Saturday, 17 September 2016

नमस्कार लाईव्ह १४-०४-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- न विचारता फोटो फेसबुकवर टाकणाऱ्या पालकांवर मुलीचा खटला
२- बलुच नेत्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची शक्यता  
३- माझ्यावर आयएसच्या किती जणांनी बलात्कार, केला माहीत नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- पंतप्रधान मोदींचा 66वा वाढदिवस, आईच्या आशीर्वादासाठी मोदी गांधीनगरमध्ये! 
५- चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजलेच पाहिजे: अमिताभ बच्चन 
६- मराठा समाजाच्या आक्रोशाला 'सैराट' सिनेमाच जबाबदारः आठवले 
७- बेहिशेबी मालमत्ता प्रकरण: कृपाशंकर सिंहांच्या संपत्तीवर टाच येणार 
८- रमेश रासकरांचं मानवी जीवन अजून सुलभ करणारं संशोधन 
९- राहुल गांधींच्या सुरक्षारक्षकांनी वैमानिकाकडे मागितलं लायसन्स 
१०- दूरसंचार क्षेत्रातील दरयुद्ध ग्राहकहिताचे
११- जनधन खात्यांतील रकमांची चौकशी सुरू
१२- भारतात गुंतवणुकीसाठी चीनची विशेष परिषद
१३- सेन्सेक्स एक आठवड्याच्या उच्चांकावर
१४- हिंदुस्थान एअरोनॉटिक्सची जागतिक झेप
१५- यंदा धान्य उत्पादनाचा नवा उच्चांक गाठणार ! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१६- भ्रष्ट नेत्यांमुळेच राष्ट्रवादी बुडाली: पृथ्वीराज चव्हाण 
१७- मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग, मुंबईसह कोकणातही संततधार 
१८- हैदराबादच्या मुक्ती संग्रामाची 68 वर्षे 
१९- मराठा मोर्चा म्हणजे अनेक वर्षांचा आक्रोश : मुख्यमंत्री  
२०- मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील 15 महत्त्वाचे मुद्दे 
२१- राज्यातील 100 गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान 
२२- 'मनोधैर्य'तील लाभार्थींना 15 दिवसात अर्थसहाय्य द्याः पंकजा मुंडे 
२३- पेट्रोलवरील व्हॅटमध्ये दीड रुपयांनी वाढ, महाराष्ट्र सरकारचा निर्णय 
२४- महापालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार सुरूच राहणार
२५- हजार टन निर्माल्यापासून खतनिर्मिती
२६- शाहिद कपूरच्या घरात डेंग्यूच्या अळ्या
२७- पुजित अगरवालच्या कोठडीत वाढ 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२८- जालन्यात गोळी झाडून PSIची आत्महत्या 
२९- नागपूरमध्ये मद्यपीला तपासणीसाठी नेताना कॉन्स्टेबलवर हल्ला 
३०- आमदाराच्या गणेश मंडळाची आर्चीसाठी वीजचोरी, तरुणाला शॉक 
३१- मध्यप्रदेशातील आदिवासी मुलीची ऑक्सफोर्डमध्ये निवड 
३२- वसई; मुस्लिम कुटुंबाला इमारतीत घर देण्यास रहिवाशांचा विरोध 
३३- नागपूर; चक्रीघाटात दोन एसटी बसची समोरासमोर धडक, २० प्रवासी जखमी. 
३४- करंजा येथील द्रोणागिरी मंदिराची 30 फूट लांबीची संरक्षक भिंत कोसळली.
३५- मांजरा धरणात साडेतीन मीटर पाणी,3 वर्षात प्रथमच धरणात पाण्याचं आगमन. 
३६- उज्जैन; ट्रक अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 14 जखमी.
३७- बुलडाणा; तरोडा येथे गणपती भंडाराच्या जेवणातून विषबाधा
३७- अमरावती; प्रसारकर मूकबधीर शाळेत 7 वर्षीय मुलीवर शिक्षकाचा बलात्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३८- ऐतिहासिक ५००व्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयचे अझरूद्दीनला निमंत्रण 
३९- कोटलावर न्यूझीलंडच्या फलंदाजांचे वर्चस्व
४०- आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाला १५० धावांची आघाडी
४१- नरसिंग डोप प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
४२- मॅँचेस्टर युनायटेडचा पराभव
४३- अजिंक्य रहाणे, रोहित शर्माचा अर्जुन पुरस्काराने गौरव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

=======================================

भ्रष्ट नेत्यांमुळेच राष्ट्रवादी बुडाली: पृथ्वीराज चव्हाण

भ्रष्ट नेत्यांमुळेच राष्ट्रवादी बुडाली: पृथ्वीराज चव्हाण
मुंबई: राष्ट्रवादीच्या प्रफु्ल्ल पटेलांच्या टीकेला काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांमुळेच राष्ट्रवादी बुडाल्यांची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

काँग्रेसमुळं राष्ट्रवादी बुडाली आणि पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या मागं चौकशीचा समेमीरा लावला अशी टीका प्रफुल पटेलांनी केली होती.

त्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी जशास तसं उत्तर देत राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांमुळं राष्ट्रावादी बुडाली काँग्रेसमुळं नाही असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.

=======================================

मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग, मुंबईसह कोकणातही संततधार

मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग, मुंबईसह कोकणातही संततधार
उस्मानाबाद: महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसानं मराठवाड्याचा पार कायापालट केला आहे. आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी या पावसानं सुखावला आहे. गेल्या तीन दिवसात औरंगाबाद, लातूर, उस्मानाबादसह मराठवाड्यात सर्वदूर दमदार पावसानं हजेरी लावली.

नांदेडच्या शेवडी गावावर अक्षरशः आभाळ कोसळलं आहे. एवढा पाऊस या विभागानं कधीही पाहिला नव्हता. औरंगाबादेतही सलग दोन दिवस पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळालं आहे. लातूरवरही वरुणराजाची कृपा झाली असून निलंग्यातला मसलगा प्रकल्प 95 टक्के भरला आहे.

मराठवाड्यासह कोकणालाही परतीच्या पावसानं झोडपलं आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. काल कणकवली, लांजा, रत्नागिरीसह अनेक भागात जोरदार पाऊस बरसला. मोठ्या विश्रांतीनंतर कोसळणाऱ्या पावसामुळं भात पिकाला दिलासा मिळाला आहे. त्यामुळं कोकणातला बळीराज सुखावला आहे.

दरम्यान, मुंबईसह नवी मुंबई, रायगड परिसरातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काल रात्रीपासूनच मुंबईतील अनेक भागात संततधार सुरु आहे.

=======================================

हैदराबादच्या मुक्ती संग्रामाची 68 वर्षे

हैदराबादच्या मुक्ती संग्रामाची 68 वर्षे
मुंबई: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संस्थानिकांनी आपली साम्राज्ये स्वतंत्र भारतात विलीन केली. मात्र, दक्षिणेतील हैदराबाद संस्थान विलीनीकरणास तयार नव्हते. देशाला स्वातंत्र्य मिळूनही 13 महिने येथील जनतेला गुलामीचे जीवन जगावे लागत होते. यामुळे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 17 सप्टेंबर रोजी सैनिकी कारवाईने हे संस्थान विलीन करून येथील जनतेला गुलामगिरीच्या जाचातून मुक्त केले. आज या घटनेला 68 वर्षे पूर्ण होत आहेत.

ब्रिटिशांनी येथील संस्थानिकच्या मार्फत चालणारा राज्यकारभाराचा फायदा उचलत विविध राजवटींमधील संघर्ष, स्वतःच्या फायद्यासाठी चातुर्याने वापरून घेतला. यासाठी कधी राजांशी तह करून, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वर्चस्व निर्माण केले. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 600 पेक्षा अधिक छोटी-मोठी संस्थानिक राज्ये भारतात होती. या संस्थानिकांना अंतर्गत प्रशासनासंदर्भात मर्यादित स्वायत्तता होती, मात्र सार्वभौमत्व ब्रिटिशांचे होते. या संस्थानिक राज्यांमध्ये सर्वांत मोठे निजामाचे हैदराबाद संस्थान होते.

=======================================

पंतप्रधान मोदींचा 66वा वाढदिवस, आईच्या आशीर्वादासाठी मोदी गांधीनगरमध्ये!

पंतप्रधान मोदींचा 66वा वाढदिवस, आईच्या आशीर्वादासाठी मोदी गांधीनगरमध्ये!
अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 66वा वाढदिवस आहे. मोदी आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा करणार आहेत. त्यामुळं गुजरातमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी मोदींनी गांधीनगरमधील रायसण इथं जाऊन आई हिराबा यांचा आर्शिवाद घेतला.

दुसरीकडे सूरतमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 1 टनापेक्षा जास्त वजनाचा आणि जगातला सर्वात उंच केक तयार करण्यात आला आहे. पिरॅमिडच्या आकाराचा हा केक असणार आहे. अतुल बेकरी, शक्ती फाऊंडेशन एनजीओ आणि गिटार मॉन्क यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. हा केक कापल्यानंतर त्याचं वाटप 10 हजार दिव्यांगांमध्ये करण्यात येणार आहे.

=======================================

जालन्यात गोळी झाडून PSIची आत्महत्या


जालन्यात गोळी झाडून PSIची आत्महत्या
जालना: जालना तालुका पोलीस स्टेशनमधील पीएसआय प्रभाकर पठाडे यांनी गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही.

घटनास्थळावर सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमधून आत्महत्येचं नेमकं कारण काय याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

पीएसआय प्रभाकर पठाडे रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयातल्या नियंत्रण कक्षात ड्युटी करत होते. त्याचवेळी रात्री त्यांनी स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून आत्महत्येमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

=======================================

मराठा मोर्चा म्हणजे अनेक वर्षांचा आक्रोश : मुख्यमंत्री

मराठा मोर्चा म्हणजे अनेक वर्षांचा आक्रोश : मुख्यमंत्री
मुंबई : कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाचे विराट मोर्चे निघू लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. मराठा समाजाचे प्रश्न सर्वांनी मिळून सोडवू. त्यासाठी प्रतिमोर्चे काढण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मराठा मोर्चात प्रस्थापित मराठा नेत्यांना स्थान नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला आहे. त्याचसोबत शिक्षण आणि सहकार सम्राटांवरही मुख्यमंत्र्यांनी आपला निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी मराठा मोर्चा तसेच अन्य मुद्द्यांवर दूरदर्शनला मुलाखत दिली.

“मराठा मोर्चा म्हणजे विस्थापितांचा प्रस्थापितांविरोधातील मोर्चा”

“मराठा मोर्चा म्हणजे अनेक वर्षांचा आक्रोश आहे. बहुतांश मराठा समाजात आजही गरिबी आहे. आर्थिक मागासलेपणा आहे. त्यामुळे हा मोर्चा म्हणजे विस्थापितांचा प्रस्थापितांविरोधाती मोर्चा आहे”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

=======================================

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजलेच पाहिजे: अमिताभ बच्चन

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजलेच पाहिजे: अमिताभ बच्चन
नवी दिल्ली: भारतीय चित्रपटातगृहात राष्ट्रगीत वाजलेच पाहिजे, अशी मागणी पुन्हा जोर धरत असून आता या मागणीला महानायक अमिताभ बच्चन यांनीही समर्थन दिले आहे. अमिताभ बच्चन यांचा ‘पिंक’ हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अमिताभ आणि चित्रपट निर्मते शूजित सरकार दिल्लीत आले होते. यावेळी त्यांनी भावना व्यक्त केली.

बॉलिवूडमध्ये ‘लव डे’ या चित्रपटातून पदार्पण करणारा अभिनेता हर्ष नायरने एक पत्रक काढून चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजले पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनीही या मागणीला समर्थन दिले.

अमिताभ म्हणाले की, ”शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात चित्रपट पाहाण्यासाठी चित्रपटगृहात जात असू, त्यावेळी चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावले जात असे. मुंबईतही जेव्हा एखाद्या चित्रपटगृहात चित्रपट रिलीजच्या वेळी जातो, तेव्हा राष्ट्रगीत सुरु केल्यानंतर मोठा अभिमान वाटतो. आताही ही परंपरा सुरुच ठेवली तर चांगली गोष्ट आहे,” असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

शूजित सरकार यांनीही याचे समर्थन केले असून जर चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु केले तर, मोठी आनंदाची गोष्ट असेल, असे म्हणले आहे.

=======================================

नागपूरमध्ये मद्यपीला तपासणीसाठी नेताना कॉन्स्टेबलवर हल्ला

नागपूरमध्ये मद्यपीला तपासणीसाठी नेताना कॉन्स्टेबलवर हल्ला
नागपूर : नागपूरमध्ये मद्यपीला तपासणीसाठी घेऊन जात असताना त्याने हल्ला केल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बारंगे गंभीर जखमी झाले आहेत. काल रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे.

नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल प्रकाश बारंगे यांनी दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी सुर्यकांत व्यास याला थांबवलं होतं. तपासणीसाठी नेताना त्याने विरोध केला. तसंच बारंगे यांना बाईकवरुन खाली पाडत हेल्मेट आणि दगडांनी जखमी केलं. या हल्ल्यात कॉन्स्टेबल बारंगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

जखमी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बारंगे यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या काही दिवसात पोलिसांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. त्यात आणखी एका हल्ल्याची भर पडली आहे.

=======================================

मराठा समाजाच्या आक्रोशाला 'सैराट' सिनेमाच जबाबदारः आठवले

मराठा समाजाच्या आक्रोशाला 'सैराट' सिनेमाच जबाबदारः आठवले
नवी मुंबईः मराठा समाजाकडून काढल्या जाणाऱ्या मोर्चामुळं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मात्र मराठा समाजाच्या आक्रोशासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी सैराट चित्रपटाला जबाबदार धरलं आहे.

जातीच्या पलीकडे जाऊन तरूण संघटीत होत असल्याचं चित्र सैराटमध्ये दाखवलं आहे. त्याचाच राग मराठा समाजाच्या मनात खदखदत असल्याची टीका आठवलेंनी केली आहे. नवी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवलेंनी अनेक विषयांवर परखड भाष्य केलं.

=======================================

मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील 15 महत्त्वाचे मुद्दे

 मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील 15 महत्त्वाचे मुद्दे
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सह्याद्री’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मराठा मोर्चा, मराठा आरक्षण यांसह अनेक मुद्द्यांवर रोखठोक मतं मांडली. विशेषत: मराठा मोर्चावर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे मुलाखत देत मौन सोडलं.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीतील 15 महत्त्वाचे मुद्दे :

  • मराठा मोर्चा म्हणजे आक्रोश, अनेक वर्षांचा आक्रोश- मुख्यमंत्री

  • बहुतांश मराठा समाजात गरिबी – मुख्यमंत्री

  • एकमेकांविरोधात मोर्चांची गरज नाही – मुख्यमंत्री

  • मराठा समाजाचे प्रश्न सर्वांनी मिळून सोडवू – मुख्यमंत्री

  • मराठा मोर्चा कोणत्याही जातीविरोधातील मोर्चा नाही, मराठा मोर्चा म्हणजे विस्थापितांचा प्रस्थापितांविरोधातील मोर्चा- मुख्यमंत्री

  • अॅट्रॉसिटीच्या गैरवापरामुळे मराठा समाजात संताप – मुख्यमंत्री

  • प्रतिमोर्चे काढू नये, ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका योग्य – मुख्यमंत्री

  • मोर्चाला प्रतिमोर्चा काढणं योग्य नाही, महाराष्ट्राची सामाजिक घडी बिघडू नये – मुख्यमंत्री

  • मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने गांभिर्याने भूमिका घेतली आहे – मुख्यमंत्री

  • मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे – मुख्यमंत्री

  • मराठा नेत्यांनी स्वत:ची सोय बघितली, समाजाची नाही – मुख्यमंत्री

  • मराठा आरक्षणाने सर्वच प्रश्न सुटणार नाहीत – मुख्यमंत्री

  • आजच्या घडीला सर्वच समाजांमध्ये थोड्या-अधिक प्रमाणात आर्थिक मागासलेपणा आहे – मुख्यमंत्री

  • कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशी झालीच पाहिजे – मुख्यमंत्री

  • मराठा मोर्चाच्या प्रतिनिधींनी आमच्याशी चर्चा करावी, चर्चेतून प्रश्न सोडवू – मुख्यमंत्री

=======================================

राज्यातील 100 गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान

राज्यातील 100 गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान!
मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता भारत अभियानाला प्रतिसाद देत महाराष्ट्रात गड-किल्ले स्वच्छता अभियानाला प्रांरभ करण्यात आला आहे. हे स्वच्छता अभियान 15 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील 100 किल्ल्यांवर होणार आहे. मुंबईतील शिवडी,सेंट जॉर्ज किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेला 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रारंभ होणार आहे.

मुंबई, ठाणे, पुणे,कोल्हापूर,रत्नागिरी,रायगड, नागपूर, चंद्रपूर,गडचिरोली,औरंगाबाद, नांदेड, नाशिक,जळगाव, धुळे,अहमदनगर या जिल्ह्यातील सुमारे 100 किल्ल्यांवर ही स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. राज्य पुरातत्व विभाग, क्रेंद्रीय पुरातत्व विभाग, गडसंवर्धन समिती आणि गडसंवर्धन निगडीत स्वयंसेवी संस्था यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग राहणार आहेत.

गड-किल्ल्यांच्या भागातील संबंधित पालकमंत्री, खासदार, आमदार , महानगरपालिका, नगरपालिका, गडप्रेमी संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, समाजसेवी संस्था यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.

=======================================

'मनोधैर्य'तील लाभार्थींना 15 दिवसात अर्थसहाय्य द्याः पंकजा मुंडे

'मनोधैर्य'तील लाभार्थींना 15 दिवसात अर्थसहाय्य द्याः पंकजा मुंडे
मुंबईः राज्यातील बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला आणि बालकांना मनोधैर्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिलं जातं. यातील जिल्हा क्षती सहाय्य मंडळाने मंजूर केलेल्या प्रकरणांचा लाभ पीडितांना 15 दिवसांत देण्याचे निर्देश महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत.

मनोधैर्य योजनेतील मंजूर प्रकरणाच्या निधीबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडेनी निर्देश दिले. तुळजापूरच्या बलात्कार पीडितेला देण्यासाठी महिला बालविकास विभागाच्या तिजोरीत खडखडाट असल्याची बातमी ‘एबीपी माझा’ने दिली होती. त्यानंतर सरकारने महिला बालविकास विभागाला निधी उपलब्ध करुन देण्यासाठी हालचाली केल्या आहेत.

ट्रॉमा टीमबाबत पंकजा मुंडेचा सकारात्मक प्रतिसाद
मनोधैर्य अंतर्गत मंजूर प्रकरणातील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे अनेक प्रकरणं प्रलंबित होती. अर्थमंत्र्यांनी सर्व प्रकरणांसाठी निधी मंजूर केला आहे. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील मनोधैर्य योजनेच्या उर्वरित प्रकरणांत तात्काळ निर्णय घेऊन माहिती पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पंकजा मुंडेंनी दिली.

=======================================

पेट्रोलवरील व्हॅटमध्ये दीड रुपयांनी वाढ, महाराष्ट्र सरकारचा निर्णय

पेट्रोलवरील व्हॅटमध्ये दीड रुपयांनी वाढ, महाराष्ट्र सरकारचा निर्णय
मुंबई : महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवरील व्हॅल्यू अॅडेड टॅक्समध्ये (व्हॅट) प्रति लीटर दीड रुपयांनी वाढ केली आहे. सुमारे 600 कोटींचा अतिरिक्त महसूल या वाढीव व्हॅटमधून अपेक्षित असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘पीटीआय’ला सांगितले.

राज्य सरकारने डिझेलवरील व्हॅटमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. कारण महाराष्ट्राने डिझेलवर व्हॅट वाढवला तर शेजारील राज्यांची विक्री वाढेल या भितीने डिझेलवर व्हॅटवाढ केली नाही.

जूनमध्ये ग्राहकांच्या फायद्याच्या दृष्टीने पेट्रोलच्या दरात सुधारणा झाली होती. मात्र, आता व्हॅट वाढल्याने पेट्रोलच्या दरातही फरक पडणार आहे.

पेट्रोलवरील व्हॅट वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्याच्या सीमेवरील भागातील किरकोळ व्यापाऱ्यांवर परिणाम होईल, असे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्रा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले.

=======================================

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण: कृपाशंकर सिंहांच्या संपत्तीवर टाच येणार

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण: कृपाशंकर सिंहांच्या संपत्तीवर टाच येणार
मुंबई : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे. कारण आर्थिक गुन्हे अन्वेशण विभागाला मुख्यमंत्र्यांनी जप्तीच्या कारवाईला हिरवा कंदील दाखवला आहे.

येत्या काळात त्यांच्या अडचणीत भर पडू शकते. उत्पन्नापेक्षा जास्त संपती असल्याचा कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप आहे. कुटुंबीयांनी ज्ञात स्रोतापेक्षा 19.95 टक्के इतकी जास्त मालमत्ता जमविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांची मालमत्ता जप्तीसाठी गृह विभागाकडे  मालमत्तेवर येणार टाच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने परवानगी मागितली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला परवानगी दिली आहे.

=======================================

रमेश रासकरांचं मानवी जीवन अजून सुलभ करणारं संशोधन

रमेश रासकरांचं मानवी जीवन अजून सुलभ करणारं संशोधन
नाशिक/मुंबईः अमेरिकेत कार्यरत असलेल्या आणि मूळच्या नाशिकच्या प्रा. डॉ. रमेश रासकर यांना एमआयटी संस्थेचा प्रतिष्ठेचा लेमेलसन पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच सुमारे 3 कोटी 35 लाख रुपये, अशी पारितोषकाची रक्कम असते. डॉ. रमेश रासकर यांच्या संशोधनाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला आहे.

प्राध्यापक डॉ. रमेश रासकर हे भारतीय नाव सध्या जगाच्या चर्चेचा विषय बनलं आहे. मूळच्या नाशिकच्या आणि सध्या अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स तंत्रज्ञान संस्थेत सहाय्यक प्राध्यापक असलेल्या या माणसाने असे काही शोध लावलेत, जे थक्क करुन सोडतात.

असं आहे डॉ. रमेश रासकरांचं संशोधन
  • फेम्टो फोटोग्राफीद्वारे प्रकाशाचा वेग टिपणे शक्य होणार.
  • स्मार्टफोनद्वारे तुमच्या चष्म्याचा नंबर शोधणं शक्य.
  • कमी खर्चात डोळ्याची काळजी घेणारं उपकरण उपलब्ध होणार.
  • न उघडता पुस्तकातील मजकूर वाचणं शक्य होणार.
  • एक्स रे शिवाय शरीरातील निरीक्षण करणं जमणार आहे.
  • लेझरद्वारे अडथळ्यांपलिकडच्या वस्तूही टिपता येतील.
  • दाट धुक्यातूनही गाडी सहजगत्या चालवण्याचं तंत्र विकसित होणार.
माणसाचं जीवन अजूनच सोपं करणारे प्रयोग
पुस्तक न उघडता त्यातील मजकूर वाचणं, पुस्तकातील पानापानावर असलेले शब्द नेमके शोधणं आणि ते परावर्तीत करुन मूळ रुपात दाखवणं नक्कीच सोपं नव्हतं, पण ते डॉ.. रासकरांनी शक्य करुन दाखवलं आहे.

अमेरिकेत संशोधन सुरु असलं तरी डॉ. रासकरांची नाळ इथल्या मातीशी घट्ट बांधलेली आहे. देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या अशा संशोधकाचं प्रत्येक भारतीयाला कौतुक आहे.

सायफाय सिनेमातील अनेक प्रयोग सत्यात उतरल्याची उदाहरणं आहेत. तसंच माणसाचं आयुष्य आणखी सोपं व्हावं, यासाठी झटणाऱ्या संशोधकांमध्ये रमेश रासकरांचं नावही अग्रक्रमाने घेतलं जाईल.
=======================================

आमदाराच्या गणेश मंडळाची आर्चीसाठी वीजचोरी, तरुणाला शॉक

आमदाराच्या गणेश मंडळाची आर्चीसाठी वीजचोरी, तरुणाला शॉक
नागपूर : ‘सैराट’मधील आर्ची म्हणजे रिंकू राजगुरुच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने आकडा टाकून घेतलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन तरुण गंभीर जखमी झाला आहे.

नागपूरमधील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गणपती विसर्जन कार्यक्रमासाठी रिंकू राजगुरुला आमंत्रित केलं होतं. मात्र या कार्यक्रमासाठी आमदार प्रकाश गजभिये यांच्या कार्यकर्त्यांनी आकडा टाकून वीज चोरली होती. आर्ची आल्याने कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. पण वीज घेताना जी तार वापरली होती, त्याला स्पर्श झाल्याने एका तरुणाला जोरदार झटका बसला आणि तो गंभीर जखमी झाला.

पोलिसांनी तातडीने या तरुणाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. परंतु सरसकट वीजचोरी करणाऱ्या प्रकाश गजभिये यांच्यावर किंवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

सेलिब्रिटींना आणण्यासाठी लाखो रुपये खर्च करणारे आमदार कार्यक्रमासाठी मात्र वीज चोरतात. त्यामुळे ऊर्जा मंत्र्याच्या जिल्ह्यातील पॉलिटिकल वीजचोरीवर महावितरण कारवाई करेल का? हा प्रश्न आहे.

=======================================

राहुल गांधींच्या सुरक्षारक्षकांनी वैमानिकाकडे मागितलं लायसन्स


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. 17 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्लीहून वाराणसीला घेऊन जाणा-या इंडिगो विमानाच्या वैमानिकांकडे उड्डाण घेण्याआधी परवाना दाखवण्याची मागणी करण्यात आली. राहुल गांधींच्या विशेष सुरक्षा टीमने ही मागणी केली होती. ही मागणी ऐकून वैमानिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या इंधन दर्जाचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. ही घटना 14 सप्टेंबरची आहे जेव्हा राहुल गांधी सकाळी 8.55 च्या विमानाने दिल्लीहून वाराणसीला चालले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षारक्षकांनी 6E 308 विमानाच्या वैमानिकांकडे परवाना दाखवण्याची मागणी केली. 
     
    सुरक्षारक्षकांनी जेव्हा वैमानिकांकडे परवान्याची मागणी केली तेव्हा आम्हाला धक्काच बसला असं एका क्रू मेम्बरने सांगितलं आहे. वैमानिकांनीही सुरक्षारक्षकांची मागणी फेटाळली. तुम्हाला कागदपत्र मागण्याचा अधिकार नाही सांगत आम्हाला याबाबत एअरलाइन्सशी बोलावं लागेल असं सांगितलं. डीसीजीएकडून विमानाची तपासणी सुरु असल्याने इंधन तपासणीची मागणी पुर्ण करण्यात आली. मात्र या सर्व प्रक्रियेमुळे विमानाला तब्बल 45 मिनिटं उशीर झाला. इंधनची तपासणी झाल्यानंतरच विमानाने उड्डाण केलं.
     
    इंडिगोने सुरक्षारक्षकांकडून करण्यात आलेल्या मागणीवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 'आम्ही याबाबतीत काहीच बोलू शकत नाही. मात्र अशा प्रकारची मागणी पहिल्यांदाच करण्यात आली. विशेष व्हीआयपी विमानांना काही प्रोटोकॉल असतो. अशावेळी एअर इंडिया किंवा हवाई दलाच्या अनुभवी वैमानिकांवर जबाबदारी सोपवली जाते,' असं इंडिगोच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. मात्र या घटनेमुळे एअरलाइन्स कंपन्या आश्चर्य व्यक्त करत आहेत.
     
  • =============================================
  • मध्यप्रदेशातील आदिवासी मुलीची ऑक्सफोर्डमध्ये निवड


    • ऑनलाइन लोकमत
      भोपाल, दि. 17 - मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यात राहणारी आदिवासी मुलगी 16 वर्षीय आशा गोंदसाठी आकाश ठेंगणं झालं आहे. कारण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी ती ऑक्सफोर्डला चालली आहे. तिच्या पासपोर्टचं काम पुर्ण झालं की लवकरच ती इंग्लंडला रवाना होणार आहे. प्रयत्नांची पराकष्टा केली तर स्वप्नही सत्यात उतरतात, फक्त गरज असते ती चिकाटीची, आणि असंच काहीसं आशा गोंदच्या बाबतीत घडताना दिसत आहे. 
       
      आशा गोंद मुळची जानवार गावातील आहे. जर्मनीहून रेनहार्ड या तेथील आदिवासी मुलांना स्केटिंग आणि इंग्लिश भाषा शिकवण्यासाठी आल्या होत्या. त्यामध्ये आशा गोंदचाही समावेश होता. त्यांच्यासोबत शिकताना आशाने फार लवकर इंग्लिश भाषा आत्मसात केली आणि त्यानंतर कुतुहूल वाढत गेलं आणि आवड निर्माण झाली. तिची प्रगती पाहून रेनहार्ड यांनी आशाला इंग्लंडला आपल्यासोबत नेऊन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.
       
      'आशाने नुकतीच दहावीची परिक्षा उत्तीर्ण केली आहे. इंग्लिश भाषा शिकताना तिने फार चांगली प्रगती केली. इंग्लंडला नेऊन इंग्लिश भाषा शिकवण्याचं आश्वासन मी तिला दिलं. सुरुवातीला तिचे आई - वडिल मुलीला इतक्या लांब पाठवण्यास तयार नव्हते. त्यांना तयार करायला मला आठ महिने लागले. अनेकवेळा त्यांच्या घरी गेली. आशाच्या आईशीही मी बोलले. त्यांचं सर्व कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. हे लोक अत्यंत साधे असून मुलगी एकदा 18 वर्षाची झाली की लग्न लाऊन देतात. इंग्लिश शिकायला मिळण्याचं आणि तेदेखील परदेशात याचं महत्व त्यांना पटवून देणं कठीणच,' असं रेनहार्ड यांनी सांगितलं आहे.
    • ======================================
    • मुस्लिम कुटुंबाला इमारतीत घर देण्यास रहिवाशांचा विरोध



      • वसई, दि. 17 - हाऊसिंग सोसायटीने मुस्लिम कुटुंबाला घर देण्यास विरोध केला आहे. इमारतीत गुजराती कुटुंबांची संख्या जास्त असून 4 सप्टेंबरला सोसायटीची बैठक पार पडली. या बैठकीत मुस्लिमांना इमारतीपासून दूरच ठेवावे असा ठराव पास करण्यात आला. इमारतीत 16 फ्लॅट असून 11 कुटुंबांनी ठरावावर सही करत निर्णयाला सहमती दर्शवली आहे. 
         
        हॅप्पी जीवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत राहणा-या कांताबेन पटेल आणि त्यांचा मुलगा जिग्नेश पटेल यांनी आपला फ्लॅट मुस्लिम व्यापारी खान यांना विकला आहे. सोसायटीने 11 सदस्यांनी सही केलेला ठराव कांताबेन पटेल यांना पत्राद्वारे पाठवला असून 'तुम्ही तुमचा फ्लॅट मुस्लिम व्यक्तीला विकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. तुम्ही असं करु नये असं आम्हाला वाटतं' असं नमूद केलं आहे. तुमचा फ्लॅट दुस-या व्यक्तीला शक्यतो आपल्याच समाजातील व्यक्तीला विका असा सल्लाही देण्यात आला आहे. 
         
        पटेल कुटुंबाने हे पत्र हाऊसिंग सोसायटीचे उप-निबंधक आणि पोलीस ठाण्यात पाठवलं असून तक्रार नोंद केली आहे. पटेल यांचा खान यांच्यासोबत करार झाला असून 1 लाख रुपये टोकन म्हणून घेण्यात आले आहेत. खान यांना कर्जासाठी सोसायटीकडून एनओसी मिळणं गरजेचं आहे. 'खान यांनी आम्हाला योग्य रक्कम देण्याचं मान्य केल्यानंतर आम्ही फ्लॅट त्यांना विकण्याचा निर्णय घेतला. मात्र आता सोसायटी एनओसी देण्यास नकार देत आहे,' असं जिग्नेश यांनी सांगितलं आहे. 
         
        'हा निर्णय सर्व सदस्यांच्या एकमतानंतरच घेण्यात आला आहे. पटेल जिथे राहतात त्या पहिल्या माळ्यावरील कुटुंबांना इतर धर्मातील लोकांबद्दल काही आक्षेप आहेत. आम्ही यावर मार्ग काढू,' असं सोसायटीचे सेक्रेटरी जितेंद्र जैन यांनी सांगितलं आहे. पहिल्या माळ्यावर पाच फ्लॅट असून सर्व गुजराती कुटुंब राहतात. त्यांनी मांसाहारावर आक्षेप असल्याने विरोध होत असल्याचं कळत आहे. खान यांचा वसईत शोरुम आहे. आपल्याला याअगोदरही अनेकदा अशा नकाराला सामोरं जावं लागल्याच त्यांचं म्हणणं आहे.
      • =========================================

No comments: