Monday, 19 September 2016

नमस्कार लाईव्ह १९-०९-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तानची भारताला पुन्हा एकदा आण्विक हल्ल्याची धमकी 
२- दोन कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची लिम्का बुकमध्ये नोंद 
३- रशियन संसदीय निवडणुकीत पुतिन यांच्या पक्षाचा विजय
४- युनायटेड रशिया पार्टीला आघाडी !
५- अमेरिकेतल्या मॅनहॅटन शहरात स्फोट, २६ जखमी
६- दहशतवादाचा भस्मासुर आणखी उग्र
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- पाकच्या हद्दीत घुसून जशास तसे उत्तर द्या, सैन्यातून मागणी 
८- मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 
९- जम्मू काश्मीर : उरीमध्ये आत्मघाती हल्ला, 17 जवान शहीद 
१०- उरी हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानीच, भारतीय लष्कराची माहिती 
११- पाकशी चर्चेचा फायदा नाही, आता आरपारच्या लढाईची वेळ : संजय राऊत 
१२- उरी हल्ल्यात शहीद झालेल्या चंद्रकांत गलांडेंच्या जाशी गावावरही शोककळा
१३- सीमेपलीकडच्या कारवाईचा विचार करा - भारतीय लष्कर
१४- पाक हा दहशतवादी देश : राजनाथ सिंह
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१५- उरी हल्ल्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा, तीन सुपुत्र शहीद 
१६- लातूर, अकोला आणि जालन्यात आज मराठा समाजाचे मूक मोर्चे 
१७- 'ओरॅकल'चा प्रथमच राज्याशी करार, मुख्यमंत्री अमेरिकेला रवाना 
१८- आम्ही मुख्यमंत्री केलं तोच आमच्याविरोधातः अजित पवार 
१९- अल्पवयीन चिमुरडीची लैंगिक अत्याचार करुन हत्या
२०- ज्येष्ट संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचे निधन
२१- आता पालकांसह वाहनमालकांवरही होणार कारवाई
२२- एमपीएससी अध्यक्षांविरुद्ध गंभीर तक्रारी
२३- पोलिसांवरील हल्ले गंभीरच - हायकोर्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२४- 'लालबागचा राजा'चरणी दान अलंकार, बाईक्सचा तीन दिवस लिलाव 
२५- कुर्ला स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर रेल्वे अर्धा तास उशीरानं 
२६- दिघ्यातील चार इमारतींना जागा खाली करण्याच्या नोटिसा 
२७- यवतमाळ; वेळेत पैसे परत न केल्याने कल्याणमध्ये महिलेला सावकाराकडून मारहाण 
२८- नाशिक; 75 वर्षीय वृद्धाकडून पत्नीची लाकडी दांडक्याने मारहाण करुन हत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- आता पॅरालिम्पिक खेळाडूंनाही खेलरत्न, क्रीडामंत्र्यांची घोषणा 
३०- अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी अयोग्य, मात्र... : नागराज मंजुळे
३१- मुंबईने धडा घालून दिला : रोंची
३२- स्पेनकडून भारताला व्हाईट वॉश
३३- आयपीएल ‘प्रसारण’साठी खुली निविदा
३४- ‘दोन आॅलिम्पिकमध्ये आम्ही सर्वोत्तम संघ पाठवला नाही’
३५- लिएंडर जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक : नदाल
३६- औरंगाबादच्या संभाजीचा डबल गोल्डन धमाका
३७- माजी कर्णधारांचा होणार सत्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html

========================================

उरी हल्ल्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा, तीन सुपुत्र शहीद

उरी हल्ल्यामुळे महाराष्ट्रावर शोककळा, तीन सुपुत्र शहीद
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे महाराष्ट्राचंही अतोनात नुकसान झालं आहे. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या 17 जवानांपैकी 3 जवान महाराष्ट्रातले आहेत.

लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे, शिपाई संदीप सोमनाथ ठोक आणि शिपाई पंजाब जानराव उईके अशी या शहीदांची नावं आहेत. लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे साताऱ्याच्या जाशी गावचे आहेत, तर संदीप सोमनाथ ठोक नाशिकच्या खंडनगळीचे होते. शिपाई पंजाब जानराव उईके अमरावतीच्या नांदगावचे रहिवाशी होते.

========================================

पाकच्या हद्दीत घुसून जशास तसे उत्तर द्या, सैन्यातून मागणी

पाकच्या हद्दीत घुसून जशास तसे उत्तर द्या, सैन्यातून मागणी
फाइल फोटो
नवी दिल्ली : सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या भ्याड हल्ल्यांविरोधात भारतीय सैन्यातही संतापाची लाट उसळली आहे. आता पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करुन जशास तसं उत्तर देण्याची वेळ आल्याची भावना भारतीय सैन्य दलाकडून व्यक्त केली जात आहे.


सीमारेषेवर अतिरिक्त कुमक पाठवून भारत सरकारनं नेहमी होणाऱ्या या हल्ल्यांविरोधात ठोस पावलं उचलावीत, असं मत सैन्यदलाकडून व्यक्त केलं जात आहे. 26/11 ते पठाणकोट हल्ला, आणखी किती सहन करायचं असा सवाल सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.


पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं. पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला किंवा सीमेत कोणी पाऊल ठेवलं तर आण्विक हल्ला करण्यासाठीही घाबरणार नाही, असं आसिफ यांनी म्हटलं आहे.

========================================

'लालबागचा राजा'चरणी दान अलंकार, बाईक्सचा तीन दिवस लिलाव

'लालबागचा राजा'चरणी दान अलंकार, बाईक्सचा तीन दिवस लिलाव
मुंबई : ‘लालबागच्या राजा’च्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या लिलावात सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून दोन स्कूटर आणि दोन बाईक्सचाही समावेश आहे. दागिने लिलावानंतर पुन्हा भक्तांकडेच जाणार आहेत. या दागिन्यांचा लिलाव 19, 20 आणि 21 सप्टेंबर रोजी लालबागच्या राजाच्या मुख्य स्टेजवर होणार आहे. यामध्ये कोणीही भाविक यामध्ये सहभागी होऊ शकतो.

लालबागच्या राजाला अंदाजे 6 कोटी रुपये दान मिळाले आहेत. सोमवारी संध्याकाळी 5 वाजता लिलावाला सुरुवात होईल. 1.162 किलो वजनाची सोन्याची पावलं ही लालबागच्या राजाला मिळालेल्या दानापैकी आकर्षणाचा विषय आहेत. याची किंमत 39 लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

त्याशिवाय 123 ग्रॅम आणि 42 ग्रॅम वजनाचे प्रत्येकी एक नेकलेस लिलावात असतील. दरवर्षी अनेक चेन आणि अंगठ्या राजाला अर्पण केल्या जातात, अशी माहितीही मंडळातील एका पदाधिकाऱ्याने दिली. 100 ग्रॅम वजनाची चार, तर 50 ग्रॅम वजनाची दोन सोन्याची बिस्किटं लालबागच्या राजाला दान करण्यात आली आहेत.

========================================

मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली : राज्यात एकीकडे मराठा समाजाचे मूक मोर्चे होत असताना आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनवाणी होणार आहे. औरंगाबादमधील सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.
मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळावं, अशी प्रमुख मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
मराठा आरक्षण 15 महिन्यांपासून मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. मराठा आरक्षणावर तातडीने सुनावणी करुन तीन महिन्यात निकाली काढण्याची मागणी विनोद पाटील यांनी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या भूमिकेला महाराष्ट्र सरकारनेही पाठिंबा दर्शवला आहे.
देशातील 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही, असं निरीक्षण नोंदवत यापूर्वी मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर हायकोर्टाच्या स्थगितीला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. त्यामुळे यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

========================================

लातूर, अकोला आणि जालन्यात आज मराठा समाजाचे मूक मोर्चे

लातूर, अकोला आणि जालन्यात आज मराठा समाजाचे मूक मोर्चे
जालना : कोपर्डीमधील अत्याचाराच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या विराट मूक मोर्चाचं लातूर, जालना आणि अकोल्यात आज आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान जालन्यात या मोर्चाला सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत.

गेल्या काही दिवसात राज्यातील विविध शहरांत हे मूक मोर्चे काढण्यात आले आहेत. कोपर्डीतील बलात्कार प्रकरणानंतर मराठा क्रांती मोर्चांना सुरुवात झाली. कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या, यासोबतच अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा, अशा मागण्या या मोर्चांद्वारे करण्यात येत आहेत.

मराठा क्रांती मूक मोर्चांच आयोजन नांदेड, फलटण आणि इंदापूरमध्ये काल करण्यात आलं होतं. या मोर्चांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता. यानंतरही मराठा क्रांती मूक मोर्चांच आयोजन राज्यातील विविध शहरांमध्ये करण्यात आलं आहे. यात पुणे, सातारा, सांगली नवी मुंबई आणि सोलापूर या शहरांचा समावेश आहे.

मराठा समाजाच्या मूक मोर्चे हे दलितविरोधी नसल्याचं सांगत प्रतिमोर्चे न काढण्याचं आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

========================================

'ओरॅकल'चा प्रथमच राज्याशी करार, मुख्यमंत्री अमेरिकेला रवाना

'ओरॅकल'चा प्रथमच राज्याशी करार, मुख्यमंत्री अमेरिकेला रवाना
मुंबई : राज्यातील स्मार्ट सिटी अभियानाला चालना देण्यासाठी राज्याचा ‘ओरॅकल कंपनी’शी करार होणार आहे. हा करार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री अमेरिकेला रवाना झाले आहेत. ओरॅकल कंपनीचा पहिल्यांदाच एखाद्या राज्याशी सामंजस्य करार होणार आहे.

ओरॅकल कंपनीने राज्याला निमंत्रण दिलं आहे. ओरॅकलकडून राज्यातील स्मार्ट सिटी अभियानासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात येणार आहे. करारानंतर ओरॅकल कंपनी कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि पिंपरी-चिंचवड या तीन महापालिकांना स्मार्ट सिटी अभियानासाठी मदत होणार आहे.

========================================

कुर्ला स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर रेल्वे अर्धा तास उशीरानं

कुर्ला स्टेशनजवळ रेल्वे रुळाला तडे, हार्बर रेल्वे अर्धा तास उशीरानं
मुंबई: हार्बर मार्गावरील कुर्ला स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाशीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे तब्बल अर्धा तास उशीरानं धावत आहेत.

रेल्वेमार्ग दुरुस्त झाल्यानंतरही ही हार्बर रेल्वे विस्कळीतच आहे. वाहतूक पूर्ववत करण्याचे हार्बर रेल्वेचे प्रयत्न सुरु आहे. वाशीहून मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं सकाळीच प्रवाशांना बराच मनस्ताप सहन करावा लागला आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हार्बर रेल्वेनं उशीरानं धावत असल्यानं प्रवाशांमध्ये बरीच नाराजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, हा बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे.

========================================

दिघ्यातील चार इमारतींना जागा खाली करण्याच्या नोटिसा

दिघ्यातील चार इमारतींना जागा खाली करण्याच्या नोटिसा
नवी मुंबई : दिघ्यातील सिडकोच्या जमिनीवर असलेल्या चार इमारतींना जागा खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. दिघा परिसरातील अमृतधाम, अवधूत छाया, दत्तकृपा आणि दुर्गामाता प्लाझा या इमारती कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात आहेत. या इमारतींमधील घरे खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आल्यामुळे रहिवाशांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

हायकोर्टाने दिघ्यातील सिडको आणि एमआयडीसीच्या भूखंडावरील 99 बेकायदेशीर इमारती पाडण्याचे आदेश यापूर्वीच प्रशासनाला दिले आहेत. या कारवाईविरोधात दिघ्यातील रहिवाशांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण हा विषय शासनाचा असून याबद्दलचा निर्णयही शासनाने घ्यावा, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं.

महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2015 पर्यंतची घरे अधिकृत करण्याचा निर्णय पावसाळी अधिवेशनादरम्यान घेतला होता. पण उच्च न्यायालयाने अजून या निर्णयाला हिरवा कंदील दाखवलेला नाही.

========================================

जम्मू काश्मीर : उरीमध्ये आत्मघाती हल्ला, 17 जवान शहीद

जम्मू काश्मीर : उरीमध्ये आत्मघाती हल्ला, 17 जवान शहीद
श्रीनगर : काश्मीरच्या उरी हल्ल्ल्यात हल्ल्यातल्या शहीदांची संख्या आता 17 वर पोहोचली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमध्ये भारतीय सैन्यदलाच्या हेडक्वार्टरवर हा हल्ला करण्यात आला होता.

चार दहशतवाद्यांनी लष्करी मुख्यालयावर हल्ला केला होता. चारही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याची माहिती असून त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र यात 17 जवान गमवावे लागले.

काल पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हल्ल्याला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळ मुख्यालय परिसरात गोळीबार आणि स्फोटाचे आवाज सुरुच होते. लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. उरीमधील बाराव्या ब्रिगेडचं मुख्यालय एलओसीपासून नजीक आहे. हीच संधी साधून आत्मघाती हल्लेखोरांनी मुख्यालय वेठीस धरलं.

दरम्यान, काश्मीरच्या उरीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी केला असून. ठार झालेले चारही अतिरेकी पाकिस्तानचे असल्याचं समोर आलं आहे.

========================================

उरी हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानीच, भारतीय लष्कराची माहिती

उरी हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानीच, भारतीय लष्कराची माहिती
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उरीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केला असून, ठार झालेले चारही दहशतवादी पाकिस्तानी वंशाचे असल्याचं समोर आलं आहे. तसंच या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर आणि त्याचा भाऊ रौफ असगर असल्याची माहिती समोर येते आहे.

उरी दहशतवादी हल्ल्याबाबत माहिती देण्यासाठी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय लष्करानं ही माहिती दिली.

धक्कादायक गोष्ट ही की कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांकडून मिळालेल्या साऱ्या वस्तू या पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आल्याचंही स्पष्ट झालं आहे.

या हल्ल्यासाठी एकूण 16 अतिरेक्यांची टोळी भारतात घुसल्याचं लष्करानं मान्य केलं. त्यामुळे अजूनही 12 अतिरेकी हे काश्मीरमध्ये मोकाट असू शकतात, अशी माहितीही लष्करानं दिली आहे.

========================================

वेळेत पैसे परत न केल्याने कल्याणमध्ये महिलेला सावकाराकडून मारहाण

वेळेत पैसे परत न केल्याने कल्याणमध्ये महिलेला सावकाराकडून मारहाण
कल्याण : सावकाराकडून व्याजाने घेतलेले पैसे वेळेत परत न केल्यामुळे एका महिलेला मारहाण करण्यात आली आहे. सासऱ्याने घेतलेले पैसे परत न केल्याने दमदाटी करत मंजुळा यादव नावाच्या महिलेसह तिच्या पतीलाही बेदम मारहाण झाली आहे.

डोंबिवलीतील टाटा पावर हाऊस परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने व्याजावर 40 हजार रुपये घेतले होते. पैसे परत न केल्यामुळे सावकाराने त्याच्या सुनेसह मुलाला मारहाण केली आहे. या कुटुंबाचा दुधाचा व्यवसाय आहे. मारहाणीवेळी महिला दुधाच्या डेअरीमध्ये होती. महिला आणि तिच्या पतीला मारहाण करत दुकानाची तोडफोड केली आणि दुकान बंद केलं.

या मारहाणप्रकरणी सावकार राहुल कमतकरवर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहुल हा एका माजी नगरसेवकाचा भाचा असल्याचंही बोललं जात आहे.

========================================

नराधम वृद्धाचा 18 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार

नराधम वृद्धाचा 18 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार
यवतमाळ: यवतमाळच्या इझारा गावात एका वृद्धाने 18 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. माणिक यंबडवार असं या नराधमाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी पीडित मुलीच्या घराशेजारी राहतो. मुलीचे आई-वडील शेतात आणि आत्या पाणी भरायला गेलेली असताना या नराधमाने पीडित मुलीला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

मुलीची आत्या पाणी भरुन आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला. मुलीचे आई-वडील शेतातून आल्यानंतर आत्याने हा प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

========================================

आता पॅरालिम्पिक खेळाडूंनाही खेलरत्न, क्रीडामंत्र्यांची घोषणा

आता पॅरालिम्पिक खेळाडूंनाही खेलरत्न, क्रीडामंत्र्यांची घोषणा
हैदराबादः पॅरालिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंनाही पुढच्या वर्षीपासून खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात येईल, अशी घोषणा क्रीडामंत्री विजय गोयल यांनी केली आहे. शनिवारी हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीच्या भेटीदरम्यान क्रीडामंत्र्यांनी ही माहिती दिली.

पॅरालिम्पिक खेळाडू पदक जिंकून देशाचं नाव जगभरात अभिमानाने उंचवतात. त्यामुळे त्यांनाही ऑलिम्पिक खेळाडूंप्रमाणेच सन्मान मिळणं गरजेचं आहे. पुढच्या वर्षीपासून पॅरालिम्पिक खेळाडूंचीही खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल, अशी माहिती गोयल यांनी दिली.

ऑलिम्पिक खेळाडूंप्रमाणेच पॅरालिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचा खेलरत्न पुरस्काराने गौरव करण्यात यावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत होती. धावपटू मिल्खा सिंह यांनीही यासाठी आवाज उठवला होता.

========================================

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी अयोग्य, मात्र... : नागराज मंजुळे

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी अयोग्य, मात्र... : नागराज मंजुळे
नागपूर : अॅट्रोसिटी कायदा सरसकट रद्द करण्याची मागणी अयोग्य असून, या कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना तितकीच कडक शिक्षा देण्याची तरतूद करण्याची गरज आहे, असं परखड मत सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं.

आज नागपुरात संत तुकडोजी महाराज विद्यापीठातल्या सांस्कृतिक आणि क्रीडा पुरस्कार वितरणानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, मराठा समाजाचा आक्रोश आणि अॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी ही ‘सैराट’मुळे वाढीला लागलेली असू शकते, असं विधान करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंबाबत मात्र नागराज यांनी कोणतंही भाष्य केलं नाही.

========================================

आम्ही मुख्यमंत्री केलं तोच आमच्याविरोधातः अजित पवार

आम्ही मुख्यमंत्री केलं तोच आमच्याविरोधातः अजित पवार
साताराः आम्ही आमचे विरोधक म्हणून भाजप-शिवसेनेकडं पाहतो, पण ज्याला आम्ही मुख्यमंत्री केलं तोच बाबा आज आमच्याविरोधात बोलत आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते साताऱ्यात बोलत होते.

…आणि आमचं सरकारच पडलं, पृथ्वीराज चव्हाणांना टोला
आघाडी सरकारच्या काळात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले, तेव्हा सरकार परत निवडून आलं. पण पृथ्वीराज बाबांना मुख्यमंत्री केलं आणि आमचं सरकारच पडलं, असा जोरदार टोला अजित पवारांनी लगावला आहे. पृथ्वीराज चव्हाण लोकांमध्ये मिसळत नसल्याचा हा परिणाम आहे, असं सांगण्यासही अजित पवार विसरले नाही.

ज्यांच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री पद मिळालं त्यांच्याच विरोधात आपण बोलत आहोत, याचा विचार यशवंतराव चव्हाणांच्या सातारा जिल्ह्यातील जनतेने करावा, असंही अजित पवार म्हणाले.

========================================

पाकशी चर्चेचा फायदा नाही, आता आरपारच्या लढाईची वेळ : संजय राऊत

पाकशी चर्चेचा फायदा नाही, आता आरपारच्या लढाईची वेळ : संजय राऊत
मुंबई : पाकिस्तानशी चर्चा करुन काहीच फायदा नाही. आता आरपारच्या लढाईची गरज आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उरी हल्ल्याबाबत बोलताना म्हटलं आहे. शिवाय, आता अॅक्शनची गरज असल्याचेही ते म्हणाले.

“उरी हल्ला हा देशावरील मोठा हल्ला असून, सैनिकांवर आतापर्यंत एवढा मोठा हल्ला झाला नव्हता. शिवाय, आता चर्चा करुन काहीच फायदा नाही. इशारा देणं किंवा धमकी देणं, इथून ठिक आहे. पण आता आता अॅक्शनची गरज आहे.”, असे संजय राऊत म्हणाले.

“पठाणकोटमध्ये हल्ला होतो, उरीमध्ये हल्ला होतो, आणखी काही ठिकाणी हल्ला होतो. आपण कधीपर्यंत डोळे बंद करुन हे हल्ले सहन करणार आहोत?” असा सवाल राऊत यांनी केला आहे.

========================================

पाकिस्तानची भारताला पुन्हा एकदा आण्विक हल्ल्याची धमकी

पाकिस्तानची भारताला पुन्हा एकदा आण्विक हल्ल्याची धमकी
ख्वाजा आसिफ, संरक्षण मंत्री, पाकिस्तान
इस्लामाबादः भारताकडून पाकिस्तानशी नेहमी शांततेने चर्चा करण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र तरीही पाकची ‘नापा’क कारस्थानं चालूच असतात. भारताच्या काश्मीरमधील उरी येथील बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवानांचा मृत्यू झाला. त्यातच पाकिस्तानने पुन्हा एकदा आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं. पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला किंवा सीमेत कोणी पाऊल ठेवलं तर आण्विक हल्ला करण्यासाठीही घाबरणार नाही, असं आसिफ यांनी म्हटलं आहे.

काश्मीरप्रश्न केवळ चर्चेनेच सोडवला जाऊ शकतो. शांतता ठेवण्यासाठी काश्मीर प्रश्नावर तोडगा निघणं अत्यंत गरजेचं असल्याचंही आसिफ यांनी सांगितलं. दरम्यान पाकिस्तानने अशी धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेकदा धमकी देण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेताच पाकिस्तानकडून आण्विक हल्ल्याची धमकी दिली जाते.

दोन कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची लिम्का बुकमध्ये नोंद

दोन कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेची लिम्का बुकमध्ये नोंद
मुंबई: संपूर्ण राज्‍यात कृषिदिनाचे औचित्य साधून 1 जुलै 2016 रोजी 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्‍प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. त्याला राज्यातील जनतेनेही चांगला प्रतिसाद देत राज्‍यात 2 कोटी 81 लक्ष 38 हजार 634 वृक्षरोपण झाले होते. आता याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली असून महाराष्‍ट्राच्‍या वनविभागाने वृक्ष लागवडीसंदर्भात नव्‍या विक्रमाची नोंद केली आहे.

वनविभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने 1 जुलै 2016 रोजी राज्‍यात 12 तासात लोकसहभागातून 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला होता. यावेळी राज्‍यात एकूण 12 तासात 153 प्रकारच्‍या प्रजातींच्‍या रोपांची लागवड 65 हजार 674 जागांवर 6 लाख 14 हजार 482 लोकांच्‍या माध्‍यमातून तब्बल 2 कोटी 81 लक्ष 38 हजार 634 वृक्षाची लागवड झाली होती. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने केली आहे.

राज्यातील वनसंपदा वाढावी यासाठी अर्थसंकल्‍प विधानसभेत सादर करताना मुनगंटीवार यांनी वनमहोत्‍सव व कृषीदिनाचे औचित्‍य हा संकल्प केला होता. या संकल्‍पपुर्तीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्‍वतः जातीने लक्ष देऊन जनजागृती केली होती.

तसेच विविध सामाजिक संघटनांचा सहभाग लाभावा यासाठी विनंती केली. तसेच राज्यातील विविध केंद्रीय मंत्र्यांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. परिणामी राज्‍यात विक्रमी रोपांची विक्रमी लागवड करण्‍यात वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग यश आले

========================================

75 वर्षीय वृद्धाकडून पत्नीची लाकडी दांडक्याने मारहाण करुन हत्या

75 वर्षीय वृद्धाकडून पत्नीची लाकडी दांडक्याने मारहाण करुन हत्या
नाशिक : 75 वर्षीय वृद्ध पतीने आपल्या पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या केली आहे. नाशिकमधील अंबडमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.

अंबडमधील चुंचाळे परिसरात रहिवासी असलेले सुधाकर साळवे आणि त्यांची पत्नी लीलाबाई साळवे यांच्यात काल मध्यरात्री काही वाद झाले आणि या वादातून सुधाकर यांनी आपल्या पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करायला सुरवात केली. यामध्ये लीलाबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने, त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, आज सकाळी उपचार घेत असताना लीलाबाई यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपी सुधाकर साळवेला पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा देखिल दाखल करण्यात आला आहे.

No comments: