Monday, 20 June 2016

नमस्कार लाईव्ह २०-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- लाहोर; प्रतिष्ठेसाठी बहिणीची पतीसह निर्घृण हत्या
२- पेशावर; ‘जिहाद’ विद्यापीठाला ३० कोटींची मदत 
३- मल्ल्या म्हणाले, ‘मी बिन बुलाये मेहमान नव्हतो’! 
४- काबूलमध्ये बसवर बॉम्बहल्ला; 14 जणांचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन 
६- विहरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही - गडकरी 
७- हिताचं असेल तर शिक्षणात भगवेकरण करण्यात येईल - राम शंकर कठेरिया 
८- ...तेव्हा शिवसेनेचीच रुग्णवाहिका होती-अमिताभ 
९- राहुल गांधी ४६ वर्षांचे झाले; शुभेच्छांचा वर्षाव 
१०- वाढदिवसानंतर राहुल गांधी लगेच परदेशात 
११- स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी केंद्राचा हातभार 
१२- राम मंदिर औरंगजेबाच्या राजवटीत पाडले! - आयपीएस अधिकारी किशोर कुणाल 
१३- डाळ आयातीवर गुप्तचरांची नजर 
१४- ‘एकावर एक मोफत’ योजनांवरही ‘जीएसटी’! 
१५- मोदी' म्हणजे 'मेकिंग ऑफ डेव्हलप्ड इंडिया - नायडू 
१६- राजन यांच्या निर्णयाचा शेअर बाजारावर 'इफेक्ट' 
१७- केजरीवालांच्या घराबाहेर महेश गिरींचे उपोषण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१८- मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी, बळीराजाही सुखावला! 
१९- पुणे; ‘एमपीएससी’कडून हमालांचीही परीक्षा, पदवीधरांच्या उड्या 
२०- जगातील एकमेव संस्कृत वृत्तपत्र बंद होणार 
२१- पश्चिम रेल्वे ठप्प, दादरमध्ये तांत्रिक बिघाड 
२२- राज्यभरात आजपासून सोनोग्राफी बंद 
२३- डिजिटल बँकिंग १० लाख कोटींवर 
२४- लाचार होऊन युती नाही- उद्धव ठाकरे 
२५- निजामाचा बाप म्हणणाऱ्यांशी युती नको-कार्यकर्ते 
२६- चेन्नई; बचत खात्यातून कर्जवसुली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२७- बेळगाव; चालकाला फाजील अात्मविश्वास नडला, नदी पात्रात ट्रक वाहून गेला 
२८- जयपूर; एक-दोन नव्हे, दहावीत 47 वेळा नापास झालेले महाशय 
२९- दिल्ली; कैलाश खैर, बाबूल सुप्रीयोच्या गाण्यावर रामदेव बाबांचा डान्सिंग योगा 
३०- कोल्हापुरात छेडछाडीला कंटाळून 17 वर्षीय युवतीची आत्महत्या 
३१- सातारा; दरोड्याच्या आरोपीचा मृत्यू, 12 निलंबित पोलिसांवर हत्येचा गुन्हा 
३२- जालना; 2 वर्षाच्या चिमुरडीसमोर वडिलांकडून आईची हत्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३३- बाळासाहेबांच्या चरित्रपटात मुख्य भूमिकेत कोण? 
३४- बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीत सलमान-कतरिना एकत्र! 
३५- किस करताना शेन वॉर्न कॅमेऱ्यात कैद... 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३६- जिल्ह्यात ४१.९५ मिमी पाऊस 
३७- अर्धापूर; डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून सालगड्याचा खून 
३८- आठ दिवसात वाहतूक सुधारा, अन्यथा कारवाईस सामोरे जा - पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे 
३९- लातूर शहरातील नळांना लवकरच मीटर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
प्रल्हाद डोईफोडे, अक्ष कोटेवाड, संदीप पाटील, दिलीप शिंदे, अतुल सुनेवड, दिनेश मुधोळ, दत्ता खरबडे, रामदास बडे, नीतिम आढाव, रामभाऊ सूर्यवंशी, सतीश अरसुळे, संतोष देशमुख, रामदास जाधव, संध्या दमकोंडवार, प्रभात साळुंके, भाऊसाहेब जाधव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
=====================================

मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी, बळीराजाही सुखावला!

मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी, बळीराजाही सुखावला!
मुंबई: मुंबईत काल संध्याकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. कल्याण, ठाणे, नवी मुंबई, रायगड परिसरातही पावसाची संततधार सुरू होती. रविवार असल्यानं मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केली. मात्र तासाभराच्या पावसामुळे दादरचा हिंदमाता परिसर, किंग्स सर्कल, एनसी केळकर मार्ग, रानडे रोडवर पाणी साचलं आणि त्यामुळे काही वेळासाठी ट्रॅफिक जाम झालं. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाच्या रिमझिम सरी सुरु आहेत.

दरम्यान काल तासाभराच्या पावसानं मुंबईत काही ठिकाणी पाणी साचलं. अजून मोठा पाऊस व्हायचा आहे. त्यावेळी मुंबईची तुंबापुरी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद, बीड, पंढरपूर आणि जळगावमध्ये पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.
=====================================

चालकाला फाजील अात्मविश्वास नडला, नदी पात्रात ट्रक वाहून गेला

VIDEO: चालकाला फाजील अात्मविश्वास नडला, नदी पात्रात ट्रक वाहून गेला
बेळगाव: बेळगावात मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला आलेल्या पुरात एक ट्रक वाहून गेला. काल संध्याकाळी ही घटना घडली. हा ट्रक हुबळीहून बागलकोटकडे निघाला होता.

पावसामुळे नदीला चांगलाच पूर आला होता. त्यामुळे या पुरातून चालकानं गाडी पुलावरुन नेऊ नये असा सल्लाही देण्यात आला होता. गावकऱ्यांकडून त्याला वारंवार बजावण्यात आलं होतं.

मात्र, पाण्यातून गाडी सहज पूल ओलांडेल. असा समज असलेल्या चालकानं ट्रक पाण्यात नेला. मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यानं ट्रक काही क्षणातच पाण्यात गेला. या दुर्घटनेत चालक मात्र सुखरुप बचावला आहे.
=====================================

बाळासाहेबांच्या चरित्रपटात मुख्य भूमिकेत कोण?

बाळासाहेबांच्या चरित्रपटात मुख्य भूमिकेत कोण?
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरित्रपटासाठी कलाकारांची निवड जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र सिनेमातील कलाकारांची नावं सध्यातरी गुलदस्त्यात ठेवणार असल्याचं निर्मात्या स्मिता ठाकरे यांनी सांगितलं.
बाळासाहेबांच्या चरित्रपटाचं दिग्दर्शन स्मिता ठाकरे यांचा मुलगा राहुल ठाकरे करणार आहे.
स्मिता ठाकरे म्हणाल्या की, “पटकथा पूर्ण झाल्यावर आम्ही व्यक्तिरेखेनुसार कलाकारांची निवड करणार आहोत. आम्ही त्याच कलाकारांना संधी देणार आहोत, जे त्या व्यक्तीरेखेला न्याय देतील. मात्र यात नवीन कलाकार असतील की लोकप्रिय कलाकार याचा खुलासा आम्ही करणार नाही. पण बऱ्याच कलाकारांची निवड झाली आहे.”
=====================================

एक-दोन नव्हे, दहावीत 47 वेळा नापास झालेले महाशय

एक-दोन नव्हे, दहावीत 47 वेळा नापास झालेले महाशय
जयपूर : अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. एखाद दुसऱ्यांदा आलेलं अपयश ही सामान्य बाब आहे. मात्र दहावीच्या परीक्षेत 47 वेळा नापास होणाऱ्या विद्यार्थ्याची गोष्ट तुम्ही कधी ऐकली आहे का?

राजस्थानच्या बहरोड भागात राहणारा एक अवलिया दहावीच्या परीक्षेत तब्बल 47 वेळा नापास झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपण परीक्षेत पास होत नाही तोपर्यंत आपण लग्न करणार नाही अशी शपथ त्याने घेतली आहे. त्यामुळे 82 वर्षीय शिवचरण यांच्यावर अद्याप अविवाहित राहण्याची वेळ आली आहे.

आपल्या या आगळ्या वेगळ्या शपथेशी निष्ठा बाळगत शिवचरण यांनी आतापर्यंत लग्न केलेलं नाही. कोशिश करने वालो की हार नही होती, या धर्तीवर शिवचरण यांनी आपली उमेद सोडलेली नाहीये. त्यामुळे त्यांच्या दुर्दैवावर वाईट वाटून घ्यावं की त्यांच्या जिद्दीला सलाम करावा असाच प्रश्न इथल्या स्थानिकांना पडलाय.
=====================================

कैलाश खैर, बाबूल सुप्रीयोच्या गाण्यावर रामदेव बाबांचा डान्सिंग योगा

कैलाश खैर, बाबूल सुप्रीयोच्या गाण्यावर रामदेव बाबांचा डान्सिंग योगा
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय योग दिनाची रंगीत तालीम करण्यासाठी योगगुरु रामदेव बाबा यांनी राजपथावर काल दिवसभर योगाचे धडे घेतले. या रंगीत तालमीला हजारो योगप्रेमींनी हजेरी लावली. या पूर्वतयारीमध्ये बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही सहभागी झाले होते.

प्रख्यात गायक कैलाश खैर यांच्या सुरांवरही बाबा रामदेव यांनी योगा केला. इतकंच नाही, तर गायक आणि बंगालमधले खासदार बाबुल सुप्रियो यांनीही रामदेव बाबांच्या योगाला सुरेल साथ दिली.

आगामी 21 तारखेला जगभरात योगा दिवस साजरा केला जाणार आहे. याच योगा दिवसाचा मुख्य कार्यक्रम हा राजपथावर होणार आहे. दरम्यान, सुरु असलेल्या तालमीच्या वेळेस केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, खासदार मिनाक्षी लेखी, मनोज तिवारी यांनीही सराव केला. तसेच योगबद्दल दाखवलेल्या उत्साहाबद्दल व्यंकय्या नायडू यांनी दिल्लीकरांचंही तोंडभरुन कौतुक केलं.
=====================================

‘एमपीएससी’कडून हमालांचीही परीक्षा, पदवीधरांच्या उड्या

‘एमपीएससी’कडून हमालांचीही परीक्षा, पदवीधरांच्या उड्या
पुणे : सध्या अनेक तरुणांना सरकारी नोकरी आणि स्थैर्य अशा दुहेरी अपेक्षा असतात. सरकार दरबारी काम करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणवर्गाला आता ‘हमाल’ या पदाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीतील हमालपदाच्या जागांसाठी ढिगाने अर्ज आल्यामुळे आता या पदासाठीही परीक्षा घेण्याची निर्णय आयोगाने घेतला आहे.

विशेष म्हणजे आलेल्या अर्जामध्ये अनेक पदवीधरांचाही समावेश असल्याचे आयोगातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. खासगी क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या असल्या तरी सरकारी नोकरीतील स्थैर्य अजूनही तरुणांना भुरळ पाडत आहे. याचाच अनुभव सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला येत आहे.


आयोगाच्या कार्यालयात सध्या हमाल या पदाच्या पाच जागा आहेत. ‘ड’ गटातील या पदासाठी डिसेंबर 2015 मध्ये जाहिरात दिली होती. या पदासाठी 18 ते 33 वर्षे वयोगटातील किमान चौथी पास झालेल्या उमेदवारांची भरती होणार आहे. मात्र या पदासाठी साडेचारशे ते पाचशे अर्ज आले. महत्त्वाचं म्हणजे त्यात केवळ चौथी उत्तीर्णाची संख्या कमी असून पदवीधरांचं प्रमाण अधिक आहे.
=====================================

बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीत सलमान-कतरिना एकत्र!

बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीत सलमान-कतरिना एकत्र!
मुंबई: काँग्रेस नेते बाबा सिद्धिकी यांनी काल रात्री इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत सलमान खान आणि कतरिना कैफ एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सलमान आणि कतरिनामध्ये बराचवेळ बातचीत झाल्याचंही समजतं आहे.

बऱ्याच कालावधीनंतर बॉलिवूडमधील हे दोघंही कलाकार एकत्र आल्याचं पाहायलं मिळालं. या व्यतिरिक्त या इफ्तार पार्टीत गुलामनबी आझाद, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरेंसह काँग्रेसच्या नेते या इफ्तार पार्टीला हजर होते. दरवर्षी बाबा सिद्धिकी इफ्तार पार्टीचं आयोजन करतात.

या इफ्तार पार्टीमध्ये राजकीय नेत्यांपासून बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. याचवेळी कतरिना आणि सलमान खान यांचीही तिथं भेट झाली. या पार्टीमध्ये दोघंही वेगवेगळे आले होते. मात्र, आतमध्ये त्यांची भेट झाली. त्यानंतर दोघांनी बराच वेळ एकत्रही घालवला.
=====================================

कोल्हापुरात छेडछाडीला कंटाळून 17 वर्षीय युवतीची आत्महत्या

कोल्हापुरात छेडछाडीला कंटाळून 17 वर्षीय युवतीची आत्महत्या
कोल्हापूर : टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून कोल्हापुरात एका 17 वर्षीय युवतीने आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने पाच संशयितांची नावं लिहिल्याचीही माहिती आहे.

कोल्हापुरातील बोंद्रेनगर परिसरात राहणाऱ्या तरुणीने काल रात्री उशिरा आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.युवती तिच्या आजी आणि धाकट्या बहिणीसह राहत होती. जवळच्या एका बंगल्यात काम करत असताना अनेक वेळा परिसरातील काही टवाळखोर तिची छेड काढत असत. याच जाचाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.


सुसाईड नोटमध्ये तिने पाच संशयितांची नावं लिहिली होती. हे समजल्यानंतर आजूबाजूच्या व्यक्तींनी संशयितांच्या घरावर दगडफेक केली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जमावाला पांगवण्यात आलं.

यापूर्वीही रोडरोमियोंच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या काही युवतींच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान पोलिस आता कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
=====================================

दरोड्याच्या आरोपीचा मृत्यू, 12 निलंबित पोलिसांवर हत्येचा गुन्हा

दरोड्याच्या आरोपीचा मृत्यू, 12 निलंबित पोलिसांवर हत्येचा गुन्हा
सातारा : कराड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी 12 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे निलंबित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेल्या रावसाहेब जाधव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी डायरीत आरोपीची नोंद न घेतल्यानं पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.

निलंबित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक विकास धस आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह आणखी 10 हवालदारांना निलंबित करण्यात आलंय.

बंगळुरु महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स गाडीवर दरोडा टाकल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने दोन जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यामध्ये रावसाहेब जाधव यांचा समावेश होता.
=====================================

जगातील एकमेव संस्कृत वृत्तपत्र बंद होणार

जगातील एकमेव संस्कृत वृत्तपत्र बंद होणार?
फोटो सौजन्य: सुधर्मा वेबसाइट
मुंबई: जगातील एकमेव संस्कृत वृत्तपत्र ‘सुधर्मा’ एका महिन्यानंतर 46 वर्ष पूर्ण करु शकेल. राजकारण, योग वेद आणि संस्कृति समवेत इतर बातम्या देणाऱ्या या वृत्तपत्राचा खप 4,000 आहे. मात्र हे वृत्तपत्र आता लवकरच दिसेनासं होण्याची शक्यत आहे.

संस्कृत विद्वान कलाले नांदूर वरदराज अंय्यगारनं संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी 15 जुलै 1970 रोजी हे वृत्तपत्र सुरु केलं होतं. पण आता हे वृत्तपत्र चालवणं हे फारच संघर्षपूर्ण असल्याचं आयंगर यांचे पुत्र आणि सुधर्माचे संपादक के वी. संपत कुमार यांनी म्हटलं आहे.

संपत कुमार यांच्यामते, ‘या वृत्तपत्राचा खप दिवसेंदिवस कमी होत आहे. कारण की सरकारकडून यासाठी कोणतंही यासाठी कोणतंही सहकार्य मिळत नाही. हे दु:खद आहे की, ज्या भाषेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्या संस्कृतच्या ऐतिहासिक भूमिकेला आपण समजू शकत नाही.’

या वृत्तपत्राचा खप 4000 जरी असला तरीही याच्या ई-पेपरचे वाचक हे लाखाहून अधिक आहेत. दरम्यान, देशामध्ये 13 संस्कृतव विद्यापीठं आणि कर्नाटकमध्ये 18 संस्कृत कॉलेज आहे. मात्र, तरीही जगातील एकमेव संस्कृत वृत्तपत्र वाचविण्यास अद्याप तरी कुणीही पुढं आलेलं नाही.
=====================================

स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन

स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन
A
मुंबई आगामी काळात राज्यामध्ये 9 महापालिकांच्या निवडणुका येत आहेत. युतीचं काय होईल माहित नाही. स्वबळावर लढण्याची तयारी ठेव, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी केलं आहे. मुंबईतील गोरेगावमध्ये शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही, माहित नाही, पण स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा असं सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुकल्याचं दिसत आहे.

सन्मानानं युती झाली तर झाली, अन्यथा लाचार युती करण्यात आम्हाला रस नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावलं आहे. इतकंच नाही, तर वाघ आणि सिंहाच्या लढाईमधून काहीच साध्य होणार नाही, असं म्हणत हा बाष्कळ वाद थांबवण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांनी केलं. पण ते करत असतानाही उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या शिलेदारांना चिमटे काढले.

अच्छे दिन सोडा, पण किमान बरे दिन तरी आणा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी थेट नरेंद्र मोदींवरही शंरसंधान करण्याची संधी सोडली नाही. शिवाय, ‘देश बदल रहा है’, पण परिस्थिती अजून बदलली नाही, अशी टीकाह उद्धव यांनी मोदींवर केली.
=====================================

'विहरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही'

'विहरीत जीव देईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही'
पुणे: वेळप्रसंगी विहिरीत जीव देईन, मात्र काँग्रेसमधे प्रवेश करणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री निती गडकरी यांनी भाजपा प्रदेश कार्यकारिणी समारोप कार्यक्रमात केले.

यावेळी त्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवरही जोरदार हल्ला चढवला. तसेच भाजप हा पक्ष कुणाच्याही मनाप्रमाणे चालत नाही. किंवा परिवाराच्या हातात पक्षाची सत्ता नाही. मोदी, शाह, अडवाणी, वाजपेयी किंवा मुख्यमंत्री यांच्यापैकी कुणाही एकाच्या मनाप्रमाणे पक्ष चालत नाही. असे सांगितलं.

ते पुढे म्हणाले, राजकारण आरामात कधीच होत नसतं. ते केवळ क्रांतीतूनच होतं असतं. संघटनेच्या प्रक्रियेतून तावून-सुलाखून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनाच नेतृत्व मिळतं. मला आजपर्यंत अनेक मोठ्या नेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. वाजपेयी, अडवाणी, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मी काम केलं आहे.

ज्यावेळी सत्ता असते त्यावेळी कार्यकर्त्यांची काळजी घेणं आवश्यक असतं. वाईट दिवसांमध्ये मनोबल टिकवण सोपं. मात्र चांगल्या दिवसांत ते टिकवणं आव्हानात्मक आहे.त्य़ामुळे राजकारणाच्या रंगात रंगून आपला मूळ रंग जाऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी कार्यकत्यांना केले.
=====================================

पश्चिम रेल्वे ठप्प, दादरमध्ये तांत्रिक बिघाड


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. २० - पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. दादर येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबईच्या दिशेने येणा-या बांद्रा रेल्वे स्थानकात थांबल्या आहेत. बांद्रा येथे लोकल गाडयांची गर्दी झाली आहे. 
    दादर येथे ओव्हहेड वायरमधील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. लवकरात लवकर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. चर्चगेट रेल्वे स्थानकातून एकही लोकल सोडण्यात आलेली नाही. १५ मिनिटात बिघाड दुरुस्त करु असा दावा पश्चिम रेल्वे प्रशासनाने केला आहे.  
    ऐन गर्दीच्यावेळी हा बिघाड उदभवल्याने कामावर जाणा-या लाखो नोकरदार प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक रेल्वे प्रवासी स्वत:च गाडीतून उतरुन ट्रॅकवरुन चालत आहेत. मुंबईत आजही पावसाळी वातावरण आहे. 
    पावसाने जोर पकडला तर, प्रवाशांना लोकलमध्येच अडकून रहावे लागेल. आज सकाळी मध्य रेल्वे मार्गावर लोकल दहा ते पंधरा मिनिट उशिराने धावत होत्या. 
=====================================

हिताचं असेल तर शिक्षणात भगवेकरण करण्यात येईल - राम शंकर कठेरिया


  • ऑनलाइन लोकमत - 
    लखनऊ, दि. 20 - शिक्षण पद्दतीत भगवाकरण करणं जर देशाच्या हिताचं असेल तर करण्यात येईल असं वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री राम शंकर कठेरिया यांनी केलं आहे. राम शंकर कठेरिया स्मृती इराणींच्या शिक्षण मंत्रालयातील मंत्री आहेत. राम शंकर कठेरिया यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लखनऊ विद्यापीठातील हिंदवी स्वराज्य दिवस कार्यक्रमात बोलताना राम शंकर कठेरिया यांनी हे वक्तव्य केलं आहे.
    'काही पत्रकारांनी आम्हाला काही लोक सरकार शिक्षण क्षेत्रात भगवेकरण करत असल्याचं बोलत असल्याचं सांगितलं. त्यांना सांगू इच्छितो भगवेकरण देशात आणि शिक्षणात दोन्हीकडे होणार आहे. जे काही देशाच्या हिताचं असेल ते होईल. मग ते भगवेकरण असो अथवा संघवाद' असं राम शंकर कठेरिया बोलले आहेत. 
    जे काही देशाच्या हिताचं असेल, ज्याच्या आधारावर जगात आपण सन्मानाने उभे राहू त्याला शिक्षणाचा आणि अभ्यासक्रमाचा भाग बनवलं पाहिजे. ते आपल्या मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. आपली मुलं जर महाराणा प्रताप किंवा शिवाजी महाराजांबद्दल वाचणार नाहीत तर मग चंगेज खानबद्दल वाचायचं का ? असा सवाही राम शंकर कठेरिया यांनी यावेळी विचारला.
=====================================

2 वर्षाच्या चिमुरडीसमोर वडिलांकडून आईची हत्या


  • ऑनलाइन लोकमत - 
    जालना, दि. 20 -  आपल्या 2 वर्षाच्या चिमुरडीसमोरच अशोक लखनलाल सुरा याने आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर अशोक सुरा स्वत: पोलिसांसमोर हजर झाला आणि आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला असून अशोका सुराला अटक केली आहे. 
    अशोक सुरा याची पत्नी पूजासोबत नेहमी भांडणं होत असे. पूजा छोट्या छोट्या गोंष्टींवरुन माझ्याशी भांडायची, मला त्रास द्यायची त्यामुळे आपण हत्या केल्याची कबुली अशोक सुराने दिली आहे. अशोक आणि पूजाचं सहा वर्षापुर्वी लग्न झालं होतं. त्यांना दोन मुली आहेत. एक पाच वर्षाची असून दुसरी दोन वर्षाची आहे.
    अशोक सुरा पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. 
=====================================

राज्यभरात आजपासून सोनोग्राफी बंद


  • पुणे : मागील ६ दिवसांपासून पुण्यात बेमुदत बंद असलेली सोनोग्राफी सोमवारपासून (दि. २०) राज्यभरात बंद होणार आहे. त्यामुळे सोनोग्राफी आणि एक्स-रेच्या आंदोलनाला व्यापक स्वरुप प्राप्त होण्याची शक्यता आहे़ गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यातील अन्यायकारक तरतुदींच्या आधारावर पुण्यातील रेडिओलॉजिस्टवर केलेल्या अन्यायकारक कारवाईचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला असून आता तो संपूर्ण राज्यात चालू होणार आहे.
    राज्यभरातील रेडिओलॉजिस्ट संपावर विविध मागण्यांसाठी १४ जून रोजी गेले होते. त्यानंतर पुण्यातील रेडिओलॉजिस्टनी बेमुदत संप केला होता. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्यांना शासकीय स्तरावरुन कोणतेही ठोस उत्तर मिळाले नसल्याने सोमवारपासून हा संप राज्यस्तरीय होत असल्याचे इंडियन रेडिओलॉजिस्ट अँड इमेजिंग असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.
    याबाबत संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डॉ. जिग्नेश ठक्कर म्हणाले, केवळ कारकुनी त्रुटींच्या आधारावर रेडिओलॉजिस्टवर अन्यायकारक कारवाई करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदलीची आणि पीसीपीएनडीटी कायद्यात तातडीने सुधारणा व्हाव्यात, यासाठी हा संप पुकारण्यात येत आहे. पुण्यातील बेमुदत आंदोलनाला शासनाकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने या आंदोलनाला राज्यस्तरीय स्वरुप आले असून हा बंदही बेमुदत चालू राहणार आहे. 
=====================================

...तेव्हा शिवसेनेचीच रुग्णवाहिका होती-अमिताभ


  • मुंबई : कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर जखमी झाल्यानंतर मला विमानाने मुंबईत आणण्यात आले होते. तेंव्हा मला विमानतळावरुन रुग्णालयात नेण्यासाठी केवळ शिवसेनेचीच रुग्णवाहिका उभी होती, अशी आठवण अभिनेता अमिताभ बच्चन यांनी सांगितली.
    शिवसेनेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारतरत्न लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, अभिनेत्री माधुरी दीक्षित आदींनी शिवसेनेला शुभेच्छा देत जागवलेल्या आठवणींची चित्रफीत दाखविण्यात आली.
    मी आणि जया जेंव्हा पहिल्यांदा बाळासाहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो तेंव्हा मार्इंनी जयाचे आपल्या सूनेसारखेच स्वागत केले होते. हा कौटुंबिक स्रेह
    तसाच आहे, असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे सूत्र असल्याचे सांगत शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारणात मी सहभागी आहे, असे लता मंगेशकर म्हणाल्या.
=====================================

राहुल गांधी ४६ वर्षांचे झाले; शुभेच्छांचा वर्षाव


  • नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी
    यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. विशेषत: काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेत्यांचा त्यात समावेश होता.
    राहुल गांधी यांना दीर्घ आणि निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, असे मोदींनी रविवारी सकाळी टिष्ट्वट केले. थँक यू मोदीजी, आपल्या प्रेमळ शुभेच्छांबद्दल आभारी आहे, असे राहुल गांधींनी आभारादाखल टिष्ट्वटमध्ये म्हटले. राज्यसभेतील
    विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, पी.चिदंबरम, शीला दीक्षित, मोतीलाल व्होरा आणि आनंद शर्मा यांनी राहुल गांधी यांच्या १२ तुघलक लेन येथील निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.
    काँग्रेसच्या मुख्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन त्यावेळी उपस्थित
    होते. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपचे नेते शहनवाज हुसेन,
    राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते
    प्रफुल्ल पटेल आदींनी शुभेच्छा दिल्यात. 
=====================================

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी केंद्राचा हातभार


  • नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी आलेल्या नि:शुल्क शिकवणीच्या सुधारित योजनेनुसार आता दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीसाठी येणाऱ्या संपूर्ण खर्चाचा भार केंद्र सरकार
    उचलणार आहे. याआधी केंद्र सरकार शिकवणी शुल्काच्या कमाल २० हजार रुपयांपर्यंतचा खर्च सहन करीत होते.
    सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने केंद्रीय क्षेत्र योजनेत दुरुस्ती केली आहे. या दुरुस्तीअंतर्गत केंद्र सरकार अनुसूचित जाती (एससी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची शिकवणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिष्ठित कोचिंग संस्थांना सूचीबद्ध करणार आहे, अशी माहिती मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
    याआधी केंद्र सरकारतर्फे कोचिंग संस्थांना प्रति विद्यार्थी २० हजार रुपये शिकवणी शुल्क म्हणून दिले जात होते. परंतु यापुढे सरकार एससी व ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांचा संपूर्ण शिकवणीचा खर्च सहन करणार आहे. (वृत्तसंस्था)
    याशिवाय स्थानिक विद्यार्थ्यांना दिले जाणारे मासिक विद्यावेतन १,५०० रुपयांवरून वाढवून २,५०० रुपये करण्यात आले आहे. राज्याबाहेरील विद्यार्थ्यांचे मासिक विद्यावेतन ३,००० रुपयांवरून ५,००० रुपये करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना मासिक २,००० रुपयांचा विशेष भत्ता दिला जाणार आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.
=====================================

राम मंदिर औरंगजेबाच्या राजवटीत पाडले!


  • नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर हे बाबराच्या नव्हे, तर औरंगजेबाच्या राजवटीत पाडले गेले, असा दावा माजी भारतीय प्रशासन सेवेतील (आयपीएस) अधिकारी किशोर कुणाल यांनी केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभेसाठीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न पुन्हा तापू लागला आहे.
    अयोध्येमध्ये बाबरी मशीद उभी राहायच्या आधी रामजन्मभूमी मंदिर अस्तित्वात होते, असे दाखविण्याचा या पुस्तकाने प्रयत्न केला आहे. किशोर कुणाल हे गुजरात केडरचे १९७२ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. मशिदीच्या बांधकामाच्या काळाबाबत कुणाल यांनी नवे प्रतिपादन केले असून, या विषयावर आतापर्यंत असलेल्या समजुती, मते मोडून काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कुणाल हे बिहारचे असून ते तेथे पोलीस अधिकारी होते. नंतर ते बिहार धार्मिक विश्वस्तांच्या मंडळाचे प्रशासक आणि अध्यक्ष होते. ते केंद्रीय गृहमंत्रालयात आॅफिसर आॅन स्पेशल ड्यूटी होते आणि अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम जमीनदोस्त होण्याच्या आधी १९९० मध्ये ते अधिकृतपणे अयोध्यावादाशी संबंधित होते. सेवानिवृत्तीनंतर किशोर कुणाल हे दरभंगा येथील केएसडी संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू होते.
=====================================

प्रतिष्ठेसाठी बहिणीची पतीसह निर्घृण हत्या


  • लाहोर : कुटुंबियांच्या संमतीशिवाय व स्वत:च्या पसंतीच्या तरुणाशी लग्न केल्याबद्दल गरोदर बहीण व तिच्या पतीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. मुहम्मद शकील (३०) आणि त्याची पत्नी अक्सा (२६) यांना कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी ठार मारण्यात आले. अक्साचा भाऊ नुकताच सौदी अरेबियाहून परतला होता, असे पोलिसांनी सांगितले. मृत जोडप्याचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते व ते पंजाब प्रांतातील थिकरीवाला खेड्यात राहत होते.
    चार दिवसांपूर्वी अक्साचा भाऊ, त्याची आई, मामा व आणखी एक जण जोडप्याच्या घरात धडकले व त्यांना त्यांनी अत्यंत निष्ठुरपणे मारहाण केली. नंतर ते त्या दोघांना अज्ञात ठिकाणी घेऊन गेले व तेथे त्यांना त्यांनी गोळ्या घातल्या, असे ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने वृत्त दिले.
    दोघांचेही मृतदेह गुरुवारी रात्री गुजरा-जंग कालव्यातून बाहेर काढण्यात आले. शकील फैसलाबादेतील सरकारी शाळेत, तर अक्सा ग्रामीण आरोग्य केंद्रात कामाला होती. शकीलचे वडील खुशी मुहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीवरून थिकरीवाला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. शवविच्छेदनात त्या दोघांचा मृत्यू बंदुकीच्या गोळ्या डोक्यात मारल्यामुळे झाल्याचे म्हटले. अंगावर जखमाही आढळल्या. अक्सा चार दिवसांनी बाळाला जन्म देणार होती, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी एकाला अटक झाली असून, इतर फरार आहेत. 
=====================================

‘जिहाद’ विद्यापीठाला ३० कोटींची मदत!


  • पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वॉ प्रांताच्या सरकारने ‘जिहादचे विद्यापीठ’ अशी ओळख असलेल्या मदरशाला ३० कोटी रुपयांची मदत दिली आहे. या मदरशाशी अफगाण तालिबानचा माजी प्रमुख मुल्ला उमरसह अनेक वरिष्ठ तालिबानी नेते संबंधित होते व आहेत. दारूल उलुम हक्कानिया नौशेरा मदरशाला त्याच्या वार्षिक खर्चासाठी ३०० दशलक्ष रुपये देताना मला खूप अभिमान वाटत असल्याचे खैबर पख्तुनख्वॉचे मंत्री शाह फर्मान यांनी खैबर पख्तुनख्वॉ विधिमंडळात सांगितले.
    इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील तहरिक ए इन्साफ (पीटीआय) सरकार खैबर पख्तुनख्वॉमधील धार्मिक संस्थांवर धाडी घालत नाही, की त्यांना लक्ष्य करीत नाही. उलट त्यांना सहकार्यच करीत आहे. त्यांना आर्थिक साह्यही देत आहे, असे फर्मान म्हणाले.
    दारूल उल हक्कानिया ही पाकिस्तानात १९४७ मध्ये स्थापन झालेली शिक्षण संस्था असल्यामुळे तिला आर्थिक मदत मिळायलाच हवी, असे सांगण्यात आले. मौलाना सामी उल हक हे जमिअत उलेमा ए इस्लामचे नेते सध्या दारूल उल हक्कानियाचे प्रमुख आहेत. खैबर पख्तुनख्वॉमधील इतर धार्मिक संस्था आणि मशिदींनाही सरकार मदत देत असल्याचे फर्मान म्हणाले. 
=====================================

मल्ल्या म्हणाले, ‘मी बिन बुलाये मेहमान नव्हतो’!


  • लंडन : पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भारतीय उच्चायुक्तांसह विजय मल्ल्या दिसल्याने यावर चर्चेला तोंड फुटले असले तरी आपण 'बिन बुलाये मेहमान' नव्हे, या कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रण होते, असे टिष्ट्वट मल्ल्या यांनी केले आहे.
    कोट्यवधींच्या थकीत कर्ज प्रकरणात मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना भारताने फरार घोषित केले आहे. सुहेल सेठ यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात गुुरुवारी उच्चायुक्त नवतेज सरना सहभागी झाले होते. याच वेळी येथे मल्ल्या उपस्थित असल्याचे दिसले होते. यावर वाद निर्माण होताच विदेश मंत्रालयाने स्पष्ट केले की, मल्ल्या निमंत्रितांच्या यादीत नव्हते. (वृत्तसंस्था)
    मी माझ्या लेखक मित्रांसाठी या कार्यक्रमाला गेलो होतो. मुलीसह मी तिथे शांतपणे बसलो होतो आणि कार्यक्रम ऐकत होतो. तथापि, कुठलाही पुरावा नाही, आरोपपत्र नाही अशा वेळी मला माझे कायदेशीर उपाय करण्याची संधी द्यायला नको का?
=====================================

किस करताना शेन वॉर्न कॅमेऱ्यात कैद...


  • ऑनलाइन लोकमत
    नवी दिल्ली, दि. १९ : क्रिकेट विश्वात स्टार झालेले खेळाडू वैयक्तीक जिवनात वादाच्या भोवऱ्यात अडकल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता पन्नाशीच्या जवळ पोहोचलेला शेन वॉर्नचेच (47 वर्ष) घ्या. त्याच्या नावावर जसे अनेक विक्रम आहेत, जणू तेवढेच वादही आहेत. आता तो लंडन शहरात ‘पब्लिक प्लेस’मध्ये किस करताना आढला आहे. एवढंच नाही तर त्याचा हे किसप्रकरण कॅमेऱ्यातही कैद झाले आहे आणि त्यामुळंच ते आता अवघ्या सोशल जगातही व्हायरल झालेय.
    शेन वार्न नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. मुख्यत: नवनवीन गर्लफ्रेड बनवण्याच्या बाबतीत तो बदनाम आहे. २००० मध्ये वार्नर्शी संबंधित पहिला मामला सामोर आला होता. ब्रिटिश नर्स डोना राइटने वार्नवर अश्लील मेसेज पाठवाल्याचा आरोप लावला होता. यानंतर वॉर्नला आॅस्ट्रेलियन टीमच्या उप-कणर्धारपदाहूनही काढण्यात आले होते. यानंतर त्याचे सिमोनाशी असलेले १० वर्षांचे नातेही तुटले.
    मात्र वॉर्न तो वॉर्न. त्याची खोड काही जिरली नाही. त्यानंतरही २००६ मध्ये एमटीव्ही प्रेझेंटर कॉरेली इचोल्ट्ज आणि एम्मासह त्याचे न्यूड फोटो समोर आले होते. यानंतर वॉनर्चे नाव लिज हर्ले आणि ऐमिली स्कॉट यांच्यासह अनेक महिलांशीही जोडले गेले. तो सेक्स स्कँडलमध्येही अडकला होता. यामुळे त्याची वेळोवेळी फजितीच झाली नाही तर, पत्नीबरोबर डिव्हसर्देखील झाला. आता नवेच प्रकरण समोर आले. तो लंडनमध्ये एका कचराकुंडीशेजारी उभं राहून आपल्या ‘नव्या’ ‘गर्लफ्रेंड’ला किस करताना टिपला गेला आहे. ही नवी सुंदरी कोण? त्यालाच माहीत.
=====================================

डाळ आयातीवर गुप्तचरांची नजर


  • नवी दिल्ली : डाळींचा काळाबाजार, तसेच साठेबाजी रोखण्यासाठी डाळींच्या आयातीवर केंद्रीय गुप्तचर संस्था नजर ठेवून आहेत. या वस्तूंच्या किमतीत तेजी आणण्यासाठी होणाऱ्या गैरप्रकारांवर अंकुश लावण्याचा त्यामागे हेतू आहे.
    गुप्तचर विभाग (आयबी) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांनी व्यापारी आणि साठेबाजांना अशा प्रकारच्या अवैध कारवाया करण्यावरून सावध केले.
    गेल्या वर्षी ५५ लाख टन डाळींची आयात झाली होती. त्यातील मोठ्या प्रमाणावरील आयात खासगी व्यापाऱ्यांमार्फत करण्यात आली. आता डाळींचे भाव २०० रुपये प्रति किलोच्या आसपास पोहोचल्यावर सरकारने हे पाऊल उचलले आहे.
    केंद्रीय संस्था आणि प्राप्तीकर विभागाचे अधिकारी साठेबाजी रोखण्यास गेल्या काही दिवसांपासून छापे मारीत आहेत. गेल्या काही महिन्यांत जवळपास १४ हजार धाडी टाकण्यात आल्या आणि १.३३ लाख टन डाळी जप्त करण्यात आल्या.
    व्यापाऱ्यांनी यंदा आतापर्यंत तीन दशलक्ष टन डाळींच्या आयातीचे करार केले आहेत. ही आयात अंदाजे दोन अब्ज अमेरिकी डॉलरच्या आसपास आहे.
=====================================

डिजिटल बँकिंग १० लाख कोटींवर


  • मुंबई : इंटरनेट आणि अन्य तंत्रज्ञानानंतर गेल्या दोन वर्षांपासून डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर आता ग्राहकही या नव्या तंत्राला चांगलेच सरावले असून, डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल १० लाख कोटी रुपयांचे वित्तीय व्यवहार झाल्याची माहिती पुढे आली आहे. बँकिंग उद्योगाशी संबंधित एका आंतरराष्ट्रीय कंपनीने ‘डिजिटल बँकिंग, ट्रान्सफर्मेशन आॅफ बँकिंग’ नावाने भारतातील डिजिलट बँकिंगचे चित्र स्पष्ट करणारा अहवाल तयार केला आहे. त्याद्वारे ही रंजक माहिती पुढे आली आहे.
    उपलब्ध माहितीनुसार, डिजिलट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांनी, पैसे काढणे, भरणे, पैसे ट्रान्स्फर करणे, बिल भरणा करणे, गिफ्ट चेक देणे, ई-कॉमर्स सेवांसाठी बँकेच्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून पैसे भरणे आदी सेवा वापरण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या सर्व सेवांची ग्राहकाला माहिती झाली असून, ते या व्यवहारांसाठी सरावल्याचे दिसून आले आहे. हे व्यवहार करणे अतिशय सोयीचे असल्यामुळे ग्राहकांमध्ये या सेवा लोकप्रिय होत आहेत. डिजिटल बँकिंगचे तंत्रज्ञान इंटरनेटवर आधारित असले तरी इंटरनेट बँकिंग म्हणून सध्या जो प्रकार आहे, त्याच्या पुढची पायरी म्हणून डिजिलट बँकिंगकडे पाहायला हवे, असे मत डिजिटल बँकिंग विषयाचे अभ्यासक उपेंद्र राजगुरू यांनी व्यक्त केले.
=====================================

बचत खात्यातून कर्जवसुली


  • चेन्नई : स्मरणपत्रे पाठवूनही कर्जाचे हप्ते न भरणाऱ्या कर्जदाराच्या बचत खात्यातून बँकेने कर्जाची परस्पर वसुली करणे योग्य असल्याचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
    बचत खात्यातील आपल्या पेन्शनच्या रकमेतून थकित कर्जाची वसुली करण्यास एका राष्ट्रीयीकृत बँकेस मनाई करावी, यासाठी एका कर्जदाराने केलेली याचिका फेटाळताना न्या. एम. वेणुगोपाळ यांनी हा निर्वाळा दिला. 






=====================================

‘एकावर एक मोफत’ योजनांवरही ‘जीएसटी’!


  • नवी दिल्ली : वस्तूंचे मोफत नमुने किंवा भेटवस्तू तसेच ‘एका खरेदीवर एक मोफत’ यासारख्या जाणाऱ्या लोकप्रिय योजनाही ‘वस्तू आणि सेवा कर’च्या (जीएसटी) अंतर्गत येणार आहेत.
    जर सर्व काही सरकारच्या योजनेनुसार झाले, तर एप्रिल २0१७ पासून जीएसटी लागू होईल. याबाबत करतज्ज्ञांनी सांगितले की, सरकारने मॉडेल जीएसटी विधेयकाचा सार्वजनिक चर्चेसाठी जाहीर केलेल्या मसुद्यातहत पैसे न देताही वस्तू देण्यात येण्यासारख्या प्रत्येक व्यवहारावर जीएसटी लागू होईल.



=====================================
वाढदिवसानंतर राहुल गांधी लगेच परदेशात

नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) सकाळी ट्विट करत आपण काही दिवसांसाठी परदेशात जात असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

राहुल गांधी यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, काही दिवसांसाठी मी देशाबाहेर जात आहे. रविवारी मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानतो. राहुल गांधी यांनी आज परदेशात जात असल्याचे सांगितले असले तरी, सूत्रांच्या मते ते रविवारी रात्रीच परदेशी रवाना झाले आहेत.

गेल्यावर्षी राहुल गांधी काही दिवसांसाठी परदेशात गेले होते. या दौऱ्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर ते भारतात परतले होते. परदेशातून आल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर शेतकरी आत्महत्या, महागाई यासारख्या विविध विषयांवरून टीका केली होती. 
=====================================
''मोदी' म्हणजे 'मेकिंग ऑफ डेव्हलप्ड इंडिया''

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा जोरदार स्तुती करत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मोदी म्हणजे ‘मेकिंग ऑफ डेव्हलप्ड इंडिया‘ (विकसित भारताची निर्मिती) असून, याबाबतची जाण नागरिकांना होत असल्याचे म्हटले आहे.

नायडू यांनी यापूर्वी मोदी हे भारताला लाभलेली दैवी देणगी असल्याचे म्हटले होते. आता त्यांनी मोदींच्या अडनावावरून त्यांनी विकसित भारताची निर्मिती करणारे अशी उपमा दिली आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त राजपथ येथे आयोजित कार्यक्रमात नायडू बोलत होते. केंद्रातील मंत्र्यांकडून सतत मोदींची जोरदार स्तुती करण्यात येते.

नायडू म्हणाले की, देशातील नागरिकांना विश्वास होऊ लागला आहे की मोदी म्हणजे ‘मेकिंग ऑफ डेव्हलप्ड इंडिया‘. त्यामुळेच देशातील नागरिक त्यांना पाठिंबा देत आहेत. मोदी मन की बात सांगतात आणि नागरिक त्याला स्वीकारतात. स्वच्छ भारताचे आवाहन मोदींनी केल्याने आता ते एक जन आंदोलन बनले आहे.
=====================================
राजन यांच्या निर्णयाचा शेअर बाजारावर 'इफेक्ट'

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी गव्हर्नरपदाच्या दुसऱ्या टर्मसाठी दिलेल्या नकाराचा अर्थातच आज (सोमवार) शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. 

आज सकाळी शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली आहे. सेन्सेक्समध्ये सुमारे 170 अंशांची घसरण झाली. तर, निफ्टीदेखील 60 अंशांच्या घसरणीसह सुरु झाला. परंतु काही काळात बाजार पुन्हा सावरला. ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याची भीती वाढल्याने याचाही परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे बोलले जात आहे. भारतीय रुपयाचेही मूल्य ढासळले आहे. आज रुपयाचे मूल्य 60 पैशांनी घसरुन डॉलरच्या तुलनेत 67.68 एवढे झाले आहे. 

रघुराम राजन यांनी केंद्रीय बॅंकेचे प्रमुख या नात्याने दुसरी टर्म (कार्यकाळ) करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे. राजन यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, की 4 सप्टेंबरमध्ये गव्हर्नरपदावरून निवृत्त होत असून, आपण पुन्हा शिक्षणक्षेत्रात परतणार आहोत, असे सांगितले.

=====================================
केजरीवालांच्या घराबाहेर महेश गिरींचे उपोषण

नवी दिल्ली - भाजप खासदार महेश गिरी रविवारपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर बेमुदत उपोषणाला बसले आहे. केजरीवाल जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केजरीवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी लिहिलेल्या पत्रात गिरी यांच्यावर एमसीडीचे कायदेशीर सल्लागार एमएम खान यांच्या हत्येप्रकरणी आरोप केले होते. केजरीवाल यांनी केलेल्या आरोपींच्या यादीत गिरी यांच्यासह दिल्ली नगरपालिका परिषदेचे उपाध्यक्ष करणसिंह तंवर यांचेही नाव आहे. या कारणामुळे गिरी रविवारपासून केजरीवाल यांच्या घराबाहेर निवासस्थानाबाहेर बेमुदत उपोषणास सुरवात केली.

गिरी यांनी मागणी केली आहे की, केजरीवाल यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी त्यांनी सार्वजनिकरित्या चर्चा करावी. केजरीवाल यांना रविवारी चार वाजता गिरी यांनी चर्चेसाठी आमंत्रित केले होते. पण, केजरीवाल न आल्याने गिरींनी थेट त्यांच्या घराबाहेर उपोषण सुरु केले. दरम्यान, आज भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी गिरी यांची भेट घेऊन उपोषणात सहभागी होणार आहेत.
=====================================
काबूलमध्ये बसवर बॉम्बहल्ला; 14 जणांचा मृत्यू

काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहराजवळील पुल-ए-चरखी येथे आज (सोमवार) सकाळी परदेशी सुरक्षा रक्षकांना घेऊन जात असलेल्या बसमध्ये स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी आहेत.

स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, परदेशी सुरक्षा रक्षकांना घेऊन जात असलेल्या बसला लक्ष्य करुन हल्ला करण्यात आला. घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या असून, हल्ल्यात 14 जण मृत पावले आहेत. हल्ल्यातील मृत व जखमींची संख्या पाहता आपत्कालीन सेवांना अलर्ट करण्यात आले आहे.

सुरक्षा रक्षकांना घेऊन ही बस कार्यालयाकडे जात होती. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला असून, तालिबानी दहशतवाद्यांकडूनच हल्ला करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काबूलमध्ये गेल्या महिन्यातही सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर हल्ला करण्यात आला होता.
=====================================
लाचार होऊन युती नाही- उद्धव ठाकरे

मुंबई - ‘‘देशात आजपर्यंत अनेक लाटा आल्या आणि गेल्या. लाटेत ओंडकेही तरंगतात आणि लाट ओसरली की गोटेही शिल्लक राहतात हे लक्षात घ्या, असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केला. आगामी महापालिका निवडणुकीत लाचार होऊन तुमच्या मागे धावणार नाही. युती होईल किंवा नाही मला माहीत नाही. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. 
=====================================
निजामाचा बाप म्हणणाऱ्यांशी युती नको-कार्यकर्ते

पुणे - शिवसेनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन करतानाच "शतप्रतिशत भाजप‘, "शिवसेनेबरोबर युती नकोच‘, अशा घोषणा देत आगामी निवडणुका या पक्षाने स्वबळावरच लढवाव्यात, अशी मागणी रविवारी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नेत्यांकडे केली. "एकीकडे समजुतीची भूमिका घ्या,‘ असे नेते सांगत असताना, निजामाचा बाप म्हणणाऱ्या शिवसेनेबरोबर युती नको,‘ अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याने पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या आज दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत विविध विषयांवरील ठराव मांडण्यात आले. या वेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिवसेनेच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास माधव भंडारी यांनी अनुमोदन दिले. ठराव मंजूर करताना "पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्यात, तेवढे बळ आमच्यात आहे,‘ असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. अधिवेशनाच्या उद्‌घाटनात केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी ""एकत्र काम करताना काही अडचणी असल्यास, त्या एकत्र मिळून आपापसात सोडविण्याचा प्रयत्न करा. शिवसेना हा भाजपचा सर्वांत जुना मित्र आहे, त्याबरोबर यापुढेही काम करावयाचे आहे,‘‘ अशा शब्दांत युतीतील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. आज मात्र या ठरावाच्या वेळी कार्यकर्त्यांनी शिवसेना विरोधात कडक शब्दांत भावना व्यक्त केल्या. 
=====================================

No comments: