Thursday, 29 September 2016

नमस्कार लाईव्ह २९-०९-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- ओबामा यांना झटका, सिनेटकडून पहिल्यांदा व्हेटो रद्द 
२- सार्कवर बहिष्कार घालण्याच्या भारताच्या निर्णयाचा अभिमान वाटतो - रतन टाटा 
३- आण्विक शस्त्र प्रदर्शनासाठी ठेवलेली नाही - पाकिस्तान 
४- कॅलिफोर्निया; वणवा विझविण्यास १,१00 कर्मचारी 
५- अॅम्सटरडॅम; MH-17 विमानाच्या रहस्यावरून पडदा उठला, रशियन मिसाईलने पाडलं विमान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना-भाजपकडून देवांची वाटणी? 
७- मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी पंतप्रधान सकारात्मक : श्रीपाल सबनीस
८- आता JIO सिम कार्डची होम डिलीवरी
९- अंबानी बंधू 10 वर्षांनंतर एकत्र 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- मराठवाड्यात सुकाळ, मात्र नैसर्गिक आपत्तीचे 70 बळी 
११- खैरलांजी हत्याकांडाला दहा वर्ष पूर्ण, भोतमांगे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत 
१२- विमान तिकिटात सवलत द्या, खासदारांची विमान कंपन्यांकडे मागणी 
१३- संजय राऊत जिथे दिसेल तिथे फटके : निलेश राणे 
१४- रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर 
१५- स्वयंघोषित धर्मगुरु राधे माँला हायकोर्टाचा दिलासा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- अंधेरी; पंख्याला उलटं लटकवून आईवर अमानुष अत्याचार, नराधम मुलगा अटकेत 
१७- शरद पवारांच्या बारामतीत मराठा मोर्चाचा एल्गार 
१८- कोल्हापुरात भरधाव कारने महिलेला चिरडलं
१९- मुंबईत व्यापाऱ्याची हत्या, पत्नी-मुलगी पोलिसांच्या ताब्यात
२०- उरण; 'थ्रील' अनुभवण्यासाठी 'तिने' पसरवली दहशतवाद्यांची अफवा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- ‘ताल स्मृती बुद्धिबळ २०१६ :विश्वनाथन आनंदचा दिमाखदार विजय 
२२- गंभीरच्या समावेशामुळे धवनचे स्थान धोक्यात 
२३- बीसीसीआयने सुधारावे; अन्यथा आम्ही सुधरवू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*फ्लॉवर एन् फ्लॉवर्स* 
आपल्या प्रियजनांचे नाव गुलाबांच्या फुलावर 
फ्लॉवर एन् फ्लॉवर्सची महाराष्ट्रातील एकमेव सेवा 
गुलाबाच्या फुलावर आपल्या ऑर्डर प्रमाणे फोटो किंवा Text संदेश प्रिंट करून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा. 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/09/blog-post_29.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*दांडिया जल्लोष २०१६*

हम सभीको जिस घडी का इंतजार था वो आ गई है।
दांडिया जल्लोष के ९वे वर्ष मे पदार्पण करते हुवे, *दांडिया और गरबा क्लास* का आयोजन किया गया है।
आप सभी इस क्लास का लाभ उठाए।
दि. ६/९/२०१६ से आपकी सेवा मे।

संपर्क - *मॉडर्न डान्स अकॅडमी, शिवाजी नगर, नांदेड*
मो.:9960993489, 9970796662
ऑनलाईन रजिस्टर करे:
http://www.moderndanceacademy.in/reservation.php
फेसबुक लिंक:
www.facebook.com/moderndanceacademy
===========================================

अंधेरी; पंख्याला उलटं लटकवून आईवर अमानुष अत्याचार, नराधम मुलगा अटकेत

पंख्याला उलटं लटकवून आईवर अमानुष अत्याचार, नराधम मुलगा अटकेत
मुंबई : माणुसकीला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार मुंबईतल्या अंधेरीत समोर आला आहे. 80 वर्षांच्या जन्मदात्या आईवर अमानुष अत्याचार केल्याप्रकरणी सुरेंद्र सत्तार वैद्य नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आगे.
महिलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पीडित मायावती वैद्य यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
या अत्याचाराचा व्हिडीओ ‘एबीपी माझा’च्या हाती लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडीओ पीडित वृद्धेची सून, मुलगी आणि नातीने काढला असून रेकॉर्डिंग करताना त्यांच्या हसण्याचा आवाजही येत आहे.
वृद्धेवरील अत्याचार किती भीषण होते हे या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे. नराधम मुलगा ओढणी पंख्याला बांधून, ती आईच्या पायात अडकवून तिला ओढत असे.
हा सैतान मुलगा मागील तीन वर्षांपासून आईचा अमानुष छळ करत असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, या धक्कादायक प्रकारात सुरेंद्रला मदत करणारी त्याची पत्नी आणि बहिणीविरोधातही डीएननगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा सुरेंद्र, बहु आणि मुलीविरोधात भारतीय दंडविधान कलम  354, 352, 336, 506 (2अ), 504 आणि 34 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.
पोलिसांनी मुलगा, सून आणि मुलीला अटक केली असून त्यांना आज अंधेरी कोर्टात सादर करण्यात येईल.
===========================================

मराठवाड्यात सुकाळ, मात्र नैसर्गिक आपत्तीचे 70 बळी

मराठवाड्यात सुकाळ, मात्र नैसर्गिक आपत्तीचे 70 बळी
उस्मानाबादः मराठवाड्याचा दुष्काळ यंदाच्या पावसाने धुऊन लावला असला तरी नैसर्गिक आपत्तीने मात्र 70 बळी घेतले आहेत. यामध्ये पशुधनाचंही मोठं नुकसान झालं आहे. वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात 70 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

अतिवृष्टीने मराठवाड्यात 569 जनावरे दगावली. तर 3 हजार 998 घरं, झोपड्या, गोठ्यांचं नुकसान झालं. 19 ठिकाणच्या खाजगी, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. या नुकसानीचा आकडा 31 लाख 48 हजार एवढा आहे.  मात्र आनंदाची बाब म्हणजे मराठवाड्यातल्या सर्वच प्रकल्पात मिळून 60 टक्के पाणी साठा झाला आहे.

मराठवाड्यात पुरात वाहून गेलेल्यांची संख्या
मराठवाड्यात वीज पडून 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुरात वाहून गेल्याने विविध जिल्ह्यात 33 जणांना आपला जीव गमवावा लागला.

===========================================

खैरलांजी हत्याकांडाला दहा वर्ष पूर्ण, भोतमांगे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत

खैरलांजी हत्याकांडाला दहा वर्ष पूर्ण, भोतमांगे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत
भंडारा : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या खैरलांजी हत्याकांडाला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद विधानसभेसह संसदेतही उमटले होते.
दलित आणि सवर्णांच्या वादात दलित कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली होती. भैयालाल भोतमांगे यांची  पत्नी आणि तीन मुले अशा चौघांची हत्या झाली होती. शेतावर गेले असल्याने कुटुंबप्रमुख भैयालाल भोतमांगे एकटेच वाचले होते.
आरोपींना फाशी व्हावी यासाठी अनेक आंदोलनं झाली. भोतमांगेना न्याय मिळावा म्हणूण अनेक दलित संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. भैयालाल भोतमांगे यांची अजूनही न्यायासाठी लढाई सुरु आहे.
या हत्याकांडांनंतर तब्बल एक महिन्यानंतर खटला सुरु झाला होता. 15 ऑक्टोबर 2008 साली भंडारा सत्र न्यायालयाने 8 जणांना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 2010 साली नागपूर खंडपीठाने 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
सध्या सर्वोच्च न्यायालयात हा खटला सुरु असून आरोपींना फाशी व्हावी, अशी भैयालाल भोतमांगे यांची मागणी आहे.

===========================================

शरद पवारांच्या बारामतीत मराठा मोर्चाचा एल्गार

शरद पवारांच्या बारामतीत मराठा मोर्चाचा एल्गार
बारामती (पुणे) : मराठा क्रांती मोर्चा आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीत धडकणार आहे. सकाळी 11 वाजता कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या मोर्चाला सुरुवात होईल.
कोपर्डीतील निर्भया आणि उरीमधल्या शहीद जवानांना मोर्चात श्रद्धांजली वाहिली जाईल. कोपर्डीत प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, आणि अॅट्रोसिटी कायद्यात सुधारणा करा, या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत..
पुण्यातल्या मोर्चाप्रमाणेच बारामतीतील मराठा मोर्चाही विक्रमी ठरण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्य या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.
मोर्चा शिस्तबद्ध व्हावा यासाठी 2500 स्वयंसेवक तैनात करण्यात आले असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.

===========================================

विमान तिकिटात सवलत द्या, खासदारांची विमान कंपन्यांकडे मागणी

विमान तिकिटात सवलत द्या, खासदारांची विमान कंपन्यांकडे मागणी
नवी दिल्लीः वेतनवाढीच्या मागणीनंतर खासदारांनी विमान प्रवासाच्या भाड्यात सवलत देण्याची मागणी केली आहे. खासदारांच्या वेतनवाढीसाठी असलेल्या समितीची विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाली. त्यामध्ये विमान प्रवासात सवलत देण्याची मागणी केली.

अशा आहेत खासदारांच्या मागण्या
  • विमानात खासदारांसाठी आरक्षित जागा असावी.
  • विमानतळावर खासदारांना स्पेशल ट्रीटमेंट मिळावी.
  • विमानात पुढच्या जागा खासदारांना मिळाव्या.
  • विमान तिकिट शुल्कात सवलत मिळावी.
  • विमान प्रवासात खासदारांना जेवन मोफत मिळावं.

===========================================

कोल्हापुरात भरधाव कारने महिलेला चिरडलं

कोल्हापुरात भरधाव कारने महिलेला चिरडलं
कोल्हापूर : कोल्हापुरातील हिट अँड रनची घटना घडली. भरधाव कारने एका महिलेसह पाच जणांना उडवलं. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य जखमी झाले आहेत.
दाभोळकर कॉर्नर ते न्यू शाहूपुरी रोड या परिसरात काल रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने 5 दुचाकींना उडवलं. दुचाकींचा चक्काचूर झाला, तर तिथून पळ काढण्यात चालक यशस्वी झाला.
दरम्यान या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कारची गाडीची तोडफोड केली. शाहूपुरी पोलिस या कार चालकाचा शोध घेत आहेत.

===========================================

संजय राऊत जिथे दिसेल तिथे फटके : निलेश राणे

संजय राऊत जिथे दिसेल तिथे फटके : निलेश राणे
मुंबई : ‘सामना’मधील कार्टून वादानंतर सर्वच पक्षांतून टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी ‘संजय राऊत जिथे दिसेल तिथे त्याला फटके टाकणार’ अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.


‘सामना’मधील कार्टून वादावर मुखपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मौन सोडलं आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, ‘ते’ कार्टून मराठा मोर्चासंदर्भात नाही, त्याचप्रमाणे व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी बिनशर्त माफी मागितली आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. संपादक वर्तमानपत्रातील सर्वच बातम्या पाहतातच असं नाही, असं म्हणत राऊत यांनी जबाबदारी झटकण्याचाही प्रयत्न केला.
‘सामना’तील कार्टून प्रकरणी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाईंनी बिनशर्त माफी मागितली आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. संपादक वर्तमानपत्रातील सर्वच बातम्या पाहतातच असं नाही. काही गोष्टी अजाणतेपणे घडतात, चूक ही चूक असते, मात्र किती ताणायचं हा प्रश्न आहे. माफी मागितली की प्रश्न संपला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.

===========================================

मराठा मोर्चा प्रश्नी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार?

मराठा मोर्चा प्रश्नी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार?
मुंबई : मराठा मोर्चातील मागण्यांचा विचार व्हावा यासाठी सरकारनं विशेष अधिवेशन घ्यावं, या मागणीचा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. याचसंदर्भात उद्धव उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे महत्त्वाच्या शिवसेना नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांना उद्या मुंबईत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बुधवारी दुपारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकल्याचं चित्र आहे.

===========================================

निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना-भाजपकडून देवांची वाटणी?

निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना-भाजपकडून देवांची वाटणी?
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी देवाला देखील सोडलेलं दिसत नाही. कुणी गणेशभक्तांना साकडं घालत आहे, तर कुणी साईभक्तांना आपलसं करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आता कोणता देव कोणत्या पक्षाला पावणार हे तर महापालिका निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी उत्तर भारतीयांना गोंजारल्याचं तुम्हाला आठवत असेल. आता त्याच भाजपनं आपला मोर्चा साईभक्तांकडे वळवला आहे. कारण मुंबईतल्या 70 टक्के गणेश मंडळांवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. त्याला शह देण्यासाठी भाजपनं ही खेळी केली आहे.
त्यासाठी साईसेवा मंडळांची शिवाजी मंदिरात बैठकही बोलावली. मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात साईभक्तांची संख्या मोठी आहे. यावर डोळा ठेवून भाजपनं पाऊल टाकलं आहे. मग शिवसेना तरी कशी मागे राहणार?
भाजप आणि शिवसेनेनं देवांच्या मंडळाचं राजकारण करण्यापेक्षा मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यावं असा सल्ला मनसेनं दिला आहे. दहीहंडी, गणेश उत्सव किंवा आता साई मंडळातून पक्षांना कार्यकर्ते मिळतात आणि त्यांच्याच जीवावर निवडणुका जिंकण्याचा राजकीय पक्षांचा मनसुबा असतो. मुंबईत शिवसेना आणि भाजपची युती होईल की नाही हे माहित नाही. पण सध्या हे दोन्ही पक्ष आपापले गड मजबूत करत आहेत. पण राजकीय पक्षांच्या या प्रयत्नांना साईबाबा पावणार का हे पाहणं महत्वाचं आहे.

===========================================

मुंबईत व्यापाऱ्याची हत्या, पत्नी-मुलगी पोलिसांच्या ताब्यात

नवी मुंबईत व्यापाऱ्याची हत्या, पत्नी-मुलगी पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबई : नवी मुंबईतल्या कामोठ्यात एका व्यापाऱ्याची चाकूनं वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. कौटुंबिक कलहातून व्यापाऱ्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
विनोद शाह असं हत्या झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे. विनोद यांची पत्नी आणि मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. बुधवारी सकाळी कामोठे गावाजवळ शाह यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. मंगळवारी रात्री उशिरा ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रात्री उशिरा धारदार शास्त्राने या व्यापार्यांच्या छातीवर वार करून हत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

===========================================

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी पंतप्रधान सकारात्मक : श्रीपाल सबनीस

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी पंतप्रधान सकारात्मक : श्रीपाल सबनीस
पुणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी डॉ. श्रीपाल सबनीसांनी पाठवलेल्या पत्राची दखल पंतप्रधानांनी घेतली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावं, अशी मागणी करणारे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधानांना पाठवलं होतं.

श्रीपाल सबनीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑगस्ट महिन्यात पत्र लिहिलं होतं. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाची मागणी या पत्रातून केली होती. बलुचिस्तानमधील नागरिकांच्या मानवाधिकारांसोबतच पाकव्याप्त काश्मीरच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित केल्याबद्दल अभिनंदनही केलं होतं.

पंतप्रधान कार्यालयाकडून श्रीपाल सबनीस यांना पत्राची पोच पाठवण्यात आली आहे. पत्रातील मुद्द्यांवर सकारात्मक विचार करुन कार्यवाही करत असल्याचही सांगण्यात आलं आहे. “मराठीला अभिजात दर्जा मिळावा तसंच मराठी भाषेचं स्वतंत्र विद्यापीठासाठी अनेकांनी पाठपुरावा केला आहे. पण आपण पाठवलेल्या पत्रामुळे सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळालं याचा आनंद वाटतो,” असं डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितलं.

===========================================

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर
नवी दिल्ली : केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर केला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांनी ही माहिती दिली. सलग पाचव्या वर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस दिला जात आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसमध्ये यावर्षी दुपटीने वाढ करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रमाणात हा बोनस दिला जाणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिला जाणारा हा बोनस आरपीएफ आणि आरपीएसएफ यांना दिला जाणार नाही. गेल्या वर्षी 8975 रुपयांचा कमीत कमी बोनस कर्मचाऱ्यांना देण्यात आला होता. यावर्षी तो वाढवून 18 हजार रुपये करण्यात आला आहे.

भारतीय रेल्वेच्या जवळपास 12 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या बोनसमुळे रेल्वेच्या तिजोरीवर 2,090.96 कोटींचा बोजा पडणार आहे.

===========================================

स्वयंघोषित धर्मगुरु राधे माँला हायकोर्टाचा दिलासा

स्वयंघोषित धर्मगुरु राधे माँला हायकोर्टाचा दिलासा
मुंबई: स्वयंघोषित धर्मगुरु राधे माँला हायकोर्टानं दिलासा दिला आहे. राधे माँ विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं निकाली काढली आहे.

पुत्र प्राप्ती आणि पैसा मिळवण्यासाठी राधे माँ लोकांची दिशाभूल करते, पोलिसात तक्रार करुनही गुन्हा नोंदवण्यात आला नसल्यानं कोर्टानं गुन्हा नोंदवण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

कोर्टानं ही जनहित याचिका होऊ शकत नसल्याचं सांगत ही याचिका निकाली काढली. तसंच पोलीस गुन्हा दाखल करत नसतील तर याचिकाकर्त्यांनी इतर पर्यायांचा वापर करावा, असंही हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना फटकारलं आहे.

===========================================

No comments: