Tuesday, 12 July 2016

नमस्कार लाईव्ह १२-०७-२०१६ चे बातमीपत्र


======================================

सदाभाऊंचा पॉवर प्ले, शेतमाल विक्रीसाठी पहाटेच मंडईत

सदाभाऊंचा पॉवर प्ले, शेतमाल विक्रीसाठी पहाटेच मंडईत !
मुंबई :  व्यापाऱ्यांनी बाजार समित्या बंद ठेवल्याने आता शेतमाल विकण्यासाठी सरकारच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उतरलं आहे. मुंबईतल्या दादर मार्केटमध्ये कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विक्रीला उतरवला. दादरच्या मार्केटमध्ये ३०० गाड्यांची आवक झाली.

यावेळी स्वत: सदाभाऊ खोत हे रस्त्यावर उतरुन मार्केटची पाहणी करत होते. नुकतंच सदाभाऊ खोत यांनी कृषी आणि पणन राज्यमंत्रीपदाचा भार स्वीकारला आहे. त्यानंतर लगेचच सदाभाऊ कामाला लागले आहेत.  सदाभाऊ खोत यांनी आज पहाटेच दादर मार्केटमध्ये हजेरी लावली.
======================================

तोंडात कांदा कोंबून पित्याकडून पोटच्या मुलीची हत्या

तोंडात कांदा कोंबून पित्याकडून पोटच्या मुलीची हत्या
औरंगाबाद : बाराखडी येत नाही म्हणून एका पित्याने पोटच्या मुलीची हत्या केली. औरंगाबादच्या बाळापूर गावात घटना रविवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली आहे. भारती कुटे असं मृत मुलीचं नाव आहे.


पहिलीत शिकणाऱ्या मुलीला बाराखडी येत नाही, म्हणून संतापलेल्या नराधम पित्याने मुलीच्या तोंडात कांदा कोंबून तिचा खून केला. त्यानंतर परस्परच मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.


परंतु मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर चिखलठाणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी राजेश कुटेला खुनाच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली.
======================================

अरविंद पानगरिया RBI चे नवे गव्हर्नर

अरविंद पानगरिया RBI चे नवे गव्हर्नर?
मुंबई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदासाठी आता नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगरिया यांचं नाव चर्चेत आलं आहे. पानगरिया हे पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या गुजरात मॉडेलचे समर्थक मानले जातात.

मागच्या वर्षी योजना आयोगाच्या जागी बनवण्यात आलेल्या नीती आयोगाचे पानगरिया हे पहिले उपाध्यक्ष आहेत. त्यांनी कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम पाहिलं आहे

तसेच, एशियन डेव्हलपमेंट बँक, वर्ल्ड बँक, आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायजेशन आणि संयुक्त राष्ट्रांच्या कामाचाही पानगरिया यांना अनुभव आहे.
======================================

मोहम्मद शमीला बीसीसीआयकडून 2.2 कोटींची नुकसानभरपाई

मोहम्मद शमीला बीसीसीआयकडून 2.2 कोटींची नुकसानभरपाई
नवी दिल्ली टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयने 2.2 कोटींची नुकसानभरपाई दिली आहे. आयपीएल 8 मध्ये न खेळल्यामुळे झालेल्या नुकसानासाठी बीसीसीआयने शमीला एकूण 2,23,12,500 रुपये भरपाई म्हणून दिले आहेत.


गुडघ्याची दुखापती असूनही मोहम्मद शमी 2015 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारतीय संघात सहभागी झाला होता. तसंच त्याआधी ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेतही तो खेळला होता. मात्र दुखापतीमुळे शमीला 2015 मध्येच झालेल्या आयपीएलच्या आठव्या मोसमाला मुकावं लागलं होतं.
======================================

मुलगी आदिराच्या व्हायरल फोटोवर राणी मुखर्जी म्हणते...

मुलगी आदिराच्या व्हायरल फोटोवर राणी मुखर्जी म्हणते...
मुंबई : मागील काही दिवसांमध्ये एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि निर्माता आदित्य चोप्राची मुलगी आदिराचा असल्याचं म्हटलं जात आहे.


हा फोटो राणी मुखर्जीच्या मुलीचा असल्याचा समजून लोक तो शेअर तसंच लाईक करत आहेत. मात्र यावर राणीकडून अधिकृत निवेदन आलं आहे.

Adira_1
======================================

बाजार समित्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस

बाजार समित्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस
मुंबई राज्यातील बाजार समित्यांचा संपाचा आज चौथा दिवस आहे. फळ आणि भाजीपाला बाजार समित्यांमधून नियंत्रणमुक्त केल्याच्या विरोधात गेल्या तीन दिवसांपासून बाजार समित्या बंद आहेत.

नवी मुंबई बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनीही आजपासून संपाची हाक दिली आहे. नवी मुंबई बाजार समिती ही राज्यातली सर्वात मोठ्या समित्यांपैकी एक मानली जाते. त्यामुळे या संपाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसतो आहे.

सरकार आणि व्यापाऱ्यांमधील बैठकही निष्पळ ठरली आहे. त्यामुळे बाजार समित्यांचा प्रश्न आणखी चिघळताना दिसतो आहे.

भाजपीला नियंत्रणमुक्तीविरोधात राज्यभरातील बाजार समित्यांनी बंद पुकारला आहे. आज बंदचा चौथा दिवस आहे.

दरम्यान, पुणे आणि नाशिकमध्ये व्यापाऱ्यांच्या आठमुठेपणाला शेतकऱ्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
======================================

आफ्रिकेतून पंतप्रधान मोदी परतले, काश्मीर प्रश्नावर आज बैठक

आफ्रिकेतून पंतप्रधान मोदी परतले, काश्मीर प्रश्नावर आज बैठक
मुंबई : पाच आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भारतात आगमन झालं आहे. काल रात्री मोदींच्या विशेष विमानाने केनियाच्या नैरोबी इथल्या विमानतळावरुन उड्डाण घेतलं आणि आज सकाळी ते भारतात दाखल झाले.

My Kenya visit was a memorable one. It has led to further cementing economic & cultural ties between India and Kenya: PM @narendramodi

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीवर बैठक घेणार आहेत.


======================================

मी फरार नाही; पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार परदेश दौऱ्यावर: धनंजय मुंडे

मी फरार नाही; पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार परदेश दौऱ्यावर: धनंजय मुंडे
फाईल फोटो
मुंबई: ‘पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शेतीविषयक अभ्यास दौऱ्यासाठी मी विदेशात असल्याने व या विदेश दौऱ्याची माहिती पोलीसांना असल्याने मी फरार असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’ अशी माहिती विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी चौकशीत आपण कायमच  सहकार्य करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

‘ज्या डीसीसी बँकेच्या घोटाळ्यात आपले नाव घेतले जाते त्या बँकेचा मी कधीही संचालक नव्हतो. तर या बँकेकडून ज्या जगमित्र सुतगिरणीने कर्ज घेतले त्या संस्थेचा संचालक होतो व या संस्थेने कर्ज घेतले तेव्हा या संस्थेचा मी संचालकही नव्हतो.’ असा दावा धनंजय मुंडेंनी केला आहे.

‘ज्या-ज्या वेळेस मला चौकशीसाठी बोलवण्यात आलं त्या-त्यावेळी मी तपासासाठी सहकार्य केलेले आहे. चार दिवसांपूर्वी तपासासंदर्भात एसआयटी समोरही हजर होऊन त्यांनाही आवश्यक असलेली माहिती स्वत:हून दिलेली आहे. तसेच विदेश दौऱ्याची एसआयटीला माहितीही दिलेली होती. या प्रकरणात आज चार्जशीट दाखल होणार हे माहित नव्हते तशी माहिती असती तर आपण दौरा रद्द केला असता.’ अशीही माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
======================================

कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर परिवारातील तिघांची आत्महत्या

कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर परिवारातील तिघांची आत्महत्या
परभणी : वडिलांच्या मृत्यूनंतर दोन मुली आणि पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणीत समोर आली आहे. वडिलांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे कुटुंबातील उर्वरित चौघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर दुःखाच्या भरात पत्नी आणि तीन मुलांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.
परभणी शहरातील नानाल पेठ भागात राहणाऱ्या 70 वर्षीय चंद्रकांत डांगे यांचा आजारपणाने मृत्यू झाला. त्यानंतर 65 वर्षीय पत्नी शैला, 42 वर्षीय कन्या रेणुका आणि 35 वर्षीय कन्या प्रणिता यांनी आत्महत्या केली, तर आत्महत्येचा प्रयत्न करणारा 30 वर्षीय मुलगा सदानंद डांगे वाचला आहे.
======================================

पाकिस्तान - पेशावर शाळा दहशतवादी हल्ल्याचा मास्टमाइंड ड्रोन हल्ल्यात मृत्युमुखी



  • ऑनलाइन लोकमत - 
    इस्लामाबाद, दि. 12 - पेशावरमधील लष्करी शाळेवर दहशतवादी हल्ला घडवून आणणा-या मास्टरमाइंडचा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमधील नानगरहर प्रांतात अमेरिकेने ड्रोन हल्ला केला होता, या हल्ल्यात पेशावर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड उमर मन्सूर याचा मृत्यू झाला आहे. उमर मन्सूरसोबत अजून एक दहशतवादी कारी सैफुल्लाह याचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या एका वरिष्ठ अधिका-याने डॉन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. 
    डिसेंबर २०१४ मध्ये पाकिस्तानच्या वायव्य सरहद्दीतील पेशावर येथील लष्करी शाळेत भीषण दहशतवादी करण्यात आला होता. उमर मन्सूरचा आणि आत्मघाती हल्लेखोरांचा प्रमुख असलेल्या कारी सैफुल्लाहचा मृत्यू झाल्याची आमची खात्रीलायक माहिती आहे असं अधिका-याने सांगितलं आहे. 
======================================

VIDEO - सात फेरे घेताना पायजमा सुटल्याने नवरदेवाची झाली फजिती


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १२ - लग्न हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण असतो. पती-पत्नी दोघांसाठी लग्नाच्या दिवसाच्या आठवणी खास असतात. लग्नानंतर अनेकवर्षांनीही या आठवणी दोघांच्या मनात ताज्या असतात. 
    अशाच एका पंजाबी लग्न सोहळयात घडलेली घटना पती-पत्नीला लक्षात ठेवायला अजिबात आवडणार नाही पण या लग्नाला उपस्थित असलेले पाहुणे मात्र कायम लक्षात ठेवतील. 
    गुरुव्दारामध्ये संपन्न झालेल्या विवाहात रितीनुसार वधू-वर सात फेरे घेत असताना अचानक नव-या मुलाच्या पायजम्याची नाडी सुटली. त्यामुळे नवरदेव फेरे घेताना एकाहाताने सुटणारा पायजमा सावरत होता. तेवढयात नवरदेवाची आई पुढे आली आणि तिने सुटणा-या पायजम्याची नाडी बांधली. 
    या प्रसंगाचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.  या घटनेला नवरदेवाने हसण्यावारी नेले असले तरी, त्याची काय स्थिती झाली असेल ते त्यालाच ठाऊक....!
======================================

'त्या' निदर्यी मातेने पाच महिन्याचे मुल फेकले प्रियकरावर



  • ऑनलाइन लोकमत 
    फ्लोरिडा, दि. १२ - प्रियकराला मारहाण करताना फ्लोरिडामध्ये एका महिलेने आपल्या पाच महिन्याच्या मुलाचा धोपाटण्यासारखा वापर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टायाना अॅलेन (१८) असे आरोपी महिलेचे नाव आहे. अॅलेन तिच्या प्रियकरासोबत डेटोना बीचवर असताना दोघांमध्ये वाद झाला. 
    यावेळी संतापलेल्या अॅलेनने प्रियकराला आधी हातांनी मारहाण केली नंतर प्रियकराच्या हातातील मुल खेचून घेतले. अॅलेनने पाच महिन्यांच्या मुलाला धुपाटण्यासारखे फिरवून प्रियकरांच्या दिशेने फेकले. हे मूल वाळूत पडले. अॅलेनचा प्रियकरच या मुलाचा पिता आहे. 
    अॅलेन मूल आपल्याकडे खेचून घेऊन काही पावले चालत गेली. त्यावेळी मुलाचे डोके कठडयावर आपटले. पोलिसांनी अॅलेनला अटक केली असून, मुलाला रुग्णालयात दाखल केले आहे. 
======================================

डिलीव्हरी बॉयने महिला कस्टमरकडे केली सेक्सची मागणी



  • ऑनलाइन लोकमत 
    बंगळुरु, दि. १२ - फूड डिलीव्हरी नाकारणा-या महिलेचा फोनवरुन लैंगिक छळ करणा-या फूड डिलीव्हरी बॉयला जेपी नगर पोलिसांनी अटक केली आहे. या मुलाने पिडित महिलेचा फोन नंबरही  व्हॉटस अॅप ग्रुपवर टाकला. त्यामुळे सेक्स सुखाची मागणी करणारे शेकडो फोन्स या महिलेला आले. महिलेला धडा शिकवण्यासाठी म्हणून हे कृत्य केल्याचे आरोपी श्रेयसने पोलिसांना सांगितले. 
    पिडित महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार तिने आठ जुलैला फूटपांडा या ऑनलाइन फूड वेबासाईटवरुन मॅकडोन्लडमधून फूड मागवले. रात्री दहाच्या सुमारास डिलीव्हरी बॉय श्रेयस ऑर्डर पोहोचवण्यासाठी या महिलेच्या घरी आला. डिलीव्हरी देताना त्याने माझ्याकडे बघून अश्लील कमेंटस केल्या आणि तो निघून गेला असे पिडित महिलेचा दावा आहे. 
    फूड डिलीव्हरी दिल्यानंतर अर्ध्यातासाने या महिलेला पुन्हा श्रेयसचा फोन आला. त्याने पिडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने श्रेयसला फोनवरुन झापले व फोन कट केला. त्यानंतर या महिलेला १४ मोबाईल क्रमांकावरुन फोन आले. फोन करणारे या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करायचे. शेवटी या त्रासाला कंटाळून पिडित महिलेने पोलिसात धाव घेतली. 
======================================

आठवण पानशेत पुराची - निर्णय झाले, अंमलबजावणी अडकली प्रशासकीय पातळीवर



  • पुणे : पानशेत धरणफुटीने पुणे शहरात हाहाकार माजविला होता़ या महापुरात बेघर झालेल्यांसाठी शासनाने शहराच्या ८ ठिकाणी वेगवेगळ्या वसाहती स्थापन करून त्यात ३ हजार ९८८ कुटुंबंची व्यवस्था केली़ या घटनेला आता ५५ वर्षे झाली़ या पूरग्रस्तांना मालकीहक्काने घरे देण्याचा, त्यांनी केलेली वाढीव बांधकामे नियमित करण्याचा शासन निर्णय झाला पण, त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसून ती प्रशासकीय पातळीवर अडकली आहे़
    या पूरग्रस्त कुटुंबांपैकी अनेकांनी घरांची विक्री केली आहे़ शासनाने ही घरे त्यांना मालकीहक्काने दिली असली तरी हे हस्तांतरण अद्याप होत नाही़ पूरग्रस्त वसाहतीतील घरांचे हस्तांतरण नियमित करावे, येथे झालेले वाढीव बांधकामे नियमित करावीत, विकास आराखड्यात टाकलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी केली आहे़
======================================

भुईकोट किल्ल्यातील पंचधातूंची तोफ चोरीस


  • औसा (जि. लातूर) : भुईकोट किल्ल्यातील पंचधातूच्या तोफेची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. शनिवार रात्री ही घटना घडली. ही तोफ सुमारे ५० किलो वजनाची असून याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
    ख्वाजा मेहमूदने १३८२मध्ये औश्याच्या भूईकोट किल्ला बांधला. पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ३४ एकर ३० गुंठे जमिनीवर असलेल्या या किल्ल्याची तीन-चार वर्षांपासून डागडुजी करण्यात येत आहे.
    शनिवारी रात्री व रविवारी पहाटेच्या सुमारास या भुईकोट किल्ल्याच्या दिंडी दरवाज्याचे कुलूप व कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी किल्ल्यात प्रवेश केला आणि साडेतीन फूट लांब, ८.८ इंच व्यास असलेली व ५० किलो वजनाची पंचधातूच्या तोफेची चोरी केली़ (प्रतिनिधी)
    किंमत दहा हजार
    औश्याच्या भूईकोट किल्ल्यातील चोरीस गेलेली ही तोफ पंचधातूची आहे़ मात्र, औसा पोलिसांत त्याची किंमत दहा हजार रुपये असल्याची नोंद करण्यात आली आहे़
======================================

‘स्वच्छ महाराष्ट्र’नंतर ‘स्वस्थ महाराष्ट्र’



  • यदु जोशी,  मुंबई
    स्वच्छ महाराष्ट्रनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार स्वस्थ महाराष्ट्र मिशन राबविण्यात येणार आहे. शासकीय यंत्रणा, सीएसआर फंड, खासगी रुग्णालये आणि नामवंत डॉक्टर यांच्या सहकार्याने ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली जाणार आहे.
    जळगाव जिल्ह्यात गेली अनेक वर्षे भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन यशस्वीरीत्या करणारे गिरीश महाजन हे वैद्यकीय शिक्षणमंत्री झाल्यानंतर आता या मिशनची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
    जळगाव, यवतमाळ आणि नागपूर या तीन जिल्ह्यांमध्ये अलीकडेच प्रायोगिक तत्त्वावर अशी शिबिरे घेण्यात आली. तिन्ही शिबिरांना मुख्यमंत्री स्वत: उपस्थित होते. त्यानंतरच ‘स्वस्थ महाराष्ट्र’ची संकल्पना पुढे आली आहे.
    नामवंत कंपन्या सीएसआर फंडातून राज्याचे आरोग्य सुधारण्यासाठी योगदान देण्यास इच्छुक असून त्यात टाटा, अंबानींसारख्या उद्योगपतींचादेखील समावेश आहे. वर्षभरात तीन हजार कोटी रुपये सीएसआर फंडातून उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. टाटा ट्रस्टने आरोग्य सुविधांसाठी भरीव अर्थसाहाय्य देण्यास आधीच सुरुवात केली आहे. स्वत: रतन टाटा त्यात जातीने रस घेत आहेत.
======================================

यंदा थर्टी फर्स्टचे सेलीब्रेशन एक सेकंद जास्त !



  • मुंबई : नव्या म्हणजे २०१७ या वर्षाचे आगमन एक सेकंद उशिराने होणार असल्याने यंदा थर्टी फर्स्टचे सेलीब्रेशन सेकंदभर का होईना, पण जास्त रंगणार आहे. २०१६ हे लीप वर्ष असून, ३१ डिसेंबर रोजीदेखील ‘लीप सेकंद’ पाळण्यात येणार आहे.
    त्यामुळे २०१६ हे वर्ष एका सेकंदाने आणखी लांबणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
    टायडल फोर्समुळे आणि इतर कारणांमुळे पृथ्वीचा स्वत:भोवती फिरण्याचा वेग मंदावत आहे. त्यामुळे अगदी अचूक वेळ दाखविणाऱ्या आधुनिक आण्विक घड्याळांची वेळ आणि प्रत्यक्ष पृथ्वीची स्थिती यामध्ये फरक पडू लागतो.
    काय आहे योजना?
    यंदा ३१ डिसेंबर रोजी लीप सेकंद धरण्यात येणार असल्याचे यू. एस. नेव्हल वेधशाळेचे डॉ. जेआॅफ चेस्टर यांनी नुकतेच जाहीर केले. १९७२पासून या वर्षापर्यंत एकूण २७ वेळा लीप सेकंद पाळले गेल्याचेही सोमण यांनी सांगितले. यापूर्वी ३० जून २०१५ रोजी लीप सेकंद धरण्यात आला होता.
======================================

महापालिकेत भाजपाचे संख्याबळ एकने वाढले



  • मुंबई : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी वॉर्ड क्ऱ १५६चे नगरसेवकपद लघुवाद न्यायालयाने बाद ठरविले आहे़ त्यांच्या जागी भाजपाचे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार हरिश भंदिरगे यांना विजयी घोषित करण्यात आले आहे़ निवडणुकीपूर्वीच भाजपाचा आणखी एक नगरसेवक वाढला आहे़
    इशाक शेख यांच्या निवडीला दुसऱ्या क्रमांकाचे भाजपाचे उमेदवार भंदिरगे यांनी आव्हान दिले होते़ न्यायालयाने भंदिरगे यांना विजयी घोषित केले़ त्यामुळे भाजपाचे संख्याबळ ३२वर पोहोचले आहे़
    सहा महिन्यांपुरते नगरसेवक
    भंदिरगे यांना नगरसेवकपद मिळाले खरे़ मात्र पुढच्या वर्षी फेब्रुवारीदरम्यान महापालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे़ त्यामुळे भंदिरगे यांना विकासकामे करण्यासाठी अवघे सहा महिनेच मिळणार आहेत. 
======================================

आमच्या अंतर्गत विषयांपासून दूर रहा, भारताने पाकिस्तानला सुनावले



  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १२ - काश्मीरमधल्या स्फोटक परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी पाकिस्तानने नेहमीप्रमाणे या मुद्यावरुन राजकारण सुरु केले आहे. बुरहान वानीच्या मृत्यूने आपल्याला धक्का बसल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे.
    एवढयावरच न थांबता सोमवारी संध्याकाळी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव अझीझ चौधरी यांनी भारताचे राजदूत गौतम बामबावले यांना बोलवून काश्मीरमधल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. बुरहान वानीच्या मृत्यूची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे. 
    पाकिस्तानच्या या कृतीला भारतानेही तितक्याच कठोर शब्दात सडेतोड उत्तर दिले आहे. काश्मीर भारताचा अंतर्गत विषय असून, पाकिस्तानने त्यात ढवळाढवळ करु नये असे भारताने म्हटले आहे. पाकिस्तानच्या विधानांवरुन आजही त्यांची दहशतवादाला साथ असून ते एक धोरण म्हणून दहशतवादाचा वापर करताना दिसतात असे भारताने म्हटले आहे. 
======================================

काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंहांचा अमेरिका दौरा स्थगित



  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. १२ - हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वनी याच्या मृत्यूमुळे काश्मिरमधील हिंसाचार उफाळला असून तीन दिवसांपासून धुमसत असलेल्या खो-यात आत्तापर्यंत २३ ठार तर २५० हून अधिक नागरिक जखमी झाले आहे. काश्मीरमधील याच तणावपूर्ण वातावरणामुळे सरकारची काळजी वाढली असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका दौरा पुढे ढकलला आहे. येत्या १७ जुलैपासून राजनाथ सिंह पाच दिवसांच्या अमेरिका दौ-यावर जाणार होते, मात्र काश्मीरमधील स्फोटक परिस्थिती पाहता हा विषय सध्या महत्वपूर्ण असल्याचे सांगत सिंह यांनी आपला दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 
    दरम्यान काशमीरमधील हिंसाचार व तेथील परिस्थितीबद्दल गृहमंत्री येत्या १८ जुलैपासून सुरू होणा-या पावसाळ अधिवेशनात निवेदन करणार आहेत.
======================================

अनेक जीव जाऊनही अमेरिकेत अजूनही ‘गन’ प्रिय!



  • टेक्सास : बेछूट गोळीबाराज आतापर्यंत अनेकांचा जीव जाऊनही अमेरिकेत बंदुकीबद्दलचे प्रेम अद्याप कमी झालेले नाही. डल्लास येथे नुकत्याच झालेल्या हल्ल्यात पाच पोलीस अधिकारी ठार झाले होते. याच ठिकाणापासून अवघ्या ३० किमी अंतरावर एक ‘गन शो’ आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ‘गन शो’ला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, खरेदीदाराची कोणतीही पार्श्वभूमी न तपासता बंदुकांची विक्री केली जात आहे. सर्वसामान्यांना बंदुकीचा परवाना दिला जाऊ नये किंवा त्यासंबंधीचे नियम कडक करावेत यासाठी अमेरिकेत मोठी मोहीम सुरू असली तरी, अशा प्रदर्शनातून या मोहिमेला मोठी खीळ बसत आहे.


======================================

इंग्लडचे पंतप्रधानपद थेरेसा मे यांना मिळणार



  • ऑनलाइन लोकमत
    लंडन, दि. ११ -  इंग्लडच्या पंतप्रधानपदाची सूत्रे गृहमंत्री थेरेसा मे बहुधा बुधवारी स्वीकारतील, असे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी सोमवारी सांगितले.
    पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मे यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या अँन्ड्रिया लिडसोम यांनी अनपेक्षितपणे माघार घेतल्यामुळे थेरेसा मे यांना कोणीही प्रतिस्पर्धी उरला नाही.
    कॅमेरून मंगळवारी मंत्रिमंडळाची शेवटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि बुधवारी ते राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्याकडे अधिकृतरित्या राजीनामा सादर करतील.
======================================
केरळमध्ये दोन राजकीय स्थानिक नेत्यांची हत्या

तिरुअनंतपुरम (केरळ) - काही काळाच्या विश्रांतीनंतर केरळमध्ये पुन्हा राजकीय हिंसाचार सुरू झाला असून दोन स्थानिक नेत्यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा समावेश आहे.

सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पय्यानूर शहरात सी व्ही धनराज (वय 36) नावाच्या सीपीआयच्या कार्यकर्त्याची करण्यात आली. धनराज आपल्या निवासस्थानाच्या दिशेने जात होते. त्यावेळी तीन दुचाकींवरून एक टोळी त्यांचा पाठलाग करत होती. दरम्यान धनराज घराजवळ पोचल्यानंतर घरात प्रवेश करत असताना टोळीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर कन्नूर येथील रुग्णालयात नेताना धनराज यांचा मृत्यु झाला. सीपीआयच्या एका स्थानिक नेत्याने या हत्येमागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर अवघ्या दोन तासांनी पय्यानूर येथीलच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सी के रामचंद्रन (वय 46) यांची प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यानंतर रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यु झाला. रामचंद्रन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय मजदूर संघाचे स्थानिक नेते होते. या दोन राजकीय हत्यांनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या हत्येनंतर भाजप आणि सीपीआय कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ला झाल्याचेही वृत्त आहे.
======================================
बॅंकांचा दोन दिवसांचा संप स्थगित

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बॅंक कर्मचारी संघटनेने दोन दिवसांचा संप तात्पुरता स्थगित केला आहे. यबाबत अखिल भारतीय बॅंक कर्मचारी संघटनेचे महासचिव सी. एच. वेंकटाचलम यांनी माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये स्टेट बॅंक ऑफ म्हैसूर, स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, स्टेट बॅंक ऑफ बिकानेर जयपूर, स्टेट बॅंक ऑफ पटियाला व स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर या पाच सहयोगी बॅंकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला बॅंक कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यासाठी 12 आणि 13 जुलै रोजी दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला होता. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने संप मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमुर्ती व्ही.के. राव यांनी स्टेट बॅंक ऑफ पटियाला आणि स्टेट बॅंकेच्या चार सहयोगी बॅंकांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात हा आदेश जारी केला आहे. न्यायालयाने स्टेट सेक्‍टर बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनचा दोन दिवसांचा संप मागे घेण्यास सांगितले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी होईपर्यंत संप करता येणार नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी 20 जुलै रोजी होणार आहे.
======================================
कऱ्हाडच्या पर्यटकांनी अनुभवला जीवघेणा थरार
-

‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणण्यासाठी समाजकंटकांनी रोखल्या बंदुका; हवेत गोळीबारही
कऱ्हाड/ कोल्हापूर - अमरनाथ यात्रेला गेलेल्या कोल्हापूर आणि कऱ्हाडच्या पर्यटकांना कश्‍मीरमधील दंगलीचा फटका बसला. पंपोर आणि अनंतनागमध्ये त्यांनी जीवघेणा थरार अनुभवला. चक्क दोन तास झाडावर बसून काढावे लागले. समाजकंटकांनी एके ४७ त्यांच्यावर रोखल्या. त्यांच्याच समोर दोन वेळा हवेत गोळीबारही केला. ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा द्यायला लावल्या, मग सुटका केली. काले (ता. कऱ्हाड) येथील विक्रम साळुंखे या तरुणाने आज परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर याबाबतची माहिती दिली.

कोल्हापूरमधील कोंडुसकर ट्रॅव्हल्सचा स्टाफ दरवर्षी सहलीसाठी जातो. यावर्षी ४० जण अमरनाथ यात्रेला गेले होते. त्यांच्यामध्ये रत्नाकर पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह काही जण कुटुंबासमवेत गेले होते. या चाळीसांमध्ये काले (ता. कऱ्हाड) येथील विक्रम साळुंखे, अरुण लाडी, शैलेश देसाई, तसेच श्रीकांत संकपाळ, उद्धव जांभळे, सोमनाथ कोळी (तिघे रा. अबयाचीवाडी) हेही होते. ३० जूनला दुपारी ते कोल्हापूरमधून निघाले. अमृतसर, आग्रा असा प्रवास करत ते ४ जुलैला जम्मूमध्ये पोचले. तेथून ट्रॅव्हलरने ते श्रीनगरमध्ये पोचले. श्रीनगरमधून अमरनाथकडे गेले. ७ जुलैला अमरनाथ दर्शन झाले. त्यानंतर ते ८ जुलैला सायंकाळी श्रीनगरमध्ये पोचले. तेथून वैष्णोदेवीकडे जात असताना पंपोर या केशरासाठी प्रसिद्ध असलेल्या गावात ते पोचले. रात्रीच्या आठच्या सुमारास खरेदी करत असताना त्यांच्यावर दगडफेक सुरू झाली. त्यांच्या तीनही गाड्यांच्या काचा फोडल्या. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सगळेच घाबरून गेले. बऱ्याच वेळानंतर पंपोरहून बाहेर निघता आले. त्यानंतर अनंतनागच्या दिशेने जात असताना शंभर-दोनशे जणांचे गट वाटेत गाड्या अडवून पर्यटकांना मारहाण करत होते. पर्यटकांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा द्यायला लावत होते. त्यांच्याकडचे साहित्य हिसकावून घेत होते. पुढे अनंतनागजवळ गेल्यानंतर रस्त्यावर टायर पेटवून फेकले होते. तेथे एका पेट्रोलपंपाजवळ गोळीबार झाला. कोंडुसकरच्या ग्रुपने तो जवळून पाहिला. मरणाच्या दारात गेल्याची जाणीव त्यांना झाली. जीव वाचवण्यासाठी अनंतनागमध्ये झाडावर बसले. तब्बल दोन तास त्या झाडावर बसावे लागले. तेथे पोलिसांनी हस्तक्षेप करून बाहेर काढले आणि पहाटे चारच्या सुमारास तिथून वैष्णोदेवीकडे निघाले. मात्र, या थरारक अनुभवानंतर सर्वांचीच अवस्था भेदरल्यासारखी झाली होती. उद्या सर्वजण आपापल्या घरी पोचतील. 
======================================

No comments: