Saturday, 11 June 2016

नमस्कार लाईव्ह ११-०६-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकने अमेरिकेची 'ड्रोन' पाडावीत - सईद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- 'सनातन' ही दहशतवादी संघटना, हिंदू समाजावर काळा डाग : आशिष खेतान 
३- टीका करण्यापेक्षा शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं: भाजप 
४- भाजप-शिवसेनेतलं पोस्टरवॉर टोकाला, मोदींना नागोबा म्हणून हिणवलं 
५- चित्रपट प्रमाणपत्राचे धोरणअधिक मुक्त ! - प्रसारण मंत्री अरुण जेटली  
६- पोस्टल पेमेंट बँकेसाठी लोगो, टॅगलाईन सूचवा आणि 50 हजार रुपये जिंका! 
७- दोन वर्षांत १00 स्टार्टअप गावे बनवणार - मोदी सरकारचा संकल्प  
८- उडता मोदी - 2 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 38 वा विदेश दौरा 
९- मेमध्ये कारच्या विक्रीत किरकोळ घट 
१०- 'हे खंडोजी खोपडे अन्‌ सूर्याजी पिसाळचे सरकार!' - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पहिली अटक 
१२- जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर 
१३- पहिल्याच पावसात मुंबईची 'लाईफलाईन' कोलमडली 
१४- राज्यात कुठे-कुठे पावसाची हजेरी 
१५- 'नालायकांसोबत राहू नका', शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला 
१६- 'यिन’ प्रतिनिधींच्या पाठीवर मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप 
१७- मार्केटिंग भारी; पण माल खराब- शरद पवार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- सरकारी कर्मचाऱ्यांनी सैराट होऊ नये: उदयनराजे 
१९- औरंगाबाद; एटीएममध्ये जाताना सावध, चोरट्यानं पैसे काढताना एकाला भोसकलं 
२०- मुंबई; रुग्णाच्या दोनच नातेवाइकांना प्रवेश 
२१- कोलकाता; मदतीसाठी ज्यूडिथचे कुटुंबीय सुषमा स्वराजांकडे 
२२- पुण्यात ओबीसी, कोल्हापुरात खुले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- मान्सून आला म्हणजे नक्की काय झालं? 
२४- पावसाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी 
२५- महामार्गावरील अपघात टाळायचाय ? तर हे पाळा.  
२६- देशच सेन्सॉर बोर्ड बनला आहे- इरफान खान 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
पत्रकार व्ही.के. कतरे, अविस खान, विजय धोत्रे, सुनील गायकवाड, धिरज राजपूत, अमोल काशीद, सुर्यकांत कांबळे, निवृत्ती रोसे, जगदीश रावतसर, मारोती शिंदे, नितीन कोंडामंगल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

===============================

पहिल्याच पावसात मुंबईची 'लाईफलाईन' कोलमडली

पहिल्याच पावसात मुंबईची 'लाईफलाईन' कोलमडली!
मुंबई : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आणि रेल्वेच्या तिनही मार्गावरच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. ऐन गर्दीच्या वेळेस मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो आहे.

मध्य रेल्वेवर सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक जवळपास 20 मिनीट उशिराने असल्याची माहिती मिळते आहे. तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मरिन लाईन्स दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चर्चगेटच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक उशीराने होत असल्याचं कळतं आहे.

तर दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावरही सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे नाहतूक उशीराने होत आहे. त्यामुळे सुरुवातीच्या मोसमात मुंबईच्या लाईफलाईनवर ही वेळ येणार असेल तर पुढचा पाऊस लोकलसेवा कसा झेलणार हा मोठा प्रश्नचं आहे.
===============================

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पहिली अटक

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पहिली अटक
पुणे डॉ. नरेंद्र दाभोलकराच्या हत्येप्रकरणी तब्बल पावणे तीन वर्षांनंतर पहिली अटक करण्यात आली आहे. सनातन संस्थेशी संलग्नीत असलेल्या हिंदू जनजागरण समितीच्या वीरेंद्र तावडेला सीबीआयनं अटक केली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमागे हिंदुत्त्ववादी संघटनाचा हात असल्याच्या संशय आणखी गडद झाला आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात सीबीआयनं सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे यांच्या घरावर छापे मारले. तेव्हापासून वीरेंद्र तावडेची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर ई-मेल द्वारे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं चौकशीअंती निष्पन्न झालं. शुक्रवारी संध्याकाळी वीरेंद्र तावडेला चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतर सीबीआयकडून अटक करण्यात आली. आज सकाळी वीरेंद्र तावडेला पुण्याच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
===============================

'सनातन' ही दहशतवादी संघटना, हिंदू समाजावर काळा डाग : आशिष खेतान

'सनातन' ही दहशतवादी संघटना, हिंदू समाजावर काळा डाग : आशिष खेतान
मुंबई : सीबीआयने अटक केलेला वीरेंद्र तावडे हा डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड आहे. शिवाय, सनातन संस्था ही दहशतवादी संघटना आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते आशिष खेतान यांनी केला आहे.

Tawde, the mastermind behind the murder of Dr Dabholkar arrested. Now agencies should go after the assassins who are still absconding.

“सनातन संस्थेने उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकांची यादी तयार केली आहे, ज्यांना ते संपवू इच्छित आहेत. सनातन संस्था ही दहशतवादी संघटना असून, हिंदू समाजावर काळा डाग आहे.”, असेही आशिष खेतान म्हणाले.
===============================

राज्यात कुठे-कुठे पावसाची हजेरी

LIVE UPDATE : राज्यात कुठे-कुठे पावसाची हजेरी?
मुंबई महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे, त्यामुळे येत्या काही तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. मात्र, आज सकाळपासूनच राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

  • रत्नागिरीतील चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वरमध्ये जोरदार पाऊस

  • मुंबईतील अंधेरी परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात,

  • ठाण्यात जोरदार पाऊस, तर कल्याणमध्ये रिमझिम सुरु

  • रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, उरण तालुक्यांमधील काही भागात पावसाची रिमझिम सुरु झाली आहे.

  • दक्षिण मुंबईसह ठाण्यातील मुलुंड आणि परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे.

  • मुंबईतील दादर, वरळी, लोअर परळ भागातही पावसाच्या सरी

  • मुलुंड, चेंबूरमध्येही पावसाच्या सरी

  • नवी मुंबईत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस
===============================

मान्सून आला म्हणजे नक्की काय झालं?

मान्सून आला म्हणजे नक्की काय झालं?
गेल्या दोन-तीन दिवसांपासून एक प्रश्न जोरात आहे- केरळात मान्सून आला का? आणि आपल्याकडं कधी येणार? तिकडं केरळात मान्सून आल्याचं जाहीर झालं आणि पावसाचा जोर कमी झाला. च्यायला, असला कसला मान्सून?… अनेकांना पडलेला हा प्रश्न.

मुळात अनेकांना वाटतो तसा, मान्सून म्हणजे पाऊस नव्हे. त्याचा अर्थ मोसमी वारे. ते पावसाळ्यात आणतात. मान्सून आल्याचं जाहीर कधी केलं जातंत्याचे काही निकष आहेत:
१. आपल्याकडं येतात. समुद्रावरून येताना सोबत पावसालाही विशिष्ट ठिकाणी अमूक इतका पाऊस पडला,
२. वाऱ्यांची दिशा विशिष्ट असली आणि
३. ढगांनी आकाश अमूक टक्के झाकोळलं की मान्सून आल्याचं जाहीर केलं जातं.

यातली गंमत अशी की, मान्सून आल्याचं जाहीर करण्याआधी विशिष्ट प्रमाणात पाऊस पडावाच लागतो. एकदा त्याचं आगमन जाहीर झालं की पडलंच पाहिजे, हे बंधन पावसावर नाही.

मान्सूनच्या काळातील पावसाचं पडणं टप्प्याटप्प्याने असतं. त्यामुळे एका टप्प्यात पाऊस पडून गेला की जोर ओसरतो, पुन्हा जोर धरायला तो वेळ घेतो. मग आपल्याला वाटतं, तोंड दाखवून पसार झाला की काय बाबा?

===============================

पावसाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

पावसाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी
मुंबईः मोठ्या प्रतिक्षेनंतर वरुणराजा महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मात्र पावसाचा आनंद घेताना आरोग्याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. वातावरणातील दमटपणा, थोडाफार गारवा आणि अंगावर ओले कपडे जास्त वेळ राहून देणे यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं.

पावसाळ्यात विविध डासांचा प्रसार होतो. त्यामुळे पावसाळ्यात दवाखाने नेहमी हाऊसफुल्ल झाल्याचं आपण पाहतो. पावसाळ्यातील आजार टाळण्यासाठी स्वच्छता आणि त्यासोबत विविध बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे.

पावसाळ्यातील आजार
  • हिवताप, मलेरियाः पावसाळ्यात प्रामुख्याने डास चावल्यामुळे हिवताप किंवा मलेरिया होतो. एनॉफिलीस जातीच्या मच्छराने दंश केल्यास हिवतापाची लागण लगेच होते.

  • सर्दी, खोकलाः अंगावर ओले कपडे जास्त वेळ, पावसात भिजणे यांमुळे सर्दी खोकल्यासारखे किरकोळ आजार उद्भवतात.

  • दमाः ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यात दमा असणाऱ्या रुग्णांना त्रास जास्त जाणवतो. दमट, गार हवा आणि मंद पचनशक्ती यामुळे दम्याचा त्रास वाढतो.

  • जुलाबः पावसाळ्यात पाण्याची प्रदुषण जास्त होते. त्यामुळे जुलबा आजार उद्भवण्याची शक्यता असते.

  • पायाला चिखल्या होणेः पावसात जास्त वेळ भिजल्यास किंवा ओली चप्पल पायात जास्त वेळ ठेवल्यास चिखल्या होतात.
===============================

टीका करण्यापेक्षा शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं: भाजप

टीका करण्यापेक्षा शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं: भाजप
मुंबई टीका करण्यापेक्षा शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं. शिवसेना सत्तेतून बाहेर पडली, तरी फरक पडणार नाही, असे भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या ‘माझा विशेष’ कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाय, ही भाजपची अधिकृत भूमिका असल्याचे अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केले.

“शिवसेनेची एकंदरीत भूमिका संभ्रमाची आहे. त्यांना सहनही होत नाही, बोलताही येत नाही. एवढंच जर असेल, तर टीका करण्यापेक्षा सेनेने सत्तेतून बाहेर पडावं. सरकारला काहीही फरक पडत नाही.”, असे अतुल भातखळकर ‘माझा विशेष’ कार्यक्रमात म्हटलं.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील धुसफूस वाढताना दिसत आहे. पोस्टर्सच्या माध्यमातून शिवसेना आणि भाजपने एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली असतानाच, आता भाजप नेते अतुल भातखळकरांनी थेट सत्तेतून बाहेर पडण्यास सेनेला सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात एकाच सरकारमधील दोन पक्षांमधील वाद आणखी रंगण्याचे चिन्हं दिसत आहेत.
===============================

'नालायकांसोबत राहू नका', शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

'नालायकांसोबत राहू नका', शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
मुंबई: एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये पोस्टर वॉर सुरु असताना पवारांनीही या वादात उडी घेतली आहे. ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लायकी असलेल्या लोकांसोबत रहावे. नालायकांसोबत राहू नये.’ असा सल्ला उध्दव ठाकरेंना दिला आहे.

‘तर भाजपनं राजकीय आकसापोटी छगन भुजबळांवर कारवाई केली आहे.’ असा थेट आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादीच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षणमुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पवारांनी आपल्या शैलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही चिमटे काढले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नाव न घेता टीका केली आहे.
===============================

भाजप-शिवसेनेतलं पोस्टरवॉर टोकाला, मोदींना नागोबा म्हणून हिणवलं

भाजप-शिवसेनेतलं पोस्टरवॉर टोकाला, मोदींना नागोबा म्हणून हिणवलं
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदींना निजामाचं बाप म्हणून हिणवल्यावर भाजपनं पोस्टरमधून उद्धवना बेडूक आणि बरंच काही म्हणत हिणवलं. त्याचा सडेतोड समाचार आज शिवसेनेनं घेतला आहे.

सेनेच्या पोस्टरमध्ये मोदींची संभावना ‘चुरणबाबा’ आणि ‘आयत्या बिळावरचा नागोबा’ अशी केली आहे. अच्छे दिन, बिच्छे दिन काही नाही, लोकंच उत्तर देतील ह्यांना आम्हाला काही घाई नाही, तसंच विदेशात खूप झालं, जरा देशात बघा, मातोश्रीचे उपकार इतक्या लवकर विसरणारी हीच का ती नमोची भाजप? अशा आशयाचे बोचरे पोस्टर शिवसेना कार्यकर्त्यांनी तयार केले आहेत.

मुंबई पालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोकाला गेला आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर तुटून पडलेले बघायला मिळत आहेत.

दरम्यान, काल भाजप कार्यकर्त्यांनी सेनेवर टीका करणारे पोस्टर तयार केले होते. देश पिताश्रींच्या पुण्याईवर आणि मातोश्रीच्या आशीर्वादाने नाही चालत… त्यासाठी खऱ्याखुऱ्या संकटांचा सामना करावा लागतो…” अशा आशयचंही एक पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. या सर्व पोस्टर्सवर ‘i support NaMo!’ अशी ओळ आहे.
===============================

सरकारी कर्मचाऱ्यांनी सैराट होऊ नये: उदयनराजे

सरकारी कर्मचाऱ्यांनी सैराट होऊ नये: उदयनराजे
प्रांताधिकारी किशोर पवार यांनी वाळू माफियांविरोधात कारवाई सुरू केली असून वाळू माफियांचे 52 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. तर 29 ट्रक्स आणि 20 बोटीही जप्त केल्या आहेत.
सातारा: ‘शासकीय अधिकाऱ्यांनी सैराट होऊ नये.’ असा इशारा देत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड बंदचं आवाहन केलं आहे. प्रांताधिकारी किशोर पवार यांच्याकडून कारवाईच्या नावाखाली मनमानी सुरू असून जनतेला वेठीस धरलं जातं आहे. असा गंभीर आरोप उदयनराजेंनी केला आहे.

प्रांताधिकारी किशोर पवार यांनी वाळू माफियांविरोधात कारवाई सुरू केली असून वाळू माफियांचे 52 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. तर 29 ट्रक्स आणि 20 बोटीही जप्त केल्या आहेत. या कारवाई दरम्यान वाहतूकदार सचिन पवार जखमी झाला आहे. मात्र प्रांताधिकाऱ्यांची कारवाई योग्य नसल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला आहे. त्यांनी आज जखमी सचिन पवारची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसंच प्रांताधिकाऱ्यांच्या कारवाईविरोधात उद्या कराड बंदंच आवाहन केलं आहे.

प्रांताधिकारी मनमानी करुन जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच शासकीय कर्मचाऱ्यांनी सैराट होऊ नये. असा इशाराही उदयनराजेंनी दिला.
===============================

एटीएममध्ये जाताना सावध, चोरट्यानं पैसे काढताना एकाला भोसकलं

एटीएममध्ये जाताना सावध, चोरट्यानं पैसे काढताना एकाला भोसकलं
औरंगाबाद: तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण एटीएमच्या मशीनमधून पैसे लुटण्याचा एक धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राजस्थानमधील जोधपूर शहरामध्ये दलपतसिंह हे एटीएममधून पैसे काढत होते. त्यावेळी त्यांच्या पाठोपाठ तोंडावर कपडा बांधून एक तरुण एटीएममध्ये शिरला. दलपतसिंह पैसे काढण्यात मग्न असताना या तरुणानं चाकूच्या सहाय्यानं त्यांच्यावर हल्लाबोल केला.

अचानक झालेल्या हल्ल्यानं दलपत बिथरला. पण लगेच सावरत त्यानं प्रतिकार केला. दलपतनं आरडाओरडा केल्यानं चोरानं पळ काढला आणि दलपत बचावला.

जोधपूरमधली ही कहाणी सविस्तर सांगण्याचा उद्देश तुम्हाला सावध करणं हा आहे. कारण असे प्रकार याआधीही घडले आहेत. कदाचित तुमच्यासोबतही घडू शकतात. त्यामुळे थोडी काळजी घेणं गरजेचं आहे.
===============================

पोस्टल पेमेंट बँकेसाठी लोगो, टॅगलाईन सूचवा आणि 50 हजार रुपये जिंका!

पोस्टल पेमेंट बँकेसाठी लोगो, टॅगलाईन सूचवा आणि 50 हजार रुपये जिंका!
नवी दिल्ली : टपाल विभागाने आपल्या प्रस्तावित पेमेंट बँकेच्या ‘लोगो डिझाईन’ आणि ‘टॅगलाईन’साठी खास स्पर्धा जाहीर केली आहे. सर्वोत्तम लोगो डिझाईन आणि टॅगलाईन सूचवणाऱ्या विजेत्याला टपाल विभागाकडून 50 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

“टपाल विभागाच्या माय गाव वेबसाईटवर 10 जूनला ‘लोगो डिझाईन’ आणि ‘टॅगलाईन’साठी स्पर्धा सुरु केली आहे. भारतीय टपाल विभागाने पेमेंट बँकेसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.”, अशी माहिती टपाल विभागाने दिली.

स्पर्धेचं स्वरुप कसे असेल?

टपाल विभागाच्या माहितीनुसार, सर्वोत्तम लोगो आणि टॅगलाईनला 50 हजार रुपयांचं बक्षीस दिले जाईल. प्रख्यात डिझाईनर, तज्ज्ञ आणि प्रतिष्ठित इंजिनियर्सची एक समिती 20 सर्वोत्तम स्पर्धकांची निवड करतील. विजेत्यांच्या निवडीनंतर माय गाव प्लॅटफॉर्मवर वोटिंगसाठी ठेवले जातील. वोटिंगमधून विजेता ठरलेला विजयी म्हणून घोषित केला जाईल. याआधी एक रुपयाचं निशाण आणि स्वच्छ भारत लोगोसाठी अशाप्रकारची स्पर्धा घेतली होती.
===============================

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे.

राज्यातील 26 जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ह्या पुढील वर्षाच्या सुरुवातीला होत आहेत. या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जातात.

जिल्ह्यावर नियंत्रण कोणत्या पक्षाचं आणि अध्यक्षपदी कोण, याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. अखेर आज ही सोडत जाहीर झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण कोणत्या सामाजिक घटकासाठी आहे हे पाहून राजकीय पक्ष आपले डावपेच आखतात.
===============================

महामार्गावरील अपघात टाळायचाय ? तर हे पाळा.


  •  ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 11 - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांचा अतिवेग जीवघेणा ठरत असून, या मार्गावर वेगाशी सुरू असलेली स्पर्धा अनेक अपघातांना आणि अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे. काही दिवसांपूर्वी लक्झरी बस, इनोव्हा आणि स्विफ्ट कार यांच्यात भीषण अपघात होऊन १७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण जखमी झाले होते.
    गेल्या काही महिन्यांत या महामार्गावर अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता मुंबई-पुणे महामार्गावर अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी सरकारी यंत्रणाही कमी पडत आहेत. ते टाळण्यासाठी आपणच काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र त्यासाठी आपल्यालाही काही गोष्टी कटाक्षानं पाळाव्या लागणार आहेत. काय आहेत त्या गोष्टी जाणून घेऊ या. 


===============================

रुग्णाच्या दोनच नातेवाइकांना प्रवेश


  • मुंबई : रुग्ण दगावल्यावर रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी आणि महापालिका रुग्णालयांत केवळ दोनच नातेवाइकांना रुग्णाला भेटण्याची मुभा द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकार व महापालिकांना दिला.
    याच महिन्यात नागपूर व मुंबईच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याच्या घटना शुक्रवारी मार्डच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या. त्यावर खंडपीठाने ही बाब गंभीर असून, यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे, असे म्हटले. आम्ही आदेश दिल्यानंतरही अशा घटना घडल्या असतील तर राज्य सरकारला उत्तर देणे बंधनकारक आहे. वास्तविकता प्रत्येक सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये २४ तास पोलीस बंदोबस्त असणे आवश्यक आहे. राज्य सरकारने याचा विचार करावा. तसेच या रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसवून कंट्रोल रूमही असाव्यात, अशी सूचना उच्च न्यायालयाने सरकारला केली. डॉ. तात्याराव लहाने यांच्या विरोधात अफाक मालविया यांनी केलेल्या याचिकेतही हा मुद्दा
    आहे.
===============================

चित्रपट प्रमाणपत्राचे धोरणअधिक मुक्त !


  • नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत चित्रपट प्रमाणपत्र देण्यासंबंधी नियम अधिक मुक्त करण्यासह काही आमूलाग्र बदलांची घोषणा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे.
    केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळाने(सीबीएफसी) अर्थात सेन्सॉर बोर्डाने सध्या वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटातील ८९ दृश्यांना कात्री लावल्याच्या विरोधात निर्मात्यांनी चित्रपट प्रमाणपत्र अ‍ॅपिलेट लवादाकडे (एफसीएटी) दाद मागितली आहे.
    या चित्रपटाचे १७ जून रोजी प्रदर्शन ठरले असून त्याच दिवशी लवादाकडून सुनावणीची शक्यता आहे. उडता पंजाबच्या वादाबद्दल विचारण्यात आले असता जेटली म्हणाले की, मी हा चित्रपट बघितला नसल्यामुळे काहीही सांगू इच्छित नाही.
    वादाचे कारण ठरलेले हे प्रकरणही मला माहीत नाही. चित्रपट प्रमाणपत्र देण्यासंबंधी सध्याच्या पद्धतीबाबत मी समाधानी नाही. त्यात बदल केले जातील. श्याम बेनेगल यांनी त्यावर अभ्यासपूर्ण अहवाल दिला आहे. त्याचा पहिला भाग माझ्याकडे आला असून तो सरकारच्या विचाराधीन आहे. येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण बदलांबाबत घोषणा केली जाईल.
===============================

दोन वर्षांत १00 स्टार्टअप गावे बनवणार


  • सुरेश भटेवरा,
    नवी दिल्ली- येत्या २ वर्षांत १00 स्टार्टअप गावे बनवण्याचा मोदी सरकारचा संकल्प आहे. निती आयोगाने त्यासाठी एक अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे.
    या गावांमधे नव्या उद्योजकांनी जैव इंधन,अ‍ॅनिमेशन, वेस्ट मॅनेजमेंट, आरोग्य सेवा तसेच रोगनिदान उपकरणांचे उत्पादन, शिक्षण, शिक्षणोपयोगी साहित्य निर्मिती इत्यादी क्षेत्रांमधे आपल्या उद्योगांची उभारणी करावी असा सरकारचा हेतू आहे. स्टार्ट अप गावे बनवण्यासाठी मार्च २0१८ ची डेडलाईन ठरवण्यात आली आहे. छोट्या शहरात नव्या उद्योजकांना आपले उद्योग उभारण्याची संधी मिळावीआणि देशात रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने निती आयोगाच्या ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अजेंड्यात १00 स्टार्टअप गावे व ५00 इनक्युबेशन सेंटर्स तयार करण्याचा संकल्प असून सरकारने त्या दिशेने जय्यत तयारी सुरू केली आहे.
    केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या उद्योजकांच्या ५ वर्षांपेक्षा अधिक जुनी नसलेल्या व उलाढाल २५ कोटींच्या जवळपास असलेल्या खासगी वा भागीदारी संस्था कायद्यानुसार नोंदलेल्या कंपनीला सरकारच्या स्टार्टअप प्रवर्गात प्रवेश करण्यास ँ३३स्र://२३ं१३४स्र्रल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर आपली नोंदणी करता येईल.
===============================

उडता मोदी - 2 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 38 वा विदेश दौरा


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 10 - अमोघ वक्तृत्वाच्या बळावर अमेरिकी संसदेलाही डोलवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दोन वर्षातला अडतिसावा विदेश दौरा होता. 32 देशांना मोदींनी एकदा भेट दिली, पाच देशांना दोन वेळा भेट दिली तर दशकभर व्हिसा नाकारलेल्या अमेरिकेला सर्वाधिक म्हणजे चार वेळा नरेंद्र मोदींनी भेट दिली. मेडिसन स्क्वेअर ते अमेरिकी सिनेट अशा सगळ्या स्तरांवर मोदींनी आपली छाप पाडली असून भारतीय जनमानसही मोदींमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर उंचावत असल्याचे मानत आहे.
    मोदींच्या विदेश दौऱ्यांची फलश्रुती वाढत्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये जशी दिसून आली आहे, तशीच ती मोठ्या प्रमाणावरील करार मदारांमध्येही दिसून आली आहे. उदाहरणार्थ...6 व 7 जून 2015 या बांग्लादेशला दिलेल्या भेटीमध्ये पंतप्रधानांनी बांग्लादेशसोबत तब्बल 22 करार मार्गी लावले. सीमाप्रश्नासारख्या अत्यंत महत्त्वाच्या करारासोबतच शिंपिंग, पाणीप्रश्न, वाहतूक, मानवी वाहतूक अशा अनेक करारांचा समावेश आहे.
===============================

मेमध्ये कारच्या विक्रीत किरकोळ घट


  • नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात मे महिन्यात कारच्या विक्रीत 0.८६ टक्का इतकी किरकोळ घट झाली, तर मोटारसायकलींची विक्री ३.५४ टक्क्यांनी वाढली. सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)ने ही माहिती दिली.
    मेमध्ये १,५८,९९६ इतक्या कारची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात १,६0,३७१ कारची विक्री झाली होती. याच महिन्यात ९,८५,१५८ इतक्या मोटारसायकलींची विक्री झाली. गेल्या वर्षी या खंडातील दुचाकी विक्रीचा आकडा ९,५३,३११ इतका होता.
    याच महिन्यात अन्य दुचाकी वाहनांच्या विक्रीत ९.७५ टक्क्यांनी वाढ होऊन १५,१५,५५६ इतक्या वाहनांची विक्री झाली. व्यावसायिक वाहनांची विक्रीही १६.८९ टक्क्यांनी वाढून ५७,0८९ इतक्या वाहनांची विक्री झाली. याशिवाय विविध विभागांत वाहनांची विक्री ९.८९ टक्क्यांनी वाढून १८,५0,७६४ इतक्या वाहनांची विक्री झाली. मे २0१५ मध्ये हा आकडा १६,९४,२६३ इतका होता.
    ग्रामीण भागातून अजूनही अपेक्षेएव्हढी मागणी नाही. दोन-तीन वर्षांत कमी पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील मागणीत घट झाली आहे. त्यात सुधारणा होण्याचे संकेत आहेत.
===============================
मदतीसाठी ज्यूडिथचे कुटुंबीय सुषमा स्वराजांकडे


कोलकता - काबूल येथून गुरुवारी अपहरण करण्यात आलेली भारतीय महिला ज्यूडिथ डिसूझा हिच्या सुखरुप सुटकेसाठी तिच्या कुटुंबीयांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली आहे. सुषमा स्वराज यांनीही तिच्या सुटकेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

काबूल येथे एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेसाठी काम करत असलेल्या ज्यूडिथचे गुरुवारी रात्री अपहरण करण्यात आले. ज्यूडिथ येत्या 15 जूनला एक महिन्याच्या सुटीसाठी भारतात येणार होती. कोलकता येथे राहणारे तिचे कुटुंबीय तिच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. पण, तिचे अपहरण झाल्याचे समजल्यानंतर आता तिच्या कुटुंबीयांनी मदतिची मागणी केली आहे.

ज्यूडिथची मोठी बहिण अॅग्नेस डिसूझा म्हणाली," दोन दिवसांपूर्वी आमचे तिच्याशी फोनवरून बोलणे झाले होते. ती येणार म्हणून आम्ही सगळे खूप खूष होतो. ज्यूडिथ गेल्या एका वर्षापासून अफगाणिस्तानातील आगा खान डेव्हलपमेन्ट नेटवर्कसाठी सामाजिक विकास अधिकारी म्हणून काम करत होती. पण तिने कधीही स्वतःच्या सुरक्षितते विषयी काळजी व्यक्त केली नव्हती. खरे तर तिला काबूलमध्ये राहणे आणि तिथे काम करणे आवडत होते. 
===============================
देशच सेन्सॉर बोर्ड बनला आहे- इरफान खान

मुंबई - ‘उडता पंजाब‘ या चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकाला आपला पाठींबा देत बॉलीवूड अभिनेता इरफान खानने देखील सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाला विरोध दर्शवत, संपूर्ण देशच सेन्सॉर बोर्ड बनला असल्याचे म्हटले आहे.

सेन्सॉर बोर्डाने अभिषेक चौबे दिग्दर्शित उडता पंजाब या आगामी चित्रपटातील बऱ्याच दृश्यांना कात्री लावण्याचे सांगितल्याने या चित्रपटाचे निर्माते आणि सेन्सॉर बोर्डामध्ये वाद निर्माण झाला आहे. चित्रपटातील कल्पकतेला सेन्सॉर बोर्ड कात्री लावत असल्याचा आरोप चित्रपट सृष्टीतील दिग्गजांनी केला आहे. इरफान खानने ‘मदारी‘ या त्याच्या आगामी चित्रपटातील एका गाण्याच्या म्युझिक लॉंचवेळी आपले मत व्यक्त केले.

संपूर्ण देशच सेन्सॉर बोर्ड बनला असल्याचे सांगत इरफान म्हणाला की, "कोणी जर एखाद्या विषयावर आपले मत व्यक्त केले, तर त्याचावर लगेचच वाद निर्माण जातो. अशाने संपूर्ण देशच सेन्सॉर बोर्ड बनला आहे. मला अडचण या गोष्टीची आहे की, आपल्याला हेच माहिती नाही की चित्रपट परीक्षण मंडळ हे चित्रपटाला प्रमाणपत्र देणारे मंडळ आहे की सेन्सॉर बोर्ड. त्यांचे चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्याचे नसून चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याचे आहे".
===============================
‘यिन’ प्रतिनिधींच्या पाठीवर मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप

मुंबई - विद्यापीठ सुधारणा कायदा, पाणीपुरवठा, दुष्काळ, शिक्षण व युवा धोरणासारख्या महत्त्वाच्या विधेयकांवरील सविस्तर चर्चा, या प्रश्‍नांवर प्रत्येक मंत्र्याकडून झालेले अभ्यासपूर्ण विश्‍लेषण, भविष्याचा घेतलेला वेध आणि त्यासंबंधी हरकती आणि सूचनांसह ठरविलेल्या उपाययोजनांनी ‘यिन’ मंत्रिमंडळाचे पहिले अधिवेशन गाजले. सभागृहात निवेदन करताना एखाद्या फर्ड्या संसदपटूलाही लाजवील, अशा विद्यार्थी मंत्र्यांच्या आत्मविश्‍वासाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच प्रमुख मान्यवरांनी भरभरून दाद दिली.

समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या यिन मंत्रिमंडळाचे पहिले अधिवेशन मुंबईत मोठ्या उत्साहात झाले. निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी या अधिवेशनासाठी प्रतिराज्यपाल, तर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी अध्यक्षाच्या भूमिकेत होते. राज्यभरातील महाविद्यालयांतून निवडून आलेले विद्यार्थी प्रतिनिधी, यिन मंत्रिमंडळ व जिल्ह्यांचे पालकमंत्री या अधिवेशनात सहभागी झाले होते. 

अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी वेगवेगळ्या खात्याचे मंत्री म्हणून अतिशय आत्मविश्‍वासाने प्रश्‍न मांडत होते. त्यांच्यातील ही उमेद अधिवेशनानिमित्त उपस्थित राहिलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, गायक पंकज उधास, निवृत्त न्यायमूर्ती प्रमोद कोदे, राजकीय विश्‍लेषक अभिनंदन थोरात, आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू युवराज वाल्मीकी या दिग्गजांना भावली.

‘यिन’च्या अधिवेशनात महाराष्ट्राच्या भावी पिढीने कृषी, स्मार्ट सिटी, जलयुक्त शिवार, महाविद्यालयीन निवडणुकांवर मांडलेले विचार आणि त्यांचे प्रयोग अभ्यासपूर्ण होते.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
===============================
मार्केटिंग भारी; पण माल खराब- शरद पवार

शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र 
मुंबई - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्केटिंग करण्यात पटाईत आहेत. काही जणांमध्ये मार्केटिंग करण्याचा जन्मतःच गुण असतो; पण त्यांचे मार्केटिंग भारी असले, तरी माल मात्र खराब आहे,‘‘ अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली. षण्मुखानंद सभागृहात सतराव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई विभागीय राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

धोक्‍याचे सोळावे वर्ष सरले, आता दिवस बदलू लागलेत, असा विश्‍वास व्यक्‍त करत आगामी मुंबई महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी आक्रमक पक्षबांधणीला सज्ज राहावे, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

केंद्र सरकारची दोन वर्षे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर पवार यांनी सडकून टीका केली. परदेशांत जाऊन देशाची बदनामी करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान असून ते परदेशांत भारताचे नाही तर भाजपचे पंतप्रधान म्हणूनच जातात की काय, असा सवाल त्यांनी केला. दोन वर्षांत केवळ जाहिराती अन्‌ मार्केटिंग यांचाच बोलबाला असून, प्रत्यक्ष काहीही फरक पडलेला नाही. त्याउलट कृषी उत्पादन घटले, देशाची निर्यात घटली. परिणामी कारखानदारीतले उत्पादन घटले, त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाल्याचा दावा शरद पवार यांनी केला. लोकसभेत असलेली मोदी लाट आता ओसरत आहे. देशात नाही; पण परदेशांत जाऊन तिथल्या भारतीयांसमोर भाषण ठोकून देशाच्या जनतेची दिशाभूल सुरू असल्याचा टोलाही पवार यांनी लगावला. 
===============================
'हे खंडोजी खोपडे अन्‌ सूर्याजी पिसाळचे सरकार!'
-

मुंबई - राज्यातील सरकार ना निजामाच्या बापाचे आहे ना औरंगजेबाचे. कर्जमाफी, स्वस्ताईसारख्या आश्वासनांपासून घूमजाव करून जनतेशी बेईमानी करणारे हे सरकार खऱ्या अर्थाने खंडोजी खोपडे व सूर्याजी पिसाळचे सरकार आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर केली.

सरकारमधील प्रमुख पक्ष भाजप आणि शिवसेनेमधील शाब्दिक वादावर आज नगर येथे त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, की पुढील आठवड्यात पाऊस सुरू होईल. शेतकऱ्यांना खरिपाच्या लागवडीसाठी पुरेशी मदत करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. अजूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झालेले नाही. राज्याच्या कृषी विभागाला मंत्री नाही. "महाबीज‘ने बियाण्यांची दरवाढ केली आहे. बाजारात बनावट बियाण्यांचा सुळसुळाट वाढत असल्याच्या बातम्या येत आहेत. या परिस्थितीत शेतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी भाजप-शिवसेना एकमेकांची उणी-दुणी काढण्यात व्यस्त आहेत. हे चित्र पाहता, यांना शेतकरी आणि जनतेप्रती काहीही आस्था नसल्याचे स्पष्ट होते. जनतेसाठी हे सरकार निजाम आणि औरंगजेबापेक्षा जुलमी ठरले आहे.
सरकारवर टीका करताना विखे पाटील म्हणाले, की राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होत आहे. त्यामुळे कारभार पारदर्शी करण्याऐवजी मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांना मीडियाच्या "स्टिंग‘पासून सावध राहण्याचा इशारा देतात. याचाच अर्थ भ्रष्टाचार करायचा असेल तर करा, पण सांभाळून करा, अशी खुली सूट मंत्र्यांना देण्यात आली आहे.
===============================
पुण्यात ओबीसी, कोल्हापुरात खुले

जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षण सोडत जाहीर 
मुंबई - मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या राज्यातील 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणासाठी आज सोडत काढण्यात आली असून, पुणे जिल्हा परिषदेवर ओबीसी, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदावर खुल्या प्रवर्गातील उमेदवार विराजमान होतील.

येत्या ऑक्‍टोबर ते मार्च 2017 या कालावधीत राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडसह दहा महापालिका, 26 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 297 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांकडे विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम म्हणून बघण्याची राजकीय पक्षांची परंपरा आहे. स्थानिक पातळीवर ज्या पक्षाची सत्ता येते, तेथील विधानसभेची जागा सहजपणे जिंकता येत असल्याचा अनुभव असल्याने सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकांचा कार्यक्रम दोन महिन्यांच्या कालावधीत कधीही जाहीर होऊ शकतो. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार राज्य सरकारने जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण आज जाहीर केले.

जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण असे - 
- अनुसूचित जाती - भंडारा, अमरावती
- अनुसूचित जाती महिला राखीव - हिंगोली, नागपूर
- अनुसूचित जमाती महिला - नंदुरबार, ठाणे, गोंदिया
- अनुसूचित जमाती - वर्धा, पालघर
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी ) - अकोला, उस्मानाबाद, धुळे, पुणे
- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी ) - जळगाव, बुलडाणा, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ
- सर्वसाधारण प्रवर्ग महिला - सातारा, रत्नागिरी, नाशिक, रायगड, नगर, सोलापूर, लातूर, वाशीम
- सर्वसाधारण प्रवर्ग - जालना, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड, सांगली 
===============================
पाकने अमेरिकेची 'ड्रोन' पाडावीत - सईद

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या हवाई हद्दीत येणारी अमेरिकी ड्रोन पाकिस्तानी लष्कराने हल्ला करून पाडून टाकावीत, असे आवाहन जमात उद दावा (जेयूडी) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हाफीज सईद याने शुक्रवारी केले. त्याच्यावर अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. तरीही सईदने आज येथील मशिदीत झालेल्या प्रार्थनेत उघडउघड सहभाग घेतला व गरळ ओकणारे भाषण केले.

मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार असलेला सईद म्हणाला, ‘पाकिस्तानच्या हवाई हद्दीत येणारी अमेरिकी ड्रोन हल्ला करुन पाडून टाकावीत, असे आवाहन मी पाकिस्तानच्या लष्करप्रमुख व हवाई दलप्रमुखांना करतो.‘‘

गेल्या 21 मे रोजी झालेल्या ड्रोन हल्ल्यात अफगाण तालिबान दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मुल्ला अख्तर मन्सूर मारला गेला होता. त्याच्या निषेधार्थ सईद याने पाकिस्तानातील अनेक शहरांत निदर्शने आयोजित केली आहेत. त्यामध्ये तो भाषणे करण्याची शक्‍यता आहे. मन्सूरच्या मृत्यूनंतर अमेरिका व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. त्यानंतरच प्रथमच अमेरिकेचे पाकिस्तान व अफगणिस्तानमधील प्रतिनिधी रिचर्ड ओल्सन पाकिस्तान भेटीवर येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सईदने हे भाषण केले आहे.
===============================

No comments: