Saturday, 30 July 2016

*नमस्कार लाईव्ह ३०-०७-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र*

[अंतरराष्ट्रीय] 
१- हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीने उत्तर प्रदेशातील ग्रामस्थांचा जल्लोष 
२- डिलीट होता होईना व्हॉट्स अॅपचे मेसेज 
३- चीनमध्ये होणार मोदी-ओबामांची भेट 
४- भारतातील असहिष्णुतेवर अमेरिकेकडून चिंता 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- आठवलेंचा एकच प्रश्न, मायावती बॅकफूटवर 
६- BSNL चा धमाका, तब्बल 2700 जागांसाठी भरती 
७- आसाममधील पुरात गेल्या आठवड्यापासून 26 जणांचा मृत्यू - राजनाथ सिंह.
८- छत्तीसगड; 11 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण 
९- पंतप्रधान पीक विमा योजनेला 2 आॅगस्ट पर्यंत मुदतवाढ 
१०- गोरक्षणासाठी माणसाचा बळी नको: आठवले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचे नुकसान, अशोक चव्हाणांचा घणाघात 
१२- सलग चौथ्या दिवशी डी.वाय पाटील संस्थांवरची छापेमारी सुरुच 
१३- खडसेंच्या चौकशीसाठी ऑफिस सज्ज  
१४- गुजरातमध्ये छोट्या वाहनांना टोलमुक्ती, महाराष्ट्रात कधी 
१५- सतीश माथुर राज्याचे नवे पोलिस महासंचालक 
१६- कल्याणमध्ये पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची ऑन ड्युटी दारु पार्टी 
१७- मुंबई खड्डेमुक्त करा, न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं 
१८- गुजरातमध्ये 15 ऑगस्टपासून टोलमुक्ती! 
१९- जलयुक्त शिवार: राज्यात 38 टीएमसी जलसंचय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- सुनेकडून वृद्ध सासु-सासऱ्यांची धुलाई, नवऱ्यालाही झोडपलं 
२१- मुलींची छेड काढणाऱ्या तिघांना 3 वर्षे सक्तमजुरी, उमरगा कोर्टाचा निकाल 
२२- भांबोरा छेडछाड : आरोपींची घरं पेटवली 
२३- बेस्टच्या अभियंत्यांचं रजा आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मागे. 
२४- काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान हुतात्मा 
२५- स्टेशनवरील 'वाय-फाय'चा 20 लाख जणांना लाभ 
२६- भाजप नेते रावत यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- ‘पीपली लाईव्ह’चा सहाय्यक दिग्दर्शक बलात्कार प्रकरणी दोषी 
२८- सलग 25 ओव्हर मेडन, श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर 17 वर्षांनी विजय 
२९- पॅनासॉनिकचा T44 Lite स्मार्टफोन लॉन्च, किंमत फक्त.... 
३०- श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर 17 वर्षांनी ऐतिहासिक विजय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

=======================================

राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचे नुकसान, अशोक चव्हाणांचा घणाघात

राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचे नुकसान, अशोक चव्हाणांचा घणाघात
नाशिक : नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच काँग्रेसचं नुकसान झालं आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. शिवाय, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ऐनवेळी परिस्थिती पाहून आघाडीचा निर्णय घेऊ, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

“भाजप सरकारला डोकं नाही. हेल्मेट, कांदा असो किंवा डाळीचा मुद्दा, एकाही विषयावर काय निर्णय घ्यावा, हेच भाजप सरकारच्या मंत्र्यांना कळेना, अशी अवस्था आहे” अशी टीका अशोक चव्हाणांनी केली आहे.

आडतीच्या निर्णयावरुन अशोक चव्हाणांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. आडत बंदीच्या निर्णयाआधी कांद्याला पर्यायी व्यवस्था द्यायला हवी होती, असे अशोक चव्हाण म्हणाले.
=======================================

सलग चौथ्या दिवशी डी.वाय पाटील संस्थांवरची छापेमारी सुरुच

सलग चौथ्या दिवशी डी.वाय पाटील संस्थांवरची छापेमारी सुरुच
पुणे : पिंपरीतील साहित्य संमेलन असो की पिंपरी पालिकेकडे असलेली मोठी थकबाकी, प्रवेशासाठी देणग्या यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवरून सतत वादात राहणाऱ्या डी. वाय. पाटील संस्थेचा ‘कारभार’ या छाप्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

सलग चौथ्या दिवशी डी वाय पाटील शिक्षण संस्थेच्या साम्राज्यावर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. नवी मुंबई, कोल्हापूर, पिंपरीतल्या संस्थेच्या कार्यालयात चार दिवसांपासून सुरु असलेल्या छापेमारीमुळे आयकर विभागाच्या हाती काय घबाड सापडलंय. याबद्दल प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

एवढंच नाही तर शिक्षणसंस्थेचे सर्वेसर्वा पी. डी. पाटील यांच्या कोरेगाव पार्कमधील आलिशान घराचीही आयकर विभागानं झडती घेतली. फक्त संस्थाचालक नाही तर संस्थेचे खजिनदार, रजिस्टर , मुख्याध्यापकांच्या घरांची झाडाझडती घेतल्याची माहिती समोर येते आहे. वेगवेगळ्या संस्थामधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. यामध्ये कॉलेजमधून महत्वाची कागदपत्रं आणि इतर गोष्टी बाहेर नेताना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.

=======================================

‘पीपली लाईव्ह’चा सहाय्यक दिग्दर्शक बलात्कार प्रकरणी दोषी

‘पीपली लाईव्ह’चा सहाय्यक दिग्दर्शक बलात्कार प्रकरणी दोषी
नवी दिल्ली : पीपली लाईव्ह सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक महमूद फारुकीला साकेत कोर्टाने अमेरिकन महिलेवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. येत्या 2 ऑगस्ट रोजी दिल्लीतील साकेत कोर्ट महमूग फारुकीला शिक्षा सुनावणार आहे.

जून 2015 मध्ये 35 वर्षीय अमेरिकन महिलेने फारुकीविरोधात न्यू फ्रेण्ड्स कॉलनी पोलीस ठाण्यात बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली होती. दिल्लीतील सुखदेव विहारमध्ये बलात्कार केल्याचा अमेरिकन महिलेचा फारुकीवर आरोप होता.

पीपली लाईव्ह सिनेमाची मुख्य दिग्दर्शक अनुषा रिझवी या महमूद यांच्या पत्नी आहेत. महमूद पीपली लाईव्ह सिनेमाचे सहाय्यक दिग्दर्शक होते.

=======================================

सुनेकडून वृद्ध सासु-सासऱ्यांची धुलाई, नवऱ्यालाही झोडपलं

सुनेकडून वृद्ध सासु-सासऱ्यांची धुलाई, नवऱ्यालाही झोडपलं
गुडगाव(हरियाणा): गुडगावमधील सोहना भागात एका सुनेची दबंगगिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सुनेने सासु सासऱ्यांच्या घरात जबरदस्ती घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. मध्यस्थी करणाऱ्या नवऱ्यालाही या महिलेने झोडपलं. महिलेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गुडगावमधील हा प्रकार 23 जुलै रोजी घडला. महिलेने सासऱ्याच्या घरात जबरदस्ती प्रवेश केला आणि मारपीट सुरु केली. पीडित वृद्ध दांपत्याने पोलिसांवर आरोप केले आहेत. पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेलो असता टाळाटाळ केली, असा आरोप वृद्ध दांपत्याने केला आहे.

का केली मारहाण?
आरोपी महिलेचा विवाह 18 वर्षांपूर्वी झाला. मात्र तिला 2012 पर्यंत कसलीही अपत्यप्राप्ती झाली नाही. त्यामुले महिलेने सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला. या खटल्याच्या सुनावणीसाठी सासरकडून कोणीही उपस्थित राहीलं नाही. त्यामुळे महिलेने संतापातून मारहाण केली.

सलग 25 ओव्हर मेडन, श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर 17 वर्षांनी विजय

सलग 25 ओव्हर मेडन, श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर 17 वर्षांनी विजय
कोलंबो: पालेकल कसोटीत श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियावर 106 धावांनी मात केली आणि ऐतिहासिक विजयासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसराच विजय ठरला.

दोन्ही टीम्समध्ये आजवर झालेल्या 27 कसोटी सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियानं 17 सामने जिंकले असून आठ लढती अनिर्णित राहिल्यात. 1999 नंतर पहिल्यांदाच श्रीलंकेनं कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे.

श्रीलंकेच्या या विजयात कुशल मेंडिस आणि रंगना हेराथचा मोठा वाटा आहे. खरं तर श्रीलंकेचा पहिला डाव 117 धावांवर आटोपला होता. त्यानंतर हेराथनं चार आणि संदाकननं चार विकेट्स काढून ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 203 असं रोखलं होतं. मग दुसऱ्या डावात कुशल मेंडिसच्या झुंजार 176 धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेनं 353 धावांची मजल मारून, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 268 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण कांगारूंना 161 धावांचीच मजल मारता आली.

=======================================

खडसेंच्या चौकशीसाठी ऑफिस सज्ज 

खडसेंच्या चौकशीसाठी ऑफिस सज्ज !
नागपूर भोसरी जमीन खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रत्यक्ष चौकशीला अखेर सुरुवात झाली आहे. निवृत्त न्यायाधीश डी एस झोटिंग यांच्या नेतृत्त्वातील समिती खडसेंची चौकशी करत आहे. महत्त्वाचं म्हणजे खडसेंना चौकशीसाठी नागपुरात जावं लागणार आहे.

कारण, माजी न्यायमूर्ती झोटिंग हे स्वत: नागपूरचे आहेत. त्यामुळे खडसेंना चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात यावं लागेल.

खडसेंच्या चौकशीसाठी झोटिंग समितीला राज्य सरकारने रवी भवनातील एक कॉटेज कार्यालयासाठी दिलं आहे. इथंच खडसेंची चौकशी होईल.  यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

=======================================

गुजरातमध्ये छोट्या वाहनांना टोलमुक्ती, महाराष्ट्रात कधी

गुजरातमध्ये छोट्या वाहनांना टोलमुक्ती, महाराष्ट्रात कधी?
गांधीनगरगुजरातमध्ये छोट्या खासगी वाहनांना टोलमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल सरकरानं केली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

शेजारच्या गुजरातने छोट्या खासगी वाहनांना टोलमुक्ती दिली असताना, महाराष्ट्रात हा निर्णय कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र टोलमुक्त करु, अशी घोषणा केली होती. मात्र फडणवीस सरकार सत्तेत येऊन दोन वर्षे झाली, मात्र सरसकट टोलमुक्ती झालेली नाही.

नाही म्हणायला देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील 12 टोलनाके कायमचे बंद आणि 53 टोलनाक्यांवरुन छोट्या वाहनांना सूट दिली. मात्र सरसकट टोलसूट मिळालेली नाही.

=======================================

मुलींची छेड काढणाऱ्या तिघांना 3 वर्षे सक्तमजुरी, उमरगा कोर्टाचा निकाल

मुलींची छेड काढणाऱ्या तिघांना 3 वर्षे सक्तमजुरी, उमरगा कोर्टाचा निकाल
उमरगा मुलींची छेड काढणाऱ्याला तीन तरुणांना तीन वर्षे सक्तमजुरी आणि 42 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. उस्मानाबादमधील उमरगा कोर्टाने हा निकाल दिला.

गेल्या वर्षी 20 मार्च 2015 ला उमरगा तालुक्यातील मुळज जिल्हा परिषद शाळेतल्या दहावी इयत्तेतील मुलींची आरोपींनी छेड काढली होती. एकूण सहा आरोपींनी 24 मुलींची छेडछाड काढली होती. त्या वेळी तीन मुलांनी अटकाव केला होता.

त्यानंतर शिक्षकांनी या टवाळखोरांना हाकलले होते आणि पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, याचा राग मनात ठेवून टवाळखोरांनी मुलींचा पाठलाग करुन त्यांना रिक्षातून उतरवून मारझोड केली होती. या प्रकरणाचा आज उमरगा कोर्टात निकाल लागला.

एकूण सहा आरोपींपैकी तीन अल्पवयीन असून, त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे आणि तिघांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

=======================================

आठवलेंचा एकच प्रश्न, मायावती बॅकफूटवर

आठवलेंचा एकच प्रश्न, मायावती बॅकफूटवर
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामध्ये आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे.

आठवलेंनी थेट बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्यावरच हल्ला चढवला आहे. “मायावती या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करतात, मात्र त्यांची तत्वं, आदर्श पाळत नाही”, असं निशाणा आठवलेंनी साधला. ‘इंडियन एक्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत आठवलेंनी मायावतींवर हल्लाबोल केला.

मायावतींनी अद्याप बौद्ध धर्म का स्वीकारला नाही?
रामदास आठवलेंनी मायावतींना अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला आहे. मायावतींनी अद्याप बौद्ध धर्म का स्वीकारला नाही? असं विचारत, आठवलेंनी मायावतींना बॅकफूटवर ढकललं आहे. इतकंच नाही तर मायावती हिंदू आहेत, त्यांना दलितांशी घेणं-देणं नाही, असा आरोप आठवलेंनी केला.

दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारायला हवा, असा सल्लाही आठवलेंनी दिला आहे.

=======================================

BSNL चा धमाका, तब्बल 2700 जागांसाठी भरती

BSNL चा धमाका, तब्बल 2700 जागांसाठी भरती !
मुंबई : सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या तरुणांना आनंदाची बातमी आहे. कारण भारत संचारर निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलमध्ये मेगाभरती होणार आहे. BSNL मध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 2700 जागा भरण्यात येणार आहेत. ज्युनिअर इंजिनिअर पदाच्या या जागा आहेत. हंगामी आणि कायमस्वरुपी अशी ही पदं आहेत.

पात्र उमेदवार 10 ऑगस्ट 2016 पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात. http://www.externalexam.bsnl.co.in/ या लिंकवर अर्ज करु शकता. 25/09/2016 रोजी ऑनलाईन चाचणीद्वारे निवड केली जाईल.

वयोमर्यादा –

*इच्छुक उमेदावराचं वय 18 ते 30 वर्षादरम्यानच असावं.
* SC/ ST & BSNL कर्मचाऱ्यांसाठी वयामध्ये 5 वर्षांपर्यंत सूट
*अन्य वर्गातील उमेदवारांसाठी त्या-त्या आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट

=======================================

भांबोरा छेडछाड : आरोपींची घरं पेटवली

भांबोरा छेडछाड : आरोपींची घरं पेटवली
अहमदनगर : कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाने हादरलेलं अहमदनगर आणखी एका छेडछाडीच्या घटनेनं आक्रमक झालं आहे.  कोपर्डीनंतर आता जवळच्याच भांबोरा गावातही शाळकरी मुलीची छेड काढल्याची घटना गुरुवारी घडली.

या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपीचं घरं उद्ध्वस्त केलं आहे. तसेच झोपड्याही पेटवून दिल्या आहेत. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.

अज्ञात जमावाने आरोपीच्या दुधोडी गावातील झोपड्या पेटवल्या आणि कच्ची घरंही उद्ध्वस्त केली आहेत.

=======================================

पॅनासॉनिकचा T44 Lite स्मार्टफोन लॉन्च, किंमत फक्त....

पॅनासॉनिकचा T44 Lite स्मार्टफोन लॉन्च, किंमत फक्त....
मुंबई : प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी पॅनासॉनिकने T44 Lite हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. भारतीय बाजारपेठ विचारात घेऊन हा स्मार्टफोन लॉन्च केल्याचं कंपनीने सांगितलं आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त 3199 रुपये आहे.

पॅनासॉनिकचा T44 Lite स्मार्टफोन 1 ऑगस्टपासून स्नॅपडीलवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन रोज गोल्डशँपेन गोल्ड आणि इलेक्ट्रिक ब्लू या तीन आकर्षक रंगात उपलब्ध असेल.

या फोनमध्ये 4 इंच डिस्प्लेसोबत 1.3 गीगाहर्त्झ क्वॉडकोअर प्रोसेसर असेल. 512 MB रॅम, 8 GB इंटरनल मेमरीसह हा फोन अँड्रॉईड मार्शमेलो 6.0 वर काम करेल. 2 मेगापिक्सल रिअर कॅमेरासोबत फ्रंट व्हीजीए कॅमेराही या फोनमध्ये देण्यात आला आहे. 2400mAh क्षमतेची बॅटरी असलेला हा फोन 3G एनेबल्ड असेल.

=======================================

सतीश माथुर राज्याचे नवे पोलिस महासंचालक

सतीश माथुर राज्याचे नवे पोलिस महासंचालक
मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी सतीश माथुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती केली.

सध्याचे राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. त्यापार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.

1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सतीश माथुर सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत. यंदाच्या एप्रिल महिन्यात त्यांची नियुक्ती झाली होती. याआधी त्यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची धुरा सांभाळली होती.

महत्त्वाची बाब म्हणजे मागील वर्षी डिसेंबरमध्ये राज्याच्या महासंचालकपदी वर्णी लागण्याआधी  प्रवीण दीक्षितसुद्धा लाचलुपत प्रतिबंधक विभागाचेच महासंचालक होते.

=======================================

कल्याणमध्ये पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची ऑन ड्युटी दारु पार्टी

कल्याणमध्ये पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची ऑन ड्युटी दारु पार्टी
कल्याण :  कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कार्यालयातील टेबलवर ऑन ड्युटी दारु पीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कल्याणच्या गणेशवाडी इमारतीचे रहिवाशी पाणी येत नाही म्हणून तक्रार करण्यासाठी कार्यालयात गेले होते, त्यावेळी हा प्रकार दिसून आला.

संतप्त रहिवाशांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी नागरिकांना धक्काबुक्की करुन कार्यालयातून पळ काढला. एका अधिकाऱ्याने तर चारचाकी रहिवाशाच्या अंगावर घातली, मात्र सुदैवाने तो बचावला.

मात्र या घटनेमुळे कल्याण डोंबिवली महापालिकेतला भोंगळ कारभार समोर आला आहे.

=======================================

हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीने उत्तर प्रदेशातील ग्रामस्थांचा जल्लोष

हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीने उत्तर प्रदेशातील ग्रामस्थांचा जल्लोष
लखनऊ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी निश्चित होताच, उत्तर प्रदेशमधील एक गाव जबरौलीमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांना रिपब्लिकनच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सामना करावा लागणार आहे. मात्र, हिलरी क्लिंटन यांच्या विजयाने उत्तर प्रदेशमधील या गावांत जल्लोषाचे वातावरण का आहे? हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या वतीने हिलरींना उमेदवारी निश्चित होताच, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून मात्र २० किलोमीटर अंतरावर असलेल्या जबरौलीमध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. हिलरी क्लिंटन आणि तिचे पती बिल क्लिंटन यांच्या फोटोंना पेढा भरवून संपूर्ण गावात मिठाई वाटप करण्यात आले.

पण या घटनेने जबरौल गावाचे क्लिंटन यांच्याशी काय संबंध आहेत, हा प्रश्न अनेकांना पडला. तर वास्तविक याचे मुळ १७ जुलै २०१४ मध्ये आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारत दौऱ्यावर आले असता, त्यांनी उत्तर प्रदेशमधील जबरौल या छोट्याशा गावाला भेट दिली. या भेटीत त्यांनी जवळपास अडीच तास ग्रामस्थांशी मुक्त संवाद साधला.
heelri2
विशेष म्हणजे, क्लिंटन यांनी यावेळी त्यांच्या फाऊंडेशनच्या आरोग्य मोहीमे अंतर्गत जबरौल गाव दत्तक घेतले. त्यानंतर या गावात आरोग्य मोहीम प्रभावीपणे राबवली गेल्याने हे गाव निरोगी बनले. पण, इतर समस्या तशाच आहेत. पण आता हिलरी क्लिंटन यांना उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांच्या विजयाने या गावाचे चित्र पालटेल ही आशा जबरौलच्या ग्रामस्थांना आहे.

जबरौल हे गाव उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर असूनही या गावातील अद्याप मुलभूत समस्यांचे निराकरण झाले नाही. या गावाला बिल क्लिंटन भेट देणार म्हणून, या गावात स्वच्छतेसोबतच तात्पूर्त्या स्वरुपातील सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र क्लिंटन यांच्या मायदेशी परतण्यानंतर गावांतील समस्यांनी पुन्हा डोके वर काढले. पण आता हिलरी क्लिंटन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरल्याने जबरौलमधील ग्रामस्थ विकासाची स्वप्ने पाहात आहेत.

=======================================

डिलीट होता होईना व्हॉट्स अॅपचे मेसेज


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. 30 - व्हॉट्स अॅपवरचे मेसेज युजर्सनी डिलिट केले तरी ते यंत्रणेमधून संपूर्णपणे काढून टाकले जात नसल्याचा दावा अॅपलचे सेक्युरिटी तज्ज्ञ जोनाथन झिरास्की यांनी केला आहे. यामुळे संपूर्ण पणे सुरक्षेचा दावा करणाऱ्या व्हॉट्स अॅपच्या माहिती सुरक्षित असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
    Whats App Chat जर युजरने डिलीट केलं किंवा Clear All Chat केलं तरी ही संभाषणं मागे उरत असल्याचे नुकत्याच केलेल्या चाचणीत आढळल्याचे झिरास्की यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याचा अर्थ युजर्स त्यांना नको असलेले चॅट डिलिट करत असला तरी ते संपूर्णपणे नष्ट झाले असे मानता येणार नाही आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो.
    जर, तुम्हाला व्हॉट्स अॅपवरचे चॅट संपूर्णपणे डिलिट करायचे असतील तर फोनमधून व्हॉट्स अॅपच काढून टाकणे हा एकमेव पर्याय असल्याचंही झिरास्की यांनी केलं आहे.
    "व्हॉट्स अॅपच्या सुरक्षिततेची चाचणी करण्यासाठी मी काही chat केले. मग, काही संभाषणं achive केली.. काही संभाषणं क्लिअर केली आणि काही संभाषणं डिलिट केली. त्यानंतर Clear All Chats चा वापर केला." झिरास्की यांनी म्हटलंय. त्यांनी पुढे असंही सांगितलं की, इतकं सगळं केल्यावरही डेटाबेसमध्ये डिलिट केलेली संभाषणं आढळून आली.
    अर्थात, व्हॉट्स अॅप हे जाणुनबुजून करत नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. व्हॉट्स अॅप रेकॉर्ड डिलिट करतं, आणि डेटाबेसमध्ये जो डेटा राहतो तो कंपनी मुद्दामहून ठेवते असं नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
    अर्थात, ही समस्या iOS अॅपपुरती मर्यादित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. झिरास्की सांगतात, यामुळे लगेच पॅनिक होऊ नका, मात्र व्हॉट्स अॅपचा मेसेज डिलिट केला म्हणजे तो मोबाईल मधून कायमचा गेला या भ्रमात राहू नका इतकंच.
=======================================

श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर 17 वर्षांनी ऐतिहासिक विजय


  • ऑनलाइन लोकमत - 
    कोलंबो, दि. 30 - पालेकल कसोटीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर 106 धावांनी मात करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा श्रीलंकेचा मिळवलेला हा  दुसराच विजय आहे. तब्ब्ल 17 वर्षांनी श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. 
    याअगोदर 1999 मध्ये श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरोधात विजय मिळवला होता. दुसरा विजय मिळवण्यासाठी त्यांना तब्बल 17 वर्ष वाट पाहावी लागली आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपर्तंय 27 कसोटी सामने झाले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियानं 17 सामने जिंकले असून आठ लढती अनिर्णित राहिल्यात. 
=======================================

मुंबई खड्डेमुक्त करा, न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं


  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. 30 - पावसाळ्यात खड्ड्यांमुळे मुंबईकर रखडत प्रवास करत असताना न्यायालयानेही खड्ड्यांवरुन राज्य सरकारला खडसावले आहे.  पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग 19 ऑगस्टपर्यत खड्डेमुक्त करा, असे आदेशच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. दोन्ही महामार्गावर 137 खड्डे असल्याची माहिती यावेळी राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे.
    राज्य सरकारने दोन्ही महामार्गांवरील 3247 खड्डे बुजवल्याचा दावा केला न्यायालयात केला होता. मात्र न्यायालयाने पाहणी करण्याचे आदेश दिल्यानंतर सरकारी वकिलांनी महामार्गांवर 137 खड्डे असल्याची माहिती न्यायालयात दिली होती. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खड्ड्यांच्या प्रश्नावरुन खडसावलं असून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग 19 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त झाले पाहिजेत, असं बजावलं आहे.
=======================================

No comments: