Saturday, 16 July 2016

नमस्कार लाईव्ह १६-०७-२०१६ चे बातमीपत्र

*[अंतरराष्ट्रीय]*
१- तुर्कस्थानातील सत्तापालटाचा प्रयत्न फसला, बंडखोर शरण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
२- एमआयएम अध्यक्ष ओवेसींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा 
३- केजरीवाल, ममता, नितीश विरुद्ध मोदी, दिल्लीत आज सगळे एकत्र !
४- वाहनचालकांना मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेल स्वस्त
५- स्मृती इराणी यांना मोदी यांचा आणखी एक हादरा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
६- नवी मुंबई; आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षीय एकवटले 
७- अडते पुन्हा नडले, व्यापाऱ्यांचं दबावतंत्र, 117 जणांकडून परवाने परत
८- ठाणे पोलिस दलातील पीएसआय 3 महिन्यांपासून बेपत्ता
९- Idea चे नेटपॅक स्वस्त, नवे दर मध्यरात्रीपासून लागू 
१०- ...तर अशा धार्मिक स्थळांवर कारवाई 
११- मराठी भावचिन्हे आता युनिकोडमध्ये! 
१२- मुंबई विद्यापीठ उभारणार १ हजार कोटी रुपये 
१३- मुंबईत परतताच पंकजांची नाराजी दूर 
१४- उपनगरीय रेल्वे स्थानकांवर वायफाय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१५- गोल्डमॅन दत्ता फुगे हत्याप्रकरणी आणखी चौघे अटकेत 
१६- सातारा; कैची- वस्तराने डोक्यावर हुबेहुबे आर्ची साकारणारा पठ्ठ्या 
१७- ठाण्यात भात लावणीला एकनाथ शिंदे 6 तास लेट, महिलांचा संताप
१८- अलाहाबाद; आधी प्रेयसीच्या लग्नात थिरकला, नंतर नवऱ्या मुलावर गोळीबार!
१९- वरिष्ठांकडून अपमानास्पद वागणूक, कॉन्स्टेबलची आत्महत्या 
२०- औरंगाबादच्या युवकाची कंपनी ‘ई-बे’ने केली खरेदी! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२१- माझ्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो- सलमान खान
२२- पीसीबीकडून खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ बसेसची खरेदी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *

=================================

गोल्डमॅन दत्ता फुगे हत्याप्रकरणी आणखी चौघे अटकेत

गोल्डमॅन दत्ता फुगे हत्याप्रकरणी आणखी चौघे अटकेत
पुणे: पिंपरी चिंचवडचा गोल्डमॅन दत्ता फुगे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. याआधी पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे.

दत्तात्रय फुगेंची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. दिघीमध्ये गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी येताना हा प्रकार घडला.

चिटफंड व्यवसायाच्या घोटाळ्यातून फुगेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. अतुल मोहिते, बाळा वाळके, शैलेष वाळके आणि त्यांच्या सात ते आठ साथीदारांनी त्यांची हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यापैकी पाच जणांना कालच अटक करण्यात आली होती. त्यामुळे अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे.
=================================

एमआयएम अध्यक्ष ओवेसींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

एमआयएम अध्यक्ष ओवेसींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा
हैदराबाद एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएसने हैदराबादेतून आससीसशी संबंधित तरुणांना अटक केली होती. या तरुणांना कायदेशीर मदत पुरवण्याची घोषणा ओवेसींनी केली होती.  यावरुन दाखल करण्यात आलेल्या एका खासगी तक्रारीवरुन ओवेसींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायिक मदत देण्याचं मान्य करुन ओवेसी आयसीसला अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचं तक्रारकर्त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे हैद्राबाद पोलिस याप्रकरणी काय कारवाई करतात हे पहावं लागेल.

तक्रारकर्त्याने आधी कोर्टात आपलं म्हणणं मांडलं. त्यानंतर कोर्टाने सरुरनगर पोलिसांना गुन्हा दाखल करुन घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी ओवेसींविरोधात कलम 124A अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

के करुना सागर यांनी दंडाधिकारी न्यायालयात ओवेसींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधानसंहितेनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.
=================================

आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षीय एकवटले

आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षीय एकवटले
नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेविरुद्ध सर्वपक्षीय एकत्र आले आहेत. मुंढेंनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखावी, यासाठी भाजप आमदार मंदा म्हात्रे आक्रमक झाल्या आहेत. त्यांच्यासह सर्वपक्षीयांनी येत्या सोमवारी बंदची हाक दिली आहे.

त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध राजकारणी हा वाद नवी मुंबई शहरातही कायम राहणार आहे.

नवी मुंबईत गावठाणांशेजारी उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी हातोडा चालवला. त्यांच्या याच कारवाईला भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी विरोध केला आहे.

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करु नये अशी मागणी म्हात्रे यांनी केली होती. पण मुंढे यांनी आपण गावाशेजारील घरांवर कारवाई करत असल्याचं स्पष्ट करुन कारवाई थांबवायला नकार दिला. त्यामुळे त्यांच्याविरोधात ही बंदची घोषणा करण्यात आली आहे.


=================================

तुर्कस्थानातील सत्तापालटाचा प्रयत्न फसला, बंडखोर शरण

तुर्कस्थानातील सत्तापालटाचा प्रयत्न फसला, बंडखोर शरण
अंकारा: तुर्कस्थानमध्ये लष्करानं सरकारविरोधात केलेला उठाव अवघ्या काही तासातच मोडीत काढण्यात यश आले आहे. काल रात्री तुर्कीतल्या अंकारा शहरावर लष्कराच्या एका गटानं अचानकपणे हेलिकॉप्टरद्वारे हल्ले करण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी इतर लष्करी साथीदारांच्या सहाय्यानं हे बंड मोडून काढलं आहे.

या धुमश्चक्रीत आतापर्यंत ६० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. लष्कराच्या बंडखोर गटानं अंकारा शहरातल्या काही मुख्य भागांबरोबरच संसदेवरही बॉम्बफेक केली. सध्या खबरदारी म्हणून तुर्कीत सोशल मीडियावर बंदी आणली गेलीय. तसंच अंकारामधील सर्व भारतीय देखील सुखरुप आहेत.

तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांनी लोकांना शांततेचं आवाहन केलंय. दरम्यान, लष्कराच्या या बंडामागे इस्लाम प्रचारक आणि धार्मिक गुरु गुलेन यांचा हात असल्याचा संशय़ व्यक्त केला जातो आहे.

=================================

कैची- वस्तराने डोक्यावर हुबेहुबे आर्ची साकारणारा पठ्ठ्या

कैची- वस्तराने डोक्यावर हुबेहुबे आर्ची साकारणारा पठ्ठ्या
सातारा : नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमाने महाराष्ट्राला याड लावलं. आर्ची-परशाच्या प्रेमकहाणीला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आर्ची अर्थात रिंकू राजगुरुची एक झलक पाहण्यासाठी गावोगावच्या तरुणांची अक्षरश: झुंबड उडाली. रिंकूचा असाच एक फॅन आहे ज्याने आर्चीचं डोक्यातलं प्रेम डोक्यावर उतरवलं आहे.

ओंकार कांबळे असं या फॅनचं नाव असून, त्याने चक्क केसांमध्ये आर्चीचं चित्र रेखाटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ही जादूई कला, कराडच्या संतोष काशीदने रेखाटली आहे.
satara sairat 1
ओंकार हा साताऱ्याचा रहिवाशी आहे. त्याने तब्बल 37 वेळा सैराट सिनेमा पाहिला आहे. कराडमधील ओगलेवाडीत संतोष काशीदचं सलून आहे. संतोषच्या हातात जादूई कला असल्याची ख्याती परिसरात पसरली आहे. संतोष कोणाचाही चेहरा हुबेहुब डोक्यावर रेखाटतो.
satara sairat 4
ओंकारला जेव्हा याबाबतची माहिती समजली, तेव्हा तो संतोषचा पत्ता शोधत ओगलेवाडीत पोहोचला. डोक्यात संचारलेलं आर्चीचं भूत डोक्यावर उतरवण्यासाठी तो साताऱ्यातून संतोषच्या दुकानात आला.
satara sairat 6
“मला डोक्यावर आर्ची साकारायची आहे”, ही फर्माईश त्याने संतोषला काशीदला सांगितली.
satara sairat 7
मग संतोषची कैची हळूहळू ओंकारच्या डोक्यावरुन फिरु लागली. हळूहळू डोक्यावर आर्चीचं चित्र साकारु लागलं. तब्बल अडीच तासाच्या अथक कौशल्यानंतर आर्चीचं रुप ओंकारच्या डोक्यावर साकारलं.

संतोषन यापूर्वी अनेक चित्रं शौकिनांच्या डोक्यावर रेखाटली आहेत.
satara sairat 2
संतोषची ही कला इतकी दूरवर पोहोचली आहे, की दररोज जवळपास शंभर फोन, त्याला केस कटिंगसाठी नंबर लावणारे येतात.

संतोष काशीदचा पिडीजात केशकर्तनाचा व्यवसाय आहे. वडिलांनी शिक्षणाबरोबर त्याला कैचिचं कौशल्य शिकवलं. संतोषने पारंपारिक कलेला छेद देत, त्यामध्ये नाविन्य शोधलं.

=================================

अडते पुन्हा नडले, व्यापाऱ्यांचं दबावतंत्र, 117 जणांकडून परवाने परत

अडते पुन्हा नडले, व्यापाऱ्यांचं दबावतंत्र, 117 जणांकडून परवाने परत
मुंबई/नाशिक बाजार समित्यांच्या संपाचा तिढा काही केल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही. अडत वसुलीविरोधात नाशिक एपीएमसीतल्या कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांना आपले परवाने परत केले आहेत.

चांदवडच्या 117 व्यापाऱ्यांनी दबावतंत्राचा वापर करत आपले परवाने परत गेले आहेत. तर पिंपळगावच्या बाजारसमितीचे व्यापारीही आज आपले परवाने परत करणार आहेत.

त्यामुळे आपल्या मागण्यांसमोर सरकारने झुकावं याकरता आता व्यापाऱ्यांनी संपानंतर राजीनामास्त्र उगारलेलं दिसतंय.

पाच दिवसानंतर बाजारपेठ सुरु
व्यापाऱ्यांच्या पाच दिवसांच्या संपानंतर नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा लिलावाला सुरूवात झाली. गेली काही दिवस सुन्न असलेली बाजारपेठ काल व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या वर्दळीनं गजबजून गेली होती. सरकारनं भाजीपाला आणि फळ एपीएमसीमधून नियमन मुक्त केल्यानंतर व्यापाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं. मात्र सरकारशी वाटाघाटी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी संप मागे घेतला.. संपामुळं शेतकऱ्यांचं बरच नुकसान झालं असलं तरी, यापुढे अडत द्यावी लागणार नसल्यामुळं शेतकरी समाधानी आहेत.

=================================

केजरीवाल, ममता, नितीश विरुद्ध मोदी, दिल्लीत आज सगळे एकत्र !

केजरीवाल, ममता, नितीश विरुद्ध मोदी, दिल्लीत आज सगळे एकत्र !
नवी दिल्ली :  राजधानी दिल्लीत शनिवारी हायहोल्टेज मिटिंग होत आहे. देशाचे पंतप्रधान, 17 केंद्रीय मंत्री आणि देशातल्या 31 राज्यांचे मुख्यमंत्री आज एकाच हॉलमध्ये बैठकीसाठी असतील. निमित्त आहे इंटर स्टेट कौन्सिल अर्थात आंतरराज्य परिषदेच्या बैठकीचं.

यानिमित्तानं मोदी सरकारच्या विरोधात आगपाखड करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांचे प्रश्न थेट पंतप्रधानांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यातही दिल्ली आणि केंद्र यांच्यात अधिकारावरुन सुरु असलेली भांडणं पाहता उद्या केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्यातला सामना कसा रंगणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.

विशेष म्हणजे 2006 नंतर म्हणजे तब्बल दहा वर्षांच्या गॅपनंतर ही बैठक आयोजित होतेय.

केंद्र आणि राज्यातले संबंध सुधारण्यासाठी पंछी आयोगाच्या शिफारशींवर चर्चा, आधार कार्डाचा अधिकाधिक वापर, डायरेक्ट कॅश ट्रान्सफर यासारख्या मुद्द्यांवर चर्चा हा बैठकीचा सरकारी अजेंडा आहे.
=================================

वाहनचालकांना मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेल स्वस्त

वाहनचालकांना मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेल स्वस्त
नवी दिल्ली : सर्वसामन्य वाहनचालकांना महागाईतून थोडासा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. पेट्रोल 2 रुपये 25 पैसे तर डिझेल 42 पैशांनी स्वस्त झाले आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील.


याआधी 1 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यापूर्वी 15 जून रोजी पेट्रोल प्रति लिटर 5 पैसे तर डिझेल प्रति लिटर 1.26 रुपयांनी महागलं होतं.

=================================

ठाण्यात भात लावणीला एकनाथ शिंदे 6 तास लेट, महिलांचा संताप

ठाण्यात भात लावणीला एकनाथ शिंदे 6 तास लेट, महिलांचा संताप
ठाणे : भात लावणीच्या यंत्रांचा शुभारंभ करताना ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट बांध गाठला. पण, दुपारीचा वेळ देऊन मंत्री महोदय पोहोचले थेट संध्याकाळी 6 वाजता. त्यामुळे त्यांची वाट पाहून कंटाळलेल्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत झाला.
 
महिला बचत गटांना भाडेतत्वावर अवजारं देण्याच्या उपक्रमासाठी शिंदे वडवळमध्ये येणार होते. याचवेळी त्यांना भात लावणीही करायची होती. पण, बांधावरुन शेती पाहण्याचा अनुभव असणारे मंत्रिमहोदय 1 वाजेचा वेळ देऊन पोहोचले थेट सायंकाळी 6 वाजता.
 
जनतेला गृहित धरण्याची तशी नेत्यांची जुनीच सवय आहे. त्यामुळे कार्यक्रमांना उशिरा येण्यातच अनेक जण मोठेपण समजतात. पण, अतिदिरंगाई लोकांचाही मूड बदलू शकते याचाही विसर नेत्यांना पडू नये एवढेच.

=================================

माझ्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो- सलमान खान

माझ्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो- सलमान खान
नवी दिल्लीः माध्यमांना दोन आठवड्यांसाठी मसाला मिळेल, असं नेहमी काही तरी बोलायला पाहिजे का, मी काही नाही बोललो तर बोरिंग वाटतो आणि बोललो तर वाद उभा होतो, असा सवाल करत बॉलिवूड स्टार सलमान खानने आपल्या बलात्कार पीडितेच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.


माझ्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो. मी एक बोलतो आणि त्याला वेगळ्याच भाषेत प्रसिद्ध केलं जातं, अशा शब्दात सलमानने माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सलमानने पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होत, त्यावेळी तो बोलत होता.


सुलतान सिनेमाच्या शुटींगवेळी बलात्कार पीडितेसारखं वाटत होतं. शुटींग करुन जेव्हा रिंगच्या बाहेर जायचो तेव्हा उठता देखील येत नव्हतं, असं विधान सलमानने केलं होतं. त्यानंतर सलमानवर सगळीकडून जोरदार टीका झाली होती. महिला आयोगाने देखील सलमानला नोटीस बजावली होती.

=================================

आधी प्रेयसीच्या लग्नात थिरकला, नंतर नवऱ्या मुलावर गोळीबार!

आधी प्रेयसीच्या लग्नात थिरकला, नंतर नवऱ्या मुलावर गोळीबार!
अलाहाबाद: अलाहाबादमध्ये एका माथेफिरु प्रियकरानं प्रेयसीच्या लग्नात जाऊन भर मंडपात तिच्या नवऱ्यावरच गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रियकरानं सगळ्यात आधी लग्नामध्ये शाहरुख खानच्या ‘डर’ सिनेमातील ‘तू है मेरी किरन’ या गाण्यावर डान्सही केला आणि जेव्हा वधू वरमाला गळ्यात घालणार त्याचवेळी त्यानं तिच्या नवऱ्यावर गोळीबार केला.

अलाहाबादमधील फुलपूर इथं ही घटना घडली आहे. गोळीबार केल्यानंतरही प्रियकर मंडपात गाणं गात राहिला. त्यानंतर वऱ्हाड्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. तर दुसरीकडे नवरदेवही गंभीर जखमी असून त्याची हालत नाजूक आहे. आरोपी का नवरीचा जवळचा नातेवाईक असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान त्याच्यावर देखील उपचार सुरु आहेत.

राम कैलाश भारती यांची मुलगी पूनम हीचं काल रात्री लग्न होतं. रात्री साडे अकराच्या दरम्यान नवरा मुलगा वरात घेऊन मंडपात पोहचला. तेव्हा आरोपी लल्लन हा देखील तिथं उपस्थित होता. नातेवाईक असल्यानं त्याला देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. लल्लननं डीजेवर जादू तेरी नजर गाणं वाजवण्यास सांगितलं आणि वऱ्हाडी मंडळींसोबत जोरदार डान्सही केला.

=================================

ठाणे पोलिस दलातील पीएसआय 3 महिन्यांपासून बेपत्ता

ठाणे पोलिस दलातील पीएसआय 3 महिन्यांपासून बेपत्ता
मुंबई : ठाणे पोलिस दलातील एक महिला पोलिस अधिकारी गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे कळंबोलीतून बेपत्ता झाल्या आहेत.
 
एप्रिल महिन्यात कार्यालयात गेलेल्या 37 वर्षीय बिद्रे पुन्हा घरी परत आलेल्या नाहीत. 15 एप्रिल 2016 पासून कामाच्या ठिकाणाहून कोणास काहीएक न सांगता त्या निघून गेल्याचा दावा हरवल्याच्या तक्रारीत करण्यात आला आहे.
 
बिद्रे कुटुंबियांनी गुरुवारी म्हणजे तब्बल तीन महिन्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली, त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद झालं आहे.

=================================

पीसीबीकडून खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ बसेसची खरेदी

पीसीबीकडून खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ बसेसची खरेदी
लाहोरः पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) देशात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ बसेसची खरेदी केली आहे. आंतरराष्ट्रीय संघांना पाकिस्तानमध्ये सुरक्षेची हमी देण्यासाठी पाकिस्तानने हे पाऊल उचललं आहे.


श्रीलंका संघाच्या बसवर 2009 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये कोणत्याही संघाने मालिका खेळलेली नाही. त्यामुळे संघांना सुरक्षेची हमी देणं पीसीबी समोरचं मोठं आव्हान बनलं आहे.

पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनर्जन्मासाठी प्रयत्न
पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात करण्यासाठी या बसेसची खरेदी करण्यात आली आहे, असं ईएसपीएनशी बोलताना पीसीबीच्या एका प्रवक्त्याने सांगितलं.


पाकिस्तान दौरा करण्यासाठी कोणताही संघ अगोदर सुरक्षेची विचारणा करतो. त्यामुळे या बसेस सुरक्षेच्या कारणासाठी समोरच्या संघाला सुरक्षेचा विश्वास देण्यास मदत करतील, असं प्रवक्त्याने सांगितलं.

=================================

Idea चे नेटपॅक स्वस्त, नवे दर मध्यरात्रीपासून लागू

Idea चे नेटपॅक स्वस्त, नवे दर मध्यरात्रीपासून लागू
नवी दिल्लीः आयडीयाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आयडीयाने 2G, 3G, आणि  4G इंटरनेट पॅकच्या दरात कपात केली आहे. नवीन दर महाराष्ट्रासह देशभरात आज मध्यरात्रीपासून लागू होतील.


आयडीयाच्या 1 जीबी पेक्षा कमी नेटपॅकमध्ये 45 टक्क्यांपर्यंत जास्त डाटा मिळणार आहे, असं आयडीयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे सांगण्यात आलं आहे. आयडीया सध्या 225 रुपयांच्या दरात ग्राहकांसाठी नेटपॅक देते.

असे आहेत नवीन दर
प्रत्येक वापरकर्त्यांला इंटरनेटचा लाभ घेता यावा, यासाठी ही दर कपात आहे. या दर कपातीमुळे ग्राहक संख्या वाढण्यास मदत होईल, अशी माहिती आयडीयाचे मुख्य मार्केटींग अधिकारी शशि शंकर यांनी दिली.


यापूर्वी 19 रुपयांत 75 एमबी 2G डाटा तीन दिवसांसाठी मिळत होता. नवीन दरांनुसार 110 एमबी डाटा मिळणार आहे. 3G आणि 4G नेटपॅक्सच्या दरातही अशीच कपात करण्यात आली आहे, असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं.
=================================

वरिष्ठांकडून अपमानास्पद वागणूक, कॉन्स्टेबलची आत्महत्या

वरिष्ठांकडून अपमानास्पद वागणूक, कॉन्स्टेबलची आत्महत्या
उस्मानाबादः वरिष्ठांनी कामावर रुजू करण्याऐवजी अपमानास्पद वागणूक देण्यात आली. या नैराश्यातून एका पोलीस कॉन्स्टेबलने विषप्राशन करून आत्महत्त्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उस्मानाबादच्या पोलीस मुख्यालयातील ही घटना आहे. धक्कादायक म्हणजे विषप्राशन करुन जमिनीवर कोसळल्यानंतर रात्रभर त्यांना कोणीही उचलण्याची तसदी घेतली नाही.


पहाटेच्या सुमारास त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं. चंद्रप्रकाश गंगाराम कलवले (वय 45) अस या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. ते उस्मानाबादच्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होते.


चार दिवसांपुर्वी त्यांची पंढरपूर यात्रा बंदोबस्तासाठी तात्पुरती नेमणूक करण्यात आली होती, परंतु प्रकृती खराब असल्याचे कारण सांगून ते पंढरपूरला गेले नाहीत. त्यानंतर त्यांच्या जागेवर दुसरा पोलीस कॉन्स्टेबलही पाठवण्यात आला होता.
=================================

...तर अशा धार्मिक स्थळांवर कारवाई


  • मुंबई : संबंधित प्रशासनाकडून परवानगी न घेता अनधिकृतपणे ध्वनिक्षेपक लावणाऱ्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिले. तसेच नियमांच्या अधीन राहून ‘शांतता क्षेत्रा’त ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, असेही राज्य सरकारने उच्च न्यायालयाला ठामपणे सांगितले.
    सणांच्या काळात ध्वनिप्रदूषण नियमांचे सररास उल्लंघन करण्यात येते. राज्य सरकार व स्थानिक संस्थांना ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर अंतिम सुनावणी सुरू आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारला ध्वनिप्रदूषण नियम २०००, नियम ५ व ६ अंतर्गत ‘शांतता क्षेत्रा’त ध्वनिक्षेपक वापरण्याची मुभा देण्याचा अधिकार आहे की नाही, असा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी नियमानुसार, राज्य सरकारला ‘शांतता क्षेत्रा’त ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी देण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद केला. तर राज्य सरकारने हा अधिकार आपल्याला आहे, असे ठामपणे खंडपीठाला सांगितले.
=================================

मराठी भावचिन्हे आता युनिकोडमध्ये!


  • मुंबई : महाराष्ट्र शासनाने ‘युनिकोड कन्सॉर्शियम’ या लिपिचिन्हांचे प्रमाणीकरण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्यत्व प्राप्त केल्यामुळे सांगीतिक लिपी, वडापाव, छत्रपती शिवरायांची राजमुद्रा अशा भावचिन्हांना प्रमाणित संकेतांक मिळविण्याचा मार्ग खुला झाला आहे. मराठीच्या संगणकीय प्रमाणीकरणासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, अशी माहिती
    मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
    ‘युनिकोड’ सदस्यत्वामुळे मराठी भाषा व संस्कृतीशी जोडलेल्या लिपिचिन्हांना आणि भावचिन्हांना (इमोजी) आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित स्थान प्राप्त होणार असून, युनिकोड संदर्भातील भविष्यवेधी जागतिक चर्चेमध्ये शासनाच्या मताला मूल्य प्राप्त होईल. शासन पुरस्कृत राज्य मराठी विकास संस्थेला हे सदस्यत्व प्राप्त झाले असल्याने मराठी भाषा आणि देवनागरी लिपीबद्दलच्या तंत्रज्ञानात्मक गरजा ‘युनिकोड’च्या सदस्य कंपन्यांना कळविणे शासनाला सहज शक्य होणार आहे.
    शिवाय, नामांकित सदस्य कंपन्या नव्या सॉफ्टवेअर्सची निर्मिती करताना शासनाने दिलेल्या गरजांचा संदर्भ लक्षात घेतील. युनिकोडचे सदस्यत्व प्राप्त करणारे महाराष्ट्र हे भारतातील दुसरे राज्य आहे. मराठी भाषा व संस्कृतीशी जोडलेल्या विविध चिन्हांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित मान्यता मिळविण्यासाठी मराठी जनतेनेही या प्रक्रियेत सहभाग नोंदवावा आणि निवडक लिपिचिन्हे व भावचिन्हे शासनाकडे पाठवावीत, असे आवाहन तावडे यांनी केले आहे
=================================

औरंगाबादच्या युवकाची कंपनी ‘ई-बे’ने केली खरेदी!


  • औरंगाबाद : मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन वयाच्या १८व्या वर्षी औरंगाबादच्या मुक्तक जोशी या तरुणाने स्थापन केलेली इव्हेन्ट तिकीट विक्री करणारी ‘टिकेट युटिल्स’ ही कंपनी ई-कॉमर्समधील अग्रगण्य असलेल्या अमेरिकेतील ‘ई बे’ कंपनीने खरेदी केली आहे.
    मुक्तक जोशी याचे औरंगाबादेतील सरस्वती भुवन प्रशालेत मराठी
    माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण झाले
    आहे. देवगिरी महाविद्यालयातून बारावी केल्यानंतर त्याने एमआयटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. या काळातच त्याने
    सॉफ्टवेअर कंपन्यांचे ‘फ्री लान्सिंग काम करण्यास सुरुवात केली. २००५मध्ये बी. ई. कॉम्प्युटर सायन्स उत्तीर्ण झाला. २००७मध्ये ‘टेक्नोप्रोटेन’ कंपनी स्थापन केली. त्यानंतर २०१२मध्ये ‘टिकेट युटिल्स’ची सुरुवात केली.
    मुक्तकचे बंधू सत्यक जोशी आणि पत्नी श्रुती हे त्यांना कंपनीच्या कामात मदत करतात. त्याचे वडील शोधन जोशी हे शहरातील प्रसिद्ध बिल्डर आहेत. अमेरिकेतील लास वेगास शहरात शुक्रवारी मुक्तकच्या ‘टिकेट युटिल्स’चा ‘ई-बे’शी करार झाला. मात्र, हा करार किती किमतीला झाला याची माहिती दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केलेली नाही.
=================================

स्मृती इराणी यांना मोदी यांचा आणखी एक हादरा


  • नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्मृती इराणी यांना संसदीय कामकाज समितीतून वगळून पुन्हा धक्का दिला आहे. त्यासोबतच विदेशमंत्री सुषमा स्वराज यांचा पंतप्रधानांनी महत्त्वाच्या आर्थिक व्यवहार समितीतही समावेश केला आहे.
    याआधी राजनाथसिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि अन्य दिग्गजांचा समावेश असलेल्या या महत्त्वाच्या समितीत स्मृती इराणी यांचा समावेश करण्यात आला. तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या; मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा आणि या समितीतील समावेशाचा काहीही संबंध नव्हता. विविध मुद्द्यांवर तडाखेबाज उत्तर देण्यासाठी पक्षानेही त्यांना अनेकदा पुढे केले होते.
    परंतु काळ बदलला आणि त्यांचे भवितव्यही बदलल्याचे दिसते. ५ जुलैच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा फेरबदल करताना स्मृती इराणी यांच्याकडील वजनदार मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेत जबर धक्का देण्यात आला. आता पुन्हा धक्का देत पंतप्रधानांनी त्यांना संसदीय कामकाज समितीमधून वगळले आहे. सुषमा स्वराज या राजकीय व्यवहार आणि सुरक्षा या समितीच्या सदस्य असतानाही त्यांचा आर्थिक व्यवहार समितीत समावेश करण्यात आला आहे. हा फेरबदल पाहता सुषमा स्वराज पुन्हा सक्रिय राजकारणात दमदारपणे उतरल्या आहेत, असे दिसते.
=================================

मुंबई विद्यापीठ उभारणार १ हजार कोटी रुपये


  • चेतन ननावरे/ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 15 - मुंबई विद्यापीठाच्या १६०व्या वर्धापन दिनानिमित्त एक हजार कोटी रुपये उभे करण्याची घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी केली आहे. या पैशांतून विद्यार्थ्यांसाठी १ हजार ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह, शिक्षकांसाठी २५० घरे अशा विविध योजना राबवणार असल्याचेही देशमुख यांनी ह्यलोकमतह्णला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
    देशमुख म्हणाले की, मुंबई विद्यापीठात केवळ राज्य आणि देशातूनच नव्हे, तर परदेशातील विद्यार्थिही शिक्षणासाठी येतात. मात्र त्यांच्यासाठी आवश्यक वसतीगृह विद्यापीठाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इच्छा असतानाही विद्यापीठात प्रवेश निश्चित करता येत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी भाड्याने जागा घेऊन राहणे, विद्यार्थ्यांसाठी कठीण असते. त्यामुळे त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी सुमारे १ हजार ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह उभारण्याचा मानस आहे. त्यामुळे चांगले विद्यार्थिही विद्यापीठाकडे आकर्षित होतील. आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांची संख्याही वाढेल. दर्जेदार शिक्षकांची वाढ व्हावी, म्हणून विद्यापीठातर्फे शिक्षकांसाठी घरांची व्यवस्था करण्याची घोषणाही देशमुख यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, सुमारे २५० शिक्षकांसाठी घरे उभारण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
=================================

मुंबईत परतताच पंकजांची नाराजी दूर


  • मुंबई : सिंगापूरमध्ये असताना इकडे मुख्यमंत्र्यांनी जलसंधारण खाते काढून घेतल्याने टिष्ट्वट करून नाराजी व्यक्त करणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत परतताच नरमाईचा सूर लावत आपण नाराज नसल्याचे सांगितले. जलसंधारण मंत्री राम शिंदे हे आपल्या भावासारखे असल्याचे सांगत त्यांनी भेटीला आलेल्या शिंदेंना शुभेच्छादेखील दिल्या.
    पंकजा काल रात्री उशिरा सिंगापूरहून परतल्या. आज दिवसभर त्यांच्या रॉयलस्टोन बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी होती. खा. प्रीतम मुंडे, आ.आर.टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे आणि बीड जिल्ह्यातील भाजपाचे नेते मोठ्या संख्येने हजर होते. मंत्री शिंदे हेदेखील दुपारी त्यांच्या बंगल्यावर पोहोचले आणि त्यांच्याशी चर्चा केली. पंकजा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, मी नाराज नाही. पंकजा मुंडे परतल्यानंतरच आपण पदभार स्वीकारू, अशी घोषणा शिंदे यांनी केली होती. मात्र, गुरुवारी दुपारी शिंदे यांनी पदभार स्वीकारला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तशी सूचना केली होती, असे सूत्रांनी सांगितले.
=================================

उपनगरीय रेल्वे स्थानकांवर वायफाय


  • मुंबई : रेल्वे प्रवाशांना स्थानकांवर जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी, यासाठी रेल टेल कॉर्पोरेशन आणि गुगलतर्फे वायफाय सेवा सुरू करण्यात आली. मुंबई सेंट्रल स्थानकात ही सेवा सुरू झाल्यानंतर आता मध्य रेल्वेच्या मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या आणखी पंधरा उपनगरीय रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून त्याला मंजुरी देण्यात आली असून १५ आॅगस्टपर्यंत सर्व स्थानकांवर वायफाय सेवा सुरू होईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. रेल्वे टेल आणि गुगलमार्फत वायफाय सुविधा पुरवण्यात येत आहे.
    २0१८ पर्यंत देशभरातील एकूण ४00 स्थानकांवर वायफाय सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील सुरुवातीला १00 स्थानकांवर टप्प्याटप्प्याने वायफाय सेवा २0१६ पर्यंत देण्यात येणार आहे. वायफाय सुविधेचा पहिला मान हा मुंबई सेंट्रल स्थानकाला मिळाला. या स्थानकात वायफाय सुविधा २0१६ च्या जानेवारी महिन्यात सुरू झाली. मात्र त्यानंतर अन्य स्थानकांवर वायफाय सुविधा सुरू करण्यासाठी मुहूर्त मिळाला नाही. अखेर १५ उपनगरीय स्थानकांवर वायफाय सुविधा सुरू करण्याच्या निर्णयाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
=================================

No comments: