Tuesday, 7 June 2016

नमस्कार लाईव्ह ०७-०६-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- लंडन; 200 बालकांचं लैंगिक शोषण, तरुणाला 22 वेळा जन्मठेप 
2- न्युयॉर्क; देशातून चोरी झालेला सांस्कृतिक वारसा मायदेशी आणणार : मोदी 
३- बांगलादेशमध्ये हिंदू पुजा-याची हत्या 
४- मोसुल; 'सेक्‍स स्लेव्ह' याझिदी तरुणींना जिवंत जाळले 
५- न्युयॉर्क; अमेरिकेने भारताला सोपविल्या 12 प्राचीन मूर्ती 
६- दोहा; कतारने केली 23 भारतीय कैद्यांची सुटका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
७- रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, व्याजदरांत कोणताही बदल नाही 
८- वाढत्या प्रदुषणामुळे तुमच्या वयोमानात साडेतीन वर्षांनी घट 
९- मथुरा प्रकरणात दोघा अधिकाऱ्यांच्या बदल्या 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- महिलांकडून गैरवापरामुळे पॅनिक बटण काढण्याची तयारी? 
११- पुणे; बोपखेलवासियांचा पुन्हा लष्कराशी वाद उफाळणार? 
१२- शालेय साहित्याचा यंदाही घोळ 
१३- पुण्यात होणार शासकीय कर्करोग रूग्णालय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- दहावीच्या निकालाचा दुहेरी आनंद, झगडे मायलेकी एकत्र उत्तीर्ण 
१५- सामान्यज्ञानाचीही बोंब, बिहारच्या कथित टॉपर्सवर गुन्हा 
१६- पिंपरी-चिंचवड; धावत्या लोकलमध्ये स्टंट, तरुणाने दोन्ही पाय गमावले 
१७- बंगळूरू; अखेर रुग्णवाहिकेत लागले 'तिचे' लग्न 
१८- काश्मिरातील स्फोटात पाच जवानांसह नऊ जखमी 
१९- बेंगळूरू; पायपुसण्यांवर देवांच्या प्रतिमा, अ‍ॅमेझॉनबद्दल तीव्र संताप 
२०- नंदुरबार; विहिरी न खोदताच दोन कोटींचा निधी हडप! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- श्रद्धा कपूर, वरुण धवन, टायगर श्रॉफला ठकसेनांचा गंडा 
२२- ब्राझीलचा फुटबॉलर नेमार आणि दीपिकाचं कनेक्शन काय 
२३- कॅलिफोर्निया; कोपा अमेरिका - मेसी शिवाय अर्जेंटिनाचा चिलीवर २-१ ने विजय 
२४- दिल्ली: दुर्मिळ "सायबेरियन हस्की'चे अपहरण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२५- जिल्ह्याचा निकाल ७४.४८ %; दहावीत ३२,१३२ विद्यार्थी उत्तीर्ण 
२६- शिरढोण; महादेव मंदिरातील दरवाजांची चोरी 
२७- बिलोली; 'एसबीएच' बँकेला पिक विम्याचे रेकॉर्ड सापडेना; अनेक शेतकरी पिक विम्यापासून वंचित 
२८- हदगाव; पांगरी येथील विद्यार्थिनीची कमी गुण मिळाल्याने आत्महत्या 
२९- जिल्ह्यातील १० सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह २५ फौजदारांच्या बदल्या 
३०- सुंडगी; गायीवर झाडली गोळी; गुन्हा दाखल 
३१- विष्णुपुरी; ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीच्या मृत्यूचा तपास 'सीआयडी' मार्फत करण्याच्या मागणीसाठी उपोषण 
३२- निवघ्यात विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू; उमरीत शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
प्रताप पवळे, शहेबाज खान, अनिल अभंगे, दिनेश बिच्चेवार, सतीश पाटील, राहुल सोनाळे, दिगंबर लाभशेटवार, रोहित बोम्मावार, मदनवार नागेश, नागेश वान्नाले, बाळू कुशोभा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html

========================================

वाढत्या प्रदुषणामुळे तुमच्या वयोमानात साडेतीन वर्षांनी घट

वाढत्या प्रदुषणामुळे तुमच्या वयोमानात साडेतीन वर्षांनी घट
मुंबई : वाढत्या प्रदुषणामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतो, याबाबत सर्वसामान्यांना माहिती असतेच. मात्र नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणाने तुमच्या-आमच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. प्रदूषणामुळे आपलं आयुष्यमान कमी होत असल्याची माहिती आहे.

राज्यातील शहरांना प्रदूषणाने घातलेला विळखा आपलं आयुष्य कमी करत असल्याचं ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी डिपार्टमेंटने केलेल्या सर्वेक्षणात समोर आलं आहे. प्रदूषणामुळे राज्यात नागरिकांचं वयोमान साडेतीन वर्षांनी कमी होत असल्याचं म्हटलं आहे.

प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पावलेल्या नागरिकांच्या एकूण संख्येपैकी 10 टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात झाल्याचं आकडेवारी सांगते. त्यामुळे हा प्रश्न किती गंभीर होत चालला आहे, हे दिसून येत आहे.

या सर्वेक्षणात प्रदूषणाची समस्या गंभीर असलेल्या राज्यांपैकी पहिल्या स्थानावर उत्तर प्रदेश (15 टक्के) तर महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे येत्या काही काळात वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्याचं मोठं आव्हान सर्वांसमोर असणार आहे.
========================================

दहावीच्या निकालाचा दुहेरी आनंद, झगडे मायलेकी एकत्र उत्तीर्ण

दहावीच्या निकालाचा दुहेरी आनंद, झगडे मायलेकी एकत्र उत्तीर्ण
मुंबई : दहावीच्या निकालानंतर अनेक घरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मुंबईतल्या शिवडीत राहणाऱ्या झगडे कुटुंबासाठी मात्र हा आनंद दुहेरी ठरला आहे. कारण झगडे मायलेकी एकाचवेळी दहावी उत्तीर्ण झाल्या आहेत.

शिवडीतल्या झगडे कुटुंबाची 10 बाय 10 ची खोली आनंदानं उजाऴून निघाली आहे. शिक्षणाच्या दिव्याचा प्रकाश घरभर पसरला आहे. झगडे कुटुंबातील आई आणि लेक दोघीही एकाचवेळी दहावीची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झाल्या आहेत.

शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. चौथीत असताना शाळा सुटलेल्या सरिताताईंनी हेच पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. वयाच्या 45 व्या वर्षी इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर यशाची पायरी सर केली आहे.

सरिताताईंची मोठी मुलगी क्षितीजाही याच वर्षी 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झाली. आपला बारावीचा अभ्यास सांभाळून क्षितीजानं आईचा आणि धाकट्या बहिणीचा अभ्यास घेतला.
========================================

सामान्यज्ञानाचीही बोंब, बिहारच्या कथित टॉपर्सवर गुन्हा

सामान्यज्ञानाचीही बोंब, बिहारच्या कथित टॉपर्सवर गुन्हा
पाटणा : बिहारमधल्या बारावी परीक्षेतील कथित घोटाळ्यात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सामान्यज्ञानाचे वाभाडे निघाल्याने त्यांच्या गुणांवर संशय व्यक्त करण्यात आला होता.

विज्ञान शाखेतून सौरभ श्रेष्ठ आणि राहुल तर कला शाखेतून रुबी ही विद्यार्थिनी पहिली आली होती. पण त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत या सर्व विद्यार्थ्यांनी सोप्या सोप्या प्रश्नांची काही भलतीच उत्तरं दिली होती.

पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय, होमसायन्समध्ये काय असतं, अशा साध्या प्रश्नांवर तिने जेवण बनवायला शिकवतात, असं उत्तर दिलं. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांची ही गत पाहून प्रसारमाध्यमांनाही याची चांगलीच दखल घेतली.


पाहा व्हिड़िओ :



अखेर या घोटाळ्यात बिहार शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसह व्ही.आर. महाविद्यालयाच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
========================================

श्रद्धा कपूर, वरुण धवन, टायगर श्रॉफला ठकसेनांचा गंडा

श्रद्धा कपूर, वरुण धवन, टायगर श्रॉफला ठकसेनांचा गंडा
मुंबई : बंटी और बबली, स्पेशल 26 सारख्या चित्रपटांच्या कथा मोठ्या पडद्यावर मनोरंजक वाटतात. मात्र चक्क बॉलिवूड स्टार्सनाच अशाप्रकारे ठकसेनांनी लुबाडल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ या बॉलिवूडच्या नव्या कलाकारांना दोघा जणांनी गंडा घातल्याचं उघड झालं आहे.

आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन श्रद्धा कपूर, वरुण धवन आणि टायगर श्रॉफ यांच्याकडून आरोपींनी हजारो रुपये उकळल्याचा आरोप आहे. प्रत्येकाकडून घेतलेली रक्कम 40 ते 75 हजारांच्या घरात असल्याची माहिती आहे.

याप्रकरणी 36 वर्षीय मुरली मुंढेरा आणि 41 वर्षीय महेश खेतवानी यांना मुंबई क्राईम ब्रांचने अटक केली आहे. दोन्ही आरोपींनी आपण या तिघांशिवाय अनेक बॉलिवूड ताऱ्यांना चुना लावल्याची कबुली दिली आहे.

घरावर आयकर विभागाची धाड घालू अशी धमकी ते देत असत. ठाण्याच्या आयकर विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची वागण्या-बोलण्याची पद्धत दोघांनी आत्मसात केली होती. श्रद्धा, वरुण, टायगर व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील काही व्यक्तींनाही त्यांनी लुबाडल्याची शक्यता आहे.
========================================

ब्राझीलचा फुटबॉलर नेमार आणि दीपिकाचं कनेक्शन काय

ब्राझीलचा फुटबॉलर नेमार आणि दीपिकाचं कनेक्शन काय?
मुंबई : ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण यांचा काय कनेक्शन असू शकतं? फार विचार करु नका, कारण या दोघांमध्ये काही सुरु नाही. ज्या सिनेमातून दीपिका हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, त्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न ऑफ झँडर केज’मध्ये नेमारही दिसणार आहे.


दीपिकाच्या या हॉलिवूड सिनेमात नेमारची छोटा मात्र महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटात नेमारचा कॅमियो आहे. विशेष म्हणजे दीपिका नेमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल.
========================================

धावत्या लोकलमध्ये स्टंट, तरुणाने दोन्ही पाय गमावले

धावत्या लोकलमध्ये स्टंट, तरुणाने दोन्ही पाय गमावले
पिंपरी-चिंचवड : लोकल ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाला दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून हा तरुण बचावला. पिंपरी-चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे.


सचिन डुलगज हा तरुण देहुरोड रेल्वे स्टेशनवरुन लोणावळा-पुणे या लोकलने प्रवास करत होता. मात्र रेल्वेत स्टंटबाजी करण्याच्या नादात तो खाली कोसळला आणि पाय रेल्वेखाली आल्याने त्याला दोन्ही पाय गमवावे लागले.


याआधी कामशेत रेल्वे स्टेशनवरील स्टंटबाजी नंतर एबीपी माझाने तो व्हिडिओ दाखवून तरुणांना असं कृत्य न करण्याचे आवाहन केलं होतं. मात्र काही टवाळखोर तरुणांना याचं काहीच सोयरसुतक नसल्याचं या घटनेने पुन्हा समोर आलं आहे.


सचिनचं नशिब बलवत्तर म्हणून आलेलं मरण त्याच्या पायांवरच निभावलं. मात्र लोकलमध्ये स्टंटबाजी करणारे या घटनेपासून काही धडा घेणार का? हा कायम प्रश्न आहे.

पाहा व्हिडीओ

========================================

200 बालकांचं लैंगिक शोषण, तरुणाला 22 वेळा जन्मठेप

200 बालकांचं लैंगिक शोषण, तरुणाला 22 वेळा जन्मठेप
लंडन : लहान मुलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका व्यक्तीला तब्बल 22 वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 30 वर्षांच्या रिचर्ड हकलने आठ वर्षांच्या कालावधीत केलेल्या गुन्ह्यांसाठी ब्रिटनमधील एका कोर्टाने ही शिक्षा ठोठावली.

2006 ते 2014 या कालावधीत रिचर्डने मलेशियामध्ये शेकडे बालकांचं लैंगिक शोषण केलं. या बालकांचं वय 6 महिने ते 12 वर्ष या वयोगटातलं होतं. बाल लैंगिक शोषणाशी निगडीत 71 आरोपांमध्ये रिचर्डने गुन्हे कबूल केले आहेत.

Child Abuse British Youth

पोलिसांच्या माहितीनुसार रिचर्डच्या अत्याचाराला बळी पडलेल्या बालकांची संख्या 200 च्या घरात आहे. यापैकी अनेक बालकं मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमधील होती. यापैकी अनेक मुलं निराधार किंवा गरिब घरातील होती. ब्रिटीश नागरिक असलेल्या रिचर्डला या गुन्ह्यांसाठी किमान 23 वर्ष तुरुंगात काढावी लागतील.

‘लैंगिक शोषणांच्या इतक्या प्रकरणांवर एकाच वेळी सुनावणी करण्याची वेळ क्वचित एखाद्या जजवर येते. ही शरमेची बाब आहे’ असं रिचर्ड हकल प्रकरणी शिक्षा सुनावतात जज पीटर यांनी म्हटलं.
========================================

बोपखेलवासियांचा पुन्हा लष्कराशी वाद उफाळणार?

बोपखेलवासियांचा पुन्हा लष्कराशी वाद उफाळणार?
पुणे: पुण्यातील बोपखेल गावातील रहिवासी आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांमधला वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. कारण बोपखेलवासीयांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेला तरंगता पुल हटवायला लष्कराने सुरुवात केली आहे. यामुळे बोपखेलवासियांना आता 15 ते 20 किलोमीटरचा अधिक वळसा घालून आपल्या गावात पोहचावं लागणार आहे.

या प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी गेल्या काही महिन्यात लष्करी अधिकारी आणि गावकऱ्यांमध्ये अनेक बैठकी झाल्या. पण यात तोडगा निघाला नाही. सुरक्षेचं कारण देत, लष्कराने पुल ठेवण्यास मनाई केली होती.

त्यातच आज पुल हटवायला सुरुवात झाल्याने हा प्रश्न आगामी काळात चिघळण्याची शक्यता आहे.
========================================

देशातून चोरी झालेला सांस्कृतिक वारसा मायदेशी आणणार : मोदी 

देशातून चोरी झालेला सांस्कृतिक वारसा मायदेशी आणणार : मोदी
न्यू यॉर्क : स्वित्झर्लंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात मोदी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत.

अमेरिकेचे थिंक टँक मानल्या जाणाऱ्यांशीही मोदी संवाद साधतील. भारतीय वेळेनुसार पहाटे दोन वाजताच्या सुमारास मोदी वॉशिंगटनला पोहचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचा हा चौथा दिवस आहे.
========================================

महिलांकडून गैरवापरामुळे पॅनिक बटण काढण्याची तयारी?

महिलांकडून गैरवापरामुळे पॅनिक बटण काढण्याची तयारी?
मुंबई : लोकलमधून महिला डब्यात प्रवास करताना संकटकाळी मदत व्हावी म्हणून रेल्वे प्रशासनाने ‘पॅनिक बटण’ गेल्याच आठवड्यात सुरु केलं. मात्र या प्रायोगिक योजनेचाच गैरवापर होत असल्याचं लक्षात आल्याने रेल्वे पुनर्विचाराच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षित प्रवासाठी रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर ‘पॅनिक बटण’ सुरु केलं. मात्र गेल्या आठवड्यात दोन वेळा त्याचा गैरवापर झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याचा पुनर्विचार करण्याची भूमिका रेल्वेने घेतली आहे.

सध्या मध्य रेल्वेच्या एका लोकलमध्ये महिलांच्या पाच डब्यांत पॅनिक बटण बसवण्यात आलं आहे. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर अन्य लोकलमध्ये ही सुविधा देण्याचा रेल्वेचा मानस आहे. महिलांना रेल्वे डब्यात जर असुरक्षित वाटत असल्यास किंवा आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास त्या हे बटण दाबून तात्काळ मदत मिळवू शकतात.

मध्य रेल्वेवर गेल्याच आठवड्यात सलग दोन दिवस वाशी आणि मानखुर्द रेल्वे स्थानकांमध्ये लोकल आली असता महिलांच्या डब्यातून या पॅनिक बटणाचा वापर करण्यात आला. मात्र महिला प्रवाशांना कोणताही धोका नसताना त्याचा गैरवापर झाल्याचे समोर आले.
========================================

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, व्याजदरांत कोणताही बदल नाही


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. ७ - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नव्या आर्थिक वर्षातील दुसरे द्वैमासिक धोरण जाहीर करताना व्याजदरांत कोणताही बदल केलेला नाही. रिव्हर्स रेपो रेट ६ टक्क्यांवर आणि रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. तसेच CRR किंवा कॅश रिझर्व्ह रेशोही चार टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
    काय असतो रेपो रेट ?
    रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात कर्ज मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
========================================

कॅलिफोर्निया; कोपा अमेरिका - मेसी शिवाय अर्जेंटिनाचा चिलीवर २-१ ने विजय


  • ऑनलाइन लोकमत 
    कॅलिफोर्निया, दि. ७ - आपला स्टार फुटबॉलपटू लायोनेल मेसी शिवाय खेळणा-या अर्जेंटिनाने कोपा अमेरिका स्पर्धेत गतविजेत्या चिलीवर २-१ ने विजय मिळवून तीन गुणांची कमाई केली. दुखापतीमुळे मेसी या सामन्यात खेळू शकला नाही. मेसीची अनुपस्थिती एंजल डी मारीयाने भरुन काढली. 
    त्याने विजयात निर्णायक ठरलेल्या दोन्ही गोलमध्ये महत्वाची भूमिका बजावली. सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला एव्हर बानेगाकडून मिळालेल्या पासचे मारीयाने गोलमध्ये रुपानंतर केले. त्यानंतर आठ मिनिटांनी बानेगाला दुसरा गोल करण्यात मदत केली. चिलीच्या जोसे पेड्रोने एक्स्ट्रा टाईममध्ये ९३ व्या मिनिटाला गोल करुन आघाडी कमी केली. पण तो पर्यंत उशीर झाला होता. 
========================================

अखेर रुग्णवाहिकेत लागले 'तिचे' लग्न


  • ऑनलाइन लोकमत 
    बंगळुरु, दि. ७ - 'तिने' सुद्धा अन्य मुलींप्रमाणे नववधूसारखे नटून मंत्रोच्चाराच्या पठणात अग्निसमोर सात फेरे घेण्याचे स्वप्न बघितले होते. तिच्या विवाहाचा दिवस जवळ येत होता. डोळयात अनेक स्वप्ने साठवून ती विवाहाची तयारी करत होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. विवाहाच्या काही दिवस आधी अचानक तिला मोठा अपघात झाला आणि सभागृहाऐवजी रुग्णवाहिकेत स्ट्रेचरवर झोपून तिला लग्नगाठ बांधावी लागली. 
    नेत्रावती असे या मुलीचे नाव असून ठरलेल्या दिवशी लग्न करण्यासाठी नेत्रावती रुग्णावाहिकेतून थेट चित्रदुर्ग मठात आली आणि विवाहबद्ध झाली. बीजी केरी गावात रहाणारी नेत्रावती शेतकरी कुटुंबातील आहे. गुरुस्वामी बरोबर भेट झाल्यानंतर पहिल्या भेटीत दोघांचे प्रेमाचे सुरु जुळले. गुरुस्वामी पेशाने तंत्रज्ञ आहे. 
    पाच जूनला अमावस्येला चित्रदुर्ग मठात सामूहिक विवाह सोहळयात लग्न करण्याचा दोघांनी निर्णय घेतला होता. पण २३ मे रोजी नेत्रावती गुरुस्वामी बरोबर चित्रदुर्ग गडावर फिरण्यासाठी गेलेली असताना पायघसरुन खाली पडली. तिला मोठा अपघात झाला. तिला रुग्णालयात दाखल केले. 
========================================

बांगलादेशमध्ये हिंदू पुजा-याची हत्या


  • ऑनलाइन लोकमत - 
    ढाका, दि. 07 - हिंदू पुजा-याची क्रूरपणे हत्या केल्याची घटना बांगलादेशमध्ये घडली आहे. 65 वर्षीय अनंत गोपाल गांगुली मंदिरात जात असताना दुचाकीवरुन आलेल्या 3 हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने अनंत गांगुली यांच्या गळ्यावर वार करत क्रूरपणे हत्या केली आणि त्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. मुस्लिमांची बहुसंख्या असलेल्या बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यात अल्पसंख्यांकावर तसंच धर्मनिरपेक्ष कार्यकर्त्यांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. 
    अनंत गोपाल गांगुली सकाळी 9.30 वाजता मंदिरात चालले होते. त्यावेळी दुचाकीवरुन 3 हल्लेखोर आले आणि अनंत गांगुली यांच्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करत त्यांची हत्या केल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक गोपीनाथ कांजीलाल यांनी दिली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून पद्दतशीरपणे योजना आखत अल्पसंख्याक, धर्मनिरपेक्ष कार्यकर्ते, परदेशी नागरिक आणि विचारवंतांवर हल्ले केले जात आहेत. 
========================================

शालेय साहित्याचा यंदाही घोळ


  • मुंबई : शासकीय आदिवासी आश्रमशाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाने घातलेल्या घोळामुळे गेल्या वर्षी वह्या आणि शालेय साहित्यापासून वंचित राहावे लागले होते. यंदाही असाच घोळ सुरू आहे.
    १० कोटी रुपयांच्या साहित्याच्या खरेदीसाठी ४ एप्रिल २०१६ रोजी निविदा काढण्यात आली होती. त्यात वह्या, पेन, पेन्सील, कंपास आदी शालेय साहित्याचा समावेश होता. नियमानुसार २१ दिवसांनंतर निविदेला अंतिम मंजुरी मिळायला हवी होती. मात्र ती आज जून उजाडला तरी देण्यात आलेली नाही. कार्यादेश देण्यात आणखी काही दिवस गेले तर विद्यार्थ्यांपर्यंत साहित्य पोहोचण्यात आणखी विलंब लागणार आहे. १५ जूनपासून शाळा सुरू होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती साहित्य पडण्याची शक्यता त्यामुळे मावळली आहे.
    पुरवठादाराची वार्षिक उलाढाल १० कोटी रुपये असावी यासह निविदेत टाकण्यात आलेल्या काही अटी विशिष्ट कंत्राटदारांचं चांगभलं करण्यास असल्याची चर्चा विभागामध्ये आहे. या अटी-शर्र्थींमध्ये शासनाच्या आधीच्या निर्णयांचे उल्लंघन झाल्याचीही तक्रार आहे. निर्णयानुसारच खरेदी करावी, असा शेरा राज्यमंत्र्यांनी दिलेला असतानाही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. 
========================================

मथुरा प्रकरणात दोघा अधिकाऱ्यांच्या बदल्या



  • नवी दिल्ली/लखनौ : उत्तर प्रदेशच्या मथुरेतील जवाहरबागमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर मंगळवारी तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मथुरेचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षकांची सोमवारी बदली केली.
    जवाहरबागमध्ये गेल्या आठवड्यात पोलीस आणि अतिक्रमणकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात दोन पोलीस अधिकारी शहीद तर २७ लोक मृत्युमुखी पडले होते. अ‍ॅड. अश्विनी उपाध्याय यांनी याप्रकरणी जनहित याचिकेद्वारे तातडीने सुनावणीची विनंती केली होती. न्यायमूर्तीद्वय पी.सी. घोष आणि अमिताभ राय यांच्या पीठाने ही विनंती मान्य करून ७ जूनला सुनावणी निश्चित केली आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने बाजू मांडताना कामिनी जयस्वाल यांनी सांगितले की, घटनेच्या प्रारंभापासूनच पुरावे नष्ट करण्यात येत असून सुमारे २०० वाहने यापूर्वीच जाळण्यात आली आहेत. गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरणाची सीबीआय चौकशी आवश्यक आहे. मथुरेतील जवाहरबाग हिंसाचाराविरुद्ध लखनौस्थित विधानभवनाला घेराव घालण्यासाठी जात असलेले भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) कार्यकर्ते आणि पोलिसात किरकोळ चकमक उडाली. भाजयुमो कार्यकर्ते विधानभवनाला घेराव घालण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी रोखल्याने किरकोळ चकमक उडाली.
========================================

काश्मिरातील स्फोटात पाच जवानांसह नऊ जखमी


  • श्रीनगर : जम्मू-काश्मिरात सोमवारी स्फोटाच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जवानांसह नऊ जखमी झाले. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात बसस्थानकाजवळ केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनात झालेल्या स्फोटात दोन जवान व तीन पोलीस जखमी झाले.
    वाहनातील अश्रुधुराचे नळकांडे फुटल्याने स्फोट
    झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. दुसऱ्या घटनेत गांदेरबल जिल्ह्यात सोनामार्गमध्ये निर्माणाधिन पुलाजवळच्या स्फोटात चार कामगार जखमी झाले. (वृत्तसंस्था)
    >हंदवाडामध्ये शोध मोहीम
    सुरक्षा दलांनी कुपवाडा जिल्ह्याच्या हंदवाडा क्षेत्रातील जंगलांमध्ये दहशतवादी दडून बसले असल्याची सूचना मिळाल्यावर संपूर्ण परिसरात सोमवारी शोध मोहीम सुरु केली. दहशतवाद्यांचा शोध लागला नाही.
========================================

पायपुसण्यांवर देवांच्या प्रतिमा, अ‍ॅमेझॉनबद्दल तीव्र संताप


  • बेंगळुरू : ई-कॉमर्समधील प्रमुख कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनने दारावरील चटया (डोअरमॅट), तसेच अन्य उत्पादनांवर हिंदू देवी-देवता, कुराणाची अवतरणे, येशू ख्रिस्तांच्या प्रतिमांचा वापर केल्यामुळे खळबळ उडाली आहे. कंपनीच्या अमेरिकन पोर्टलवर उत्पादनांच्या जाहिरातीत अशा प्रतिमा दाखविण्यात आल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
    टिष्ट्वटरवर संताप व्यक्त झाल्यानंतर अ‍ॅमेझॉनने ही उत्पादने जाहिरातींमधून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अ‍ॅमेझॉनने अशा प्रतिमा असलेले मोबाइल फोन कव्हर, माउस पॅड आणि अन्य उत्पादनाची विक्री चालविली असल्याचा दावा अन्य वेबसाइटने केला आहे.
    आॅनलाइन विक्री करणाऱ्या कंपनीवर सोशल मीडियातून रोष व्यक्त होण्याची पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी फॅशन ई-टेलर मंत्रा ही कंपनी गार्इंच्या कातड्यापासून बनविलेल्या बॅग विकत असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर हिंदू गटाने कंपनीविरुद्ध जोरदार मोहीम छेडली होती. अशा बॅगची निर्मिती आयात केलेल्या कातड्यापासून करण्यात आली असल्याचा खुलासा करीत या कंपनीने माफीही मागितली होती. अ‍ॅमेझॉन इंडियाने पक्षी पकडण्याचे जाळे आणि पिंजरे बाजारात आणल्यावर वन्यप्राणीप्रेमी संघटनांनी आक्षेप घेतला होता. कंपनीने त्यानंतर संबंधित ४०० उत्पादने वगळली होती.
========================================

पुण्यात होणार शासकीय कर्करोग रूग्णालय


  • नम्रता फडणीस,
    पुणे- कर्करोग रुग्णांना उपचार मिळणे आणखी सुलभ व्हावे, यासाठी आता पुण्यात शासकीय कर्करोग रूग्णालय उभारले जाणार आहे. त्यासाठी जागेची पहाणी झाली असून लवकरच जागा निश्चित केली जाईल, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
    ससून सर्वोपचार रूग्णालयाने कर्करोग रूग्णालयाच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला असून, यासंबंधीचा प्रस्ताव एक वर्षांपूर्वी शासनदप्तरी दाखल केला आहे. जुनी जिल्हा परिषदेची इमारत आणि ससून रुग्णालयाच्या मधोमध असलेला भूखंड यासाठी निश्चित करण्यासंबंधी चर्चा सुरू आहे. हा सव्वा दोन एकरचा भूखंड एमएसआरडीसीचा आहे, त्यांच्याशी जागेसंबंधी बोलणी सुरू आहेत. या भूखंडाच्या बदल्यात ससूनची येरवडा येथील मेंटल हेल्थ इन्स्टिट्यूटची जागा एमएसआरडीसीला देण्यात येणार आहे.
    शासकीय कर्करोग रूग्णालयासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे रूग्णालय लवकरात लवकर आकाराला येण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार आहे.
========================================

विहिरी न खोदताच दोन कोटींचा निधी हडप!


  • रमाकांत पाटील,
    नंदुरबार- विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत राबविलेल्या स्वाभिमान सबलीकरण योजनेत लाभार्थ्यांसाठी विहिरी न खोदताच परस्पर रक्कम हडप केल्याचा प्रकार जिल्ह्यात उघड झाला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने गेल्या पाच वर्षांत ही योजना राबविली असून त्यावर आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठपका ठेवला आहे.
    विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत २०१०-११ व २०११-१२ साठी वनहक्क कायद्यांतर्गत तथा स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या शेत जमिनीवर नवीन विहिरी खोदून विद्युत पंप बसवून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास विभागातर्फे योजना राबविण्यात आली. २०१०-११ मध्ये ४६ लाभार्थ्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांप्रमाणे एक कोटी १५ लाखांचा निधी वर्गही करण्यात आला होता. २०११-१२मध्ये २५ लाभार्थ्यांसाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांप्रमाणे ७५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी ६२ लाख ५० हजार रुपयांचा निधी प्रत्यक्ष वितरीत झाला आहे. यासंदर्भात कृषी विकास विभागाने आॅगस्ट २०१५ मध्ये ही कामे पूर्ण झाल्याचा अहवाल सादर केला आहे. अहवालासोबत लाभार्थ्यांचा १०० रुपयांच्या स्टॅम्पवर करारनामा तसेच निधीच्या उपयोगीतेचे प्रमाणपत्र जोडले आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्यासह संबधित योजनेच्या लाभार्थ्यांनी आदिवासी विकास एकात्मिक प्रकल्पाकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत उपयोगिता प्रमाणपत्र बनावट असल्याचे व त्यावरील उप अभियंता व कृषी अधिकारी यांच्या सह्या एकसारख्या असल्याचे दिसून आले.
========================================
दिल्ली: दुर्मिळ "सायबेरियन हस्की'चे अपहरण

नवी दिल्ली - दिल्ली शहरामधील वसंतकुंज भागामधील एका पाळीव कुत्र्याचे "अपहरण‘ करण्यात आल्याचे वृत्त आज (मंगळवार) सूत्रांनी दिले. हा कुत्रा "सायबेरियन हस्की‘ या जातीचा असून ही जात भारतामध्ये अत्यंत दुर्मिळ आहे.

एका एसयुव्हीमधून आलेल्या दोन जणांनी या कुत्र्यास गाडीमध्ये ओढून येथील सुलतानगढी दर्गा भागाच्या दिशेने पोबारा केला. प्राण्यांच्या परकीय जातींचा खरेदीविक्री व्यवसाय करणाऱ्यांमधील काही जणांचे हे कृत्य असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. "ब्रीडिंग‘ साठी परकीय जातीच्या श्‍वानांचा वापर करण्यावर भारतामध्ये गेल्या एप्रिल महिन्यापासून बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर, अशा स्वरुपाच्या दुर्मिळ जातींच्या प्राण्यांच्या मालकांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. 
========================================
मोसुल; 'सेक्‍स स्लेव्ह' याझिदी तरुणींना जिवंत जाळले

मोसूल - दहशतवाद्यांबरोबर शारिरीक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या किमान 19 बाणेदार याझिदी तरुणींना इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेकडून जिवंत जाळण्यात आल्याची घृणास्पद घटना घडली आहे.

"सेक्‍स स्लेव्हज‘ म्हणून पकडण्यात आलेल्या या तरुणींना इराकमधील मोसूल शहरात लोखंडी पिंजऱ्यांत बंदिस्त करुन जाळण्यात आले. शेकडो जणांच्या उपस्थितीत हा भीषण प्रकार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. "19 तरुणींना जिवंत जाळण्यात आले. यावेळी शेकडो जण हा प्रकार मूकपणे पाहत होते. या मुलींना वाचविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही,‘‘ असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

इसिसच्या ताब्यात सध्या सुमारे 5 हजार याझिदी महिला असून त्यांना अशा अनन्वित अत्याचारांस सामोरे जावे लागत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या महिलांमध्ये अनेक अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. 
========================================
अमेरिकेने भारताला सोपविल्या 12 प्राचीन मूर्ती

न्यूयॉर्क - भारतातून तस्करी करण्यात आलेल्या चौल व मौर्य राजवटीतील 12 प्राचीन मूर्ती अमेरिकेने भारताला सोपविल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) अमेरिकेत दाखल झाले असून, अमेरिकेकडून भारताला ही भेट देण्यात आली आहे.

स्वित्झर्लंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. वॉशिंग्टनमध्ये मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा आणि दक्षिण मध्य आशियाचे सहाय्यक परराष्ट्रमंत्री निशा बिस्वाल आदी अधिकारी उपस्थित होते. विमानतळावर भारतीय नागरिकांनी जल्लोषात मोदींचे स्वागत केले. या दौऱ्यात मोदी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची आज भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचा हा चौथा दिवस असून, यानंतर ते मेक्सिकोला भेट देणार आहेत.
========================================
कतारने केली 23 भारतीय कैद्यांची सुटका

दोहा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कतारला भेट दिल्यानंतर कतारने मैत्रीचे प्रतीक म्हणून कैदेत असलेल्या 23 भारतीय नागरिकांची सुटका केली आहे.

कतार दौऱ्यादरम्यान मोदींनी प्रामुख्याने कतारमधील भारतीयांचे हिताबद्दल कतारच्या नेतृत्वाशी चर्चा केली होती. रमजानच्या पवित्र महिन्याची सुरवात होण्याच्या पार्श्वभूमीवर आमीर शेख तमीम बिन हमद अल-थाणी यांनी हे पाऊल उचलल्याबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले आहेत. मोदी ट्विटरवरून कतारचे आभार मानत म्हणाले की, रमजानच्या पवित्र महिन्याच्या सुरवातीला कतारने 23 भारतीय कैद्यांची सुटका केली. हे एका दृढ मैत्रीचे प्रतीक असून याबद्दल मी कतारच्या आमीरचे मनापासून आभार मानतो.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कतारच्या आमीरने मोदींना कतारमधील 6.3 लाख भारतीयांची काळजी घेतली जाइल असे आश्वासनही दिले आहे.

========================================

No comments: