिंग यादवबाबत शनिवारी किंवा सोमवारी निर्णय
नवी दिल्ली : महाराष्ट्राचा पैलवान नरसिंग यादवला रिओ ऑलिम्पिकला जाण्याची संधी मिळणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. नरसिंगविषयी निर्णय शनिवारी किंवा सोमवारी घेतला जाईल, असं नाडाच्या वकिलांनी
स्पष्ट केलं आहे.

नाडाच्या मुख्यालयात आज पुन्हा एकदा नरसिंगची सुनावणी झाली. बुधवारी नाडा मुख्यालयाबाहेर नरसिंगच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज नाडाच्या मुख्यालयाबाहेर सुरक्षाव्यवस्था आणखी कडक करण्यात आली होती.

25 जून आणि 5 जुलैला नरसिंगच्या अ आणि ब नमुन्यांची तपासणी झाली होती. त्यात मेटँडिएनोन या उत्तेजकाचा अंश आढळून आला होता. नरसिंगनं मात्र आपल्यावरचे डोपिंगचे आरोप फेटळाले असून, आपल्या खाण्यात काहीतरी मिसळण्यात आल्याची तक्रार केली होती. पण नरसिंगनं केलेल्या षडयंत्राच्या आरोपांना पुरावा म्हणून सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध नाही.

दरम्यान, नरसिंगनं याप्रकरणी बुधवारी सोनीपत पोलिसांत एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर हरयाणा पोलिसांनी आज सोनीपतच्या साई सेंटरमध्ये जाऊन चौकशीही केली.

=========================================

महापालिकेत गोंधळ घातल्यास नगरसेवकपद रद्द होणार

महापालिकेत गोंधळ घातल्यास नगरसेवकपद रद्द होणार ?
मुंबई : महापालिका सभागृहात गोंधळ घातल्यास आता नगरसेवक पद जाऊ शकतं. कारण तसा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास महापालिकेच्या सभागृहात गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांचं पद रद्द
करण्याबाबत आयुक्तांना अधिकार मिळणार आहेत.

आयुक्त कारवाईबाबतची शिफारस राज्य सरकारला करतील. गेल्या काही दिवसांत महापालिकेत झालेल्या गोंधळानंतर हा प्रस्ताव आणण्यात आला आहे.

देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीनंतर महापालिकेच्या महासेभत विरोधकांनी गोंधळ घातला होता. तसंच काही सदस्यांनी महापौरांसमोर कचरा आणून टाकला होता. त्यानंतर महापौरांनी सभागृह शिस्तीत चालावं म्हणून अधिनियमात सुधारणा करण्याचे
निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते.

त्यानुसार प्रशासनाने अतिरिक्त आयुक्तांची समिती नियुक्ती केली होती. या समितीनंच हा प्रस्ताव तयार केला आहे.

=========================================

एक्स्प्रेस वेवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर

आता एक्स्प्रेस वेवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर
मुंबईः मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे. वाढत्या अपघातांवर मात करण्यासाठी सरकारने नवी शक्कल लढवली आहे. एक्सप्रेस वेवर लेन कटिंग, ओव्हर स्पीडिंग आणि ओव्हरटेकमुळे अपघातांचं प्रमान वाढत आहे. त्यामुळे याचं मॉनिटरिंग करण्यासाठी आता ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्याचा सरकारचा विचार आहे.


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या सुरक्षिततेबाबत आज विधानभवनात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृह राज्य मंत्री दीपक केसरकर, अजित पवार आणि एक्सप्रेस वे परिसरातील आमदार उपस्थित होते.

=========================================

विवाहितेचे प्रियकरासोबत तिस-यांदा पलायन


  • ऑनलाइन लोकमत
    अकोला, दि. २९ -  अहमदाबाद येथील युवकासोबत लग्न झालेल्या २0 वर्षीय विवाहितेने तिस-यांदा अकोल्यातील प्रियकरासोबत पलायन केले. विवाहितेचा शोध घेत, तिचे माहेरकडील कुटूंबिय गुरूवारी अकोल्यात पोहोचले. कुटूंबियांनी विवाहितेला ताब्यात घेऊन सायंकाळी रामदासपेठ पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी प्रियकराचेही कुटूंब पोहोचल्या दोन्ही गटात चांगलाच वाद रंगला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. पोलिसांच्या डोळ्यांदेखतच दोन्ही कुटूंबातील महिला सदस्यांनी एकमेकांना मारहाण केली. 
    अहमदाबाद येथील युवतीचे अकोल्यातील एका युवकासोबत सुत जुळले. दरम्यान ही बाब तिच्या कुटूंबियांना कळल्यानंतर त्यांनी तिच्या इच्छेविरूद्ध अहमदाबाद येथील एका युवकासोबत लग्न झाले. लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतरही प्रियकर व युवतीची एकमेकांना भेटायचे. पती आवडत नसल्याने आणि मनाविरूद्ध लग्न झाल्यामुळे युवतीने प्रियकरासोबत पलायन केले. कुटूंबियांनी युवतीला ताब्यात घेऊन अहमदाबादला आणले. काही दिवस उलटत नाही तो, दुसºयांदा युवतीने प्रियकरासोबत पलायन केले. महिनाभरानंतर कुटूंबियांनी युवतीला शोधून तिला घरी आणले. घरी आणून पंधरा दिवस होत नाही. तोच, पुन्हा युवतीने तिस-यांदा आपल्या प्रियकरासोबत पलायन केले आणि थेट अकोला गाठले. कुटूंबियांना ही बाब माहिती पडताच, त्यांनीही गुरूवारी दुपारी अकोला गाठले आणि प्रियकराच्या ताब्यातून तिला सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने प्रियकराच्या कुटूंबासमवेत रामदासपेठ पोलीस ठाणे गाठले आणि कुटूंबियांविरूद्ध तक्रार देण्याची तयारी केली. याठिकाणी युवतीचेही कुटूंबिय पोहोचले. कुटूंबातील सदस्य तिची समजूत घालत असताना, युवतीने कुटूंबियांनी माझ्या इच्छेविरूद्ध लग्न केले. मला मुलगा पसंत नाही. मी त्याच्याकडे जात नाही. प्रियकराकडे राहण्याचा निर्णय तिने पोलिसांना सांगितला. युवती हाताबाहेर जात असल्याचे कुटूंबियांनी तिला जबरदस्ती केली. यामध्ये प्रियकराच्या कुटूंबातील सदस्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही गटात शाब्दीक वाद सुरू झाला आणि पोलिसांच्या डोळ्यांदेखतच त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी काही सदस्यांना ताब्यात चांगलाच चोप दिला. रात्री उशिरापर्यंत पोलीस दोन्ही कुटूंबांचे म्हणणे ऐकून घेत होते. दोन्ही कुटूंबियांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलीस निर्णय घेतील. 

=========================================

पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून ९ मजूर ठार


  • ऑनलाइन लोकमत
    पुणे, दि. २९ -  पुण्यातील बालेवाडी येथे निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून ९ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. तसेच ढिगा-याखाली ८ ते १० जण अडकल्याचे समजते.
    मिळालेल्या माहितीनुसार, बालेवाडी मैदानाजवळील एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. इमारतीच्या १४ व्या मजल्यावरील स्लॅबचे काम सुरू असताना तो स्लॅब कोसळला व  काही कामगार त्याखाली अडकले. तर काही जण १४ व्या मजल्यावरून थेट खाली पडले व त्यांचा मृत्यू झाला. 
    दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तेथे धाव घेत ढिगा-याखाली दबलेल्यांना बाहेर काझले व उपचारांसाठी रुग्णालयात हलवले. मुख्य म्हणजे एवढी मोठी दुर्घटना होऊनही इमारतीचा बिल्डर वा प्रशासकीय अधिकारी अद्यापही घटनास्थळी न पोचल्याने संताप व्यक्त होत आहे.

=========================================

उपोषणाची दखल न घेतल्याने संतप्त महिलेचा टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न


  • ऑनलाइन लोकमत
    बीड, दि. २९ -  उपोषणास बसल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली नाही, म्हणून चिडलेली एक महिला जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढली आणि प्रशासनाची पळता भूई थोडी झाली.  या महिलेने टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने प्रशासनही हादरून गेले. पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी अर्धा तास विनवणी केल्यानंतर अखेर ती खाली उतरली आणि पोलीस अधिका-यांनी सुटेकचा नि:श्वास सोडला.
    कविता आप्पाराव पवार (रा. वासनवाडी ता. बीड) असे त्या महिलेचे नाव आहे. कुटुंबियांसमवेत ती चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेली आहे. वासनवाडी येथील गायरान जमिनीचा कायमस्वरुपी ताबा मिळावा, गायरान नावचे करावे अशा स्वरुपाच्या तिच्या मागण्या आहेत. उपोषणास बसूनही प्रशासनाने साधी विचारणाही केली नाही. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकाळी सात वाजता कविता पवार कार्यालय परिसरातील मोाबईलच्या टॉवरवर चढली. काही नागरिकांनी तिला टॉवर पाहिले अन तातडीने पोलिसांना कळविले. शिवाजीगर ठाण्याचे निरीक्षक उमेश कस्तुरे हे फौजफाट्यासह तेथे पोहोचले. यावेळी अग्निशामक दलाच्या कर्मचा-यांनाही पाचारण केले होते.

=========================================

मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे झाड कोसळून १ ठार


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. २९ -  रात्रभरच्या मुसळधार पावसाने संपूर्ण मुंबईला झोपडून काढले असतानाच मालाडमध्ये एक विशाल झाड कोसळून पडले. या झाडाखाली चिरडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सुंदरनगर परिसरात शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. हा इसम मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना हा प्रकार घडला. त्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी स्थानीक रुग्णालयात पाठविण्यात आला असुन त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. तसेच अग्निशमन दलाचे जवान हे झाड हलविण्याचा प्रयत्न करत आहेत. यात एका कारचेेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

=========================================

वेळ पडल्यास आणखी कर्ज काढा, पण शेतकऱ्यांना मदत करा


  • मुंबई :राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी समाधानी नाही, अशी टीका करतानाच राज्यावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. गरज भासली तर शेतक-यांसाठी राज्य सरकारने आणखी कर्ज काढावे. पण अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली.
    राज्यातील सततची दुष्काळी स्थिती आणि राज्य सरकारने करायच्या उपाययोजना यासंदर्भात विरोधकांनी चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. सुरुवात करताना राणे म्हणाले की, राज्यावर गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटे ओढवत आहेत. परिणामी आर्थिक अडचणीतील शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत. गेल्या एका वर्षात आत्महत्यांमध्ये सोळा टक्क्यांनी वाढल्याचे सरकार सांगत आहे. सरकारने कृषी क्षेत्रात शाश्वत उपाययोजना केल्या असत्या, दुष्काळग्रस्तांना पिण्याचे पाणी, पुरेसे अन्न-धान्य, शालेय विद्यार्थ्यांची फी माफी आणि शेतक-यांना वेळीच मदत दिली असती तर आत्महत्यांची संख्या घटली असती. सध्यस्थितीत राज्यात शेतकरी समाधानी नाही, असे सांगत राणे यांनी अच्छे दिनाच्या घोषणेची खिल्ली उडवली. विरोधकांनी सातत्याने शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. मात्र, मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यावधींचा खर्च, कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग, व्यापा-यांना सात हजार कोटींची एलबीटी माफी करणा-या सरकारला शेतक-यांबाबत कणव नाही. सत्तेत येण्याआधी केलेली आश्वासने कुठे गेली, असा सवाल राणे यांनी केला.

=========================================

३,६५६ कोटींच्या पीकविम्याचे वाटप


  • मुंबई : गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी विम्याच्या ४ हजार २०० कोटी रुपयांपैकी ३ हजार ६५६ कोटी रुपये थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत दिली.
    विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पीक विम्यासंदर्भात सूचना मांडली होती. गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या सुमारे दहा लाख शेतक-यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यापैकी सुमारे साडेसात लाख शेतकरी दुष्काळी मराठवाड्यातील आहेत. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे ११ हजार ७०० शेतक-यांना केवळ २८ रुपये एकरी विमा देण्यात आली. औरंगाबाद येथील शेतक-यांनाही कापूस आणि इतर पिकांसाठी अत्यल्प भरपाई दिली गेली. पीक विम्याचे हक्काचे पैसे न मिळाल्याने शेतक-यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाल्याचे मुंडे यांनी सभागृहात सांगितले.

=========================================

पाकिस्तानात मरणा-या हिंदूंचा आक्रोश ऐका - उद्धव ठाकरे


  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. 29 - पाकिस्तानात हिंदूंच्या मताला किंमत नाही व त्यांना मतस्वातंत्र्य नाही. त्यामुळे तेथील हिंदूंना मार खाण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या देशात मुसलमान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश, लोकसभेचा सभापती, क्रिकेट टीमचा कप्तान होतो. राज्यात व केंद्रातील मंत्रीपदे मुसलमानांच्या चरणी अर्पण करून आपले निधर्मीपण सिद्ध करून दाखविण्याची जणू चढाओढच लागलेली असते. या चढाओढीत कधीकाळी हिंदुत्वावरून रान उठविणारे आता सामील झाले आहेत. त्यांनी पाकिस्तानात रोज मरणार्‍या हिंदूंचा आक्रोश जरा ऐकावा म्हणजे बरे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून केली आहे. 
    'हिंदुस्थानातील एखाद्या भागात मुसलमानांना नुसते खरचटले तरी पाकिस्तानचे राज्यकर्ते थयथयाट करतात व त्यांना आझम खानसारखे येथील पुढारी साथ देतात. हिंदुस्थानातील अल्पसंख्याक समुदायाचे म्हणजे मुसलमानांचे जीवन असुरक्षित असल्याची बांग आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मारली जाते, पण गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर निर्घृण हल्ले सुरू आहेत व हे हल्ले दिवसेंदिवस वाढतच जात आहेत', असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.

=========================================

काश्मीरमधील असंतोष आम्हीच भडकाविला!


  • कराची : सुरक्षा दलांच्या कारवाईत हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणी ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लष्कर-ए-तोयबाने असंतोष भडकाविला, अशी कबुली देऊन जमात-उद-दवाचा प्रमुख हाफीज सईदने पाकिस्तान सरकारचा खोटेपणा उघडा पाडला.
    काश्मीरमध्ये गेले तीन आठवडे खदखदणाऱ्या असंतोषामागे पाकचा हात आहे, या भारताच्या प्रतिपादनाचा इस्लामाबादमधील सरकार एकीकडे इन्कार करत असतानाच दुसरीकडे हाफीजने वणीच्या मृत्यूनंतर रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांचे नेतृत्व लष्करच्या एका ‘अमीरा’ने (म्होरक्या) केल्याचे सांगितले. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची री ओढत हाफीजने गरळ ओकली की, काश्मीरशिवाय पाक अपूर्ण आहे. अल्लाच्या कृपेने काश्मीर पाकचा भाग नक्की होईल. भारताचे तुकडे झालेले जगाला पाहायला मिळतील. वणीच्या मृत्यूनंतर पाकमधील फैसलाबादहून अनेक लोक काश्मीरमध्ये गेले. त्यापैकी काहींनी ‘हौतात्म्य’ही पत्करले, अशी फुशारकीही त्याने मारली.

=========================================

तपासणीच्या नावाखाली लैंगिक चाळे करणा-या डॉ. पटवर्धनला तुरुंगावास


  • ऑनलाइन लोकमत
    लंडन, दि. २९ - तपासणीच्या नावाखाली महिलांशी लैंगिक चाळे करणारे लंडनमधील प्रसिद्ध स्त्रीरोगविशेषज्ञ डॉ. महेश पटवर्धन यांना लैंगिक गुन्ह्याच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले असून त्यांना आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान पटवर्धन यांनी आपल्यासोबत गैरकृत्य केल्याची तक्रार सहा महिलांनी नोंदवली होती. 
    त्यावर झालेल्या सुनावणीदरम्यान वोलोविच क्राऊन कोर्टाने पटवर्धन यांना दोषी ठरवून ही शिक्षा ठोठावली. डॉ. महेश पटवर्धन अॅलडर्टन हिल हॉस्पिटल आणि बकहर्स्ट हिल येथील आपल्या खासगी दवाखान्यात प्रॅक्टीस करायचे. तपासणी दरम्यान
    महिलांच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श करण्याबरोबर त्यांच्या शरीराला घर्षण होईल अशा पद्धतीने पटवर्धन तपासणी करायचे. 
    ३१ जुलै २००८ ते २४ सप्टेंबर २०१२ दरम्यानच्या गुन्ह्यासाठी त्यांना दोषी ठरवले. शिक्षा सुनावणीच्यावेळी त्यांची दोन मुले आणि पत्नी कोर्टात हजर होती. महेश पटवर्धन मूळचे भारतीय वंशाचे आहेत. २० नोव्हेंबर २०१४ रोजी भारतातून आलेल्या विमानातून उतरल्यानंतर त्यांना हिथ्रो विमानतळावर अटक करण्यात आली. 

=========================================

No comments: