Thursday, 16 June 2016

नमस्कार लाईव्ह १६-०६-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- आज जर फेसबुक सुरु केलं असतं तर असं नसतं : झुकरबर्ग 
२- पॅरीसअतिगरम कॉफीमुळे कॅन्सरची शक्यता - जागतिक आरोग्य संघटना 
३- चीनमध्ये मुसळधार पावसामुळे 10 जणांचा मृत्यू तर 13 बेपत्ता 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- अहमदाबाद, माणसाच्या शिकारीप्रकरणी 18 सिंह गजाआड, दोषी ठरल्यास आजन्म कैद 
५- पाच बँकांच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारचा हिरवा कंदील 
६- पाचपैकी एका वडिलधारी व्यक्तीवर अत्याचार होत असल्याचं सर्व्हेतून स्पष्ट 
७- अलका लांबा 'आप' प्रवक्ते पदावरून निलंबित 
८- स्वामींचा राजन, आरबीआयवर भ्रष्टाचाराचा आरोप 
९- पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागलं  
१०- दाभोलकर हत्येसाठी गोळ्या बेळगावातून 
११- विमानाला पक्षी धडकल्यानंतर इंडिगोच्या कोलकाता - भुवनेश्वर - मुंबई विमानाचं इमर्जन्सी लॅडिंग 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- जळगाव; कारखान्यासाठी गिरीश महाजनांनी 5 एकर जमीन लाटली : काँग्रेस 
१३- मुंबईतील रस्ते घोटाळ्यात मोठी कारवाई, 10 लेखा परीक्षकांना अटक 
१४- अहमदनगर; विखे पाटलांच्या वाढदिवसाला पोलिसांकडून पोस्टर, कारवाईची मागणी 
१५- विमान प्रवास आता सामान्यांच्या आवाक्यात 
१६- खडसेंनंतर आता गिरीश महाजनांचा भुखंड घोटाळा 
१७-  'करुन दाखवलं' म्हणणारेही तुरुंगात जातील, शेलारांचा शिवसेनेला टोला 
१८- 20 मिनिटं उरलीत, जाऊ नका, काँग्रेसच्या मोर्चाचा बोजवारा 
१९- पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्याचा दाभोलकर हत्येशी संबंध? 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- मुंबई; आमदार सदा सरवणकर अडचणीत, शूटिंग करणाऱ्यावर उचललेला हात महिलेला लागला 
२१- यवतमाळ; सेनेच्या जि.परिषद सदस्याची गुंडागिरी, बँक कर्मचाऱ्याच्या भडकावली कानशिलात 
२२- देहरादून; मृत्यू झाल्यानंतर 7 वर्षांनी लष्करी जवान घरी परतला 
२३- आसामचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दत्ता यांचे निधन 
२४- द्रुतगती मार्गावर अपघातामुळे वाहतूक कोंडी 
२५- पनवेलमधील शिरढोणी येथील टायरच्या गोडाऊनला आग. 
२६- उत्तरप्रदेश - जौनपूर जिल्ह्यात कार अपघातात तिघांचा मृत्यू तर चार जखमी. 
२७- पुण्यात पीएमपीची बस थेट सलूनमध्ये, चालकासह काही जखमी 
२८- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पाच वाहनांचा विचित्र अपघात 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- नव्या सिनेमासाठी आकाशचं लपून-छपून शूटिंग
३०- 30 व्या वर्षी पहिली वन डे; विदर्भाच्या फैझ फजलची ओळख 
३१- रिलीजआधी 'उडता पंजाब' टोरेंटवर लीक, गुन्हा दाखल 
३२- सचिन, सौरव आणि लक्ष्मण निवडणार टीम इंडियाचा कोच! 
३३- झिम्बाब्वेला व्हाईटवॉश... तब्बल दहा गडी राखून टीम इंडिया विजयी 
३४- जगभरात सॅमसंगने अॅपलला टाकलं मागे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३५- मुखेड; भ्रष्टाचार बंद, विकासकामे सुरु - केंद्रीय राज्यमंत्री बंडारू दतात्रय 
३६- शेतकऱ्याचा जीव टांगणीला; मान्सून लांबला 
३७- पेठवडज; शवविच्छेदनासाठी डॉक्टर नसल्याने प्रेत चार तास पडून 
३८- मृग नक्षत्राचा पाऊस लांबणीवर; भाजीपाला महागला 
३९- हैदरबाग परिसरात होणार सुसज्ज शहरी आरोग्य केंद्र; राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मान्यता 
४०- उद्या गोवर्धन घाट येथे चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/03/dhingcyak-fresh-2016.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
=====================================

आज जर फेसबुक सुरु केलं असतं तर असं नसतं : झुकरबर्ग

आज जर फेसबुक सुरु केलं असतं तर असं नसतं : झुकरबर्ग
मुंबई : फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांने पहिल्यांदा फेसबुक लाईव्ह फिचरचा वापर करून फेसबुक यूजर्सच्या प्रश्नांना लाईव्ह उत्तरं दिली. यावेळी त्यांनी व्हर्च्युअल रिअॅलिटी, आर्टिफीशअल इंटिलिजन्स, फेसबुकमध्ये भविष्यात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा आदींवर चर्चा केली.

यावेळी त्यांनी भविष्यातही फेसबुक पूर्णपणे मोफतच असेल हे स्पष्ट केलं. मंगळवारी मध्यरात्री 12 वाजता एक तास हा कार्यक्रम झाला.

एका यूजरने आज फेसबुक सुरु केले असते तर त्याचे काय स्वरुप असते असा प्रश्न केला. यावर उत्तर देताना त्याने सांगितले की, जर मला जंगलातही नेऊन सोडले तरी माझे लोकांना जोडण्याचे काम चालूच असतं, असे उत्तर दिले.
=====================================

माणसाच्या शिकारीप्रकरणी 18 सिंह गजाआड, दोषी ठरल्यास आजन्म कैद

माणसाच्या शिकारीप्रकरणी 18 सिंह गजाआड, दोषी ठरल्यास आजन्म कैद
अहमदाबाद : सामान्यत: एखाद्या व्यक्तीने खून केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. त्यानंतर त्याच्यावर खटला चालतो आणि त्याला शिक्षा ठोठावण्यात येते. पण पहिल्यांदाच एखाद्या जनावरावर हत्येचा आरोप करुन गजाआड करण्यात आला आहे. माणसांच्या शिकारीबाबत पहिल्यांदाच सिंहांना कैद करण्यात आलं आहे. इतकचं नव्हे तर हत्येसाठी आरोपी ठरलेल्या एकूण 18 सिंहांना कैदेतही ठेवण्यात आलं आहे. गुजरातच्या अहमदाबादच्या सासणमध्ये ही घटना घडली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अहमदाबादजवळच्या आबंरडी, कोदिया आणि दूधिया गावांमध्ये या सिंहांची दहशत होती. 3 महिन्यात या सिंहांनी 4 जणांची शिकार केली, तर 6 जणांना गंभीर जखमी केलं. यानंतर वन विभागाने कारवाई करत 18 सिंहांना पकडलं आणि सगळ्यांना कैदेत ठेवलं आहे.
तपासानंतर या 18 सिंहांपैकी जे सिंह नरभक्षक असतील, तसंच ज्यांनी माणसांची शिकार केली आहे, त्यांना दोषी ठरवून आजन्म कैदेत ठेवलं जाईल.
=====================================

कारखान्यासाठी गिरीश महाजनांनी 5 एकर जमीन लाटली : काँग्रेस

कारखान्यासाठी गिरीश महाजनांनी 5 एकर जमीन लाटली : काँग्रेस
जळगाव : विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्यापाठोपाठ आता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाच एकर जमीन लाटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मानपूर गावातील पाच एकर जमीन गिरीश महाजन यांनी 2002 मध्ये कारखान्यासाठी केली होती. मात्र या जमिनीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात न केल्याने महाजनांनी निवडणूक शर्तींचा भंग केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
या कारखान्यात शेतकऱ्यांना नोकरु देऊ असं आश्वासन ही जमीन खरेदी करताना गिरीश महाजन यांनी दिलं होतं.  पण प्रत्यक्षात मागील 16 वर्षात या पाच एकर जमिनीवर ना कारखाना उभा राहिला, ना शेतकऱ्यांना रोजगार मिळाला, असंही काँग्रेसने म्हटलं आहे.
=====================================

नव्या सिनेमासाठी आकाशचं लपून-छपून शूटिंग

नव्या सिनेमासाठी आकाशचं लपून-छपून शूटिंग
मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटामुळे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु रातोरात स्टार बनले. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरश: वेडे होतात. मात्र याचा फटका त्यांच्या खासगी आयुष्यालाही बसत आहे. आकाशच्या दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगवर याचा परिणाम जाणवत आहे.
महेश मांजरेकर यांच्या ‘FU’ या आगामी सिनेमात आकाश ठोसर काम करत आहे. सिनेमाची शूटिंग महाराष्ट्राच्या विविध भागात सुरु आहे. परंतु चाहत्यांच्या गर्दीमुळे आकाशला प्रचंड पोलिस बंदोबस्तात राहावं लागत आहे.
=====================================

30 व्या वर्षी पहिली वन डे; विदर्भाच्या फैझ फजलची ओळख

30 व्या वर्षी पहिली वन डे; विदर्भाच्या फैझ फजलची ओळख
फोटो सौजन्यः फेसबुक
मुंबईः झिम्बाब्वेविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका भारताने 3-0 अशी जिंकली. हरारे येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात फैझ फजल या युवा खेळाडूला पदार्पणाची संधी देण्यात आली. फजलने संधीचा फायदा घेत पदार्पणातच अर्धशतक झळकावून भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
=====================================

मुंबईतील रस्ते घोटाळ्यात मोठी कारवाई, 10 लेखा परीक्षकांना अटक

मुंबईतील रस्ते घोटाळ्यात मोठी कारवाई, 10 लेखा परीक्षकांना अटक
मुंबई : मुंबईतील रस्ते घोटाळा प्रकरणात अटकेची पहिलीच मोठी कारवाई करण्यात आली आहे. या रस्ते घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या दहा लेखा परीक्षकांना अटक करण्यात आली आहे. आझाद मैदान पोलिसांनी रात्री उशिरा ही कारवाई केली आहे.
कंत्राटदारांनी दिलेली बिलं न पडताळता महापालिकेला सादर केल्याचा आरोप लेखा परिक्षकांवर आहे. या अटकेनंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली असून कंत्राटदारांचे धाबे दणालले आहेत. आता यापुढची कारवाई पालिकेचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांवर होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील रस्ते बांधणीत 352 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीने मुंबईतील 34 रस्त्यांची पाहणी केली होती. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, काम अपूर्ण ठेवणे यांसह अनेक गंभीर बाबींचा उल्लेख या समितीने आपल्या अहवालात केला आहे.
=====================================

अतिगरम कॉफीमुळे कॅन्सरची शक्यता

अतिगरम कॉफीमुळे कॅन्सरची शक्यता
पॅरिसः तुम्ही कॉफीचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. तसंच चांगली बातमी देखील आहे. कॉफी प्यायल्याने कॅन्सर देखील होऊ शकतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. कॉफी 65 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गरम असेल तर कॉपी कॅन्सरचं कारण बनू शकते, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने सांगितलं आहे.
कोणतंही पेय 65 डिग्री पेक्षा जास्त गरम असेल तर त्याने कॅन्सर होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलं. आहे. कॉफी ही आरोग्यास हानिकारक नाही, मात्र अधिक गरम असल्यास कॅन्सरची शक्यता असल्याचं समोर आलं आहे.

कॅन्सरवर संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय एजन्सी आयएआरसी या संस्थेने देखील कॉफी जास्त गरम असल्यास कॅन्सर होण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला होता.
=====================================

विखे पाटलांच्या वाढदिवसाला पोलिसांकडून पोस्टर, कारवाईची मागणी

विखे पाटलांच्या वाढदिवसाला पोलिसांकडून पोस्टर, कारवाईची मागणी
अहमदनगरः विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांनी दैनिकात जाहिरात दिल्यानं वादंग उठलं आहे. नगर जिल्हा पोलीस आणि लोणी पोलीस ठाण्याच्या वतीनं ही जाहिरात देण्यात आली आहे. काही दैनिकांनी विखे-पाटील यांची अभिष्टचिंतन वाढदिवस विशेष पुरवणी काढली आहे.
जाहिरातीमध्ये पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन पगार यांची छबी झळकवत आहे. जाहिरातीत सुसंस्कृत व्यक्तिमत्व लोकसेवेतून निर्माण झालेला कर्तबगार नेता, असा उल्लेखही करण्यात आला आहे.
याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे कार्यकर्ते श्याम असावा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. पोलीस दलानं औचित्यभंग केल्यानं कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
=====================================

पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागलं

पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागलं
नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर पाच पैशांनी वाढलं असून डिझेल प्रति लिटर 1.26 रुपयांनी महागलं आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ झाली असून दोन महिन्यातील ही पाचवी दरवाढ आहे. यापूर्वी 1 जून रोजी पेट्रोल 2.58 रुपये आणि डिझेल 2.26 रुपयांनी महागलं होतं.  तर त्या याआधी 17 मे रोजी पेट्रोल 0.83 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 1.26 रुपये प्रति लिटर महागलं होतं. तर 30 एप्रिलला पेट्रोलचे दर प्रति लिटर 1.06 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 2.94 रुपयांनी  वधारले होते. तसंच 5 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते.

दरम्यान देशात 1 जूनपासून कृषी कल्याण सेस लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व्हिस टॅक्स 14.5 टक्क्यांवरुन 15 टक्के झाला आहे. मोबाईल, डीटीएच, वीज, पाणी यांचं बिल, रेस्टॉरंटमधील जेवण, रेल्वे आणि विमानाचं तिकीट, बँकिंग, विमा सेवाही महागल्या आहेत. आता पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे.
=====================================

रिलीजआधी 'उडता पंजाब' टोरेंटवर लीक, गुन्हा दाखल

रिलीजआधी 'उडता पंजाब' टोरेंटवर लीक, गुन्हा दाखल
मुंबई : प्रदर्शनाच्या ‘उडता पंजाब’ हा वादग्रस्त सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. याविरोधात सिनेमाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला आहे. चित्रपट उद्या म्हणजेच 17 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.


प्रदर्शनाआधी सिनेमा ऑनलाईन लीक होणं हा निर्मात्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे.
=====================================

पाच बँकांच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारचा हिरवा कंदील

पाच बँकांच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारचा हिरवा कंदील
मुंबई : देशातील पाच मोठ्या बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

प्रस्तावित पाच बँकांमध्ये स्टेट बँक बिकानेर आणि जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटियाला , स्टेट बँक ऑफ मैसूर आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकांचे आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरणं करण्यात येणार आहे. याशिवाय भारतीय महिला बँकदेखील यापुढे स्टेट बँक ऑफ इंडियाचाच भाग असणार आहे.

केंद्राच्या या निर्णयामुळं स्टेट बँक आणि विलीनकरण होणाऱ्या बँकांचा मोठा फायदा होणार असल्याचं मत अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. पण दुसरीकडे विलीनीकरणाच्या बातमीनंतर या बँकांच्या शेअरमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
=====================================

सचिन, सौरव आणि लक्ष्मण निवडणार टीम इंडियाचा कोच!

सचिन, सौरव आणि लक्ष्मण निवडणार टीम इंडियाचा कोच!
मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या खांद्यावर बीसीसीआयनं टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी सोपवली आहे. सचिन, सौरव आणि लक्ष्मण या तिघांचा बीसीसीआयच्या त्रिसदस्यीय सल्लागार समितीत समावेश आहे.

या समितीला मुख्य समन्वयक म्हणून माजी सचिव संजय जगदाळे यांची जोड देऊन बीसीसीआयचं भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड भारतीय क्रिकेटच्या ‘बिग थ्री’वर सोपवली आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी देशविदेशातून तब्बल 57 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. बीसीसीआयच्या प्राथमिक निकषांनुसार त्यापैकी केवळ 21 अर्ज वैध ठरले आहेत.

प्रामुख्यानं या 21 जणांमधूनच टीम इंडियाच्या भावी मुख्य प्रशिक्षकांची निवड होईल. पण त्रिसदस्यीय समितीनं मागणी केल्यास त्यांना बाद झालेल्या उमेदवारांचे अर्जही दाखवण्यात येतील. दरम्यान, या समितीचा एक सदस्य सचिन तेंडुलकर सध्या देशाबाहेर आहे. पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बीसीसीआयनं निवडलेल्या या समितीला 22 जूनपर्यंत आपला अंतिम रिपोर्ट बीसीसीआय सचिव अजय शिर्केसमोर सादर करायचा आहे.
=====================================

झिम्बाब्वेला व्हाईटवॉश... तब्बल दहा गडी राखून टीम इंडिया विजयी

झिम्बाब्वेला व्हाईटवॉश... तब्बल दहा गडी राखून टीम इंडिया विजयी
हरारे: धोनीच्या टीम इंडियानं हरारेच्या तिसऱ्या वन डेत झिम्बाब्वेचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवून तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असं निर्भेळ यश मिळवलं. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यातही निर्विवाद वर्चस्व गाजवलं. जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्यासमोर झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली.

झिम्बाब्वेचा अख्खा डाव 43व्या षटकांत अवघ्या 123 धावांवर आटोपला. बुमरानं 10 षटकांत केवळ 22 धावा देऊन चार विकेट्स काढल्या. भारताकडून यजुवेन्द्र चहलनं दोन, तर धवल कुलकर्णी आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक विकेट काढली. मग सलामीच्या लोकेश राहुल आणि फैझ फजलनं 126 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

राहुलनं 70 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 63 धावांची खेळी उभारली, तर फैझ फझलनं 61 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद 55 धावांची खेळी रचली. फैझ फजलनं वन डे पदार्पणातच अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला.
=====================================

आमदार सदा सरवणकर अडचणीत, शूटिंग करणाऱ्यावर उचललेला हात महिलेला लागला

आमदार सदा सरवणकर अडचणीत, शूटिंग करणाऱ्यावर उचललेला हात महिलेला लागला
मुंबई: मुंबईमध्ये शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी एका महिलेवर हात उचलल्याचा प्रकार घडला आहे. ही घटनेची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शिवसेना आमदार सदा सरवणकर वरळीत नागरिकांशी संवाद साधत होते. त्यावेळी एक जण मोबाईलर शूटिंग करत होता. त्याला आक्षेप घेत सदा सरवणकर यांनी त्यांच्या मोबाइलवर हात उचलला. मात्र, तो हात तिथं उपस्थित असलेल्या एका महिलेला लागला.

तर आज यवतमाळमध्ये शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदेनं सेंट्रल बँकेच्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात भडकावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या दोन्ही घटना शिवसेनेची वाढलेली गुंडगिरी दर्शवतात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
=====================================

विमान प्रवास आता सामान्यांच्या आवाक्यात

विमान प्रवास आता सामान्यांच्या आवाक्यात!
नवी दिल्ली: तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आता विमान प्रवास रेल्वेच्या प्रवासापेक्षाही स्वस्त होणार आहे. कारण तासाभराच्या विमानप्रवासाठी यापुढे कुठल्याही एअरलाईन्स कंपनीला 2500 रुपयांपेक्षा अधिक भाडं आकारता येणार नाही. केंद्र सरकारच्या नव्या विमान वाहतूक धोरणांमध्ये यासंदर्भात तरतूद करण्यात आली होती आणि या धोरणाला मोदी सरकारनं मंजूरी दिली आहे. त्यामुळे विमानप्रवास करणाऱ्यांना ‘अच्छे दिन’ आल्याचं चित्र आहे.

– पुणे ते शिर्डी हा प्रवास अवघ्या अडीच हजारात करता येणार आहे.

– एक तासाचा अवधी असणाऱ्या विमान प्रवासासाठी आता 2500 रु. मोजावे लागणार

– अर्ध्या तासाचा अवधी असणाऱ्या विमान प्रवासासाठी आता 1250 रु. मोजावे लागणार

– ही नवी योजना जुलैच्या एक तारखेपासून लागू होणार आहे.

देशात 482 विमानतळं आहेत. पण यातील केवळ 77 विमानतळांवरुनच विमानं उड्डाणं घेतात. इतर विमानतळांची अवस्था फारच बिकट आहे. त्यामुळेच याचा विचा करुन ही नवी योजना सुरु करण्यात आली आहे.

पूर्वीच्या धोरणात प्रवाशांना जाच आणणारे अनेक नियम होते, ज्यामुळे विमान प्रवास अडचणीचा होता. सरकारने ऑक्टोबर 2015 मध्ये नवीन धोरणाचा मसुदा तयार केला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने विमानाचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
=====================================

सेनेच्या जि.परिषद सदस्याची गुंडागिरी, बँक कर्मचाऱ्याच्या भडकावली कानशिलात

सेनेच्या जि.परिषद सदस्याची गुंडागिरी, बँक कर्मचाऱ्याच्या भडकावली कानशिलात
यवतमाळ: सत्तेचा माज शिवसेना कार्यकर्ते आणि नेत्यांच्या नसानसात भिनल्याचं सध्या पाहायला  मिळत आहे. शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदेनं सेंट्रल बँकेच्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात भडकावल्याची घटना घडली आहे.

एका शेतकऱ्यानं पीक कर्जाची मागणी केली होती. मात्र पीक कर्ज मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यानं पैसे मागितल्याचा आरोप आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे आपल्या कार्यकर्त्यासह बँकेत पोहोचला. मात्र, संबंधित अधिकारी उपस्थित नसतानाही त्यानं तिथल्या एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात भडकावली.

त्यामुळं शेतकऱ्याच्या नावाखाली शिवसेनेची गुंडागर्दी का खपवून घ्यायची? असा सवाल विचारला जातो आहे.

‘काही वेळा कार्यकर्त्यांचा संयमाचा बांध सुटतो, पण तरीही प्रवीण शिंदेने अशी मारहाण करणं योग्य नाही. मी मारहाणीचं समर्थन करीत नाही. पण बँकेच्या कारभारामुळे शेतकरी वैतागले आहेत. पण कार्यकर्त्यांकडून असं टोकाचं पाऊल उचललं जातं.’ 
अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी दिली.
=====================================

जगभरात सॅमसंगने अॅपलला टाकलं मागे

जगभरात सॅमसंगने अॅपलला टाकलं मागे
याआधी लीक झालेल्या माहितीनुसार, या नव्या फॅबलेटचं डायमेंशन 153x745 आणि 7.8mm असणार आहे. नोट 5च्या तुलनेनं हा स्मार्टफोन आणखी स्लीम असेल.
मुंबई : दक्षिण कोरीयातील सॅमसंग कंपनीने गेल्या तीन महिन्यात स्मार्टफोन विक्रीचा नवा विक्रम केला आहे. तीन महिन्याच्या अकडेवारीवरून सॅमसंगच्या या वर्षभरात 32 कोटी स्मार्टफोन विक्रीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेतील एका कंपनीने केलल्या सर्वेक्षणानुसार सॅमसंगने गेल्या तीन महिन्यात 8.15 कोटी स्मार्टफोनची विक्री केली. तर दुसरीकडे याच कालावधीमध्ये अॅपलने 5.16 कोटी स्मार्टफोनची विक्री केली. सर्वाधिक स्मार्टफोनची विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये 12 चीनी कंपन्याचाही समावेश आहे.
या 12 कंपन्यांच्या यादीत मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीचाही समावेश आहे. कंपनीने गेल्या तीन महिन्यात 50 लाख स्मार्टफोनची विक्री केली. या आकडेवारीवरून वर्षभरात कंपनी 2.5 कोटी स्मार्टफोन विक्रीचा अंदाज बांधला जात आहे.

अॅन्ड्राइड डॉट कॉमने दिलेल्या रिपोर्टनुसार, चीनी कंपनी हुवाइ तिसऱ्या स्थानी, ओप्पो चौथ्या, शिओमी पाचव्या, विवो सहाव्या, झेडटीइ आठव्या, लिनोवो नवव्या, टिसीएल दहाव्या आणि मेजू अकराव्या स्थानी आहे.
सोनी, मायक्रोसॉफ्ट आणि कुलपॅडसारख्या कंपनी या टॉप 12 यादीतून बाहेर फेकल्या गेल्या आहेत. आयसी इनसाइटनुसार जगभरात स्मार्टफोनच्या विक्रीत पाच पटीने वाढ झाली आहे. चालू वर्षी 1.5 अरब स्मार्टफोनच्या विक्रीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
=====================================

खडसेंनंतर आता गिरीश महाजनांचा भुखंड घोटाळा


  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. 16 - विविध आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आणखी एका मंत्र्याचा भुखंड घोटाळा समोर आला आहे. भुसावळ जिल्ह्य़ातील मानपूर येथील जमीन खरेदीवरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांनी कारखाना काढण्याच्या नावाखाली पाच एकर जमीन लाटल्याचा आरोप होत आहे.
    लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार ‘तापीपूर्णा साखर कारखाना’ काढण्याच्या नावाखाली २००२ मध्ये गिरीश महाजन यांनी जमीन खरेदी केली होती. गिरीश महाजन यांनी वैयक्तिक नावावर पाच एकर जमीन फक्त १ लाख ११ हजार रुपयांमध्ये विकत घेतली. या कारखान्यात शेतकऱ्यांना नोकरी देऊ असं आश्वासन ही जमीन खरेदी करताना गिरीश महाजन यांनी दिलं होतं. विशेष म्हणजे एकनाथ खडसे हेच या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक होते. मात्र, या साखर कारखान्याची नोंदणीही झाली नाही आणि तो कधीच अस्तित्वातही आला नाही. 
=====================================

आश्चर्य ! मृत्यू झाल्यानंतर 7 वर्षांनी लष्करी जवान घरी परतला


  • ऑनलाइन लोकमत - 
    देहरादून, दि. 16 - अभिनेता अक्षय कुमार आणि अश्विनी भावे यांचा सैनिक चित्रपट तुम्हाला आठवतो का ? त्या चित्रपटात अक्षय कुमार लष्कराचा जवान असतो आणि एक दिवस मोहिमेदरम्यान अचानक गायब होतो. सर्वांना वाटतं त्याचा मृत्यू झाला आहे, पण एक दिवस तो अचानक सर्वांसमोर येतो. चित्रपटातील हुबेहूब अशीच घटना धरमवीर सिंग यांच्या आयुष्यात घडली आहे. 
    लष्कर जवान धरमवीर सिंग यांचा सात वर्षांपुर्वी अपघात झाला होता ज्यामध्ये त्यांची स्मृती हरवली होती. हरिद्वारमधील रस्त्यांवर ते भटकत होते. लष्करानेदेखील त्यांना मृत घोषित केलं होतं. आणि अचानक एक दिवस कोणीही विचार करु शकत नव्हतं असं काही झालं. दुस-या अपघातामुळे धरमवीर सिंग यांची स्मृती परतली आणि तब्ब्ल 7 वर्षांनी ते आपल्या घरी परतले. घरच्यांसाठी तर हा आश्चर्याचा धक्काच होता. 
    धरमवीर सिंग 2009 पासून बेपत्ता होते. नियमाप्रमाणे तीन वर्षानंतर लष्कराने त्यांना मृत घोषित केलं. 'माझा भाऊ लष्कराच्या वाहनाने प्रवास करत असताना चकारता येथे त्याचा अपघात झाला होता. त्याच्यासोबत अजून दोन जवानदेखील होते. गाडी डिव्हायडरवर चढून अपघात झाला होता. पण शोधूनदेखील मृतदेह सापडलाच नव्हता', अशी माहिती राम निवास यांनी दिली आहे. 
  • लष्कराने मृत्यूपत्र जारी केलं होतं, तसंच कुटुंबाला पेन्शनदेखील सुरु केली होती. कुटुंबाला धरमवीर सिंग जिवंत असतील याच्या फार कमी आशा होत्या. मात्र त्यांची पत्नी मनोज देवी यांना ते परत येतील असा विश्वास होता, त्यासाठी त्यांनी उपवासदेखील ठेवले होते.
    अपघातानंतर काय झालं मला काहीच आठवत नसल्याचं धरमीवर सिंग सांगतात. 'हरिद्वारमधील रस्त्यांवर ते भीक मागत होते, त्यावेळी एका दुचाकीने त्यांना धडक दिली. त्या व्यक्तीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा तिथे त्यांना भूतकाळ आठवला. त्यांची स्मृती परतली', अशी माहिती डॉक्टर राम निवास यांनी दिली आहे. 
    'अपघातानंतर त्या दुचाकीस्वाराने मला 500 रुपये दिले. त्या पैशांनी मी दिल्लीचं तिकिट काढलं, आणि माझ्या घरी पोहोचलो. मला आश्चर्याचा धक्काच बसला आहे. माझ्या मुलींना ओळखणं मला कठीण जात आहे. त्या किती मोठ्या झाल्या आहेत', असं धरमवीर सिंग सांगतात. त्यांची एक मुलगी दहावीत शिकत असून दुसरी बारावीत आहे. त्यांना कुटुंबियांनी जयपूरला उपचारासाठी आणलं आहे.
=====================================

पाचपैकी एका वडिलधारी व्यक्तीवर अत्याचार होत असल्याचं सर्व्हेतून स्पष्ट


  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि. 16 - काही दिवसांपुर्वी 60 वर्षीय महिला आपल्या 85 वर्षाच्या वृद्द आईला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या घटनेमुळे वृद्धांवर कुटुंबियांकडून होणारा अत्याचाराचा मुद्दा समोर आला होता. हेल्पेज इंडियाने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार पाचपैकी एका वृद्धाला किंवा वडिलधारी व्यक्तीला अशा कौंटुबिक अत्याचाराला सामोरे जावं लागत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी कायदा असूनदेखील 98 टक्के पिडीत व्यक्ती याची तक्रार करण्याच टाळत असल्याचंही सर्व्हेक्षणानुसार समोर आलं आहे.
    वडिलधारी व्यक्तीवर अत्याचार करणा-यांमध्ये अनेकदा कुटुंबियच असतात ज्यामध्ये मुलगी, मुलगा, सून यांचा समावेश असतो. 53.2 टक्के प्रकरणांमध्ये संपत्ती आणि वारसा हक्कावरुन वाद असल्याचं सर्व्हेक्षणानातून स्पष्ट झालं आहे. हेल्पेज इंडियाला दिल्लीत दिवसाला कमीत कमी अत्याचाराची तक्रार करणारे 150 फोन येतात.
    'अनेक फोन संपत्ती आणि पैशांच्या वादाशी संबंधीत असतात. अनेकदा शेजारी किंवा हितचिंतक आम्हाला फोन करुन याची माहिती देत असतात. वृद्द व्यक्ती स्वत:हून फोन करत नाहीत कारण त्याच्या परिणामांची त्यांना भीती असते. तर काहींना ही गोष्ट सगळ्यांसमोर आणायची नसते', अशी माहिती हेल्पेज इंडियाची हेल्पलाईन सांभाळणा-या गीतीका सेनगुप्ता यांनी दिली आहे.
    शक्यतो कुटुंबातीलच कोणी अत्याचाराची तक्रार करत नाही. पण अनेकदा नातवंड फोन करुन अशा घटनांची माहिती देतात असं एजवेल फाऊंडेशनच्या निदर्शनास आलं आहे.
    वृद्धांनी रस्त्यावर सोडून देण्याच्याही अनेक घटना समोर येत असतात. हेल्पेज इंडियाला येणा-या 150 फोनपैकी 6 फोन रस्त्यावर निराधार सापडलेल्या वृद्धांशी निगडीत असतात. 'काही लोक आम्हाला अशा वृद्धांची माहिती फोन करुन देतात. त्यानंतर आम्ही त्यांना वृद्धाश्रमात ठेवतो आणि त्यांच्या कुटुंबाचा शोधण्याचा प्रयत्न करतो', असं गीतीका सेनगुप्ता यांनी सांगितलं आहे.
    वडिलधारी व्यक्तींच्या सुरक्षेसाठी पालक व ज्येष्ठ नागरिक संगोपन व संवर्धन कायदा 2007 अंमलात आणण्यात आला आहे. पण अनेकांना याची माहितीच नाही आहे. 
=====================================
अलका लांबा 'आप' प्रवक्ते पदावरून निलंबित

नवी दिल्ली - दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) नियमांचे उल्लंघन केल्याने अलका लांबा यांना प्रवक्ते पदावरून दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अलका लांबा यांनी वक्तव्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सत्येंद्र जैन यांच्याकडे देण्यात यावी. यामुळे झालेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होईल. या वक्तव्यावरून त्यांच्या पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत प्रवक्ते पदावरून निलंबित करण्यात आले आहे.

पक्षाकडून करण्यात आलेल्या या कारवाईवर आपले म्हणणे स्पष्ट करताना लांबा यांनी ट्विट केले आहे, की मी पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती आहे. पक्षाच्या प्रत्येक निर्णयाचा सन्मान करते. अनावधनाने माझ्याकडून चूक झाली असेल तर मी नक्कीच पश्चाताप करेल. माझ्यामुळे पक्षाच्या भ्रष्टाचारविरोधी लढाईला धक्का बसेल अशा माझा उद्देश नाही. 
=====================================
स्वामींचा राजन, आरबीआयवर भ्रष्टाचाराचा आरोप

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर राजन यांच्या हकालपट्टीची मागणी करणारे भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी आता मध्यवर्ती बँकेच्या संपुर्ण कार्यपद्धतीवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. लघुवित्त बँकांचे परवाने (स्मॉल फायनान्स बँक) देताना योग्य नियमांचे पालन झाले नसून, या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. याविषयी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

रिझर्व्ह बँकेने 10 कंपन्यांना ‘तत्वतः मंजुरी‘ देऊन लघुवित्त बँकेचा परवाना दिला आहे. या कंपन्यांनी आरबीआयने ठरवून दिलेल्या परदेशी गुंतवणूकीसंबंधीच्या नियमांसह अनेक नियमांची पुर्तता केलीच नव्हती. यापैकी अनेक कंपन्यांवर परदेशी कंपन्यांचे नियंत्रण आहे. म्हणजेच या प्रकरणात नियमांची पुर्तता झाली नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. आरबीआयला आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयश आले असून या प्रकरणात आरबीआय अधिकाऱ्यांनी जाणुनबुजून दुर्लक्ष केले आहे., असा आरोप स्वामींनी केला आहे.
=====================================
आसामचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दत्ता यांचे निधन

नवी दिल्ली - आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अन्जान दत्ता यांचे आज (गुरुवार) एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. दत्ता यांच्या निधनानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

न्युमोनिया झाल्याने अन्जान दत्ता यांना खासगी रुग्णालयातून 17 मे रोजी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दत्ता यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु होते. अखेर आज सकाळी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. राहुल गांधी यांनी नुकतीच त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. 

दत्ता हे आसाममधील आमगुडी विधानसभा मतदारसंघातून तिनवेळा विधानसभेत निवडून आले आहेत. त्यांना परिवहन मंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती. 


=====================================
द्रुतगती मार्गावर अपघातामुळे वाहतूक कोंडी

पुणे - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ आज (गुरुवार) सकाळी तीन गाड्यांमध्ये झालेल्या अपघातामुळे काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, आडोशी बोगद्याजवळ आज सकाळी मोटार, ट्रक आणि कंटेनरमध्ये अपघात झाला. अपघातात तिन्ही गाड्यांचे नुकसान झाले असले, तरी जिवीतहानी झालेली नाही. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. पुण्याहून मुंबईला जात असलेल्या मोटार, ट्रक आणि कंटेनरमध्ये अपघात झाला असून, कंटेनरला मार्गावरून हटविण्याचे काम सुरु आहे.

या अपघातामुळे सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलिसांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करत वाहतुक पूर्ववत केली.
=====================================
दाभोलकर हत्येसाठी गोळ्या बेळगावातून?

बेळगाव - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या बंदुकीच्या गोळ्या बेळगावातून खरेदी झाल्याची माहिती पुढे येत आहे. सांकेतिक भाषेत बंदुकीच्या गोळीला "चॉकलेट‘ असे नाव देऊन हे "चॉकलेट‘ बेळगावातून खरेदी करण्याचा निर्णय मारेकऱ्यांनी घेतल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांपर्यंत पोचली आहे. परंतु, बेळगावचे वरिष्ठ पोलिस अधिकारी मात्र याबाबत अद्याप अनभिज्ञ आहेत.

डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्याची जबाबदारी वीरेंद्र तावडेवर जेव्हा सोपविण्यात आली, तेव्हा त्याने सारंग अकोलकरशी ई-मेलद्वारे संपर्क साधला. बंदुकीसाठी लागणाऱ्या गोळ्यांची खरेदी बेळगावातून करण्याचा निर्णय याच वेळी झाल्याचा संशय सीबीआयला आहे. मात्र बंदुकीच्या गोळ्यांना थेट गोळ्या न म्हणता "चॉकलेट‘ असे नाव देण्यात आले.
"हे चॉकलेट बेळगावातून खरेदी करायचे असून, त्याची तयारी करा‘ अशा आशयाचा ई-मेल तावडेने अकोलकरला पाठवला होता, असे सीबीआय सूत्रांचे म्हणणे आहे. सांकेतिक भाषेचा वापर ही जगभरातील गुन्हेगारांची प्रमाणित पद्धत आहे. कटाचा सुगावा आधी कुणाला लागू नये, यासाठी ही खबरदारी घेतली जाते. सारंग आणि तावडे यांच्यातही ई-मेलची सांकेतिक भाषेत देवाणघेवाण झाली होती, असेही सीबीआय सूत्रांचे म्हणणे आहे. 

बंदुकीच्या गोळ्या विकणारी बेळगावात दोन दुकाने आहेत. ती कॅम्प परिसरात आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून मिळालेल्या माहितीनुसार अकोलकरनेच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा संशय सीबीआयला आहे. 
=====================================

'करुन दाखवलं' म्हणणारेही तुरुंगात जातील, शेलारांचा शिवसेनेला टोला

'करुन दाखवलं' म्हणणारेही तुरुंगात जातील, शेलारांचा शिवसेनेला टोला
मुंबई : मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यात 10 लेखापालांना अटक झाल्यानंतर भाजपने शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे. आज केवळ अधिकारी आत गेले आहेत, यापुढे कंत्राटदार आणि त्यांच्या मागे ‘करुन दाखवलं’ असं समर्थन करणारेही तुरुंगात जातील असा टोला आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.
 
मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यासंदर्भात भाजपने महापालिका आणि विधानसभेत दोन्ही ठिकाणी आवाज उठवला. त्याचमुळे आज ही कारवाई होत असल्याचं म्हणत शेलार यांनी या कारवाईचं श्रेय भाजपकडे घेतलं.
=====================================

20 मिनिटं उरलीत, जाऊ नका, काँग्रेसच्या मोर्चाचा बोजवारा

20 मिनिटं उरलीत, जाऊ नका, काँग्रेसच्या मोर्चाचा बोजवारा
यवतमाळ : भाजपच्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या विरोधात आज काँग्रेसनं यवतमाळमध्ये चाय पे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कोरा चहा पिऊन काँग्रेसने आपला निषेध व्यक्त केला. मात्र काँग्रेसच्या या निषेध मोर्चाचा पुरता बोजवारा उडाल्याचं चित्र होतं.
 
दिल्लीतले अनेक दिग्गज नेते या आंदोलनाला उपस्थित होते. मात्र कार्यक्रमाला लोक थांबावेत, यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर विनवण्या करण्याची वेळ आली. श्रोते सभास्थळातून काढता पाय घेत असताना केवळ 20 मिनिटांचा कार्यक्रम शिल्लक आहे, लोकांनी जाऊ नये अशा सूचना द्यावा लागल्या. मात्र तरीही लोकांवर त्याचा परिणाम झाला नाही.
 
महत्वाचं म्हणजे हे सगळं घडत असताना अशोक चव्हाणांसह दिग्विजय सिंह, राज बब्बर अशी दिल्लीतली मंडळीही मंचावर उपस्थित होती.
 
यवतमाळमधल्या बाभळी गावात हा कार्यक्रम घेतला गेला. निवडणूक काळात याच गावात भाजपनं चाय पे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याचा निषेध म्हणून काँग्रेसनं कोरा चहा पिऊन याठिकाणी सभेचं आयोजन केलं होतं.
=====================================

पुण्यात पीएमपीची बस थेट सलूनमध्ये, चालकासह काही जखमी

पुण्यात पीएमपीची बस थेट सलूनमध्ये, चालकासह काही जखमी
बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे पीएमपीचा बेदरकारपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे.
पुणे : पुण्यात पीएमपीची बस एका सलूनमध्ये घुसल्याचं समोर आलं आहे. बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे पीएमपीचा बेदरकारपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे.
 
अपघातात बसचा चालक आणि काही प्रवासी जखमी झाले असून सलूनमधील काही गिऱ्हाईक किरकोळ जखमी आहेत. जखमी व्यक्तींवर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
 
हडपसर रोड वरुन उरळी कांचना बस निघाली होती. त्यावेळी बसचे ब्रेक फेल झाल्याने मांजरी फाट्याजवळ एका सलूनमध्ये बस घुसली. त्यामुळे प्रशासन यावर काही कारवाई करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
=====================================

पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्याचा दाभोलकर हत्येशी संबंध?

पुणे पोलिस दलातील अधिकाऱ्याचा दाभोलकर हत्येशी संबंध?
मुंबई : गोव्यातील बॉम्बस्फोटामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा कट चार वर्ष लांबल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. आरोपी वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर यांना 2009 मध्ये दाभोलकारांची हत्या करायची होती, त्याचप्रमाणे पुणे पोलिस दलात कार्यरत असलेला एक अधिकारीही दाभोलकरांच्या कटात सामील असल्याचं समोर आलं आहे.
 
गोव्यातील मार्गाव बॉम्ब ब्लास्टच्या कटापूर्वीच दाभोलकरांच्या हत्येचा कट शिजला होता. मात्र मलगोंडा पाटील आणि योगेश नाईक यांच्याकडून अपघाताने नियोजित ठिकाणाच्या आधीच बॉम्बचा स्फोट झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे दाभोलकरांच्या हत्येचा कट पुढे ढकलल्याचं म्हटलं जातं. तेव्हापासून आरोपी अकोलकर परागंदा आहे.
 
2009 मध्येच दाभोलकरांची हत्या घडवून आणण्याचा दोघांचा इरादा असल्याचं तपासात पुढे आलं आहे. तावडेला गेल्या आठवड्यात पनवेलमधून अटक झाली होती. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक झालेला तो पहिला आरोपी आहे. हत्येसाठी तावडेची बाईक वापरण्यात आली होती. दाभोलकरांच्या अंधश्रद्धाविरोधी कार्यामुळे तावडेचा त्यांच्यावर राग असल्याचं म्हटलं जातं. त्याच शूटरने पानसरेंची हत्या केल्याचीही माहिती आहे.
=====================================

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पाच वाहनांचा विचित्र अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पाच वाहनांचा विचित्र अपघात
सलगच्या अपघातांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक धोक्याची होत आहे का, असा प्रश्न सामान्य प्रवाशांच्या मनात निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आडोशी बोगद्याजवळ झालेल्या विचित्र अपघातामुळे सकाळपासूनच वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. पाच वाहनं एकमेकांवर धडकल्यानं महामार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक अखेर सुरळीत झाली आहे.
 
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर तीन ते चार किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी साडेसातच्या दरम्यान आडोशी बोगद्याजदवळ दोन कार, दोन ट्रक आणि एक कंटेनर एकमेकांवर आदळले. या अपघातात दोन्ही कारचा चक्काचूर झाला.
 
या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र सलगच्या अपघातांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक धोक्याची होत आहे का, असा प्रश्न सामान्य प्रवाशांच्या मनात निर्माण झाला आहे.
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================


No comments: