Friday, 3 June 2016

नमस्कार लाईव्ह ०३-०६-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- टोकियो; इ.स. 705 मध्ये स्थापना, जगातलं सर्वात जुनं हॉटेल 
2- इस्लामाबाद; बॉलिंग अॅक्शनमुळे पाकिस्तानचा 7 वर्षाचा मुलगा चर्चेत 
३- पाकिस्तानने दहशतवादाची साथ सोडावी तर, संबंध सुधारतील - पंतप्रधान मोदी 
४- बांगलादेशच्या निर्मितीत भारताची भुमिका 
५- टोकियो; जंगलात सोडलेला मुलगा 7 दिवसांनी सापडला 
६- भारत-बांगलादेश सीमा वर्षभरात सीलबंद होणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- मथुरेत जमाव हिंसक, एसपींची गोळ्या घालून हत्या 
८- पाकिस्तान, बांगलादेशातील हिंदूंना मिळणार भारतीय नागरीकत्व 
९- दिल्ली; ओलाच्या टॅक्सी चालकावर महिला न्यायाधाशीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोप 
१०- ओडीसा; ‘गरिबी हटाओ’ची मोदींकडून खिल्ली 
११- पटना; १२वीच्या ‘टॉपर’ची होणार फेरपरीक्षा 
१२- 'क्रांतिकारकांमध्ये भेदभाव करणे भाजपचा स्वभाव' - काँग्रेस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१३- विधान परिषदेसाठी आज मतदान 
१४- विधानपरिषद निवडणुकीनंतरच खडसेंचा फैसला 
१५- खडसेंना मुख्यमंत्र्यांनी बडतर्फच केले पाहिजे: राधाकृष्ण विखे-पाटील 
१६- ठाणे विधानपरिषदेसाठी आज मतदान, डावखरे-फाटक यांच्यात चुरस 
१७- मुंबई; सिडकोच्या भूखंडाला मिळाला विक्रमी भाव 
१८- मुंबई; लोकल बिघाडांचा आढावा घेणार 
१९- शाळा, शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- रेल्वे रुळ ओलांडताना मुंबईत एकाच दिवसात 16 जणांचा मृत्यू 
२१- मुंबईच्या रस्त्यांवरील शीतपेयांत ई कोलाय जीवाणू, पालिकेचा सर्व्हे 
२२- कोल्हापूर; मोबाईलवर बोलताना अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू 
२३- कल्याण; दारुसाठी पैसे न दिल्यानं दगडानं ठेचून दोघांची हत्या, पाच गर्दुल्ले अटकेत 
२४- मेट्रो हाऊसची आग अखेर नियंत्रणात, कुलाबा परिसरात धुराचे ढग 
२५- मुंबई/चेंबूर परिसरातून वेश्याव्यवसायातून ६ मुलींची सुटका 
२६- वाडिया रुग्णालयातून गायब झालेली चिमुरडी सापडली 
२७- पश्चिम बंगाल; छळवणुकीचा विरोध करणाऱ्या विद्यार्थिनीला सळईने मारहाण 
२८- दिल्लीत भीषण अपघात; सहा ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२९- टीम इंडियासाठी प्रशिक्षक हवा... या आहेत बीसीसीआयच्या अटी! 
३०- माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांची बॉलिवूड एन्ट्री 
३१- तुम्ही दररोज किती मीठ खाताय? 
३२- साईनाच्या कामगिरीने भारताचा दबदबा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
श्रद्धा चव्हाण, प्रफुल्लता आठवले, सुदास थोरात, नीलकंठ वरपडे, रामलिंग बिवडे, प्रशांत देवकरे, किशोर वाघदारीकार, गोटू इंगळे, दिलीप वाघमारे, प्रकाश दोने, अजय देशमुख, विकाश नरबंगे, संदीप 

कुलकर्णी, सुयश शिंदे, रियाझ सय्यद, पंकज गावंडे, राहुल परमार, तुळशीराम मदने, भगीरथसिंह वाघेला, कपिल हाणे, यशवंत राजे, सुनील ओझा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

==========================================

मथुरेत जमाव हिंसक, एसपींची गोळ्या घालून हत्या

मथुरेत जमाव हिंसक, एसपींची गोळ्या घालून हत्या
मथुराचे शहीद आणि एसपी मुकुल द्विवेदी आणि ठाणे अंमलदार
मथुरा हिंसाचारातील मृतांचा आकडा 21 वर गेला आहे. शहीद एसपी मुकुल द्विवेदी या घटनेसाठी सरकारला दोषी ठरवलं आहे. दोन्ही शहीद पोलिस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईचे आदेश सरकारने दिल्यानंतर मुकुल यांची आई मनोरमा यांनी टाहो फोडला. आम्हाला पैसे देण्यापेक्षा आमच्याकडून हवे तितके पैसे घ्या, पण आमचा मुलगा आम्हाला परत करा, असा आक्रोश त्यांनी मांडला.


मथुरा : सरकारी जमिनीवर अवैधरित्या ताबा मिळणाऱ्या जमावाला हटवताना झालेल्या गोळीबारात दोन पोलिस अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. मथुरेत घडलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.


आंदोलक बाबा जयगुरुदेव संस्थेशी निगडीत असल्याचं म्हटलं जातं. ते स्वतःला आजाद भारत विधिक वैचारिक क्रांति सत्याग्रही म्हणवतात.
पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या निवडणुका रद्द करा, सुभाषचंद्र बोस यांना जिवंत घोषित करा, पेट्रोलचे दर कमी करा, देशात नवं चलन लागू करा, अशा मागण्या घेऊन गेल्या अडीच वर्षांपासून तीन हजार लोकांनी सरकारच्या जवाहरबाग या उद्यानावर कब्जा केला होता. सुमारे अडीचशे एकर परिसरात हे अज्ञात लोक गेल्या अडीच वर्षांपासून निदर्शने करत होते.

Mathura Police

गुरुवारी संध्याकाळी या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांची तुकडी उद्यानासमोर आली. तेव्हा आंदोलकांनी पोलिसांना अडवण्याची पूर्ण तयारी केली होती. पोलिसांनी उद्यानात घुसण्याचा प्रयत्न करताच आंदोलकांनी गोळीबार केला. त्यात पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि ठाणे अंमलदार संतोष यादव यांचा गोळीबारात मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
सुमारे 6 तासांच्या संघर्षानंतर पोलिसांनी या जागेवर ताबा मिळवला, मात्र तोपर्यंत सर्व आंदोलक पसार झाले होते. मथुरेसारख्या शहरामध्ये देशाच्या व्यवस्थेलाच आव्हान देणारे लोक अडीच वर्षांपासून एका सरकारी जमिनीवर ताबा मिळवतातच कसे, असा प्रश्न उभा राहिला आहे.
==========================================

ठाणे विधानपरिषदेसाठी आज मतदान, डावखरे-फाटक यांच्यात चुरस

ठाणे विधानपरिषदेसाठी आज मतदान, डावखरे-फाटक यांच्यात चुरस
ठाणे : ठाणे विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे रविंद्र फाटक विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे असा सामना रंगणार आहे. ठाणे विधान परिषदेसाठीचं मतदान थोड्याच वेळात होणार आहे, तर 6 जून रोजी मतमोजणी होईल.


एकदा शब्द दिला म्हणजे दिला, आमची सर्व मतं डावखरेंनाच : हितेंद्र ठाकूर
1992 पासून चार वेळा विधानपरिषदेवर निवडून गेलेले वसंत डावखरे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. यापूर्वीही ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून जाताना डावखरेंना शिवसेनेबरोबर असलेल्या जवळीकीचा फायदा झाला होता.
==========================================

टीम इंडियासाठी प्रशिक्षक हवा... या आहेत बीसीसीआयच्या अटी!

टीम इंडियासाठी प्रशिक्षक हवा... या आहेत बीसीसीआयच्या अटी!
मुंबई: बीसीसीआयनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले असून, हिंदी तसंच अन्य भारतीय भाषांमध्ये संभाषण करणारा उमेदवार अधिक स्वीकारार्ह असेल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

सदर उमेदवाराला हिंदीत संभाषण करता येणं अनिवार्य मात्र नसेल, असंही बीसीसीआयनं नमूद केलं आहे. बीसीसीआयनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवताना नऊ मुद्दे मांडले आहेत. त्यापैकी सहाव्या मुद्यात म्हटलं आहे की, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठीच्या उमेदवाराला आंतरराष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव असणं, त्याचं संभाषणकौशल्य उत्तम असणं अनिवार्य आहे. त्याचं इंग्रजीवर प्रभुत्व असावं.

आपल्याला काय म्हणायचंय ते परिणामकारकरित्या खेळाडूंपर्यंत त्याच्याकडून अपेक्षित आहे. हिंदी तसंच अन्य भारतीय भाषांमध्ये संभाषण करणारा उमेदवार अधिक स्वीकारार्ह असेल. मात्र हिंदीत संभाषण करता येणं अनिवार्य नसेल.
==========================================

माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांची बॉलिवूड एन्ट्री

माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांची बॉलिवूड एन्ट्री
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल बॉलिवूडमध्ये पदार्प करण्याच्या तयारीत आहेत. ‘शोरगुल’ या आगामी बॉलिवूडपटासाठी सिब्बल यांनी गीतलेखन केलं आहे.
 
सलमान खानशी झालेल्या वादाबाबत जाहीर माफीनामा मागितल्यामुळे चर्चेत आलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजीत सिंगने हे गीत गायलं आहे. तर सुप्रसिद्ध झितारवादक (सितार आणि गिटारच्या संगमातून बनवलेलं वाद्य) निलाद्रीकुमार यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
 
सिब्बल यांनी ‘शोरगुल’ या सिनेमासाठी ‘तू ही तू’ ही कव्वाली लिहिली होती. मात्र निलाद्री कुमार यांच्यासोबत दुसऱ्या एका प्रोजेक्टवर काम करताना त्यांनी ‘तेरे बिना’ हे आणखी एक गाणं लिहिण्याचं ठरवलं. शोरगुल हा सामाजिक-राजकीय विषयावरील चित्रपट आहे.

तेरे बिना हे गाणं अनेकांच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास सिब्बल यांनी व्यक्त केला आहे. नऊ महिने या ट्रॅकवर निलाद्री कुमार यांच्यासोबत काम केल्याचं ते सांगतात. तेरे बिना हे प्रेम आणि विरह या भावनांचा मेळ गाण्यात आहे, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं. तुर्की सुपरमॉडेल सुहा गेझेवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.
==========================================

रेल्वे रुळ ओलांडताना मुंबईत एकाच दिवसात 16 जणांचा मृत्यू

रेल्वे रुळ ओलांडताना मुंबईत एकाच दिवसात 16 जणांचा मृत्यू
मुंबई: काल मुंबई रेल्वेच्या विविध मार्गांवर एकाच दिवशी तब्बल 16 जणांना रुळ ओलांडताना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत.

हा आठवडा भारतीय रेल्वेतर्फे ‘हमसफर’ सप्ताह म्हणून चालवला जातो आहे. त्यामुळे या आठवड्यातच झालेल्या अपघातांच्या या आकडेवारीने हमसफर सप्ताहावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

वेळ वाचवण्यासाठी अथवा गाडी पकडण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा घातकी पर्याय अनेक जण स्वीकारत असल्याचं या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. तर, २४ मे ते १ जून या अवघ्या नऊ दिवसांत रेल्वे अपघातांत तब्बल ९० जणांनी जीव गमावला आहे. मध्य, हार्बर, पश्चि‌म रेल्वे मार्गांवर अनेक ठिकाणी प्रवासी रुळ ओलांडतात. त्याबाबत वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केलं जाते.
==========================================

मुंबईच्या रस्त्यांवरील शीतपेयांत ई कोलाय जीवाणू, पालिकेचा सर्व्हे

मुंबईच्या रस्त्यांवरील शीतपेयांत ई कोलाय जीवाणू, पालिकेचा सर्व्हे
मुंबई : उन्हामुळे तापलेल्या शरीराला गारवा मिळण्यासाठी तुम्ही शीतपेयांना पसंती देत असाल तर सावधान! मुंबईच्या रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या थंड पेयांमध्ये तब्बल 92 टक्क्यांपर्यंत ई कोलाय हा घातक जीवाणू आढळला आहे.

फेरीवाल्यांकडे असलेल्या पाण्यातही ई कोलायचं प्रमाण 26 टक्के आहे. हा जीवाणू सामान्यत: मानवी विष्ठेत आढळतो. ई कोलाय या जीवाणूच्या प्रादुर्भावामुळे गॅस्ट्रो, जुलाब यासारखे आजार होऊ शकतात.
 
मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने हॉटेल्स, फ्रूट ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचे स्टॉल्स, डेअरी, मिठाईची दुकानं, बर्फाचे गोळेवाले, लस्सी-ताक विक्रेते आणि फास्ट फूड सेंटर्स यांची पाहणी करुन हा निष्कर्ष काढला आहे.
 
ज्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील नमुन्यांमध्ये ई-कोलाय जीवाणू आढळून आला, त्या सर्वांवर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाई केली जात आहे.
==========================================

मोबाईलवर बोलताना अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू

मोबाईलवर बोलताना अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापुरात मोबाईलवर बोलणाऱ्या एका इसमाच्या अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रकाश पाटील असं घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
 
पाटील पत्नी आणि मुलीसोबत कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. यावेळी ढगाळ वातावरण झालं आणि लगेच मेघगर्जनेसह पाऊसही सुरु झाला. त्याच वेळी त्यांना मोबाईलवर कॉल आला. त्यांनी तो कॉल घेतला आणि अचानक विजेचा कडकडाट होऊन एक वीज त्याच्या दिशेनं झेपावली. काही समजण्या आधीच वीज त्यांच्या अंगावर कोसळली. त्यांच्या सोबत असलेली त्यांची पत्नी आणि मुलगी वेगाने त्याच्यापासून दूर फेकल्या गेल्या.
 
पाटील यांना तात्काळ कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. पाटील मुळचे नाशिकचे असून कोल्हापूरमध्ये ते प्रादेशिक परिवहन कार्यालयात कामाला होते.

मोबईल लहरींमुळे वीज आकर्षित झाली का? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात वीज कडाडत असताना मोबाईलधारकांनी याची काळजी घेणं गरजेचं झालं आहे.
==========================================

तुम्ही दररोज किती मीठ खाताय?

तुम्ही दररोज किती मीठ खाताय?
मुंबई : तुम्ही जर आहारात मिठाचा अतिरिक्त वापर करत असाल, तर सावधान. कारण अतिरिक्त मिठामुळे तुमच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात.

हल्ली अनेकांना उच्चरक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. मात्र त्याचं कारणच मीठ असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मिठाच्या अधिकच्या वापराने उच्चरक्तदाब होतोच, शिवाय त्यामुळे हृदयरोगाचं प्रमाणही वाढलं आहे.

हृदयरोगासंबंधीच्या समस्यांची 90 टक्के कारणं म्हणजे धुम्रपान, तणाव, मद्यसेवन, खूप कमी किंवा खूप जास्त झोप ही आहेत.

शरीरात किती प्रमाणात मीठ असावं?

तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारातून केवळ 5 ते 6 ग्रॅम मीठ शरीरात जाणं आवश्यक आहे. मात्र सध्या यापेक्षा दुप्पट-तिप्पट प्रमाणात मीठ शरीरात जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच उच्चरक्तदाबाचं प्रमाण वाढलं आहे.

त्याचा परिणाम म्हणजे, शहरी भागात 30 ते 40 टक्के तर ग्रामीण भागात 12 ते 17 टक्के रुग्णांना उच्च रक्तदाबाची समस्या जाणवत आहे.

उच्चरक्तदाबाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू, स्मृतीभ्रंश, दृष्टी जाण्याची भीती अशा समस्या उद्भवू शकतात.
==========================================

इसवीसन 705 मध्ये स्थापना, जगातलं सर्वात जुनं हॉटेल

इसवीसन 705 मध्ये स्थापना, जगातलं सर्वात जुनं हॉटेल
टोकियो : जपानमधील एका हॉटेलची सर्वात जुनं हॉटेल अशी नोंद झालेली आहे. 1 हजार 311 वर्ष जुन्या हॉटेलची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली आहे.
 
इसवी सन 705 पासून हे हॉटेल अस्तित्वात असल्याचं म्हटलं जातं. ‘निसियामा ओनसेन केईउनकान’ असं हॉटेलचं नाव असून एकाच कुटुंबाच्या 52 पिढ्यांपासून हे चालत आलेलं आहे.

गरम पाण्याचे झरे हे जपानच्या या हॉटेलचं वैशिष्ट्य मानलं जातं. हॉटेलच्या स्थापनेपासून हे गरम पाण्याचे कुंड इथे आहेत. प्रतिदिवशी हॉटेलचं भाडं 52 हजार येन म्हणजे सुमारे 31 हजार रुपये आहे. पर्यटकांचा ओढा कायम या हॉटेलकडे असल्याचं म्हटलं जातं.
==========================================

दारुसाठी पैसे न दिल्यानं दगडानं ठेचून दोघांची हत्या, पाच गर्दुल्ले अटकेत

दारुसाठी पैसे न दिल्यानं दगडानं ठेचून दोघांची हत्या, पाच गर्दुल्ले अटकेत
कल्याण: कल्याण जवळच्या म्हारळ गावात दुहेरी हत्याकांडानं खळबळ उडाली आहे. म्हारळ गावातल्या राधा नगरी परिसरात दोन नेपाळी तरुणांचे मृतदेह आढळून आले आहेत. राजू सुनार आणि मदन सुनार नावाच्या तरुणांची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. तर राजू सुनार याचं गुप्तांग कापण्यात आलं आहे.

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्यानं पाच गर्दुल्ल्यांनी दोघांची निर्घृण हत्या केली आहे. मृतकाचं गुप्तांग एका आरोपीकडे मिळाल्यानंतर या दुहेरी हत्याकांडाचा छडा लागला. त्यामुळे अवघ्या दोन तासाच्या आत पाच आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रं फिरवली. पळून जाण्याच्या तयारीत असतानाच टिटवाळा स्टेशनजवळून एका आरोपीला पोलिसांनी पकडलं. दारुसाठी पैसे न दिल्यानं हत्या केल्याचं आरोपींना सांगत आपला गुन्हा कबूल केला.  चौकशीत त्यानं पोलिसांना आपल्या चारही साथीदारांचं नाव सांगितलं. त्यानंतर चारही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली.
==========================================

मेट्रो हाऊसची आग अखेर नियंत्रणात, कुलाबा परिसरात धुराचे ढग

मेट्रो हाऊसची आग अखेर नियंत्रणात, कुलाबा परिसरात धुराचे ढग
मुंबई : जवळपास सात तासानंतर कुलाब्यातील मेट्रो हाऊसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र, पाण्याच्या कमतरतेमुळं आग विझवण्यात अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यात आग वारंवार भडकत असल्यामुळं अग्निशमन दलासमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं.

मात्र आता आग नियंत्रणात आल्यामुळं अग्निशमन अधिकाऱ्यांसह स्थानिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. दुपारी चारच्या सुमारास कुलाब्यातील रिगल सिनेमाजवळच्या मेट्रो हाऊसला आग लागली. बघता बघता आगीच्या ज्वालांनी मेट्रो हाऊसला पूर्णत: वेढलं होतं.

सुरक्षेचे उपाय म्हणून या सगळ्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. ज्या ठिकाणी आग लागली त्या परिसरात पोलीस मुख्यालय, मनोरा आमदार निवास, कॅफे लिओपोल्ड आणि कॅफे मॉन्डेगार तसंच ताज हॉटेल अशी प्रसिद्ध ठिकाणं आहेत.
==========================================

खडसेंना मुख्यमंत्र्यांनी बडतर्फच केले पाहिजे: राधाकृष्ण विखे-पाटील

खडसेंना मुख्यमंत्र्यांनी बडतर्फच केले पाहिजे: राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई: ‘महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांचे गांभीर्य पाहता त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फच केले पाहिजे.’ असं वक्तव्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

‘भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या भूमिकेवर भाजप ठाम असेल तर त्यांना तातडीने सरकारमधून काढून टाकून त्यांच्या आरोपांची सखोल चौकशी करावी.’ अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

‘पुणे येथील एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंनी मंत्रिप्रदाचा दुरूपयोग करून आपल्या कुटुंबाला लाभ मिळवून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणे निरर्थक असून त्यांना मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करणं आवश्यक आहे.’ असे विखे-पाटील म्हणाले.
==========================================

विधानपरिषद निवडणुकीनंतरच खडसेंचा फैसला

विधानपरिषद निवडणुकीनंतरच खडसेंचा फैसला
नवी दिल्ली महसूल मंत्री एकनाख खडसेंसंदर्भातला निर्णय विधानपरिषदेनंतर घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज दिल्ली दरबारी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींमध्ये जवळपास अर्धा तास गुप्त बैठक झाली. यापूर्वी फडणवीसांनी खडसेंवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांसदर्भातला अमित शाहांकडे सोपवला.

देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यालयात बंद दाराआड अमित शाह यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली.

यावेळी अंबरनाथमधील जमिनीसाठी लाच मागितल्याचं प्रकरण, लिमोझिनचं मॉडिफिकेशन आणि भोसरी एमआयडीसीतील जमिनीच्या खरेदीचा वाद याबाबतची सखोल माहिती मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांना दिली.

एकनाथ खडसे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं त्यांचा राजीनामा घेऊऩ त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी सर्व स्तरातून होते आहे. शिवसेना, आम आदमी पक्ष आणि अंजली दमानिया यांच्यासह काँग्रेसनं भाजपवर दबाव वाढवला आहे. त्यामुळं आता भ्रष्टाचार सहन करणार नाही, असं सांगणाऱ्या मोदी-शाह यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
==========================================

पाकिस्तान, बांगलादेशातील हिंदूंना मिळणार भारतीय नागरीकत्व


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. ३ - धर्माच्या आधारावर होणा-या हिंसाचाराच्या भितीने आश्रयासाठी भारतात आलेल्या पाकिस्तान, बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना लवकरच भारतीय नागरीकत्व मिळू शकते. केंद्रीय गृहमंत्रालय त्यासाठी भारतीय नागरीकत्व कायद्यामध्ये सुधारणा करण्यास तयार आहे. 
     
    नागरीकत्व कायदा १९५५ मधील प्रस्तावित बदलांमुळे शरणार्थींना भारतात रहाण्याचा कायदेशीर अधिकार मिळणार असून, त्यांना नागरीकत्वासाठी दावा करता येईल. कायद्यातील प्रस्तावित बदल प्रत्यक्षात आल्यानंतर आपले सरकार हिंदूचे संरक्षणकर्ते असल्याचा संदेश जाणार असून, त्यातून राजकीय उद्देशही साध्य होणार आहे. 
     
    पाकिस्तान, बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांक असून तेथे धर्माच्या आधारावर होणा-या हिंसाचारामुळे अनेक हिंदूंनी भारतात आश्रय घेतला आहे. या निर्णयाचा पाकिस्तान-बांगलादेशातून आलेल्या दोन लाख हिंदूंना फायदा होणार आहे.
     
    कायद्यात बदल करुन हिंदूंना नागरीकत्व दिले तर, आर्थिक कारणांमुळे बांगलादेशातूनही अनेक मुस्लिम भारताच्या सीमावर्ती राज्यांमध्ये आले आहेत. सरकारने फक्त हिंदूंना नागरीकत्वाचा लाभ दिला तर, सरकार जाणीवपूर्वक शरणार्थींमध्ये भेदभाव करत असल्याचाही संदेश जाईल. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने हिंदू शरणार्थींना नागरीकत्व देण्याचे वचन दिले होते. 
==========================================

ओलाच्या टॅक्सी चालकावर महिला न्यायाधाशीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोप


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. ३ - अतिरिक्त महिला सत्र न्यायाधीशाचा लैंगिक छळ आणि गैरवर्तणूक केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ओलाच्या चालकाला गुरुवारी अटक केली. उत्तर दिल्लीच्या कमला नगर मार्केटमध्ये ही घटना घडली. मंगळवारी गुन्हा घडला. महिला न्यायाधीशाने बुधवारी तक्रार दाखल केली असे पोलिसांनी सांगितले. 
     
    चालक संदीप कुमारला गुरगाव येथून अटक केली. महिला न्यायाधीशाने न्यायालयातून घरी जाण्यासाठी मोबाईल अॅपवरुन ओलाची कॅब बुक केली. संदीप कुमारला महिला न्यायाधीशाला घरी घेऊन जायचे भाडे मिळाले. त्याने महिला न्यायाधीशाशी संपर्क साधल्यानंतर महिला न्यायाधीशाने त्याला कोर्टात येण्यास सांगितले. 
     
    महिला न्यायाधीश संदीपच्या गाडीत बसल्यानंतर तिने संदीपला काही काम असल्याने कमला नगर येथे गाडी थांबवण्यास सांगितले. पण संदीपने तिची मागणी फेटाळून लावली त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. वादावादी सुरु असताना ड्रायव्हरने अश्लील हातवारे केले आणि सामान गाडी बाहेर फेकून दिले असा आरोप महिला न्यायाधीशाने केला आहे. 
     
    महिला न्यायाधीशाच्या तक्रारीवरुन चालकाविरोधात ३५४ अ लैंगिक छळ, कलम ५०९ आणि कलम ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल नोंदवण्यात आला आहे. 
==========================================

बॉलिंग अॅक्शनमुळे पाकिस्तानचा 7 वर्षाचा मुलगा चर्चेत


  • ऑनलाइन लोकमत - 
    इस्लामाबाद, दि. 03 - क्रिकेट जगतात पाकिस्तानला जर कोणी सर्वात जास्त प्रसिद्धी मिळवून दिली असेल तर ती त्यांच्या गोलंदाजांनी. पाकिस्तानने क्रिकेट जगाला एकापेक्षा एक सरस गोलंदाज दिले आहेत. सरफराज नवाज, इमरान खान, वसीम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तर आणि मोहम्मद आमीर यांच्यासारखे सर्वश्रेष्ठ गोलंदाज पाकिस्तानला मिळाले. ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेटचा स्थर उंचावला. 
     
    मात्र पाकिस्तानमध्ये सध्या 7 वर्षाचा एहसान त्याच्या बॉलिंग अॅक्शनमुळे चर्चेचा विषय बनला आहे. एवढया कमी वयात एहसानने बॉलिंग अॅक्शनवर आपली पकड बनवली आहे. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कप्तान सना मीर एहसानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एहसानचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एहसानची बॉलिंग अॅक्शन पाहायला मिळते.
     
    पाकिस्तानचा यष्टीरक्षक कामरान अकमलने हा व्हिडिओ रिट्विट करत एहसानवर मेहनत घेतल्यास तो एक दिवस पाकिस्तानसाठी नक्की खेळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. एहसानला व्यवस्थित कोचिंग मिळाल्यास पाकिस्तानला क्रिकेटला येत्या काही वर्षात अजून एक तोडीचा फास्ट बॉलर मिळेल हे मात्र नक्की. 
==========================================

विधान परिषदेसाठी आज मतदान

  • F
  • ठाणे : ठाणे व पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीकरिता शुक्रवार, ३ जून रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे हे पाचव्यांदा आपले नशीब आजमावत असून शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी त्यांना कडवे आव्हान दिले आहे. सात महापालिका, दोन नगरपालिका यामधील एकूण १०६० मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. एकूण १३ मतदान केंद्रांवर होणाऱ्या मतदानाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, याकरिता निवडणूक आयोगाने कठोर उपाययोजना केल्या आहेत.
    डावखरे यांना काँग्रेस व बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिला असल्याने त्यांच्याकडे ४२१ मते आहेत. शिवसेना, भाजपा यांची मिळून ४९१ मते आहेत. विजयी उमेदवाराला ५३१ मतांची मॅजिक फिगर गाठावी लागणार असल्याने मनसे, छोटे पक्ष व अपक्ष यांच्या १०८ मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. मते फुटू नयेत, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादीने आपले नगरसेवक अलिबाग व लोणावळा येथे, तर शिवसेना-भाजपाने आपले नगरसेवक गोव्यात नेऊन ठेवले आहेत. सोमवार, ६ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे.
    शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. याशिवाय, व्हिडीओ चित्रीकरणासह सीसीटीव्हींची करडी नजर या केंद्रांवर असणार आहे.
==========================================

सिडकोच्या भूखंडाला मिळाला विक्रमी भाव


  • कमलाकर कांबळे,  नवी मुंबई
    सानपाडा येथील सिडकोच्या भूखंडाला रेकॉर्ड ब्रेक दर प्राप्त झाला आहे. हा भूखंड ३ लाख ३९ हजार ३३९ रुपये प्रति चौरस मीटर दराने विकला गेला आहे. सिडकोच्या इतिहासातील हा सर्वोच्च दर मानला जात आहे. सिडकोने नेरूळ व सानपाडा येथील भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या होत्या. यातून सिडकोच्या तिजोरीत तब्बल ३१९ कोटी रुपयांची भर पडली आहे.
    सानपाडा सेक्टर १३ येथील ३0५0 चौरस मीटर भूखंडाला प्रति चौरस मीटर ३ लाख ३९ हजार ३३९ रुपये इतका दर मिळाला आहे. निवास्ती डेव्हलपर्सने ही बोली लावली होती.
    ५१२२ चौरस मीटरच्या आणखी एका भूखंडाला प्रति चौरस मीटर ३ लाख ७ हजार ५५५ रुपये इतका दर मिळाला आहे.
==========================================

लोकल बिघाडांचा आढावा घेणार


  • मुंबई : गेल्या काही दिवसांत मुंबईच्या तिन्ही उपनगरीय मार्गांवरील लोकल सेवा अनेक कारणांनी विस्कळीत होत आहे. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत असल्याने उपनगरीय लोकल रुळावर येणार कधी, असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर त्याची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बिघाडांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत थेट एका रेल्वे बोर्ड सदस्यालाच धाडले. बिघाडाची कारणे आणि अन्य माहितीचा एक अहवाल रेल्वेमंत्री प्रभू यांना लवकरच या सदस्याकडून सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर विशेष मोहीम घेण्याबरोबरच असुरक्षित ठिकाणांचा आढावा घेण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना रेल्वे बोर्ड सदस्याकडून देण्यात आले आहेत.
    सिग्नलमध्ये बिघाड, रुळाला तडा, ओव्हरहेड आणि लोकलच्या पेन्टाग्राफमध्ये समस्या, रुळावरून ट्रेन घसरणे इत्यादी कारणांमुळे पश्चिम, मध्य रेल्वेची मेन लाइन आणि हार्बर सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी तर अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असून त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचा आढावा मुंबई रेल्वे बोर्ड सदस्य गणेश पिल्लई (टूरिझम, कॅटरिंग, पायाभूत सुविधा) यांच्याकडून घेण्यात आला. त्यामध्ये नुकत्याच घडलेल्या तीन घटनांची त्यांनी गांभीर्याने दखल घेतली. पश्चिम रेल्वेवर लोअर परेल येथे रुळावरून ट्रेनचा घसरलेला एक डबा, मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील विक्रोळी येथे ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने सिग्नल यंत्रणेत निर्माण झालेली समस्या आणि हार्बरच्या वडाळा येथील रावळी जंक्शनजवळील सिग्नल यंत्रणेला लागलेली आग या घटनांची माहिती त्यांनी घेतली. एकूणच घडणाऱ्या घटनांसंदर्भात माहिती देताना पिल्लई यांनी सांगितले की, रेल्वेमंत्र्यांकडून उपनगरीय मार्गावर होणाऱ्या बिघाडाची दखल घेतली आणि त्याचा आढावा घेण्यासाठी मला पाठविले आहे. यासंदर्भात एक अहवाल रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना सादर केला जाईल. लोकल सेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी योग्य त्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
==========================================

पश्चिम उपनगरात वेश्याव्यवसायातून ६ मुलींची सुटका


  • मुंबई : समाजसेवा शाखेने चेंबूर, अंधेरी आणि खार परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये ६ मुलींची सुटका करण्यात आली. या कारवाईत तब्बल २५ जणांवर कारवाई करण्यात आली.
    अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली. त्यानुसार, समाजसेवा शाखेचे उपायुक्त प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला. या कारवाईत ४ तरुणींची सुटका करत तीन दलाल महिलांविरुद्ध पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ चेंबूर पूर्वेकडील अजिंक्य तारा सोसायटीत समाजसेवा शाखेने केलेल्या कारवाईत २ मुलींची सुटका करत एका दलाल महिलेला अटक करण्यात आली. घटनास्थळावरून पोलिसांनी २२ हजार रुपये जप्त केले.
    हे धाडसत्र सुरू असतानाच बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास खार परिसरातील नीलम बारमध्ये विनापरवाना छम छम सुरू होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी आपला मोर्चा तेथे वळविला. बारमध्ये सुरू असलेल्या अश्लील नृत्यावर पडदा पाडत तपास पथकाने २१ जणांच्या मुसक्या आवळल्या. तसेच तेथील बारबालांची सुटका केली. या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
==========================================

वाडिया रुग्णालयातून गायब झालेली चिमुरडी सापडली


  • मुंबई : परळच्या वाडिया रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातून गायब झालेली एक महिन्याची चिमुरडी आग्रीपाडा येथील सातरस्ता परिसरात सापडली. या मुलीला ताब्यात घेऊन आग्रीपाडा पोलिसांनी तिला नायर रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    सातरस्ता परिसरातील साने गुरुजी मार्ग येथे मनिष जोरे आणि संपदा जोरे कुटुंबीय राहतात. त्यांची एक महिन्याची चिमुरडी आजारी असल्याने तिला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाडिया रुग्णालयातील अतिदक्षता विभागात या मुलीवर उपचार सुरू होते. अतिदक्षता विभागात नातेवाइकांना प्रवेश नसल्याने जोरे दाम्पत्य अतिदक्षता विभागाच्या बाहेरील परिसरात बसले होते. बुधवारी सकाळच्या सुमारास त्यांची मुलगी गायब झाल्याचे तेथील कक्षसेवकाच्या लक्षात आले. त्याने तत्काळ वरिष्ठांना याची सूचना दिली. चिमुरडी गायब झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली.
    या प्रकरणी वाडिया रुग्णालयाने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून अधिक तपास सुरू असताना सातरस्ता परिसरातील एका कचराकुंडीजवळील प्लास्टिक पिशवीवर एक चिमुरडी आढळली. आग्रीपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिमुरडीला ताब्यात घेतले. तपासामध्ये कचराकुंडीजवळ सापडलेली चिमुरडी वाडिया रुग्णालयातील असल्याचे निष्पन्न झाले. मुलगी सापडल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला बाळाला घेऊन जात असताना दिसत आहे. ती महिला चिमुरडीची आई असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेनेही पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक सरंभळकर यांनी दिली.
==========================================

शाळा, शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन


  • मुंबई : पालिका शाळा व सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशीन लावण्याचा निर्धार शिवसेनेने दोन वर्षांपूर्वी केला होता़ भाजपाने मात्र ही मशीन लवकरच शाळा, प्रसूतिगृह व सार्वजनिक शौचालयांमध्ये बसविण्यात येणार असल्याची गुरुवारी घोषणा करीत याचे श्रेय आपल्या खात्यावर जमा केले़
    पालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मित्रपक्षामध्ये चढाओढ सुरू आहे़ २०१४ मध्ये शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी पालिका शाळेत, गलिच्छ वस्तींमधील महिलांसाठी ही सुविधा उपलब्ध करण्याची घोषणा केली होती़ मात्र भाजपाने आता हा प्रकल्प
    हायजॅक केला आहे़ या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त आय़ए़ कुंदन यांनी दिले असल्याचा दावा भाजपाने केला आहे़
    गरीब व मध्यमवर्गीय महिलांना विविध कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकीन आर्थिकदृष्ट्याही परवडत नाहीत़ तसेच विल्हेवाट लावण्याची सोय नसल्याने वापरलेले सॅनिटरी नॅपकीन शौचालयांमध्येच टाकण्यात येतात़ यामुळे मलनिस्सारण वाहिनी तुंबते़ म्हणून ही स्वयंचलित मशीन इन्सिनेटरच्या सुविधेसह असेल, अशी माहिती महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांनी आज दिली़ शिरवाडकर भाजपाच्या नगरसेविका आहेत़
==========================================

‘गरिबी हटाओ’ची मोदींकडून खिल्ली


  • बालासोर (ओडिशा) : ‘गरिबी हटाओ’चा नारा ज्यांनी दिला होता, त्यांचा हेतू चांगला असेलही, परंतु त्यांनी हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी निवडलेला मार्ग मात्र अयोग्य होता, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या या घोषणेची खिल्ली उडविली.
    ओडिशाच्या बालासोर येथे एका रॅलीला संबोधित करताना मोदी बोलत होते. त्यांनी ‘संतुलित’ विकासाचे आवाहन केले आणि नैसर्गिक संसाधनांनी युक्त असलेला पूर्व भाग मागासलेला असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ओडिशा, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि आसामच्या विकासाची गरज असल्याचे सांगून मोदी म्हणाले, ‘माझे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. गरीब हाच आमच्या सर्व योजनांच्या केंद्रस्थानी असेल. त्यासाठीची योजना आमच्या सरकारने तयार केली असून, या योजनेचा प्रत्यक्ष परिणाम तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल.’
    मोदींनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे प्रत्यक्ष नाव न घेता, टीका केली. ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही, तेथील अवस्था काय आहे, हे तुम्हीच अधिक जाणता, असे सांगून ते म्हणाले की, या राज्यातही आता बदल होणे गरजेचे बनले आहे. निवडणुका, आंदोलने, नसतानाही बालासोरसारख्या सिटीमध्ये माझे भाषण ऐकायला तुम्ही आला आहात. याचा अर्थच मुळी तुमचा सरकारवर विश्वास आहे. माझे सरकार देशातील गरिबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे, असे मी याआधीही सांगितले होते. जेव्हा मी हे सांगितले तेव्हा माझा उद्देश कोणतेही राज्य वा क्षेत्र विकासाच्या बाबतीत मागासलेले राहू नये हा होता. संतुलित विकास झाला पाहिजे आणि त्याचा प्रत्येकालाच फायदा झाला पाहिजे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आमचे सरकार प्रामाणिकपणे काम करीत आहे, हे लक्षात घेतले तरच तुम्हाला आम्ही घेतलेल्या निर्णयांच्या फायद्याकडे पाहता येईल. गरिबी दूर करण्यासाठीही जनतेने केंद्र सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे.
==========================================

१२वीच्या ‘टॉपर’ची होणार फेरपरीक्षा


  • पाटणा : बिहारमध्ये १२वी कला शाखेच्या परीक्षेत पहिल्या आलेल्या मुलीने कॅमेऱ्यासमोर राज्यशास्त्र हा विषय पाककलेशी संबंधित असल्याचे सांगितले, तर तिच्याच कॉलेजमधील आणि विज्ञान शाखेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला पाणी व एचटूओ यांचा संबंध काय, यांसारख्या प्राथमिक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.
    या पार्श्वभूमीवर बिहार शालेय परीक्षा मंडळाने (बीएसईबी) गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थी या मानास पात्र आहेत का याची पडताळणी करण्यासाठी त्यांची पुन्हा छोटी परीक्षा घेण्याचे ठरवले आहे.
    बिहारमध्ये १२ वीच्या तिन्ही शाखांचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाल्यानंतर स्थानिक वाहिन्यांनी गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यात त्यांच्या गुणवत्तेचा भंडाफोड झाला.
    बीएसईबीने कला, वाणिज्य व विज्ञान शाखांतील सर्व १४ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना छोटेखानी फेरपरीक्षेसाठी ३ जून रोजी पाचारण केले आहे. कला शाखेतील विद्यार्थिनी रुबी रॉय हिने पॉलिटिकल सायन्स (राज्यशास्त्र) विषयाचा ‘प्रोडिगल सायन्स’ असा उच्चार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंडळाने तातडीने गुणवत्ताधारकांच्या फेरपरीक्षेचा निर्णय घेतला. सोबतच या प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले.
==========================================

छळवणुकीचा विरोध करणाऱ्या विद्यार्थिनीला सळईने मारहाण


  • माणिकचक : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील माणिकचक येथे गुरुवारी छेड काढणाऱ्या एका युवकाचा विरोध केल्यावरून इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला सळईने बेदम मारहाण करण्यात आली. तिच्यासोबत तिची आई व स्थानिक ग्रामपंचायतच्या एका सदस्यालाही मारहाण झाली.
    नूर अली (२०) हा युवक तिची वर्षभरापासून छेड काढत तिला त्रास देत होता. त्याची तक्रार करण्यास विद्यार्थिनी आईला घेऊन लानूरच्या घरी आली. त्या दोघी नूरच्या घरासमोर आल्या तेव्हा नूरच्या कुटुंबीयांनी त्यांना लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य आयूष करानी यांनी हस्तक्षेप केला तेव्हा हल्लेखोरांनी त्यांचीही पिटाई केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश होता. हल्ल्यात विद्यार्थिनी, तिची आई आणि आयुष असे तिघेही गंभीर जखमी झाले.
==========================================

पाकिस्तानने दहशतवादाची साथ सोडावी तर, संबंध सुधारतील - पंतप्रधान मोदी



  • पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग सोडला तर, भारत-पाकिस्तान संबंध ख-या अर्थाने नवी उंची गाठतील असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. भारत-पाकिस्तान संबंधांना नवा आयाम देण्यासाठी पाकिस्तानने स्वत:हून लादलेला दहशतवादाचा अडथळा दूर केला पाहिजे असे मोदी म्हणाले. 
    आम्ही पहिले पाऊल उचलण्यासाठी तयार आहोत. पण शांततेचा रस्ता दोन मार्गी असला पाहिजे असे वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी सांगितले. परस्परांबरोबर भांडण्यापेक्षा भारत-पाकिस्तानने एकत्र येऊन गरीबी विरोधात लढा दिला पाहिजे असे मोदी म्हणाले. 
     दहशतवादावर अजिबात तडजोड करणार नाही असे मोदींनी स्पष्ट केले. पाकिस्तान भारतावर दहशतवादी हल्ला करणा-या अतिरेक्यांवर ठोस कारवाई करत नसल्यामुळे संबंध सुधारणेला मर्यादा येतात असे मोदी म्हणाले. शांतता आणि शेजा-यांबरोबर चांगल्या संबंधांसाठी आपले सरकार स्थापनेच्या पहिल्यादिवसापासून प्रयत्नशील असल्याचे मोदींनी सांगितले.
==========================================

बांगलादेशच्या निर्मितीत भारताची भुमिका



  • बांगलादेशच्या निर्मितीत भारताचा महत्वाचा हात असून यासाठी भारताला पाकिस्तानसोबत युद्ध करावं लागलं होतं. भारत - पाकिस्तानमधील हे तिसरे युद्द होते. डिसेंबर १९७१ मध्ये झालेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला आणि बांगलादेशची निर्मिती केली.
     
    २७ मार्च १९७१ रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यानी पूर्व पाकिस्तानात चालू असलेल्या बांगलादेशसाठीच्या स्वातंत्र्य लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला व पूर्व पाकिस्तानी जनतेला जी मदत लागेल ती पुरवण्याचे आश्वासन दिले. पूर्व पाकिस्तानात चालू असलेल्या हिंसाचारामुळे अनेकांना भारतामध्ये स्थलांतर केलं. त्यांच्यासाठी सीमेवर छावण्या उभारण्यात आल्या होत्या. 
     
    पूर्व पाकिस्तानातील हिंसाचारामुळे भारतात येणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली होती. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर ताण पडू लागला. यादरम्यान अमेरिकेने पाकिस्तानला मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ९ ऑगस्ट १९७१ रोजी श्रीमती गांधींनी रशियाशी २० वर्षाचा मैत्रीचा करार करून अमेरिकेला व ब्रिटन व फ्रान्ससारख्या देशांना धक्का दिला. 
     
    दरम्यानच्या काळात मुक्तिवाहिनी पूर्व पाकिस्तानात सक्रिय झाली व तिने गनिमी काव्याने पाकिस्तानी लष्कराविरुद्ध उठाव केला. भारताने देखील मुक्तिबाहिनीला पूर्ण पाठिंबा देत लष्करी साहित्याची मदत केली.
==========================================
जंगलात सोडलेला मुलगा 7 दिवसांनी सापडला

टोकियो - खोड्या करणाऱ्या आपल्या मुलाला शिक्षा म्हणून जंगलात सोडून दिल्याने हरवलेल्या मुलाचा तब्बल सहा दिवसानंतर शोध लागला आहे. दरम्यान या सर्व प्रकारामुळे जगभरात पालकत्वाच्या शिस्तीचा विषय चर्चेत आला आहे.

यामातो तानुका नावाचा सात वर्षीय मुलगा दुसऱ्यांच्या गाड्यांवर आणि लोकांच्या दिशेने दगड फेकत होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या त्याच्या पालकांनी त्याला गाडीतून अस्वलांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जवळच्या जंगलात एकटे सोडले. शिक्षा म्हणून काही वेळ जंगलात सोडून दिलेल्या मुलाला नेण्यासाठी त्याचे पालक काही वेळाने त्याच ठिकाणी आले. मात्र यामातो सापडला नाही. त्यानंतर आई-वडिलांनी तक्रार केल्याने मुलाला शोधण्यासाठी शोधमोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये तब्बल सात दिवसांनी सैन्याच्या पथकाला यामातो जिवंत अवस्थेत सापडला. त्याला कोणतीही इजा झालेली नव्हती. 
==========================================
भारत-बांगलादेश सीमा वर्षभरात सीलबंद होणार

File Photoनवी दिल्ली - भारत आणि बांगलादेशदरम्यान आसाममध्ये असलेल्या सीमेवर भौतिक अडथळे निर्माण करून ही सीमा येत्या वर्षभरात पूर्णबंद सीलबंद करण्याचा निर्णय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

आसाममध्ये 223 किलोमीटर लांबीची भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा येत्या वर्षभरात संपूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. राजधानसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गृहराज्यमंत्री किरण रीजीजू, सीमा व्यवस्थापन विभागाचे सचिव सुशील कुमार आणि गृह मंत्रालयाच्या इतर अधिकारी उपस्थित होते. सीमा बंद करण्याचे जून 2017 पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी आशा या बैठकीत व्यक्त करण्यात आली. सीमेपार वाहणाऱ्या नद्यांकाठचा भाग सीलबंद करण्यासह अन्य सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणींवर मात करून ही सीमा बंद करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत सीमेवर किमान 122 जागी भौतिक अडथळे अस्तित्वात नाहीत, त्यापैकी सुमारे 12 किमी परिसरातील 100 जागांवर भौतिक अडथळे निर्माण करण्यात येणार असल्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 
==========================================
दिल्लीत भीषण अपघात; सहा ठार

नवी दिल्ली - आज पहाटे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकवर स्पीड कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले आहेत.

आज पहाटे साडेचारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकवरून दिल्लीतून कर्नालच्या दिशेने जाणाऱ्या इको स्पोटर्स कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. "आज पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास आम्हाला कॉल आला. आम्ही घटनास्थळी पोचल्यावर भीषण अपघात झाल्याचे आढळून आले. प्रथमदर्शी स्पीडिंग कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिल्याचे दिसत आहे. या घटनेत सहाजण ठार झाले आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत‘, अशी माहिती अतिरिक्त पोलिस उपायुक्त पंकज कुमार यांनी दिली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
==========================================
साईनाच्या कामगिरीने भारताचा दबदबा

बॅडमिंटनमध्ये भारताची ओळख तशी जुनीच. राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू घडले. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख दिली ती प्रकाश पदुकोण यांनी. ऑल इंग्लंड ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू होते. त्यांच्यानंतर भारताला त्यांचाच शिष्य पुल्लेला गोपीचंद याने याच स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिले. पुरुष एकेरीभोवती केंद्रित राहिलेले भारतीय बॅडमिंटन साईनाच्या आगमनाने महिलांभोवती फिरू लागले. साईनाच्या सातत्यपूर्ण कामगिरीने एक वेळ अशी आली, की बॅडमिंटनमध्ये साईना नेहवालचा दबदबा निर्माण झाला. साईना म्हणजे भारतीय बॅडमिंटन असे समीकरण होऊ लागले होते. त्यात वावगे काहीच नाही. तिची कामगिरी तशीच होती. जागतिक क्रमवारीत तिने अव्वल स्थानापर्यंत झेप मारली होती. तिच्या पाठोपाठ पी. व्ही. सिंधू हिनेदेखील जागतिक स्पर्धेत दोन वेळा ब्रॉंझपदक जिंकून भारताची खेळातील प्रगती दाखवून दिली. अशा वेळी पुरुष मागे होते असे नाही. पी. कश्‍यप, के. श्रीकांत, प्रणय कुमार, अजय जयराम, सौरभ वर्मा, एच. एस. प्रणॉय, गुरुसाई दत्त असे सरस खेळाडू आपला ठसा उमटवत आहेत. 
==========================================
'क्रांतिकारकांमध्ये भेदभाव करणे भाजपचा स्वभाव'

नवी दिल्ली - महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, भगत सिंग या सर्व क्रांतिकारकांमध्ये भेदभाव करण्याचा भारतीय जनता पक्षाचा स्वभाव असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना कॉंग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद म्हणाले, "क्रांतिकारक आता आपल्यामध्ये नाहीत. मात्र भारतीय जनता पक्ष त्यांच्या नावाने वाद निर्माण करत आहे. हेच भाजपचे उदरनिर्वाहाचे साधन आहे.‘ महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, "हा भ्रष्टाचाराचा एक प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा शांत आहेत. ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे.‘ दरम्यान एकनाथ खडसे यांच्याबाबत वरिष्ठांवर अहवाल पाठविला त्याबाबत चर्चा केली आहे. या प्रकरणी पक्ष निर्णय घेईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

No comments: