Tuesday, 21 June 2016

नमस्कार लाईव्ह २१-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्पच्या हत्येचा प्रयत्न 
२- ब्रसेल्समध्ये स्फोटक पट्टा घातलेल्या एका व्यक्तीला अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- योग म्हणजे शून्य बजेटचा आरोग्यविमा : नरेंद्र मोदी 
४- देशभरात योगदिनाचा उत्साह, चंदीगडमध्ये मोदींचा योग 
५- आतापर्यंत भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
६- खडसेंची न्यायालयीन चौकशी होणार, सरकार न्यायमूर्तींचं नाव घोषित करणार 
७- व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा : मुंबईसह दहा ठिकाणी ईडीचे छापे 
८- मुंबई; प्रवाशांचा संताप, पंचवटी एक्स्प्रेसवर दगडफेक 
९- कोलकाता; टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आज मुलाखत 
१०- शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूपत्राचा वाद, जयदेव यांची 18 जुलैपासून उलटतपासणी 
११- ठाणे; पारसिक बोगद्याजवळ संरक्षक भिंत कोसळून फास्ट ट्रॅकवरील वाहतूक पुर्णपणे ठप्प 
१२- विदर्भातील ५५ टक्के आत्महत्या मदतीला अपात्र 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- विक्रोळी स्थानकात अज्ञाताची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या 
१४- नांदेड; शर्टात कॉपी, पॅडखाली कॉपी, साडे 8 हजार सरकारी कर्मचारी सापडले ! 
१५- मेरठ; तिहेरी हत्याकांडाने मेरठ हादरलं, कंडोम सापडल्यानं गूढ वाढलं! 
१६- म्हाडाचं घरं आता मोठं, क्षेत्रफळातील विसंगती अखेर दूर 
१७- कानपूर; मुस्लिम बांधवांच्या रमजानसाठी हिंदू देतोय जागता पहारा 
१८- लासगाव; शौचास जाणा-या तरुणावर बिबटयाचा हल्ला 
१९- मुंबई; मालकाची ३० लाखाची एसयूव्ही चोरुन टॅक्सीमध्ये बदलली 
२०- लोकल सेवा रखडलेली असताना दक्षिण मुंबईत टॅक्सी चालकांचा बंद 
२१- मुंबई - भांडूपमध्ये महिलेने लोकमध्येच दिला बाळाला जन्म. 
२२- कर्नाटक; ओमनी कार आणि खासगी बसमध्ये अपघात; 8 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू, 11 जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- 'मोहेंजोदडो'चं ट्रेलर लाँच, हृतिक रोशनचा अनोखा अवतार 
२४- भारताकडून झिम्बाब्वेचा 10 विकेट्सने धुव्वा 
२५- 'सुलतान'च्या शूटिंगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटायचं : सलमान 
२६- …. अखेर विंडोज -१० ला फेसबुक अॅप मिळाले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
==========================================

अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्पच्या हत्येचा प्रयत्न

अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्पच्या हत्येचा प्रयत्न
लॉस अँजेलस : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न उधळण्यात पोलिसांना यश आलं आहे. 19 वर्षीय ब्रिटीश व्यक्तीला लास वेगासमध्ये अटक करण्यात आली आहे.

ट्रम्प यांच्या लास वेगासमधील रॅलीमध्ये आरोपीने पोलिस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. मिशेल सँडफोर्ड असं आरोपीचं नाव असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या उद्देशातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती आहे.

ट्रम्प यांची हत्या करण्यासाठीच आपण कॅलिफोर्नियाहून लास वेगासला आल्याची कबुली त्याने सिक्रेट सर्व्हिस एजंटना दिली आहे. यापूर्वी कधीच बंदूक न चालवल्यामुळे आदल्या दिवशी शूटिंग रेंजवर त्याने सराव केल्याचीही माहिती आहे.

विशेष म्हणजे ट्रम्प यांचा जीव घेतल्यास तत्क्षणी पोलिस अधिकारी आपल्याला ठार करतील, यासाठी आपली तयारी झाल्याचंही त्याने सांगितलं. हा प्रयत्न फसल्यास पुढील रॅलीत हत्या करण्यासाठी त्याचीही तिकीटं त्याने विकत घेतली होती.
==========================================

योग म्हणजे शून्य बजेटचा आरोग्यविमा : नरेंद्र मोदी

योग म्हणजे शून्य बजेटचा आरोग्यविमा : नरेंद्र मोदी
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
चंदिगड : आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हजारो नागरिकांच्या उपस्थित योग केला. यावेळी योगाची महती सांगताना ‘योग म्हणजे शून्य बजेटचा आरोग्यविमा’ असल्याचं मोदी म्हणाले.


ज्याप्रमाणे मोबाईल फोनला कवटाळून बसता, तसं योगाला आपलंसं करा, असं आवाहन पंतप्रधानांनी उपस्थितांना केलं. योगाला कर्मकांडाशी जोडू नका आणि त्याला वादात ओढू नका अशी विनंतीही मोदींनी केली. योग परलोकाचं विज्ञान नसून इहलोकात मनःशांती कशी मिळेल, हे सांगणारं विज्ञान असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
==========================================

देशभरात योगदिनाचा उत्साह, चंदीगडमध्ये मोदींचा योग

देशभरात योगदिनाचा उत्साह, चंदीगडमध्ये मोदींचा योग
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगडमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला 30 हजार नागरिकांनी सहभागी नोंदवल्याची माहिती आहे.

फरिदाबादमध्ये बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत खास कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात जवळपास 1 लाख नागरिक उपस्थित होते. भाजप अध्यक्ष अमित शाहसुद्धा यावेळी उपस्थित होते. यावेळी बाबा रामदेव यांनी उपस्थितांकडून योगासने करुन घेतली.

फरीदाबादमधल्या हुडा ग्राऊंडमध्ये या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी सूर्यनमस्कार आणि शीर्षासनासंदर्भात विश्वविक्रम नोंदवला जाण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

राजधानी दिल्लीतही खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

==========================================

विक्रोळी स्थानकात अज्ञाताची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या

विक्रोळी स्थानकात अज्ञाताची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या
मुंबई: मुंबईत विक्रोळी रेल्वे स्टेशनवर एक अज्ञात व्यक्ती आत्महत्या करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. काल दुपारी दीड वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर जवळपास 40 वर्षीय इसमानं लोकलसमोर येऊन आत्महत्या केली. प्लॅटफॉर्मवर लोकल येत असल्याचं पाहून हा व्यक्ती प्लॅटफॉर्मवरुन उडी घेत थेट रेल्वे रुळासमोर आला. त्यामुळं या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मृत व्यक्तीचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. रेल्वे पोलीस या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
==========================================

खडसेंची न्यायालयीन चौकशी होणार, सरकार न्यायमूर्तींचं नाव घोषित करणार

खडसेंची न्यायालयीन चौकशी होणार, सरकार न्यायमूर्तींचं नाव घोषित करणार
मुंबई: भोसरी एमआयडीसीच्या जमीन प्रकरणात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात न्यायालयीन चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. लवकरचं राज्य सरकार या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींचं नाव जाहीर करणार आहे.

या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी खडसेंची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतचं पुण्याच्या कार्यकारणीत मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसेंची जाहीर पाठराखण केली होती.

सरकारचं काम प्रामाणिकपणे सुरु आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावरील सर्व आरोप हे तथ्यहीन आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे. जनतेला कन्व्हिन्स करु शकत नाहीत, म्हणून कन्फ्युज करण्याचा विरोधकांचा डाव आहे. असं म्हणत फडणवीस यांनी खडसेंची पाठराखण केली होती. त्यामुळे याप्रकरणी खडसेंना क्लिन चीट मिळते का? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
==========================================

शर्टात कॉपी, पॅडखाली कॉपी, साडे 8 हजार सरकारी कर्मचारी सापडले !

शर्टात कॉपी, पॅडखाली कॉपी, साडे 8 हजार सरकारी कर्मचारी सापडले !
नांदेडः वर्गात कॉपी.. शर्टात कॉपी.. पॅडखाली कॉपी.. सगळीकडे कॉपीच कॉपी..भरारी पथकाला नांदेड विभागातील 85 केंद्रांवर हे दृश्यं दिसत होतं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत पदोन्नती मिळवण्यासाठी डिग्री घेणाऱ्या एक दोन नव्हे तर तब्बल 8 हजार 400 सरकारी कर्मचाऱ्यांना कॉपी करताना पकडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे कॉपी करताना सापडलेले लोक पाहा.. कोणी तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस अशा पदांवर कार्यरत आहेत.


विद्यार्थ्यांना कॉपी मुक्तीचे धडे देणारे शिक्षक, बेकायदेशीर कृत्यांना लगाम घालणारे पोलिस, जनतेची सेवा करणारे ग्रामसेवक, तलाठी, शेतकरी ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात असे कृषी सहाय्यक आणि रुग्णांची सेवा करणारे आरोग्य कर्मचारी पदोन्नतीसाठी किती लाचार झाले आहेत, हे समोर आलं आहे.
==========================================

आतापर्यंत भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस

आतापर्यंत भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस
मुंबईः तब्बल दहा वर्षानंतर मान्सून पूर्व विदर्भातून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात सरासरीने पर्जन्यमान कमी असलं तरी दुष्काळाने होरपळत असलेल्या मराठवाड्यासाठी मात्र आशादायी वातावरण आहे. महाराष्ट्रात केवळ मराठवाड्यातच सरासरीप्रमाणे पाऊस पडला आहे.


जून महिन्यात जरा उशीराने का होईना मान्सूनचं आगमन झालं असलं तरी संपूर्ण देशात सध्या सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचं चित्र दिसत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.
==========================================

'मोहेंजोदडो'चं ट्रेलर लाँच, हृतिक रोशनचा अनोखा अवतार

'मोहेंजोदडो'चं ट्रेलर लाँच, हृतिक रोशनचा अनोखा अवतार
नवी दिल्लीः हृतिक रोशनचा मच अवेटेड ‘मोहेंजोदडो’ सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेता हृतिक रोशनचा कधीही न पाहिलेला अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


सिनेमाच्या ट्रेलरमधून हृतिक रोशनने केलेला अभिनय प्रेक्षकांना सरप्राईज असणार आहे. जोधा अकबर सिनेमानंतर हृतिकचा हा अनोखा अंदाज प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.


सिनेमात हृतिक रोशन आणि नवोदित अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केलं आहे, तर निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर हे आहेत. हा सिनेमा येत्या 12 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे.
==========================================

तिहेरी हत्याकांडाने मेरठ हादरलं, कंडोम सापडल्यानं गूढ वाढलं!

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एलआयसी ब्रँच मॅनेजर आणि त्यांच्या पत्नीची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली आहे. मृत पती-पत्नीचे शव ज्या रुममध्ये सापडले, तिथे नग्न अवस्थेत एका तरुणीचाही मृतदेह सापडला आहे. त्यामुळे प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे. मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही.


मृत तरुणी कोण आहे, याचा तपास पोलीस करत असून, तरुणीच्या मृतदेहाच्या बाजूला कंडोम सापडले आहेत. त्यामुळे बलात्कार करुन तरुणीची हत्या केल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.


या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यात तरुणीच्या मृतदेहाशेजारी कंडोम सापडल्याने प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे.
==========================================

भारताकडून झिम्बाब्वेचा 10 विकेट्सने धुव्वा

भारताकडून झिम्बाब्वेचा 10 विकेट्सने धुव्वा
हरारेः धोनीच्या टीम इंडियाने हरारेच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात झिम्बाब्वेचा दहा विकेट्स राखून धुव्वा उडवला आणि तीन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात झिम्बाब्वेनं भारताला विजयासाठी केवळ 100 धावांचं माफक आव्हान दिलं होतं.


या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या मनदीप सिंहने अर्धशतक झळकावलं. मनदीपने 40 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 52 धावांची खेळी उभारली. तर लोकेश राहुलने 40 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 47 धावा ठोकल्या. मनदीप आणि राहुलने 103 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.


बरिंदर सरन आणि जसप्रित बुमराने भारताच्या विजयाचा पाया घातला. सरनने दहा धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढून झिम्बाब्वेच्या आघाडीच्या फळीचं कंबरडं मोडून ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये आपलं पदार्पण साजरं केलं. तर जसप्रीत बुमराने 11 धावांत तीन विकेट्स काढल्या.
==========================================

म्हाडाचं घरं आता मोठं, क्षेत्रफळातील विसंगती अखेर दूर

म्हाडाचं घरं आता मोठं, क्षेत्रफळातील विसंगती अखेर दूर
मुंबई : म्हाडाच्या ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळातील विसंगती राज्य सरकारने अखेर दूर केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून घरांच्या क्षेत्रफळातील विसंगती दूर करण्याबाबत राज्य सरकार विचार करत होतं.

सुधारित क्षेत्रफळ:

  • अत्यल्प उत्पन्न गट- 300 चौरस फुटांपर्यंत – ऐवजी – आता 30 चौ. मी.पर्यंत
  • अल्प उत्पन्न गट – 475 चौर फुटांपर्यंत – ऐवजी – आता 30 चौ.मी. पेक्षा जास्त व 60 चौ. मी.पर्यंत
  • मध्यम उत्पन्न गट – 650 चौ. फुटांपर्यंत – ऐवजी – आता 60 चौ.मी.पेक्षा जास्त व 80 चौ.मी.पर्यंत
  • उच्च उत्पन्न गट – 1076 चौ.फुटांपर्यंत – ऐवजी – आता 80 चौ.मी.पेक्षा जास्त व 100 चौ.मी.पर्यंत

म्हणजेच उच्च उत्पन्न गट सोडल्यास अल्प, अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न गटांच्या घरांचं क्षेत्रफळ वाढवलं आहे. अर्थात क्षेत्रफळांनुसार किंमतीतही वाढ असणार आहे. मात्र, जास्त आकाराचं रुम मिळणार असल्याने नागरिकांना ही एकप्रकारे खुशखबरच ठरणार आहे.
==========================================

मुंबई लोकल LIVE: प्रवाशांचा संताप, पंचवटी एक्स्प्रेसवर दगडफेक

मुंबई लोकल LIVE: प्रवाशांचा संताप, पंचवटी एक्स्प्रेसवर दगडफेक
गेल्या दीड तासांपासून मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात एकही लोकल न आल्यानं संतापलेले प्रवासी रेल्वे रुळावर ठाण मांडून बसले आहेत. ट्रॅकवर उतरलेल्या प्रवाशांनी पंचवटी एक्स्प्रेसवर दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे.

अनेकांकडून या ठिकाणी एक्स्प्रेस रोखण्याचाही प्रयत्न होतोय. आज मुंबईत पहाटे पहिल्यांदाच  मोठा पाऊस झाला…मात्र काही तासातच अनेक ठिकाणी पाणी साचलं आणि तिन्ही मार्गावरची वाहतूक कोलमडून पडली.

सध्या कल्याण, डोंबिवली आणि ठाणे स्थानकांवरही मोठी गर्दी झालीय… सीएसटीकडे जाणारी जलदगती वाहतूक धीम्या मार्गावरुन वळवली गेलीय…तर तिन्ही मार्गावरची लोकल वाहतूकही उशिरानं सुरु आहे..

दिवा स्थानकावर तासाभरापासून लोकल नाही, त्यामुळे संतप्त प्रवासी ट्रॅकवर उतरले आहेत.  मुंबईत काल रात्री  पडलेल्या मुसळधार पावसाने तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
==========================================

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आज मुलाखत

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आज मुलाखत
कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आज कोलकातामध्ये मुलाखत होणार आहे. अनिल कुंबळे, रवी शास्त्री, संदीप पाटील यांच्यासह सात उमेदवार प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, अनिल कुंबळे प्रशिक्षक बनण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
==========================================

'सुलतान'च्या शूटिंगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटायचं : सलमान

'सुलतान'च्या शूटिंगनंतर बलात्कार पीडितेसारखं वाटायचं : सलमान
Photo Courtesy : YRF Video
मुंबई : अनेक वादांमुळे कायम चर्चेत असलेला बॉलिवूडचा सुपरस्टार पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. ‘सुलतान’ चित्रपटाच्या शुटिंगनंतर आपल्याला बलात्कार पीडितेसारखं वाटत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य सलमान खानने केलं आहे.

‘दररोज 120 किलो वजनाच्या माणसाला 10 वेगवेगळ्या अँगलमधून 10 वेळा उचलावं लागत होतं. दररोज सहा तास ही कसरत केल्यानंतर मला धड चालताही येत नव्हतं. कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडताना मला बलात्कार झाल्यासारखं वाटायचं’ असं विधान सलमानने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत केलं.

सलमानने स्वतःची तुलना बलात्कार पीडितेशी केल्याने त्याचे चाहतेही नाराज झाले आहेत. सोशल मीडियातून सलमानवर टीकेची झोड उठली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी केलेल्या मेहनतीची तुलना रेप पीडितेशी जोडणं हे लज्जास्पद असल्याचं म्हटलं जात आहे. बलात्कार पीडितेला कोणत्या यातनांना सामोरं जावं लागतं, याची कल्पना सलमान कधीच येऊ शकत नाही, असंही म्हटलं जात आहे.
==========================================

शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूपत्राचा वाद, जयदेव यांची 18 जुलैपासून उलटतपासणी

शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूपत्राचा वाद, जयदेव यांची 18 जुलैपासून उलटतपासणी
मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरून सुरू असलेल्या वादात येत्या 18 जुलैपासून जयदेव ठाकरे यांची उच्च न्यायालयात उलटतपासणी होणार आहे.

न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर या संदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यावर जयदेव यांची येत्या 18 जुलैपासून उलटपासणी होणार असून दैनंदिन ही सुनाणी होईल, असे न्यायालयाने जाहीर केले.

बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. यावर जयदेव यांनी आक्षेप घेत बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली असताना हे मृत्यूपत्र तयार करण्यात आले आहे. यामध्ये सर्व मालमत्तेचा तपशील नाही, असा आरोप जयदेव यांनी केला.

त्यामुळे यावर न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. सुरूवातीला न्यायालयाने या वादावर सामोपचाराने तोडगा काढण्याची सूचना उद्धव व जयदेव यांनी केली होती. सामोपचाराने तोडगा न निघाल्याने याची रितसर सुनावणी सुरू झाली. आतापर्यंत या वादात बाळासाहेबांचे डॉक्टर जलील परकार, अनिल परब यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
==========================================

पारसिक बोगद्याजवळ संरक्षक भिंत कोसळून फास्ट ट्रॅकवरील वाहतूक पुर्णपणे ठप्प


  • ऑनलाइन लोकमत - 
    ठाणे, दि. 21 -  उदयनगर येथे पारसिक बोगद्याजवळ संरक्षक भिंतीचा कठडा रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याने ठाणे स्थानकातील
    फास्ट ट्रॅकवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. संरक्षक भिंतीचा कठडा कोसळल्याने दरड कोसळण्याची भीती व्यक्त असून तात्काळ ब्लॉक घेऊन संरक्षण भिंतीचं काम करण्यात यावे, अशी विनंती महापालिकेने मध्य रेल्वेच्या अधिका-यांकडे केपूली आहे. दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकावर फास्ट ट्रॅकवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे.  
    खासदार श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे अधिका-यांशी यासंबंधी बातचीत केली आहे. कल्याण आणि ठाणेदरम्यान जास्तीत जास्त बसेस सुरु करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवाशांना एक्स्प्रेस प्रवास करण्याची मुभा देण्याचीही विनंती केली आहे.  कल्याण डोंबिवली पालिकेच्या अतिरिक्त बसेस नवी मुंबई. ठाण्याच्या दिशेने, तर ठाण्याच्या बसेस नवी मुंबई आणि कल्याणच्या दिशेनं सोडणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.
==========================================

मुस्लिम बांधवांच्या रमजानसाठी हिंदू देतोय जागता पहारा

  • ऑनलाइन लोकमत - 
    कानपूर, दि. 21 - रमजानमध्ये उपवास असल्याने मुस्लिमांना सकाळी लवकर उठावं लागतं. रमजानमध्ये दिवसभर पाणीही न पिता रोजे केले जातात. दिवस उगवण्याच्या आधी म्हणजे पहाटे पाचच्या आधीच नाष्टा, जेवण केले जाते. त्यामुळे साहजिकच पहाटे लवकर उठावे लागते. अनेकदा ही जबाबदारी घरातील महिलेवर असते. पण उत्तरप्रदेशातील मुबारकपूरमध्ये मुस्लिम बांधवाना वेळेत पहाटे उठता यावं यासाठी गुलाब यादव नामक इसमाने ही जबाबदारी स्वीकारली असून ते त्यांच्या 12 वर्षाच्या मुलासोबत पहाटेपासूनच जागे असतात. 
    उत्तरप्रदेशातील मुबारकपूर बनारसी साडी कामगारांसाठी प्रसिद्द आहे. पहाटेचे 1 वाजले आहेत, आणि गावात फक्त दोनच व्यक्ती जाग्या आहेत. रमजानमध्ये गुलाब यादव यांचा दिवस मध्यरात्री एकपासूनच सुरू होतो आणि त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अभिषेकही जागा असतो. ना त्यांचा उपवास असतो, ना ते धर्माने मुस्लिम..! पण तरीही मुस्लिम बांधवांना पहाटे वेळेत उठता यावं या जबाबदारीच्या जाणीवेमुळे यादव  व त्यांचा मुलगा जागे राहून घरोघरी जाऊन सर्वांना लवकर उठवतात. 
    गुलाब यादव आणि अभिषेक 1 ते 3 वाजेपर्यंत सर्वांना उठवण्याचं काम करत असतात. विशेष म्हणजे एका घरातील सर्व व्यक्ती जोपर्यत उठत नाही तोपर्यंत ते दुस-या घराकडे वळत नाहीत. गुलाब यादव यांच्या कुटुंबात 1975 पासून ही परंपरा सुरु आहे.
    मात्र हे का आणि कसं सुरु झालं ? हे गुलाब यादव यांना आठवतही नाही. 'यामुळे मनाला शांतता मिळत असावी. माझ्या वडिलांनी हे सुरु केलं, त्यानंतर माझ्या मोठ्या भावाने काही वर्ष ही परंपरा सुरु ठेवली आणि त्यानंतर मी आता हे काम कायम ठेवलं आहे. प्रत्येक रमजानला मी येथे येतो आणि सर्वांना उठवतो', असं गुलाब यादव सांगतात.
==========================================

शौचास जाणा-या तरुणावर बिबटयाचा हल्ला


  • ऑनलाइन लोकमत 
    लासलगाव, दि. २१-  येथुन पंधरा किलोमीटर अंतरावरील  वाहेगाव भरवस येथील मार्तंड वसंत डुंबरे (२७)  या युवकाला मंगळवारी सकाळी शौचास  जात असताना शेतात दबा धरून बसलेल्या  बिबट्याने जोरदारपणे कमरेवर चावा घेतल्याने त्यास तातडीने गंभीर जखमी अवस्थेत नासिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    वाहेगाव भरवस येथे  सकाळी 6.30 दरम्यान मार्तंड वसंत डुंबरे बाहेर शौचास गेलेला असताना बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर तातडीने भरवस फाटा येथील डॉ. राजेंद्र नागरे यांनी प्राथमिक उपचार केले व त्यानंतर निफाडचे उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येऊन त्यास तातडीने नासिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    या बिबट्याच्या हल्ल्याने देवगाव व भरवस फाटा परीसरातील शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. वनखात्याने तातडीने पिंजरे लावुन या नरभक्षक बिबट्याला पिंज-यात पकडण्यात यावे अशी मागणी केली आहे.
==========================================

विदर्भातील ५५ टक्के आत्महत्या मदतीला अपात्र


  • प्रदीप भाकरे,  अमरावती
    राज्य शासनाने शेतकरी आत्महत्यांबाबतही निकषांची चौकट आखल्याने तब्बल ५५ टक्के आत्महत्या पात्र-अपात्रतेच्या जंजाळात अडकल्या आहेत. गत साडेपंधरा वर्षांत विदर्भातील सहा जिल्ह्यांत एकूण १२ हजार ७७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तथापि त्यापैकी ५५८० शेतकरी आत्महत्या या शासकीय मदतीच्या निकषाला पात्र ठरल्यात.
    विदर्भात अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोल्यासह वर्धा या सहा जिल्ह्यांत २००१ पासून शेतकरी आत्महत्यांचे दुर्दैवी सत्र सुरू झाले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अमरावती
    जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील काही गावांना भेट देऊन ‘पीएम पॅकेज’ घोषित केले. त्या पाठोपाठ ‘सीएम पॅकेज’ही आले आणि सोबतच आली मदतीसाठी पात्र-अपात्र ठरविणारी पद्धत. तहसीलदारांच्या अहवालावरून आत्महत्या पात्र-अपात्र ठरू लागल्या.
    गळफास घेऊन, विषाचा घोट घेऊन आणि प्रसंगी आत्मदहन करून स्वत:ला संपविणाऱ्या
    शेतकऱ्यांनंतर त्यांंच्या कुटुंबीयांची मात्र यात फरफट झाली. सन २००१ पासून १२ हजार ७७० शेतकरी आत्महत्यांची सरकार दरबारी नोंद असली, तरी त्यापैकी ५५ टक्के अर्थात ७,०४० आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.
==========================================

मालकाची ३० लाखाची एसयूव्ही चोरुन टॅक्सीमध्ये बदलली


  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. २१ - मालकाची तीस लाखाची एसयूव्ही फॉर्च्युनर गाडी चोरुन खासगी टॅक्सीमध्ये बदलणा-या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. महेश जिवाच असे आरोपीचे नाव असून, ११ जूनला त्याने  पंचतारांकित हॉटेलमधून गाडीची चोरी केली. ठाण्याचे रहिवासी संदीप गोम्स (३५) यांच्याकडे महेश ड्रायव्हर म्हणून काम करायचा. 
    संदीप गोम्स पंचतारांकित हॉटेलमध्ये जीम इन्स्ट्रक्टरचे काम करतात. पाहुण्याची ने-आण करण्यासाठी गाडी ते हॉटेलमध्ये ठेवायचे. ११ जूनला महेश हॉटेलमधून गाडी घेऊन गेला. त्यानंतर गोम्स यांनी दुस-यादिवशी संर्पक साधण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन स्विचऑफ येत होता. 
    त्यामुळे गोम्स यांचा संशय बळावला व त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. महेशला बहिणीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. म्हणून त्याने गाडी चोरली. त्याने अलहाबाद आणि बिहारमध्ये गाडी विकण्याचा प्रयत्न केला. पण त्याला गाडी विकणे जमले नाही. त्यानंतर अलहाबादमध्ये त्याने एसयूव्हीला टॅक्सीमध्ये बदलले. 

==========================================

व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा : मुंबईसह दहा ठिकाणी ईडीचे छापे


  • नवी दिल्ली : व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सौद्यातील मनी लाँडरिंग प्रकरणाच्या तपासात नव्याने कारवाई करताना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद येथील काही कंपन्यांच्या दहा ठिकाणांवर एकाचवेळी छापे घातले. या छाप्यादरम्यान कंपन्यांचे ८६ कोटी रुपये किमतीचे शेअर गोठविण्यात आले.
    हेलिकॉप्टर घोटाळ्याशी संबंध असल्याचा संशय असणाऱ्या या कंपन्या आणि व्यक्तींच्या ठिकाणांवर घातलेल्या या छाप्यात अनेक दस्तऐवज जप्त करण्यात आल्याचे ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मनी लाँडरिंग प्रतिबंधात्मक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींअंतर्गत हे छापे घालण्यात आले. यावेळी कंपन्यांचे दुबई, मॉरिशस व सिंगापूर येथे असलेले ८६ कोटी रुपयांचे शेअर गोठविण्यात आले.
    ईडीने या हेलिकॉप्टर्स घोटाळ्याच्या संदर्भात नुकतेच नवे आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात ब्रिटिश नागरिक आणि या सौद्यात दलाल म्हणून काम करणारा ख्रिस्टीयन मिशेल जेम्स याला आरोपी बनविण्यात आले होते. ईडीने २०१४ मध्ये या संदर्भात पीएमएलएअंतर्गत एफआयआर दाखल केला होता.
==========================================

…. अखेर विंडोज -१० ला फेसबुक अॅप मिळाले


  • अनिल भापकर 
    औरंगाबाद, दि. २० - टेक्नो जगतातील दोन दादा कंपन्या एक म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि दुसरी म्हणजे फेसबुक.मायक्रोसॉफ्ट ही ऑपरेटिंग सिस्टम मधील दादा कंपनी तर फेसबुक ही सोशल मेडिया मधील दादा कंपनी. मात्र असे असूनही मायक्रोसॉफ्टच्या विंडोज -१० ह्या ऑपरेटिंग सिस्टमला अजून पर्यंत फेसबुक अॅप ऑफिशियली उपलब्ध झालेले नव्हते. मात्र आता विंडोज -१० मोबाइल आणि पीसी धारकांसाठी गुड न्यूज आहे, फेसबुक ने विंडोज -१० साठी ऑफिशियल फेसबुकअॅप उपलब्ध केले आहे.
    आतापर्यंत विंडोज -१० युझर्स साठी जे फेसबुक अॅप उपलब्ध होते ते मायक्रोसॉफ्टने डेव्हलप केलेले होते . मात्र आता फेसबुक ने जगभरातील विंडोज -१० युझर्स वर लक्ष केंद्रित करत त्यांच्या साठी फेसबुक अॅप उपलब्ध केले आहे. सध्या हे फेसबुक अॅप चे बीटा व्हर्जन मध्ये उपलब्ध असले तरी लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होईल असे विंडोज सेन्ट्रल डॉट कॉम या साईट ने म्हटले आहे. 
==========================================

No comments: